Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘वैद्यनाथ’वर सीबीआयचे छापे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, मुंबई/औरंगाबाद
राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांच्या भगिनी व भाजपच्या बीड येथील खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचे वर्चस्व असलेल्या वैद्यनाथ अर्बन को-ऑप. बँकेमध्ये गेल्या आठवड्यात १० कोटी १० लाख रुपयांच्या नोटा सापडल्याप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी घाटकोपर पोलिस ठाण्यात बँकेच्या तीन अधिकाऱ्यांसह औरंगाबादमधील सिग्मा हॉस्पिटलविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सीबीआयने बँकेच्या मुंबईसह पुणे, बीड आणि औरंगाबाद येथील ११ कार्यालयावर छापे टाकले. औरंगाबाद शहरातील नामवंत सिग्मा हॉस्पिटलमध्येही अधिकाऱ्यांनी चौकशी करुन कागदपत्र ताब्यात घेतली आहेत. राज्यात बँकेच्या ४१ शाखा आहेत. या बँकेचे मुख्यालय बीडमध्ये आहे.
वैद्यनाथ सहकारी बँकेची दहा कोटी दहा लाखांची रोकड मुंबईत जप्त करण्यात आली होती. २५ कोटी रुपयांची रक्कम परळीतील राष्ट्रीयकृत बँकानी न स्वीकारल्यामुळे ती रक्कम मुंबईला पाठविण्यात आली. मुंबई पोलिसांनी १९ डिसेंबर रोजी यागेश शिरोये यांच्या मालकीची कार तपासली. पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी कारची तपासणी केली असता, त्यात हजार व पाचशे रुपयांच्या या जुन्या चलनातील दहा कोटी रुपये आणि नव्या चलनातील दहा लाख रुपये सापडले. दोन हजार रुपयांच्या नवीन नोटचा त्यात समावेश होता. वैद्यानाथ बँकेच्या कर्मचारी कृष्णा सातपुते हे कार चालवत होते. पिंपरी-चिंचवड शाखेचे व्यवस्थापक शिरीष धर्मराज थिगळे, गजानंद सोमनाथ स्वामी हे त्या कारमध्ये बसले असल्याचे घाटकोपर पोलिस ठाण्याच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. बँकेचे घाटकोपर शाखेचे बी. एम. शाह यांच्यासह पिंपरी-चिंचवडच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत पंधरा कोटी रुपये भरले आणि उर्वरित रक्कम पोलिसांनी मोटारीने बीडला नेताना मुंबई पोलिसांनी ही मोटर ताब्यात घेतली होती.
बँकेची घाटकोपर शाखामध्ये साडेतीन कोटी रुपयांचे डिपॉझिट असते त्यापैकी १ कोटी ९८ लाख रुपयांची रोकड सिग्मा हास्प‌िटलच्या खात्यात डिपॉझिट करण्यात आली. मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर सुरेश अडवाणी यांच्या घरातून ही रक्कम नेण्यात आली होती. बँकेचे शिरीष थिगळे, कृष्णा सातपुते, गजानंद स्वामी आणि बी. एम. शाह यांनी योगेश शिरोये, डॉ. सुरेश अडवाणी, सिग्मा हॉस्पिटल यांच्याशी संगनमत करून कटकारस्थान केल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. या सर्वांनी केंद्र शासन आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लघंन केले आहे. बँकेचे कर्मचारी हे लोकसेवक आहेत म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, असे एफआयआरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. सीबीआयने भारतीय दंड संहितेच्या कलम १२० (ब), कटकारस्थान, कलम ४२० (फसवणूक), कलम ४०६ (विश्वासघात) आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दहा कोटींची रक्कम ही वैद्यनाथ बँकेचीच आहे. या रकमेचा पूर्ण हिशेब आमच्याकडे आहे. - डॉ. प्रीतम मुंडे, खासदार, भाजप

१ कोटी ९८ लाख रुपये आमच्याच खात्यात भरलेले आहेत. ती रोकड स‌िग्मा हॉस्प‌िटलचीच आहे. याच्या कागदोपत्री नोंदी आहेत. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी आमच्या हॉस्प‌िटलमध्ये येऊन कागदपत्रांची तपासणी केली आहे. - डॉ. उन्मेष टाकळकर, सीईओ, सिग्मा हॉस्पिटल

परळीच्या शाखेत जाऊन सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. या चौकशीत ही रोकड वैद्यनाथ बॅँकेचीच आहे का याची विचारणा करण्यात आली. ही रोकड वैद्यनाथ बॅँकेचीच आहे. ती खातेदारांकडून आलेली आहे. ज्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे ते अधिकारीही बॅँकेचेच आहेत. याची सत्यता सीबीआयने तपासली. - एस. एस. जोशी, विधी अधिकारी, वैद्यनाथ बॅँक

यांच्याविरुद्ध गुन्हा
- बी. एम. शाह, व्यवस्थापक, वैद्यनाथ बँक, घाटकोपर
- शिरीष थिगळे, व्यवस्थापक, वैद्यनाथ बँक, पिंपरी-चिंचवड
- योगश शिरोये, कार मालक, पिंपरी-चिंचवड
- कृष्णा सातपुते, कर्मचारी, वैद्यनाथ बँक
- गजानंद स्वामी, कर्मचारी, वैद्यनाथ बँक
- सिग्मा हॉस्पिटल, औरंगाबाद
- डॉ. सुरेश अडवणी, मुंबई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कॅशलेस’ योजनेमुळे आठ हजारांचा फटका

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नोटबंदीने एकीकडे सामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता एकेक घोळ समोर येत आहेत. जुनेद अहेमद यांनी एका दुकानातून किराणा सामानाची खरेदी केली. त्याचे बिल त्यांनी स्वाइप कार्डद्वारे दिले. तेव्हा त्यांच्या खात्यातून अतिरिक्त आठ हजारांची रक्कम वळती झाल्याचा प्रकार घडला. याबाबत स्टेट बॅँक ऑफ इंडियाकडे त्यांनी विचारणा केल्यास टोलवाटोलवीचे उत्तरे मिळत आहेत.
जुनेद यांनी ९ डिसेंबर रोजी शहरातील महावीर दाल सेंटर येथून ७ हजार ४८० रुपयांच्या किराणा मालाची खरेदी केली. या खरेदीनंतर बिल स्वाइप मशीनद्वारे दिले. एसबीआयचे (जुना मोंढा, शाखा) कार्ड स्वाइप करताच जुनेद यांना बॅँक खात्यातून ७ हजार रुपये वळते केल्याचा संदेश आला. मात्र, हे पैसे दुकानदाराच्या खात्यावर जमा झालेच नाहीत. त्यामुळे दुकानदाराने पुन्हा पाचशे, पाचशे रुपयांचे पुन्हा स्वाइप केले. तरीही दुकानदाराच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. मात्र, जुनेद यांच्या खात्यातून पुन्हा एक हजार रुपये वळते झाल्याचा संदेश आला. अखेर दुकानदाराने दुसरी स्वाइप मशीन आणून सात हजार ४८० रुपयांचे पुन्हा स्वाइप केले. तेव्हा ही रक्कम दुकानदाराच्या खात्यावर जमा झाली. या घोळात जुनेद यांचे अतिरिक्त आठ हजार रुपये बॅँकेतून वळते झाले. याबाबतची माहिती त्यांनी स्टेट बॅँकेला दिली. आपल्या खात्याचे बॅँक स्टेटमेंट, महावीर दाल सेंटरच्या दुकानदाराचे बॅँक स्टेटमेंट बॅँकेत दिले. माझे अतिरिक्त आठ हजार कुठे वळते झाले, याची विचारणा बॅँकेकडे केली. एसबीआयच्या कस्टमर सर्व्हिस सेंटरसह शाखा बँक आणि बँकेच्या अधिकृत मेलवर ही त्यांनी तक्रार नोंदवली. मात्र, त्यांना कुणीही उत्तर देत नाही. शिवाय पैसे परत मिळतील का? असा प्रश्न त्यांनी बॅँकेत केला, तर त्यांना मुख्य बॅँकेत जाण्याच्या सूचना देण्यात आल्या.

अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी
जुनेद एसबीआयच्या मुख्य बँकेत गेले. मात्र, तिथल्या अधिकाऱ्यांनी त्यांना पुन्हा शाखा कार्यालयाकडे पाठविले. बॅँकेच्या तांत्रिक चुकेमुळे मागील चौदा दिवसांपासून स्वतःचे हक्काचे पैसे मिळविण्यासाठी जुनेद यांना चकरा माराव्या लागत आहेत. बॅँक अधिकारी मात्र टोलवाटोलवी करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळ अनुदान घोटाळ्यात गुन्हे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुष्काळाने देशोधडीला लागलेले कुटुंब, वाढत्या शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारने दुष्काळी अनुदान जाहीर केले. मात्र, निबर कातडीच्या अधिकाऱ्यांनी इथेही मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार केला. याचे पडसाद शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उमटले. या घोटाळ्याची सखोल चौकशी करून आठ दिवसांत दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले.
मराठवाड्यात गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. नैसर्गिक आपत्तीने सैरभैर झालेल्या शेतकऱ्यांना आधार म्हणून सरकारने दुष्काळी अनुदानाची घोषणा केली. पंचनाम्यानंतर अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्याला दोन वर्षांमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला. मात्र पैठण, गंगापूर तालुक्यात या निधीवर डल्ला मारण्याचा संतापजनक प्रकार घडला. हा घोटाळा आमदार अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडला. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दुष्काळी अनुदान वाटप करताना प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला. ज्यांच्या नावावर जमीन नाही त्यांनी दुसऱ्याचा सातबारा वापरून अनुदान लाटले. ज्यांच्यावर कर्ज नाही अशा लोकांनाही तब्बल १६ लाखांपर्यंतचे अनुदान वाटप झाले. जमीन नसतानाही बँकेत खाते उघडून अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली. हे प्रकार ऐकताच पालकमंत्री कदम संतप्त झाले. ‘ज्यांची जमीन नाही त्यांना अनुदान मिळते कसे ? अनुदान वाटपात झालेला घोळ गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या अनुदानाचा घोळ करणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही. जे शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले असतील त्यांच्या अनुदानाची अधिकाऱ्यांकडून वसुली करण्यात येईल. या गैरव्यवहार प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसात चौकशी करावी,’ असे आदेश त्यांनी दिले.

एक कोटीचा घोटाळा
‘जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी दुष्काळी अनुदान वाटपाची फेर चौकशी केली आहे. यात सुमारे १ कोटीचा घोटाळा असल्याचे आढळून आले आहे,’ अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊ शाळांचे पगार रोखले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुचविलेल्या अतिरिक्त शिक्षकांना समायोजित करून न घेतल्याने शिक्षण विभागाने नऊ शाळांना दणका देत येथील शिक्षक, कर्मचाऱ्यांचे पगार दोन महिन्यांपासून थांबविले आहेत.
राज्य सरकारच्या धोरणानुसार अतिरिक्त शिक्षकांना समायोजित करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यामध्ये ९८ शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत. या शिक्षकांना जिल्हा परिषदेकडून घरबसल्या वेतन द्यावे लागत असल्याने या सर्व शिक्षकांचे इतर खासगी शाळांमध्ये समायोजन करण्याचा शिक्षण विभागाने निर्णय घेतला. यानुसार, काही दिवसांपूर्वी यातील २१ शिक्षकांच्या समायोजनाचे आदेश काढण्यात आले. मात्र, यातील फक्त ९ शिक्षकांनाच पदस्थापना मिळाली. अन्य शाळांनी शिक्षण विभागाने सूचविलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्यास नकार दिला. शिक्षण विभागाने पाठपुरावा करत या शाळांना अनेक वेळा नोटीस बजावली. त्यात शिक्षकांचे समायोजन करून घ्यावे असे आदेशित केले होते. मात्र, या आदेशाला या शाळांनी जुमानले नाही. काही ठिकाणी कोर्टाची कारणे सांगितली गेल्याचे झेडपीच्या शिक्षण विभागातूल सूत्रांनी सांगितले.

संबंधित शाळांनी समायोजन करणे आवश्यक आहे. या कारवाईनंतरही जर अंमलबजावणी झाली नाही, तर या शाळांमधील रिक्त पदे कायमची रद्द केली जातील. - आर. एस. मोगल, शिक्षणाधिकारी

या आहेत शाळा
- सरस्वती भुवन प्राथमिक शाळा, औरंगपुरा
- शारदा मंदिर प्राथमिक शाळा, औरंगपुरा
- संस्कार प्रबोधिनी शाळा, औरंगाबाद
- शिवाजी प्राथमिक शाळा, खोकडपुरा
- ज्ञानकिरण प्राथमिक शाळा, मुकुंदवाडी
- त्रिमूर्ती प्राथमिक शाळा, वाळूज
- एकनाथ विद्यामंदिर, हर्सूल
- भीमाशंकर प्राथमिक शाळा, वाहेगाव (ता.पैठण)
- श्रीनाथ प्राथमिक शाळा, पैठण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन बसची टक्कर; पाच ठार, दहा गंभीर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
येणेगुरजवळ दोन बसची टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांसह पाच जण जागीच ठार, तर २६ जण जखमी झाले. यातल्या १० जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उमरगा येथून पुण्याकडे निघालेली इंदापूर आगाराची बस (क्रमांक एमएच १४ बीटी ३२५४) आणि तुळजापूरहून आळंदकडे निघालेली कर्नाटकातील आळंद डेपोची बस (क्रमांक केए २८ एफ १६०३) यांची मुंबई - हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग-उमरगा दरम्यानच्या येणेगुरजवळ धडक झाली. या अपघातात दोन्ही बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातातील मृतांमध्ये दोन बसच्या चालकांसह दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. शिवाजी मारुती साळुंके, वामन मारुती साळुंके, लक्ष्मण दत्तात्रय म्हेत्रे (वांगी, ता. भूम, बसचालक), आंबराया शिवराया तेलीकुणे (रा. आळंद), राहुल रमाकांत कठारे (रा. मुरुम ता. उमरगा) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी मुरुम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीडीआर घोटाळा: मोबदला इतिवृत्त पोलिसांच्या ताब्यात

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिका प्रशासनातील मुखंडांनी केलेल्या बहुचर्चित टीडीआर घोटाळा प्रकरणात अखेर पोलिसांनी तपास सुरू केला असून त्यांनी रोखीने मोबदला देण्याच्या संदर्भात स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयाचे इतिवृत्त ताब्यात घेतले आहे. रोखीने मोबदला मिळालेला असतानाही त्याच जागेसाठी टीडीआर मागितल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
चेलिपुरा व मंजूरपुरा येथील जमिनीच्या प्रकरणात मोबदला घेताना व देताना ‘डबलगेम’ झाल्याचे प्रकरण ‘मटा’ने उघडकीस आणले. या दोन्ही भागातील रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी भूसंपादन करण्यात आले होते. भूसंपादनाचा प्रत्येकी ८ लाख २५ हजार रुपयांचा मोबदला महापालिकेने तत्कालीन स्थायी समितीच्या मंजुरीने दिला होता. रोखीने मोबदला मिळाल्यावर तब्बल दहा वर्षांनी त्याच जागेसाठी टीडीआर मागण्यात आला व पालिकेच्या नगररचना विभागाने टीडीआर देण्याची तयारी देखील केली. टीडीआर प्रमाणपत्रही तयार केले. ‘मटा’ ने प्रकरण चव्हाट्यावर आणल्यावर प्रमाणपत्र देणे थांबवण्यात आले. या प्रकरणाच्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते किशोर राजपूत यांनी पालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्याकडे तक्रार केल्यावर ‘टीडीआर’च्या दोन्ही प्रकरणात पोलिसात तक्रार देऊन गुन्हे दाखल करण्याचे आदेश बकोरिया यांनी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. बकोरिया यांच्या आदेशानुसार सिटीचौक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गेल्या आठवड्यात पालिकेत येऊन ‘डबलगेम’ प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली. स्थायी समितीच्या ज्या बैठकीत रोखीने मोबदला देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता, त्या बैठकीचे इतिवृत्त पोलिसांनी सचिव कार्यालयातून ताब्यात घेतले. या इतिवृत्ताच्या आधारे अधिक चौकशी होऊ शकेल असे मानले जात आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी
मोबदल्याच्या ‘डबलगेम’ प्रकरणात पालिकेने मोबदला मागणाऱ्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे, त्यानुसार गुन्हाही नोंद झाला आहे. मात्र, मोबदला देऊनही टीडीआर मंजूर करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मात्र पालिका प्रशासनाने अद्याप हात लावलेला नाही. आयुक्तांनी या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले असतानाही अधिकारी - कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे किशोर राजपूत यांनी आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांना पुन्हा एकदा निवेदन देऊन दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ कायद्याची नियमावली तयारः कुंटे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘विद्यापीठ कायद्याच्या नियमावलीचे (स्टॅट्यूट) काम पूर्ण झाले असून त्यानुसारच विद्यापीठांना कार्यप्रणाली अवलंबावी लागेल,’ असे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांनी शनिवारी स्पष्ट केले.
औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या कुंटे यांनी शासकीय विद्यान संस्था, शासकीय अभियांत्रिकी, फॉरेन्सिक सायन्स संस्था, शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयांना भेटी देत पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ‘नवीन कायद्याला विधिमंडळात मंजुरी मिळाल्यानंतर राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठीची प्रक्रिया सुरू आहे. कायद्याची नियमावली तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीचे काम पूर्ण झाले आहे. १९९४च्या कायद्यानुसार विद्यापीठांकडे ही जबाबदारी होती. त्यावेळी अनेक विद्यापीठांमध्ये ही नियमावलीच तयार झाली नाही. यावेळी मात्र कायद्यासोबतच नियमावली तयार करण्यात आली. त्यात स्थानिक तुरळक बदल वगळता, विद्यापीठांना याच नियमावलीत काम करावे लागणार आहे. त्यामुळे विद्यापीठांच्या कार्यशैलीत सुसूत्रता येईल. १९९४च्या कायद्यात अनेक त्रूटी होत्या, त्यामुळे हवी तेवढी प्रगती झाली नाही. नवीन कायद्यात अनेक बदल करण्यात आले असून त्यामुळे प्रशासकीय, शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. कायद्याबाबत विद्यापीठ, कॉलेजपातळीवर अधिकची माहिती व्हावी या हेतूने सेमिनार घेतले आहेत,’ असे ते म्हणाले.

कॉलेज प्रशासनाची धावपळ
उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधानसचिव भेट देण्यासाठी येणार असल्याचे कळताच कॉलेज प्रशासन खडबडून जागे झाले. कुंटे यांनी शनिवारी फॉरेन्सिक सायन्स संस्था, सायन्स संस्थेला भेट दिली. सचिव येणार असल्याने प्रयोगशाळा, अनेक शैक्षणिक उपकरणांवरील धूळ झटकली गेली. कॉलेजची प्रगती दाखविण्यासाठी लागलेली ही चढाओढ विद्यार्थ्यांमध्येही चर्चेचा विषय ठरली. सायन्स कॉलेजमधील संशोधक विद्यार्थ्यांनी कुंटे यांची भेट घेत, आपले प्रश्न मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांनी केली आयुक्तांची पाठराखण

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पालकमंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी झालेल्या जिल्हा विकास समितीच्या बैठकीत महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांचा विशेष सत्कार केला. या सत्कारामुळे पालकमंत्र्यांनी आयुक्तांची पाठराखण केल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा विकास समितीची बैठक (डीपीसी) रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत त्यांनी ध्वजनिधी संकलनात विशेष काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांचा, तर महापालिकेत आयुक्त म्हणून चांगले काम केल्याबद्दल बकोरिया यांचा सत्कार केला. बकोरिया यांनी उत्कृष्ट काम केल्याचा उल्लेख कदम यांनी यावेळी आवर्जुन केला. दोन महिन्यांपूर्वी महापौर बंगल्यात कदम यांनी शहरातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. त्या बैठकीतही त्यांनी बकोरिया यांची पाठराखण केली होती. ‘ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करायचे आहे, त्यांना निलंबित करा. शिल्लक राहिलेल्यांना सोबत घेऊन आपण काम करू,’ असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील नेते - पदाधिकाऱ्यांना चपराक बसली होती. शुक्रवारच्या जाहीर सत्काराने बकोरिया यांना विविध कामात कोंडीत लक्ष करणाऱ्या पालिका पदाधिकारी व नेत्यांना चेक बसला असल्याचे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्मचारी गणवेशासाठी ७० लाखांची तरतूद

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेतील चतर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना गणवेश देण्यासाठीचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला आहे. गणवेश खरेदीसाठी सत्तर लाखांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे सुमारे तीन कोटी ४५ लाख रुपये किंमतीचे प्रस्ताव देखील स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत.
महापालिकेत सफाई कर्मचारी व चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून सुमारे २८०० कर्मचारी काम करतात. त्यांच्यासाठी गणवेश खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला आहे. पुरुष कर्मचाऱ्यांसाठी गणवेशासाठी कपडा घेण्यासाठी ३७ लाख ३० हजार रुपयांचा खर्च येणार आहे, तर महिला कर्मचाऱ्यांसाठी २३ लाख २४ हजार रुपये खर्च येणार आहे. सफाई कर्मचारी व चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वेगवेगळ्या रंगचा गणवेश सूचविण्यात आला आहे. दरवर्षी १४ जानेवारी रोजी या कर्मचाऱ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात येते. यंदा स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव उशिरा आल्यामुळे १४ जानेवारीला गणवेशांचे वाटप होईल की नाही या बद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

काँक्रिटचे रस्ते; वैद्यकीय खर्च
विविध वॉर्डांमध्ये काँक्रिटच्या रस्त्यांच्या कामासाठी आर्थिक तरतुदीला मान्यता देण्याचे सुमारे ३ कोटी ४५ लाख ८७ हजार ५०४ रुपयांचे प्रस्ताव देखील स्थायी समितीच्या बैठकीत आहेत. कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या परिपूर्तीचे दोन प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या समोर मंजुरीसाठी ठेवले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते रखडण्याची वर्षपूर्ती

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहराची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या जालना रोड आणि बीड बायपास रस्त्याच्या कामाचे भूमिपजून होऊन रविवारी (२५ डिसेंबर) एक वर्ष पूर्ण होईल. मात्र, या काळात दोन्ही कामाच्या डीपीआरचे (सविस्तर प्रकल्प अहवाल) घोडे प्रशाकीय पातळीवर अडल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत.
केंद्रीय रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गतवर्षी २५ डिसेंबर रोजी औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून ही कामे केली जातील, असे त्यावेळी जाहीर करण्यात आले. या रस्त्यांमध्ये नगरनाका ते केंब्रिज शाळा या जालना रस्त्याचा व बीड बायपास रस्त्याच्या समावेश करण्यात आला. या दोन्ही रस्त्यांसाठी सुमारे साडेसातशे कोटी रुपये खर्च करण्याची घोषणा गडकरींनी केली. या रस्त्यांची कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्याची मागणी आमदार अतुल सावे यांनी केली होती. आता या घटनेला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. या काळात दोन्हीही रस्त्यांची कामे सुरू झालेली नाहीत. जालना रोड व बीड बायपास रस्ता हे दोन्हीही रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याचे नियोजन साडेसातशे कोटी रुपयांच्या खर्चात केले जाणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली. रस्त्याचे काम करण्यासाठी बीड बायपासवर काहीच अडचण नाही. रस्त्यासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध आहे. भूसंपादन करण्याची गरज नाही, असेही जाहीर करण्यात आले होते. जालना रोडसाठी मात्र भूसंपादन करणे गरजेचे होते. महापालिकेने विशेष मोहीम राबवून १२० फूट रुंद रस्ता मोकळा करून दिला. त्यामुळे या रस्त्याच्या कामातील अडथळा देखील दूर झाला, पण डीपीआर व टेंडरच्या प्रक्रियेत अडकलेल्या या दोन्ही रस्त्यांची कामे तुंबली आहेत.

नागरिकांचे हाल
राज्य शासनाने शहरातील पाच रस्त्यांच्या कामासाठी पालिकेला २४ कोटी ३३ लाख रुपये दिले होते, या निधीतून ज्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे करण्यात येणार होती, त्यात महावीर चौक ते क्रांतीचौक या रस्त्याचा समावेश होता. हा रस्ता जालना रोडचाच एक भाग आहे. संपूर्ण जालना रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाच्या ताब्यात आल्यामुळे महापालिकेने महावीर चौक ते क्रांतीचौक या रस्त्याचे काम करण्यास नकार दिला. महापालिकेनेही रस्त्याचे काम केले नाही व भूमिपूजनाच्या नंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देखील अद्याप काम सुरू केले नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

जालना रोड व बीड बायपास रस्त्याच्या कामाचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार झाला आहे. पुढील महिन्यात या दोन्हीही रस्त्यांच्या कामाचे टेंडर होईल आणि त्यानंतर लगेचच दोन महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. मी या दोन्हीही रस्त्यांच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सतत पाठपुरावा करीत आहे. प्रशासकीय कामाला वेळ लागतो. - अतुल सावे, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादी’त आमदार चव्हाणांविरोधात सूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

‘आमदार सतीश चव्हाण यांच्या कार्यशैलीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमकुवत होत आहे. पक्षात कोणी मोठे होऊ नये असा प्रयत्न ते सातत्याने करत आले आहेत,’ यासह विविध आरोपांच्या फैरी झाडत राष्ट्रवादीचे स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांनी शनिवारी तोफ डागली.

राष्ट्रवादी भवनात एका पत्रकार परिषदेत पक्षाचे उपाध्यक्ष कदीर मौलाना, माजी आमदार संजय वाघचौरे, प्रदेश चिटणीस प्रा. माणिक शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य उदयसिंग राजपूत यांनी आमदार सतीश चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. कदीर मौलाना म्हणाले, ‘नगरपालिका निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळू शकले नाही. याला माजी मंत्री सुरेश धस यांना कसे जबाबदार धरता येईल? औरंगाबाद महापालिकेत राष्ट्रवादीचे संख्याबळ १३ वरून तीनवर आले. याला सतीश चव्हाण हेच जबाबदार आहेत. निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना मदत करण्याऐवजी विरोधकांना रसद पुरवण्याचे काम ते नेहमी करत आले. आमदार चव्हाण व आमदार अब्दुल सत्तार यांच्यात पक्की मैत्री असून, ‘मॅच फिक्सिंग’सारखे ते निवडणुकीचा निकाल ठरवतात. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मला पाडण्याचे राजकारण करण्यात आले. संजय वाघचौरे यांना पैठण विधानसभा निवडणुकीतही पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ‘मॅच फिक्सिंग’चा धंदा बंद होण्याची गरज आहे. त्यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच सुरेश धस यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना कोणाचेही वर्चस्व सहन होत नाही. पक्षाशी त्यांचे काहीही देणे-घेणे नाही. ते सर्वेसर्वा असल्याचे आभास निर्माण करतात. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण असते. पक्षापेक्षा कोणी मोठे नाही,’ अशा शब्दांत कदीर मौलाना यांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.


माजी आमदार संजय वाघचौरे म्हणाले, ‘औरंगाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद, लातूरच्या लोकांचा हस्तक्षेप वाढला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात कोणीही मोठा होऊ नये, असा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो. कंत्राटदार, दलालांपासून सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे. निवडणुकीत हार-जीत होत असते. त्यांनी त्यांच्या नेतृत्त्वाखाली एखादे पॅनल निवडून तरी कधी आणले आहे का? पक्षातील वरिष्ठांना चुकीची माहिती देणारी ‘कानपूर लाइन’ बंद होण्याची आवश्यकता आहे. पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी व्यापक संधी मिळणे आवश्यक झाले आहे.’या प्रसंगी उपाध्यक्ष नीलेश राऊत, अभिषेक देशमुख, राहुल तायडे, विजय साळवे, संजीव शेळके, लता पाटील, शमा परवीन आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

'धनशक्तीचे राजकारण'
माजी आमदार संजय वाघचौरे म्हणाले, ‘आमदार चव्हाण हे पूर्वी कंत्राटदार म्हणून काम करीत होते. धनशक्तीच्या जोरावर ते राजकारण करू पाहात आहेत. पक्षात अन्य कोणी मोठा होऊ नये असे ते पाहातात. त्यांच्या कार्यपद्धतीची शेवटची घटका आलेली आहे. आठही जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्या कार्यापद्धतीमुळे त्रस्त आहेत. धनशक्तीच्या बळावर राजकारण असेच सुरू राहिले तर पक्ष रसातळाला जाईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडा विभाग फक्त प्रमाणपत्र देण्यापुरते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शाळा, कॉलेजांमधील शारीरिक शिक्षण विभाग हे केवळ प्रमाणपत्र देण्यापुरतेच आहेत, की काय असे वाटते. तेथे आदर्श शिक्षक असतील, तर चांगले विद्यार्थी घडतील, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले. सुधीरदादा जोशी स्मृतीप्रित्यर्थ क्रीडा तपस्वी पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर रविवारी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूर्णवाद युवा फोरमचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पारनेरकर होते. व्यासपीठावर सत्कारमूर्ती मनोजराव देवळेकर, मकरंद जोशी, गणेशदादा पारनेरकर यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बागडे म्हणाले, अनेक शाळा, कॉलेजांमध्ये चांगल्या शिक्षकांची वाणवा आहे. क्रीडा विभागात चांगल्या शिक्षकांची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ज्यांना खेळांचे ज्ञान नाही, असे शिक्षक अनेक ठिकाणी नेमले आहेत. याप्रकारचे शिक्षक असतील, तर खेळाडू कसे तयार होतील. चांगले विद्यार्थी घडवायचे असतील, तर चांगल्या शिक्षकांची आवश्यकता आहे. नोकरी, भरतीसाठी प्रमाणपत्राचा फायदा होतो, म्हणून केवळ प्रमाणपत्र देण्यापुरते क्रीडा शिक्षण असता कामा नये, असे बागडे म्हणाले.
सुधीरदादा जोशी यांच्या आठवणी सांगताना बागडे म्हणाले, जिम्नास्टिक्ससारखा अत्यंत अवघड आणि फारशा लोकाश्रय नसलेल्या क्रीडा प्रकाराला औरंगाबाद शहरात बळ देण्याचे काम सुधीरदादा यांनी केले. या खेळाला बळ देण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. लक्ष्मीकांत पारनेरकर यांचेही यावेळी भाषण झाले.
सत्काराला उत्तर देताना मनोजराव देवळेकर म्हणाले, सुधीरदादा जोशी स्मृतीप्रित्यर्थ क्रीडा तपस्वी पुरस्कार मिळणे माझ्यासाठी फार मोठी पदवी आहे. सुधीरदादा यांच्यासारखे काम करण्याचा मी प्रयत्न करेन. शारीरिक शिक्षणसारख्या विषयाकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. चांगले खेळाडू निर्माण करण्यासाठी शिक्षकांनीही मेहनत घेण्याची गरज आहे. कार्यक्रमाला क्रीडासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्लिम पर्सनल लॉ वस्तुनिष्ठचा दावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘म‌ुस्लिम पर्सनल लॉमधील कायदे वस्तुनिष्ठ असून त्याद्वारे महिलांना अधिकार दिले आहेत. त्यामुळे इस्लामी कायद्याबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी, ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डातर्फे विविध शहरांत विधीतज्ज्ञ व मुस्लिम धर्मगुरूंसाठी विशेष कार्यशाळा घेण्यात येत आहेत. यातून तलाकबद्दलचे गैरसमज दूर होतील,’ असा आशावाद मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव अॅड. जफर याब जिलानी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डतर्फे आयोजित वकिलांच्या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ते आले होते. त्यानिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.‘मुस्लिम पर्सनल लॉची अंमलबजावणी करण्याचे अधिकार काझीला होते, कालांतराने हे अधिकार रद्द करण्यात आले. मात्र, आजही इमारत ए शरियाद्वारे अनेक कौटुंबिक प्रकरणात कोर्टात जाण्यापूर्वी सामंजस्याने निवाडा केला जात आहे. मुस्लिम पर्सनल लॉचा अभ्यास केल्यास तो वस्तुनिष्ठ असल्याचे लक्षात येईल. या कायद्यात बदल करण्याची आवश्यकता नाही,’ असे त्यांनी सांगितले.‘इस्लाममध्ये महिलांना अनेक अधिकार देण्यात आले असून इतर धर्मियांची याचा अभ्यास करावा. एकदम तलाक देणे नियमात बसत नाही. धर्म व धार्मिक ग्रंथात सांगितल्याप्रमाणे तलाकची कार्यवाही केल्यास वाद होणार नाहीत,’ असा दावा त्यांनी केला. मुस्लिम कायदा कार्यशाळा हैदराबाद, लखनऊ, बंगलोरनंतर औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आली. जयपूर, इंदुर, गुवाहाटी येथे कार्यशाळा होणार आहेत, असे त्यांनी सांगितले. ही कार्यशाळा मौलाना आझाद रिसर्च सेंटरमध्ये पार पडली. पत्रकार परिषदेला बोर्डाचे सचिव खालेद सैफुल्लाह रहेमानी, मुफ्ती मोईजोद्दिन सहाब, अॅड. शकील अहेमद, मौलाना एकबाल अन्सारी आदींची उपस्थिती होती.

पाच हजार प्रकरणांचा निपटारा
औरंगाबादमधील इमारत ए शरियामध्ये मागील दीड ते दोन वर्षांत पाच हजार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. ही प्रकरणे कोर्टाबाहेर सामंजस्याने सोडवण्यात आल्याने न्यायव्यवस्थेवर ताण पडला नाही. प्रकरणे निकाली काढताना पती-पत्नी व त्यांच्याशी संबंधित सर्वांची मते जाणून घेण्यात आली, असे इमारत ए शरियाचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती मोईजोद्दीन यांनी सांगितले.

दोन कोटी महिलांचा पाठिंबा
मुस्लिमांप्रमाणे पारसी समाजाला अधिकार आहेत. मिझोरम, नागालॅण्ड या राज्यांना राज्यघटनेने विशेष अधिकार दिले आहेत. समान नागरी कायद्यामुळे सर्वांचे अधिकार संपुष्टात येण्याची भीती आहे. समान नागरी कायदा लागू केल्यानंतर वाद वाढतील, अशी शंका बोर्डाच्या सदस्यांनी उपस्थित केली. सुमारे दोन कोटी महिलांनी मुस्लिम पर्सनल लॉ मान्य असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. या पत्रांचा गठ्ठा पंतप्रधानांना पाठवल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तारा लुकलूकला... ख्रिस्त जन्मला’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गाणी, नाच, धमाल, मिठाई वाटप, केक वाटप आणि मेरी ख्रिसमस म्हणत रविवारी अपूर्व उत्साहात नाताळचा सण साजरा करण्यात आला. प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्मदिनानिमित्त रविवारी शहरातील विविध चर्चमध्ये ख्रिस्ती बांधव एकवटले होते. ‘तारा लुकलूकला... ख्रिस्त जन्मला’, असे जन्म गीत यावेळी गाण्यात आले.
शहरातील विविध भागामध्ये असलेल्या सर्वपंथीय ६७ चर्चमध्ये शनिवारी मध्यरात्रीपासून ‘ख्रिस्त जन्म’ उत्साव साजरा करण्यात आला. मध्यरात्री १२ च्या ठोक्याला केक कापून आनंदोत्सवाला सुरुवात झाली, विविध चर्चमध्ये विशेष आराधना करण्यात आली. रात्री उशीरापर्यंत चर्चमध्ये ख्रिस्ती बांधव प्रार्थना करीत होते. रविवारी सकाळी ७ वाजेपासून पवित्र सहभागिता, प्रभू संदेश आणि प्रार्थना करण्यात आली. छावणीतील सर्वात मोठ्या क्राईस्ट चर्चला जत्रेचे स्वरूप आले होते. ख्रिस्तीबांधवांच्या गर्दीने चर्चची जागाही अपुरी पडली. शेकडो ख्रिस्ती बांधव चर्चच्या बाहेर बसून रेव्ह. सुशीलकुमार घुले यांचा पवित्र संदेश ऐकत होते. बाहेरील बाजूस एलईडी टीव्ही लावण्यात आले होते. त्यावर चर्चमधील कार्यक्रम दाखविण्यात येत होता.
चर्चच्या गायकवृंदांनी धार्मिक गीते सादर केली. उपस्थितांकून धान्य,फळे आणि इतर विविध प्रकारच्या भेट वस्तू चर्चला अर्पण करण्यात आल्या. ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता वर्षसमाप्तीची सभा होईल. १ जानेवारी २०१७ रोजी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होईल.

विविध चर्चमध्ये उत्साह
छावणीतील सेंटर फिलीप चर्चमध्ये रविवारी सकाळी सहभागिता विधी पार पडला, प्रभू संदेश आणि अन्य धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी रेव्ह. एस. एस. बत्तिसे यांनी ‘ख्रिसमस’ चा संदेश दिला. नगरनाका येथील होली ट्रिनिटी चर्च येथे बिशप एम. यू. कसाब, सह रेव्ह. पी. के. अकसाळ यांनी संदेश दिला. सिडको एन-७ येथील सेंट जॉन एव्हान्जलीस चर्चमध्ये शनिवारी रात्री साडेदहा पासून महापूजा विधी सुरू झाला. फादर पायस व मुख्य धर्मगुरू फादर आॅस्कर यांनी रविवारी सर्वांना शांतीचा संदेश दिला. एन-६ परिसरातील चर्च आॅफ द नॅझरिन येथे फादर रेव्ह. पी. डी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. ख्राईस्ट चर्चमध्ये प्रिस्ट-इन- चार्ज रेव्ह. घुले विशेष संदेश दिला. सेंट फिलीप चर्चमध्ये प्रिस्ट-इन-चार्न रेव्ह सॅमसन, एस. बत्तीसे यांच्यासह रेव्ह. आर. व्ही. दिवे यांनी धार्मिक विधी केला. नगरनाका येथील होली ट्रिनिटी चर्च, सिडकोतील सेंट स्टिकन चर्च, सेंट पॉल चर्च येथेही कार्यक्रम झाले. भावसिंगपुरा येथील न्यू अँपोस्टोलिक चर्च येथे रविवारी सकाळी सभा झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तंत्रज्ञान करील शेतीत क्रांती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘बदलत्या काळात यशोगाथांची बेटं दाखवून शेती क्षेत्राचे भले होणार नाही. सर्वाधिक शेतकऱ्यांनी वापरले तरच तंत्रज्ञानाची यशस्विता वाढते. शेतकरी गटांनी एकत्र येऊन जबाबदारीने तंत्रज्ञान वापर आत्मसात करावा,’ असे प्रतिपादन विभागीय कृषी अधिकारी उदय देवळाणकर यांनी केले. ‘महा-अॅग्रो’ कृषी प्रदर्शनातील परिसंवादात ते बोलत होते.
मराठवाडा शेती सहाय्य मंडळाने ‘महा-अॅग्रो २०१६’ कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे. अयोध्यानगरी मैदानावर रविवारी शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन नवीन तंत्रज्ञान आणि माहिती समजून घेतली. दुपारच्या सत्रात ‘शेती आणि तंत्रज्ञान’ विषयावर परिसंवाद घेण्यात आला. यावेळी विभागीय कृषी अधिकारी उदय देवळाणकर, संयोजक विजय बोराडे, अॅड. वसंत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान वापर आत्मसात करावा असे देवळाणकर म्हणाले. ‘कृषी क्षेत्रातील नवीन संधी आणि तंत्रज्ञानाची पुरेपूर माहिती शेतकऱ्यांना हवी. नवीन पिढीचे शेतकरी तंत्रज्ञान सहजतेने हाताळतात. नवीन घडामोडींची त्यांना माहिती असते. सर्वाधिक प्रयोगशील शेतकरी जिल्ह्यात असून काळानुसार बदलणारे शेतकरी नवीन क्रांती करतील. शेतकऱ्यांनी आपली कंपनी स्थापन करुन प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकणे सहजशक्य आहे. १५ ते ३० शेतकरी गटांनी एकत्र येऊन ‘आरओसी’कडे नोंदणी केल्यास स्पर्धाक्षम कृषी प्रकल्पातील योजनांसाठी शेतकरी कंपनी पात्र ठरते. आता देशात कॉर्पोरेट अॅग्रीकल्चर आवश्यक आहे. खुलताबाद तालुक्यातील शेतकरी दोन वाणांचे आठ ते नऊ हजार क्विंटल ब्रँडेड गहू विक्री करणार आहेत. शेतात ड्रोनने फवारणी करण्याच्या तयारी आहे. तंत्रज्ञान स्वीकारल्यामुळे शेतीत आमूलाग्र बदल घडत आहे. त्यामुळे योग्य तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी हिताचे आहे,’ असे देवळाणकर म्हणाले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रदर्शनात गर्दी
जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली. नवीन अवजारे, यंत्रसामग्री आणि बियाण्यांच्या स्टॉल्सवर सर्वाधिक गर्दी झाली. प्रत्येक कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करीत होते. तर काही ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती, शेवाळ खत निर्मिती, सेंद्रीय खत, रोपवाटिका या दालनांना चांगला प्रतिसाद मिळाला. बचतगटांच्या दालनांना दिवसभर गर्दी असल्यामुळे विविध वस्तूंची मोठी विक्री झाली.

शेतकऱ्यांनी एकत्र यावे
‘शेतकरी कंपनीने पत वाढवण्यासाठी एकत्र आले पाहिजे. २०१३ मध्ये राज्यात कापसाचे ३१ लाख हेक्टर क्षेत्र होते. कापसाचे वैजापूर तालुक्यात ९७ हजार हेक्टर आणि गंगापूर तालुक्यात ८७ हजार हेक्टर होते. क्रॉप पॅटर्नवर कुणाचेही नियंत्रण नसते. या स्थितीत ३०० शेतकरी एकत्र आल्यास कापसातून १० कोटी रूपयांची उलाढाल होते. या माध्यमातून पत वाढवून विविध प्रकल्प सुरू करता येतील,’ असे देवळाणकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


श्रेयस, सागर, अभिजीत, शौर्याला जेतेपद

$
0
0

श्रेयस, सागर, अभिजीत, शौर्याला जेतेपद
एमजीएम ट्रायथलॉन स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महात्मा गांधी मिशनच्या ३४व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या विभागीय पातळीवरील ट्रायथलॉन व ड्युथलॉन स्पर्धेत श्रेयस निर्वाल, सागर बरडे, अभिजीत लोंढे, सुनील देशमुख, शौर्या यादव, मनीषा ब्रह्मा, अजयसिंग पाल, अदिती निलंगेकर, मनमीत घई, डॉ. रेखा महाजन, वैशाली तुपे, सनी पवार, सोनम शर्मा यांनी सहभागी गटामध्ये जेतेपद पटाकाविले.
आयकर आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. ट्रायथलॉन स्पर्धा पाच, तर ड्युथलॉन स्पर्धा तीन गटांत घेण्यात आली. या स्पर्धेत सातशेपेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. विजेत्यांना एक लाख ६५ हजारांची रोख पारितोषिके देण्यात आली. या प्रसंगी डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. गिरीश गाडेकर, रणजित कक्कड, आशिष गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रत्येक गटातील विजेत्यांना सुवर्ण, रौप्य, ब्राँझ अशी १०२ पदके देण्यात आली. मलेशियातील मॅच्यु ट्रोटा, ऑलिव्हर यांनी यशस्वी कामगिरी केली. ६३ वर्षीय डॉ. रेखा महाजन यांनीही ट्रायथलॉन सुपर स्प्रिंट प्रकारात सुवर्णपदक जिंकले. एमजीएम क्रीडा संकुलात स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा झाला. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अभिजीत ठाकूर, अभिजीत बिरारी, अनिल पालवे, कुणाल गायकवाड, तनुजा डुबे, सुचित्रा मेंडके, सायली वाबळे, सचिन हाटोळे, सोनिका कररा, अस्मिता जोशी, स्मिता खुरसाळे आदींनी पुढाकार घेतला. डॉ. राजलक्ष्मी भोसले व भक्ती देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
अंतिम निकाल ः ट्रायथलॉन स्प्रिंट पुरुष : (१४ ते २५ वर्षे) - १. श्रेयस निर्वाल, २. रणवीर परिहार, ३. गोपाल बिरादार. (२६ ते ३५ वर्षे) - १. सागर बरडे, २. अनिल चव्हाण, ३. प्रफुल्ल जटाले. (३६ ते ४५ वर्षे) - १. अभिजीत लोंढे, २. विवेक शर्मा, ३. कपिल जमाल. (४५ वर्षांपेक्षा अधिक) - १. सुनील देशमुख, २. उदय पाटील, ३. श्रीराम लोमटे. महिला (१४ ते २५ वर्षे) - १. शौर्या यादव. (३६ ते ४५ वर्षे) - १. मनीषा ब्रह्मा.
ट्रायथलॉन सुपर स्प्रिंट पुरुष - (१४ ते २५ वर्षे) ः १. अजयसिंग पाल, २. मॅच्यु ट्रोटा, ३. लहुकुमार वाघमारे. (२६ ते ३५ वर्षे) - १. पुषन शर्मा, २. अन्सारी मोहंमद शफी, ३. प्रीतेश मुनोथ. (३६ ते ४५ वर्षे) - १. कैलास झोलगे, २. एकनाथ पठाडे, ३. नीलेस सावजी. (४५ वर्षांपेक्षा अधिक) - १. डॉ. श्याम महाजन, २. दिनेश दिओ, ३. सुहास देशपांडे. महिला (१४ ते २५ वर्षे) - १. अदिती निलंगेकर. (२६ ते ३५ वर्षे) - १. मनमीत घई. (४६ वर्षांपेक्षा अधिक) - १. डॉ. रेखा महाजन, २. डॉ. संगीता देशपांडे.
ट्रायथलॉन किड्स ब्राव्हो मुले - (११ ते १३ वर्षे) - १. वरद पाटील, २. सिद्धांत नायर, ३. नकुल पालकर. मुली (११ ते १३ वर्षे) - १. अलोकी बोबडे, २. ऋतिका रांझवन, ३. मुग्धा निकाळजे.
ट्रायथलॉन किड्स सुपर मुले (८ ते १० वर्षे) - १. संयोग पाटील, २. श्रेयंग जोशी, ३. आयुष देशपांडे. मुली - १. मारिया सदाफ.
ट्रायथलॉन फन : मुले (१४ वर्षांपेक्षा अधिक) - १. जन्मेजय मुगल, २. अनीष टिळक, ३. राहुल डहाळे. मुली - १. आकांक्षा जैस्वाल.
ड्युथलॉन स्प्रिंट - पुरुष (१४ ते ४० वर्षे) - १. राम काकडे, २. लक्ष्मण भोजने, ३. ऑलिव्हर. महिला - १. प्रणिता सोमण, २. नीता मणियार, ३. हिना पठाण. (४१ वर्षांपेक्षा अधिक) - १. सतीश अनरेकर, २. बाबू नागरगोजे, ३. शांतीलाल राठोड. महिला - १. माधुरी निमजे.
ड्युथलॉन सुपर स्प्रिंट ः पुरुष (१४ ते ४० वर्षे) - १. सनी पवार, २. जयंत पाटील, ३. राम लिभोरे. महिला - १. वैशाली तुपे, २. सिमरन चुराग. ४१ वर्षांपेक्षा अधिक पुरुष - १. शेषराव वडोर, २. विजय शिंपी. महिला - १. सोनम शर्मा.
ड्युथलॉन किड्स : मुले - १. हर्षवर्धन पाटणी, २. अथर्व गिरी, ३. पार्थ मिणियार. मुली - १. ऐश्वर्या जैन, २. आम्रपाली, ३. सई पाटील, ४. ऋतुजा पोहर, ५. वर्षा तक्षय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वॉरंटवर पोलिसाचा पत्नीलाही फुकट प्रवास

$
0
0

वॉरंटवर पोलिसाचा पत्नीलाही फुकट प्रवास
पोलिसावर केली जाणार कारवाई
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः
वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसाने आपल्या सोबत पत्नीलाही फुकट एसटी प्रवास घडविल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी संबंधित पोलिसावर कारवाई केली जाणार असल्याचे एसटीच्या सूत्रांनी सांगितले.
एका शहरातून दुसऱ्या शहरात वॉरंट बजावण्यासाठी जाणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना एसटीमधून मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, आपल्याला मोफत प्रवासाची सोय असताना काही पोलिस कर्मचारी याचा गैरफायदा घेत असल्याचे काही प्रकरणांत दिसून आले आहे. शुक्रवारी वॉरंटचा आदेश बजावण्यासाठी एका पोलिस कर्मचाऱ्याने आपल्याकडील वॉरंटवर एक अधिक एक असे लिहून घेतले आणि आपल्या पत्नीला अजिंठा ते औरंगाबाद असा फुकट प्रवास करविला.
अजिंठ्याहून औरंगाबादला येणाऱ्या या बसमध्ये (क्रमांक एमएच २० बीएल १६२०) तिकीट तपासणी पथकाकडून मध्येच तपासणी करण्यात आली. सर्व प्रवाशांची तिकिटे तपासण्यात आली. या पोलिसाकडील वॉरंटचीही तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यावर एक अधिक एक असे लिहीलेले होते. मात्र, वॉरंटवरील अक्षरात आणि एक अधिक एक असे लिहीलेल्या अक्षरात फरक असल्याचे तपासणी अधिकाऱ्याच्या लक्षात आले. त्यावरून त्यांना संशय आला. त्यांनी दुसरा प्रवासी कोण आहे, अशी विचारणा केली. तेव्हा एक महिला समोर आली. अधिक चौकशी केली असता ती त्याची पत्नी असल्याचे स्पष्ट झाले.
मार्ग तपासणी पथकाने पकडलेल्या प्रकरणात संजय दादाराव ठोंबरे असे या पोलिसाचे नाव आहे. त्याच्या जबाबात त्याने समन्स बजावण्यासाठी औरंगाबादला निघालो होतो. सोबत आपली पत्नीही होती, असे त्याने सांगितले. संबंधित पोलिसावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅरल सिंगिंगनी ख्रिसमस साजर

$
0
0

कॅरल सिंगिंगनी ख्रिसमस साजर
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कॅथलिक डायसिस् ऑफ औरंगाबाद यांच्या वतीने आयोजित डायसिस् लेवल कॅरल सिंगिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात घेण्यात आली. यासाठी फादर बेन्नी कालीकट्ट व फादर लेजनी रॉडरिक्स, डायसिस् युथ डायरेक्टर फादर संजय ब्राम्हणे, फादर अॅन्‍थोनी मायकल प्रमुख पाहुणे होते.
फादा वॉलटर गोन्सालवीस यांनी प्रार्थना व आशीर्वाद देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी खास 'गव्हाणी' म्हणजे येशू जन्माचा देखावा तयार करण्यात आला होता. यावेळी कॅरल ग्रुप्सनी जोरदार सादरीकरण केले. अत्यंत चुरशीच्या लढाईत एस. एफ. एस. कॅथरिडल संघाने बाजी मारली. तर विद्याभवन कॅथलिक चर्च, बीडने दुसरा व संत अलफोन्सा चर्च, वाळूजने तिसरा क्रमांक पटकावला. प्रथम, द्वितीय व तिसऱ्या क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे ११ हजार, ७ हजार व ५ हजार व मानचिन्ह देण्यात आले. उत्तेजनार्थ विजेत्यांना २ हजार व मान‌चिन्ह देण्यात आले. मारिया फर्नांडिस, आकांशा कापसे व डॉमनिक दिवे यांनी सूत्रसंचालन व संदीप निर्मल यांनी आभार व्यक्त केले. फादर लेजली रॉडरिक्स व फादर वॉलरिन डिसूजा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी फादर जॉन गुलाब जाधव, फादर पॉल जॉर्ज, फादर अॅन्डू मोरास, फादर विनोद शेळके, फादर विल्फेड सलडाना, फादर पी. ए. झेवीयर, फादर सायमन शिंगारे आदींनी परिश्रम घेतले. फादर अॅन्थोनी मायकल यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या तावडीतून दुचाकीचोरांचे पलायन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चार अट्टल दुचाकीचोरांनी औरंगाबाद पोलिसांच्या तावडीतून पलायन केले. विशेष म्हणजे, नगर येथील उपकारागृहाच्या प्रवेशद्वारासमोरच शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. यातील दोघांना कोतवाली पोलिसांनी पकडले.
दीपक तात्याराव थोरात, लखन उत्तम वाघमारे, भीमा सोपान मिरगे (रा. शासकीय दूध डेअरी, एमआयडीसीनगर), नागेश छगन वारे (रा. खोपटी, ता. शिरूर कासार, जि. बीड) अशी पळालेल्यांची नावे आहेत. यातील लखन वाघमारे व भीमा मिरगे यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. दुचाकीचोरीच्या गुन्ह्यात नगरस्थित एमआयडीसी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी या चौघांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यांच्याकडून चोरीच्या दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. यातील दोन दुचाकी फुलंब्री (औरंगाबाद) येथून चोरट्यांनी लंपास केल्याचे तपासातून स्पष्ट झाले. अधिक तपासासाठी चौघांना शनिवारी फुलंब्री पोलिस ठाण्याचे हवालदार आर. एम. रोहकले, बी. के. कासोटे, एस. यू. आव्हाड, पोलिस नाईक बी. जे. चव्हाण हे घेऊन गेले होते. औरंगाबादेत न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर त्याच दिवशी एका खासगी वाहनाने पोलिस पथक या चौघांना घेऊन नगर येथील उपकारागृहाजवळ आले. रात्री साडेआठच्या सुमारास कारागृहात प्रवेश करतेवेळी त्यांच्या हाताचा दोर सोडताना चौघांनी पोलिसांच्या हाताला झटका दिला. त्यानंतर बेड्यासह त्यांनी पलायन केले. यानंतर सर्वत्र नाकेबंदी करण्यात आली. दरम्यान, कोतवाली पोलिसांनी पळालेल्यांपैकी लखन उत्तम वाघमारे, भीमा सोपान मिरगे यांच्या नगरमध्येच मुसक्‍या आवळल्या. मात्र, दीपक थोरात व छगन वारे गुंगारा देण्यात यशस्वी ठरले.

मोबाइलही नेला
एका कर्मचाऱ्याला हिसका दिल्यानंतर तो खाली पडला. त्याचवेळी दुसऱ्याने पोलिसाचा मोबाइल पळवून पोबारा केला. पळालेल्या दोघांचा कसून शोध सुरू असून त्यांचा अद्याप कोणताही थांगपत्ता लागला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसचे झेडपीसाठी बिगुल

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नांदेड

जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या पाच सभा होऊनही, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसने घवघवीत यश संपादन केले. हाच विजयाचा रथ पुढे चालू ठेवण्यासाठी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागा, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी​ जिल्हा ​परिषद निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले .
नांदेड जिल्हा काँग्रेसच्या वतीने नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी जिल्हा परिषद निवडणुका जिंकण्याचे आवाहन केले. या यशाबद्दल अशोक चव्हाण म्हणाले, ‘या निवडणुकीमुळे जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढली आहे. पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेसचे २११ सदस्य होते, ते आता २२५ झाले आहेत. या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या सात नगराध्यक्षांसह तब्बल ७३ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे जिल्ह्यातील अव्वलस्थान कायम आहे. कार्यकर्त्यांचे काम व मतदारांची समर्थ साथ यामुळे आपण हा विजय संपादन करू शकलो.’
तसेच, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन करतान ते म्हणाले, ‘अनेकांना दोन ते तीन वेळा उमेदवारी दिल्यामुळे नव्यांना संधी मिळत नाही. त्यामुळे यापुढे नव्यांना संधी देण्याचा अधिक प्रयत्न करू. जनतेनी विश्वास ठेवून मतदान केले आहे. त्यामुळे त्यांच्या कामांना प्राधान्य द्या, लहानसहान नाराजांमुळे अत्यंत कमी मतांनी अनेकांचा पराभव झाला. यापुढे पक्षाला मजबूत करण्यासाठी वैयक्तिक मतभेद बाजूला सारा. लोकांचे म्हणणे व्यवस्थित ऐकून घ्या, त्यांच्या समस्या सोडवा, त्याचा फायदा लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला होणार आहे.’
माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, ‘नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने नेटवर्क उभे केले, तेच नेटवर्क जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये कामाला लागले पाहिजे. राष्ट्रवादी-शिवसेना व भाजप या तिन्ही पक्षांच्या हाती असलेल्या अनुक्रमे धर्माबाद, देगलूर, मुखेड व कंधार नगरपालिकांवर काँग्रेसने तिरंगा फडकविला आहे. हे यश काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे मिळाले आहे.’
यावेळी महानगराध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर म्हणाले, ‘भाजपाने पैसे वाटले म्हणून त्यांना जिल्ह्यात कुठेतरी थोडेबहुत यश दिसते. या सरकारने मराठा, मुस्लिम, धनगर समाजाचे आरक्षण असो किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असो, हे सोडविलेच नाहीत. नोटबंदीमुळे मोठी नाराजी आहे. केवळ पैसे वाटल्यामुळे त्यांना हे यश मिळाले.’
जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी कार्यकर्त्यांच्या उभे केलेल्या जाळ्यामुळे काँग्रेसला यश मिळाले असे सांगतानाच काही कार्यकर्त्यांनी काम करण्यात हाराकिरी केली त्यामुळे काही जागा अल्पमताने पडल्या, याकडे लक्ष वेधले. व्यासपीठावर आमदार वसंतराव चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस बी. आर. कदम, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images