Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

क्षीरसागरांमधील भाऊबंदकी कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

नगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये बीडमध्ये आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या कुटुंबामध्ये पडलेली फूट चर्चेचा विषय होती. दोन्ही गटांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे तयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे, नगरपालिका निवडणुकीनंतर दिलजमाईची शक्यताही मावळली आहे.
बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांचे भाऊ रवींद्र व पुतण्या संदीप यांनी स्वतंत्र चूल मांडत काकू-नाना विकास आघाडी उभी केली होती. या माध्यमातून त्यांनी जयदत्त क्षीरसागर व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्याविरोधात बंड केले होते. पहिल्याच प्रयत्नात वीस नगरसेवक निवडून आणण्यात काकू-नाना आघाडी यशस्वी झाली होती. त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत क्षीरसागर घराण्यात दिलजमाई होते का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. जयदत्त क्षीरसागर व भारतभूषण क्षीरसागर यांनी बीड मतदारसंघातील जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीसाठी सर्कलनुसार कार्यकर्ते मेळावे आणि इच्छुक उमेदवारांचे मुलाखती घेतल्या. काही उमेदवार अंतिम केले असून, उमेदवारांना प्रचारास सुरुवात केली आहे. या बैठकीस रवींद्र क्षीरसागर, संदीप क्षीरसागर यांना सोबत घेतले गेले नाही. त्यामुळे रवींद्र क्षीरसागर व जिल्हा परिषद सभापती संदीप क्षीरसागर यांनी आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित केल्या आहेत. रवींद्र क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलीम व राजेंद्र जगताप यांचे उपस्थितीत जिल्हा परिषद गण बहिरवाडी व घोडका राजुरी या गणाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
नाळवंडी सर्कलधील दोन्ही पंचायत समिती गण व गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक गोरक्षनाथ टेकडी येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी संदीप क्षीरसागर म्हणाले, ‘भाषणबाजीपेक्षा आम्ही लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अहोरात्र रस्त्यावर आहोत. सर्वसामान्य जनतेमध्ये राहून त्यांची सुख-दुःख जवळून पाहिली आहेत. मुंबई बसून नव्हे, लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या अडचणी सोडवत अहोरात्र काम करत आहोत. शहरातील दणका ग्रामीण भागामध्येही दाखवून द्यायचा आहे.’
सय्यद सलीम म्हणाले, ‘सामान्य जनतेचा विश्वास संदीप क्षीरसागर यांच्यावर आहे. कोणत्याही दबावाला, प्रलोभनांना बळी न पडता त्यांना साथ द्यावी.’ राजेंद्र जगताप म्हणाले, ‘रवींद्र क्षीरसागर व संदीप क्षीरसागर यांची नाळ ग्रामीण भागातील लोकांशी जुळलेली आहे. या जनतेच्या आशीर्वादावर शहरातला दणका ग्रामीण भागामध्येही दाखवून देऊ.’
या बैठकांमुळे क्षीरसागर बंधूंमधील दरी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये त्याचा किती परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सामान्यांना मूलभूत हक्क देणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

स्वातंत्र्यानंतर देशात दोन हजार पक्ष निर्माण झाले. मात्र, राजकीय व्यवस्थेत शेतकरी, श्रमकरी, कष्टकरी कोठेच नाही. सुशिक्षित समाज राजकारणापासून दूर गेला आहे. हे चित्र पुसूट टाकत, गावांतील सामान्य जनतेला संविधानातील मुलभूत हक्क व अधिकार देण्यासाठी संभाजी ब्रिगेड राजकीय लढाईत उतरली आहे, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते प्रा. गंगाधर बनबरे यांनी केले.
संभाजी ब्रिगेड पक्षाची स्थापना झाल्यानंतर जालना शहरातील कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात रविवारी रोजी पहिल्या जिल्हास्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर, कोषाध्यक्ष संतोष गाजरे, छगन शेरे, डॉ. श्रीकांत देशमुख, साईनाथ पवार, जिल्हाध्यक्ष सतीष ढवळे, संदीपान जाधव, प्रा. सुदर्शन तारख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. बनबरे पुुढे म्हणाले, ‘पूर्वीची शंभर कामे चालू ठेऊन राजसत्ता ताब्यात घेण्यासाठी संंभाजी ब्रिगेड राजकीय पक्षात विलिन झाली आहे. राज्य व्यवस्था आणि सामाजिक परिवर्तनासाठी तलवारीच्या लढाया कालबाह्य झाल्या असून, ज्ञानाच्या लढाईत शत्रूची बलस्थाने शोधून वैचारिक व दिशादर्शक चळवळ राबविली जाणार आहे. विचारातून सत्ता ताब्यात घेऊन परिवर्तन व लोककल्याण साधने हेच आमचे उद्दीष्ट असून, मराठ्यांचा एकही पक्ष नाही. प्रस्थापित पक्षांचे ध्येय, धोरणे आणि उद्दीष्ट एकच असून, चेहरे वेगळे आहेत.’ मराठा नेत्यांवर टीका करताना प्रा. बनबरे म्हणाले, ‘रस्त्यावरची लढाई आम्ही लढू, पण आरक्षणासाठी आमचे लोकप्रतिनिधी संसदेत का लढत नाहीत? संभाजी ब्रिगेडमुळे कुुणाचे नुुकसान अथवा फायदा होणार नाही, तर ६७ वर्षानंतरही मुलभूत गरजा सामान्य माणसाला मिळू शकल्या नाहीत. ८० टक्के लोकप्रतिनिधींना संविधानही माहिती नाही.’
अध्यक्षीय समारोपात अॅड. मनोज आखारे म्हणाले, ‘व्यवस्था परिवर्तन हेच संभाजी ब्रिगेडचे उद्दीष्ट असून, गेली पंचवीस वर्षे शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी, विद्याथी आणि सर्वसामान्यांसाठी लढे दिल्यानंतर राजकीय पक्षात रुपांतर झाले. एल्गार मोर्चाची भिती घेतल्यानेच काल शिवस्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. आगामी काळात शंभर टक्के राजकारण आणि समाजकारण अशी भूमिका घेऊन दुुसऱ्याच्या ताटाखालचे मांजर न होता शैक्षणिक व आर्थिक दहशतवादाशी लढाई करणार आहोत.’
प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष सतीष ढवळे यांनी जि. प. पं. स. निवडणूका ताकदीने लढविणार असून तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी मदत करणार असल्याचे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडमध्ये कापूस विक्री व्यापाऱ्यांनाच

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, बीड

बीड जिल्ह्यातील कापूस खरेदीसाठी सरकारकडून सहा केंद्रे सुरू केली असली, तरीही खासगी व्यापाऱ्यांपेक्षा या केंद्रांवर कमी भाव मिळत आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांनी या केंद्रांकडे पाठ फिरविली आहे. या केंद्रांवर आतापर्यंत एक किलो कापूसही खरेदी करण्यात आला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यामध्ये यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे, कापसाचे उत्पादनही होत आहे. जिल्ह्यात कापूस पणन महासंघाच्या वतीने सहा कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना सरकारी कापूस खरेदी केंद्रापेक्षा खासगी व्यापाऱ्याकडून जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी सरकारी खरेदीकडे पाठ फिरवली आहे.
बीड जिल्हा हा विदर्भानंतर मराठवाड्यातील प्रमुख कापूस लागवडीचा आणि उत्पादक जिल्हा म्हणून काही वर्षांत पुढे आला आहे. जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी चार लाख वीस हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झाली होती. मात्र, कापसाचे कमी असणारे भाव व दुष्काळी स्थितीमुळे कापूस तीन लाख वीस हजार हेक्टरवर आला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या कापूस उत्पादनामुळे कापूस प्रक्रिया जिनिंग आणि प्रेसिंग उद्योग आले. यातच यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला कापूस पणन महासंघाने परळी विभागाच्या अंतर्गत जिल्ह्यात सहा कापूस खरेदी केंद्रांना मंजुरी दिली.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, नाफेडची एजन्सी म्हणून पणन महासंघ कापसाची खरेदी करतो. जिल्ह्यात शेतकरी खाजगी व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कापूस विकत असताना, शेतकरी सरकारी कापूस केंद्राकडे ढुंकूनही बघायला तयार नाही. जिल्ह्यात बीडजवळील नामलगाव येथे पार्वती कॉटन, परळीत शुभम कोटेक्स, माजलगाव येथे मोरेश्वर जिनिंग, पानगाव येथे व्यंकटेश कॉटन, केज येथे केशव जिनिंग आणि धारूर येथे नर्मदा जिनिंग अशी सहा केंद्रे सरकारकडून सुरू करण्यात आली आहेत.
या केंद्रांवर प्रतिक्विंटल ४१६० रुपये या दराने कापूस खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली. तर, खासगी व्यापारी ४५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल या दराने भाव देत आहेत. खासगी व्यापाऱ्यांकडे जास्त दर मिळत असल्यामुळे, शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना प्राधान्य दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोण म्हणतं, राज्याला कृषी धोरण नाही ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सरकारच्या उदासीन कृषी धोरणाचे निवृत्त कृषी सचिव नानासाहेब पाटील यांनी जाहीर वाभाडे काढल्यानंतर रविवारी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सरकारची पाठराखण केली. सरकारकडे ठोस कृषी धोरण आहे. या धोरणाची अंमलबजावणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करायची असते, असे सांगत बागडे यांनी पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

पंजाब-हरियाणा राज्याची लक्षणीय गहू उत्पादता असूनही केंद्र सरकारने गहू आयातीचा निर्णय घेतला आहे. कोरडवाहू भागात देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रोत्साहन योजना नाहीत. निर्यातक्षम फळ उत्पादकता घटली आहे. पिकाला आधारभूत किंमत नसलेल्या देशात शेतीला भवितव्य नाही, असे निवृत्त कृषी सचिव नानासाहेब पाटील म्हणाले. हे परखड भाषण सत्ताधारी नेत्यांच्या जिव्हारी लागले आहे. अयोध्यानगरी मैदानावर भरलेल्या ‘महा-अॅग्रो’ कृषी प्रदर्शनाचे शनिवारी उदघाटन केल्यानंतर पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. मात्र, कोणतेही सरकार कृषी धोरणाबाबत आग्रही नव्हते, असेही पाटील यांनी नमूद केले. मागील सरकारच्या काळात पक्षीय भूमिका बाजुला ठेवून नेत्यांचे एकत्रित पॅनेल कृषी धोरणासाठी नेमले होते. यात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचाही सहभाग होता. मात्र, या सरकारने पॅनेलचे काम मागे टाकून केवळ शहरी लोकांना खूष ठेवण्यासाठी स्वस्त धान्य ठेवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी हिताचा नाही, अशी टीका पाटील यांनी केली होती. या वक्तव्याचा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी समाचार घेतला.

‘पशूपालन आणि दुग्ध व्यवसाय’ या विषयावरील परिसंवादाला बागडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील यांच्या भाषणाचा दाखला देत त्यांनी सरकार शेती धोरणासाठी सक्षम असल्याचे सांगितले. या सरकारकडे शेतीचे ठोस धोरण आहे. धोरणाची प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी करायची असते. आपल्या कार्यकाळात त्यांनी प्रयत्न करायचा असता’ असे बागडे म्हणाले. सत्ताधारी सरकारचे कृषीविषय धोरण नेहमीच निराशाजनक राहिले आहे. एका वर्षात पाच लाख शेततळी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वर्षापूर्वी जालना येथे केली होती. प्रत्यक्षात पाच हजार शेततळीसुद्धा पूर्ण झाली नाही. या परिस्थितीत सरकार विरूद्ध निवृत्त अधिकारी अशी टोलेबाजी शेतकऱ्यांसाठी उत्सुकतेचा विषय ठरली.

शेतकरी बाजारचे उद्‍घाटन

‘आपल्या देशाचा प्रमुख व्यवसाय शेती असून विविध कारणांनी शेतकरी अल्पभूधारक झाले आहेत. शेती फायद्याची कशी करावी, असा प्रश्न आहे. कमी शेतीत अधिक उत्पादन घेण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. पशूपालन, दूग्धव्यवसाय, मत्स्यपालन या व्यवसायातून शेती स्थिर करता येईल. शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावे’ असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले. ‘महा-ऍग्रो’ कृषी प्रदर्शनात रविवारी बागडे यांच्या हस्ते ‘शेतकरी बाजार’चे उदघाटन करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे माजी अध्यक्ष राम भोगले, डॉ. नितीन मार्कंडेय, डॉ. यशवंत वाघमारे, समन्वयक अॅड. वसंतराव देशमुख आदी उपस्थित होते. ‘दूग्ध व्यवसायाने शेतकरी स्थिर झाला. ज्या ठिकाणी शेतीला दुग्धव्यवसायाची जोड होती तिथे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही असे बागडे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांच्या पाठिशी भाजप खंबीरपणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबिरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना कायमस्वरूपी स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी सरकार आराखडा तयार करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात २७ हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केले.
तालुक्यातील निल्लोड येथील पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा व विविध विकास कामांचे उद्‍घाटन सोमवारी आयोजित करण्यात आले होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, औरंगाबादचे महापौर भगवान घडामोडे, सुरेश बनकर, ज्ञानेश्वर मोठे, इद्रीस मुलतानी, मकरंद कोर्डे, राजेंद्र जैस्वाल, श्रीरंग साळवे,जिजाबाई दाभाडे, अशोक गरूड, राजेंद्र ठोंबरे, विष्णू काटकर, विलास आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना दानवे म्हणाले की, अवघ्या विश्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशाची मान उंचावली आहे. भाजप हा पक्ष सर्वांना सोबत घेऊन चालणारा आहे, म्हणून मतदारांनी भाजपच्या १२ दलित नगरसेवक व २ अल्पसंख्याक समाजाच्या नेत्यांना नगराध्यक्ष केले आहे. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मोदींचे हात बळकट करावे. तुम्ही साथ दिली, तर विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असे दानवे म्हणाले. भाजप विकास कामांवर मत मागणारा पक्ष असून जलयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरली आहे, असे ते म्हणाले. यावेळी एकनाथ शिंदे, शिवाजी थोरात, रामू मिरगे, कौतिक शिंदे, परमेश्वर जिवरग, ज्ञानेश्वर वाहतुले, सारंग जैवळ, काशिनाथ विधाते, दिंगबर तेजराव सांगळे, आरिफ मुलतानी, रावसाहेब फरकादे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज ग्राहकांच्या समस्यांचा पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
‘महावितरण आपल्या दारी’ या योजनेतून १९०० ग्राहकांना अद्याप वीज कनेक्शन मिळाले नाही. पोल आले नसले तरी ग्राहकांना वीज बिल दिले जात आहे. वीज ग्राहकांच्या समस्यांकडे लक्ष नसून जळालेले रोहित्र मिळवण्यासाठी आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. शेतकऱ्यांना वायरमनची भूमिका पार पाडावी लागत आहे, अशा एक ना अनेक तक्रारींचा पाऊस विशेष बैठकीत सोमवारी पडला.
आमदार अब्दुल सत्तार यांनी वीज समस्यांबद्दल सोमवारी शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात अधिकारी व शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला वीज ग्राहकांनी मोठी उपस्थिती लावली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यश्र श्रीराम पाटील महाजन, नायब तहसीलदार संजय सोनवणे, महावितरणचे कार्यकारी अभियंता वाय. बी. निकम, गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, उपकार्यकारी अधिकारी एस. एम. अधिकार, बी. व्ही. सोनवणे यांची उपस्थिती होती.
या बैठकीत सादर झालेल्या तक्रारींवर चर्चा करण्यात आली. आमदार सत्तार म्हणाले की, रोहित्र तत्काळ मिळत नाही, कोटेशन भरूनही वीज कनेक्शन मिळत नाही, ७२ तासात वीज द्यावी असा दंडक आहे. पण, नियम असूनही ग्राहक व शेतकरी हाल सहन करत आहेत. महावितरण चालढकलपणा करीत आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांबद्दल उदासीन असून अधिकारी पिळवणूक करत आहेत, अशी टीका आमदार सत्तार यांनी केली. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश दौड, नगराध्यक्ष अब्दुल समीर, दुर्गाबाई पवार, रामदास पालोदकर, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, आदींची उपस्थिती होती.

रोहित्र बदल सिल्लोडलाच
सिल्लोड येथे सब डिव्हिजन ऑफिस, अजिंठा येथे उपविभागीय कार्यालयाचा ठराव घेण्यात आला आहे, हे विषय मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात मार्गी लागण्याची शक्यता आहे. आमठाणा येथे १३२ केव्ही केंद्र व्हावे यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव दिला आहे. येत्या एक महिन्यात जळालले रोहित्र सिल्लोड येथेच बदलून मिळणार असल्याची माहिती आमदारांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी उत्पादनांचे प्रदर्शनात आकर्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘एकमेका सहाय्य करू’ या उक्तीनुसार महिला बचतगट आणि शेतकरी गटांनी कृषीपूरक व्यवसायातून विकासाची वाट धरली आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन शेकडो कृषीपूरक वस्तूंची निर्मिती करण्यात शेतकऱ्यांनी आता पुढाकार घेतला आहे. अयोध्यानगरी मैदानावर भरलेल्या ‘महा-अॅग्रो’ कृषी प्रदर्शनात जिल्ह्यातील शेतकरी गटांचे वैविध्यपूर्ण दालन लक्षवेधी ठरले आहेत.
शेतकरी आणि ग्राहक यांच्यात मध्यस्थ नसल्यास दोघांनाही जास्त फायदा मिळतो. दलालांची साखळी संपुष्टात आणण्यासाठी कृषी विभागाच्या ‘आत्मा’अंतर्गत शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली आहे. कृषीपूरक व्यवसाय आणि कृषी उत्पादनांची थेट विक्री शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरली आहे. ‘महा-अ‍ॅग्रो २०१६’ कृषी प्रदर्शनात सर्व दालने वैशिष्ट्यपूर्ण आहेत. करडीचे तेल विक्री करणारा दौलताबाद येथील देवगिरी बचतगट, अस्सल पेरू विक्री करणारे सिकंदर जाधव यांच्यासारखे शेतकरी लक्ष वेधत आहेत. कुरड्या-पापड्या, गुळ, डाळ, मूग, मटकी, शेंगा, बोर या उत्पादनांना मोठी मागणी आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि कृषी विभाग पुरस्कृत बचतगटांनी स्वतंत्र स्टॉल थाटले आहेत. बाजरीची भाकरी-ठेचा, सेंद्रिय भाजीपाला शहरातील ग्राहकांसाठी आकर्षण ठरले आहे. परळी वैजनाथ येथील सुलक्षणा वाघमारे यांच्या बचतगटाचा औषधी वस्तूंचा स्टॉल आहे. आयुर्वेदिक गोरक्षनाथ चिंचोके विक्री करून वाघमारे यांनी नवीन पायंडा पाडला आहे. पापड-लोणचे, जॅमजेली, फ्रूट जॅम, गुलाब जल, शिकेकाई, आवळा कॅन्डी, आवळा लोणचे, शरबत या उत्पादनांची मोठी विक्री सुरू आहे. दुष्काळी परिस्थितीने मराठवाड्यातील शेती अडचणीत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बेचाची असल्यामुळे अडचणीत भर पडत आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कृषीपूरक उद्योग केल्यामुळे निश्चित फायदा झाला आहे. कृषी प्रदर्शनात शेकडो शेतकरी या गटांची भेट घेऊन सल्ला घेत आहेत. वस्तू विक्रीसोबत माहितीची आदान-प्रदान होत असल्यामुळे प्रदर्शनाचा उद्देश काही प्रमाणात साध्य झाला आहे.

प्रभावी मार्केटिंग हवे
स्वतः कृषीपूरक उत्पादन निर्मिती केल्यानंतर विक्रीचा प्रश्न उभा राहतो. शहरी भागातील मार्केटिंगची शेतकऱ्यांना माहिती नसते. परिणामी, विक्री कमी झाल्यास त्यांचा उत्साह कमी होतो. त्यामुळे विपणन तंत्र शिकवण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी प्रयत्न करीत आहेत. हळद, गुळ या वस्तूंच्या विक्रीसाठी विशेष मार्गदर्शन करण्यात आले आहे. परिणामी, शेतकरीसुद्धा आकर्षक पॅकिंग करून वस्तू विकत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेतील बंड आश्वासनानंतर थंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून बंड पुकारलेल्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेवकांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भविष्यात मोठी संधी देण्याचे ‘चॉकलेट’ देऊन शांत केले आहे. त्यामुळे पेल्यातील वादळ संपल्याचे बोलले जात आहे.
महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने महापालिकेतील पदाधिकाऱ्यांमध्येही बदल केले. उपमहापौरपदावर अपक्ष नगरसेविका स्मिता घोगरे यांची वर्णी लावण्यात आली, तर सभागृहनेतेपदावर गजानन मनगटे, गटनेतेपदावर मकरंद कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली. मनगटे व कुलकर्णी या दोघांची नगरसेवकपदाची पहिलीच वेळ आहे. शिवसेनेत नगरसेवकपदाचा तीन-चार टर्मचा अनुभव असलेले काही नगरसेवक आहेत. सभागृहनेता व गटनेतापदावर नियुक्ती करताना त्यांचा विचार व्हायला हवा होता, असे संकेत देत काही ज्येष्ठ नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकवले होते. त्यांना अन्य काही नगरसेवकांनी साथ दिली, त्यामुळे बंडाच्या पवित्र्यात असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या १५ ते १८ च्या घरात गेली होती. ज्येष्ठ नगरसेवकांपैकी राजू वैद्य, नंदकुमार घोडेले व विकास जैन यांच्याशी संपर्कनेते विनोद घोसाळकर यांनी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची नाही. पक्षप्रमुखांची व आमची भेट घालून द्या, आम्ही त्यांच्याशीच चर्चा करू. पक्षात काय घडत आहे ते त्यांच्या कानावर टाकू, अशी भूमिका या नगरसेवकांनी घेतली. घोसाळकर यांनीही उद्धव ठाकरे यांची भेट घालून देण्याचा शब्द या नगरसेवकांना दिला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे यांनी राजू वैद्य व विकास जैन यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. छोट्या-छोट्या गोष्टीत तुम्ही स्वतःला का गुरफटून घेता ? तुमच्या समोर खूप संधी आहेत. भविष्यात तुम्हाला मोठी संधी देण्याचा विचार आम्ही करीत आहोत, महापालिकेत किती दिवस नगरसेवक म्हणून राहणार, असे ठाकरे यांनी या दोन नगरसेवकांना सांगितल्याची माहिती आहे. शांत रहा, तुमच्या विश्वासावरच मी काम करतोय असेही त्यांनी या नगरसेवकांना सांगितले. खुद्द पक्षप्रमुखांनीच मोठी संधी देण्याचा शब्द दिल्यामुळे महापालिकेत आहे त्या परिस्थितीला जुळवून घेण्याचे या नगरसेवकांनी ठरविले आहे.

नगरसेवक ‘त्या’ दालनात जाणार का ?
शिवसेना नगरसेवकांचे बंड शांत झाले असले तरी ज्येष्ठ नगरसेवकांसह बंडात सामील झालेले नगरसेवक सभागृहनेत्याच्या व गटनेत्याच्या दालनात जाणार का ? सर्वसाधारण सभेपूर्वी घेतल्या जाणाऱ्या ‘प्री जीबी’ ला उपस्थित राहणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिका अधिकाऱ्यांना आता काही आठवेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘रस्ते प्रकरणात टेंडर मंजूर करताना, वर्क ऑर्डर देताना आम्ही नेमके काय केले ते आठवत नाही. त्यामुळे त्या प्रकरणाची मूळ फाइल उपलब्ध करून द्या. फाइल पाहिल्यानंतरच कारणेदाखवा नोटीसचे उत्तर देऊ,’ असा पवित्रा चार पैकी तीन अधिकाऱ्यांनी घेतला आहे. या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अस्थापना विभागाला याबद्दलचे पत्र पाठवले आहे.
राज्य शासनाने शहरातील रस्त्यांसाठी पालिकेला २४ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी दिला. या निधीतून रस्त्यांची कामे करताना १ कोटी ६० लाख रुपयांचे नुकसान पालिकेला सहन करावे लागले. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना दिला. त्यानुसार पालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्यावर कारवाई केली. गेल्या आठवड्यात त्यांच्या आदेशाने कार्यकारी अभियंता सिकंदर अली, उपअभियंता एस. पी. खन्ना, निवृत्त उपअभियंता के. आर. कुलकर्णी व तत्कालीन मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात यांना कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली.
या अधिकाऱ्यांनी काय उत्तर दिले, याची माहिती घेण्यासाठी ‘मटा’ने पालिकेच्या अस्थापना विभागाशी संपर्क साधला असता, त्या अधिकाऱ्यांनी मूळ फाइलची मागणी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. रस्त्यांच्या त्या प्रकरणात आम्ही नेमके काय केले आहे ते आठवत नाही, त्यामुळे मूळ फाइल उपलब्ध करून द्या. फाइल पाहून नोटीसचे उत्तर देऊ, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांना फाइल उपलब्ध करून द्यावी लागणार असून, नोटीसचे उत्तर देण्यासाठी वेळ वाढवून द्यावा लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

नोटीसमध्ये याबद्दल विचारणा
रस्त्याच्या कामाचे टेंडर अंतिम करणे, त्याला मंजूरी देणे, कंत्राटदाराला वर्कऑर्डर देणे ही कामे शहर अभियंता यांच्या अधिकारातील असताना ही सर्व कामे तुम्ही कोणत्या अधिकारात केली, असे या नोटीसद्वारे सिकंदर अली, खन्ना व कुलकर्णी यांना विचारण्यात आले आहे. तीन टेंडर आल्याशिवाय कोणत्याही कामाचे टेंडर मंजूर करू नये, असा नियम असताना रस्त्यांच्या कामासाठी आलेल्या एकाच टेंडरला मंजुरी देण्यास सहमती कशी दर्शवली, असा उल्लेख करून थोरात यांना कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली. या चारही अधिकाऱ्यांना नोटीसला उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा अवधी देण्यात आला. हा अवधी शनिवारी (२४ डिसेंबर) संपला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लुबाडणारा तोतया पोलिस अखेर जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना लुबाडणाऱ्या तोतया पोलिसाला गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली. आजमखान, असे या तोतया पोलिसाचे नाव आहे. शहरात विविध हॉस्पिटलजवळ केलेल्या सहा गुन्ह्याची कबुली त्याने दिली असून ५० हजारांचा ऐवज पोलिसांच्या हवाली केला.
गेल्या काही महिन्यांपासून घाटी तसेच विविध हॉस्पिटलजवळ नागरिकांना लुबाडण्याच्या घटना घडल्या होत्या. तुमच्या जवळ गांजा आहे, दारू पिलेले आहात, गुटखा आहे, अशी थाप मारून तो झडतीचे नाटक करीत होता. यामध्ये अनेक नातेवाईकांनी रुग्णाच्या उपचारासाठी आणलेली रक्कम आजमखानने लांबवली आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी घाटी हॉस्पिटल परिसरात फिरत असल्याची माहिती खबऱ्याने गुन्हेशाखेला दिली होती. त्यावरून आजमखान अफजलखान पठाण (वय ४९ रा. पांगरा, ता. मलकापूर) याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने सहा गुन्ह्याची कबुली दिली. आजमखानच्या ताब्यातून ३५ हजार रुपये रोख, अंगठी, घड्याळ आदी ऐवज जप्त करण्यात आला. पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त संदिप आटोळे, सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल वाघ, सहायक फौजदार शेख आरेफ, मनोज चव्हाण, भगवान शिलोटे, संजय खोसरे, संतोष सूर्यवंशी, संतोष काकडे आदींनी ह‌ी कामगिरी केली.

झिरो पोलिस म्हणून काम
अजमखान याचे मलकापुर येथे नेहमी पोलिस ठाण्यात जाणे येणे होते. पोलिसांच्या हाताखाली ‘झिरो पोलिस’ म्हणूनही त्याने काम केलेले आहे. त्यामुळे त्याला पोलिसांच्या कार्यपद्धतीची चांगलीच माहिती आहे. अंगात कडक पांढरा शर्ट घालून तो समोरच्या व्यक्तीवर छाप पाडत असे. तो हॉस्पिटलच्या जवळ फिरून प्रामुख्यांने जेष्ठ नागरिकांना लक्ष्य करत असे. औरंगाबादसह चिखली, मलकापूर, बुलडाणा, हिंगोली, वाशीम, परभणी, वसमत आदी ठिकाणी त्याने या पद्धतीचे गुन्हे केले आहेत. गुन्हा केल्यानंतर तो थेट बसने मलकापूर गाठत होता.

तोतयावरील शहरातील गुन्हे
- २६ जून रोजी कडुबा मगरे (रा. रांजणगाव) यांच्या मुलाच्या उपचाराचे १८ हजार रुपये धुत ह‌ॉस्पिटलजवळून लांबवले.
- ११ ऑगस्ट रोजी आनंदा भोरे (रा. टेंभुर्णी) यांच्या पत्नीच्या कँसरच्या उपचारासाठी जमा केलेली रक्कम सेव्हनहिल परिसरातून लंपास.
- ३१ ऑगस्ट रोजी मधुकर गायकवाड (रा. मंगरूळ) हे मुलीला भेटण्यासाठी आले असता कामगार चौकातून रोख ४ हजार व सोन्याची अंगठी लांबवली.
- ३ सप्टेंबर रोजी अब्दुल वाहीद अब्दुल वाहेद (रा. सेलू) यांच्या दहा वर्षाच्या मुलीच्या ब्लड कँसरसाठी जमा केलेले १० हजार घाटी हॉस्पिटलमधून लुबाडले.
- १६ नोव्हेंबर रोजी नवल पाटील (रा. म्हाडा कॉलनी, श्रद्धा कॉलनी) या ७३ वर्षाच्या जेष्ठ नागरिकाला दारू पिलेले आहात का, असे दरडावत ५ हजार लांबवले.
- ३० नोव्हेंबर रोजी प्रकाश पितळे (रा. मेहकर) यांच्या घाटीत अपघातामध्ये जखमी असल्यामुळे दाखल केलेल्या मुलीच्या उपचाराचे २३ हजार ५०० रुपये लंपास केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्त रजेवर; रुंदीकरण ठप्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राजाबाजार ते बायजीपुरा-जिन्सी या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम दोन दिवसात संपवण्याचा वायदा पालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी गेल्या आठवड्यात केला होता. पण, ते सुटीवर जाताच रुंदीकरणाचे काम ठप्प झाले आहे. हे काम किमान ८ ते १० दिवस पूर्ण होणार नाही, असे बोलले जात आहे. त्यामुळे बकोरियांचा वायदा फसल्यात जमा आहे.
गावठाणातील १६ रस्त्यांच्या रुंदीकरणाची मोहीम बकोरिया यांनी हाती घेतली आहे. त्यापैकी राजाबाजार ते बायजीपुरा-जिन्सी या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम एक महिन्यापासून सुरू आहे. अर्ध्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. जिन्सी ते राजाबाजार या रस्त्याचे काम होणे शिल्लक आहे. रस्त्याच्या या टप्प्यात सुमारे ४० मालमत्ता पाडाव्या लागणार आहेत. गेल्या आठवड्यात बकोरिया यांनी पत्रकारांशी संवाद साधला, तेव्हा दोन दिवसात या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण करू, असे त्यांनी सांगितले होते. परंतु, आता हे काम ठप्पच झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बकोरिया रजेवर गेले आहेत. ते गुरुवारी (२९ डिसेंबर) रुजू होणार आहेत. बकोरियाच नसल्यामुळे पालिकेचे काम ढेपाळले आहे. त्याचा परिणाम रस्ता रुंदीकरणाच्या कामावर देखील झाला आहे. हे काम शुक्रवारपासून बंद पडले आहे. शनिवार-रविवार दोन दिवस सुटी असल्यामुळे सोमवारी कामाला सुरूवात होईल, असे मानले जात होते, पण सोमवारी देखील काम सुरू झाले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तब्बल सहा वर्षांनंतर रेल्वेतून कांदा वाहतूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातून तब्बल सहा वर्षांनंतर कांदा इतर राज्यात पाठवण्यात आला आहे. नांदेड रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या नगरसोल स्टेशनवरून २०१० मध्ये कांदा पाठवण्यात आला होता. येथून नुकताच २६५५ टन कांदा पश्चिम बंगालधील चित्तूर येथे रवाना करण्यात आला. येत्या २० दिवसात आणखी कांदा पाठवण्यात येणार आहे.
नगरसोल स्टेशनवरून २०१० पूर्वी नियमितपणे शेतमालाची वाहतूक केली जात होती. पण, त्यानंतर शेतमालाची वाहतूक बंद पडली. शेतमालाची वाहतूक सुरू होण्यासाठी रेल्वेने औरंगाबाद शहरातील उद्योजक व ग्रामीण भागातील प्रमुख वाहतूकदारांसोबत चर्चा केली, पण यश मिळाले नाही. अखेर सहा वर्षांनंतर येवला येथील व्यापारी आर. ई. कलंत्री यांनी नगरसोल येथून रेल्वेने कांदा पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बूक केलेल्या ४२ वाघिणींतून कादा घेऊन पहिली रेल्वे २२ डिसेंबर रोजी पश्चिम बंगालमधील फतवा जिल्ह्याकडे रवाना झाली. यातून रेल्वेला २९ लाख रुपयांचा महसूल मिळाला. २४ डिसेंबर रोजी २६४९ टन कांदा घेऊन दुसरी रेल्वे पश्चिम बंगालमधील चित्तूरला रवाना झाली, याद्वारे ३४ लाख ३८ हजार रुपयाचे महसूल मिळाला. तिसरी रेल्वे सोमवारी ४२ वाघिण्यांमधून २६५५ टन कांदा घेऊन रवाना झाली. नजिकच्या काळात १७ रेल्वेने पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये कांदा पाठवण्यात येणार आहे. त्याद्वारे रेल्वेला पाच कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न अपेक्षित आहे.

सहा वर्षांनंतर शेतमाल वाहतुकीची रेल्वेला ही पहिलीच ऑर्डर मिळाली. संबंधित वाहतूक कंत्राटदाराने २० रॅक पाठविण्याबाबत विनंती केली आहे. त्यानुसार त्या कंत्राटदाराला रॅक पुरविण्यासाठी रेल्वे तयार आहे. त्यांच्या मागणीनुसार माल पाठवला जाईल.
धनंजयकुमार सिंघ
मुख्य वाणिज्य निरीक्षक, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टेशनवरील लिफ्ट, सरकता जिना बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नगरसोल चेन्नई रेल्वेने नांदेडकडे जाणाऱ्या एका रुग्‍णाला फलाट क्रमांक एकवरून दोनवर जाण्यासाठी सोमवारी पूर्ण फलाटाचा वळसा घालून जावे लागले. त्याने कुलीच्या मदतीने हा फलाटावरील प्रवास केला. रेल्वे स्टेशनवरील लिफ्ट व सरकता जिना बंद असल्यामुळे महिला, वृद्ध, रुग्णांना काही दिवसांपासून प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या सुविधा देखभाल दुरुस्तीच्या नावे बंद ठेवण्यात आल्या आहेत.
औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर लिफ्ट बसविण्यात आली असून काही महिन्यांपूर्वी सरकता जिना सुरू करण्यात आला. यामुळे एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्याची सोय झाली होती. पण, फलाट क्रमांक एक वरील लिफ्ट वर्षातून आठ महिने बंद राहते. लिफ्ट चालवण्यासाठी रेल्वेने खासगी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. सध्या ही लिफ्ट २० डिसेंबर पासून बंद आहे. तिच्यावर दुरुस्तीसाठी लिफ्ट बंद ठेवल्याची सूचना डकवली आहे. शिवाय सरकता जिनाही बंद आहे, पण त्याचे कारण रेल्वेच्या मेकॅनिकल विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सक्षम उमेदवारांसाठी भाजपची चाचपणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने सक्षम उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी प्रत्येक गट व गणांमधून नावे मागविण्यात आली आहे. संभाव्य उमेदवारांच्या यादीतून अंतिम नावे कोअर कमिटी व पक्षश्रेष्ठींच्या मान्यतेने जाहीर केली जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्ह्यातील चार नगरपालिका निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले आहे. पैठणमध्ये शिवसेना व भाजपने स्वबळ अजमावले, त्यात भाजपने नगराध्यक्षपद मिळवले. औरंगाबाद जिल्हा बालेकिल्ला असूनही शिवसेनेला एकाही नगरपालिकेत नगराध्यक्षपद मिळवता आले नाही. याउलट भाजपने गंगापूर आणि पैठणमध्ये नगराध्यक्षपद खेचून आणले. त्यानंतर भाजपने जिल्हा परिषदेवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. पक्षाची ताकत वाढल्यामुळे शिवसेनेसोबत युती करताना सन्मानपूर्वक झाली पाहिजे, अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी घेतली आहे. युती न झाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी असावी, म्हणून युद्धपातळीवर सर्व गट, गणात कार्यकर्त्यांना कामाला लावण्यात आले आहे. जिल्हा मेळाव्यासह तालुकास्तरीय तसेच बुथनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुक प्रयत्नशील आहेत. पक्षानेही अधिक सक्षम उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे. शिवाय संभाव्य उमेदवारांच्या नावाची यादी तयार केली जाणार आहे.

प्रत्येक मतदारसंघातून प्रबळ, सर्वमान्य असा उमेदवार रिंगणात असेल. त्यासाठी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. शिवसेनेसोबत युतीची व्हावी, अशी आमची इच्छा आहे. भाजपची ताकद वाढली असून त्यादृष्टीने जागा वाटपाच्या वाटाघाटी झाल्या पाहिजे.
- शिरीष बोराळकर, प्रदेश प्रवक्ते, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गटविकास अधिकाऱ्यास फुलंब्रीत घेराव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
एक वर्षांपासून अनुदान रखडलेल्या घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांनी सोमवारी पंचायत समितीच्या एका सदस्याला घेऊन गटविकास अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्याला दालनात घेराव घातला. यावेळी लाभार्थ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली.
पंचायत समिती कार्यालय दोन वर्षांपासून वयैक्तिक लाभाच्या विहीर योजनेत अनियमितता आढळून आल्याने तत्कालीन गटविकास अधिकारी शिवाजी माने यांना निलंबित करण्यात आले आहे. अनेक विहिरीचे प्रस्ताव रद्द करण्यात आले, तर काही प्रस्ताव पुन्हा मागवण्यात आले. यात सर्वसामान्य शेतकरी भरडला गेला आहे. त्यानंतर घरकुलासाठी निधी उपलब्ध असताना सुद्धा लाभार्थ्यांची अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. दीड महिन्यापूर्वी कायमस्वरुपी गटविकास अधिकारी मिळाले पण, त्यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने घरकुलांचे अनुदान रखडले आहे. या विभागातील कर्मचारी लाभार्थ्यांना टोलवत आहेत. त्यामुळे सोमवारी पंचायत समिती डॉ. सारंग गाडेकर यांच्याकडे विविध गावातील ३० ते ४० लाभार्थ्यांनी अनुदानाविषयी विचारणा केली. आम्ही तुम्हाला निवडून दिले, तुम्ही अधिकाऱ्यांकडून काम करून घ्या, असे ठणकावून सांगितले. त्यांना घेराव टाकला. त्यामुळे डॉ. गाडेकर यांनी सर्व लाभार्थ्यांना घेऊन गटविकास अधिकारी एम. सी. राठोड यांचे दालन गाठले. घरकुलाच्या अनुदानाचे काय झाले तुमच्याकडून कामे होत नसेल, तर लेखी द्या, असा जाब विचारला. तेव्हा गटविकास अधिकारी एम. सी. राठोड यांनी संबंधित यंत्रणेच्या सर्व कर्मचाऱ्यांना दालनात बोलावून घेतले. यावेळी ते लाभार्थ्यांसमोरच टोलवाटोलवी करत होते. तेव्हा गटविकास अधिकाऱ्यांना त्यांना खडसावले. तुमच्याकडून काम होत नसेल, तर कार्यालयात येऊ नका, असा इशारा गाडेकर यांनी दिला.

१५ दिवसात अनुदान
गटविकास अधिकारी राठोड यांनी दोन तासात अपूर्ण प्रस्ताव ऑनलाइन करून सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाचा हप्ता १५ दिवसात जमा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर लाभार्थ्यांनी दालनाचा ताबा सोडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रसिकांच्या गर्दीत मुशायरा रंगला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रेम, एकात्मता, माणुसकी अशा चिरंतन भावनांना संवेदनशील शायरीतून मांडणारा मुशायरा रसिकांची भरभरून दाद घेत रंगला. ख्यातनाम शायर बशर नवाज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महानगरपालिकेने सोमवारी रात्री संत तुकाराम नाट्यगृहात ‘एक शाम बशर नवाज के नाम’ हा मुशायरा आयोजित केला. देशभरातील प्रसिद्ध शायर ऐकण्यासाठी जिंदादिल रसिकांची तुफान गर्दी झाली.
‘करोगे याद तो हर बात याद आयेगी, गुजरते वक्त की हर मौज ठहर जायेगी’ अशी शायरी करणारे बशर नवाज देशभरातील रसिकांचे आवडते शायर होते. बशरजींचे स्मरण करीत देशभरातील कवींनी आपली शायरी सादर करीत मुशायरा रंगवला. डॉ. राहत इंदौरी (इंदूर), मंजर भोपाली (भोपाळ), हामेद भुसावली (भुसावळ), नईम अख्तर खादमी (बऱ्हाणपूर), नदीम फर्रूख (मुरादाबाद), शम्स जालनवी (जालना), सुंदर मालेगावी (मालेगाव), युसूफ यलगार (मुंबई), काजी सुफयान (खंडवा), डॉ. सलीम मोहियोद्दीन (परभणी), मोनिका सिंग (पुणे), अता हैद्राबादी (हैदराबाद), खान शमीम (औरंगाबाद), महेशर आफ्रिदी (रूडकी), उम्मी अहमद (अहमदाबाद), खमर ऐजाज (औरंगाबाद), जावेद अमान (औरंगाबाद) आणि राही जलगावी (जळगाव) यांनी मुशायऱ्यात सहभाग घेतला. ‘आप आये तो जमाने के मुकद्दर जागे’ या रचनेतून शम्स जालनवी यांनी दाद मिळवली. तर शमीम खान यांनी बशर नवाज यांना आदरांजली वाहणारी ‘मै लिखूंगी तो क्या लिखू’ ही नज्म सादर केली. जावेद अमान यांची सद्यस्थितीवर भाष्य करणारी रचना विशेष होती. ‘तुम्हारी नोटबंदीसे हमारा कुछ नही होगा, और हमारी वोटबंदीसे तुम्हारा कुछ नही होगा, मगर ये याद रखो वक्त के शातीन अदाकारों, तुम्हारे दिन सहारा कुछ नही होगा’ या रचनेला प्रतिसाद मिळाला. सुंदर मालेगावी यांनी हास्यकविता सादर केल्या. ‘बुझी बुझी है तबियत मेरी, हरी कर दे, तु आजा पास मेरे और मुझे गुदगुदी कर दें’ या कवितेने रसिकांची करमणूक केली. रात्री उशिरापर्यंत मुशायरा रंगला.
दरम्यान, उदघाटन समारंभाला उपायुक्त अय्युब खान, महापौर भगवान घडमोडे, स्थायी समितीचे सभापती मोहन मेघावाले, विरोधी पक्ष नेते अय्युब जहागिरदार, नगरसेवक जमीर कादरी, शिवाजी दांडगे यांची उपस्थिती होती.

मनपाला शिव्या नको
‘महापालिका रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज यांचे काम करते. लोक आम्हाला नेहमीच शिव्या देत असतात. पण, आता मुशायरा घेऊन मनपाने सांस्कृतिक एकोपा साधला आहे. शहराच्या विकासासाठी एकोपा बळ देणारा ठरू दे’ असे प्रतिपादन महापौर भगवान घडमोडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेवतामध्ये डीजेबंदी; कमी खर्चात लग्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
तालुक्यातील शेवता येथील ग्रामस्थांनी अवाजवी खर्च टाळण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. गावकऱ्यांनी लग्नात डीजेबंदी करून वारेमाप खर्च टाळण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे.
शेवता खुर्द व शेवता बुद्रुक ही दोन गावे गिरिजा नदीच्या काठावर वसलेली आहेत. या दोन्ही गावांची लोकसंख्या अंदाजे दोन हजार असून ९० टक्के मराठा समाजाची वस्ती आहे. येथील गावकऱ्यांनी शुक्रवारी हनुमान मंदिराच्या प्रांगणात आयोजित केलेल्या बैठकीला प्रत्येक कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत लग्नातील खर्चिक रूढी परंपरा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. गावात होणाऱ्या लग्नामध्ये वारेमाप खर्च करू नये, वरातीमध्ये डीजे वाजवू नये, दुसऱ्या गावात लग्नासाठी गेलेले वऱ्हाडही डीजे वाजवणार नाही, असा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
गावकऱ्यांच्या या निर्णयामुळे दारूबंदी करण्यास मदत होणार आहे. एखाद्याचे लग्न ठरले असेल, तर वधू किंवा वरापैकी एकाचे कपडे खरेदीसाठी टेम्पोभर माणसे जातात. हा खर्च कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सामूहिक विवाह सोहळात लग्न करण्यास नागरिकांना प्रोत्साहित केले जाणार आहे. त्यामुळे आपोआपच खर्चाला आळा बसू शकेल, असे बैठकीत सांगण्यात आले.यापुढे गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे बचत गट स्थापन करून गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्याला सामील करून घेतले जाणार आहे. बचत गटाच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील शिक्षण, लग्न, अंत्यविधी यासाठी निधी दिला जाणार आहे. शासकीय परवानगी मिळाल्यानंतर गावात शिवस्मारक बांधकाम केले जाणार आहे. येत्या शिवजयंतीला ग्रामस्थ दारूबंदीची शपथ घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करावेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
‘पर्जन्यमान घटत असल्याने पक्ष्यांचे नैसर्गिक पाणवठे नाहीसे होत आहेत. त्यामुळे पक्षांच्या अनेक प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर असून वन्यजीव व पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी जंगलामध्ये नैसर्गिक पद्धतीचे पाणवठे तयार करण्याची व प्रत्येकाने घरांवर पक्षांना पिण्यासाठी पाणी ठेवण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन पक्षी तज्ज्ञ किरण पुरंदरे यांनी केले.
जायकवाडी धरण परिसरात आयोजित आंतराष्ट्रीय पक्षी महोत्सवात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना नैसर्गिक पाणवठ्याचे महत्त्व सांगितले. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे विभागीय वन अधिकारी सोनकुसरे, बोरीकर व पैठण शहर व परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनी सोनवाडी येथे पक्षीनिरीक्षण केले. यावेळी दिलीप यार्दी यांनी माहिती दिली.
‘सध्या जायकवाडी धरणावर विविध प्रकारचे बगळे व फ्लेमिंगो आले आहेत. जायकवाडी धरणाच्या पूर्व भागातील पिंपळवाडी, जायकवाडी व पश्चिम भागातील सोनवाडी, एरंडगाव या भागातून पक्ष्यांचे निरीक्षण केले जाऊ शकते,’ अशी माहिती दिलीप यार्दी यांनी दिली. शेवटच्या सत्रात शालेय विद्यार्थ्यांना दुर्मिळ पक्ष्यांचे माहितीपट दाखवण्यात आले. तसेच चित्रकला व प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आले.

पर्यटनाला वाव
जायकवाडी धरण पसरट असून पाण्याची खोली कमी असल्याने सूर्यप्रकाश खालपर्यंत पोहचतो. परिणामी पक्ष्यांना अन्न सहज उपलब्ध होते. त्यामुळे येथे वर्षभर शेकडो जातींचे देशी-विदेशी पक्षी आढळतात. जायकवाडी पक्षी अभयारण्याचा आतापर्यंत योग्य पद्धतीने प्रसार व प्रचार झाला नसल्याने अपेक्षेप्रमाणे पर्यटक येत नाहीत. या अभयारण्याचा माहिती योग्य पद्धतीने पोहचवल्यास, पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे, असे मत औरंगाबादचे विभागीय वन अधिकारी कमलाकर धामणे यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांच्या माथी पोस्टडेटेड धनादेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
सरकार कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन करत असताना काही आडत व्यापारी शेतकऱ्यांना ठकवण्यास सुरुवात केली आहे. आधी जुन्या नोटा देऊन माल खरेदी केला, आता पुढील तारखेचे धनादेश देऊन शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत.
नोटबंदीनंतर सर्वाधिक अडचण शेतकऱ्यांची झाली आहे. पाचशे व हजार रुपयांच्या नोटा पूर्णतः बाद झाल्यानंतर शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. नोटबंदीनंतर कापूस, मका, अद्रक, डाळी विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना आडत्यांनी १५ डिसेबरपर्यंत जास्तीचा भाव देवून जुन्या नोटा दिल्या. त्यावेळी रोख व धनादेशाने पैसे देण्याकरिता वेगवेगळा भाव दिला जात आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांची लूट केली जात आहे. सध्या शेतमाल खरेदीनंतर लगेच धनादेश घेऊन जा, असे सांगितले जाते. पण, प्रत्यक्षात ८ ते १० दिवसांनंतरच्या तारखेचा नागरी वा सहकारी बँकेचा धनादेश दिला जात आहे.
नागरी किंवा सहकारी बँकेचा धनादेश वटण्यासाठी किमान महिना ते दोन महिने वेळ लागेल, असे सांगून राष्ट्रीयकृत बँका दिशाभूल करत आहेत. यामध्ये शेतकरी नाहक भरडला जात आहे. वस्तुतः आरटीजीएस वा नेफ्टच्या माध्यमातून पैसे लगेचे खात्यावर वर्ग करता येऊ शकतात. पण, अधिक दिवस पैसा वापरण्यासाठी व्यापारी शेतकऱ्यांना धनादेश देत आहेत. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
ग्रामीण भागात आर्थिक साक्षरता नसल्याने कॅशलेस व्यवहार, बँकिंगची माहिती शेतकऱ्यांना व ग्रामीण नागरिकांना नाही. याचा फायदा आडते घेत आहेत. या परिस्थितीत शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

बँकांची कमतरता
कन्नड तालुक्यात कन्नड शहर, पिशोर, नाचनवेल, लिंबाजी चिंचोली, करंजखेडा, नागद, उपळा (कालीमठ), चापानेर, जेहूर, देवगांव रंगारी व चिकलठाण या १० गावांमध्येच राष्ट्रीयकृत बँक आहे. त्यामुळे तालुक्यातील २१२ गावांपैकी उर्वरित २०२ गावांना अधिकृत व्यवहारासाठी या १० गावांतील बँकांवर अवलंबून राहावे लागत आहे.

एका शेतकऱ्याचा अनुभव
धनादेशाद्वारे पैसे देणार असल्याचे सांगितल्यानंतर खासगी व्यापाऱ्याला १६ डिसेंबर रोजी मका विकली. प्रत्यक्षात मका विक्री झाली त्या दिवसाऐवजी पुढील ८ दिवसानंतरच्या तारखेचा सहकारी बँकेचा चेक दिला. कन्नड येथील राष्ट्रीयकृत बँकेत गेल्यानंतर हा धनादेश वटण्यासाठी किमान महिना ते दीड महीना लागेल, असे उत्तर मिळाले. पण, दुसरा मार्ग नसल्याने धनादेश बँकेत जमा केला असून तो वटेपर्यंत माझे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत, असे रमेश जाधव या शेतकऱ्याने सांगितले.

व्यापाऱ्यांची शक्कल
१५ डिसेंबरनंतर रोख रक्कम देणे जवळपास बंद
शेतकऱ्यांना धनादेश देण्यास सुरुवात
खरेदी दिवसाऐवजी पुढील तारखेचा धनादेश देणे
राष्ट्रीयकृत बँकेऐवजी सहकारी बँकेचा धनादेश
आरटीजीएस सारख्या पैसे ट्रान्स्फर पद्धतीला नकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीचे पुन्हा ‘प्रवासी वाढवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

प्रवाशांना पुन्हा एकदा एसटीकडे आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळ नव्या वर्षामध्ये प्रवासी वाढवा अभियान राबविणार आहे. यामध्ये ‘हात दाखवा, गाडी थांबवा’ यांसारख्या योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उस्मानाबाद विभागीय वाहतुक अधिकारी अमोल गोंजारी यांनी दिली. प्रवासी संख्या वाढविणाऱ्या डेपोंना वेगवेगळी बक्षिसे देतानाच, वाहक-चालकांनाही रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.

एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत चालल्याने त्याचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी एसटी महामंडळाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. आता नवीन वर्षात एसटी महामंडळाने प्रवाशांची संख्या वाढविण्याचे निश्चित केले आहे. नव्या वर्षात एसटी महामंडळाकडून राज्यभर प्रवासी वाढवा अभियान राबविले जाणार आहे. एक जानेवारी ते ३१ मार्च या काळात हे अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डेपोला दर महिन्याला एक लाख रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. दुसऱ्या क्रमांकावरील डेपोला ७५ हजार आणि तृतीय क्रमांकावरील डेपोस ५० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेतील एसटीला खासगी वाहतुकीबरोबरच अवैध प्रवासी वाहतुक करणाऱ्यांचा विस्तार वाढल्याने एसटीच्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस घट होत चालली आहे. त्याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर होत आहे. त्यामुळे हे चित्र पालटण्यासाठी व एस टी महामंडळाला गतवैभव प्राप्त होवून, एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ व्हावी म्हणून एसटी महामंडळाने नवीन वर्षांपासून विविध उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. याचाच एक भाग म्हणून नववर्षाच्या प्रारंभी तीन महिन्यांसाठी प्रवासी वाढवा अभियान राबविण्यात येणार आहे. एसटीपासून दुरावत चाललेला प्रवासी पुन्हा एसटीला जोडण्यासाठी ‘हात दाखवा-गाडी थांबवा’ सारख्या उपाययोजनाही करण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images