Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तरुणाच्या त्रासामुळे मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

0
0

औरंगाबाद : रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळत नववीतील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. नारळीबाग येथील जिल्हा परिषद वसाहत परिसरात बुधवारी दुपारी सुमारास हा प्रकार घडला. गेल्या सहा महिन्यापासून एकतर्फी प्रेमातून हा प्रकार सुरू होता. दरम्यान, याप्रकरणी यापूर्वी तक्रार करूनही शाळा प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप पीडित मुलीने व तिच्या आईने केला. मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध क्रांतिचौक पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी सांगितले की, समर्थनगर येथील एका शाळेत ही विद्यार्थिनी नवव्या इयत्तेत शिकत आहे. बुधवारी दुपारी या मुलीची साडेबारा वाजता शाळा होती. त्यापूर्वी सव्वाबाराच्या सुमारास या मुलीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यावेळी तिची आई बाहेर गेली होती. आई त्याच वेळी परतली. हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारील तरुणांनी धाव घेऊन दरवाजा उघडत मुलीची गळफासातून सुटका केली. तिला तातडीने घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
मुलीने व तिच्या आईने ‌क्रांतिचौक पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दिली. महिला सुरक्षा समितीच्या सदस्यासमोर या मुलीची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला.
या मुलीने दिलेल्या माहितीनुसार; गेल्या सहा महिन्यांपासून तिला कृष्णा नावाचा तरुण एकतर्फी प्रेमातून त्रास देत होता. पाठलाग करणे, रस्त्यात अडविणे असे प्रकार सुरू होते. दोन दिवसांंपूर्वी या तरुणाने तिच्या वर्गाच्या भिंतीवर ‘आय लव्ह यू’ असे लिहून तिच्या बदनामीचा प्रकार केला. या प्रकाराची माहिती शाळेतील शिक्षिकांना दिली होती. सहा महिन्यांपूर्वी हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले होते, मात्र शिक्षिका व मुख्याध्यापक काही कारवाई करण्याऐवजी मुलींनाच दडपशाही करीत असल्याचा आरोप मुलीने केला.

भिंतीवरील मजकूर पुसला
भिंतीवर या रोडरोमिओने लिहिलेला मजकूर पुसून टाकण्यात आला आहे. हा मजकूर कोणी पुसला याबाबत शिक्षिकांनी काही माहित नसल्याचे सांगितले. त्यामुळे हा प्रकार शि‌क्षिकांना माहित नव्हता. या रोडरोमिओने शाळेत घुसून कधी हा प्रकार केला, हा प्रश्न अनुत्तरित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उर्मिलाने सांगितले, कमवा शिकाचे महत्त्व

0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
‘कॉलेज शिक्षण घेण्यासाठी पैसै नसणे ही परिस्थिती विद्यार्थ्यांसाठी खूप त्रासदायक असते. त्यामुळे त्यांच्यासाठी ‘कमवा शिका योजना’ अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेतून शिक्षण घेणारे विद्यार्थी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करतात. शिक्षणासाठी मेहनतीने कमावलेला एक रुपया देखील महत्त्वाचा आहे,’ असे मत सिनेअभिनेत्री उर्मिला कानीटकर यांनी व्यक्त केले.
बजाजनगर येथील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाच्या ‘कमवा व शिका’ योजनेचे उद्‍घाटन ‘दुनियादारी’ फेम उर्मिला कानिटकर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव विजय राऊत, प्राचार्य कल्याणराव लघाने, विद्यापीठ विद्यार्थी कल्याण संचालक सुहास मोराळे, प्रा. विनायक शिंदे, डॉ. प्रा. संजय सांभाळकर आदींची उपस्थिती होती.
‘मराठवाडा विद्यापीठाची ही योजना गरजू विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. या विद्यापीठामुळे चित्रपटसृष्टीला अनेक कलावंत मिळाले. ही योजना देशभरातील विद्यापीठांनी लागू केली, तर पैशाशिवाय कोणाचेच शिक्षण थांबणार नाही,’ असे कानिटकर म्हणाल्या.

नानासोबत भूमिका करण्याची इच्छा
मराठी चित्रपट हे हिंदी चित्रपटाहून अधिक कमाई करत आहेत. प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या सोबत काम करण्याची माझी इच्छा असल्याचे कानिटकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण निश्चित

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्ह्यातील ९ तालुक्यांच्या पंचायत समित्यांचे सभापती पदाची आरक्षण सोडत बुधवारी (४ जानेवारी) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात काढण्यात आली. जिल्हा नियोजन सभागृहात झालेल्या सोडत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय या होत्या.
हर्षा बनसोडे या दहा वर्षाच्या मुलीच्या हातून आरक्षणासाठीच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. आगामी निवडणुकीनंतर होणाऱ्या सभापतींसाठी हे आरक्षण लागू होणार आहे. यावेळी औरंगाबाद पंचायत समिती-सर्वसाधारण महिला, पैठण- ओबीसी महिला, फुलंब्री- सर्वसाधारण, सिल्लोड- सर्वसाधारण, कन्नड- सर्वसाधारण महिला, सोयगाव- ओबीसी, वैजापूर- अनुसूचित जमाती महिला, गंगापूर- अनुसूचित जाती व खुलताबाद पंचायत समिती सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षण जाहीर झाले आहे.
ग्रामविकास व जलसंधारण विभाग मुंबई यांच्या अधिसूचना २७ डिसेंबर २०१६ या अन्वये महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या सभापती पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, इतर अधिकारी, पचांयत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

खुलताबादेत हिरमोड
खुलताबादः पंचायत समिती सभापतीपद पुन्हा एकदा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने सभापतिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या पुरूष पुढाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. गेली पाच वर्ष पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित होते. पंचायत समितीचा गदाना गण सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित असल्याने येथून चुरशीची लढत मिळेल. सभापतीपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलासाठी घोषित होताच गदाना गणातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतमाल तारण योजना कन्नडमध्ये सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे कडधान्य व भरड धान्यासाठी शेतमाल तारण कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेची औपचारिक सुरुवात आमदार हर्षवर्धन जाधव, माजी आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आली.
यानिमित्त बाजार समिती परिसरात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शेतमाल तारण कर्ज योजनेसाठी सुमारे १५ लाख रुपये निधी बाजार समिती करिता उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठी ६ टक्के व्याज अाकारणी करण्यात येणार आहे. त्यात ३ टक्के व्याज परतावा मिळणार आहे. पणन महासंघाचे सरउपव्यवस्थापक एम. एन. साळुंके यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेचे सतीष तांबट यांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कौशल्यआधारित उपक्रमाची माहिती दिली. ३२ योजनांच्या माध्यमातून थेट प्रशिक्षण व नोकरीची हमी असल्याचे सांगितले. प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब थोरात यांनी गटशेतीचे महत्त्व पटवून दिले. निसर्ग फ्रेशचे पंकज गायकवाड यांनी शेतमाल निर्यातीची माहिती दिली. यावेळी उपसभापती पंडितराव वेताळ, बाजार समिती सभापती राजेंद्र मगर, अशोक मगर, भरत जाधव, के. एम. वानखेडे, सहकार निबंधक उमेशचंद्र हुसे, सहनिबंधक दीपक परदेशी आदींची उपस्थिती होती.

अशी आहे योजना
तूर, मूग, उडीद, सोयाबीन, धान, सूर्यफूल, करडई आदी पिकांसाठी हमी भावाच्या
७५ टक्के, मका, बाजरी, ज्वारी, गहू आदी पिकांसाठी ५० टक्के कर्ज वितरित करण्यात येणार आहे. योग्य भाव मिळाल्यानंतर शेतकरी शेतमाल विकू शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावकारावर छापा; ३२ खरेदीखत जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
शेतकऱ्याच्या तक्रारीवरून सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील पेंडगाव येथील अवैध सावकार काशीनाथ गंगाधर काटेकर यांच्या घरी व दुकानात बुधवारी सकाळी एकाच वेळी छापे टाकले. या छाप्यात शेतजमिनीचे ३२ खरेदीखत, करारनामे, अवैध सावकारीच्या नोंदी असलेल्या सहा नोंदवह्या ताब्यात घेतल्या. याप्रकरणी चौकशी व जबाब नोंदवून पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती सहकार अधिकारी दिलीप जैस्वाल यांनी दिली.
या बाबत अधिक माहिती अशी की, सहकार विभागाला अवैध सावकारी करणारे काटेकर यांच्या विषयी सरूबाई जाधव, शिवाजी विठ्ठल जाधव, कोंडिराम भिका जाधव (रा. सर्व पेंडगाव) यांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीसाठी काशीनाथ गंगाधर काटेकर यांचे घर व दुकान झडतीसाठी सहकार अधिकारी दिलीप जैस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली. विभागीय सह निबंधक राजेश सुरवसे, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्या मार्गदर्शनाखाली तक्रारदार यांना सोबत घेऊन बुधवारी सकाळी सहकार अधिकारी दिलीप जैस्वाल, कर्मचारी संगिता शिंदे, एस. वाय. पठाण, बी. डी. कुंभारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अवैध सावकारांनी शेतकऱ्यांना वेठीस धरून त्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या, शेतकऱ्यांच्या तकारीनुसार सहकार विभागाने आतापर्यत कारवाई करून तालुक्यातील शेतकऱ्यांना ६५ एकर जमीन परत केली आहे, अशी माहिती सहकार अधिकारी दिलीप जैस्वाल यांनी दिली.

सावकाराविरुद्धची तक्रार
-सरूबाई जाधव यांनी काटेकर याच्याकडून ५० हजार रुपये ७ टक्के व्याजाने घेतले होते. त्या बदल्यात १२३ आर जमीन धर म्हणून पलटावून देण्याच्या बोलीवर दिली होती. आतापर्यत त्यांनी अडीच लाख रुपये देऊनही शेतजमीन पलटावून दिली नाही. आणखी साडेचार लाख रुपयांची मागणी करण्यात आली.
-शिवाजी जाधव यांनी ६० हजार रुपये १० टक्के व्याजाने घेऊन या रक्कमेस धर म्हणून ९७ आर शेतजमीन सावकाराच्या नावाने परत पलटावून देण्याच्या बोलीवर लिहून दिली होती. त्यांनी तीन लाख रुपये देऊनही जास्त पैशाची मागणी केली. शेतजमिनीचा ताबा बळजबरी घेऊन सात लाख रुपये न दिल्यास जमीन विक्री करण्याची धमकी दिली.
-कोंडिराम जाधव यांनी ६० हजार रुपये ७ टक्के व्याजाने घेऊन दोन एकर जमीन सावकाराच्या नावावर परत पलटावून देण्याच्या बोलीवर लिहून दिली. त्यापैकी एक एकर जमीन पलटावून दिली. उर्वरित जमीन मुद्दल व व्याजापोटी दीड लाख रुपये घेऊनही पलटावून दिली नाही. त्यांच्याकडे तीन लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेंभापुरी धरणग्रस्तांचा आयुक्तालयावर मोर्चा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गंगापूर-भेंडाळा येथील शेती महामंडळाच्या जमिनीतून टेंभापुरी धरणग्रस्तांना जमिनी त्वरित वाटप करण्यात याव्यात यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने बुधवारी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला.
सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार गंगापूर-भेंडाळा क्षेत्रातील जमीन टेंभापुरी प्रकल्पग्रस्त लाभार्थ्यांना त्वरित करण्याची मागणी वारंवार करण्यात आली. पण त्याबाबत प्रशासनाने दखल घेतली नाही. धरणग्रस्त खातेदारांना पर्यायी जमीन धरणग्रस्त भूमिहीन, शेतमजूर, छोटे व्यावसायिक व माजी सैनिकांना सरकारी नियमानुसार देय जमीन गंगापूर-भेंडाळा क्षेत्रातील शेती महामंडळाच्या जमिनीतून देण्यात याव्यात, उर्वरित लाभधारकांना भूखंड द्यावे, नियमित करावे, सर्व धरणग्रस्तांना दारिद्र्यरेषेखालील कार्ड, इंदिरा आवास योजनेनुसार अनुदान, शौचालय बांधणी अनुदान आदी लाभ द्यावेत आदी मागण्या मांडण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने मागण्यांच्या पूर्ततेसाठी डॉ. श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत एक बैठक बोलवावी, अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली. जिल्हाध्यक्ष सुभेदार मेजर सुखदेव बन यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला आणि निवेदन देण्यात आले. त्यावर बन यांच्यासह साहेबराव साबळे, राम बाहेती, प्रभाकर साबळे, सईद पठाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नड पोलिस ठाणे, निवास्थानाचे भूमिपूजन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
शहरातील पोलिस ग्राउंड मैदानावर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, पोलिस ठाण्याची इमारत, ४ पोलिस अधिकारी व ३६ पोलिस कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले.
सुमारे पाच कोटी ७३ लाख रुपयांच्या या कामाला लगेच सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पूर्व) कनिष्ठ अभियंता एस. डी. शिंदे, उपअभियंता मुर्तुजा अहमद, पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे व मारुती पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती. या कामाला २० डिसेंबर २०१६ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. शहर पोलिस ठाण्याची इमारत शंभर वर्ष जुनी असून ग्रामीण पोलिस ठाणे व उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय भाड्याच्या इमारतीमध्ये आहे. चाळीसगाव रोडवरील पिशोर नाक्यासमोर पोलिस ग्राउंड मैदानावर या इमारती बांधण्यात येणार आहेत. टाइप २ मध्ये ३६ पोलिस कर्मचाऱ्यांचे निवासस्थान व टाइप ३ मध्ये पोलिस अधिकारी यांच्यासाठी ४ निवासस्थानाचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठणच्या विकासाला प्राधान्य असेल

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
नवनिर्वाचित नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी बुधवारी पदाची सूत्रे स्वीकारली. शहरातील स्वच्छता, पिण्याचे पाणी, नगरपालिका कर्मचाऱ्यांचे वेतन या समस्या सोडवणे व शहराचा सर्वांगिण विकास याला प्राधान्य राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
राज्यातील सर्वात तरूण नगराध्यक्ष ठरण्याचा मान भाजपचे सूरज लोळगे यांनी मिळवला आहे. नगरपालिकेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे, उपजिल्हाध्यक्ष लक्ष्मण औटे, डॉ. सुनील शिंदे, माजी आमदार भाऊ थोरात, माजी नगराध्यक्ष चंद्रशेखर पाटील, शहराध्यक्ष विजय चाटुपळे, राजेंद्र लोळगे, सुनील रासने, रघुनाथ आगलावे, महेश जोशी, रमेश पाठक, गणी बागवान, शाम पंजवानी, शिवाजी तुपे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष लोळगे म्हणाले, पैठण शहर हे ऐतिहासिक असून स्थानिक नागरिक, वारकरी व पर्यटकांना नगरपालिकेतर्फे सुविधा पुरवण्यावर लक्ष राहणार आहे. पक्षीय मतभेद बाजुला ठेऊन सर्वांना सोबत घेऊन नगराध्यक्षपदाच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात पैठणनगरीचा कायापालट करणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी बोलताना भाजप तालुकाध्यक्ष शिसोदे म्हणाले, शहराचा विकास कसा असतो हे स्थानिक नागरिकांना भाजपच्या माध्यमातून समजणार आहे. विकास योजनांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमाला नगरसेवक कल्याण भुकेले, सविता माने, आशा आंधळे, अलकाबाई परदेशी, बजरंग लिंबोरे, शोभा लोळगे, हसनोद्दिन कट्यारे, अजित पगारे, नुजहत टेकडी, ज्ञानेश घोडके, महेमुदा शेख, मैमुना बागवान, आबासाहेब बरकसे, सुचित्रा जोशी, पुष्पा वानोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपमुख्यधिकारी दिलीप साळवे यांनी प्रस्ताविक केले. मान्यवरांचे स्वागत व्यंकटी पापुलवार, लेखापाल अश्वीन गोजरे, राजेश राजणीकर, उदय पटेल, सुभाष तुसामकर, कैलास मगरे, चंद्रकांत पगारे, अशोक मगरे, रऊफ शेख, दारासिंग साळवे यांनी केले.

शिवसेना नगरसेवक गैरहजर
नगरपालिककेत निवडून आलेल्या संख्याबळानुसार, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्याची शक्यता आहे. आघाडीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचा उपनगराध्यक्ष व भाजपचा स्वीकृत सदस्य होणार आहे. याप्रकरणी काही दिवसापासून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गुप्त बैठका सुरू आहेत. याकारणाने शिवसेना भाजपवर नाराज आहे. त्याचा प्रत्यय बुधवारी झालेल्या पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमात आला. शिवसेनेच्या सर्व नगरसेवकाना निमंत्रण देवूनही एकही शिवसेना नगरसेवक यावेळी उपस्थित राहिला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बहुजन क्रांती मोर्चा; २० जानेवारीला आयोजन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘राज्यात वेगवेगळ्या मागण्यांसाठी मोर्चे-प्रतिमोर्चे निघत आहेत. सत्ताधारी सरकार मोर्चांना फूस लावून समाजात तेढ निर्माण करीत आहे. विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित बहुजन समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी शहरात २० जानेवारीला बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे’ अशी माहिती समन्वयक कुमार काळे यांनी दिली. या मोर्चानिमित्त गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बहुजन समाजातील सर्व जातींना एकत्र घेऊन २० जानेवारीला औरंगाबाद शहरात बहुजन क्रांती मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मोर्चात अनुसूचित जाती-जमाती, भटके विमुक्त, ओबीसी, मराठा, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, लिंगायत, शीख, जैन यांचा सहभाग राहणार आहे. यापूर्वी औरंगाबाद शहरात चार नोव्हेंबरला बहुजन क्रांती मूक मोर्चा निघाला होता. हा मोर्चा अॅट्रॉसिटी कायदा कायम ठेवण्याच्या मागणीसाठी होता. या मोर्चात इतर समाजाचा सहभाग कमी होता. त्यामुळे सर्वसमावेशक मागण्यांसाठी सर्वांना घेऊन मोर्चा काढण्यात येणार आहे, असे काळे यांनी सांगितले. हा मोर्चा २० जानेवारीला सकाळी १० वाजता क्रांती चौकातून निघणार आहे. तर आमखास मैदानावर मोर्चाचा समारोप होईल. आतापर्यंत ७५ सामाजिक संघटनांनी मोर्चाला पाठिंबा दिला आहे. या पत्रकार परिषदेला सिद्धार्थ शिनगारे, अमिनभाई जामगावकर, प्रा. सुभाष राठोड, तुकाराम महाराज शिंदे, दादाराव सावळे, प्रा. राजकुमार गाजरे, हनुमंत पाईक, सुरेश बोर्डे आदी उपस्थित होते.

मोर्चाच्या मागण्या
अॅट्रॉसिटी कायदा मजबूत करून स्वतंत्र न्यायालय व यंत्रणा निर्माण करावी, राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या ब. मो. पुरंदरेला दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार शासनाने परत घ्यावा, ओबीसी व एसबीसी भटक्या विमुक्तांची जातीनिहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, मुस्लिमांना सच्चर आयोगाच्या शिफारशी लागू करून आरक्षण द्यावे, लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता द्यावी यासह चाळीस मागण्यांची मोर्चात मागणी करण्यात आली आहे.

आरक्षण रखडले
धनगर जातीला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, आता दिशाभूल करण्यात येत आहे. प्रत्येक समाजाच्या मागण्या असताना सरकार दिशाभूल करीत आहे अशी टीका यशवंत ब्रिगेडचे सावळे यांनी केली. तर या मोर्चात दहा हजार विद्यार्थी सहभागी होतील असे भारतीय विद्यार्थी मोर्चाचे हनुमंत पाईक यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबादमध्ये मुस्लिम समाजाचा मोर्चा

0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
उस्मानाबादमध्ये गुरुवारी मुस्लिम समाजाच्यावतीने मुस्लिम समाजाला तातडीने पाच टक्के आरक्षण देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम समाजबांधव सहभागी झाले होते. शिस्तबद्धपणे निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व समाजातील लहान मुलांनी केले.
उस्मानाबाद शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा अतिशय शिस्तबद्धपणे निघाला. समाजातील नागरिकांसह युवकांची संख्या लक्षणीय होती. जागोजागी पाण्याच्या पाऊचचे वाटप करण्यात आले. या मोर्चाला मराठा महासंघाने पाठिंबा दिला होता. त्याशिवाय पदाधिकारी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

मोर्चाची शिस्त कायम राखण्यासाठी दोन हजार तरुण स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते. यावेळी मोर्चाचे नेतृत्व करीत असलेल्या समाजातील लहान मुलांनी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. मोर्चानंतर स्वंयसेवकांनी सर्व मार्गावरील स्वच्छता केली.

राज्य सरकारने मुस्लिमांसाठी पाच टक्के आरक्षणाचा अध्यादेश काढला होता. या अध्यादेशाची कालमर्यादा संपल्यानंतरही, सरकारने पावले उचलली नाहीत. त्यामुळे, समाजाला आरक्षण मिळाले नाही. मुस्लिमांचा न्याय हक्क तातडीने मिळावा, यासोबतच विविध मागण्या करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्री गुरू गोविंदसिंग जयंतीनिमित्त मिरवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड
शिख धर्माचे दहावे धर्मगुरू श्री गुरू गोविंदसिंग यांचा ३५० वा पावन प्रकाशपर्व उत्सव नांदेडच्या ऐतिहासिक गुरुद्वारांमध्ये भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. ‍यावेळी शहरातील शिख बांधवांनी गुरुद्वारामध्ये पहाटे आज ब्रह्म मुहूर्तावर उठून प्रार्थना केली.
रैन सवाई (रात्री जागरण) कार्यक्रमाने सुरुवात झालेल्या धार्मिक कार्यक्रमानंतर गुरुवारी सकाळी ‘दरबार कीर्तन’ सकाळी ९ ते दुपारी दीड वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते. या कीर्तन श्रवणाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. दुपारी दोनच्या सुमारास पूजापाठ झाला. गुरुद्वारा बोर्डातर्फे सर्व शैक्षणिक संस्था, विविध कार्यालयात मिष्टान्न वाटप करण्यात आले.
चार वाजता मुख्य गुरुद्वारा येथून नगर कीर्तन मिरवणूक निघाली. रात्री दहा वाजेपर्यंत मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीत शस्त्रांच्या कवायती व युद्धाची प्रात्यक्षिके बघायला नागरिकांनी गर्दी केली होती. या वेळीही सर्वाना मिष्टान्न प्रसाद म्हणून वाटण्यात येत होता. हैदराबाद येथून आणलेला बँड या वर्षीच्या मिरवणुकीचे आकर्षण ठरला. श्री गुरु गोविंदसिंगजी जयंती निमित्त श्री साचखंड गुरुद्वारावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. मिरवणुकीनंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांची कामे २०१८ पर्यंत पूर्ण करणार

0
0


म. टा. प्रतिनिधी, लातूर
प्रत्येक गाव, शहर, जिल्हा व पर्यायाने देशाचा विकास हा तेथील चांगल्या व दर्जेदार दळणवळणाच्या सुविधांमुळे अधिक गतीने होत असतो. त्यामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर करून लातूर जिल्ह्याच्या विकासाचा गाडा अधिक गतीमान करण्यात येणार आहे. २०१८ सालापर्यंत जिल्ह्यातील रस्त्यांची सर्व कामे पूर्ण करणार असल्याची माहिती कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली.
निलंगा तालुक्यातील बोरसुरी, तगरखेडा व होसूर येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर रस्त्यांच्या कामाचे भूमीपूजन तसेच होसूर निम्न पातळी बंधाऱ्याचे जलपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर बोलत होते. या कार्यक्रमास खासदार सुनील गायकवाड, आमदार सुधाकर भालेराव, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता ओमप्रकाश निला, उपविभागीय अधिकारी भवानजी आगे, निम्न तेरणा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता ई.एम.चिस्ती उपस्थित होते.
पालकमंत्री निलंगेकर म्हणाले, ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून लातूर जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला जाणार आहे. त्याप्रमाणेच जिल्ह्यातून जाणारे राज्यमार्ग व नवीन राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना मंजुरी मिळालेली असून जिल्ह्यातील रस्त्यांची सर्व कामे २०१८ पर्यंत पूर्ण करणार आहे. उदगीर-निलंगामध्ये रेल्वे आणण्यासाठी सन २०१९ पर्यंत सर्व पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. पुढील कालावधीत या भागात रेल्वेचे जाळे निर्माण करून या भागाच्या विकासाला अधिक चालना देण्यात येईल.’
मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. त्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विम्याचे अनुदान शासनाने थेट जमा केलेले असून यावर्षी लातूर जिल्ह्यातील सोयाबीन व इतर तत्सम पिकांचे अतिवृष्टीने व पुराने झालेल्या नुकसानीसाठी शासनाकडून राज्यात सर्वात जास्त अनुदान लातूर जिल्ह्याला मिळवून देऊ असे निलंगेकर यांनी सांगितले. लातूर जिल्ह्याला या पुढील काळात जास्तीत जास्त रोहित्रे उपलब्ध करून अखंडीतपणे शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लातूर जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार कुशल बनवून त्यांना कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याचाच पहिला टप्पा म्हणून टाटा पॉवर कंपनी जिल्ह्यातील आडीच हजार बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या कंपनीत नोकरी उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती निलंगेकर यांनी दिली. बेरोजगारांची निवड, तपासणी, प्रशिक्षणावरील सर्व खर्च टाटा कंपनी करणार असून तीन महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीत प्रतिमहा १५ हजार रुपये मानधन प्रशिक्षणार्थी बेरोजगारांना मिळणार आहे.
अनेक वर्षांपासून होसूर निम्न पातळी बॅरेजचे काम रखडले होते. ते सर्व काम पूर्ण झालेले असून या बॅरेजमधील पाण्याचे पूजन करुन ह्या बंधाऱ्याचे लोकार्पण करण्यात येत असल्याचे निलंगेकर यांनी सांगितले. या बॅरेजच्या पाण्यामुळे होसूर व परिसरातील शेकडो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यातील उद्योग; गरुडझेप कौतुकास्पद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

‘राज्यातील अन्य औद्योगिक शहरांच्या तुलनेत औरंगाबाद व मराठवाड्याच्या उद्योगांची गरुडझेप निश्चितच कौतुकास्पद आहे. औरंगाबादमधील औद्योगिक वातावरण सुदृढ ठेवण्याचे श्रेय निश्चितपणे येथील उद्योगांना जाते,’ असे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केले.

मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (मासिआ) आणि महाराष्ट्र पर्यटन औद्योगिक महामंडळ (एमटीडीसी) यांच्यावतीने चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील कलाग्राममध्ये अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो २०१७ प्रदर्शनाचे उद्‍घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे प्रमुख पाहुणे होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर भगवान घडमोडे, आमदार अतुल सावे, संजय शिरसाट, इम्तियाज जलील, सतीश चव्हाण, सुभाष झांबड, प्रशांत बंब, मासिआचे अध्यक्ष विजय लेकुरवाळे, मुख्य समन्वयक भारत मोतिंगे, संतोष कुलकर्णी, नगरसेवक राजू शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘परदेशी उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी यासाठी मी गेल्या दोन वर्षांत अनेक दौरे केले. त्या शिष्टमंडळात औरंगाबादचे उद्योजक जास्त संख्येने होते. सध्या महाराष्ट्राची औद्योगिक परिस्थिती सुधारली आहे. त्यापूर्वी गर्व्हनन्स, लालफितशाहीमुळे उद्योजक महाराष्ट्राबाहेर गेले. आता परिस्थिती बदलली आहे. गेल्या सहा महिन्यांत परदेशातून भारतात येणारी जेवढी गुंतवणूक जाहीर झाली त्यापैकी ५० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात यायची आहे. प्रशासकीय बदल, सरकारी धोरणे बदलल्याने हा बदल झाला. औरंगाबादची इको सिस्टीम मोठी आहे. अॅटोमोबाइल हब आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त आहे. डीएमआयसीच्या माध्यमातून मोठे उद्योग येथे येतील. अॅटोमोबाइल क्लस्टरच्या उभारणीसाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. डीएमआयसीत प्लॉटमध्ये गुंतवणूक होऊ देणार नाही. येथे उद्योग उभे राहतील, यासाठी आमचा आग्रह राहील,’ असे फडणवीस यांनी नमूद केले. संतोष कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. नीता वाळवेकर यांनी सूत्रसंचालन केले. भारत मोतिंगे यांनी आभार मानले.

आचारसंहितेमुळे अडचण
मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम बुधवारी जाहीर झाला. त्यामुळे आचारसंहिता लागू झाली. अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो प्रदर्शनात मुख्यमंत्र्यांकडून काही घोषणा अपेक्षित होत्या, पण आचारसंहिता लागल्याचे उद्योगमंत्री देसाई यांनी भाषणातून स्पष्ट केले. त्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांची अडचण झाली.

अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पोमुळे महाराष्ट्राची औद्योगिक ताकद दिसून आली. युतीच्या काळात उद्योगांची घोडदौड सुरू आहे. मोटारीचे सुटे भाग बनविण्यात औरंगाबाद, मराठवाडा जगात आघाडीवर आहे. तुमचा हात कुणी धरणार नाही. उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्मिती करताना इलेक्ट्रॉनिक्स आयटी धोरण जाहीर केले. उद्योगांसाठी परवानग्यांची संख्या घटविली. भविष्यात प्रोत्साहन म्हणून अनेक उपक्रम राबविले जातील.
- सुभाष देसाई, उद्योगमंत्री

शेंद्रा एमआयडीसीमध्ये अनेक प्लॉट अद्याप रिकामे आहेत. गुंतवणूक म्हणून प्लॉट घेऊन ठेवल्याने नव्याने उद्योजक होऊ इच्छिणाऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याबाबत काहीतरी ठोस निर्णय झाला पाहिजे. शेंद्रा व बिडकीनमधील ६००० हेक्टर जमीन ताब्यात घेऊन डीएमआयसीसाठी पुढचे पाऊल टाकावे. औरंगाबादमध्ये उद्योगाची अजून भरभराट झाली पाहिजे. त्यासाठी सरकारने उद्योजकांना नेहमीच पाठबळ द्यावे.
- हरिभाऊ बागडे, विधानसभा अध्यक्ष

लघुउद्योजकांनी २००२ पासून असे प्रदर्शन भरविणे सुरू केले. सहा प्रदर्शनातून मोठा व्यवसाय निर्माण झाला. औरंगाबादेतील उद्योगांकडून ८० देशांत निर्यात केली जाते. छोट्या उद्योगांना सक्षमीकरणासाठी प्रोत्साहन मिळावे. औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. शहर व परिसराचे रस्ते सुधारले पाहिजेत, औद्योगिक एनएसाठी अडवणूक केली जाते, ती थांबवली पाहिजे.
- विजय लेकुरवाळे, अध्यक्ष, मासिआ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदेशाध्यक्षांच्या मुलाचे लग्न; पालिकेचे सिमेंट कार्पेट!

0
0

unmesh.deshpande@timesgroup.com
Tweet : unmeshdMT
औरंगाबाद : रस्त्यांमधील खड्ड्यांमुळे औरंगाबादकर त्रस्त असले तरी सत्ताधारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या आमदारपुत्राचे शुभमंगल काही दिवसांवर आल्यामुळे गारखेडा भागातील त्यांच्या बंगल्यासमोरच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जात आहे. या कामाला परवानगी दिलेली नाही, अशी भूमिका महापालिकेने घेतलेली असली, तरी प्रत्यक्षात 'सिमेंट कार्पेट' अंथरले जात आहे.
महापालिका हद्दीतील रस्त्यांची कामे महापालिकाच करू शकते, असा नियम आहे. महापालिकेच्या क्षेत्रात दुसऱ्या यंत्रणेला रस्त्याचे काम करायचे असेल, तर त्या यंत्रणेने महापालिकेची परवानगी किंवा एनओसी घेणे गरजेचे आहे. वैयक्तिक पातळीवर तर रस्त्याचे काम करताच येत नाही, मात्र गारखेडा भागातील लक्ष्मीनगरात खासदार रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचे काम केले जात आहे. दानवे यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांचे पुढील महिन्यात लग्न आहे. या निमित्ताने घरी येणाऱ्या पाहुण्यांना गुळगुळीत रस्त्याचा आनंद घेता यावा यासाठी रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू करण्यात आले आहे. तयार केलेल्या रस्त्याचे सध्या क्युरिंग केले जात आहे. यासंदर्भात महापालिकेतून माहिती मिळवली असता, या रस्त्याचे काम खासगीकरणातून केले जात असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी पालिकेची परवानगी मात्र घेण्यात आली नाही. पालिकेच्या म्हणण्यानुसार हे काम खासदार निधीतून केले जात असले, तरी एक तर ते दानवे यांच्या मतदारसंघातील नाही आणि त्यासाठीही पालिकेची परवानगी बंधनकारक आहे.

लक्ष्मीनगर येथील निवासस्थानत दुरुस्तीचे काही काम सुरू आहे, पण या परिसरात सिंमेट रस्त्याचे कुठे काही काम सुरू आहे किंवा नाही, याबाबत कोणतीही कल्पना नाही. गेल्या काही दिवसांत त्या भागात अन्य कामांमुळे जाणेही शक्य झाले नाही. माझा मतदारसंघ नसल्यामुळे खासदार निधीचाही प्रश्न नाही.
- रावसाहेब दानवे, खासदार, प्रदेशाध्यक्ष भाजप

‘त्या’ रस्त्याच्या कामाला महापालिकेने परवानगी दिलेली नाही. या कामाची चौकशी केली जाईल. महापालिकेचा कोणी कंत्राटदार ते काम करीत असेल तर त्याचे बिल थांबवले जाईल. खासदार दानवे यांनी त्यांच्या निधीतून रस्त्याचे काम करून घेतले असावे. काम करायला हरकत नाही, पण त्यासाठी महापालिकेची परवानगी घ्यायला हवी होती.
- ओम प्रकाश बकोरिया, आयुक्त, महापालिका

‘त्या’ रस्त्याचे काम महापालिकेतर्फे केले जात नाही. खासदार दानवे स्वतःच्या खर्चातून ते काम करीत असावेत. त्यांच्या घरी काही कार्यक्रम असल्याने रस्त्याचे काम केले जात आहे, असे कानावर आले आहे. महापालिकेची त्याला परवानगी नाही. मुख्यमंत्री, विविध मंत्री, नेते त्यांच्या घरी येतात. त्यांना खड्ड्यांचा त्रास होऊ नये म्हणून दानवे रस्त्याचे काम करून घेत असावेत.
- सिकंदर अली, कार्यकारी अभियंता, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्य रस्ते मजबूत करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शहरातील रस्त्यांसाठी येत्या तीन वर्षांत मुबलक निधी देईन, पण विकास आराखड्यानुसार रस्त्यांच्या कामांचा प्रस्ताव तयार करून पाठवा. नियोजन करताना गल्लीबोळातील रस्त्यांऐवजी मुख्य रस्त्यांना प्राधान्य द्या, अशा कानपिचक्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका पदाधिकाऱ्यांना गुरुवारी दिल्या.

मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चर (मासिआ) व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांच्या वतीने आयोजित अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो २०१७ या औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ‘मासिआ’चे अध्यक्ष विजय लेकुरवाळे यांनी भाषणातून शहराच्या रस्त्यांसाठी सरकारने निधी द्यावा, अशी मागणी केली होती. तो धागा पकडून मुख्यमंत्री म्हणाले,‘औरंगाबादच्या रस्त्यांसाठी गेल्या दोन वर्षांत सरकारने निधी दिला. आता महापालिकेने रस्ते आराखडा तयार करून सरकारकडे पाठवावा. ‘डीपी’प्रमाणे वर्गीकरण करणे महत्त्वाचे आहे. त्याप्रमाणे आराखड्यानुसार पुढील तीन वर्षे सातत्याने पैसे देऊ. पालिकेला रस्त्यांसाठी पैसे दिले की नगरसेवक त्यावर तुटून पडतात. मतांचा जोगवा मागावा लागत असल्याने आधी गल्लीबोळातील रस्ते केले जातात आणि मुख्य रस्ते दुर्लक्षित राहतात. मी नगरसेवक म्हणून काम केले आहे. त्यामुळे मला हे माहित आहे, पण याठिकाणी तसे करू नये. गल्लीबोळातील रस्त्यांऐवजी मुख्य रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी प्रस्ताव सादर करा.’

इंडस्ट्रिअल एनए न दिल्यास निलंबन
औद्योगिक क्षेत्राबाहेर उद्योग उभारण्यासाठी इंडस्ट्रिअल एनएची आवश्यकता पूर्वी होती. हा विषय आम्ही संपविला आहे. यासंदर्भातील सनद देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे उद्योग सुरू करण्यासाठी कुठलेही अडथळे राहू नयेत, याची खबदारी सरकार घेत आहेत. उद्योजकांना सनद मुदतीत देणे आवश्यक आहे. अर्ज निकाली काढले नाहीत, तर जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित केले जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. इज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातून उद्योगांच्या अडचणी दूर केल्या आहेत. काही अधिकाऱ्यांना मात्र हे फार काळ चालणार नाही, असे वाटते. म्हणून काही ठिकाणी विरोध होतो, पण आम्ही ते खपवून घेणार नाही. त्यांचे काहीच चालू देणार नाही. सर्व प्रक्रिया पारदर्शी असेल. पूर्वी इन्स्पेक्टर राज होते. मनाला वाटेल त्या पद्धतीने कंपन्यांची तपासणी होत होती. औद्योगिक क्षेत्राचे आम्ही सेल्फ सर्टिफिकेट सिस्टिममध्ये रुपांतर केले. तपासणीसाठीही विशिष्ट प्रक्रिया आखून दिली. ठराविक मुदतीनुसार लॉटरी पद्धतीने उद्योगांची तपासणी केली जाईल. तपास अधिकाऱ्याकडून ४८ तासांत अहवाल नेटवर सादर करावा लागेल. त्यामुळे कुठेच मांडवली होणार नाही. इन्स्पेक्टर राज आम्ही संपवून टाकले आहे, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘साई’त सिथेंटिक फुटबॉल मैदान

0
0

sudhir.bhalerao@timesgroup.com
Tweet : @sudhirbMT
औरंगाबाद ः राज्यातील पहिले सिथेंटिक टर्फ फुटबॉल मैदान औरंगाबादेतील साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रात साकारण्यात येणार आहे. त्यासाठी सात कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
साई क्रीडा प्रशिक्षण केंद्राला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ९९ वर्षांच्या करारावर १०१ एकर जागा दिलेली आहे. या जागेचा विविध मैदाने तयार करण्याकरिता साई क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया - स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर’ योजनेतून सिथेंटिक टर्फ फुटबॉल मैदान उभारण्याकरिता सात कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीत साई क्रीडा प्रशिक्षण केंद्राचा दोन कोटींचा वाटा असणार आहे. हे मैदान हिरव्या रंगाचे असेल.
मराठवाडा भागात एकाही जिल्ह्यात सिथेंटिक टर्फ फुटबॉलचे मैदान नाही. राज्यातही अशी सुविधा नाही. सिथेटिंक फुटबॉल मैदानाची सुविधा निर्माण झाल्यास औरंगाबादसह मराठवाड्यातील फुटबॉल क्षेत्राला मोठी संधी उपलब्ध होणार आहे. औरंगाबादेत फुटबॉलचे चांगले वातावरण आहे. अनेक वर्षांपासून नियमितपणे शहरातून गुणवान फुटबॉलपटू पुढे येत आहेत. शाळा, महाविद्यालयातील उदयोन्मुख खेळाडूंकरिता ही सुविधा अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या सुविधेमुळे युवा फुटबॉलपटूंना प्रारंभापासूनच दर्जेदार मैदानावर नियमित सराव करण्याची संधी मिळेल. ही सुविधा निर्माण झाल्यानंतर गुणवान फुटबॉलपटू शोध उपक्रमही राबवण्यात येणार आहे; तसेच राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षण शिबिरांची संख्याही वाढेल.

हिरव्या रंगाचे मैदान
फुटबॉल मैदानासाठी हिरव्या रंगाचे सिंथेटिक टर्फ वापरण्यात येणार आहे. मैदानासाठी सिंथेटिक टर्फ आयात करण्यात येईल. संपूर्ण मैदानावर सिंथेटिक टर्फ अंथरण्यात येते. या मैदानावर खेळाडू घसरून पडण्याचे प्रमाण कमी असते. खेळाडुंना दुखापती कमी होतात. त्याचबरोबर गवती मैदानाच्या तुलनेत सिंथेटिक टर्फवर खेळाचा वेग जास्त असतो.

सिथेंटिक टर्फ फुटबॉल मैदान ही सुविधा मराठवाड्यातील फुटबॉलपटूंसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. सहा ते आठ महिन्यांत ही सुविधा उपलब्ध होणार आहे. युवा फुटबॉलपटूंना फुटबॉल खेळात करिअर करण्यासाठी ही सुविधा प्रेरणादायी ठरेल.
- वीरेंद्र भांडारकर, उपसंचालक, साई क्रीडा प्रशिक्षण केंद्र.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योग न उभारल्यास प्लॉट परत घेणार

0
0

Makarand.Kulkarni@timesgroup.com
Tweet : @makarandkMT
औरंगाबाद ः दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरमध्ये (डीएमआयसी) चार बहुराष्ट्रीय उद्योगांनी भूखंड घेण्याचे कबूल केले. त्यांच्याशी राज्य सरकारचा सामंजस्य करारही झाले आहेत. पहिल्या टप्प्यातील प्लॉट विक्री प्रक्रिया नुकतीच पार पडली. प्लॉट घेतलेल्या उद्योगांनी बांधकाम करून उद्योग उभारले नाहीत, तर त्यांचे भूखंड परत घेतले जातील, असा इशारा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना दिला.
‘डीएमआयसी’च्या पहिल्या टप्प्यातील भूखंड विक्री प्रक्रियेस अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाला. यासंदर्भात विचारले देसाई म्हणाले,‘डीएमआयसीच्या पहिल्या टप्प्यातील प्लॉटविक्रीसाठी प्रक्रिया नुकतीच राबविली. २४०० जणांनी नोंदणी केली. ४९ प्लॉटसाठी अनेकांनी खरेदीची तयारी दर्शविली. कमी प्रतिसाद का आला, याचा शोध आम्ही घेत आहोत. भविष्यात हा औरंगाबाद व मराठवाड्याच्या विकासासाठीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पायाभूत सुविधा पुरविण्याचे काम शेंद्रा टप्प्यात सुरू आहे. एखादा मोठा उद्योग उभारला की उद्योजक इकडे येतील. सर्व भागांचा समतोल विकास करण्याची जबाबदारी सरकारची आहे. मोठ्या चार बहुराष्ट्रीय उद्योगांसोबत आम्ही सामंजस्य करार केले. त्यांना जागा देणार आहोत. या उद्योगांनी लवकरात लवकर बांधकाम सुरू करून उत्पादन करावे, असे आम्ही त्यांना सांगणार आहोत. जर या उद्योगांनी वेळेवर बांधकाम केले नाही तर प्लॉट परत घेण्याची कारवाईही केली जाईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रक्तस्त्रावामुळे बाळंतिणींचा मृत्यू रोखण्यात यश

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रसुतीपश्चात रक्तस्त्रावामुळे बाळंत महिलांचा मृत्यू रोखण्यात आणि हे प्रमाण निम्म्याने घटविण्यात घाटीतील स्त्रीरोग विभागाला यश आले आहे. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी ‘इंटरनल इलियाक आर्टरी लायगेशन’ शस्त्रक्रिया ही रामबाण असल्याचे सिद्ध झाले असून, या शस्त्रक्रियेमुळेच तब्बल ८८ टक्के बाळंत महिलांचे प्राण वाचवणे शक्य झाले व ६६ टक्के महिलांचे गर्भाशय काढण्याची वेळ आली नाही. या संबंधीचा रिसर्च पेपरही ‘ओपन जर्नल ऑफ ऑब्सेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी’ या आंतरराष्ट्रीय पाक्षिकात नुकताच प्रसिद्ध झाला आहे.
प्रसुतीपश्चात अतिरक्तस्त्रावामुळे जगभरात २५ ते ३० टक्के महिलांवर मृत्यू ओढवतो. सर्व प्रकारचे उपचार केल्यानंतरही रक्तस्त्राव थांबला नाही, तर संबंधित महिलेचे प्राण वाचवण्यासाठी महिलेचे गर्भाशय काढून टाकण्याचा शेवटचा वैद्यकीय पर्याय शिल्लक राहातो. त्यानंतरही महिलांवर मृत्यू ओढावण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. या गंभीर स्थितीमध्ये रक्तस्त्राव जिथून होतो ती रक्तवाहिनीच बांधून टाकण्याची ‘इंटरनल इलियाक आर्टरी लायगेशन’ ही शस्त्रक्रिया जालीम उपाय असल्याचे सिद्ध झाले. या शस्त्रक्रियेमुळे रक्तस्त्राव थांबून संबंधित महिलेचे प्राण वाचवणे शक्य होतेच; शिवाय गर्भाशय काढण्याचीही गरज पडत नसल्याचे स्पष्ट झाले. या शस्त्रक्रिया पूर्वी घाटीत अत्यल्प प्रमाणात होत होत्या. अलीकडे घाटीतील स्त्रीरोग विभागाच्या सर्वच डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण घेतले असून, मागच्या दोन वर्षांत तब्बल ५७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
या ५७ केसेसच्या अभ्यासानुसार, या शस्त्रक्रियेमुळे ६६ टक्के महिलांचे गर्भाशय काढण्याची गरज पडली नाही व तब्बल ८८ टक्के महिलांचे प्राण वाचवणे शक्य झाले. याचाच अर्थ, या शस्त्रक्रियेमुळे प्रसुतीपश्चात रक्तस्त्रावाने होणारे मृत्यू प्रमाण निम्म्याने घटवण्यात घाटीला यश आले. त्याशिवाय या शस्त्रक्रियेचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत व शस्त्रक्रिया झालेली महिला पुन्हा गर्भवती राहू शकते.
आता तर ही शस्त्रक्रिया पदव्युत्तर विद्यार्थ्यांनाही शिकवली जात असून, या शस्त्रक्रियेचा समावेश पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये करण्यात यावा, अशी सूचनाही रिसर्च पेपमध्ये करण्यात आली आहे. घाटीतील स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा हे रिसर्च पेपरचे मुख्य लेखक असून, त्यांना माजी विभागप्रमुख व नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, सहयोगी प्राध्यापक डॉ. सोनाली देशपांडे, निवासी डॉ. सचिन गाडेकर यांनी सहकार्य केले आहे.

‘लायगेशन’ शस्त्रक्रियेमुळेच प्रसुतीपश्चात रक्तस्त्रावाने होणाऱ्या महिलांच्या मृत्युमध्ये निम्म्याने घट झाली आहे. ही जीवनदायी शस्त्रक्रिया असून खासगीत लाखावर खर्च येतो. त्यामुळेच विभागात या शस्त्रक्रियेला प्राधान्य देण्यात येऊन, पीजी विद्यार्थ्यांना ही शस्त्रक्रिया शिकवली जात आहे.
- डॉ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग विभागप्रमुख, घाटी

प्रसुतीपश्चात रक्तस्त्रावाची कारणे
- जुळे-तिळ्यांचा जन्म होणे
- अधिक प्रमाणातील बाळंतपणे
- दोन बाळंतपणात कमी अंतर असणे
- रक्त न गोठण्याची समस्या असणे
- महिलेस रक्तदाब, अॅनेमिया असणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुलत दीर निघाला खुनी

0
0

जालना : अंबड येथील सुमित्रा होंडे खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. चुलत दीरानेच हा खून केल्याचे निष्पन्न झाले.
अंबड बाजार समितीचे सभापती सतीश होंडे यांच्या पत्नी सुमित्रा होंडे (वय ३४) यांचा सोमवारी गोळी झाडून खून केला होता. दरम्यान, पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवित सुमित्राचा चुलत दीर विलास होंडेला (वय १९) ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे दिली. परंतु पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्हा कबूल केला. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सोनावणे करीत आहेत. दरम्यान, आरोपी विलास होंडे याला न्यायालयात हजर केले असता वकिलांनी त्याचे वकिलपत्र घेण्यास नकार दिला. अखेर न्यायालयाच्या निर्देशानुसार विलास होंडे याला सरकारी वकील पुरविण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोन न उचलल्याने डेपो मॅनेजर निलंबित

0
0

औरंगाबाद : वरिष्ठांनी केलेला फोन न उचलणे एसटीच्या आगार व्यवस्थापकांना महागात पडले आहे. मुंबईहून महाव्यवस्थापकांनी केलेला फोन उचलला नाही म्हणून एसटी महामंडळाच्या पैठण आगाराचे व्यवस्थापक एल. व्ही. लोखंडे यांना निलंबित करण्यात आले आहे.
एसटी महामंडळाच्या मुंबई मुख्य कार्यालयात वाहतूक महाव्यवस्थापक आर. आर. पाटील यांनी पैठणचे आगार व्यवस्थापक यांना महत्त्वाच्या माहितीसाठी ३ जानेवारी रोजी फोन केला होता. पैठण आगार व्यवस्थापकांनी महाव्यवस्थापकांचा फोन उचलला नाही. पहिल्या वेळेस फोन न उचलल्याने महाव्यवस्थापकांनी मोबाइलवर दोन ते तीन वेळेस फोन केला. तरीही आगार व्यवस्थापकांकडून प्रतिसाद मिळाला नाही. महाव्यवस्थापकांनी केलेल्या फोन नंबरवर लोखंडे यांनी कॉलबॅक केला नाही. महाव्यवस्थापकांनी गैरवर्तणुकीमुळे आगार व्यवस्थापक लोखंडे यांना निलंबित केरण्याचे आदेश दिले. पैठण आगार व्यवस्थापकांसह सातारा येथील दोन अधिकाऱ्यांना याच कारणासाठी निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images