Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अग्निपथः...बाभूळ झाड उभेच आहे!

0
0



manoj.kulkarni@timesgroup.com
भर दुपार. उन्हात चावरं वारं. अंगाला झोंबायचं. डोळ्यांसमोर मोठी पाटी तरळली. ‘स्वरोपासना संगीत विद्यालय’. घरात प्रवेश केला. लख्ख हॉल. पुस्तकांनी कपाट भरलेलं. कोपऱ्यात मोठ्या ऐटीत बसलेल्या तबल्यांचे दोन-चार जोड. दोन मोठ्ठे तंबोरे. आपल्याला वाजवायला जमत नसलं तरीही, कुणालाही वाटेल त्या तारेवरून आपली बोटे फिरलीच पाहिजेत. सोबतच मोठ्या दिमाखात आपल्याकडे मान उंचावून पाहतेय असा भास निर्माण करणारी गिटार. मैफल जमली. सूर गवसला. रसिक दंग झालेत. सगळं तसंच. पुढचे अडीच तास सुरू झालेली ‘अभयार्पितांची’ ही स्वरोपासना...
अभय-अर्पिता कुलकर्णी या दाम्पत्यानं बोलणं सुरू केलं तेव्हा त्यांना कुठं थांबवावं, असं वाटलं नाही. कुठं उत्सुकता, कुठं कुतूहल वाटलं म्हणून एकदोन प्रश्न विचारले. अभय बीड जिल्ह्यातल्या ‘सात्रापोत्रा’चे. अर्पिता केजच्या. अभय यांच्या घरात कसलीही संगीत परंपरा नाही. मात्र, त्यांचं गाण्यावर जीवापाड प्रेम. तर अर्पितांचं कुटंब संगीतात रंगलेलं. त्यांचे बाबा कीर्तनकार. पाच काका. प्रत्येक काका संगीताच्या कुठल्या ना कुठल्या कलेत पारंगत. कुणी तबला, कुणी हार्मोनियम, तर कुणी गायन. बहीण सध्या बेंगळुरूला असते. तिथंही तिनं संगीत अकादमी थाटलीय. या दोघांचंही अंबाजोगाईला शिक्षण सुरू होतं. संगीताचे धडे शिवदास देगलुकरकरांकडे गिरवत होते. इथंच दोघांची मनं जुळली. आयुष्य एकत्र घालवायचं ठरलं. घरातल्यांनाही तसंच वाटलं.
अभय यांनी पुढच्या शिक्षणासाठी औरंगबाद गाठलं. १९९७-९८ मध्ये अर्थशास्त्रात एम.ए. केलं. सोबत संगीत विशारदही झाले. त्यानंतर इतरांप्रमाणं मागच्या पानावरून पुढे सुरू झालं. २००२ मध्ये एका खासगी शाळेत संगीत शिक्षक म्हणून नोकरी सुरू केली. लग्न झालेलं. आठ तासाचं काम. मुलं काही वेळ संगीत शिकायचे. मात्र, दुय्यम विषय म्हणून याकडं पाहिलं जायचं. याची खंत त्यांना बोचायची. हे आत दाटलेलं मळभ कवितांना सुरेल चाल लावून ते दूर करायचे. अन् बघता-बघता त्यांच्या असं लक्षात आलं, की आपल्या तासांत मुलं बसली की अक्षरशः डोलतात. देहभान विसरतात. वेळ कसा जातो हे त्यांना समजत नाही. संगीताची ही जादू त्यांना पुन्हा-पुन्हा खुणावू लागली. बंदिस्त आठ तासातलं जगणं नकोसं झालं. अन् मनाचा निर्धार करून, जवळ कसलिही पुंजी नसताना त्यांनी नोकरी सोडली. डोक्यात फक्त एकच होतं, गाण्यात काहीतरी करायचं. मात्र, पोटाचं काय, घराचं काय, काही-काही ठरलेलं नव्हतं. अन् इथंच त्यांच्या मदतीला गाणं आणि कविता धावली. जगण्याचा असा सूर गवसला, की पुन्हा मागं वळून पाहण्याची वेळच आली नाही.
कवितांचे छोट-छोटे संगीतमय कार्यक्रम सुरू केले. विशेषतः शाळा, कुठलं निमंत्रण. प्रत्येक ठिकाणी त्यांनी कवितेचं एकेक झाड लावलं. बालकवींची ‘ऐल तीरावर पैल तीरावर...’ असो की अजून कोणती. अभयार्पितांच्या कार्यक्रमात कवितेचं गाणं होतं. या गाण्याचा सुंदर भावार्थ ते स्वतः उलगडतात. हे रसाळ प्रासादिक ऐकून दर्दी कानसेन तृप्त होतात. त्यांना मिळणारा प्रतिसाद उत्साह वाढवणारा होता. मात्र, खिसा गळका तो गळकाच. कौतुकानं, प्रेमाच्या शब्दानं, पाठीवरल्या थापेनं पोट भरत नसतं. इथं तर चिमुकल्या अथर्वचं आगमन झालेलं. त्याला धावायला सारं घर कमी पडायचं. त्या काळात परिस्थितीही अशी होती की, अथर्वच्या दुधापुरतेही पैसे अनेकदा खिशात नसायचे. त्यावेळी अभयमधला बाबा आणि अर्पितातली आई उद्धवस्त व्हायची. पोटचा तळमळणारा गोळा पाहताना दोघंही खचून जायचे. अनेकदा वाटायचं संगीत नको, कविता नको, हे जग नको. सगळं चक्र इथं थांबावं. सगळं निरामय संपावं. मात्र, त्यांच्या आतल्या संगीताला हे कदाचित मान्य नसावं. सरपणासाठी तोडलेल्या लाकडाला जशी पालवी फुटते, त्यांचंही तसंच झालं. अन् त्यांच्या आतून ५ ऑगस्ट २००६ रोजी ‘गीत-फुलोरा’चा जन्म झाला. ज्येष्ठ शिक्षतज्ज्ञ वि.वि. चिपळूणकर यांच्या उपस्थितीत हा पहिलावहिला जाहीर कार्यक्रम एका शाळेत दणक्यात झाला. तीन तास कधी सरले कळलं नाही. स्टेजवर अभयार्पिता. समोर सगळ्या मुलांनी कवितेवर फेर धरलेला. चिपळूणकर सरांनी हे आश्चर्यचकित करणार दृष्य पाहिलं. अन् १३ ऑगस्ट रोजी त्यांचं भलं मोठं पत्र अभयार्पितांच्या घरी येऊन धडकलं. त्यांनी केलेल्या कौतुकानं दोघांवर मूठभर मास चढलं. आता इथून मागे पाहणं नाही, असा निर्धार त्यांनी केला. एका सुकलेल्या अनवट कवितेचा, गाण्याचा पुन्हा संगीतमय प्रवास सुरू झाला.
एकीकडे गीत-फुलोरा, दुसरीकडे स्वरोपासना संगीत विद्यालयाच्या माध्यमातून गायन-वादनाचे शिकवणी वर्ग सुरू केले. आजघडीला ते सिडको, बीड बायपास या दोन्ही भागात हे वर्ग चालवितात. महाराष्ट्रभर कार्यक्रमाच्या निमित्ताने दौरे सुरू असतात. २० फेब्रुवारी २०१२ ची घटना. लातूर जिल्हा दुष्काळानं होरपळून निघालेला. अनेक शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण दुष्काळानं बंद केलेलं. जगण्याचं पहिलं उदि्दष्ट पाणी झालेलं. तिथल्या ज्ञान प्रकाश शाळेत ‘गीत-फुलोरा’चं आयोजन केलेलं. कार्यक्रमाला प्रतिसाद मिळेल का, या प्रश्नाने अभयार्पिता चिंतीत झालेले. मात्र, सकाळी कार्यक्रम सुरू झाला. सभागृहात पाय ठेवायला जागा नव्हती. बाहेर तुडूंब गर्दी. कविता सुरू झाली...

‘नका नका मला देऊ नका खाऊ
वैरी पावसानं नेला माझा भाऊ
भांडी कुंडी माझी खेळणी वाहिली
लाडकी बाहुली जाताना पाहिली
हिंमत द्या थोडी, उसळू द्या रक्त
पैसा बिइसा नको दफ्तर द्या फक्त’

अभयार्पिताच्या बोलावर समोर बसलेल्या प्रत्येकाच्या ओठी अशोक कोळींची ही कविता होती. माना डोलावलत होत्या. सगळ्या धमण्या-धमण्यातून वाहणारी हिंमत होती. या कार्यक्रमाला इतका तुफान प्रतिसाद मिळाला की बाहेर थांबलेल्या तुडूंब गर्दीसाठी लगोलग दुसरा कार्यक्रम याच सभागृहात करावा लागला. खरंच या लोकांनी इतकं प्रेम दिलं, की आम्हाला खऱ्या अर्थानं माणूस केलं, हे सांगायला हे जोडपं विसरत नाही. राज्यभर कार्यक्रम होतात. सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांनी या कार्यक्रमाची दखल घेतली. मात्र, राज्याच्या काय आपल्या इथल्या शिक्षण विभागालाही कधी कवितेचं रोपटं रुजवणारा, मुलांत साहित्याची गोडी निर्माण करणारा हा कार्यक्रम आपल्या शाळेत घ्यावा असं वाटलं नाही. हा कार्यक्रम करणं म्हणजे एक दिव्य असतं. बारा कलाकारांचा संच. त्यांचं मानधन. सगळी व्यवस्था. प्रत्येक ठिकाणी पदरमोड, खिशाला झळ सोसून कार्यक्रम करणंही शक्य नसतं. अशा कलाकारांच्या पाठीवर शासन व्यवस्थेची थाप पडली तर शाळेशाळेतून कवितेचा मळा फुलेल. तसं होताना दिसत नाही. आमचा कार्यक्रम तुमच्या शाळेत ठेवा म्हणून जाणारे अभय यांनी २००७ पासून सरकारी अनास्थेमुळं जिल्हा परिषदेची पायरी पुन्हा कधी चढली नाही.

आजवर दोनशे कार्यक्रम झाले. ज्या वयाचा रसिक समोर, त्यानं ज्या कविता शिकल्या त्याच कविता हे जोडपं सादरं करतं. आजवर हजारेक मराठी, हिंदी कवितांना त्यांनी चाली लावल्यात. या कवितेचा पेरा प्रत्येक शाळेत व्हावा. एकीकडे मराठीला अभिजाततेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शासनानं हे अभिजातपण आपल्या शाळेत पेरावं, असं त्यांना मनोमन वाटतं. तसं होताना दिसत नाही. त्यामुळं हे सगळं गुंडाळून ठेवावं. फक्त संगीत विद्यालय, मुलांची शिकवणी इतकंच करावं असंही मन म्हणतं, पण पुन्हा तो प्रसंग आठवतो.

हैदराबादच्या कार्यक्रमाला जाताना रेल्वेमध्ये एका अपरिचित व्यक्तीची ओळख झाली. त्यांनी काय करतो विचारलं. बोलघेवड्या स्वभावाच्या अभयार्पितांनी सगळं प्रांजळपणे सांगितलं. तेव्हा समोरच्या व्यक्तीनं हट्टच धरला. तुम्ही माझ्यासोबत चला. एकदोन दिवस राहा. आंध्रप्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांशी तुमची भेट करून देतो. तुम्ही आमच्या कविता, आमच्या राज्यात गावोगावी पोहचवा. पुढे काय झालं असतं माहित नाही. मात्र, इथून पुन्हा त्यांच्या मनावर साचलेलं मळभ दूर झालं. पुन्हा पदरमोड, झळ सोसून होणाऱ्या कार्यक्रमातून त्यांची कविता गाण्यातून पाझरू लागलीय...

‘अस्सल लाकूड भक्कम गाठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात
बाभूळ झाड उभेच आहे!’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्मार्ट सिटीसाठी आम्ही सज्ज आहोत

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उघड्यावरचे डीपी. त्यात उतरलेला वीजप्रवाह, त्याचा स्पर्श होऊन एखाद्याचा मृत्यू होण्याचे प्रकार आपल्याकडे पाहावयास मिळतात. याऐवजी जर एकदम बंद डीपी. कर्मचाऱ्याच्या ओळखपत्राच्या सेन्सरशिवाय न उघडणारे दरवाजे, त्यावर सोलार पॅनेलद्वारे वीजनिर्मिती, सर्व परिमाणे तपासणारी यंत्रणा आणि सीसीटीव्ही या गोष्टी जर रस्त्यावरील ट्रान्सफॉर्मरला लावल्या तर स्मार्ट सिटीसाठी योग्य पाऊल राहील. याची झलक पाहायची असेल तर मासिआच्या अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पोला भेट देण्याची गरज आहे.
चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील गरवारे मैदानालगत असलेल्या कलाग्राम येथे भरविण्यात आलेल्या औद्योगिक प्रदर्शनात औरंगाबादच्या उद्योजकांनी बनविलेल्या लाखो वस्तू पाहावयास मिळत आहेत. इंजिनीअरिंग, अॅटो, कृषी, अन्नप्रक्रिया, फार्मास्युटिकल्स सह अनेक विभागातील दालने नागरिकांच्या गर्दीची ठिकाणे बनली आहेत.
चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील ट्रान्सडेल्टा कंपनीचे संचालक प्रशांत नानकर हे त्यापैकी एक. या तरुण उद्योजकाने स्मार्ट सिटीला साजेला ट्रान्सफॉर्मरचा सेट बनविला आहे. त्याबद्दल अधिक माहिती देताना नानकर म्हणाले, ‘आपल्याकडे रस्त्यावर उभे असलेले ट्रान्सफॉर्मर आपण एरव्ही पाहतो. आता देशभर स्मार्ट सिटी संकल्पना आली आहे. त्याला अनुसरून आम्ही स्मार्ट सिटी किट बनविला आहे. आपल्या नेहमीच्या ट्रान्सफॉर्मरला चहूबाजूंनी मजबूत आच्छादन केले आहे. ट्रान्सफॉर्मरचे दरवाजे कुणालाही उघडता येऊ नये, यासाठी इलेक्ट्रॉनिक लॉक सिस्टीम, परिसराच्या पाहणीसाठी व्हिजिलन्स सिस्टम बसविण्यात आली आहे. दोन भागात विभागलेल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये वीजपुरवठा, वहनयंत्रणा, वीजेचा दाब मोजण्याची अत्याधुनिक यंत्रणा यात असेल. शिवाय जीपीएस सिस्टीमचा वापर करून यात कार्ड टाकले की प्रशासकीय यंत्रणा हाताळणाऱ्या अधिकाऱ्याला एसएमएस अॅलर्टही येतील. ज्याद्वारे वीजपुरवठा कसा सुरू आहे ? त्यात काही दोष आला आहे काय ? याची माहिती मिळेल. गरजेपेक्षा जास्त क्षमतेने वीजपुरवठा होत असेल, तर सिस्टीम तत्काळ बंद होईल. जेणेकरून संभाव्य धोके टाळता येतील. ट्रान्सफॉर्मरला आग लागण्याचे प्रकार घडतात. ते रोखण्याचीही यंत्रणा यात बसविली आहे.’
सन्मान इंजिनिअर्सचे बालाजी शिंदे यांनी स्टेनलेस स्टीलची पाण्याची टाकी बनविली आहे. अशा प्रकारचा प्रयोग देशात यापूर्वी केवळ दिल्लीत झाल्याचे सांगत ते म्हणाले, ‘मोठी कार्यालये, हॉस्पिटल्स, कार्पोरेट कार्यालयांमध्ये पिण्याचे पाणी साठवून ठेवण्यासाठी या टाक्या उपयोगी ठरतील. फार्मास्युटिकल्सच्या परिमाणानुसार ‘३१६ एल’ या सूत्राचा वापर करत स्टेनलेस स्टीलचा वापर करून बनविलेल्या टाक्या १०० टक्के हायजेनिक आहेत. या मटेरिअलने पाण्यात कुठल्याही जंतूचा संसर्ग होणार नाही. उन्हाळ्यामध्ये वाढलेल्या तापमानामुळे टाक्यांमध्ये असलेल्या पाण्यावरही परिणाम होतो. पण या टाक्यांमधील पाणी चांगले राहते. ’

रेडिमेड स्वच्छतागृह
श्रेया सिस्टीम्सच्या भगवंत ग्रामले यांनी स्टेनलेस स्टिलचा वापर करत रेडिमेड स्वच्छतागृह बनविले आहे. स्वच्छ भारत अभियानाला अनुसरून बनविलेले एक मीटर बाय एक मीटरचे स्वच्छतागृह १५० किलो वजनाचे आहे. पाणी, वीज आणि ड्रेनेज वाहिनीला जोडले की हे स्वच्छतागृह वापरण्यास सज्ज होते. याशिवाय हॉलो कोअर स्लॅब ही नवीन संकल्पना त्यांनी समोर आणली आहे. बांधकामासाठी रेडिमेड स्लॅब बनविले आहेत. स्लॅब टाकल्यानंतर क्यूरिंगसाठी लागणारा २१ दिवसांची बचत याद्वारे होईल, असा दावा ग्रामले यांनी केला.


आज समारोप
अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो २०१७ औद्योगिक प्रदर्शनात समारोप रविवारी होत आहे. दुपारी साडेचार वाजता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. आमदार अतुल सावे, प्रशांत बंब, राजू शिंदे, राम भोगले, मानसिंह पवार यांची विशेष उपस्थिती असणार असल्याचे मासिआचे अध्यक्ष विजय लेकुरवाळे, समन्वयक भारत मोतिंगे, संतोष कुलकर्णी, अर्जुन गायके यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाहुण्या विद्यार्थिनी एमजीएममध्ये

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शैक्षणिक सहलीसाठी आलेल्या नाशिक येथील विद्यार्थिनींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने दिलेल्या वागणुकीबद्दल विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. कुलूप तोडून बाहेर काढलेल्या या विद्यार्थिनींच्या निवासाची अखेर एमजीएम प्रशासनाने व्यवस्था केली. रात्री साडेबारा वाजेपर्यंत या मुली निवासाच्या शोधात होत्या.
नाशिकच्या ‘एसएमआरके’ कॉलेजच्या काही विद्यार्थिनी प्रा. स्नेहल एकबोटे यांच्यासह औरंगाबादमध्ये आल्या होत्या. परिचिताच्या माध्यमातून मुलींची राहण्याची व्यवस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वसतिगृहात करण्यात आली. शुक्रवारी या मुली अंजिठा येथे गेल्या असताना, त्यांना कल्पना न देता विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्या खोलीमधील साहित्य बाहेर काढले. कुलूप तोडून प्रशासनाने त्या खोल्या ताब्यात घेतल्या. अंजिठ्यावरून आल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर या विद्यार्थिनींनी प्रशासनाकडे विचारणा केली, परंतु त्यांना योग्य उत्तर मिळाले नाही. अचानक घडलेला प्रकार, त्यात रात्री रूम कोठे शोधायची असा प्रश्न डॉ. एकबोटे यांना पडला. ही बाब ‘एमजीएम’च्या प्रेरणा दळवी, डॉ. रेखा शेळके यांना समजली. त्यांनी या पाहुण्या मुलींच्या राहण्याची व्यवस्था ‘एमजीएम’च्या वसतिगृहात केली. तोपर्यंत रात्रीचे साडेबारा वाजले होते. निवासाची सुरक्षित व्यवस्था झाल्याने, संघप्रमुखाने ‘एमजीएम’ प्रशासनाचे आभार मानले, तर विद्यापीठ प्रशासनाच्या वागणुकीमुळे विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापकांत प्रचंड नाराजी आहे. पाहुण्यांना अशा प्रकारे वागणूक देणे चुकीचे असल्याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये आहे. मुलींच्या सुरक्षेचा विचार, बाहेर आपल्या विद्यापीठाची प्रतिमा कशी होईल याबाबत प्रशासनाला कसे समजले नाही. असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत.

विद्यापीठासाठी ही घटना खरच खूप घृणास्पद आहे. ज्या विद्येच्या मंदिरात शिकविले जाते की, अतिथी देव भवः त्याच विद्योच्या मंदिरात रात्री-अपरात्री पाहुण्यांना हकलले जाते. विद्यापीठ प्रशासनाने सहकार्य दाखवायला हवे होते. मात्र, त्यांनी स्वतःच्या अकलेचे, दिवाळखोरीचे प्रदर्शन केले. - दीक्षा पवार, विद्यार्थिनी

पाहुण्यांना आपण कशी वागणूक द्यावी, याचे ज्ञान देण्याची गरज आहे का? याचा विचार विद्यापीठ प्रशासनाने करायला हवा. असा प्रकार घडल्याने, विद्यापीठाची राज्यभर बदनामी झाली. त्याला जबाबदार प्रशासन आहे. अनधिकृत लोकांचे लाड पुरवायचे पाहुण्यांना अशी वागणूक हे निषेधार्ह आहे. - अमोल दांडगे, राविकाँ

विद्यापीठातीलच इतर वसतिगृहात विद्यार्थिनींच्या राहण्याची व्यवस्था करता आली असती, परंतु प्रशासन अतिशय ढिसाळ आहे. अशी वागणूक मिळाल्यानंतर त्या विद्यार्थिनी तेथे जाऊन काय सांगतील. मुलींच्या सुरक्षिततेचा तरी प्रशासनाने विचार करायला हवा होता. - निखिल आठवले, अभाविप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
मराठवाड्यात व महाराष्ट्राला सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागतो. अशा प्रतिकूल परिस्थितीत पक्षांचे संवर्धन व संगोपन करण्याची मोठी जबाबदारी पक्षीमित्रांवर आहे. या कामासाठी पक्षीमित्रांनी पुढाकार घेऊन विविध पक्षांचे संगोपन करावे, असे आवाहन ३० व्या पक्षीमित्र संमेलनाचे अध्यक्ष तथा पर्यावरणाचे अभ्यासक विजय दिवाण यांनी केले.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत ‘यस’ संघटनेच्यावतीने ७ व ८ जानेवारी रोजी ३० वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन येथील अनिकेत मंगल कार्यालयात सुरू आहे. शनिवारी सकाळी संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रचना मोदी होत्या. तर व्यासपिठावर २९ व्या संमेलनाचे अध्यक्ष शरद आपटे, विभागीय वनाधिकारी अमोल सातपुते, स्वागताध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर वडमारे, ‘यस’ संघटनेचे अध्यक्ष रत्नाकर निकम, सचिव शंकर कराड उपस्थित होते. यावेळी बोलतांना विजय दिवाण म्हणाले, ‘महाराष्ट्राचा जलविकासात प्रथम क्रमांक लागत असून आजही १६६ तालुके व ११ हजार खेडी दुष्काळाच्या झळा तीव्रतेने सहन करीत आहेत. याचा मोठा परिणाम प्राणी व पक्षी यांच्या जीवनावर होतो. मराठवाड्यात तर पाणीतूट व पर्जन्यमान अस्थिर असल्यामुळे ७६ तालुक्यांपैकी ६१ तालुक्यांची पाणीपातळी खालवलेली आहे. अशा स्थितीत वृक्ष लागवड व पक्षीसंवर्धन करणे हे मोठ्या जिकीरीचे काम आहे. प्रतिकूल परिस्थितीत पक्षांचे संवर्धन व संगोपन करण्याची जबाबदारी पक्षीमित्रांनी जोपासली पाहिजे.’
महाराष्ट्रात जंगल अत्यंत कमी क्षेत्रावर असून आगामी काळात मोठ्या प्रमाणात वृक्षाची लागवड झाली तरच पर्यावरणाचा समतोल साधला जाईल. यासाठी समाजाने वृक्षलागवडीची मोहीम हाती घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी बोलतांना शरद आपटे म्हणाले, ‘केवळ पक्षांचे निरीक्षणच न करता पक्षांच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना या संमेलनात आखल्या जाव्यात पक्षीमित्रांची संख्या वाढवून पर्यावरण व वृक्षारोपण जोपासण्यासाठी सामूहिक पुढाकार घेण्याची गरज आहे.’
यावेळी वनविभागाचे अधिकारी अमोल सातपुते यांनी देव-देवतांचे वाहन पक्षी असूनसुद्धा घुबड, गिधाड, टिवटिवी या पक्षांना अंधश्रद्धेपोटी अशुभ मानले जाते. त्या-त्या पक्षांचे पर्यावरणातील महत्त्व समाजासमोर मांडल्याशिवाय पक्षांबद्दलची आस्था समाजात निर्माण होणार नाही. पक्षी वृद्धींगत करण्यासाठी वनविभाग पक्षीमित्रांसोबत राहिल. अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी आपले स्वागतअध्यक्षपर मनोगत व्यक्त करतांना नंदकिशोर मुंदडा म्हणाले, ‘बीड जिल्ह्यात २७ हजार ८०० हेक्टर जमिनीवर जंगल आहे. वनविभागाच्या ताब्यात असलेले हे क्षेत्र इतर विभागाला विकसित करण्यासाठी मोठे अडथळे निर्माण होतात. परिणामी वन्यजीव, पक्षी व निसर्ग संवर्धन करण्यासाठी मोठ्या अडचणी येतात. वनविभागाच्या पुढाकारातूनच या परिसराचा विकास साध्य होतो. कायद्यातील त्रुटी दुरूस्त करून वन विभागाशी समन्वयाने काम करता यावे. यासाठी पुढाकार घेणार आहोत. मुकुंदराज परिसरात वनविभागाच्या माध्यमातून रोप -वे, पक्षी उद्यान व बालउद्यान साकारण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.’
यावेळी चंद्रशेखर वडमारे यांनी मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्षीय समारोपात बोलतांना रचना मोदी यांनी अंबाजोगाईत होत असलेल्या हे संमेलन पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी दिशादर्शक ठरेल. असे सांगून नगर परिषदेच्यावतीने पक्षीसंवर्धन व वृक्षारोपण करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्या म्हणाल्या. दीपप्रज्वलनाने ३० व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘यस’ संघटनेचे अध्यक्ष रत्नाकर निकम यांनी केले. संचालन डॉ. शुभदा लोहिया यांनी तर उपस्थितांचे आभार शंकर कराड यांनी मानले. या पक्षीमित्र संमेलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पक्षीमित्र अंबाजोगाईत दाखल झाले. या दोन दिवस चालणाऱ्या संमेलनासाठी यस संघटनेचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढत्या वीजवापरामुळे प्रदूषणात भर

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘जगात कार्बन उत्सर्जनासंदर्भात विविध स्तरांवर अभ्यास केला जात आहे. त्याची कारणे शोधून उत्सर्जनाचा वेग कमी करण्याबाबत संशोधन सुरू आहे. ऊर्जेची जागतिक परिस्थिती पाहता नवीनीकरणाच्या (रिनेवेबल ) पर्यायाकडे सक्षमपणे पाहिले पाहिजे. वीजेच्या वाढत्या वापरामुळे प्रदूषणात भर पडत असून ते कमी करण्यासाठी नवीनीकरण पद्धतीने उर्जा निर्मितीला वाव आहे,’ असे प्रतिपादन बेंगलुरू येथील स्नॉयडर इलेक्ट्रिक इंडियाचे इंद्रजित सेन यांनी शनिवारी येथे केले.
मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (मासिआ) आणि एमटीडीसीच्या वतीने कलाग्राम येथे सुरू असलेल्या अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो २०१७ औद्योगिक प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी ऊर्जा विषयक विशेष परिसंवादात त्यांनी मार्गदर्शन केले. महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, आमदार अतुल सावे, एमटीडीसीचे विभागीय अधिकारी अण्णासाहेब शिंदे, महावितरणचे मुख्य अभियंता गणेशकर, खंडपीठातील सरकारी वकील अमरजितसिंग गिरासे, मासिआचे अध्यक्ष विजय लेकुरवाळे, समन्वयक सुरेश तोडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सेन म्हणाले, ‘ऊर्जा मिळणे हा प्रत्येक माणसाचा मुलभूत हक्क आहे. प्रदूषणवाढीचे प्रमुख कारण म्हणून वीजेचा वाढता वापर असल्याचे समोर आले आहे. हे कमी करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने वीजनिर्मितीचा पर्याय स्वीकारणे आवश्यक आहे. ऊर्जा बजतीकडेही आपण लक्ष दिले तर गरज पूर्ण होऊ शकते.
आमदार अतुल सावे म्हणाले, ‘स्वातंत्र्य मिळून इतके वर्षे झाली तरी देशातील अनेक गावे अजून वीजेपासून वंचित आहेत. २०१९ पर्यंत देशभर वीज पुरविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. पारंपरिक वीज निर्मितीची मर्यादा लक्षात घेऊन सौर ऊर्जेचा पर्याय आत्मसात करणे गरजेचे आहे. असे झाल्यास देश वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल.’ नवीनीकरण ऊर्जा हा शहर विकासाचा पाया असल्याचे अण्णासाहेब शिंदे यांनी सांगितले. श्री. गणेशकर आणि अॅड. अमरजितसिंग गिरासे यांनीही मार्गदर्शन केले. बकोरिया म्हणाले, की शहरात रिनेवेबल ऊर्जानिर्मितीसाठी पुढाकार घेण्यात येईल. मासिआचे अध्यक्ष विजय लेकुरवाळे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, की नवीनीकरण ऊर्जेची निर्मिती हा विषय अत्यंत महत्वाचा असून वीजेची वाढती गरज आणि पडत असलेला तुटवडा, वीजनिर्मिती प्रक्रियेमधून निर्माण होणारे प्रदूषण आदी समस्यांवर प्रभावी मार्ग काढण्याकरिता नवीन पर्याय हा सक्षम मार्ग आहे. समन्वयक सुरेश तोडकर यांनी परिसंवादाचा उद्देश स्पष्ट केला. त्यात औद्योगिक उत्पादनांची किंमत कशी कमी करता येईल, यामध्ये वीजेचा वापर आणि वेगवेगळ्या स्वरूपात वीज कशी उपलब्ध करता येईल ? यावर विचारमंथन अपेक्षित असल्याचे सांगितले. सौर ऊर्जा, हवेपासून निर्माण होणारी उर्जा, लाटांपासून निर्माण होणारी उर्जा जरी उपलब्ध होत असली तरी त्यांचे स्थान आणि ती वाहून नेण्यासाठी येणाऱ्या अडचणी आदी प्रमुख समस्या असल्याचे सांगितले.
बजाज अॅटोचो प्रमोद पांडे यांनी कंपनी ऊर्जाबचतीचे राबविलेले प्रयोग पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे सांगितले. बजाजमध्ये ऊर्जा बचतीच्या प्रयोगांकरीता पावणेपाच कोटी रुपये वार्षिक खर्च केले जातात. वीजेचे ऑडिट करून त्याची कारणमीमांसा करून वीजेचा अतिरिक्त वापर, गळती याबाबत विशेष लक्ष दिले जाते. उर्जाबचतीसंदर्भात भाग्यलक्ष्मी रोलिंग मिलचे नितीन काबरा यांनी मार्गदर्शन केले.

उलगडली मराठवाड्याची बलस्थाने
नवीनीकरण ऊर्जानिर्मितीत मराठवाड्याची बलस्थाने या विषयावरील चर्चासत्रात विवेक काबरा, प्रसाद कोकिळ, डॉ. अशोक केचे, ऋषिकेश चौधरी, अमित भांबरे, एस. एम. बडवे यांनी सहभाग घेतला. गॅसीफायर, सोलार कुकिंग, ओव्हन, सोलार वॉटर हिटर, लिथियम बॅटरी याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली. एस. एम. बडवे यांनी एमआयटी शिक्षण संस्थेत सौर ऊर्जेचा केला जाणारा वापर यावर प्रकाश टाकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समन्वयातून यशोशिखर गाठणे सोपे

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घर, कुटुंब, व्यवसाय या पातळींवर यशस्वीपणे लढत कुठलेही शिखर गाठता येणे शक्य आहे. स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाला साजेसे कर्तृत्व मिळविण्यासाठी आपल्यातील क्षमता ओळखून अभ्यास, कष्ट आणि सातत्य याची जोड देऊन काम करा, यश तुमच्या हातात आहे. पण करिअर आणि घर या दोन्ही पातळ्यावर यश मिळविण्यासाठी योग्य समन्वय आवश्यक आहे, असे प्रतिपादन उद्योजक महिलांनी शनिवारी येथे केले.
मासिआतर्फे आयोजित अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो २०१७ प्रदर्शनात महिला उद्योजकांचे यश या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. हावरे इंजिनिअर्स अँड बिल्डर्सच्या प्रमुख उज्ज्वला हावरे, डॉ. ज्योती दाशरथी, डॉ. रश्मी बोरीकर, मिताली मिश्रा यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. नीता वाळवेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
पतीच्या निधनानंतर श्रीमती हावरे यांनी उभा केलेला बांधकाम व्यवसाय समर्थपणे सांभाळून नावारूपाला आणला आहे. पतीने जपलेला सामाजिक वसाही तितक्याच समर्पणाने त्यांनी जोपासला आहे. लहान मुलांची जबाबदारी पेलून त्यांनी केलेली वाटचाल अत्यंत प्रेरणादायी ठरली. स्त्रिया या मल्टी टास्क असतात. व्यवसायात यशस्वी होणे त्यांना सहजशक्य आहे, फक्त त्यांनी आपल्या क्षमता ओळखायला हव्यात, असे त्या म्हणाल्या.
डॉ. ज्योती दाशरथी यांनी त्यांच्या फूड प्रोसेसिंग उद्योगबाबत माहिती दिली. डॉ. रश्मी बोरीकर यांनी वैधकीय व्यवसाय आणि सामाजिक कार्य यांची सांगड कशी घातली याची माहिती दिली. एक्स्पर्ट ग्लोबल सोल्यूशन्समधील अभियंता, जगभर फिरणाऱ्या मिताली मिश्रा म्हणाल्या, की घर आणि काम यांची सांगड घालणे आवश्यक आहे. कष्ट करण्याची तयारी ठेवली तर कोणतीही तरुणी हे करू शकते असे त्या म्हणाल्या.
डॉ. ज्योती दाशरथी यांनी, फूड प्रॉडक्ट तयार करणाऱ्या महिलांनी एकत्र येऊन क्लस्टर तयार करावे, शासन, बँक आपल्याला मदत करण्यास तयार आहे, असे सांगितले. प्रास्ताविक विजय लेकुरवाळे यांनी केले तर सूत्रसंचालन अभय हंचनाळ यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ वर्षे ड्रायव्हर म्हणून काम केले: मोहन जोशी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

लहानपणापासूनच नाटकात काम करण्याची आवड होती. त्यामुळे त्यावेळी वडिलांनी नाटकात काम करण्याची परवानगी दिली. याच क्षेत्रात भविष्य करेन, असे मलाही वाटले नव्हते. पण नाटकात काम करण्याचा प्रारंभ किर्लोस्कर रंगमंचावर १९६६ म्हणजे इयत्ता सहावीत असल्यापासून झाला. पुढे नाटक सुरू असताना माझे वाणिज्य पदवीपर्यंतचे शिक्षणही नापास न होता झाले. खूप संघर्ष करावा लागला, असे मला वाटत नाही आणि मी मानत ही नाही. बरेवाईट अनुभव प्रत्येकालाच त्याच्या कामात येतात तसेच मलाही आले. काही काळ ड्रायव्हर म्हणून काम केले आणि नंतर या क्षेत्रात स्थिरावलो, असे सांगत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी आपला प्रवास उलगडला.

प्रख्यात निवेदक राजेंद्र पाटणकर यांनी नांदेडच्या अखिल भारतीय बालनाट्य संमेलनात मोहन जोशी यांची प्रकट मुलाखत घेतली. खचाखच भरलेल्या सभागृहात त्यानी आपल्यातील कलावंताचा जीवन प्रवास उलगडला.

पदवीधर झाल्यावर पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून किर्लोस्कर कंपनीत नोकरीला लागलो. पण नाटकाच्या दौऱ्यांसाठी सुट्या लागायच्या आणि त्यासाठी प्रत्येकवेळी खोटे बोलणे अपरिहार्य झाले. कारण बहुतेक वेळा रजा मागताना माझी आजी वारल्यामुळे असे कारण मी लिहिले होते. एक दिवस माझ्या या चुकीने व्यवस्थापकाजवळ माझे बिंग फुटले आणि त्यांनी नोकरी किंवा नाटक यापैकी एक निवडायला सांगितले. मी शांतपणे विचार करून दुसऱ्या दिवशी नोकरीचा राजीनामा दिला. नाटकाने पोट भरेल अशी स्थिती नव्हती, त्यामुळे स्वत:चा ट्रक घेऊन ड्रायव्हर झालो. आठ वर्षे ड्रायव्हर म्हणून काम केले अन २० लाख किलोमीटर प्रवास केला.

अभिनयाच्या क्षेत्रात कुणी गॉडफॉदर नव्हता. माझा पहिलाच मराठी सिनेमा ‘एक डाव भुताचा’ त्यात मला खलनायकाची भूमिका मिळाली. हिरो म्हणून काम का केले नाही ? मी चरित्र अभिनेत्याच्या भूमिका करतो, इंडस्ट्रीत हल्ली कुटुंबासारखे वाटत नाही पण आम्ही आता वयाने वाढलो. त्यामुळे वागण्यात जरा फरकही पडतो, हेही कारण असेल, असे ते म्हणाले. प्रसिद्ध दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्या सोबत काम करताना आम्ही नेहमी सकाळी फिरायला जात असत ते थोर कलाकार होते, अशा शब्दात त्यांनी आठवणींना उजळा देत श्रद्धाजंली वाहिली.

बालरंगभूमीच्या या चळवळीबद्दल तुमच्या कोणत्या अपेक्षा आहेत, असे विचारले असता ते म्हणाले, ‘या चळवळीकडे सकारत्मक दृष्टीने बघतो आज औरंगाबादहून आलेल्या सोहम पिंगळीकर या बाल कलाकाराने सहा ते सात भूमिका इतक्या लहान वयात साकारताना प्रत्येकवेळी अभिनय, आवाज, लकबी याच्या छटा बदलत आपली अभिनयाची जाण आणि ताकद दाखवून दिली. त्याच्या सारखे कलाकार सातत्याने काम काम करीत राहले तर नकीच मोठे नट, या चळवळीतून मिळणार आहेत. अर्थात त्या आधी त्याने पदवीपर्यंत शिक्षण घ्यायला हवे. कशालाच नाही म्हणायचे नाही, ही माझी भूमिका असल्याने मी मिळेल ते काम जीव ओतून केले, ते सर्वांच्या पसंतीस उतरले. प्रत्येक कलाकाराने कोणतही भूमिका कण्याची तयारी ठेवली पाहिजे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळेच्या छतावरून पडून पेंटरचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिका शाळेच्या छतावरून कोसळल्याने पेंटरचा मृत्यू झाला. कैलासनगर येथे रविवारी सकाळी साडेनऊ वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रकाश मारोती हिवाळे (वय ६० रा. आकाशवाणी जवळ), असे या पेंटरचे नाव आहे. हिवाळे हे मूळ श्रीरामपूरचे रहिवासी असून सध्या बहिणीकडे आले होते. कैलासनगर येथील मनपा शाळेला रंग देण्याचे काम सुरू आहे. हिवाळे हे सकाळी रंग देण्यासाठी छतावर गेले होते. यावेळी तोल गेल्याने ते खाली कोसळले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना मुख्याध्यापक व नागरिकांनी घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवले. त्यांना ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सुरुवातीला घाटी मेडिकल चौकी व नंतर जिन्सी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लेखकाची आस्था नेहमी विशाल असावीः लोमटे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘काही लेखकांच्या लेखनात ते ज्या वर्गातून आले, त्याचे हितसंबंध आणि आस्था दिसते. उलट लेखकाने सर्वांना शब्दाखाली झाकून घेतले पाहिजे. लेखक नेहमी सत्तेच्या विरोधात असतो आणि त्याला जात-धर्म नसते. म्हणून लेखकाची आस्था विशाल असावी’ असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक आसाराम लोमटे यांनी केले. जाहीर सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
साहित्यिक आसाराम लोमटे यांच्या ‘आलोक’ कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यानिमित्त मराठवाडा साहित्य परिषदेने रविवारी लोमटे यांचा जाहीर सत्कार केला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ समीक्षक डॉ. चंद्रकांत पाटील, ‘मसाप’चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, डॉ. दादा गोरे आणि डॉ. रामचंद्र काळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. चंद्रकांत पाटील यांनी लोमटे यांचा सत्कार केला. शहरातील साहित्यिक, रसिक यांनी लोमटे यांचे अभिनंदन केले. आपल्या मनोगतात लोमटे यांनी कथालेखनाचा प्रवास उलगडला. ‘आपल्या लेखनातील सामाजिक पर्यावरणाची व माणसांच्या जगण्याची नोंद पुरस्कारानिमित्त घेतली जाते. यावेळी त्या कलात्मक आशयाकडे सर्वांचे लक्ष जाते. माझ्या कथा अनागर समूहातील असून किस्सेबाज ग्रामीण कथा नाही. कथा माणसाची गोष्ट असून मानवी जगण्याचा शोध घेणारी आहे. दररोजच्या जगण्यात कमालीच्या वंचना असलेली व कष्टाने अंग ठणकणारी माणसेसुद्धा गोष्ट ऐकतात. अभावग्रस्त माणसांनीसुद्धा मानसिक बळ मिळवण्यासाठी गोष्टीची परंपरा घालून दिली आहे. प्रत्येकाच्या जगण्याची गुंतागुंत वेगळी आहे. घायाळ करणारे अनुभव लेखक लिहितो. दंश करणारे अनुभव लेखनासाठी पिच्छा पुरवतात. गावात चार-दोन वाळू माफिया आणि रेशन माफिया सोडल्यास सर्वांचे जगणे एका स्तरावर आहे. काही कुटुंबे तीन दिवस स्वतःच्या शेतात आणि तीन दिवस दुसऱ्याच्या शेतात मजुरी करतात. या शेतकऱ्यांना आपण कोणत्या वर्गवारीत गृहीत धरणार’ असे लोमटे म्हणाले.
डॉ. चंद्रकांत पाटील यांनी लोमटे यांच्या लेखनावर भाष्य केले. ‘मराठवाड्याला लेखनाची सशक्त परंपरा लाभली आहे. लोमटेंच्या कथा वेगळा आविष्कार असून रचनेचे त्यांना पुरेपूर भान आहे. भाषेची मांडणी, घटनांची निवड आणि भाषाशैलीवर साहित्याची वाचनीयता ठरते. लोमटे यांची भाषा अतिशय सरळ आणि प्रवाही आहे’ असे पाटील म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कैलास इंगळे यांनी केले. यावेळी साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अस्मितांचे काय करायचे ?
‘सध्या जाती-जातीच्या अस्मिता उफाळून आल्यामुळे साहित्यिक व महापुरूष वाटले गेले. गडकरी यांचा पुतळा फोडल्यानंतर पुण्यातील ब्राह्मणांनी गडकरींचे चित्र लावले. म्हणजे गडकरी ब्राह्मणांचे झाले. शिवाजी महाराजांवर बोलण्याचा हक्क आमचाच, असे बजावले जात आहे. महात्मा फुलेंवर बोललेले त्यांच्या समाजाला आवडत नाही. दलित साहित्यावर दलितेतरांनी लिहिलेले दलितांना आवडत नाही. तुमचा काय संबंध, असा प्रश्न केला जातो. या गोष्टीचे मला दुःख होते. जातीमुक्त होऊन माणसांच्या अंतरंगांचा वेध घेतात ते पुढे निघून जातात’ असे डॉ. चंद्रकांत पाटील म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटबंदीविरुद्ध भारिपचे पोलिसांसमोर आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘नोट दो, या रोटी दो’ अशा घोषणा देत भारिप बहुजन महासंघातर्फे रविवारी दुपारी क्रांतिचौक पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आले. राज्यभरात नोटबंदीच्या विरोधात भारिपतर्फे हे आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी करण्याचा निर्णय घेऊन देशातील सर्वसामान्य, कष्टकरी, गरिबांचे हाल केल्याचा आरोप भारिप बह‌ुजन महासंघाने यावेळी केला. हातात भाकरी घेत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत पोलिस ठाण्याचा परिसर दणाणून सोडला. जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ, महासचिव दिनेश साळवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिस ठाण्यात शिरकाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी अडवत ताब्यात घेतले. या आंदोलकामध्ये माणिक करवंजे, पंडितराव तुपे, जितेंद्र शिरसाठ, प्रवीण म्हस्के, सुभाष शिरसाठ, शांताबाई धुळे, रेखा उजगरे, सागर दळवी, कैलास बनकर, प्रमोद भालेराव यांच्यासह इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

ठाण्यासमोर प्रथमच आंदोलन
शासनाच्या विरोधात कोणतेही आंदोलन यापूर्वी विभागीय आयुक्तालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येते. शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांना निवेदन सादर करण्यात येते. पोलिस ठाण्यासमोर अशा प्रकारे हे पहिलेच आंदोलन करण्यात आले. पोलिस‌ निरीक्षक धनंजय येरुळे यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. आंदोलन झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष भुईगळ व इतर पदाधिकाऱ्यांना काही काळ ताब्यात घेत नंतर त्यांची सुटका करण्यात आली. या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदारांची वेगळी चूल कन्नडमध्ये कायम

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
बाजार समिती व नगरपालिका निवडणुकीप्रमाणे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आघाडीच्या माध्यमातून लढवणार असल्याचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी रविवारी जाहीर केले. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आमदार जाधव यांचा ताळमेळ बसत नसल्याने त्यांनी स्वतंत्र चूल कायम ठेवल्याचे दिसून येत आहे.
आमदार जाधव यांनी विकासमहर्षी रायभानजी जाधव विकास आघाडीतर्फे कन्नड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक लढवली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सुद्धा त्यांनी ही आघाडी कायम ठेवली आहे. कन्नड बाजार समिती निवडणुकीत त्यांनी सत्ता मिळवली, तर नगरपालिकेत मर्यादित यश मिळाले. बाजार समिती निवडणुकीत स्वपक्षाच्या आमदारांनी वेगळी वाट धरल्याने खासदार चंद्रकांत खैरे यांचे काँग्रेससोबत युती केली, पण शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले. नगरपालिका निवडणुकीत आमदारांच्या आघाडीला शिवसेनेपेक्षा दुप्पट जागा मिळाल्या आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सरला विलास वाडेकर यांना ४८०० मते मिळाली, तर शिवसेनेने आयात केलेल्या उमेदवार मीना मारोती राठोड यांना १६५० मते मिळाली.
‘शिवसेना पक्षश्रेष्ठींनी गेल्या निवडणुकीचे अवलोकन करून शिवसेनेची कन्नड तालुक्याची सूत्रे माझ्याकडे सोपवणे गरजेचे होते. मात्र तसे न करता खासदार चंद्रकांत खैरे यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विकास आघाडीची बाजू कन्नड-सोयगाव मतदार संघात चालवण्याचा प्रयत्न मी करणार आहे,’ असे त्यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

उमेदवार जाहीर
जिल्हा परिषदेच्या आठ पैकी पाच गटाचे उमेदवार जाहीर केले.
देवगाव रंगारी - शेरखान शेख लाल
हतनूर -अशोक पंडितराव वाळुंजे
कुंजखेडा -फकीरराव मन्नू चव्हाण
औराळा -सीमा सुभाष काळे
चिंचोली लिंबाजी- शिवाजी देविदास मनगटे

पंचायत समितीच्या १६ पैकी ९ गणांचे उमेदवार जाहीर केले.
ताडपिंपळगाव - नेहा सिद्धेश्वर
हतनूर -किशोर यादवराव पवार
चापानेर-रामदास आबा घुले
चिखलठाण- संगीताबाई शेकनाथ चव्हाण
कुंजखेडा- अकिलाबी मुक्तार शहा
औराळा- अन्नपूर्णा पोपट मिसाळ
जेहूर- यशोदाबाई मुलचंद पवार
चिंचोली लिंबाजी- दिलीप बालू पवार
नाचनवेल- नंदाबाई बाबुराव बनकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनांची तोडफोड; चौघांच्या कोठडीत वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रस्त्यावर उभ्या केलेल्या सरकारी तसेच खासगी ८ गाड्यांची तोडफोड करणाऱ्या चार आरोपींच्या पोलिस कोठडीत मंगळवारपर्यंत (१० जानेवारी) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी. अत्तार यांनी रविवारी दिले.
या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक राहुल तुकाराम भांदरगे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीनुसार, शहरातील कटकटगेट, नेहरुनगर, आझाद चौक, सेंट्रल नाका, रोशन गेट परिसरातील तीनचाकी व चारचाकी सरकारी तसेच खासगी ८ वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी आरोपी शेख जफर नुर मोहमद (३४, रा. एन ६, बजरंग चौक), आरोपी शेख नफिस शेख याकुब (२२, रा. मुजिब कॉलनी), आरोपी काजी अमिनोद्दीन इफ्तेखरोद्दीन (३२, रा. करीम कॉलनी) व आरोपी शेख यासिन शेख लतीफ (३२, रा. मकसूद कॉलनी) यांना मंगळवारी (३ जानेवारी) अटक करण्यात आली होती. या सर्व वाहनांचे ५४ हजारांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले होते. आरोपींना बुधवारी कोर्टात हजर केले असता, त्यांना रविवारपर्यंत (८ जानेवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना रविवारी कोर्टात हजर केले असता, आरोपींकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली असली तरी इतर दोन दुचाकी जप्त करणे बाकी आहे. तसेच आरोपींकडून हत्यारे जप्त करणे आणि फरार असलेल्या दोन आरोपींना अटक करणे बाकी आहे. त्याचवेळी वाहनांची तोडफोड करण्यामागे आरोपींचा काय हेतू होता, याचाही तपास करावयाचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील एस. एस. विजयसेनानी यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरुन कोर्टाने चौघा आरोपींना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरपालिकेत अपेक्षित यश नसल्याची कबुली

0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
नगरपालिका निवडणुकीत भाजपला चमकदार कामगिरी करता न आल्याने त्याची भरपाई जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत रविवारी तालुक्यातील म्हैसमाळ येथे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीला आमदार प्रशांत बंब, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, किशोर धनायत, आसाराम तळेकर, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, डॉ. संजय गव्हाणे, संजय खंबायते, सुहास शिरसाट, डॉ. भागवत कराड, शिरीष बोराळकर, महापौर भगवान घडामोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नगरपालिका निवडणुकीचा आढावा घेताल. या निवडणुकीत भाजप विदर्भात क्रमांक एक, उत्तर महाराष्ट्रात क्रमांक दोनवर, पश्चिम महाराष्ट्रात तीनवर, मराठवाडा चार व कोकणात पाचव्या क्रमांकावर राहिली, असे खासदार दानवे म्हणाले. मराठवाड्यात नगरपालिका निवडणुकीत चांगली कामगिरी झाली नाही. बीड जिल्ह्यात तीन, नांदेड-जालना-हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक व औरंगाबाद जिल्ह्यात दोन नगरपालिका मिळाल्या. गंगापूर आणि पैठणने लाज राखली,असे ते म्हणाले.
‘येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मराठवाड्याने क्रमांक एकची कामगिरी केली पाहिजे. औरंगाबाद जिल्हा परिषदेत भाजपला ३३ जागा मिळतील,’ असा दावा त्यांनी केला. कार्यकर्त्यांनी उत्तम कामगिरीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

वेडा माणूस ते प्रदेशाध्यक्ष
उमेदवार निवडीबद्दल रावसाहेब दानवे स्वतःचे उदाहरण सांगितले. ‘प्रमोदजींच्या एका फोनमुळे मला विधानसभेची उमेदवारी मिळाली. शबनम गळ्यात असलेला तो मुलगा कोण, अशी विचारणा त्यांनी केली. मला फोन करून उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले. तुला फक्त अर्ज भरायचा आहे, उभे राहायचे नाही, असे सांगून प्रमोद महाजन यांनी अर्ज माघारीच्या दिवशी गाडीत बसवून घेतले. मला बीड आणि गेवराईच्या मध्ये सोडून दिले. मी म्हणालो, साहेब उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटा दिवस आहे. त्यावर ते म्हणाले, वेड्या माघारीची वेळ तीन वाजताच संपली. हे सांगून त्यांनी मला गाडीतून उतरवून दिले. त्यावेळी खिशात शंभर रुपये होते. असा वेडा माणूस आमदार ते आज भाजप प्रदेशाध्यक्ष झाला. त्यासाठी आत्ताच चेहरे बाहेर काढा. संभाव्य उमेदवारांच्या याद्या तयार करा. सहयोगी आणि विरोधी पक्ष काय करतात यावर लक्ष ठेवा,’ असा सल्ला दानवे यांनी दिली.

मुलाखतींच्या तारखा जाहीर
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या मुलाखतींचा कार्यक्रम यावेळी जाहीर करण्यात आला. १० जानेवारी कन्नड, खुलताबाद, गंगापूर, ११ जानेवारी पैठण, वैजापूर, औरंगाबाद, १३ जानेवारी सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री येथे मुलाखती होणार आहेत.

युतीबाबत कार्यकर्ते संभ्रमात
भाजप-शिवसेना युतीबद्दल पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. कार्यकर्त्यांची मनस्थिती ठीकठाक आहे काय. ऐनवेळी तारांबळ नको. युतीचे अधिकार जिल्हापातळीवर आहेत, प्रदेश कार्यकारिणीकडून युती करावी किंवा करू नये, याबद्दल काहीही सांगितले जाणार नाही. भाजप व शिवसेनेत लढत झाली, तर निकाल काय असू शकतो, आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. ‘युती होईल किंवा होणार नाही. संपूर्ण जागा लढविण्याची तयारी करा,’ असे खासदार दानवे यांनी सांगितले. भाजप-शिवसेना युतीबद्दल स्पष्ट खुलासा न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम दिसून आला.

हुरडा पार्टीत कार्यकर्ते खुश
आमदार प्रशांत बंब यांनी म्हैसमाळ येथील निसर्गरम्य वातावरणात आयोजित केलेल्या या बैठकीत कार्यकर्त्यांसाठी हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी २५० कार्यकर्त्यांना मेजवानी देण्यात आली. हुरडा पार्टी मिळाल्याने कार्यकर्ते खुश दिसत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अज्ञात तरुणांची बसवर दगडफेक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
‘एक मराठा लाख मराठा’, अशा घोषणा देत तीन ते चार अज्ञात तरुणांनी पैठण डेपोची सोलापूर-पैठण बस दगडफेक करून काचा फोडल्या. ही घटना पैठण-पाचोड रस्त्यावरील सोलनापूर फाट्याजवळ शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. बसमध्ये २५ प्रवासी होते, पण एकही प्रवासी जखमी झाला नाही.
पैठण डेपोची सोलापूर-पैठण बस (एम एच २० बी एल २८४१) शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पैठणकडे येत होती. त्यावेळी पैठण-पाचोड रस्त्यावरील सोलनापूर फाट्याजवळ तीन ते चार अज्ञात तरुणांनी हात दाखवून बस थांबवण्याचा इशारा केला. मात्र, येथे थांबा नसल्याने चालकाने बस थांबवली नाही. त्या तरुणांनी बसचा पाठलाग करून समोरील काच फोडली. अचानक काच फुटल्यामुळे पुढील काहीच दिसत नसल्याने चालक संतोष पवार यांनी बस थांबवली. त्यानंतर त्या अज्ञात तरुणांनी तुफान दगडफेक करत बसच्या सर्व काचा फोडून टाकल्या. बस फोडल्यानंतर या तरुणांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देण्यास सुुरुवात केली. घोषणाबाजी केल्यानंतर ते दोन मोटारसायकलीवरून निघून गेल्याची माहिती बस चालक संतोष पवार यांनी दिली. घटनास्थळी अंधार असल्याने हल्लेखोर तरुणांच्या मोटारसायकलचा नंबर दिसू शकला नाही. दगडफेक सुरू झाल्यानंतर बसमधील प्रवाशांनी लगेच बसमध्ये लोळन घेऊन स्वतःचा बचाव केला, असे बस चालकाने सांगितले. याप्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात अज्ञात तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३० हजारांचे नुकसान
बस चालकाने दगडफेकीची माहिती दिल्यानंतर पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे घाबरलेल्या २५ प्रवाशांना बंदोबस्तात पैठण येथे आणण्यात आले. दगडफेकीमुळे बसचे ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती प्रभारी आगार प्रमुखांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीएमआयसीत अँकर प्रोजेक्ट ठरेना

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) शेंद्रा टप्प्यात विविध आंतरराष्ट्रीय उद्योग येणार, अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून होती. मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांसह उद्योग खात्याचे वरिष्ठ अधिकारी चार देशांच्या दौऱ्यावर जाऊन आले. त्यानंतर किया मोटर्स, ह्यूंदाई मोटर्स औरंगाबादमध्ये येणार असे म्हटले जात होते, पण या चर्चा नुसत्या अफवाच ठरल्या आहेत.
औरंगाबादेत डीएमआयसीच्या शेंद्रा टप्प्यात एखादा मोठा आंतरराष्ट्रीय उद्योग यावा, यासाठी उद्योग विभागासह स्थानिक उद्योजक प्रयत्नशील होते. किंबहुना कोरिया, जपान आणि अमेरिकेत उद्योग विभागाचे शिष्टमंडळ गेल्या वर्षी गेले होते. तेथे डीएमआयसीचे मार्केटिंग केले गेले. दौऱ्यानंतर औरंगाबादेत ह्यूंदाई, किया सारखे मोठे प्रकल्प येणार अशी चर्चा सुरू झाली, प्रत्यक्षात या कंपन्यांकडून आतापर्यंत कुठलीच विचारणा केली गेली नाही. ह्यूंदाईचा प्रकल्प चेन्नईमध्ये आहे. किया मोटर्सचा आंध्रप्रदेशाकडे अधिक ओढा आहे. त्या तुलनेत महाराष्ट्र मात्र खूप मागे पडल्याचे मुंबईतील सूत्रांनी सांगितले. भविष्यात एखादा आंतरराष्ट्रीय प्रकल्प डीएमआयसीमध्ये येईल की नाही याबाबत अद्याप काहीच सांगता येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

डीएमआयसीमध्ये मोठे प्रकल्प यावेत, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. आम्ही विविध कंपन्यांच्या व्यवस्थापनांना प्रस्ताव पाठविले आहेत. त्यामुळे मोठे उद्योग डीएमआयसीमध्ये येणार याबाबत केवळ चर्चा आहेत.
- सुभाष देसाई, उद्योगमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दीपस्तंभ : संघर्षातून उभारला सभुचा वटवृक्ष

0
0

pramod.mane@timesgroup.com
Tweet : @pramodmaneMT
सरस्वती भुवन शिक्षण संस्था १०२ वर्षांपासून कार्यरत अाहे. संस्थेचे आजमितीला दोन सिनिअर कॉलेज, आठ ज्युनिअर कॉलेज, १० हायस्कूल आणि दोन प्रायमरी स्कूल आहेत. १६ मार्च १९१५मध्ये ‘सरस्वती भुवन मुलांची शाळा’ सुरू झाली. शाळा सुरू झाली तेव्हा या शाळेत एक शिक्षक आणि २५ विद्यार्थी होते. शैक्षणिक वर्षाच्या शेवटी हीच संख्या १६१वर गेली होती. ३ एप्रिल १९१६मध्ये शारदा मंदिर कन्या शाळा सुरू झाली. शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या २१ होती. मुलींना मातृभाषा ‘मराठी’तून शिक्षण घेता यावे म्हणून ही शाळा सुरू करण्यात आली होती. हैदराबाद हायकोर्टाचे न्या. मौलवी सय्यद मोहम्मद गुलाम जब्बार हे पहिल्या कार्यकारिणीचे पेट्रन होते आणि व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंडितराव पारगावकर, तर सरचिटणीस म्हणून राजारामपंत पोळ हे होते.
मराठवाडा हा प्रांत निजाम राजवटीत होता. प्रशासन हे उर्दू भाषेतून चालत होते. बहुसंख्यांची बोलीभाषा मराठी, मात्र प्रशासन आणि मिळणारे शिक्षण उर्दू भाषेतून उपलब्ध होते. मराठवाड्यातील नागरिकांना आपल्या भाषेतून म्हणजे, मराठी भाषेतून शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून स.भु. शिक्षण संस्थेची स्थापना झाल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर यांनी सांगितले. त्यावेळी मराठी भाषेतून शिक्षण देणारी स.भु. ही एकमेव संस्था होती. शासनाने या संस्थेला एका वर्षानंतर शासकीय मान्यता दिली. मराठीतून शिक्षण देणाऱ्या संस्थेविषयी प्रशासनाला दुरावा होता. कारण यात त्यांना निजाम विरोधाची शंका असायची, असेही बोरीकर म्हणाले. पहिली दहा वर्षे शाळेला शासनाकडून कोणतेही अनुदान मिळाले नाही. ही शाळा लोकाश्रय, विद्यार्थ्यांकडून मिळालेली फी, शिक्षकांनी केलेले विनावेतन काम आणि देणगीदारांच्या मदतीवर चालविली गेली. बराच काळ शिक्षकांनी केलेल्या त्यागावरच ही संस्था चालविली गेली. शाळेला स्वतःची इमारत नव्हती. ही शाळा विठ्ठलबागेच्या जागेत सुरू करण्यात आली. स्वतःची इमारत बांधण्यासाठी शाळेकडे पैसा उपलब्ध नव्हता. सार्वजनिक संस्थेचे खरे अस्तित्व सामान्य जनतेच्या मदतीवरच अवलंबून असते. मोठ्या आपत्तींशी लढून ही संस्था आज आपल्यापुढे जिवंत आहे, असे बोरीकर यांनी सांगितले. साथीचे आजार फैलावल्यास त्याला अटकाव करण्यासाठी लागणारी सामग्री उपलब्ध नव्हती. त्यावेळी प्लेगची साथ सुरू झाली. परिणामी, शाळा चार महिने बंद ठेवावी लागली होती, अशी आठवणही बोरीकर यांनी दिली. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजविली जावी, बंधूभाव वाढीस लागावा म्हणून ‘वंदे मातरम‍्’ ही प्रार्थना नियमित घेतली जात असे. दुर्दैवाने या प्रार्थनेमुळेच निजाम सरकारने शाळेस मिळणारे अनुदान बंद केले. कालांतराने अनुदान सुरू झाले. १९१६ ते १९४०पर्यंत मुलींना मराठी माध्यमातून चौथीनंतरचे शिक्षण देणारी ही एकच संस्था होती. मॅट्रिकपर्यंतच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून शारदा मंदिर कन्या शाळेमध्ये कर्वे विद्यापीठाचे व काहीकाळ त्यावेळच्या नागपूर विद्यापीठाचे मॅट्रीकपर्यंतचे वर्ग चालविण्याची सोय करण्यात आली. यासाठी शासनाकडून कोणतेही अनुदान मिळत नव्हते, परंतु एक सामाजिक, शैक्षणिक कर्तव्य म्हणून संस्थेने ही आर्थिक झीज सोसली होती. १३४९ ते १३५५ फसलीपर्यंत उर्दू शिक्षण देता येत नसल्यामुळे अनुदान बंद केले व उर्दू शिक्षणाचा समावेश केला तरच शाळेची मान्यता कायम ठेऊ, नसता शाळेची मान्यता काढून घेऊ, असे सरकारने स्पष्ट केले. स.भु. शिक्षण संस्थेने सरकारपुढे घुटणे न टेकवता मराठी माध्यमातूनच शाळा चालू ठेवली होती. आज स.भु. शिक्षण संस्थेच्या कॉलेज, शाळांमध्ये तब्बल २० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शैक्षणिक गुणवत्तेत तर स.भु. शिक्षण संस्थेचे विद्यार्थी कायमच आघाडीवर होते. आजही स.भु. शिक्षण संस्थेचे विद्यार्थी सर्व देशात आणि परदेशातही मोठ्या पदावर आहेत. केवळ प्राथमिक शिक्षण देऊन संस्था थांबली नाही, तर उच्च शिक्षणाची गरज लक्षात घेऊन १९६३मध्ये औरंगाबाद शहरात कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाची सुरुवात करण्यात आली होती. यालाही आता ५४ वर्षे झाली आहेत. साहित्य, कला आणि संगीताला चालना मिळावी व प्रोत्साहन मिळावे म्हणून संस्थेने कनिष्ट व वरिष्ट स्तरावर संगीत शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर पदवी स्तरावर नाट्यशास्त्रासारखा विषय सुरू करून कलेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. यासाठी संस्थेने स्वतंत्र इमारत व नाट्य अकादमीची निर्मिती केलेली आहे. भाऊसाहेब वैशंपायन यांनी शाखा विस्ताराचे काम केलेले आहे. स.भु. शिक्षण संस्थेच्या भरारीचे खरे आधुनिक शिल्पकार म्हणून ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गोविंदभाई श्रॉफ यांचे नाव आघाडीवर घेता येईल. त्यांनी अध्यक्ष म्हणून तब्बल २६ वर्षे, तर सरचिटणीस म्हणून नऊ वर्षे कार्य केले आहे. त्यांनी केलेल्या कामामुळेच आज स.भु. शिक्षण संस्थेचे नाव संपूर्ण राज्यात झाले आहे. गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी क्रॉस कंट्री स्पर्धा घेतली जाते. त्यात ८ ते १० हजार नागरिक सहभागी होतात. संगीत शास्त्र व नाट्यशास्त्र या विषयांना लागणारी सुविधा कै. गोविंदभाई श्रॉफ कला अकादमी या रुपाने उभी राहिलेल्या स्वतंत्र वास्तूमध्ये निर्माण करण्यात आली आहे. कॉलेज पातळीवर अशी स्वतंत्र वास्तू मराठवाड्यात एकमेव असेल. दरवर्षी गोविंदभाई श्रॉफ संगीत महोत्सव साजरा केला जातो. विद्यार्थ्यांत साहसी वृत्ती निर्माण व्हावी या दृष्टीकोनातून गिरीभ्रमण व गिर्यारोहणासाठी साहसी उपक्रम राबविले जातात. जनतेच्या मनात या संस्थेविषयी आपुलकी व आदराची भावना निर्माण झाल्याचे दिसून येते. या अपुलकीच्या प्रभावामुळेच औरंगाबाद शहराच्या बाहेर रांजणी, बिडकीन, वडोद बाजार, गोंदेगाव, भराडी, कुंभार पिंपळगाव, बालानगर या दुर्गम भागामध्ये संस्था शिक्षणाचा प्रसार प्रभावीपणे करू शकली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात माजी राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा, व्यंकटरामण, माजी पंतप्रधान कै.पी. व्ही. नरसिंहराव, माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण, शरद पवार, सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख, पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा, शास्त्रज्ञ प्रा. यशपाल, डॉ. राजा रामण्णा, संगीत सम्राट भीमसेन जोशी, सीने अभिनेता बलराज सहानी, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, स्वामी रामानंद तीर्थ, जयप्रकाश नारायण, शेख अब्दुल्ला यांनी संस्थेस भेटी दिल्या आहेत. नवीन अनुदान संहिता लागू झाल्यामुळे शिक्षकांना महागाई भत्ता व मागील फरक देण्यासाठी संस्थेला स्वतःचा फार मोठा भूखंड विकावा लागला. ज्याठिकाणी आज सरस्वती भुवन कॉलनी वसली आहे, त्यावेळचे सरचिटणीस भाऊसाहेब वैशंपायन यांनी स्वतःचे घर गहाण ठेवून या प्रसंगावर मात केली आहे.
संस्थेचे शिक्षण विषयक धोरण काळानुसार बदलत राहते. संस्था स्थापनेच्यावेळी जी उद्दिष्ट्ये होती, त्याचे स्वरूप आता बदलले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सामाजिक समरसता, मूलभूत हक्क चळवळ वगैरे गोष्टी शाळेच्या माध्यमातून केल्या गेल्या. गोविंदभाई श्रॉफ यांच्या काळात तर मराठवाड्याचे संपूर्ण राजकीय आणि सामाजिक नेतृत्व याच संस्थेने केले. स.भु. मधूनच सारी सूत्रे हलविली जात होती. सध्याच्या काळात गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि स्वयंरोजगार निर्मिती हीच दोन उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करीत आहे.
केवळ पदवीला महत्त्व न देता प्रत्येक विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहील, अशा रोजगारकेंद्री अभ्यासकेंद्राची योजना आखावी लागणार आहे. भविष्यात जीर्ण स.भु. सभागृहाचे नूतनीकरण केले जाणार आहे. दीड हजार प्रेक्षकांची क्षमता असलेले सभागृह बांधण्याचा संकल्प असल्याचे बोरीकर यांनी सांगितले, तसेच स.भु. आणि शारदा मंदिर या दोन्ही जीर्ण इमारतींचे अद्ययावत सुविधांसह नूतणीकरण केले जाणार आहे. या दोन्ही नूतनीकरणासाठी तब्बल बारा कोटींचा खर्च अपेक्षित आहे. अध्यापक प्रशिक्षण पदविका व पदवीसाठी इमारत, दोनशे विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी सुविधायुक्त दोन वसतिगृह, अद्ययावत क्रीडांगण व क्रीडा संकुल, माहिती तंत्रज्ञान, अॅनालिटीकल केमिस्ट्री, बायो टेक्नॉलॉजी, व्यवस्थापन शास्त्र, फायनान्शियल अॅनालिसीस यासाठी नवीन इमारत बांधण्याचा संस्थेचा संकल्प आहे.

सीबीएसई शाळा सुरू करणार
मातृभाषेतून शिक्षणाचा हक्क अबाधीत ठेवत इंग्रजी माध्यमांचाही अंगिकार करावा लागणार आहे. सीबीएसई अभ्यासक्रमाचा आग्रहा पालकांनी धरला आहे. हा आग्रह दुर्लक्षून चालणार नाही, हे संस्थेच्या विद्यमान सदस्यांनी ओळखले आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून स.भु.ची सीबीएसई शाळा सुरू होणार आहे.

स.भु. शिक्षण संस्थेला मिळालेले पुरस्कार
- १९९३ ः भारत सरकारचा सद‍्भावना पुरस्कार
श्यामची आई संस्थार कथामाला पुरस्कार
- २००० ः राज्य शासनाचा आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार
- २००५ ः साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचा भालचंद्र पुरस्कार
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचा प्रतिष्ठित एन. एन. भिडे पुरस्काराची हॅट‍्ट्रिक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लॉटवाटप सुलभ व्हावे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद परिसरातील गेल्या ४० वर्षांत उद्योगांचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले. जागतिक पातळीवर औरंगाबादचे नाव मोठे झाले, पण अलीकडच्या काळात नवीन उद्योगांना प्लॉटवाटपाची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट केल्याने उद्योजकांच्या अडचणी वाढल्या आहेत. ही प्रक्रिया सुलभ करावी, अशी अपेक्षा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली.
मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चर (मासिआ) व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांच्या वतीने कलाग्राम येथे भरविण्यात आलेल्या अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो २०१७ प्रदर्शनाचा समारोप रविवारी झाला. यावेळी बागडे बोलत होते. आमदार अतुल सावे, उद्योजक राम भोगले, मानसिंह पवार, राजेंद्र दर्डा, एमटीडीसीचे प्रादेशिक अधिकारी अण्णासाहेब शिंदे, मासिआ अध्यक्ष विजय लेकुरवाळे, समन्वयक भारत मोतिंगे, संतोष कुलकर्णी, सुनील कीर्दक, अभय हंचनाळ, नारायण पवार आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
बागडे म्हणाले, की या प्रदर्शनातून औरंगाबादची ताकद दिसून आली आहे. अशा उपक्रमातून शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग सहभागी करून घ्यायला हवेत. शेंद्रा एमआयडीसी परिसरात डीएमआयसीच्या प्लॅननुसार ५० एकर जागेवर कन्व्हेन्शन सेंटर उभारले जाईल. या प्रदर्शनातून औद्योगिकदृष्ट्या कसा लाभ झाला, हे मांडावे.
आमदार सावे यांनी, दर दोन वर्षांनी असे प्रदर्शन भरवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मानसिंह पवार म्हणाले, की याठिकाणी सहभागी झालेल्या उद्योजकांपैकी बहुतांश उद्योजक शेतकरी कुटुंबातून आले आहेत, हे अभिमानास्पद आहे. गेल्या वीस वर्षांत विविध औद्योगिक प्रदर्शनाद्वारे औरंगाबादने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. औरंगाबादला हा दर्जा मिळविण्यासाठी कुणा एकट्याचे श्रेय नसून ते उद्योजकांचे सांघिक यश आहे. दर्डा यांनीही उद्योग विकासाच्या सूचना केल्या.
भोगले म्हणाले, की औरंगाबादच्या उद्योगाची ताकद या प्रदर्शनाच्या निमित्ताने जगासमोर आली आहे. भविष्यातील वाटचालीला हे पूरक आहे. औरंगाबादमधील उद्योजकांनी आता राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदविला पाहिजे. मासिआने यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मासिआ अध्यक्ष विजय लेकुरवाळे यांनी चार दिवसांचा आढावा घेतला. नारायण पवार यांनी सू्त्रसंचालन करून आभार मानले.

३२५ उद्योजकांचा सहभाग
अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो २०१७ प्रदर्शनात औरंगाबादेतील ३२५ उद्योजकांनी सहभाग नोंदविला. इंजिनीअरिंग, ऑटोमोबाइल, फार्मा, कृषी, अन्न प्रक्रिया आदी गटांत उद्योगांची विभागणी करण्यात आली होती. मसिआतर्फे दर तीन वर्षांनी हे प्रदर्शन भरविण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरोग्य’च्या परीक्षेत गोंधळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आरोग्य विभागातर्फे रविवारी ‘वर्ग-३’मधील विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत नियोजनाचा गोंधळ समोर आला. पेपर सुटल्यानंतर काही केंद्रावर प्रश्नपत्रिका परत देण्यात आल्या, तर काही ठिकाणी त्या देण्यात टाळाटाळ करण्यात आली. त्यावरून परीक्षा केंद्रावर विद्यार्थी आणि आरोग्य विभाग प्रशासन यांच्यात वादावादी झाली. विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत, विभागाच्या कारभारावर टिका केली. औरंगाबादमध्ये ३७ सेंटरवरून परीक्षा घेण्यात आली.
शहरातील विविध कॉलेजच्या सेंटरवरून पहिल्या टप्प्यात सकाळी ११ ते दुपारी १ यादरम्यान परीक्षा घेण्यात आली. दुपारच्या टप्प्यात ३ ते ५ वेळेत परीक्षा झाली. सकाळच्या टप्प्यात आरोग्य विभागामध्येच परीक्षेबाबत एकवाक्यता नसल्याने काहीसा गोंधळ उडाला. सीएसएमएसएस कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा संपल्यानंतर प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आली नाही. इतर केंद्रावर प्रश्नपत्रिका मिळाली, या केंद्रावर मिळत नसल्याचे कळताच विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. यावेळी प्रशासनाच्या कारभाराचा निषेधार्थ विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांचा रोष वाढत असल्याने आरोग्य विभागाचे अधिकारी परीक्षा केंद्रावर दाखल झाले. तासभर गोंधळानंतर अखेर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. त्यासह ‘ओएमआर’पद्धतीने परीक्षा का घेण्यात आली नाही, असा प्रश्नही परीक्षार्थींनी उपस्थित केला.

सूचनांमध्ये तफावत
आरोग्य विभागातीलच समन्वयाच्या अभावामुळे हा गोंधळ उडाल्याचे बोलले जात आहे. प्रारंभी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना न देण्याच्या सूचना होत्या. त्यात काही केंद्रावर प्रश्नपत्रिका देण्याच्या सूचना होत्या. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना हॉलतिकीटसोबत देण्यात आलेल्या सूचनापत्रात १३व्या क्रमांकावर परीक्षा संपल्यानंतर प्रश्नपत्रिका सोबत घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. असे असतानाही केंद्रावर हा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.

सुरुवातीला आम्हाला प्रश्नपत्रिका न देण्याच्या सूचना होत्या. त्यामुळे हा प्रकार घडला. आम्हाला पुन्हा सुचना आल्यानंतर लगेच विद्यार्थ्यांना त्या परत करण्यात आल्या. परीक्षा सुरळीत पार पडल्या.
- विजय कंदेवाड, उपसांचालक, आरोग्य विभाग.

प्रश्नपत्रिका देण्याचा उल्लेख सूचनापत्रावर आहेत. अशावेळी प्रश्नपत्रिका दिल्या जात नव्हत्या. त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. खरेतर, स्पर्धा परीक्षांप्रमाणे ‘ओएमआर’ पद्धतीने ही परीक्षा घेणे आवश्यक होते.
- ज्ञानेश्वर हर्षे, परीक्षार्थी.

आमच्या केंद्रावर परीक्षार्थींना प्रश्नपत्रिका परत दिली जात नव्हती. आम्ही काय उत्तरे सोडविली. त्याबाबत आम्हाला माहिती हवी. त्यासाठी आमची मागणी होती की प्रश्नपत्रिका द्यावी. सर्व विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केल्यानंतर त्यांनी प्रश्नपत्रिका दिली.
- आकाश परिवाले, परीक्षक.

एकूण रिक्त पदे ः २३८
परीक्षार्थी ः १३ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेतू सुविधा केंद्रात १५ स्वाइप मशीन

0
0

औरंगाबाद : जिल्हा प्रशासनातर्फे नोटाबंदी झाल्यानंतर नागरिकांना कॅशलेस व्यवहार करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सेतू सुविधा केंद्रातही १५ स्वाइप मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सेतूमध्ये रहिवासी, उत्पन्न, वय-अधिवास-राष्ट्रीयत्व, नॉन क्रिमिलेअर, जात प्रमाणपत्र, रेशनकार्डसाठी अर्ज आदी विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी मोठी गर्दी होते. अनेकदा सुट्या पैशांवरून काउंटरवरील कर्मचाऱ्यांसोबत वाद होतात. आता कॅशलेस उपक्रमाअंतर्गत स्वाइप मशीन उपलब्ध करून देण्यात आल्याने ही अडचण दूर होणार आहे, मात्र नागरिकांमध्ये अजूनही रोखीने व्यवहार करण्याची सवय असल्याने; तसेच प्रमाणपत्रासाठीचे शुल्क हे शंभर रुपयांपेक्षा कमी असल्याने नागरिकांकडून रोखीनेच व्यवहाराला पसंती दिली जात आहे. सेतू सुविधा केंद्रात २५ काउंटर असून, यापैकी १५ काउंटरवर रोखीने व्यवहार होतात. या सर्व १५ काउंटरवर प्रत्येकी एक स्वाइप मशीन देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेतमालाच्या विक्रीकडे लक्ष द्या’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कृषी उद्योग आपल्याकडे बाजारपेठेशी निगडित नाहीत. ग्राहकांना दर्जेदार आणि माफक दरात कृषिउत्पादने मिळत नाहीत, त्याचवेळी शेतकऱ्यांनाही भाव मिळत नाही. याकरिता विक्री व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष दिले जाणे आवश्यक आहे. आपल्या राज्यात फळे, फुले, भाजीपाला मोठ्या प्रमाणावर पिकतो परंतु ते योग्य दर्जात आणि वेळेत ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी शास्त्रोक्त मूल्यवर्धन साखळी निर्माण व्हायला हवी, अशी अपेक्षा माजी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी रविवारी येथे व्यक्त केली.

मासिआतर्फे आयोजित अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो २०१७ प्रदर्शनात रविवारी कृषी व अन्नप्रक्रिया उद्योगावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी दांगट बोलत होते. याप्रसंगी आमदार सतीश चव्हाण, महाराष्ट्र बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. मराठे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड, नाथ ग्रुपचे चंद्रशेखर पाठक आदी उपस्थित होते. आमदार चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या आणि त्या सोडविण्याकरिता प्रयत्नांची गरज व्यक्त केली. श्री. मराठे यांनी शासन आणि बँकांमार्फत कृषी क्षेत्राला देण्यात येणारे प्राधान्य आणि विविध योजनांची माहिती दिली.
दांगट म्हणाले, की कृषी क्षेत्रामधील सततचे चढउतार आणि अस्थिरता संपवायची असेल, तर प्रत्येकाने आपल्या मनात कृषी क्षेत्राची नवीन व्याख्या बिंबविले पाहिजे. उत्पादन, प्रक्रिया, मार्केटिंग, प्रत्यक्ष विक्री अशा सर्वंकष प्रक्रियेचा आता ‘कृषी’ या एका शब्दात अंतर्भाव अत्यावश्यक आहे. या साऱ्या प्रक्रियेमध्ये अमर्याद शक्यता, मोठा वाव आणि असंख्य संधी आहेत, हे समजून घ्यायला हवे. कृषीमालाच्या निर्यातीलाही मोठी संधी आहे. अन्न सुरक्षा या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.विनय ओसवाल यांनी फळ, भाजीपाला निर्यातीसंदर्भात माहिती दिली. देशामधील अन्न प्रक्रिया उद्योग हा १५ टक्के वेगेने वाढतो आहे.

या वेगाचा, मागणीचा लाभ मिळविण्याकरिता प्रक्रिया उद्योग सुरू करून त्यामार्फत चांगली, दर्जेदार उत्पादने वाजवी दारात ग्राहकांपर्यंत पोचवा, असा सल्ला त्यांनी दिला. प्रवीण मसालेचे आनंद चोरडिया यांनी ग्राहकांची बदलली गरज आणि त्यांच्या समस्या यांचा विचार करण्याची, बदलत्या जीवनशैलीचा अभ्यास करून त्याला अनुसरून उत्पादने तयार करण्याची गरज व्यक्त केली.

फळशेतीला वाव

नाशिक येथील सह्याद्री अॅग्रोचे विलास शिंदे यांनी त्यांच्या कंपनीमार्फत जगभरात होणाऱ्या निर्यातीसंदर्भात आणि अगदी लहान प्रमाणात सुरवात करून आज हजारो टन फळे, भाज्या निर्यातीचा प्रवास कथन केले. मराठवाड्यामध्ये फळशेतीला मोठा वाव आहे, असे डॉ. दांगट यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images