Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

...कुणब्याच्या पोरा आता लढायला श‌िक!

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘लाजरेपणा बुजरेपणा बाजारात इक
घेऊ नको फाशी बाबा खाऊ नको इख
मागं मागं नको पुढं सरायला श‌िक
कुणब्याच्या पोरा आता लढायला श‌िक’
कविवर्य इंद्रजित भालेरावांचा हा आशावाद शुक्रवारी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ४९ मुलांनी आपल्या पथनाट्यातील संदेशातून पेरला. तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणवाले.
राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे शिक्षण व संगोपन करणाऱ्या आधारतीर्थ आश्रम संस्थेच्या चिमुकल्यांनी आज शहरातील आकाशवाणी चौक तसेच शहागंज येथे पथनाट्य सादर करून आत्महत्या न करण्याचा संदेश दिला.
शहागंजमध्ये अनेक शेतकरी शेतीअवजारे खरेदी करण्यासाठी येतात. त्यामुळे येथे हे पथनाट्य सादर करण्यात आले. आमच्या शेतकरी बापाने आत्महत्या केली. मात्र, तुम्ही कितीही कर्ज असले तरी आत्महत्या करू नका असा संदेश व शपथ दिली. यावर्षी आतापर्यंत ७ जिल्हे व २६ तालुक्यात पथनाट्याद्वारे संदेश दिला असल्याचे संस्थेचे त्र्यंबक गायकवाड यांनी सांगितले. आकाशवाणी चौक परिसरामध्ये पथनाट्य सुरू असताना त्याच भागात मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू होती. यावेळी पदाधिकाऱ्यांनी सर्व मुला मुलींच्या जेवणाची सोय केली तसेच त्यांना नवीन कपडे, औषधी घेऊन दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१८ जानेवारीपर्यंत पदभार घेऊ नये

0
0

औरंगाबाद : राज्य वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा न्यायिक सेवा प्राधिकरणाचे सचिव ए. आर. कुरेशी यांच्या नियुक्तीला वक्फ बोर्डाचे सदस्य व आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात अाव्हान दिले.
खंडपीठाचे न्या. विद्याधर कानडे व न्या. संगीतराव पाटील यांनी १८ जानेवारीपर्यंत सीईओपदाचा पदभार न्यायाधीश कुरेशी यांना स्वीकारता येणार नाही, असे आदेश दिले. कुरेशी यांच्या निवडीचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागाचे सचिव श्याम तागडे यांनी ३ जानेवारी रोजी काढले होते.
विशेष म्हणजे नोव्हेंबर २०१६ रोजी बोर्ड बैठकीत एक निर्णय मंजूर करण्यात आला की, सीईओपदावर वक्फ कायदा २००३ नियम कलम २५नुसार न्यायालयीन सेवेतील व्यक्तीची नेमणूक करता येत नाही. याची माहिती बोर्डाने शासनालाही दिली होती. तरीसुद्धा अल्पसंख्याक विभागाने न्यायालयीन सेवेतील व्यक्तीला नेमणूक दिली. यामुळे पुन्हा शासनासमोर वक्फ बोर्डाच्या सीईओच्या निवडीबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे. याचिकेत शासनालाही प्रतिवादी केले आहे. जानी यांची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. जे. दीक्षितहे मांडत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचा सेनेला हाबाडा

0
0


चंदन लक्कडहार, पैठण
पैठण नगरपालिकेत शिवसेनेला एकाकी पाडण्यासाठी भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत महायुती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नगरपालिकेत सर्वात मोठा पक्ष असतानाही शिवसेनेला स्वीकृत सदस्य व उपनगराध्यक्ष पदाला मुकावे लागेल.
नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष व दोन स्वीकृत सदस्य निवडण्याकरिता १७ जानेवारीला विशेष सभा बोलविण्यात आली आहे. नगरपालिकेचे पक्षीय बलाबल पाहता शिवसेना सर्वात मोठा पक्ष असून शिवसेनेचे सात नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादीचे सहा, तर भाजप व काँग्रेस पक्षाचे अनुक्रमे पाच व चार नगरसेवक निवडून आले आहेत. पालिका सभागृहातील सदस्य संख्या विचारात घेतल्यास शिवसेनेचा एक व अन्य दोन पक्षाची आघाडी झाल्यास त्यांचा एक असे दोन स्वीकृत सदस्य निवडून येण्याची शक्यता आहे.
मात्र, संत एकनाथ साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती व नगर पालिकेच्या निवडुकीदरम्यान शिवसेना व भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये निर्माण झालेली कटुता व दुराव्यामुळे, भाजपने ने नगरपालिकेच्या सभागृहात शिवसेनेला एकाकी पडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी व अपक्षाला सोबत घेऊन महाआघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. महाआघाडीत भाजप, काँग्रेस पक्षाला उपनगराध्यक्ष पद देणार असून भाजप व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य असणार आहे. तिन्ही पक्षांना हा फॉर्म्युला मंजूर झाला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

आम्ही कोणत्याही स्थानिक निवडणुकीत यापुढे शिवसेनेसोबत युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. पैठण नगरपालिकेत सत्ता असताना शहराचा संपूर्ण बट्ट्याबोळ करणाऱ्या शिवसेनेला नगरपरिषदेच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत महाआघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. - तुषार शिसोदे, तालुकाध्यक्ष, भाजप

पैठण नगरपालिकेत सत्तेत असताना हुकुमशाही पद्धतीने व मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणाऱ्या शिवसेनेला पैठण नगर पालिकेत एकाकी पाडण्यासाठी आम्ही भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत महाआघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाआघाडीच्या काँग्रेस पक्षाचा उपनगराध्यक्ष असणार आहे. - विनोद तांबे, काँग्रेस नेते, जिप सभापती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचोड गटात भुमरेंविरुद्ध तांबे

0
0


म. टा. प्रतिनिधी, पैठण
जिल्हा परिषदेचा पाचोड गट खुल्या संवर्गास सुटला आहे. या ठिकाणी विद्यमान आमदार संदीपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे व विद्यमान जिल्हापरिषद सभापती विनोद तांबे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
मागच्या वीस वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत तालुक्याने नेहमीच शिवसेनेला नेहमीच साथ दिली आहे. २००९ ची विधानसभा निवडणूक वगळता मागच्या पंचवीस वर्षांपासून पैठणमध्ये शिवसेनेचा आमदार निवडून येत आहे. पाचोड हे आमदार संदीपान भुमरे यांचे गाव असल्याने २००९ च्याही निवडणुकीत पाचोड व परिसरातील गावांनी शिवसेनेलाच साथ दिली. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार भुमरे यांचे चिरंजीव तथा माजी पंचायत समिती सभापती विलास भुमरे हे पाचोड गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र, विद्यमान जीप सभापती विनोद तांबे यांचा परंपरागत विहामांडवा गट ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाला. त्यामुळे तांबे यांच्यासारख्या तुल्यबळ उमेदवाराने पाचोड गटातून काँग्रेसकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी स्थानिक निवडणुकीत आमदार भुमरे यांना पाचोड गट व गणातून विरोधी पक्षाकडून कधीच आव्हान न मिळाल्याने या रणधुमाळीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर एकतर्फी विडा उचलू; शिवसेनेचा भाजपला इशारा

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाबरोबर युती करण्याची शिवसेनेची इच्छा आहे, पण त्यांनी युतीची बोलणी शेवटपर्यंत लांबवली, तर आम्हाला नाइलाजाने सर्व जागांवर उमेदवार जाहीर करावे लागतील,’ असा इशारा शिवसेना संपर्कनेते विनोद घोसाळकर यांनी दिला.
झेडपी व महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिवसेना-भाजपची युती होणार की नाही, या बद्दल चर्चा सुरू आहे. औरंगाबाद, जालना जिल्ह्यांसाठी घोसाळकर शिवसेनेचे संपर्कनेते आहेत. निवडणुकीच्या तयारी संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘युतीसाठी शिवसेना उत्सुक आहे. मात्र, यापूर्वीच्या फॉर्म्युल्यावर आम्ही ठाम आहोत. यापूर्वी शिवसेनेने औरंगाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या छत्तीस जागा लढवल्या. भाजपला चोवीस जागा दिल्या. जागा वाटपाचे प्रमाण हेच रहावे, अशी आमची भूमिका आहे. शिवसेनेचे अठरा, तर भाजपचे सात सदस्य निवडून आले होते. यंदा दोन गट वाढले आहेत. दोन्हीही पक्षांसाठी जागा वाटपात पूर्वीचेच प्रमाण कायम ठेवून वाढलेल्या दोन जागांच्या संदर्भात स्वतंत्र विचार करावा अशी आमची भूमिका आहे.
वाढलेल्या दोन गटांमध्ये राजकीय वातावरण कोणत्या पक्षाला अनुकूल आहे याचा विचार करून त्याचे वाटप करावे लागेल. ज्या गट आणि गणामध्ये भाजपची ताकद नाही ते गट आणि गण भाजपला सोडून कसे चालेल ?’ असा प्रश्नही घोसाळकर यांनी उपस्थित केला.

मंगळवारी मेळावा
‘जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद व जालना जिल्ह्याचा शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांचा मेळावा मंगळवारी, १७ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याला उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित राहणार आहेत. अनेक बाबी यावेळी स्पष्ट होतील,’ असे घोसाळकर म्हणाले.

युती संदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय व्हावा, असे शिवसेनेने ठरविले आहे. त्यानुसार एक बैठक झाली आहे. भाजपने शेवटपर्यंत युतीची बोलणी लांबवली, तर आम्हाला आमची तयारी करावीच लागेल, आम्ही सर्व जागा जाहीर करू.- विनोद घोसाळकर, संपर्कनेते, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पं.स.मध्ये दहा वर्षांपासून महिलाराज

0
0


विजय चौधरी , खुलताबाद
खुलताबाद पंचायत समितीमध्ये गेल्या दहा वर्षांपासून महिलाराज आहे. यंदाही पंचायत समिती सभापतिपद सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित झाल्यामुळे अनेक इच्छुक पुरुष पुढाऱ्यांचे ‘सभापती’ होण्याचे स्वप्न भंगले आहे.
यंदा पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षणाबाबत सर्वांना उत्सुकता होती. सभापती होण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून ठेवले होते. मात्र, सभापतीपद आरक्षण सोडतीत सर्वसाधारण महिलासाठी राखीव झाल्यामुळे अनेकांची अडचण झाली आहे. मात्र, काहींनी आपल्या सौभाग्यवतीला उमेदवारी मिळावी म्हणून फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
खुलताबाद पंचायत समितीची स्थापना १९६३ मध्ये झाली. पहिले पंचायत समिती सभापती होण्याचा मान बाजारसावंगी येथील गवनाजी नलावडे यांनी भूषविला. गेल्या ५४ वर्षांत २० सभापतींनी कारभार पाहिला. यामध्ये सात महिलांचा समावेश आहे.
पंचायत समितीचा गदाना गण सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्यामुळे या गणातून निवडून आलेली महिला सभापती पदाची दावेदार राहणार असल्यामुळे तालुक्यातील मातब्बरांनी गदाना गणातून निवडणूक लढविण्याची तयारी चालविली आहे. या गणातून गेल्यावेळेस शिवसेनेचे कृष्णा कुकलारे यांनी पंचायत समिती सदस्य, तर कॉँग्रेसच्या उज्वला अनिल श्रीखंडे यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रतिनिधीत्व केले आहे. हा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव निघाल्याने राजू वरकड हे आपल्या सौभाग्यवतींना निवडणूक रिंगणात उतरवू शकतात.

...असे आहेत सभापती
२१ एप्रिल ९४ ते १० मे ९५ चंद्रकला उबाळे
११ मे ९५ ते ८ फेब्रुवारी ९६ डॉ. सरला पाटणी
१४ मार्च ९८ ते ११ मार्च ९९ हिराबाई राठोड
१४ मार्च ०७ ते २७ नोव्हेंबर ०९ आशाबाई नलावडे
२७ नोव्हेंबर ०९ ते १४ मार्च १२ ताराबाई कुकलारे
१४ मार्च १२ ते १३ सप्टेंबर १४ लीलाबाई पवार
१४ सप्टेंबर २०१४ ते आजपर्यंत फरजाना पटेल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच वर्षांत पाहिले चार सीईओ

0
0


औरंगाबाद : जिल्हा परिषदेत विद्यमान सभागृहाने पाच वर्षांत चार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कार्यपद्धती अनुभवली. यांच्यासोबत काम करताना सदस्यांना बरेच अनुभव आले.
सभागृहाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावयाची की नाही याचे अंतिम अधिकार सीइओंना असतात. विद्यमान सभागृह मार्च २०१२ मध्ये अस्तित्वात आले. त्यापूर्वी म्हणजे १६ डिसेंबर २०११ रोजी सुखदेव बनकर सीइओ म्हणून रुजू झाले. ते २१ ऑक्टोबर २०१३ पर्यंत कार्यरत होते. बनकरांच्या काळात सदस्य आणि प्रशासन यांच्यात एक सुसंवाद निर्माण झाला होता. त्यानंतर २१ ऑक्टोबर २०१३ ते १५ जानेवारी २०१५ या काळात दीपक चौधरी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाले. श्री. बनकर यांच्यानंतर चौधरींचा काळही सदस्यांसाठी ‘अच्छे दिन’ वाला होता. एक चौधरी गेले आणि त्यांच्या जागेवर डॉ. अभिजित चौधरी रुजू झाले. १५ जानेवारी १५ ते २८ जून १६ पर्यंत ते कार्यरत होते. त्यांची भंडारा जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाली आणि त्यांच्या जागेवर मधुकरराजे अर्दड रुजू झाले.

कामे रोखून धरली
अर्दड यांनी झेडपी सीइओ म्हणून काम करताना वेगळी ओळख निर्माण केली. मुदत संपताना विकास कामे मार्गी लावण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी हरेक प्रयत्न केले, पण अर्दड यांनी नियम डावलून आलेली कामे रोखून धरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनजागरणाच्या बाणातून ‘संघा’चा तीर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गावपातळीवर झालेला विस्तार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडणार आहे. संघ सध्या प्रचार करत नाही, पण प्रत्येक गावात शंभर टक्के मतदान करा म्हणत सक्रिय झाला आहे.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही ‘मतदान कर्तव्य आहे’ ही भूमिका घेऊन संघ जनजागरणासाठी उतरला होता. संघाशी निगडित संस्थांचे पदाधिकारी भारतीय जनता पक्षाशीही संबंधित आहेत. यामुळे काही ठिकाणी सरळसरळ तर काही ठिकाणी अप्रत्यक्षपणे संघ व स्वयंसेवक या निवडणुकीत उतरल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. काही ठिकाणी सरळसरळ उघड प्रचारही केला जात आहे. भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय विकास परिषद, ग्रामसेवा मंडळ, यासह काही एनजीओशी संघ निगडित आहे. ही जवळीकता शहरापेक्षा ग्रामपातळीवर अधिक आहे. वैजापूर, गंगापूर, सोयगाव, सिल्लोड, पैठण यासह काही तालुक्यात संघाच्या शाखा रोज भरतात. याशिवाय या तालुक्यांतील काही गावांमध्येही शाखाविस्तार झालेला आहे. या शाखेत येणारे किंवा गावातील अनेक स्वयंसेवक भारतीय जनता पक्ष आणि तत्सम संघटना-संस्थाचे पदाधिकारी आहेत. यंदा मागील महिन्यात राज्यात झालेल्या विविध ठिकाणच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या भरघोस यशाचे दाखले गावागावांत देणे संघातर्फे सुरू झाले आहे.

संघ शंभर टक्के मतदान करा, यावर भर देणारा आहे, लोकशाही बळकटीसाठी ते किती महत्त्वाचे आहे हे पटवून देणारी भूमिका संघ मांडतो. आता संघातील स्वयंसेवक हे भारतीय जनता पक्ष किंवा संलग्न संस्थांशी निगडित आहेत, हे काही नव्याने सांगायला नको. - वामनराव देशपांडे, प्रांत प्रचारक, देवगिरी प्रांत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घोटाळेबाज अधिकाऱ्यांवर फौजदारीचा इशारा

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘टीडीआरच्या चार प्रकरणात एकच मालमत्ताधारक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार देत गुन्हा दाखल केला. आता टीडीआर मंजुरीसंदर्भात विशिष्ट अधिकाऱ्यांनी ठरवून स्वाक्षरी केली असेल व स्वाक्षरी करणारे तेच ते अधिकारी आहेत असे लक्षात आले, तर त्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करू,’ असा इशारा महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी शनिवारी दिला.
बोगस टीडीआरची काही प्रकरणे उघडकीस आली आहेत. या प्रकरणांमध्ये महापालिकेने फक्त मालमत्ताधारकावरच गुन्हा दाखल केला आहे, अधिकारी - कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारची कारवाई केली नाही, असे पत्रकारांनी ओम प्रकाश बकोरिया यांना विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘टीडीआरची जी प्रकरणे उघडकीस आली आहेत, त्या सर्व प्रकरणांत एक व्यक्ती मालमत्ताधारक आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार देत गुन्हा दाखल केला आहे.
टीडीआरची अशी आणखी दोन प्रकरणे हातावर आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. या सर्व प्रकरणात टीडीआर मंजूर करणारे अधिकारी - कर्मचारी तेच ते आहेत का, याची तपासणी केली जाणार आहे. तेच ते अधिकारी - कर्मचारी या सर्व प्रकरणात असतील, तर त्यांच्या विरुद्धही फौजदारी स्वरुपाची कारवाई केली जाईल.’

पानझडेंची विभागीय चौकशी होणार
‘हर्सूल तलावाचे गाळ प्रकरण व २४ कोटींच्या रस्त्यांचे प्रकरण यात निलंबित शहर अभियंता सखाराम पानझडे यांची महापालिका स्तरावरची चौकशी अंतिम टप्प्यात आली आहे. विभागीय चौकशीसाठी सर्वसाधारण सभेची मान्यता मिळणे गरजेचे आहे. ही मान्यता मिळाल्यावर त्यांची विभागीय चौकशी देखील केली जाणार आहे,’ असे बकोरिया यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावी परीक्षेला सामोरे जाताना

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दहावीची परीक्षा! वर्षभर तयारी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना आता या परीक्षेचे वेध लागले आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स'सुद्धा त्यांच्या मदतीसाठी सरसावला आहे. दहावीचे पेपर नेमके कसे सोडवावेत, प्राधान्य कोणत्या गोष्टींना द्यावे, उत्तरांची रचना कशी असावी याविषयी तज्ज्ञ शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
सिडको भागातील विद्यार्थ्यांसाठी एन-७ येथील मुकुल मंदिराच्या सभागृहात येत्या १८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांसाठी खुल्या असलेल्या या कार्यक्रमात तज्ज्ञ शिक्षक गणित, इंग्रजी आणि विज्ञान या विषयांचे पेपर कसे सोडवावेत, याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रश्नोत्तरांचे सत्रही होणार आहे. विद्यार्थ्यांनी येताना सोबत वही व पेन आणावा आणि आपल्या शंका कोणत्याही भाषेत निर्धास्तपणे तज्ज्ञांना विचारून त्यांचे निरसन करून घ्यावे. उर्वरित शहरातील विद्यार्थ्यांसाठीही असे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्यांची माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाजी ब्रिगेडतर्फे जाधव यांना उमेदवारी

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी संभाजी ब्रिगेडने संजय जाधव यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान राजकीय पक्षांवर सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास राहिलेला नाही. त्याला शिक्षकही अपवाद नाहीत. शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संभाजी ब्रिगेडने संपूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला असून मराठवाडाभर आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे,’ अशी माहिती प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी शनिवारी पत्रकारांनी दिली.
भानुसे म्हणाले, ‘संभाजी ब्रिगेडचे राजकीय लाँचिंग ३० नोव्हेंबर रोज मुंबईत झाले. त्यानंतर सर्व निवडणुका लढविण्याचा निर्णय आम्ही घेतला. मराठवाडा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे, सरचिटणीस सौरभ खेडेकर, कोषाध्यक्ष संतोष गाजरे यांच्या प्रमुख उपस्थितीत औरंगाबादेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यात संजय जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अधिवेशन २०१५ मध्ये सांगली येथे झाले होते. तिथे संघटना राजकीय प्रवेश करणार, असे ठरले होते. तेव्हापासून प्रयत्न सुरू होते. त्याला आता निवडणूक आयोगाची रितसर मान्यता मिळाली आहे. आजवर संभाज ब्रिगेडने सामाजिक संघटनेच्या माध्यमातून समाजहित, देशहिताचे अनेक प्रश्न मार्गी लावले. त्याचे पुढचे पाऊल टाकत आता राजकीय वाटचाल सुरू करत आहोत. मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून संजय जाधव यांच्या उमेदवारीस पाठिंबा मिळत आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रदेश कोषाध्यक्ष संतोष गाजरे, जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, राहुल बनसोड, महानगर अध्यक्ष सचिन मगर, बाबासाहेब दाभाडे, अनिल हिरडे, संजय सोमवंशी, आजिनाथ गाडेकर, रविंद्र बोचरे, सचिन हारणे आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी
संजय जाधव राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्याबद्दल विचारले असता जाधव म्हणाले,‘मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रितसर राजीनामा दिला आहे. या निवडणुकीत शिक्षक संघटनेने नाव कुठेही वापरणार नाही. निवडणूक संपल्यानंतर संघटनेचे नाव बदलण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साबळे खूनप्रकरणी चौघांची चौकशी सुरू

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मार्केटिंग प्रतिनिधी अमोल साबळेच्या (रा. ब्रिजवाडी) खूनप्रकरणी चार संशयितांची पोलिस कसून चौकशी करत आहेत. यातील तिघांना शुक्रवारी मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले, तर एकास शनिवारी अहमदनगर जिल्ह्यातून ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
आर्थिक देवाणघेवाणीवरून, व्यावसायिक हेव्यादाव्यावरून हा खून झाला असावा, अशी शक्यता व्यक्त होत असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मृत अमोल यांचा भाऊ राहुल साबळेच्या फिर्यादीवरून अंबादास गुजर (रा. खंडा, ता. पैठण), अमोल कदम, काकडे (पूर्ण नाव माहित नाही) व अरविंद पितळे या चारजणांविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोलचा त्याच्या कारमध्ये कटरच्या सहाय्याने गळा कापून खून करण्यात आला. त्यानंतर त्याचा मृतदेह साईबाबा मंदिरा मागील परिसरातून जाणाऱ्या रेल्वेरुळावर टाकण्यात आला होता. त्यावरून रेल्वे गेल्याने तो छिन्नविछिन्न झाला होता. शुक्रवारी सकाळी खुनाचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिस अधीक्षक नविनचंद्र रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक उज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सुनील लांजेवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कांचनकुमार चाटे, चतुर्भूज काकडे, सहायक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले तपास करत आहेत. शनिवारी रात्री उशिरापर्यंत ताब्यात असलेल्या चारही संशयितांची कसून चौकशी सुरू होती.

शेगावमधून एकास अटक
अमोल याच्या नातेवाईकांनी त्याच्या काही मित्रांवर संशय व्यक्त केला आहे. त्यावरून पोलिसांनी तीन संशयितांना शुक्रवारी रात्रीच पकडले. घटनेपासून पसार असलेल्या एका संशयितास अहमदनगर जिल्ह्यातील शेगाव येथून शनिवारी ताब्यात घेण्यात आले आहे.

चार पथकांची स्थापना
अमोलच्या खुनाचा छडा लावण्यासाठी खास चार पथक स्थापन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. साबळे हा पूर्वी एका मित्रासोबत चीट फंडचा व्यवसाय करत होता. त्यानंतर त्याने आयुर्वेदिक औषधाच्या कंपनीचे मार्केटिंगचे काम सुरू केले, अशी माहिती समोर येत असून संबंधित कंपनीकडून आवश्यक माहिती घेण्यात येणार आहे. घटनास्थळी सापडलेले अमोलचे मोबाइल, डायरी पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्याआधारे काही धागेदोरे हाती लागतात का, याचा तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नर्सवर बलात्कार, पीएसआयवर गुन्हा दाखल

0
0


औरंगाबादः परिचारिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी नगर येथील पोलिस उपनिरीक्षक पुंडलिक पावशेवर बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा नंदुरबार पोलिसांकडे वर्ग केला आहे.
पीडिता शासकीय हॉस्पिटलमध्ये काम करते, तर संशयित पावशे पीडितेच्या मैत्रिणीचा नवरा आहे. पीडिता मैत्रिणीसह शिर्डी दर्शनाला गेली असता २०१५ मध्ये पावशेसोबत ओळख झाली. पुढे त्याने सोशल मीडिया व मोबाइलद्वारे संपर्क वाढविण्याचा प्रयत्न केला. पीडिता नंदुरबार येथे कामास असताना १२ जून २०१५ रोजी पावशे कामाचे निमित्तकरून घरी आला. घरात अन्य कुणी नसल्याची संधी साधत त्याने अत्याचार केल्याचे पीडिताने तक्रारीत नमूद केले आहे. त्यानंतर धमकी देत तर लग्न करू असे आमिष दाखवत त्याने वारंवार अत्याचार केला. त्यातून गर्भ राहिल्याने त्याने गर्भपात करायला भाग पाडल्याचेही पीडिताने नमूद केले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सलीम शेख यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोटो हटवून गांधीजींचे महत्त्व कमी होत नाही

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
खादीच्या प्रचारासाठी केंद्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या प्रचारकीय साहित्यात चरख्यामागे असलेला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला. याबद्दल देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. खादी आणि गांधी हे समीकरण स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाला माहित आहे. केवळ सत्ता मिळाली म्हणून त्याचा दुरुपयोग करत गांधीजींचा फोटो हटविल्याने गांधींजींचे महत्व अजिबात कमी होत नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया विचारवंतांनी व्यक्त केल्या.

गांधींच्या तिरस्काराचा हा प्रकार
खादीच्या प्रसार आणि प्रचारासाठी महात्मा गांधी यांचे मोठे योगदान आहे. स्वदेशी व देशातील गरिबातील गरीब यांचे नाते दृढ होण्यासाठी खादी फार महत्त्वाचा दुवा आहे, हे अर्थशास्त्र गांधीजींना कळले होते व म्हणूनच ते खादीची वस्त्रे वापराचा प्रचार करीत. दुर्दैवाने आजच्या सरकारला याचा विसर पडलेला दिसतो आहे. एकतर ज्या पक्षाचे सरकार आज केंद्रात व राज्यात आहे, त्याला गांधी तत्वज्ञान व उपक्रम कधीच मान्य नव्हते. केवळ राजकीय अपरिहार्यता म्हणून गांधीजी त्यांना हवे असतात. संघाच्या मुशीतून तयार झालेला भाजप व संघ स्वयंसेवक असलेले मोदी गांधीजींच्या तिरस्कारापोटी त्यांच्या तत्वज्ञानाला व त्यांनी निर्माण केलेल्या संस्थांना मूठमाती देण्याचा प्रयत्न करत आहेत. - प्रा. श्रीराम जाधव, सचिव, सेवाग्राम आश्रम, वर्धा

ते कृत्य वेडेपणाचे
खादीशी गांधीजी इतके जोडले गेले होते की त्यांना हटविणे वेडेपणाचे आहे. नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून प्रसिद्धी मिळतच आहे. त्यासाठी त्यांनी कॅलेंडरवरचा चरख्या सोबतचा गांधीजींचा फोटो काढून टाकून त्याच्या जागी आपला फोटो छापण्याची गरज नव्हती. अर्थात त्यांनी हे केले नसेल, पण जे करण्यात आले त्याबद्दल त्यांनी नापसंती देखील व्यक्त केली नाही. जे काही घडले आहे ते चुकीचेच घडले आहे. खादीच्या प्रचारासाठी सध्याचे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसते, ही बाब खेदजनक आहे. - पन्नालाल सुराणा, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत

यशाचा उन्माद नको
खादी आणि गांधी वैचारिक बंधन आहे. खादी केवळ वस्त्र नाही, तर तो बंधूभावाचा विचार त्यामागे आहे. माझ्या गावातील कोणीही बेकार, उपाशी राहणार नाही. गावातील विणकरांनीच विणलेले वस्त्र घालणार असा व्यापक विचार त्यामागे आहे. खादी एक जीवनप्रणाली आहे. खादीच्या जाहिरातीत गांधीजींचे छायाचित्र असलेच पाहिजे असा अट्टाहास दूर केला पाहिजे. कोणाचेही फोटो वापरले तरी ‘खादी आणि गांधी’ असे समीकरण बदलत नाही. हा प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभणारा नाही. यशाचा उन्माद यायला नको होता. तांत्रिकदृष्ट्या हे योग्य असले तरी त्यापलिकडे लोकभावना असते. खरे तर मोदींनीच अशा प्रकाराला विरोध करायला हवा. व्यक्तीमहात्म्यापेक्षा आपले कार्य लोकांसमोर आणा असा आग्रह त्यांचा असायला हवा. - प्रा. दिनकर बोरीकर, ज्येष्ठ विचारवंत

चांगले माणूस म्हणून राहावे
खादी आणि महात्मा गांधी हे अतूट नाते साऱ्या जगाला माहित आहे. त्यांचा फोटो हटवून कुणाचाही फोटो लावला तरी त्याने गांधीजींचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशाचे प्रमुख म्हणून अभिमान आहे, पण त्यांनी अशा गोष्टी केल्या तर ते मान्य कसे होईल ? त्यांचे सरकार आले म्हणून काहीही करू नये. देशवासीयांमध्ये गांधीजींविषयी असलेला आदर तसूभरही कमी होणार नाही. - प्रताप बोराडे, प्राचार्य

गांधीजींची जागा कुणी घेऊ शकत नाही
खादी आणि गांधीजी हे अतूट नाते आहे. त्यांच्या जागेवर कुणाचाही फोटो लावला तरी महात्मा गांधींचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. पंतप्रधान हे पद मोठे आहे. चरख्याच्या मागे मोदींचा फोटो टाकला. पंतप्रधान हे पद मोठे आहे. त्यांच्या फोटोविषयी अन्य ठिकाणी कुठलाही आक्षेप नाही, पण गांधीजींचा फोटो हटविणे योग्य नाही. त्यातून काय साध्य होणार आहे ? गांधीजींच्या जागी बसण्याचा प्रयत्न कुणी करू नये. - डॉ. अशोक बेलखोडे, सामाजिक कार्यकर्ते

‘तो’ चरखा मोदींचाचः आठवले
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चरखा यावर सध्या जोरात चर्चा सुरू आहे. याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, ‘तो चरखा मोदींचाच आहे. मोदींचे गांधींवर प्रेम आहे. गांधींचे अपूर्ण राहिलेले स्वप्न साकार करण्याचे काम मोदी करीत आहेत. गांधीजींचा चरखा वेगळा आहे व मोदींचा चरखा वेगळा आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्राला दुहेरी मुकुट

0
0

महाराष्ट्राला दुहेरी मुकुट
महिलांची कर्नाटकवर, तर पुरुषांची कोल्हापूरवर मात
राष्ट्रीय खो-खो स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद,
महाराष्ट्र संघाने २७ व्या फेडरेशन चषक राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महिला आणि पुरूषांच्या गटात आपले वर्चस्व सिद्ध करताना दुहेरी मुकुट पटकावला. महिला गटात महाराष्ट्राने कर्नाटक संघाला, तर पुरुष गटात कोल्हापूर संघाला धूळ चारून विजेतेपदावर नाव कोरले.
तुळजाभवानी क्रीडा संकुलातील प्रबोधनकार ठाकरे क्रीडानगरीत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अकरा राज्यांतील सोळा संघ सहभागी झाले होते. महिला गटात महाराष्ट्राने कर्नाटकवर ११-८ अशी तीन गुणांनी मात केली. महाराष्ट्राच्या प्रियांका भोपी, ऐश्वर्या सावंत यांनी भक्कम बचाव केला. महाराष्ट्रातर्फे श्रुती सपकाळने एक, काजल भोरने चार, तर मृणाल कांबळेने तीन गडी बाद केले. कर्नाटकाकडून वीणा, दीक्षा आणि संगीता यांनी कडवी झुंज दिली. महिला गटात दिल्ली व केरळ संघ तिसऱ्या स्थानी राहिले.
पुरुष गटात महाराष्ट्र-कोल्हापूर यांच्यातील अंतिम लढत अखेरच्या डावापर्यंत चुरशीची झाली. या सामन्यात महाराष्ट्राने कोल्हापूर संघाचा १५-१० असा पाच गुणांनी पराभव केला. महाराष्ट्राच्या महेश शिंदे, अक्षय गणपुले आणि दिपेश मोरे यांनी प्रभावी खेळ करून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. कोल्हापूरकडून सागर पोतदार, विजय हजारे आणि सुशील चव्हाण यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पुरुष गटात कर्नाटक व तेलंगण संघ तिसऱ्या स्थानी राहिले.
विजयी संघांना सिनेअभिनेते विजय कदम, रेशीम टिपणीस, स्पर्धेचे आयोजक अनिल खोचरे, आमदार ज्ञानराज चौगुले, भारतीय खो-खो महासंघाचे सुरेश शर्मा, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे डॉ. चंद्रजित जाधव यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. महेश पोतदार आणि रवींद्र केसकर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. चंद्रजित जाधव यांनी आभार मानले.

चौकट
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू
सर्वोत्कृष्ट संरक्षण - सागर पोतदार (कोल्हापूर), वीणा एम. (कर्नाटक).
सर्वोत्कृष्ट आक्रमण - दिपेश मोरे (महाराष्ट्र), काजल भोर (महाराष्ट्र).
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू - महेश शिंदे (महाराष्ट्र), प्रियांका भोपी (महाराष्ट्र).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘खरी लढाई अजूनही सुरूच’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराचा लढा केवळ पाटी बदलण्याचा नव्हता. नामांतराची लढाई समतेचा विचार समोर ठेऊन लढलेली लढाई होती. हा संघर्ष अद्याप संपलेला नसून, वेगळ्या पद्धतीने सुरू ठेवावा लागेल, असा सूर मान्यवरांनी काढला. विद्यापीठातर्फे आयोजित नामविस्तारदिनाच्या कार्यक्रमात मान्यवरांचा आणि शहिदांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मान्यवरांचा आणि शहिदांच्या कुटुंबियांचा विद्यापीठ प्रशासनातर्फे शनिवारी सत्कार करण्यात आला. विद्यापीठातील नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री गंगाधर गाडे उपस्थित होते. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर प्राचार्य राजाराम राठोड, अॅड. रमेशभाई खंडागळे, रतनकुमार पंडागळे, सुभाष लोमटे, स. सो. खंडाळकर, बाबुराव कदम यांच्यासह शहीद गौतम वाघमारे यांचे बंधू शशिकांत, शहीद पोचीराम कांबळे यांच्या पत्नी धोंडाबाई व शहीद जनार्धन मवाडे यांच्या पत्नी ताईबाई, मुलगा डॉ. विवेक यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशासनातर्फे त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.
अॅड. रमेशभाई खंडागळे म्हणाले, ‘जगाच्या इतिहासात नोंद होईल, असा हा सतरा वर्षाचा संघर्ष होता. तुम्ही लढला, तर नक्की जिंकू शकता, हा नामांतर लढ्याचा प्रेरणादायी संदेश आहे.’ रतनकुमार पंडागळे म्हणाले, ‘नामांतर लढ्यात जे शहीद झाले, त्यांच्या कुटुंबीयांबद्दल समाजाने कृतज्ञ राहिले पाहिजे.’ विद्यापीठाच्या उपक्रमाचे कौतुकही त्यांनी केले. तर, नामांतराची लढाई अजून संपली नाही, ती तुम्हा आम्हाला लढावी लागेल असे स. सो. खंडाळकर म्हणाले. बाबुराव कदम म्हणाले, ‘समतेचा विचार समोर ठेवून लढलेली नामांतराची लढाई होती. केवळ, पाटी बदलण्यासाठी ते आंदोलन नव्हते.’ संतोष लोमटे म्हणाले, ‘समतेची ही चळवळ वेगळ्या पद्धतीने सुरू रहायला हवी, ती रेटत राहिली पाहिजे.’ प्राचार्य राजाराम राठोड म्हणाले, ‘नामांतराची चळवळ उच्चवर्णीय, जाती व्यवस्थेच्या विरोधात लढलेला संघर्ष होता. शहीद कुटुंबातील डॉ. विवेक मवाडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या ताफ्यासमोर जीवाची बाजी लावणाऱ्या संगीताबाई, जमुनाबाई गायकवाड या मायलेकी, बीडच्या राहीबाई जावळे व नामांतर लढ्यात पायावर गोळी लागलेले सय्यद गफार यांचाही गौरव करण्यात आला. उपस्थितांनी उभे राहून शहीद व लढ्यातील नेत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. डॉ. प्रतिभा अहिरे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘साहित्यातील मानवतावाद आचरणामध्ये झिरपावा’

0
0



म. टा. प्रतिनिधी, लातूर

साहित्य संमेलने ही उत्सवी, ग्रंथदिंडी पुरती न राहता, ती कृतीशील असावित, अशी सांगत साहित्यातील मानवता, चांगूलपणा प्रत्यक्ष वागणुकीत झिरपला पाहिजे, अशी अपेक्षा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली.
लातूरमध्ये होत असणाऱ्या ३४व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे उद्घाटन अॅड. निकम यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. संमेलनाध्यक्ष डॉ. प्रज्ञा दया पवार उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे होते. व्यासपीठावर अस्मिातादर्शचे प्रणेते, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे, माजी संमेलनाध्यक्ष रवीचंद्र हडसनकर, मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीचे सदस्य रामचंद्र तिरुके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांची उपस्थिती होती.
संयोजन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. माधव गादेकर यांनी संमेलनातील कार्यक्रमाची माहिती आणि संमेलनामागील भूमिका मांडली. स्वागताध्यक्ष जयप्रकाश दगडे यांनी लातूर जिल्ह्यातील दलित साहित्यिक चळवळीचा आढावा घेतला. संमेलानापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्यापासून संमेलन स्थळापर्यंत संविधान रॅली काढण्यात आली. या रॅलीत शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.
उद्‌घाटनपर भाषणात बोलताना अॅड. निकम यांनी खैरलांजी हत्याकांडाच्या खटल्याची आठवण सांगितली. ते म्हणाले, ‘खटला लढवताना युक्तिवाद केला होता, त्यावेळी माणुसकी शिल्लक आहे की नाही, असा उल्लेख केल्याचे सांगितले. आरोपींना फाशीची शिक्षा झाली. मात्र, काही मूठभरांनी या खटल्यात अॅट्रासिटी कायदा का लावला गेला नाही, याची चर्चा केली. त्याचे खूप दु:ख झाले होते. परिवर्तनाची दिशा आणि विचाराची लढाई ही विचारानेच लढावी लागते. साहित्यात व्यक्त झालेला मानवतावाद, संवेदनशीलता ही व्यक्तिगत आचरणात झिरपणे महत्त्वाचे असते.’ अस्मितादर्श साहित्य चळवळीचा आणि डॉ. गंगाधर पानतावणे यांचा गौरव करून, अस्मितादर्श साहित्य हे अक्षरनिष्ठांची मांदियाळी आहे, इतिहास घडविणार साहित्य असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. जनार्दन वाघमारे यांनी अस्मितादर्श या वाङ्मयीन चळवळीमुळेच आपण घडल्याची सांगितले. त्यांनी १९६०च्या काळात मिलिंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दलित नसलेल्या म. भी. चिटणीस यांनी लिखाणासाठी दिलेले प्रोत्साहन, विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड दूर करण्याचे केलेले काम यांचा उल्लेख केला. समीक्षकांनी कोणत्याही वादापेक्षा घटनावाद स्वीकारावा, तोच सर्वांना बरोबर घेऊन जाऊ शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
संमेलनाध्यक्ष डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी त्यांच्या भाषणात काही गोष्टीवर बोलणार नाही असे सांगत त्यांचा उल्लेख मात्र केला. त्यांनी देशातील सामाजिक, आर्थिक, साहित्यिक परिस्थितीचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या, ‘आंबेडकरवाद पुढे नेण्यासाठी त्याला गतिमान करण्यासाठी डोळस चिकित्सेची आवश्यकता आहे. आंबेडकरवादी म्हणून घ्यायचे असेल, तर आता नव्वदच्या दशकातील भाषा बदलावी लागणार आहे. नव्या हत्याराचा वापर केला पाहिजे. आणि नवी पिढी तसे करतीलही.’
संमेलनाच्या स्थळी लावण्यात आलेले प्रदर्शने, ग्रंथाचे स्टॉलच उद्‌घाटन अॅड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते करण्यात आले. स्मरणिका प्रकाशन आणि विविध लेखांच्या पुस्तकाचे प्रकाश या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. कृष्णा किरवले आणि संध्या रंगारी यांना यंदाचे अस्मितादर्श वाङ्मय पुरस्कार या वेळी प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुधीर अनवले आणि डॉ अशोक नारनवरे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आश्रमशाळेमध्ये लैंगिक अत्याचार

0
0


बीड : शिरूर तालुक्यातील सिंदफना आश्रमशाळेत लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले असून देवराव मस्के यांना निलंबित करण्यात आले आहे. लेक लाडकी अभियानाच्या वर्षा देशपांडे यांनी संबंधित यंत्रणेकडे तक्रार केली होती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाळीस कोटींच्या कामाचे बुडबुडे

0
0

Unmesh.Deshpande @timesgroup.com
Tweet : @unmeshdMT

औरंगाबाद: औरंगाबादच्या पाणी योजनेसाठी ४० कोटी रुपये खर्चाच्या जलवाहिनी कामाचे बुडबुडे आता निघू लागले आहेत. हे काम पूर्ण होण्यापूर्वीच संपवल्याने महापालिकेच्या मुख्य लेखा परीक्षकांनी अहवालात ठपका ठेवला असून, शहरातील नागरिकांना या योजनेपासून वंचित ठेवल्याचे ताशेरे ओढले आहेत.

शहरात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (१७ व १८ सप्टेबर २००८) पाणीपुरवठा योजनेसाठी ठोस आर्थिक तरतूद जाहीर करण्यात आली. नक्षत्रवाडीच्या संतुलन टाकीपासून (एमबीआर) शहरापर्यंत ७०० मीलीमीटर व १४०० मीलीमीटर जलवाहिनी टाकण्यासाठी ४० कोटी रुपये, तसेच शहरातील जुन्या जलवाहिन्या बदलण्यासाठी ३० कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार अंदाजपत्रक तयार करून त्याला २० सप्टेबर २००८ च्या सर्वसाधारण सभेत मान्यता घेण्यात आली. त्यानंतर जलवाहिनीच्या कामाला सुरूवात करण्यात आली. याच कामाच्या संदर्भात महापालिकेने २८ ऑगस्ट २०१२ रोजी शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपसचिवांना पत्र पाठवून या योजनेचा आर्थिक आणि भौतिक अहवाल सादर केला. त्यात ८५ टक्के काम पूर्ण झाल्याचा उल्लेख करण्यात आला. पंधरा टक्के काम पूर्ण झालेच नाही, अद्यापही हे काम पूर्ण झाल्याची नोंद पाणीपुरवठा विभागात नाही असे महापालिकेच्याच लेखापरीक्षण अहवालात म्हटले आहे.

मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज यांनी २०१५ - २०१६चा लेखापरीक्षण अहवाल आयुक्तांना नुकताच सादर केला. त्यात नक्षत्रवाडी ते औरंगाबाद शहरापर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले नसल्याचा उल्लेख केला आहे. १५ टक्के काम अद्याप पूर्ण होऊ शकले नाही, याचे कारण स्पष्ट होत नाही असे त्यांनी म्हटले आहे. जलवाहिनीचे काम पूर्ण तर झालेच नाही, पण या कामासाठीचा पैसा अन्य उपक्रमांवर खर्च करण्यात आल्याचा आक्षेपही अहवालात घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सुजल व निर्मल योजनेच्या अनुदानाची स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या बँक खात्यातील ३ कोटी १७ लाख इतर कामांसाठी वापरल्याचा उल्लेख जलवाहिनी टाकण्यासाठीच्या कामाच्या फाइलवरील पान क्रमांक १०५ वर आहे. शासकीय अनुदानाच्या प्राप्त रकमा त्याच कामावर खर्च करणे बंधनकारक असते. असे असताना लेखा विभागाने शासनाच्या परवानगीशिवाय रक्कम बँकेतून काढून ती इतर कामांसाठी वापरली, त्यासाठी सक्षम प्राधिकरणाची मान्यता घेण्यात आली नाही, असा आक्षेपही अहवालात नोंदवण्यात आला आहे.

महाराष्ट्र सुजल व निर्मल योजनेअंतर्गत चाळीस कोटी रुपये खर्च करून नक्षत्रवाडी ते शहरापर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात येणार होते. हे काम ८५ टक्के पूर्ण झाले हे खरे आहे. कंत्राटदाराच्या पेमेंटची फाईल लेखा विभागात आहे. पेमेंट न झाल्यामुळे उर्वरित १५ टक्के काम होऊ शकले नाही. पेमेंटच्या फाईलला लेखा विभागातून मान्यता मिळाल्यावर उर्वरित काम होऊ शकेल. शहरात बल्क वॉटर येण्यासाठी हे काम महत्त्वाचे आहे. - सरताजसिंग चहल, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा, महापालिका.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५६१ मुलांचा घरासाठी शोध!

0
0

ashish.choudhari@timesgroup.com

औरंगाबादः कुटुंबाचे दुष्काळाने मोडलेले कंबरडे, कर्त्या पुरुषाने केलेली आत्महत्या. मराठवाड्याचे हे भीषण दुःख आजही मस्तकावरल्या वाहत्या जखमेसारखे भळभळत आहे. ही जखम कुठल्याही पॅकेजने, घोषणेने भरली नाही. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ५६१ अनाथ मुलांनी शिक्षण, निवाऱ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथील ‘आधारतीर्थ आश्रम’कडे नाविलाजाने आसरा मागितला आहे.

सततचा दुष्काळाने मराठवाड्याच्या भूमीवर केलेली नांगरणी शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. यंदा समाधानकारक पाऊस पडला. मात्र, मागील वर्षापर्यंत चित्र विदारक होते. नापिकी, दुष्काळ त्यात कर्जाचा वाढता डोंगर याला कंटाळून शेकडो शेतकऱ्यांनी जीवन संपवले. कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुला-मुलींचे शिक्षण यात भरडल्या जाणाऱ्या या कुटुंबांच्या भाळी अनाथांचे जगणे. त्यातच या मुलांचे शिक्षण, निवारा यासाठी अनेकांनी आश्रमांकडे धाव घेतली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी त्र्यंबकेश्वर येथे चालविल्या जाणाऱ्या ‘आधारतीर्थ आश्रम’मध्ये या विद्यार्थ्यांनी आसरा मिळविण्यासाठी अनेकांची धडपड सुरू केली आहे. ‘आधारतीर्थ आश्रम’कडे राज्यातील १४७७ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी आहे. त्यात सर्वाधिक मराठवाड्यातील ५६१ विद्यार्थी आहेत. यात आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाकडूनही मुलांच्या शिक्षण आणि निवाऱ्यासाठी आसरा मागितला जातो आहे. वाढती प्रतीक्षायादी, त्यानंतरही कायम होणारी विचारपूस यामुळे ‘आधारतीर्थ आश्रम’ने यादी ठेवणेच बंद केले आहे. कुटुंबातील कर्ता पुरूष गेल्यानंतर मुलांवर शिक्षण आणि संगोपणाचे ओढावलेले हे संकट मराठवाड्यातील वास्तव समोर आणणारे ठरले आहे. शिक्षण व संगोपणासाठी आसरा मागणाऱ्यांमध्ये मराठवाड्यातून बीड जिल्ह्यातून जास्त विचारपूस असल्याचे आश्रमकडून सांगण्यात आले.

आमच्या आश्रमाकडे १४७७ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी आहे. त्यात मोठी संख्या मराठवाड्यातील आहे. मात्र, आमची क्षमता एवढ्या विद्यार्थ्यांना सांभाळण्याची नसल्याने आम्ही प्रतीक्षा यादी केली आहे. ही यादी वाढत असल्याने ती प्रक्रियाच बंद केली. आत्महत्या, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नये असेच आम्हाला वाटते. - त्र्यंबक गायकवाड, आधारतीर्थ आश्रम

बीड आघाडीवर
५६१ मुले मराठवाड्यातील
१५३ मुले बीड जिल्ह्यातील
३१८ एकूण मुले
२४३ एकूण मुली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images