Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मोकळ्या जागांसाठी पालिका सरसावली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिका हद्दीत असलेल्या मोकळ्या जागांवर अतिक्रमण होऊ नये, अनधिकृपणे बांधकामे होऊ नयेत यासाठी पालिका प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. यासंदर्भात धोरण निश्चित करण्यासाठी मंगळवारी पालिकेचा मालमत्ता, नगररचना आणि सिटी सर्व्हे विभागाची एकत्र बैठक मंगळवारी आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी बोलाविली आहे.
महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागांबाबत अनेक ठिकाणी वाद सुरू आहेत. पालिकेकडे बहुतांश जागांचे पीआर कार्ड नाहीत. या जागांचा एकत्र तपशील गोळा करून पुढचे धोरण निश्चित करण्यात येणार आहे. यावर उद्याच्या बैठकीत चर्चा होणार आहे. जुन्या शहराच्या हद्दीत ४२५, सिडकोत ४७५, तर सातारा परिसरात ४७० मोकळ्या जागा आहेत. यापैकी अनेक मोकळ्या जागांची मालकी महापालिकेची असूनही पीआर कार्डवर नाव नाही. या सर्व जागा नावावर करून घेण्यासाठी सिटी सर्व्हेमधील दोन निवृत अधिकाऱ्यांना सोबत घेऊन विशेष मोहीम राबविली जाईल. पीआर कार्डावर पालिकेचे नाव नोंदविल्यानंतर या जागांवर पालिकेच मालकी असलेला फलक लावण्यात येणार आहे. जेणेकरून भविष्यात या जागांवर अतिक्रमण होणार नाही. मंगळवारच्या बैठकीत मोकळ्या जागांबद्दल धोरण निश्चित केले जाईल, असे बकोरिया यांनी स्पष्ट केले.

मार्किंगनंतर निर्णय
चंपा चौक ते जालना रोड रस्ता १०० फुटांचा होणार आहे. रुंदीकरणासाठी ३०० मालमत्ता हटविण्यात येणार आहेत. त्यात अनेकांची घरे जातील, त्यांचे काय, असे विचारल्यानंतर बकोरिया म्हणाले,‘ज्यांची घरे पालिकेच्या नोंदीत असतील त्यांना नियमानुसार टीडीआर, एफएसआय दिला जाईल. ज्यांच्या नोंदीच नाहीत अशांचे पुर्नवसन केले जाईल. पालिकेकडे हर्सूल आणि चिकलठाणा भागात जागा आहे तेथे प्लॉटिंग उपलब्ध करून देऊ. अर्थात मार्किंग झाल्यानंतर पुढे कुणाच्या किती मालमत्ता बाधित होणार आहेत, हे पाहिल्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात येईल.’

मटा भूमिका ः क्रीडांगणे, उद्याने बेपत्ता
महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागांबाबत काही वर्षांपूर्वी सर्वेक्षण झाले होते. त्यात बहुसंख्य जागांवर अतिक्रमणे झाल्याचे उघडकीस आले होते. पालिकेच्या मोकळ्या जागा कुठे आहेत, याची माहिती पालिकेतूनच अतिक्रमणकर्त्यांना दिली जाते आणि या जागांवर बांधकामे झाली की माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांना संरक्षण देण्याची मागणी पुढे येते. त्यामुळे पालिकेने क्रीडांगणे, उद्याने, सभागृहे यांसारख्या सामाजिक उपक्रमांसाठी राखून ठेवलेल्या कित्येक जागा बेपत्ता झाल्या आहेत. आयुक्तांनी त्या ताब्यात घेण्याचे ठरविले, तर नागरिकांना मोकळा श्वास घेता येईल. या जागा सापडताच कुंपण घालून त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवनव्या प्रयोगांची शिक्षण वारी

$
0
0

औरंगाबाद ः तंत्रज्ञानाची मदत घेऊन शिक्षण कसे आनंददायी करता येते, टाकाऊ वस्तूंपासून शैक्षणिक साहित्य, जादूची कांडीद्वारे गणिताचे दिले जाणारे धडे इथपासून ते बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि संपूर्ण सूर्यमाला मोबाइलद्वारे शिकविण्यासाठी शिक्षकांनी तयार केलेले ‘अॅप’ अशा नवनवीन प्रयोगांचा समावेश असलेली ‘शिक्षण वारी’ सोमवारपासून औरंगाबादमध्ये सुरू झाली.
विभागीय क्रीडा संकुलात ‘शिक्षणाची वारी’ उपक्रमास सुरुवात झाली. शिकविण्याच्या पद्धतीत नवीन प्रयोग राबवून शिक्षकांनी शाळेचा कायापालट केला. अशा शिक्षकांच्या वेगवेगळ्या प्रयोगांचे एकत्रित प्रदर्शन शिक्षणाच्या वारीत भरविण्यात आले आहे. शिक्षणाची वारीमध्ये ५२ स्टॉल उभारण्यात आलेले आहेत. त्यात ज्ञानरचनावादी शाळा, डिजिटल शाळा, लोकसहभागातून उभारलेली शाळा अशा अनेक विषयांवर मांडणी करण्यात आली. गणित, इंग्रजी, विज्ञानासह मूल्यशिक्षण, व्यक्तिमत्व विकास, किशोरवयीन आरोग्य विज्ञान, कृतियुक्त विज्ञान व वैज्ञानिक दृ‌ष्टिकोन अशा विषयांमध्ये तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अध्ययन आणि अध्यापनात झालेले बदल शिक्षकांनी सादर केले आहेत.
‘शिक्षणाची वारी’चे उद‍्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधूकरराजे आर्दड, विशेष कार्य अधिकारी प्राची साठे, विद्या परिषदेचे संचालक सुभाष कांबळे, शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके, शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, आर. एस. मोगळ, लता सानप, प्रतिभा भराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रवीण लोहाडे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. किरण गाडेकर यांनी आभार मानले.

जादूची कांडी
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील कोतन येथील प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी तयार केलेली ‘जादूची कांडी’ पाहण्यासाठी शिक्षकांची गर्दी केली. बेरीज, बजाबाकी, गुणाकार शिकविण्यासाठी पाकिटावर गणिती क्रीया लिहिलेली असते. पाकिटात उत्तरासाठी चार पर्याय दिलेले असतात. अचूक पर्यायायाला जादूची कांडी कॅच करते. चुंबक आणि टाकाऊ वस्तूंपासून हा प्रयोग तयार करण्यात आला. त्यानुसार शाळेत गणित शिकविले जाते.

शिक्षकानेच तयार केले ‘अॅप’
औंढा तालुक्यातील शिरडशहापूर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू कन्या शाळेतील मोहम्मद रफिक अन्सारी यांनी आनंददायी शिक्षणासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यांनी विविध ‘अॅप’ तयार केले आहेत. गतितासाठी ‘खेट गणिताचा’, ‘किड्स मॅथ्स गेम’, ‘उर्दू मॅथ्स गेम’पासून ते ‘सूर्यमाला मराठी’ हे ‘अॅप’ विद्यार्थ्यांना भावले.

लाइव्ह ‘स्पोकन इंग्लिश’ने लक्ष वेधले
गारखेडा बीटमधील सांजखेडा शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी लाइव्ह ‘स्पोकन इंग्लिश’ने शिक्षकांचे लक्ष वेधले. दैनंदिन व्यवहारात वावरताना इंग्रजी संभाषण कसे असते, इंग्रजीत संवाद कसा साधावा, मुलाखत कशी घ्यावी याचे प्रात्यक्षिक विद्यार्थी दाखवित होते. शाळेतील २४ विद्यार्थी यात सहभागी झाले होते.

‘ई-लायब्ररी’
वाचन संस्कृती कमी होत असल्याने ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांनी ‘ई-लायब्ररी’चा प्रयोग सुरू केला. विद्यार्थी, शिक्षकांमध्ये अवांतर वाचन वाढावे या हेतूने ऑडिओ बुक्स ते मोबाइलवर उपलब्ध करून देतात.‘शामची आई’सारख्या ३० ते ४० पुस्तकांचे ऑडिओ बुक्स त्यांनी तयार करत ते विविध शिक्षकांना दररोज मोबाइलवर पाठविले जाते. हा स्टॉल पाहण्यासाठी शिक्षकांनी गर्दी केली.

ग्रंथदिंडी, पालखीने सुरुवात
‘शिक्षणाची वारी’ची सुरुवात विद्यार्थ्यांनी काढलेल्या ग्रंथदिंडी, पालखीने झाली. विविध शाळांचे विद्यार्थी दिंडीत झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अशा अनेक महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी झालेली मुले. वासुदेवच्या वेशभूषेतील शिक्षकांनी वारीमध्ये चैतन्य निर्माण केले.

पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती
विभागीय क्रीडा संकुलात तीन दिवसांच्या ‘शिक्षणाची वारी’त ५२ स्टॉल आहेत. त्यात बालभारती, राज्य मंडळ, विद्या प्राधिकरणाचेही स्टॉल आहेत. वारीला भेट देण्यासाठी पहिल्या दिवसी १२ जिल्ह्यातील १२०० शिक्षक आले होते. त्यासह विद्यार्थी, पालकांनीही हजेरी लावून नवनवीन प्रयोगांची पाहणी केली. पहिल्याच दिवशी नियोजनाचा गोंधळ समोर आला. संकुलनात पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती. बसण्यासाठी आसन व्यवस्थाही अपुरी होती.

आम्ही आमच्या शाळेत विविध उपक्रम राबविले आहेत. आनंददायी शिक्षणासाठी ‘जादूची कांडी’ हे उपक्रम विद्यार्थ्यांना आवडला. गणितासारखा अवघड विषय विद्यार्थ्यांना सोपा करून सांगणे आम्हाला सहज शक्य झाले आहे.
- श्रीकृष्ण उंडाळे, शिक्षक.

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण आनंददायी करता येते. मी त्याच दृष्टिकोनातून ‘अॅप’ तयार केले. बेरीज, वजाबाकी, गुणाकार आदी अॅपद्वारे शिकविण्यावर माझा भर असतो. अॅपमधील काठिण्य पातळी लेवलनुसार वाढत जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आंनद वाटतो.
- मोहम्मद रफिक अन्सारी, शिक्षक.

आमच्यासारख्या उत्साही, उपक्रमशिल शिक्षकांसाठी ‘शिक्षणाची वारी’ ही एक संधी आहे. विविध शिक्षकांनी काय प्रयोग केले. कोणते प्रयोग सुरू आहेत, काय करता येईल याचे अदान-प्रदान होते.
- नितीन गबाले, शिक्षक.

शिक्षणाच्या वारीमध्ये सहभागी झाल्याचा आनंद आहे. शाळेत कशा प्रकारे शिकविले जाते. इतर ठिकाणी कोणते उपक्रम आहेत, हे पहायला मिळते. आम्ही इंग्रजीचे संभाषण उपस्थितांसमोर मांडत आहोत. प्रत्येकाने कौतुक केले, याचा आनंद आहे.
- वैष्णवी शिंदे, विद्यार्थिनी.

अशा उपक्रमामुळे माहितीची देवाण-घेवाण होते. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी इंग्रजी संभाषण कसे करावे हे सांगण्याचा प्रयोग सादर केला. आम्हाला जे शिकविले जाते, ते आम्ही मांडले.
- कंचना बारवाल, विद्यार्थिनी.

अशा प्रदर्शनात आम्ही आमचा उपक्रम दाखवू शकलो याचा आनंद आहे. अनेकांनी आमच्या उपक्रमाचे कौतुक केले. ते आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.
- कोमल चवळी, विद्यार्थिनी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. आंबेडकर यांच्या प्रज्ञापैलूवर १२ ज्ञानग्रंथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रज्ञापैलूंवर अभ्यासकांनी १२ ज्ञानग्रंथांचे लेखन पूर्ण केले आहे. मराठी भाषेतील या १२ ग्रंथांचे प्रकाशन मंगळवारी करण्यात येणार आहे. या ग्रंथांचे कन्नड, उर्दू आणि हिंदीतही भाषांतर करण्यात येणार अाहे, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज ‌मिशनचे प्रकल्प प्रमुख संपादक प्रा. सुधीर गव्हाणे यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज मिशनने डॉ. आंबेडकर यांच्या विविध पैलूंवर विशेष स्वतंत्र ग्रंथ तयार करण्याचा निर्णय घेतला होता. त्याअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्रष्टे शिक्षणतज्ज्ञ, नवसंस्कृतीचे जनक, राष्ट्रभक्त, अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, दलितांचे व राष्ट्राचे हितकर्ते, राज्यशास्त्रज्ञ, प्रशासक, संरक्षणतज्ज्ञ, अंतर्गत सुरक्षा तज्ज्ञ, विद्यार्थी या विषयांवर ११ अभ्यासकांनी १२ ग्रंथ लिहिले आहेत. या ग्रंथांचे लेखन संबंधित क्षेत्रांतील तज्ज्ञ लेखकांनी केले आहे, अशी माहिती डॉ. गव्हाणे यांनी दिली.
या ग्रंथांचा प्रकाशन सोहळा मंगळवारी विद्यापीठाच्या नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, डॉ. आंबेडकर यांच्या विचारावर चाल‌णारे ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यापत्रकार परिषदेत लेखक डॉ. इंद्रजित आल्टे, डॉ. संजीव साळवे, डॉ. डी. एल. भोसले आणि बुद्धप्रिय कबीर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

पुढील वर्षी १३ ग्रंथ
पहिल्या १२ ग्रंथांचे प्रकाशन झाल्यानंतर १३ प्रज्ञापैलूवर लिखाण लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे. हे ग्रंथ २०१८मध्ये नामविस्तार दिनी प्रकाशित केले जाणार आहेत, अशीही माहिती डॉ. गव्हाणे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसकडून एमबीए, पीजी इच्छुकांची गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती सोमवारी गांधीभवनात झाल्या. औरंगाबाद, कन्नड, फुलंब्री तालुक्यांतील इच्छुकांची समर्थकांसह मोठी गर्दी झाली होती. एकट्या औरंगाबाद तालुक्यातील उमेदवारांच्या मुलाखती पाच तास चालल्या. त्यामुळे पुढच्या तालुक्यांसाठी गटनिहाय इच्छुकांना एकत्र बोलावून त्यांची मते जाणून घेतली. यात एमबीए, पीजी झालेल्या इच्छुकांची संख्या लक्षणीय होती.

गांधीभवनात सोमवारी सकाळपासून पक्ष निरीक्षक नतीकउद्दीन खतीब, बी. आर. कदम, जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, नितीन पाटील, विलास औताडे, महिला आघाडीच्या शोभा खोसरे, प्रभाकर मुठ्ठे, अकिल पटेल, जगन्नाथ काळे यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या. औरंगाबाद तालुक्याच्या मुलाखती सकाळी सुरू झाल्या. गटातील सामाजिक परिस्थिती, काँग्रेसचे बलस्थान, निवडून येण्याचे निकष, प्रमुख विरोधी पक्ष यासंदर्भात प्रश्न विचारले गेले. अनेक गटांमधून एलएलबी, एमए, बीएड, एमबीए आणि डॉक्टर उमेदवार काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत.


औरंगाबाद तालुक्याच्या मुलाखती पाच तास चालल्या. उमेदवारांसोबत समर्थकांचीही गर्दी झाल्याने गांधी भवनचे सभागृह भरून गेले होते. दुपारच्या सत्रात कन्नड तालुक्याच्या मुलाखती सुरू झाल्या पण प्रत्येक उमेदवाराची मुलाखत घेतली तर वेळ पुरणार नाही हे जाणून गट आणि गणनिहाय इच्छुकांना एकत्र बोलावले गेले. ‘ तुमच्या गटातून एवढे उमेदवार इच्छुक आहेत. तुम्ही सगळे एकत्र बसून एक उमेदवाराचे नाव सांगा. ते जमले नाही तर श्रेष्ठी सांगतील त्या उमेदवाराच्या पाठिशी राहावे लागेल,’ असे सांगण्यात आले. फुलंब्री तालुक्यातूनही इच्छुक मोठ्या प्रमाणावर आले होते. सायंकाळी सहापर्यंत मुलाखती चालल्या. उर्वरित तालुक्यांच्या मुलाखती मंगळवारी घेण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धूत मोटर्सने १६ हजार द्यावेत

$
0
0

औरंगाबाद : ह्युंदाई मोटर्स इंडिया लिमिटेडचे अधिकृत विक्रेते, अदालत रोडवरील धूत मोटर्सने ग्राहकाकडून २१ हजार रुपये रोख घेऊनही वेळेत गाडी उपलब्ध करून दिली नाही. ग्राहकाकडून रक्कम घेऊनही वेळेत सेवा उपलब्ध करण्यात आपयशी ठरल्याबद्दल धूत मोटर्सने १६ हजार रुपये ग्राहकास व्याजासह परत करावेत, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचा अध्यक्षा नीलिमा संत, सदस्य संध्या बारलिंगे व किरण ठोले यांनी दिले आहेत. तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रास झाल्याबद्दल पाच हजार रुपये भरपाई व खर्च तीन हजार रूपये देण्याचे आदेश दिले आहेत.
तक्रारकर्ते संजय अभिमन्यू वाकुरे (कोनिका हाउसिंग सोसायटी, एन-४ ,सिडको) १७ जानेवारी २०१४ रोजी ग्रँड आय-टेन घेण्यासाठी संजय जाजू, विवेक देशमुख व राजू भिसे यांना घेऊन अदालत रोड येथील धूत मोटार्समध्ये गेले. त्यांना हवी असलेली गाडी उपलब्ध नसल्याने १५ दिवस वाट पाहावी लागेल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यासाठी आगाऊ रक्कम २१ हजार रुपये भरावी लागेल, असेही त्यांना सुचविण्यात आले. १५ दिवसात वाहन मिळाले नाही, तर रक्कम परत केली जाईल असेही त्यांना सांगण्यात आले. रक्कम भरल्यानंतर वारंवार विचारणा करूनही गाडी मिळत नसल्याने त्यांनी रक्कम परत मागितली. लवकरच रक्कम देऊ म्हणून माेघम सांगण्यात आले. अखेर तीन महिन्यांनी वाहन देतो म्हणून त्यांना सांगण्यात आले, परंतु आपणास गाडी परत हवी आहे, असे तक्रारदारांनी शेवटचे सांगून टाकले. रक्कम मिळत नसल्याने त्यांनी नोटीस पाठविली. अखेर तक्रारदार वाकुरे यांनी मंचात धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्लिम आरक्षणासाठी जनहित याचिका

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

मुस्लिम समाजाला आरक्षण द्या, अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात करण्यात आली आहे.

सिराजोद्दीन इकबाल परकोटे यांनी ही याचिका केली आहे. राजश्री शाहू महाराज यांनी १९०२मध्ये मुस्लिम समाजाला इतर मागासवर्गीयाप्रमाणे आरक्षण दिले होते. ९ मार्च २००५ रोजी मुस्लिम समाजाचा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक अभ्यासासाठी न्या. राजेंद्र सच्चर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती. त्यांनी आपला अहवाल १७ नोव्हेंबर २००६ रोजी केंद्र सरकारला सोपविला. न्या. रंगनाथ मिश्रा यांच्या आयोगाच्या शिफारसीमध्ये मुस्लिम समाज आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे म्हटले आहे. या दोन्ही समित्यांच्या शिफारसी केंद्राने लागू केल्या नाहीत, असे या याचिकेत म्हटले आहे. या शिफारशींची अंमलबजावणी न झाल्याने बेरोजगारी व उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. मुस्लिम समाज अद्याप न्यायापासून वंचित आहेत.

वटहुकूमानुसार आरक्षण द्या

सामाजिक व आर्थिक मागासवर्गाचा अहवाल मागवावा, मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी न्या. सच्चर व न्या. रंगनाथ मिश्रा या आयोगांच्या शिफारशी लागू करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. मुस्लिम समाजाला ५ टक्के शैक्षणिक आरक्षण वटहुकूमाप्रमाणे देण्याचे निर्देश राज्य व केंद्र सरकारला द्यावेत, अशी विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याची बाजू पंडितराव आनेराव हे मांडणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चायना रिटर्न्ड डॉक्टरांची एन्ट्री

$
0
0

Nikhil.Nirkhee@timesgroup.com
Tweet : @nnrikheeMT

औरंगाबाद : चीन, रशिया, युक्रेन आदी देशांमधून एमबीबीएस पूर्ण करून येणाऱ्या भारतीय डॉक्टरांना प्रॅक्टिससाठी बंधनकारक असलेली स्क्रिनिंग टेस्ट रद्द करण्याचा डाव असून, प्रस्तावित ‘एक्झिट’ परीक्षेच्या माध्यमातून या डॉक्टरांना भारतात रुग्णसेवेत ‘एन्ट्री’ दिली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

परदेशातून पदवी घेऊन आलेल्या डॉक्टरांची संख्या दरवर्षी ८-१० हजारांच्या घरात आहे आणि निम्म्या खर्चात डिग्री मिळत असल्याने ही संख्या दरवर्षी वाढत चालली आहे. २००७मध्ये च‌िनी पदवी घेऊन आलेल्या डॉक्टरांची संख्या अवघी हजार-दोन हजार होती. आता चीनमधून पदवी घेतलेल्या डॉक्टरांची संख्या ५ हजारांवर गेली आहे. चीनशिवाय सध्या रशियातून दीड–दोन हजार, युक्रेनमधून हजार-दोन हजार, झेकोस्लोव्हाकिया-उझबेकिस्तानमधून ४००-५००, सिंगापूरमधून १००-२०० उमेदवार ‘एमबीबीएस’ची पदवी घेऊन दरवर्षी भारतात दाखल होतात. भारतातील ‘एमसीआय’च्या निकषांप्रमाणे कुठलेच निकष-नियम चीनमध्ये नाहीत आणि निम्म्या खर्चात च‌िनी पदवी मिळते. भारतात खासगी मेडिकल कॉलेजमध्ये ‘एमबीबीएस’साठी किमान ५० ते ६० लाखांचे, तर चीनमध्ये २५ लाख शुल्क आहे. विदेशातून पदवी घेतलेले फक्त ५ ते १० टक्के विद्यार्थी भारतातील ‘स्क्रिनिंग टेस्ट’ उत्तीर्ण होतात. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय अशा विद्यार्थ्यांना भारतात प्रॅक्टिस करता येत नाही आणि त्यामुळेच ही परीक्षा अशा विद्यार्थ्यांसाठी अाडकाठी ठरत होती.

प्रस्तावित ‘एक्झिट’ (द नॅशनल एक्झिट टेस्ट) परीक्षेमध्ये ही स्क्रिनिंग टेस्टच रद्द होणार आहे; किंबहुना ही टेस्ट रद्द करण्यासाठीच विदेशातील मेडिकल कॉलेजांच्या भारतातील ‘हितचिंतकां’नी केलेल्या प्रयत्नातून या ‘एक्झिट’चा जन्म झाल्याची चर्चा आहे. ‘इंडियन मेडिकल कौन्सिल (अमेंडमेंट) बिल २०१६’ मंजूर झाले, तर विदेशी पदवीधारकांना ‘एक्झिट’च्या माध्यमातून भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांप्रमाणे पदव्युत्तर अभ्यासक्रमालाही (पीजी) प्रवेश मिळणार आहे.

कुठल्याही विधेयकाच्या दुरुस्त्यांबाबत मते नोंदविण्यासाठी किमान महिनाभर वेळ दिला जातो, मात्र ‘एक्झिट’ परीक्षेसंदर्भातील विधेयकावर मते नोंदविण्यासाठी फक्त १० दिवस, म्हणजेच ६ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. इतका कमी कालावधी १९५६नंतर पहिल्यांदाच देण्यात आला आणि यामागे घाईघाईत विधेयक पास करण्याचा डाव आहे, अशी शंका मान्यवर डॉक्टर व्यक्त करीत आहेत.

५० टक्के कोटा राखीव

‘एक्झिट’ उत्तीर्ण झाल्यानंतर तीन वर्षे देशात कुठेही मेडिकल ऑफिसर म्हणून काम केले, तर ‘पीजी’ अभ्यासक्रमासाठी ५० टक्के आरक्षण असेल. बहुतेक वैद्यकीय विद्यार्थी ग्रामीण भागात जाण्यास इच्छुक नसतात व शेकडो जागा रिक्त असतात. त्यामुळे विदेशातून पदवी घेतलेले विद्यार्थी मेडिकल ऑफिसर म्हणून सहज काम मिळवू शकतात आणि पुन्हा पीजीसाठी ५० टक्के आरक्षणाचे दावेदार ठरू शकतात.

विरोध अन् स्वागतही

साडेपाच वर्षांत विद्यार्थी ५० ते ७० तज्ज्ञ शिक्षकांच्या वेगवेगळ्या कठीण लेखी-प्रात्यक्षिक परीक्षांच्या चाळणीमधून एमबीबीएस होतो. त्यानंतर ही परीक्षा घेणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे; तसेच आपल्या वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेवर अविश्वास दाखविणे आहे, असे मत महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवाजी सुक्रे यांनी ‘मटा’कडे नोंदविले. एखादा विद्यार्थी ‘एक्झिट’ परीक्षा अनुत्तीर्ण झाला तर त्याला पुन्हा पुढच्या वर्षी परीक्षा द्यावी लागणार आहे. आधीच लांबलचक अभ्यासक्रम, त्यात ही परीक्षा, यामुळे गुणवान विद्यार्थी मेडिकलकडे येणार नाहीत, असे मत ‘आयएमए यूथ विंग’चे प्रदेशाध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी नोंदविले. त्याचवेळी, किमान दर्जाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी अशी परीक्षा आवश्यक असल्याचे मत प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अजित भागवत यांनी व्यक्त केले.

‘एक्झिट’मुळे विदेशातील पदवी घेतलेल्यांना स्क्रिनिंग टेस्ट रद्द होणार आहे. ही टेस्ट रद्द होणार नसेल, तर या बिलाचे स्वागतच आहे. - डॉ. प्रवीण शिनगारे, वैद्यकीय संचालक, डीएमईआर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटबंदीने सहकार संकटात: शरद पवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नोटाबंदीच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला. ‘नोटाबंदीचा निर्णय योग्य वाटला होता, मात्र काळा पैसा बाहेर आला नाही. कारण काळा पैसा परदेशात आहे. नोटबंदीचा सर्वाधिक फटका सहकार क्षेत्राला बसला आहे,’ असे म्हणत पवारांनी सरकारवर टीका केली.

सहकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, ‘नोटाबंदीला ६० दिवस उलटून गेली. अजूनही अर्थव्यवस्था विस्कळित आहे. ग्रामीण भाग आणि सहकारी बँकांच्या व्यवहारांना नोटाबंदीचा सर्वाधिक फटका बसला. नोटाबंदीमुळे देशातील ५० टक्के लघुउद्योगांवर परिणाम झाला आहे. ३५ टक्के रोजगाराला फटका बसला आहे. नोटाबंदीपूर्वी ३० लाख लोक ‘मनरेगा’च्या कामावर येत होते. आता ८३ लाखांवर हजेरी भरली आहे. तब्बल ५३ लाख मजूर वाढले आहेत. कारण कामगारांना बाहेर काम नाही.’

सहकाराचा रस्ता सामान्य माणसाला मदत करणारा आहे, मात्र नोटाबंदीमुळे सहकार चळवळ डबघाईला आली असल्याची खंत पवारांनी यावेळी व्यक्त केली. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्य माणूस दुबळा होईल. अर्थकारणाचा प्रश्न सामंजस्याने सोडवून सहकारी चळवळीला गती देण्याची गरज असल्याचे पवारांनी सांगितले.

बाजार समित्यांत शेतकऱ्यांची फसवणूक

शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याचे सांगत पवार म्हणाले, ‘बाजार समित्यांमध्ये पारदर्शकपणे भाव ठरवले जात नाहीत. त्यात शेतकऱ्यांची फसवणूक होते. मालाला रास्त भाव मिळत नसल्याने त्यांच्या व्यवहारावर परिणाम झाला आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहावी परीक्षेचे आज मार्गदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दहावीची परीक्षा! वर्षभर तयारी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना आता या परीक्षेचे वेध लागले आहेत. अनेकांना परीक्षेचे टेन्शन आले आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’सुद्धा विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सरसावला आहे. दहावीचे पेपर नेमके कसे सोडवावेत, प्राधान्य कोणत्या गोष्टींना द्यावे, उत्तरांची रचना कशी असावी याविषयी तज्ज्ञ शिक्षक विद्यार्थ्यांना बुधवारी मार्गदर्शन करणार आहेत.
सिडको भागातील विद्यार्थ्यांसाठी एन-७ येथील मुकुल मंदिराच्या सभागृहात येत्या १८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वर्षभर दहावीचा अभ्यास केला तरी परीक्षेच्यावेळी विद्यार्थ्यांना टेंशन येते. पेपर सोडविण्याचे तंत्र काही विद्यार्थ्यांना अवगत नसते. त्यामुळे उत्तरे लिहिताना चुका होतात. परिणामी अभ्यास करूनही गुण मिळत नाहीत. त्यामुळे पेपर सोडविताना कोणती काळजी घ्यावी, याची माहिती असणे गरजेचे आहे.
सर्वांसाठी खुल्या असलेल्या या कार्यक्रमात तज्ज्ञ शिक्षक गणित, इंग्रजी आणि विज्ञान या विषयांचे पेपर कसे सोडवावेत, याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. पेपर सोडविण्याविषयी विद्यार्थ्यांच्या मनात काही प्रश्न असतात. त्यांची उत्तरे या मार्गदर्शन सत्रात विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रश्नोत्तरांचे सत्रही होणार आहे. विद्यार्थ्यांनी येताना सोबत वही व पेन आणावा. आपल्या शंका कोणत्याही भाषेत निर्धास्तपणे तज्ज्ञांना विचारून त्यांचे निरसन करून घ्यावे. उर्वरित शहरातील विद्यार्थ्यांसाठीही असे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्यांची माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाईल.

मार्गदर्शक शिक्षक
- सुनील उपाध्ये (गणित)
- वंदना रसाळ-मिरखेलकर (इंग्रजी)
- विनायक पवार (विज्ञान)
- कार्यक्रमाचे स्थळ ः मुकुल मंदिरचे सभागृह, एन-७, सिडको
- वेळ ः दुपारी १२ वाजता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसबीएचमध्ये व्हीआरएस योजना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाच असोसिएट बँकांच्या विलिनीकरणप्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ हैदाराबादच्या संचालक मंडळाने अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या ‘व्हॉलेंटरी रिटायर्डमेंट स्कीम’ला मान्यता दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. ही योजना लागू झाल्यावर सुमारे एक हजार ते बाराशे बँक कर्मचारी ‘व्हीआरएस’ घेतील असा अंदाज आहे.
स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये विलिनीकरणानंतर कर्मचारी व्हीआरएस घेतील अशी बातमी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने प्रसिद्ध केली होती. एसबीएचच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली असून, त्यात व्हीआरएस लागू करण्याला तत्वत: मान्यता दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियात एसबीएचचे विलिनीकरण होईल, त्याच दिवशी ही व्हीआरएस योजना लागू होईल, असेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ही योजना लागू झाल्यावर सुमारे एक हजार ते बाराशे बँक कर्मचारी व्हीआरएस घेतील, असा अंदाज आहे. त्यात मराठवाड्यातील सुमारे १५० अधिकारी-कर्मचारी असतील.
संचालक मंडळाने स्वेच्छानिवृत्ती योजनेला तत्त्वत: मान्य दिल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना स्टेट बँक ऑफ हैदराबाद कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी जगदीश भावठाणकर म्हणाले,‘विलिनीकरणानंतर बढती, सेवाज्येष्ठता डावलली जाणार आहे. यामुळे ५५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले बहुतांश कर्मचारी स्वेच्छानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे.’

मराठवाड्यात सर्वाधिक शाखा
स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या तेलंगाणा आणि मराठवाड्यात जास्त शाखा आहेत. मराठवाड्यातील हैदराबाद बँकेतील स्वेच्छानिवृत्तीमुळे कामकाजावर विपरित परिणाम होईल. व्हीआरएस घेऊ इच्छिणारे बहुतांश कर्मचारी ५५ ते ५८ या वयोगटातील आहेत. त्यांची २५ वर्षांपेक्षा अधिक सेवा झाली आहे. बँकेच्या मराठवाड्यात २१० शाखा असून, दोन हजार कर्मचारी आहेत. देशभरात सुमारे १९५५ शाखा असून, १८ हजार ५०० कर्मचारी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठणमध्ये भाजपचा उपनगराध्यक्ष

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पैठण
नगरपालिकेत शिवसेनेला एकाकी पाडून राणाभीमदेवी थाटात महाआघाडीची गर्जना करणारा मातब्बरांचा बार फुसका ठरला आहे. ऐनवेळी भाजप-सेनेमध्ये युती झाल्याने उपनगराध्यक्षपदी भाजपच्या सुचित्रा महेश जोशी यांची निवड झाली.
शिवसेनेला पैठण नगरपालिकेत एकाकी पाडण्यासाठी भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महाआघाडी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार भाजपच्या नेतृत्वाखाली प्रतिष्ठान नगरी शहर विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडीची स्थापना करण्यात आली. दोन्ही आघाड्यामध्ये काँग्रेस चे प्रत्येकी दोन नगरसेवक सहभागी करण्यात आले होते. महाआघाडीनुसार काँग्रेसकडे उपनगराध्यक्ष पद व भाजप व राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य देण्याचा फॉर्म्युला ठरवण्यात आला. मात्र, उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडीसाठी बोलाविलेल्या सर्वसाधारण सभेच्या एक दिवस अगोदर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. महाआघाडीमध्ये फूट पडली, तर भाजप सेनेमध्ये युती झाली. युतीनुसार भाजपचा उपनगराध्यक्ष व शिवसेनेचा दोन स्वीकृत सदस्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मंगळवारी, नगराध्यक्ष सूरज लोळगे यांच्या नेतृत्वाखाली बोलाविलेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आलेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या सुचित्रा महेश जोशी यांनी काँग्रेसच्या हसनोद्दिन कट्यारे यांचा १४ विरुद्ध दहा मतांनी पराभव केला. भाजपच्या सुचित्रा महाजन यांना भाजपचे सहा, शिवसेनेचे सात व अपक्षाचा एक मत अशी चौदा मते मिळाली. तर काँग्रेसचे हसनोद्दिन कट्यारे यांना काँग्रेस चे चार व राष्ट्रवादी काँग्रेसची सहा अशी दहा मते मिळाली.

स्वीकृत सदस्यपदी वानोळे, बाबर
स्वीकृत सदस्य निवडणुकीपूर्वी भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाआघाडीचे दोन व शिवसेनेचा एक अशी तीन गटे स्थापन झाली होती. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील गटाने संजय सोनारे यांचे, तर महाआघाडीत फूट पडल्याने भाजपच्या नेतृत्वाखालील गटाने काँग्रेस चे अजय करकोटक यांच्या नावाऐवजी शिवसेनेचे प्रकाश वानोळे यांचे व राष्ट्रवादीच्या गटाने डॉ. विष्णू बाबर यांचे नाव स्वीकृत सदस्यपदासाठी प्रस्तावित केले. तिन्ही गटाकडे प्रत्येकी आठ असे समसमान सदस्य संख्या असल्याने व तीनपैकी दोन स्वीकृत सदस्य निवडायचे असल्याने अखेर चिठ्ठया काढण्यात आल्या. यामध्ये शिवसेनेचे प्रकाश वानोळे व राष्टवादीचे डॉ. विष्णू बाबर यांच्या नावाच्या चिठ्ठ्या निघाल्यावर पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी या दोघांची निवड केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुरशीच्या लढाईत जाधवांची आघाडी

$
0
0


संजय काळे, कन्नड
अत्यंत चुरशीच्या अशा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आखाड्यात सर्व पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी अंतिम टप्प्यात आहे. भाजपचे उमेदवार आयातीचे धोरण आणि आ. रायभान जाधव विकास आघाडीमुळे कॉँग्रेस, राष्ट्रवादीचा पुरता कोंडमारा झाला आहे.
तालुक्यातील एक गट व दोन गण कमी झाल्याने विविध पक्षात उमेदवारीसाठी रस्सीखेच वाढली आहे. यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच उमेदवारांनी पक्ष बदल केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये भाजपकडून उमेदवार आयात करण्याचे धोरण अवलंबल्याने व आ. रायभान जाधव विकास आघाडीत जिल्हा परिषद गटातील दिग्गज नेत्यांनी उमेदवारी घेतल्याने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला नेते सांभाळताना मोठी कसरत करावी लागत आहे. मागील निवडणुकीत बस्तान बसवलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढावी आहे. कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कै. नारायण पवार व सध्याच्या जिल्हा परिषद हतनूर गटातील कॉंग्रेसच्या पुष्पाबाई पवार यांचे चिरंजिव किशोर पवार व आमदारकीची निवडणूक लढवलेले उत्तम राठोड यांच्या नियोजित भाजप प्रवेशाने कॉंग्रेसची मोठी कोंडी झाली आहे. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हतनूर गटाचे उमेदवार प्रसन्ना पाटील यांना कॉंग्रेस पक्षाला साथ देण्याशिवाय पर्याय नाही.
हतनूर गटापुरती कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाल्याचे स्पष्ट चित्र आहे. याबाबत इतर काही गटांमध्ये आघाडी होण्याची शक्यता कॉंग्रेसच्या गोटातून व्यक्त करण्यात आली आहे. उमेदवार निवडीत आ. जाधव यांच्या विकास आघाडीकडून सध्याचे चिकलठाण गटाच्या जिल्हा परिषद सदस्य संगीता शेकनाथ चव्हाण चिकलठाण पंचायत समितीला, देवगाव रंगारी येथील शेरखान शेख लाल यांना देवगाव गटासाठी, तर चिंचोली लिंबाजी गटात शिवाजी देविदास मनगटे यांना, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष पंडितराव वाळूंजे यांचे चिरंजीव अशोक वाळूंजे यांना हतनूर गटात उमेदवारी देऊन कन्नड नगरपालिका निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या राष्ट्रवादीला पुरते बेजार करून सोडले आहे. कन्नड पंचायत समितीचे सभापतिपद आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी सुटल्याने खुल्या जागेसह सर्वसाधारण जागेवर विविध पक्षातील महिलांचा उमेदवारीसाठी कल दिसून येत आहे.

तयारी जोरात
कॉंग्रेस व राष्ट्रवादीने मेळाद्वारे, शिवसेनेकडून गटनिहाय दौरे करून, तर आ. जाधव आघाडीकडून प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर करून निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे. प्रथमपासून गटातटाने पोखरलेल्या भाजपमध्ये इतर पक्षातील इनकमिंगमुळे किती जीव येतो यावरच या पक्षाचे भवितव्य आहे. एमआयएमने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. ते या आखाड्यात काही गटात व गणात उतरणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वीकृत सदस्यपदी काँग्रेसने मारली बाजी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कन्नड
नगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी मंगळवारी कॉँग्रेसचे अजमलखाँ कादरखाँ (अथरभाई) व गोविंद राजकुमार भारुका यांची बिनविरोध निवड झाली.
दरम्यान उद्या बुधवारी होणाऱ्या उपनगराध्यक्ष निवडीसाठी अब्दुल जावेद अब्दुल वाहेद यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड पक्की आहे. नगरपलिका स्वीकृत सदस्याच्या निवडीसाठी उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीमंत हारकर यांच्याकडे सोमवारी अजमलखाँ कादरखाँ (अथरभाई) व गोविंद राजकुमार भारुका यांचे अर्ज प्राप्त झाले होते. मंगळवारी नगराध्यक्ष स्वाती कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी साडेबाराच्या सुमारास विशेष सभा घेण्यात आली. या सदस्य निवडीसाठी मुख्याधिकारी संतोष आगळे यांच्या उपस्थितीत कर्मचारी देविदास पाटील, प्रमोद तुपे, प्रशांत देशपांडे यांनी सहकार्य केले. २३ सदस्यांच्या नगरपालिकेत १७ सदस्यांची उपस्थिती होती. उर्वरित आघाडीचे चार व सेनेच्या दोन सदस्यांनी एका स्वीकृत सदस्याच्या निवडीला विरोध करत सभेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एक सदस्याची निवड चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे याविरोधात न्यायालयात व प्रशासनाकड़े दाद मागणार असल्याचे नगरसेवक पंकज सुरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळसेकर, महाजन यांना काव्य पुरस्कार

$
0
0


औरंगाबाद ः मराठवाडा साहित्य परिषदेचे विशेष काव्यपुरस्कार कवी सतीश काळसेकर आणि कवयित्री कविता महाजन यांना जाहीर झाला आहे. कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी रोजी कवितादिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त कवितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कवीला कुसुमाग्रज यांच्या नावाने आणि कवितालेखनात स्थिर झालेल्या कवयित्रीस लीला धनपलवार पुरस्कार प्रदान केला जातो. रोख ११ हजार, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या २७ फेब्रुवारीला मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात प्रसिद्ध समीक्षक व कवी डॉ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१०० टक्के ‘कॅशलेस’ला २० वर्षे लागणारः तुळजापूरकर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘कॅशलेससाठी हवी ती सुविधा पुरविण्यात सरकार अपयशी ठरत आहे. यामुळे १०० टक्के ‘कॅशलेस’साठी पुढील २० वर्षे लागतील. नोटबंदीमुळे रिझर्व्ह बँकेची स्वायत्ता धोक्यात आली आहे,’ असे मत ऑल इंडिया बॅंक इम्प्लॉइज असोसिएशनचे (एआयबीईए) नवनिर्वाचित सहसचिव देविदास तुळजापूरकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
तुळजापूरकर म्हणाले, ‘औरंगाबादसह मराठवाड्यात युनियन यशस्वीपणे चालवण्याबद्दल असोसिएशनने चेन्नई येथे झालेल्या अधिवेशनात राष्ट्रीय पातळीवर सहसचिवपदी माझी निवड केली. नोटबंदी विषयी आम्ही सरकारशी युनियन म्हणून काहीप्रस्ताव ठेवत आहोत. रिझर्व्ह बँकेशीदेखील बोलणी करणार आहोत. कर्मचारी वर्गाला दिलासा मिळावा, ओव्हरटाइम मिळावा यासाठी पाठपुरावा करू. बँकांमध्ये अखंडित चलनपुरवठा व नोटबंदीतून दिलासा मिळाला नाही, तर आम्ही बँक कर्मचारी १ दिवसाच्या लाक्षणिक संपावरही जाऊ असा इशारा सरकारला व रिझर्व्ह बँकेला देणार आहोत. चेन्नईतील अधिवेशनात ५ महत्त्वाचे प्रस्ताव पारित झाले असून ४ लाख कर्मचारी या अधिवेशनास उपस्थित होते,’ असे त्यांनी सांगितले.
‘नोटबंदीच्या ६५ दिवसांनतरही अर्थव्यवस्था अजून पूर्वपदावर आलेली नाही. काळा पैसा यातून बाहेर आलाच नाही. त्याउलट उत्पादन, सेवा, बॅंकिंग, रोजगार आदी क्षेत्रावर नोटाबंदीचा नकारात्मक परिणाम झाला. नागरिकांना रांगांमध्ये उभे रहावे लागले. एक टक्क्याने जीडीपी कमी झाल्यास बॅंकांच्या एनपीएमध्ये घट होते, हे समीकरण आहे. गेल्यावर्षी २६ पैकी १४ बॅंका तोट्यात होत्या. यंदा नोटबंदीमुळे केवळ तीन ते चार बॅंका नफ्यात राहण्याची शक्यता आहे. नोटबंदीचे आणखी वाईट परिणाम येत्या सहा महिन्यात बघायला मिळू शकतील,’ अशी शक्यता तुळाजपूरकर यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युवा कट्टा : खादीच्या प्रसारात राजकारण कशाला?

$
0
0

खादी ग्रामोद्योग मंडळाच्या डायरी व कॅलेंडरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चरख्यासह फोटो छापल्याने देशभरात वाद उफाळला आहे. सर्वार्थाने खादी आणि गांधीजी या प्रतिकाला पुसण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ‘एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंग कॉलेज’च्या विद्यार्थ्यांनी परखड प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या
‘युवा कट्टा’ उपक्रमात मंगळवारी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपले मत मांडले. खादी, चरखा आणि गांधीजी ही प्रतिमा वर्षानुवर्षे भारतीयांच्या मनात रुजली आहे. राष्ट्रपिता अशी उपाधी दिलेल्या गांधींचे स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्व कुणालाही पुसता येणार नाही. खादी ग्रामोद्योग मंडळाच्या कॅलेंडरवर गांधींचे छायाचित्र छापण्याची परंपरा आहे, मात्र पंतप्रधान मोदी यांचा फोटो चरख्यासह कॅलेंडर, डायरीवर प्रसिद्ध झाला आहे. पंतप्रधान खादीचा प्रचार व प्रसार करीत आहेत, पण त्यांनी गांधीजींना हटवून स्वतःची प्रतिमा निर्माण करू नये, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.

आक्षेप घेण्याचे कारण नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी खादीच्या प्रसारासाठी पाठपुरावा करीत असतील, तर आक्षेप घेण्याचे कारण नाही. सध्या खादीचा वापर कमी झाला आहे. कधीकाळी खादी कापड निर्मिती रोजगाराचे प्रमुख साधन होते. या उद्योगाला बळकटी देण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न आहे. खादीचे महत्त्व टिकवणे आणि सर्वांपर्यंत पोचवणे हाच मोदी यांचा उद्देश असावा.
- पायल मेघे

गांधीजींचा आदर राखला पाहिजे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादीच्या वापराचे आणि उद्योगाला जरूर पाठबळ द्यावे. चरख्यासमोर काढलेला फोटो या मोहिमेचा एक भाग आहे, मात्र चरखा आणि महात्मा गांधी यांची अतूट प्रतिमा आमच्या मनात आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी खादीचा पुरस्कार जरूर करावा; पण, गांधीजींचा योग्य आदर राखावा. शिवाय या विषयावर सुरू झालेले राजकारण थांबले पाहिजे.
- अमृता क्षीरसागर

गांधीजीच असावेत
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधी यांचे मोठे योगदान आहे. खादीच्या माध्यमातून त्यांनी स्वदेशी वस्तूंचा आग्रह धरला. स्वातंत्र्य चळवळीला त्यातून बळ मिळाले. स्वातंत्र्य लढ्याचा हा इतिहास पुढच्या पिढीला कळायला हवा. त्यासाठी खादी ग्रामोद्योग मंडळाच्या डायरी, कॅलेंडरवर महात्मा गांधी यांचाच फोटो हवा होता
- अश्विनी देहाडे

मोदींच्या फोटोचा अट्टहास का?
देशातील प्रत्येक खादी केंद्र, खादीचे प्रसारक यांनी महात्मा गांधी यांची प्रतिमा दर्शनी भागात लावली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः फोटोसेशन करून चरख्यासह खादीचा प्रचारक भासवत आहेत. खादीचा प्रचार सर्वजण करतात. मग, चरख्यासोबत फोटो काढण्याचा मोदी यांचा अट्टहास कशासाठी? चुकीची संकल्पना रुजवू नये.
- अश्विनी तराळ

मोदींचा फोटो लावणे गैर
चरखा हा स्वातंत्र्य चळवळीचे प्रतीक ठरला. महात्मा गांधी यांनी ग्रामीण भागापर्यंत खादीचा प्रसार केला. या उल्लेखनीय कार्यामुळे खादी आणि गांधीजी यांचे अतूट नाते आहे. या राष्ट्रीय प्रतिकाला कुणी पुसण्याचा प्रयत्न करू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा चरख्यासह वैशिष्ट्यपूर्ण फोटो काढणे चुकीचे आहे.
- सोनम सासणे

गांधीजीच खादीचे ब्रँड अॅम्बेसेडर
खादी म्हटले की महात्मा गांधीचा चेहरा समोर येतो. खादीला जगभरात पोचविण्याचे, त्याची सुरुवात करण्याचे काम गांधीजींनीच केले. त्यामुळेच तेच खरे त्याचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. त्यामुळे त्यांचा फोटो काढून पंतप्रधानांनी स्वतःचे छायाचित्र ठेवण्याचा आग्रह धरणे चुकीचे आहे. जे पूर्वापार चालत आले आहे, तेच रहायला हवे होते.
- तन्वीर काझी

गांधीजींचाच फोटो असावा
खादी, चरखा हे स्वातंत्र चळवळीतील एक प्रतिक आहे. खादी सर्वसामान्यांपर्यंत, घराघरात पोचविली ती, महात्मा गांधी यांनीच. त्यामुळे त्यांचाच फोटो मंडळाच्या डायरी, कॅलेंडरवर असायला हवा. खादीचा प्रसार करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. अशावेळी प्रत्येकजण डायरी, कॅलेंडरवर आपला फोटो ठेवण्याचा आग्रह धरेल.
- शीतल खरात

गांधीजींचा लढा कसा कळणार?
मोदींना विरोध नाही, परंतु खादी ग्राम उद्योग मंडळाच्या डायरी, कॅलेंडरवर स्वतःचा फोटो त्यांनी ठेवायला नको होता. अशा प्रकारामुळे महात्मा गांधीचा लढा पुढच्या पिढीला कसा कळणार, असाच प्रश्न उपस्थित होतो. चुकीची संकल्पना पुढील पिढ्यासमोर जाईल, अशी भीती यातून व्यक्त करता येऊ शकते.
- आकाश आडे

खादीचे प्रचारक गांधी की मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चरख्यासोबत फोटो काढणे गैर आहे. खादीचा पुरस्कार व प्रचार करणारा प्रत्येकजण ही कृती करण्याची शक्यता आहे. खादीच्या प्रसाराचे व्रत महात्मा गांधींनी आयुष्यभर निष्ठेने जोपासले. म्हणून त्यांची प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येक ठिकाणी गांधीजींच्या नावाला विरोध सुरू झाला आहे. त्यामुळे खादीचे प्रचारक गांधी की मोदी, असा भ्रम पुढील पिढीसमोर निर्माण होऊ शकतो.
- सरिता यादव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किर्तनातून शिक्षणाच प्रसार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिक्षण क्षेत्रातील नवीन कल्पना, शैक्षणिक साहित्याच्या माहितीचे धडे विविध जिल्ह्यांतून आलेल्या १ हजार शिक्षकांनी गिरविले. विभागीय क्रीडा संकुलात ‘शिक्षण वारी’ उपक्रमास दुसऱ्या दिवशीही स्टॉलवरी गर्दी होती. किर्तनाच्या माध्यमातून ‘ज्ञानरचनावाद’ एकनाथ जाधव, प्रमोद कुमावत यांनी शिक्षकांसमोर मांडला.
विभागीय क्रीडा संकुलात ‘शिक्षणाची वारी’ उपक्रमास सोमवारपासून सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी नाशिक, परभणी, नांदेड, नंदुरबार जिल्ह्यातील १ हजार शिक्षकांनी भेट दिली. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद, कन्नड, पैठण, सोयगाव तालुक्यातील महापालिका क्षेत्रातील एकूण ५०० शिक्षकांनी शिक्षणाच्या वारीस भेट दिली. शिक्षकांनी केलेल्या नव्या प्रयोगांचे एकत्रित प्रदर्शन भरविण्यात आले. ज्ञानरचनावादी शाळा, डिजिटल शाळा अशा विविध ५२ स्टॉल वारीत उभारण्यात
आले आहेत. वारीचे आकर्षण ठरले ते सिंगापूरवारीला जाऊन आलेले ४० शिक्षक. परदेशातील शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून आलेल्या या शिक्षकांनी विविध विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन केले, संवाद साधला. एकनाथ जाधव यांनी ‘ज्ञानरचनावाद’वर सादर केलेले किर्तनही उल्लेखनिय ठरले. आनंददायी शिक्षणातील शिक्षणाची गुणवत्ता, कमी खर्चातील नवनव्या प्रयोगातून विद्यार्थ्यांना कसा लाभ होतो, हे त्यांनी मांडले. प्रा. प्रमोद कुमावत यांनी नवीन शिक्षण पद्धतीतील बदल आणि प्राचीन शिक्षण पद्धती यावर भाष्य करणारे किर्तन सादर केले. बदलत्या शिक्षणाचा वेध घेत, तंत्रज्ञानाची उपयुक्तता सांगितली.

दोरीवरचा मल्लखांब
शिक्षणाच्या वारीमध्ये गारखेडा नंबर १ जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला दोरीवरचा मल्लखांब आकर्षणाचे केंद्र ठरला. दुसरी ते सातवीपर्यंतच्या शाळेतील २९ विद्यार्थ्यांनी आपल्या कवायती सादर करत क्रीडा क्षेत्रातही जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी मागे नसल्याचे दाखवून दिले. दादासाहेब नवपुते यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे सादरीकरण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रशियन महिला पर्यटक भरकटली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
वेरूळ लेणी पाहताना अंधारात भरकटलेल्या रशियन पर्यटक तरुणीला जोगेश्वरी येथे शेतात मुक्काम करावा लागला. ही तरुणी ग्रामीण भारतीय जीवनाचा अनुभव घेत असताना पोलिस तिचा रात्रभर शोध घेत होते.
व्हिक्टोरिया अॅलेक्सिवा ही ३१ वर्षांची रशियन पर्यटक सोमवारी वेरूळ येथील लेणी पाहण्यासाठी आली. एलोरा रेस्टॉरंट येथे तिची शेख सादिक या गाइडशी भेट झाली. तिने त्याच्याकडून लेणी परिसराची माहिती घेतली. सादिकने तिला लेणीचे तिकीट काढून दिले. रेस्टॉरंटमध्ये बॅग ठेऊन ती लेणी पाहण्यासाठी एकटीच गेली.
लेणी क्रमांक २९ पाहिल्यानंतर व्हिक्टोरिया लेणी डोंगरावर गेली. तेथे अंधार झाल्याने तिला परत येण्याचा रस्ता सापडला नाही. ती दूर जोगेश्वरी परिसरात गेली तेव्हा उजेड दिसला. त्या दिशेला असलेल्या एका घराजवळ गेली.
दरम्यान, सोमवारी रेस्टॉरंटचे मालक अंकुश जाधव यांनी परदेशी महिला पर्यटक हॉटेलमध्ये सामान ठेऊन बेपत्ता असल्याचा अर्ज पोलिसांत दिला. त्यामुळे पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली रात्रभर पोलिसांनी तिचा शोध घेतला. हॉटेल, धाबे, विमानतळ, रेल्वेस्टेशन, बसस्टँड, परिसरातील हॉकर्स यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली.
व्हिक्टोरिया परतली त्यावेळी लेणी बंद होती. एक महिला पर्यटक वेरूळ लेणी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलिस उपनिरीक्षक अनिलकुमार बेंद्रे व त्यांच्या पथकाने वेरूळ लेणी गाठली. त्या महिला पर्यटकाला पोलिस ठाण्यात आणून तिचे सामान तिच्याकडे सुपूर्द केले.

रात्रभर जोगेश्वरी येथे शेतात मुक्काम
मोबाइलची बॅटरी डिस्चार्ज झाल्याचे त्यावेळी समजले. त्यावेळी मनोज बारगळ त्यांच्या शेतात होते. तिने त्यांना मोबाइल चार्जिंगला लावण्याची विनंती केली. विदेशी पर्यटक अचानक वस्तीवर आल्याने आश्चर्यचकित झालेले बारगळ यांनी व्हिक्टोरियाचा मोबाइल चार्जिंगला लावला. तिला चहा दिला. चहा प्यायल्यानंतर मोबाइल घेऊन ती निघाली. तेव्हा बारगळ यांनी, सोबत कोणी नसल्याने तिला रात्रभर तेथेच थांबण्यास सांगितले. तिच्या राहण्याची व्यवस्था केली. मंगळवारी व्हिक्टोरिया वेरूळ लेणी परिसरात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. बाबासाहेबांचे ज्ञान इंटरनेटमुळे जगभर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

इंटरनेटच्या युगामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य जगभरात पोचले आहे. यामुळेच अनेक देशांनी बाबासाहेबांचे महत्त्व जाणले. बाबासाहेबांच्या कार्यावर आणि त्यांच्या विचारावर शास्त्रोक्त संशोधन करण्याची गरज असल्याचे मत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज मिशनने आयोजित केलेल्या १२ पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज मिशनने आंबेडकरांच्या प्रज्ञापैलूंवर नामांकित अभ्यासंकांडून १२ ज्ञानग्रंथांची निर्मिती केली आहे. या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आज पार पडला. यावेळी निवृत्त शिक्षणाधिकारी के. डी. पगारे, परिवर्तनवादी आंदोलनातील ज्येष्ठ नेते अॅड. मनोहर टाकसाळ, प्रा. डी. एल. हिवराळे, प्राचार्य ल. बा. रायमाने, अॅड. बी. एच. गायकवाड, के. ई. हरिदास, शाहीर मीरा उमप, शाहीर सखुबाई साळवे, जमुनाबाई गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

डॉ. चोपडे यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेबांच्या प्रज्ञापैलूंवर काढण्यात आलेल्या या साहित्यामुळे त्यांच्यावर अभ्यास करणाऱ्यांसाठी उपयोगी ज्ञानग्रंथ उपलब्ध झालेला आहे. बाबासाहेबांच्या विचारांवर शास्त्रीय पद्धतीने संशोधन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज मिशन यांनी पुढाकार घेतल्यास त्याला कुलगुरू म्हणून मीही पाठबळ देईन.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादकर साकारणार ‘ड्रायव्हरलेस कार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जागतिक पातळीवर ड्रायव्हरलेस कार (चालकरहित कार) विकसित करण्यासाठी संशोधन सुरू आहे. औरंगाबादेतील एक्स्पर्ट ग्लोबल सोल्यूशन्स आणि जर्मनीच्या सिमोअर अॅटोमोटिव्ह या कंपनीने स्थापन केलेल्या इसी मोबिलिटी या कंपनीसाठी १३० अभियंत्यांची निवड करण्यात आली. हे सर्व अभियंते औरंगाबादचे आहेत. यापैकी २१ जणांची एक टीम नुकतीच लिंडाऊ (जर्मनी) येथे एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी रवाना झाली. हे औरंगाबादकर अभियंते ड्रायव्हरलेस कारची टेक्नॉलॉजी तयार करणार आहेत.

इसी मोबिलिटी कंपनीची स्थापना नोव्हेंबर २०१६मध्ये झाली. माहिती, तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर सेवा पुरविण्यासाठी स्थापन केलेल्या या कंपनीला जर्मनीत एका प्रतिथयश कंपनीकडून मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. कंपनीने औरंगाबादेतील पीईएस अभियांत्रिकी, देवगिरी अभियांत्रिकी आणि एमआयटी या कॉलेजमधील इलेक्ट्रॉनिक्स, आयटी व कम्प्युटर सायन्स विषयातील अभियंते निवडले. एकूण १३० जणांची निवड केली यापैकी बहुतांश जण फ्रेशर आहेत. काहींची पदवी पूर्ण होण्यास सहा महिने बाकी आहेत.

विमानात असणाऱ्या ब्लॅकबॉक्स प्रमाणे कारमध्ये ब्लॅकबॉक्सची संकल्पना जर्मनीच्या संबंधीत कंपनीने मांडली आहे. कारचा ब्लॅकबॉक्स विकसित करणे, ब्लॅकबॉक्सला हुशार करणे असे टार्गेट या टीमला आहे. इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि इंडस्ट्री ४.० या सिस्टिमचा वापर करून ड्रायव्हरलेस कारसाठी कोणता डेटा लागणार आहे, याचे संकलन सध्या सुरू आहे. चालकरहित कारसाठी महत्त्वाचे इनपूट इसी मोबिलिटी कंपनीकडून पुरविले जाणार आहे. त्यात औरंगाबादच्या अभियंत्याची भूमिका महत्त्वाची असणार असल्याचे कंपनीचे संचालक प्रशांत देशपांडे, मुकुंद कुलकर्णी, या प्रकल्पाच्या प्रमुख अधिकारी मिताली मिश्रा, सीएम अॅटोमोटिव्हचे व्यवस्थापकीय संचालक ग्रेगर मेटनेर यांनी पत्रकारांना सांगितले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात औरंगाबादमध्ये संधी उपलब्ध झाली असून आता येथील टॅलेंट मुंबई, पुणे किंवा अन्यत्र जावे लागणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अभिलाषा काबरा, लोकेशा केलवानी, टीना देवळाणकर, पंकज गर्जे यांनी अनुभवकथन केले. यावेळी प्रा. संजय कल्याणकर, राम कान्हे उपस्थित होते.

सेन्सर, कॅमेऱ्यांचा वापर
- डेटा इंजिनीअरिंगचा वापर
- रस्त्यावर किती गाड्या आहेत, येणाऱ्या जाणाऱ्यांचे प्रमाण किती, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे वातावरणातील तापमान, वाऱ्याचा वेग, हादरे, टायरमधील दाब आदी गोष्टी मोजण्याचे तंत्रज्ञान विकसित केले जाणार आहे.
- सेन्सर आणि कॅमेऱ्यांचा वापर करून इसी मोबिलिटीची टीम संशोधन करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images