Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

धावत्या रेल्वेत मुलाचा जन्म

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बाळंतपणासाठी मध्यप्रदेशात जाणारी महिला रेल्वे पोलिस, अधिकारी, रेल्वे प्रवासी सेनेचे पदाधिकारी तसेच प्रवासी महिला डॉक्टरांच्या मदतीने नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये प्रसूत झाली. १०८ सरकारी अँब्युलन्सला आधी कळवूनही अँब्युलन्स जालना स्थानकावर पोचण्यास उशीर झाला. मात्र, तीन यंत्रणांच्या सहकार्याने कुठलीच अडचण झाली नाही.
नागपूर - मुंबई (गाडी क्रमांक ११४०२) ही शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास परतूर रेल्वेस्थानकावर पोचली. सुपरफास्ट एक्स्प्रेस असल्याने मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी झाली होती. परतूर येथील नवजिनिंग मिलमध्ये काम करणारा मध्यप्रदेशातील एक मजूर पत्नीसह आला होता. पाच वर्षांपासून हे कुटुंबीय परतूरला राहते. या मजुराच्या पत्नीचे पहिले बाळंतपण होते. तीन दिवसांपासून त्यांनी स्थानिक डॉक्टरांकडून तपासणी करून घेतल्यानंतर गावी जाण्याचा निर्णय घेतला. आवश्यक सामानासह ते स्टेशनवर आले. या गाडीला कायम गर्दी असते. तरीही त्यांनी गार्डशेजारील जनरल डब्यात पत्नीसाठी जागा मिळविली. नंदीग्राम परतूरहून जालन्याकडे निघाली. रांजणी स्टेशनजवळ या महिलेस प्रसुति वेदना सुरू झाल्या आणि गडबड उडाली. डब्यात शेजारी असलेल्या गार्डचे तिकडे लक्ष गेले. मात्र गाडी कुठेही न थांबविता त्याने सारवाडी स्टेशनपर्यंत वाट पाहिली. तिथे क्रॉसिंगसाठी नंदीग्राम थांबली. त्या वेळेत गाडीत असलेले प्रवासी सेनेचे सदस्य दीपक साळवे यांनी संघटनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना ही माहिती दिल. टीटीई जयप्रकाश कुमार यांना सोमाणी यांनी संपर्क साधला आणि प्रवाशांमध्ये कुणी डॉक्टर आहे काय ? अशी विचारणा केली. त्यात एस पाच या डब्यात परभणीहून बसलेल्या डॉ. संमती शर्मा मुंबईपर्यंत प्रवासासाठी असल्याचे कळाले. सोमाणी आणि जयप्रकाश कुमार यांनी पुढाकार घेऊन डॉ. शर्मा यांनी तत्काळ मदतीस होकार दिली. तोवर विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. ए. के. सिन्हा यांना संपर्क साधून घटनेचे गांभीर्य सांगण्यात आले. जर नंदीग्राम अन्यत्र अधिक वेळ थांबली तर महिलेचा जीव धोक्यात येऊ शकतो, याची कल्पना त्यांनी दिली. ८ वाजून ४० मिनिटांनी नंदीग्राम जालना स्थानकावर पोचली. तोवर १०८ अँब्युलन्सला सज्ज राहण्यास सांगितले होते, पण अँब्युलन्स ४५ मिनिटे उशिराने दाखल झाली.
तिकडे डब्यामध्ये महिलेला त्रास होत होता. डॉ. संमती शर्मा यांनी प्रवाशांना डब्याबाहेर पाठवून काही महिला प्रवाशांना सोबत घेऊन प्रसुति केली. त्यानंतर अँब्युलन्समध्ये बसवून रात्री साडेदहा वाजता महिला व बाळाला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेल्वे पोलिस चव्हाण, सुरक्षा दलाचे निरीक्षक परमवर सिंग, मुंडे, रेल्वे सेनेचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष अजय पहाडे, इम्रान शेख, अन्वेष काकडे यांनी मदत केली. रेल्वे सेनेने या दांपत्याला आर्थिक मदत केली. बाळाचे नाव नंदन ठेवणार असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिंचन विहीरप्रकरणी दोन बीडीओ निलंबित

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींच्या मंजुरीत गैरव्यवहार झाल्याचे आढळून आल्यामुळे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी तत्कालीन गटविकास अधिकारी विश्वनाथ केळकर आणि प्रभारी गटविकास अधिकारी एन. एम. वाघ यांना निलंबित केले. भापकर रुजू झाल्यानंतर ही पहिलीच मोठी कारवाई आहे. दोन्ही अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश शनिवारी काढण्यात आले.
रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरींसाठी तत्कालीन बीडीओ विश्वनाथ केळकर यांनी अनियमितता केल्याचे आरोप करण्यात आले होते. निकषाप्रमाणे लाभधारकांची पात्रता न तपासता विहिरींना प्रशासकीय मान्यता देणे, जीएसडीएचे प्रमाणपत्र न घेता मंजुरी, लाभार्थींच्या विहिरींची देयके अदा करताना आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न करणे, ग्रामपंचायत निहाय विहिरींची कामे मंजूर करताना सूचनांचे अनुपालन न करणे, प्रशासकीय मान्यतेचे आदेश संबंधित संचिकांमध्ये जोडून न ठेवणे, मजुरांना विलंबाने मजुरी देणे, मस्टर ट्रकर न ठेवणे आदी अनियमितता केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. प्रभारी गटविकास अधिकारी एन. एम. वाघ यांनी या कामांतर्गत निकषाप्रमाणे लाभार्थ्यांच्या विहिरींची देयके अदा करताना विहित कागदपत्रांची पूर्तता न करणे, जीएसडीएचे प्रमाणपत्र न घेता २३० विहिरांनी मंजुरी देणे आदी अनियमिता आढळून आल्या. नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची तपासणी तसेच सरकारी नोंदी यावरून विश्वनाथ केळकर आणि एन. एम. वाघ यांच्या निलंबनाचे आदेश भापकर यांनी शनिवारी काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोषणेचे नव्हे, दिस ‘दामाजी’चे!

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘साहेब, परिस्थिती बदलली आहे. पूर्वीसारखे जय भवानी-जय शिवाजीच्या घोषणा देत निवडून येण्याचे दिवस गेले,’ अशा भावना झेडपीच्या इच्छुक उमेदवारांनी शनिवारी शिवसेनेच्या मुलाखतीदरम्यान व्यक्त केल्या. पक्षात केलेल्या कामापेक्षा निवडणुकीसाठी पैसा किती खर्च करणार, असा प्रश्न बहुतेक इच्छुकांना विचारण्यात आला.
जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या मुलाखतींना औरंगपुरा येथील शिवसेना भवनात सुरुवात झाली. आज पहिल्या दिवशी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, माजी आमदार अण्णासाहेब माने, संतोष माने, शहरप्रमुख संतोष जेजूरकर, बाळू थोरात, आसाराम रोठे यांच्यासह महिला आघाडीच्या रंजना कुलकर्णी, प्रतिभा जगताप, सुनिता देव मुलाखतीच्या पॅनलमध्ये होते. यावेळी औरंगाबाद (पश्चिम) ग्रामीण, खुलताबाद व वैजापूर या तीन तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सकाळी दहा वाजेपासून सुरू झालेले मुलाखतींचे सत्र सायंकाळी सातपर्यंत सुरू होते. उद्या रविवारी जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
इच्छुकांना पॅनलसमोर पाच ते सात मिनिटे मुलाखत द्यावी लागत होती. पॅनल मधील नेत्यांकडून एकच परवलीचा प्रश्न सर्वांना विचारण्यात येत होता आणि तो म्हणजे तिकीट दिले तर निवडून कसे येणार ? निवडून येण्यासंदर्भात जातीय समिकरण, मतदारांपर्यंत असलेला संपर्क, पक्षात केलेले काम हे मुद्दे दुय्यम ठरत होते. पैसा कसा आणि किती खर्च करणार ते सांगा, यावरच नेत्यांच्या प्रश्नांचा जोर होता. आता पक्ष मदत करू शकणार नाही. मोदींनी नोटबंदी केली आहे. त्यामुळे पक्षाकडे, नेत्यांकडे पैसा नाही. जो काही पैसा खर्च करावा लागेल तो उमेदवारालाच करावा लागणार आहे, असे इच्छुकांना जाणीवपूर्वक सांगितले जात होते.
इच्छुकांपैकी काही जणांनी देखील लाखोंच्या पटीत रक्कम सांगण्यास सुरुवात केली. ही रक्कम सांगताना ‘साहेब, आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही. जय भवानी - जय शिवाजीच्या घोषणा देत निवडून येण्याचे दिवस संपले. आता पैसाच लागणार, आम्ही त्यांची तयारी केली आहे,’ असे नियोजन सांगितले.

उमेदवार तुम्हीच ठरवा
पंचायत समितीच्या गणामध्ये निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना जिल्हा परिषद गटात कुणाला उमेदवारी द्यायची हे विचारले जात होते. एकाचे नाव सांगितले तर दुसऱ्याशी वैर निर्माण होईल हे लक्षात येत असल्यामुळे कुणाच्याही नावाची शिफारस केली जात नव्हती. ‘साहेब, तुम्हीच उमेदवार ठरवा. पक्ष योग्य उमेदवारालाच संधी देईल,’ असे सांगून नेत्यांच्याच गळ्यात घोंगडी टाकण्याचा चाणाक्षपणा इच्छुकांनी केला.

मुलाखतीचे तंत्र
- २५० जणांची हजेरी
- ३ तालुक्यांतले इच्छुक
- २ दिवस मुलाखती
- १० ते सायंकाळी ६ वेळ
- ५ ते ७ मिनीट प्रत्येकास

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...दिल, दोस्ती दुनियादारी!

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कॉलेज सुटले आणि दोस्त कंपनींचा संपर्क तुटला. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात मोठी मजल मारली, पण जुन्या सवंगड्यांची आठवण आली की घालमेल व्हायची. हे मैतर शनिवारी जमले आणि गप्पांचा फड रंगला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागाच्या १९९१च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा रौप्य महोत्सवी आज घेण्यात आला. विभागाचे संस्थापक डॉ. पी. जी. देशमुख, डॉ. सुनिता बापट, डॉ. कृष्णमूर्ती, डॉ. पी. पी. कार्यकर्ते, डॉ. ए. बी. कुलकर्णी, विभागप्रमुख डॉ. चंद्रशेखर हिवरे, डॉ. यशवंत खिल्लारे, डॉ. गुंडेराव कुलकर्णी, डॉ. मीना पाटील, डॉ. सी. बी. दुमलोड, संयोजक डॉ. राम चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. ‘तंत्रज्ञानाच्या युगात संवादाची गती वाढली तरी परस्पराविषयीच्या भावना, संवेदना बोथट होऊ लागल्याचे दिसते. अशा काळातही शिक्षकांचे स्थान मोलाचे असते, याची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याने ठेवली पाहिजे,’ अशी भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
प्रारंभी कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे उद्घाटन झाले. दिवसभरातील विविध सत्रांमध्ये आजी-माजी विद्यार्थ्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. कोणी आपल्या त्या वर्गात जाऊन बाकावर बसत होते. काही जण ग्रंथालय, प्रयोगशाळेला भेट देत जुन्या आठवणींमध्ये रमले. विद्यार्थ्यांसोबत आजी-माजी प्राध्यापकही या आनंदात सहभागी झाले अन् जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आपुलकीने विचारपूस केली. सूत्रसंचालन डॉ. रवी रेड्डी, तर आभार डॉ. स्मिता सोनवणे यांनी मानले.

...यांची हजेरी
कार्यक्रमास माजी विद्यार्थी डॉ. बबिता सरवदे, अंजली देशमुख, शीला देशमुख-पवार, डॉ. बी. एस. खैरे, डॉ. वसंत बावणे, राजेश्वर बेंबडे, जनक भोसले, प्रा. अनिल कंकाळ, मिलिंद वाघमारे, मनोज देशपांडे, संजय गिरी, उदय पाटील, सुरेश बिरादार, अनिल शिंदे, संध्या डांगे, पुष्पा कांबळे, उज्ज्वला उंबरे, नीता आबूज-नवले, शुभदा जोशी, भीमराव पेहकर, आनंद गडकर, डॉ. आर. एम. धोंडगे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बाऊल’ लोकपरंपरेची रसिकांना भुरळ

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘एसराज’ या दुर्मिळ वाद्याचे नादविश्व, ओडिसी पदन्यास आणि पश्चिम बंगालच्या ‘बाऊल’ या लोककलेने शारंगदेव महोत्सवाचा दुसरा दिवस संस्मरणीय ठरला. रुक्मिणी सभागृहात शनिवारी सादरीकरण झाले. या कलाकारांच्या अदाकारीला रसिकांची भरभरून दाद मिळाली.
महात्मा गांधी मिशन संस्थेच्या ‘महागामी’ गुरुकूलच्या वतीने शारंगदेव महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाची दुसऱ्या दिवशी ‘एसराज’ वादनाने सुरुवात झाली. शांतिनिकेतन येथील गुरू बुद्धदेव दास यांनी या दुर्मिळ वाद्याद्वारे अवघे नादविश्व उभे केले. दिलरूबा वाद्याशी साधर्म्य असलेले ‘एसराज’ तीनशे वर्षे जुने वाद्य आहे. त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल राज्यात एसराजचे वादन होते. औरंगाबाद शहरात प्रथमच एसराज वादन झाले. ‘राग जोग’ उत्कटतेने सादर करीत दास यांनी रसिकांना नावीन्यपूर्ण अनुभूती दिली. मृदंगाच्या संगीत साथीने गुरू रवींद्रनाथ टागोर यांच्या भक्तिरचना दास यांनी सादर केल्या. तबल्यावर जगदीश व्यवहारे, मृदंगावर चंचल नंदी आणि एसराजवर अर्जुनज्योती बंदोपाध्याय यांनी साथसंगत केली. दुसऱ्या सत्रात पार्वती दत्ता आणि शिष्यांचे ओडिसी नृत्य रंगले. ‘मंगलाचरण’द्वारे नृत्य सादरीकरण सुरू झाले. ‘थाई’, ‘श्लोक पठण’, स्वरशब्दपाठ या पारंपरिक रचनांनी नृत्य लक्षवेधी ठरले. संगीत साथसंगत, प्रकाशयोजना आणि तालबद्ध पदन्यासामुळे ओडिसी रसिकांसाठी पर्वणी ठरले. वैभवी पाठक, कन्नगी गोसावी यांनी नृत्य साथसंगत केली. तर मनोज देसाई, रोहन डहाळे, विनय शंखपाळ, सुनील अवचट व अपर्णा देवधर यांनी संगीत साथसंगत केली. तिसऱ्या सत्रात त्रिवेंद्रम येथील पार्वती बाऊल यांचे ‘बाऊल’ सादरीकरण रंगले. डुग्गी, एकतारा आणि घुंगरू या वाद्यांचा किमान वापर करून ‘बाऊल’ सादर करण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये ही लोकपरंपरा विशेष लोकप्रिय आहे. तर पार्वती बाऊल या एकमेव महिला बाऊल कलावंत आहेत. विरक्ती व भक्तिपूर्ण बंगाली रचनातून त्यांनी बाऊलचे दर्शन घडवले. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समारोप आज
शारंगदेव महोत्सवाचा रविवारी समारोप होणार आहे. शेवटच्या दिवशी भाई बलदीप सिंग यांचे गुरबानी संगीत, पार्वती दत्ता यांचे कथक आणि नक्षत्र गुरुकूलचे गोटीपुआ नृत्य सादर होणार आहे. शारंगदेव प्रसंग कार्यक्रमात सकाळी पार्वती बाऊल व गुरू बुद्धदेव दास मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रसिकांचे अधीर मन झाले

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शास्त्रीय संगीत, सुगम संगीत आणि चित्रपट गीतांनी रसिकांना ठेका धरायला लावत देवगिरी महोत्सव गाजवला. देवगिरी महोत्सवात शनिवारी सायंकाळी आरती अंकलीकर आणि बेला शेंडे यांचे गायन रंगले. हजारो रसिकांच्या प्रतिसादाने संगीत मैफल बहारदार झाली.
मराठवाडा शिक्षण प्रसार मंडळाच्या देवगिरी महोत्सवात दुसऱ्या दिवशी शास्त्रीय व सुगम संगीत रजनी झाली. या मैफलीला प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर यांच्या गायनाने सुरुवात झाली. ‘जागू मै सारी रैना बलमा’ रचनेने अंकलीकर यांनी रसिकांना खिळवून ठेवले. संत तुकाराम रचित ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’ अभंगाने सांगता केली. दुसऱ्या सत्रात गायिका बेला शेंडे यांचे सुगम गायन झाले. ‘अप्सरा आली’ लावणी गाण्यास सुरुवात करताच रसिकांनी एकच जल्लोष केला. ‘राती अर्ध्या राती’, ‘का कळेना’, ‘मला वेड लागले प्रेमाचे’, ‘कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी’, ‘वाजले की बारा’ अशा लोकप्रिय गाण्यांनी बेला यांनी रसिकांचा उत्साह कायम ठेवला. श्रद्धा जोशी हिने ‘सत्यम शिवम सुंदरा’ आणि स्नेहल प्रधान हिने ‘अधीर मन झाले’ गीत सादर केले. स्वराज सरकटे, मुनव्वर अली, प्रा. डॉ. तुकाराम वांढरे, श्रावणी महाजन, श्वेता गरबडे, मनोज थोरे यांनी विविध गीते सादर केली. दरम्यान, या मैफलीचे उदघाटन पंडीतराव हर्षे यांनी केले. यावेळी पं. नाथराव नेरळकर व आरती अंकलीकर यांची उपस्थिती होती. गिरीजा गोळे व अस्मिता भारती यांनी इशस्तवन सादर केले.

समारोप आज
देवगिरी महोत्सवाचा रविवारी सायंकाळी समारोप होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचे पाच वाजता व्याख्यान होईल. तर सहा वाजता ‘महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रम रंगणार आहे. अभिनेत्री मानसी नाईक हिचे नृत्य, पांडुरंग घोटकर यांचे ढोलकीवादन, रामानंद उगले यांचा पोवाडा, चंदाताई तिवाडी यांचे भारूड असा भरगच्च कार्यक्रम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरधाव ट्रॅव्हल्स बसने इंजिनीअरला चिरडले!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रॉँग साइडने भरधाव जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने चिरडल्याने इंजिनीअर रूपेश शशी गोपालन (वय २५, रा. संगीता कॉलनी) यांचा मृत्यू झाला. नगरनाका येथील उड्डाणपुलाजवळ शनिवारी सकाळी हा अपघात झाला. रुपेशला नुकतीच वाळूज औद्योगिक वसाहतीतील एफडीसी कंपनीत नोकरी मिळाली होती. दरम्यान, बसचालकास अटक करण्यात आली आहे.

रुपेश गेल्या आठवड्यापासून रात्रपाळीसाठी जात होता. तो शनिवारी सकाळी साडेसातला वाळूजहून दुचाकीने नगरनाक्याच्या दिशेने जात होता. उड्डाणपूल उतरत असताना विरूद्ध दिशेने वेगाने येणाऱ्या विजयानंद ट्रॅव्हल्सच्या औरंगाबाद-पुणे बसने त्याच्या दुचाकीला समोरून धडक दिली. हेल्मेट असूनही समोरून धडक बसल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला. रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. जागरूक नागरिकांनी त्यास तातडीने घाटी हॉस्पिटलमध्ये नेले. माहिती मिळाल्यानंतर छावणी पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रल्हाद मोटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपघातग्रस्त दुचाकी आणि ट्रॅव्हल्स बस जप्त करून बसचालक गांगुलीला अटक केली.

मित्रांनी जागवल्या आठवणी

रॉँग साइडने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रॅव्हल्स बसने दुचाकीस्वाराला चिरडले. नगरनाका येथील उड्डाणपुलाजवळ शनिवारी झालेल्या ट्रॅव्हल्स अपघातात रूपेश शशी गोपालन यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने गोपालन कुटुंबावर आभाळ कोसळले असून, संगीता कॉलनी, नंदनवन कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मुळचा केरळ येथील रहिवासी असलेल्या रुपेश पालकांच्या नोकरीनिमित्त लहानपणापासून औरंगाबादेत राहत होता. छावणी येथील लिटील फ्लॉवर स्कूलमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर सरस्वती भवन कॉलेजातून तो बारावी पास झाला. त्यानंतर त्याने देवगिरी अभियांत्रिकी कॉलेजातून शिक्षण पूर्ण केले होते. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना प्रत्येक स्नेहसंमेलन रुपेशने गाजवले होते. २०१६ रुपेश व त्याच्या मित्रांचे अभियांत्रिकीचे शेवटचे वर्ष होते. शेवटच्या वर्षाच्या स्नेहसंमेलनात रुपेशने मात्र, त्यांच्या मैत्रीवर आधारीत ‘ना छोडे यारीया’ हे गाणे गायले होते. उत्कृष्ट गायक असलेला रूपेश हा चांगला गिटार वादक आणि राज्यस्तरीय बास्केट बॉलचा तो चॅम्पियनही होता. तो गाणेही लिहीत. त्याला स्वत:च्या गाण्यांचा अल्बम तयार करायचा होता, अशी माहिती त्याचा मित्र निखील गाडेकर याने दिली. तो लवकरच त्याच्या नजीकच्या मित्रांना केरळमधील मूळगावी सहलीसाठी घेऊन जाणार होता, असेही काही मित्रांनी सांगितले. मनमिळावू असलेला रुपेश दुचाकी नेहमी सावकाश चालवत तसेच नेहमी हेल्मेटचा वापर करत असे सांगताना त्याच्या मित्रांना अश्रू आवरणे कठीण झाले होते.

एकुलता एक होता रुपेश

रुपेशचे वडील कमलनयन बजाज हॉस्पिटमध्ये नोकरीस होते. काही दिवसांपूर्वीच ते सेवानिवृत्त झाले. रुपेशला दोन महिन्यांपूर्वीच वाळूज औद्योगिक वसाहतीतील एफडीसी कंपनीत नोकरीची संधी मिळाली होती. गेल्या महिन्यातच त्याने पहिले वेतन उचलले होते. तो एकुलता एक असल्याने आई-वडिलांना त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. सायंकाळी छावणीच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोन्याची पोत हिसकावली

0
0

सोन्याची पोत हिसकावली;
दाम्पत्यास अटक, कोठडी
पाण्या सांडल्यावरून घरात घुसुन केली मारहाण
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पाणी सांडण्याच्या कारणावरून घरात घुसून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत ५ ग्राम सोन्याची पोत हिसकावणाऱ्या दाम्पत्याला शनिवारी (२१ जानेवारी) अटक करण्यात आली. त्यांना रविवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, मंगळवारपर्यंत (२४ जानेवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एस. कोचर यांनी दिले.
या प्रकरणी नंदा साईनाथ औटे (३५, रा. शिवाजीनगर, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २१ जानेवारी २०१७ रोजी गल्लीमध्ये पाणी सांडल्याचा आरोपी करीत आरोपी जाहेदाबी हसन पठाण (३५. रा. इंदिरानगर, औरंगाबाद) आणि तिचा पती व आरोपी हसन पठाण कासम पठाण (३६, रा. वरीलप्रमाणे) यांनी फिर्यादीच्या घरात घुसुन फिर्यादीसह तिच्या मुलांना शिविगाळ व मारहाण केली. घरातील सामान अस्ताव्यस्त फेकले. तसेच फिर्यादीच्या गळ्यातील ५ ग्राम सोन्याची (१४ हजार रुपये) पोत हिसकावून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होऊन दोघांना शनिवारी अटक करण्यात आली. त्यांना रविवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रागदारींच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
योगीराज संगीत अकादमीतर्फे आयोजित उस्ताद डॉ. गुलाम रसुल संगीत महोत्सवात रविवारी विविध रागदारींच्या सुरावटींनी रसिक मंत्रमुग्ध झाले. तापडिया नाट्य मंदिरात आयोजित या महोत्सवाचे हे यंदाचे सातवे वर्ष आहे. उस्तादजींच्या सुमधुर आवाजातील ध्वनीफितींने व खाँ साहेबांच्या जीवन परिचयाने महोत्सवाची सुरूवात झाली. यानंतर विविध कलाकारांनी सुमधूर गायन व बासरीवादनाने रसिकांना सुंदर अनुभूती ‌दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुषार तोत्रे यांच्या ‘मधुवंती’ रागातील ‘सुनिये नाऽऽ...’ या बडा ख्यालाने व ‘पिया बिन नैना या छोटा ख्यालाने उत्तम वातावरण निर्मिती केली. त्यांनतर त्यांनी स्वत: संगीत दिलेले ‘इतुकी कृपा करावी’ हे भजन सादर केले. बासरीवादक निरंजन भालेराव यांच्या ‘हंसध्वनी’ रागाने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली. संगीत अकादमीच्या स‍ंचालिका मीनाक्षी चौधरी यांनी राग मेघ मधील ‘आस लगी...’ या बडा ख्यालाने सुरुवात केली. ‘बरसन लागी कारी छटाएँ’ या बंदिशीने रसिकांना अक्षरश: चिंब केले. डॉ. गुलाम रसुल खाँ यांनी रचलेले व संगीत दिलेले भजन ‘मन लागो मेरो यार फकिरीमे’ गुरुजींना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरले. डॉ. पराग चौधरी यांनी राग ‘रागेश्री’ने आपले गुरू डॉ. गुलाम रसुल यांच्या चरणी सेवा अर्पण केली. रागेश्री रागातील ‘कैसे बितेगी’ हा बडा ख्याल, व ‘आया मौसम बहार रे..’ या छोटा ख्यालाने कार्यक्रमाला एक उंचीवर नेऊन ठेवले. यानंतर याच रागातील ठुमरी ‘छोडके न जाओ सैया’, रसिकांसाठी पर्वणी ठरली.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण किराणा घराण्यातील प्रसिद्ध गायक पंडित कृष्णेंद्र वाडीकर यांचे गायन कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू ठरला. त्यांनी विविध रागदारी गाऊन किराणा घराण्यातील खासियत दाखवून दिली. याआधी त्यांच्या हस्ते पराग चौधरींच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘साद अंतरीची’ ध्वनीफितीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी दिलीप दोडके, योगरेश हरबक यांनी संवादिनीवर, तर शोण पाटील, शिवाजी आर्दड यांनी तबल्यावर साथसंगत केली. यावेळी डॉ. श्रीराम चौधरी, उद्‍घाटक संजय बारगजे, डॉ. जितेन कुलकर्णी, दिवाकर कुलकर्णी, डॉ. अनंत कडेठाणकर, ए.जी. वाडेकर, डी. आर. कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रकाश मुधळवाडकर यांनी केले, तर डॉ. पराग चौधरी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघाच्या कार्यालयात महिलांकडून शाईफेक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समर्थनगर येथील ‘प्रल्हाद भवन’ या कार्यालयात व कार्यालयाच्या प्रांगणात अज्ञात महिलांकडून रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास शाई फेकण्यात आली. कार्यालयात शिरलेल्या या महिलांनी काही स्वयंसेवकांसोबत हुज्जत घालून ‘तुमच्या आरक्षणाबाबत असलेल्या भूमिकेचा निषेध करतो,’ असे बजावले.

संघ कार्यालयात घडलेल्या या घटनेमुळे स्वयंसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे. ही घटना कार्यालयातील स्वयंसेवकांनी सर्व वरिष्ठ पदाधिकारी, शहरसंघचालक डॉ. उपेंद्र अष्टपुत्रे, वामनराव देशपांडे, दिवाकर कुलकर्णी, राजेश लेहेकर यांना कळवली. दिवाकर कुलकर्णी, राजेश लेहेकर आणि पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात धाव घेऊन माहिती घेतली. संघ कार्यालयात शाई फेकल्याची माहिती पसरल्याने अनेकांकडून त्याबद्दल विचारणा करण्यात आली. क्रांतिचौक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात येऊन या प्रकरणाची चौकशी केली. परंतु, याबद्दल पोलिसांत तक्रार देण्यात आलेली नाही. याशिवाय पोलिस बंदोबस्त मागितला नाही. दरम्यान, या प्रकारानंतर पोलिसांनी संघ कार्यालयावर लक्ष ठेवले असून रात्री बरेच संघ पदाधिकारी एकमेकांच्या संपर्कात होते. संघ कार्यालयात आलेल्या महिलांना स्वयंसेवकांनी ‘आपण कार्यालयात बसून बोलू,’ अशी विनंती केली. त्यांना पाणी पिण्याबद्दल विचारणा केली. पण, त्यांची विनंती धुडकावून त्या महिला निघून गेल्या. त्यानंतर स्वयंसेवकांनी कार्यालय धुवून काढले.

संघाकडून भूमिका स्पष्ट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सायंकाळी अखिल भारतीय प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांच्या आरक्षणाविषयक वक्तव्याबद्दल काहीही उल्लेख न करता सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्याचे पत्रक जारी केले. ‘राज्य घटनेनुसार देशात सर्वांना आरक्षण मिळाले पाहिजे. राज्य घटनेला आम्ही सर्वोच्च मानतो, त्यानुसार एस. सी. , एस. टी. प्रवर्ग आणि इतर जातींना दिलेले आरक्षण सर्वांना मिळायलाच हवे,’ अशी भूमिका होसबळे यांच्या नावे जारी केलेल्या पत्रकात मांडण्यात आली आहे, असे स्थानिक प्रचार-प्रसार प्रमुख राजेश लेहेकर यांनी ‘म.टा’ शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवगिरी महोत्सवात लोककलांना मुजरा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गणेशाची आराधना करणारा गण, भन्नाट लावण्यांची शृंखला, तरुणात त्वेष निर्माण करणारा पोवाडा, प्रबोधन करणारे भारूड आणि आध्यात्मिक गोंधळाने देवगिरी महोत्सव रसिकांसाठी अविस्मरणीय पर्वणी ठरला. मराठी लोककलांच्या बहारदार सादरीकरणाने तीन दिवसांच्या महोत्सवाचा थाटात समारोप झाला. या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी हजारो रसिक उपस्थित होते.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित देवगिरी महोत्सवात रविवारी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा कार्यक्रम विशेष रंगला. शाहीर रामानंद उगले यांच्या ‘या नाचत अंगणी’ या गणाने महोत्सव सुरू झाला. मराठी लोककलांचा अस्सल आविष्कार दाखवत कलाकारांनी अवघे चैतन्य निर्माण केले. ‘मीच एक राधा गवळ्याची’ ही गवळण सुप्रिया कुलकर्णी, वर्षा मस्के, मीनल कुलकर्णी व स्वाती म्हेत्रे यांनी सादर केली. ‘वाटलं होतं तुम्ही याल’ या ठसकेबाज लावणीसाठी भूमिका चांदजकर हिने रसिकांची भरभरून दाद मिळवली. रामानंद यांनी ‘गाडी घुंगराची’ हे लोकगीत ठसक्यात सादर केले. छत्रपती संभाजी महाराज यांचा पोवाडा सादर करून रामानंदने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले. ‘धर्मासाठी प्राण अर्पिला, शंभूराजाही चालला’ या ओळीने अवघे वातावरण भावूक झाले. स्वराज्य आणि स्वधर्मासाठी बलिदान दिलेल्या शंभूराजांचा जाज्ज्वल्य इतिहास रामानंद यांनी खड्या आवाजात उभा केला. डॉ. अनिलकुमार साळवे लिखित ‘कब होगी सुबह’ प्रहसन दाद घेऊन गेले. प्रसिद्ध भारूडकार चंदाताई तिवाडी यांचे भारूड साध्या शब्दातून थेट प्रबोधन करून गेले. ‘बये तुला बुरगुंडा होईल गं’, ‘नाथांच्या घरच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून’ अशा भारूडांनी त्यांनी उत्साह वाढवला. रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता असलेल्या अभिनेत्री मानसी नाईक हिने ठसकेबाज लावणीने रंगमंचावर आगमन केले. ‘या रावजी बसा भावजी’, ‘बाई मी ऐवज हवाली केला’, ‘मी साताऱ्याची गुलछडी’ अशा भन्नाट लावण्यांवर बेफाम नृत्य करीत मानसीने रसिकांना वेड लावले. ‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’ अशा लोकप्रिय लावण्यांनी तिने समारोप केला. नारायण धोंगडे यांच्या गोंधळाने महोत्सवाची सांगता झाली. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू बी. ए. चोपडे, ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे, स्थानिक नियामक मंडळाचे अध्यक्ष पंडीतराव हर्षे आणि पांडुरंग घोटकर यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी हजारो रसिक उपस्थित होते.

मानसीची धावपळ
आपल्या बेफाम नृत्याने मानसी नाईकने महोत्सवात रंगत आणली. नाचत असताना तिने थेट प्रेक्षकांमध्ये प्रवेश केला. त्यामुळे तिला बघण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी एकच झुंबड उडाली. या अनपेक्षित प्रकारामुळे पोलिस आणि बाउंसरची धावपळ उडाली. पुढील वर्षीसुद्धा महोत्सवात यायला आवडेल असे तिने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबाद बसस्थानकाचा ‘फाइव्ह स्टार लूक’ गुलदस्त्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
‘बीओटी’च्या नावाखाली सुरू असलेली दुकानदारी चालू देणार नाही, या परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या इशाऱ्यामुळे आता उस्मानाबाद बसस्थानकाच्या आधुनिकीकरणाचे (फाइव्ह स्टार लूक) काम प्रत्यक्षात कधी सुरू होईल, याबद्दल साशंकताच आहे.
लोकशाही आघाडी सरकारने राज्यभरातील एसटी महामंडळाच्या डेपोंना आधुनिकीकरणाच्या नावाखाली ‘बीओटी’ तत्वावर दिलेली परवानगी थांबविली. यामुळे उस्मानाबाद बीडच्या बसस्थानकाच्या भूमिपुजनावर करण्यात आलेली खर्चाची उधळपट्टी वाया गेल्यातच जमा आहे. एसटी महामंडळाच्या मालमतेचा कल्पकतेने वापर केल्यास जनतेची ही मालमता कुठल्याही खासगी कंपनीच्या घरात जाणार नाही तसेच एसटीला देखील आर्थिक स्थैर्य मिळेल. व स्वावलंबत्व प्राप्त होईल, असे परिवहन मंत्री रावते यांचे मत आहे.
लोकशाही आघाडी सरकारने राज्यातील महत्त्वाच्या शहरात असलेल्या एसटी डेपोची जागा व्यावसायिक तत्वावर खासगी व्यावसायिकांनी देण्याचा निर्णय घेतला होता. ‘बीओटी’ तत्वावर सुरू करण्यात येत असलेल्या योजनेमुळे राज्यातील एसटी डेपोसह बस स्थानकाचे आधुनिकीकरण होईल, असे आघाडी सरकारने पांढरे झाल्याचे भाजप शिवसेना सरकारला वाटते. उस्मानाबाद बस स्थानकाला पंचतारांकित लूक देण्याच्या कामाची सुरुवात करून आता सुमारे अडीच वर्षाचा कालावधी लोटला. मात्र, अद्यापही या कामासंदर्भात कोणताही हालचाल होताना दिसत नाही.
२४ ऑगस्ट २०१४ रोजी उस्मानाबाद बसस्थानकात पंचतारांकित लूक देण्याच्या या कामाचे श्रेय लाटण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न व त्यानंतर परिवहन मंत्री दिवकर रावते यांचा बीओटीच्या दुकानदारीला होणारा विरोध पाहाता उस्मानाबाद बस स्थानकाचे तसेच बीडच्या बसस्थानकाचे काम प्रत्यक्षात सुरू होईल किंवा नाही हे सांगता येत नाही, असे येथील विभाग नियंत्रक कार्यालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

अडीच वर्षांपासून काम रखडले
२४ ऑगस्ट २०१४ रोजीच्या कामाच्या उद्घाटन भूमिपूजन सोहळ्यात या कामांची तात्काळ सुरूवात करण्याची ग्वाही सोलापूर येथील ठेका घेतलेल्या भारत कन्स्ट्रक्शन कंपनीच्यावतीने देण्यात आली होती. मात्र, गेल्या अडीच वर्षांपासून हे काम रखडलेलेच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युती, आघाडीत चर्चेचे गुऱ्हाळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप व शिवसेनेची युतीमधील जागांबाबत एकमत होत नसल्याने बोलणी सोमवारी करण्याचे ठरले. तर काँग्रेससोबत राष्ट्रवादीकडून आघाडी करण्याबाबत अशीच चालढकल सुरू आहे. ग्रामीण भागातील राजकारणात कार्यकर्त्यांच्या करीअरसाठी महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत युती आणि आघाडीच्या तडजोडीच्या समीकरणाची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
भाजपच्या स्थानिक पातळीवरील राजकारणात आता पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सोबत युती करण्यासाठी चर्चा सुरू आहे. भाजपच्यावतीने जिल्हा परिषदेच्या ४१ जागा व पंचायत समितीच्या ८५ जागांवर उमेदवार उभे करण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांना प्रस्ताव देण्यात आला आहे तर शिवसेनेच्यावतीने भाजपच्या वाट्याला २९ जिल्हा परिषदेच्या जागा व ६४ पंचायत समितीच्या जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या स्थानिक पातळीवरील जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणूकीच्या जागा वाटपाची प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. यात काँग्रेसच्यावतीने जिल्हा परिषदेच्या २५ जागा व पंचायत समितीच्या ५० जागा सोडून देण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषदेच्या २० जागा देण्याची तयारी आहे. पाच जागांबाबत बोलणी सुरू आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी आघाडी करण्याचा आग्रह धरला आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना फार प्रतिसाद दिला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रस्थापित नेत्यांच्या वर्चस्वाला कायम स्वरूपी पुन्हा एकदा पाच वर्षांचे स्थैर्य मिळेल याची रचना लावण्यात दिग्गज नेते सध्याच्या घडीला दंग आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे यांनी रेवगाव सर्कलमध्ये भाजपच्यावतीने उमेदवारी जाहीर केली आहे. आता याच ठिकाणी शिवसेनेच्यावतीने सेनेतील महत्वाचे नेते अनिरूद्ध खोतकर हे पदसिद्ध सदस्य आहेत. त्यामुळे या जागेवर वाद निर्माण झाला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या कन्या आशा पांडे-दानवे यांनी सोयगाव या जिल्हा परिषदेच्या सर्कलमध्ये उमेदवारी मागितली. त्या सोयगावच्या सरपंच आहेत. जिल्ह्यातील राजकारणात अग्रेसिव्ह होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
भाजपच्यावतीने पालकमंत्री बबनराव लोणीकर हे रविवारी परभणी येथे दौऱ्यावर होते तर शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे उपलब्ध नसल्याने स्थानिक पातळीवरील जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे, अनिरुद्ध खोतकर तर भाजपच्यावतीने जिल्हा अध्यक्ष रामेश्वर भांदरगे, जिल्हा सरचिटणीस देविदास देशमुख यांनी एकत्रितपणे चर्चा केल्यानंतर पुढच्या वेळी नेमक्या जागांबाबत एकमत होत नसल्याने बोलणी सोमवारी करण्याचे ठरले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

नेत्यांच्या निवडणुका बिनविरोध, कार्यकर्त्यांसाठी खलबते
जिल्ह्यातील राजकारणात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे, राहूल लोणीकर व संदीप गोरे हे तीन भाजपचे संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. जिल्हा बँकेच्या राजकारणात गटातटाच्या बाजारात नेत्यांच्या स्थानिक पातळीवरील एकजूटीचे स्पष्ट चित्र दिसत आहे तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मात्र, युतीच्या चर्चा आणि वाटाघाटीची खलबते रंगू लागली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नेट’ नव्हे वैतागवाडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अधिव्याख्यातापदासाठी राष्ट्रीय पातळीवर रविवारी झालेली ‘नेट’ परीक्षा औरंगाबाद केंद्रावरील विद्यार्थ्यांना वैतागवाडी ठरली. परीक्षेसाठी बाहेरगावाहून आलेल्या हजारो विद्यार्थ्यांची रेल्वेस्थानक, बसस्थानकापासून १८, २० किलोमिटर दूर असलेली परीक्षा केंद्र शोधताना, तेथे पोचाताना दमछाक झाली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या या परीक्षेत नियोजनाचा गोंधळा उडाल्याने परीक्षार्थींना मोठा त्रास सहन करावा लागला.
‘सीबीएसई’तर्फे रविवारी देशभर अधिव्याख्यातापदासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) घेण्यात आली. औरंगाबाद केंद्रावरून परीक्षेला बसलेल्या परीक्षार्थींना सीबीएसईच्या नियोजनशून्य कारभाराचा मोठा त्रास सहन करावा लागला. परीक्षेची अनेक केंद्र शहराबाहेर होते. त्या केंद्रांवर पोचण्यासाठी परीक्षर्थींना मोठी कसरत करावी लागली. बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक त्रास झाला. चिकलठाणा, शेंद्रा एमआयडीसीजवळील पोखरी अशा दूर-दूरच्या शाळांमध्ये परीक्षा केंद्र होते. त्या केंद्रांवर वेळेत पोचताना बाहेरगावच्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. नांदेडहून आलेले सुनील जाधव यांचे परीक्षा केंद्र ‘पीएसबीए’ होते. मुख्य बसस्थानकावरून ८ वाजता निघालेले जाधव सव्वानऊ वाजता शाळेजवळ पोचले. त्यातही ऑटोचालकाने रस्त्यावरच सोडल्याने त्यांना धावतपळत केंद्र गाठावे लागले. तशीच स्थिती अनेकांची झाली. त्यात परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर अनेकांना पेन, पेन्सिल स्वतःला आणायचे असे सांगण्यात आले. हॉल तिकिटावर मात्र, पेन दिला जाईल, अशा सूचना होत्या. त्यामुळेही परीक्षेत गोंधळ उडाला.

केंद्र १८ ते २० किलोमीटरवर
‘सीबीएसई’तर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेत केंद्र शहरापासून दूर-दूर देण्यात आले. काही शाळांचे केंद्र तर १८ ते २० किलोमीटरपर्यंत दूर होते. बाहेरगावाहून आलेल्यांना फारशी माहिती नसल्याने संबंधित केंद्र कोठे आहे, याची माहिती मिळविण्यापासून तेथे पोहचण्यापर्यंत त्यांना धावपळ करावी लागली. अनेकांना वेळेत पोचता आले नाही. रात्रभर प्रवास करून आलेल्या आणि धावपळीतून केंद्रावर पोचल्यानंतर पेपर सोडविण्यासाठी कशी मानसिकता असेल, याचा विचार होणे अपेक्षित असल्याचे परीक्षार्थी म्हणाले. यंदा डॉ. वाय. एस. खेडकर स्कूलकडे समन्वयाची जबाबदारी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले, परंतु शाळा व्यवस्थापन याबाबत काहीही सांगण्यास तयार नव्हते.

बेंच छोटे, पेपर सोडतानाही अडचणी
देशपातळीवर ‘सीबीएसई’कडे या परीक्षेचे नियोजन आहे. त्यामुळे परीक्षा केंद्र देताना सीबीएसई शाळांना प्राधान्य देण्यात आले. शाळांमध्ये प्राथमिक, माध्यमिक स्तरांवरील विद्यार्थी असतात. त्यांच्या सोयीनुसार शाळेत बेंच असतात. अनेक शाळांमध्ये बसण्यासाठी परीक्षार्थींना बेंच अपुरे पडले.

ऑटोचालकांचा धंदा तेजीत
अनेक परीक्षा केंद्र शहरापासून दूर असल्याने केंद्र शोधण्यासाठी परीक्षार्थींनी ऑटोची मदत घेतली. त्यासाठी त्यांना जास्तीची किंमतही मोजावी लागली. बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांचा याचा सर्वाधिक फटका बसला. काही ऑटोचालकांनी २५० रुपयांपासून ते ४०० रुपयापर्यंत भाडे आकारले. काही परीक्षार्थी मिळून गाडी करून आपल्या गावाहून आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलचाचणी ९ फेब्रुवारीपासून

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दहावीनंतर कोणते करिअर निवडावे, याबाबत विद्यार्थ्याला मार्गदर्शन व्हावे म्हणून यावर्षी येत्या ९ फेब्रुवारीपासून कलचाचणी घेण्यात येणार आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, कला, फाइन आर्ट, वाणिज्यसह यंदा कृषी आणि संरक्षण या दोन नव्या क्षेत्रांचा कलचाचणीत समावेश करण्यात आला आहे.
शालेय शिक्षणानंतर करिअर निवडताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे, यासाठी त्यांचा कल जाणून त्याप्रमाणे क्षेत्र सुचविणारी कलचाचणी मागील वर्षापासून राज्यभरात सुरू झाली. मार्गदर्शन व निवड संस्थेतर्फे मानसशास्त्रीय चाचणीद्वारे हा कल जाणून घेतला जातो. दहावीची परीक्षा ७ मार्चपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर यावर्षी ९ फेब्रुवारीपासून राज्यभरात कलचाचणी परीक्षा होत आहे. ही चाचणी ३ मार्चपर्यंत घेतली जाणार आहे. मागील वर्षी पाच क्षेत्रांसाठी कलचाचणी घेण्यात येत होती. यावर्षी त्यात बदल करण्यात येणार आहे. तशा सूचना शिक्षण उपसंचालक, विभागीय शिक्षण मंडळ कार्यालयांना देण्यात आले आहे.
मागील वर्षी कलचाचणीला उशीर झाला होता. त्यानंतरही लाखो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला. कलचाचणीनंतर प्रगती पुस्तकावर संबंधित विद्यार्थ्याचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे, याचा उल्लेख करण्यात येतो.

७ क्षेत्र, सोडवावे लागणार २१० प्रश्न
कृषी, संरक्षण या दोन क्षेत्रांचा कलचाचणीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकेचे स्वरुपही बदलणार आहे. प्रत्येक क्षेत्रासाठी ३० प्रश्न विचारण्यात यायचे, त्यासाठी एक तास वेळ दिला जायचा. दोन क्षेत्राची वाढ झाल्याने आता विद्यार्थ्याला एकूण २१० प्रश्न सोडवावे लागणार आहेत. त्यासाठी वेळही वाढवून दिला जाणार आहे. त्याचे स्वरूप आणि वेळापत्रकाच्या नियोजनाची प्रक्रिया सुरू आहे.

कृषी, संरक्षणातील कलही समजणार
मागील वर्षी कलचाचणी पहिल्यांदा घेण्यात आली. राज्यभरातील सुमारे १६ लाख विद्यर्थ्यांनी ही परीक्षा दिली. वैद्यकीय, अभियांत्रिकी, कला, वाणिज्य, ललित कला, या क्षेत्रासाठी ही परीक्षा घेण्यात आली. यंदा त्यात कृषी, संरक्षण क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. कृषीप्रधान देश आणि संरक्षणाकडे वाढता कल लक्षात घेत या दोन क्षेत्रांचा समावेश करण्यात आल्याचे सूत्रांनी ‘मटा’ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चार तासांच्या प्लॅनिंगमुळे अधिकारी जाळ्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्वच्छता अभियानांतर्गत औरंगाबाद महापालिकेने केलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्र सरकारच्या क्वालिटी कंट्रोल अॅश्युरन्स सेलचे अधिकारी चार तासांच्या प्लॅनिंग गळाला लागले. या अधिकाऱ्यांच्या कारनाम्यांची तक्रार राज्य व केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.
स्वच्छता अभियानाअंतर्गत महापालिकेने केलेल्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्र सरकारच्या क्वालिटी कंट्रोल अॅश्युरन्स सेलचे शैलेश बजानिया, विजय जोशी, गोविंद घिमरे हे तीन अधिकारी दोन दिवसांपूर्वी शहरात आले होते. शुक्रवारी, शनिवारी त्यांनी शहराच्या विविध भागात फिरून कामाची पाहणी केली. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास या अधिकाऱ्यांची आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्याबरोबर बैठक झाली. यावेळी पलिकेच्या घनकचरा व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी देखील उपस्थित होते. बैठक झाल्यानंतर अधिकारी हॉटेल रामा इंटरनॅशनलकडे रवाना झाले. त्यांच्याबरोबर डॉ. जयश्री कुलकर्णी, प्रमोद खोब्रागडे होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; याचदरम्यान त्यांनी आपला प्रस्ताव पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर मांडला. औरंगाबादचा क्रमांक पहिल्या २०मध्ये आणायचा असेल तर अडीच लाख रुपये द्या, अशी मागणी त्यांनी केली. या अजब प्रस्तावामुळे पालिकेचे अधिकारी अवाक् झाले. ‘विचार करू,’ असे सांगून त्यांनी तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर ते थेट आयुक्तांकडे आले. आयुक्तांना त्यांनी पथकातील अधिकाऱ्याची ऑफर सांगितली. आयुक्तांनी ही ऑफर गांभीर्याने घेतली आणि त्या अधिकाऱ्याला जाळ्यात अडकवण्याचा प्लान त्यांनी केला.
रात्री आठच्या सुमारास काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी पाठवले. सुमारे एक तासाच्या चर्चेनंतर १ लाख ७० हजार रुपये घेऊन पालिकेचे रँकिंग पहिल्या २०मध्ये करून देण्याचे मान्य केले. ही माहिती पुन्हा आयुक्तांना देण्यात आली. दरम्यानच्या काळात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना आयुक्तांनी बोलावून घेतले. त्यांना आपला प्लान त्यांनी सांगितला. ‘त्या अधिकाऱ्यांचे ऑपरेशन होईपर्यंत कुणाही कुणाचा फोन घ्यायचा नाही, एकमेकांशी चर्चा करायची नाही. केवळ आयुक्तांचेच आदेश ऐकायचे,’ असे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानंतर त्या अधिकाऱ्यांना जेवणासाठी साडेनऊ-दहाच्या सुमारास हॉटेल अजिंठा अॅम्बेसेडरमध्ये येण्याचे निमंत्रण देण्यात आले. ‘जेवण झाल्यावर कबूल केलेली रक्कम तुम्हाला देऊ,’ असे सांगण्यात आले. १ लाख ७० हजारांच्या लालचीने ते तिघेही जेवणासाठी अॅम्बेसेडर हॉटेलमध्ये आले. हे सर्व होत असताना आयुक्तांनी स्वतः लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या सहाय्यक आयुक्तांना फोनवरून संपर्क साधला आणि लाच घेताना त्या अधिकाऱ्यांना पकडण्याची विनंती केली. त्यानुसार रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास सापळा लावण्यात आला. आणि पावणेअकरा ते अकरादरम्यान सुमारास शैलेश बंजानिया याला रक्कम स्वीकारताना पकडले. त्याच्याबरोबर अन्य दोन अधिकारी होते. रात्री आठ ते अकरापर्यंत चाललेले हे लाचखोरीचे नाट्य त्या अधिकाऱ्याच्या अटकेनंतर संपले.

सरकारकडे तक्रार
लाचखोर अधिकाऱ्यांना पकडल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी स्वतः तक्रार केली. ‘मटा’शी बोलताना बकोरिया म्हणाले, ‘स्वच्छतेच्या कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या त्या अधिकाऱ्यांकडून अशी अपेक्षा नव्हती. त्यांनी पहिल्या २०मध्ये शहराचा क्रमांक लावण्यासाठी पैशाची मागणी केली. त्यामुळे आम्हाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करावी लागली.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२६ जानेवारीला महारक्तदान शिबिर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सतर्फे आचार्य डॉ. श्री शिवमुनिजी यांच्या हीरक जन्मोत्सव व २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून देशपातळीवर रक्तदान ‌‌शिबिराचे अायोजन करण्यात अाले अाहे. यात १ लाख ११ हजार १११ बाटल्यांचा रक्तसंकलनाचा उद्देश असल्याची माहिती रवी छाजेड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ‘या महारक्तदान शिबिराचा एक भाग म्हणून शहरात २६ जानेवारीला शहरात ११ हजार बाटल्या रक्तसंकलनाचा उद्देश अाहे. शहरात २० ठिकाणी शिबिर घेण्यात येणार आहे. सकाळी नऊ वाजता पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते होणार आहे. रक्तदानाबाबत २४ व २५ तारखेला जनजागृती करण्यात येणार आहे. २४ रोजी सकाळी दहा वाजता चिंतामणी कॉलनीतून फेरीला प्रारंभ होईल. साडेअकरा वाजता पैठण गेट येथून फेरीला सुरुवात होईल. २५ रोजी त्रिमूर्ती चौकतून फेरी सुरू होईल. दुसरी फेरी साडेअकरा वाजता हडको येथील जैस्वाल मंगल कार्यालयापासून सुरू होणार आहे.’
महावीर भवन कुंभारवाडा, अग्रवाल मंगल कार्यालय पानदरिबा, चंद्रसागर धर्मशाळा, साधना भवन हडको, अहिंसा भवन, महावीर एनएक्स रोड पुंडलिकनगर, वर्धमान रेसिडेन्सी उल्कानगरी, बालाजीनगर, अरिहंतनगर जैन मंदिर परिसर, अग्रसेन भवन, विश्वरूप मंगल कार्यालय, पगारिया कॉलनी, वेदांतनगर, कलश मंगल कार्यालय, छावणी जैन स्थानक संघ, डीकेएमएम कॉलेज, जैन स्थानक, सातारा परिसर, उल्कानगरी मे फेयर, प्रोझोन मॉल आदी २० ठिकाणी रक्तदान शिबिर होणार आहे. शिबिरासाठी नऊ रक्तपेढ्यांचे सहकार्य ‌मिळाले असल्याचे यावेळी सांगण्यात अाले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१८ बनावट नोटा जप्त!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शहरात दोन हजारांच्या बनावट नोटा चालवणारे रॅकेट उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेने बनावट नोटा चलनात आणणाऱ्या घाटीच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याला अटक करून दोन हजारांच्या १८ नोटा जप्त केल्या. नोटाबंदी झाल्यानंतर त्याने साथीदारांच्या मदतीने हा प्रकार सुरू केला होता. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपी महंमद इर्शाद महंमद इसाक (वय २७, रा. जाफरी मशिदीमागे, शहा बाजार) हा शहरात गेल्या काही दिवसांपासून बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती खबऱ्याने गुन्हे शाखेला दिली होती. या माहितीवरून पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती. रविवारी दुपारी तीन वाजता सेंट्रला नाका परिसरात असलेल्या फिश मार्केट येथे इर्शाद नोटा चालवण्यासाठी येणार होता. पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ दोन हजारांच्या १८ नोटा आढळल्या. आरोपी इर्शादविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त संदिप आटोळे, एसीपी खुशालचंद बाहेती, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विजय जाधव, सहायक फौजदान नसीम पठाण, विजयानंद गवळी, विशाल सोनवणे, प्रदिप शिंदे, नवाब शेख, रवि दाभाडे, भाऊसाहेब चव्हाण व एजाजखान यांनी केली.

अंबडपर्यंत धागेदोरे
आरोपी इर्शादने साथीदाराच्या मदतीने या नोटा तयार करून मार्केटला चलनात आणल्याची कबुली दिली. मुख्य सूत्रधार अंबड येथील असून, तेथे बनावट नोटा तयार करून त्या चालनात आणण्यासाठी इर्शादला देण्यात येत होत्या. नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे स्कॅनर जप्त करणे बाकी असून, मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, या रॅकेटमधील आणखी एका संशयिताला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.

इर्शादने चालवल्या शंभराच्या नोटा
दोन वर्षांपूर्वी देखील आरोपी इर्शादने शंभर रुपयांच्या बनावट नोटा तयार करून त्या मार्केटमध्ये चलनात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या नोटांचा दर्जा खराब होता. त्यामुळे त्या नोटा ओळखू येत असल्याने त्याने हा प्रकार बंद केला. यासंदर्भात त्याच्यावर कोणताही गुन्हा त्यावेळी दाखल झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

३०हजारांत ०१लाख
बनावट नोटा तयार करून चालवणारे हे रॅकेट आहे. स्कॅनरमध्ये चांगल्या प्रतिचा कागद वापरून या नोटा स्कॅन करण्यात येतात. खऱ्या चलनातील ३० हजार रुपये घेऊन एक लाख रुपये मूल्याचा बनावट नोटा देण्यात येत होत्या. नोटाबंदी झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसांत दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा तयार करून मार्केटला चालवण्यात आल्या. आतापर्यंत आरोपी इर्शादने दीड लाख रुपयांहून अधिक मूल्याच्या बनावट नोटा मार्केटला चालवल्या असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिली.

केंद्र म्हणते, बनावट चलन नाही
नोटबंदीच्या फायद्यांची यादी देताना, केंद्रीय अर्थ मंत्रालयाने या निर्णयानंतर देशामध्ये बनावट नोटा अजिबात सापडलेल्या नाहीत, असे सांगितले आहे. त्यामुळे, दहशतवाद्यांना होणारा अर्थपुरवठा आणि बनावट चलन या दोन्ही आघाड्यांवर यश मिळाल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र, या दाव्यानंतर काही वेळामध्येच औरंगाबादमध्ये बनावट नोटा सापडल्या आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या दाव्यानुसार, ‘देशात आठ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या काळामध्ये बनावट नोटा अजिबात सापडलेल्या नाहीत. तसेच, दहशतवादी किंवा तस्करांच्या टोळ्यांकडेही चलन सापडल्याचे दिसून आले नाही. देशातील मौल्यवान संपत्ती जाहीर करण्याचे प्रमाण १०० टक्क्यांनी, तर दडवलेली संपत्ती जाहीर करण्याचे प्रमाण ५१ टक्क्यांनी वाढले आहे. तसेच, कर संकलनामध्ये मोठी वाढ झाली आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोर अधिकाऱ्याला कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील स्वच्छतेचे रँकिंग वाढून देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या आणि एक लाख ७० हजारांची लाच स्वीकारताना पडकण्यात आलेल्या केंद्रीय पथकातील अधिकारी शैलेश बजानिया याला मंगळवारपर्यंत (२४ जानेवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष सत्र न्यायाधीश व्ही. एस. पाडळकर यांनी दिले.
अभियानांतर्गत महापालिकेने केलेल्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्रीय पथकातील अधिकारी शहरात आले होते. या पथकामध्ये वरिष्ठ मूल्यमापक शैलेश पुरुषोत्तम बजानिया, विजय जोशी व गोविंद घिमिरे यांचा समावेश होता. शहराचे रँकिंग वाढवून देण्यासाठी बजानिया याने पालिकेच्या अधिकाऱ्याला पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना दिली. त्यानंतर लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्यात येऊन ट्रॅप लावण्यात आला आणि १ लाख ७० हजारांची लाच स्वीकारताना बजानिया याला शनिवारी रात्री हॉटेल अॅम्बेसेडर येथे पकडण्यात आले.
रविवारी सकाळी आरोपी बजानिया याच्यावर सिडको पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली. त्याला रविवारी कोर्टात हजर करण्यात आले.

अन्य गैरप्रकार शोधणार
आरोपी बजानिया याच्या पँटच्या खिशाला आणि हाताला आंत्रासिनची पावडर आढळून आल्याचे कोर्टाचे निदर्शनास आणून देण्यात आले. अशा प्रकारे आरोपीने अन्यत्र कुठे गैरप्रकार केले आहेत का, त्याची कोणत्या एजन्सीमार्फत नियुक्ती करण्यात आली होती; तसेच आरोपी हा सुरत (गुजरात) येथील असल्याने तेथील माहिती घेणे बाकी आहे. त्यामुळे आरोपीला दोन दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती मुख्य सरकारी वकील शिवाजी नवले यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपीला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच दरोडेखोर जेरबंद

0
0

गावठी कट्ट्यासह दारुचा साठा जप्त

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोपरगावावरून परतवाड्याकडे जात असलेल्या ट्रकला गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुबाडणाऱ्या पाच दरोडेखोरांना ग्रामीण गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली आहे. सोमवारी रात्री वैजापूर शिवारातील बेलगाव येथे ही घटना घडली होती. आरोपींच्या ताब्यातून गावठी कट्टा, दोन काडतूस, दारुचे सहाशे बॉक्स तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहे.
सिद्धेश्वर दत्तात्रय घुगे (वय ३२, रा. लोणार) हा ट्रकचालक सोमवारी क्लीनर राजू इंगोलेसह कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथून देशी दारुचे एक हजार २५० बॉक्स घेऊन अमरावती परतवाड्याकडे निघाला होता. बेलगाव शिवाराजवळ दोन दुचाकीवर आलेल्या सहा जणांनी त्यांचा ट्रक अडवला. घुगे व इंगोलेला गावठी कट्टा व चाकूचा धाक दाखवून त्यांचे हातपाय बांधण्यात आले. त्या दोघांना एका कापसाच्या शेतात सोडून दरोडेखोरांनी पलायन केले. जाताना घुगे व इंगोले यांचे पाच हजार तसेच दोन मोबाइल देखील त्यांनी पळवले. कशीबशी सुटका करून घेत घुगे यांनी ट्रान्सपोर्ट मालकाला हा प्रकार सांगितला. यानंतर विरगाव पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक कांचनकुमार चाटे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली.

गेवराईवरून ट्रक जप्त

गेवराई रोडवरील बाग पिंपळगाव हे दरोडेखोरांनी लुटलेला ट्रक उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून गुरुवारी हा ट्रक व दारूचे बॉक्स जप्त केले होते. या गुन्ह्यातील संशयित दरोडेखोर योगेश अर्जुन दुबीले (वय २३, रा. हर्सुली, ता. गंगापूर), सचिन गोपीनाथ जगदाळे (वय २४, रा. रांजणगाव खुरी, ता. पैठण), किरण जनार्दन शिंदे (वय २५, रा. बकवालनगर, वाळुज), योगेश दगडुबाळ सावंत (वय २६, रा. बाबरगाव, ता. गंगापूर) आणि संतोष शिवाजी गावंडे ( वय २४, रा. मांगेगाव, ता. गंगापुर) अशी पाच दरोडेखोरांची नावे आहेत. पोलिस अधिक्षक नवीनचंद्र रेड्डी, अपर अधिक्षक उज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कांचनकुमार चाटे, पीएसआय पांडूरंग भारती, सरोदे, सहायक फौजदार दिलीप मगरे, मुळे, कोल्हे, कामठे, जोशी, वारे, देशमुख, जमधडे, पाटील, लटपटे व तांदळे आदींनी ही कामगिरी केली.
मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू
या टोळीचे मुख्य सूत्रधार योगेश लघाने व संभाजी नागोडे हे आहेत. त्यांनी यापूर्वी असे ट्रक लुटीचे गुन्हे केले आहे. लुटलेल्या ट्रकमधील १६४ बॉक्स त्यांनी वाळूज एमआयडीसीतील एकलहेरा येथील गांगुर्डे नावाच्या व्यक्तीच्या घरी लपवले होते. एका ठिकाणी माल लपवल्यानंतर त्याची विल्हेवाट नंतर लावण्यात येत होती. गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा लघानेचा असून त्याने गावंडेला तो दिला होता. या गुन्ह्याची कोणतीही पूर्वकल्पना लघाने व नागोडे यांनी या पाच जणांना दिली नसल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images