Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सातारा परिसरात वाळूचे ८ ट्रक पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बेकायदा वाळू उपसा करून सातारा परिसरात वाळू वाहतूक करणारे आठ ट्रक महसूल पथकाने शुक्रवारी पकडले. परिसरामध्ये वाळूची बेकायदा साठेबाजी केल्यानंतर ही वाळू विहिरीच्या पाण्याने धुवायची आणि ट्रकमधून शहरात आणून विकायची असा फंडा वापरणाऱ्या तस्करांच्या महसूल पथकाने मुसक्या आवळल्या आहेत.
विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे अवैध वाळू वाहतुकीसंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी आयुक्‍तांना २५ जानेवारी रोजी सातारा परिसरातील अवैध वाळू वाहतुकीसंदर्भात तक्रार प्राप्त झाली होती. डॉ. भापकर यांनी या प्रकरणी उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांना तत्काळ कारवाईचे आदेश दिले. यावरून हदगल यांनी केशव डकले, राजेंद्र बागडे, कुलकर्णी या महसूल पथकासह सातारा परिसरात जाऊन ८ ट्रकमधील वाळू धुत असताना ही कारवाई केली. प्रत्येक वाहनामध्ये तीन ते पाच ब्रास वाळू असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
सातारा परिसरामध्ये मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत लहान मोठ्या रस्‍त्यांवरून वाळू तस्करी सुरू असते. नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, वाळू तस्करांनी महसूल पथकातील कर्मचारी व पोलिस यामध्ये नेटवर्क निर्माण केल्यामुळे या भागात कारवाई होत नाही. वाळू तस्कर येथे लहान वाहनांमधून आणलेली वाळू मोकळे भूखंड तसेच शेतीमध्ये टाकतात. ही वाळू पाण्याने धुऊन स्वच्छ केली जाते व त्यानंतर मोठ्या वाहनांमधून विक्री केली जाते. वाळू धुत असतानाच ही कारवाई करण्यात आळी. ज्या ‌भूखंडावर वाळूचा साठा आहे त्या मालकाविरुद्ध तसेच विहीर मालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तक्रारीची वेळ का ?
औरंगाबाद शहर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी करण्यात येते. मात्र, या भागातील महसूल कर्मचारी सपशेल डोळेझाक करतात. काही वाळू साठ्यांचे लिलाव झाले असले तरी ठेकेदारांना वाळू उपसा करण्याची परवानगी नाही. मग ही वाळू येते कुठून ? सातारा परिसरातही मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू आहे. मोकळ्या भूखंडावर अवैधरित्या वाळूची साठेबाजी करण्यात येते. मात्र, याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात येते. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी आदेश दिल्यानंतर महसूलच्या पथकाने ही कारवाई केली हे विशेष.

मराठवाड्यात अनेक ठिकाणी महसूल पथकावर हल्ला होणे, गुन्हा न नोंदवण्याचे प्रकार होत असल्यामुळे येणाऱ्या काळात वाळू तस्करांविरुद्ध कारवाई करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारू. वाळू तस्करांची देखरेख करण्यापासून ते त्यांच्यावर नियमाप्रमाणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यासंदर्भात कारवाई करण्यात येऊन संपूर्ण तस्करी मोडून काढू. नागरिकांनी माहिती दिल्यास त्वरित कारवाई करू.
- डॉ. पुरुषोत्तम भापकर, विभागीय आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेना, भाजपवर आपत्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,नांदेड
भाजप-शिवसेना युती तुटल्यामुळे नांदेड जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रया उमटल्या आहेत. अजूनही काहींना ही युती अबाधित राहील असे वाटते आहे. तसे घडले नाही तर ही शिवसेना, भाजपसाठी आपत्ती ठरणार आहे. याही वेळीही सर्व पक्ष एका बाजूला आणि अशोक चव्हाण आणि त्यांचा काँग्रेस पक्ष एका बाजूला अशी स्थिती निर्माण होणार असून सर्वाधिक लाभ जिल्हा परिषद निवडणुकीत अशोक चव्हाण यांनाच होण्याची शक्यता आहे. युती तुटल्याचा लाभ घेत नांदेड जिल्ह्यात आघाडी झाली आणि दोन काँग्रेस एकत्र आल्या तर हा लाभ वाढणार आहे.
युती तुटणार आणि आपल्याला स्वबळावर निवडणूक लढवाव्या लागणार असे सुरुवातीपासून मानणारे धनदांडगे इच्छुक उमेदवार खुष झाले असून ते आपली सर्वशक्ती पणाला लाऊन निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
शिवसेना, भाजप यांना नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकात सत्ताधारी पक्ष असूनही यशात मागेच राहिले होते. आता त्याचीच पुनरावृती टाळायची असेल तर तिकीट वाटप, प्रचार यंत्रणा आणि अचूक उमेदवार निवडून सर्व तयारीनिशी या दोन्ही पक्षांना निवडणूक आखाड्यात उतरावे लागणार आहे. शिवसेनेचे राज्यमंत्री खोतकर हे नवे पालकमंत्री झाले आहेत. त्यांनी आतापासूनच प्रचारात आघाडी घेतली आहे. दिवाकर रावते यांच्यापेक्षा ते जिल्ह्याला जास्त वेळ देतील असे सांगण्यात येते आहे. तसे झाले तर ही निवडणूक शिवसेने इतकीच अर्जुन खोतकर यांच्याही प्रतिष्ठेची ठरणार आहे. याही निवडणुकीत भाजप आपली सर्व ताकद पणाला लावणार आहे. पण मुळातच संघटन कमी आणि स्थानिक भाजप नेत्यातील गटातटाचे राजकारण युती तुटल्यामुळे भाजपला कितपत अडचणीत आणते ते बघावे लागणार आहे. यावेळी शिवसेनेचे ‘पाच पांडव’ किती मेहनत घेतील यावर या पक्षाचे यश अधोरेखित होणार आहे.
मागच्या वेळी अशोक चव्हाण हे सत्तेत होते त्यामुळे त्यांना एक हाती विजय मिळवून राष्ट्रवादीच्या मदतीने जिल्हा परिषद ताब्यात घेतली होती. कारण ते सत्तेत होते. अशोक चव्हाण हे सत्तेत नाहीत पण जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचाच प्रभाव आहे. हा प्रभाव पुसून टाकण्याचा नवा खेळ भाजप, सेना एकत्र येऊन खेळले असते तर नक्कीच फरक पडला असता आता या दोन्ही सत्ताधारी पक्षांची शक्ती एकमेकांशी झुंज देण्यात संपणार आहे. जिल्ह्यात सर्वच पक्षांना संभाजी ब्रिगेड आणि सर्वच पक्षातील बंडोबाचे आव्हान असणार आहे. पण बंडोबाना थंड कसे करावे ? विरोधी पक्षांच्या उमेदवारी वाटपात खास उमेदावारासाठी विरोधात कच्चे उमेदावर दिले जातील याची तरतूद वरिष्ठ पातळीवरून करणे असले ‘मॅनेजमेंट’ चे डावपेच माजी मुख्यमंत्र्यांना चांगले जमतात. अशा वेळी हिंदुत्त्वादी पक्षांचे मतविभाजन धर्मनिरपेक्ष पक्षांच्या पथ्यावर पडणार आहे. एमआयएमचे आव्हान उभे राहू शकते पण हा पक्ष अशोक चव्हाण यांच्या ओंजळीने पाणी पितो. त्यामुळे महापालिकेवर भगवा फडकविण्याचे आव्हान भाजपच्या सहकार्याशिवाय शिवसेना कसे पेलणार आहे ? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहणार आहेत. प्रत्यक्षात काय घडते ते निवडणुकीत समजेल. बाकी युती तुटल्याने भाजप असो की शिवसेना यांच्या तयारीत असलेल्या प्रत्येक उमेदवाराला तिकीट मिळण्याची शक्यता वाढल्याने हे उमेदवार खुश आहेत, कारण युते तुटावी ही या सर्वच इच्छुकांची इच्छा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोपीचा मृ्त्यू; पोलिसांवर आळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात संशयावरून ताब्यात घेतलेल्या राहुल गायकवाड (रा. डोमेगाव ता. गंगापूर) या तरुणाचा शुक्रवारी पहाटे घाटी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. शासकीय वाहनातून घेऊन येत असतानाच त्याने पळून जाण्यासाठी उडी मारली, त्यात तो गंभीर जखमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तर, पोलिसांनी केलेल्या मारहाण केल्याने हा तरूण मरण पावल्याच आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप ठेऊन पाच पोलिसांना निलंबित केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
वैजापूर पोलिसांनी यापूर्वी एका गुन्ह्यात अटक केलेला राहुल गायकवाड हा दुचाकी चोरीतील संशयित असल्याची माहिती गस्त घालत असताना गुन्हे शाखेच्या पोलिकांना गुरुवारी (२६ जानेवारी) सायंकाळी पाच वाजता मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे जमादार अशोक नरवडे, दत्तू सांगळे, पोलिस नाईक युनूस शहा, पोलिस शिपाई संतोष काकडे आणि फेरोज खान पठाण हे चालक बहुरे यांना सोबत घेऊन जीपने (एम एच २०, सी यू- ००५१) लिंबेजळगाव फाट्यावर गेले. त्यांनी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास राहुल याला पकडण्यासाठी सापळा रचला. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार त्या वर्णनाचा तरूण व दोन साथिदार लिंबेजळगाव फाट्यावर थांबले असल्याचे रात्री आठच्या सुमारास या पथकाला दिसले. पोलिसांनी तेथे राहुल गायकवाडला पकडले, पण त्याचे दोन साथिदार पळून गेले. पोलिसांनी पाठलाग करुन साजन अशोक गायकवाड (वय २३, रा. डोमेगाव) आणि लक्ष्मण वामन तुपे (वय २८, रा. भेंडाळा) यांना पकडले. यावेळी संशयित राहुल गायकवाड याने एमआयडीसी वाळुज व छावणी परिसरातून दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली व दुचाकी चोरलेली ठिकाणे दाखवून दुचाकी ताब्यात देतो, असे पोलिसांना सांगितले. त्यामुळे तिघांना सोबत घेऊन दुचाकी हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी त्यांना नेवासा येथे नेले. पण त्याने सांगितलेल्या ठिकाणी दुचाकी सापडल्या नाहीत. त्यामुळे तिघांना सोबत घेऊन पोलिस वाळूज एमआयडीसीतील चोरीचे घटनास्थळ पाहण्यासाठी जीपने येत होते. त्यावेळी जीपच्या मागील सीटवर तिन्ही संशयितांसह पोलिस शिपाई फेरोज खान पठाण बसले होते. पठाण यांची नजर चुकवून लिंबेजळगाव फाटा ते टोलनाक्याच्या दरम्यान, राहुल गायकवाडने पळून जाण्याच्या प्रयत्नात जीपच्या फुटलेल्या काचेतून उडी मारली. त्यामुळे तो रस्त्यावरील दुभाजकावर आपडला. या घटनेत राहुल गायकवाडच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तत्काळ घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद वाळूज पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

घाटी हॉस्पिटलमध्ये तणाव
राहुल गायकवाड याचा मृत्यू झाल्याची माहिती समजल्यानंतर त्याच्या संतप्त नातेवाईक व पालकांनी शुक्रवारी घाटी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. राहुलचे पालक शेतमजूर असून त्याचे तीन वर्षापूर्वी लग्न झाले आहे. त्याला दोन मुले आहेत. राहुलसह साजन गायकवाड याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी गाजगाव शिवारातून पकडून नेले. पोलिसांनी बेदम मारहाणी केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असून पोलिस काहीच माहिती देत नाही, साजन यास भेटू देत नाही, असा आरोप संतप्त नातेवाईकांनी केला. दोषींवर कारवाई करेपर्यंत त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे घाटीत परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. उपायुक्त संदीप आटोळे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घाटी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली, येथे पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली. नातेवाईकांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी भेट घेऊन दोषींवर खूनाचा गुन्हा दाखल करावा, मृताच्या कुटुंबियाना २५ लाख रुपयांची मदत द्यावी, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी केली. त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिल्यानंतर नातेवाईकांचा संताप निवळला.

तपास सीआयडीकडे
संशयित आरोपीच्या सुरक्षेची योग्य काळजी घेतली नाही, त्यात कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा केला, अशी कबुली पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांसोबत बोलताना दिली. गुन्हे शाखेचे पोलिस हेड कॉस्टेबल अशोक नरवडे, दत्ता सांगळे, संतोष काकडे, फिरोज पठाण व पोलिस नाईक युनुस शहा यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडी क्राइमकडे देण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यासमोर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचे व्हिडिओ शुटिंग करण्यात आहे. घटनेच्या संदर्भातील सर्व कागदपत्रे सीआयडीला देण्यात आली. तीन पथकांच्या माध्यमातून राहुल गायकवाडच्या मृतदेहाची पाहणी करून ‘इन कॅमेरा’ पंचनामा केल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परभणी पालिकेत एलबीटीवरून तोडफोड

$
0
0

परभणी - एलबीटीप्रकरणी शहरातील व्यापाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत बंद पुकारला आहे. याच प्रकरणावरून शुक्रवारी शिवसेनेने पालिका आयुक्तांच्या दालनात जोरदार तोडफोड करत प्रशासनाचा निषेध नोंदवला. दरम्यान, या प्रकरणी ७ ते ८ जणांवर गुन्हे दाखल झाले असून यात आणखी २५ ते ३० जणांची नावे आयुक्तांनी दिली असून त्यांच्यावरही रात्री उशिरापर्यंत कारवाईची प्रक्रिया सुरू होती. या घटेनमुळे शहरात तणावपूर्ण वातावरण आहे.
परभणी जिल्हा व्यापारी महासंघाने २६ जानेवारी पासून एलबीटी प्रकरणी मनपा कुठलाही निर्णय घेत नसल्याने बाजारपेठ बंद ठेवली आहे. २६ जानेवारी रोजी व्यापाऱ्यांनी एलबीटी कराच्या विरोधात तसेच मनपाने बजावलेल्या नोटीस आणि मनपाच्या गाळेधारकांना विनाकारण त्रास दिल्याबाबत धरणे आंदोलनास सुरूवात केली. तरी देखील मनपाने कुठलाही निर्णय न घेतल्याने व्यापार्यांनी बेमुदत बंद पुकारला. परिणामी शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही परभणी शहर कडकडीत बंद राहिले.
तर हाच मुद्दा घेऊन मनपातील विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवक व पदाधिकार्यांनी निवेदन देण्यासाठी शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आयुक्त राहुल रेखावार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तब्बल दीड तास आयुक्तांच्या दालनात बसूनही आयुक्त रेखावार निवेदन घेण्यासाठी आले नाही. ज्यामुळे शिवसैनिकांनी संतप्त भावना व्यक्त करत मनपाच्या प्रवेशद्वारापासूनच तोडफोड करण्यास सुरूवात केली. सर्वप्रथम प्रवेशद्वार त्यानंतर आयुक्तांच्या दालनाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील काचेचा दरवाजा फोडला. तसेच आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांच्या दालना बाहेरील दरवाजा तोडून दालनाची काचे देखील फोडली. ७ ते ८ जणांवर गुन्हे दाखल केले असून इतरांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी मात्र उशिरापर्यंत कोणालाही अटक ही झालेली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांचे पगार रखडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने करताना होणारी तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी प्रशासनाने मुख्यालयातून वेतन करणे सुरू केले होते. शालार्थ वेतनप्रणाली कार्यान्वित केल्याने शिक्षकांचे वेतन पूर्वीप्रमाणे तालुकास्तरावरून करण्याचा निर्णय झेडपी प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पगार मिळण्यास उशीर होत आहे. डिसेंबर महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाही.
जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे वेतन व भत्ते शालार्थ या नवीन वेतन प्रणालीद्वारे करण्याबाबत सरकारने आदेश दिले होते, पण शालार्थ ऑनलाइन वेतन प्रणाली अद्याप अद्ययावत झालेली नसल्याने कोषागारा (ट्रेझरी) कार्यालयामार्फत थेट शिक्षकांच्या बँक खात्यात वेतन जमा होत नव्हते. परिणामी, शिक्षकांच्या मासिक वेतनास विलंब होत असल्याने डिसेंबर २०१६चे शिक्षकांचे मासिक वेतन शालार्थ प्रणाली अंतर्गत नोंदवून तालुका स्तरावरून देण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे.
शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न झेडपी प्रशासनाला हाताळण्यास कायम अडचणी येत होत्या. दोन वर्षांपूर्वी त्यावर तोडगा काढत मुख्यालयातून पगार देयके जमा करून शिक्षकांच्या खात्यावर थेट पगार जमा करण्याची पद्धत सुरू झाली होती. दरम्यान, शिक्षकांच्या हजेरीची संपूर्ण माहिती घेऊन त्यांना ऑनलाइन वेतन देण्यासंदर्भात राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शालार्थ प्रणाली विकसित केली.
जिल्हा परिषदेत ही प्रणाली अद्ययावत झाली नसल्याने ऐनवेळी काही प्रकरणे ऑफलाइन पद्धतीने सादर करून शिक्षकांचे पगार केले जात होते. आता ही प्रणाली अद्ययावत झाल्याचे सांगून मुख्यालयातून पगार काढणे बंद करण्यात आले आहे. त्याचा फटका शिक्षकांना बसला असून, जानेवारी महिना संपत आला तरी अद्याप डिसेंबरचा पगार मिळालेला नाही. सुरळीत असलेली पद्धत प्रशासनाने अचानकपणे का बंद केली, याबाबत मात्र कुठेच समाधानकारक उत्तर नाही.

शालार्थ यंत्रणा सक्षम असावी. जिल्ह्याच्या ठिकाणपासून वेतन देण्याची दोन वर्षांपूर्वीची पद्धत पुन्हा राबविली पाहिजे. सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे ऑनलाइन पगार झाले पाहिजे. झेडपी प्रशासन यात कमी पडले.
- दिलीप ढाकणे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

शाळा ः १५३०
शिक्षक ः १०५००
दरमहा वेतन ः ३८ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजय सिकची यांचा टीडीआर रद्द केला

$
0
0

औरंगाबाद : रस्त्याच्या भूसंपादनात १५ मीटरऐवजी २४ मीटर दिलेला टीडीआर (विकास हक्क हस्तांतर) महापालिकेच्या नगररचना विभागाने रद्द केला. या प्रकरणात आक्षेप घेण्यात आल्यानंतर नगररचना विभागाला तीन वर्षानंतर उपरती झाली आणि टीडीआर रद्द करण्याची कारवाई करण्यात आली.
पडेगाव गट क्रमांक ७१ मधील संजय सिकची यांच्या मालमत्तेतून शहर विकास योजनेचा रस्ता जात होता. या रस्त्याची रुंदी १५ मीटर होती, परंतु नगररचना विभागाने सिकची यांना २६ एप्रिल २०१३ रोजी २४ मीटर रुंद रस्त्यासाठी टीडीआर दिला. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते किशोर राजपूत यांनी तक्रार केल्यावर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन वर्षांपूर्वी दिलेला टीडीआर रद्द केला. १५ऐवजी २४ मीटर रुंद रस्त्यासाठी नजर चुकीने टीडीआर देण्यात आला होता. मोजणी नकाशा विकास योजना आराखड्याशी सुसंगत नसल्यामुळे सिकची यांचा प्रस्ताव रद्द करण्यात आल्याचे या विभागाच्या सहाय्यक संचालकांनी म्हटले आहे.

गुन्हे दाखल करा
याच प्रकरणात शहर सुधार समितीचे सभापती शिवाजी दांडगे यांनी शुक्रवारी आयुक्तांच्या नावे पत्र दिले. पडेगाव गट क्रमांक ७१ येथील रद्द केलेल्या टीडीआरप्रकरणी मालमत्ताधारक व टीडीआर मंजूर करणाऱ्या तत्कालीन अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. लेखा विभागाप्रमाणेच नगररचना विभागाची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, असे त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सवाई एकांकिका स्पर्धेत ‘पाझर’ अव्वल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाची ‘पाझर’ एकांकिका मुंबईच्या सवाई एकांकिका स्पर्धेत सांघिक करंडकाची मानकरी ठरली. सांघिक विजेतेपदासह सर्वोत्कृष्ट संगीत आणि सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनेचे पारितोषिक पटकावले. सवाईच्या ३० वर्षांच्या परंपरेत मराठवाड्यातील संघाने पहिल्यांदाच प्रथम विजेतेपद पटकावले.
राज्यातील अत्यंत महत्त्वाची सवाई एकांकिका स्पर्धा मुंबई येथील रवींद्र नाट्यगृहात बुधवारी पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत वेगवेगळ्या महाविद्यालयांच्या सात एकांकिका सादर झाल्या. प्राथमिक फेरी सहज पार करून अंतिम फेरीत धडक मारलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ‘पाझर’ ही एकांकिका अंतिम फेरीत प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. रोख २५ हजार रूपये, करंडक आणि प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. मुंबई संघाची ‘इन सर्च ऑफ’ एकांकिका द्वितीय आली. या स्पर्धेचे परीक्षण अभिनेते सुशील इनामदार, संपदा जोगळेकर आणि शेखर ताम्हाणे यांनी केले. ‘पाझर’ एकांकिकेचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण पाटेकर या तरूण रंगकर्मीचे आहे. या एकांकिकेच्या संघात शुभम खरे, जगदीश जाधव, गणेश मुंडे, आकाश थोरात, प्रमोद तांबे, प्रशांत गीते, धीरज शिरसाट, चेतन ढवळे, अर्जुन टाकरस, प्रवीण पारधे, मंगेश साळुंके, प्रीतेश कोसबे, सुनील वनवे यांचा समावेश आहे. सांघिक विजेतेपदासह सर्वोत्कृष्ट संगीत आणि प्रकाशयोजना ही दोन पारितोषिके संघाने पटकावली. गेल्या महिन्यात पुणे येथे झालेल्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत ‘पाझर’ अव्वल ठरली. मराठवाड्यातील दुष्काळाचे चित्रण करताना मानवी संवेदना नेमकेपणाने टिपणाऱ्या ‘पाझर’ एकांकिकेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. राज्यात विविध ठिकाणी ‘पाझर’चे ५१ प्रयोग सादर झाले आहेत. आशयघन कथानकाला संगीत आणि प्रकाशयोजनेची नेमकी जोड लाभल्यामुळे ‘पाझर’ रसिक व जाणकारांच्या पसंतीस उतरली आहे.

सवाई एकांकिका स्पर्धेत ‘पाझर’ने सांघिक विजेतेपद मिळवले. मराठवाड्याचा भवताल टिपणारी एकांकिका राज्यभरात गाजली आहे. यंदा सवाई स्पर्धेचे ३० वे वर्ष होते. मराठवाड्यातील नाट्य संघाने पहिल्यांदाच या स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याचा सर्वाधिक आनंद आहे.
- प्रवीण पाटेकर, लेखक-दिग्दर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जॉली एलएलबी’ विरुद्ध याचिका

$
0
0

म. टा.विशेष प्रतिनिधी , औरंगाबाद
जॉली एलएलबी-२ या सिनेमामध्ये न्यायालयाचा अवमान, वकिली व्यवसायाची चेष्टा करण्यात आली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या दिग्दर्शक व निर्मात्याने न्यायव्यवस्थेची बिनशर्त माफी मागावी, अशी विनंती करणारी याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात करण्यात आली आहे. या याचिकेत निर्माता फॉक्स स्टार स्टुडिओला शपथपत्र दाखल करण्याचे आदेश न्या. विद्याधर कानडे व न्या. संगीतराव पाटील यांनी दिले आहेत.
ही याचिका हायकोर्टातील वकील अजयकुमार वाघमारे यांनी केली आहे. जॉली एलएलबी-२ या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये वकील कोर्टाच्या परिसरात पत्ते खेळतात. ते न्यायमूर्तींच्या डायस व आसनासमोर धावून जातात आणि त्यांच्यासमोरच जोरदार मारामारीही करतात. कोर्टाच्या परिसरातच हे वकील डान्सही करतात. न्यायमूर्ती हे साक्षीदारांना, ‘बाहेर घेऊन जा, नहीं तो मुर्गा बना दूंगा,’ असे संबोधतात. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हा सिनेमा सत्यघटनेवर आधारित आहे, असे लिहून चित्रपट निर्माता व दिग्दर्शकाने न्यायव्यवस्था व वकील व्यवसायाची चेष्टा केली आहे, असा आक्षेप याचिकेत घेण्यात आला आहे. वकिलील व्यवसायाचे बदनामीकारक चित्रीकरण करण्यात आले आहे. या व्यवसायाची आणि न्यायालयीन प्रक्रियेची चेष्टा केली आहे, असा आक्षेपही याचिकेत करण्यात आला आहे.
या चित्रपटातून एलएलबी हा शब्द वगळावा, अशी विनंती करण्यात आली आहे. या सिनेमाचे प्रक्षेपण प्रतिबंधित करण्यात यावे, अशी विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याची बाजू व्ही. डी. साळुंके व पंडितराव आणेराव हे मांडत आहेत. निर्माता कंपनीची बाजू जेष्ठ वकील प्रवीण शहा यांनी मांडली. या याचिकेची सुनावणी सोमवारी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रताप बोराडे खरे ‘पालक प्राचार्य’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘शिस्त आणि वागणुकीतून बहुआयामी व्यक्तित्वाचे दर्शन घडवणारे प्राचार्य प्रताप बोराडे अद्वितीय पालक प्राचार्य आहेत. त्यांच्या आत्मचरित्राचे नाव ‘मी न् माझा’ असे आहे. उलट या पुस्तकाचे नाव ‘मी न तुझा मी तर समाजाचा’ असे पाहिजे. सामाजिक बांधिलकीने जगणारे बोराडे सोनेरी पान आहेत’ असे प्रतिपादन माजी मंत्री भाई वैद्य यांनी केले. बोराडे यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.
जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने श्रीकांत गोरे संपादित ‘पालक प्राचार्य’ आणि शशिकला बोराडे यांचे शब्दांकन असलेल्या ‘मी न् माझा’ या पुस्तकांचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता. एमजीएम संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात शुक्रवारी हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर माजी मंत्री कमलकिशोर कदम, समाजवादी नेते भाई वैद्य, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, बजाज अॅटो सीएसआरचे सल्लागार चंद्रप्रकाश त्रिपाठी, शशिकला बोराडे, एमजीएमचे विश्वस्त सचिव अंकुशराव कदम, माजी मंत्री रामप्रसाद बोराडे, महारूद्र मंगनाळे यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी पुस्तकांचे प्रकाशन आणि वेबसाइटचे उद्घाटन केले.
यावेळी भाई वैद्य म्हणाले, ‘विद्यार्थी आणि सहकाऱ्यांच्या भावना पुस्तकात आहेत. बोराडे यांनी आयुष्यभर सर्वत्र यश मिळवले. या वाटचालीत कर्तृत्व, निष्ठा आणि कष्टाची तयारी महत्त्वाची होती. साने गुरुजींचा अंश बोराडे यांच्या जीवनात आहे. त्यामुळे हाती घेतलेले प्रत्येक काम त्यांनी पूर्ण केले. सतत ज्ञाननिर्मितीसाठी शिक्षकाचे योगदान महत्त्वाचे आहे. आपल्याकडे पिढी घडवणाऱ्या शिक्षणावर कमी खर्च केला जातो. शस्त्राने नव्हे तर ज्ञानाने सुरक्षा मिळते, ही जाणीव निर्माण करणे शिक्षकाचे काम आहे. शिक्षणाबाबत सरकारची भूमिका जबाबदारी नाही. यातूनच शिक्षणाचे बाजारीकरण होत आहे. शिक्षण क्षेत्रात बोराडे यांनी मोलाचे काम केले.’
पुस्तक लेखनामागील भूमिका शशिकला बोराडे यांनी मांडली. ‘पन्नास वर्षे सार्थ सफल जीवनाची साक्षीदार असल्यामुळे पुस्तकाचे शब्दांकन केले. शब्द शोधावे लागले नाही. शिस्तबद्ध विद्यार्थ्याप्रमाणे शब्द सहज पुस्तकात मांडले. मी त्यांच्या जीवनाचा एक अलंकार आहे. पुस्तक किती यशस्वी ठरले ते बोराडेच ठरवतील,’ असे शशिकला बोराडे म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्रीकांत गोरे यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मनसोक्त जगलो
‘दोन्ही पुस्तके माझ्या वर्तनाचे लिखाण आहे. मी आयुष्यभर मनसोक्त जगलो. मी खेड्यातील पाटलाचा मुलगा असल्यामुळे बालपणापासून खोडकर होतो. राष्ट्रीय सेवा दलाशी संबंध आला आणि माणसातला माणूस शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली. प्रत्येक ठिकाणी सामावून घेणारे लोक भेटले. समाजाचे ऋण उपयोगी पडले. लोक म्हणतात शिक्षक म्हणून तुम्ही काय कमावले. त्यापेक्षा एक शिक्षक म्हणून काय कमावणारे आपण तयार केले याचा विचार व्हावा,’ असे बोराडे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीसाठी ९२ कोटी

$
0
0

औरंगाबाद ः स्मार्ट सिटी प्रकल्पात केंद्र सरकारकडून औरंगाबाद शहरासाठी ९२ कोटी रुपयांचा पहिल्या टप्प्यातील निधी मंजूर करण्यात आला असून, केंद्राने यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. सोमवारपर्यंत हा निधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यातून प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटच्या नियुक्तीसह अर्बन ट्रॅफिक मोबिलिटीचे काम सुरू केले जाणार आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी शहराला पाच वर्षांत एक हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यापैकी ५०० कोटी रुपये केंद्र सरकार देणार असून, २५० कोटी रुपये राज्य सरकार, तर उर्वरित २५० कोटी रुपये महापालिकेला स्वतःचा हिस्सा म्हणून द्यावे लागणार आहेत. पालिकेची नाजूक आर्थिक स्थिती लक्षात घेऊन २५० कोटी रुपये सिडकोकडून देण्यात येणार आहेत.
स्मार्ट सिटी योजनेत शहराचा समावेश झाल्यानंतर एसपीव्हीची (स्पेशल पर्पज व्हेइकल) स्थापना करण्यात आली आहे. एसपीव्हीचे मुख्याधिकारी म्हणून पालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्राकडून निधी मिळाल्याशिवाय एसपीव्हीचे काम सुरू होणार नाही. निधी मिळाल्याशिवाय ‘पीएमसी’ची नियुक्तीही करता येणार नाही, हे लक्षात आल्यावर बकोरिया यांनी निधीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. त्यानुसार ९२ कोटी रुपयांचा पहिल्या टप्प्यातील निधी मंजूर करून तो वितरित करण्याचे आदेश काढले आहेत. आदेशाची प्रत पालिकेला मिळाली आहे.
स्मार्ट सिटीसाठी ९० कोटी रुपयांमधून ‘पीएमसी’ची नियुक्ती करण्याबरोबर अर्बन ट्रॅफिक मोबिलिटी क्षेत्रात काम सुरू केले जाणार आहे. पीएमसीच्या नियुक्तीसाठी पालिकेने राष्ट्रीयस्तरावर निविदा मागविल्या आहेत. मॅकेन्झी, सीएचटूएम आणि ईडब्ल्यूई या तीन कंपन्यांनी निविदा भरल्या आहे. त्यांचे तांत्रिक मूल्यमापन करण्याचे काम सध्या सुरू आहे. पात्र कंपनीची नियुक्ती ‘पीएमसी’ म्हणून केली जाईल. त्यापाठोपाठ अर्बन ट्रॅफिक मोबिलिटी क्षेत्रात ‘एसपीव्ही’तर्फे काम सुरू केले जाणार आहे. यात केवळ सिटी बस सुरू करण्याच्या दृष्टीने काम केले जाणार नसून, स्मार्ट पार्किंग, स्मार्ट सिग्नलिंग, दर्जेदार रस्ते, अद्ययावत बसथांबे आदी कामे सुरू केली जातील.

स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात ९२ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे केंद्र सरकारचे पत्र प्राप्त झाले आहे. हा निधी मिळवण्यासाठी आयुक्त यांनी राज्य व केंद्र सरकारच्या स्तरावर पाठपुरवठा सुरू ठेवला होता. त्याला यश आले आहे. एक-दोन दिवसांत निधी प्राप्त होईल.
- सिकंदर अली, कार्यकारी अभियंता, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे प्रमुख.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी बसच्या मानगुटीवर १६ कोटी रुपयांचा तोटा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एसटी महामंडळातर्फे चालविण्यात येणाऱ्या शहर बस सेवेचा तोटा १६ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. तो महापालिकेने भरून काढवा. अन्यथा एसटी बस सेवा बंद करू, असे स्मरणपत्र एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभाग नियंत्रकांनी महापालिकेला दिले आहे.
एसटी महामंडळातर्फे शहरात २००५पर्यंत शहर बस सेवा चालविण्यात येत होती. पालिका क्षेत्रात सिटी बस चालविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. यामुळे महापालिकेने ही सेवा चालवावी, असा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. यानंतर २६ जानेवारी २००६पासून शहरात महापालिकेची एएमटी (अकोला महानगर प्रवासी वाहतूक) बस सेवा सुरू करण्यात आली. एएमटी बस सेवा २०१०मध्ये बंद करण्यात आली. डिसेंबर २०११मध्ये तत्कालीन परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सिटी बस सेवा पुन्हा सुरू केली. एसटी महामंडळाला २०११ ते २०१७ या काळात सिटी बस सेवेमुळे सुमारे १६ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. सिटी बस सेवा महापालिकेने चालवावी, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सूचित केले होते.
सिटी बस सेवेमुळे एसटीचा तोटा वाढत अाहे. एक तर तोटा भरून द्या, अन्यथा बस सेवा बंद करून, असे पत्र औरंगाबाद विभाग नियंत्रक कार्यालयाने महापालिकेला देण्यात आले आहे, अशी माहिती विभाग वाहतूक अधिकारी संदीप रायलवार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिलांच्या चौकशीसाठी एसआयटीची मदत घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पेस्ट कंट्रोलच्या बिलांवरील बनावट स्वाक्षरीप्रकरणी चौकशीसाठी गरज पडल्यास राज्य शासनाच्या ‘एसआयटी’ची मदत घ्यावी, अशी शिफारस महापालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशी अहवालात करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बनावट स्वाक्षरींच्या आधारे पेस्ट कंट्रोलच्या कामाची बिले काढण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी तीन अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली. लेखा विभागाने या समितीला कोणतीच कागदपत्रे उपलब्ध करून दिली नाहीत. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशाने हा विभाग सील करण्यात आला. दरम्यानच्या काळात बोगस बिलांच्या दोन-तीन फाइल चौकशी समितीच्या हाती लागल्या होत्या. लेखा विभागाचे सील दुसऱ्या दिवशी उघडल्यावर चौकशी समितीच्या हाती आणखीन फाइल लागल्या. अशा स्वरुपाच्या आठ ते दहा फाइल मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांची तपासणी केल्यावर बनावट स्वाक्षरींच्या आधारे पेस्ट कंट्रोलची बिले काढण्यात आल्याची आणखी काही प्रकरणे उघडकीस आली. त्याच्या आधारे चौकशी समितीने आयुक्तांकडे प्राथमिक अहवाल सादर केला.
आयुक्त ओम प्रकाश बकोरिया शुक्रवारी मुंबईला गेले होते. शनिवार, रविवारी सुट्टी असल्यामुळे चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालावर बकोरिया सोमवारी निर्णय घेतील, असे मानले जात आहे.

गैरप्रकार कोटीच्या घरात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; विशेष तपास पथकाची (एसआयटी) मदत घेण्याची शिफारस चौकशी समितीने केली आहे. सध्या लाखांच्या घरात वाटणारा हा गैरव्यवहार तपासानंतर कोटीच्या घरात देखील जाऊ शकतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी राज्य शासनाच्या एसआयटीची मदत घ्या, असे अहवालात म्हटले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देखील या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, असे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युत‌ी भंगाचा फटका दोघांनाही

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
मुंबई महापालिकेतील जागावाटपावरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची २५ वर्षांची युती तोडल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केली. यामुळे दोन्ही गटांत आनंदाचे वातावरण असले, तरी जिल्हा परिषद निवडणुकीत दोघांना फटका बसण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषदेत गेल्या २० वर्षांपासून शिवसेना-भाजपची युती आहे. २०१२च्या निवडणुकीत दहा वर्षांनंतर युती सत्तेतून पायउतार झाली. ६० गटांपैकी ३६ जागा शिवसेनेने, तर २४ जागा भाजपने लढविल्या होत्या. गेल्या वेळी भाजपला केवळ सहा जागा मिळाल्या. शिवसेनेने १९ गटांमध्ये विजय मिळविला. भाजपला कमी जागा मिळाल्याने सत्ता स्थापण्यास अडचण झाली. ही संधी साधत काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेची मोट बांधून झेडपीची सत्ता मिळविली. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आली. हे पाहून झेडपीची टर्म संपताना शिवसेना, अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग झाले. याचा फायदा २०१७च्या निवडणुकीत होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात होता, पण युती तुटल्याने राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
पैठण तालुक्यात शिवसेनेचे संदीपान भुमरे आमदार आहेत. फुलंब्री भाजपकडे, तर सिल्लोड काँग्रेसकडे आहे. जिल्हा परिषद गटांमधून मात्र संमिश्र चित्र आहे. या पट्ट्यात शिवसेनेची बाजू तुलनेत कमकुवत आहे. निवडणुकीच्या तोंडावर पैठण तालुक्यात राष्ट्रवादी, मनसेचे अनेकजण भाजपवासीय झाल्याने सेनेची अडचण होणार आहे. भाजपची बाजू मात्र वैजापुरात लंगडी आहे. गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यात भाजपची ताकद आहे. आमदार प्रशांत बंब यांच्याकडून शिवसेनेला रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे कृष्णा पाटील डोणगावकर नुकतेच शिवसेनेत गेल्याने चुरस दिसेल. एकूणच दोन्ही पक्षांत लढाई जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पहायला मिळेल. युती भंगल्यामुळे मतांची फाटाफूट झाल्याचा फटका मात्र दोन्ही पक्षांना बसणार हे निश्चित आहे.

ऐनवेळी धावपळ
झेडपी व पंचायत समिती निवडणुकीत युती होणार किंबहुना कोणता गट कुणाकडे जाणार याची सर्वसाधारण कल्पना शिवसेना व भाजपच्या नेत्यांना होती. त्यातही परंपरागत एकमेकांकडे असलेल्या गटात दुसऱ्याचा प्रभाव वाढणार नाही, याची दक्षता घेतली जात होती. आता ऐनवेळी ६२ गटांमधून उमेदवार उभे केले तरी प्रचार आणि यंत्रणा राबविण्यासाठी निश्चितपणे धावपळ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक बदल्यांबाबत रोस्टर तयार करणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘शिक्षक बदल्यांचा विषय गंभीर बनला आहे. त्यामुळे राज्याचे एकच रोस्टर तयार करण्याचा निर्णय शासन घेत आहे,’ असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले शनिवारी झालेल्या शिक्षक मेळाव्यात केले.
एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात झालेल्या मेळाव्यासाठी व्यासपीठावर महापौर भगवान घडामोडे, आमदार अतुल सावे, लक्ष्मण पवार, श्रीकांत जोशी, शिरीष बोराळकर, प्रा. सतीश पत्की, ज्ञानोबा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘शिक्षण क्षेत्रात अनेक प्रश्न आहेत. त्यातील बदलीचा प्रश्न चिंताजनक आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. अनुदानाचाही निर्णय घेण्यात आला असून, संस्थाचालकांनी शिक्षकांची पिळवणूक केली तर त्यांना शासन करण्यास राज्यसरकार सक्षम आहे. शिक्षकांवर मूळ कामापेक्षा इतर कामांचा ताण आहे. तो ताण कमी होण्याची गरज आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते आज बदलले आहे. या बदलत्या काळात शिक्षकांनी आपले काम उत्तमरितीने पार पाडावे,’ असेही त्यांनी आवाहन केले. अतुल सावे, ज्ञानोबा मुंडे, माजी आमदार श्रीकांत जोशी, प्रा. पत्की यांचेही भाषणे यावेळी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युती तुटल्याचे दुःख; नवीन पिढीचा निर्णय

$
0
0


औरंगाबाद : ‘दोन तपापासून असलेली शिवसेना-भाजपची युती तुटल्याचे दुःख आहे, परंतु हा निर्णय नवीन पिढीचा असून तो स्वीकारत पुढे जावे लागणार आहे,’ असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी औरंगाबादमध्ये केले. शिक्षक मेळाव्यासाठी त्या जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. त्या म्हणाल्या, ‘शिवसेनेने भाजपशी युती तोडण्याचा निर्णय नवीन पिढीने घेतलेला आहे. त्यामुळे यावर बोलण्यापेक्षा प्रचाराला महत्त्व देते. विधानसभेसह, कल्याण-डोंबिवली आदी निवडणुका दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेत दोन्हीही पक्षाला आता विचार करण्याचा वेळ नव्हता. त्यामुळे दोन्ही पक्ष आपआपल्या परीने प्रचार करतील.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गैरप्रकारांवर ‘रेरा’चा अंकुश

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘रिअल इस्टेट व्यवसाय हा आता उद्योग बनला आहे. सरकारकडून एक मे २०१७ पासून रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅक्ट (रेरा) हा नवीन कायदा अंमलात येणार आहे. या कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर बांधकाम व्यवसायात अधिक पारदर्शकता येऊन या क्षेत्रातील गैरप्रकारांना आळा बसेल. त्यादृष्टीने आम्ही आजच्या सर्वसाधारण सभेत विचारमंथन केले,’ अशी माहिती क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सतीश मगर यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.
क्रेडाई महाराष्ट्रच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज औरंगाबादमध्ये झाली. बैठकीसाठी राज्यभरातील २७५ सभासद उपस्थित होते. यासंदर्भात अधिक माहिती देताना मगर म्हणाले, ‘रेरा कायद्याची अंमलबजावणी मे महिन्यापासून होणार आहे. त्याअंतर्गत अनेक हितकारक निर्णय राबविणे सोपे जाणार आहे. या कायद्यातील तरतुदींची माहिती बिल्डरांना व्हावी, यासाठी आजच्या बैठकीत विचारमंथन झाले. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत केलेल्या नियोजनासाठी क्रेडाईचा सहभाग असेल,’ असे त्यांनी स्पष्ट केले. रेरा कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर बॅड एलिमेंटसच्या बोगसगिरीला आळा बसेल. सर्व गोष्टी पारदर्शी राहणार असल्याने बिल्डर नसूनही या क्षेत्रात येऊन बनावटगिरी करणाऱ्यांना वचक बसणार आहे.
बैठकीसाठी क्रेडाईचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत सरोदे, सचिव महेश साधवानी, उपाध्यक्ष प्रमोद खैरनार, औरंगाबाद क्रेडाईचे अध्यक्ष एस. एस. पाटील, मनोज पगारिया, राजेंद्रसिंग जबिंदा, क्रेडाई यूथ विंगचे राष्ट्रीय समन्वयक आदित्य जावडेकर, महिला आघाडीच्या दर्शना परमार आदींची यावेळी उपस्थित होती.

‘रेरा’तील तरतुदी
- योजनेच्या सरुवातीस जी कागदपत्रे दाखल केली असतील त्यानुसारच बांधकाम करावे लागेल.
- विहित मुदतीच्या आत जर स्किम पूर्ण झाली नाही, तर बिल्डरला दंडाची तरतूद कायद्यात आहे.
- स्कीम जर अर्धवट राहिली तर उर्वरित स्किम पूर्ण करण्यासाठी बिल्डरकडून पैशांची वसुली.
- सर्व सुविधा जर करारात मांडल्या गेल्या असतील, तर त्या पुरविणे बंधनकारक असणार आहे.
- प्रत्येक बिल्डरकडे आवश्यक ते कर्मचारी पूर्णवेळ भरणे आवश्यक असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संचालक मंडळाविरुद्ध अर्ज

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकरभरतीमधील गैरप्रकाराच्या गुन्ह्यात ‘दोषनिश्चिती’ करताना संचालक मंडळाविरुद्ध आर्थिक भ्रष्टाचारविषयक लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गतच्या कलमांखाली दोष निश्चिती केली नाही. ती व्हावी, असा दुरुस्ती अर्ज विशेष सरकारी वकील जनार्दन बी. नवले यांनी सेशन कोर्टात दाखल केला आहे.
सत्र न्यायाधीश विनोद पाडळकर यांनी तो अर्ज मंजूर केला असून सुधारित दोषारोप निश्चितीसाठी या प्रकरणाची सुनावणी १७ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे. बचाव पक्षास आवश्यक वाटल्यास सरकार पक्षाने जबाब नोंदविलेल्या (तपासलेल्या) साक्षीदारांची उलट तपासणी घेवू शकतील, असेही कोर्टाने स्पष्ट केले. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकरभरतीमधील गैरप्रकारासंदर्भातील सुनावणी दरम्यान सरकार पक्षाने दोन साक्षीदारांचे जबाब नोंदविल्यानंतर दोषारोप निश्चितीमध्ये दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे विशेष सरकारी वकील जनार्दन नवले यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. संचालक मंडळाविरुद्ध आर्थिक भ्रष्टाचाराचा आरोप आहे. बँकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध नोकरभरती संदर्भातील कागदपत्रे, गुणपत्रिकांमध्ये फेरफार आणि गैरकायदेशीर कृत्यकरून संचालक मंडळास सहकार्य केल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरुद्ध संगनमत आणि कट रचल्याच्या कलमांसह भारतीय दंड विधानाची कलमे लावण्यात आली आहेत. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध ‘दोषनिश्चिती’ झाली आहे. या गुन्ह्यात बँकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह बँकेचे संचालक मंडळ सुद्धा गुन्ह्यात सहभागी असताना त्यांच्याविरुद्ध आर्थिक भ्रष्टाचारविषयक लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गतच्या कलमांखाली दोष निश्चिती केली नाही, असे नवले यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणात बचाव पक्षातर्फे सचिन शिंदे काम पाहत आहेत.

आरोपी कोण?
३४ एकूण आरोपी
१७ आरोपी संचालक
१४ आरोपी कर्मचारी
३ आरोपींचा मृत्यू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतीच्या जादुटोणा प्रकरणी पत्नी पोलिसांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आजार बरा करण्याच्या नावाखाली पती दोरेगंडे, ताबीज देऊन लोकांची फसवणूक करीत असल्याची तक्रार पत्नीने जिन्सी पोलिसांकडे केली. दरम्यान, घरझडतीत फिर्यादीचा पती हा अनेक बनावट नाव धारण करुन राहत असल्याचे तसेच त्याकडे बनावट ओळखपत्र, चाकू, जादुटोण्याचे साहित्य सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.
फिर्यादी महिला शरीफ कॉलनीतील रहिवासी आहे. ईशरत उल्ला खान उर्फ आमील पठाण याच्याशी तिचे आठ वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्यांना दोन मुलगे आहेत. ईशरत उल्ला कामानिमित्त पाथ्री, परभणी, बीड येथे जातो. घरीही तो आजार बरा करण्याच्या नावाखाली दोरे गंडे, ताबीज देत लोकांची फसवणूक करतो, अशी तक्रार पत्नीने केली आहे. घरात २१ जानेवारी रोजी एक अनोळखी महिला आल्याने पतीपत्नींत वाद झाला. त्यावेळी पतीने जिवे मारण्याची धमकी दिल्याने फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेत कारवाईची मागणी केली होती. पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांचीही फिर्यादीने भेट घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी फिर्यादीच्या घरी जात पंचासमक्ष झडती घेतली. त्यात ईशरत उल्ला खान ज्या खोलीत रुग्णावर उपचार करत असे त्या ठिकाणी दारुच्या बाटल्या, औरंगाबादचा नकाशा, दोन मोठे चाकू, एक मोबाइल, दोन पेन ड्राइव्ह, मेमरी कार्ड, मोहम्मद जाफर हुसेन या नावाचा वाहन परवाना, फिर्यादीच्या पतीचा फोटो असलेले मतदान ओळखपत्र ज्यावर ईशरत उल्ला युनुस खान असे नाव आहे. तर ईशरत उल्ला खान नावाचे एक रेशन कार्ड, मोहम्मद जाफर हुसैन अशा नावाचे दिल्लीतील मदरशाचे ओळखपत्र, ईस्माली दारुल फैज असे नाव असलेले एक पत्रक असे साहित्य आढळले. पोलिसांनी पंचनामा करुन हे साहित्य जप्त केले आहे. पतीने खोट्या नावाने राहून फसवणूक केली, बनावट कागदपत्र व ओळखपत्र तयार करुन शासनाची फसवणूक केली तसेच जादुटोण्याचे साहित्य बाळगतो, असे सांगत पत्नीने त्या विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार खैरे यांच्या घरावर मोर्चा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करावी यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी आयटक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी - बालवाडी कर्मचारी युनियनने शनिवारी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या घरावर मोर्चा काढला. प्रलंबित प्रश्न दिल्लीत मांडून न्याय मिळवून देईन, असे आश्वासन खैरेंनी मोर्चेकऱ्यांना दिले.
आयटक ही भारतातील पहिली कामगार संघटना असून ९७ वर्षांचा इतिहास असणाऱ्या या संघटनेस देशभरातील शेकडो संघटना संलग्नित आहेत. देशभरातल अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन या आयटकशी संलग्न असणाऱ्या संघटनांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर देशभर गेल्या ३० वर्षांत लढे दिले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करावी, या मागणीसाठी खासदारांच्या निवासस्थानावर मोर्चे काढण्याचे ठरले. आगामी अर्थसंकल्पात अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी भरीव तरतूद करावी, यासाठी दोन फेब्रुवारी रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व आमदारांचे वेतन दुपटीने वाढवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू केला. संसदेतील खासदारांनाही चांगले वेतन, पेन्शन व सुविधा प्राप्त होत आहेत. मात्र, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मात्र कायम आहे. या प्रश्नी खासदार खैरे यांच्या घरावर मोर्चा नेल्यानंतर खैरेंनी मोर्चेकऱ्यांशी चर्चा केली. शिवसेना अंगणवाडी सेविकांना न्याय मिळवून देईल, असे आश्वासन दिले. यावेळी प्रा. राम बाहेती, अनिल जावळे, अशफाक सलामी, अभय टाकसाळ, तारा बनसोडे, विलास शेंगुळे, संगीता वैद्य, गंगा जंजाळ, विजया गाढवे, चंचल खंडागळे, ज्योती पाटील, शन्नो शेख, ललिता दीक्षित, अनिता पावडे, मंगल परदेशी, कमल शिरसाठ, कीर्ती राजगुरू, नंदा देशमाने यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

...या आहेत मागण्या!
आगामी अर्थसंकल्पात देशभरातील २० लाख अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी भरीव आर्थिक तरतूद करावी यासाठी आपण लोकप्रतिनिधी या नात्याने पुढाकार घ्यावा, अंगणवाडी सेविका व मदतनीसांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा व हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सेविकांना २० हजार रुपये तर मदतनीसांना १५ हजार किमान वेतन द्यावे, निवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांना एकरकमी रक्कम तातडीने अदा करावी, यासह प्रलंबित मागण्या मांडण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यातील रेल्वेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘नांदेड रेल्वे विभागाच्या मागण्यांकडे आजवर दुर्लक्ष झाले,’ अशी कबुली दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी शनिवारी औरंगाबाद दौऱ्यात दिली.
पंधरा दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आज औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या हॉलिडे कॅम्पचे उद‍्घाटन केले. यावेळी यादव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘नांदेड विभागातील प्रलंबित मागण्यांची यादी मोठी आहे. ज्या मागण्या अल्पावधीत पूर्ण होतील त्यांचे नियोजन करून, त्या त्वरित पूर्ण करू. काही मागण्या पूर्ण करण्यासाठी वेळ लागेल. नगरसोल रेल्वे स्थानकावर प्रवाशी सुविधा वाढवू. मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर काम सुरू आहे. उत्पन्न वाढल्यास अजून सुविधा वाढवू. मुदखेड - परभणी दुहेरीकरणातील मुदखेड ते मिरखेलपर्यंच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मिरखेल ते परभणी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचेही अंतिम टप्प्यात असून मार्च अखेरपर्यंत हा मार्ग खुला करण्यात येईल. मुदखेड ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम मंजुरी मिळाल्यानंतर सुरू करू,’ असे यादव म्हणाले. यादव यांनी नांदेड रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. एस. के. सिन्हा यांच्यासह नगरसोल रेल्वे स्थानकाची पाहणी केली.

विभाग बदलणे सोपे नव्हे
सतत होणाऱ्या दुर्लक्षामुळे राज्यातील अनेक खासदारांनी नांदेड रेल्वे विभाग मध्य रेल्वेशी जोडण्याची मागणी केली आहे. या बाबत यादव म्हणाले, ‘रेल्वेमधील एक विभाग दुसऱ्या झोनमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करण्यात गैर नाही. मात्र, ही प्रक्रिया क्लिष्ट आहे. यात वेळ लागेल. झोन बदलल्यानंतरही तो विभाग हा रेल्वेचाच एक भाग असतो.’


मी साईभक्त
शनिवारी सकाळी महाव्यवस्थापकांनी शिर्डीच्या साई मंदिराला भेट दिली. त्यानंतर ते शनिशिंगणापूरला जाऊन दर्शन घेऊन आले. औरंगाबाद रेल्वे स्थानकावर आल्यानंतर त्यांनी मी साईभक्त असल्याचे सांगितले. तसेच हे पद मिळण्याच्या दोन दिवसांपूर्वी साई दर्शन घेतल्याचे पत्रकारांना सांगितले.

थ्री स्टार विश्रामगृह
औरंगाबाद रेल्वे स्थानकावर रेल्वे गार्ड, ड्रायव्हर, पॉइंटमन यांना आराम करण्यासाठी हॉलिडे कॅम्प तयार करण्यात आला आहे. या विश्रामगृहाचे उदघाटन यादव यांनी केले. हे विश्रामगृह कर्मचाऱ्यांसाठी आहे. हे कॅम्प थ्री स्टार हॉटेलच्या दर्जाचे तयार झाल्याचेही यादव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images