Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बचतगटाकडून निकृष्ट दर्जाच्या गव्हाचा पुरवठा

0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
अंगणवाडीत शिकणाऱ्या लहान बालक व गरोदर मातांच्या पोषण आहारात मोठा घोटाळा होत असल्याचे उघड झाले आहे. बचत गटाकडून निकृष्ट गहू व धान्याचा सर्रास वापर केला जात आहे. गव्हात किड्यासह काड्या व कचरा असलेला गहू मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. महिला व बालविकास विभागाममार्फत नेमण्यात आलेले हे बचतगट बालकांच्या आरोग्याशी खेळत आहेत.
राज्यातील अंगणवाडी व गरोदर स्त्री आणि स्तनदा मातांना महिला व बाल विकास विभागामार्फत पोषण आहार योजनेतंर्गत गव्हापासून बनवलेले पदार्थ दिले जातात. मात्र, या पोषण आहारासाठी वापरला जाणारा गहू हा निकृष्ट दर्जाचा असल्याचे समोर आले असून या गव्हात किडे, काड्यासह अन्य कचरा आहे. अत्यंत निकृष्ट असलेला हा गहू किडे व कचरा काढून नंतर त्यापासून पोषण आहार बनवला जातो. उस्मानाबाद जिल्ह्यातील एमआयडीसी भागात असलेल्या योगेश्वरीदेवी महिला बचत गटाच्या पोषण आहार निर्मिती केंद्रावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. किडे लागलेला निकृष्ट गहू पोषण आहारासाठी वापरला जात आहे. यावेळी येथे काम करणाऱ्या एका कामगाराने गव्हातून किडे काढून नंतर ते गहू भाजून त्यापासून पोषण आहार बनवला जात असल्याचे सिकंदर हातगळे यांनी सांगितले. जनावरे सुद्धा खाणार नाहीत असा हा गहू पोषण आहारासाठी बचत गट वापरत असून लहान बालक व गरोदर मातांच्या आयुष्याशी खेळण्याचा हा गंभीर प्रकार सुरू आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात ११ महिला बचत गट हे पोषण आहार तयार करण्याचे काम करीत असून त्यांना दर महिन्याला यासाठी सुमारे एक कोटी रुपये दिले जातात. यातील अनेक प्रकल्प बंद अवस्थेत असून त्यांच्या नावाने कारभार चालतो.

पोषण आहाराच्या नावाखाली बचत गटांना कोटयावधी रुपयाची खैरात दिली जात असून यामध्ये शासकीय अधिकारी सुद्धा गुंतले आहेत. बचत गटांना केंद्र सरकारचे भारतीय खाद्य निगम दोनशे रुपये क्विंटल म्हणजे दोन रुपये दराने गहू देते. मात्र, हा गहू निकृष्ट असतो शिवाय यातील फक्त ५० टक्के गहू हा चाळून वापरता येतो असे अधिकारी सांगत आहेत. मात्र, इतकी गंभीर बाब असतानाही कोणताही अधिकारी उघडपणे बोलण्यास तयार नाही.

याप्रकरणी शिंगोली गावात एक भयाण वास्तव समोर आले. या गावातील अंगणवाडीत शिकणाऱ्या महेश व अथर्व लोंढे या दोन बालकांना दरमहा प्रत्येकी चार पिशवी पोषण आहार मिळतो. मात्र, एकदा या आहारात खडे व कचरा निघाल्याने कोणीही हा आहार खात नाही हा आहार जनावरांना टाकला तर जनावरे सुद्धा तो आहार खात नसल्याचे त्यांची आजी पद्मिनी लोंढे व आई काजल लोंढे यांनी सांगितले.

महिला व बालविकास विभागातील अधिकारी बचत गटाशी संधान साधून या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करीत लाखो रुपयांचा अपहार करीत आहेत. त्यामुळे या प्रकाराची पोषण आहाराच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या शीला उंबरे यांनी केली आहे.

कारवाईकडे सर्वांचे लक्ष
पोषण आहार हा पोषक आहे की नाही हे तपासण्याची कसलीही यंत्रणा जिल्हा पातळीवर नसल्याने बचत गटावर कोणाचाही अंकुश राहिलेला नसल्याचे दिसत आहे. बचत गटाच्या या निकृष्ट धान्य घोटाळ्यानंतर महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बीड जिल्ह्यात ९७ अर्ज दाखल

0
0


म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्हा परिषदेच्या ६० गट आणि अकरा पंचायत समितीच्या १२० गणासाठी निवडणूक होत असून सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २७ जानेवारीपासून सुरुवात झाली. मात्र, शुक्रवारी अमावस्या असल्याने जिल्ह्यात एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. सोमवारी जिल्ह्यातील अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्हा परिषदेच्या ६० गटांसाठी ४७ अर्ज दाखल झाले होते. तर पंचायत समितीसाठी ५० अर्ज दाखल झाले.
गेवराई तालुक्यात जिल्हा परिषद गटासाठी १२ व पंचायत समितीसाठी २१ उमेदवारी अर्ज आले आहेत. बीड तालुक्यात जिल्हा परिषद गटासाठी ११ व पंचायत समितीसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल झाले. माजलगावमध्ये पंचायत समितीसाठी आठ तर जिल्हा परिषदेसाठी चार अर्ज दाखल झाले. केज तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी सहा तर पंचायत समिती गणासाठी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला. परळीत जिल्हा परिषद गटासाठी सात तर पंचायत समितीसाठी सात अर्ज आले आहेत. आष्टीत जिल्हा परिषदेला व पंचायत समितीत दोन अर्ज आले आहेत. शिरूर, धारूर, वडवणी तालुक्यात प्रत्येकी एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. चकलंबा आणि उमापूर अशा दोन जिल्हा परिषद गटातून आज जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी उदयसिंह पंडित, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर पिसाळ, जिल्हा परिषद सदस्य डॉ. विजयकुमार घाडगे, आदी उपस्थित होते. तर बीड तालुक्यातून नाळवंडीमधून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुण डाके, तर शिवसेनेकडून गणेश वरेकर यांनी तर पालीतून राष्ट्रवादीकडून उषा आखाडे यांनी उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला. एक फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे राहिलेल्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची मोठी गर्दी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेड-पुणे रेल्वे औरंगाबादमार्गे धावणार

0
0

आठवड्यातून दोन दिवस; डॉ. ए. के. सिन्हा यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नांदेड-पनवेल रेल्वे फेब्रुवारीपासून नियमित धावणार आहे. ही रेल्वे नियमित झाल्यानंतर नांदेड-पुणे ही रेल्वे औरंगाबाद मार्गे आठवड्यातून दोन दिवस चालविण्यात येणार असल्याची माहिती नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक डॉ. ए. के. सिन्हा यांनी दिली. ते प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी नांदेड विभागात रेल्वे सुरक्षा, प्रवासी तथा माल गाड्या वेळेवर चालवून प्रलंबीत विकास कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त नांदेड विभागात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. नांदेड रेल्वे विभागीय कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात डॉ. ए. के. सिन्हा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रेल्वे सुरक्षा दलाने डीआरएमला सलामी दिली. त्यासोबतच विविध सांस्कृ‌तिक कार्यक्रमांचे आयोजनही यावेळी करण्यात आले.

यावेळी डॉ. सिन्हा म्हणाले, ‘स्वच्छतेत नांदेड विभागाने नववा क्रमांक पटकाविला. वक्तशीरपणामध्ये नांदेड विभाग चौथ्या क्रमांकावर आहे. हे रेल्वे कर्मचाऱ्यांमुळे शक्य झाल्याचे सांगून त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. नांदेड विभागात आतापर्यंत ११६ विशेष रेल्वे चालविल्या असून ३९१ अतिरिक्त डब्बे जोडण्यात आले आहेत. नांदेड विभागात ३४ एटीव्हीएम मशिन, ११ जनसाधारण तिकिट बुकींग सेवक, ४ प्रवासी सुविधा केंद्र, २० रेल्वे स्थानकावर बुकिंग सेवक दिले. याशिवाय नांदेड विभागात ५ सरकते जिने आणि २ लिफ्टची सेवा देण्यात आली. १० रेल्वे स्टेशनवर पीओएस मशीन बसवून कॅशलेस रेल्वे स्थानक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने १६ मानवरहित रेल्वे फाटक कायमचे बंद करण्यात आले आहे. तर अन्य मानवरहित फाटक आगामी काळात टप्प्याने बंद करण्यात येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूर: ९ कामगारांचा गुदमरून मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

लातूर एमआयडीसीतील एका तेलाच्या कंपनीत टाकी साफ करण्यासाठी त्यात उतरलेल्या पाच कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. टाकीतील विषारी वायूमुळं हे कर्मचारी बेशुद्ध पडले. बराच वेळ ते बाहेर न आल्याने त्यांना पाहण्यासाठी टाकीत उतरलेल्या कामगारांचाही मृत्यू झाला.

लातूर एमआयडीसीमधील किर्ती ऑइल मिलमध्ये सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला. खाद्य तेलाचं उत्पादन करणाऱ्या या कंपनीत रासायनिक प्रक्रियेतून निघणारे टाकाऊ द्रव्य एका टाकीत जमा केले जायचे. त्यासाठी कंपनीच्या आवारात ६०० चौरस फुटांची आणि २० फूट खोल अशी टाकी तयार करण्यात आली होती. या टाकीच्या नियमित सफाईसाठी कंत्राटी कामगारांना बोलवण्यात आले होते. संध्याकाळी टाकी साफ करण्यासाठी तीन कामगार टाकीत उतरले. ते बराच वेळ झाले तरी बाहेर येत नसल्याने साफसफाईचे काम घेणारा कंत्राटदार आणि अन्य पाच कामगारही टाकीत उतरले. मात्र, तेदेखील बाहेर आले नाहीत. शेवटी रात्री एका कामगाराला दोरीने बांधून टाकीच्या आत सोडण्यात आले. टाकीत विषारी वायू असल्याचे त्या कामगाराच्या लक्षात येताच तातडीने त्याला बाहेर काढण्यात आले. यानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरू झाले. पोकलेन मशिनच्या आधारे टाकीचा काही भाग खोदण्यात आला. टाकीतून नऊ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. विषारी वायूमुळेच या सर्वांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘काँग्रेसमधील इनकमिंग हेच उत्तर’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

भाजप व शिवसेना या दोन पक्षांनी केंद्र आणि राज्यामध्ये सत्तेत असताना जनविरोधी निर्णय घेतल्यामुळे नागरिकांचा कौल काँग्रेसकडे वाढला असून राष्ट्रवादी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमधील प्रवेश हेच विरोधकांना जिल्ह्यात उत्तर असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नांदेड तालुका प्रमुख सत्यजित भोसले व कंधार तालुक्यातील कौठा जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेश सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर माजी पालकमंत्री आमदार डी. पी. सावंत, आमदार अमरनाथ राजुरकर, आमदार वसंतराव चव्हाण, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे-नागेलीकर, प्रदेश सरचिटणीस बी. आर. कदम, माजी आमदार रोहिदास चव्हाण आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी चव्हाण म्हणाले, ‘६३ जिल्हा परिषद गट व १२६ पंचायत समिती गणामधून ९०० पेक्षा अधिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितली आहे. उमेदवारी मागणारे हे सगळे जवळचे आहेत. प्रत्येकांना उमेदवारी द्यावी अशी माझी इच्छा आहे. परंतु जो जिंकेल त्यांनाच उमेदवारी देण्याचा माझा प्रयत्न असेल. अर्थात उमेदवारी ज्यांना देवू शकलो नाही. त्यांच्यासाठी माझ्या हृदयात वेगळे स्थान आहे. त्यामुळे उमेदवारी दिलेल्या व्यक्तिंना निवडून आणणे ही कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे.’

प्रारंभी या पक्ष प्रवेश सोहळ्यास जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर व डॉ. श्याम पाटील-तेलंग यांनी संबोधित केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नांदेड तालुकाध्यक्ष सत्यजित भोसले यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यासोबतच कंधार तालुक्यातील कौठा सर्कलमधील बारूळचे माजी उपसरपंच हरी पाटील-शिंदे, राष्ट्रवादीचे तालुका सदस्य शहाबुद्दीन शेख, केशव पाटील जाधव यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी काँग्रेसचे तालुका प्रभारी डॉ. श्याम पाटील-तेलंग, जिल्हा काँग्रेसचे सचिव भाऊसाहेब कदम, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील-कल्याणकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका वटविली.

या पक्ष प्रवेश सोहळ्याच्यावेळी पंढरीनाथ पाटील-बोकारे, नागोराव पाटील- चिनेगावकर, नांदेड उत्तरचे विधानसभा अध्यक्ष विठ्ठल पावडे, गंगाधर कदम, चांदोजी बागल आदींची उपस्थिती होती.

‘सरकारच्या त्रासाला जनता कंटाळली’

केंद्रातील नरेंद्र मोदी व राज्यातील देवेंद्र फडणवीस या दोघांनी जनविरोधी अनेक निर्णय घेतले. नोटबंदीमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले. त्यामुळे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील असंख्य कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत. हेच खऱ्या अर्थाने सत्ताधाऱ्यांना उत्तर आहे. सरकारच्या जनविरोधी धोरणास जनता कंटाळली आहे, असे मत आमदार डी. पी. सावंत यांनी त्यांच्या भाषणामधून व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप सरकारचा खोटारडेपणा उघड

0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

‘देश आणि राज्यातील भाजप सरकारचा खोटारडेपणा उघड होत आहे. यामुळे काँग्रेसचे सरकार बरे होते, असे म्हणण्याची पाळी जनतेवर आली आहे,’ अशी टीका आमदार अब्दुल सत्तार यांनी केले.

तालुक्यातील राजाराय टाकळी येथील हाजराबेगम उर्दू प्रायमरी हायस्कूलमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा सोमवारी मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला बाजारसावंगी गट आणि गण, टाकळी राजेराय गणातील कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार सत्तार भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यकारभारावर टीका केली. गेल्या २२ दिवसांमध्ये मराठवाड्यातील ५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याकडे लक्ष वेधून हे सरकार जनतेची दिशाभूल करीत असल्याचे सांगितले. ‘जिधर बंब, उधर हम,’ असे करू नका, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. या मेळाव्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

सविता देविदास अधाने यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकाच दिवसात मेळाव्याची उत्तम तयारी केल्याची दखल नेत्यांनी घेतली. फेरोज पटेल यांच्यावर बाजारसावंगी गट आणि गणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

व्यासपीठावर टाकळी राजेरायचे सरपंच अफसर दादा पटेल, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार नितीन पाटील, खुलताबादचे नगराध्यक्ष एस. एम. कमर, फेरोज पटेल, तौसीफ देशमुख, जगन्नाथ खोसरे, शोभा खोसरे, अब्दुल समद टेलर हे उपस्थित होते.

...नंतर सारवासारव

माजी आमदार नितीन पाटील यांनी सविता अधाने या निवडून आल्यानंतर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती होतील, असे जाहीर केले. पण व्यासपीठावर महिला जिल्हाध्यक्षा व वेरूळ गटातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार शोभा खोसरे हे नाराज असल्याचे दिसताच त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

कामाच्यांना आणले

आमदार अब्दुल सत्तार यांनी आजच्या मेळाव्यासाठी रिकाम्या लोकांना आणले नसल्याचे सांगितले. प्रभारी जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, माजी जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, जिल्हा सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर, तालुकाध्यक्ष अनिल पाटील श्रीखंडे, जिल्हा परिषद सदस्या शोभा नलावडे, पंचायत समिती सभापती फरजाना पटेल यांची गैरहजरी मेळाव्यात चर्चेची ठरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोपींकडे बनावट नोटा

0
0

औरंगाबाद : दोन हजारांच्या बनावट नोटा चालवणाऱ्या शहरातील दोघांच्या पोलिस कोठडीमध्ये बुधवार, १ फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. यू. सुपेकर यांनी दिले. कोठडीदरम्यान, आरोपींकडून ९ नोटा जप्त करण्यात आल्या.

घाटीतील निलंबित चतुर्थ श्रेणी कर्मचारी आरोपी मोहम्मद इर्शाद मोहम्मद इसाक (रा. शाहबाजार) याला दोन हजारांच्या १८ बनावट नोटा, तर आरोपी फिरोज अब्दुल रशीद देशमुख (रा. कैसर पार्क, नारेगाव) याला दोन हजारांच्या २ बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होऊन त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. कोठडीदरम्यान आरोपींकडून आणखी ९ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. तसेच अशाच प्रकारच्या काही नोटा खुलताबाद येथील उरूसात खर्च केल्याचीही त्यांनी कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून कागद-शाई-छपाई यंत्र आदी साहित्य जप्त केले आहे. आरोपींच्या इतर साथीदरांचा शोध घेणे बाकी आहे, तसेच या प्रकरणात परराज्यात काही धागेदोरे आहेत का, याचा तपास करण्याचा असल्याचे आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील एम. ए. गंडले यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने दोन्ही आरोपींना बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघाच्या ३०० वादकांचा विक्रम

0
0

औरंगाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रजासत्ताक दिनी झालेल्या मातृभूमी स्वरवंदना या कार्यक्रमात ३०० पेक्षा जास्त वादकांनी एक तासापेक्षा अधिक काळ देशभक्तीपर गाणी सादर केली. या विक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया या संस्थेने दखल घेऊन आयोजकांना प्रमाणपत्र दिले आहे.

सिडकोतील राजीव गांधी मैदानावर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत २४ ब्रास बँड पथकांनी मातृवंदना स्वरवंदना केली. या पथकांमधील वाद्यवृंदांनी ‘ए मेरे वतन के लोगो...’ ‘जयोस्तुते श्री महन्मंगले..’, ‘सारे जहाँ से अच्छा..’, ‘मेरे देश की धरती...’, ‘सत्यम शिवम ‌सुंदरम’..’, अशी विविध गीते सादर केली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्र सेवा समितीची घोष पथकेही सामील झाली होती. त्यांनी विविध रचना सादर केल्या. ब्रास बँड पथके केवळ लग्नकार्यात सहभागी होतात, परंतु संघाने त्यांना देशभक्तीपर गाणी सादर करून व्यासपीठ मिळवून दिले.

हा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भन्ते विशुद्धानंद महाथेरो, सकल चर्मवाद्याचे अभ्यासक शरद दांडगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मधुभाऊ कुलकर्णी, प्रांत सहसंघचालक दाजी जाधव, शहर सहसंघचालक देवानंद कोटगिरे, अनिल भालेराव हे व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त करत उपक्रमाचे कौतुक केले.

लक्ष्मीकांत धोंड यांनी सूत्रसंचालन केले. सहभागी बँड पथकांना प्रमाणपत्रे देण्यात आली. वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र पुरूषोत्तम हेडा, मनीष कुलकर्णी, वेदांत देशपांडे, प्रकाश पुराणिक यांनी संस्थेचे मुख्य संपादक पवन सोळंकी यांच्याकडून स्वीकारले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलीची धिंड काढली; नुकसानभरपाईचे आदेश

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

मुलीच्या तोंडाला काळे फासून तिची गावातून धिंड काढल्याप्रकरणी तिघांनी प्रत्येकी १५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एन. डब्ल्यू सांबरे यांनी दिले.

सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील रहिवासी सीताराम धोंडू महानोर, रामकृष्ण धोंडू महानोर आणि प्रफुल्ल महानोर यांनी २४ सप्टेंबर १९९९ रोजी त्याच गावातील एका मुलीला घरातून ओढत आणून शिवीगाळ केली. तिच्या तोंडाला काळे फासले आणि गावातून धिंड काढली. मुलीच्या तक्रारीवरून सोयगाव पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भांदवि ५०६, ५०४, ५०९ कलामान्वे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सोयगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिघांविरोधात आरोप सिद्ध झाल्यामुळे त्यांना एक वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावास आणि सीताराम धोंडू महानोर याला ४५२ कलमाखाली सहा महिने सक्तमजुरी, ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कैदेची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेच्या विरोधात तिघांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अपील केले.

या अपिलावर सुनावणी होऊन न्यायालयाने तिघांची सक्तमजुरीची शिक्षा कमी करून प्रत्येकी दोन हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. यावर फिर्यादी मुलीने औरंगाबाद खंडपीठात पुनर्विलोकन याचिका दाखल केली.

यावर सुनावणी झाली असता खंडपीठाने याचिका मान्य करत प्रत्येकी १५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश देत याचिका निकाली काढली. मुलीच्या वतीने जगदीश देशपांडे, शासनाच्या वतीने एन. टी. भगत यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी बस गाशा गुंडाळणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आधीच शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा बट्ट्याबोळ उडालेला असताना आता रडतपडत सुरू असणारी सिटी बसही बंद होण्याची शक्यता आहे. ‘पालिकेची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे आम्ही सिटी बस चालविणार नाही,’ असे उत्तर आयुक्तांनी एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक रा. ना. पाटील यांना दिले. त्यामुळे महामंडळाने या सेवेतून गाशा गुंडाळण्याचे संकेत दिले आहेत.

शहरात मागील पाच वर्षांपासून एसटी महामंडळाकडून सिटी बस चालविण्यात येत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला १६ कोटींचा तोटा झाला. तो दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने महापालिका आयुक्तांना ५ जानेवारी रोजी पत्र दिले. एसटीचा तोटा भरून काढा, अन्यथा ही सेवा बंद करू असा इशारा दिला. मात्र, आयुक्तांनी एसटी महामंडळाकडून पालिकेला शहर बस सेवेबाबत कोणतेही पत्र मिळाले नसल्याचा खुलासा केला होता. यानंतर मागील आठवड्यात पुन्हा महामंडळाने तसेच पत्र दिले. विभाग नियंत्रक पाटील आणि वाहतूक अधिकारी संदीप रायलवार यांनी महापालिका आयुक्तांची सोमवारी भेट घेतली. यावेळी सिटी बस सेवेबाबत चर्चा करण्यात आली. आयुक्तांनी पालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने सिटी बस सेवा चालविणे शक्य नाही, असे सांगितले. त्यामुळे एसटीचा तोटा भरून काढणेही शक्य नसल्याचे सांगितले. आयुक्तांनीच हात वर केल्याने आता मार्चनंतर सिटी बस कधीही बंद पडण्याची शक्यता आहे.

सिटी बसचा इतिहास

महापालिका क्षेत्रात सिटी बस चालविण्याची जबाबदारी पालिकेची आहे. त्यामुळे पालिकेने ही सेवा चालवावी, असा निर्णय एसटी महामंडळाने २००५ मध्ये घेतला. यानंतर २६ जानेवारी २००६ पासून शहरात महापालिकेने बीओटी तत्त्वावर एएमटी (अकोला महानगर प्रवासी वाहतूक) बस सेवा सुरू केली. मात्र, २०१०मध्ये एएमटी बंद करण्यात आली. डिसेंबर २०११मध्ये तत्कालीन परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा एसटीची सिटी बस सेवा सुरू केली.

शहर वेठीला

एसटी महामंडळ आणि महापालिकेने सिटी बसच्या बाबतीत शहराला पुन्हा एकदा वेठीला धरले आहे. अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या मनात आले तेव्हा ही सेवा सुरू केली जाते, नागरिकांना सवय लागल्यानंतर अचानक ती बंदही केली जाते. त्यामुळे या सेवेबद्दल महापालिका गंभीर आहे की नाही, हा प्रश्नच आहे. बहुतेक शहरांमध्ये ही सेवा महापालिकेकडूनच चालविली जाते कारण ती पालिकेचीच जबाबदारी आहे; परंतु या पालिकेची क्षमता नसल्याने एसटीकडून ती चालविली जाते. ती तोट्यात असल्यामुळे एसटीला नको आहे. कोणत्याही शहरातील बससेवा फायद्यात नाही, परंतु सेवा म्हणून ती चालविली जाते. तशीच औरंगाबादेतही चालविणे पालिकेला शक्य आहे. सदैव नकारात्मक भूमिका घेऊन जबाबदारी झटकण्यापेक्षा पालिकेने स्मार्ट सिटी योजनेत शासनाकडून निधी आणून ही बससेवा सुरू करावी. त्याशिवाय वाहनांची गर्दी, प्रदूषण आणि नागरिकांवरील आर्थिक ताण कमी होणार नाही.

सिटी बसची वाटचाल

सध्या ११ मार्गावर १६ बस

२००५ पर्यंत एसटीकडे

२००६ पासून पालिकेकडे

२०१० एटीएम सेवा बंद

२०११ सिटी बस सुरू

महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे शहरात महापालिकेच्या माध्यमातून सिटी बस सेवा चालविणे शक्य नाही. त्यातून एसटी महामंडळाचा तोटा भरणेही सध्या तरी अवघड दिसते आहे.

- ओम प्रकाश बकोरिया, आयुक्त

आयुक्तांनी सिटी बस चालविणे शक्य नसल्याचे सांगितले आहे. ही माहिती आम्ही वरिष्ठ कार्यालयाला पाठवू. वरिष्ठ कार्यालयातून सिटी बस सेवा चालू ठेवायची की नाही, याबाबत निर्णय होईल.

- रा. ना. पाटील, विभाग नियंत्रक, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर गावात मुक्कामी पाठवीन

0
0

औरंगाबादः मार्च २०१७पर्यंत जिल्ह्यात ६५ हजार ३९६ शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले नाही, तर त्या तालुक्यासाठी नेमलेल्या पालक अधिकाऱ्याला थेट गावागावांत मुक्कामाला पाठवीन, असा इशारा औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांनी दिला आहे. आतापर्यंत फक्त २६ हजार शौचालये बांधण्यात आली आहेत.

जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागांतर्गत गेल्या वर्षी ग्रामपंचायत निहाय सर्वेक्षण करून पाणंदमुक्तीसाठी मोहीम राबविण्यात आली होती. शौचालय बांधण्यासाठी लाभार्थींना प्रोत्साहनपर भत्ता म्हणून प्रत्येकी १२ हजार रुपये दिले जातात. राज्य सरकारने यात पुढाकार घेऊन राज्यभर ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाठपुरावा केला. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांनी पाणंदमुक्ती मोहिमेच्या बाबतीत सुरवातीपासून धडाकेबाज पावले उचलली. खुलताबाद तालुका पथदर्शी म्हणून निवडला गेला. गावकऱ्यांसोबत बैठका, जनजागृती मोहीम राबवून या तालुक्याची पाणंदमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. औरंगाबाद तालुक्यातही ही चळवळ जोरदारपणे राबविली जात आहे. सीईओ अर्दड महिन्यातून दोनदा या मोहिमेचा आढावा विभागप्रमुखांकडून घेतात.

अर्दड यांच्या दालनात सोमवारी सर्व विभागप्रमुखांची पाणंदमुक्तीबाबत बैठक झाली. जिल्ह्यात वार्षिक कृती आराखड्यानुसार एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत ६५ हजार ३९६ शौचालयांचे बांधकाम पूर्ण होणे आवश्यक आहे. डिसेंबर अखेर केवळ २६ हजार ३९६ शौचालयांचेच बांधकाम पूर्ण झाल्याची आकडेवारी त्यांच्यासमोर सादर करण्यात आली. काही तालुक्यांमध्ये अतिशय कमी झाल्याचे पाहून सीईओ संतापले आणि त्यांनी थेट विभागप्रमुखांना यात जबाबदार ठरविले आहे.

‘एवढी चांगली योजना राबविताना कुठेही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. तुम्हाला सहा महिन्यांपूर्वी तालुके वाटून दिले. तेथे जाऊन तुम्ही आढावा घेत नसाल, तर योजना यशस्वी होणार नाही. पाणंदमुक्तीमुळे ग्रामीण भागातील आरोग्याचे प्रश्न बऱ्याच अंशी संपणार आहेत. मार्च २०१७अखेर जिल्हा पाणंदमुक्तीचे उद्दिष्ट आहे. त्यात कुणी कसूर करणार असेल तर थेट कारवाई केली जाईल. ज्या विभागप्रमुखाच्या तालुक्याची १०० टक्के उद्दिष्टपूर्ती होणार नाही, त्याला संबंधित तालुक्यातील एका गावात रोज मुक्कामासाठी पाठवू,’ असा इशारा त्यांनी दिला.

अर्दड यांच्या इशाऱ्यानंतर अधिकारी हादरून गेले आहेत. अनेक अधिकाऱ्यांनी केवळ औपचारिकात म्हणून तालुक्यात जाऊन आढावा बैठक घेतली होती. आता पुढच्या दोन महिन्यात उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी अधिकाऱ्यांना युद्धपातळीवर काम करावे लागणार आहे.

औरंगाबाद जिल्हा मार्च २०१७अखेर पाणंदमुक्त करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. यंत्रणेकडून सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यात लक्ष देऊन काम पूर्ण केले तर निश्चितपणे वेळेच्या आत उद्दिष्टपूर्ती होईल. कामात कुठेही कुचराई सहन केली जाणार नाही.

- मधुकरराजे अर्दड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योगमुद्रेने ७९व्या वर्षी १६ गोळ्या बंद!

0
0

औरंगाबादः ह्रदयविकारामुळे रोज सुरू असलेल्या १६ गोळ्या योगमुद्रांमुळे बंद झाल्याचा डॉ. आर. डी. दीक्षित यांचा दावा आहे. पन्नास वर्षे अॅलोपॅथीची प्रॅक्टिस केलेले डॉ. दीक्षित यांना २००५मध्ये हार्ट अटॅक आल्यानंतर बायपास शस्त्रक्रिया केली. पुन्हा २०१४मध्ये हार्ट अटॅक आल्यानंतर दुसऱ्यांदा बायपासचा सल्ला देण्यात आला, परंतु त्यांची इच्छा नव्हती. योगमुद्रेचे पुस्तक हातात पडले व मुद्राभ्यास सुरू करताच १५ दिवसांत त्रास कमी झाला. आणखी मुद्राभ्यास वाढवत एकेक गोळी कमी केली. दोन महिन्यांत बहुतांश त्रास कमी झाला आणि ७९ वर्षीय डॉ. दीक्षित यांच्या १६ गोळ्या मागच्या १० महिन्यांपासून शून्यावर कायम आहेत.

डॉ. दीक्षित हे शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचे (१९५८) विद्यार्थी. ‘एमबीबीएस’ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी २ वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली व १९६६ ते २०१४पर्यंत देगलूर येथे प्रॅक्टिस केली. दरम्यान, त्यांना २००५मध्ये पहिला हार्ट अटॅक आला आणि त्यांच्यावर शहरातील कमलनयन बजाज रुग्णालयात बायपास झाली. अॅलोपॅथीचे औषधोपचार सुरू असताच २०१४मध्ये दुसरा तीव्र स्वरुपाचा हार्ट अटॅक आला व दुसऱ्यांदा बायपासचा सल्ला देण्यात आला. त्यांना शस्त्रक्रियेची अजिबात इच्छा नव्हती; म्हणूनच त्यांनी गोळ्यांचा पर्याय निवडला, मात्र २-४ नव्हे, तर तब्बल १६ गोळ्या घ्याव्या लागत होत्या. जुलै २०१५ मध्ये डोळ्यांवर शस्त्रक्रिया होऊन वाढलेल्या मधुमेहामुळे काही महिने इन्सुलिनही घ्यावे लागले.

दरम्यान, ते आपल्या मुलाकडे औरंगाबादला आले असता, त्यांच्या हातात योग मुद्रेचे पुस्तक पडले. ते वाचून त्यांनी नोव्हेंबर २०१५पासून प्रत्यक्ष योग मुद्रा करण्यास प्रारंभ केला. अवघ्या १५ दिवसांत त्यांना दम लागणे व इतर त्रास कमी झाले. आणखी मुद्रांचा अभ्यास सुरू केला आणि दोनच महिन्यांत बराचसा त्रास कमी झाल्यानंतर एकेक गोळी कमी केली. घरच्यांनी विरोध केला; पण ते निर्णयावर ठाम होते. एकेक गोळी कमी करत त्यांनी २ एप्रिल २०१६पासून म्हणजेच जवळजवळ १० महिन्यांपासून त्यांनी एकही गोळी घेतलेली नाही.

मला वॉलची समस्या आहे. १९८५मध्ये ओपन हार्ट सर्जरी झाली आहे. २००३मध्ये पुन्हा बलून टाकून वॉल मोठा करण्यात आला. ऑक्टोबरमध्ये पुन्हा त्रास सुरू झाल्यानंतर वॉल रिप्लेसमेंटचा सल्ला देण्यात आला. त्यासाठी मोठा खर्च होता. प्रकृती ढासळल्यानंतर डॉ. दीक्षित यांच्या सल्ल्यानुसार मुद्राभ्यास सुरू केला व १६व्या दिवशी इंटरव्यूहला गेलो. आता कुठलाच त्रास नाही.

- अनिल लोखंडे

मला ३६-३७ वर्षांपासून पॅरालिसिस आहे व मनगट-हातामध्ये अजिबात शक्ती नव्हती. मात्र मुद्रांमुळे १५ दिवसांत हात-बोटांमध्ये शक्ती आली. ७९व्या वर्षी हा परिणाम खूप दिलासादायक आहे.

– गोविंद वार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद विकास समुद्रेंवर अंत्यसंस्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

काश्मीर येथे हिमस्खलनामुळे बीड जिल्ह्यातील भारतीय सैन्य दलाच्या जवान विकास पांडुरंग समुद्रे हे शहीद झाले होते. त्यांच्या पार्थीवावर बीड जिल्ह्यातील गांजपूर येथे शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद विकास समुद्रे हे सैन्य दलाच्या मुळ युनिट १८ महार रेजिमेंटमध्ये व सध्या ५१ राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. जम्मू काश्मीर मधील गुरज भागात अतिरेकी घुसखोरीवर नियंत्रण ठेवण्याकरीता तैनात करण्यात आले होते. २५ जानेवारी रोजी अचानक झालेल्या हिमस्खलनामध्ये विकास समुद्रे शहीद झाले होते. त्यांचे पार्थिव गुरज सेक्टर येथून श्रीनगर मिलिटरी हॉस्पीटल येथे हेलिकॉप्टरने ३० जानेवारी सायंकाळी आणण्यात आले. श्रीनगर येथून दिल्ली, दिल्लीहून विमानाने पुणे आणि बुधवारी सकाळी पुण्याहून हेलिकॉप्टरने धारुर आणि तेथून त्यांच्या मुळगावी गांजपूर येथे रुग्णवाहिकेतून आणण्यात आले. प्रथम धारुर शहरात त्यानंतर गांजपूर गावात आणि त्यांच्या राहत्या घरी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले. गावकऱ्यांनी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. त्यांचा तिरंग्यामधील पार्थिव गावात आणताच गावकऱ्यांनी तसेच एनसीसी व स्काऊट गाईडच्या पथकांनी अंतयात्रेत सहभाग घेतला. संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी शहीद विकास समुद्रे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. पोलिस दलाच्या पथकाने तसेच भारतीय सैन्य दलाच्यावतीने लेप्टनंट कर्नल नितिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे, आमदार संगीता ठोंबरे, आमदार आर. टी. देशमुख, सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल हरीभाऊ दळवी, कॅप्टन भीमराव पारवे यांच्यासह असंख्य अधिकारी, पदाधिकारी व देशप्रेमी नागरिकांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. शहीद विकास समुद्रे यांचे भाऊ परमेश्वर यांनी चितेला भडाग्नी दिला. यावेळी आई, पत्नी, बहिनी, चिमुकली मुलगी आणि नातेवाईकांनी अत्यंत शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापूर तालुक्यात १८४ अर्ज दाखल

0
0

वैजापूरः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवट्या दिवशी बुधवारी १८४ अर्ज दाखल झाले. संख्या पुढीलप्रमाणे गड- वाकला ४, बोरसर ९, शिऊर ४, सवडगाव १२, लासूरगाव ९, घायगाव ९, वंजारगाव ६, महालगाव १५. पंचायत समिती गण- वाकला १०, पोखरी ५, मनुर ६, बोरसर ८, शिऊर ६, खंडाळा १०, जरुळ ७, सवडगाव ९, पालखेड ९, लासूरगाव ६, घायगाव ७, लाडगाव ४, वांजरगाव ८, वीरगाव ९, महालगाव ६, नागमठाण ६.

खुलताबादेतून १११ अर्ज

खुलताबाद : तालुक्यातून जिल्हा परिषद गटांतून ४० व पंचायत समिती गणांतून ७१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बाजारसावंगी गटातून १५, गदाना १२ , वेरूळ गटातून १३ अर्ज दाखल झाले. बाजारसावंगी गणातून १०, टाकळी राजेराय १८, ताजनापूर ८, गदाना १२, गल्ले बोरगाव १६, वेरूळ गणातून ७ अर्ज दाखल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेवटच्या क्षणापर्यंत कन्नडमध्ये पक्षांतर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

कन्नड तालुक्यात उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत इच्छुकांच्या कोलांटउड्या सुरू राहिल्या. काँग्रेस सोडून मंगळवारी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या आघाडीत दाखल झालेले नासेर खान यांनी तिकीट नाकारताच बुधवारी आघाडीचा सोडचिठ्ठी दिली. शिवसेनेचे तरूण नेते धीरज पवार सुद्धा व्हाया आमदार आघाडी, काँग्रेसमध्ये दाखल झाले. तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी एकूण ९६ व पंचायत समितीसाठी १६२ अर्ज दाखल करण्यात आहेत.

काँग्रेसमधून मंगळवारी आमदार जाधव यांच्या आघाडीत दाखल झालेल्या नासेर खान याना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी करंजखेडा गटातून तिकीट नाकारले. त्यामुळे नासेर खान यांनी पंचायत समिती उपसभापती प्रकाश गाडेकर यांच्या आघाडीमधून करंजखेडा गटातून आपले समर्थक आमीरखान यांना करंजखेडा गटातून, तर गणातून नौशाबाई विश्वनाथ उघडे यांना उमेदवारी मिळवून दिली. पूर्वश्रमीचे शिवसैनिक, नंतर आमदार जाधव यांच्या आघाडीत गेलेले धीरज पवार यांनी बुधवारी काँग्रेसची वाट धरत चापानेर गणातून उमेदवारी दाखल केली. आठ गटात शेवटच्या दिवशी ६९, तर पंचायत समिती सोळा गणांमध्ये ११९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

शिवसेना नेत्यांत हमरीतुमरी

शिवसेनेकडून अर्ज दाखल केलेल्या केशव राठोड यांना उमेदवारी दिली नसल्याने सुदाम राठोड व जिल्हा उपाध्यक्षांत हमरी-तुमरी झाली.

दोन गटात आघाडी

देवगाव गण, हतनूर गटात राष्ट्रवादी काँग्रेसने, देवगाव गट व हतनूर गणात काँग्रेसने उमेदवार दिले आहेत. या पक्षांनी दोन्ही गटांपुरती आघाडी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पैठण तालुक्यात ३४४ अर्ज दाखल

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तालुक्यातील नऊ गटांसाठी १२२ उमेदवारांनी, तर पंचायत समितीच्या अठरा गणांसाठी २२२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी अपेक्षेप्रमाणे अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली. मंगळवारपर्यंत तालुक्यातील नऊ गटासाठी ३२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. शेवटच्या दिवशी ९० उमेदवारांनी अर्ज दाखल केले. पंचायत समितीसाठी मंगळवारपर्यंत ५८ अर्ज दाखल भरले गेले होते. बुधवारी, तब्बल १६९ जणांनी अर्ज दाखल केले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मंजुषा मुथा यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्यांना उमेदवारी, जुन्यांचा संताप

0
0

औरंगाबाद येथून खुलताबाद येथे आलेल्या पक्षाच्या नेत्यांना जुन्या शिवसैनिकांनी घेराव टाकून जाब विचारला.

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

तालुक्यातील गदाना गणातून उमेदवारी न मिळाल्याने माजी तालुकाप्रमुख कारभारी जाधव आणि विभागप्रमुख प्रकाश चव्हाण, गणेश वाकळे यांनी पक्षाने पाठविलेल्या संपर्क नेत्यांना जाब विचारत खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नावाने शिमगा करत राडा केला.

काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले राजू वरकड यांच्या पत्नी लीना यांना गदाना पंचायत समिती गणातून उमेदवारी मिळाली आहे. या जागा महिला सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. पण, उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या रेखा प्रकाश चव्हाण आणि कारभारी जाधव यांच्या पत्नीला इच्छुक होत्या, पण जुन्यांना डावलून नव्याने पक्षात आलेल्यांना उमेदवारी देण्यात आल्याने हा वाद उफाळला आहे. वरकड यांना उमेदवारी मिळाल्याने शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या परिसरात खासदार चंद्रकांत खैरे व जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. ‘शिवसेना मुर्दाबाद, खैरे साहेबांचे करायचे काय खाली मुंडक वर पाय, दलाल है दलाल है चंद्रकांत खैरे दलाल है, दलाल है दलाल है अंबादास दानवे दलाल है,’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

दुसरीकडे गदाना गटातून उमेदवारी मिळालेले किशोर कुकलारे यांनी उमेदवारी मागे घेण्याचा दबाव असंतुष्ट शिवसेना कार्यकर्त्यांनी वाढवला आहे. आम्हाला उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे तुम्ही निवडणूक लढवायची नाही, असे जुन्या कार्यकर्त्यांनी कुकलारे यांना ठणकावले. गदाना गट गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मात्र, यावेळी या गटात शिवसेनेपुढे बंडखोरीचे आव्हान निर्माण झाले आहे. गदाना गटातून शिवसेनेच्या इतर इच्छुकांनीही उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यांना अर्ज मागे घेण्यास लावणे, शिवसेनेसमोर आव्हान राहील. या निवडणुकीत युती नसल्याने या गटात प्रामुख्याने भाजप व शिवसेना अशीच लढत होण्याची शक्यता आहे.

वरकडांसमोर आव्हान

राजू वरकड यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला तेव्हांच उमेदवारी निश्चित मानली जात होती. उमेदवारी अर्जासोबत पक्षाचा ए बी फॉर्म जोडतांना जुन्या शिवसैनिकांकडून त्यांना विरोध झाला. त्यामुळे बंडखोरी शमवण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे.

संपर्क नेत्यांना जाब

शिवसेनेने या निवडणुकीसाठी येथे औरंगाबादचे नगरसेवक रावसाहेब आम्ले आणि नगरसेवक सुभाष शेजवळ यांना संपर्क नेते म्हणून पाठवले आहे. जुन्या शिवसैनिकांनी त्यांना जाब विचारला.

तालुक्यावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना राजकीय वर्चस्व दाखवून देईल.

-किशोर कुकलारे, शिवसेना तालुकाप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधानेंनी केलेली मेहनत वाया

0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर एका दिवसात टाकळी राजेराय येथे मेळावा घेतल्याबद्दल आमदार अब्दुल सत्तार यांनी कौतुक केलेल्या सविता अंधारे यांना काँग्रेसने बाजारसावंगी गटातून उमेदवारी नाकारली. येथून औरंगाबादचे माजी महापौर सुदाम सोनवणे यांचे बंधु मधुकर सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

टाकळी राजाराय येथे सोमवारी काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळव्याला आमदार अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड तसेच माजी आमदार नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या नेत्यांनी त्यांचे कौतुकही केले होते. त्यामुळे सविता अधाने यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, ऐनवेळी अधाने यांचा पत्ता कट झाला. माजी महापौर सुदाम सोनवणे यांनी नारायण राणे यांच्यामार्फत बंधू मधुकर सोनवणे यांना उमेदवारी मिळवून दिल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्लोड तालुक्यात २२३ अर्ज दाखल

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील आठ गटांसाठी ८२ व पंचायत समितीच्या सोळा गणांसाठी १४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी तहसील कार्यालयात प्रचंड गर्दी उसळली हाेती.

जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन व साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीरंग साळवे यांनी भराडी गटातून अर्ज दाखल केले. शिवना गटातून बाजार समितीचे माजी उपसभापती अरूण काळे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष गजानन राऊत, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सुनील काळे, पंचायत समिती सदस्य विक्रांत दौड, उंडणगाव गटातून भाजपच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा विजया गव्हाणे, पालाेदमधून पंचायत समिती सभापती लताबाई वानखेडे, अंधारी गटातून पंचायत समितीचे माजी सभापती अरूण शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य केशवराव तायडे, पंचायत समिती सदस्या वृषाली मिरकर, भवन गटातून माजी जिल्हा परिषद सभापती अनिता मोठे, पंचायत समिती माजी सभापती कुशवर्ता बडक, कल्पना भागवत, जया दत्तात्रय पांढरे यांनी अर्ज दाखल केले.

पंचायत समिती गणासाठी माजी पंचायत समिती सदस्य नासेर हुसैन यांनी अजिंठामधून, भवन गणातून भाजप महिला आघाडी तालुकाध्यक्ष गंगाबाई ताठे, निल्लोड गणातून माजी पंचायत समिती सदस्या रुबीनाबी इद्रीस मुलतानी या प्रमुख उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

गट निहाय उमेदवार

अजिंठा ७, शिवना १५, उंडणगाव ११, घाटनांद्रा ६, पालाेद ८, भराडी १२, अंधारी १०, भवन १.

गण निहाय उमेदवार

अजिंठा ९, हळदा ८, शिवना ११, पानवडाेद (बुद्रुक) १०, उंडणगाव ६, अंभई ३, घाटनांद्रा ११, आमठाणा ५, पालाेद ७, हट्टी ७, भराडी १३, केऱ्हाळा १२, अंधारी ११, बाेरगाव सारवनी ६, भवन १४, निल्लोड ७.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध दारू जप्त; चौघांना अटक

0
0

औरंगाबाद : जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध देशी दारूचा साठ्यासह अडीच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चौघांना अटक केल्याची माहिती अधीक्षक सी. बी. राजपूत यांनी दिली. सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील हॉटेल दिशा गार्डन, वाकोद फाटा येथील हॉटेल दुर्गेश येथून १७ हजार रुपये किंमतीची देशी दारु जप्त केली. याप्रकरणी सिद्धेश्वर मोहिते (रा. अंधारी), ईश्वर जैस्वाल (रा. चिंचोली ता. कन्नड) यांना अटक केली. पंढरपूर-वळदगाव येथे सापळा रचून देशी दारुचा अवैध साठ्यासह एकूण सव्वा दोन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. एका रिक्षातून दारूची वाहतूक केली जात होती. याप्रकरणी प्रकाश काळे, गणेश राठोड या दोघांना अटक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images