Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पुरातत्व अवशेष सोडले वाऱ्यावर!

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अंबाजोगाई (जि. बीड) येथील बाराखांबी मंदिर परिसरात सापडलेले पुरातत्व अवशेष राज्य पुरातत्व विभागाने वाऱ्यावर सोडले आहेत. शिलालेख आणि मूर्तीची स्थापत्यशैली, लिपीचा उलगडा व कालनिश्चितीसाठी विभागाने पुरेसे नियोजन केले नाही. परिणामी, प्राचीन वारशाचे प्रचंड नुकसान होत आहे. उत्खननात सापडलेले शिलालेख अस्ताव्यस्त पडले असून, पुरातत्व विभागाच्या झापडबंद कामाचा प्राचीन वास्तूला फटका बसला आहे.
बाराखांबी मंदिर परिसरात जानेवारी महिन्यात सापडलेल्या मूर्ती आणि शिलालेख चर्चेचा विषय ठरला आहे. या ठिकाणी राज्य पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवाय उत्खनन करण्यात आले. मंदिर परिसरात दडलेले पुरातत्व अवशेष उत्खननात सापडले. मात्र, शास्त्रीय पद्धतीने उत्खनन करण्यात आले नाही. यंत्राच्या सहाय्याने माती काढताना मूर्ती व इतर वास्तूचे प्रचंड नुकसान झाले. विशेषतः मूर्ती व शिलालेखांची तोडफोड झाल्यामुळे मोठा ऐतिहासिक ऐवज नष्ट झाला आहे. राज्य पुरातत्व विभाग पुरातन वास्तूंची देखभाल करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. विभाग उशिरा जागा झाल्यामुळे बाराखांबी मंदिर परिसरात पुरातत्व अवशेषांचे प्रचंड नुकसान झाले. राज्य पुरातत्व विभागाचे सहाय्यक उपसंचालक अजित खंदारे यांनी कर्मचाऱ्यांसह परिसराची पाहणी केली. मात्र, वास्तू जतन करण्याचे ठोस नियोजन केले नाही. सध्या इतिहास संशोधक आणि इतिहास विभागाचे विद्यार्थी बाराखांबी मंदिर परिसरात जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास विभागाच्या काही विद्यार्थ्यांनी शुक्रवारी परिसर पाहिला. पुणे येथील डेक्कन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही पुरातन वारसा जाणून घेतला. सध्या मूर्ती व शिलालेख अस्ताव्यस्त पडलेले असून मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आहे. फुटलेले काही शिलालेख सुरक्षित जागी ठेवण्याचा प्रयत्न इतिहासप्रेमी करीत आहेत. ही वास्तू अकराव्या शतकातील असावी, असा अंदाज आहे.

उलगडा शिलालेखाचा ?
बाराखांबी मंदिर परिसरात सापडलेल्या शिलालेखाचे यंत्रामुळे दोन तुकडे झाले आहेत. शिलालेखावर मोडी लिपीत मजकूर असून त्याचा अर्थ आणि काळ निश्चित करण्याचे काम बाकी आहे. शास्त्रीय पद्धतीने काळनिश्चिती केली जाते. मात्र, प्राचीन वास्तू सांभाळताना राज्य पुरातत्व विभागाचा हलगर्जीपणा नडला आहे. शिलालेखाचा उलगडा करण्यासाठी नियोजन करण्यात आले नाही. परिणामी, वारसा नष्ट होण्याची भीती आहे.

बाराखांबी मंदिर परिसरातील मूर्ती व शिलालेखांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐतिहासिक साधने जतन करण्याची गरज आहे. शिलालेखातून शेकडो वर्षांपूर्वीच्या राजवटीवर प्रकाश पडू शकतो. - रवी चव्हाण, विद्यार्थी, इतिहास विभाग

शिलालेखाची माहिती घेतली आहे. मंदिर कोणत्या राजाने बांधले याची माहिती शिलालेखात असावी. - अजित खंदारे, सहाय्यक उपसंचालक, राज्य पुरातत्व विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पथदिवे सुरू करण्याचे कोर्टाचे महावितरणला आदेश

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
आपापसातील भांडणामुळे महापालिका व महावितरण या दोन संस्थांनी संपूर्ण शहराला अंधारात लोटले. त्याच्यातील वाद मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात पोचला आहे. शहरातील पथदिव्याचा वीजपुरवठा तत्काळ सुरू करण्याचे आदेश हायकोर्टाने मंगळवारी दिले. त्यानंतर सायंकाळी शहरातील बहुतांश पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला.
महापालिकेने दहा दिवसांत महावितरणकडे एक कोटी रुपये भरण्याचे निर्देश देत, राज्य शासनाने महावितरण आणि पालिका या दोन्ही संस्थांमध्ये समन्वय घडवून आणावा, असे मतही कोर्टाने प्रदर्शित केले. पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका महापालिकेच्या वतीने आयुक्तांनी केली. महावितरणच्या मुख्य अभियंत्यांनी १ फेब्रुवारी २०१७ रोजी महापालिकेला पत्र पाठविले. त्यात, महापालिकेकडे गेल्या दोन वर्षांपासूनची पथदिव्यांच्या वीजपुरवठ्यापोटी आणि चालू वीजबिलापोटी २७ कोटी ७२ लाख रुपये थकबाकी आहे. त्यामुळे पथदिव्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत असून, नागरिकांची गैरसोय झाल्यास, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आम्ही जबाबदार नाही. या पत्राला पालिकेने आव्हान दिले आहे. या याचिकेची सुनावणी न्या. संजय गंगापूरवाला व न्या. कालिदास वडणे यांच्यासमोर झाली.
महावितरणकडून स्थानिक संस्था कर व मालमत्ता कर अशी ३० कोटी २२ लाख रुपये येणे आहे. हा प्रश्न थकबाकीचा नसून 'सेटलमेंट अकाउंट'चा आहे; तसेच ही कारवाई विनासूचना आणि बेकायदा करण्यात आली, महापालिकेला पुरेसा वेळही दिला नाही, असा युक्तीवाद पालिकेचे विशेष वकील राजेंद्र देशमुख यांनी केला. महावितरणच्या वतीने अनिल बजाज यांनी यावेळी, महापालिकेकडून ७६ कोटी रुपये येणे असल्याचे सांगितले. महापालिकेतर्फे मंगळवारी ४९ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. येत्या १० दिवसांत महावितरणकडे १ कोटी भरण्याचे आदेश कोर्टाने पालिकेला दिले. येत्या ६० दिवसांत महावितरणकडे चालू बिलापोटी ४ कोटी ५० लाख रुपये भरण्याची हमी पालिकेने कोर्टात घेतली.
राज्य शासनातर्फे सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी, पथदिवे बंद असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू शकतो, असे सांगितले. याप्रकरणी पालिकेतर्फे राजेंद्र देशमुख यांनी काम पहिले. त्यांना गोविंद कुलकर्णी, अमोल जोशी, कुणाल काळे, निर्मल दायमा आणि मीनल देशमुख यांनी साह्य केले. महावितरणतर्फे अनिल बजाज यांनी काम पाहिले. त्यांना हर्षिता मंगलानी, हर्षवर्धन बजाज यांनी साह्य केले.

थकबाकी
महापालिकेची महावितरणकडे थकबाकी : ३० कोटी २२ लाख
महावितरणची महापालिकेकडे थकबाकी : ७६ कोटी ३० लाख

वीजबिलासाठी पत्रप्रपंच
१ फेब्रुवारी ः २७ कोटी ७२ लाख रुपये थकबाकी द्या, महावितरणचे पालिका आयुक्तांना पत्र
३ फेब्रुवारी ः ३० कोटी २२ लाख रुपये भरण्याची मागणी, आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांचे महावितरणचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक यांना पत्र.
३ फेब्रुवारी ः पालिका आयुक्तांची महावितरणबरोबर बैठक
३ फेब्रुवारी ः आचारसंहिता, परीक्षांचा काळ; तसेच शहर संवेदनशील असल्याने पथदिव्याचा वीजपुरवठा खंडित करू नये, अशा आशयाचे पालिकेचे महावितरणला पत्र
३ फेब्रुवारी ः महावितरणने पथदिव्यांचा बंद केला वीजपुरवठा
६ फेब्रुवारी ः पालिकेचे महावितरणला पुन्हा पत्र, वीजपुरवठा बंदी मागे घेण्याची विनंती
७ फेब्रुवारी ः पालिका आयुक्तांची औरंगाबाद खंडपीठात महावितरणच्या विरोधात याचिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामावरून काढलेल्या कामगाराने घेतले विष

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

१४ महिन्यांपासून कामावरून कमी केलेल्या निलंबित कामगाराने कंपनी व्यवस्थापन व कामगाराच्या बैठकीत विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजता चिकलठाणा एमआयडीसीमधील युनायटेड स्पिरिट कंपनीच्या आवारात घडला. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सुरेश रामचंद्र मेश्राम (वय ५२ रा. एन २, संघर्षनगर), असे या कामगाराचे नाव आहे.

युनायटेड स्पिरिट कंपनीमधून १४ महिन्यांपूर्वी २२ कामगारांना कामावरून कमी करण्यात आले होते. यापैकी चार कामगारांनी कंपनीकडे राजीनामे सादर केले होते. उर्वरित १८ कामगारांची कामावर परत घेण्याची कंपनीकडे मागणी होती. कंपनीचे व्यवस्थापन आणि १८ कामगारांची बैठक मंगळवारी कंपनीमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये अचानक सुरेश मेश्राम यांनी सोबत आणलेले विषारी औषध प्राशन केले. खाली कोसळलेल्या मेश्राम यांना कंपनीच्या अॅम्ब्युलन्समधून जवळच असलेल्या धूत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. याप्रकरणाची मेडिकल लिगल केस सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

आत्मदहनाचा होता इशारा
सुरेश मेश्राम यांनी एप्रिल २०१६ मध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले होते. यामध्ये त्यांनी आत्मदहन करणार असल्याचा इशाराही दिला होता. या संदर्भात त्यांनी कामगार उपायुक्त कार्यालयाकडे देखील तक्रार केली होती.

युनायटेड स्पिरिट या कंपनीमध्ये निलंबित कामगार व व्यवस्थापन यांच्या बैठकीमध्ये हा प्रकार घडला आहे. मेश्राम यांना हॉ‌स्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
श्रीपाद परोपकारी, पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा कँपेन : खेळाडूंचा विकास खुंटला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
क्रिकेट स्टेडियम उभारल्याने शहरात क्रिकेटचा नियमित सराव करण्यासाठी दर्जेदार नेट्स सुविधा उपलब्ध होतील. सरावासाठी नेट्स नसतील, तर खेळाडू घडणार नाही. स्टेडियम नसल्याने खेळाडूंचा विकास खुंटला आहे. मुलींच्या क्रिकेटकडे तर साफ दुर्लक्ष झाले आहे. महिला क्रिकेटलाही चालना देणे गरजेचे आहे, असे मत माजी रणजीपटू अनंत नेरळकर व अनुभवी क्रिकेटपटू शाकेर राजा यांनी व्यक्त केले.
क्रिकेट विश्वातही ठळकपणे औरंगाबादचे नाव झळकवण्याकरिता आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारणी करण्याच्यादृष्टीने गांभीर्याने पाऊल टाकण्याची आवश्यकता अनंत नेरळकर यांनी व्यक्त केली. नेरळकर म्हणाले, ‘क्रिकेट स्टेडियम म्हणजे पांढरा हत्ती हा गैरसमज आहे. स्टेडियमच्या माध्यमातून अनेक सुविधा निर्माण होतात. त्याचा योग्य वापर झाल्यास मेंटेनन्सचा खर्च सहजपणे मिळतो. शाळा व महाविद्यालयीन क्रिकेटही बळकट करणे गरजेचे आहे. खेळाडू याच वयात घडत असतो. त्यामुळेच शहरातील विविध भागांमध्ये क्रिकेटच्या दर्जेदार सुविधा निर्माण करण्याचा विचार गांभीर्याने व्हायला हवा. १२, १६, १९ या वयोगटातील क्रिकेट स्पर्धांचेही प्रमाण अधिक हवेच. दर्जेदार खेळपट्ट्या व नेट्स या दोन सुविधा अत्यंत गरजेच्या आहेत. महिला क्रिकेटचा विकास तर ठप्प झाला आहे.’
अजय शिर्के यांनी जिल्हास्तरावरील क्रिकेटला मोठी चालना दिली. त्यामुळे अनेक जिल्ह्यांतून चांगले खेळाडू पुढे आले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातूनही अनेक खेळाडू निश्चित घडू शकतील. खेळाडूंच्या भवितव्यासाठी आता सर्वांनीच एकत्रित येण्याची गरज आहे. खेळाडूंचे भविष्य दुर्लक्षून चालणार नाही. उदयोन्मुख खेळाडूंचे करिअर घडविण्यासाठी क्रिकेट स्टेडियम उभारणी ही चांगली पायाभरणी ठरू शकेल, अशी अपेक्षा नेरळकर यांनी व्यक्त केली.

क्रिकेटला करिअर कसे करावे?
शहर व जिल्ह्यात विविध भागांमध्ये टेनिसबॉल क्रिकेट लोकप्रिय आहे. या क्रिकेटचा नर्सरी म्हणून उपयोग होऊ शकतो. यातून अनेक चांगले खेळाडू घडू शकतात. वाळूज, चिकलठाण, सातारा या परिसरात एकही मोठे मैदान नाही. चांगले क्रीडांगण नसल्याचा फटका खेळाडूंना बसत आहे. क्रिकेट संघटनेचे स्वतःचे स्टेडिमय असणे आता गरजेचेच झाले आहे, असे वरिष्ठ क्रिकेटपटू शाकेर राजा यांनी सांगितले.
शाकेर राजा म्हणाले, ‘स्मार्ट सिटीकडे वाटचाल करताना स्टेडियमची उणीव भरून काढली तर दर्जेदार खेळाडू घडण्याचा मार्ग सुकर होऊ शकेल. क्रिकेट विश्वातील भरटकेल्या प्रवाहाला एकत्रित आणण्यासाठी आता क्रिकेट संघटनेने पुढाकार घेण्याची हीच योग्य वेळ आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात २५ हजार नवे पॅनकार्डधारक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केंद्र सरकारने नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर कॅशलेल, बँकांमार्फत व्यवहार करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे मराठवाड्यात पॅनकार्ड काढण्याचे प्रमाण वाढले आहे. विभागात गेल्या तीन महिन्यांत २५ नागरिकांनी पॅनकार्डसाठी अर्ज केले. त्यापैकी बहुतांश नागरिकांना कार्ड देण्यात आली आहेत. त्यात बंधकाम क्षेत्रातील कामगारांचे प्रमाण जास्त असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
पॅनकार्ड घरपोच मिळण्याची सोय आहे. यामुळे अर्जधारकांनाही दिलासा मिळाला आहे. शहरातील विविध चार्टर्ड अकाउंटंट, टॅक्स प्रॅक्टिशनर्स आणि काही वित्ती‌य संस्था यांच्यामार्फत पॅनकार्ड काढण्याची प्रक्रिया अनेकांनी पूर्ण केली आहे, असेही या सूत्रांनी सांगितले. मराठवाड्यात सुमारे तीन लाख पॅनकार्डधारक आहेत. त्यात आता सुमारे २० टक्के कार्डधारकांची भर पडली आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता या प्रक्रियेशी संबंधितांनी व्यक्त केली.
पॅनकार्डधारकांच्या संख्येत दरवर्षी साधारणत: आठ ते दहा टक्क्यांची भर पडते, मात्र नोटबंदीनंतर बँकेत पैसे भरताना पॅनकार्ड क्रमांक बंधनकारक करण्यात आले. बँकेत खाते उघडण्यापासून ते विविध व्यवहारांसाठी नव्याने पॅनकार्ड क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे पॅनकार्ड मिळविण्यासाठी अर्जदारांच्या संख्येत वाढ होत आहे. पॅनकार्ड क्रमांकाशिवाय बँकांमधील व्यवहारांचा माग काढणे कठीण असते. पॅनकार्डमुळे एकाच कार्डधारकाने वेगवेगळ्या बँकांत स्वतःच्या बँक खात्यावर केलेले व्यवहार सॉफ्टवेअरच्या मदतीने शोधता येतात. त्यामुळे पॅनकार्डची संख्या जास्तीत जास्त वाढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असेही या सूत्रांनी सांगितले.
नोटबंदीनंतर पगार देण्यासाठी कामगारांना बँकेत खाती उघडण्यास सांगण्यात आले आहे. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या बहुतांश मजुरांची बँकेत खाती नाहीत. त्यांनी बँकेत खाते सुरू करण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यासाठी त्यांना पॅनकार्ड आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी पॅनकार्डासाठी अर्ज केल्याचे या सूत्रांनी सांगितले.

केवायसीत आवश्यक
आतापर्यंत बँकत खाते सुरू करण्यासाठी पॅनकार्ड नसल्यास अर्जासह फॉर्म क्रमांक ६० आणि ६१ भरून द्यावा लागत असे, मात्र आता केवायसी (नो युवर कस्टमर) नियमानुसार पॅनकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. पॅनकार्डमुळेच देशात बँकांच्या वेगवेगळ्या शाखांतील १८ लाख खात्यांचा उलगडा झाला आहे. १ फेब्रुवारी २०१७पासून या खातेधारकांना प्राप्तिकर विभागामार्फत नोटीस पाठविली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड बँकप्रकरणी १६ जणांना जेल

0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील (बीडीसीसी) बेकायदा कर्ज वाटप प्रकरणी बॅँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांच्यासह १६ जणांना पाच वर्षे तुरूंगवास आणि ६० हजार रुपये दंडाची शिक्षा झाली. अंबाजोगाई मुख्य न्याय दंडाधिकारी न्या. व्ही. एम. सुंदाळे यांनी मंगळवारी हा निकाल दिला. या प्रकरणी दाखल विविध गुन्ह्यांपैकी हा पहिला निकाल असून तो घाटनांदूरच्या शेतकरी सहकारी तेलबिया प्रक्रिया संस्थेला दिलेल्या कर्जाबाबत आहे.
तेलबिया संस्थेला बँकेने २००९मध्ये तब्बल २ कोटी ७५ लाखाचे कर्ज दिले होते. ते बेकायदा असल्याच्या लेखा परीक्षणातील अहवालानुसार बँकेच्या तत्कालीन अध्यक्षासह आठ संचालक आणि बड्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. विशेष म्हणजे या कर्जप्रकरणांची मंजुरी बॅँकेच्या मुख्यालयात होण्याऐवजी नायगाव येथील विश्रामगृहावर झाली होती.
अंबाजोगाई मुख्य न्याय दंडाधिकारी न्या. व्ही. एम. सुंदाळे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. बँकेतील कर्ज वाटपाची प्रक्रिया, त्या संदर्भातील सर्व कागदपत्रे, अनेक अधिकारी व संचालकांची साक्ष खटल्यात नोंदविण्यात आली होती. न्यायालयाने मंगळवारी १६ आरोपींना दोषी धरत ५ वर्षे साधी कैद आणि प्रत्येकी ६० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
अंबाजोगाईच्या तत्कालीन पोलिस उपअधीक्षक स्वाती भोर यांनी हा तपास केला होता. सरकारतर्फे अॅड. अशोक कुलकर्णी यांनी काम पाहिले.

प्रकरणातील दोषी
शिक्षा झालेल्यांत राजाभाऊ मुंडे यांच्यासह तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण नरहरी कुलकर्णी यांच्यासह रामराव आघाव, रामकृष्ण मानाजी कांदे, विठ्ठल गोविंद जाधव, दशरथ वनवे, शरद रमाकांत घायाळ, नागेश किशनराव हन्नुरकर, विनायक सीताराम सानप, शिवाजी रामभाऊ खाडे, मंगला उर्फ प्रेरणा सुंदरराव मोरे, लताबाई सानप, विजयकुमार दत्तात्रय गंडले, जनार्दन प्रभाकर डोळे, रंगनाथ बाबुराव देसाई आणि सुनील बाबासाहेब मसवले यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीयोजनेच्या ब‌िलासाठी पालिकेला महावितरणची नोटीस

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हायकोर्टाच्या आदेशाने पथदिवे सुरू झाल्यानंतर महावितरणने महापालिकेला दुसरा झटका दिला आहे. पाणीपुरवठा योजनेचे थकित वीज बिल बुधवारी सायंकाळपर्यंत भरा अन्यथा पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करू, असा इशारा देणारी नोटीस महावितरणने महापालिकेला बजावली आहे. त्यामुळे आता पथदिव्यांपाठोपाठ शहरवासीयांना पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद शहरासाठी जायकवाडीहून पाणी पंपिंग करून आणले जाते. जायकवाडी, ढोरकीन, नक्षत्रवाडी या तीन ठिकाणी पाण्याचा उपसा करावा लागतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वीज वापरावी लागते. ग्रामीण आणि शहर अशा दोन भागात पाण्याचा उपसा होत असल्यामुळे नक्षत्रवाडीपर्यंतच्या पाणीपुरवठा योजनेचे विजेचे बिल कृषीदराने आकारा व नक्षत्रवाडीपासून पुढे औरंगाबाद शहरापर्यंत सर्वसाधारण दराने आकारा, अशी महापालिकेची मागणी आहे, पण महावितरणने ती मान्य न करता सरसकट वीज बिल आकारणे सुरू केले आहे. त्यामुळे दर महिन्याला सुमारे सव्वातीन कोटी रुपयांचे वीज बिल महापालिकेला प्राप्त होते.
महापालिकेतर्फे वेळेवर बिल भरले जात नसल्यामुळे थकबाकी वाढत आहे. त्यामुळे महावितरणने महापालिकेला निर्वाणीचा इशारा देत थकबाकी बुधवारी सायंकाळपर्यंत भरा, अन्यथा पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करू, अशी नोटीस बजावली आहे.
पथदिव्यांच्या प्रकरणात हायकोर्टाच्या आदेशाने ५० लाख रुपये भरून सुटका करून घेतलेल्या महापालिकेच्या प्रशासनासमोर आता पाण्याचे नवे संकट निर्माण झाले आहे. यासंदर्भात ‘मटा’ शी बोलताना पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल म्हणाले,‘बुधवारी सायंकाळपर्यंत वीज बिल भरा, अन्यथा पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करू, अशी नोटीस महावितरणने महापालिकेला बजावली आहे. किती बिल थकले आहे याची माहिती लेखा विभाग देऊ शकेल.’
थकित बिलासंदर्भात मुख्यलेखाधिकारी संजय पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,‘डिसेंबर महिन्याचे ३ कोटी २३ लाख रुपयांचे बिल थकलेले आहे. जानेवारी महिन्याचे बिल अद्याप मिळालेले नाही.’
शहरात तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा होतो. तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा एक तास बंद पडला, तर पाण्याचे वेळापत्रक सुमारे पाच तासांनी पुढे ढकलेले जाते. महावितरणने पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केल्यास पाण्याचे मोठे संकट निर्माण होणार आहे.

पाण्याचे गण‌ित
जायकवाडीतून पाण्याचा उपसा : १५० ते १५५ एमएलडी
पाणीयोजनेचे महिन्याचे विजबील : ३.२५ कोटी रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांच्या घरात संस्कारांची कमी: पंकजा

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेबाबत अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याला राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. 'व्यक्ती हयात नसताना त्यांच्या जन्मतारखेवर भाष्य करून वाद निर्माण करणं योग्य नाही. पण पवारांच्या घरात संस्कारांची कमी आहे,' अशी बोचरी टीका पंकजा यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस १२ डिसेंबरला असतो. पवारांचा वाढदिवस राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ते पाहूनच मुंडेंनी देखील १२ डिसेंबर हीच जन्मतारीख लावली होती, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान केला होता. पवार यांच्या या वक्तव्यावर पंकजा यांनी नाराजी व्यक्त केली. 'अजित पवारांच्या या वक्तव्यामुळं संपूर्ण मुंडे कुटुंबीयांना वेदना झाल्या आहेत. मी नेहमीच शरद पवार यांचा आदर आणि सन्मान केला आहे. तो माझ्या संस्काराचा भाग आहे. पण पवारांच्या घरात अशा प्रकारच्या संस्कारांची कमी आहे हेच अजित पवारांच्या वक्तव्यातून दिसते. 'धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच अजित पवार हे बोलत आहेत,' असा आरोपही पंकजा यांनी केला. 'गोपीनाथ मुंडे यांना जन्मतारीख बदलायचीच असती तर त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जन्मतारीख लावली असती,' असंही त्या म्हणाल्या.

गोपीनाथ मुंडे यांची खरी जन्मतारीख त्यांच्या आई-वडिलांना ठाऊक नव्हती. मुंडे ऐंशीच्या दशकात राजकारणात आले. त्यावेळी शरद पवार यांचे वलय राज्याच्या राजकारणात होते. पवारांप्रमाणेच आपलाही वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा व्हावा यासाठीच त्यांनी ही तारीख जाहीर केल्याचे ते म्हणाले होते.

काँग्रेसप्रवेशाची चर्चा झाली नव्हती!

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये जाणार होते. त्यांच्यासोबत पाच आमदार देखील होते. मात्र डॉ. मनमोहन सिंग यांनी विरोध केल्यामुळे तसेच सुषमा स्वराज यांनी मुंडेंना समजावल्यानेच ते भाजपमध्ये राहिल्याचे अजित पवार म्हणाले होते. पंकजा यांनी याबाबत वेगळे मत मांडले. 'काँग्रेसमध्ये जाण्याबद्दल गोपीनाथ मुंडेंनी कधीही माझ्याशी चर्चा केली नाही. आमदार असताना मी त्यांच्यासोबत दिल्लीला गेले नव्हते,' असा दावाही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बारावी हॉलतिकिटांत चुका

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नमनाला घडाभर अशीच गत बुधवारपासून सुरू झालेल्या बारावी प्रात्यक्षिक परीक्षेत झाली. हॉलतिकिटांमध्ये शिक्षण मंडळाने चुकांचा भरणा केल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली, तर दुरुस्तीसाठी आर्थिक दंडाचा भुर्दंडही सोसावा लागला.
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २८ फेब्रुवारी ते २५ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. तर, प्रात्यक्षिक परीक्ष आजपासून सुरू झाली. २५ फेब्रुवारीपर्यंत ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी ७ फेब्रुवारीला कॉलेजांना हॉलतिकीट वितरित करण्यात आले. बुधवारी विद्यार्थ्यांच्या हाती हॉलतिकीट पडल्याच अनेकांच्या हॉलतिकिटांमध्ये चुकांचा भरणा असल्याचे समोर आले. नावासह जन्मतारखांमध्ये चुका, दुसऱ्याचे फोटो, कम्प्युटर सायन्सच्या जागी बायोलॉजी, द्वितीय भाषांमध्ये झालेला बदल, माध्यम बदल अशा चुकांची गर्दी आहे. त्यामुळे आज अभ्यास सोडून विद्यार्थी कॉलेजांमध्ये हॉलतिकिटांमधील चुका दुरुस्तीसाठी अर्ज भरण्यासाठी विचारपूस करत होते.

भुर्दंड विद्यार्थ्यांनाच
हॉलतिकीट दुरुस्तीसाठी वेळ खर्च होतो आहेच. त्यासह आर्थिक भुर्दंडही विद्यार्थ्यांनाच बसतो आहे. दुरुस्तीसाठी शंभर रुपयांचा खर्च मंडळ घेते. वेळेसह आर्थिक भारही सोसावा लागत असल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

मानसिक ताण
हॉलतिकिटांच्या चुकांमध्ये सर्वाधिक माध्यम बदल असल्याचे समोर आले. अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन होते. अर्ज भरल्यानंतर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून तपासून घेतल्यानंतर अर्ज भरले जातात. त्यानंतरही अशा चुका होतात. मंडळाच्या कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांना मानसिक ताण सहन करावा लागतो आहे.

बारावीच्या हॉलतिकिटांमध्ये अनेक चुका आहेत. माध्यम, भाषा, विषय बदल. फोटो दुसऱ्याचे येणे. अर्ज भरताना आम्ही काळजी घेतो. अर्ज व्यवस्थित भरला गेला आहे का, हे विद्यार्थ्यालाही तपासायला सांगतो. त्यानंतरही मंडळाकडून हा गोंधळ होतो. ऐन परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांना दुरुस्तीची प्रक्रिया करावी लागते. आता प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहेत. कॉलेज स्तरावरून दुरुस्तीची प्रक्रिया होते, परंतु मंडळ स्तरावरून प्रक्रियेला अनेकदा विलंब होते. ही प्रक्रिया वेळेत व्हावी यासाठी विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागलेले असते. - प्रा. रजनीकांत गरुड, उपप्राचार्य, देवगिरी कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रिकेट स्टेडियम, मटा कॅम्पेनः अधिकृत कार्यकारिणी हवी

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘सभासदांच्या सहकार्यातून क्रिकेट स्टेडियम उभारणे सहज शक्य आहे. त्यासाठी कायदेशीर अडथळे दूर करण्याबरोबरच अधिकृत कार्यकारिणी निवडून येणे गरजेचे आहे. खेळाडूंचे भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी हे पाऊल उचलणे महत्त्वाचे आहे,’ असे अनुभवी क्रिकेटपटू दिनेश कुंटे यांनी सांगितले. ‘क्रिकेटच्या विकासासाठी सर्वजण एकत्र येत असतील तर प्रसंगी न्यायालयीन प्रकरणेही मागे घेता येतील,’ असे क्रिकेट समीक्षक हेमंत मिरखेलकर यांनी स्पष्ट केले.
‘ऐतिहासिक पर्यटनस्थळे, पंचतारांकित हॉटेल्स, विमानसेवा अशा सर्व सुविधांची जोड क्रिकेट स्टेडियम उभारणीसाठी आहे. स्टेडियम ही जिल्हा क्रिकेट संघटनेच्या आवाक्याबाहेरची गोष्ट निश्चितच नाही. सभासदांच्या माध्यमातून निधी उभारला जाऊ शकतो. गरज आहे ती केवळ सकारात्मक पुढाकार घेण्याची. युवा पिढीच्या खेळाडूंसाठी पुढाकार घेण्याची ही योग्य वेळ आहे,’ असे कुंटे यांनी सांगितले.
कुंटे म्हणाले, ‘अनेक वर्षांपासून क्रिकेट संघटनेचा वाद न्यायालयात चालू आहे. हा वाद कधी संपेल माहिती नाही, परंतु त्यात खेळाडूंचे भवितव्य अधांतरी लटकले आहे हे विसरून चालणार नाही. खेळाडू हाच फोकस ठेवला, तर वादातून तोडगा सहजपणे निघू शकेल. १९८८ नुसार निवडणूक घेतली तर सर्व गोष्टींना कायदेशीर अधिष्ठान प्राप्त होईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने क्रिकेट विकासाचा मार्ग मोकळा होईल आणि त्यासाठी तत्कालीन सहसचिव किरण जोशी यांनी पुढाकार घ्यायलाच हवा.’
‘बीसीसीआयचे निकष आता पूर्णतः बदलले आहेत. लोढा समितीनुसार आता जिल्हा क्रिकेट संघटनेलाही बदलावे लागेल. बीसीसीआयच्या वर्तुळात ज्यांचे वर्चस्व आहे, त्याठिकाणी स्टेडियमची उभारणी झाल्याचे दिसून येते. पुणे व नागपूर या ठिकाणी स्टेडियम हे अलीकडच्या काळातच झाले. औरंगाबादलाही स्टेडियम उभारले जाऊ शकते. सामनेही मिळतील. डीएमआयसीमध्ये क्रीडांगणासाठी जागा राखीव आहे. सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले तर ही जागा स्टेडियम उभारणीसाठी माफक दरात मिळू शकते,’ असे हेमंत मिरखेलकर यांनी सांगितले.

जबाबदार कोण, विचार व्हावा
‘गेल्या तीस वर्षांपासून जिल्हा क्रिकेट संघटनेकडे स्वतःच्या मालकीची जागा आहे. इतका कालावधी स्टेडियम उभारणीसाठी लागायला नको होता. यास कोण जबाबदार आहेत याचाही गांभीर्याने विचार व्हावा. क्रिकेटच्या विकासासाठी सर्वजण एकत्र येत असतील तर प्रसंगी न्यायालयीन केसेसही मागे घेण्याची तयारी आहे,’ असे एडीसीएचे आजीव सभासद हेमंत मिरखेलकर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी कुलगुरू डॉ. धुळे यांचे निधन

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि जागतिक कीर्तीचे रसायण शास्त्रज्ञ डॉ. डी. जी. धुळे यांचे बुधवारी दुपारी बारा वाजता निधन झाले. डॉ. धुळे यांना १४ जानेवारी रोजी ब्रेन हॅमरेज झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
उल्कानगरी येथील रहिवासी असलेले डॉ. धुळे यांचे मूळ गाव यवतमाळ जिल्ह्यातील विडूळ हे आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी उच्चशिक्षण पूर्ण करत नावलौकिक मिळविला. १९७० पासून विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात ते अध्यापक म्हणून रुजू झाले. त्यापूर्वी एनडीए, मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्येही ते कार्यरत होते. डॉ. धुळे यांच्यावर प्रतापनगर स्नशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमजीएम’मध्ये कम्युनिटी रेडिओ केंद्र

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘नमस्कार, एमजीएमच्या रेडिओ केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे सात वाजतायत. ऐकूयात...’ अशी मधाळ उद्घोषणा लवकरच तुम्हाला कानावर पडल्यास आश्चर्य वाटू देऊ नका. शिक्षणक्षेत्रात आघाडीवर असलेल्या महात्मा गांधी मिशनच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. संस्थेच्या कम्युनिटी रेडिओ फ्रिक्वेन्सीला अखेर केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे.
आयटी विभागाच्या ‘वायरलेस प्लॅनिंग अँड कोऑडिनेशन विंग’ने बुधवारी स्टँडिग अॅडवायजरी कमिटी फॉर फ्रिक्वेन्सी अॅलोगेशन मंजूर केले. कॅम्पसमध्ये घडणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक घडामोडींचे प्रसारण या केंद्राद्वारे केले जाणार आहे. संस्थेकडून २०१२पासून ‘कम्युनिटी रेडिओ’साठी प्रयत्न सुरू आहेत. २०१३साली केंद्रसरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने ९०.८ची फ्रिक्वेन्सी दिली. त्यानंतर आज अखेर आयटी विभागाच्या ‘वायरलेस प्लॅनिंग अँड कोऑडिनेशन विंग’ विभागाकडूनही ‘कम्युनिटी रेडिओ’साठी आवश्यक असलेली मंजुरी मिळाली. या रेडिओ स्टेशनवरून कॅम्पसमध्ये घडणाऱ्या शैक्षणिक घडामोडिंचे प्रसारण केले जाणार आहे. कॅम्पसमध्ये विविध २० अभ्यासक्रमांचे कॉलेज असून दहा हजार पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या कॉलेजांमध्ये विविध उपक्रम घेतले जातात. विविध विषयातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर, सामाजिक कार्यक्रमांचेही आयोजन होते. अशा विविध कार्यक्रमांचा आस्वाद घर बसल्या नागरिकांना घेता येणार आहे. सुमारे तीस किलोमीटरच्या परिसरात या रेडिओवरील प्रसारण ऐकता येणार आहे.

एप्रिलमध्ये कार्यान्वित
अत्याधुनिक पातळीवरील हा ‘कम्युनिटी रेडिओ’ एप्रिल-मेपर्यंत कार्यान्वित होणार आहे. ‘कम्युनिटी रेडिओ’साठी आवश्यक तो सेटअप उभारण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यात ट्रान्समीटर टॉवर, आवश्यक ते तंत्रज्ञान, स्टुडिओ उभारणी केली जाणार आहे.

असा आहे प्रवास
२० अभ्यासक्रम कॅँपसमध्ये
१०००० विद्यार्थी
३० किमी परिघात प्रसारण
२०१३ साली ९०.८ ची फ्रिक्वेन्सी
२०१७ कम्युनिटी फ्रिक्वेन्सी मंजूर

पाच वर्षांपासून यासाठी आमचा पाठपुरावा सुरू होता. अखेर त्याला मंजुरी मिळाली. त्याचा आनंद आहे. कॅम्पसमध्ये वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. हे उपक्रम नागरिकांपर्यंत घेऊन जाता येतील. कॅम्पसमधील शैक्षणिक घडमोडी, सामाजिक उपक्रम, भाषणांचे प्रसारण त्यावरून केले जाईल. विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. - डॉ. रेखा शेळके, प्राचार्य, एमजीएम वृत्तपत्रविद्या महाविद्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुजींचे भांडण चव्हाट्यावर

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करून न घेणाऱ्या शाळा मुख्याध्यापकांचे पगाराचे अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वतःकडे घेतले आहेत. जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षकांची संख्या २२ असून समायोजनाचे आदेश दिल्यानंतरही शाळांनी त्यास असमर्थता दर्शविली होती. या प्रकारामुळे मुख्याध्यापक आणि शिक्षणाधिकारी यांच्यातील वाद तीव्र होण्याची शक्यता आहे.
शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न गंभीर आहे. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाचे आदेश काढण्यात आले. त्यानंतरही अनेक शाळांनी शिक्षकांचे समायोजन करून घेतले नाही. त्यात अखेर अशा शाळांच्या मुख्याध्यापकांचे पगाराचे अधिकार स्वतःकडे घेत शिक्षण विभागाने अतिरिक्त शिक्षकांचे पगार त्याच शाळेतून केले आहेत. शिक्षकांचे पगार ऑनलाइन पद्धतीने होतात. प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांला त्यासाठी लॉगिन आयडी, पासवर्ड देण्यात आलेला आहे. दर महिन्याला पगार बिले पाठविल्यानंतर बिले मंजूर होऊन येतात. मुख्याध्यापक समायोजित शिक्षकांना रुजू करून घेत नाहीत. त्यामुळे या शिक्षकांचे पगार बिलेच शाळेकडून देण्यात येत नव्हती.
शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांचे हे अधिकार स्वतः वापरत अतिरिक्त शिक्षकांचे ज्या शाळेत समायोजनाचे आदेश काढले त्याच शाळेतून पगार बिले सादर करत पगार काढले. या अधिकार वापराच्या प्रकारामुळे नवा वाद समोर येण्याची शक्यता आहे.

समायोजनाचा गोंधळ कायम
जिल्ह्यातील २२ शिक्षक अतिरिक्त ठरल्याचे शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी ‘मटा’ला सांगितले. या शिक्षकांचे समायोजन झालेले नाही. जुन्याच शाळेत हे शिक्षक आपल्या उपस्थितीची नोंद करत असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जेथून अतिरिक्त ठरले तेथे काम करू दिले जात नाही आणि समायोजनही होत नाही. त्यामुळे अनेक महिन्यांपासून या शिक्षकांना अध्यापनाचे कामच नसल्याचे बोलले जात आहे. शिक्षण विभागाच्या गलथान कारभाराचा फटका बसत असल्याची चर्चा आहे.

अतिरिक्त ठरलेल्या २२ शिक्षकांचे शाळांनी समायोजन करून घेतले नाहीत. त्यामुळे मुख्याध्यापकांचे पगाराचे अधिकार काढून घेत, शिक्षकांचे पगार करावे लागले. - एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका बरखास्त करून सीबीआय चौकशी करावी

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या कारभारामुळे महावितरणने पाच दिवस शहरातील पथदिव्यांचा पुरवठा खंडित केला होता. पंधरा लाख शहरवासियांना वेठीस धरणाऱ्या महापालिकेची आर्थिक स्थिती एवढी डबघाईला
आली कशी ? सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणाचा फटका शहरवासीयांना बसत आहे. याची जबाबदारी निश्चित करून महापालिका बरखास्त करावी, पालिकेच्या कारभाराची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
शहर उपाध्यक्ष शेख इब्राहिम पटेल, माजी नगरसेवक मोहसीन अहमद, रमजानी खान यांच्यासह शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना यासंदर्भात निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की प्रकाश महाजन आयुक्त असताना शिवसेना - भाजपने त्यांना हटविण्यासाठी मतदान केले त्यांना एमआयएमने मदत केली. त्यामुळे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांची हातमिळवणी आहे.
आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी औषधी फवारणीची बनावट प्रकरणे नुकतीच शोधून काढली. टीडीआर घोटाळा झाला, पॅचवर्क व खड्डे बुजविण्याच्या नावाखाली अधिकारी नगरसेवकांनी कोट्यवधी रुपये उचलले, लेखा विभागातील एक अधिकारी वर्षानुवर्षे ठाण मांडून आहे, त्याच्या मालमत्तेची व नातेवाईकांची चौकशी व्हावी, वीजबिल भरण्यासंदर्भातील दुर्लक्षाची चौकशी करावी, महापालिकेच्या सर्व प्रकरणांची चौकशी करून दोषींना निलंबित करावे, महापालिका बरखास्त करावी, अशी मागणी
करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन कोटींचे व्हाउचर्स सापडले

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पेस्ट कंट्रोलच्या बनावट बिल प्रकरणात दोन कोटींपेक्षा जास्त किमतीचे व्हाउचर्स चौकशी समितीच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. चौकशी समितीच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांना असून हा अहवाल प्राप्त झाल्यावर दोषींवर कारवाई केली जाईल असे बोलले जात आहे.
औषधींची फवारणी केल्याचे भासवून लाखो रुपयांचे पेमेंट बनावट स्वाक्षऱ्या करून उचलल्याचे लक्षात आल्यावर अजिंठा पेस्ट कंट्रोल या कंपनीच्या विरोधात पालिकेने पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी तीन अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली. समितीने चौकशीचा पहिला प्राथमिक अहवाल बकोरिया यांना सादर केला. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून बिल उचलल्याचे त्यात नमूद करण्यात आले. दरम्यानच्या काळात लेखा विभागही सील करण्यात आला. त्याचा परिणाम म्हणून लगेचच चौकशी समितीला एक ते दीड कोटी रुपये बिलांचे व्हाउचर्स हाती लागले. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर घबाड हाती लागत गेले. समितीने मंगळवारी आयुक्तांना दुसरा प्राथमिक अहवाल सादर केला. या अहवालाच्या आधारे आयुक्तांनी मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांना खुलासा करण्यासंदर्भात नोटीस बजावली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशी समितीला दोन कोटींपेक्षा जास्त किंमतीचे व्हाउचर्स सापडले. त्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला. अंतिम अहवाल तयार करण्याचे काम सध्या केले जात आहे. तो आयुक्तांना सादर केल्यावर ते या प्रकरणातील दोषींवर कारवाई करतील, असे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘लेखा’ कारभारावर विशेष सभा घ्या

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लेखा विभागाच्या कारभारावर विशेष सर्वसाधारण सभा घ्या, अशी मागणी एमआयएमच्या नगरसेवकांनी बुधवारी महापौरांकडे केली. या बद्दलचे पत्र महापौर कार्यालयाला देण्यात आले आहे.
शासनाच्या आदेशानुसार उपायुक्त पदावरून पदावनत करण्यात आलेल्या अय्युब खान यांच्यासाठी जनजागरण समितीने पुढाकार घेतला असून, त्यांना पुन्हा उपायुक्तपदावर नियुक्त करण्यासाठी आयुक्तांकडे शब्द टाका, अशी गळ या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल यांना घातली आहे.
अय्युब खान यांना महापालिकेच्या उपायुक्तपदी देण्यात आलेली पदोन्नती चुकीची आहे, त्यामुळे त्यांचे हे पद रद्द करा, असे आदेश राज्य शासनाच्या नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांनी दिले आहेत. या आदेशाची प्रत महापालिकेला मंगळवारी प्राप्त झाली. त्यानुसार अय्युब खान यांना तत्काळ उपायुक्तपदावरून हटविण्यात आले. सहाय्यक आयुक्त म्हणून त्यांना पदनाम देण्यात आले.
अय्युब खान यांना पदावनत करण्याचे प्रकरण महापालिकेत चांगलेच गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पेस्ट कंट्रोलच्या बनावट बिल प्रकरणात लेखा विभाग टार्गेट झालेला आहे. मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांना या प्रकरणात आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दोन नोटीस बजावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर लेखा विभागाच्या कारभारावर चर्चा करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करा, अशी मागणी करणारे पत्र एमआयएमच्या नगरसेवकांनी महापौरांना दिले. या संदर्भात विरोधीपक्षनेते अय्युब जहागिरदार यांच्या दालनात एमआयएमच्या नगरसेवकांची सायंकाळी बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला.

आयुक्तांशी चर्चा करा
अय्युब खान यांच्या समर्थनासाठी माजी नगरसेवक मोहसीन खान अध्यक्ष असलेल्या जनजागरण समितीने स्वतंत्र बैठक घेतली. अय्युब खान यांच्यावर केलेली कारवाई अन्यायकारक आहे, अशी भावना यावेळी व्यक्त केली. यासंदर्भात एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल यांनी पालिका आयुक्तांशी चर्चा करावी, अशी गळही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जलिल यांची भेट घेवून घातली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन‍् रॅम्पवर अवतरला ‘युवारंग’

0
0


शुभम पाटील, कॉलेज क्लब रिपोर्टर
औरंगाबाद ः मराठमोळी नऊवारी, सदरा-धोतर, पंजाबचा कुर्ता-पैजमा, बंगालची सुतीसाडी अशा विविध राज्यांची वेशभूषा परिधान करत तरुणाई रॅम्पवर अवतरली अन् तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले. राज्यांच्या वेगवेगळ्या परंपरा, संस्कृतीचे दर्शन बुधवारी सरस्वती भुवनच्या ‘युवारंग’मध्ये घडले.
स्नेहसंमेलन म्हटले की विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच. सरस्वती भुवन आर्ट अँड कॉर्मस कॉलेजच्या ‘युवारंग’ची ओळख तर वेगळीच. यंदा महोत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली ती ‘फॅशन डे’ने. पारंपारिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी सकाळपासून कॉलेजच्या आवारात गर्दी केली. त्यानंतर रंगला तो ‘रॅम्प वॉक’. विविध राज्याचे प्रतिनिधित्व करणारी तरुणाई रॅम्पवर अवतरली आणि एकच कल्ला सुरू झाला. संगीत, गीतांचा ठेका धरून विद्यार्थ्यांनी रॅम्प वॉक केला, तर टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी दाद दिली. महाराष्ट्रापासून ते पंजाब, बंगाल, गुजरात, तमिळनाडू अशा विविध राज्यांचा पेहराव, त्यांच्या संस्कृतीचे अनोखे दर्शन पहायला मिळाले. ‘विविधतेतून एकता’ ही ‘फॅशन डे’ची थीम होती. ‘युवारंग’मध्ये ‘मिसमॅच डे’, ‘ग्रुप डे’ असे डेही उल्लेखनीय ठरणार आहेत.

बेटी बचाओ
‘स्वच्छ भारत’ ही संकल्पना देशभर गाजते आहे. या संकल्पनेसह ‘बेटी बचाओ’, पर्यावरण अशा विविध सामाजिक प्रश्नावर रांगोळी स्पर्धेतून तरुणाईने प्रकाश टाकला. स्पर्धेचे वैशिष्ट म्हणजे विद्यार्थिंनीसह विद्यार्थ्यांनीही यात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

नेहसंमेलन उत्साह, जल्लोषात साजरे होत आहे. विविध स्पर्धा या आपल्या कल्पकतेला वाद देणाऱ्या असतात. विविध स्पर्धांमधून सामाजिक प्रश्नांकडे ही लक्ष वेधले जाते. ‘फॅशन डे’मध्ये विविध राज्यांची परंपरा, त्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडले.- शीतल बनसोड

गॅदरिंग ‘विविध सामाजिक’ विषयांनाही जोडणारी असते. विद्यार्थी विविध स्पर्धांमधून आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून देतात. ‘फॅशन डे’साठीची विविधतेतून एकता ही थीम उल्लेखनीय ठरली. त्यात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.- रोहिणी घुगे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका, महावितरणने माफी मागावी : कोर्ट

0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिका व महावितरणने औरंगाबादच्या जनतेला पाच दिवस वेठीस धरले. त्यांच्यामुळे शहरवासीयांना नाहक त्रास सोसावा लागला. त्यामुळे या दोन्ही संस्थांनी जनतेची जाहीर दिलगिरी व्यक्त करावी, अशी अपेक्षा खंडपीठाने बुधवारी व्यक्त केली.
संपूर्ण शहरवासीयांची ससेहोलपट होत असल्याने यापुढे जीवनाश्यक नागरी सुविधा खंडित न करण्याचे आदेश महावितरण, पालिका व राज्य शासन यांना द्यावेत, अशी विनंती करणारी जनहित याचिका माजी नगरसेवक समीर राजूरकर यांनी केली आहे. या याचिकेची सुनावणी न्या. संभाजी शिंदे व न्या. के. के. सोनवणे यांच्यासमोर झाली. या याचिकेत महापालिका व महावितरणने शपथपत्र दाखल करण्यासाठी वेळ मागवून घेतला. शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केल्याने नागरिकांची असुविधा होत आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या दोन्ही संस्थांनी टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी बैठक घेऊन तोडगा का काढला नाही, अशीही विचारणा कोर्टाने केली. महावितरणने पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा खंडित करण्याची नोटीस पालिकेला बजावली असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिल्यावर कोर्टाने दोन्ही संस्था विचारविनिमय करून निर्णय घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. याचिकाकर्त्याची बाजू देवदत्त पालोदकर यांनी, तर महावितरणची बाजू अनिल बजाज यांनी मांडली.

पालिकेची कोंडी
जायकवाडीत पुरेसा पाणीसाठा असताना शहरवासीयांना पाण्याचा तुटवडा का सहन करावा लागतो, पालिकेच्या अनेक भागात अद्याप पाणी पुरवठा का केल्या जात नाही, अशी विचारणाही कोर्टाने महापालिकेकडे केली.

जनतेस वेठीस धरण्याचा अधिकार नाही
‘पाणीपुरवठा योजनेचे चालू बिल आम्ही भरतो. त्यामुळे या योजनेचा वीज पुरवठा खंडित करून १५ लाख जनतेला वेठीस धरण्याचा अधिकार महावितरणला नाही,’ अशा शब्दांत महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी बुधवारी महावितरणला ठणकावले.
पाणीपुरवठा योजनेचे थकलेले वीज बिल, व्याज व दंडासह ९ कोटी ७२ हजार ४१९ रुपये तत्काळ भरा अन्यथा योजनेचा वीज पुरवठा खंडित करू, अशी नोटीस महावितरणने महापालिकेला पाठविली आहे. याबाबत बकोरियांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘पाणीपुरवठा योजनेचे चालू महिन्याचे बिल महापालिका नियमित भरते. नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंतचे बिल पालिकेने भरलेले असेल. जानेवारी महिन्याचे बिल भरणे बाकी असावे, ते देखील भरले जाईल. पाणीपुरवठा ही अत्यावश्यक सेवा आहे. त्यामुळे या सेवेचा वीज पुरवठा खंडित करण्याचा अधिकार महावितरणला नाही.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद जिल्ह्यात यंदाही पाण्यासाठी भटकंती

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जलयुक्त शिवार अभियानामध्ये राज्य पातळीवर औरंगाबाद जिल्ह्याचा गौरव झाला असला तरी जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा बसणे सुरू झाले आहे. फेब्रुवारी महिन्यातच ४४ गावांमधील ९६ हजार नागरिकांची तहान ४८ टँकरद्वारे भागवण्यात येत आहे. मराठवाड्यात इतरत्र मात्र कुठेही टँकर सुरू झालेले नाहीत.

मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांना अत्यल्प पावसामुळे नेहमीच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यंदा सर्वच जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प तुडूंब भरले होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यातच जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून टँकर सुरू करण्यात आले आहेत. वार्षिक सरासरीच्या तुलनेत गंगापूर तालुक्यात ६९.३५, खुलताबाद ७२.८८, कन्नड ८२.८३ टक्के पाऊस झाला होता, तर सिल्लोड १०६.८१ व वैजापूर तालुक्यात ११३.८२ टक्के असा सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली होती. तरीही या तालुक्यंना अवघ्या चार महिन्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने पाण्यासाठी जिल्ह्यातील ६६ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. यामध्ये औरंगाबाद तालुक्यातील १, फुलंब्री ७, गंगापूर २४, वैजापूर १५, खुलताबाद १ तर कन्नड व सिल्लोड तालुक्यात प्रत्येक ९ विहिरींचा समावेश आहे.


या गावात टँकरच्या झळा

वैजापूर तालुक्यातील खिर्डी कन्नड, मालेगाव कन्नड, हडसपिंपळगाव, हिंगणेकन्नड, राजुरा, एकोडीसागज, माळीसागज, बल्लाळीसागज, जळगाव, मनूर, शहाजतपूर, गंगापूर तालुक्यातील तांदूळवाडी, शहापूर, बोलठाण, हादियाबाद, घोडेगाव, सिल्लेगाव, वडगाव, टोकिवर्गीपूर, इब्राहिमपूर, सिद्धनाथवाडगाव, सिरेसायगाव, शिरेगाव, सावंगी हर्सूल, अनंतपूर दायगाव, गवळी धानोरा, कनकोरी, वडाळी मेंढी, मालुंजा मेंढरी, मालुंजा बु. कोळघर, मालुंजा खुर्द, भालगाव, कन्नड तालुक्यातील औराळी धनगरवाडी, सासेगाव, सिल्लोड तालुक्यातील पळशी, म्हसला खुर्द व उपळी तर खुलताबाद तालुक्यातील जाफरवाडी येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

टँकर व गावांची लोकसंख्या

तालुका……….गावे…….. लोकसंख्या…………टँकर

गंगापूर…………२६…….….६९५२८……………….२९

वैजापूर…………११…….….…१०८५८…………….१४

खुलताबाद………०१…….….…..५५०……………..०१

कन्नड……………०३…….….….३८५०……………०२

सिल्लोड……………०३…….….….११५६०…………..०५

एकूण…………….४४.....९६३४६………………………….४८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेचा महावितरणवर पलटवार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पथदिव्यांचा वीज पुरवठा तोडल्यावर व पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्याची नोटीस महावितरणने बजावल्यानंतर महापालिकेने महावितरणवर पलटवार केला आहे. रस्त्यात बाधित होणाऱ्या व वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या डीपींचे (रोहित्र) पालिकेने एकाच दिवसांत सर्वेक्षण केले असून, त्या हटविण्याचा पवित्रा घेतला आहे. अशा डीपींची संख्या सुमारे चारशेच्या घरात आहे.

महावितरणने थकबाकीचे कारण पुढे करून महापालिकेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. २५ कोटी रुपयांचे बिल थकल्यामुळे पथदिव्यांचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केला होता. त्यामुळे पाच दिवस औरंगाबादकर अंधारात होते. कोर्टाच्या आदेशाने पथदिवे सुरू झाल्यावर पाणीपुरवठा योजनेची वीज तोडण्याची नोटीस महावितरणने महापालिकेला बजावली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी महापालिकेच्या पथकाने शहरातील डीपींचे सर्वेक्षण केले. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या डीपींची यादी तयार करण्यात आली. या कामासाठी इमारत निरिक्षकांची मदत घेण्यात आली. एका इमारत निरिक्षकाला दोन मदतनीस देऊन सर्वेक्षण करण्यात आले. वाहतुकीस अडथळा ठरणारी बांधकामे पाडण्याच्या संदर्भात कोर्टाचा आदेश आहे. त्यानुसार शासनानेदेखील परिपत्रक काढले आहे. त्याचा आधार घेत आयुक्तांच्या आदेशानुसार मंगळवारी डीपींचे सर्वेक्षण करण्यात आले. सुमारे चारशे डीपी रस्त्यात येतात, असे यावेळी लक्षात आले आहे. त्या डीपींची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे. या यादीवर आयुक्त बकोरिया काय निर्णय घेणार, याबद्दल पालिकेच्या वर्तुळात उत्सुकता आहे.

पालिकेच्या जागांवर २३५ डीपी

महापालिकेच्या मालकीच्या जागांवरील डीपींचे सर्वेक्षण महापालिकेने यापूर्वीच केले आहे. शहरातील एकूण ५७९ डीपींपैकी २३५ महापालिकेच्या जागेवर आहेत. या सर्व डीपींना व्यावसायिक दराने मालमत्ता कर आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. १ एप्रिल २०१० पासून हा कर आकारण्यात आला असून, करापोटी १ कोटी ७६ लाख ९९ हजार ८०३ रुपयांची थकबाकी महापालिकेने महावितरणवर काढली आहे.

- एकूण डीपी - ५७९

- पालिकेच्या जागेतील डीपी - २३५

- डीपींचा थकलेला कर - १ कोटी ७६ लाख ९९ हजार ८०३ रुपये.

- रस्त्यात येणाऱ्या डीपी - सुमारे ४००

- सर्वेक्षणासाठी कर्मचारी - ६ इमारत निरीक्षक व प्रत्येकी दोन सहाय्यक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images