Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महावितरणचे तीन कर्मचारी निलंबित

0
0


औरंगाबाद : बेशिस्त वर्तन, सतत गैरहजर राहणे, कामचुकारपणाचे कारण देत महावितरणने दीपक फड, शेख अन्सार, एस. व्ही. बल्लावे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
औरंगाबाद शहर विभाग, रेल्वे स्टेशन क्रमांक एक येथे तंत्रज्ञ म्हणून काम करणारे दीपक निवृत्ती फड, छावणी भागातील शेख अन्सार, छावणी उपविभागाचे तंत्रज्ञ एस. व्ही. बल्लावे यांच्यासह जालना जिल्हयातील तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. दरम्यान, ‘वरिष्ठ व कनिष्ठांचे अपयश ल‌पविण्यासाठी कारवाई केली आहे,’ असा आरोप महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेने केला आहे. लाइनमन शेख अन्सार हा मानसिक उपचारासाठी सुट्टया घेत होता. यामुळे ही कारवाई चुकीची आहे, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वक्फ बोर्डाच्या जागा परत मिळवा

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘वक्फ बोर्डाच्या गिळंकृत केलेल्या जागा मिळवा. न्यायमूर्ती एटीएके शेख समितीने राज्यातील ११३ वक्फ जमिनीच्या गैरव्यवहाराच्या कारभाराचा चौकशीचा अहवाल शासन दरबारी सादर केला. याप्रकरणातील दोषींवर कारवाई करा. समितीच्या शिफारशी लागू करा. या मागणीसाठी तहरिक - ए - औकाफ समितीच्या वतीने जनआंदोलन उभारण्यात येईल,’ अशी माहिती शब्बीर अन्सारी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
अन्सारी म्हणाले, ‘वक्फची एकूण ९२ हजार एकर जमीन राज्यात होती. सध्या यातील दहा टक्के जमीन बोर्डाकडे आहे. या जमिनीबाबत आतापर्यंतचे व्यवहार नियमबाह्य आहेत. यामुळे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना भेटून वक्फ बोर्डाच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. एटीएके समितीचाही मुद्दा मांडला होता. बोर्डाच्या ११३ जमिनीच्या व्यवहाराबाबत चौकशी करण्यासाठी २००७मध्ये एटीएके शेख समिती नेमली होती. समितीने ७ एप्रिल २०११ रोजी अहवाल शासनाकडे सादर केला. या समितीच्या अहवालात झालेल्या जमीन व्यवहाराबाबत आक्षेप घेण्यात आले आहेत. तत्कालीन बोर्डाचे सदस्य, तत्कालीन सीईओ आणि सध्या काम करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांना दोषी ठरवून कारवाईची शिफारसही केली आहे. या समितीने यातील अनेक जमिनी परत घेण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. या समितीच्या अहवालावर राज्य शासनाने कारवाई करावी.
या मागणीसाठी आगामी काळात राज्यभर आंदोलन उभारू,’ असा इशारा यावेळी अन्सारी यांनी दिला. पत्रकार परिषदेला मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी, मौलाना एकबाल अन्सारी, मौलाना सदरूल हसन नदवी, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष मुश्ताक अहेमद, अब्दुल जब्बार बागवान, डॉ. अली शहा, युसूफ निजामी, जहिरोद्दीन सिद्दिकी यांची उपस्थिती होती

सचिवांसमोर तक्रारी मांडा
‘अल्पसंख्यांक विभागाचे प्रधान सचिव श्याम तांगडे हे शेख समितीच्या अहवालाचा आढावा घेण्यासाठी येत आहेत. त्यांच्यासमोर तक्रारी मांडा. वक्फ बोर्डाचे काम करण्यासाठी सहा प्रादेशिक कार्यालये स्थापन करावेत,’ अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यांनी कार्यालय स्थापन करण्याचे आश्वासन दिले,’ असे अन्सारी म्हणाले.

सीईओला विरोध का?
‘सध्या वक्फ बोर्डाच्या सीईओपदी कायदेमंडळात कार्यरत न्यायधीशाची ‌नेमणूक केली आहे. या विरोधात बोर्डाच्या सदस्यांनी उच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे. शासनाने नियुक्त केलेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला बोर्डाचे सदस्य का विरोध करित आहेत,’ असा सवालही अन्सारी यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नर्सिंग’ची फाइल पडून कशी?

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सर्व संबंधित यंत्रणांनी मान्यता दिल्यानंतर, सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतरही दोन वर्षांपासून आमच्या नर्सिंग कॉलेजची फाइल केंद्रीय मंत्रालयात पडून आहे. याचा दुसरा काय अर्थ होतो? त्यामुळेच आमच्या कॉलेजमध्ये दोन वर्षांपासून ‘एमएसस्सी नर्सिंग’ सुरू झालेले नाही, असे स्पष्ट वक्तव्य कमलनयन बजाज रुग्णालयाचे विश्वस्त सी. पी. त्रिपाठी यांनी कॉलेजमधील शपथग्रहण सोहळ्यात केले.
‘मराठवाडा मेडिकल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट’संचलित ‘कमलनयन बजाज नर्सिंग कॉलेज’मधील प्रथम वर्षातील बेसिक बीएसस्सी नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा मानला जाणारा ‘लँप लायटनिंग’ आणि शपथविधी सोहळा बुधवारी महाविद्यालयात झाला. या प्रसंगी ते बोलत होते. यासंदर्भात विचारले असता, त्रिपाठी म्हणाले, ‘आमच्या कॉलेजमध्ये ‘एमएसस्सी नर्सिंग’ सुरू करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी मान्यता दिली आहे. त्यासाठी आम्ही सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केली आहे. शुल्कदेखील भरले आहे, मात्र त्यानंतरही मंत्र्यांकडे फाइल पडून आहे. यातून दुसरा कोणताही अर्थ निघत नाही. त्यामुळेच आम्हाला ‘एमएस्सी नर्सिंग’ अभ्यासक्रम सुरू करता आलेला नाही.’
चार महिन्यांपूर्वी डॉ. हेडगेवार रुग्णालयामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आले असता, त्यांच्याकडेही ‘नर्सिंग’बाबत पाठपुरावा केला होता. त्यांच्यासोबत ‘नर्सिंग’ची फाइल दिली होती व ते ती फाइल घेऊन गेले होते, मात्र त्यानंतरही काहीही झाले नाही. सरकार बदलल्यामुळे फरक पडेल, असे वाटले होते. मात्र फरक पडलेला नाही, असेच दुर्दैवाने म्हणावे लागते, अशीही खंत त्रिपाठी यांनी ‘मटा’कडे व्यक्त केली.
महाविद्यालयात बुधवारी झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रा. कल्ल्याणी मकासरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. सुमित खरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शमीम अहमद खान, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नागराजप्पा डी, उपप्राचार्य प्रा. जोअन्ना जॉन यांच्यासह कर्मचारी, विद्यार्थी, पालक आदींची उपस्थिती होती.

पदवीधारक विद्यार्थ्यांचा गौरव
यावेळीत महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात पदवीधारक विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातर्फे ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. ‘उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर करून रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी गुणवत्तेचा उत्कृष्ठ आदर्श घडवावा,’ असे आवाहन घाटीतील मेडिसिन विभागाच्या प्रा. डॉ. मंगला बोरकर यांनी विद्यार्थ्यांना केले. ‘रुग्णांना सेवारुपी प्रकाश सतत द्यावा,’ असे आवाहन त्रिपाठी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहरणाच्या मेसेजने तारांबळ

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दहावीच्या विद्यार्थिनीचे कारमधून आलेल्या चौघांनी अपहरण केल्याचा मेसेज बुधवारी सोशल मीडियावरून पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्यापर्यंत पोहचला. आयुक्तांनी हे प्रकरण गांर्भियाने घेत मुलीच्या शोधासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित केली. मात्र, संबंधित शाळेच्या शिक्षकांशी संपर्क साधल्यानंतर ही मुलगी या शाळेची विद्यार्थिनी नसल्याचे स्पष्ट झाले.
गेल्या २४ तासांपासून शहरातील विविध ग्रुपमध्ये एक पोस्ट व्हायरल झाली होती. एचआर १२, ८६८७ या रिटझ कारमधून आलेल्या चौघांनी दहावीच्या विद्यार्थिनीचे अपहरण केल्याचा त्यात उल्लेख होता. मेसेजसोबत मुलीचा फोटो होता, पण नाव व पत्ता काही नसून छावणी परिसरात असलेल्या एका इंग्रजी शाळेच्या नावासारखे नाव असल्याचा उल्लेख होता. हा मेसेज
प्रसारमाध्यमातील एका प्रतिनिधीने पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना पाठवत खात्री करण्याची विनंती केली. अमितेशकुमारांनी गांर्भियाने घेत शहरात सर्वत्र नाकाबंदी केली. गुन्हेशाखेची पथके तत्काळ त्या शाळेतील संस्थाचालक, शिक्षकाकडे पाठवण्यात आली. यावेळी फोटोत असलेली विद्यार्थिनी ही या शाळेतील नसल्याचे शिक्षकांनी स्पष्ट केले.

हरियाणातील शाळा
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इंटरनेटवर अशा शाळेच्या नावाचा शोध घेतला असता हरियानातही या नावाची शाळा असल्याचे निष्पन्न झाले. ज्या कारमधून अपहरण झाल्याचा उल्लेख मेसेजमध्ये नमूद करण्यात आला होता, त्या कारची पासिंगही हरियाना येथील होती. त्यामुळे या मेसेजचा शहरातील शाळेशी काही संबध नसल्याचे सिद्ध झाले. मात्र, या संपूर्ण प्रकारात पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध तुकड्यांना मंजुरी

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
लातूर जिल्हा परिषदेतील शाळेच्या २६२ अवैध तुकड्या मंजुरीप्रकरणी दाखल झालेल्या फौजदारी याचिकेत शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवासह संचालक शिक्षण विभाग, उप संचालक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लातूर व शिक्षण अधिकारी प्राथमिक यांना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे आणि न्या. के. के. सोनवणे यांनी दिले.
लातूर येथील निवृत्त शिक्षण अधिकारी व्ही. एम. भोसले यांनी २०१३मध्ये जनहित याचिका दाखल केली होती. त्यात हायकोर्टाने २० जुलै २०१५ रोजी १८ दोषी अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी पूर्ण करून तीन महिन्यांत अहवाल सादर करावा, असे आदेश दिले होते, मात्र या प्रकरणात कुठलीही कारवाई न झाल्याने याचिकाकर्ते भोसले यांनी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली. त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ३१ आॅक्टोबर २०१४ रोजी शिक्षण अधिकारी (प्राथमिक) यांंना प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल करून संबधितांवर कारवाईचा अहवाल सादर करण्यासंबंधीचे पत्राद्वारे आदेश दिले, मात्र त्यावर काहीच कारवाई झाली नसल्याचे याचिकेत म्हटले आहे.
सुनावनीवेळी खंडपीठाने शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवासह संचालक शिक्षण विभाग, उप संचालक, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण अधिकारी प्राथमिक यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यातर्फे राम बिरादार, तर शासनातर्फे अमरजिंतसिंह गिरासे हे काम पाहत आहेत. या प्रकरणाची सुनावणी ३ मार्च रोजी अपेक्षित आहे.

दोषी अधिकाऱ्यांकडून वसुली नाही
या प्रकरणात ६ कोटी ५१ लाख ९९ हजार ५९० रुपयांच्या अफरातफर झाल्याप्रकरणी शिक्षण सहसंचालक यांनी १९ सप्टेंबर २०१४ रोजी सुमारे १० अधिकाऱ्यांवर दोषी ठरविले होते. त्यांच्याकडून रक्कम वसुली करण्याचे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याची अंमलबजावणी देखील नसल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. २६२ तुकड्यावरती नियुक्त शिक्षकांची नियुक्ती रद्द करावी व संस्थाचालक, शिक्षण विभागाचे दोषी अधिकारी यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता

0
0

म. टा. प्रतिनिधी, आैरंगाबाद
औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीतर्फे राष्ट्रपुरुषांच्या शहरातील सर्व पुतळ्यांची स्वच्छता करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, यंदाचे समिती अध्यक्ष डी. एन. पाटील, अनिल मानकापे, मनोज पाटील संदीप शेळके, राजेंद्र दाते पाटील, विशाल दाभाडे, दिग्विजय पाटील, धीरज पवार, अनिकेत पवार, हरिष शिंदे आदींची उपस्थिती होती.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची; तसेच परिसराची स्वच्छता करून अभिवादन करण्यात आले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता वेरूळ येथील मालोजी राजे गढीची स्वछता व ध्वजवंदन करण्यात येणार अाहे. रविवारी रोजी सकाळी ८ वाजता क्रांतिचौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक अभिषेक, पुष्पहार अर्पण, ध्वजवंदन व अभिवादन करण्यात येणार आहे.
क्रांतिचौक ते टीव्ही सेंटरपर्यंत मोटार सायकल फेरी काढण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजता संस्थान गणपती राजा बाजार येथून मुख्य मिरवणुकीस सुरुवात होईल व क्रांतिचौक येथे समारोप करण्यात येईल. या सर्व कार्यक्रमांमध्ये सर्व शिव प्रेमींना सहभागी व्हावे, असे आवाहन औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीतर्फे करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्याख्यान उधळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पंडीत दीनदयाल उपाध्यय यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यान उधळणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल सावे यांनी बुधवारी कुलगरु डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भातील बुधवारी कुलगुरुंना निवेदन देण्यात आले. आयोजित व्याख्यान कार्यक्रम उधळून लावणे ही घटना शैक्षणिक क्षेत्रास काळीमा फासणारी आहे. लोकशाही मूल्यांची गळचेपी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विद्यापीठाची निरपेक्ष प्रतिमा डागळण्याचा हा कुटील राजकीय जाव आहे, असा आरोपही आमदार सावे यांनी केला आहे.
व्याख्यान उधळणारे यापूर्वी विद्यापीठात राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत, असा आरोप करत त्यांनी या गुडगिरीला आळा घालण्यात यावा, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याप्रसंगी मनोज पत्की, प्रा. जयश्री चामरगोरे, जालिदर शेंडगे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुर्वेद महाविद्यालयास प्रथम क्रमांक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (नाशिक), आयुर्वेद व्यासपीठ शाखा औरंगाबाद आणि छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे आयुर्वेद महाविद्यालय यांच्यातर्फे आयोजित वैद्य बिंदुमाधव कट्टी स्मृती राज्यस्तरीय आयुर्वेद प्रश्नमंजुषा देवगिरी करंडक स्पर्धेत औरंगाबादच्या छ. शा. म. शि. संस्थेच्या आयुर्वेद महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळविला.
कांचनावाडी येथील छ. शा. म. शि. संस्थेच्या आयुर्वेद महाविद्यालयात ही स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या आयुर्वेद महाविद्यालय संघास पाच हजार रुपये रोख व फिरता करंडक प्रदान करण्यात आला. उपविजेत्या संघास तीन हजार रुपये रोख व तृतीय संघास दोन हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेचे महाराष्ट्र टाइम्स हे माध्यम प्रायोजक होते.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य श्रीकांत देशमुख, आयुर्वेद व्यासपीठाचे केंद्रीय अध्यक्ष संतोष नेवपूरकर, डॉ. गिरीश वेलणकर, सोहन पाठक, आनंद कट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत २६ संघांनी सभाग घेतला होता. त्यात औरंगाबाद, बीड, उदगीर, अहमदनगर, पुणे, जयसिंगपूर, मोझरी, संगमनेर, नाशिक, सातारा या जिल्ह्यांतून संघ सहभागी झाले होते. पारितोषिक वितरण सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून संतोष नेवपूरकर, प्राचार्य डोंगरे, विलास जाधव, जयश्री देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. परीक्षक म्हणून राजेश उपाध्या, फडणवीस, संध्या येलावार, विलास जाधव, जयश्री देशमुख, अंतरकर यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी परेश देशमुख, अश्विनी पाठक, पंकज मुळे, अमोल घनघाव, सदानंद काळे, अजय देशमुख, राहुल इंगोले, देवदत्त धनेश्वर, अजय थोटे, विजय जैस्वाल, सोहन पाठक, आनंद कट्टी आदींनी पुढाकार घेतला.

स्पर्धेचा निकाल
प्रथम ः पूजा तेलांगे, विलास शिंदे, कांचन नागरे (आयुर्वेद महाविद्यालय, औरंगाबाद), द्वितीय ः प्रियांका निसळ, अभिषेक कोकरे, शीतल सगर, जे. जे. मकदूम (आयुर्वेद महाविद्यालय, जयसिंगपूर), तृतीय ः मंजुश्री पाटील, मीनल पवार, चैताली लुंगारे (आयुर्वेद महाविद्यालय, औरंगाबाद)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालमत्ता कर वाढणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मालमत्ता करात वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या प्रशासनाने तयार केला असून, तो स्थायी समितीच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. नव्याने आकारण्यात येणारा कर प्रचलित दरापेक्षा किमान तिप्पट जास्त असावा, अशी शिफारस प्रस्तावात केली आहे. जुन्या मालमत्तांच्या करात २५ टक्क्यांनी वाढ करावी, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
दरवर्षी २० फेब्रुवारीपर्यंत कर आकारणीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मांडून तो मंजूर करण्यासाठी पालिकेच्या प्रशासनाकडून प्रयत्न केला जातो. त्यानुसार शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीसमोर करवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
करयोग्य मूल्याच्या आधारे मालमत्ता कराची आकारणी केली जाते. सामान्य कर हा करयोग्य मूल्याच्या ३० टक्के निश्चित करण्यात आला होता. कर आकारणीसंदर्भात तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात सामान्य कर ३० टक्केच ठेवणात आला आहे, पण करयोग्य मूल्यदरात (रेडिरेकन) वाढ झाली असल्यामुळे समान्य करातही आपोआपच वाढ होणार आहे. सामान्य कर हा करयोग्य मूल्यदराच्या तिप्पट असल्यामुळे सध्याच्या करातही तिप्पट वाढ होणार आहे. त्याचा बोजा नागरिकांवर पडणार आहे. पालिका प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला, तर सध्याच्या करात किमान तिप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. निवासी वापराच्या जुन्या इमारतींचा कर वाढवण्याचा प्रस्ताव देखील पालिकेने स्थायी समितीच्या समोर ठेवला आहे. सध्या ११ रुपये प्रतिचौरस मीटर दर आहे. तो १३ रुपये ७५ पैसे प्रतिचौरस मीटर करण्याचा प्रस्ताव आहे. निवासेत्तर इमारतींसाठी २२ रुपयांऐवजी २७ रुपये ५० पैसे प्रतिचौरस मीटर या दराने मालमत्ता कर आकारणी करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे जुन्या मालमत्तांचा कर २० ते २५ टक्क्यांनी वाढेल. व्यावसायिक इमारतींचा कर २८ रुपये प्रतीचौरस मीटरवरून ३५ रुपये प्रतिचौरस मीटर करण्याचे प्रस्तावित आहे.

असा वाढेल कर
मालमत्तेचा प्रकार............सध्याचादर.......प्रस्तावित दर
निवासी इमारत......................११..............१३.७५
निवासेतर इमारती..................२२..............२७.५०
अनुदानीत शैक्षणिक संस्था......१४..............१७.५०
कायम विनाअनुदानित संस्था...१७..............२१.२५
व्यावसायिक इमारती..............२८..............३५
औद्योगिक क्षेत्र....................१४.६४..........१८.३०
(कराचा दर ः रुपये दरमहा प्रतिचौरस मीटर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिसेंबरअखेर सिटीबस

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत शहरातील प्रमुख मार्गांवर सिटीबस सुरू होऊ शकेल, असे महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सूचित केले आहे. कोणत्या मार्गांवरून सिटीबस सेवा सुरू करायची याचा निर्णय स्पेशल पर्पज व्हेकल (एसपीव्ही) घेईल, असे ते म्हणाले.
स्मार्टसिटी प्रकल्पातील पॅनसिटीअंतर्गत सिटीबस सेवा सुरू केली जाणार आहे. त्यासंदर्भात बकोरिया म्हणाले, ‘जालना रोडवर सिटीबस सेवा सुरू करावी, असा विचार झाला आहे, पण या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जाणार आहे. हे काम करताना प्राधिकरण ‘बीआरटीएस’चे नियोजन करणार आहे. त्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण होईल, बांधकामे देखील होतील. बसथांबे, बसडेपो, उड्डाणपूल ही कामे देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून होणार आहेत. त्यामुळे ही कामे पूर्ण होईपर्यंत जालना रोडवर सिटीबस सुरू करता येणार नाही. त्याऐवजी अन्य मार्गावर सिटीबस सुरू करण्याचा विचार केला जात आहे. रेल्वेस्टेशन ते हर्सूल, औरंगपुरा ते रेल्वेस्टेशन, विद्यापीठ ते रेल्वेस्टेशन आदी मार्गांवर सिटीबस सुरू करणे शक्य आहे. सिटीबसचे मार्ग ‘एसपीव्ही’ ठरवेल.’

लवकरच एसपीव्हीची बैठक
‘एसपीव्ही’ची बैठक घेण्यासंदर्भात स्मार्टसिटी प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अपूर्व चंद्रा आपण चर्चा करणार आहे. पुढील दोन आठवड्यांत ‘एसपीव्ही’ची बैठक होईल, त्यात काही महत्त्वाचे निर्णय देखील होतील, असे बकोरिया यांनी स्पष्ट केले. स्मार्टसिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ९० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्याचे पत्र राज्य शासनाकडे आले आहे. महापालिकेला ते लवकरच प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीसाठी आज मतदान

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेसाठी गुरुवारी मतदान होत आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांसाठी मतदान होईल. औरंगाबाद जिल्ह्यात परिषदेच्या ६२ गटांसाठी ३२३ आणि १२४ पंचायत समिती गणांतून ५७६ असे ८९९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी सकाळी साडेसात ते सायंकाळी सडेपाच यादरम्यान मतदान होणार आहे.
मतदानासाठी ईव्हीएएमसह अन्य साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत. जिल्ह्यात १७८० मतदान केंद्र असून, निवडणुकीसाठी १० हजार ५१२ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक २७८ मतदान केंद्र गंगापूर तालुक्यात आहेत. खुलताबाद तालुक्यात सर्वात कमी ७८ मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यात १६३ मतदान केंद्र संवेदनशील आणि १२ मतदान केंद्र अतिसंवेदनशील आहेत. या मतदान केंद्रांवर पोलिस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मतदानासाठी ३९३० ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तालुका व मतदारांची संख्या
- औरंगाबाद : २ लाख १६,७०९
- पैठण : १ लाख ९९,८७२
- वैजापूर : १ लाख ९६,११८
- गंगापूर : २ लाख १९,३८३
- सिल्लोड : २ लाख ०१,४५८
- कन्नड : २ लाख २२,४१६
- फुलंब्री : १ लाख ०६,३६७
- सोयगाव : ७३ हजार ३४२
- खुलताबाद : ७१ हजार ७४२
- एकूण : १५ लाख ७,४०७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१३५ ग्रामपंचायतींची बँक खाती गोठवली

0
0

वैजापूर : पॅनकार्ड सादर न केल्याने १३५ ग्रामपंचायतींची बँक खाती एक महिन्यापासून गोठवण्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. खाते सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतींनी पॅनकार्ड काढण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर रोजी नोटबंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्राप्तीकर विभागाने बँकेत रोख रक्कम जमा करणाऱ्यांवर नजर ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पॅनकार्ड शिवाय ५० हजार व त्यापेक्षा जास्त रकमेच व्यवहार करण्यास मज्जाव केला आहे. पॅनकार्ड नंबर बँक खात्याला लिंक केल्यानंतर व्यवहार करता येणार आहेत. पॅनकार्ड नसल्याने वैजापूर तालुक्यातील १६५ गावांचा कारभार पाहणाऱ्या १३५ ग्रामपंचायतींच्या खात्यावरील रक्कम काढण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. खाते गोठवल्याची ग्रामपंचायतींना कल्पना नव्हती, मात्र बँकेतून रक्कम काढण्यासाठी गेल्यानंतर त्यांना बँकेतून पॅनकार्ड नंबर दिल्यानंतरच व्यवहार करता येईल, असे सांगणात येत आहे.

कामावर परिणाम
खाती गोठविल्याने दैनंदिन कर्मचाऱ्यांचा पगार, पाणीपुरवठ्याची कामे (पाइप लाइनचे लिकेज काढणे, मोटार दुरुस्ती आदी), सरपंचांचे मानधन व ग्रामपंचायत सदस्यांचा भत्ता आदी कामांवर परिणाम झाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्याने योजनांची कामे करता येत नव्हती. त्यामुळे त्यावर परिणाम झाला नाही, पण गुरुवारी मतदान संपल्यानंतर या कामांवर परिणाम होऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी रुग्णालयांत स्वस्त चाचण्या

0
0

औरंगाबाद ः प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते जिल्हा सामान्य रुग्णालयांपर्यंतच्या सर्वच सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या राज्यभरातील रुग्णांना निःशुल्क ते अत्यल्प शुल्कात पॅथॉलॉजी लॅबचे दर्जात्मक रिपोर्ट मिळणार आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकारचा ‘एचएलएल’शी नुकताच करार झाला आहे. येत्या तीन महिन्यांत १०९ लॅबद्वारे या सेवा मिळणार आहेत. त्याचवेळी सरकारी रुग्णालयातील रुग्णांना रेडिओलॉजीच्या दर्जेदार चाचण्याही करून मिळणार आहेत आणि त्यासाठीही लवकरच एका कंपनीशी करार होणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यामध्ये औरंगाबाद, वैजापूर, सिल्लोड, कन्नड व गंगापूर येथे, तर मराठवाड्यामध्ये हिंगोली, जालना, जाफराबाद, मंठा, परभणी, बीड, परळी, माजलगाव, लातूर, उदगीर, नांदेड, मुखेड, हिमायतगर, उमरी, उस्मानाबाद, उमरगा, तुळजापूर, परंडा या ठिकाणी ‘एचएलएल’च्या छोट्या व मोठ्या स्वरुपाच्या लॅब सुरू होणार आहेत. राज्यातील एकूण ३३ जिल्ह्यांमध्ये १०९ ठिकाणी या लॅब असतील. यापैकी निम्म्या लॅब या एनएबीएल प्रमाणित, तर निम्म्या लॅब या एनएबीएल दर्जाच्या असणार आहेत.
मूलभूत स्वरुपाच्या सर्व प्रकारच्या पॅथॉलॉजी व मायक्रोबायोलॉजीच्या चाचण्या सरकारी रुग्णालयांमध्ये कमीत-कमी वेळेत व्हाव्यात आणि त्यांचे दर्जात्मक अहवाल मिळावेत, या दृष्टीने ‘एचएलएल लाइफ केअर लिमिटेड’ या सार्वजनिक क्षेत्रातील मिनी रत्न दर्जाच्या कंपनीशी राज्य सरकारने नुकताच करार केला आहे. या करारानुसार; रुग्णालयातून रुग्णाचे रक्त-लघवी-थुंकीचे नमुने घेतले जाणार असून, सर्व तातडीचे रिपोर्ट ४ तासांत, तर इतर रिपोर्ट २४ तासांत रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यांत सर्व प्रयोगशाळा कार्यान्वित होणार आहेत आणि त्यासाठी सुमारे ५०० पॅथॉलॉजिस्ट-मायक्रोबायोलॉजिस्टची नियुक्ती केली जाणार असल्याचे समजते.

अशा असतील चाचण्यांच्या सुविधा
- तातडीचे रिपोर्ट ४ तासांत मिळणार
- इतर रिपोर्ट २४ तासांत मिळणार
- बीपीएल रुग्णांना निःशुल्क सेवा
- इतरांना ३० ते ७० रुपये शुल्क
- रुग्णालयातून रक्तनमुन्यांचे संकलन
- निम्म्या लॅब ‘एनएबीएल’ प्रमाणित

‘एचएलएल’शी महाराष्ट्र सरकारचा नुकताच करार झाला असून, प्रायमरी व सेकंडरी स्वरुपाच्या सर्व तपासण्या करुन त्यांचे दर्जात्मक रिपोर्ट मिळणार आहेत. येत्या तीन महिन्यांत या सेवा सुरू होतील. रेडिओलॉजीसंबंधीच्या सेवांचेही आउटसोर्सिंग केले जाणार असून, त्यासाठी लवकरच करार केला जाणार आहे.
– डॉ. सतीश पवार, संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'जय मल्हार'ची म्हाळसा शिवसेनेच्या प्रचारात

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । जालना

राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे वारे वाहत असतानाच सर्व पक्ष जोमाने प्रचार करत असल्याचे चित्र आहे. प्रचारासाठी आपल्यापरिने हटके पद्धत अवलंबण्याचा प्रयत्न करत असताना शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे उमेदवार महेंद्र पवार यांनी म्हाळसा देवीला प्रचारात उतरवले. घनसावंगी तालुका येथील तीर्थपुरी गटातील शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे उमेदवार महेंद्र पवार यांचा प्रचार करण्यासाठी ‘जय मल्हार’ मालिकेतील ‘म्हाळसा’ अर्थात अभिनेत्री सुरभी हांडे हिने हजेरी लावली होती.

प्रचारादरम्यान सुरभीने जाहीर सभेत भाषण ही केले. तसेच उपस्थित मतदारांना ‘जय मल्हार’ मालिकेचे कथानक ऐकवून मतदान करण्याचे आवाहन केले. सुरभीला पाहण्यासाठी तीर्थपुरीमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.आपला प्रचार इतरांपेक्षा हटके करण्यासाठी अनेक युक्त्यांचा वापर केला जात असून कोणी सैराटच्या गाण्याचा आधार घेतलाय तर कोणी सैराटमधील संवाद डब केले आहेत.

राज्यातील जिल्हा परिषदाच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाचा प्रचार आता शांत झाला असून प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जालन्यातील सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी कुठे रॅली तर कुठे मतदारांना प्रत्यक्ष भेटून प्रचाराचा शेवट केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिच्या हाती मतदानाची दोरी...!

0
0


म. टा. प्रतिनिधी,खुलताबाद
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रकियेत खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील चार मतदान केंद्रांवर सर्वकाही महिलाच, असे चित्र पाहायला मिळाले. वेरूळमधील हा उपक्रम निवडणूक प्रक्रियेचा पथदर्शी उपक्रम ठरला आहे.
जिल्हा परिषदेचा वेरूळ गट व पंचायत समितीचा गण महिला राखीव आहे. त्यामुळे येथील उमेदवार महिलाच होत्या. पण, मतदान केंद्राध्यक्ष, अधिकारी व कर्मचारी महिलांची नेमणूक करण्यात आली. एवढेच नव्हे, तर राजकीय पक्षांनी प्रथमच मतदान प्रतिनिधी म्हणून महिलांचीच नियुक्ती केली होती. सुरक्षेसाठी महिला पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचारी व होमगार्ड सुद्धा महिलांनाच तैनत करण्यात आले होते. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी पिवळ्या रंगाचा ड्रेसकोड परिधान केला होता. जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी वेरूळ येथील चारही मतदान केंद्राना भेट देऊन रांगेत उभ्या असलेल्या मतदारांचे मतदानाचा हक्क बजावल्याबद्दल आभार मानले. त्यांनी सर्व प्रक्रिया महिलाच समर्थपणे हाताळत असल्याबद्दल या उपक्रमाचे कौतुक केले. हा संकल्पनेबद्दल त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अंजली धानोरकर यांचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्षयरोग्यांसाठी आता घाटीमध्ये डेली डॉटस्

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
क्षयरोग्यांसाठी पूर्वीच्या ‘डॉटस्’ या उपचार पद्धतीमध्ये बदल होऊन ‘डेली डॉटस्’ ही नवीन तसेच पूर्णपणे निःशुल्क व अधिक सुटसुटीत व प्रभावी उपचार पद्धती देशभरात सुरू झाली आहे. या उपचार पद्धतीची गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) बाह्यरुग्ण विभागात सुरुवात करण्यात आली. नवीन उपचार पद्धतीमुळे एकाच गोळीमध्ये चार औषधे असल्याने क्षयरोग्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
घाटीचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर चौधरी, घाटीतील छातीविकार व क्षयरोग विभागप्रमुख डॉ. अविनाश लांब, पालिकेचे आरोग्य अधिकारी व शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अंजली पाथ्रीकर-शिंदे, डॉ. मिनाक्षी नारखेडे, डॉ. अस्मा शेख आदींच्या उपस्थितीत या उपक्रमाचे गुरुवारी उद्घाटन झाले. ही सुविधा घाटीतील बाह्यरुग्ण विभागील वॉर्ड क्रमांक १२६ येथे; तसेच पालिकेचे सर्व आरोग्य केंद्र व रुग्णालयांमध्ये उपलब्ध झाली आहे.
देशभरामध्ये क्षयरोगाचे मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, अर्धवट व चुकीच्या उपचारांमुळे टीबीच्या दैनंदिन औषधांना अवरोध निर्माण होऊन साध्या टीबीचे रूपांतर ‘एमडीआर-टीबी’मध्ये, तर ‘एमडीआर-टीबी’चे रूपांतर ‘एक्सडीआर-टीबी’मध्ये होत आहे. त्याचवेळी ‘एमडीआर-टीबी’ तसेच ‘एक्सडीआर-टीबी’ या टीबीच्या गंभीर व अतिगंभीर अवस्थांमुळेही मृत्युचे प्रमाण देशभरात वाढत आहे. पूर्वी साध्या टीबीसाठी चार वेगवेगळ्या औषधांच्या चार वेगवेगळ्या गोळ्या होत्या व आठवड्यातून तीनदा घ्याव्या लागत होत्या. त्यामुळेच गोळ्या वेळेवर व अचूकपणे घेण्याचे प्रमाण कमी होते आणि अर्धवट व चुकीच्या उपचारांमुळे टीबीचे रूपांतर ‘एमडीआर’ व ‘एक्सडीआर’मध्ये होत होते. या पार्श्वभूमीवर पूर्वीच्या उपचार पद्धतीमध्ये बदल करून ही पद्धत सुटसुटीत करण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, आता एकाच गोळीमध्ये चार औषधांचा समावेश करुन आठवड्यातून तीनदाऐवजी रोजच व विशेष म्हणजे डॉक्टरांच्या देखरेखीखाली गोळ्या घेण्याचा सकारात्मक बदल करण्यात आला आहे. गोळ्या-औषधे अचूकपणे घेण्यातून टीबीचा प्रसार व मृत्यूचे प्रमाण घटवण्याच्या हेतुने हा बदल देशपातळीवर करण्यात आला आहे. त्याची सुरुवात महाराष्ट्रासह पाच राज्यांपासून करण्यात आली आहे, असे डॉ. लांब यांनी ‘मटा’ला सांगितले. महापालिकेतच्या सर्व आरोग्य केंद्र व रुग्णालयांमध्ये ही उपचार पद्धत उपलब्ध असेल, असेही महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास जगताप यांनी ‘मटा’ला सांगितले.

दर तीन मिनिटांला एक मृत्यू
देशामध्ये दर तीन ते चार मिनिटाला एका टीबी रुग्णाचा मृत्यू होतो. त्याशिवाय टीबी हा संसर्गजन्य असल्यामुळे त्याचा प्रसार देशात फार झपाट्याने होत असून, औषधोपचारांकडे दुर्लक्ष होत असल्यानेच ‘एमडीआर’ तसेच ‘एक्सडीआर’ या टीबीच्या गंभीर-अतिगंभीर अवस्थांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे ‘एमडीआर’च्या संसर्गातून थेट ‘एमडीआर’ किंवा ‘एक्सडीआर’च्या संसर्गातून थेट ‘एक्सडीआर’ टीबी होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर ‘डेली डॉटस्’ ही उपचार पद्धती उदयास आली, असेही सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठण तालुक्यात दोन ठिकाणी यंत्र बंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नऊ गट व पंचायत समितीच्या १८ गणांसाठी गुरुवारी मतदान घेण्यात आले. विहामांडवा व चितेगाव येथील मतदान केंद्रातील ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात झालेला बिघाड व काही मतदान केंद्रात झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले.
तालुक्यातील २४४ मतदान केंद्रावर गुरुवारी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात सकाळी साडे नऊपर्यंत मतदानाचा वेग कमी होता. त्यानंतर मतदानाचा वेग वाढला, सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान तालुक्यातील बहुतांश मतदान केंद्रावर मतदारांनी मोठ्या रांगा लावल्या. सकाळी अकरापर्यंत तालुक्यात जवळपास साडेबावीस टक्के मतदान झाले. त्यानंतर दुपारी वेग थोडा मंदावला, मात्र दुपारी तीननंतर मतदार पुन्हा घराबाहेर पडले.
तालुक्यातील कोळीबोडखा व बिडकीन पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील काही मतदान केंद्रावर बाचाबाचीचे तुरळक प्रकार घडले. या घटना वगळता तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडल्याची माहिती निवडणूक विभागकडून देण्यात आली.

मतदान यंत्र बदलले
तालुक्यातील विहामांडवा व चितेगाव येथील मतदान केंद्रातील मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या घटना घडल्या. विहामांडवा येथील ९० क्रमांकाच्या मतदान केंद्रातील मतदान यंत्रात १९० मतदारांनी मतदान केल्यानंतर यंत्रात बिघाड झाला. प्रशासनाने या मतदान केंद्रवरील नादुरुस्त यंत्र त्वरित बदलून प्रक्रिया सुरळीत केली. मतदान सुरू होण्यापूर्वी यंत्रात बिघाड असल्याचे चितेगाव येथील मतदान केंद्रावर लक्षात आले. तेथील यंत्र बदलण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदानानंतर आता मतमोजणीकडे डोळे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ३१० व पंचायत समितीच्या ५९८ उमेदवारांचे भवितव्य गुरुवारी मतदान यंत्रांत बंद झाले. गेले काही महिने घाम गाळलेल्या उमेदवारांना आता मतमोजणीची प्रतीक्षा आहे. येत्या २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.
मतदानानंतर मतदान यंत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व तालुक्याच्या ठिकाणी स्ट्राँग रूम तयार करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद तालुक्यातील यंत्रे ठेवण्यासाठी टीव्ही सेंटर परिसरातील स्ट्राँगरूम तयार करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी भारत कदम, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सतीश सोनी, नायब तहसीलदार डी. एम. देशपांडे यांनी ईव्हीएम सुरक्षीत ठेवण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.

औरंगाबाद तालुक्यात ७२ टक्के
औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक सरासरी ७२ टक्के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक निर्णय अधिकारी भारत कदम यांनी व्यक्त केला. औरंगाबाद शहराभोवती असलेल्या या मतदारसंघात सायंकाळी पाच वाजता दीडशे बुथवर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. दिवसभरात तालुक्यातील झाल्टा, पळशी, बनगाव, वडगाव कोल्हाटी येथील ३ केंद्र व रामवाडी अशा ७ ठिकाणच्या बुथवरील ईव्हीएम नादुरुस्त झाले. येथील मशीन तत्काळ बदलण्यात आले.

मतदार याद्यांत गोंधळ
राज्य निवडणूक आयोगाने तयार केलेल्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ असल्याचे निदर्शनास आले. नावे चुकीचे असणे, दुसऱ्याच गटात किंवा गणामध्ये नाव असणे, क्रमांक चुकणे आदी प्रकारांमुळे मतदारांची दमछाक झाली. वडगाव कोल्हाटी उत्तर, वाळूज, रांजणगाव शेणपुंजी, वडगाव कोल्हाटी पश्चिम व मध्य आदी भागातील मतदारांनी या तक्रारी केल्या. औरंगाबाद व गंगापूर तालुक्यातील इतर बुथवरूनही या तक्रारी आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रघुनाथपूरवाडीत रस्त्यासाठी बहिष्कार

0
0

म .टा. प्रतिनिधी, वैजापूर
रस्त्याच्या मागणीसाठी वैजापूर तालुक्यातील बोरसर जिल्हा परिषद गटातील रघुनाथपूरवाडी येथील ५५४ मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. रघुनाथपूरवाडी येथील मतदान केंद्रावर एकही मतदार फिरकला नाही. या केंद्रावरील मतदान अधिकारी हातावर हात धरून बसले होते.
वैजापूर-औरंगाबाद रस्त्यावर शिऊरपासून सहा किलोमीटर अंतरावर रघुनाथपूरवाडी हे गाव आहे. या गावात २६३ महिला व २९१ पुरुष, असे ५५४ मतदार आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या काळात या गावाला जोडणारा चांगला रस्ता व इतर विकासकामे न झाल्याने ग्रामस्थ संतापले आहेत. सरपंच भारती दुलत, उपसरपंच काशाबाई जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी संदिपान सानप व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुमन मोरे यांना मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन दिले होते. गावात रस्ता नसल्याने जानेवारीमध्ये गर्भवती महिलेला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी अॅम्ब्युलन्स येऊ शकली नाही, परिणामी ही महिला रस्त्यातच प्रसूत झाली. जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत मतदान न करण्याचा ठाम निर्णय त्यांनी घेतला. या निर्णयानंतर औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिनकर पवार यांनी गावकऱ्यांची मनधरणी केली. तहसीलदार सुमन मोरे यांनी विशेष ग्रामसभा घेऊन गावकऱ्यांची समजूत काढली. परंतु, तोडगा निघाला नाही. मतदानाच्या दिवसापर्यंत गावकरी निर्णयावर ठाम राहिल्याने या केंद्रावर मतदान होऊ शकले नाही. मतदान केंद्राच्या परिसरात गावकरी घोळक्याने जमा होत होते. पण त्यांनी मतदान केले नाही. मतदान केंद्राध्यक्ष राजेंद्र कवडे, त्यांचे सहकारी सुचेता माहूरकर, तलाठी फोसे, पोलिस कॉन्स्टेबल एकनाथ करवते, प्रदीप वाबळे यांची नियुक्ती करण्यात आली होती.

रक्त घेतले, विकास नाही
माजी उद्योग संचालक व भारतीय जनता पक्षाचे नेते जे. के. जाधव यांनी हे गाव दत्तक घेतले होते. त्यांनी गावात रक्तदान शिबिर घेऊन गावकऱ्यांचे रक्त घेतले, मात्र विकासकामे केली नाहीत, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुटुंब देवदर्शनला; साताऱ्यात घरफोडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
साताऱ्यातील चंद्रशेखरनगर येथे राहणारे सेवानिवृत्त कुटुंबासह देवदर्शनासाठी बोधन येथे गेल्याची संधी साधून चोरट्यांनी घर फोडून १ लाख ९१ हजाराचा ऐवज चोरल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.
विनोद विठ्ठल श्रीरामवार (वय ५०, रा. प्लॉट न. २७, चंद्रशेखरनगर) येथे राहतात. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी घराला कुलूप लावून ते कुटुंबासह देवीच्या दर्शनासाठी तेलंगणातील बोधन येथे गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता शेजाऱ्यांनी फोन करून तुमच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले आहे, दरवाजा उघडा आहे, अशी माहिती दिली. ही माहिती मिळल्यावर श्रीरामवार लगेच घरी आले. घरी येऊन पहिले असता चोरट्यांनी बेडरूममधील अलमारी तोडून एक लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व ११ हजार रुपये रोख, असा १ लाख ९१ हजाराचा ऐवज चोरून नेल्याचे लक्षात आले. तसेच वरच्या मजल्यावरील रुमचे कुलूप तोडून समान अस्ताव्यस्त केले. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास आला असून, पुढील तपास एपीआय बहुरे हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images