Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

औरंगाबादसाठी विकास प्राधिकरण

$
0
0

unmesh.deshpande@timesgroup.com
Tweet : @unmeshdMT
औरंगाबाद ः ‘एमएमआरडीए’प्रमाणे ‘औरंगाबाद रिजन मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अॅथॉरिटी’ स्थापन करण्याचा निर्णय एक महिन्यापूर्वी घेतला आहे. जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांची आचारसंहिता संपल्यावर यासंदर्भातील अध्यादेश काढला जाणार आहे, अशी माहिती राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांनी ‘मटा’ला दिली.
रिजनल डेव्हलपमेंट प्लानसंदर्भात बैठक घेण्यासाठी डॉ. करीर औरंगाबादेत आले होते. यावेळी त्यांनी ‘मटा’शी संवाद साधला. नियोजन प्राधिकरणाच्या नियुक्त्या व त्यामार्फत कामे होत नसल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले,‘प्राधिकरणाची नियोजन समिती निवडणुकीच्या माध्यमातून सध्या अस्तित्वात आली आहे. या समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या उपस्थितीत समितीची बैठक होईलच. याशिवाय अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण असते. त्याचीही स्थापना झाली आहे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कामे होतील. ‘एमएमआरडीए’च्या धर्तीवर हे प्राधिकरण असेल. संबंधित विभागाचे नाव प्राधिकरणाला दिले जाते. हे प्राधिकरण ‘औरंगाबाद रिजन मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अॅथॉरिटी’ या नावाने ओळखले जाईल. त्याच्या स्थापनेचा अध्यादेश निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर काढण्यात येणार आहे.
सिडकोच्या झालरपट्ट्याचा आराखडा देखील शासनाकडे मंजुरीसाठी पडून आहे. याकडे डॉ. करीर यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले,‘आचारसंहिता संपल्यावर, २३ फेब्रुवारीनंतर हा विषय देखील मार्गी लागेल. लवकरच हा आराखडा मंजूर करून पाठवला जाणार आहे.’
विकास आराखड्याची अंमलबजावणी फारच कमी प्रमाणात होते. महापालिकेकडे पैसा नसल्यामुळे रस्त्यांचे रुंदीकरण होताना दिसत नाही. भूसंपादनासाठी राज्य शासन महापालिकेला मदत करणार आहे का, या प्रश्नाला उत्तरात त्यांनी सांगितले की, आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे भूसंपादन करताना महापालिकांना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे विकास आराखड्याची अंमलबजावणी होत नाही, ही बाब खरी आहे. त्यामुळेच राज्य शासनाने भूसंपादनाच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. टीडीआर, एफएसआय देणे सोपे व्हावे, यासाठी संपूर्ण प्रक्रियेत सुलभता आणली आहे. स्थानिक प्राधिकरणाला सहकार्य करण्याचीच शासनाची भूमिका आहे.
औरंगाबादच्या सुधारित विकास आराखड्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याबद्दल शासनाच्या भूमिकाविषयी ते म्हणाले, ‘भूमिका मांडण्यासंदर्भात कोर्टाकडून कळविले जाईल तेव्हा याबद्दल विचार करू. यासंदर्भात आयुक्तांशी किंवा अन्य कुणाशी चर्चा करण्याची गरज वाटत नाही. कारण आवश्यक ती माहिती घेतलेली आहे.’

टीडीआरप्रकरणी मागणी केल्यास अधिकारी देऊ
औरंगाबाद महापालिकेत टीडीआर घोटाळ्याची काही प्रकरणे उघड झाली आहेत. या घोटाळ्यांची चौकशी शासनाच्या स्तरावरून केली जाईल का, या प्रश्नाच्या उत्तरात डॉ. नतीन करीर म्हणाले, ‘टीडीआर घोटाळ्याच्या माहिती मिळाली आहे. या प्रकरणांच्या चौकशीसाठी आयुक्तांनी राज्य शासनाकडे अधिकारी मागितला, तर अधिकारी उपलब्ध करून दिला जाईल. महापालिकेला मदत करण्याचीच शासनाची भूमिका आहे.’

महापालिकेला समांतर यंत्रणा
‘एमएमआपडीए’प्रमाणेच औरंगाबादेतील प्राधिकरणाची रचना असेल. प्राधिकरणाच्या प्रमुखपदी आयएएस दर्जाचा स्वतंत्र अधिकारी नियुक्त केला जाईल. पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी या अॅथॉरिटीला शासनातर्फे विशेष निधी दिला जाणार आहे. अॅथॉरिटी ही महापालिकेला समांतर यंत्रणा असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर वसुलीनंतर कर्जाचा घाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भूमिगत गटार योजनेत महापालिकेचा वाटा देण्यासाठी गेल्या सिवरेज टॅक्स वसूल करण्यात आला, मात्र महापालिकेने याच योजनेसाठी आता १५० कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे महापालिकेचा वाटा देण्यासाठी आतापर्यंत कररुपाने १०० कोटी रुपयांवर वसुली केली असताना, त्याच कारणासाठी कर्ज का काढले जात आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
भूमिगत गटार योजनेच्या ३६५ कोटी रुपयांच्या प्रकल्प अहवालाला शासनाने मान्यता दिली. ३६५ कोटी रुपयांपैकी ८० टक्के रक्कम केंद्र सरकार देणार, असे त्यावेळी शासनाने जाहीर केले. उर्वरित २० टक्के रक्कम राज्य शासन व महापालिका यांनी प्रत्येकी १० टक्के हिस्सा देऊन उभी करावी, असे आदेश देण्यात आले. दरम्यानच्या काळात वाढीव ‘डीएसआर’नुसार प्रकल्पाची किंमत ४६५ कोटी रुपये झाली. त्यामुळे महापालिकेचा हिस्सा ८० कोटी रुपये होण्याची शक्यता लक्षात घेऊन सिवरेज टॅक्स आकारण्याचा निर्णय २०११-१२मध्ये घेण्यात आला, पण २०१०पासूनच. या कराची वसूली सुरू केली. करयोग्य मूल्याच्या १५ टक्के सिवरेज टॅक्स वसूल करण्यास स्थायी समितीबरोबरच सर्वसाधारण सभेनेही मान्यता दिली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; २०१०पासून जानेवारी २०१७पर्यंत या कराचा माध्यमातून पालिकेच्या तिजोरीत १०० ते ११० कोटी रुपये जमा झाले. पालिकेला स्वतःच्या वाट्यापोटी ८० कोटी रुपये भरावे लागणार होते. जास्त पैसे जमा झाल्याने कराची वसुली थांबवली पाहिजे. त्याचबरोबर या योजनेसाठी १५० कोटींचे कर्ज काढण्याचा विचार देखील सोडून दिला पाहिजे, असा पालिकेत मतप्रवाह आहे.

‘भूमिगत’साठी डबलगेम
- पालिकेचा हिस्सा भरण्यासाठी सिवरेज टॅक्सची वसुली
- १५० कोटी रुपये कर्ज काढण्याचे प्रयत्न सुरू

भूमिगत गटार योजना अस्तित्वात आली नसताना नागरिकांकडून सिवरेज टॅक्स वसूल करणे, हा एक प्रकारचा अन्यायच आहे. २०१०पासून आतापर्यंत किती कर वसूल झाला हे जाहीर करावे.
- समीर राजूरकर, माजी नगरसेवक.

नागरिकांना दिल्या जाणाऱ्या मालमत्ता कराच्या नोटीसमध्ये जलनिःसारण कर व सिवरेज कर अशा दोन करांचा उल्लेख अाहे. एकाच आशयाच्या कामासाठी दोन कर वसूल केले जात आहेत, ही बाब कायद्याच्या विरोधात आहे.
-रवींद्र देशमुख, सामाजिक कार्यकर्ते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात टक्का वाढला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेसाठी मराठवाड्यात गुरुवारी सरासरी ७० टक्क्यांवर मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत औरंगाबाद जिल्हा वगळता मराठवाड्यात मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ६६.२२ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील ८९९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. वैजापूर तालुक्यातील रघुनाथपूरवाडी आणि सिल्लोड तालुक्यातील जळकी घाट या गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला. मतमोजणी २३ फेब्रुवारीला आहे.
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी गुरुवारी मतदान झाले. औरंगाबाद जिल्ह्यात परिषदेच्या ६२ गटांसाठी आणि १२४ पंचायत समिती गणांसाठी मतदान घेण्यात आले. सकाळी साडेसात वाजता मतदानाला प्रारंभ झाला. सकाळी साडेसात ते साडेनऊ या कालावधीत अत्यंत संथ गतीने मतदान झाले. पहिल्या दोन तासांत केवळ ७.८९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वात कमी वैजापूर तालुक्यात केवळ ५.८६ टक्के मतदान झाले, तर सर्वाधिक ११.६६ टक्के मतदान सिल्लोड तालुक्यात झाले. दुपारच्या सत्रातही मतदानाची कासवगती कायम होती. दुपारनंतर मतदानाला वेग आला. दीडपर्यंत ३४.१९, तर साडेतीनपर्यंत जिल्ह्यात ४८.२३ टक्के मतदान झाले होते. मतदानाची वेळ संपण्याच्या दोन तास आधी मात्र मतदारांनी गर्दी केली.
कार्यकर्त्यांनी मतदान करून घेण्यासाठी नियोजन केले होते. अनेकांनी बाहेरगावी राहत असलेल्या मतदारांना गावात आणून मतदान करवून घेतले. साडेतीनपर्यंत जिल्ह्यात ७ लाख ४४ हजार ३५३ मतदारांनी हक्क बजावला होता. साडेतीनपर्यंत औरंगाबाद तालुक्यात ५३.४८, पैठण ५३.४८, फुलंब्री ५९.९९, सिल्लोड ४४.९९, खुलताबाद ५०.८०, वैजापूर ४८.६२, गंगापूर ४४.१२, कन्नड ५२.१३, तर सोयगाव तालुक्यात ४९.५४ टक्के मतदान झाले होते.

जुनाट ईव्हीएमची डोकेदुखी
केंद्रीय निवडणूक आयोगाने २००६मध्ये वापरलेल्या ईव्हीएम मशीन राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी वापरल्या. जिल्ह्यात २० ठिकाणी ईव्हीएमसंदर्भात तक्रारी आल्या. त्या केंद्रांवर नवीन मशीन देण्यात आले.

दोन गावांचा बहिष्कार
गावातील रस्त्यांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही रस्ते तयार न केल्यामुळे सिल्लोड तालुक्यातील जळकी घाट व वैजापूर तालुक्यातील रघुनाथपूरवाडी येथील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला. जळकी घाट येथे केवळ दोघांनी मतदान केले.

मराठवाड्यातील मतदानाची टक्केवारी
जिल्हा............२०१७...........२०१२
औरंगाबाद.......६६.२२.........६८.१७
जालना...........७४.८०.........७०.२५
नांदेड.............७१.६९.........६७.४६
परभणी..........७४.९७.........७१.३२
हिंगोली..........७२.४९.........७२.२७
बीड...............६८.७३........६६.९०
लातूर.............७०.३१.......६५.२९
उस्मानाबाद....७१.९४.......६३.४७
(२०१७मधील मतदानाची टक्केवारी प्राथमिक आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावाने धरली बियाणे निर्मितीची वाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पारंपरिक पीक पद्धती आणि मर्यादित तंत्रज्ञानावर मात करून भिवधानोरा येथील शेतकऱ्यांना बियाणे निर्मितीची वाट धरली आहे. गहू व सोयाबीन बियाणे विक्री करून शेतकरी नफा मिळवत आहेत. चाकोरीबद्ध शेती व्यवसाय सोडून कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी बिजोत्पादनात लक्षवेधी कामगिरी केली आहे.
भिवधानोरा (ता. गंगापूर) येथे जायकवाडी धरणाच्या पाण्यामुळे खरीप व रब्बी पिके घेतली जातात. पाणी मुबलक असल्याने ऊस लागवडीचे प्रमाण जास्त आहे. सुपीक शेतजमीन आणि मुबलक पाणी असले, तरी पारंपरिक पीक पद्धती, पर्यायी पीक पद्धतीचा अभाव, मर्यादित तंत्रज्ञान आणि शेतमाल विक्रीतील अडचणीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. गंगापूर आणि लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विकून पुरेसा मोबदला मिळत नव्हता. या अडचणींवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी जून २०१०मध्ये ‘कल्पतरू कृषी मंडळ’ स्थापन केले, पण गटाचे नियोजन नसल्यामुळे अपेक्षित यश मिळत नव्हते. २०११-१२मध्ये ‘महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प’ व ‘आत्मा’ (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) विभागाने भिवधानोरा परिसरात सर्वेक्षण केले. पारंपरिक पद्धतीने कापूस व सोयाबीन पीक घेणे आणि एकत्रित निविष्ठा खरेदी एवढेच उपक्रम गट राबवत होता. त्यामुळे महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत गटाच्या बळकटीकरणासाठी प्रशिक्षणे व कार्यशाळा घेण्यात आल्या. बंगळुरू येथील ‘सफल’ मार्केटला भेट देऊन पीक प्रात्यक्षिक राबवण्यात आले. एकूण १६ गटातील २४५ सभासदांना गटाचे महत्त्व सांगून ‘आत्मा’ने २०१२-१३ यावर्षी ८० हेक्टरवर गहू आणि २०० हेक्टरवर सोयाबीन बिजोत्पादनाचे पीक घेतले. बिजोत्पादन तंत्रत्रानाची माहिती सांगून स्वच्छता व चाळणी यंत्र दिले. उत्पादन प्रतिएकर सहावरून नऊ क्विंटल झाले. शेतकरी गटांनी तब्बल १८०० क्विंटल उत्पादन घेतले. राज्यात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा असताना भिवधानोरा गावात मुबलक बियाणे होते. आर्द्रता मापकामुळे योग्य आर्द्रता ठेवून बियाणे साठवण्यात आले. परिणामी, बियाण्याला योग्य बाजारभाव मिळाला आणि परिसरात खासगी कंपनीची बियाणे विक्री घसरली. खासगी कंपनी व शेतकरी कंपनीने संयुक्त ‘समृद्धी केंद्र’ उभारून माती व पाणी परीक्षण, कृषी सल्ला तसेच योग्य दरात बियाणे, खते, औषधी, किटकनाशके शेतकऱ्यांना उपलब्ध केली आहेत. केंद्रातून ट्रॅक्टर व अद्ययावत कृषी अवजारे देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

कोट्यवधींची उलाढाल
२०१० ते २०१५ या पाच वर्षांत साडेपाच कोटी रुपयांची बियाणे विक्री करण्यात आली. सोयाबीन क्षेत्रात ४०० हेक्टरपर्यंत वाढ झाली असून, शेतकरी कंपनीचा ऑगस्ट २०१५पर्यंत निव्वळ नफा दीड कोटी रुपये होता. शेतमाल वाळवणे, स्वच्छता, प्रतवारी व पॅकेजिंग करीत असल्याने शेतकऱ्यांना अधिक नफा मिळत आहे.

भिवधानोरा येथील शेतकरी गटाला प्रोसेसिंग मशीन, आर्द्रता मापक दिले आहे. लागवड प्रक्रियेत आता ‘आत्मा’चा फारसा सहभाग नसला तरी मार्केटिंगसाठी मार्गदर्शन करीत आहोत. शेतकरी बियाणे निर्मितीसाठी सतत प्रयत्नशील असतात.
- सतीश शिरडकर, उपसंचालक, ‘आत्मा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार सावे यांच्या कार्यालयावर हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल सावे यांच्या सिडको परिसरातील संपर्क कार्यालयावर गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास सात ते आठ जणांनी हल्ला केला. विद्यापीठात तोडफोड करणाऱ्यांची आमदार सावे हे पाठराखण करत आहे, असा आरोप करत पँथर सेनेच्या कार्यकर्त्यांनीच सावे यांच्या निषेधार्थ हे आंदोलन केल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, पाच हल्लेखोरांना सिडको पोलिसांनी अटक केली, अशी माहिती पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी दिली. हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी सावे यांनी केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पंडित दीनदयाल उपाध्यात यांच्या स्मृतिदिनी आयोजित व्याख्यानाचा कार्यक्रम उधळण्यात आला होता. याप्रकरणी कारवाईची मागणी आमदार सावे यांनी कुलगुरूंकडे केली होती. या पार्श्वभूमीवर आमदार सावे यांचे खडकेश्वर येथील संपर्क कार्यालयावर काही युवक हल्ला करणार आहेत, अशी माहिती पोलिसांना दुपारी दोनच्या सुमारास मिळाली. पोलिसांनी तेथे तातडीने धाव घेतली. त्यांच्या कार्यालयासमोर बंदोबस्त तैनात करण्यात आला होतो. हल्ला टळल्याचे वाटत असतानाच दुपारी तीनच्या सुमारास आमदार सावे यांच्या सिडको बजरंग चौक परिसरातील संपर्क कार्यालयावर सात ते आठ युवकांनी घोषणाबाजी करत दगडफेक केली. त्यात खिडक्याच्या काचा फुटल्या. त्यावेळी कार्यालयात कुणीही नव्हते. कार्यालय आवारातील पोस्टर फाडून हल्लेखोर पसार झाले.
याप्रकरणी सायंकाळी पँथर सेनेचे दीपक केदार, सचिन तिवारी, राहुल घेवंदे, किरण तुपे, विशाल नवगिरे यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सिडको पोलिस स्टेशनचे निरीक्षक कैलास प्रजापती यांनी दिली.

कडक कारवाई करावी ः सावे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यान उधळणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कुलगरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे केली केलेली आहे. डॉ. अशोक मोडक यांचे व्याख्यानविषयी कोणाला आक्षेप होता, तर त्यांनी कुलगुरुकडे जायला हवे होते. कार्यक्रम उधळणे योग्य नाही. संपर्क कार्यालयावर भ्याड हल्ला करणाऱ्यावरही कडक कारवाई झाली पाहिजे, असे आमदार सावे यांनी नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हाळ्यात रोपे जगवण्याचे आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जुलै महिन्यात व्यापक वृक्ष लागवड मोहीम राबवून दोन कोटी झाडे लावण्यात आली. या लागवडीतील ९० टक्के झाडे जिवंत असल्याचे ऑक्टोबर महिन्यातील पाहणीत दिसले. मे महिन्यात दुसऱ्यांदा रोपांची पाहणी केल्यानंतर जिवंत रोपांची संख्या कळणार आहे, मात्र प्रतिकूल वातावरण, चराई, रोगराई आणि पाणी टंचाई या कारणांमुळे टक्केवारीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.
दरवर्षी वन विभाग पावसाळ्यात वृक्ष लागवड मोहीम राबवत असते. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात यंदा जवळपास १५ लाख रोपांची लागवड करण्यात आली. दुष्काळात पाणी टंचाई असल्यामुळे मुबलक प्रमाणात रोपे उपलब्ध नव्हती, पण जिल्ह्यातील वेगवेगळ्या रोपवाटिकांच्या माध्यमातून रोपे उपलब्ध करण्यात आली. शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने वन विभागाने व्यापक प्रमाणात रोपांची लागवड केली. विशेष म्हणजे सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे रोपे बळकट झाली आहेत. डोंगर उतारावर रोपांची उगवण चांगली असून, यंदा वनक्षेत्रात भर पडणार आहे. लागवडीतील एकूण रोपांपैकी जिवंत असलेल्या रोपांची पाहणी वन विभाग वर्षातून दोन वेळेस करीत असतो. या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पहिल्या पाहणीत जिवंत रोपांची टक्केवारी ९० टक्के आहे. येत्या मे महिन्यात दुसऱ्यांदा पाहणी करून यावर्षीच्या लागवडीचे प्रमाण निश्चित केले जाईल. उन्हाळ्यात रोपे जळण्याचे प्रमाण जास्त असते. नैसर्गिक वातावरण अनुकूल असल्यास रोपे तग धरतात. रूक्ष वातावरणात तग धरणाऱ्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. प्रत्येक रोपाला पाणी घालणे शक्य नसते. पावसाळ्यात चांगली वाढलेली रोपे उन्हाळ्यातसुद्धा टिकतात. यंदा झाडांची टक्केवारी समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. मागील चार वर्षे जेमतेम ३० टक्के रोपे जिवंत असल्याचे आढळले होते. या प्रमाणात उपलब्ध पाण्यामुळे वाढ होऊ शकते. मराठवाड्यात अवघे चार टक्के वनक्षेत्र असून, नैसर्गिक समतोल साधताना किमान ३३ टक्के वनक्षेत्र आवश्यक असते.

चराईचे संकट
वनक्षेत्रात चराई बंदी असूनही अनेक ठिकाणी स्थानिक रहिवासी गुरे-ढोरे वनक्षेत्रात सोडतात. जनावरांमुळे रोपांचे मोठे नुकसान होते. रोपांवर रोग पडल्यानंतर रोपे कोमेजून नष्ट होतात. तसेच वणवा आणि प्रतिकूल हवामान असल्यास रोपांचे जळण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. नीलगायीसारखे वन्यजीव झाडांचे काही प्रमाणात नुकसान करतात. पण, वन्यजीवांना अधिवासात मुक्त संचार असल्याने रोखणे शक्य नसते. या कारणांमुळेसुद्धा वनक्षेत्र वाढण्यास मर्यादा आल्या आहेत.

आव्हान लागवडीचे
- मराठवाड्याचे वनक्षेत्र ः ४ टक्के
- राज्यातील लागवड उद्दिष्ट ः ३ कोटी
- औरंगाबाद जिल्ह्यात लागवड ः १६ लाख
- जिवंत रोपांचे प्रमाण ः ९० टक्के

यावर्षी लक्षणीय वृक्ष लागवड झाली असून जास्तीत जास्त रोपे वाचवण्यावर भर आहे. पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी रोपांना पाणी देण्यात येईल, मात्र पाणी टंचाईशिवाय इतर कारणांनी रोपे नष्ट होतात. रोपांची स्थिती सध्या चांगली आहे.
- ए. पी. गिऱ्हेपुजे, उप वनसंरक्षक, वन विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॅल्यू डी, ‘देवगिरी’त करार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अॅमेझॉन, मायक्रोसॉफट, एटी अँड टी, आयबीएम यासारख्या अनेक नामांकित कंपन्यांना उच्च तंत्रज्ञान संबंधित सेवा पुरविणाऱ्या व्हॅल्यू ‌डी कंपनीत काम करण्याची संधी देवगिरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उपलब्‍ध होणार आहे. देवगिरी अभियांत्रिकी आणि व्हॅल्यू डी यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला आहे. कंपनीच्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यंना औरंगाबादेत बसून नामांकित कंपन्यांसाठी काम करता येणार आहे.
देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग मॅनेजमेंट स्टडिज आणि अमेरिकेतील नामांकित व्हॅल्यू डी कंपनी यांच्यात गुरुवारी शैक्षणिक सामांजस्य करार करण्यात आला. देवगिरी अभियांत्रिकीचे संचालक डॉ. उल्हास शिऊरकर आणि कंपनीचे अध्यक्ष गोपीचंद लटपटे यांनी करारावर सह्या केल्या. या कराराबाबत डॉ. शिऊरकर यांनी सांगितले की, व्हॅल्यू डी कंपनीच्या गरजेनुसार त्यांच्या तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम महाविद्यालयाला देण्यात आले आहे. १२० तासांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमात ६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कंपनीने यातील ४५ विद्यार्थ्यांची निवड अभ्यासक्रमासाठी केली आहे. या विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन त्यांना कंपनीत सामावून घेण्यात येणार आहे. त्यांना सुरुवातीला तीन लाखांपर्यंत पॅकेज सुरवातीला दिले जाणार अाहे.
व्हॅल्यू डीचे अध्यक्ष लटपटे यांनी सांगितले की, उत्तर नॉ‌र्थ अमेरिकेत सर्वात वेगात विकसित होणारी कंपनी असा व्हॅल्यू डीचा लौकिक आहे. कंपनीने विस्तारासाठी औरंगाबाद शहराची निवड केली आहे. औरंगाबादेतून देशातील मोठ्या कंपन्या; तसेच अमेरिकेसह जगभरातील प्रसिद्ध कंपन्याचे काम केले जाणार अाहे.
यावेळी कंपनीचे उपाध्यक्ष रवींद्र वायबसे, कम्प्युटर सायन्स विभागाचे प्रमुख डॉ. संजय कल्याणकर यांच्यासह अन्य मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

व्हॅल्यू डीने डीएमआयसीत घेतली जागा
दिल्ली मुंबई इंड्रस्टीयल कॅरिडोरमध्ये (डीएमआयसी) सॉफ्टवेअर पार्क उभारण्यासाठी ३.२ एकर जागा व्हॅल्यू डी कंपनीने घेतली आहे. आगामी दोन ते तीन वर्षांत या ठिकाणी एक हजार ते बाराशे कर्मचाऱ्यांकडून देश आणि विदेशातील कंपन्याचे कामे केली जाणार असल्याची माहितीही कंपनीचे उपाध्यक्ष वायबसे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रम्प यांच्या घोषणेचा भारतीयांनाच लाभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ट्रम्प यांच्या घोषणेमुळे सध्या अमेरिकेतील स्‍थायिक भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ट्रम्प यांच्या घोषणेविरोधात आयटीसह अन्य कंपन्यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. सध्या भीतीचे वातावरण दिसत असले, तरी भविष्यात त्याचा भारतीयांनाच सर्वाधिक फायदा होणार असल्याचे मत व्हॅल्यू डी कंपनीचे संचालक गोपीचंद लटपटे यांनी व्यक्त केले.
व्हॅल्यू डी या कंपनीने देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयासोबत सांमजस्य करार केल. त्यावेळी लटपटे यांनी सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत ‘अमेरिका फर्स्ट’ची घोषणा दिली होती. त्यांनी निवडणुकीत रोजगाराबाबत अनेक घोषणाही केल्या आहेत. त्यांच्या अंमलबजावणीमुळे तेथील भारतीयांच्या मनात भीती आहे. सध्याहे संकट वाटत असले तरी अमेरिकेत तेथे उत्पादित मालाची विक्री फार कमी आहे. तेथे विकण्यात येणारे सर्व वस्तू या बाहेरच्या देशातून आयात करतात. अमेरिकेत मालाच्या उत्पादनासाठी खूप जास्त खर्च करावा लागतो.
साफ्टवेअर क्षेत्रात तेथील कंपनीन्यां मागणी जास्त आहे. ती पीर्ण करण्यासाठी त्यांना आउटसोर्सिंग करावे लागते. सॉफ्टवेअरसह अन्य क्षेत्रांची गरज विचारात घेता भारतात या कंपन्या स्‍थापन करून अमेरिकेची मागणी पूर्ण करून देता येणार आहे. यामुळे ट्रम्प यांचा निर्णयामुळे नुकसान दिसत असेल, तरी त्याची अमलबजावणी सध्या तरी कठीण वाटते. निर्णयाची अमलबजावणी केली, तर भारतीयांना विकासाची मोठी संधी साधता येणार असल्याचे मत लटपटे यांनी व्यक्त केले.

‘अच्छे दिन’सारख्याचया घोषणा
भारतात निवडणुकीत ‘अच्छे दिन’ची घोषणा करण्यात आली होती. ट्रम्प यांनीही अशाच प्रकारच्या घोषणा केलेल्या आहेत. निवडणुकीत केलेल्या घोषणांची अमलबजावणी किती होईल, याबाबत शंका आहे, असे मत लटपटे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालमत्ता कर वाढवू नका

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘मालमत्ता कर वाढवू नका,’ अशी मागणी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्याकडे केली.
महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर वाढीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत ठेवला होता. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी आमदार नामदेव पवार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बकोरिया यांची भेट घेतली व निवेदन सादर केले. यावेळी पालिकेतील काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप देखील उपस्थित होते. बकोरिया यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘सध्या जो मालमत्ता कर आकारला जात आहे तोच जास्त आहे. कराच्या तुलनेत नागरिकांना सुविधा दिल्या
जात नाहीत. त्यामुळे मालमत्ता कर वाढवू नये.’

...अन्यथा आंदोलन
‘मुंबईत पाचशे चौरस फुटाच्या मालमत्तेला कर आकारणी करण्यात येऊ नये, असा विचार केला जात आहे. औरंगाबादेत मात्र कर वाढीचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या प्रस्तावाला शहर जिल्हा काँग्रेसचा विरोध असून कर आकारणी केल्यास आंदोलन केले जाईल,’ असा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दाते पाटील यांनी गुरुवारीच स्थायी समितीचे सभापती व सदस्यांना निवेदन देवून कर वाढीस विरोध दर्शवला. प्रशासनाने ठेवलेला कर वाढीचा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार सावे कार्यालय हल्ला; पाच जणांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल सावे यांच्या सिडको परिसरातील संपर्क कार्यालयावर गुरुवारी हल्ला करणाऱ्या पाच आरोपींना शनिवारपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी. अत्तार यांनी दिले.
विद्यापीठात तोडफोड करणाऱ्यांची आमदार सावे हे पाठराखण करत आहे, असा आरोप करत पँथर सेनेच्या कार्यकर्त्यांनीच सावे यांच्या निषेधार्थ हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. सिडको पोलिसांनी पँथर सेनेचे दीपक केदार, सचिन तिवारी, राहुल घेवंदे, किरण तुपे, विशाल नवगिरे यांना गुरुवारी अटक केली. शुक्रवारी दुपारी या आरोपींना कोर्टात उभे करण्यात आले. आरोपींचा उद्देश काय होता याची विचारपूस करणे, आणखी काही साथीदार आहे काय ? याचा शोध घेण्यासाठी पोलिस कोठडीची विनंती सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी केली. कोर्टाने ती मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढीवरून नगरसेवक आक्रमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मालमत्ता करात वाढीच्या प्रस्तावाला स्थायी समितीत सर्वच सदस्यांनी विरोध केला. कराची थकबाकी भरपूर आहे, वसुलीकडे विशेष लक्ष दिले जात नाही. असे असताना करवाढीचा प्रस्ताव कसा काय मांडला, असा सवाल करून हा प्रस्ताव असलेली विषयपत्रिका नगरसेवकांनी फाडून टाकली. सभापतींनी देखील सदस्यांच्या विरोधाचे समर्थन केले व हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठवण्याचा निर्णय जाहीर केला. वॉर्डनिहाय कर आकारणी व वसुलीसाठी नियोजन करा, असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.
मालमत्ता करात वाढ करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाने मांडला. मालमत्ता करात २० ते २५ टक्के वाढ सुचविण्यात आली होती. त्यावर चर्चा करताना स्थायी समितीच्या सदस्यांनी प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले. मालमत्ता कर वसुलीचे यावर्षीचे टार्गेट किती, आतापर्यंत किती कर वसूल झाला, महापालिकेच्या रेकॉर्डवर किती मालमत्ता आहेत, किती मालमत्तांना कर लागलेला नाही, कर आकारणीच्या टेंडरचे काय झाले आदी प्रश्नांचा भडीमार सर्वपक्षीय सदस्यांनी केला. राजगौरव वानखेडे, विकास एडके, कमलाकर जगताप, कीर्ती शिंदे, कैलास गायकवाड, गजानन मनगटे यांनी या प्रशासनाला कोंडीत पकडले.
जास्तीत जास्त करवसुली व्हावी, यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे, पण मनुष्यबळाचा प्रश्न आहे. उपलब्ध मनुष्यबळात काम करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे सांगत करमूल्य निर्धारक व संकलक रवींद्र निकम यांनी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण त्यामुळे सदस्यांचे समाधान झाले नाही. भाजपचे नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी कर वाढीच्या प्रस्तावाचा निषेध करीत विषयपत्रिकाच फाडली. या प्रस्तावावर सर्वसाधारण सभेने निर्णय घ्यावा, स्थायी समितीने निर्णय घेऊ नये, अशी भूमिका सर्वच सदस्यांनी मांडली. सभापती मोहन मेघावाले यांनी देखील त्याला पाठिंबा दिला.
करवाढीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे वर्ग करण्यात येत आहे, असे ते म्हणाले. प्रशासनाने मालमत्ता करवसुलीवर विशेष लक्ष द्यावे, असे आदेश त्यांनी दिले. प्रत्येक वॉर्डात कर आकारणी व वसुलीचे आठ-आठ दिवसांचे शिबिर घ्या, त्यातून मोठा कर जमा होण्यास मदत होईल, असे त्यांनी प्रशासनाला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादसाठी आता पाच व्यवस्था

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शहराच्या नियोजनासाठी महापालिका, सिडको, एमआयडीसी, महानगर नियोजन समिती ही चार प्राधिकरणे कार्यरत असताना आता ‘औरंगाबाद मेट्रोपॉलिटन सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ ही पाचवी व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. सरकारने या प्राधिकरणाला पुरेसा निधी दिला, तरच त्याचा स्थापनेचा शहरासाठी उपयोग होईल. अन्यथा ही व्यवस्थाही शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यात अपयशी ठरेल.
औरंगाबाद मेट्रोपॉलिटन सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्याच्या स्थापनेचा अध्यादेश लवकरच निघेल, अशी माहिती राज्याच्या नगरविकास खात्याचे प्रधानसचिव डॉ. नितीन करीर यांनी दिली आहे. हे कॉर्पोरेशन ‘एमएमआरडीए’सारखेच काम करणार असल्यामुळे औरंगाबादसाठीचे ते विकास प्राधिकरण असेल, असे मानले जात आहे.
सध्या औरंगाबादसाठी महापालिकेसह, सिडको, एमआयडीसी, महानगर नियोजन समिती आदी नियोजन प्राधिकरणे कार्यरत आहेत. महापालिकेचा संबंध शहरातील पायाभूत सुविधांशी आहे. सिडको व म्हाडा यांची गृहनिर्माण क्षेत्रात कामे काही प्रमाणात सुरू आहेत. जागांच्या उपलब्धतेमुळे या दोन्ही संस्थांच्या कामांना ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून डीएमआयसीचे काम येत्या काळात गती घेणार आहे. या चार प्राधिकरणांपैकी महापालिका सर्वच बाबतीत पिछाडीवर आहे. शासनाचा निधी पुरेशाप्रमाणात मिळत नसल्यामुळे महापालिकेतर्फे विकास कामांची गती संथ झाली आहे. कर वसुलीचे प्रमाणही कमी असल्यामुळे विकास कामांमध्ये महापालिकेला स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवता आलेले नाही. औरंगाबाद मेट्रोपॉलिटन सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या नावाने राज्य शासनाने नवीन प्राधिकरण सुरू केले, तर त्याच्या कामासाठी मोठ्या निधीची गरज पडणार आहे. तुटपुंज्या निधीच्या बळावर प्राधिकरणाची स्थापना झाली, तर कोणतीच कामे मार्गी लागणार नाहीत, असे मानले जात आहे. निधी आणि अधिकारासह या प्राधिकरणाचे काम सुरू झाल्यास विकास कामांना गती मिळेल असे जाणकारांचे मत आहे.

‘शेद्रा-बिडकीन’साठी ‘ऑरिक’
दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडोर (डीएमआयसी) प्रकल्पात औरंगाबादचा समावेश आहे. या प्रकल्पात तब्बल ८४ चौरक किलोमीटर क्षेत्रात शेंद्रा-बिडकीन गुंतवणूक क्षेत्र विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी ‘औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी’ची (ऑरिक) स्थानपा करण्यात आली आहे. शेंद्रा ते बिडकीन या शहराच्या पूर्वेपासून दक्षिणेपर्यंत असलेल्या क्षेत्रात विकास प्राधिकरण म्हणून ‘ऑरिक’ची भूमिका महत्त्वाची असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिर्डी संस्थानवर आयएएस नेमा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
भारतात सर्वात श्रीमंत असलेल्या यादीत पहिल्या पाचमध्ये असलेल्या शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानवर सीईओ म्हणून आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती १५ मार्चपूर्वी करण्यात यावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्या. जे. एस. केहर, न्यायमूर्ती एन. व्ही. रामन्ना, न्या. धनंजय चंद्रचूड व न्यायमूर्ती संजय कौल यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र शासनाला दिले आहेत. राज्य शासनाची विशेष याचिका फेटाळून लावली.
शिर्डीतील नागरिक राजेंद्र गोंदकर व संदीप कुलकर्णी यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठत श्री शिर्डी साईबाबा संस्थानमध्ये गैरव्यवहार होत आहे. या संस्थानवर सीईओ म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (आयएएस) यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी जनहित याचिका दाखल केली होती. औरंगाबाद खंडपीठाचे तत्कालीन न्या. के. यू. चांदिवाल व न्या. व्ही. एम. देशपांडे यांनी २ मे २०१४ रोजी याचिकेतील विनंती मान्य करत आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक करावी, असा आदेश दिला होता.
या आदेशाला राज्य शासनाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. संस्थानचे शताब्दी वर्षे सुरू होत आहे. त्यामुळे सुनावणी लवकर घेण्यात आली. शताब्दी वर्षासाठी अर्थसंकल्पात ३००० कोटींची तरतूद करावी, असा राज्य सरकारकडे प्रस्ताव न्याय व विधी मंत्रालयाने दाखल करण्यात आला आहे.
याचिकेवर सुप्रीम कोर्टात शुक्रवारी सुनावणी झाली. शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या व्यवस्थापनातील गैरव्यवहाराच्या अनेक बाबी याचिकाकर्त्यांच्या वकील प्रज्ञा तळेकर यांनी निदर्शनास आणून दिल्या. शिर्डी परिसरात बांधण्यात आलेली भक्त निवासे, हॉस्पिटल, उद्यान व इतर सुविधांकरिता कार्यक्षम व अनुभवी आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे कसे गरजेचे आहे, असा युक्तीवाद तळेकर यांनी केला.

... तर कोर्टाचा अवमान
महाराष्ट्र शासनाच्या सेवेत भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने संस्थानच्या मुख्य कार्यकारीपदी आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक करणे अशक्य असल्याचा युक्तिवाद महाराष्ट्राचे वकील निशांत कात्तनेश्वरकर यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राची विशेष याचिका फेटाळून लावला. १५ मार्च २०१७पूर्वी आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती न केल्यास कोर्टाचा अवमान होईल, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.

शिर्डी संस्थानचे उत्पन्न
- शिर्डी संस्थानला २०१५मध्ये मिळालेला महसूल ः ३९३ कोटी ७२ लाख
- शिर्डी संस्थानला २०१६मध्ये मिळालेला महसूल ः ४०३ कोटी ७५ लाख
- २०१६मध्ये दान म्हणून आलेला महसूल ः २५८ कोटी ४२ लाख
- दानात मिळाले २८ किलो सोने ः ६ कोटी ७४ लाख
- दानात मिळाली ३८३ किलो चांदी ः १ कोटी १० लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोघा भोंदूबाबांना बेड्या

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दागिने दुप्पट करून देतो म्हणून ज्येष्ठ महिलेला गंडा घालून पोबारा करणाऱ्या दोघा भोंदूबाबांना जामनेर येथून बारा तासांच्या आत जेरबंद करत पोलिसांनी शुक्रवारी बेड्या ठोकल्या. साईनाथ गंगाराम जगताप (रा. जामनेर) व प्रेमनाथ तात्या चव्हाण (रा. अंबड) अशी या ठगांची नावे आहेत.
पाणचक्की परिसरातील प्रबुद्धनगर येथे गुरुवारी सीमा संदीप आडसूळ यांच्या घरात, त्यांच्या नातेवाईक असणाऱ्या जेष्ठ नागरिक महिला एकट्याच होत्या. यावेळी भगवे कपडे घातलेले दोन तरुण आले. आपण भिक्षुक असून घरातील धनाची पूजा करून ते दुप्पट करून देतो, अशी थाप त्यांनी मारली. त्या जेष्ठ महिलेला हा प्रकार खरा वाटल्याने त्यांनी त्यांची पोत तसेच दोन हजारांची नोट त्यांच्याकडे पूजेसाठी दिली. पूजा केल्याचे नाटक करीत हा ऐवज त्यांनी एका पुडीत गुंडाळून महिलेच्या हातात दिला. थोड्या वेळाने पुडी उघडण्यास सांगितले. मात्र, महिलेने तत्काळ पुडी उघडली असता आतमध्ये ऐवज नसल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरडा केला. मात्र, तोपर्यंत या भामट्यांनी पलायन केले. सीमा आडसूळ यांच्या तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखेच्या पथकाने फुलंब्री येथील या मंडळीचा तळ गाठला. यावेळी औरंगाबादला अजून दोघे गेले होते मात्र, ते जामनेरला निघून गेल्याची माहि‌ती मिळाली. पोलिसांनी जामनेर गाठून संशयित आरोपी साईनाथ गंगाराम जगताप व प्रेमनाथ तात्या चव्हाण यांना अटक केली. त्यांच्या सामानाच्या झडतीमध्ये जेष्ठ महिलेची लंपास केलेली सोन्याची पोत आढळली. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त संदिप आटोळे, एसीपी रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विजय जाधव, सहायक फौजदार नंदकुमार भंडारे, नसीमखान, शिवाजी झिने, फारुख देशमुख, विजयानंद गवळी, विलास वाघ, अफसर शहा, प्रमोद देवकाते, ओमप्रकाश बनकर, विकास माताडे, आनंद वाहूळ, रितेश जाधव, शेख बाबर व राम तांदळे यांनी केली.

कर्मचाऱ्याची समयसूचकता
गुन्हेशाखेलाही या घटनेची माहि‌ती मिळाली होती. शाखेचे शिवा बोर्डे हे कर्मचारी पोलिस कॉलनीत राहतात. बोर्डे यांना त्यांच्या घराजवळ भगवे कपडे घातलेली एक व्यक्ती आढळून आली. त्यांनी त्यांच्याशी गप्पा मारीत असे किती लोक शहरात आले आहेत याची माहिती घेतली. यावेळी या बाबाने आपली काही मंडळी फुलंब्रीजवळ असल्याचे सांगितले. बोर्डे यांनी वरिष्ठांना या गोष्टीची माहिती दिली. या माहितीवरून पोलिसांना आरोपींचा सुगावा लागला. फुलंब्रीतून आरोपी साईनाथच्या वडिलांना सोबत घेत त्यांनी जामनेर गाठले. या ठिकाणी दोन्ही आरोपी घरी मनसोक्त मद्यप्राशन करून झोपले होते. झोपेतच या दोघांना उचलण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजिंठा पेस्ट कंट्रोल कर्मचाऱ्यास कोठडी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी सुशांत सुरेश देशपांडे (रा. गुलमोहर कॉलनी) यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. जी. एम. शेख यांनी १८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना नामदेव राणे (रा. श्रीनगर, औरंगाबाद) यांनी सिटीचौक ठाण्यात आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांच्या आदेशावरून मे. अजिंठा पेस्ट कंट्रोलचे संचालक योगिता ठोंबरे यांनी महापालिकेची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती.
आरोपींनी फेब्रुवारी १५ ते जून १५ या कालावधीत बनावट स्वाक्षरी करुन महापालिकेची ६ लाख ८१ हजार ६०० रुपयांची फसवणूक केली आहे. या तक्रारीवरुन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी सुशांत देशपांडेला हजर केले असता त्यास फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश होते. कोठडी संपल्याने शुक्रवारी हजर केले. कोर्टाने शनिवारपर्यंत कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भुकेने माय-लेकराची केली ताटातूट

$
0
0


औरंगाबाद ः आजारपणामुळे आई घाटीत दाखल. नऊ वर्षांच्या मुलाच्या पोटात भुकेने आगडोंब उसळल्याने तो आईच्याच सांगण्यावरून कोणी अन्नदाता आला आहे का, हे पाहण्यासाठी बाहेर पडला. मुलगा आला नाही म्हणून आईही त्याला शोधायला बाहेर पडली आणि माय-लेकरांची ताटातूट झाली. शुक्रवारी दुपारी ही ह्रदयद्रावक घटना घडली.
गणेश तात्या चव्हाण हा मूळचा अंबडचा असून, सध्या आईवडिलांसोबत महावीर चौक परिसरात राहतो. गणेशची आई घाटीत दाखल आहे. शुक्रवारी सकाळी गणेश भुकेने व्याकूळ झाला. यावेळी आईने त्याला येथे अन्नदान करणारे अनेकजण येतात, बाहेर जाऊन काहीतरी खाऊन ये, असे सांगितले. अन्नाच्या शोधात गणेश बाहेर पडला. दीड तास उलटला तरी गणेश परतला नसल्याने आजारी ‌आई चिंतीत झाली. तशा अवस्थेत ती गणेशच्या शोधासाठी बाहेर पडली. त्याचा शोध घेत ती थेट छावणी पोलिस ठाण्यात गेली. दरम्यान, सैरभैर अवस्थेत फिरत असलेला गणेश दामिनी पथकाच्या नजरेस पडला. पीएसआय अरुणा घुले, स्वाती बनसोडे, पूनम झाल्टे, कोमल निकाळजे व संगीता रोठे यांनी त्याला एसीपी रामेश्वर थोरात यांच्याकडे आणले. थोरात यांनी त्याची विचारपूस करीत त्याच्या आई-वडिलांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. दामिनी पथकाने त्याच्या आईचा घाटी परिसरात शोध घेतला. सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, आईचा शोध लागला नाही. दरम्यान त्याची आई दाखल असलेल्या वॉर्डात दामिनी पथकाने चौकशी केली. यावेळी शेजारील रुग्णाकडे गणेशच्या वडिलांचा मोबाइल क्रमांक मिळाला. त्यावरून आई-वडील आणि मुलाचे मिलन झाले.
चार तासांचा विरह
पोलिसांनी वडिलांचा नंबर मिळवून त्यांना फोन केला असता ते छावणी ‌परिसरात असल्याची माहिती मिळाली. छावणी पोलिस ठाण्यात गणेशच्या आई-वडिलांची भेट घेऊन गणेशला त्यांच्या स्वाधीन केले. चार तासांपूर्वी झालेल्या ताटातुटीचे दामिनी पथकाच्या प्रयत्नाने मिलन झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​प्राधिकरणातून विकास

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘एमएमआरडीए’प्रमाणे शहरासाठी ‘औरंगाबाद रिजन मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अॅथॉरिटी’ स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे शहरातील आमदारांनी स्वागत केले आहे. शहर विकासासाठी हा निर्णय योग्य असून, यात कुणाची ढवळाढवळ होऊ नये, अशी मागणीही त्यांनी शुक्रवारी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली.
औरंगाबादसाठी प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांनी रिजनल डेव्हलपमेंट प्लानसंदर्भात बैठक घेण्यासाठी शहरात आले ‘मटा’ला दिली होती. जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांची आचारसंहिता संपल्यावर यासंदर्भातील अध्यादेश काढला जाणार आहे.

पर्यटन उद्योगाला चालना
औद्योगिक, शैक्षणिक व पर्यटनदृष्ट्या औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर आहे. ते झपाट्याने वाढत आहे. नवीन वसाहती निर्माण होत आहेत. त्यामुळे महापालिका व क्षेत्रालगत परिसराचा संपूर्ण विकास हा महत्त्वाचा विषय आहे. अशा परिस्थितीत ‘एमएमआरडीए’प्रमाणे ‘औरंगाबाद रिजन मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अॅथॉरिटी’च्या माध्यमातून निश्चितच विकासकामांना अधिक गती मिळेल. सुनियोजित विकास होईल. त्यातून पर्यटन उद्योगाला अधिक चालना मिळेल. औद्योगिक क्षेत्रालाही त्यांचा लाभ होऊन रोजगारांच्या नवीन संधी प्राप्त होण्यास मदत होईल. - अतुल सावे, आमदार भाजप

..फक्त नावापुरते नको
शहराच्या विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची आवश्यकता आहे. मात्र, प्राधिकरणाचे अस्तित्व त्याच्या कामातून दिसून आले पाहिजे. आता हेच पाहा नियोजन प्राधिकरणाच्या दोन वर्षांपूर्वी निवडणुका झाल्या. मात्र, या काळात एकही बैठक झाली नाही. मग याचा उपयोग काय? प्राधिकरणाची घोषणा करून फायदा नाही. तसे कामही झाले पाहिजे. सध्या प्राधिकरण कुठे आहे? त्याचे आस्तित्त्वच दिसून येत नाही. शहराच्या विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची गरज आहेच. मात्र, ते फक्त नावापुरते असता कामा नये. - संजय शिरसाट, आमदार, शिवसेना

इतरांची ढवळाढवळ नको
‘एमएमआरडीए’ प्रमाणे ‘औरंगाबाद रिजन मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अॅथॉरिटी’ स्थापन करावा, अशी मागणी मीच विधानसभेत केली होती. असे प्राधिकरण स्थापन होणार असेल, तर आमची मागणी सरकारने पूर्ण केली आहे, असेच म्हणावे लागेल. यामुळे शहराचा विकास होईल. निवडणुकांची आचारसंहिता संपल्यावर यासंदर्भातील अध्यादेश निघेल यात काही शंका नाही. ‘एमएमआरडीए’च्या धर्तीवर हे प्राधिकरण असेल. संबंधित विभागाचे नाव प्राधिकरणाला दिले जाते. यासाठी खास आयएएस अधिकारीच नेमला जावा. इतर कोणीही यात ढवळाढवळ करू नये. - इम्तियाज जलिल, आमदार, एमआयएम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सजग नागरिकांमुळे ४०० झाडे वाचली

$
0
0


औरंगाबाद : सजग नागरिकांच्या प्रयत्नामुळे पारिजातनगर येथील महापालिका मैदानात शनिवारी भरणाऱ्या बाजारला स्थगिती देण्याचे आदेश विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी शुक्रवारी दिले. आता हा बाजार दुसऱ्या ठिकाणी भरणार आहे. या निर्णयामुळे पारिजातनगरच्या मैदानातील ४०० झाडे वाचली आहेत.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजार अभियान राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत ऑगस्ट २०१६ पासून शहरात आठवडी बाजार सुरू करण्याचे नियोजन होते. तब्बल सात महिन्यांनंतर नवीन आठवडी बाजार थाटण्यास मुहूर्त मिळाला होता. शनिवारी, १८ फेब्रुवारी रोजी सिडको एन ४ येथील मनपाच्या मैदानावर पहिला महिला शेतकरी आठवडी बाजार भरणार होता. वुई फॉर इन्व्हार्मेंट आणि पारिजातनगरातील स्थानिक रहिवासी भाऊसाहेब पवार, उद्धव दौड, शंकर सानप, भगवान कुदळे ,शंकर हळकुडे यांनी एकत्रित येऊन गेल्या दोन वर्षांत ४०० झाडे लावली व जगविली. त्याचे संगोपन चालू आहे. आठवडी बाजार शनिवारी याच मैदानावर सुरू होणार याची माहिती मिळताच पर्यावरण संस्थेच्या सदस्य मेघना बडजाते व स्थानिक रहिवाशी यांनी विभागीय आयुक्त भापकर यांची भेट घेतली. बाजार भरविला गेला, तर ४०० झाडांना इजा होऊ शकते. त्यामुळे या जागेवर बाजार भरवू नका, अशी विनंती केली होती.

आठवडी बाजार भरविला गेला असता, तर आपले ‘औरंगाबाद, ग्रीन औरंगाबाद’ या संकल्पनेला तडा गेला असता. सजग नागरिकांनी आवाज उठविला म्हणूनच मैदानात लावलेली ४०० झाडे जगली. - मेघना बडजाते, पर्यावरणवादी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्ट फूडने मधुमेहाला आवतन

$
0
0


म. टा. प्र‌ति‌निधी, औरंगाबाद
‘जीवनशैलीतील बदल, व्यायामाचा अभाव, फास्ट फूड, ताण-तणाव, अपुरी झोप, बाहेरचे चटपटीत खाण्याच्या सवयीमुळे देशात मधुमेहींची संख्या झपाट्याने वाढली आहे. नियमित व्यायाम, पौष्टिक आहार हे जीवनसूत्र बनविल्याशिवाय तरणोपाय नाही,’ असा सल्ला शुक्रवारी ‘रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबेटीस इन इंडिया’ या मधुमेह तज्ज्ञांच्या संघटनेच्या राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. विजय पण्णीकर यांनी दिला.
‘रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबेटीस इन इंडिया’ या मधुमेह तज्ज्ञांच्या राष्ट्रीय संघटनेच्या महाराष्ट्र शाखेतर्फे आयोजित अकराव्या ‘महा आरआरएसएसडीआय २०१७’ या मधुमेह तज्ज्ञांच्या तीन दिवसीय परिषदेला शुक्रवारी, १७ फेब्रुवारी रोजी हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी व्यासपीठावर आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. संतोष मालपाणी, डॉ. विश्वनाथ परसेवर, डॉ सुनिता कदम, डॉ. सुनील मसारे आदी उपस्थित होते. डॉ. अरुण मन्नीकर यांनी प्रास्ताविक केले आणि आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. मधुमेहाशी संबंधित विविध विषयांवर तज्ज्ञांनी परिषदेत मार्गदर्शन केले. या प्रसंगी डॉ. पण्णीकर म्हणाले, ‘जगात दुसऱ्या क्रमांकाची मधुमेही रुग्णांची संख्या असलेला आपला देश एक क्रमांकावरील चीनला लवकरच मागे टाकेल. लहान मुलांमधील वाढत लठ्ठपणा घातक आहे. लठ्ठपणा आणि मधुमेह एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे फिटनेसला पर्याय नाही, हे लक्षात ठेऊन प्रत्येकाने व्यायाम करायलाच हवा. बाहेरचे खाणे टाळायलाच हवे,’ असे त्यांनी सांगितले. नांदेडचे किडनी विकारतज्ज्ञ डॉ. संतोष दुरूगकर, डॉ. राहुल महाजन आणि डॉ. बाळकृष्ण मोरे यांनी मधुमेह आणि त्याचा किडनीवर होणार दुष्परिणाम, तो टाळण्यासाठीच्या उपाययोजना याबाबत सादरीकरण केले. परिषदेमध्ये हजारपेक्षा जास्त डॉक्टर सहभागी असून, मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई, गोवा येथील तज्ज्ञ विविध विषयांवर मार्गदर्शन करीत आहेत. परिषदेमध्ये बावीस शोधनिबंधही सादर करण्यात येणार आहेत.

शाळांमधूनही फॅट वाढविणारे पदार्थ खाऊ देण्यास, उपलब्ध करण्यास मनाई हवी. पालकांत जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. लहान मुलांमध्येही टाइप दोन प्रकारचा मधुमेह आढळतो हे धक्कादायक आहे. - डॉ. विजय नेगलूर, मधुमेह तज्ज्ञ

लठ्ठपणा आणि मधुमेहामुळे शरीर आणि संपूर्ण जीवनावरच दुष्परिणाम होतो. बारियाट्रिक सर्जरीमुळे यावर मात करणे शक्य आहे. राज्यभरात आम्ही ‘फाइट ओबेसिटी’ अशी चळवळच सुरू केली आहे. - डॉ. जयश्री तोडकर, सर्जन, मुंबई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढोरकीनचे दहावी परीक्षा केंद्र कायम

$
0
0


औरंगाबाद : ढोरकीन (ता. पैठण) येथील दहावीचे परीक्षा केंद्र रद्द करण्याचा एसएसएसी मंडळाचा निर्णय रद्द करून हे परीक्षा केंद्र सुरू ठेवण्याचे आदेश शुक्रवारी न्या. संजय गंगापूरवाला व न्या. कालिदास वडणे यांनी दिले.
ढोरकीन येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे केंद्र रद्द करण्याचा निर्णय माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाने २ फेब्रुवारी रोजी घेतला. विद्यार्थी संख्या दोनशेपेक्षा कमी असल्याचे कारण दाखवून येथील केंद्र बिडकीन केंद्राला विद्यार्थी जोडण्याचा निर्णय मंडळाने घेतला. या विरोधात साईनाथ कासुले, रफीक हमीद मेलेदार, शिवनाथ उघडे आणि राजू मुळे या चार पालकांनी खंडपीठात धाव घेतली.
याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार जिल्हा परिषद शाळेचे १५१ आणि मारुतीराव पाटील विद्यालय धुपखेडा येथील ३८ असे १८९ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी आहेत. त्याचप्रमाणे ढोरकीन ते बिडकीन हे बारा किलोमिटरचे अंतर आहे. त्यातही विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे. बहुतांश पालक हे गरीब, शेतकरी, शेतमजूर आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बिडकीन केंद्रात परीक्षेसाठी दररोज जाणे-येणे अवघड आणि अन्यायकारक असल्याचे याचिकेत नमुद केले होते. सुनावणीनंतर खंडपीठाने शिक्षण मंडळाचा परिक्षा केंद्र रद्द करण्याचा निर्णय रद्द करत परीक्षा केंद्र कायम ठेवण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्याची बाजू सिद्धेश्वर ठोंबरे यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images