Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विलिनीकरण घातक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सहयोगी बँकांच्या विलिनीकरणाला केंद्र सरकारने दिलेल्या परवानगीचा निषेध करत शुक्रवारी, १७ फेब्रुवारी रोजी जिल्हा बँक कर्मचारी संघटनेने एसबीआयच्या सिडको येथील विभागीय कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.
संघटनेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘सहयोगी बँकांच्या विलिनीकरणानंतर मोठ्या प्रमाणात बँकेच्या शाखा बंद होतील. त्यामुळे नव्याने परवाना मिळालेल्या बँकांचे फावेल. तसेच खासगी सावकारांचे फावेल. नोटबंदीनंतर झालेला गोंधळ आता कमी होऊ लागला आहे. मात्र, यामुळे आणखी गोंधळाची स्थिती निर्माण होईल.’ आंदोलनात शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी ऑल इंडिया बँक एम्प्लॉइ असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव देविदास तुळजापूरकर, एसबीएच संघटनेचे सचिव जगदीश भावठाणकर यांनी मार्गदर्शन केले. राकेश बुरबुरे, रवींद्र धामणगावकर, हेमंत जामखेडकर, सुनीता गणोरकर यांची विशेष उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुतळा सुशोभीकरण; नगरसेवक आक्रमक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
क्रांतिचौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणावरून शनिवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक आक्रमक झाले. काही अधिकारी महापालिकेची व पदाधिकाऱ्यांची बदनामी व्हावी म्हणून मुद्दाम पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे करतात, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी नगरसेवकांनी लावून धरली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्याने क्रांतिचौकातील पुतळ्याचे व परिसराचे महापालिकेतर्फे सुशोभीकरण केले जाते. गतवर्षी सुशोभीकरणाचे काम योग्य प्रकारे न झाल्यामुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त करीत तत्कालीन महापौर त्र्यंबक तुपे व आयुक्त सुनील केंद्रेकर यांना क्रांतिचौकातच घेराव घातला होता. त्यावेळी केंद्रेकर यांनी जाहीर माफी मागून पालिकेकडून चूक झाल्याचे मान्य केले होते. या प्रकारामुळे यंदा पालिकेचे अधिकारी अधिक दक्ष राहून सुशोभीकरणाचे काम करतील अशी अपेक्षा होती, पण तसे घडले नाही. निकृष्ट दर्जाची लाइटिंग, फाटलेल्या कपड्यांचे पडदे लावण्यात आल्यामुळे शिवप्रेमी पुन्हा एकदा संतापले. त्याचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटले. नंदकुमार घोडेले, राजेंद्र जंजाळ, प्रमोद राठोड, राजू शिंदे, राजगौरव वानखेडे यांनी या बद्दलचा विषय मांडला. छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यांच्या जयंतीच्या दिवशी महापालिकेचे अधिकारी मुद्दाम कामात कुचराई करतात. सुशोभीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करा अशी मागणी नगरसेवकांनी केली. नगरसेवक आक्रमक झाल्यामुळे महापौर भगवान घडमोडे यांनी सर्वसाधारण सभा दहा मिनिटांसाठी तहकूब केली. सभा पुन्हा सुरू झाली तेव्हा आयुक्तांनी या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. महापौरांनी आयुक्तांना आदेश देताना या प्रकरणाची सात दिवसांत चौकशी करून जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

‘मोदींना साथ’हे तरी लक्षात ठेवा
‘छत्रपतींचे घेवून नाव, मोदींना देवू साथ’ अशी भारतीय जनता पक्षाची घोषणा आहे. महापौरही भारतीय जनता पक्षाचे आहेत. महापौरांनी ‘मोदींना देवू साथ’ हे लक्षात ठेवून तरी छत्रपतींच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामात लक्ष घालायला हवे होते, अशी बोचरी टीका शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी टँकर टेंडर; चौकशीचे आदेश

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पाणी पुरवठ्यासाठी काढलेले टँकरचे टेंडर संशयास्पद असून या प्रकरणाची चौकशी करा, असे आदेश महापौर भगवान घडमोडे यांनी महापालिका आयुक्तांना दिले.
सातारा परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाच कोटींचे टेंडर आयुक्तांचे विशेषाधिकार वापरून काढले. हा मुद्दा भाजप नगरसेवक राजू शिंदे यांनी उपस्थित केला. समांतर जलवाहिनीच्या संदर्भात कोर्टात केस सुरू आहे. कोर्टाने जैसे थे चा आदेश दिला आहे. असे असताना हे टेंडर कसे काढले, असा सवाल त्यांनी विचारला. टेंडर काढून अपात्र कंत्राटदाराला टँकरचे कंत्राट देण्यात आले असा आरोप त्यांनी केला. त्यांनी या सर्व प्रकरणात प्रशासनाने खुलासा करावा अशी मागणी केली. कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला पण ते समाधानकारक खुलासा करू शकले नाहीत. यावर आयुक्तांनी टँकर टेंडर प्रकरणात झालेल्या अनियमिततेची तीन सदस्यांची समिती स्थापन करून चौकशी केली जाईल. पंधरा दिवसात चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

मालमत्ता कर वाढीसाठी सभा
मालमत्ता कर वाढीच्या प्रस्तावावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभाचे आयोजन केले जाईल, असे महापौर भगवान घडमोडे यांनी शनिवारी स्पष्ट केले. लवकरच विशेष सभेचे आयोजन केले जाणार आहे. पालिकेच्या प्रशासनाने शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मालमत्ता कर वाढीचा प्रस्ताव ठेवला होता. वीस ते पंचेवीस टक्के दरवाढ सूचवणारा हा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर न करता तो सर्वसाधारण सभेकडे वर्ग करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यामुळे प्रशासनाने आज झालेल्या सर्वसाधारण सभेत कर वाढीचा प्रस्ताव ऐनवेळी ठेवला. या प्रस्तावावर ऐनवेळी चर्चा करून निर्णय घेणे शक्य नाही, त्यामुळे या महत्वाच्या विषयाबद्दल विशेष सर्वसाधारण सभा घेण्याची सूचना नगरसेवकांनी केली. त्यांची ही मागणी महापौरांनी मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूजमध्ये केमिकल गळती

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, वाळूज
वाळूज औद्योगिक वसाहतीतील एम सेक्टरमध्ये असलेल्या पूजा इंटरप्राइजेस केमिकल कंपनीत शनिवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास नायट्रिक अॅसिडची गळती झाली. अग्निशमन दलाच्या दक्षतेने मोठी हानी टळली.
एमआयडीसीतील एम ४७ प्लॉटवर पूजा इंटरप्राइजेस केमिकल कंपनी आहे. कंपनीत बाहेरून रसायन आणल्यानंतर ते किरकोळ स्वरुपात विकले जाते. शनिवारी कंपनीतील नायट्रिक अ‍ॅसिडच्या (एचएनओ ३) रसायनच्या टँकचा वॉल लिक झाल्याने मोठ्या प्रमाणात केमिकल गळती झाली. हे रसायन कंपनीतून बाहेर येऊन रोडवर जवळ-जवळ १०० फूट वाहत गेले. त्यामुळे सर्वत्र उग्रवास पसरला. परिसरात गवत व लहान झाडे जळून खाक झाले. धूर निघून परिसरातील कामगारांच्या डोळ्यांना जळजळ सुरू झाली. या प्रकारामुळे परिसरातील कंपनी मालकांनी आपआपल्या कंपन्या बंद करून सावधगिरी बाळगली. तर बाजूच्या सात ते आठ कंपन्यामध्ये हा विषारी वायू गेल्यामुळे तसेच या कंपनीतील मशिनरी बंद पडल्या. त्यामुळे त्यांचे उत्पादन थांबले. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पीएसआय ताहेर पटेल, पोहेकॉ. वसंत शेळके, भागिनाथ बोडखे, राजकुमार सूर्यवंशी, राजू मोरे, राजेश वाघ, मोहन पाटील, तसेच अग्निशमन दलाचे आर. एस. फुलारे, एस. एफ. वासनकर, एस. आर. गायकवाड, एच. जी. भुरंगे, डी. एम. राठोड, एस. एस. अंभोरे. एस. ए. गोसावी, पी. एस. कोलते आदींनी पाणी मारून विषारी वायू नामशेष केला.

लाखोंचे नुकसान
कंपनीमालक विलास जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन ते तीन टन रसायनाची गळती झाली. यात कुणाचीही जीवित हानी झाली नाही. मात्र, लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्थ बजेटचे प्लॅनिंग कराः डॉ. हिरेमठ

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘आपण शिक्षण, घर, संसारासाठी आर्थिक तरतूद करतो. त्याचे प्लॅनिंग करतो. मात्र, या रगाड्यात आरोग्याबाबत कुठेच बजेटचा विचार करत नाही. आयुष्यात आजार जडला तर त्याचे बिल पाहून अनेकांना भीती वाटते. आनंदी कुटुंबासाठी हेल्थ बजेटचे प्लॅनिंग करा,’ असा सल्ला प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी शनिवारी येथे दिला.
‘रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबेटीस इन इंडिया’च्या वतीने तापडिया नाट्य मंदिर येथे डॉ. हिरेमठ यांचे ‘मधुमेह सांभाळा - हृदयरोग टाळा’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. हिरेमठ म्हणाले, ‘आपल्याकडे लग्नासाठी एखादे स्थळ आल्यावर प्रत्येक जण पत्रिका जुळविण्यासाठी प्रयत्न करतो. परंतु, आजच्या युगामध्ये कुंडली पाहण्यापेक्षा त्या व्यक्तीचे आरोग्य किती चांगले हे पाहूनच निर्णय घ्यायला हवे. रक्तदाब, हृदयरोग आणि मधुमेह या आजारांचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढते ताणतणाव घरातील वातावरण बिघडवणारे आहे, हे टाळण्यासाठी प्रत्येकाने आपले, सहचाऱ्यांचे व
सहवासात राहणाऱ्यांसोबत जीवन आनंदी करण्यासाठी सुसंवाद वाढविणे गरजेचे आहे. सहजीवनात लैंगिक संबंधांनाही तितकेच महत्त्व आहे. सुमधूर सहजीवनाबाबत आपण सर्वांनी आशादायी रहायला हवे. आयुष्यात अवघड वाटणाऱ्या गोष्टी सहज साध्य करण्याची जिद्द बाळगायला हवी. मधुमेह, उच्च रक्तदाब विकाराचे प्रमाण वाढत आहे. उपचाराविना अनेकांचा मृत्यू होत आहे. यासाठी आपली आरोग्य दैनंदिनी आखली पाहिजे, काय खावे, काय खाऊ नये, याचे नियोजन केल्यास त्याचा फायदा होतो. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फास्ट फूड, व्यसन टाळावे, हल्ली पारंपरिक मैदानी खेळ हद्दपार झाले. हे खेळ मोबाइलमध्ये येऊन बसले. त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. आयुष्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येकाने योग्य आहार व व्यायाम करणे आवश्यक आहे. हे तथ्य पाळल्यास आजाराला आपण खऱ्या अर्थाने ‘बायपास’ करू शकतो, ’ असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय
मधुमेहामुळे ह्दयावर काय दुष्परिणाम होतात आणि ते कसे टाळता येऊ शकते याची संपूर्ण माहिती त्यांनी पॉवर पॉर्इंट प्रझेंटेशनच्या माध्यमातून उपस्थितांना दिली. त्यानंतर नाशिक येथील डॉ. अजित कुमठेकर यांनी मधुमेह आणि अर्थकारण विषयावर मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरांनी विशेष प्राविण्य मिळवावेः डॉ. म्हैसेकर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘वैद्यकीय क्षेत्रात विशेषज्ज्ञ ही काळाची गरज आहे, कारण लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या आजही कमी आहे. विकारांवर प्रभावी उपचारासाठी विशिष्ट शाखांमध्ये स्पेशलायझेशन करण्यासाठी फेलोशीप योजना जाहीर करण्यात आल्या आहेत, त्याचा लाभ घेऊन डॉक्टरांनी विशेष प्राविण्य मिळवावे,’ असे आवाहन आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी शनिवारी येथे केले.
मधुमेह तज्ज्ञांच्या राज्यस्तरीय परिषदेचे औपचारिक उद्‍घाटन म्हैसेकर यांच्या उपस्थितीत आज झाले. पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे सदस्य डॉ. संजय कदम, डॉ. अनंत सूर्यवंशी, आरएसएसडीआय प्रदेशाध्यक्ष डॉ. विजय पण्णीकर, सचिव नारायण देवगावकर, आयोजन समिती अध्यक्ष डॉ. संतोष मालपाणी, वैज्ञानिक समितीचे प्रमुख डॉ. अरुण मान्नीकर, सचिव डॉ. सुनिता कदम, डॉ. विश्वनाथ पारसेवार आणि कोषाध्यक्ष डॉ. ऋषिकेश मेहेत्रे यांची उपस्थिती होती.
डॉ. मालपाणी यांनी परिषद आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. या परिषदेत १ हजारपेक्षा जास्त डॉक्टरांनी सहभाग नोंदवल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. देवगावकर यांनी संघटनेचे कार्य, परिषदेसोबतच विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ. पण्णीकर यांनीही विचार मांडले. रेड्डी म्हणाले, ‘देशात मधुमेहींचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. याला नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न गरजेचे ठरतील. भारतीय दृष्टीकोनातून याविषयी संशोधन व्हायला हवे. यासोबतच जनजागृतीही खूप गरजेची आहे. अशा परिषदांतून होणाऱ्या चर्चा, मार्गदर्शनातून सर्वसामान्यांना लाभ व्हावा,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. डॉ. सुनिता कदम आणि डॉ. विश्वनाथ पारसेवार यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

चळवळ उभारावी
डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी, रुग्ण आणि रुग्णांच्या कुटुंबियांशी डॉक्टरांचा सुसंवाद व्हावा आणि तो वाढत रहावा याकडे लक्ष वेधले. डॉ. संजय कदम म्हणाले, ‘मधुमेहाशी लढण्यासाठी डॉक्टरांना उर्जा देणारी ही परिषद आहे. रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक आणि सर्वसामान्य यांच्यात जागृती होण्यासाठी डॉक्टरांनी चळवळ उभी करायला हवी.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवराई’ देते संशोधनाला प्रेरणा

$
0
0


औरंगाबाद : भारतातील वैभवशाली राजवटीतील नाण्यांचा अभ्यास करून संशोधनात्मक मांडणीचा प्रयत्न आशुतोष पाटील हा विद्यार्थी करीत आहे. फक्त दोन वर्षांच्या कालावधीत त्याने तब्बल साडेपाच हजार दुर्मिळ नाण्यांचा संग्रह केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीतील अडीच हजार ‘शिवराई’ नाणी आशुतोषच्या संग्रहात आहेत. या नाण्यांचा स्वतंत्र अभ्यास करून संशोधन प्रकाशित करण्याचा आशुतोषचा प्रयत्न आहे.
नाणेसंग्रहाला संशोधनाची जोड देण्याचा प्रयत्न संशोधक विद्यार्थी आशुतोष पाटील करीत आहे. देवगिरी महाविद्यालयाचा विद्यार्थी आशुतोषला दोन वर्षांपूर्वी चार प्राचीन नाणी सापडली. कुतूहल वाढल्याने त्याने आणखी नाणी जमवण्यास सुरुवात केली. दोन वर्षांत देशभरात फिरून आशुतोषने तब्बल साडेपाच हजार नाण्यांचा संग्रह केला. इ. स. पूर्व ६०० ते २०१७ पर्यंतची नाणी त्याच्या संग्रहात आहे. गुप्त, सातवाहन, कुषाण, मोगल, ब्रिटीश अशी विविध कालखंडातील नाण्यांचा त्यात समावेश आहे. मात्र, संग्रहात सर्वाधिक ‘शिवराई’ नाणी आहेत.
‘पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक भागात फिरून नाणी जमवली. १६७४ मध्ये राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी ‘शिवराई होण’ सुवर्णमुद्रा आणली. मात्र, सध्या अस्सल ‘होण’ चार ते पाच उपलब्ध आहेत. ‘शिवराई’ नाणे तांब्याचे असल्यामुळे जास्त उपलब्ध आहे,’ असे आशुतोषने सांगितले. पूर्वी पत्र्यावर ठोकून तयार केली जात असल्यामुळे नाणी एकसारखी नाहीत. सध्या काहीजण साच्याने बनावट नाणी तयार करून विकतात. अशी नाणी सहज ओळखता येतात. नाण्यांचा काटेकोर अभ्यास केल्यास फसवणूक टाळता येईल’ असे आशुतोषने सांगितले. संग्राहकाला नाण्यांवरील लेखन, वजन, धातू यांचा किमान अभ्यास आवश्यक असतो. पुरातत्वशास्त्राचे शिक्षण घेऊन संशोधक होण्याची आशुतोषची इच्छा आहे. छंद जोपासण्यासाठी कुटुंबियांचे पाठबळ मिळत आहे. नाणी खरेदीसाठी मोठा खर्च झाला आहे. नाणी संग्रहातील कामगिरीबद्दल इंदूर मुद्रा परिषदेने आशुतोषचा ‘मुद्रा मित्र’ पुरस्काराने सन्मान केला आहे. ‘असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड रिसर्च फाउंडेशन’ने या कामाची दखल घेतली आहे.

नाण्यांचा संग्रह करताना आदर्श राजवटींचा अभ्यास झाला. छत्रपती शिवरायांच्या काळातील ‘शिवराई’ नाणे स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. तांब्याची अडीच हजार ‘शिवराई’ नाणी माझ्या संग्रहात आहेत. संग्रहाच्या छंदातून आता संशोधन व लेखन करणार आहे. - आशुतोष पाटील, नाणी संग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरवणुकीनिमित्त रविवारी वाहतूक व्यवस्थेत बदल

$
0
0


औरंगाबाद : शिवजयंतीनिमित्त शनिवारी, १९ फेब्रुवारी रोजी शहरात विविध मिरवणुका निघणार आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. मुख्य मिरवणूक संस्थान गणपती ते क्रांतिचौक या मार्गावर निघणार आहे.
शिवजयंतीनिमित्त चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. वाहतूक शाखेचे चार पोलिस निरीक्षक, आठ सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक व शंभर कर्मचारी बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत. तर बॉम्ब शोधक नाशक पथकाचे पोलिस निरीक्षक तसेच अधिकारी व १४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय ठाण्यातील १४ पोलिस निरीक्षक, ६९ सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक, एक हजार २६५ पुरुष कर्मचारी आणि ७५ महिला कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

...हे मार्ग बंद
- संस्थान गणपती, शहागंज, महात्मा गांधी पुतळा, सिटीचौक, गुलमंडी, बाराभाई ताजिया, पैठण गेट, क्रांतिचौक.
- एन १२, टी.व्ही. सेंटर चौक, जिजामाता चौक, एम २, एन ९.
- शिवनेरी कॉलनी, पार्श्वनाथ चौक, बळीराम पाटील चौक, ओंकार चौक.
- बजरंग चौक, आविष्कार चौक, गारखेडा, गजानन मंदिर मार्ग.

...पर्यायी मार्ग
- शहागंजहून सिटीचौकाकडे येणाऱ्या वाहनांना चेलिपुरा चौक-लोटा कारंजा मार्ग.
- क्रांतिचौकाकडून गुलमंडी, सिटीचौककडे जाणाऱ्या वाहनांनी सिल्लेखाना-सावरकर चौक, कार्तिकी हॉटेल चौक-मिलकॉर्नर-भडकल गेट मार्गाने जावे.
- मिलकॉर्नरकडून औरंगपुऱ्याकडे येणारी सर्व वाहने अंजली चित्रपटगृहाजवळून उजवीकडे नागेश्वरवाडी-निराला बाजार-समर्थनगर मार्गे जातील.
- जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टीव्ही सेंटरकडे जाणाऱ्या वाहनांनी अण्णाभाऊ साठे चौक-उद्धवराव पाटील चौक-सिद्धार्थ चौकाचा वापर करावा.
- पटियाला बँकेकडून गजानन महाराज मंदिर चौकाकडे येणारी वाहने हिंदूराष्ट्र चौक, विजयनगर, गजानन कॉलनी, रिलायन्स मॉल मार्गे जातील.
- त्रिमूर्ती चौकाकडून गजानन मंदिराकडे येणारी वाहने हेडगेवार हॉस्पिटलमागील रस्त्याने माणिक हॉस्पिटल, जवाहरनगर पोलिस ठाण्यामार्गे जातील.
- सेव्हन हिल उड्डाणपुलाकडून गजानन महाराज मंदिराकडे येणारी वाहने जालना रोडमार्गे आकाशवाणी, अमरप्रीत चौक मार्गे जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


छोट्या शहरातही जलयुक्त शिवार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘ग्रामीण भागासह आता छोट्या शहरातही जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार आहे,’ अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. विभागातील जिल्हाप्रशासन अधिकारी, मुख्याधिकारी, नगराध्यक्षांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर ते बोलत होते.
आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ही बैठक झाली. बैठकीत विभागातील पाणी पुरवठा, सिंचनाचे प्रकल्प, पाणीपट्टी, मालमत्ता वसुली, वृक्षलागवड, स्वच्छ महाराष्ट्र अभियान अशा विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी डॉ. भापकर यांनी संवाद साधला. ‘विविध योजना राबविण्यात आणि त्या पूर्ण करण्यात मराठवाडा इतर विभागांच्या तुलनेत मागे आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे मराठवाड्यात पाणी टंचाई कमी होण्यास मदत झाली. त्याच धर्तीवर आता शहरातही जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार आहे.
‘क’ वर्ग असलेल्या नगरपालिकांच्या क्षेत्रामध्ये किंवा छोट्या शहरात या अभियानातून काम केले जाणार आहे. पाणलोट विकास, जलसंधारणाच्या माध्यमातून पाणी आडविले जाईल. त्या-त्या नगर परिषदेंनी त्याबाबत आढावा घेऊन त्या दृष्टिकोनातून पाऊले उचलायची आहेत. या कामाच्या माध्यमातून शहरातील पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विभागात ३४ ‘क’ वर्गातील नगर परिषद तर, २४ नगर पंचायती आहेत. वृक्षलागवडीवर ही भर देणार आहोत,’ असे डॉ. भापकर म्हणाले. बैठकीला ६२ मुख्याधिकारी, २० नगराध्यक्षांची मुख्य उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणंदमुक्तीत मराठवाडा पिछाडीवर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्वच्छ महाराष्ट्र अभियानतंर्गत वैयक्तिक स्वच्छतागृह उभारणीत मराठवाडा इतर विभागांच्या तुलनेत पिछाडीवर आहे. १ लाख २७ हजार वैयक्तिक स्वच्छतागृह उभारण्याच्या उद्दिष्टापैकी केवळ ५५ हजार स्वच्छतागृह उभारली गेली. त्यामुळे पाणंदमुक्त गाव संकल्पनेपासून जालना, बीड, परभणी हे जिल्हे कमालीचे मागे आहेत.
शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे यासाठी शहरामधील सर्व नागरिकांना शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हे अभियान राबविण्यात येत आहे. मात्र, ते कागदापुरतेच मर्यादित राहण्याची शक्यता असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांर्गत वैयक्तिक स्वच्छतागृह उभारणीच्या कामात मराठवाडा दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा जवळपास साठ टक्के मागे आहे. आठ जिल्ह्यात १ लाख २७ हजार वैयक्तिक स्वच्छतागृह उभारणीचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले. प्रत्यक्षात फेब्रुवारीपर्यंत केवळ यापैकी ४०.३४ टक्केच उद्दिष्ट पूर्ण झाले. त्यातही अनेक स्वच्छतागृहांची माहिती, फोटो अपलोड करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. विभागात बीड, जालना, परभणी अशी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे जिल्हेच स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत उपक्रमांमध्ये मागे आहेत. मार्चपर्यंत उर्वरित वैयक्तिक स्वच्छतागृह उभारणीचे काम पूर्ण करण्याचे आव्हान आहे. जिल्हा परिषद निवडणुका पाहता हे उद्दिष्ट कागदावरच राहण्याची शक्यता आहे.

६२७ पैकी ३६४ कामे
आजही अनेक शहरांमध्ये कुटुंबे उघड्यावर शौचालयास जात आहेत. अशा कुटुंबांना शौचालयाची व्यवस्था करून देण्यासाठी राबविण्यात येणारी ही योजना अडचणीत सापडली आहे. स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे यासाठी उघड्यावर शौच्चास बसण्याचे ६२७ ठिकाण शोधून काढण्यात आले होते. अशा ठिकाणी मोठ्या संख्येत शौचालयांची उभारणी करण्यात येणार आहे. ६२७ पैकी ३६४ ठिकाणीच सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मार्चपर्यंत उर्वरित ठिकाणचे काम कसे पूर्ण होणार, हा प्रश्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपतर्फे मोफत अतुल्य आरोग्य शिबिर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल सावे यांच्या पुढाकाराने पुंडलिकनगर परिसरातील तिरुमला मंगल कार्यालय येथे शुक्रवार, २४ फेब्रुवारीपासून तीन दिवसीय अतुल्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात आरोग्य तपासणी, औषधापासून ते गरजूंवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत, अशी माहिती संयोजकांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
आरोग्य शिबिरात कॅन्सर तज्ज्ञ, कार्डियॅक, स्त्री रोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, ईएनटी, ऑर्थेापेडिक्स, डेनिस्ट, फिजिशयन, सर्जन आदीसह चाळीसहून अधिक तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची मोफत तपासणी करतील. सामाजिक व शासकीय योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल दिली. यापुढे वर्षातून दोन वेळा आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाईल. शुक्रवारी, २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता शिबिरास सुरुवात होणार आहे. नाव नोंदणी शनिवार, १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून इच्छुक, गरजूंनी पुंडलिकनगर, सिडको परिसरातील बजरंग चौक येथील संपर्क कार्यालयात संपर्क साधवा,’ असे आवाहन आमदार अतुल सावे यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला अनिल मकरिये, नगरसेवक शिवाजी दांडगे, मंगलमूर्ती शास्त्री, गणेश नावंदर, नंदकिशोर चरखा, राम बुधवंत आदी उपस्थित होते.

अन्य विषय नकोच
विद्यापीठातील राडा तसेच संपर्क कार्यालयावर झालेल्या दगडफेक संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारले असता आमदार सावे म्हणाले, ‘विद्यापीठात जे काही झाले, त्यातील दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्याचा गैरअर्थ काढून कोण्या संघटनेने पुढील कृत्य केले आहे. या विषयापेक्षा आपला भर हा विकासकामे, प्रश्नांची सोडवणुकीवर आहे,’ असे म्हणत त्यांनी अधिक भाष्य टाळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपोषणस्थळाला लागलेल्या आगीची चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
उदगीर येथील सिद्धार्थ औद्योगिक सहकारी संस्थेच्या विरोधात सुरू असलेल्या उपोषणाच्या मांडवाला अज्ञातांनी लावलेल्या आगीची चौकशी सुरू आहे. याप्रकरणात उपोषणकर्त्या सविता बिराजदार यांनी काही संशयीतांचे नावे दिली आहेत. त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती उदगीर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी. एम. हिरमुखे यांनी दिली.
सिद्धार्थ औद्योगिक सहकारी संस्थेच्या विरोधात सविता रमेश बिराजदार आणि त्यांच्या सहकाऱ्यानी गेली काही दिवस उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी पहाटे अज्ञात इसमांनी उपोषणस्थळाला आग लावण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात उपोषणासाठी असलेल्या मांडवाला काहीही झाले नाही. उपोषणकर्त्यांची सुद्धा पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केली असून कोणालाही इजा पोहचली नसल्याचे पोलिस निरीक्षक बी. एम. हिरमुखे यांनी सांगितले. या प्रकरणी सविता बिराजदार यांनी संशयीत म्हणून काही नावे दिली आहेत. त्याचा फौजदार ठाकुर तपास करीत असल्याचे सांगून चौकशी अंती गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपोषणकर्त्यांना जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची तक्रार पोलिस आणि उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सविता बिराजदार यांनी केली आहे. या उपोषणाच्या बाबतीत सहकारी संस्थेच्या उपनिबंधकाना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या प्रमाणे उपनिबंधकानी चौकशी अहवालात सिद्धार्थ औद्योगिक सहकारी संस्थेचे लेखा परीक्षण झालेले असून त्यात कुठलेही दोष आढलेले नाहीत असे म्हटले आहे. त्यासोबतच पत्र त्यांनी उपोषणकर्त्यांना ही दिले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निलंबनावर आयुक्त ठाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करून त्यांना कामावर रूजू करून घ्या व त्यानंतर त्यांची विभागीय चौकशी करावी, या सर्वसाधारण सभेच्या ठरावाशी आपण सहमत नाही. हा ठराव विखंडित करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठवणार असून, अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू केली जाईल, अशी भूमिका महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी शनिवारी स्पष्ट केली.
विविध कामांत दोषी ठरवून आयुक्तांनी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. डी. पी. कुलकर्णी, उपअभियंता शिरीष रामटेके, शाखा अभियंता आर. पी. वाघमारे, शहर अभियंता सखाराम पानझडे, मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांना निलंबित केले आहे. यापैकी पानझडे यांचे निलंबन कायम करून त्यांची विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी यापूर्वी झालेल्या सभेत ठेवला होता. संबंधितांच्या चौकशीबरोबरच नगररचना विभागातील निवृत्त उपअभियंता सय्यद फहिमोद्दीन विखारोद्दिन व निवृत्त शाखा अभियंता मोहम्मद वसील यांच्याही विभागीय चौकशीची शिफारस करण्यात आली होती.
आयुक्तांनी मांडलेला ठराव अमान्य करताना सर्वसाधारण सभेने निलंबित अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करून त्यांना कामावर घेण्याचा निर्णय घेतला. त्या अधिकाऱ्यांना कामावर रुजू करून घेऊन त्यानंतर त्यांची विभागीय चौकशी करा, असे आदेश आयुक्तांना दिले होते. त्याच वेळी आयुक्तांनी या निर्णयाशी आपण सहमत नाही असे स्पष्ट केले होते. सभेत घेतलेल्या निर्णयाची प्रत प्राप्त न झाल्यामुळे शनिवारी झालेल्या सभेत विभागीय चौकशीचा प्रस्ताव नव्याने ठेवण्यात आला होता, पण दरम्यानच्या काळात इतिवृत्ताचा कारणापुरता उतारा प्राप्त झाल्यामुळे सभेत ठेवलेला चौकशी प्रस्ताव आयुक्तांनी परत घेतला. सभेने घेतलेला निर्णय नगरसचिवांनी वाचून दाखवला. अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करून त्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे, त्यानंतर त्यांची विभागीय चौकशी करावी असा तो निर्णय असल्याचे सर्वसाधारण सभेत स्पष्ट झाले.
सभेनंतर पत्रकारांशी बोलताना आयुक्त म्हणाले, कारणापुरता उतारा प्राप्त झाल्यामुळे विषयपत्रिकेवरील प्रस्ताव मागे घेतला आहे, पण सभेने घेतलेल्या निर्णयाशी आपण सहमत नाही. त्या अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करून त्यांना कामावर रूजू करून घेण्याचा प्रश्नच येत नाही. अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करण्याचा सर्वसाधारण सभेने घेतलेला निर्णय विखंडित करावा अशी शिफारस शासनाकडे केली जाणार आहे. त्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी मात्र लगेचच सुरू केली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताठ होतील माना, उंच होतील नजरा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवजयंतीचे औचित्य साधून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या रंग उडून बकाल झालेल्या भिंतीची साफसफाई केली. भिंतीवर सुबक चित्रांची आरास काढून ‘पाणी बचत’, ‘पर्यावरण संवर्धन’, ‘सोशल मीडियाचा वापर’ अशा विविध विषयांकडे लक्ष वेधत विधायक मार्गातून शिवरायांना शनिवारी अभिवादन केले.

शासकीय अभियांत्रिकी कॉलेजचे विद्यार्थी रविवारी देवगिरी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविणार आहेत. शिवरायांना सकारात्मक कामातून अभिवादन करण्यासाठी शासकीय अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यांनी शनिवारी सकाळी ८ वाजेपासूनच श्रमदानास सुरुवात केली होती. प्रारंभी साफसफाई केली. पाणी टाकून भिंती साफ केल्या. त्यानंतर रंगरंगोटी केली.
‘पाणी बचत’, ‘पर्यावरण संवर्धन’, ‘सोशल मीडियाचा वापर’, ‘नेत्रदान’, ‘सोशल मीडियाचा योग्य वापर’, ‘पर्यावरण संवर्धन’, ‘डिजिटल इंडिया’, ‘स्वच्छ भारत’ असे विविध महत्वाचे विषय भावी अभियंत्यांनी चित्रांतून मांडले. विविध अभियांत्रिकी शाखांच्या पन्नासपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. या उपक्रमाला कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्राणेश मुरनाळ, कॉलेज व्यवस्थापन मंडळाचे सदस्य रवींद्र वैद्य, विभागप्रमुख डॉ. अंजली भालचंद्र, प्रा. सायली कुलकर्णी, सुनील शास्त्री यांनी प्रोत्साहन दिले.

विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिवजयंती साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात आम्ही विविध सामाजिक विषय चित्रांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्यांचे, तरुणांचे लक्ष या विषयांकडे लक्ष जावे, हा हेतू आहे. - निखिल बडवे, विद्यार्थी

अभियांत्रिकीचे विद्यार्थी केवळ तांत्रिकदृष्ट्या सक्षम असतात असे नाही, तर त्यांच्यात विविध कलाही दडलेल्या असतात. त्या कलेला वाव मिळावा आणि शिवाजी महारांच्या जयंतीच्या निमित्ताने काहीतरी समाजाला संदेश आपण देऊ हा हेतू आहे. - सायली पवार, विद्यार्थिनी

विविध शाखांच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त स्वच्छतेचा संदेश देत इतर विषयांकडेही आम्ही लक्ष वेधू शकलो. विद्यार्थ्यांनी अतिशय सुबक असे विविध विषय चित्रांच्या माध्यमातून मांडले आहेत. - पूजा पाटील, विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुचकाअभावी शिक्षण समितीचे सभापतीपद रिक्तच

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
नगरपालिकेचे शिक्षण समितीचे सभापतीचे सभापतीपद पुन्हा एकदा तांत्रिक कारणामुळे रिक्त राहिले आहे. या उमेदवारीसाठी सूचक मिळत नसल्यामुळे सत्ताधाऱ्यांना अर्जच सादर करता आला नाही. अर्ज न भरल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची सभापतीपद मिळवण्याची संधी हुकली आहे. नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी अपेक्षेप्रामणे भाजपच्या रंजना पवार यांची वर्णी लागली.
नियोजन व विकास समिती आणि शिक्षण समितीच्या सभापती निवडीसाठी १८ फेब्रवारी रोजी नगरपालिकेची विशेष सभा बोलविण्यात आली होती. पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. चेतन गिरासे हे यावेळी उपस्थित होते. यावेळी भाजपच्या नगरसेविका अंजना पवार यांनी नियोजन समितेच्या सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला. मात्र, शिक्षण समितीसाठी एकही अर्ज अला नाही. त्यामुळे यावेळी अंजना पवार यांची विनविरोध निवड करण्यात आली. शिक्षण समितीच्या सभापतीचे पद रिक्तच राहिले. यापूर्वी सात जानेवारी २०१७ रोजी सभापती पदाच्या निवडीसाठी जी बैठक झाली. त्यावेळी भाजपाकडून नगरसेवका झालेल्या काही तांत्रिक चुकांमुळे ही दोन्ही पदे रिक्त राहिली होती.
नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे संख्याबळ अधिक आहे. येथे राष्ट्रवादीला समितेचे सभापतीपद बिनविराध मिळवणे सहज शक्य होते. ७ जानेवारी रोजी सभापती पदासाठीचे उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे तर यंदा या पदासाठी अनुत्सुकता दाखविल्यामुळे त्यांचा सभापतीची संधी हुकली.


तांत्रिक अडचण
शिक्षण समितीत अकरा सदस्य आहेत. यामधूनच सभापती निवडण्याचा नियम आहे. भाजप-सेनेचे समितीत सहा जण आहेत. यापैकी एक सभापतीचा उमेदवार व एक अनुमोदक झाला. उर्वरित चारजण अन्य समित्यांमध्ये सूचक किंवा सभापती आहेत. त्यामुळे येथे त्यांना सूचक होता येत नाही. यामुळे यंदाही भाजपच्या उमेदवाराची अडचण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वंदन शिवरायांना!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध उपक्रमांनी साजरी झाली. सकाळी आठ वाजता क्रांतिचौकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. सकाळपासूनच शिवप्रेमींची क्रांतिचौकात गर्दी झाली. वाहन फेरी काढून विविध कॉलेजचे विद्यार्थी अभिवादन करण्यासाठी एकत्र झाले. विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सहभाग लक्षणीय असल्यामुळे मिरवणुकीत उत्साह निर्माण झाला. विविध संस्था, संघटना, कॉलेज, राजकीय पक्ष आणि शिवप्रेमींनी अभिवादन करण्यासाठी गर्दी केली. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने विशेष उपक्रम घेण्यात आले. क्रांतिचौकात मंच उभारून पोवाड्याचे कार्यक्रम घेण्यात आले. शिवाजी महाराजांचे महनीय कार्य पोवाड्याच्या माध्यमातून शाहिरांनी सादर केले. भगवे फेटे, झेंडे आणि शिवप्रतिमा घेऊन शहरात ठिकठिकाणी मिरवणूक काढण्यात आली. सातारा, गारखेडा, सिडको, हडको, शिवाजीनगर, जयभवानीनगर, मुकुंदवाडी, हर्सूल, चिकलठाणा, औरंगपुरा या भागात शिवजयंती उत्साहात साजरी झाली. रक्तदान शिबिर, शालेय साहित्य वाटप, मिठाई वाटप, भंडारा आदी उपक्रम राबवण्यात आले. मुकुंदवाडी भागात एक वॉर्ड एक शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रत्येक घरावर भगवा झेंडा उभारून घरासमोर रांगोळी काढण्यात आली. तर सायंकाळी अभिवादन कार्यक्रमाला हजारो शिवप्रेमींची गर्दी उसळली. शिवाजीनगर भागातही शिवाजी महाराज जयंतीचा उत्साह दिवसभर राहिला.

वसाहतींत कार्यक्रमांची रेलचेल
शिवाजी महाराज जयंती शहरातील अनेक वसाहतीत साजरी करण्यात आली. यानिमित्त कॉलनीत व्याख्याने व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सिडको, गारखेडा, शिवाजीनगर, सातारा भागात सर्वाधिक कार्यक्रम झाले. शहरातील वक्त्यांना शिवकार्याला उजाळा देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. काही ठिकाणी संगीतमय कार्यक्रम सादर झाले. वेगवेगळ्या उपक्रमातून शिवरायांचे स्मरण करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालगृहातील चिमुकल्यांना अन्नदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनतर्फे छावणीतील विद्यादीप बालगृहातील ८८ अनाथ विद्यार्थिनींना अन्नदान करण्यात आले.
जिल्हा परिषद मुख्यालयात कार्यक्रम झाला. कमलाकर साबळे यांनी शिवचरित्रावर व्याख्यान झाले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे जाधव, शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमानंतर उपस्थितांना भोजन देण्यात आले. युनियनने यंदा अभिनव उपक्रम राबविला. छावणी येथील विद्यादीप बालगृहातील ८८ विद्यार्थिनींना जिल्हा परिषदेत बोलावून भोजन देण्यात आले. बालगृहात ६ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थिनींचा सांभाळ केला जातो. आजचा उपक्रम विशेषतत्वाने आवडल्याचे समुपदेशक सिस्टर दीपाली, लक्ष्मी राजेश तमलेल्लू यांनी सांगितले.
शिवजयंती कार्यक्रमासाठ सुरेश गायकवाड, प्रदीप राठोड, बाबासाहेब काळे, ज्ञानेश्वर सोनवणे, सुरेश अंथरूणकर, पद्मसिंह राजपूत, रमेश कारभाळ, संजय काळम, वाल्मिक सोनवणे, चंद्रभान बनसोडे, एम. व्ही. तपकिरे, भाग्यश्री लोणे आदींनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘छत्रपती शिवाजी महाराज भारताचे महानायक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आपल्या देशात खऱ्या अर्थाने लोकशाहीची मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजी महाराज यांनी रोवली. रयतेच्या कल्याणासाठीच त्यांनी राज्य केले. याची दखल देश-विदेशातील सत्ताधिशांनी घेतल्याने ते महाराष्ट्राचेच नव्हे, तर भारताचे महानायक होते, असे प्रतिपादन ख्यातनाम साहित्यिक नरेंद्र मोहन यांनी केले.
शिवजयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. बीसीयूडी डॉ. सतीश पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. राम चव्हाण, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुहास मोराळे यांची उपस्थिती होती. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रासंगिकता’ विषयावर बोलताना नरेंद्र मोहन म्हणाले,‘छत्रपती शिवरायांनी रयतेसाठी सत्ता स्थापन केली. त्यात प्रत्येक धर्म, जातीला सन्मान होता. कोणालाही तुच्छतेची वागणूक दिली नाही. यामुळे साडेतीनशे वर्षांनंतरही शिवाजी महाराजांना सर्वच जाती, धर्मातील लोक महानायक मानतात. तुकाराम महाराजांसह इतर अनेक संतांच्या साहित्यात शिवाजी महाराजांविषयी भरभरून वर्णन करण्यात आले आहे. महात्मा फुले यांनीतर दिन, दलित, दुबळ्यांचा राजा असा उल्लेख केला असल्यामुळे ते खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते.’ डॉ. सतीश पाटील यांचेही यावेळी भाषण झाले. प्रा. अनिल लहाने यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मोराळे यांनी आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्रातर्फे विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. केंद्रातर्फे काव्यवाचन, वक्तृत्त्व, निबंध लेखन, रांगोळी, शोधनिबंध, पोस्टर व वस्तूनिष्ठ परीक्षा अशा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.

मिरवणुकीने लक्ष वेधले
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विद्यापीठात सकाळी मिरवणूक काढण्यात आली. लेझीम, ढोल ताशच्या गजरात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विद्यापीठ गेटपासून ही मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजर, कवायती, सजीव देखावा अशा उत्साही वातावरणात मिरवणुकीचा नाट्यगृहाजवळ समारोप करण्यात आला. विद्यार्थ्यांसह, बीसीयूडी डॉ. सतीश पाटील, डॉ. सुहास मोराळे, डॉ. धर्मराज वीर, डॉ. राम चव्हाण, डॉ. अरुण खरात, डॉ. कैलास पाथ्रीकर, डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोण कुणासोबत जाणार ?

$
0
0

सुरेश कुलकर्णी, जालना

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या मतपेट्या मतदारांनी भरून टाकल्या आहेत. अनेक राजकीय महत्वाकांक्षी नेत्यांचे भवितव्य आजच्या घडीला या झाकलेल्या मुठीत यंत्रबंद झाले आहे. आता मात्र, गावोगावी पारावर गप्पा आणि चर्चांना मोठा ऊत आला आहे. कोणाचे किती येणार ? आणि कोण कुणासोबत जाणार ? याच एका मुद्द्याभोवती चर्चा रंगत आहेत.

जिल्ह्यात झालेल्या मतदानाच्या अंदाजावरून प्रत्येक उमेदवार आपल्याला कसा काय फायदा होतो आहे, याची मोठ्या आत्मविश्वासाने गणिते मांडत आहेत. भोकरदन, जाफ्राबाद या तालुक्यात प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक झाली. याठिकाणी खासदार दानवे हेच विरोधी पक्षनेत्याच्या रडारवरचे लक्ष होते. शिवसेनेच्यावतीने राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भोकरदनमध्ये जाऊन जोरदार जाहीरपणे वक्तव्ये केली. दानवे यांच्या वर्चस्वाला हादरे देण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र आले होते. मात्र, त्यातील काही नेत्यांचे खासदार दानवे यांच्यासोबत विविध विकासाच्या कामांना देण्यात येणारा निधी उपलब्ध करून देण्यासाठी असलेल्या छुप्या युतीचे व्यवहार भोकरदन, जाफ्राबादमध्ये राजरोसपणे चालतात आणि याच राजकारणाचा पहिला अंक म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भोकरदनमध्ये झालेली सर्वपक्षीय हाणामारीची घटना सांगितली जाते. दरम्यान, या निवडणुकीत हा फॅक्टर किती चाललाय यावर निकालाची सुई फिरणार आहे.

परतूर व मंठा तालुक्यातील राजकरणात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचे राजकारण झाले. तर घनसावंगी अंबडच्या राजकारणात राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांच्या विरोधात भाजपच्या माजी आमदार विलास खरात, शिवसेनेचे हिकमतराव उढाण यांनी आघाडी उघडली होती म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचे मते विभागली गेली नाहीत. भाजप, सेनेची युती तुटली याचा फायदा राष्ट्रवादीच्या पारड्यात पडेल असे सांगितले जाते.

जालन्यात सुरुवातीपासून शिवसेना उमेदवारांच्या निवड करण्यापासून राज्य मंत्री अर्जुन खोतकर यांनी विशेष लक्ष दिले. त्यांचे बंधू अनिरूद्ध खोतकर यांच्या रेवगाव सर्कलमध्ये भाजपच्यावतीने जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे यांनी निवडणूक लढवली ही जागा अतिशय प्रतिष्ठेची झाली आहे.

जिल्ह्यात एकाला संपूर्ण बहुमत मिळेल याची खात्री अनेकांना वाटत नाही. याची अनेक कारणे सांगितली जात आहेत. प्रत्यक्ष तालुक्यातील वेगवेगळे राजकीय पक्षाचे प्रभाव आहेत. त्याचाच परिणाम निकालात उमटणार आहे, असे बोलले जाते. निकालानंतर जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा किमान दोन पक्षांना एकत्र यावे लागेल असे दिसते. मुंबई पालिकेच्या निकालावर जिल्हा परिषदेच्या सत्तेचे संचित अवलंबून असणार आहे. भाजप आणि शिवसेना मुंबईत एकत्र आले तर जालन्यात फार काही अडचण येणार नाही. मात्र, मुंबईत जर फिसकटले तर त्याचे पडसाद जालन्यात नक्की उमटतील असे बोलले जाते. या परिस्थितीत राष्ट्रवादी हा पक्ष जालन्यात केंद्रस्थानी असेल राष्ट्रवादी शिवसेना नाही तर राष्ट्रवादी भाजप अशी युती जिल्हा परिषदेच्या राजकारणात होईल असे वातावरण आहे. सत्तेचा सोपान जालन्यात सगळ्यांनाच चांगला खुणावतोय कोण कुणासोबत जाणार आहे याच्या चर्चा अशाच सुरू झाल्या आहेत.

भाजपच्यावतीने ही निवडणूक अतिशय अटीतटीच्या पातळीवर आम्ही लढवली. दोन स्वतंत्र एजन्सीच्यावतीने निःपक्ष पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट व गणाचे सर्व्हेक्षण केले आहे. उमेदवार उभे करताना या सर्व संदर्भात विशेष करून विचार केला आहे आणि त्यातूनच खात्री वाटते की स्वबळावर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला भरघोस प्रतिसाद मिळेल.
बबनराव लोणीकर, पालकमंत्री, जालना.

नोटा बंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक मोठा फटका जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला बसलेला आहे. शिवसेना जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागात सामान्य माणसाला तातडीने मदतीचा हात पुढे करणारी एकमेव संघटना आहे. त्यामुळे हमखास शिवसेनेच्या उमेदवारांना जालना जिल्ह्यातील मतदारांनी विजयी करण्यासाठी मतदान केले. शिवसेना सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर समाधानकारक विजयी होणार याचा आत्मविश्वास वाढला आहे.
अर्जुन खोतकर, राज्यमंत्री, शिवसेना.


जिल्ह्यातील निवडणूक आघाडीच्यावतीने एकत्रपणे लढवली असल्याने हाच विजयाचा मजबूत पाया आहे. भाजप व शिवसेनेच्या भांडणाचा कल्लोळ उडालेला आहे. आघाउीच्या विजयाची निर्माण झालेली वाटचाल स्पष्टपणे बघत आहोतच राष्ट्रवादी जिल्ह्यात क्रमांक एक असेल.
राजेश टोपे, आमदार, माजी मंत्री राष्ट्रवादी.


जिल्ह्यातील राजकारणात कार्यकर्त्यांच्या राजकीय वाटचालीत अनेकदा चढउतार होतात. मात्र काँग्रेसच्या परंपरागत वर्चस्वाला कुठे धक्का बसला नाही. विशेष करून राष्ट्रवादी सोबत आघाडीच्या केल्यामुळेच मतविभागणीचे सगळे मार्ग बंद झाले आहेत. विरोधक विस्कटलेल्या अवस्थेत आहेत. काँग्रेसचे जुने वैभवाचे दिवस या सर्व निवडणुकीच्या निकालानंतर निश्चितच दिसणार आहेत. सुरेशकुमार जेथलिया, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष काँग्रेस.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवजयंती जल्लोषात साजरी

$
0
0

औरंगाबाद ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रविवारी अवघे औरंगाबाद शहर भगवे झाले. शहराच्या विविध भागांत शिवजयंतीनिमित्त व्याख्याने, रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले होते.

वर्तमानत्र विक्रेता संघटनेतर्फे शिवजयंती
वर्तमानपत्र विक्रेता संघटनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संघटनेच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. या वेळी अध्यक्ष अण्णासाहेब जगताप, सचिव नीलेश फाटके, शेख फइम, गणेश भोसले, अनिल बर्गे, नाना सोळंके, मदन बेडवाल, शिवाजी ढेपले, सचिव नरबदे, अशोक वाघमारे, अनिल शिंदे, सुरेंद्र पटेल, विनायक कोमटकर, आसाराम कुलकर्णी, माणिक कदम, भीमराव वायभट, दत्ता खरात, रामकृष्ण राऊत, रामदास महाडिक, संदीप देवर, चंद्रकांत भालेराव आदींची उपस्थिती होती.

पिसादेवीत ‘जय महाराष्ट्र माझा’
मराठमोळ्या लोककलांच्या ‘गर्जा जय जय महाराष्ट्र माझा’ या कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वशाली कारकिर्दीला वंदन करण्यात आले. ओवी, वासुदेव, नमन, गोंधळ, जागरण, पोतराज या लोककलांचे बहारदार सादरीकरण करण्यात आले. पिसादेवी येथे ए. बी. ग्रुपचे भाऊसाहेब काळे व अजिनाथ धामणे यांच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सव कार्यक्रमात शनिवारी हा कार्यक्रम रंगला. यावेळी भाऊसाहेब काळे म्हणाले, ‘तरुण पिढीसमोर शिवरायांचा आदर्श निर्माण व्हावा आणि बालमनावर संस्कार करण्यासाठी शिवजन्मोत्सव आहे’. युवामित्र फाऊंडेशन निर्मित, सचिन अंभोरे प्रस्तुत व राहुल काकडे, नितिन पगारे दिग्दर्शित या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. संतोष धामणे, भारत कानवडे, जयेश निकम, निखिल धामणे, जयदीप गोसावी, सुरेश खिल्लारे, अशोक देशमुख, संतोष राजगुरे, अशोक उंद्रे, गणेश कदम, संजय चिंचखेडे, संजय तापीर, दिलीप काळे, सुदाम काळे, सतीष भुजंग, राजेश राठोड, फुलसिंग चव्हाण, नारायण जाधव, अनिल मुरकुळे आदींनी परिश्रम घेतले.

शिवरायांना विद्यार्थ्यांचे वंदन
एलोरा हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद शिंदे व मुख्याध्यापिका संगीता शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले. निरंजन खैरनार, केतकी अंगडी, अमृता मगर, राहुल जंगले, आदिती महानोर, अनिकेत खलसे, विशाल हांडगे, पार्थ चव्हाण, अभिजीत गुंड, सुमीत पवार, रघुनंदन काळे, वैभव वेताळ या विद्यार्थ्यांनी भाषण व पोवाडे सादरीकरण केले. स्वराज्य स्थापनेचा इतिहास अश्विनी काळे यांनी कथन केला. कीर्ती काळे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मीरा मगर, निलिक्षी राव, मनाली बल्लाळ, स्वाती देशमुख आदींनी प्रयत्न केले.

रांगोळीतून साकारले शिवराय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनाच्या वतीने शिवमहोत्सव घेण्यात आला. या उपक्रमात भूगोल विभागात शनिवारी रांगोळी व पोस्टर स्पर्धा पार पडली. रांगोळी स्पर्धेत ३० आणि पोस्टर स्पर्धेत सात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डॉ. शिरीष अंबेकर व प्रा. गौरी कल्लावर यांनी परीक्षण केले. यावेळी संयोजक डॉ. राम चव्हाण, डॉ. धनंजय माने, डॉ. राजेश करपे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख, डॉ. विकास देशमुख, डॉ. मदनलाल सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

शिवराय सर्वसामान्यांचे राजे ः प्रा. शिंदे
‘छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. उत्तम प्रशासक, आरमार दलाचे प्रमुख, अभियंता असलेले शिवराय सर्वसामान्यांचे राजे होते. महाराजांनी समाजातील स्त्रिया, शेतकरी, कष्टकरी यांना सन्मानाची वागणूक दिली. ते कोणत्याही जातीधर्माच्या विरोधात नव्हते. अन्यायाच्या विरोधात त्यांचा लढा होता,’ असे प्रतिपादन प्रा. संजय शिंदे यांनी केले. सिडकोतील तापडिया पार्क येथे आयोजित शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला रत्नाकर राजूरकर, विजय मुगळीकर, सुरेश मुळे, अशोक धर्मापुरे, शितल गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभावाचा विचार आचरणात आणावा असे प्रा. शिंदे म्हणाले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रितेश पटेल, आसाराम भालेराव, रमेश नवाथे, सटवा जायभाये, दिवाकर गवई, अॅड. सचिन देशमुख, गोपीनाथ पाटील, अॅड. संदीप गोंदकर, श्यामराव भुमे, सुहासिनी मोरखंडीकर, शीला गवई, रंजना उदावंत, कृतिका चौधरी आदी उपस्थित होते.

रेखाटली किल्ल्यांची चित्रे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हर्सूल येथील न्यू हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी किल्ल्यांची चित्रे रेखाटली. चित्रांच्या माध्यमातून शिवरायांच्या दुर्ग वैभवावर प्रकाश टाकण्यात आला. रायगड, देवगिरी, जंजिरा, प्रतापगड, जलदुर्ग, सिंधूदुर्ग किल्ल्यांचे चित्रे बालचित्रकारांनी रेखाटली. या उपक्रमात प्रज्ज्वल कारके, सौरभ म्हस्के, करण शेळके, कुणाल सोनवणे, सौरभ भुजंगे, शुभम गुंजाळे, मुकेश म्हस्के, निखिल हंडे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांना कला शिक्षक अमोल देवडे यांनी मार्गदर्शन केले.

पोवाड्यातून शूर शिवरायांचे स्मरण
मुकुंदवाडी येथे कै. गणपतराव जगताप विद्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आबासाहेब जगताप यांनी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक राकेश गांगुर्डे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक कैलास वनारसे, किशोर हिवर्डे व रामेश्वर इथर उपस्थित होते. ऋषिकेश वाघ या विद्यार्थ्याने पोवाड्याद्वारे शिवरायांची कारकिर्द मांडली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भानुदास मलवाड यांनी केले, तर अंजू शर्मा यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दत्तात्रय बिरादार, शितल वानखेडे, धनश्री पाटील, अमृता वाकळे, प्रिती वैष्णव, विजय खोमणे यांनी परिश्रम घेतले.

भित्तीपत्रकाचे प्रकाशन
धर्मवीर संभाजी प्राथमिक विद्यालयात शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वक्त्या श्रीमती लहाने व साबळे मॅडम यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे केली. इयत्ता चौथीच्या विद्यार्थांनी शिवरायांचा जीवनपट आकर्षक भित्तीपत्रकाच्या माध्यमातून दाखवला. यावेळी भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.

विज्ञान वर्धिनी
रोकडिया हनुमान कॉलनी येथील विज्ञान वर्धिनी हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी अशोक उजळंबकर, गुलाबराव गाडेकर, विठ्ठलराव गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापक अविनाश शंकपाळ यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कोलते यांनी केले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images