Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

छावणी ठाण्याच्या जमादाराची चौकशी

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘बनावट अपघात विमा घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने छावणी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या जमादार शेख मुश्ताकची कसून चौकशी केली. यामध्ये दोन पोलिसांचे निलंबन करण्यात आले असून, या प्रकरणात आणखी तीन पोलिसांचा समावेश आहे,’ अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारी दिली.
बनावट कागदपत्रे सादर करीत एचडीएफसी अर्गो इन्शुरन्स कंपनीला गंडा घालणारे रॅकेट ३ फेब्रुवारी रोजी उघडकीस आले आहे. विमा कंपनीच्या अधिकारी, वकिलांनी डॉक्टर व पोलिसांच्या संगनमताने हा घोटाळा केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पूर्वीच जमादार आर. आर. शेख, डॉक्टर महेश मोहरीर, दलाल शेख लतीफ यांना अटक केली आहे. शनिवारी विमा कंपनीचा वकील अॅड. गजानन मापारी याला मुंबई येथून अटक करण्यात आली. या प्रकरणात छावणी पोलिस ठाण्याचा जमादार शेख मुश्ताक व पुंडलिकनगर चौकीच्या खंडागळे नावाच्या कर्मचाऱ्याचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेख मुश्ताकला कागदपत्रासह चौकशीसाठी बोलावले होते. रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती.

लवकरच अटक
‘बनावट कागदपत्रे, पंचनामे सादर करीत विमा कंपनीला लाखो रुपयांचा गंडा या टोळीने घातल्याचे आतापर्यंत निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी न घडलेल्या अपघातांच्या खोट्या नोंदी व पंचनामे केल्याचेही उघड झाले आहे. याप्रकरणी नरवडे व मुश्ताक यांना निलंबुत करण्यात आले आहे. या प्रकरणात आणखी तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यांना देखील लवकरच अटक करण्यात येणार आहे,’ अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाळू तस्करी झाल्यास निरीक्षकांवर कारवाई

0
0


औरंगाबाद : ‘वाळूज, हर्सूल व सातारा पोलिसांच्या हद्दीतून अवैध वाळूची वाहने शहरात आल्यास संबंधित पोलिस निरीक्षकांवर कडक कारवाई करू,’ असा इशारा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारी दिला.
परवानगी नसताना दिवसाढवळ्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा शिरकाव होत आहे. गेल्या महिन्यात वाळू वाहतूक करणाऱ्या टेंपोने चिरडल्याने बायजीपुरा भागात एका चिमुकलीचा बळी गेला. शहरात पैठण तसेच शेजारच्या जिल्ह्यातून वाळूची वाहतूक होते. वाळूज, सातारा व हर्सूल पोलिस ठाण्यांच्या हददीतून वाळू वाहतूक करणारी वाहने शिरकाव करतात. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अन्यथा संबंधित पोलिस निरीक्षकास जबाबदार धरून कारवाई करू, असा इशारा अमितेशकुमार यांनी दिला आहे. ते म्हणाले, ‘ वाळूची वाहतूक करणारी वाहने दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त ब्रास वाळूची वाहतूक करतात. मात्र, ओव्हरलोड ट्रक मोजणे पोलिसांचे काम नसून महसूल विभागाचे आहे. शहरात रॉयल्टी असलेले वाळूचे वाहन रात्री बारा ते सहा वाजेपर्यंत वाहतूक करू शकतात. मात्र, ट्रॅक्टरला शहरात वाळू वाहतूक करण्यास बंदी आहे. टाटा चारशे सात सारख्या वाहनांना मात्र मनाई नाही,’ असेही त्यांनी सांगितले.

वर्षभरात १२० गुन्हे
अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या १२० वाहनधारकांवर महसूल विभागाने गौण खनिज कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये हायवासह टेंपो, ट्रॅक्टरचालकाचा देखील समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धडकेत दुचाकीस्वार ठार; २३ लाख भरपाईचे आदेश

0
0


औरंगाबादः टँकरच्या धडकेत दुचाकीचालक ठार झाल्याप्रकरणी मृताच्या वारसांना २२ लाख ९० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश मोटार न्यायाधिकरणाचे विशेष न्यायाधीश एजाज. एच. सय्यद यांनी टँकरचालक, मालक व विमा कंपनीला दिले. दावा दाखल झाल्याच्या तारखेपासून ९ टक्के व्याज देण्याचेही आदेशात स्पष्ट केले आहे.
२२ मार्च २०१३ रोजी मौजी पारुंडी (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील भाऊसाहेब पुंजाराम मिसाळ (४५) हे दुचाकीवरुन औरंगाबाद-बीड रस्त्याने फारुळा येथून पारुंडीकडे जात असताना, समोरुन येणाऱ्या भरधाव वेगातील टँकरने त्यांना जोराची धडक दिली. यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यांचे भाऊ निरंजन पुंजाराम मिसाळ यांच्या फिर्यादीवरुन चिकलठाणा पोलिसांनी टँकरचालक देविदास फकिरराव घिरटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर मृताची पत्नी व मुलांनी नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला होता. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर कोर्टाने हे आदेश दिले. मिसाळ कुटुंबियांची बाजू अॅड. पी. एस. तांदुळजे व अॅड. सुनिता तांदुळजे यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासनाला गर्दी खेचणारे प्यारे

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘महाराष्ट्र शासनाने मराठी दिनानिमित्त मुंबईत शंकर महादेवनचा कार्यक्रम आयोजित केला. निवेदक, ऑर्केस्ट्रासह गर्दी खेचणारे जे कोणी असतील त्यांची नावे जाहिरात फलकांवर ठळकपणे छापली, पण मारुती चितमपल्ली आणि सुधीर रसाळ यांची नावे जाहिरात व फलकांवर आजिबात दिसली नाहीत. हा सगळा उथळपणा आहे,’ असे परखड मत व्यक्त करत ज्येष्ठ साहित्यिक कविता महाजन यांनी शासनाला सोमवारी खडेबोल सुनावले.
मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस कविता दिन म्हणून साजरा करताना ‘कविवर्य कुसुमाग्रज काव्य पुरस्कार आणि कवयित्री लीला धनपलवार काव्य पुरस्काराने’ अनुक्रमे सतीश काळसेकर व कविता महाजन यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना महाजन बोलत होत्या. व्यासपीठावर ज्येष्ठ समीक्षक डॉ. चंद्रकांत पाटील, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, मसापचे सचिव दादा गोरे, कवी श्रीधर नांदेडकर, कवी दिनकर मनवर यांची उपस्थिती होती.
महाजन म्हणाल्या, ‘हल्ली उथळपणा वाढत चालला आहे. कवी पुरस्कार किंवा कविसंमेलनास एक-दोन जण जमले तरी पुरेसे आहेत. तेच खरे दर्दी आहेत असे मी मानते. शासन मराठी दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करते आणि ऑर्केस्ट्रा ठेवला जातो. गर्दी खेचता यावी म्हणून गायक बोलावले जातात हे चूक आहे. आजचा पुरस्कार मी आज ७५ वर्षे पूर्ण करत असलेल्या माझ्या वडिलांना समर्पित करते. हा माझ्या माहेरचा पुरस्कार आहे,’ असे त्या म्हणाल्या. काळसेकर म्हणाले, ‘हा पुरस्कार माझ्यासाठी गौरवास्पद आहे. माझी पुरस्कार स्वीकारण्याची कुवत नाही. आजकाल कवी व साहित्यिकांना सुविधा आणि मुबलक प्रमाणावर अभिव्यक्त होणारे माध्यम उपलब्ध होऊ लागले आहे, पण त्यातून ‌किती कसदार साहित्य बाहेर येते याबाबत माझ्या मनात ‌शंका आहे.’ यानंतर त्यांनी औरंगाबादच्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी काळसेकर आणि महाजन यांच्या कवितांचा आणि शैलीचा गौरव केला. श्रीधर नांदेडकर यांनी काळसेकर व महाजन यांच्या कवितांविषयी भाष्य केले. प्रास्ताविक कौतिकराव ठाले-पाटील यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार दादा गोरे यांनी मानले. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. यात काळसेकर, महाजन मनवर आणि नांदेडकर यांची सहभाग नोंदवला.

हे भंपक आणि उथळ
महाजन म्हणाल्या, ‘परवा नाशिक येथेही लक्ष्मीबाई टिळकांच्या नावाच्या चौकासही दुसऱ्याचेच नाव दिले गेले. त्यावर आक्षेप घेत असलेल्या टिळकांच्या नात सुनेस भर कार्यक्रमात राजकारणी लोकांनी गप्प बसवले. हे कशाचे लक्षण आहे? याचा कुठेही निषेध करावासा वाटत नाही, हाच खरा प्रश्न आहे. हे सारे भंपकपणाचे, उथळपणाचे लक्षण आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कवितेचा अंकुर शाळेत उगवला!

0
0


औरंगाबाद ः शालेय विद्यार्थ्यांच्या भावविश्वाचा पहिला वहिला कवितासंग्रह असलेल्या ‘अंकुर’चा प्रकाशन सोहळा सोमवारी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत मोठ्या थाटात पार पडला. यानिमित्ताने मराठा हायस्कूल शाळेतील ३० विद्यार्थ्यांनी साहित्यक्षेत्रात प्रवेश केला आहे.
शाळेच्या आवारात झालेल्या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभागातील प्रा. डॉ. कैलास अंभुरे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अक्षय शिसोदे पाटील होते. यासह बालसाहित्यिक विनोद सिनकर, शाळेचे मुख्याध्यापक राघवेंद्र यत्नांळकर, उपमुख्याध्यापिका एस. बी. पाटील, जे. आर. पुनवटकर, शेख यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. डॉ. कैलास अंभुरे यांनी आपल्या भाषणात सर्व बालकवींचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी आपला हा कविता लेखनाचा गुण आयुष्यभर जोपासावा, अशा शब्दात शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात अक्षय शिसोदे म्हणाले कविता, वक्तृत्व, संगीत आदी कलांनी व्यक्तीचे व्यक्तिमत्व समृद्ध होत जाते. विद्यार्थ्यांनी एक तरी कलागुण जोपासावा. अंकुर साठी लेखन करणाऱ्या ३० नवोदित कवींचा यावेळी सत्कार करण्यात आला. बालसाहित्यिक विनोद सिनकर यांनी या पुस्तकावर भाष्य केले. प्रारंभी अश्विनी दांडेकर या विद्यार्थिनीने गायलेल्या ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने’ या अभंगाने सोहळ्याची सुरुवात झाली. शाळेचे मुख्याध्यापक राघवेंद्र यत्नाळकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपेश मोरे यांनी, तर आभार एस. पी. भोसले यांनी मानले.

शिक्षकांचा गौरव
कार्यक्रमात मराठी राजभाषा दिनानिमित्त अशोक उगले, भरत झोडपे, एस. पी. भोसले, आर. डब्ल्यू. देशमुख, नरेंद्र महालपुरे या मराठी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांच्या गौरव करण्यात आला. शिवानी शिंदे हिने मायबोली मराठी या विषयावर तर नेहा गायकवाड, वैष्णवी पेंढारे व साहिल शहा यांनी आपल्या कविता सादर केल्या. भरत झोडपे यांनी आपल्या भाषणातून कवी कुसुमाग्रज यांच्या वाड्मयीन कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठीचे सांस्कृतिक नेतृत्व मराठवाड्याने केले

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘मराठीचे सांस्कृतिक नेतृत्व मराठवाड्याने केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विभागातील मराठी विभाग नियोजनबद्ध विकासावर आधारलेला असल्याने मराठीचा झेंडा अटकेपार नेता आला,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री डॉ. यु. म. पठाण यांनी सोमवारी केले. विद्यापीठात ‘मराठी भाषा दिना’निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ‘माझ्या मराठीची गोडी..साऱ्या जगाला जोडी’अशा शब्दात त्यांनी मराठीचा गौरव केला.
विद्यापीठाच्या नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात मराठी संस्कृती समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातील दहा जणांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. डॉ. पठाण, कुलगुरू डॉ. चोपडे यांच्या हस्ते रा. रं. बोराडे, प्रा. मधू जामकर, पं. नाथराव नेरळकर, पं. विश्वनाथ ओक, मुरली लाहोटी, प्रा. दिलीप बडे, प्रा. अजित दळवी, डॉ. दिलीप घारे, मीरा उमप, निरंजन भाकरे या मान्यवरांना सन्मानचिन्ह, ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला.
डॉ. पठाण म्हणाले, ‘संताची भूमी म्हणून ओळख असलेल्या मराठवाड्यातील विद्यापीठाच्या मराठी विभागाने मराठी भाषेतील साहित्य देशविदेशात पोहचविले. विभागाची पोथी शाळेचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील अभ्यासक येतात. त्यात अभिजात मराठीसाठी सगळ्या विभागाने अधिक जोमाने काम करण्याची गरज आहे.’ कुलगुरू डॉ. चोपडे यांचेही यावेळी भाषण झाले. कार्यक्रमास आमदार इम्तियाज जलील यांनीही हजेरी लावली.
विद्यापीठाने मराठी दिनानिमित्त १७ ते २७ फेब्रुवारी दरम्यान महोत्सवाचे आयोजन केले होते. आज अखेरच्या दिवशी लक्ष वेधले ते ग्रंथदिंडीने. विद्यापीठ गेट ते नाट्यगृह ही ग्रंथदिंडी काढण्यात आली. पालखीत भारतीय संविधान, डॉ. आंबेडकर समग्र वाङ्मय, महात्मा फुले समग्र वाङ्मय, ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा हे ग्रंथ ठेवण्यात आले होते. कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, सहसंचालक डॉ. राजेंद्र धामणस्कर, डॉ. सुहास मोराळे, डॉ. सतीश बडवे, डॉ. अशोक देशमाने, डॉ. दासू वैद्य, डॉ. मुस्तजीब खान, डॉ. कैलास अंभुरे, डॉ. जयंत शेवतेकर, डॉ. शिरीष आंबेकर, डॉ. समाधान इंगळे आदींसह विद्यार्थी सहभागी झाले. पदव्युत्तर विभागाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी लेझीम सादर केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठीचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘मराठीचा विस्तार सातासम्रुदापार पोहोचला आहे. प्रत्येक मराठी माणसाने आपल्या भाषेचा अभिमान बाळगावा,’ असे आवाहन खासदार चंद्रकांत खैरे यांनी सोमवारी केले.
मध्यवर्ती बसस्थानकात मराठी भाषा गौरव दिन आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने ते बोलत होते. यावेळी विभागीय यंत्रचालन एल. लोखंडे यांच्यासह कवी बाळासाहेब शिंदे, विभागीय वाहतूक अधिकारी संदीप रायलवार, आगार व्यवस्थापक स्वप्निल धनाड, माजी जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मध्यवर्ती बसस्थानकात मान्यवरांच्या हस्ते पाच प्रवाशांना मराठी पुस्तक भेट म्हणून देण्यात आले. खैरे म्हणाले, ‘युती सरकारच्या काळात परिवहन मंत्री असताना कायदा बदलून सर्व बसेसवर मराठीमध्ये नंबर लिहिण्यास भाग पाडले होते,’ ही आठवण त्यांनी सांगितली. यावेळी सुचेता देशपांडे यांच्या भारुडाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन म्हारोळकर यांनी केले. यावेळी आगारातील एल. गायकवाड, संदीप जाधव, दीपक बागलाने, पंढरीनाथ काळे, मच्छिंद्र बनकर, प्रेमानंद कर्णे, यांच्यासह स्वप्ना शिरोळे, मंजू माने, शिवकन्या तिडके, अनिता सोनगीरे, यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

सिडकोत पेढे वाटले
सिडको आगारात पेढे वाटून मराठी दिन साजरा करण्यात आला. ‌शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, बाबासाहेब डांगे यांच्या उपस्थितीत प्रवाशांना गुलाब पुष्प, मराठीचे पुस्तक देऊन प्रवाशांचा गौरव करण्यात आला. यावेळी सिडको आगार व्यवस्थापक ए. यू. पठाण, एसटी कर्मचारी स्वाती घोडके, पंडित वंजारे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी भाषेची परवड नको

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘इंग्रजी शिकणे ही गरज आहे. पण मराठी भाषेची होणारी परवड योग्य नसून आपल्याच मातृभाषेकडे दुर्लक्ष व्हायला नको. प्रत्येकाने मराठीलाही न्याय द्यायला हवा,’ असे प्रतिपादन लेखिका ललिता गादगे यांनी सोमवारी केले. त्या मराठी दिनाच्या कार्यक्रमाच्या बोलत होत्या.
एमजीएमचे पत्रकारिता महाविद्यालय व अध्यापक महाविद्यालय यांच्या वतीने मराठी दिन कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख पाहुण्या गादगे यांनी ‘अमृताते ही पैजा जिंके’ या विषयावर व्याख्यान दिले. मराठी साहित्याच्या व्यापकतेवर प्रकाश टाकताना त्यांनी संत तुकाराम, बहिणाबाईंपासून ते नारायण सुर्वे, सुरेश भट यांच्यादेखील साहित्यकृतींविषयी माहिती दिली. बहिणाबाईंच्या ‘मन वढाय वढाय’ आणि कुसुमाग्रजांची ‘प्रेम कर भिल्लासारखं’ या कविता सादर करून त्यांनी आपल्या व्याख्यानाचा शेवट केला. पत्रकारिता महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रेखा शेळके यांनीही मराठी भाषेकडे दुर्लक्ष होत आहे, अशी खंत व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांनीही काव्य वाचन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विभक्त कुटुंबपद्धतीने ओव्यांची परंपरा थांबली

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘माजी माय सरसोती
मले शिकवते बोली,
लेक बहिनाच्या मनी
किती गुपितं पेरली’
अहिराणीतील बहिणाबाईंची ही शब्दरचना एखाद्या विचारवंताप्रमाणे श्रेष्ठ. मात्र, संयुक्त कुटुंबपद्धती लोप पावली आणि जात्यावरच्या ओव्यांची निर्मितीही अस्तंगत झाली, अशी खंत संत साहित्यिक डॉ. कुमूद गोसावी यांनी व्यक्त केली.
मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित कवितेच्या बागेतील ओवी महोत्सवात बोलत होत्या. आस्था जनविकास संस्था आणि सखी बहुद्देशीय महिला मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
निवृत्त उपप्राचार्या डॉ. विद्या पाटील या प्रमुख पाहुण्या होत्या. यावेळी झालेल्या ओवी स्पर्धेत ७५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. डॉ. गोसावी म्हणाल्या, ‘ओव्यांची परंपरा मौखिक असल्याने लेखी स्वरुपातील ओव्यांचे प्रमाण कमी आहे. तरी घरातील जाते गेले म्हणून ओव्या गेल्या असे म्हणता येणार नाही. काळानुरूप ओव्यांचे स्वरूप बदलले. ओवी महोत्सवातून ओवीचे नवे रूप समोर आले आहे.’ डॉ. विद्या पाटील यांनी ओव्यांविषयी माहिती दिली. ‘ग्रंथ आणि लोकगीतातील ओवी असे ओवींचे दोन प्रकार होतात. जसे सुचेल तसे रचले, असे वाटणाऱ्या ओवीचा उगम वैदिक आणि अनुष्टुभ छंदात आढळतो. आज जरी ओवी विस्मृतीत जाण्याची भीती असली तरी, अशा कार्यक्रमांमुळे हा लोकप्रकार नव्या पिढीला माहिती होईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ओवी महोत्सवासाठी ग्रामीण भागातील देखावा तयार केला होता. तसेच स्पर्धेकांनी पारंपरिक वेषभूषेत हजेरी लावली.
ज्योती काथार यांनी आयोजनाची भूमिका मांडली. आस्थाच्या अध्यक्ष आरती श्यामल जोशी यांनी प्रास्ताविक केले, तर ज्योत्स्ना पुजारी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मधू ठाकूर, आशा तेली, अंजू मुळे, स्मिता धवलशंख, नगरसेविका सुमित्रा हाळनोर, गीता खांबेकर, माणिक कुलकर्णी, अश्विनी जहागिरदार यांनी परिश्रम घेतले.

-
ओवी महोत्सव विजेते
-
- प्रथम - रंजना देशपांडे, लक्ष्मी काथार
- द्वितीय - विमल मेने
- तृतीय - वैशाली नांदगावकर
- उत्तेजनार्थ - ज्योती परळीकर, शांता निरंतर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​आमदारांच्या लग्नाला मंत्र्यांची मांदियाळी

0
0

आमदारांच्या लग्नाला मंत्र्यांची मांदियाळी

दोनशे बाउन्सरसह शेकडो पोलिसांचा बंदोबस्त; वाहतूक कोंडीने सामान्य वेठीस

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आमदार संतोष दानवे यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी आज शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्र्यांची उपस्थिती होती. काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेतेही हजर होते. तथापि, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे मात्र लग्नास उपस्थित राहिले नाहीत. दरम्यान, या शाही विवाहाला आलेल्या पाहुण्यांमुळे दर्गा परिसर तसेच बीड बायपास भागात झालेल्या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांना मात्र त्याचा त्रास सहन करावा लागला.

संतोष दानवे यांचा विवाह आज गायक राजेश सरकटे यांची कन्या रेणू सरकटे हिच्यासोबत बीड बायपास रोडवरील जबिंदा लॉन्स येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत थाटात पार पडला. त्यासाठी भव्य व्यासपीठ तयार करण्यात आले होते. महत्वाच्या व्यक्तिंना बसण्यासाठी व्यासपीठानजिक खास व्यवस्था होती. विवाह सोहळ्याचे पौरोहित्य जालना येथील पुरोहित विनायक महाराज फुलंब्रीकर, भगवती पुरोहित संघाने केले. त्र्यंबकेश्वर येथील पुरोहितही यावेळी उपस्थित होते. गायिका कार्तिकी गायकवाड यांनी मंगलाष्टके म्हटली. रात्री साडेआठवाजता हजारोंच्या साक्षीने हे लग्न लागले.

या विहाहाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, सुरेश प्रभू, डॉ. सुभाष भामरे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह अनेक मंत्री, अभिनेता विवेक ओबेरॉय यांची उपस्थिती होती.

काही वेळ गोंधळ

मंगलाष्टके सुरू असताना काही उत्साही मंडळींनी स्टेजवर धाव घेतल्याने काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. शाही विवाहासाठी या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला होता. औरंगाबादसह बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबादहून पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी आले होते.

सामान्यांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप

विवाहाला अनेक मंत्री, मान्यवरांची उपस्थिती असल्याने विवाह सोहळ्याच्या आसपासच्या रस्त्यांवरील वाहतूक थांबविण्यात आली होती. सायंकाळी सर्वसामान्य नागरिकांनी हे मान्यवर जाईपर्यंत रस्त्यावरच ताटकळत बसावे लागले. या प्रकाराचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागला. वाहतूक कोंडीचा सामना काही मंत्र्यांच्या, अधिकाऱ्यांच्या वाहनांनाही करावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलसंधारण’चा कारभार औरंगाबादेतून

0
0

‘जलसंधारण’चा कारभार औरंगाबादेतून

‘मटा’ सदिच्छा भेटीत मंत्री राम शिंदे यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

‘जलसंधारण आयुक्तालयाचे मुख्य कार्यालय येत्या एप्रिलपासून औरंगाबादमधून सुरू होईल. त्यासाठी लागणारे आवश्यक ते मनुष्यबळ दिले असून संपूर्ण राज्याचा कारभार येथूनच पाहिला जाईल,’ अशी माहिती जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिली. शिंदे यांनी गुरुवारी ‘मटा’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी संपादकीय विभागाच्या सहकाऱ्यांशी संवाद साधला.

शिंदे म्हणाले, ‘कमी पावसामुळे पीकाची उत्पादनातील घट लक्षात घेता पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविला जात आहे. दरवर्षी पाच हजार गावे टंचाई मुक्त करण्याचे उद्दिष्ट असून लोकसहभागामुळे यात चांगले यश मिळत आहे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन व मत विचारता घेऊनच जलयुक्ताची कामे सुरू असून पर्यावरणाचा कोणताही ऱ्हास होत नाही. आतापर्यंत विविध कंपन्यांनी सीएसआरमार्फत सुमारे पाचशे कोटींचा निधी या कामासाठी दिला आहे. या योजनेस अधिक गती देण्यासाठी औरंगाबादमध्ये जलसंधारण आयुक्तालय सुरू करण्याचा निर्णय घेतला असून येत्या दोन महिन्यांत हे आयुक्तालय वाल्मी येथे सुरू होईल. सेक्रेटरी दर्जाचा अधिकारी आयुक्त म्हणून नियुक्त केला जाणार असून, येथूनच सर्व राज्याचा कारभार पाहिला जाईल. तीन सहआयुक्त, एक लेखा सहसंचालक, आठ उपायुक्त यासह अन्य कर्मचारी वर्ग असेल,’ असेही त्यांनी नमूद केले.

----

चौकट

---

जलसंधारण विभागाकडे नियंत्रण

---

‘जलयुक्त शिवाराच्या कामात विविध विभाग एकत्रित काम करत आहेत. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर जलसंधारण विभागाकडेच या कामाचे नियंत्रण, देखरेख असावे. जलयुक्तचे काम वेळेत केले नाही वा अन्य काही बाबी असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार हा जलसंधारण विभागाकडे असावा याला मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मान्यता दिली आहे,’ असेही शिंदे म्हणाले.

---

कोट

---

२०१५ ते १७ मध्ये एकूण ११ हजार ४९४ गावात जलयुक्तची कामे हाती घेतली. त्यात २ लाख ८० हजार २८७ कामे पूर्ण झाली, तर ३३ हजार ८४ कामे प्रगतीपथावर आहेत. या कामामुळे ११ लाख ८२ हजार २२९.४८ टीसीएम पाणीसाठ्याची क्षमता निर्माण झाली आहे.

- राम शिंदे; जलसंधारण मंत्री

----

जलयुक्तसाठी गावांची निवड

---

- १ हजार २३२ औरंगाबाद

- १ हजार ४१ अमरावती

- ८३७ नाशिक

- ८२३ पुणे

- ७५० नागपूर

- ३१७ कोकण

- ५ हजार एकूण गावे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत नागरी सोयी-सुविधांसाठीची लेखी माहिती हायकोर्टात

0
0

सिडकोत नागरी सोयी-सुविधांसाठीची लेखी माहिती हायकोर्टात

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

सिडकोत नागरी सोयी-सुविधांसाठीची लेखी माहिती गुरुवारी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर करण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी न्या. संभाजी शिंदे व न्या. के. के. सोनवणे यांच्या खंडपीठासमोर झाली.

सिडको परिसरात अत्यावश्यक सुविधा देण्यात याव्यात यासाठी १९८६ मध्ये खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात खंडपीठाच्या आदेशानंतर नवीन जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर नुकतीच प्राथमिक सुनावणी झाली असता राज्य शासन, सिडको व महापालिकेला नोटीस बजावण्यात आली.

१९८६ मध्ये याप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेनंतर सिडको भागात अनेक सोयी-सुविधा पुरवण्यात आल्या. त्यात रस्त्याची, ड्रेनेज व इतर कामे झाली. तसेच २२ हजार अतिक्रमणे पाडण्यात आली. तरीही नागरिकांना सोयींसाठी झगडावे लागत होते. खंडपीठाने २४ आॅगस्ट २००४ रोजी अ‍ॅड. प्रदीप देशमुख, पालिका व सिडको यांच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. समितीने १३ डिसेंबर २००४ रोजी अहवाल सादर केला. त्याआधारे खंडपीठाने नवीन जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश दिले होते.

खंडपीठात प्रदीप देशमुख यांनी सिडकोत रस्ता, ड्रेनेज, पाणीपुरवठा, खुल्या जागा, खेळाची मैदाने, बगिचे, वृक्षरोपण व ग्रीनबेल्ट, हॉकर झोन, रिक्षा स्टँड, भाजीपाला बाजार, कम्युनिटी सेंटर व हेल्थ क्लब आदी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याविषयी ठळक व संक्षिप्त माहिती सादर केली. प्रदीप देशमुख यांना प्रवीण कारेगावकर, योगेश देशमुख यांनी सहकार्य केले. या याचिकेची सुनावणी ८ मार्च रोजी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन वर्षात पोलिसांसाठी उभारली ५१ हजार घरे

0
0

दोन वर्षात पोलिसांसाठी उभारली ५१ हजार घरे

पोलिस आयुक्तालय, कर्मचारी निवासस्थानाच्या बांधकामाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

१९७४ ते १९१४ या कालावधीत पोलिसांना जितकी घरे मिळाली नाही तितकी घरे दोन वर्षात देण्यात आली आहेत. ५१ हजार नवीन निवासस्थाने पोलिसांसाठी उभारण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गुरुवारी सायंकाळी शहर पोलिस दलाच्या नूतन पोलिस आयुक्तालय व कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात येणाया इमारतीच्या बांधकामाचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते पार पडले.

शहर पोलिस आयुक्तालयाची जुनी इमारत तसेच पोलिस कॉलनीतील जुनी घरे पाडून आयुक्तालयाची प्रशासकीय इमारत तसेच नवीन घरे बांधण्यात येत आहेत. या बांधकामाचे भूमीपूजन आज थाटात पार पडले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, गृहराज्यमंत्री शहर रणजीत पाटील, गृहराज्यमंत्री ग्रामीण दीपक केसरकर, पोलिस महासंचालक सतीश माथूर, पोलिस महासंचालक गृहनिर्माण विष्णुदेव मिश्रा, महापौर भगवान घडामोडे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय ‌शिरसाठ, प्रशांत बंब, इम्तीयाज जलील, अतुल सावे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

आपले मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘आपण मुख्यमंत्री पदासोबतच गृहमंत्रीपदाचाही पदभार स्वीकारला. यानंतर माहिती घेतली असता पोलिस कर्मचारी आजही शिवकालीन, शाहूकालीन, ब्रिटीशकालीन इमारतीत वाईट अवस्थेत राहत असल्याचे दिसून आले. याची खंत वाटली. त्यांना चांगली घरे देण्याचे ठरवण्यात आले. १९७४ ते २०१४ या कालावधीत जे जमले नाही ते आम्ही दोन वर्षांत केले. या दोन वर्षांत ५१ हजार घरे पोलिसांसाठी उभारण्यात आली आहेत. मुंबई, पुणे, नागपूर या शहरात स्मार्ट टाऊनशीप उभारण्याचे काम सुरू आहे.’ पोलिसांसाठी नवीन वसाहती बांधताना त्यामध्ये पोलिसांच्या मुलांसाठी व्यायाम शाळा तसेच पोलिसांच्या कुटुंबीयासाठी कौशल्य विकास केंद्र उभारण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. ४५ वर्षांच्या वरील पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून १२०० विविध आजारांवरील उपचारासाठी सहायक पोलिस उपनिरीक्षक दर्जापासून खालच्या पदावरील कर्मचाऱ्यांच्या मोफत उपचाराससाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

औरंगाबाद शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या पायाभूत ‌सुविधा उपलब्ध करून शहर १०० टक्के सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत राहणार असून याचे कंट्रोलिंग पोलिस आयुक्तालयातून होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गुन्ह्याच्या सिद्धतेचे प्रमाण आठ टक्क्यावरून चाळीस टक्क्यापर्यंत वाढले असून याबद्दल त्यांनी महाराष्ट्र पोलिस दलाचे कौतुक केले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महासंचालक सतीश माथूर, महासंचालक गृहनिर्माण विष्णुदेव मिश्रा आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी तर सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी केली. एसीपी नागनाथ कोडे यांनी यावेळी आभारप्रदर्शन केले.

निवृत्त पोलिसांना मालकीची घरे

पोलिस दलातून निवृत्त झाल्यानंतर पोलिस क्वाटर्स सोडल्यानंतर अनेकांना घरांचा प्रश्न भेडसावतो. या निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांसाठी देखील त्यांच्या मालकीची घरे कशी देता येतील याबद्दल योजना राबवणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका आयुक्तांशी जुळवून घ्या

0
0

पालिका आयुक्तांशी जुळवून घ्या

विनोद घोसाळकरांचा शिवसेना नगरसेवकांना सल्ला

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

महापालिका आयुक्तांशी जुळवून घ्या, त्यांना अंगावर घेवू नका, असा सल्ला शिवसेनेचे संपर्कनेते विनोद घोसाळकर यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना दिला. खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत एका हॉटेलात झालेल्या बैठकीत त्यांनी हा सल्ला दिला.

पालिकेतील शिवसेनेच्या सर्वच नगरसेवकांना बैठकीसाठी तातडीने बोलावण्यात आले होते. त्यानुसार नगरसेवक बैठकीला आले होते. घोसाळकर यांनी त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. पालिका आयुक्तांच्या संदर्भात काही दिवसांपासून नगरसेवक आक्रमक झाले आहेत. त्याचा संदर्भ घेत घोसाळकरांनी सर्वच नगरसेवकांना आयुक्तांशी जुळवून घेण्याचा सल्ला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. आयुक्तांना अंगावर घेवू नका, त्यांच्याशी जुळवून घेवून काम करा, असे ते म्हणाले.

महापालिकेची आगामी निवडणूक प्रभाग पद्धतीनुसार होणार आहे. त्यासाठी आतापासूनच नियोजन करून काम करा. एका नगरसेवकाने तीन - तीन, चार - चार वॉर्डात काम केले पाहिजे. आपल्या कामाचा ठसा उमटवला पाहिजे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांमध्ये एकवाक्यता रहात नाही, त्यामुळे पक्षाबद्दल जनसामान्यांत वेगळी प्रतिमा निर्माण होते. पालिकेच्या सभागृहात शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये एकवाक्यता असली पाहिजे, असे ते म्हणाले. प्रत्येक सर्वसाधारण सभेपूर्वी आपल्या नगरसेवकांची एकत्रित बैठक घ्या, विषयपत्रिकेवरील विषयांनुसार पक्षाचे धोरण ठरवा व त्यानुसार कामकाजात सहभागी व्हा, असेही त्यांनी सर्व नगरसेवकांना सांगितले. सर्वसाधारण सभेपूर्वी ‘प्री जीबी’ घेण्याची पद्धत काही महिन्यांपासून बंद पडली आहे, याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
भूमिगत गटार योजने अंतर्गत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्यात मतदारसंघात जास्त कामे झाली याबद्दल घोसाळकर यांनी नाराजी व्यक्त केली. महापालिकेत महापौर शिवसेनेचा असताना त्या मतदारसंघात कामे कशी होतात असा सवाल त्यांनी विचारला. आपले नगरसेवक - पदाधिकारी काहीच आक्षेप कसा घेत नाहीत. आपल्या मतदारसंघात कामे का होत नाहीत, असे प्रश्नही त्यांनी नगरसेवकांना विचारले.
बजेटमध्ये जास्तीत जास्त कामांचा अंतर्भाव करा
येत्या काही दिवसांत पालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात आपापल्या वॉर्डातील जास्तीत जास्त कामांचा अंतर्भाव करून घ्या व ही कामे मार्गी कशी लागतील यासाठी पाठपुरावा करा. विकासाची कामे झाल्याशिवाय यापुढच्या काळात गत्यंतर राहणार नाही, असे विनोद घोसाळकर यांनी नगरसेवकांना बजावले.

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३० हजार कोटींचे रस्ते

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘राज्यात आगामी वर्षात ३० हजार कोटींची रस्ते बांधणी केली जाईल. मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात शंभर किलोमीटर रस्ते बांधणीचे काम केले जाणार आहे,’ अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केली.
पाटील यांचे एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात आगमन झाले होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी त्यांच्या उपस्थितीत रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीला राज्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पाटील यांनी प्रामुख्याने मराठवाड्यातील रस्ते प्रश्नांचा आढावा घेतला. विभागातील सर्व जिल्ह्यांत रस्त्यांची अवस्था बिकट असल्याचे यावेळी लक्षात आले. प्रत्येक जिल्ह्यात रस्त्यांची कामे करण्याची आवश्यकता अधिकाऱ्यांनी सांगितली. त्यानंतर पाटील यांनी मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात शंभर किलोमीटरच्या रस्ते निर्मितीचा निर्णय जाहीर केला. आगामी एक वर्षात ही कामे केली जातील. त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील रस्ते विकासाच्या धोरणाबद्दलही बैठकीत चर्चा झाली. राज्यभरातील रस्त्यांचा आढावा यावेळी घेण्यात आला. खराब झालेले रस्ते व नव्याने करावयाचे रस्ते याबद्दल पाटील यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. राज्यभरातील सुमारे साठ हजार किलोमीटर रस्त्यांच्या कामाचा आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यापैकी १६ हजार किलोमीटरचे रस्ते नाबाईडकडे वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत केली जाणार आहेत.

पुलांची देखभाल दुरुस्ती करणार
‘गतवर्षी पावसाळ्यात सावित्री नदीवरील पूल वाहून गेला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली होती. यंदा अशी घटना घडू नये याची काळजी घेतली जाणार आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व नदींवरच्या पुलांची देखभाल दुरुस्ती केली जाईल,’ असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात शंभर किलोमीटरचे रस्ते करण्यात येथील. आगामी एक वर्षात ही कामे केली जातील. त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. - चंद्रकांत पाटील; सार्वजनिक बांधकाम मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहर झाले घामाघूम

0
0


म. टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद
गेल्या पंधरा दिवसांपासून शहराला उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. तापमानात सातत्याने वाढ होत असून गुरुवारी (२ मार्च) शहराचे तापमान ३४.६ अंशावर पोचल्यामुळे शहरवासीय घामाघूम झाले.
सकाळपासूनच उन्हाचा पारा चढण्यास सुरुवात होत आहे. दहानंतर उन्हाचे चटके अधिक तीव्र होत असल्यामुळे रसत्यांवर दुचाकीस्वारांची संख्या कमी झाली आहे. संध्याकाळी उन्ह कमी झाले तरी वातावरणात उकाडा जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यात तापमान किंचित वाढण्याची शक्यता आहे. यंदा मराठवाड्यात दमदार पाऊस झाल्यामुळे थंडी लांबली. यामुळे जानेवारीअखेरपर्यंत वातावरणात गारवा जाणवत होता. फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभीपासूनच उन्हाची तीवृता जाणवण्यास सुरुवात झाली असून, मार्च महिन्यामध्ये उन्हाचा कडाका वाढणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लेडिज स्पेशल’ सुसाट..!

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घर, कुटुंब सांभाळणाऱ्या, मुलांची काळजी वाहणाऱ्या, नोकरीसाठी धावपळ करणाऱ्या नारीशक्तीला महिला दिनानिमित्त रविवार, ५ मार्चचा दिवस ‘सुसाट वेगा’ने साजरा करण्याची संधी ‘महाराष्ट्र टाइम्स’ पुन्हा घेऊन आला आहे. रविवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून औरंगाबादमधील क्रांतिचौकातील हॉटेल मेनोर येथून ही ऑल विमेन बाइक रॅली सुरू होणार आहे.
कोणताही सोहळा, समारंभ, पार्टी या प्रसंगी महिलांना विविध जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात. तयारी करण्यापासून पाहुण्यांच्या स्वागतापर्यंत साऱ्याचे नियोजन करताना अनेकदा महिलांना कार्यक्रमाचा आनंदच घेता घेत नाही. मात्र, महिला दिनासारख्या हक्काच्या दि‍वशी काम, टेन्शन, जबाबदाऱ्या यांना काही काळासाठी मागे ठेवत महिलांना धम्माल करता यावी यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही ही बाइक रॅली आयोजित करण्यात आली आहे. यंदाचे हे चौथे वर्ष असून त्यादिवशी महिला सुसाट धमाल करणार आहेत.
क्रांतिचौकातील हॉटेल मेनोर येथून ही रॅली सकाळी साडेसात वाजता सुरू होईल. विविध वेशभूषा, रंगभूषा, संकल्पना घेऊन महिला या रॅलीत सहभागी होतील. वेशभूषा, केशभूषा यांच्याबाबत कोणतीही सक्ती नसली तरी बहुतांशी महिला या रॅलीत सहभागी होताना पारंपरिक तसेच आधुनिक हटके पोषाख, फेटे, पगड्या पारिधान करतातच.

अशी करा नोंदणी
सहभागासाठी पूर्वनोंदणी करणे अनिवार्य आहे. allwomenbikerally.com या साइटवर जाऊन नोंदणी करता येईल. तसेच BIKERALLYABG हा एसएमएस 58888 या क्रमांकावर पाठवूनही नोंदणी करता येईल.

लायसन्स, हेल्मेट बंधनकारक
रॅलीमध्ये सहभागी होताना महिलांना लायसन्स आणि हेल्मेट बाळगणे बंधनकारक आहे. बाइकसह मोपेड आणि नॉन गिअर गाड्या घेऊनही रॅलीत सहभागी होता येईल.

सामाजिक भान
महिला दिन म्हणजे धम्माल, मजा आणि मस्ती असे जरी असले तरी उत्साहाचा हा सोहळा साजरा करतानाही सामाजिक भान जपणे सख्या विसरत नाहीत. स्वतःच्या मनोरंजनाचा विचार न करता त्यातून प्रत्येकाचे प्रबोधन व्हावे आणि रॅलीच्या माध्यमातून एकत्र येणाऱ्या सर्वांपर्यंत जनजागृतीचा संदेश पोहचवावा हा विचार गेल्या तीन वर्षांत पुढे आला आहे. यामध्ये स्त्री शिक्षणापासून आरोग्यापर्यंत प्रत्येक विषय हाताळला जातो. वेशभूषेतूनही या संकल्पना दाखविल्या जातात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...बाइकिंग म्हणजे सुरक्षा!

0
0


ashich.choudhari@timesgroup.com
औरंगाबादः बाइकिंग म्हणजे रस्ते सुरक्षा, बाइकिंग म्हणजे हेल्मेट सक्ती, बाइकिंग म्हणजे सामाजिक संदेश, बाइकिंग म्हणजे वेगाला आवर, बाइकिंग म्हणजे समाजासाठी काही करणे ही आगळीवेगळी संकल्पना घेऊन देवगिरी इंजिनीअरिंग कॉलेजच्या मुलींचा ‘बाइक रायडर्स क्लब’ काम करतो आहे. विशेष म्हणजे अशी बाइकिंग करण्यातच त्यांना धम्माल येते आहे.
कॉलेजांमध्ये बाइक चालविणाऱ्या मुलींची संख्या वाढते आहे. मोपेड चालविणाऱ्या मुलींचे प्रमाण ७० ते ८० टक्के आहे. यात अनेकजण स्पोर्टस, सुपर बाइक्सही चालवितात. या ग्रुपच्या सदस्यांची संख्याही मोठी आहे. देवगिरी कॉलेजचा हा बाइक रायडर्स क्लब सामाजिक उपक्रमात एक पाऊल पुढे असतो. आपापल्या परीने ग्रुपच्या माध्यमातून विविध ठिकाणी राइडिंग सुरू असते. त्यासह रस्ता सुरक्षेचे महत्त्व, दुचाकीची काळजी कशी घ्यावी, दुचाकी चालविताना कोणती काळजी घ्यावी, वाहतुकीचे नियम काय, यासाठी हा ग्रुप सतत उपक्रम घेतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘हेल्मेट सक्ती’साठी हा ग्रुप कायम आग्रही असतो. दुचाकी चालविताना सुरक्षेच्या कारणासाठी हेल्मेट असणे आवश्यक असल्याने त्याबाबत अधिक दक्षता घेतली जाते. त्याबाबत आपल्या क्लब सदस्यांसह इतरांमध्येही जनजागृती केली जाते. कॉलेजमधील सर्व बाइकप्रेमींनी एकत्र येऊन हा क्लब स्थापन केला. दरवर्षी या ग्रुपच्या सदस्यांची संख्या वाढते आहे.

उपक्रमांच्या नियोजनांचे वेळापत्रक
६ जानेवारी रोजी या ग्रुपची स्थापना झाली. २०० मुली या ग्रुपच्या सध्या सदस्य आहेत. ही संख्या वाढते आहे. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त भगवे फेटे परिधान करून निघालेली रॅली लक्षवेधक ठरली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तही विद्यर्थ्यांनी भव्य रॅली काढली. त्यासह हेल्मेट सक्ती, रस्ता सुरक्षाबाबत रॅली काढून जनजागृती केली. यासह पुढे पीयूसी कॅम्प, वाहन परवाना याबाबत तरुणांमध्ये जनजागृती अशा कार्यक्रमांचे वेळापत्रक तयार आहे. कॉलेजचे संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांचे मार्गदर्शन या ग्रुपला मिळते.

ड्रंक अँड ड्राइव्ह; जनजागृती मोहीम
‘बाइक रायडर्स क्लब’ने ड्रंक अॅँड ड्राइव्हविरोधात वर्षभर काम केले आहे. व्यसन कुठलेही असो, ते आरोग्याला घातक असते. मद्यप्राशनकरून गाडी चालवल्यास मृत्यू आपली वाट पहात असतो. त्यामुळे मद्यप्राशन टाळा, वेगाला आवर घाला, नियमांचे पालन करून वाहन चालवा यासाठी या ग्रुपने वर्षभर मोहीम राबविली. जनजागृतीचे काम केले.

बाइक रॅलीसाठी केली खास तयारी
‘मटा’ बाइक रॅली ही बाइकिंगची संधी आहे. महिलांच्या कर्तबगारीचा तो सन्मान असल्याचे सांगत यंदा रॅलीसाठी खास तयारी सुरू असल्याचे ग्रुप सदस्यांनी सांगितले. एक सामाजिक संदेशाची थीम घेऊन हा क्लब सहभागी होईल. त्याची तयारी सुरू झाल्याचे गुरुवारी पहायला मिळाले. यावेळी आयुशी पवार, जयश्री गायके, फार्यान इब्रास, आकांशा गावडे, अनघा कुलकर्णी, कोमल बन्सवाल, मुयरी आदमाने, वृषाली जोशी, आरती नाचन, अंकिता भोसले, श्रेया देशपांडे, किरण बनसोड, मुग्धा काटे, अश्विनी राजपूत, पूजा मोरे, ऐश्वर्या देशमाने, शिवानी गर्गे, गीतांजली नवपुते, स्वप्नाली नाचन यांचा समावेश होता.

दुचाकी चालविताना सुरक्षेबाबत हेल्मेट आवश्यक आहे. त्यासाठी आग्रह असायला हवाच. सुरक्षेबाबत आपण सजग असू तर अधिक चांगले. - जयश्री गायके

बाइक चालविताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक ते नियम पाळले जावेत. बाइकर्समध्ये मुलींची संख्या ही वाढत असून ही चांगली बाब आहे. - अनघा कुलकर्णी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’चरख्यावरची खादी बापूंची नाहीच

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘खादीच्या कॅलेंडवरवरून गांधींना काढण्यात आले. आजकाल चरख्यावर पॉलिस्टर कापडही विणले जाऊ लागले आहे. यामुळे सध्या चरख्यावर असणारी खादी ही बापूंची नाहीच,’ असे खडेबोल सुनावत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधले.
देव‌गिरी महाविद्यालयात फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफले. ‘महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रासंगिकता’ हा विषय त्यांनी मांडला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य पंडितराव हर्षे, प्राचार्य शिवाजीराव थोरे यांची उपस्थिती‌ होती.
गांधी म्हणाले, ‘महात्माजींची अहिंसा समजून घेण्यासारखी आहे. सध्या हीच समजून घेण्यासाठी आपण स्वत: लायकीचे आहोत का, हे तपासून पाहिले पाहिजे. आजचे पंतप्रधान खादीप्रेम दाखवत चरख्यासंबंधी असलेल्या कॅलेंडरवर गांधींना काढून टाकतात. ही काही गांधी विचारांची प्रासंगिकता नाही. गांधीचे प्रेम, तत्व, निष्ठा आणि प्रासंगिकता पोलंड, अफ्रिका, म्यानमार, स्वीडन या देशातील नेत्यांनी, क्रांतिकारकांनी आणि जनतेने जपली आहे. आँग स्यान सुकी, नेल्सन मंडेला यासारख्या नेत्यांनी गांधीच्या तत्वाला अंगिकाररून प्रासंगिकता जपली. आजकालच्या राजकारण्यांनी निर्माण केलेली परिस्थिती, नोटबंदी, समाजकारण, राजकारण, अर्थकारण या सर्वच विषयांवर गांधीची प्रासंगिकता अनुरूप नाही, ‘ असा आरोप त्यांनी केला. यानंतर पंतप्रधान मोदी, समाजवादी पक्ष, मुंबईतील सध्याची परिस्थिती, नोटबंदीनंतर पिचला गेलेला सर्वसामान्य माणूस या सर्व मुद्यांवर त्यांनी त्यांनी परखड मते नोंदवत जोरदार हल्ला चढवला. अध्यक्षीय समारोप बी. एन. देशमुख यांनी केला. प्रा. विजय शिंदे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

दानवेंच्या लग्नामुळे विमानास उशीर
व्याख्यानादरम्यान तुषार गांधी म्हणाले, ‘मी मुंबईहून विमानाने आलो, पण विमानास ४५ मिनिटे उशीर झाला. मी विचारले का उशीर होतोय, तर मला सांगण्यात आले औरंगाबादला ‌भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाचे लग्न आहे. वऱ्हाडी येणार आहेत. मी विमानात बसलो तर विमानात मी सोडून बाकी सगळे ‘दानवें’चे वऱ्हाडीच होते.’

हीच का पारदर्शकता
‘भारतीय जनता पक्ष पारदर्शकतेवर बोलत असतो. दानवेंच्या लग्नासाठी मुंबईहून विमानाने लोक येतात, उशीर होतो, लोकांना वेठीस धरले जाते. येथे आल्यावर ट्रॅफिक बंदोबस्ताचा खेळ पाहिला. अरेरे हीच का पारदर्शकता. आज सर्व पोलिस मला लग्न बंदोबस्तात दिसत आहेत. यामुळे आज चोरांची चांदीच झाली आहे,’ असे गांधी म्हणताच सभागृहात हशा पिकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक सप्टेंबरला नवी अधिकार मंडळे

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६’ बुधवारपासून लागू झाला. या कायद्यानुसार विद्यापीठांना निवडणूक प्रक्रिया करावी लागेल. १ सप्टेंबर २०१७ पर्यंत नवीन अधिकार मंडळे अस्तित्वात येतील.
दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नवीन विद्यापीठ कायद्याला डिसेंबरमध्ये विधिमंडळाने मंजुरी दिली. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने बुधवारी राजपत्र जाहीर करत, आजपासून कायदा लागू झाल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता नवीन कायद्यानुसार राज्यातील अकृषी विद्यापीठांची प्रक्रिया सुरू होईल. नवीन कायद्याच्या नियमावलीनुसार (स्टॅट्यूट) विद्यापीठांना कार्यप्रणाली अवलंबावी लागेल. या कायद्याचे वैशिष्ट्य म्हणजे कायद्यासह नियमावलीही तयार आहे. त्यासह सगळ्या विद्यापीठांसाठी ही नियमावली सारखी असेल. १९९४च्या कायद्यानुसार विद्यापीठांकडे स्टॅट्यूटची जबाबदारी होती. त्यावेळी अनेक विद्यापीठांमध्ये ही नियमावलीच तयार झाली नाही. यावेळी मात्र कायद्यासोबतच नियमावली तयार करण्यात आली. विद्यापीठांना याच नियमावलीत काम करावे लागेल. त्यामुळे विद्यापीठांच्या कार्यशैलीत सुसूत्रता येईल असे बोलले जाते.

आज बैठक
नवीन कायद्यानुसार १ सप्टेंबरपर्यंत नवीन अधिकार मंडळे अस्तित्वात यावी लागतात. त्या दृष्टिकोनातून प्रक्रिया करावी लागेल. अधिकार मंडळातील ५० टक्के पदे ही निवडणुकीद्वारे भरली जाणार आहेत. निवडणुकींच्या अनुषंगाने प्रक्रिया कशी असेल, याबाबत ३ मार्च रोजी राज्यपातळीवर राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, अधिकारी यांची मुंबईत बैठक होणार आहे.

नवीन कायद्यानुसार विद्यापीठ प्रशासनाला प्रक्रिया करावी लागेल. ती प्रक्रिया कशी असेल हे दोन-तीन दिवसांत समोर येईलच. नवीन कायद्यात अनेक बदल आहेत. त्यात कुलगुरूंचे अधिकारात वाढविले आहेत. कुलगुरू चांगला असेल तरच विद्यपीठाचे भले होईल. ‘अकाऊंट कोड’ही बदलायला हवा. २०१२साली विद्यापीठांचा अकाऊंट कोड तयार करण्यात आला आहे. तोही यासोबतच यायला हवा. त्यामुळे खर्चाचे अधिकारही समोर येतील. - भाऊसाहेब राजळे, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images