Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बाइक रॅलीची जोरात तयारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या वर्षी ऑल वुमन बाइक रॅलीमध्ये शहरातील महिला मंडळांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. प्रत्येक ग्रुपच्या महिलांनी बाइक रॅलीसाठी वेगळी थीम निवडली. कुणी कॉमन रंग, तर कुणी कॉमन ड्रेस कोड. बुलेट चालवणाऱ्या महिला, युवतींची संख्या काही कमी नव्हती. बाइक रॅली सुरू होण्यापूर्वी आणि नंतरही सर्वांचे फोटोसेशन रंगले. हा शेवटपर्यंत उत्साह कायम ठेवत महिलांनी नंतर डिजेवर मस्त ताल धरला. यंदाही ही मंडळी तितक्याच उत्साहाने रॅलीची वाट पाहत आहे.

मी दोन्ही वर्षे ‘मटा’च्या बाइक रॅलीमध्ये बुलेट घेऊनच येते. खूप छान व थ्रीलिंग अनुभव असतो. आपली बुलेट घेऊन महिलांसोबत गाडी चालवताना जी मजा येते ती अनुभवयाची असेल तर तुम्हीही बाइक रॅलीमध्ये नक्‍की या. - दीप्ती शेवतेकर, बेस्ट बाइकर विजेत्या, ऑल वुमन बाइक रॅली २०१६

गेल्या वर्षीचा बाइक रॅलीचा अनुभव खूप भन्‍नाट होता. इतक्या महिला असूनही अजिबात गैरसोय झाली नाही. निकिताचे सूत्रसंचालन मस्‍त होते. महिला दिनाच्या निमित्‍ताने आपणही कुणापेक्षा कमी नाही हे प्रत्यक्षात सिद्ध झाले. - जान्हवी शेगावकर, अध्यक्ष, ताई फाऊंडेशन

बाइक रॅलीच्या निमित्‍ताने शहरातील सर्व महिला एकत्र येतात. महिला दिनाची एक चांगली सकाळ, मटाचे आतिथ्य आणि बाइक रॅलीची संधी खूप छान योग जुळतो. याही वयात आम्ही रॅलीमध्ये सहभागी होतो. मग तुम्ही मागे राहू नका. - अलका अमृतकर, अध्यक्ष, स्फूर्ती महिला मंड‌ळ

गेल्या वर्षी मी बाइक रॅलीच्या उत्‍सवात सहभागी झाले होते. याही वर्षी माझी तयारी जोरत सुरू आहे. शेकडो महिला रॅलीमध्ये येतात. यंदाही आमच्यासाठी नवीन काय असेल हे पाहण्यासाठी मी बाइक रॅलीमध्ये येणार आहोत. - माधुरी लासूरकर, ओंजळ महिला मंडळ

बाइ‌क रॅलीमध्ये सहभागी होणे सन्मान वाटला. गुलाबी फेटे बांधून सकाळच्या प्रसन्न वातावरणात गेल्या वर्षी रविवारची सकाळ आम्ही एन्जॉय केली. मी सर्व महिलांना आवाहन करेल की या वर्षी जास्त संख्येने या आणि आनंद घ्या. - स्वाती स्मार्त, शक्ती कॅनॉट महिला मंडळ

माझ्यासाठी तीन ‘म’ खूप महत्त्वाचे आहेत. मार्च, महिला दिन आणि महाराष्ट्र टाइम्स. कारण या तिन्ही गोष्टी सुखद अनुभव देतात, तो म्हणजे बाइक रॅली. प्रत्येक ‘स्त्री’ला स्वतःची ओळख नव्याने करून देणारी ही बाइक रॅली आहे. - गौरी लहुरीकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दानवेंच्या मुलाच्या लग्नाला ३० हजार वऱ्हाडी

$
0
0

औरंगाबाद

मध्ययुगीन काळातील शाही राजवाड्याचा देखावा...कारंजे आणि रोषणाईचा झगमगाट...संगीताचे मंद स्वर...पंचपक्वान्नाच्या पंगतीवर पंगती...देशातील बड्या हस्तींना आणण्यासाठी केलेली खास व्यवस्था...डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री आणि ३० हजार वऱ्हाडी मंडळीने लावलेली हजेरी आणि या सर्व लवाजम्यावर ड्रोनद्वारे ठेवलेला वॉच... अशा थाटामाटात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आणि भोकरदन तालुक्याचे आमदार संतोष दानवे यांचा शाही विवाह सोहळा गुरुवारी पार पडला.

प्रसिद्ध संगीतकार राजेश सरकटे यांच्या कन्येबरोबर संतोष दानवे यांचा विवाह पार पडला. या सोहळ्याला राज्यातील सर्वच व्हीव्हीआयपी हजर होते. याशिवाय औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील बडे नेते आणि सरकारी अधिकारीही उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या विवाह सोहळ्याला आले नसले तरी शिवसेनेचे दोन मंत्री मात्र वधू-वरांना आशिर्वाद देण्यासाठी हजर होते. त्यात मंत्री अर्जुन खोतकर यांचा समावेश होता. काँग्रेस नेते नारायण राणे, धनंजय मुंडे आणि खासदार संभाजी राजे भोसले ही या लग्नाला उपस्थित राहिले होते. विरोधी पक्ष नेते आणि राज्यातील अनेक आमदारांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. या शाही विवाह सोहळ्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आम आदमी नाराज...

गेल्या काही वर्षापासून मराठवाड्यात शेतकऱ्यांनी दुष्काळामुळे आत्महत्या केल्या आहेत. तर दुसरीकडे मराठवाड्यात अशापद्धतीने होणाऱ्या सोहळ्यांवर टीका होत आहे. या लग्नात भेदभाव झाल्याचा आरोपही लग्नाला आलेल्या वऱ्हाडींनी केला. व्हीव्हीआयपी आणि सामान्य लोकांसाठी जेवणाची वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली होती. सामान्य लोकांसाठी केवळ चपाती, पुरी, डाळभात आणि भाजी आदी पकवान्न ठेवण्यात आले होते. तर अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी महाराष्ट्रीयन, दाक्षिणात्य, उत्तर भारतीय आणि चायनीज पदार्थ ठेवअयात आले होते. त्याशिवाय अति महत्त्वाच्या व्यक्तिंना पाच ते सहा प्रकारचे मिष्ठान्न देण्यात आल्याबद्दलही वऱ्हाडींनी नाराजी व्यक्त केली. त्याशिवाय केवळ लग्नासाठी शहरातील उड्डाण पूल सामान्य लोकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळेही सामान्य लोकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान लग्न सोहळ्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी लोकसभेत खाजगी विधेयक येणार असून त्यात लग्नाला किती पाहुण्यांना निमंत्रित करायचे आणि जेवणाच्या किती डिशेस ठेवायच्या हे नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलंब्री तालुक्यात पीक जळून खाक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथील शेतातून गेलेल्या वीज तारांचे घर्षण होऊन लागलेल्या आगीत दोन शेतकऱ्यांचा मका व गहू जळून लाखो रुपायाचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी दुपारी तीन वाजता घडली.
तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथील आकाश सुभाष भुमे व वामन तुकाराम भुमे यांची गट नंबर ७९ व ८० मध्ये शेती आहे. हे शेत भगवान रामराव भुमे हे बटाईने करतात. शेतात सध्या गव्हाचे पीक सोंगणीच्या अवस्थेत असून बांधावर मका ठेवलेला होता. या शेतातून गेल्या वीज तारा लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत. या तारांमध्ये गुरुवारी दुपारी घर्षण झाल्याने त्याखालीली गव्हाचे पीक पेटले. त्यालगतच्या मक्याच्या ढिगाऱ्यानेही काही वेळात पेट घेतला. पाहता, पाहता या आगीने रुद्ररूप धारण केले. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील शेतकऱ्यांनी आग विझवण्यासाठी धावपळ केली. महिला व पुरुषांनी भांड्याने पाणी आणून व विद्युत पंप सुरू करून आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे उर्वरित गहू या आगीतून बचावला. पण, मक्याचा ढिगारा जळून खाक झाला. सुमारे शंभर क्विंटल मका व गव्हाचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यात घटनेत सुमारे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरणने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या घटनेचा शुक्रवारी तलाठी एम. एस. पांचाळ यांनी पंचनामा केला. यावेळी सरपंच साईनाथ भुमे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष आजिनाथ भुमे, काकासाहेब भुमे आदींची उपस्थिती होती.

मदतीची मागणी
‘आकाश भुमे व वामन भुमे यांची शेती बटाईने केली होती. मका सोंगणीनंतर ढीग करून बंधाऱ्यावर ठेवली होती. या ठिकाणी गव्हाची पेरणी केलेली आहे. लोंबकळणाऱ्या वीज तारांचे घर्षण होऊन सुमारे शंभर क्विंटर मका व सात ते आठ क्विंटल गहू जळून खाक झाला. हे सुमारे सव्वालाखाचे नुकसान महावितरण व महसूल प्रशासनाने भरून द्यावे,’ अशी मागणी भगवान रामराव भुमे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रधान सचिव काढले शौचखड्ड्यातून सोनखत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार यांनी शुक्रवारी खिर्डी येथील प्रकाश दवंडे यांच्या घरातील शौचखड्ड्यात उतरून सोनखत बाहेर काढले. हा देशातील दुसरा व राज्यातील पहिलाच प्रयोग आहे.
हैदराबाद वारंगल येथे शौचखड्ड्यातून सोनखत काढण्याचा प्रयोग झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ फेब्रुवारीच्या मन की बातमध्ये सांगितली होती. त्यामुळे राज्यात सोनखत काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. तालुक्यातील खिर्डी येथे झालेल्या या उपक्रमाला प्रधान सचिवांसह, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, उपसचिव ॠचेश जयवंशी, सतीश उमरीकर, मराठवाड्यातील जिल्हा परिषदचे सीईओ मधुकरराजे आर्दड (औरंगाबाद), दीपक चौधरी (जालना), सुशील खोडवेकर (परभणी), डॉ. शिंगारे (नांदेड), नामदेव ननावरे (बीड), डॉ. तुममोड (हिंगोली), आनंद रायते (उस्मानाबाद), प्रकल्प संचालक डॉ. दिलीप देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी युनिसेफचे जयंत देशपांडे यांनी खिर्डी येथील निर्मलग्रामची माहिती दिली. गटविकास अधिकारी हारकचंद कहाते यांनी प्रास्ताविक केले.
प्रधान सचिव राजेशकुमार म्हणाले, सोनखत काढण्याचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे. शौचखड्ड्यातील सोनखत अत्यंत उपयुक्त असते. याप्रसंगी ग्रामस्थांनी सर्व अधिकाऱ्यांचे टाळ-मृदंगाच्या गजरात स्वागत केले.

तालुका पाणंदमुक्त
खुलताबाद तालुक्यातील ३९ ग्रामपंचायती अंतर्गत १६ हजार ७९९ वैयक्तिक शौचालय बांधकाम पूर्ण झाले असून औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुका पाणंदमुक्त झाल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी यावेळी घोषित केले. त्याबद्दल प्रधान सचिव व विभागीय आयुक्तांच्या हस्ते आर्दड व गटविकास अधिकारी हारकचंद कहाते यांचा सत्कार करण्यात आला. संपूर्ण मराठवाडा येत्या २ ऑक्टोबरपर्यंत पाणंदमुक्त करण्याचे शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रधान सचिव यांना दिला आहे. तोपर्यंत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी व्यक्त केला.

एक वर्षांत पाणंदमुक्ती
राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतीपैकी १३ हजार १०० ग्रामपंचायती पाणंदमुक्त झाल्या आहेत. सिंधुदुर्ग, सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर यासह सहा जिल्हे आणि ९६ तालुके पाणंदमुक्त झाले आहेत. येत्या मार्च २०१८ पर्यंत संपूर्ण राज्य पाणंदमुक्त होईल, अशी माहिती प्रधान सचिव राजेशकुमार यांनी पत्रकारांंशी बोलताना दिली. २०१६-१७ या आर्थिक वर्षात राज्यात १८ लाख शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. मार्चअखेर भंडारा, गोंदिया, ठाणे, पुणे हे चार जिल्हे पाणंदमुक्त होणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. राज्यातील ४५ टक्के कुटुंबांकडेच वैयक्तिक शौचालय होते. उर्वरित ५५ टक्क्यांपैकी ७४ टक्के कुटुंबानी शौचालय बांधकाम केले आहे. ग्रामीण भागात शौचालयाचा वापर वाढल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनोहारी चित्रछटांचा ‘रंगोत्सव’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वारली शैली, अमूर्त शैली, व्यक्तिचित्र, चारकोल, निसर्गचित्र अशा वैविध्यपूर्ण शैलीतील चित्रांचा समावेश असलेले ‘रंगोत्सव’ चित्र प्रदर्शन रसिकांसाठी आकर्षण ठरले आहे. तापडिया नाट्यमंदिराच्या आर्ट गॅलरीत हे चित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. चित्तवेधक छटांचे खुले चित्र प्रदर्शन कलात्मक जागृती करणारे आहे.
उत्तमोत्तम चित्रशैलीतील ‘रंगोत्सव’ चित्र प्रदर्शन तीन ते पाच मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक धनंजय लांबे यांनी शुक्रवारी सकाळी प्रदर्शनाचे उदघाटन केले. यावेळी मनीष धूत, ‘वुई फॉर एन्व्हॉयर्नमेंट’च्या मेघना बडजाते आणि सीमा बडजाते यांची प्रमुख उपस्थिती होती. चित्रकार मोना सेठी, डॉ. अमरजा नगरे, पूनम चिंतामणी-डहाळे व कुणाल बन्सवाल या चार चित्रकारांनी रेखाटलेली लक्षवेधी चित्रे प्रदर्शनात मांडली आहेत. रंगसंगतीचा उत्तम वापर करून चित्रकारांनी प्रत्येक विषय ताकदीने मांडला आहे. कालियामर्दन प्रसंगाच्या पार्श्वभूमीवरील चित्र सद्यस्थितीवर भाष्य करते. तर आईच्या कडेवर विसावलेल्या लहान बाळाचा निरागस चेहरा अंतर्मुख करतो. वारली चित्रातून पारंपरिक कलेचा बाज जपला आहे. चारकोल चित्रांनी वेगळ्या चित्रभाषेचा आविष्कार घडवला असून व्यक्तिचित्र, निसर्गचित्रांचा प्रभाव जाणवतो. आहारतज्ज्ञ असलेल्या मोना सेठी यांनी चित्र काढण्याची आवड जोपासली आहे. ‘कला क्षेत्रात भरपूर पैसे मिळत नसल्यामुळे पालक मुलांना कला क्षेत्रात येऊ देत नाही. स्पर्धेच्या काळात प्रत्येकाला पैसे कमावण्याची ओढ आहे. हा प्रकार भारतीय कला क्षेत्राचा दर्जा खालावण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे सेठी म्हणाल्या. तर वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. अमरजा नगरे यांनी प्रचंड व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत चित्रांना न्याय दिला आहे. ‘हृदय भूलतज्ज्ञ असल्यामुळे जास्त जबाबदारी असते. एका शस्त्रक्रियेसाठी चार-पाच तास जातात. शिवाय तणाव कायम असतो. चित्र काढताना तणाव निवळत असल्याचा अनुभव आहे. चित्रांची आवड मला तणावमुक्त जीवन जगण्यासाठी सहाय्यभूत ठरली’ असे डॉ. नगरे यांनी सांगितले. चित्रांची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे पाठबळ महत्त्वाचे आहे असे चित्रकार पूनम डहाळे यांनी सांगितले. प्रदर्शनाला पहिल्या दिवशी रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सागवानाच्या झाडांवर तोडण्यासाठी खुणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
गौताळा अभयारण्य परिसरातून सागवानाची तस्करी करणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्याची माहिती मोहर्डा येथील गावकऱ्यांनी सांगितले. मोहर्डा व कोळसवाडी शिवाराच्या उत्तरेला जंगलात तोडण्याच्या हेतूने सागवानाच्या झाडांवर कुऱ्हाडीने खुणा करून ठेवल्या आहेत.
गौताळा अभयारण्यात सागवानाची झाडे असून जंगलातून लाकूड तस्करी सुरू असते. गेल्या महिन्यात मोहर्डा शिवारात असाच प्रकार दोन वेळा घडला होता. यावेळी कोळसवाडी शिवाराच्या उत्तरेला गौताळा अभयारण्य परिसरात सागवानाची झाडे तोडण्याच्या उद्देशाने खोडाला कुऱ्हाडीचे घाव घालून खुणा केल्याचे दिसून आले. येथे सागवानाची काही झाडे तोडण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यामागे मोठी टोळी असण्याची भीती स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या प्रकाराकडे वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिलाषने फिरवले श्रीमंतांच्या मुलांना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वर्धन घोडे या मुलाच्या खुनप्रकरणातील सशंयित आरोपी अभिलाष मोहनपूरकर हा परिसरातील वर्धनच्याच वयाच्या पण, श्रीमंताच्या मुलांना कारमध्ये फिरवण्यासाठी घेऊन जात होता, अशी माहिती समोर आली आहे. ही माहिती काही नागरिकांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात जाऊन दिली. दरम्यान, नगर रोडवर जेथे पाच कोटी रुपये ठेवण्यास सांगितले आहे, तेथील हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वर्धन घोडे या दहा वर्षांच्या मुलाच्या खुनप्रकरणी अभिलाष मोहनपुरकर व शाम मगरे हे दोन संशयित आरोपी पोलिस कोठडीत आहेत. वर्धनला ओपन कारमध्ये चक्कर मारायचे आमिष दाखवून आरोपींनी त्याला सोबत नेले होते. वर्धनप्रमाणेच अभिलाष, कॉलनीतील काही श्रीमंताच्या मुलांना देखील कारमध्ये चक्कर मारण्यासाठी घेऊन जात होता, अशी माहिती समोर आली आहे. आरोपींनी वर्धनचा खून करण्याचे नेमके कारण काय याचा अद्यापही उलगडा झालेला नाही. दरम्यान आरोपींनी चिठ्ठीमध्ये खंडणीची रक्कम औरंगाबाद-नगर रोडवरील स्माइल स्टोन हॉटेलसमोर असलेल्या सुवर्णज्योत ढाब्यासमोर रात्री दोन वाजता टाकून निघून जाण्यास सांगि‌तले होते. या अनुषंगाने देखील तपास करण्यात येत आहे. वर्धनचा खून झाला त्यावेळी व नंतर या हॉटेलमध्ये कोण संशयित होते याचा देखील तपास करण्यात येणार आहे. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टेशनवर पकडला तीस किलो गांजा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात तस्करीसाठी आणलेल्या ३० किलो गांजासह आंध्रप्रदेश येथील दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. ही कारवाई शुक्रवारी दुपारी रेल्वेस्टेशनच्या पार्किंगमध्ये करण्यात आली. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही जण शुक्रवारी दुपारी मोठ्या प्रमाणावर गांजा घेऊन येणार आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये सापळा रचण्यात आला. यावेळी संशयित आरोपी सुशीलकुमार गुड्डू पचांडी (वय २३) व गणेश सुबराव शेट्टी (वय ३५ रा. बोंडाम, ता. अरकुहली, जि. विशाखापट्टणम, आंध्रप्रदेश) यांना अटक करण्यात आली. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ ३० किलो ३० ग्रॅम गांजा व रोख पाचशे रुपये सापडले. त्यांना अटक करून मुद्देमालासह उस्मानपुरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. जमादार संतोष सोनवणे यांच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त राहूल श्रीरामे, एसीपी रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, पीएसआय प्रशांत आवारे, विजय पवार, संतोश सोनवणे, सुधाकर राठोड, सिद्धार्थ थोरात, योगेश गुप्ता, विरेश बने, शेख नवाब, लालखान पठाण, नंदलाल चव्हाण, प्रभाकर राऊत, धर्मराज गायकवाड, चंद्रकांत सानप, शेख बाबर आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सफाई कामगारांची हॉस्पिटलमध्ये आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चिकलठाण्याजवळील धूत हॉस्पिटलच्या छतावर सफाई कामगाराचा गळफास घेतलेला मृतदेह शुक्रवारी दुपारी सापडला. मिलिंद भगवान सोनकांबळे (वय २३ रा. शहानगर, सिंधीबन, मसनतपूर), असे या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिलिंद हा सफाई कामगार म्हणून धूत हॉस्पिटलमध्ये कार्यरत होता. विवाहित असलेल्या मिलिंदला सहा महिन्यांपूर्वीच मुलगा झाला होता. तो गुरुवारी दिवसा काम करून रात्री आठ वाजता घरी परतला. पण, रात्री पुन्हा ड्युटीला जायचे असल्याचे सांगत डब्बा घेऊन घराबाहेर पडला. मिलिंदच्या मित्राने शुक्रवारी सकाळी आठ वाजता त्याच्या घरी जाऊन मिलिंद रात्री ड्युटीवर का आला नाही, अशी विचारणा केली. मिलिंद शुक्रवारी दुपारपर्यंत घरी परतला नसल्याने नातेवाईकांनी त्याचा जेवणाचा डब्बा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले व चौकशी केली असता भेट झाली नाही. दरम्यान, हॉस्पिटलच्या शेजारील इमारतीच्या वॉचमनला दोन इमारतींमधील पाइपला एक मृतदेह लटकत असल्याचे दिसले. या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली असता तो मिलिंदचा असल्याचे दिसून आले. मिलिंदच्या नातेवाईकांना तसेच सिडको एमआयडीसी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. एमआयडीसी सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मिलिंद यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पीएसआय मुकेश कुरेवाड तपास करत आहेत.

आत्महत्या की घातपात
मिलिंदचा मृतदेह हा दोन इमारतीच्या गॅपमध्ये ३० फूट खोल दोरीने लटकलेल्या अवस्थेत आढळला. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार मिलिंदला आत्महत्या करण्याचे काही कारण नव्हते. त्यामुळे हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकेचा अधिकारीच निघाला आरोपी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ग्राहकाच्या क्रेडीट कार्डवरील पावणेदोन लाखांचे बोनस पॉइंट परस्पर मित्राच्या खात्यावर वळते करणाऱ्या एचडीएफसी बँकेच्या सेल्स एक्झिकेटिव्हला सायबर सेलने अटक केली. याप्रकरणी २० फेब्रुवारी रोजी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
डॉ. हिरू गुरुसहानी (वय ६२ रा. गुरूसहानीनगर, एन चार, सिडको) यांच्याकडे एचडीएफसी बँकेचे क्रेडीट कार्ड आहे. अज्ञात हॅकरने यांच्या कार्डवर असलेले पावणे दोन लाखांचे बोनस पॉइंट कमी केले होते. १३ फेब्रुवारी २०१७ रोजी हा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर सेलच्या पथकाने तपास केला असता एचडीएफसी बँकेतील सिनीयर सेल्स एक्झिकेटिव्ह धनंजय रामलाल भावसार (वय २५ रा. गल्ली क्रमांक ११, पुंडलिकनगर) याने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले. भावसार हा १८ मार्च २०१४ ते २३ फेब्रुवारी २०१७ पर्यंत बँकेत कामाला होता. या कालावधीत त्याने स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा मित्र अरुण साहेबराव हिवाळे याच्या खात्यावर हे बोनस पॉइंट ट्रान्सफर केले होते. भावसारला मुकुंदवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त संदिप आटोळे, एसीपी रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उन्मेश थिटे, पीएसआय नितीन आंधळे, हेमंत तोडकर, जमादार विजय राजपूत, धुडकू खरे, विवेकानंद औटी, रेवननाथ गवळे, सुशांत शेळके, नितीन देशमुख, रवि खरात, प्रदिप कुटे, प्रशांत साकला, सुदर्शन एखंडे , अतुल तुपे, धनंजय सानप,कल्पना जांबोटकर व शिल्पा तेलोरे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टू व्हीलर शिकून जणू झाला पुनर्जन्म

$
0
0

म. टा. प्र‌तिनिधी, औरंगाबाद
‘इतके वर्षे उलटली. कधी टू-व्हीलर चालवली नाही. कधी पती, कधी भाऊ, कधी मुलांच्या मागे बसून कामे केली. आता मात्र प्रत्येकाचे आपले वेळापत्रक. स्वतःची कामं. यामुळे अडचण व्हायची त्यांची. सारख मुलांच्या मागे लागणे त्यांना जमायचे नाही. ऑटोही परवडत नव्हता. घरी बसून खूप कंटाळा आला होता. नुसत्या घरात अडकून पडल्या होत्या त्या. शेवटी एकदाचा निर्णय घेतला आणि वयाच्या साठाव्या वर्षी टू व्हीलर शिकण्याकडे माझ्याकडे आल्या. ज्या दिवशी त्यांनी गाडी शिकली त्या अक्षरक्षः माझ्या गळ्यात पडून रडत होत्या. चार ‌भिंतीच्या आत कैद झाले होते. तुम्ही मला नवे जीवनदान दिले...,’ या शब्दांमध्ये त्यांनी आभार व्यक्त केले.
प्रतापनगरच्या ओम टू व्हीलरच्या संचालिका संगीता सुरेश गायकवाड आपल्या टू व्हीलर क्लासविषयी मोठ्या आत्मविश्वासाने बोलत होत्या. तू चांगली गाडी शिकवते, असे मैत्रिणी म्हणायच्या. त्यांच्या आग्रहामुळे २०१०पासून संगीतांनी प्रतापनगरमध्ये टू व्हीलर प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. हळुहळु यामध्ये त्यांना यशस्वी करिअर दिसायला लागले. तेव्हापासून त्या सकाळी ९ ते दुपारी ५ या वेळेत प्रशिक्षण देतात. विशेष म्हणजे त्यांचे पती, मुलगा व मुलगी सुद्धा व्यावसायिक बाइक रेसर आहेत. स्वतः संगीता सुद्धा वेगवेगळ्या बाइक चालवतात व इच्छुकांना हेव्हीवेट बाइक चालवणे शिकवतात, पण क्लासमध्ये लाइटवेट गाड्या शिकणाऱ्यांचे प्रमाण मात्र जास्त आहे, तर सर्वच वयोगटातील महिला त्यांच्याकडे गाडी शिकायला येतात.
कधी सायकलही न चालवणाऱ्या महिला जेव्हा पहिल्यांदा गाडीवर बसतात, तेव्हा त्यांना अक्षरक्षः घाम फुटतो. त्यांची मानसिक स्थिती विचारात घेऊन, ‌भीती घालवून त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हे गाडी चालवण्यापेक्षाही कठीण असते, पण एकदा बॅलन्स आले की, काम थोडे सोपे होते. प्रशिक्षण कालावधी १२ दिवसांचा असला, तरी संगीता गाडी चालवता येईपर्यंत प्रशिक्षण सुरू ठेवतात. एकदा गाडी आल्यावर मात्र त्यांच्या आनंदाला पारावार नसतो. आनंदाने उड्या मारून त्या गळ्यात पडतात आणि खूप रडतात. आपल्याला गाडी चालवता येते याचा आनंद व विश्वास त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतो. अगदी त्यांच्या प्रत्येक उत्साहात त्या मलाही सहभागी करून घेतात, असेही संगीतांनी सांगितले.
सुरुवातीला एका गाडीवर आपले करिअर सुरू करणाऱ्या संगीतांकडे आज पाच गाड्या आहेत. महिलांना स्वावलंबी बनवताना याही क्षेत्रात एक महिला यशस्वी क‌रिअर करू शकते हे संगीता गायकवाड यांनी दाखवून दिले.

लायसन्स, हेल्मेट बंधनकारक
रॅलीमध्ये सहभागी होताना महिलांना लायसन्स आणि हेल्मेट बाळगणे बंधनकारक आहे. सोबत गाडीची कागदपत्रे ठेवावी. वाहतुकीचे सर्व नियम पाळावेत. बाइकसह मोपेड आणि नॉन गिअर गाड्या घेऊनही रॅलीत सहभागी होता होईल.

अशी करा नोंदणी
सहभागासाठी पूर्वनोंदणी करणे अनिवार्य आहे. allwomenbikerally.com या साइटवर जाऊन नोंदणी करता येईल; तसेच BIKERALLYABG हा एसएमएस ५८८८८ या कमांकावर पाठवूनही नोंदणी करता येईल.

रॅलीचा मार्ग
ऑल वुमन बाइक रॅलीला हॉटेल मॅनोर इथून सकाळी साडेसात वाजता सुरुवात होईल. क्रांती चौक - उस्मानपुरा स्वेअर - बन्सीलालनगरमार्गे रेल्वे स्टेशन चौक ते आरटीओ कार्यालयासमोरून बाबा पेट्रोल पंपमार्गे मुख्य बसस्थानकासमोरून मिल कॉर्नर चौक ते अंजली टॉकिजकडे जाणारा रस्ता - महात्मा फुले चौक ते सरस्वती भुवन कॉलेज समोरून निराला बाजारकडून समर्थनगरकडे जाणारा रस्ता - सावरकर चौक सिग्नलमार्गे - नूतन कॉलनीमार्गे क्रांती चौक व हॉटेल मॅनोर येथे समारोप.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दलितांच्या हक्कासाठी पाठपुरावा करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

‘दलित, पीडित, उपेक्षित आणि शोषित वर्गाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. ती आपली जबाबदारी असून, प्रश्‍न सोडवण्यासाठी पाठपुरावा करू,’ अशी ग्वाही खासदार अमर साबळे यांनी दिली. लवकरच दलित हक्काच्या जाहीरनाम्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार साबळे यांनी शुक्रवारी सुभेदारी विश्रामगृहावर दलित, ओबीसी कार्यकर्त्यांकडून समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी भूमिका स्पष्ट केली. यावेळी नगरसेवक राजू शिंदे, जालिंदर शेडगे, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष उत्तम अंभोरे यांची उपस्थिती होती. खासदार साबळे म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या योजना उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. येत्या संसद अधिवेशनात केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. त्यानंतर विधानसभा अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. समाजकल्याण विभागाचा निधी इतरत्र वळ‍वू नये यासाठी आंध्रप्रदेश व कर्नाटकाने कायदा केला आहे. त्या धर्तीवर वेगळे हेड निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. अट्रॉसिटी कायदा अंमलबजावणीसाठी स्थापन झालेल्या जिल्हा समित्या सक्षम नसून नाहीत. अनेक ठिकाणी संबंधित जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक समिती सदस्यांना बोलू देत नसल्याच्या तक्रारी आहेत, असे खासदारांनी सांगितले. या कायद्याची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद शेळके, गौतम खरात, नागराज गायकवाड, अशोक भातपुडे, प्रा. प्रशांत साठे, डॉ. राम बुधवंत, आनंद लोखंडे आदी उपस्थित होते.

अंबावडेत होणार पर्यटनस्थळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव अंबावडे (ता. रत्नागिरी) हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ होणार आहे. होलोग्राम तंत्राने बाबासाहेब स्वत: आत्मचरित्र सांगतील, अशी आगळीवेगळी संकल्पना असून, जगभरातील अनुयायांसाठी हे प्रेरणास्थळ होईल, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे गाव खासदार साबळे यांनी दत्तक घेतलेले आहे. या गावाची लोकसंख्या २५४ लोकसंख्या असून येथे गेल्यानंतर स्फूर्ती संचारावी, अशी ही संकल्पना आहे. बाबासाहेबांमुळे पावन झालेल्या या गावाचा विकास करण्याचा संकल्प केंद्र शासनाने घेतला आहे. या ठिकाणी चैत्यभूमी, दीक्षाभूमी, बाबासाहेबांचे लंडन येतील वास्तव्य असलेली इमारत, देश-विदेशातील त्यांची स्मारके, बाबासाहेब जिथे जिथे गेले, त्या ठिकाणची मॉडेल्स असणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. यासाठी मुख्यमंत्र्यांनी चाळीस कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. या शिवाय मुंबई- गोवा महामार्ग अंबावडे गावातून वळविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन ३५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे खासदार साबळे यांनी सांगितले. हे काम दोन वर्षांत पूर्ण केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाइक रॅली म्हणजे सळसळता उत्साह

$
0
0

औरंगाबादः रुटीन आयुष्य जगताना प्रत्येकाला चेंज हवाच असतो. ‘मटा’ची ऑल वुमन बाइक रॅली हाच तो चेंज आहे. महिलांच्या शक्तीप्रदर्शनापेक्षाही रोजच्या आयुष्यातला एक बदल आहे. आपल्या ग्रुपसह, आपल्या मैत्रिणींबरोबर बाइक रॅली एन्जॉय करणे म्हणजे स्वतःला क्वालिटी टाइम देणे. हाच क्वालिटी टाइम मिळतो म्हणून यंदाही ऑल वुमन बाइक रॅलीमध्ये सहभागी होण्याचे स्वप्न घेऊन सर्वजणी तयारीला लागल्या आहेत.

मी सहा वर्षांपासून गाडी चालवते, पण कामनिमित्तच. बाइक रॅलीमध्ये तुम्ही केवळ स्वतःसाठी गाडी चालवत असता. गेल्या वर्षी मी पहिल्यांदा सहभागी झाले तेव्हा हेच अनुभवले. हाच दृष्टिकोन ठेऊन मी यंदाही ‘मटा’च्या बाइक रॅलीमध्ये येणार आहे.

- यामिनी होले, नोकरदार

बाइक रॅलीमधे सहभागी होण्याचे दुसरे वर्ष. माझ्यासाठी ती एकदम चैतन्यमयी सकाळ असते. रणरागिणींचा सळसळता उत्साह वाखाणण्यासारखा असतो. असा उपक्रम आयोजित करून ‘मटा’ने आपले वेगळे वैशिष्ट्य जपले आहे.

- अॅड. माधुरी अदवंत, नगरसेवक

बाइक रॅली हा एक छान अनुभव होता. स्वतःची नवी ओळख होऊन माझी मला मी भेटले. सगळ विसरून त्यादिवशी निखळ आनंद लुटला. डान्स, वन‌ मिनिट शो, फेटे, फोटोसेशन सगळ काही मस्त होता. स्वत:तल्या स्त्रित्वाची ओळख करून देणारी ही बाइक रॅली म्हणूनच मला खूप आवडते.

- अंबिका टाकळकर, आरंभ ऑटझिम सेंटर

गेल्या वर्षी मी ‘मटा’च्या बाइक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. इतक्या महिलांना सेलिब्रेशन करताना पाहून खूप छान वाटत होते. मला स्वतःलाही खूप मजा आली. यंदाही बाइक रॅली यशस्वी होईल, असे मला वाटते. मी सुद्धा सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे.

- शिल्पाराणी वाडकर, नगरसेवक

महिला दिनाच्या निमित्ताने महिला शक्तीचे एकत्रिकरण करणारी ’मटा’ची बाइक रॅली मला मनापासून आवडते. मी माझी लहान बहीण, माझी आई आम्ही सगळेच दरवर्षी रॅलीमध्ये सहभागी होतो. महिलाशक्तीचे दर्शन घडवणाऱ्या बाइक रॅलीमध्ये सर्वांनी आर्वजून यावे.

- स्नेहा वेद, आहारतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्थपूर्ण चित्रपटांची निर्मिती हवी : उसगावकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘दरवर्षी शंभर-सव्वाशे मराठी चित्रपटांची निर्मिती होते, पण चित्रपटांची संख्या वाढली म्हणजे गुणवत्ता वाढत नाही. अर्थपूर्ण चित्रपटांची निर्मिती करून ते प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याची गरज आहे. चित्रपटातून चांगला संदेश देणे हा निर्माता-दिग्दर्शकांचा उद्देश पाहिजे,’ असे प्रतिपादन अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी केले. कलाकार-तंत्रज्ञ यांच्या स्नेहमेळाव्यात त्या बोलत होत्या.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे विभागीय कार्यालय औरंगाबाद शहरात सुरू करण्यात आले आहे. यानिमित्त रामचंद्र हॉल येथे शुक्रवारी कलाकार-तंत्रज्ञ स्नेहमेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाला अभिनेत्री वर्षा उसगावकर, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सुनील मांजरेकर, धनाजी यमकर, संजय ठुबे, सतीश बीडकर, दीपक चौधरी, सुरेंद्र पन्हाळकर, अजित शिरोळे, सतीश रणदिवे, पितांबर काळे, विशाल पवार व मच्छिंद्र चाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठवाड्यातील कलाकार व दिग्दर्शकांना हक्काचे विभागीय कार्यालय देण्यामागची भूमिका उसगावकर यांनी स्पष्ट केली. ‘माझा जन्म गोव्यातील असला, तरी अभिनयाचे औपचारिक शिक्षण मराठवाड्याने दिले. डॉ. लक्ष्मणराव देशपांडे यांना गुरुस्थानी मानते. गोवा सोडल्यानंतर औरंगाबाद शहर मला रूक्ष वाटले होते, मात्र इथल्या लोकांचे प्रेम आणि आत्मियता पाहून गोव्याचा विसर पडला. मराठी चित्रपट ग्लोबल झाला असून, स्थानिक पातळीवर चित्रपट निघत आहेत. या चित्रपटांनी दर्जा राखत मनोरंजन करावे,’ असे उसगावकर म्हणाल्या.
चित्रपट महामंडळाच्या नियोजित प्रकल्पाची माहिती राजेभोसले यांनी दिली. ‘सध्या मराठी चित्रपटांना वितरण व चित्रपटगृह नसण्याची समस्या जाणवत आहे. त्यामुळे तालुकास्तरावर छोटे चित्रपटगृह सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला दिला आहे. महामंडळाच्या कार्यालयाचा कारभार सुरळीत करीत स्क्रिप्ट नोंदणीसुद्धा सुरू केली आहे. डिजिटायजेशन करीत ऑनलाइन शुल्क भरणे व घरपोच ओळखपत्र मिळण्याची सुविधा लवकरच सुरू होईल. मराठी माध्यमात ‘एफटीआय’सारखी दर्जेदार संस्था सुरू करण्याचा महामंडळाचा विचार आहे,’ असे राजेभोसले म्हणाले. विशाखा रूपल यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते व दिग्दर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्टेशन परिसरात कार्यालय
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे कार्यालय रेल्वे स्टेशन रोडवरील लाभ चेंबर्स येथे सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयात नोंदणी करून संबंधितांना ओळखपत्र व इतर तांत्रिकी माहिती मिळणार आहे. या कामासाठी इतर शहरात जाण्याची गरज नाही; तसेच सिंगल स्क्रिन थिएटर, टुरिंग टॉकिजचे प्रश्न सोडवण्यासाठी महामंडळ काम करणार आहे. यावर्षीचा मराठी चित्रपट वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा आणि चित्रकर्मी पुरस्कार वितरण सोहळा औरंगाबाद शहरात घेणार असल्याची घोषणा राजेभोसले यांनी केली.

मेळाव्यात वादावादी
चित्रपट महामंडळाच्या विभागीय कार्यालयाचा कारभार बदनाम लोकांच्या हाती सोपवू नका. अन्यथा, पुन्हा इथे दुकानदारी सुरू होईल. कलाकारांची आर्थिक फसवणूक करणारे लोक कार्यालयात कशासाठी आले असा सवाल करीत दिग्दर्शक भरत अधाने यांनी स्नेहमेळाव्यात आक्षेप घेतला. एकमेकांच्या उणिवा काढण्यापेक्षा सर्वांनी एकत्रित काम करा, असा सल्ला राजेभोसले यांनी दिला. या प्रकारामुळे काही वेळ मेळाव्यात गोंधळ उडाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बीएड’मध्ये विधी विद्यापीठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबादमध्ये २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून विधी विद्यापीठ सुरू होत आहे. सुरुवातीची काही वर्षे या विद्यापीठाचे वर्ग शासकीय अध्यापक महाविद्यालयात भरणार आहेत. विद्यापीठाची प्रशासकीय इमारतही पूर्णपणे तयार आहे.
बीएड कॉलेज तात्पुरत्या स्वरुपात जुन्या इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. विद्यापीठाच्या सगळ्या नियोजनाबाबत शनिवारी नवनियुक्त कुलगुरू एस. सूर्यप्रकाश यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक होणार आहे.
राज्यात औरंगाबादसह मुंबई आणि नागपूर येथे विधी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. नागपूर आणि मुंबईचे विधी विद्यापीठ सुरू झाले. औरंगाबादचे विद्यापीठ येत्या शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित होत आहे. त्यासाठी कुलगुरूंची निवड झाली आहे. करोडी येथे ५० एकरांवर हे विद्यापीठ उभारण्यात येणार आहे. सुरुवातीला विद्यापीठाचे वर्ग पद्मपुरा परिसरातील शासकीय बीएड कॉलेजमध्ये भरविण्यात येणार आहेत. त्याची तयारी पूर्ण झालेली आहे.

इमारतीचे काम पूर्ण
तात्पुरत्या स्वरुपात काहीवर्ष विद्यापीठाचे वर्ग बीएड कॉलेजमध्ये भरतील. त्यासाठी विद्यापीठाचे प्रशासकीय कामकाज बीएड कॉलेजसमोरील इमारतीत होईल. त्या इमारतीची आवश्यक ती डागडुजी करण्यात आली आहे. तेथे २०१५मध्येच सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डागडुजीसाठी १ कोटी ५२ लाख ५० हजार रुपये खर्च मंजूर करण्यात आले होते. या इमारतीत ग्रंथालय, अभिरूप न्यायालयाची उभारणी, विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र रूम असतील. या इमारतीची साफसफाई पुन्हा केली जात आहे.

आज बैठक
विधी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नियुक्तीनंतर पुढील नियोजनाबाबत शनिवारी महत्वाची बैठक होत आहे. कुलगुरू एस. सूर्यप्रकाश, उच्च व तंत्रशिक्षण प्रधान सचिव सीताराम कुंटे, उपसचिव सिद्धार्थ खरात, संचालक, विभागीय सहसंचालक यांच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे. शासकीय बीएड कॉलेजमध्ये सकाळी १०पासून ही बैठक होणार आहे. कॉलेज इमारत, वर्ग खोल्यांची पाहणी, प्रशासकीय इमारतीची पाहणी करण्यात येणार आहे. त्यासह देशपातळीवर होणाऱ्या ‘कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट’द्वारे (क्लॅट) प्रवेश प्रक्रिया करण्यासाठीचा प्रस्तावाबाबतही याच बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले

अभ्यासक्रम..
- बीए एलएलबी
- बीकॉम एलएलबी
- एलएलएम

नियोजनासंदर्भात ही बैठक आहे. विद्यापीठाची पुढील प्रक्रिया निश्चित वेगवान असेल. जागतिक दर्जाचे इन्स्टिट्यूट बनविण्यासाठी आपला प्रयत्न असेल.
- एस. सूर्यप्रकाश, कुलगुरू, विधी विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विनाटेंडर शामियाने; अधिकाऱ्यांना नोटीस

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिका निवडणुकीतील तंबूंनी अधिकाऱ्यांची झोप उडवली आहे. मतदान केंद्रांबाहेर तंबू उभारण्यात आले, पण त्यासाठी निविदा काढण्यात आली नव्हती असे लक्षात आल्यावर तब्बल २३ महिन्यांनी आयुक्तांनी तीन अधिकाऱ्यांना कारणेदाखवा नोटीस बजावली आहे.
एप्रिल २०१५ मध्ये महापालिकेची निवडणूक झाली. निवडणुकीच्या वेळी विविध मतदानकेंद्रांच्या बाहेर शामियाने उभारण्यात आले. शामियान्यांसाठी लाखोंचा खर्च करण्यात आला. पालिकेच्या अंतर्गत कोणतेही काम करताना त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असते. निवडणुकीसाठीचे साहित्य खरेदी करून ते मतदान केंद्रांना आवश्यकतेनुसार पुरवण्याची जबाबदारी पालिकेच्या भांडार विभागाची आहे. भांडार विभागाने शामियाने उभारताना टेंडर काढले नाही, आपल्या मर्जीतल्या कंत्राटदाराकडून शामियाने टाकून घेतले व त्याचे बिल देखील देवून टाकले ही बाब आता आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या लक्षात आली आहे. त्यांनी या संदर्भात प्रभारी मुख्यलेखाधिकारी संजय पवार, लेखाधिकारी व त्यावेळचे भांडार विभागाचे प्रमुख एन. जी. दुर्राणी व अन्य एका अधिकाऱ्याला कारणेदाखवा नोटीस बजावली आहे. सात दिवसात नोटीसचे उत्तर देण्याचे या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रस्तावात घुसडले काम झालेले रस्ते

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ज्या रस्त्यांचा डिफेक्ट लायब्लिटी पिरेड (डीएलपी) बाकी आहे, अशा रस्त्यांचा समावेश शासनाकडे पाठवायच्या प्रस्तावात केल्याने शनिवारी आमदारांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. ज्या रस्त्यांची कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करणार आहे त्या रस्त्यांचा समावेशही प्रस्तावात असल्याचे पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले.
शहर विकासाच्या संदर्भात महापौर भगवान घडमोडे यांनी शहराशी संबंधित असलेल्या सर्व आमदार, खासदारांची बैठक महापौर बंगल्यात आयोजित केली होती. अशा प्रकारची बैठक गेल्या काही वर्षात प्रथमच झाली. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत अर्थसंकल्पाच्या अनुशंगाने नियोजन समितीची बैठक काही दिवसांपूर्वी झाली. यावेळी मुनगंटीवार यांनी शहरातील रस्ते विकासासाठी दोन टप्प्यात दीडशे कोटी देण्याचे मान्य केले. रस्त्यांचा प्रस्ताव आठ दिवसांत पाठवा, अशी सूचना आयुक्तांना केली. हा प्रस्ताव पाठवण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी आज महापौर बंगल्यात बैठक झाली. प्रस्तावातील रस्त्यांची यादी वाचण्याचे काम आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी बैठकीत सुरू केले. एक - दोन वर्षांपूर्वी ज्या रस्त्यांची कामे केली त्या रस्त्यांचाही समावेश या यादीत केल्याचे लक्षात आल्यावर आमदार अतुल सावे, सतीश चव्हाण यांनी आक्षेप घेतला. महर्षी दयानंद चौक ते शहानूरमिया दर्गा चौक या रस्त्याचा समावेश शासनाकडे पाठवायच्या प्रस्तावात केला होता. सतीश चव्हाण यांनी या रस्त्याच्या समावेशाबद्दल आक्षेप घेतला. या रस्त्याचा डिफेक्ट लायब्लिटी पिरेड आणखीन तीन वर्ष असताना हा रस्ता प्रस्तावात कसा काय घेतला, असे ते म्हणाले. मध्यवर्ती बसस्थानक ते ज्युबलीपार्क या रस्त्याचाही समावेश प्रस्तावाच्या यादीत करण्यात आला, अतुल सावे यांनी त्यास आक्षेप घेतला. पाच महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे काम केले, पुन्हा हा रस्ता प्रस्तावात कसा काय घेतला असे ते म्हणाले. शिवाय या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करणार आहे, मग शासनाचा निधी या रस्त्यासाठी कशासाठी वापरता. हाच निधी अन्य रस्त्यांसाठी वापरता येईल, अशी सूचना त्यांनी केली. जालना रोडला साइड रोड सोडण्यात आले आहेत. या साइड रोडचे काम शासनाच्या निधीतून करण्याचा उल्लेख यादीत केला होता. संपूर्ण जालना रोडसह साइड रोडचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जाणार आहे, असे असताना पालिकेचे प्रस्तावात त्याचा उल्लेख कसा काय केला, असा सवाल सावे यांनी केला.

ते रस्ते वगळणार
आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देणे आयुक्त बकोरिया व कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांना शक्य झाले नाही. ज्या रस्त्यांचा डिफेक्ट लायब्लिटी पिरेड बाकी आहे व ज्या रस्त्यांची कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केली जाणार आहेत, त्या रस्त्यांची नावे शासनाकडे पाठवायच्या प्रस्तावातून वगळा अशी सूचना आमदारांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीडशे कोटींचा प्रस्ताव शासन दरबारी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील रस्ते विकासाचा दीडशे कोटींचा प्रस्ताव मंगळवारी शासनाला सादर केला जाणार आहे. या संदर्भात शनिवारी महापौर बंगल्यात विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीकडे खासदार चंद्रकांत खैरे यांनी पाठ फिरवली. त्यामुळे खैरे यांच्या उपस्थितीत पुन्हा बैठक होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रस्ते विकासासाठी दीडशे कोटींचा प्रस्ताव महापालिकेला शासनाकडे पाठवायचा आहे. या प्रस्तावाच्या अनुशंगाने चर्चा करण्यासाठी महापौर भगवान घडमोडे यांनी बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, सतीश चव्हाण, इम्तियाज जलील, संजय शिरसाट, सुभाष झांबड, उपमहापौर स्मिता घोगरे, स्थायी समितीचे सभापती मोहन मेघावाले, आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांच्यासह पालिकेचे अन्य अधिकारी देखील उपस्थित होते.
महापालिकेने रस्ते विकासासंबंधीचा २६० कोटींचा प्रस्ताव यापूर्वीच पाठवला आहे. यात फेरफार करून १५० कोटींचा प्रस्ताव आता शासनाकडे पाठवावा लागणार आहे. त्या दृष्टीने या बैठकीत चर्चा झाली. आयुक्तांनी २६० कोटींच्या प्रस्तावातील रस्त्यांची यादी वाचून दाखवली. या पैकी कोणते रस्ते नव्यान प्रस्तावात घ्यायचे ते ठरवा, असे ते म्हणाले. आमदार सतीश चव्हाण, सुभाष झांबड यांनी ती यादी आम्हाला पाठवा. आम्ही आमच्या मतदारसंघातील रस्त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून त्याची माहिती हरीभाऊ बागडे यांना देतो. बागडेंच्या कार्यालयात रस्त्यांची नावे एकत्रित करून त्याचा प्रस्ताव तयार केला जाईल, त्यानंतर तो प्रस्ताव शासनाला सादर करा, असे सूचवले व हे दोन्हीही आमदार बैठकीतून निघून गेले. चव्हाण , झांबड बैठकीतून निघून गेल्यावर पुन्हा थोडावेळ बैठक चालली. दोन दिवसांत प्रस्ताव तयार करण्याची सूचना यावेळी आयुक्तांना करण्यात आली. महापौर बंगल्यावर सुमारे तीन तास बैठक सुरू होती, पण या बैठकीला खासदार चंद्रकांत खैरे आले नाहीत. त्यांचे विश्वासू नगरसेवक नंदकुमार घोडेले मात्र, काही वेळासाठी बैठकीला हजर होते. त्यांनी बैठकीत सुरू असलेल्या चर्चेचा अंदाज घेतला.
बैठकीच्या नंतर पत्रकारांशी बोलताना महापौर भगवान घडमोडे म्हणाले, ‘बैठकीला खासदारांना बोलवले होते, पण ते एका अंत्ययात्रेसाठी गेल्यामुळे बैठकीला येऊ शकले नाहीत. रस्त्यांचा सर्वसमावेशक प्रस्ताव तयार करून मंगळवारी शासनाकडे सादर केला जाईल.’

रस्त्यांची पीएमसी २३ मार्चपर्यंत
दीडशे कोटींच्या रस्त्यांसाठी महापालिकेतर्फे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) नियुक्त केली जाणार आहे. २३ मार्च पर्यंत पीएमसीची नियुक्ती होईल. रस्त्यांच्या कामाचे डिझाइन तयार करण्यापासून रस्त्यांची कामे योग्य प्रकारी पूर्ण होईपर्यंत पालिकेच्यावतीने पीएमसी काम करणार आहे, ही माहिती आयुक्तांनीच बैठकीत दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैलासनगर - एमजीएम रस्ते काम मार्चअखेरीस

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कैलासनगर - एमजीएम रस्त्याच्या कामाचा मुहूर्त मार्च महिन्याच्या अखेरीस लागणार आहे. नाल्यावरच्या पुलाचे काम वगळता दोन्हीही बाजूने रस्त्याचे काम सुरू केले जाईल, असा शब्द महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी लोकप्रतिनिधींना दिला.
शहरातील रस्त्यांच्या कामाचा प्रस्ताव तयार करण्यासाठी शनिवारी महापौर बंगल्यात बैठक झाली. या बैठकीत आमदार अतुल सावे यांनी लक्ष्मणचावडी - कैलासनगर - एमजीएम रस्त्याचा मुद्दा उपस्थित केला. या रस्त्याचे काम केव्हा सुरू करणार असे ते म्हणाले. महावीर चौक ते क्रांतिचौक या रस्त्याच्या कामासाठीची तरतूद कैलासनगर - एमजीएम रस्त्यासाठी वळती करण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे, पण अद्याप काम सुरू झालेले नाही. या रस्त्याचे काम झाल्यास जालना रोडला समांतर रस्ता होईल व वाहतुकीची कोंडी सुटेल असे ते म्हणाले.
कैलासनगर ते एमजीएम रस्त्याच्या कामाचे नियोजन झाले असून मार्च अखेरपर्यंत या रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल, असे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया म्हणाले. कैलासनगर स्मशानभूमीला लागून असलेल्या नाल्यावर पूल बांधावा लागणार आहे. सध्या पूल बांधण्याचे काम न करता दोन्हीही बाजूने पुलाला जोडल्या जाणाऱ्या रस्त्याचे काम प्रथम केले जाणार आहे. न्यायलयीन प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर पुलाचे काम करू, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोडके यांचा पोहताना हार्ट अॅटॅकने मृत्यू

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एमजीएम जलतरण तलावावर पोहताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने रमेश मुरलीधर घोडके (वय ४२ वर्ष) यांचा शनिवारी (४ मार्च) मृत्यू झाला. सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
मुकुंदवाडी परिसरातील संघर्षनगर येथील रहिवासी असणारे रमेश घोडके यांचा जलतरणाचा हा चौथाच दिवस होता. शनिवारी ते आपल्या मित्रांसमवेत जलतरणासाठी गेले. काही काळ पोहल्यानंतर पायरीवरून पाण्यातून बाहेर येत असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. ते पाण्यात पडले. सुरक्षारक्षकांनी त्यांना तत्काळ पाण्याबाहेर काढले आणि एमजीएम रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या पूर्वीही या तलावात अशा घटना घडलेल्या आहेत.

उपचार सुरू होते
घोडके यांचे मुकुंदवाडी परिसरात हेअर सलूनचे दुकान आहे. त्यांना पत्नी, एक मुलगा व एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. घोडके यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ह्रदयरोगावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार व्ही. आर. वाघ हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images