Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अण्णांच्या पत्रामुळे पालिका हलली

$
0
0

Unmesh.Deshpande@timesgroup.com
Tweet : @UnmeshdMT

औरंगाबादः ‘औरंगाबाद महापालिकेत टक्केवारीशिवाय बिले निघत नाहीत. या प्रकरणात आयुक्तांनी व्यक्तीशः लक्ष घालावे,’ अशा आशयाचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे पत्र प्राप्त झाले आणि महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. हजारेंच्या पत्रामुळे तीन वर्षांपासून रखडलेले २३ लाख ७५ हजारांचे बिल आता पुरवठादाराला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना २०१४ मध्ये ६२० सायकलींचे वाटप केले. अहमदनगर येथील संजय ट्रेडर्स या पुरवठादाराला सायकल पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले होते. कंत्राटानुसार पुरवठादाराने महापालिकेला सायकल उपलब्ध करून देऊन २३ लाख ७५ हजार रुपयांचे बिल सादर केले होते. महापालिकेने विविध नगरसेवकांच्या वॉर्डातील विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप केल्यावर १२० सायकली शिल्लक राहिल्या. त्याही महिला बाल कल्याण समितीच्या बैठकीत निर्णय घेऊन गरजू विद्यार्थिनींना वाटप करण्यात आल्या. सायकलींचे वितरन केल्यानंतरही महापालिकेने पुरवठादाराला बिलाची रक्कम दिली नाही. बिलाची रक्कम मिळावी यासाठी पुरवठादाराने महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला, परंतु त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही.

दरम्यानच्या काळात या प्रकरणात महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे सरकार’ या वेब पोर्टलवर दोन तक्रारी प्राप्त झाल्या. तीन वर्षांपासून बिल थांबवून ठेवण्यात आले आहे. याची चौकशी करून पुरवठादाराला बिल देण्यात यावे, अशा आशयाचा मजकूर या तक्रारींमध्ये होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी यासंदर्भात महापालिकेच्या आयुक्यांना पत्र पाठविले आहे. पालिकेत टक्केवारीशिवाय बिले काढली जात नाहीत याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आणि आयुक्तांनी स्वतः लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.

हजारे यांच्या पत्रानंतर तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या फाइलला पाय फुटले आणि बिल मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ९ जानेवारी २०१७ रोजी पुरवठादाराला २३ लाख ७५ हजार रुपयांचे बिल देण्यास आयुक्तांनी मान्यता दिली. आयुक्तांच्या मान्यतेनंतरही काही अधिकाऱ्यांनी या प्रकरणात खोडा घालून बिल थांबवण्याचा प्रयत्न केला. ही बाब पुन्हा आयुक्तांच्यास्तरावर लक्षात आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला तत्काळ बिल काढण्याची ताकीद दिली. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी बिलाचे व्हाउचर लेखा विभागात पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आले.

सायकलींच्या पुरवठा करण्यात आल्याच्या संजय ट्रेडर्स यांच्या फाइलमध्ये काही त्रुटी आढळल्यामुळे त्यांचे बिल काढण्यास उशीर झाला, परंतु दोन दिवसांपूर्वी बिलाचे व्हाउचर लेखा विभागात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणात अण्णा हजारे यांनी महापालिकेला पत्र पाठवल्याचे आपल्याला माहिती नाही. आता लवकरच संबंधिकांना बिल दिले जाईल.
- रवींद्र निकम, उपायुक्त, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टार्गेटपूर्तीसाठी कारवाईचा फार्स

$
0
0


म. टा. प्रतिनिधी औरंगाबाद
सध्या जिल्हाभर वाळू तस्करांनी उच्छाद मांडला असताना महसूल विभागाकडून केवळ टार्गेटपूर्तीसाठी कारवाईचा फार्स सुरू आहे. तालुक्यात गेल्या दोन महिन्यांत फक्त २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. वाहने पकडल्यानंतर वाहनधारकांकडून फक्त दंड वसूल करून सोडून देण्यात येत आहे, त्यामुळे या कारवाईबद्दल संशय व्यक्त होतो आहे.
गेल्यावर्षी वाळू लिलावाला फाटा देत तस्करांनी सर्रास चोरी करून मनमानी भावात वाळू विक्रीचा फंडा अवलंबला. यंदाही वाळू लिलावाकडे पाठ फिरवून प्रत्येक तालुक्यात पोलिस आणि महसूलच्या नाकावर टिच्चून तस्करांची वाळू चोरी आणि विक्री सुरू आहे. यामध्ये महसूल पथकाने पकडलेल्या वाहनांवर गुन्हा दाखल न करता दंड वसूल करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये २७ खासगी खदानींना परवानगी आहे. मात्र, किती दगड खदानींतून काढण्यात येतो याचा कोणताही हिशेब महसूलकडे नाही. संबंधित तहसील कार्यालयाकडूनही जिल्हा प्रशासनाकडे वेळेवर अहवाल देण्यात येत नसल्यामुळे प्रशासनाकडे कोणतीही आकडेवारीही उपलब्ध नसते. वाळू तस्करी प्रकरणात वाहनांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे. शिवाय परिवहन विभागाला कळवून या वाहनांचा परवाना रद्द करण्याचाही तरतूद आहे. मात्र, गुन्हा न दाखल करता केवळ दंड वसूल करून महसूल विभाग वाळूतस्करांना अभय देत असल्याचे चित्र औरंगाबाद जिल्ह्यात आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या कारवाईमध्ये केवळ फुलंब्री तालुका वगळता कुठेही वाहने जप्त करण्याची कारवाई झाली नाही. यामुळे वारंवार अवैध वाळू वाहतुकीत पकडण्यात येणारी वाहने पुन्हा रस्त्यावर येत आहेत.

लाखोंची वसुली; गुन्हे केवळ २१
गौण खणिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणांमध्ये एप्रिल ते डिसेंबर या कालावधीमध्ये २ कोटी १६ लाख रुपये वसूल करण्यात आला आहे. यामध्ये औरंगाबाद तालुक्यात ५० लाख ७६ हजार तर अपर तहसील कार्यालय अंतर्गत ३९ लाख ८८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे मात्र केवळ २१ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये सीटीचौक, एमआयडीसी सिडको शहर, चिकलठाणा, करमाड, फुलंब्री या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एआयएमआयएमची कोअर कमिटी बरखास्त

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एमआयएम अर्थात ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमिन’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पक्षाची महाराष्ट्रातली कोअर कमिटी बरखास्त केली आहे.
ओवेसी यांनी एमआयएमच्या विस्तारासाठी जिल्हास्तरीय कमिटी नेमण्यासाठी सहा सदस्यीय कमिटीची नियुक्ती केली होती. राज्यभर दौरा करून या कमिटीच्या सदस्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये कमिटीची नेमणूक केली. या नेमणुकीनंतर नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीत कोअर कमिटीच्या प्रत्येक सदस्यांना प्रत्येकी एक जिल्हा देण्यात आला.
नगरपालिका निवडणुकीत बीड, उदगीर या ठिकाणी ‌यश मिळाले. यासह अन्य काही मोजक्या जागा मिळाल्या. मात्र, पक्षाला अपेक्षित यश पक्षाला मिळविता आले नाही. औरंगाबाद आणि जालनासारख्या भागात ‘एमआयएम’कडे झुकते माप असतानाही या ठिकाणी पक्षाला अपयश मिळाले. या अपयशाबाबतची माहिती ओवेसी यांना पाठविण्यात आली होती. ओवेसी यांनी पत्र पाठवून कोअर कमिटीला पक्ष उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल सदस्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच पक्षाच्या पुढील योगदानात आपण सोबत राहील, अशी अपेक्षा व्यक्त करून कोअर कमिटी बरखास्त केल्याचे सांगितले आहे.

एमआयएम कोअर कमिटीचे काम राज्यभरात जिल्हा कार्यकारिणी स्थापन करण्याचे होते. त्यांनी ते काम केले. त्यामुळे कोअर कमिटीचे काम संपले आहे. त्यामुळे ही कमिती कमिटी बरखास्त करण्यात आली. - सय्यद मोईन, प्रदेशाध्यक्ष, एआयएमआयएम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापतिपदासाठी इच्छुकांचे डोळे मुंबईकडे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांचे सभापतिपद कुणाला मिळणार, याबाबतचा निर्णय मुंबईचा महापौर झाल्यानंतरच ठरणार आहे. तोवर इच्छुकांचे डोळे मुंबईकडे लागले आहेत. नऊपैकी चार पंचायत समित्यांमध्ये भाजपला बहुमत आहे. दोन ठिकाणी शिवसेना - भाजपचे संख्याबळ समान आहे. उर्वरित तीन ठिकाणी दोघे एकत्र आले तरच सत्ता मिळणार आहे.
पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत सिल्लोड, फुलंब्री आणि खुलताबाद पंचायत समितीत भाजपचे निर्विवाद वर्चस्व असून वैजापूरमध्ये एसटी महिला प्रवर्गासाठी सभापतिपद राखीव आहे. तिथे भाजपला तीन जागा मिळूनही सभापतिपदाचा उमेदवार त्यांच्याकडून निवडून आल्याने सत्ता भाजपकडे राहील. गंगापूरमध्ये शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे इथल्या सभापतिपदासाठी समझोता होणार की टॉसवर सभापती निवडला जाणार याबाबत तालुक्यात चर्चा रंगली आहे. कन्नड पंचायत समितीमध्ये (कै.) रायभान जाधव विकास आघाडीची भूमिका महत्वाची ठरणार आहे. औरंगाबाद तालुक्यातही सेना भाजपला एकत्र आल्याशिवाय सत्तेची खुर्ची अशक्य आहे. सोयगावमध्ये काँग्रेसने तीन जागा जिंकल्या असून उर्वरित तीन जागांवर युतीचे उमेदवार विजयी ठरले आहेत. एकूण नऊपैकी चार ठिकाणी भाजपचा सभापती होईल पण उर्वरित पाच पैकी चार ठिकाणी शिवसेना - भाजप एकत्र आल्याशिवाय त्यांना सत्ता मिळणे अवघड आहे. मुंबई महापौरपदावरून राज्यातील सर्वच ठिकाणच्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये पेच निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे इच्छुकांचे डोळे लागले आहेत.

आम्हाला कुठलीच घाई नाही. पक्षाचे वरिष्ठ नेते मुंबईत धोरण ठरवतील. त्यानुसार अंमलबजावणी केली जाईल. - अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

भाजप व शिवसेनेची युती व्हावी, अशी आमची इच्छा आहे. त्यात सकारात्मक पावले उचलली जातील, असा विश्वास आहे. - एकनाथ जाधव, जिल्हाध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेद संस्कृतीचे जतन व्हावे!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘सृष्टीचे समग्र ज्ञान असलेल्या वेदांमुळे मनुष्यला मोक्षप्राप्ती होते. त्यामुळे वेदांचे संवर्धन व्हायला हवे आणि या कार्यासाठी घनपाठी घडावेत,’ असे आवाहन वाराणसीचे वेदमूर्ती गणेशशास्त्री द्रविड यांनी आज केले. घनपाठ वेदपारायणाच्या निमित्ताने शहरात आलेल्या गणेशशास्त्रींनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले.
गारखेडा परिसरातील आजुबाई मंदिरात सुरू असलेल्या शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखा घनपाठ वेदपारायण महोत्सवाला वेदमूर्ती गणेशशास्त्री द्रविड यांची उपस्थिती लाभली. घनपाठी शुभम दत्तात्रय जोशी (नीलजगावकर) तसेच घनपाठी वैभव श्रीराम मांडे यांच्या वेदपारायणानंतर उपस्थित ब्रह्मवृंद आणि भाविकांना त्यांनी वेदांविषयी प्रबोधन केले. ‘साक्षात भगवंतांचे स्वरूप मानल्या जाणाऱ्या वेदांचे मनुष्य जीवनात प्रचंड महत्त्व आहे. समग्र ज्ञान असलेल्या वेदांच्या पठणाने जसा वैदिकाला मोक्ष प्राप्त होतो, तसाच या वेदांचे श्रवण करणाऱ्यालाही मोक्ष मिळतो. अपौरुषेय अर्थातच केवळ श्रृतीनेच अस्तित्वात आलेल्या वेदाचे अनादी काळापासून गुरुकुल परंपरेने जतन केले जाते. त्यामुळे आजच्या पिढीला वेदांचे ज्ञान उपलब्ध होत आहेत. यापुढेही हे कार्य निरंतर सुरू राहावे, यासाठी घनपाठी घडत राहावे,’ असे आवाहन गणेशशास्त्रींनी केले. यावेळी वेदमूर्ती देवेंद्रजी गढीकर आदींसह घनपाठ वेदपारायण समितीचे मान्यवरही उपस्थित होते. २५ तारखेपर्यंत सुरू असलेल्या या सोहळ्याला भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभत असल्याबद्दलही आयोजक घनपाठ पारायण समितीने आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विक्रम डेकाटेस दुहेरी मुकुट

$
0
0

विक्रम डेकाटेस दुहेरी मुकुट
रोहन, लक्ष्मीकांत, दिलीपला जेतेपद
बॅडमिंटन, टेबल टेनिस स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मासिआ पुरस्कृत आंतर औद्योगिक बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धेत विक्रम डेकाटेने दुहेरी मुकुट पटकावला. याशिवाय रोहन अग्रवाल, लक्ष्मीकांत सुर्वे, दिलीप शिंदे हे सहभागी गटांमध्ये विजेते ठरले.
एमजीएम क्रीडा संकुलात या दोन्ही स्पर्धा घेण्यात आल्या. टेबल टेनिस स्पर्धेत विक्रम डेकाटेने एकेरीतील विजेतेपदासह दुहेरी स्पर्धेत रोहन अगरवालच्या साथीने अजिंक्यपद मिळवून दुहेरी मुकुट निश्चित केला. दुहेरीत चेतन डेकाटे, काणिक भारद्वाज, एकेरीत चेतन डेकाटे यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्मीकांत सुर्वे व दिलीप शिंदे यांनी मंगेश निटुरकर व अविनाश देशपांडे यांचा पराभव करून विजेतेपद मिळविले. एमजीएमचे डॉ. प्रवीण सूर्यवंशी, मासिआचे अध्यक्ष विजय लेकुरवाळे, क्रीडा सचिव मनीष अग्रवाल यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी विनय राठी, प्रविण भुजबळ, सुहास कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. मनीष अग्रवाल यांनी सूत्रसंचालन केले. मंगेश निटुरकर यांनी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मनीष अग्रवाल, नितीन पाटणी, आशिष नरवडे, विकास पाटील, रितेश अग्रवाल, मंगेश निटुरकर, सचिन गायके, विनय राठी, जगदीश पटेल, सुहास देशपांडे, अविनाश कुलकर्णी, विवेक येवले आदींनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर वसुलीसाठी पोलिस बंदोबस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पोलिस बंदोबस्तावरून निर्माण झालेला गोंधळ ताजा असताना आता महापालिकेने पुन्हा एकदा पोलिसांच्या बंदोबस्तात मालमत्ता कराची वसुली करण्याचे ठरविले आहे. यासंदर्भात पोलिस आयुक्तांकडे बंदोबस्तासाठी १२ पोलिसांची मागणी केली आहे. पोलिसांचा खर्च पालिका करणार आहे.
महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यावर दोनच महिन्यांत आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी मालमत्ता कर वसुलीसाठी पोलिस आयुक्तांची मदत घेण्याची भूमिका घेतली व थकबाकीदारांची बैठकच पोलिस आयुक्तालयात बोलावली. या बैठकीवरून मोठे वादंग झाले. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी या प्रकाराला आक्षेप घेतला. शहरातील नागरिक गुन्हेगार नाहीत, पोलिसांचे बळ वापरून दशहत निर्माण करू नका, असे नेत्यांनी आयुक्तांना बजावले होते.
त्यानंतर आता पुन्हा पालिकेच्या प्रशासनाने मालमत्ता कर वसुलीसाठी पोलिस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. ३१ मार्चपर्यंत मोठ्या प्रमाणावर वसुली करायची असल्यामुळे महापालिकेच्या पथकांना पोलिस संरक्षण द्यावे, अशी विनंती करण्यात आली आहे. पालिकेच्या सहा वॉर्ड कार्यालयांतर्फे वसुलीची मोहीम राबवली जाते. सहा वॉर्ड कार्यालयांच्या सहा पथकांना पोलिसांचे संरक्षण द्या. प्रत्येक पथकाच्या सोबत एक महिला व एक पुरूष पोलिस शिपाई द्या, ३१ मार्चपर्यंतचा या पोलिसांचा खर्च महापालिका करेल, असे पोलिस आयुक्तांना कळविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या एक-दोन दिवसांत पालिकेच्या पथकाला पोलिसांचे बळ मिळण्याची शक्यता असून, पोलिस बंदोबस्तात यापुढे कर वसुलीचे काम केले जाणार आहे.

वसुलीला ठेंगा
महापालिकेने गेल्या आठवड्यात वॉर्ड कार्यालयनिहाय टॉप टेन थकबाकीदारांची यादी जाहीर केली, पण यादीमधील एकाही थकबाकीदाराकडून पालिकेची यंत्रणा वसुली करू शकली नाही. त्यामुळे थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध करणे हा फार्स होता का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंगोलीत व्यापाऱ्यांवर छापे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्राप्तिकर विभागाने (आयटी) सोमवारी हिंगोलीतील पाच व्यापाऱ्यांवर छापे टाकले. त्यात हळद व्यापारी, पेट्रोल पंपचालक, साखर व्यापारी, किराणा होलसेलर भुसार व्यापाऱ्याचा समावेश आहे. दरम्यान, मराठवाड्यातील सुमारे ४०० बँक खातेदार ‘आयटी’च्या रडारवर आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; परभणी, हिंगोलीसह मराठवाड्यात ‘ऑपरेशन क्लिन मनी’अंतर्गत ४०० संशयित खातेधारकांनी बँकांच्या खात्यांत जमा केलेल्या रकमांचा हिशेब समाधानकारक दिलेला नाही. त्यांची यादी विभागीय प्राप्तिकर आयुक्तालय कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे.
या यादीनुसार मंगळवारीही कारवाई सुरू राहणार आहे. समाधानकारक हिशेब न देणाऱ्यांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमध्ये शेवटची संधी मिळणार आहे. अन्यथा त्यांच्यावर दंडासह फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या ४०० खातेदारांशिवाय दुसऱ्या टप्प्यातील यादी आल्यास प्राप्तिकर विभागाकडून मार्चएंडपर्यंत रोज कारवाया होण्याची शक्यता अाहे. हिंगोलीतील कारवाई सहायक प्राप्तिकर आयुक्त संदीपकुमार साळुंके यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आली. परभणी व हिंगोली येथील प्राप्तिकर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; त्यामुळे एक मार्चपासूनच या ४०० जणांवर टप्प्याटप्प्यांने कारवाई सुरू करण्यात आली आहे. मराठवाड्यात ३० ते ३५ संशयित खातेधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये कोचिंग क्लासेस, चार्टर्ड अकाउंटंट आणि व्यापाऱ्यांचा समावेश आहे. सोमवारी दुपारी वसमत व हिंगोलीतील एकूण पाच व्यापाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली. यामध्ये त्यांचे व्यवहार तपासण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने बेहिशेबी मालमत्तेचा तपशील समजू शकला नाही.

‘ऑपरेशन क्लिन मनी’ जोरात
केंद्र सरकारने काळ्या पैशाच्या विरोधात सुरू केलेल्या मोहिमेंतर्गत इन्कम डिक्लेरेशन स्किम, नोटाबंदीनंतर फेब्रुवारीमध्ये ऑपरेशन क्लिन मनीला सुरवात झाली. त्याजोडीला पंतप्रधान गरीब कल्याण योजनाही सुरू करण्यात आली. याअंतर्गत मराठवाड्यातील ४०० संशयितांनी बँकांत बेहिशेबी पैसा जमा केला आहे. हे खातेदार प्राप्तिकर विभागाच्या रडारावर आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एमजेपीच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वेतनाची आणि निवृत्तीवेतनाची जबाबदारी स्वीकारण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील (एमजेपी) अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. हे आंदोलन राज्यपातळीवर सुरू करण्यात आल्यामुळे प्राधिकरणातर्फे चालवल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा योजनाही बंद करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीतर्फे हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाची नोटीस समितीने ८ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांना दिली होती. त्यावर काहीच कार्यवाही न झाल्यामुळे सोमवारपासून बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनात राज्यभरातील सुमारे साडेसहा हजार अधिकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत. एमजेपी ही शासनाची अंगीकृत संस्था १९७९पासून कार्यरत आहे. प्राधिकरणात काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पगार व भत्त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यांचे वेतन व भत्ते देण्याची जबाबदारी राज्य शासनाने स्वीकारावी व त्यांना संपूर्ण आर्थिक लाभ द्यावेत, अशी मागणी करीत कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
काम बंद करून सर्वजण या आंदोलनात सहभागी झाल्याचे संघर्ष समितीच्या औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष सुमित भुईगळ यांनी सांगितले. वेतन व भत्त्यांसंदर्भातील मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही देण्यात आला. औरंगाबादेतील जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन करण्यात आले.
त्यात मुख्य अभियंता एस. जी. मुखेडकर यांच्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी आर. बी. मुळे, ए. टी. टाक, संजय कागवटे, आर. व्ही. कुलकर्णी, श्रीमती पी. के. गायकवाड, ज्योती धारूरकर, अनंत कुलकर्णी, संजय टोणपे आदी सहभागी झाले होते.

...तर पाणी योजना बंद
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे राज्यभरात ६० पाणीपुरवठा योजना चालवल्या जातात. या सर्व योजना ६ मार्चपासून बंद करण्याचा इशारा संघर्ष समितीने दिला होता. पाणीपुरवठा खात्याचे मंत्री बबनराव लोणीकर यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून, ‘धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी दोन द्यावेत,’ अशी विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देवून दोन दिवस पाणीपुरवठा योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. या कालावधीत आंदोलन मात्र सुरू राहणार आहे, असे अध्यक्ष भुईगळ यांनी सांगितले. दोन दिवसांत काहीच निर्णय झाला नाही, तर गुरुवारपासून सर्व पाणीपुरवठा योजना बंद केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षा चालकांच्या मनमानीला आळा घालण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शहरातील रिक्षा चालक मनमानी पद्धतीने प्रवाशांकडून भाडे आकारतात. या विरोधात जागरूक नागरिकांच्यावतीने सोमवारी (६ मार्च) जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त व आरटीओ यांना निवेदन देण्यात आले.
रिक्षा चालक हे मनमानी पद्धतीने भाडे आकारत आहेत. थोड्या अंतरासाठीही ४० ते ५० रुपये भाडे घेतात. अनेक रिक्षा मीटरशिवायच धावतात. या मनमानी भाडे आकारण्याच्या विरोधात ज्येष्ठ नागरिक व रुग्णांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले. या निवदेनात म्हटले आहे की, ‘प्रत्येकी रिक्षा चालकास नवीन मीटर रिक्षात बसवणे सक्तीचे करावे, मीटरप्रमाणेच भाडे आकारण्याचे बंधन करावे, प्रत्येक रिक्षात पोलिस खात्याच्या हेल्पलाइन क्रमांक लिहिण्यात यावा, पोलिस कर्मचाऱ्यांना प्रवाशांना मदत करण्याचे आदेश द्यावेत, शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या रिक्षांमध्ये मुलांची संख्या निश्चित करावी अशा विविध मागण्यांचा समावेश आहे, असे अनंत मोताळे यांनी सांगितले. या अभियानात राजेंद्र वाहुळे, रुपाली वाहुळे, स्वाती कुलकर्णी, राजेश कापुरे, श्वेता कापुरे, रितू अग्रवाल, किरण शर्मा, शरद लासूरकर, अॅड. श्रीचंद जग्यासी, रामचंद्र राव, आकांक्षा, शंकरराव अंबिलेकर, प्रशांत अवसरमल आदींनी सहभाग घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीची परीक्षा आजपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहे. औरंगाबाद विभागातून १ लाख ९१ हजार ४८८ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.
दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा १५ फेब्रुवारी ते ४ मार्चदरम्यान पार पडल्या. लेखी परिक्षांना मंगळवारपासून सुरुवात होत आहे. दहावी परीक्षेसाठी महसूल विभागाचे बैठे पथकासह मंडळानेही भरारी पथक नेमले आहेत. बारावीच्या परीक्षेत पेपरफुटीसारखे प्रकार घडल्याने दहावीच्या परीक्षेबाबत मंडळ दक्षता घेत आहे. औरंगाबाद विभागातून ५८४ केंद्रावर १ लाख ९१ हजार ४८८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मंगळवारी प्रथम भाषा मराठी, हिंदी, उर्दू हे पेपर होतील. शहरातील परीक्ष केंद्राना साहित्य वाटप सोमवारी उशिरापर्यंत सुरू होते.

६० जणांनी मागितले लेखनिक
अनेक परीक्षार्थी लेखनिकाची मागणी करतात. यंदा ६० जणांनी लेखनिक मागतिले आहेत. त्यासह परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंत अनेक अर्जदारांना लेखनिक मिळाला नसल्याचे चित्र होते. ऐनवेळी मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी असते. त्यामुळे विलंब होतो असे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘सीसीटीव्ही’चा गोंधळच
दहावी, बारावी परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी परीक्षा केंद्रांच्या प्रवेशद्वारावरच ‘सीसीटीव्ही’ बसविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिल्या आहेत. बारावी परीक्षा केंद्रावर या सूचनेला केराची टोपली दाखविली गेली. दहावीच्या केंद्रांबाबतही गोंधळ कायम आहे. मंडळाचे अधिकारीही याबाबत बोलण्यास तयार नाहीत. शिक्षण विभाग, संस्थांचालकांनी आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली असताना, महसूल विभाग अशा केंद्रांवर काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.

गैरप्रकार रोखण्यासाठी ३५ भरारी पथके असतील. याशिवाय विभागीय आयुक्तालयाची ५ पथके असतील. परीक्षेबाबत सर्वकेंद्रप्रमुखांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषतः केंद्र संचालक, सहसंचालक व कस्टोडिअन यांच्या व्यतिरिक्त कुणाला मोबाइलचा वापर करता येणार नाही.
- वंदना वाहुळ, विभागीय सचिव, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नफेखोरीविरुद्ध बोलणारे देशद्रोही ठरतात’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घरीदारी अन् देशात आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. सर्वच क्षेत्रात नफेखोरीला कोणी विरोध केला की त्याला देशद्रोही ठरविले जात आहे. कधी नव्हे एवढी आज अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची गळचेपी सुरू आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी सोमवारी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्यासमोरील आव्हाने’ विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.
प्रसिद्ध माध्यम विश्लेशक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागातील प्रा. जयदेव डोळे ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या गौरवार्थ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव, संयोजक डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. दिनकर माने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. जोशी म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अभिव्यक्तीची सम्रग मांडणी केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आद्य व शेवटचे क्रांतीकारक भारतरत्न डॉ. आंबेडकर हेच आहेत. आज प्रत्येक ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासमोरील पुरातन, सनातन विचारांचे आव्हान झुगारून द्यावे लागेल.’
यावेळी माजी कुलगुरू डॉ. कोत्तापल्ले म्हणाले,‘पत्रकारितेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची गोष्ट अडचणीत आली आहे. माध्यमांची मालकी भांडवलदाराकडे जात आहे. त्यामुळे अभिव्यक्तीवर शंका येते. तुम्ही बोलाल तर तुमचा दाभोळकर करू, अशा धमक्या उघडपणे दिल्या जात आहेत.’ प्रा. डोळे प्रत्येक क्षेत्रातील अपप्रवृतीवर लिहितात. पहारेकऱ्याचे काम डोळे हे करतात ही आनंदाची बाब आहे. दुपारच्या सत्रात ‘अभिव्यक्ती स्वातंत्र व प्रसारमाध्यमे’ विषयावर निशिकांत भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिपक पटवे, संजय वरकड, व्यंकटेश केसरी यांनी सहभाग घेतला. यावेळी भालेराव म्हणाले, ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्यात कोणतेच सरकार मागे नाही. सब घोडे बारा टक्के असा हा मामला आहे.’ प्रा. डोळे यांनी, ‘युवकांनी अभिव्यक्तीसाठी लढा द्यावा,’ असे आवाहन केले. कोमल मोरे, कोमल पौळ व क्षितिजा भूमकर यांनी सूत्रसंचालन केले. अनिकेत मस्के यांनी आभार मानले.

विषमता, बेरोजगारी वाढत आहे ः डॉ. कानगो
चर्चासत्राचा समारोप ज्येष्ठ कामगार नेते डॉ. भालचंद्र कानगो, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक धनंजय लांबे, डॉ. वि. ल. धारूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. डॉ. कानगो म्हणाले, ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आज विविध पद्धतीने बंधने आणली जात आहेत. जनरेट्याचा वापर करून हवे ते करायचे हे काम सरकार करते आहे. देशात विषमता, बेरोजगारी असे प्रश्नांची दाहकता प्रचंड आहे. हे प्रश्न समोर येऊच नयेत, यासाठी प्रयत्न केले जात अाहेत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अरबी-मराठी व्युत्पत्तीकोश आकारास येतोय’

$
0
0

औरंगाबाद : ‘१९८९मध्ये लिहिलेला फार्सी-मराठी व्युत्पत्तीकोश अभ्यासकांसाठी उपयोगी ठरला. आता अरबी व मराठी भाषेचे परस्परसंबंध अधोरेखित करणारा अरबी-मराठी व्युत्पत्तीकोश लिहीत आहे. मौलिक संदर्भ साधनांच्या अभ्यासातून ग्रंथ आकारास येत आहे. हा ग्रंथ भाषा अभ्यासकांसाठी महत्त्वाचा ठरेल,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यू. म. पठाण यांनी व्यक्त केले. सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत पठाण बोलत होते.
ज्येष्ठ साहित्यक व संशोधक डॉ. पठाण येत्या नऊ मार्च रोजी वयाच्या ८८ वर्षांत पदार्पण करीत आहेत. मागील वर्षी पठाण यांचे आठ ग्रंथ प्रकाशित झाले. येत्या वर्षभरात नऊ महत्त्वाचे ग्रंथ प्रकाशित होणार आहेत. या प्रकल्पांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पठाण यांनी विविध विषयांवर भाष्य केले. ‘सध्या अरबी-मराठी व्युत्पत्तीकोशाचे काम सुरू आहे. ‘बायको’, ‘चपाती’ असे तुर्की शब्द मराठीत सहज रुजले. अरबी शब्दांचीसुद्धा अशीच गंमत आहे. तौलनिक अभ्यास करण्यासाठी प्राचीन मराठी ग्रंथ, बखर वाड्मय, स्वतःला ज्ञात असलेले शब्द अशा संदर्भांचा आधार घेतला आहे. यापूर्वी फार्सी-मराठी व्युत्पत्तीकोशाचा अभ्यासकांना उत्तम उपयोग झाला,’ असे डॉ. पठाण म्हणाले. यावर्षी ‘मराठवाडी’, ‘स्मृतिस्थळ’, ‘सूफी संतांचं मराठी साहित्य’, ‘कथाकार डॉ. यू. म. पठाण’, ‘समस्या शिक्षणाच्या’, ‘माझं विद्यापीठ’, ‘रामनामाच्या अमृतधारा’ हे ग्रंथ प्रकाशित होतील,’ अशी माहिती पठाण यांनी दिली. दरम्यान, पैठण येथील रखडलेल्या संतपीठ प्रकल्पाबाबत पठाण यांनी खंत व्यक्त केली. वाचन व लेखनाची आवड असल्यामुळे कुटुंबासोबत आनंदाने राहिलो. सध्या आत्मचरित्र लिहीत असून, हेच दीर्घायुष्याचे रहस्य असल्याचे पठाण यांनी मनमोकळेपणे सांगितले.

‘सर तास घ्या ना’
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे नेहमी दौऱ्यावर असतात. त्यांचा वचक नसल्यामुळे विद्यापीठाची दुर्दशा झाली. मराठी विभागाचे हाल बघवत नाही. एकेकाळी विभागात १५०-२०० विद्यार्थी असत. सध्याचे प्राध्यापक तास घेत नसल्यामुळे ‘सर तास घ्या ना’ हा लेख मला लिहावा लागला. फक्त कविता लिहून आणि गप्पा मारून विभाग नावारूपाला येत नसतो,’ अशी परखड टीका डॉ. पठाण यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३,४९६ गावांवर टंचाईचे ढग

$
0
0

shripad.kulkarni@timesgroup.com
Tweet : @kulshripadMT

औरंगाबाद : गेल्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडूनही राज्यातील ३ हजार ४९६ गावांवर यावर्षी पाणी टंचाईचे संकट घोंघावत आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या (जीएसडीए) अहवालात या पाणीसंकटाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अर्थात, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी टंचाईग्रस्त गावांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

‘जीएसडीए’ने राज्यातील भूजल पातळीची जानेवारी महिन्यात पाहणी केली. या पाहणीवर आधारित अहवालात संभाव्य पाणीटंचाईची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यातील ३५३ पैकी २०५ तालुक्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. १०० तालुक्यांत पर्जन्यमानात २० टक्क्यांपर्यंत घट झाली. २५ तालुक्यांत २० ते ३० टक्के, २१ तालुक्यांत ३० ते ५० टक्के आणि २ तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला. त्याचा भूजल पातळीवर परिणाम झाला आहे.

राज्यात ३ हजार ९२० निरीक्षण विहिरींतील जानेवारी महिन्यात असलेल्या पाणी पातळीच्या नोंदी ‘जीएसडीए’ने घेतल्या. त्यानुसार; १६६ तालुक्यांतील ३ हजार ४९६ गावांत भूजल पातळीत १ मीटरपेक्षा जास्त घट झाल्याचे दिसून आले. त्यात ३०६ गावांत ३ मीटरपेक्षा जास्त आणि ६८१ गावांत २ ते ३ मीटरदरम्यान घट झाली आहे. २ हजार ५०९ गावांत पाणी पातळी १ ते २ मीटरने घट झाली आहे.

पर्जन्यमानात २० टक्क्यांपेक्षा जास्त तूट असलेल्या ५१ तालुक्यांतील ८४१ गावांत भूजल पातळीत १ मीटरपेक्षा जास्त घट झाली आहे. त्यातील ८३ गावांतील घट ३ मीटरपेक्षा जास्त आहे. २१० गावांत २ ते ३ मीटर आणि ५४८ गावांत १ ते २ मीटरपर्यंत घट झाल्याचे दिसून आले आहे. पर्जन्यमानात २० टक्क्यांपेक्षा कमी तूट असलेल्या ९४ तालुक्यांतील १४०८ गावांत भूजल पातळीत १ मीटपेक्षा जास्त घट झाली आहे. त्यात १२० गावांतील भूजल पातळी ३ मीटरपेक्षा जास्त घटली आहे.

धुळे, नाशिक, औरंगाबादेत स्थिती चिंताजनक

राज्यात नाशिक, मराठवाडा, पुणे, नागपूर विभागात भूजल पातळीत घट झालेल्या गावांची संख्या जास्त आहे. धुळे जिल्ह्यात तब्बल ४५९ गावांतील भूजल पातळी घटली आहे. त्याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातील ३५० गावे, जळगाव ३१४, सोलापूर २८१, हिंगोली २८०, वर्धा २७५, सांगली २२२, अमरावती २०९, अहमदनगर जिल्ह्यातील १५४ गावांतील भूजल पातळी खोल गेल्याचे जीएसडीएने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आणि कोकणातील ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकाही तालुक्यात भूजल पातळीत घट झाली नाही, असेही या पाहणीत दिसून आले आहे.

पाऊस पडूनही पाणीपातळी घसरली

गेल्यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडूनही १३३ तालुक्यांतील १२४७ गावांत भूजल पतळीत घट झाल्याची नोंद आहे. त्यात १६ तालुक्यांतील १०३ गावांतील भूजल पातळी ३ मीटरपेक्षा जास्त घटली आहे. ३३ तालुक्यातील २०६ गावांत २ ते ३ मीटरदरम्यान आणि ८४ तालुक्यांतील ९३८ गावांच्या भूजल पातळीत १ ते २ मीटरपर्यंत घट झाली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थिती चांगली

राज्यात २०१५मध्ये पावसाने पाठ फिरविली होती. त्यामुळे जानेवारी २०१६ मध्ये केलेल्या पाहणीत राज्यात तब्बल २८५ तालुक्यांतील १५ हजार ९६० गावांतील भूजल पातळीत १ मीटरपेक्षा जास्त घट झाली होती. त्यात ४ हजार ८२८ गावांत भूजल पातळी ३ मीटरपेक्षा जास्त खोल गेल्याचे दिसून आले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीटंचाईची स्थिती तुलनेत सुसह्य आहे.

भूजल पातळीत झालेली घट
विभाग...........गावे
कोकण..........१०४
नाशिक..........१११५
पुणे...............६०१
मराठवाडा......७४६
अमरावती......३२९
नागपूर..........६०१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनांच्या मालकीत ‘ती’ मागेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शहरात दुचाकी, चार चाकी वाहने चालविणाऱ्या महिलांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असली तरी वाहनांची मालकी त्यांच्याकडे नाही. दुचाकी व चार चाकी वाहनांचे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी मात्र महिला आघाडीवर आहेत.
औरंगाबादच्या आरटीओ कार्यालयात रोज २००पेक्षा जास्त वाहनांची नोंदणी केली जाते. त्यात महिलांच्या नावावर वाहनाची नोंदणी करण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. आजही अनेक वाहने घरच्या कर्त्या पुरुषांच्या नावावर असल्याची माहिती गेल्या वर्षभरात केलेल्या वाहन नोंदणीवरून समोर आली आहे. महिलांच्या नावावर वाहन नोंदणी करण्याचे प्रमाण जेमतेम तीन ते चार टक्क्यांच्या आसपास आहे. गेल्या वर्षभरात ६७४७५दुचाकी वाहनांची नोंदणी करण्यात आली. त्यात ३३७३ (४.९%) वाहने महिलांच्या नावावर नोंदविली. त्याचबरोबर ८८४७ चार चाकी वाहनांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी २८०(३.१%) वाहने महिलांच्या नावावर नोंदविण्यात आली आहेत.
आरटीओ कार्यालयातून महिलांच्या नावावर रिक्षांचे परवानेही दिले जातात. पतीच्या निधनानंतर हे परवाने पत्नीच्या नावावर करण्यात येतात. त्याशिवाय काही महिलाही स्वतःच्या नावावर नवे परवाने काढतात. गेल्या वर्षभरात ११ महिलांनी स्वतःच्या नावावर रिक्षा परवाने घेतले.
दुचाकी आणि चार चाकी वाहनांचे लायसन्स काढण्यासाठी आरटीओ कार्यालयात महिलांची गर्दी असते. रोज सुमारे ७५ पर्मनंट लायसन्स दिले जातात. त्यात १२ ते १५ लायसन्स महिलांचे असतात. वर्षभरात सुमारे चार हजार महिलांना लायसन्स देण्यात आले. त्यात सुमारे १८०० लायसन्स चारचाकी वाहन चालविण्यासाठी आहेत. सुमारे २२०० महिलांनी दुचाकी चालविण्यासाठी लायसन्स काढले आहे. गेल्या चार वर्षांत लायसन्स काढण्यात महिलांचे प्रमाण वाढले आहे. चार वर्षांपूर्वी रोज तीन ते चार महिला पर्मनंट लायसन्ससाठी ड्रायव्हिंग टेस्ट देत असत, हे प्रमाण आता १२ ते १५पर्यंत पोचले आहे.

महिलांची वाहनांवरील मालकी...
वाहनाचा प्रकार.......महिलांच्या नावावर नोंदणी........एकूण वाहने
दुचाकी...................३३७३..............................६७४७५
चार चाकी................२८०................................८८४७
(१ मार्च २०१६ ते १ मार्च २०१७ या कालावधीत विक्री झालेल्या वाहनांची नोंदणी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मटा राऊंडटेबलः हा लढा एकीचा अन् लेकींचा !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘दिल्लीच्या निर्भयाप्रकरणाने देश हादरला. जनक्षोभ उसळला. मात्र, महिला अत्याचाराच्या घटना रोज सुरू आहेत. पाच वर्षांची मुलगी सुरक्षित नाही, की साठ वर्षांची माता. या साऱ्यांवर आपण एकीने मात करू. हा लढा लेकींचाच आहे. तो लेकींनाच लढावा लागेल,’ असा सूर जागतिक महिलादिनानिमित्त आयोजित ‘मटा’ राऊंड टेबलमधून पुढे आला. ‘महिला सुरक्षा’ या विषयावर मान्यवरांनी मते व्यक्त केली. या राऊंडटेबलमध्ये कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टच्या समन्वयक रेणुका कड, नगरसेविक अॅड. माधुरी अदवंत, डोळस ग्रुपच्या अध्यक्ष शैलजा मुंशी, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या ग्रामीण प्रकल्प प्रमुख डॉ. प्रतिभा फाटक, स्फूर्ती महिला मंडळाच्या नीला रानडे, मधुसुदन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेद्वारे स्वसंरक्षणाचे धडे देणाऱ्या अश्विनी चायल व त्यांची कन्या मयुरी चायल, ओंकार बालवाडीच्या विशेष मुलांच्या विहंग गटातील पालक मीरा गोडबोले यांनी भाग घेतला.

-
सायबर धोका ओळखा
-
आजची स्त्री सायबर क्राइमला सर्वाधिक बळी पडते आहे. सोशल मीडियाच्या सर्रास वापरातून सायबर क्राइमचे प्रमाण वाढले आहे. एनसीआरबीच्या सर्वेक्षणानुसार २०१४ मध्ये महाराष्ट्र सायबर क्राइममध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता. त्यातून होणाऱ्या अत्याचारांमध्ये बळी पडणाऱ्या महिलांत महाराष्ट्र एक नंबरवर होता. यामध्ये सर्वप्रथम ई मेल पाठवून ई हरासमेंट सर्वाधिक होते. यानंतर मोर्फिंग हा प्रकार मुलींबाबत घडतो. आजकाल लहान- मोठ्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले जातात. अकांऊट तयार करताना सूचना वाचल्या जात नाहीत. अकाऊंट पब्लिक असावे ‌की फ्रेंडसपुरते याची काळजी न घेता ते पब्लिक केले जाते. मुलींचे फोटो डाऊनलोड करून त्यामध्ये नको असलेले बदल केले जातात. चेहरा तोच खालचे शरीर तुमचे नसते. या गुन्ह्याचे प्रमाण ९० टक्के असून मुंबईमध्ये तर दिवसाला किमान ५०० घटना घडतात. मात्र, केस दाखल होण्याचे प्रमाण केवळ एक असते. बदनामी, चारित्र्यावर संशय, बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य हिरावले जाण्याची शक्यता असल्याने तक्रार केली जात नाही. आरोपीला पकड्याऐवजी मुलीलाच पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. तिसरा सायबर क्राइम म्हणजे सायबर पोर्नोग्राफी. मुली, महिलांसह मुलसुद्धा या गुन्ह्याचे थेट शिकार होतात. पोर्नोग्राफी म्हणजे अशा काही वेबसाइटस् ज्यावर सगळ अश्लिल साहित्य उपलब्ध असते. आठ-नऊ वर्षांचे मुलेही चॅटिंग करतात. यादरम्यान एखाद्या हॅकर मुलांना ट्रॅप करतो. वेब कॅमच्या सहाय्याने मुलांना कपडे काढायला लावणे, त्याचे ‌शूटिंग करून ते पुन्हा पोर्नोग्राफिक वेबसाइटवर अपलोड करणे याचे प्रमाणही वाढले आहे. दोन वर्षांपूर्वी पोर्नोग्राफीक वेबसाइसटसवर बंदी आणण्यात आली. पण दुसऱ्याच दिवशी ती बंदी उठवण्यात आली. याचा परिणाम आताही दिसून येतो. नुकतेच सर्वोच्च न्यायालयामध्ये ५० वर्षांच्या माहिलेने एक याचिका दाखल केली. तिच्या पतीला या पोर्न वेबसाइट पाहण्याचे व्यसन लागले व त्याच्या पत्नीकडून तो तीच अपेक्षा करायचा. हा माझ्यावर होणारा अत्याचार असून या सगळ्या वेबसाइटस बंद कराव्या, अशी मागणी तिने केली आहे. याशिवाय स्टॉकिंग अर्थात पाठलाग. पूर्वी मुलीच्या घरापर्यंत व्हायचा. आता हे स्टॉकिंग छुप्या पद्धतीने होते. मुलगी ऑनलाइन कधी बसते, काय शेअर करते, तिच्या शेअर केलेल्या पोस्टवर आपण काय बदल करू शकतो याकडे लक्ष ठेवले जाते. २००९ सायबर जनजागृती करताना हे लक्षात आले की, सायबर गुन्ह्यांमध्ये तक्रार केल्यावर गुन्हेगार सापडण्याचे प्रमाण जास्त आहे, पण तक्रारी दाखल व्हायल्याच हव्या. - रेणुका कड

-
सर्वसमावेश‌क मॉडेल हवे
-
महिलांच्या निवासानुसार महिला सुरक्षेचे विषय वेगळे आहेत. यासाठी उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टीचे विभाजन करावे लागते. झोपडपट्टीतील महिला तर दैनंदिन सुरक्षेसाठी झगडतात. भटक्या-विमुक्त महिलांची सुरक्षा वेगळा विषय आहे. म्हणून प्रत्येकासाठी स्वतंत्र योजना हवी. तसेच विधवा, परितक्त्या, निराधार महिलाही आहेतच. सामाजिक सुरक्षेपूर्वी स्त्री घरी सुरक्षित आहे का ? नातेवाईकांडून बळी पडतात. गर्भातील स्त्री भ्रूणही सुरक्षित नाही. महिला साक्षर झाल्या आहेत. संपन्नता आली, पण परिस्थिती बदलली नाही. शहरातील चांगल्या घरातील मुले कुपोषित आहेत. ग्रामीण भागापेक्षा शहरातील स्त्रिया अॅनिमियाग्रस्त आहेत. स्त्री आर्थिकदृष्ट्या सुरक्षित नसणे, हा पण प्रश्न आहे. ती आजारी पडली तर तिच्या उपचारासाठी तिच्या हातावर चार पैसे पडतात का ? सगळे घर तिचे, शेत तिचे, धन-धान्य तिचे, पण तिला आर्थिक स्वातंत्र्य नसेल तर उपयोग नाही. एक-एक कडी जोडूनच प्रत्येक घटकांवर काम हवे. मात्र, सुरुवात स्वतःपासून हवी. स्त्रीधर्म ओळखून कुटुंब व मुलांना योग्य दिशा देण्याची धुरा महिलांनीच वाहावी. किशोरवयीन मुलांचा सर्वेक्षण केल्यावर बाईला मारण्यात काही वावगे नाही, या प्रश्नावर ३६ टक्के मुलांनी हो म्हटले. हीच मानासिकता लक्षात घेऊन विचार केला, तर पुन्हा महिलांची सुरक्षा पुढे येते. मुलीला कितीही सक्षम बनवले, पण समोरच्या व्यक्तीची मानसिकता बदलत नसेल तर उपयोग नाही. जेंडर सेंसेटायजेशन हा महिला व पुरुष दोघांसाठी समान आहे. किशोरवयीन मुलांना समजुतदार जोडीदाराचे धडे हवे. पहिल्या सहा वर्षांमध्ये मुलांवर समानतेचे संस्कार द्या. एका जुन्या सर्वेक्षणानुसार तिहार जेलच्या महिला व पुरुष कैद्यांची तुलना करण्यात आली. यानुसार अपहरण गुन्ह्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण ३.१७ % तर महिला ५. ७५ % होते. फसवणुकीच्या गुन्ह्यात पुरुष ३.९ % तर महिला १०.३४% होते. हुंड्याच्या गुन्ह्यात पुरुष २.३ % तर महिला १८. ७५% व अंमली पदार्थांची तस्करी पुरुष ८.६ % व महिला १५. ४० % होत्या. गुन्हेगारीमध्ये आपण मागे नाही. म्हणजे प्रगती झाली, पण पुढे जाऊन आपण दोन पावले मागे आलो. त्यामुळे १०० % सुरक्षेची जबाबदारी त्या महिलेचीच आहे. ‌महिला सुरक्षेसाठी पुरुष, मुले संस्कारित करणे गरजेचे आहे. तेव्हाच भविष्यात महिला सुरक्षा हा विषय अस्तित्वातच नसेल. कायद्याची अंमलबाजवणीही व्हावी. या सर्व स्तरावर काम करणारे सर्वसमावेशक मॉडेल तयार झाले, तरच महिला सुरक्षित होईल. - डॉ. प्रतिभा फाटक

-
करारीपणा जोपासा
-
महिला अत्याचारांचे गुन्हे पूर्वी गुन्हे घडायचे नाहीत, ‌हा केवळ समज आहे. तेव्हा पुढे येऊन तक्रार करण्याचे धाडस दाखवायचे प्रमाण कमी होते. माझ्या घरची परिस्थिती चांगली असली तरी मला नोकरी करण्याची आवड होती. स्टेनो, क्लर्क व टायपिंग इ‌‌न्स्टिट्यूटची संचालिका म्हणून मी काम केले. साधारणतः १९८० च्या काळातही नोकरदार महिलांना त्रास व्हायचा. नोकरी करणारी महिला वाईट असा दृष्टिकोन घेऊन महिलांना त्रास दिला जायचा. मी स्वतःही अशा वाईट अनुभवातून गेले, पण मी मात्र तक्रार केली आणि स्वतः त्रास देणाऱ्यालाचा पाठपुरावा केला. नोकरी करायची, स्वतंत्र ओळख मिळवायची यासाठी स्वतःला करारी करणे मला गरजेचे वाटले. तेव्हापासूनच आजपर्यंतही मी तो बाणा जपला. काही नियम बनवले आणि स्वतः कधीही ती चौकट मोडली नाही. पुरुषांना कधीच माझ्या टेबलासमोर बसू दिले नाही आणि यासाठी तडजोडही केली नाही. मी पुरषांविरोधी नव्हते, तर पुरुषत्वाचा अहंकार बाळगणाऱ्या दांभिक पुरुषुत्वाला माझा विरोध होता. हीच शि‌कवण मुलांनाही दिली आणि काम पडल्यावर त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहले. कुठलीही गोष्ट लपवायची नाही आणि त्रास झाला तर तत्काळ आणि कडाडून विरोध करायचा हे सांगितले. मुलीला कॉलेजमध्ये त्रास व्हायचा तेव्हाही स्वतः लक्ष घातले. समाजातील उच्चभ्रू कुटुंबातील तरुण गुन्हेगार निघाले, तेव्हा मात्र आश्चर्य वाटले. चुकीच्या गोष्टीला विरोध करण्याचा अॅटिटयूड मुलांमध्ये बिंबवला. पालकांनी आपल्या मुलांना चांगले-वाईट याची ओळख करून देताना त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा व ती चुकली तरी उपाय काढायला हवे. बाहेरचे बोल लावतील म्हणून गप्प बसणे चुकीचे आहे. - नीला रानडे, स्फूर्ती महिला मंडळ

-
सुरक्षा समिती असावी
-
महिला सुरक्षेवर कौटुंबिक, राजकीय व सामाजिक या तिन्ही पातळींवर एकाच वेळी क‌ाम व्हावे. तात्विक आकर्षणापोटी आपण काय करतोय याचे भान तरुणाईला नाही, पण अनुभवातून शिकलेले पा‌लक तर मुलांना समज देऊ शकतात. मुलांच्या हातून चुका होतात, पण कौटुंबिक आधारातूनच उत्तर निघते. माझे शरीर माझे आहे. यावर माझा अधिकार आहे. माझ्या संमतीनेच माझे शरीर कुणाचे होईल हा अॅटिट्यूड मुला-मुलींमध्ये विकसित झाला पाहिजे. एखाद्याशी जवळीक वाढवण्याचा तुमचा व समोरच्याही अॅप्रोच निरागस हवा. आज प्रत्येक व्यक्ती सामाजिक आयुष्य जगतो. याचा परिणाम मुलांवरही होतो. मला मिळाले नाही मग मुलांना का नको, ही विचारसरणी किती मारक असते याचा विचार व्हायला हवा. मुलांना पॉकेटमनी द्या, पण हिशेबही घ्या. सामाजिक सुरक्षा व निकोप वातावरणासाठी प्रत्येक वॉर्डात सुरक्षा समिती असावी. यामध्ये योग्य व्यक्तींची निवड करून तरुणांचाही समावेश करावा. नगरसेव‌कांनी या समितीकडे लक्ष ठेवावे. आपल्या वार्डातील अशा गैरकृत्यांवर लक्ष ठेवणे. वेळोवेळी नगरसेव‌काच्या निर्दशनास आणून देणे ही भूमिका ‌समितीची असावी. यामुळे वॉर्डातील समस्या ठळकपणे समोर येईल. काही गुन्ह्यांमध्ये कधी-कधी प्रेशर ग्रुप दबाव आणतात. यामुळे सामान्य व्यक्ती न्यायापासून वंचित राहतो. अशा घटनांमध्ये या समिती मदतगार सिद्ध होवू शकतात. - शैलजा मुंशी

-
स्त्रीनेही स्मार्ट व्हायला हवे
-
सुरक्षेसाठी प्रिव्हेंटिव्ह उपाय म्हणून कॉलेजमध्ये आम्ही जनजागृती कार्यक्रम घेतो. याचा खूप मोठा परिणाम दिसला नाही, पण बदल सुरू झाला. स्मार्ट सिटीमध्ये महिला सुरक्षा ही स्मार्ट हवी, पण पुढाकार स्त्रीनेच घ्यायला हवा. टेक्नॉलॉजी आली तर मदत येईपर्यंत स्वतःची सुटका स्वतःच करावी लागते. घरापासूनच याची सुरुवात हवी. आपल्या मुलीला गुड टच बॅड टच शिकवायला हवे. तिला प्रतिकार करणे, नकार देणे शिकवायला हवे. अनेकदा आपण प्रतिकार करत नाही आणि प्रसंगाला आमंत्रण देतो. नगरसेवक म्हणून जेव्हा मी माझ्या वार्डातील सुरक्षेचा नेहमी फॉलोअप घेते. रात्री ओपन स्पेसला भेट देऊन आक्षेपार्ह्य दिसले की, अॅक्शन घेते. ही जबाबदारी नागरिकांचीही आहे. वकील म्हणूनही अनेक सामाजिक समस्या लक्षात आल्या. यामध्ये विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण वाढले आहे. यशाचा शॉर्टकट स्वीकारण्याच्या नादात आपण संयम गमावला. यामध्ये महिला व पुरुष दोघही जबाबदार आहेत. प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते हे समजायला हवे. सामाजिक संघटनांनीही गोष्टी तडीस नेईपर्यंत फॉलोअप घ्यायला हवा. एखादी घटना घडल्यावर चर्चा होते, पण पुढे शिक्षा काय झाली याचा फॉलोअप घेत नाहीत. गुन्हा दाखल केल्यावर तक्रारकर्ती केस मागे घेते. यामध्ये आर्थिक स्वरुपात तडजोड होते. तक्रारकर्तीची आर्थिक बाजू जरी कमकुवत असली तरी अशावेळी त्या स्त्रीने स्वतःला मजबूत करणे गरजेचे आहे. आपण तडजोड केली, तर ही व्यक्ती पुढचे गुन्हे करायला मोकळी होते‌ हे महिलांना कळत नाही. पैसे दिल्यावर आपण सुटतो असे गुन्हेगारालाही वाटते. विकृतीला उत्तर जनजागृती आहे. - अॅड. माधुरी अदवंत

-
स्वसंरक्षण शिका
-
परिस्थितीमुळेच महिला व मुलींना मानसिक व शारीरिकरित्या खंबीर करणे गरजेचे आहे. आलेल्या प्रसंगावरती मात करण्यासाठी स्वतःची सुरक्षा स्वतःच करावी. निर्भया घटनेनंतर मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देणे गरजेचे वाटले म्हणून आम्ह‌ी दिवसातून एक तास मोफत प्रशिक्षण देतो. कराटे वेगळे आणि स्वसंरक्षण वेगळे. यामध्ये आम्ही प्रशिक्षणार्थींची भीती घालवून आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. आज तरी स्वसंरक्षण प्रशिक्षण शहराची गरज झाली आहे. वाळूज भागामध्ये तर महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. शिवाय इतर घटना घडतात. कायद्याचे ज्ञान नसल्यामुळेही महिलांना त्रास होतो व तक्रार दाखल होत नाही. आमच्या तीन दिवसांच्या प्रशिक्षणाने त्यांचा आत्मविश्वास वाढतो. सोप्या टेक्निक त्यांना धीर देतात व किमान प्रतिकार करता येईल इतकी काळजी आम्ही घेतो. शहर व ग्रामीण भागातील मुली मिळून आम्ही ७० हजार मुली व महिलांना प्रशिक्षण दिले. मुलीच नव्हे तर आई, शिक्षिका प्रत्येकीने स्वसंरक्षण शिकायला हवे. - अश्विनी चायल

-
विशेष मुलांसाठी स्वतंत्र सुरक्षा धोरण हवे
-
महिला सुरक्षेमध्ये विशेष मुला-मुलींसाठी वेगळे धोरण स्वीकारले गेले पाहिजे. कारण सामान्य मुला-मुलींच्या अनुषंगाने चर्चा होते. आमच्या मुलांचा आय क्यू नॉर्मल नसतो. त्यांची शारीरिक व मानसिक स्थिती बरोबर नसते. आपल्यावर अन्याय झाला हे त्यांना सांगताही येत नाही. म्हणूनच बलात्कार किंवा लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये गतिमंद, मतिमंद मुलींचा समावेश असतो. मुलेही अशा अत्याचारास बळी पडतात. म्हणूनच प्रशासकीय पातळीवर विचार व्हायला हवा. यासाठी शहरातील विशेष मुलांच्या शाळा ‌मिळून या मुलांचा डेटाबेस पोलिस आयुक्तांना दिला. प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये याची सीडी पाठवण्यात आली. विशेष मुलांच्या आईनांही प्रशिक्षण मिळायला हवे. - मीरा गोडबोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१३४ ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू

$
0
0


पृथा वीर, औरंगाबाद
‘महिला सुरक्षेबाबत पोलिस खाते गंभीर आहे. तत्काळ कारवाई ‌करण्यासोबतच ‌दीर्घकालीन उपाययोजनांवर आमचा भर आहे. छेडछाडीच्या घटना होणारी १३४ ठिकाणे निश्चित केली असून, तेथे दामिनी पथक, चार्लीमार्फत स्वतंत्र पॅट्रोलिंग होते,’ असे‌ पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी ‘मटा’शी बोलताना स्पष्ट केले. जागतिक महिला दिनानिमित्ताने त्यांच्याशी महिला सुरक्षेबाबत साधलेला संवाद.

■ महिला सुरक्षेसाठी पोलिस खात्याचे नियोजन काय आहे?
महिला सुरक्षा आमच्यासाठी गंभीर विषय आहे. यासाठी दामिनी पथक व महिला दक्षता समितीला वारंवार सूचना दिल्या जातात. टिजिंगसारख्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी दामिनी पथकाची मदत मिळते. अशा व्यक्तींवर तत्काळ कारवाई होते. सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई ‌होते. मिसिंग केसेसमध्ये १८ वर्षांखालील मिसिंग केसमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. याचाही तपास गांर्भियाने होतो आणि बऱ्याच प्रकरणात आम्ही यशस्वी झालो आहोत.

■ कोणत्या स्वरुपाचे गुन्हे अधिक आहेत ?
गुन्ह्यांमध्ये विनयभंगाच्या घटनांचे प्रमाण जास्त आहे. निर्भया घटनेनंतर अशा घटनांमध्ये कडक कारवाई होते. कमी वेळात घडणाऱ्या या घटनांचे सातत्य जास्त असले तरी तपास पूर्ण क्षमतेने होतो. जबर शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्न असतो. विनयभंगांच्या गुन्ह्या अंतर्गत वेगवेगळ्या शिक्षा असल्या तरी जास्तीत जास्त ७ वर्षांपर्यंत शिक्षा होते.

■ सायंकाळी अनेक ठिकाणी महिला छेडछाड होते. त्या ठिकाणी का कारवाई का होत नाही?
शहरातील अशा १३४ ठिकाणांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे. या ठिकाणांवर दामिनी पथक व स्वतंत्र टीम सातत्याने पॅट्रोलिंग करते. यामुळे परिस्थिती सुधारेल. मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनसाठी आम्ही स्वतंत्र धोरण स्वीकारल्याने या भागातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले. पोलिस कर्मचारी नेमून पेट्रोलिंग वाढवले. मध्यंतरी इथले दारूचे दुकान बंद केल्याने फायदा झाला. सध्या परिस्थिती बरीच निवळली आहे.

■ बदलत्या समाजव्यवस्थेमध्ये गुन्ह्यांचे स्वरुप हायटेक झाले आहे. पोलिस खाते किती टेक्नोसॅव्ही झाले आहे ?
सायबर क्राइम थांबवण्यासाठी आमच्याकडे सक्षम व प्रभावी यंत्रणा आहे. कितीही हायटेक गुन्हे घडले तरी गुन्हेगारापर्यंत पोचण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. जनजागृतीसाठी आम्ही ८० कॉलेज, ६४ वसतिगृह आणि ६६ कोचिंग क्लासमध्ये सायबर कार्यशाळा घेतल्या.

■ सीसीटीव्हींची स्थिती कशी आहे?
सरकारी योजनेअंतर्गत शहरात ५० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले. तसेच खाजगी संस्थेमार्फतही २००० कॅमेरे लावलेत. गुन्हा घडल्यांनतर तपासणी करताना आम्हाला या कॅमेऱ्यांचा चांगला उपयोग होतो. सेफ सिटी प्रकल्पाअंतर्गत शासनाकडूनही निधीची मागणी केली आहे.

■ महिला-मुलींचे गुन्हा दाखल करण्याचे प्रमाण कसे आहे?
गेल्या काही वर्षांमध्ये मुली-महिलांचे तक्रार दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. लोकसंख्या वाढेल तशा तक्रारींची संख्याही वाढेल. याचा विचार करुनच महिला, पोलिस शाळा, कॉलेजमध्ये जावून संवाद साधतात. यामुळेही मुली पुढे येतात. सामान्य नागरिक आणि पोलिस यातील अंतर कमी झाले. आपली दखल घेतली जाईल इतपत विश्वास संपादन झाला आहे.

■ महिलांविषयी नोंदविलेले गुन्हे वेगळ्या पद्धतीने हाताळले जातात का ?
महिला विषयक गुन्ह्यांची तक्रार आम्ही शक्यतो महिला अधिकाऱ्यांकडे वर्ग करतो. तपासासाठी सामाजिक संस्थांची मदत घेतली जाते. अल्पवयीन मुलींच्या बाबतीत आम्ही केवळ एकदाच फिर्यादीला पोलिस स्टेशनमध्ये बोलावतो. अन्यथा तिच्या घरी जबाब नोंदवला जातो. महिला पोलिसांचे चार्ली पथक असल्याने प‌ीडितांशी संवाद साधण्यास मदत होते. नव्याने घोषित झालेल्या दामिनी पथकांवर काम सुरू असून यासाठी आम्ही मनुष्यबळ वाढवले. दक्षता समित्यांची प्रत्येक महिन्यात बैठक होते. आयुक्तालय वेळोवेळी फॉलोअप घेते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला अधिकाऱ्यांमुळे पेन्शनरांचा तिढा सुटला

$
0
0


औरंगाबाद ः जिल्हा परिषदेतील ५,६०० पेन्शनरांना गेल्या महिन्यांपासून निवृत्तीवेतन मिळण्यासाठी अडचण येत होती. झेडपीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे - जाधव यांनी ट्रेझरी ऑफिसर मंजिरी जोशी यांची भेट घेऊन हा तिढा सोडविला.
जिल्हा परिषदेच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन संबंधित गटविकास अधिकाऱ्यांकडून अदा केले जाते. त्यासाठी अडचणी येत होत्या. त्या दूर करण्यासाठी झेडपी मुख्यालयात पेन्शन सेल स्थापन करण्यात आला. त्याच्या माध्यमातून जिल्हाभरातील पेन्शनरांचे निवृत्ती वेतन वेळेत जमा होत होते. दीड महिन्यांपूर्वी सीईओ मधुकरराजे अर्दड यांनी पेन्शन सेल बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पेन्शनरांमध्ये एकच खळबळ उडाली. सेलच्या माध्यमातून नियमितपणे पगार व्हायचे. आता ही प्रथा बंद पडल्यामुळे पेन्शन मिळण्यास दहा तारखेपेक्षा जास्त उशीर होणार असल्याची चर्चा होती. मार्च महिन्यात फेब्रुवारीचे वेतन एक तारखेला जमा झाले नाही. पेन्शनरांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता बजेट नसल्याचे सांगण्यात आले. पेन्शनर मंडळी झेडपीत आली आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांना भेटली, पण हा प्रश्न आपल्या अखत्यारित नाही तुम्ही उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा जाधव यांना भेटा असे सांगितले होते.

अन् तोडगा निघाला
अखेरच्या महिन्यात बजेटची सर्वत्र अडचण होते. बजेट नसते पण ट्रेझरीमध्ये हमी देऊन पेन्शन केली जाते. गेल्या वर्षी मार्च महिन्यात अशीच पद्धती अवलंबिण्यात आली होती. याची माहिती घेऊन श्रीमती जाधव यांनी ट्रेझरी ऑफिसर मंजिरी जोशी यांची भेट घेतली आणि हा प्रश्न सांगितला. त्यावर तोडगा काढून हमीवर पेन्शन जमा करण्यास ट्रेझरी ऑफिसरनी मान्यता दिल्याचे श्रीमती जाधव यांनी सांगितले. त्यामुळे येत्या एक - दोन दिवसांत पेन्शनरांच्या खात्यावर निवृत्ती वेतन जमा होईल, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर, पाचवा प्रश्न आणला का?

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘सर, पाचवा प्रश्न आणला का?,’ हा प्रश्न होता परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकाचा. तोही माध्यम प्रतिनिधीला.कॉपी पुरविण्यात दंग असलेल्या पर्यवेक्षक महाशयांना वर्गावर माध्यम प्रतिनिधी केव्हा आले, याचेही भान नसल्याचे चित्र औरंगाबादपासून जवळच असलेल्या लाडसावंगी जिल्हा परिषद हायस्कूल परीक्षा केंद्रावरचे.
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. पेपरफुटीमुळे बारावीची परीक्षा गाजत असताना, दहावी परीक्षाही कॉपीमुक्त ऐवजी कॉपीयुक्त झाल्याचे पहिल्याच दिवशी चित्र होते. विभागातून दहावीला १ लाख ९१ हजार ४८८ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.
मंगळवारी प्रथम भाषा मराठी, हिंदी, उर्दू हे पेपर झाले. मराठीच्या पेपरलाच कॉप्यांचा सुळसुळाट होता. औरंगाबादपासून जवळ असलेल्या लाडसावंगी गावातील जिल्हा परिषद हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर, तर चक्क जमिनीवर बसून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. कोणताही विद्यार्थी जमिनीवर बसून परीक्षा देणार नाही, अशा प्रकारचे वक्तव्य मंडळाचे अधिकारी करत होते. प्रत्यक्षात मात्र परीक्षा केंद्रांवर सगळा गोंधळ असल्याचे चित्र आहे.
परीक्षा केंद्रावर कॉपी पुरविण्यासाठी सर्रास अनेकजण वावरतानाचे चित्र होते. भौतिक सुविधा, वीजपुरवठा असल्याचा दावा करणारे शिक्षण मंडळ तर बैठे पथक, ‘सीसीटीव्ही’ अशा सूचना देणारे महसूल विभाग या दोन्ही विभागांचा दावा किती खोटा आहे, हे परीक्षा केंद्रावरील चित्रांतून समोर आले.

महसूल विभागही झोपेत
पेपरफुटीमुळे राज्यभर बारावीची परीक्षा गाजत असताना दहावी परीक्षेतही कॉपीमुक्ती अभियानाचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र आहे. महसूल विभागाचे बैठे पथक अनेक केंद्रावर नाहीत तर, ‘सीसीटीव्ही’सारख्या सूचना पाळण्यात परीक्षा केंद्रांना रस नसल्याचे परीक्षेच्या पहिल्याच दिवशी समोर आले. यंदा बारावी परीक्षेला पेपरफुटीचे ग्रहण लागले. त्यामुळे दहावीच्या परीक्षेत माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ दक्षता बाळगेल अशी अपेक्षा होती. मात्र, मराठीच्याच पेपरला मंडळाचे दावे फोल ठरल्याचे समोर आले. शहरातील केंद्रासह ग्रामीण भागातील केंद्रावर परीक्षेत बैठे पथक अनेक ठिकाणी नव्हते. ग्रामीण भागात दूरच्या लाडसावंगीसारख्या परीक्षा केंद्रावर महसूल विभागाचे बैठे पथक नव्हतेच. त्याचबरोबर शहरातही जय भवानी हायस्कूलसारख्या अनेक केंद्रावर बैठे पथक फिरकलेच नाही.

आयुक्तांच्या घोषणेला टोपली
परीक्षा केंद्राबाहेर ‘सीसीटीव्ही’ आवश्यक अशा प्रकारची घोषणा खुद्द विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केली. तशा प्रकारच्या सूचना शिक्षण मंडळ, महसूल विभागाला देण्यात आल्या. त्यांच्याकडून शाळांना सूचना देण्यात आल्या. प्रत्यक्षात मात्र अनेक केंद्रावर अशाप्रकारची व्यवस्थाच नव्हती. त्यामुळे ही घोषणा कागदापुरतीच राहिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेनऊ कोटींचा घोटाळा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘महाराष्ट्र बँकेच्या यूपीआय अॅप्सच्या माध्यमातून हजारो तरुणांची लाखोंचा गंडा घालण्यात आला. जिल्ह्यात एकूण १२१४ खात्यांमधून हा व्यवहार होऊन नऊ कोटी ४३ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. यामध्ये पन्नास टक्के रक्कम बँकेत परत भरण्यात आली असून उर्वरित प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत,’ अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.
महाराष्ट्र बँकने खातेधारकांसाठी यूपीआय अॅप्स काढले आहे. या अॅपच्या माध्यमातून एका लाखाचे कर्ज काढण्याची सुविधा आहे. यासाठी बँकेत मोबाइल क्रमांक रजिस्टर्ड असलेले सिमकार्ड आवश्यक आहे. या क्रमांकावर अॅप्स डाउनलोड करून ही सुविधा घेता येऊ शकते. या अॅपची माहिती असलेल्या सायबर भामट्यांनी आपल्या मित्रांना तसेच परिचितांना लाखो रुपये एचडीएफसी बँकेच्या खात्यावर वळवून घेत गंडा घातला. बँकेच्या नोटीस आल्यानंतर खातेधारकांना हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी पोलिसांत धाव घेतल्यानंतर फसवणूक झालेल्या तरुणांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. महाराष्ट्र बँकेच्या जिल्ह्यात असे १२१४ अॅप असलेले खातेधारक असून शहरात साडेसातशे खातेधारक आहेत. या खातेधारकांच्या खात्यातून नऊ कोटी ४३ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.

यूपीआय फसवणुकीच्या गुन्ह्यात वेगवेगळे प्रकार घडले आहेत. मित्रानेच मित्राला टक्केवारीचे आमिष दाखवून लोन काढले आहे, तर काही प्रकरणात मित्राचे सिमकार्ड घेऊन त्याच्या नकळत लोन काढून त्याची देखील फसवणूक करण्यात आली. बँकेने अनेकांना नोटीस बजावल्यानंतर पन्नास टक्के प्रकरणात लोन काढलेल्या मंडळीनी रक्कम पुन्हा जमा केली आहे. बँकेकडून आम्ही अशा खातेधारकांचे रेकॉर्ड मागविले आहे. या प्रकरणात जाणीवपूर्वक फसवणूक केलेल्या आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. - अमितेशकुमार, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images