Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पैठण तालुक्यात वाळूपट्ट्यात वाहनबंदी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पैठण तालुक्यामधील ११ लिलाव न झालेल्या वाळूपट्ट्यातून चोरी रोखण्यासाठी चारचाकी मालवाहू वाहने जाण्यास बंदी घालावी, असा प्रस्ताव पैठण तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिला आहे. वाळूघाटांवर वाहनांना प्रतिबंध करून वाळू चोरी रोखता येईल, असे या प्रस्तावात म्हटले आहे.
गेल्या वर्षभरापासून वाळूतस्करांनी वाळूठेका न घेता सर्रास चोरी करून वाळूविक्री करण्याचा फंडा सुरू केला आहे. पैठण तालुक्यातील १२ वाळूपट्ट्यांपैकी ११ पट्ट्यांचा लिलाव झालेला नाही. त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी होते. या वाळूपट्ट्यातून रात्री ट्रक, एलपी ट्रक, हायवा, ट्रॅक्टर, आयशर टॅम्पो, लोडिंग रिक्षांमधून सर्रास वाळू चोरी केली जातो. या संदर्भात गावकऱ्यांनी प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत, मात्र कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्रशासनाला वाळू तस्करांकडून अरेरावीची भाषा, शिवीगाळ करण्यात येऊन धमकी देण्यात येते. अधिकाऱ्यांवर हल्ले करण्याचे प्रकारही तालुक्यात झाले आहेत. वाळूचोरी रोखण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक गेल्यानंतर पथकाच्या मागावर असलेले तस्करांचे लोक पथकाचे लोकेशन देतात यामुळे चोरी रोखणे अवघड झाले आहे. अनधिकृत वाळू उत्खननामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सर्व मालवाहतूक करणाऱ्या वाहनास त्या परिसरात बंदी घालून शासनाचे नुकसान थांबवता येईल. अवैध वाळू उत्‍खनन व वाहतूक करणाऱ्या लोकांना प्रतिबंध करण्यासाठी ११ वाळूपट्ट्यात ट्रक, एलपी ट्रक, हायवा, ट्रॅक्टर, टॅम्पो, लोडिंग रिक्षा तसेच वाळू वाहतूक करू शकणाऱ्या सर्व वाहनांवर प्रतिबंध घालण्यासाठी संहिता १९७३ चे कलम १४४ (१) नुसार कारवाई करावी, असा प्रस्ताव पैठणचे तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिला आहे.

लिलाव न झालेले वाळूपट्टे
नवगाव, पाटेगाव, वडवाळी, नायगाव भाग १, नायगाव भाग २, आपेगाव, मायगाव, दादेगाव जहांगीर, हिरडपुरी, टाकळी अंबड व आवडे उंचेगाव येथील वाळूपट्ट्यांचा लिलाव झालेला नाही. या वाळूपट्ट्यांमध्ये मालहवाहू वाहने जाण्यास प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करावे, असा प्रस्ताव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वर्धन घोडे खुनप्रकरण; न्यायालयीन कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
टिळकनगरातील दहा वर्षांच्या वर्धन घोडे खून प्रकरणातील संशयित आरोपी अभिलाष मोहनपूरकर व श्याम मगरे यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरुंद‍ळे यांनी गुरुवारी दिले.
पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी वर्धन घोडे याचा २७ फेब्रुवारी रोजी अपहरण करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी दोघा आरोपींची पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, कोर्टाने त्यांनी रवानगी हर्सूल कारागृहात करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात सरकारी वकील सुनील जोंधळे यांनी काम पाहिले.
दरम्यान, पोलिस या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेत आहेत. या दहा वर्षांच्या मुलाच्या वडिलांचा सुद्धा ठाणे जिल्ह्यात यापूर्वी खून झाला होता. वर्धनचा खून केल्यानंतर संशयित आरोपींनी त्याचा मृतदेह नाल्यात फेकून दिला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जादूटोणा केल्याचा सूनेवर आरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घरगुती वादातून मुलाच्या वशीकरणासाठी सुनेने व तिच्या माहेरच्या मंडळीनी अंगणात जादूटोण्याचे साहित्य टाकल्याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार २७ फेब्रुवारी रोजी होनाजीनगर जटवाडा भागात घडला. तक्रारदार निवृत्त पोलिस जमादार असून मुलीचे वडील देखील पोलिस खात्यात कार्यरत आहेत.
‌होनाजीनगर, जटवाडा भागात पूनमचंद सुकराम लोदवाल (वय ६३) हे निवृत्त पोलिस जमादार राहतात. पूनमचंद यांच्या मुलगा मंगलसिंग याचा विवाह यशोदा नावाच्या महिलेसोबत झाला होता. मंगलसिंग हा देखील पोलिस खात्यात कार्यरत आहे. या दोघांच्या कौटुंबिक वादातून भांडणे होत होती. महिला तक्रार‌ निवारण केंद्रात देखील हा वाद पोहचला होता. दरम्यान, २७ फेब्रुवारी रोजी लोदवाल यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये प्लास्टिकवर कुंकु टाकलेला लिंबू, लोदवाल यांच्या विवाहित मुलीचा पासपोर्ट साइज फोटो व त्या फोटोवर टाचणी लावण्यात आली होती. तसेच स्वप्नाचा मृत्यू, वशीकरण मंत्र असलेल्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या होत्या. दोन महिन्यापूर्वी देखील असाच प्रकार लोदवाल यांच्यासोबत घडला होता. याप्रकरणी लोदवाल यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून संशयित आरोपी यशोदाबाई मंगलसिंग लोदवाल, संगीताबाई गोपाल शिरे, गोपाल देवीलाल शिरे (सर्व रा. टीव्ही सेंटर, एन १२, हडको) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र अघोरी प्रथा व जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिमग्याआधीच पाण्याची ओरड

$
0
0

शिमग्याआधीच पाण्याची ओरड

गळत्यांच्या दुरुस्तीनंतरही पाणीबाणी कायम, पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बिघडले, नागरिकांचे हाल

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

होलिकोत्सवात पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनीवरील गळत्या दुरुस्तीसाठी २४ तासांचा शटडाऊन घेतला. मात्र, गळत्यांच्या दुरुस्तीनंतरही पाणीबाणी कायम असल्यामुळे शिमग्याआधीच शहरात पाण्याची ओरड सुरू झाल्याचे चित्र आहे. बुधवारी मध्यरात्री जायकवाडीहून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असला तरी शहरात पाणी पोहोचेपर्यंत सहा ते आठ तास लागले. त्यामुळे संपूर्ण शहराचे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बिघडले आहे. पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत.

होलिकोत्सव व प्रामुख्याने उन्हाळ्यात पाणीपुरवठा सुरळीत रहावा यासाठी महापालिकेने मंगळवारी २४ तासांचा शटडाऊन जाहीर केला. औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडी अशा ७०० आणि १४०० मिलीमीटर व्यासाच्या दोन जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. नक्षत्रवाडी येथील संतुलित जलकुंभातून औरंगाबाद शहरासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात आली आहे. नक्षत्रवाडीपर्यंत आलेले पाणी संतुलित जलकुंभाच्या माध्यमातून शहरात पाठवले जाते. दोन्ही जलवाहिनींवर मोठ्या प्रमाणावर गळत्या असल्यामुळे त्या बंद करून शहरात येणारे पाणी वाढवण्याच्या दृष्टीने शटडाऊन घेण्याचे महापालिकेने ठरविले. त्यानुसार मंगळवारी सकाळी नऊ वाजता जायकवाडी उपसा केंद्रातूनच पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे दोन्ही जलवाहिन्या कोरड्या झाल्या. मंगळवारी सकाळी नऊ वाजेपासून बुधवारी मध्यरात्री एक वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. महापालिकेने जाहीर केलेल्या माहितीनुसार हे काम बुधवारी सकाळी नऊ वाजता पूर्ण होऊन त्याच वेळी पाणीपुरवठा सुरू होणे गरजेचे होते, परंतु दुरुस्तीचे काम लांबल्यामुळे बुधवारी रात्री दोन वाजता जायकवाडीहून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.

शटडाऊनच्या काळात ३५ गळत्यांची दुरुस्ती करण्यात आल्याची माहिती पालिकेतर्फे देण्यात आली. त्यात ५ मोठ्या आणि ३० लहान गळत्यांचा समावेश होता. जायकवाडी पंपहाऊसजवळ मोठी गळती होती, ती बंद करण्यात आली. कौडगाव, गट नंबर ३०२, ढोरकीन आणि नक्षत्रवाडी या ठिकाणी देखील मोठ्या गळत्या होत्या, त्यांची दुरुस्ती करण्यात आली. दुरुस्तीचे काम रेंगाळल्यामुळे ठरवलेल्या वेळेपेक्षा १७ तास उशिरा पाणीपुरवठा सुरू झाला. त्याचा परिणाम संपूर्ण शहरात पाण्याचा ठणठणाट निर्माण होण्यावर झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही जलवाहिन्या गळत्यांच्या दुरुस्तीसाठी कोरड्या करण्यात आल्यामुळे टँकरव्दारे देखील पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे संपूर्ण शहराला ४८ तासांपेक्षा जास्त काळ पाणीबाणीला तोंड द्यावे लागले. शटडाऊन घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी देखील शहराच्या अनेक भागात पाणीपुरवठा न झाल्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.

गळत्या दुरुस्तीचे काम बुधवारी रात्री उशिरा संपले. त्यानंतर रात्री दोन वाजता एक - एक पंप सुरू करीत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. गुरुवारी दुपारी सिडकोच्या काही भागात पाणी आले. हळूहळू पाणीपुरवठा सुरळीत होईल. होळी सण डोळ्यासमोर ठेवून शटडाऊन घेतला होता. आता होळी सणाला आणि उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. शटडाऊनमुळे किमान दोन एमएलडी पाणी वाढेल.

सरताजसिंग चहल, कार्यकारी अभियंता, महापालिका.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एनडीआरएफची थरारक प्रात्यक्षिके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रेल्वे अपघात किंवा बॉम्ब स्फोटासारखी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ती कशी हाताळावी, याची प्रात्यक्षिके राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने (एनडीआरएफ)ने दाखविली. ही प्रात्यक्षिके औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी इतर ठिकाणी रेल्वेमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटना घडू नयेत, घटना घडल्यास कोणती काळजी घ्यावी, यासाठी रेल्वे विभाग, एनडीआरएफ यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्‍वेस्टेशनवर गुरुवारी सकाळी फलाट क्रमांक चारवर रंगीत तालीम करण्यात आली. एनडीआरएफच्या पथकाने स्टेशनवर बॉम्ब स्फोटासारखी परिस्थिती निर्माण केली. बॉम्बस्फोटानंतर तेथे स्फोटकांचा शोध घेणे, जखमी प्रवाशांचे प्राण वाचविणे आदी प्रात्याक्षिके करण्यात आली. या प्रात्याक्षिकात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यापासून उपचारासाठी रवाना करण्यापर्यंत तालीम करण्यात आली. यावेळी जीआरपीएफ, आरपीएफ, पोलिस, भगवान होमियोपॅथिक कॉलेजच्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या. गर्दीचे नियंत्रण, जखमींना वाचविण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न आदींची माहिती एनडीआरएफच्या जवानांनी स्थानिक कर्मचाऱ्यांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकेत खाते उघडून देत सव्वालाख लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ओळखीच्या व्यक्तिंचे बँकेत खाते उघडून देत पासबुक व एटीएम स्वतःजवळ ठेवत एकाने एक लाख २० हजार रुपये लंपास केले. हा प्रकार डिसेंबर २०१५ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत घडला. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उस्मानपुरा परिसरात एक ४० वर्षांची महिलेची गुरूलालसिंग चरणसिंग शिंधु (रा. पुंडलिकनगर) याच्याशी ओळख होती. गुरूलालसिंग याने डिसेंबर २०१५ मध्ये बंधन बँकेत या महिलेच्या पतीचे व मुलाचे बँक खाते उघडण्यास मदत केली होती. यावेळी मुलाच्या खात्यात एक लाख ५३ हजार रुपये टाकले होते. संशयित आरोपी गुरूलासिंगने दोघांच्या बँक खात्याचे पासबुक व एटीएम कार्ड स्वतःजवळच ठेवले. या कार्डचा वापर करीत त्याने दोघांच्या खात्यातून एक लाख २० हजार रुपये दोन वर्षात काढले. पैसे काढल्यानंतर मुलाच्या मोबाइलवर मॅसेज येत होते, मात्र विचारणा केल्यावर गुरूलालसिंग याने पैसे निघत नसल्याच्या थापा मारल्या. याप्रकरणी महिलेने अखेर तक्रार दाखल केली. याप्रकरणी फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करून उपनिरीक्षक बहुरे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तर प्रदेशापूर्वी द्या राज्यात कर्जमाफी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडून आलो, तर उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार, अशी घोषणा केली आहे. पण, उत्तर प्रदेशात कर्जमाफी करण्यापूर्वी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ करावे. त्यासाठी पंतप्रधानांनी राज्यातील भाजप सरकारला सूचना द्याव्यात, अशी मागणी अॅड. विष्णु ढोबळे यांनी पत्रकार परिषदेत केली.
राज्यात आतापर्यंत झालेल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी किंवा त्यांना आधार देण्यासाठी सत्ताधारी शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांची तयारी आहे, परंतु, ते घोषणा करत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य वेळी कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे. शेतकरी दररोज आत्महत्या करत असून योग्य वेळ आतापर्यंतच आलीच नाही का, असा सवाल अॅड. ढोबळे यांनी केला. देशाचा विकासदर ७ टक्क्यावर पोचला, पण या वाढीव राष्ट्रीय उत्पन्नाचा उपयोग शेतीच्या विकासासाठी होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
उत्तर प्रदेशात सत्ता मिळाल्यास कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिलेल्या पंतप्रधानांनी उत्तरप्रदेशचे निवडणूक निकाल येण्याआधी मुख्यमंत्री फडणवीस यांना विधीमंडळ अधिवेशन काळात कर्जमाफी देण्याची सूचना करावी, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीचे पत्र सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना पाठवल्याचे अॅड. ढोबळे यांनी दिली.

रोज नऊ आत्महत्या
वर्ष १९९७ ते २०१४ या काळात सरकारी माहितीनुसार देशात २ लाख ८४ हजार ९२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. वर्ष १९९७ ते २०१३ या काळात महाराष्ट्रात ५७ हजार ६८६ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी ३२०४ व दररोज ९ शेतकरी आत्महत्या करत आहेत, असे अॅड. विष्णू ढोबळे यांनी लक्षात आणून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक कोटी रुपयांचा मालक भूमिगत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जुन्या नोटा बदलून नवीन नोटा घेण्यासाठी राजेश ठक्कर याला रक्कम देणारा हितेश पुजारा मोबाइल बंद करून भूमिगत झाला आहे. त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात प्रवर्तन निदेशालयाला ‌(ईडी) पत्र पाठवणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणात अटक झालेल्या जमादार थापा याला यापूर्वी दोन वेळा समज दिली होती, असे त्यांनी सांगितले.
एक कोटी रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या नोटांची लूट करण्याच्या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. राजेश ठक्कर या व्यापाऱ्याचे एक कोटी रुपये पाच जणांनी पळवले होते. त्यांना नुकतीच अटक झाली आहे. या प्रकरणात ही रक्कम स्वतःच्या घरी ठेवणारा मुख्यालयातील जमादार वीरबहादूर गुरंग थापा यालाही अटक करण्यात आली आहे. एक कोटी रुपये लुटण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्तांना झाल्यानंतर चौकशी सुरू करण्यात आल्याने थापाचे धाबे दणाणले. त्याने या रकमेची विल्हेवाट लावण्याची योजना आखली. त्यानुसार कारचालक जमीर खान याला साडेनऊ लाख रुपयांसह गेवराईकडे पाठवले. जमादार थापा यानेच चकलांबा पोलिसांना टीप दिली व जमीर खान याला पकडून दिले. पण, त्यानंतरही हे प्रकरण न दबल्याने सलीम स्टेफनी याच्यामार्फत उर्वरित रक्कम चकलांबा पोलिसांकडे जमा केली. रकमेची विल्हेवाट लावण्याच्या प्रकारात गुन्हेशाखेने गुरुवारी चकलांबा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर यांची चौकशी करून जबाब नोंदवून घेतला.
जमादार थापा हा पूर्वी उपायुक्त परिमंडळ दोनच्या विशेष पथकात कार्यरत होता. पोलिस आयुक्तांनी त्याची दीड वर्षापूर्वी मुख्यालयात बदली करून वागणूक सुधारण्याची समज दिली होती. त्यानंतर पुन्हा एकदा बोलावून घेत हजेरी घेऊन समज दिली होती. पण, यावेळचा प्रकार गंभीर असल्याने त्याच्यावर खात्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

पुजाराचा मोबाइल बंद
कुरिअर व्यावसायिक हितेश पुजारा याने नवीन नोटांमध्ये बदल करण्यासाठी चलनातून बाद झालेल्या एक कोटी रुपयांच्या नोटा दिल्यास, अशी माहिती राजेश ठक्कर याने पोलिसांना दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीनुसार ठक्कर याला दोन लाख रुपये कमिशन देण्याचे आमिष दाखवले होते. रक्कम लुबाडली गेल्यानंतरही पुजाराने काहीच हालचाल केलेली नाही. गुन्हेशाखेने सहा जणांना अटक केल्यानंतर हितेश पुजारा पसार झाला आहे. त्याची चौकशी करण्यासाठी गुन्हेशाखेने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने मोबाइल बंद केला आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. या संदर्भात ईडी सोबत पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यालाच कर्ज वसुलीची नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
नियमबाह्य पद्धतीने कर्ज घेऊन कर्जाची परत फेड न करणाऱ्या थकबाकीदारांना जिल्हा सहकारी बँकेने कर्जवसुलीची अंतिम नोटीस बजावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कारभारी असलेले माजी जिल्हाध्यक्ष तथा डॉ. पद्मसिंह पाटील यांचे भाचे अमोल पाटोदेकर यांच्यासह अनेक राजकीय पक्षाच्या नेते मंडळींचा यामध्ये समावेश आहे.

बँकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःच्या पक्षातील नेते मंडळींना घरचा आहेर दिला असून, आता तरी हे नेते लाजणार काय असा प्रश्न जिल्हा बँकेचे सभासद शेतकरी विचारत आहेत. एकेकाळी वैभव संपन्न असलेल्या या जिल्हा बँकेला बुडविण्यात या राजकीय नेते मंडळींचा सिंहाचा वाटा होता. तेरणा साखर कारखाना, तुळजाभवानी साखर कारखाना, रेशीम वस्त्र उद्योग, कुक्कुटपालन यांच्या नावाने कर्ज उचलण्याचा व बँक बुडविण्याचा उद्योग या मंडंळींनी केला. या मंडळींनी ही बँक डबघाईस यावी या साठी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही. शिवाय ज्या संस्थेच्या नावे कर्ज होती. त्या संपत्तीचा उपभोग मात्र ते घेत आहेत. त्यामुळे बँकेने ज्या कर्ज बुडव्यांची मालमत्ता ताब्यात घेऊन जप्तीची कारवाई करणे गरजेचे आहे.
या बँकेने मर्जीतल्या नेतेमंडळींच्या संस्थांना व साखर उद्योगाला विनातारण आणि केवळ एका अर्जावर कोट्यावधींचे कर्ज नियमबाह्य पद्धतीने दिले. याशिवाय ज्या संस्था डबघाईला आल्या आहेत, अशा संस्थांना पुन्हा हेतु बदलून वेगवेगळ्या नावाने नियमबाह्य कर्ज दिले आहे. धाराशिव कुक्कुटपालनच्या ठिकाणी वस्त्रोद्योग सुरू केल्याचे दर्शवित कर्ज उचलण्यात आले आहे

कागदोपत्रीच कर्ज वसुलीचे नाटक
जिल्हा बँकेला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी कर्जवसुलीचे नाटक करणाऱ्यास सर्व पक्षीय नेते मंडळी बँकेस भाग पाडतात. या नाटकावर बँकेच्या पैशांची उधळण केली जाते. मात्र धनदांडग्यांच्या व नेते मंडळींच्या कर्जवसुली संदर्भाने कुठलीही ठोस कारवाई केली जात नाही. केवळ कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केले जातात. त्यामुळे नेतेमंडळी किंवा उद्योजकही आपल्याकडील कर्ज भरण्यास धजावत नाहीत, हा आजवरचा अनुभव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवार, पटेल यांना ‘मसाप’चे पुरस्कार

$
0
0


औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेचा ‘यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार’ ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रास जाहीर झाला आहे. तर ‘नटवर्य लोटू पाटील नाट्यपुरस्कार’ ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना दिला जाणार आहे. दोन्ही पुरस्कार लवकरच समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतील असे ‘मसाप’चे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी कळवले आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी दोन विशेष वाङ्मय पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांची घोषणा ‘मसाप’चे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी शुक्रवारी केली. यावेळी परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. भास्कर बडे आणि कार्यक्रम समितीचे प्रमुख डॉ. रामचंद्र काळुंखे उपस्थित होते. चरित्र, आत्मचरित्र किंवा राजकीय स्वरूपाचे लेखन असलेल्या सर्वोत्कृष्ट ग्रंथासाठी ‘यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार’ दिला जातो. यावर्षीचा पुरस्कार शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ ग्रंथाला जाहीर झाला आहे. प्रांजळपणा, स्पष्टता आणि कालसुसंगतता याचे भान आत्मचरित्रातून व्यक्त होते. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या ग्रंथाची निवड केली. गेली ४० वर्षे मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना ‘नटवर्य लोटू पाटील नाट्यपुरस्कार’ जाहीर झाला आहे. रोख ११ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दोन्ही पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात हजार कोटींच्या जुन्या नोटा जमा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नोटबंदीनंतरच्या चार महिन्यात जिल्ह्यातून हजार, पाचशे रुपयांच्या सात हजार कोटींच्या नोटा बॅंकांत जमा झाल्या. या नोटाच्या बदल्यात रिझर्व्ह बँकने केवळ साडेतीन हजार कोटी पाठविले आहेत.
जानेवारीपासून परिस्थिती काही प्रमाणात सुधारायला सुरुवात झाली. मात्र, अजूनही परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. बँकिंग तज्ज्ञांनुसार रिझर्व्ह बँकेने बचत खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादा १३ मार्चपासून हटविली. मात्र, त्यासाठी लागणारी यंत्रणा रिझर्व्ह बँकेने केलेली नाही. पगाराच्या कालावधीत एक ते पंधरा तारखेदरम्यान औरंगाबादला ६० ते ८० कोटींची गरज असते. या रकमेतून बँका आणि एटीएमचा कारभार चालतो. मात्र, खातेधारकांची सुरू असलेली होरपळ चार महिन्यानंतरही सुरू आहे. चलनातून बाद झालेल्या नोटांपोटी शहराच्या पाच रोकड भांडारामधून सात हजार कोटींच्या नोटा रिझर्व्ह बँकेला पाठविण्यात आल्या. मात्र, त्याबदल्यात केवळ केवळ साडेतीन हजार कोटींवर बोळवण करण्यात आली. त्यामुळे बँका, एटीएमवर अवलंबून असलेल्या लाखो नागरिकांना कारभार चालविणे अवघड होऊन बसले आहे. नोटबंदीमुळे दैनंदिन व्यवहारासह रोजगारनिर्मिती, कारखान्यांतील उत्पादन ठप्प झाले आहे. त्याचा थेट तीस टक्क्यांर्पंतचा फटका व्हॅट, विक्रीकर, प्राप्तिकर आणि स्थानिक संस्था कर वसुलीला बसला आहे.

पैसे काढण्याची मर्यादा १३ मार्चला संपणार
स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ हैदराबाद वगळता कोणत्याही राष्ट्रीयकृत, खासगी आणि सहकारी बँकांत पैशांचा पुरेशा प्रमाणात रोकड पुरवठा नव्हता. आता १३ मार्चपासून पैसे काढण्याची मर्यादा हटणार असल्याने खातेधारकांना हवी तितकी रक्कम द्यावी लागेल. त्यासाठी बँकांना दिवसाकाठी ७० ते ८० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया, हैदराबाद, बँक ऑफ महाराष्ट्र या प्रमुखबँकांसह राष्ट्रीयकृत बँकांना केवळ २० लाख रुपयांमध्ये भागवावे लागत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रोकड भांडारामध्ये गुरुवारी पैसे आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, ही रक्कम सर्व बँकांना पुरेशी नाही. त्यामुळे उर्वरित बड्या राष्ट्रीयकृत व खासगी बँकांनी आपल्या खातेधारकांपुरते पैसे पुणे, मुंबई आणि नाशिकमधून जमा केले.

आजपासून तीन दिवस बँका बंद
११ मार्चला दुसरा शनिवार, १२ मार्चला रविवार आणि सोमवारी धुलिवंदनाची अशी सलग तीन दिवस बँकांना सुटी आहे. यादरम्यान खातेधारक पूर्णपणे एटीएमवर अवलंबून असतील. मात्र, आऊटसोर्स कंपन्यांना पुरसे पैसे न देण्यात आल्याने तिन्ही दिवस एटीएममध्ये ठणठणाट राहण्याची शक्यता आहे. गुरुवारी व शुक्रवारीदेखील सातशेपैकी निम्म्या एटीएममध्ये खडखडाट होता.

पगारासाठी बड्या बँकांना दिवसाकाठी ६० ते ८० लाखांची आवश्यकता असते. सध्या २० ते ३० लाखांची व्यवस्था बँकांना आपसात करावी लागते. बचत खात्यावरील
मर्यादा हटल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर होईल. - रवी धामणगावकर, अधिकारी, स्टेट बँक ऑफ हैदराबाद

बँकांतून पैसे काढण्याची मर्यादा १३ मार्चला संपुष्टात येईल. सध्या बँकांकडे एटीएममध्ये भरायलाही पैसे नाहीत. त्यामुळे शनिवार, रविवार आणि सोमवार कठीण जातील. आता लवकरात लवकर रिझर्व्ह बँकेकडून पैसे यावेत. - देविदास तुळजापूरकर, राष्ट्रीय सचिव, ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या पुलांकडे दुर्लक्ष धोकादायक

$
0
0

aurangabad
जुन्या पुलांकडे दुर्लक्ष धोकादायक
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वाहतुकीची मर्यादा पार केलेल्या रस्ते व पुलांच्या डागडुजीकडे वेळेवर लक्ष देणे आवश्यक आहे. मुदत संपलेल्या पुलांची डागडुजी तातडीने झाली नाही, तर महाड आणि भराडीसारख्या दुर्घटना होऊ शकतात. हे माहित असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने जुन्या पुलांच्या दुरुस्तीसाठी अद्याप कुठलीच पावले उचललेली नाहीत. त्यामुळे मराठवाड्यातील पुलांवरून वाहतुकीचा धोका वाढला आहे.
गेल्यावर्षी महाडच्या सावित्री नदीवरील पूल वाहून गेला. त्यात अनेकजण मृत्युमुखी पडले. त्यानंतर दोन महिन्यांनी भराडी (ता.सिल्लोड) येथील पूल कोसळून दोन जण जखमी झाले. महाडच्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयांना कळवून धोकादायक रस्ते आणि पुलांची माहिती मागविली होती. अगदी निजामकालीन पुलांचीही स्वतंत्र माहिती घेण्यात आली. सर्व पुलांची डागडुजी आणि देखभाल, दुरुस्ती गरजनेनुसार तातडीने केली जाईल, असे सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यावेळी सांगितले होते. त्याला सात महिने उलटून गेले तरी मराठवाड्यातील जुन्या पुलांच्या दुरुस्तीबाबत अद्याप कुठलाच निर्णय झालेला नाही.
सार्वजनिक बांधकाम मंत्री गेल्या आठवड्यात औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन ३१ मेपर्यंत पुलांची दुरुस्ती करा, असे आदेश दिले. मात्र गेल्या दोन अडीच वर्षांत मराठवाड्यात ३३ ठिकाणी नवीन पूल उभारण्यात येत आहेत. त्यात ११ पूल नाबार्ड, १९ राज्य सरकारच्या निधूतून तर ३ रेल्वे प्रशासनाकडून उभारले जात आहेत. मराठवाड्यात जुने ७४ पूल आहेत. त्यापैकी अनेकांची डागडुजी अत्यावश्यक आहे.

दर्जाचे काय ?
मोठ्या मार्गांवरील पुलांची अवस्था चांगली राहिलेली नाही. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने जुन्या पुलांच्या दुरुस्तीसाठी तातडीने उपाययोजना करणे अपेक्षित होते. आता मार्च महिन्यात पुलांचे सर्वेक्षण आणि त्यानंतर कामाची सुरुवात होईल, असे गृहित धरले तर पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर दुरुस्ती होईल. पण कामाचा दर्जा कितपत राखला जाईल ? याबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे. वाहतुकीची मर्यादा पार केलेल्या रस्ते व पुलांच्या डागडुजीकडे वेळेवर लक्ष देणे आवश्यक आहे. मुदत संपलेल्या पुलांची डागडुजी तातडीने झाली नाही, तर महाड आणि भराडीसारख्या दुर्घटना होऊ शकतात. हे माहित असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने जुन्या पुलांच्या दुरुस्तीसाठी अद्याप कुठलीच पावले उचललेली नाहीत. त्यामुळे मराठवाड्यातील पुलांवरून वाहतुकीचा धोका वाढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवयवदानातून हिंदू-मुस्ल‌िम ऐक्याचे दर्शन !

$
0
0


Nikhil.Nirkhee@timesgroup.com
औरंगाबाद : शहरामध्ये मागच्या वर्षापासून सुरू झालेल्या अवयवदानाच्या चळवळीने हिंदु-मुस्ल‌िम ऐक्याचे अनोखे दर्शन घडविले असून, एकाच मुस्ल‌िम कुटुंबातील दोन सख्ख्या भावांना दोन हिंदू ब्रेन डेड दात्यांच्या किडनीदानातून जीवनदान मिळाल्याचे समोर आले आहे. दोन्ही भावांना मूत्रपिंड दाते (डोनर) मिळत नव्हते आणि म्हणूनच दोघे भाऊ तब्बल दोन ते तीन वर्षांपासून ‘डायलिसिस’वर होते. प्रत्यारोपणानंतर दोन्ही भावांची प्रकृती उत्तम असून, दोघेही आपापल्या मुळच्या शिक्षकी पेशाकडे वळाले आहेत, हे विशेष.
मौलाना आझाद कनिष्ठ महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्र विषय शिकवणारे प्रा. अब्दुल रहेमान (५७) यांना २०११ पासून किडनीविकार सुरू झाला व दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबर २०१३ पासून त्यांच्यावर ‘डायलिसिस’चे उपचार सुरू झाले. त्याचवेळी त्यांचे सख्खे कनिष्ठ भाऊ व शिक्षक शेख जब्बार (२७) यांनादेखील किडनीविकार सुरू होऊन त्यांच्यावरही जून २०१३ पासून ‘डायलिसिस’चे उपचार सुरू झाले. दोघांचीही मूत्रपिंड प्रत्यारोपणाची (किडनी ट्रान्स्प्लान्ट) इच्छा असूनदेखील कुटुंबामध्ये त्यांचा रक्तगट जुळणारा एकही मूत्रपिंड दाता उपलब्ध नव्हता. ज्यांचा रक्तगट जुळत होता, त्यांना इतर व्याधी होत्या व किडनीदान करणे शक्य नव्हते. अशा एकंदर स्थितीमुळे जवळजवळ तीन वर्षे दोघांनाही ‘डायलिसिस’वरच राहावे लागले. सुमारे दीड वर्षापूर्वी अवयवदानासंबंधी ‘झेडटीसीसी’ कार्यान्वित झाल्यानंतर किडनीसाठीच्या प्रतीक्षा यादीमध्ये दोघांच्या नावांची अधिकृत नोंदणी करण्यात आली होती. अवयवदानासंबंधीचे निकष व रक्तगट जुळल्यामुळे अब्दुल रहेमान यांच्यावर २६ फेब्रुवारी २०१६ रोजी, तर शेख जब्बार यांच्यावर १९ ऑक्टोबर २०१६ रोजी ब्रेन डेड रुग्णांच्या अवयवदानातून कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये दोघांवर यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले. त्यांच्यावर मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. सचिन सोनी यांनी अखंड उपचार केले. प्रत्यारोपणानंतर दोघांच्या प्रकृतीमध्ये आमुलाग्र सुधारणा झाली असून, अब्दुल रहेमान हे सुटीनंतर पुन्हा एकदा आपल्या शिक्षकी पेशाकडे वळाले आहेत.

अडीअडणींवर अखंड मात
प्रत्यारोपणापूर्वी अब्दुल रहेमान यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते व शस्त्रक्रियाही झाली होती. तर, प्रत्यारोपणानंतर काही दिवसांतच त्यांना डेंगीही झाला होता. मात्र, योग्य काळजी घेतल्याने तसेच खंबीर वृत्तीमुळे ते त्यातूनही सहीसलामत बाहेर पडले.

अवयवदानामुळेच आम्ही वाचलो…
ब्रेन डेड रुग्णांनी केलेल्या अवयवदानामुळेच आम्हा दोघांना नवे जीवन मिळाले आणि आम्ही आजचा दिवस पाहू शकतो. त्यामुळेच अवयवदानासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे, अशा भावना अब्दुल रहेमान व शेख जब्बार यांनी ‘मटा’कडे व्यक्त केल्या.

अब्दुल रहेमान यांना खूप दिवसांपासून उच्चरक्तदाब व मधुमेह होता, तर शेख जब्बार यांनाही उच्च रक्तदाबाचा त्रास होता. हेच दोघांच्या किडनीविकाराचे प्रमुख कारण ठरले. मात्र, दोघांनी नियमित ‘डायलिसिस’चे उपचार घेतल्याने त्यांची प्रकृती प्रत्यारोपणासाठी जास्त योग्य होती.– डॉ. सचिन सोनी, मूत्रपिंडविकारतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महसूलचे कडकडीत कामबंद

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महसूल कर्मचारी संघटनेने शुक्रवारी जिल्ह्यात शंभर टक्के काम बंद आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून गजानन चौधरी यांचा मृत्यूस प्रशासनाला जबाबदार धरत निषेध नोंदविला. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी या प्रकरणाची अप्पर आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
गौण खणिज शाखेचे अव्वल कारकून गजानन चौधरी यांचे गुरुवारी निधन झाले. आपल्याला कामाचा प्रचंड तणाव असल्याचे त्यांनी दोन वेळेस प्रशासनाला लेखी कळवले होते. मात्र, यावर प्रशासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. सोमवारी अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांची चौधरी यांनी भेट घेतली. आपल्याला कामामध्ये होत असलेला तणाव असहाय्य होत असल्याचे लेखी पत्र महसूल कर्मचारी संघटनेमार्फत दिले. मात्र, यावर प्रशासनाने या पत्राला गांभिर्याने घेतले नाही व चौधरी यांचा मानसिक तणाव वाढत गेला. परिणामी त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट
घटनेनंतर महसूल कर्मचारी संघटनेने मराठवाड्यात बंद पुकारला. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळपासूनच शुकशुकाट होता. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयात सर्व कर्मचारी कार्यालयात न जाता बाहेरच थांबले. दुपारनंतर तहसील कार्यालय तसेच काही विभागांना कुलूप लावण्यात आले. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन चौधरी यांना श्रद्धांजली अर्पण केली व या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, हा प्रशासनाच्या तणावाचा बळी आहे, दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र गिरगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची बदली करावी तसेच अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.

विभागीय आयुक्तांना निवेदन
श्रद्धांजलीनंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची भेट घेऊन निवेदन दिले व कर्मचारी मृत्यूप्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र गिरगे, राज्य संघटनेचे डी. एम. देशपांडे यांच्यासह अरविंद धोंगडे, संतोष अनर्थे, विनोद आहेर, परेश खोसरे, विजय शहाने, वसुधा बागुल, दत्तात्रय देशपांडे, मंगला मोरे, दिनेश हापत, बबन आवले, मुकुंद गिरी, फकीरचंद खंडागळे आदींची उपस्थिती होती.

कर्मचारी कल्याण कक्ष
डॉ. भापकर यांनी घडलेली घटना अत्यंत दुखद असल्याचे सांगत या घटनेची चौकशी अप्पर आयुक्तांमार्फत करण्यात येणार असल्याचे सांगितले. कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असून कार्यालयात वातारण आनंददायी रहावे म्हणून तसेच कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचारी कल्याणकारी कक्षाची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सोरमारे मूग गिळून गप्प
जिल्हाधिकारी कार्यालयातील गौणखणिज विभाग हा अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांच्या अखत्यारित येतो. चौधरी कामाचा तणाव होत असल्याच्या दोन वेळेस तक्रारी प्रशासनाकडे केल्या होत्या. यावर काय कारवाई केली, असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी उत्तर देणे टाळले. या घटनेनंतर ज्या विभागात कर्मचाऱ्यांना अधिक तणाव आहे. तेथील काय नियोजन राहील, या प्रश्नावरही सोरमारे यांनी मूग गिळून गप्प बसनेच पसंत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाडा विकासासाठी कायदेशीर लढा द्यावा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘मराठवाड्याच्या विकासासाठी गोविंदभाई श्रॉफ यांच्यासारखे सक्षम नेतृत्व आज नसले तरी सामूहिक नेतृत्व उभारावे लागेल. व्यापक जनआंदोलन आणि कायदेशीर लढा उभारल्याशिवाय मराठवाड्याचा अनुशेष भरला जाणार नाही,’ असा सूर दुसऱ्या दिवशीच्या चर्चेत निघाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विभागास विद्यापीठ अनुदान आयोगाकडून ‘सेंटर विथ पोटेंशियल फॉर एक्सलन्स’चा दर्जा मिळाला आहे. या केंद्रातर्फे 'थ्रस्ट एरिया रुरल डेव्हलपमेट इन बॅकवर्ड डिस्ट्रिक्टस ऑफ मराठवाडा' प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 'कॉन्फटिंग डेव्हलपमेट : पर्सपेक्टीव्हज ऑन मराठवाडा' या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र सुरू आहे. शुक्रवारी (१० मार्च) दुपारच्या सत्रात 'मराठवाड्याचा विकास: संधी आणि आव्हाने याविषयावर चर्चा झाली. या चर्चेत भालचंद्र कानगो, विजय दिवाण, 'सीएमआयए'चे माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, प्रा. बालाजी कोम्पलवार, डॉ. अशोक बलखोडे, प्राचार्य सर्जेराव ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले. दिवसातील शेवटच्या पाचव्या चर्चासत्रात अध्यक्षस्थानी माजी खासदार व्यंकटेश काब्दे होते. तर ज्येष्ठ समाजसेवक डॉ. द्वारकादास लोहिया, जलतज्ज्ञ या. रा. जाधव, डॉ. एस. बी. वऱ्हाडे यांनी सहभाग नोंदवला. सकाळच्या पहिल्या आणि चर्चासत्रातील तिसऱ्या सत्रात वारंगळ विद्यापीठातील प्रा. इक्बाल अली आणि प्रा. रमेश कांबळे यांनी बीजभाषण केले.

मराठवाड्यासाठी नवीन धोरण निर्माण करावे लागेल. शेती हा एकमेव पर्याय आहे. यात शेतकऱ्यांचे प्रमाण ४३ टक्के एवढे असताना शेती मात्र १६ टक्के एवढीच उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना दोन पीके घेण्यासह पश्चिम महाराष्ट्रासारखा विकास, पाणी वापरता आले पाहिजे. - डॉ. द्वारकादास लोहिया, ज्येष्ठ समाजसेवक

मराठवाड्याकडे केवळ शेती, मनुष्यबळ आणि पावसाचे पडणारे थोडेफार पाणी एवढीच साधने आहेत. सरकारने मराठवाड्याच्या विकासाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यामुळे दरडोई वीज वापर, उच्च शिक्षण, रोजगार, औद्योगिकरण, आर्थिक विकास, गुंतवणूक आणि दरडोई उत्पादनात आपण मागे पडलो आहोत. - या. रा. जाधव, जलतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोरा सैंया रे खेलत होरी...

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राधा-कृष्ण यांच्या होळीचे मोहक रंग उलगडणाऱ्या सुश्राव्य बंदिशींनी ‘रंग होली के’ ही शास्त्रीय संगीत मैफल श्रवणीय ठरली. गायिका हेमा उपासनी, जयंत नेरळकर आणि उत्तरा चौसाळकर यांनी शास्त्रीय रागदारीतून रंगाविष्कार दाखवला. अनवट चिजांनी रसिकांचा आनंद द्विगुणित झाला.
पं. नाथ नेरळकर फाउंडेशन ट्रस्ट यांच्या वतीने ‘रंग होली के’ या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी सभागृहात शुक्रवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. गायिका हेमा उपासनी यांनी ‘दुर्गा’ रागातील ‘प्रीतम सैया’ या मध्य लयीतील बंदिशीने मैफलीला सुरुवात केली. ताना, हरकती आणि आवाजातील आरोह-अवरोह गायकीचे रंग वाढवणारे ठरले. ‘मोरा सैया रे खेलत होरी, अंगन मे राधा प्यारी’ या तीनतालातील बंदिशीने हेमा यांनी रसिकांची भरभरून दाद मिळवली. तर ‘भीमपलास’ रागातील ‘खेलन लागे श्याम’ रचना जयंत नेरळकर यांनी गायली. उत्तरा चौसाळकर यांनी ‘बागेश्री’ रागातील दोन बंदिशी सादर केल्या. शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीतातील बंदिशी, ठुमरी व भजनाने मैफल उत्तरोत्तर रंगली. योगीराज पांडे व अभिषेक सिनकर यांनी संगीत साथसंगत केली. या मैफलीचे निवेदन श्रीकांत उमरीकर यांनी केले. दरम्यान, कार्यक्रमाचे उदघाटन विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी केले. यावेळी पं. नाथ नेरळकर व सी. पी. त्रिपाठी यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांनी गाजवला गोल्डन इरा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जाग‌तिक महिला दिनानिमित्त आयोजित गोल्डन इरा कार्यक्रमाला चिमुकल्यांसह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. साथी सेवा संस्था तर्फे आयोजित या नावीण्यपूर्ण स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना पुन्हा जुन्या काळात रमण्याची संधी मिळाली. तापडिया नाट्यमंदिराच्या व्यासपीठावर एकेकाळी सिल्वर स्क्रीन गाजवणाऱ्या अभिनेत्रींप्रमाणेच वेशभूषा व त्यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यांवर स्पर्धकांनी डान्स सादर करुन महिला दिन साजरा केला.
कठपुतली सिनेमातील बांगड बंब गाण्यावर शिक्षिका असलेल्या गौरी लहुरीकर यांनी डान्स सादर केला. तर एका चार वर्षांच्या चिमुकलीने लावणी सादर करून आपल्या प्रतिस्पर्धकांनी चीत केले. गाण्यांप्रमाणेच वेशभूषा आणि नृत्याने उपस्थित महिला प्रेक्षकही उठून नाचत होत्या. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने साथी सेवा संस्थेच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतो. यावर्षी संस्थेने गोल्डन इरा कार्यक्रमाद्वारे महिलांना पुन्हा व्यासपीठ दिले. यामध्ये महिला व मुलींना जुन्या अभिनेत्रींची वेशभूषा करून स्टेज गाजवण्याची संधी मिळाली. जुन्या अभिनेत्रींची वेशभूषा, गाजलेली गाणी, डान्स आणि प्रत्येक वयोगटाचा सहभाग यामुळे एकापेक्षा एक गाणी पहायला मिळाली. मुमताज, वहिदा रहेमान, मधुबाला, वैजयंतीमाला, आशा पारेख, हेमामालिनी, रेखा, झिनतामान आदी सौंदर्यमूर्तींच्या अभिनयाने, नृत्याने सर्वांना मोह‌ित केले. या अभिनेत्रींच्या आठवणी वेशभूषा व नृत्यसंगम या माध्यमातून दाखवताना स्पर्धकांनी जीव ओतला होता. पन्नाशीच्या आसपास असलेल्या दोन स्पर्धक महिलांनी 'रेश्मी सलवार कुर्ता’ या अजरामर गाण्यावर ह‌ुबेहुब डान्स केला. याशिवाय ‘दिल चीज क्या है..., झुमका गिरा रे..., कहते है मुझको हवा हवाई..., राधा कैसे न जले.., होठो पे ऐसी बात...,कांटा लगा...,’ आदी गाण्यांवर डान्स पाहायला मिळाले. कपल व ग्रुप श्रेणीमध्येही भन्नाट गाणी निवडण्यात आली होती. शीतल रुद्रवार, अजय शेंडगे परीक्षक होते. नितीन दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले. मूनवॉकर्स फॅमिली ग्रुपने गणेशवंदना सादर केली.
नम्रता ज्वेलर्स, सोनचाफा आणि गहना ज्वेलर्स यांनी सहाय्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष किरण शर्मा, उपाध्यक्ष माधुरी धुप्पड, सचिव राधिका शर्मा, पुष्पा लढ्ढा, नीता चांडक, उमा जैस्वाल, प्रमिला काबरा, नम्रता पुणेकर, प्रमिला मुगदिया, संतोषी खंडेलवाल, राधा पाटील, ज्योती दासरी, निलिमा डोंगरे आदींनी परिश्रम घेतले.

स्पर्धेतील विजेत्या
गौरी लहुरीकर, रीमा गटेरवार, कुसुम मंत्री, भारती जसोदिया, जान्हवी मोरावेकर, मानसी प्रामाणिक, सौंदर्या राजपूत, निधी जोगळेकर, प्रांजल धनदर आदी.

मी वैजयंतीमालाच्या कठपुतली सिनेमातील बांगड बंब गाण्याची निवड केली. या गाण्यासाठी मला १९५७ चा काळ दाखवायचा होता. तर ओरिजनल गाण्याप्रमाणेच मोराचे रुप घ्यायचे होते. माझ्यासाठी हे चॅलेंज होते, पण डान्स करताना खूप मजा आली. परीक्षकांना माझा सहज वावर खूप आवडला. स्पर्धेची विजेती ठरल्याने आत्मविश्वास वाढला आहे. - गौरी लहुरीकर, विजेत्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंद्रखळ्याचे सौंदर्य; आकाशात भुईचक्र

$
0
0

औरंगाबाद : सहज आकाशातील चंद्र पाहणाऱ्यांना शुक्रवारी रात्री धक्काच बसला. चंद्राभोवती एक वलय निर्माण झाले आणि जणू काही आकाशात भुईचक्र फिरावे, तसे दृश्य दिसले. निसर्गाच्या या चमत्काराला खगोलतज्ज्ञ चंद्रखळे म्हणतात...

पूर्णावस्थेतील चंद्राभोवती रात्री साडेआठच्या सुमारास शुभ्र वलय दिसू लागले. ज्यांचे चंद्राकडे लक्ष गेले, त्यांनी आप्तेष्टांना हा चमत्कार पाहण्यास सांगितले. कर्णोपकर्णी ही बातमी शहरभर पसरली अन् लोक रस्त्यावर, गच्चीवर जाऊन निसर्गाचा हा आविष्कार पाहू लागले. याविषयी खगोलतज्ज्ञ व्यंकटेश केदारे यांनी सांगितले की, ‘वातावरणातील बाष्पाचे प्रमाण वाढले की असे चंद्रखळे तयार होते. चंद्र पूर्णावस्थेत असेल, तर ते ठळकपणे दिसून येते. अर्थात, हे बाष्प वातावरणात असते. पृथ्वीपासून तीन लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्रापर्यंत ते पोचलेले नसते. वातावरणातील बाष्पामुळे असा नजारा दिसू लागतो.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहेगाव बंगला येथे दुकानात पुन्हा चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
औरंगाबाद-नगर महामार्गावर असलेल्या दहेगाव बंगला येथे एकच कापड दुकान चोरांनी दुसऱ्यांदा फोडून एक लाख १२ हजार रुपयांचे रेडिमेड कपडे चोरून नेले. ही चोरी गुरुवारी रात्री अडीच वाजता झाल्याचा संशय आहे.
दहेगाव बंगला येथील कापड दुकानासह परिसरातील दुकानांना चोरांनी काही दिवसांपासून लक्ष्य केले आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चोरट्यांनी परिसरातील दोन दुकाने व एका कृषी साहित्याच्या दुकानातून माल लंपास केला होता. या गुन्ह्यातील चोरट्यांना अटक करण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. त्यामुळे मनोधैर्य वाढलेल्या चोरांनी गुरुवारी रात्री अडीचच्या सुमारास सूर्यभान अण्णासाहेब शिंदे (रा. नरसापूर) यांच्या सुमंजली कलेक्शन या कापड दुकानात चोरी केली. शटर उचकटून त्यापुढील भिंत चोरांनी फोडली. चोरांनी एक लाख १२ हजार रुपयांचे कपडे लांबवले आहेत. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहेगाव बंगला परिसरातील महामार्गावरील रस्त्यालगत असलेल्या दुकानांमध्ये चोरीच्या घटनेत वाढ होत आहे. त्यात लिंबेजळगाव, दहेगाव बंगला आदी परिसरातील रस्त्यालगतची छोटी हॉटेल व दुकाने लक्ष केली आहे. वारंवार घडणार्‍या या घटनेमुळे व्यापारी व नागरीकांमधून रोष व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचायत समिती निवडीवर झेडपीचे गणित

$
0
0


म. टा. प्र‌िनिधी, बीड
बीड जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वात जास्त जागा निवडून आल्या आहेत. तर भाजप,सेना, शिवसंग्राम मिळून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी तीन सदस्य कमी पडतात. त्यामुळे जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस राखते की भाजप, सेना, शिवसंग्रामचा झेंडा फडकतो याकडे लक्ष आहे. मात्र, मॅजिक फिगर गाठण्यासाठी जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीच्या आधी म्हणजे १४ मार्च रोजी पंचायत समिती सभापती निवडी आहेत. त्यामुळे या निवडीवर जिल्हा परिषदेचे गणित ठरणार आहे. त्यामुळे आता चौदा तारखेकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.
बीड जिल्हा परिषद निवडणुकीत साठ पैकी सर्वाधिक २५ जागी राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली होती. तसेच एक राष्ट्रवादी समर्थक अपक्ष सदस्य निवडून आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ आणि एक अपक्ष अशा २६ जिल्हा परिषद सदस्यांचा गट स्थापन करण्यात आला आहे. बजरंग सोनवणे यांची जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे तीन सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे आज घडीला राष्ट्रवादी, काँग्रेस, अपक्ष मिळून आकडा २९ पर्यंत पोचतो आहे. मात्र, बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांना दोन सदस्यांची आवश्यकता आहे. बीड विधानसभा मतदारसंघातील आमदार माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात त्यांच्या पुतण्याने बंड केले. काकू-नाना विकास आघाडीचे उमेदवार उभे केले. काकू-नाना विकास आघाडीचे तीन जिल्हा परिषद सदस्य व सहा पंचायत समिती सदस्य निवडून आले आहेत. काकू-नाना आघाडीला बीडची पंचायत समिती महत्वाची आहे. त्यामुळे काकू-नाना विकास आघाडीचे सदस्य हे कुणाबरोबर जाणार याकडे लक्ष आहे. बीड पंचायत समितीमध्ये सभापती निवडून आणण्यासाठी त्यांना नऊ सदस्यांची गरज आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पंचायत समितीच्या निवडीस मदत दिली तर जिल्हा परिषदेला काकू-नाना राष्ट्रवादीला मदत करू शकते. तसेच गेवराई तालुक्यात माजी आमदार बदामराव पंडीत यांच्या नेतृत्वाखाली चार जिल्हा परिषद सदस्य निवडून आले आहेत. त्यांना पंचायत समितीला मदत करून जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेची मदत घेण्याचा एक मतप्रवाह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची निवड २१ मार्चला आहे. पण या निवडीआधी म्हणजेच चौदा मार्च रोजी पंचायत समिती सभापती उपसभापती निवड आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे भवितव्य हे पंचायत समितीवर ठरणार आहे.
दुसरीकडे भाजप, सेना व शिवसंग्रामचे मिळून २८ सदस्य होतात. भाजप-सेना एकत्र असल्यास गेवराई पंचायत समितीवर सेना भाजपचा झेंडा फडकू शकतो.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटातील महिलासाठी राखीव आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत माजलगाव मतदार संघावर माजी मंत्री प्रकाश सोळंके यांचा वरचष्मा सिद्ध झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक सदस्य माजलगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अकरा पैकी नऊ सदस्य विजयी झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी मंगला सोळंके यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, जिल्हा परिषदेचा निर्णय पंचायत समिती निवडीनंतर स्पष्ट होईल.
.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images