Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पत्नीची आत्महत्या; पतीला सक्तमजुरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पतीसह सासरच्या छळाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याप्रकरणी पतीला एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. काकाणी यांनी शुक्रवारी (१० मार्च) ठोठावली.
या प्रकरणी मृत विवाहिता माया हिची आई सिंधुबाई इंगळे (४०, रा. प्रबुद्ध नगर, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, विवाहिता माया यांचा विवाह आरोपी शरद पवार (२६, रा. मूळचा बुलडाणा, हमु प्रगती कॉलनी, औरंगाबाद) याच्याशी २६ मे २००९ रोजी झाला होता. लग्नानंतर हुंडा कमी दिला, मानपान केले नाही आदी कारणांवरून पतीसह सासरच्या मंडळींकडून तिचा शारीरिक-मानसिक छळ केला जात होता. पतीकडून तिला वारंवार मारहाण केली जात होती. खाऊ-पिऊ दिले जात नव्हते. शेवटी सततच्या छळाला कंटाळून विवाहिता माया हिने ४ डिसेंबर २०१० रोजी राहत्या घरी जाळून घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन पती शरद पवार, सासू, नणंद, दिराविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यामध्ये कलम ४९८ (अ), ३०४, ३०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. सुनावणीवेळी, दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर कोर्टाने आरोपीला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा टोठावली. तर, सबळ पुराव्याअभावी इतर तिघांची मुक्तता करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस करणार पाठकला साक्षीदार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘टिळकनगर येथील वर्धन घोडेच्या खूनाच्या षडयंत्रात अभिलाष मोहनपूरकर व श्याम मगरे या दोघांचाच समावेश आहे. कटात सहभागी असल्याच्या संशयावरून चौकशी करण्यात आलेला ‌अभिलाषचा मित्र इंद्रनील पाठक याचा कटात समावेश नसून त्याला साक्षीदार करण्यात आहे,’ अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.
वर्धन घोडे या दहा वर्षांच्या मुलाचे पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी २७ फेब्रुवारी रोजी अपहरण करून खून करण्यात आला होता. ‌पोलिसांनी संशयित आरोपींना तत्काळ अटक केली आहे. चौकशीमध्ये घटनेपूर्वी अभिलाष हा त्याचा मित्र इंद्रनील पाठक याला भेटल्याचे निष्पन्न झाले होते. अभिलाष त्याच्यासोबत काही महिन्यांपासून अपहरण व खंडणीच्या गप्पा मारीत होता. दारू पिल्यानंतर तो नेहमी या विषयावर चर्चा करीत होता. मात्र, तो असे कृत्य करेल, असे पाठकला वाटत नसल्याने त्याने त्याकडे दुर्लक्ष केले, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत पाठकने दिली होती. या प्रकरणात पाठकचा समावेश नसल्याने त्याला आरोपी करण्यात येणार नाही, तर साक्षीदार करण्यात येणार आहे. त्यामुळे या घटनेत अभिलाष व श्याम या दोघांचाच समावेश असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपंगत्वास कारणीभूत; २८ महिने कारावास

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
वीज जोडणीसाठी एका तरुणास डीपीच्या खांबावर चढण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यास २८ महिने वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व ५० हजार रुपये नुकसान भरपाईची देण्याचे आदेश प्रथम न्याय दंडाधिकारी आर. एन. खान यांनी दिले. आरोपीचे नाव दत्तात्रय मारुती कानडजे (रा. शिवना, ता. सिल्लोड), असे असून खांबावर चढलेल्या तरुणाला अपंगत्व आलेले आहे.
शिवना येथील दत्तात्रय मारोती कानडजे याने राजू लक्ष्मण जाधव याला विद्युत डीपीवर चढवून वीज जोडणी करण्याचे काम सांगितले होते. कानडजे यांच्या सांगण्यावरून राजू डीपीवर चढला होता. त्यानंतर वीज जोडणीचे काम करताना अचानक वीज प्रवाह सुरू होऊन झालेल्या अपघातात त्याचे दोन्ही हात व उजवा पाय भाजला. या घटनेमुळे राजू जाधव याचा डावा हात कोपरापासून कापावा लागला. याप्रकरणी अजिंठा पोलिस ठाण्यात कानडजे विरूद्ध भादंवि कलम २८५, ३३८, ५०६ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. सिल्लोड कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षाच्या वतीने विशेष सहायक सरकारी अभियोक्ता अॅड. अजीम खान यांनी सात साक्षीदार तपासले, त्यात आरोपी विरूद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायाधीश आर. एन. खान यांनी कानडजे यास २८ महिने सश्रम कारावासाची शिक्षा व ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भागीदार महिलेची फेसबुकवरून फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भागीदारीतील वादाचा सूड उगवण्यासाठी एका महिलेचे फेसबुकवर बनावट अकाउंट उघडून बदनामी करण्यात आली. या महिलेच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. याप्रकरणी पोलिसांनी रशीद अहमद अब्दुल रऊफ (वय ३० रा. आरेफ कॉलनी) याला अटक केली आहे.
रशीद अहमद अब्दुल रऊफ याची एका महिलेसोबत व्यवसायात भागीदारी होती. त्यांच्यात वाद झाल्यामुळे रशीदचा तिच्यावर राग होता. याचा सूड घेण्यासाठी त्याने त्या महिलेच्या नाव, फोटो व मोबाइल नंबर टाकून अकाउंट उघडले. महिलेच्या पतीचा मोबाइल नंबरही टाकला होता. हे अकाउंट उघडल्यानंतर ही महिला व तिच्या पतीला अनोळखी फोन नंबरवरून फोन येण्यास सुरुवात झाली. त्याचा मानसिक त्रास होत असल्याने महिला तिच्या पतीने २५ फेब्रुवारी रोजी बेगमपुरा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सायबर सेलने तपास करून रशीदला अटक केली. त्याने गुन्हा कबूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक उन्मेश थिटे, गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक हेमंत तोडकर, नितीन आंधळे, विजय राजपूत, धुडकू खरे, विवेकानंद औटी, रेवननाथ गवळे, सुशांत शेळके, नितीन देशमुख, रवी खरात, प्र्रदीप कुटे, प्रशांत साकला, सुदर्शन एखंडे, अतुल तुपे, धनंजय सानप, कल्पना जांबोटकर, शिल्पा तेलोरे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लुटीच्या रकमेसाठी अनेकांची फिल्डिंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एक कोटी रुपयाच्या दरोडा प्रकरणात आरोपी असलेल्या पोलिस जमादार थापाच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी पोलिसांतर्फे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवण्यात येणार आहे. या रकमेसाठी फिल्डिंग लावलेल्या कदीर मौलाना व ओसामा नावाच्या व्यक्तींनी लुटीतील एका संशयित आरोपीला मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे, त्या दोघांना चौकशीसाठी बोलावणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.
नोटा बदलून देण्याच्या प्रकरणात एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटांची लूट करण्यात आली आहे. या प्रकरणी रक्कम पळवणाऱ्या पाच संशयित आरोपींसह त्यांना सहकार्य करणारा पोलिस जमादार वीरबहादूर गुरंग थापा याला अटक करण्यात आली आहे. राजेश ठक्कर यांची ही रक्कम योगेश शेट्टे व इतरांनी पळवली होती. ठक्कर यांनी योगेशला कोणत्याही परिस्थितीत ही रक्कम परत मिळाली पाहिजे, अशी मागणी केली होती. हे प्रकरण कदीर मौलाना व ओसामा नावाच्या व्यक्तीकडे गेले होते. त्यांनी या लुटीमधील एक आरोपी शेख शहजाद उर्फ सद्दाम (वय २४ रा. रहेमानिया कॉलनी, किराडपुरा) याला घरी बोलावून मारहाण केली होती. पण, जमादार थापा या सर्वाना भारी पडला. त्याने लुटीतील रक्कम स्वतःकडे घेत आठ दिवस घरी ठेवली, कदीर मौलाना व ओसामा या दोघांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.

थापाच्या मालमत्तेची चौकशी
पोलिस जमादार थापा हा गेल्या अनेक वर्षापासून पोलिसात कार्यरत आहे. स्कॉर्पिओ वापरणाऱ्या थापाची एकूण मालमत्ता किती आहे, याची चौकशी करण्यात येणार आहे. या संदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला पत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्लोड बाजार समितीचे उपसभापती अपात्र

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तीन महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदारसंघातून विजयी झालेले व सध्या बाजार समितीचे उपसभापती असलेले नंदकिशोर सहारे यांची निवड रद्द करून त्यांना आपात्र ठरविण्यात आले आहे. हा आदेश जिल्हा उपनिबंधक एस. बी. खरे यांनी दिला.
या मतदारसंघातील पराभूत उमेदवार प्रभाकर रामलाल झारेवाल यांनी अपिल कोले होते. नंदकिशोर सहारे हे बाजार समितीचे कंत्राटदार आहेत. त्यांनी कामाबद्दलचे करारही केले आहेत. बाजार समितीने त्यांना देयके अदा केली असून त्यांनी केलेल्या कामाची अनामत रक्कम बाजार समितीकडे जमा आहे. त्यांच करार अस्तित्वात असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम १९६३ नियम ४१(२) अन्वये ते निवडून येण्यास पात्र नाहीत. त्यामुळे त्यांची निवड रद्द करावी, असे अपिलात म्हटले होते. याप्रकरणी संबंधितांना नोटीस पाठवून सुनावणी घेण्यात आली. याप्रकरणी जिल्हा उपनिबंधक एस. बी. खरे यांनी, नंदकिशोर सहारे यांचे बाजार समितीसोबत व्यावसायिक हितसंबंध असल्याचा निष्कर्ष काढला. ते कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री अधिनियमानुसार अजमता धारण करीत असल्याने २०१६ ते २०२१ या कालावधीसाठी झालेली निवड रद्द करत त्यांना अपात्र ठरवत असल्याचा आदेश दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यात्रेच्या निविदांवर शिवसेनेचा आक्षेप

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
नाथषष्ठी महोत्सवाच्या तयारीसंबंधी काढण्यात आलेल्या निविदामध्ये सावळा गोंधळ असल्याचा आरोप शिवसेनेच्या सात नगरसेवकांनी केला आहे. याविषयी खुलासा करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन केली आहे.
नाथषष्ठी महोत्सव यात्रेत भाविक व वारकऱ्यांना सुविधा पुरवण्याची सर्व जबाबदारी नगर पालिकेवर आहे. यासाठी राज्य शासनकडून नगर पालिकेला यात्रा निधी देण्यात येतो. यावर्षी नाथषष्ठी यात्रेसाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला यात्रेची तयारी करण्यात येत आहे. यात्रेच्या कामांच्या निविदा प्रक्रियेत सावळा गोंधळ असल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला आहे. निविदेची नोटीस ९ मार्च रोजी देण्यात आली असून त्या १५ मार्च रोजी म्हणजे नाथषष्ठी उत्सवाच्या दोन दिवस आधी उघडण्यात येणार आहे. म्हणजे काम करण्यासाठी कंत्राटदाराला केवळ दोन दिवसांचा अवधी मिळणार आहे. ही कामे दोन दिवसात होतील का, असा प्रश्न नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात उपस्थित केला आहे. निवेदेतील एकाही कामाचे अंदाजपत्रक निविदा नोटीसमध्ये दाखवण्यात आला नाही; नदीपात्रातील चिंध्या उचल्याची निविदा काढण्यात आली आहे, मात्र चिंध्या आधीच उचलण्यात आल्या आहेत, असे या निविदेत म्हटले आहे. निवेदनावर तुषार पाटील, सोमनाथ परळकर, संगीता मापारी, शोभा सव्वासे, ईश्वर दगडे, दत्ता गोर्डे व भूषण कावसनकर या नगरसेवकांच्या सह्या आहेत.

कामासाठी दोन दिवस
निविदा १५ मार्च रोजी म्हणजे नाथषष्ठी उत्सवाच्या दोन दिवस आधी उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे काम करण्यासाठी कंत्राटदाराला केवळ दोन दिवसांचा अवधी मिळणार आहे. ही कामे दोन दिवसात होतील का, असा प्रश्न नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छेडछाडप्रकरणी पाचव्या दिवशी शिक्षा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील १४ वर्षांच्या मुलीला धमक्यांसह वारंवार छेडछाड करणाऱ्या १९ वर्षीय युवकाला मुलीने तक्रार दिल्याच्या पाचव्या दिवशी दोषी ठरवून युवकाचे वय व करिअरचा विचार करून एक लाख रुपयांच्या बाँडसह दोन वर्षे कालावधीच्या चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर सोडण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. काकाणी यांनी नुकतेच दिले. या कालावधीत आरोपीने अशाच प्रकारचा गुन्हा केल्यास त्याला शिक्षा सुनावण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
याप्रकरणी शहरातील १४ वर्षांच्या मुलीने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, आरोपी असद अन्सार पठाण (१९, रा. गारखेडा) हा संबंधित पीडित मुलीला शाळेत जाताना-येताना ‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझ्या वडिलांना मारून टाकेन’ अशी धमकी देत होता. या धमक्यांमुळे संबंधित मुलगी १५ दिवसांपासून शाळेत गेली नव्हती. दरम्यान, ४ फेब्रुवारी २०१७ रोजी पीडित मुलगी तिच्या राहत्या घरासमोर उभी असता, आरोपी तिथे आला आणि त्याने पीडित मुलीचा हात पकडून ‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला व तुझ्या वडिलांना मारुन टाकेन’ अशी धमकी देत तिचा विनयभंग केला. या वेळी मुलगी ओरड्याने आरोपी तिथून पळून गेला. पीडित मुलीने घडला प्रकार रात्री आई-वडिलांना सांगितला आणि दुसऱ्या दिवशी ५ फेब्रुवारी रोजी पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यामध्ये आरोपीविरुद्ध कलम ३५४ (अ) (ड), ५०६, तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ११ (१), १२ अन्वये गुन्हा दाखल झाला. तपासी अंमलदार पोलिस उपनिरीक्षक अनिता फास्ते यांनी तपास करुन तक्रार दिल्याच्या तिसऱ्या दिवशी ८ फेब्रुवारी रोजी कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीवेळी, सहाय्यक सरकारी वकील उदय पांडे व बाळासाहेब महेर यांनी फिर्यादी, तिची आई व तपासी अंमलदार यांचे जबाब नोंदविले. स्पॉट पंचनाम्यासह दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने दोषारोपपत्र दाखल झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १० फेब्रुवारी रोजी आरोपी युवकाला एक लाख रुपयांच्या बाँडसह दोन वर्षे कालावधीच्या चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर सोडण्याचे आदेश दिले. या कालावधीत आरोपीने अशाच प्रकारचा गुन्हा केल्यास त्याला याच कलमाखाली शिक्षा ठोठावण्यात येईल, असेही कोर्टाने आदेशात स्पष्ट केले आहे.

तातडीने तपास, प्राधान्याने निकाल
या प्रकरणी प्रोबेश्नरी पोलिस उपनिरीक्षक अनिता फास्ते यांनी तातडीने तपास पूर्ण केला आणि पीडितेने तक्रार दिल्याच्या तिसऱ्या दिवशी सर्व पुराव्यांनिशी कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. तर, छेडछाडीच्या प्रकारांना गांभीर्याने घेत कोर्टानेही दोषारोपपत्र दाखल केल्याच्या दुसऱ्या दिवशी प्राधान्याने निकाल दिला. त्याचवेळी १९ वर्षीय युवकाच्या वयाचा व करिअरचा विचार करून युवकाला सुधारण्याची संधी दिलीच; शिवाय यापुढे युवकाने अशा प्रकारचा गुन्हा केल्यास शिक्षा ठोठावणार असल्याचेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रक्कम दिली झाल्ट्यात; पंचनाम्यात घराची नोंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एक कोटी रुपयाचा दरोडा अंगलट आल्यानंतर जमादार थापाने चकलांबा पोलिसांना माहिती देत रक्कमेची विल्हेवाट लावली. झाल्टा फाटा येथे चकलांबा पोलिसांच्या हाती रक्कम सुपूर्द करण्यात आली, मात्र पोलिसांनी पंचनामा करताना ही रक्कम आरोपींच्या घरात दाखवल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमारी दिली. ही रक्कम देणाऱ्या साक्षीदाराचा इन कॅमेरा जबाब घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सेंट्रल नाका येथून एक कोटीची रक्कम लुबाडल्यानंतर आरोपींनी जमादार थापा याच्याशी संपर्क साधला. त्याने ही रक्कम स्वतःच्या स्कॉर्पिओतून घेऊन जाऊन घरी ठेवली. ती रक्कम आठ दिवस त्याच्या घरी होती. दरम्यान, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना हा प्रकार समजल्यानंतर रकमेची विल्हेवाट लावण्याचे आरोपींनी ठरवले. त्यांनी साडेनऊ लाख रुपये घेऊन कारचालक जमीरखानला गेवराईकडे पाठवले. जमादार थापा याने चकलांबा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर यांना फोन करून कार क्रमांक सांगितला. यानंतर चकलांबा पोलिसांनी ही कार अडवत साडेनऊ लाख रुपये जप्त केले. त्यानंतरही प्रकरण मिटले नसल्याने उर्वरीित रक्कम चकलांबा पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे ठरले. सलीम स्टेफनी नावाच्या व्यक्तीसोबत ही रक्कम झाल्टा फाटा येथे पाठवण्यात आली. झाल्टा फाटा येथून चकलांबा पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेतली. मात्र, पंचनामा करताना संशयित आरोपी शेख सद्दाम, शेख फजल व साजीद अब्दुल शेख यांच्या घरातून ही रक्कम अनुक्रमे ३० लाख, ४० लाख व साडेचौदा लाख, अशी जप्त केल्याचे दाखवले. या रक्कमेची विल्हेवाट लावण्यासाठी चकलांबा पोलिसांनी देखील मदत केली असून झाल्टा फाटा येथे रक्कम देणाऱ्या सलीम स्टेफनी याचा इन कॅमेरा जबाब घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळेच्या परिसरात चिमुकलीचा विनयभंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पाच वर्षीय मुलीचा जिल्हा परिषद शाळेच्या आवारात एका ३० वर्षाय इसमाने विनयभंग केला. चिमुकलीने आरडाओरड केल्याने संशयित आरोपीने तेथून पळ काढला. याप्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी सतीश जऱ्हाडे (रा. कवडगाव अंबड) यास अटक करण्यात आली, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक डी. जी. चिखलीकर यांनी दिली.
पाच वर्षीय पीडित मुलगी गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर खेळत होती. त्यावेळी संशयित आरोपी सतीश जऱ्हाडे याने चिमुरडीला बळजबरीने शाळेच्या स्वच्छतागृहात घेऊन जाऊन विनयभंग केला. त्यावेळी मुलीने आरडाओरड केल्याने ओरडू नको, लोक आपल्याला मारून टाकतील, अशी भीती दाखवली. पीडिताने त्यास न जुमानता आरडाओरड केल्याने आरोपी तेथून पसार झाला, असे पालकांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, सायंकाळ झाल्यानंतर मुलगी घरी न आल्याने आजीने तिचा शोध घेतला. त्यावेळी ती शाळेच्या मैदानावर रडत असल्याचे निदर्शनास आले. चौकशीत हा घृष्णास्पद प्रकार समोर आला. नातेवाईकांनी शोध घेत संशयितास पडून त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाला निर्यातीचे स्वप्न शिवारातच

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पारंपरिक पिकांना फाटा देऊन भाजीपाला उत्पादनाकडे वळलेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला निर्यात सुरू केली. मात्र, वर्षभरातच निर्यातीतील अचडणींनी शेतकऱ्यांचा उत्साह मावळला. वाहतूक सुविधा, उत्तम रस्ते आणि उत्पादनात सातत्य नसल्यामुळे निर्यात थंडावली आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात यशस्वी ठरलेला निर्यात पॅटर्न औरंगाबाद जिल्ह्यात बारगळला आहे.
भाजीपाल्याची निर्यात शेतकऱ्यांची जोखीम कमी करण्यास कारणीभूत ठरत आहे. जिल्ह्यात मागील तीन वर्षांत भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढले. अद्रक, हळद, कांदा, मिरची, भेंडी, ढोबळी मिरची, कोबी, काकडी व कारले पिकाचे क्षेत्र लक्षणीय वाढले. कन्नड, सिल्लोड आणि औरंगाबाद तालुक्यात सिंचन सुविधा मुबलक असल्याने भाजीपाला उत्पादनाकडे शेतकरी वळले आहेत. बहुतेक पिकाची विक्री देशांतर्गत बाजारपेठेत होते. सूरत, अहमदाबाद आणि वाशी या तीन बाजारपेठेत भाजीपाला विक्रीसाठी पाठवला जातो. निर्यातक्षम पीक असल्यास अधिक नफा मिळून जोखीम कमी होते. नाशिक आणि नगर जिल्ह्यात खासगी कंपन्या भाजीपाला निर्यात करीत आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना जास्तीचा नफा मिळत आहे. कन्नड तालुक्यातील कविटखेडा येथे पंकज गायकवाड यांनी निवडक शेतकऱ्यांशी करार करून भेंडीची निर्यात केली. शेतकऱ्यांना भेंडीसाठी जागेवर प्रतिकिलो ३५ रूपये दर देण्यात आला. कन्नड तालुक्यातील भेंडी लंडनला पोहचली. या निर्यातीमुळे शेतकरी उत्साहित झाले. पण, खराब रस्ते आणि वातानुकूलित वाहनांचा अभाव निर्यातीसाठी अडसर ठरला. काही दिवस प्रयत्न कायम ठेवून नंतर निर्यात बंद करण्यात आली.
‘अंतर्गत रस्ते अत्यंत खराब असल्यामुळे माल घेऊन महामार्गावर येण्यासाठी दोन तास लागतात. मुंबईपर्यंत भाजीपाला जलद पाठवणे शक्य नसल्याने निर्यात थांबवण्यात आली’ असा अनुभव गायकवाड यांनी सांगितला. सिल्लोड तालुक्यातील मिरची आखाती देशात जात असली तरी थेट शेतकऱ्यांकडून पुरवली जात नाही. वाशी बाजारपेठेत ग्रेडींग व पॅकिंग करून मिरचीची निर्यात होते. त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेसा नफा मिळत नसल्याची स्थिती आहे. पायाभूत सुविधा दिल्यास जिल्ह्यातून भाजीपाला निर्यात वाढण्याची शक्यता आहे. कृषी विभाग आणि कृषी उत्पन्न बाजार समितीने निर्यातीबाबत ठोस धोरण नाही. या उदासिनतेचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

निर्यातीचा प्रवास
भाजीपाला निर्यात करणे अत्यंत कष्टप्रद असून ‘कनेक्टिव्हीटी’चा मोठा अडथळा आहे. निश्चित वेळेत भाजीपाला तोडणी करून वाहनात योग्य पद्धतीने भरावा लागतो. वातानुकूलित वाहन नसल्यास भाजीपाला खराब होण्याची भीती असते. भाजीपाला मुंबईत शीतगृहात नेऊन ग्रेडींग व पॅकिंग करतात. त्यानंतर विमानतळावर माल पाठवून करार झालेल्या देशात निर्यात होतो. शिवार ते विदेश हा प्रवास जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अजूनही आवाक्यात नाही.

शेतकरी गटाने एकत्रितपणे भाजीपाला उत्पादन घेण्याची मानसिकता नाही. निर्यातीची माहिती नसल्याने शेतकरी भाजीपाला उत्पादनाकडे वळत नाहीत. ‘क्लस्टर’ तयार झाल्याशिवाय निर्यातीला वेग येणे शक्य नाही.
- पंकज गायकवाड, निर्यातदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज तारांमुळे आग; गव्हाची गंजी खाक

0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
तालुक्यातील आळंद येथील रंगनाथ बाबूराव तायडे यांच्या शेतातील गव्हाच्या गंजीला विद्युत तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली. या आगीत गहू, आंबा व पेरुची झाडे खाक झाल्याने सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले.
रंगनाथ तायडे यांचे आळंद शिवारातील गट नंबर ४४७ मध्ये शेत आहे. त्यांच्या शेतातून गेलेल्या विजेच्या तारांमुळे गुरुवारी दुपारी एकच्या सुमाराला आग लागली. गव्हाच्या गंजीला आग लागताच मुले व महिलांनी आरडाओरडा केला, त्यावेळी रंगनाथ तायडे हे पुतण्या भगवान तायडे याच्यासह पाणी काढत होते. त्यांनी धाव घेऊन शेजाऱ्यांना हाका मारून मदतीसाठी बोलावून घेतले. सर्वांनी मदतकार्य करून आग आटोक्यात आणली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेजारी असलेल्या घरातील मुले व महिला आगीमध्ये सापडल्या असत्या. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तलाठी सी. एम. सुरडकर व महावितरणचे सहायक अभियंता पी. आर. पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. एक महिन्यापूर्वी घरातील विद्युत बोर्डात वीज प्रवाह उतलल्यामुळे रंगनाथ तायडे यांची पुतणी अर्चना तायडे (वय १९) यांचा मृत्यू झाला आहे. त्या घटनेनंतर विजेमुळेच आर्थिकहानी झाल्याने हे कुटुंब संकटात सापडले आहे.

तारा लोंबकळल्या
या शेतामधून गेलेल्या विजेच्या तारा हाताचा स्पर्श होतील एवढ्या अंतरापर्यंत लोंबकळल्या आहेत. थोडा वारा सुटताच या तारांचे एकमेकांत घर्षण होते. वाऱ्याने हलू नयेत यासाठी विज तारांना दगड बांधले आहेत. वेगवान वारे सुटल्यास तारा हलून स्पार्किंग होते, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद क्रिकेट संघटनेची निवडणूक २६ मार्चला

0
0

औरंगाबाद क्रिकेट संघटनेची निवडणूक २६ मार्चला
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी २६ मार्च रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. संघटनेची अखेरची निवडणूक २००९मध्ये झाली होती. त्या कार्यकारिणीला धर्मादाय आयुक्तांनी मान्यता दिली नाही.
क्रिकेट क्षेत्रातील रखडलेल्या विकासाला दिशा देण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर आवाज उठत होता. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने औरंगाबाद शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्याबाबत वृत्तमालिका दिली होती. यात अनेकांनी क्रिकेट संघटनेची निवडणूक घेऊन सशक्त कार्यकारिणी निवडून आल्याशिवाय क्रिकेटचा विकास शक्य नसल्याची भावना व्यक्त केली होती. धर्मादाय आयुक्तांनी संघटनेचे सचिव सचिन मुळे यांचा चेंज रिर्पोटचा अर्ज फेटाळून लावत त्यांच्यासह नवीन ४८ सभासद आणि तीन आजीव सभासदांचे सदस्यत्त्व रद्द करण्याचे आदेश दिले होते. सध्या शेड्युल वनवर असलेल्या पदाधिकाऱ्यांना तीन महिन्यांत निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निवडणूक प्रक्रिया सुरूही झाली होती. पण ती अचानक रद्द करण्यात आली.
१९८८च्या कार्यकारिणीतील पदाधिकारी व सभासद एकत्रित घेऊन निवडणूक घेत आहेत. निवडणूक घेण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून विविध स्तरांवर बैठका होत होत्या. शुक्रवारीही एडीसीए मैदानावर आजीव सभासदांची बैठक घेण्यात आली. त्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. १९८८ पर्यंत जिल्हा क्रिकेट संघटनेचे आजीव सभासद मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊ शकणार आहेत. १९८८ पर्यंतची सभासद संख्या सुमारे १५१ असल्याचे समजते. त्यातील पन्नासपेक्षा अधिक सभासद आज हयात नाहीत. मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ शकणाऱ्या अधिकृत सभासदांची यादी धर्मादाय आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आलेली आहे. २६ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीची प्रक्रिया १४ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. उमेदवारांना आपले अर्ज जिल्हा क्रिकेट संघटनेच्या कार्यालयात दुपारी ३ ते ५ या वेळेत सादर करायचे आहेत.
आज बैठक
राम भोगले यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणीची बैठक शनिवारी (११ मार्च) सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत धर्मादाय आयुक्त कार्यालयात चालू असलेल्या खटल्यांसंदर्भात चर्चा होणार आहे.

निवडणूक प्रक्रिया अशी
१४ ते १६ मार्च - उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी
१७ मार्च - उमेदवारी अर्जांची पडताळणी
१८ मार्च - उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख.
२६ मार्च - गरज पडल्यास मतदान.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाथषष्ठी सोहळ्यात भाविकांचा उत्साह

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘भानुदास-एकनाथ’चा गजर करीत श्री संत एकनाथ षष्ठी सोहळ्याला उत्साहात सुरुवात झाली. औरंगपुरा येथील संत एकनाथ मंदिरात शनिवारी सकाळी कळसपूजन व ग्रंथपूजन करण्यात आले. पुढील आठ दिवस या मंदिरात हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळा होणार आहे.
संत एकनाथ षष्ठीनिमित्त संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा सुरू झाला आहे. संत एकनाथ महाराज मंदिरात वाकी येथील नारायणदेवबाबा महाराज यांच्या हस्ते कळसपूजन व ग्रंथपूजन करण्यात आले. यावेळी श्री क्षेत्र देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराज, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बापू वाळके, अॅड. सदाशिव देवे, लक्ष्मण थोरात, रवीकुमार बडे, प्रा. दिनकर कोरान्ने, प्रा. गणेश घुगे, विष्णू जाधव, रायभान पाटील व सतीश म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. भाविकांनी दर्शन घेत एकनाथांचा गजर केला. तर सायंकाळी मिलिंद डोलारे यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर झाला. सोमवारपासून दररोज सायंकाळी सात वाजता हरिकीर्तन आयोजित करण्यात आले आहे. तर शनिवारी दुपारी बारा वाजता श्री नाथांचा पादुका अभिषेक महापूजा व महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी नाथषष्ठी सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

भारूड आज
नाथषष्ठी सोहळ्यात रविवारी सायंकाळी सात वाजता भारूडाचा कार्यक्रम होणार आहे. गेवराई येथील ह. भ. प. विष्णू महाराज बांडे भारूड सादरीकरण करणार आहेत. भारूडातून प्रबोधन करण्याची परंपरा बांडे यांनी जोपासली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडमध्ये तीन भावंडांचा बुडून मृत्यू, आई वाचली

0
0

मटा ऑनलाइन वृत्त। बीड

बीड तालुक्यातील कामखेडा गावात तीन सख्ख्या भावंडांचा नदीच्या बंधाऱ्यात मृत्यू झाल्याची ह्रद्य हेलावणारी घटना घडली आहे. जिशान, सानिया आणि अफ्फान अशी या मुलांची नावे आहेत. आपल्या डोळ्यांसमोर आपल्या बुडणाऱ्या लेकरांना वाचवण्यासाठी या मुलांच्या आईनेही पाण्यात उडी घेतली. मात्र गावकऱ्यांनी बुडणाऱ्या आईला वाचवले.

या तीन दुर्दैवी मुलांची आई परवीन शेख कपडे धुण्यासाठी कामखेडजवळच्या बंधाऱ्यावर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची तीन मुलेही होती. आई कपडे धूत असताना अचानक जिशान पाय घसरुन पाण्यात पडला. हे सानिया आणि अफ्फानने पाहिल्याबरोबर ते दोघे जिशानला वाचवण्यासाठी लगबगीने पाण्यात उतरले. मात्र यांपैकी कुणालाही पोहता येत नसल्याने तिघेही बु़डू लागली.

शेजारीच कपडे धूत असलेल्या परवीन यांनी आपली मुले बुडत आहेत हे पाहताच आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांना वाचवण्यासाठी त्यांनीही पाण्यात उडी घेतली. दरम्यान, गटांगळ्या खाणाऱ्या जिशान, सानिया आणि अफ्फान यांना पाण्याने आपल्यात सामावून घेतले.

तीन मुले पाण्यात पडली आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या आईनेही बंधाऱ्यात उडी घेतली आहे, हे पाहताच आसपास असलेल्या गावकऱ्यांनी धाव घेत पाण्यात उड्या घेतल्या आणि परवीन यांचा प्राण वाचवला.

बंधाऱ्यात बुडून मृत्यू पावलेल्या या दुदैवी मुलांचे वडील शेतकरी आहेत. शिवाय त्यांचा कापूस विक्रीचा व्यवसाय आहे.

एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी मागचा पुढचा विचार न करता आपल्या जीवांची बाजी लावणाऱ्या या तीन भावंडांचा दुदैवी मृत्यू झाल्याने कामखेडा गाव आणि बीड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंडितअण्णा मुंडे यांचे ह्रदयविकाराने निधन

0
0

मटा ऑनलाइन वृत्त। बीड

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे बंधू आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे वडील पंडितअण्णा मुंडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. परळीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७७ वर्षांचे होते.

पंडितअण्णांना गेल्या महिन्यात २८ सप्टेंबरला ह्रदयविकाराचा धक्का बसला होता. त्यावेळी त्यांना लातूरमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना विमानाने पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते.

पंडितअण्णा हे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे वडीलबंधू आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे चे वडील होत. पंडितअण्णा यांनी दोन वेळा बीड जिल्हापरिषदेचे अध्यक्षपद भूषवले आहे. याबरोबर संत जगमित्र नागा सहकारी सूतगिरणीचे, तसेच परळी बाजारसमितीचे ते संचालक होते.

पंडितअण्णांनी राजकारणाची सुरूवात आपले बंधू दिवंगत गोपिनाथ मुंडे यांच्या सोबतच केली. गोपीनाथ मुंडे राज्य, तसेच राष्ट्रीय पातळीवर सक्रिय झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकाऱणाची जबाबदारी पंडितअण्णा पार पाडत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंकजांना धक्का; परळीत धनंजय मुंडेच

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । परळी (बीड)

परळी-वैजनाथ नगरपरिषदेत राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या भावा-बहिणींमध्ये रंगलेल्या वर्चस्वाच्या लढाईत पंकजा यांना धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपला गड आणखी मजबूत करत ३३ पैकी २७ जागा जिंकल्या असून भाजपच्या पदरात अवघ्या ४ जागा पडल्या आहेत. परळीच्या नगराध्यक्षपदीही राष्ट्रवादीच्या सरोजिनी हालगे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत. दरम्यान, पंकजा यांनी 'मी हा पराभव स्वीकारत आहे', अशी प्रतिक्रिया निकालांनंतर दिली.

परळीच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सहकारी संस्थांच्या निवडणुकीत पंकजा यांच्या नेतृत्वाने कमाल केली होती. त्या निकालांचीच पुनरावृत्ती परळीत होईल, असे आडाखे बांधले जात होते. मात्र धनंजय मुंडे यांनी हे सगळे अंदाज फोल ठरवले आणि परळीतील आपलं वर्चस्व सिद्ध केलं. भाजप आणि पंकजांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे भाजपने परळीची निवडणूक विशेष प्रतिष्ठेची केली होती. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही येथे प्रचारसभा घेतली होती. त्यामुळे भाजपसाठी हा पराभव जिव्हारी लागणारा ठरला आहे. पंकजा यांची याबाबत प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी पराभव मान्य केला आहे. या पराभवाची जबाबदारी सर्वस्वी माझी आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरता येणार नाही, असे त्या म्हणाल्या. शरद पवार एखाद्या ठिकाणी प्रचाराला गेले आणि तेथे पराभव झाला तर तो पवरांचा पराभव आहे, असे आपण म्हणतो का?, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला.

धनबळ हरलं, जनशक्ती जिंकली: धनंजय मुंडे

भाजपने धनबळ वापरलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नेत्यांच्या फौजा प्रचारासाठी आणल्या, तरीही परळीतील जनशक्तीने राष्ट्रवादीच्या बाजूने कौल दिला आहे. नगरपालिकेत आम्ही करत असलेल्या भरीव कामांना मिळालेली ही पोचपावती आहे, अशी प्रतिक्रिया या विजयावर धनंजय मुंडे यांनी दिली.

परळी-वैजनाथ नगर परिषद निकाल


पक्षीय बलाबल

राष्ट्रवादी - २७
भाजप - ४
शिवसेना - १
काँग्रेस - १
एकूण जागा - ३३

- नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उमेदवार सरोजिनी हालगे ५ हजार १४४ मतांनी विजयी. हालगे यांना १८ हजार १७६ मते तर भाजपच्या मेनकुदळे यांना १३ हजार ३२ मते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेंव्हा त्यानं हजेरीपटावरून जात खोडली...

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

'जात नाही ती जात', असं सांगत अनेकजण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जातीचं समर्थन करत असतात. त्यामुळे जातीही नष्ट होत नाहीत आणि जातीमुळं होणारं नुकसानही टाळता येत नाही. बीडमध्ये मात्र रोहन भोसले या इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं जातीविरोधात लढण्याचं धाडसी पाऊल उचललयं. त्यानं शाळेच्या हजेरीपटावरून स्वत:ची जात आणि धर्मच खोडून काढला असून त्याच्या या कृतीचं सर्वजण कौतूक करत आहेत.

आष्टी तालूक्यातील पारगावच्या जिल्हा परिषद शाळेत रोहन शिकतो. रोहन शाळेतील हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. तो देव आणि धर्मही मानत नाही. शाळेतील हजेरीपटावर विद्यार्थ्यांच्या नावासमोरच्या कॉलममध्ये त्याची जात आणि धर्म लिहिला जात असल्याचं त्याला खटकत होतं. त्यामुळं त्यानं शाळेच्या मधल्या सुट्टीत वर्गात शिक्षक नसल्याची संधी साधत हजेरीपटावरून स्वत: जात खोडून टाकली. जवळ पेन नव्हता, त्यामुळं वर्ग मैत्रिणीचा पेन घेऊन त्यानं हजेरीपटावरून जात काढून टाकण्याचं मिशन फत्ते केलं.

रोहननं जात खोडल्याचं घरी कळताच त्याचे आई-वडिल घाबरले. पण गावकरी आणि शिक्षकांनी त्याच्या या कृतीचं समर्थन केल्यानं रोहनच्या आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला. शाळेत आम्ही विद्यार्थ्यांना जे संस्कार देतो, ते रोहनमुळे खऱ्या अर्थानं सार्थकी लागल्याचं त्याचे शिक्षक सागंतात. रोहनच्या या कृत्याचा अभिमान असून त्याचा हा संकल्प सरकारी पातळीवर राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं शिक्षकांनी सांगितलं.

शिवराय, फुले आणि आंबेडकर प्रेरणास्त्रोत

इतर मुलांसारखं टाइमपास करणं आणि खेळणं यात रोहनला इंटरेस्ट नाही. तो नियमितपणे किर्तन ऐकतो. वाचन करतो आणि घरच्यांना छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचे विचार सांगत असतो. या तीन महापुरुषांच्या विचाराच्या पगड्यातूनच त्याला हजेरीपटावरून जात खोडण्याची प्रेरणा मिळाल्याचं सांगण्यात येतं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीच्या जन्मानंतर चहा,नाश्ता आणि दाढी फ्री

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

गावात मुलींचा घटलेला जन्मदर वाढविण्यासाठी बीडमधील एका गावानं न्यारीच शक्कल लढवली आहे. मुलगी जन्माला आली तर मुलीच्या वडिलांची सहा महिने दाढी-कटींग फुकट करून देण्यात येत असून त्यांना चहा-नाश्ताही फुकट देण्यात येत आहे. त्यामुळं मराठवाड्यात हे गाव चर्चेचा विषय झाले आहे. शिवाय आधीच स्त्रीभ्रूण हत्येनं बदनाम झालेल्या बीडचा 'बेटी बचाव' मोहिमेचा हा अनोखा 'बीड पॅटर्न' असल्याचं बोललं जात आहे.

स्त्रीभ्रूण हत्येमुळं बीडचे नाव खुप खराब झालं होतं. त्यामुळे या बीडचा जन्मदर ही प्रचंड कमी झाला होता. बीडच्या कुंबेफळ या गावाची स्थितीही काही वेगळी नव्हती. पण ही परिस्थिती बदलण्यासाठी दोन तरूण पुढे आले. अशोक पवार आणि भागवत थोरात असं त्यांचं नावं. मुलगी जन्माला आल्यास मुलीच्या वडिलांची सहा महिने फुकटात दाढी-कटींग करण्याचं पवार यांनी जाहीर केलं. तर भागवत थोरात यांनी मुलीच्या बापाला चहा आणि नाश्ता मोफत देण्याचं जाहीर करून उपक्रमही राबवायला सुरुवात केली. आर्थिक झळ बसत असली तरी या दोघांनी गावच्या हितासाठी हा उपक्रम हाती घेतला आणि गावकऱ्यांना उपक्रमाची माहिती देण्यासाठी आपआपल्या दुकानांवर फलकही लावले. या उपक्रमाचं गावकऱ्यांनी स्वागतही केलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड जिल्ह्यात ९७ अर्ज दाखल

0
0


म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्हा परिषदेच्या ६० गट आणि अकरा पंचायत समितीच्या १२० गणासाठी निवडणूक होत असून सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २७ जानेवारीपासून सुरुवात झाली. मात्र, शुक्रवारी अमावस्या असल्याने जिल्ह्यात एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. सोमवारी जिल्ह्यातील अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्हा परिषदेच्या ६० गटांसाठी ४७ अर्ज दाखल झाले होते. तर पंचायत समितीसाठी ५० अर्ज दाखल झाले.
गेवराई तालुक्यात जिल्हा परिषद गटासाठी १२ व पंचायत समितीसाठी २१ उमेदवारी अर्ज आले आहेत. बीड तालुक्यात जिल्हा परिषद गटासाठी ११ व पंचायत समितीसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल झाले. माजलगावमध्ये पंचायत समितीसाठी आठ तर जिल्हा परिषदेसाठी चार अर्ज दाखल झाले. केज तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी सहा तर पंचायत समिती गणासाठी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला. परळीत जिल्हा परिषद गटासाठी सात तर पंचायत समितीसाठी सात अर्ज आले आहेत. आष्टीत जिल्हा परिषदेला व पंचायत समितीत दोन अर्ज आले आहेत. शिरूर, धारूर, वडवणी तालुक्यात प्रत्येकी एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. चकलंबा आणि उमापूर अशा दोन जिल्हा परिषद गटातून आज जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी उदयसिंह पंडित, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर पिसाळ, जिल्हा परिषद सदस्य डॉ. विजयकुमार घाडगे, आदी उपस्थित होते. तर बीड तालुक्यातून नाळवंडीमधून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुण डाके, तर शिवसेनेकडून गणेश वरेकर यांनी तर पालीतून राष्ट्रवादीकडून उषा आखाडे यांनी उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला. एक फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे राहिलेल्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची मोठी गर्दी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images