Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शहीद विकास समुद्रेंवर अंत्यसंस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

काश्मीर येथे हिमस्खलनामुळे बीड जिल्ह्यातील भारतीय सैन्य दलाच्या जवान विकास पांडुरंग समुद्रे हे शहीद झाले होते. त्यांच्या पार्थीवावर बीड जिल्ह्यातील गांजपूर येथे शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद विकास समुद्रे हे सैन्य दलाच्या मुळ युनिट १८ महार रेजिमेंटमध्ये व सध्या ५१ राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. जम्मू काश्मीर मधील गुरज भागात अतिरेकी घुसखोरीवर नियंत्रण ठेवण्याकरीता तैनात करण्यात आले होते. २५ जानेवारी रोजी अचानक झालेल्या हिमस्खलनामध्ये विकास समुद्रे शहीद झाले होते. त्यांचे पार्थिव गुरज सेक्टर येथून श्रीनगर मिलिटरी हॉस्पीटल येथे हेलिकॉप्टरने ३० जानेवारी सायंकाळी आणण्यात आले. श्रीनगर येथून दिल्ली, दिल्लीहून विमानाने पुणे आणि बुधवारी सकाळी पुण्याहून हेलिकॉप्टरने धारुर आणि तेथून त्यांच्या मुळगावी गांजपूर येथे रुग्णवाहिकेतून आणण्यात आले. प्रथम धारुर शहरात त्यानंतर गांजपूर गावात आणि त्यांच्या राहत्या घरी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले. गावकऱ्यांनी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. त्यांचा तिरंग्यामधील पार्थिव गावात आणताच गावकऱ्यांनी तसेच एनसीसी व स्काऊट गाईडच्या पथकांनी अंतयात्रेत सहभाग घेतला. संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी शहीद विकास समुद्रे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. पोलिस दलाच्या पथकाने तसेच भारतीय सैन्य दलाच्यावतीने लेप्टनंट कर्नल नितिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे, आमदार संगीता ठोंबरे, आमदार आर. टी. देशमुख, सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल हरीभाऊ दळवी, कॅप्टन भीमराव पारवे यांच्यासह असंख्य अधिकारी, पदाधिकारी व देशप्रेमी नागरिकांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. शहीद विकास समुद्रे यांचे भाऊ परमेश्वर यांनी चितेला भडाग्नी दिला. यावेळी आई, पत्नी, बहिनी, चिमुकली मुलगी आणि नातेवाईकांनी अत्यंत शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेस नेत्यांचं सोन्याच्या ताटात शाही भोजन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । उस्मानाबाद

राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरुण बेरोजगार आहेत, गरिबांना दोन वेळचं अन्न मिळत नाहीए, मध्यमवर्गीय जनता महागाईनं हैराण आहे, मग कुठे आहेत 'अच्छे दिन'?, असा सवाल करत राज्य सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी उस्मानाबादमध्ये सोन्याच्या ताटात जेवणावर ताव मारल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून, हाच का काँग्रेसचा गरिबांबद्दलचा कळवळा?, असा प्रश्न विचारला जात आहे.

उस्मानाबादमधील येणगूरमध्ये काँग्रेसने जिल्हा परिषद प्रचाराचा नारळ फोडला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील, आमदार बसवराज पाटील ही नेतेमंडळी सभेसाठी पोहोचली होती. त्यांच्या जेवणाची व्यवस्था एका कार्यकर्त्याच्या घरी करण्यात आली होती. तिथे पोहोचल्यानंतर सगळ्यांचेच डोळे विस्फारले. सोन्याचा मुलामा दिलेली ताटं-वाट्या डायनिंग टेबलवर मांडल्या होत्या आणि एकापेक्षा एक झक्कास पदार्थ घेऊन वाढपी सज्ज होते. नेत्यांच्या ताटातील एकेक वाटी सुग्रास पदार्थांनी भरत गेली. ते पाहून कुणालाच मोह आवरला नाही. सगळ्यांनीच आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घेतला आणि पोटावरून हात फिरवला.

अर्थात, हे शाही भोजन त्यांना पचणार का, हा प्रश्नच आहे. कारण, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अनेक गरिबांच्या घरी जाऊन चक्क पत्रावळीवर जेवले आहेत. त्यांना महाराष्ट्रातील नेत्यांचा हा डामडौल रुचेल का, याबद्दल शंका आहे.

याआधी, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अशाच शाही मेजवानीला स्पष्ट नकार दिला होता. बीडमधील दुष्काळी दौऱ्यादरम्यान एका कार्यकर्त्यानं त्यांच्या भोजनाची जय्यत तयारी केली होती. परंतु, जनता दुष्काळात होरपळत असताना आपण हे शाही भोजन जेवणार नाही, असं त्यानं सांगितलं होतं. परंतु, त्या चव्हाणांसारखा समंजसपणा अशोक चव्हाणांनी आणि इतर नेत्यांनीही दाखवला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेऊर-आष्टी मार्गासाठी दहा कोटी

$
0
0

पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे यांनी मानले प्रभूंचे आभार

म. टा. प्रतिनिधी, बीड

जेऊर ते आष्टी या बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बीड जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या परळी-बीड-नगर रेल्वे मार्गासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ७८० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. याबद्दल बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे पत्राद्वारे आभार मानले आहेत.

बीड जिल्ह्यातील आष्टी ते जेऊर ७० किलोमीटर या मार्गासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने जिल्ह्यवासियांच्या दृष्टीने दुधात साखर अशी भावना आहे. परळी-बीड-नगर हा रेल्वे मार्ग १९९५ मध्ये मंजूर करण्यात आला होता. २६१ किलोमीटरच्या या रेल्वे मार्गाचा सुरूवातीला १९९५ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यावेळी ३५३ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद केंद्र व राज्य सरकार संयुक्तरित्या करेल असे ठरले होते. या मार्गासाठी अनेकदा आंदोलने झाली. मात्र, या मार्गासाठी मोठी तरतूद कधीच झाली नाही. दहा वीस कोटी रुपये देवून दरवर्षी या रेल्वे मार्गाची बोळवण केली जात होती. वीस वर्षांत ३०० कोटी रुपयांचा निधी या मार्गाला मिळाला. त्यामुळे या रेल्वे मार्गासाठी आता २८०० कोटी रुपयांची आवश्यकता होती. २८०० कोटी प्रकल्प खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी राज्याने मान्यता दिली. त्यासाठी निम्मा वाटा उचलावा, असेही पंतप्रधान मोदी यांनी आदेश दिले होते. त्यानंतर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १ हजार ४१३ कोटी या नगर-बीड-परळी रेल्वेसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. बीडचे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न हा रेल्वे प्रकल्प होता. दिवंगत मुंडे यांच्या पहिल्या स्मृतीदींनाच्या पूर्व संध्येला हा निर्णय घेऊन राज्य सरकारने एक प्रकारे मुंडे यांच्या स्मृतीला अभिवादन केले होते. पंतप्रधानांच्या हस्तक्षेपामुळे हा मार्ग 2019 पर्यंत पूर्ण होणार असून सध्या त्याचे काम वेगाने सुरू आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाला पहिल्या वर्षी १५९ कोटी, दुसऱ्या वर्षी तिनशे कोटी आणि आता थेट ७८० कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. यापैकी पाचशे कोटी हे अर्थसंकल्पा बाहेरून म्हणजे वित्तीय संस्थांकडून उपलब्ध होणार आहेत. या रेल्वे मार्गावरील नगर ते नारायणडोहपर्यंत १५ किलोमीटर रेल्वेमार्ग टाकण्याचे काम झाले आहे. बीड जवळ असणाऱ्या पालवण ते तिप्पटवाडी या साडेसात किलोमीटरमध्ये मातिकाम पूर्ण झाले असून या साडेसात किलोमीटरवर केवळ रेल्वे रुळ अंथरण्याचे काम बाकी आहे. नारायणडोह ते तिपट्टवाडीपर्यंत मातीचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या महिनाभरात बीड ते परळी रेल्वेमार्गाचे माती कामाच्या निविदा निघणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सचिन मुंगसे-पाटील यांनी दिली. दरम्यान, पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांनी या तरतूदीबद्दल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना पत्र पाठवून त्यांचे आभार मानले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परळीत पुन्हा मुंडे विरुद्ध मुंडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

परळी तालुक्यातील पिंपरी गटात अजय व रामेश्वर मुंडे यांच्यात लढत होत आहे. या पूर्वी बीड जिल्ह्यातील गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा संघर्ष साऱ्या राज्याने बघितला. गोपीनाथ मुंडेंच निधन झाल्यानंतर पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे हा संघर्ष तर सर्वश्रुत आहेच. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा मुंडे विरुद्ध मुंडेंचा संघर्ष मिनी मंत्रालयासाठी परळी तालुक्यातील पिंपरी गटात अजय मुंडे विरुद्ध रामेश्वर मुंडे यांच्यात पहावयास मिळणार आहे.

अजय मुंडे हे गोपिनाथ मुंडे यांचे पुतणे आणि पंकजा आणि धनंजयचे सख्खे चुलत भाऊ आहेत. तर रामेश्वर मुंडे हे धनंजय आणि पंकजा मुंडेचे सख्खे चुलत भाऊ आहेत. हे दोघे आताच चर्चत येण्याचे कारण या जिल्हा परिषद निवडणुकीत हे दोघे भाऊ एकमेकासमोर उभे आहेत. ज्या वेळी धनंजय मुंडे यांनी बंड करून आपला वेगळा मार्ग पत्करला त्याच वेळी अजय मुंडे हे धनंजय मुंडे सोबत राष्ट्रवादीत आले. युवक राष्ट्रवादीत प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करीत आहेत. या पूर्वी नाथ्रा ग्रामपंचायतीचे ते बिनविरोध सरपंच राहिले. आता जिल्हा परिषदेच्या आखाड्यात त्यांचा सामना रामेश्वर मुंडे सोबत असणार आहे.

रामेश्वर मुंडे हे धनंजय मुंडेच्या बंडानंतर ही पंकजा मुंडे सोबतच राहिले. एक भाऊ दूर गेला तरी एक भाऊ पंकजासोबत स्थानिक राजकारण करीत होता. मात्र, अजय मुंडे यांच्या तुलनेत रामेश्वर राजकारणात नवखे आहेत. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील गावात ही लढत होणार असल्याने शेतकरी अपल्यालाच मतदान देतील असे रामेश्वर मुंडेंना वाटते.
मागच्या पाच वर्षापासून परळीच्या सगळ्या छोट्या-मोठ्या निवडणुकीत पंकजा आणि धनंजयचा सामना झालेला म्हणूनच आता परळीच्या पिंपरी बुद्रुक या जिल्हा परिषद गटात पुन्हा या भावंडातील लढत लक्षवेधी असणार आहे. या दोन मुंडेच्या लढतीत कस पंकजा व धनंजय यांचा लागणार आहे.

धनंजय मुंडे हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आहेत तर पंकजा मुंडे या राज्याच्या ग्रामविकास मंत्री म्हणून काम पाहत आहेत. आता भाऊबंदकीच्या या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाला पहिल्या वर्षी १५९ कोटी, दुसऱ्या वर्षी तिनशे कोटी आणि आता थेट ७८० कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. यापैकी पाचशे कोटी हे अर्थसंकल्पा बाहेरून म्हणजे वित्तीय संस्थांकडून उपलब्ध होणार आहेत. या रेल्वे मार्गावरील नगर ते नारायणडोहपर्यंत १५ किलोमीटर रेल्वेमार्ग टाकण्याचे काम झाले आहे. बीड जवळ असणाऱ्या पालवण ते तिप्पटवाडी या साडेसात किलोमीटरमध्ये मातिकाम पूर्ण झाले असून या साडेसात किलोमीटरवर केवळ रेल्वे रुळ अंथरण्याचे काम बाकी आहे. नारायणडोह ते तिपट्टवाडीपर्यंत मातीचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या महिनाभरात बीड ते परळी रेल्वेमार्गाचे माती कामाच्या निविदा निघणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सचिन मुंगसे-पाटील यांनी दिली. दरम्यान, पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांनी या तरतूदीबद्दल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना पत्र पाठवून त्यांचे आभार मानले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांच्या घरात संस्कारांची कमी: पंकजा

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेबाबत अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याला राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. 'व्यक्ती हयात नसताना त्यांच्या जन्मतारखेवर भाष्य करून वाद निर्माण करणं योग्य नाही. पण पवारांच्या घरात संस्कारांची कमी आहे,' अशी बोचरी टीका पंकजा यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस १२ डिसेंबरला असतो. पवारांचा वाढदिवस राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ते पाहूनच मुंडेंनी देखील १२ डिसेंबर हीच जन्मतारीख लावली होती, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान केला होता. पवार यांच्या या वक्तव्यावर पंकजा यांनी नाराजी व्यक्त केली. 'अजित पवारांच्या या वक्तव्यामुळं संपूर्ण मुंडे कुटुंबीयांना वेदना झाल्या आहेत. मी नेहमीच शरद पवार यांचा आदर आणि सन्मान केला आहे. तो माझ्या संस्काराचा भाग आहे. पण पवारांच्या घरात अशा प्रकारच्या संस्कारांची कमी आहे हेच अजित पवारांच्या वक्तव्यातून दिसते. 'धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच अजित पवार हे बोलत आहेत,' असा आरोपही पंकजा यांनी केला. 'गोपीनाथ मुंडे यांना जन्मतारीख बदलायचीच असती तर त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जन्मतारीख लावली असती,' असंही त्या म्हणाल्या.

गोपीनाथ मुंडे यांची खरी जन्मतारीख त्यांच्या आई-वडिलांना ठाऊक नव्हती. मुंडे ऐंशीच्या दशकात राजकारणात आले. त्यावेळी शरद पवार यांचे वलय राज्याच्या राजकारणात होते. पवारांप्रमाणेच आपलाही वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा व्हावा यासाठीच त्यांनी ही तारीख जाहीर केल्याचे ते म्हणाले होते.

काँग्रेसप्रवेशाची चर्चा झाली नव्हती!

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये जाणार होते. त्यांच्यासोबत पाच आमदार देखील होते. मात्र डॉ. मनमोहन सिंग यांनी विरोध केल्यामुळे तसेच सुषमा स्वराज यांनी मुंडेंना समजावल्यानेच ते भाजपमध्ये राहिल्याचे अजित पवार म्हणाले होते. पंकजा यांनी याबाबत वेगळे मत मांडले. 'काँग्रेसमध्ये जाण्याबद्दल गोपीनाथ मुंडेंनी कधीही माझ्याशी चर्चा केली नाही. आमदार असताना मी त्यांच्यासोबत दिल्लीला गेले नव्हते,' असा दावाही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंकजा मुंडेंना धक्का; धनंजय मुंडेंची सरशी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना जिल्हा परिषद निवडणुकीत धक्का बसला आहे. परळीतील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झाली आहे. परळी विधानसभेच्या अंतर्गत येणाऱ्या १० जिल्हा परिषदेच्या जागांपैकी तब्बल आठ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहे. तर बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

परळीतील जिल्हा परिषद निवडणूक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. जिल्हा परिषदेशिवाय परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवरदेखील राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. भाजपने २०१२ साली झालेल्या परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवर विजय मिळवला होता. पण यंदा धनंजय मुंडे यांनी दोन्ही पंचायत समिती भाजपकडून खेचून आणल्या. नगरपालिका पाठोपाठ आपल्या मतदारसंघात कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला ६० जागांपैकी २४ जागांवर विजय मिळला. भाजपला २०, शिवसेना ५, काकू नाना आघाडी ४, शिवसंग्रामला तीन, काँग्रेसला दोन आणि अपक्ष एका जागेवर विजयी झालेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडमध्ये पराभव: पंकजा मुंडे राजीनामा देणार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पराभव झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे राजीनामा देणार आहेत. परळी विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

काही महिन्यांआधी झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले होते. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल घोषित झाल्यानंतर पंकजांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. कामे करूनदेखील जनतेने असा कौल का दिला, याचे विश्लेषण करणार असल्याचे पंकजा यांनी सांगितले. भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सोपवणार असल्याचे पंकजा मुंडेंनी जाहीर केले आहे.

परळीतील जिल्हा परिषद निवडणूक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. जिल्हा परिषदेशिवाय परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवरदेखील राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. भाजपने २०१२ साली झालेल्या परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवर विजय मिळवला होता. पण यंदा धनंजय मुंडे यांनी दोन्ही पंचायत समिती भाजपकडून खेचून आणल्या. नगरपालिका पाठोपाठ आपल्या मतदारसंघात कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला ६० जागांपैकी २४ जागांवर विजय मिळला. भाजपला २०, शिवसेना ५, काकू नाना आघाडी ४, शिवसंग्रामला तीन, काँग्रेसला दोन आणि अपक्ष एका जागेवर विजयी झालेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा कंत्राटदार ब्लॅकलिस्ट

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रस्त्यांची कामे निकृष्ट केल्याचा महाप्रताप करणाऱ्या सहा कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करून महापालिका प्रशासनाने शिमग्याचा आहेर दिला आहे. प्रशासनाच्या कारवाईमुळे इतर कंत्राटदार हातातली कामे संपवण्याच्या मागे लागले आहेत.
महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत विकास कामांवरून चर्चा झाली. कंत्राटदार टेंडरला प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे कामे होत नाहीत, असा सूर नगरसेवकांतून निघाला. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता तीन महिन्यांत पालिका आयुक्तांनी सहा कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट केल्याची माहिती मिळाली. ब्लॅकलिस्ट केलेल्यांमध्ये ‘जीएनआय’ या बड्या कंत्राटदाराचा समावेश आहे. या कंत्राटदाराकडे सध्या जी कामे सुरू आहेत, ती कामे पूर्ण झाल्यावर नवीन कामे दिली जाणार नाहीत. प्रत्येक कामासाठी वेळेचे बंधन घालून देण्यात आले आहे. पूर्वी हे बंधन पाळले जात नव्हते. कंत्राटदार व अधिकारी यांच्या संगनमताने कामे केली जायची. आता आयुक्तांनीच यात लक्ष घातल्यामुळे वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारावर ब्लॅकलिस्टची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हातावरची कामे पूर्ण करण्याकडे कंत्राटदारांचे लक्ष आहे.
प्रत्येक कामात दर्जाला महत्त्व दिले जात असल्यामुळे तडजोडीला वाव नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. झालेली प्रत्येक कामे त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासून घेतली जात असल्यामुळे अधिकारी व कंत्राटदारांवर वचक बसल्याचे बोलले जात आहे.
नवीन आर्थिक वर्षात सव्वाशे कोटींची जुनीच कामे केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पालिका आयुक्तांनी सुमारे सव्वाशे कोटींची चारशे कामे मंजूर केली आहेत. आगामी आर्थिक वर्षात हीच कामे तडीस नेण्याचे नियोजन पालिकेच्या प्रशासनाने केले असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे नवीन वर्षात कोणतेही नवीन काम होणार नाही, तशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

अर्थसंकल्प मर्यादित ?
नवीन कामांचा समावेश न करण्याची भूमिका प्रशासनाने घेतल्यामुळे पालिकेचा नवीन वर्षाचा अर्थसंकल्प मर्यादित असण्याची शक्यता आहे. अत्यावश्यक कामांचाच समावेश अर्थसंकल्पात असेल, असे बोलले जात आहे. त्यामुळे अर्थसंकल्प फुगवण्यावरही मर्यादा येणार आहेत. यंदाचा अर्थसंकल्प ७७७ कोटी रुपयांचा आहे. वसुलीचे प्रमाण घटल्यामुळे त्यात मोठी तूट येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काला चबुतरा कामांचा आराखडा प्रसिद्ध करा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
काला चबुतरा परिसरात केल्या जात असलेल्या कामांचा आराखडा प्रसिद्ध करा, अशी मागणी नागरिकांनी महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्याकडे केली आहे. ज्या संस्थेच्या माध्यमातून कामे केली जात आहेत, त्या संस्थेबरोबर पालिकेने करार केला आहे का, असा सवालही करण्यात आला आहे.
शहराच्या क्रांतिचौक परिसरात ऐतिहासिक काला चबुतरा आहे. या परिसरात ध्वजस्तंभ उभारण्याचे काम सुरू आहे. त्याशिवाय अन्यही कामे या परिसरात केली जात आहेत. त्या परिसरात कोणती विकास कामे होणार आहेत, कामे करण्यासाठी कोणत्या संस्थेने पुढाकार घेतला आहे, त्या संस्थेबरोबर महापालिकेने करार केला आहे का, असे प्रश्न पालिका आयुक्तांच्या नावे दिलेल्या निवेदनात राजेंद्र दाते पाटील व रवींद्र देशमुख यांनी विचारले आहेत.
काला चबुतरा परिसरात करण्यात येत असलेल्या कामांसाठी किती खर्च होणार आहे, हा खर्च कोण करणार आहे, महापालिका खर्च करणार असेल तर त्याची तरतूद करण्यात आली आहे का, जी कामे केली जात आहेत त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे का, आराखडा तयार करण्यात आला असेल तर तो प्रसिद्ध करावा अशी मागणीही केली आहे.

इतिहास कायम रहावा
‘काला चबुतऱ्याला ऐतिहासिक महत्व आहे. निझाम व इंग्रजांविरुद्धची क्रांतीची ज्योत याच ठिकाणाहून पेटल्याचे बोलले जाते. त्यामुळे या संपूर्ण परिसराला क्रांतिचौक या नावाने संबोधले जाते. क्रांतीचा इतिहास कायम रहावा, नव्या पिढीसाठी तो प्रेरणादायी ठरवा,’ अशी भूमिका पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थापासह पाच जणांच्या पोलिस कोठडीत वाढ

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चलनातून बाद झालेल्या १ कोटीच्या नोटा घरात दडवून ठेवणारा निलंबित पोलिस वीर बहादूर थापा व त्याच्या पाच साथीदारांना १६ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश शनिवारी (११ मार्च) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. बी़. बहिरवाल यांनी दिले.
चलनातून बाद झाल्यामुळे नोटा बदलून आणण्यासाठी राजेश हरगोविंद ठक्कर (रा. सिडको एन १) हे २१ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता कार मधून घेऊन जात होते़ त्या वेळी सेंट्रलनाक्याजवळ शेख फजल शेख युसुफ (रा. किराडपुरा), जमील खान जलील खान (रा. बिसमिला कॉलनी नारेगाव), अब्दुल साजीद अब्दुल कय्युम (रा. कैसरपार्क, नारेगाव), शेख सद्दाम शेख रियाज (रा. रहिमानिया कॉलनी, किराडपुरा) यांनी ठक्कर यांची गाडी अडवून त्यांच्या जवळील पैशाची बॅग हिसकावून धुम ठोकली. या चौघांना मंगळवारी न्यायालयाने ११ मार्च पर्यंत कोठडी सुनावली. पोलिस कोठडी दरम्यान त्या चौघांची स्वंतत्रपणे चौकशी करण्यात आली असता ही रक्कम
साजीदने थापाच्या फोनमुळे त्याच्याकडे ठेवण्यास दिले. त्यानंतर थापाने फजल आणि जमील खानला शहरातून पळून जाण्यास सांगितल्याने ते मालेगावला निघून गेले, अशी माहिती पोलिस कोठडीत समोर आली. दरम्यान, शेख सलीम उर्फ स्टेपनी शेख महमंद शरीफ यांची कसून चौकशी केली असता त्याने जमीरने माझ्याकडे १ कोटी रुपये आणले होते. त्यावेळी मीच थापाला टीप दिल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिस कोठडीची मुदत शनिवारी संपल्याने त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते.

हा तपास सुरू
आरोपींकडून गुन्ह्यातील ६ लाखांच्या जुन्या नोटा हस्तगत करायच्या आहेत, थापाकडून गुन्ह्यातील पैसे ठेवण्यासाठी वापरलेली स्कॉर्पिओ जीप कोठे व कोणाकडे ठेवली याची चौकशी करून ती हस्तगत करायची आहे, आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याची विचारपूस करायची आहे़, आरोपी ज्यांच्याकडून नोटा बदलून घेणार होते ते पाटील साहेब आणि रफीक भाई कोण आहेत याची विचारपूस करायची आहे. त्यामुळे आरोपींना वाढीव पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकिलांनी कोर्टाकडे केली. कोर्टाने ही विनंती मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हाय व्होल्टेजचा फटका बसलेल्या घरांचा पंचनामा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बालाजीनगर जवळील नाथनगरात शुक्रवारी विजेचा दाब अचानक वाढल्यामुळे अडीचशेहून अधिक घरांमधील विद्युत उपकरणे जळाली. महावितरणतर्फे शनिवारी या घरांचा पंचनामा करण्यात आला. येत्या दोन दिवसांत नुकसानीचा आकडा स्पष्ट होणार आहे.
विजेचा दाब वाढल्यामुळे नाथनगरातील घरांमधील फ्रीज, टी.व्ही., पंखे, दिवे आदी वस्तू जळाल्या. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हाय व्होल्टेजमुळे मोठे नुकसान झाले, पण त्याची भरपाई होणार का, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला होता. माजी महापौर व नगरसेवक त्र्यंबक तुपे यांनी यात पुढाकार घेतला व महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ज्या ज्या घरात विद्युत उपकरणे जळाली त्या त्या घराचा पंचनामा करण्यास सांगितले. खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशीही त्यांनी संपर्क साधला व घडलेल्या घटनेची माहिती दिली. खैरे यांनीही महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना केली. त्यानुसार शनिवारी दिवसभर नाथनगरात घरांचे पंचनामे करण्यात आले. सर्व पंचनामे एकत्रित करून नुकसानीचा एकत्रित आकडा काढला जाणार आहे. येत्या दोन - तीन दिवसांत हे काम होईल, असे तुपे यांनी सांगितले. महावितरण कडून नागरिकांना जास्तीतजास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले. या प्रकरणात चंद्रकांत खैरे यांनीही लक्ष घातले असून त्यांच्या मदतीने नागरिकांना दिसाला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलसंकट गहिरे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेने घेतलेल्या मेगा शटडाऊन नंतरही शहरात जलसंकट कायम आहे. अनेक भागात सलग चौथ्या दिवशी पाण्याचा ठणठणाट होता. रेल्वेस्टेशनच्या जवळ उड्डाणपुला खाली जलवाहिनीला लागेलली गळती कायमच आहे, तर सिडको एन पाचच्या जलकुंभातून लाखो लिटर पाणी वाया गेल्याची तक्रार नागरिकांनी केली.
जलवाहिनीवरील गळत्या दुरुस्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने मंगळवारी चोवीस तासांचा शटडाऊन घेतला. चोवीस तासांचा शटडाऊन पुढे सतरा तास लांबला. त्यामुळे बुधवारी सकाळी नऊ वाजता सुरू होणारा पाणीपुरवठा बुधवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास सुरू करण्यात आला. जायकवाडीहून रात्री एक वाजता एक - एक पंप सुरू करीत पाणीपुरवठा पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला गेला, पण अद्याप संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा पूर्वपदावर आला नाही. अनेक भागात नागरिकांना निर्जळीलाच समोरे जावे लागत आहे. सलग चौथ्या दिवशी पाणीपुरवठा न झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
गळत्यांच्या दुरुस्तीसाठी शटडाऊन घेतल्यानंतरही रेल्वेस्टेशनच्या जवळ असलेल्या उड्डाणपुलाखाली जलवाहिनीला पुन्हा गळती सुरू झाली आहे. या गळतीची तीव्रता जास्त असल्याचे सांगितले जाते. मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. दुसरीकडे सिडको एन ५ येथील जलकुंभातून शनिवारी सकाळी लाखो लिटर पाणी वाया गेले. पूर्वी या जलकुंभातून वाया जाणारे पाणी एमजीएम परिसरात पसरायचे. या संदर्भात ओरड झाल्यावर जलकुंभातून ओव्हरफ्लो होणाऱ्या पाण्यासाठी नाल्यात वाट काढून देण्यात आली. शनिवारी सकाळी नाल्यामधून मोठ्या प्रमाणावर शुद्ध पाणी वाहून जात होते. जलकुंभावरील कर्मचाऱ्यांनी मात्र याची दखल घेतली नाही. या जलकुंभातून पाणी वाया जाण्याचे प्रकार नेहमीच घडतात. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, असे पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले.

जलवाहिनींवरील गळत्या दुरुस्त करण्यासाठी शटडाऊन घेतला होता. त्याचा परिणाम शहराला जाणवणार आहे. रविवार किंवा सोमवारपासून संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. रेल्वेस्टेशनच्या उड्डाणपुलाखाली जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. ती गळती दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा जायकवाडीहून पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे. होळीचा सण लक्षात घेता पाणीपुरवठा बंद करणे शक्य नाही. - सरताजसिंग चहल, कार्यकारी अभियंता, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिठाई वाटून भाजपचा जल्लोष

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर विधानसभा निवडणुकांतील येथील पक्षाच्या विजयी घौडदोडीचा आनंद भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सिडको, गुलमंडीसह विविध भागात जल्लोष, मिठाई वाटप आणि फटाक्यांची आतिषबाजी करत साजरा केला.
सकाळी उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आपला आनंद व्यक्त केला. संजय खंबायते, व्यापारी आघाडीचे राजेश मेहता आदी यावेळी उपस्थित होते. औरंगपुरा परिसरात प्रदेश सदस्य अनिल मकरिये यांच्या उपस्थित असंख्य कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. याप्रसंगी नागरिकांना मोतीचूर लाडूंचे वाटप करण्यात आले. पुंडलिंकनगर येथे आमदार अतुल सावे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत एकच जल्लोष केला. गुलमंडी येथे शहर शाखेतर्फे सायंकाळी आंनदोत्सव साजरा करण्यात आला. शहराध्यक्ष तनवाणी, जिल्हाध्यक्ष जाधव, आमदार सावे, डॉ. कराड, रहाटकर, भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय केनेकर यांच्या नेतृत्वात हा जल्लोष करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादच्या प्रदूषणात वाढ

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘औद्योगिक आणि पर्यटन शहर म्हणून दररोज हजारो नागरिक शहरात येतात. मात्र, शहराला पायाभूत सुविधा पुरवताना केवळ इथल्या कायमस्वरूपी लोकसंख्येचा विचार होतो. यामुळे येथील यंत्रणेवर भार येऊन त्याचा परिणाम हवेच्या प्रदूषणात होत आहे. मात्र, शहरातील हवेच्या प्रदूषणाची निश्चित आजही आकडेवारी उपलब्ध नाही. याबाबत सखोल संशोधनही झाले तर शहराला हादरवून टाकणारे तथ्य समोर येतील,’ अशी माहिती दिल्लीतील क्लिन एअर एशिया इंडिया संस्थेच्या संशोधिका डॉ. गीताजंली कौशिक यांनी शनिवारी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित ‘एन्वायरोनमेंट पोल्युशन - इमर्जिंग प्रॉस्पेक्टीव्ह’ या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या अॅकडॅमिक अॅण्ड प्लानिंग विभागाचे संचालक प्रा. डॉ. सतीश पाटील, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी बीसीयूडी अध्यक्ष प्रा. व्ही. एस. लोमटे, माजी पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. बी. एन. पांडे तसेच कार्यशाळेचे समन्वयक आणि विभागप्रमुख प्रा. डॉ. एन. एन. बंदेला आणि संयोजक प्रा. डॉ. महादेव मुळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
डॉ. कौशिक म्हणाल्या, ‘आपण दिवसाकाठी एक किलो जेवण घेतो. ३ ते ४ लिटर पाणी पितो, तर सुमारे १५ हजार किलोलिटर हवा शरीरात घेतो. यामुळे ही हवा शुद्ध असणे आवश्यक आहे. औरंगाबादेत उद्योग आणि पर्यटनामुळे मोठ्या संख्येने लोक येतात. या लोकांचा शहरातील पर्यावरणावर परिणाम पडतो. जगात १.० आकाराच्या धुलीकणाचे मोजमाप सुरू झाले असताना औरंगाबादेत २.५ आकाराच्या धुलीकणाचे मोजमाप करणारी यंत्रणा बंद आहे. या शहराशी संबधीत हवेचा अभ्यासच झालेला नाही. तो होणे गरजेचे आहे,’ असे त्यांनी सांगितले. जेएनईसीचे डॉ. अरविंद चेल यांनी ग्रीन बिल्डिंगवर मार्गदर्शन केले. ‘बेल्जियममध्ये ४ तास ऊन पडत असतानाही तेथील इमारतीत सौर ऊर्जेची यंत्रणा बसवली आहे. भारतात ९-१० तास उन असूनही याकडे दुर्लक्ष झाले,’ असे त्यांनी सांगितले.

अपांरपरिक ऊर्जा महत्त्वाची
वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट इंडियाच्या तन्वी बोंगाळे म्हणाल्या, ‘वृक्षतोड, वाहने आणि उद्योगांमुळे वातावरणात कार्बनचे प्रमाण वाढत चालले आहे. गेल्या शतकात जगाच्या तापमानात केवळ ०.८५ डिग्री सेल्सियसने वाढ झाली. आणि आपण हवामान बदलाने त्रस्त झालोय. हे तापमान आणखी वाढले तर काय होईल? हे टाळण्यासाठी उद्योगांनी कार्बन बजेट तयार करावे. स्वित्झरलॅँडसारखा छोटा देश ५६ टक्के वीजनिर्मिती अपारंपरिक स्त्रोताने करतो. तर भारतात अजूनही ६० टक्के ऊर्जा कोळशाने तयार केली जाते. आजघडीला अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करण्याची गरज आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा बळकट करणे, पारंपरिक इंधनाचा वापर टाळणे, विजेचा वापर कमी करणे यासारख्या छोट्या उपायातून मोठी मदत होऊ शकते,’ असे त्या म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रिकेट संघटनेच्या मतदार यादीत घोळ

$
0
0

क्रिकेट संघटनेच्या मतदार यादीत घोळ
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या २६ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीत एक नवाच वाद समोर आला आहे. मतदार यादीतून आठ आजीव सभासदांचे नावे वगळण्यात आली आहेत. दरम्यान, १४ मार्चपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आसून त्यावेळी मतदार यादी जाहीर करण्यात येईल, असे ही निवडणूक घेणारे १९८८ मधील सहसचिव किरण जोशी यांनी स्पष्ट केले.
औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेची निवडणूक ही पुन्हा एकदा वादात अडकली आहे. या आधी सप्टेंबर महिन्यात व नोव्हेंबर महिन्यात जिल्हा क्रिकेट संघटनेची निवडणूक जाहीर करण्यात आली होती. सप्टेंबर महिन्यातील निवडणुकीला धर्मादाय आयु्क्तांनी स्थगिती दिली होती. नोव्हेंबर महिन्यातील निवडणूक संघटनेतील वादावर तोडगा निघत असल्यामुळे स्थगित करण्यात आली होती. गेल्या सहा महिन्यात तिसऱ्यांदा औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेने निवडणूक जाहीर केली आहे. ही निवडणूकही मतदार यादीमुळे वादात आली आहे.
१९८८च्या शेड्युल वनवर असलेल्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक घेण्याचे अधिकार धर्मादाय आयुक्तांनी दिले होते. पण या आदेशात निवडणुकीसाठी कोणती मतदार यादी वापरावी किंवा मतदार कोण असतील याचा स्पष्ट उल्लेख आणि जिल्हा क्रिकेट संघटनेच्या १९८८च्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःहूनच १९८८मध्ये सभासद असलेल्यांची मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. खरे तर धर्मादाय आयुक्तांकडे जाऊन या पदाधिकाऱ्यांनी मतदार यादी कोणती वापरायची याचा निर्णय घ्यायला हवा होता. पण पदाधिकाऱ्यांनी मतदार यादी प्रसिद्ध केली आहे, त्यात अनेक आजीव सभासदांची नावे गायब झालेली आहेत. प्रसिद्ध विधीज्ञ दिनेश गंगापूरवाला-वकील, डॉ. सुनील देशपांडे, हेमंत मिरखेलकर यांची नावे वगळण्यात आली आहेत.

कोट...
औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेची स्थापना झाल्यापासून मी आजीव सभासद आहे. माझे नाव कसे वगळले याचे मला आश्चर्य वाटते. १९७७ मध्ये मी कोषाध्यक्ष असताना मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर महाराष्ट्र-बडोदा सामनाही आयोजित करण्यात आला होता. माझे नाव वगळल्याबाबत मी आक्षेप नोंदवणार आहे.
- डॉ. सुनील देशपांडे, आजीव सभासद, क्रिकेट संघटना.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जालन्यातील रस्त्याचे काम कासवगतीने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
शहरातील सर्व प्रमुख रस्ते सिमेंटचे करण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. गत तीन महिन्यांपासून जागोजागी रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यामुळे संपूर्ण वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. या सर्व प्रकारच्या निषेधार्थ जुन्या जालन्यातील नागरिकांनी खोदलेल्या रस्त्याच्या जागेवरच बेशरमाची झाडे लावली.
सिमेंटच्या रस्त्याच्या कामांची शहरातील होत असलेल्या वाताहतीची दखल नुकतीच पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सर्वासमक्ष चांगलेच खडसावले होते. मात्र, त्यानंतरही परिस्थिती फारशी बदलली नाही. सिमेंटच्या रस्त्याची जाडी अंदाजपत्रकाच्या पेक्षा चक्क निम्मिच असल्याचे उघडपणे दिसत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी संबंधित कंत्राटदारांना पाठीशी घालत आहेत.
जुन्या जालन्यातील शनी मंदिर ते मुक्तेश्वरद्वार हा मुख्य कचेरी रोडवरील रस्त्यावर निम्मा हिस्सा गेल्या तीन महिन्यांपासून नुसते खोदण्याचे काम सुरू आहे. हा रस्ता खोदलेल्या जागांवर दबाई केली नाही तर मोठे खड्डे पडले आहेत आणि रस्ता अर्धाच उरला आहे. त्यामुळे दुहेरी वाहतूक कोंडी रोजचेच संकट उभे राहिले आहे.
सिमेंटच्या रस्त्याची वाताहात करणाऱ्या या साखळी गुत्तेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी भाजपचे नगरसेवक पालिकेतील गटनेते अशोक पांगारकर यांनी केली आहे. तर मानवहक्क संघटनेच्यावतीने रमेशराव देहेडकर यांनी रस्त्याच्या गुणवत्तेच्या संदर्भात तक्रार दाखल केली आहे.
बेशरमाची झाडे लावण्याच्या आंदोलनात मैत्र मांदियाळी संघटनेचे निवृत्ती रूद्राक्ष, अंध्दश्रद्धा निर्मुलन समितीचे एकनाथ घुगे, प्रकाश पाटील, मनोज कुलकर्णी, विजय जोशी, प्रमोद पाटील, जुनेद चाऊस, समद चौधरी, हबीबभाई, मुन्नाभाई, खालेद चाऊस, राजेश कंठाळे, मनोज गुरव, संजीवनी गाडगे, वसंत बुनगे, संजीवनी पाटील यांच्यासह जुन्या जालन्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


या संपूर्ण कामाची तपासणी जनतेच्या साक्षीने झाली पाहिजे. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कधीच या सर्व कामाला भेट देत नाहीत. त्यांचा एकही अधिकारी जागेवर नसतो. तीन महिने झाले आमचे सगळे दुकाने बंद झाले आहेत. धूळ, माती आणि कचरा साचलेला जागोजागी ढिगारे पडले आहेत. उचलायला कोणीही येत नाही, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक खड्यात पडत आहेत. त्यामुळे आम्ही बेशरमाची झाडे लावली आहेत. उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत.
बळीराम वैद्य. अध्यक्ष, नाभिक महामंडळ, जालना.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुळजापूर तीर्थक्षेत्र दारूमुक्त करण्यासाठी साकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

देशभरातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत तथा महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवनीचे तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर शहराला राज्य सरकारने दारूमुक्त घोषीत करून या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य राखावे, यासाठी तुळजापूर शहरवसियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे साकडे घातले आहे.

तुळजापूर नगरपालिकेने देखील येथील जनतेच्या भावना लक्षात घेऊन तुळजापूर शहर दारूमुक्त शहर म्हणून घोषित करावे, अशा स्वरूपाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.

तुळजापूर या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी दररोज महाराष्ट्रासह परप्रांतातून भाविक हजारोंच्या संख्येने येतात. परंतु, दारूमुळे व्यवसनाधीनतेकडे भाविक, स्थानिक नागरिक व पुजाऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढू लागलेला आहे. यातूनच अनेक गैरप्रकार येथे वाढू लागले आहेत. अवैद्य धंद्यांना ऊत आला आहे. परिणामी तुळजाभवानीच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या या तीर्थक्षेत्राला गालबोट लागण्याचा धोकाही निर्माण होऊ लागला आहे.

तुळजापूर नगरपालिकेने यापूर्वी दारूबंदीचा ठराव सर्वानमुते मंजूर केला. मात्र, याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे शासनस्तरावरून दारूबंदीचे आदेश कोठून तुळजापूर शहर हे दारूमुक्त म्हणून घोषीत करावे, असे साकडे पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे, उपनगराध्यक्ष तुळशीदास साखरे, सचिन पाटील, सुनिल रोचकरी आदींनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना घातले आहे.

अनेकांचे संसार देशोघडीला लावणारी दारू तुळजापूरातून हद्दपार करण्यात यावी. दारू ही अनेक समस्यांचे मूळ असून, येथे येणारा भाविकही त्याचा बळी ठरत आहे.
किशोर गंगणे, माजी अध्यक्ष पुजारी मंडळ, तुळजापूर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमीन विक्रीची सीबीआय चौकशी करा

$
0
0

औरंगाबाद : नाशिक येथील दुदाधारी मशिदीच्या जमीन विक्रीचे प्रकरण समोर आले आहे. कोट्यवधी रुपयांची जमीन कवडीमोल भावाने विकली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
आमदार जलील आणि वारिस पठाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली. नाशिक येथील दुदाधारी मशिदीच्या जमिनीच्या विक्रीचे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत, वक्फ बोर्डाच्या नोंदणीकृत जमिनी‌ची बाजारभावानुसार सुमारे दोन हजार कोटी रुपये किंमत आहे. ही जमीन खोट्या कागदपत्रांच्या आधारे पुण्याच्या एका बिल्डरला विकण्यात आली. या प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. दुदाधारी मशिदीच्या जमीन प्रकरणासह वक्फ बोर्डाच्या जमिनी अशाच पद्धतीने विकण्यात आलेल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. या जमीन विक्रीप्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी. यासह अन्य प्रकरणांची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे एमआयएमच्या आमदारांनी केली आहे. याशिवाय एटीएके शेख समितीने वक्फ बोर्डाच्या संपत्तीबाबत दिलेल्या अहवालाबाबत अॅक्शन रिपोर्ट, विधानसभेत सादर करावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

शिक्षा झालीच पाहिजे
मुंबई आणि पुण्यात वक्फ बोर्डाच्या मालकीच्या मोक्याच्या जागा बिल्डरांनी हडप केल्या आहेत. अशा प्रकरणांची चौकशी सीबीआय मार्फत करून गैरव्यवहार करणाऱ्या दोषींना कडक शिक्षा करण्यात यावी, अशीही मागणी आमदार जलील यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रान्सपोर्ट नगरीला जागेची अद्याप प्रतीक्षा

$
0
0

ट्रान्सपोर्ट नगरीला जागेची अद्याप प्रतीक्षा

विधी विद्यापीठाच्या जागेची अडचण

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः

औरंगाबादमध्ये येणाऱ्या शेकडो ट्रकना थांबण्यासाठी ट्रान्सपोर्ट नगरी उभारण्याचा निर्णय जाहीर करून सहा महिने उलटले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सह महिन्यांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला. मात्र, अद्यापही या ट्रान्सपोर्ट नगरीला जागेची प्रतीक्षा आहे. आता विधी विद्यापीठाच्या जागेचा प्रश्न सोडविल्यानंतर ट्रान्सपोर्ट नगरीला जागा मिळणार असल्याची माहिती महसूल विभागातून मिळाली आहे.

करोडी येथील गट नं २४ मध्ये ट्रान्सपोर्ट हबसाठी जागा देण्याची घोषणा औरंगाबादमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. करोडी येथे याधी आरटीओला जागा मिळालेली आहे. त्यासोबतच लॉ विद्यापीठाच्या जागेसह दोन संस्थांना येथे जागा देण्यात आली आहे. तसेच मराठा व महार समाजाच्या स्मशानभूमीसाठीही जागा देण्यात आली आहे. करोडी येथे गट नंबर २४ ये‌थे ८० ते ९० एक्कर जागा रिक्त आहे. या गटातील पाच ते दहा एक्कर जागेवर अतिक्रमणे आहेत. या गटातून ट्रान्सपोर्ट हबला जागा देण्याचे निश्चित करण्यात आले होते.

विधी विद्यापीठाची जागा एका बाजूला ठेवून उर्वरित जागा ट्रन्सपोर्ट नगरीसाठी देण्याचा विचार महसूल विभागाकडून सुरू आहे. मात्र विधी विद्यापीठाला कोणत्या बाजूने जागा दिली जाणार याचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे ट्रान्सपोर्ट नगरीची जागाही निश्चित होऊ शकत नाही व ती जागा महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला देता येत नाही. परिणामी ट्रान्सपोर्ट नगरीचा प्रश्न तसाच रेंगाळत पडलेला आहे.

भविष्यात ट्रान्सपोर्ट हबचे महत्व वाढणार

करोडीपासून काही अंतरावर दौलताबादच्या माळीवाडा येथे कंटेनर डेपो उभारण्यात आला आहे. या कंटेनर डेपोचाही विस्तार होणार आहे. रेल्वे लाईन जवळ असल्याने याचा फायदा स्‍थानिक टान्सपोर्टर्सला मिळेल. याशिवाय एनएच २११, तसेच नागपूर मुंबई एक्सप्रेस वे झाल्यानंतर वाहनांची संख्या वाढणार आहे. ही वाहने रात्रीच्या वेळी ट्रान्सपोर्ट नगर येथे थांबू शकतील.

असा वाढणार रोजगार

एमएसआरडीसी (महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ) च्या माध्यमातून उभारल्या जाणाऱ्या या हबमध्ये औरंगाबाद शहरातील ट्रान्सपोर्टर्सचे गोडावून, या मार्गावरून जाणारे ट्रक थांबण्यासाठी पार्किंग, तसेच छोट्या वाहनांसाठी जागा, बॉडी बिल्डिंगचे गॅरेज, गॅरेज, अॅटो पार्टस् विक्रीची दुकाने, वजन काटा, याशिवाय वाहन चालकांसाठी विश्रांतीगृहे, छोटी-मोठी हॉटेल, स्वच्छता गृहे यासोबतच या ठिकाणी जर हजारपेक्षा जास्त कामगार किंवा लोकांची वर्दळ असेल तर अशा ठिकाणी मनोरंजनासाठी थिऐटर उभारले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे या भागात रोजगारामध्ये वाढ होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूकबधीर मुलांनी लुटला रंगपंचमीचा आनंद

$
0
0

मूकबधीर मुलांनी लुटला रंगपंचमीचा आनंद


आस्था जनविकास संस्थेचा उपक्रम


म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

होळी रंगपंचमीचा उत्सव म्हणजे बच्चे कंपनीसाठी पर्वणीच असते. जटवाडा परिसरातील मूकबधीर व अपंग मुलांनी मात्र रविवारी हा रंगपंचमी उत्साहात साजरी केली. टिळा होळीसोबतच झिंगाट गाण्यावर ही मंडळी मनसोक्त थिरकली. ज्योतीनगर येथील आस्था जनविकास संस्थेच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.

आस्था जनविकास संस्थेच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवून होळी सण साजरा करण्यात येतो. रविवारी सकाळी जटवाडा रोडवरील मराठवाडा ग्रामीण अपंग विकास मंडळ संचलित सावित्रीबाई फुले निवासी मूकबधीर विद्यालयात हा उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात रंगोत्सवाने झाली. आलेल्या पाहुण्यांचे मुलांनी टिळा लावून स्वागत केले. यानंतर आस्थाच्या स्वयंसेवकांनी देखील मुलांना रंग लावून रंगोत्सवाला सुरुवात केली. यावेळी पर्यावरणपूरक अशा हर्बल रंगाचा वापर करण्यात आला. एकमेकांना रंग लावल्यानंतर मुलांनी नृत्याचा आनंद लुटला.

श्लोक, शिस्त आणि जेवणाचा आनंद

रंगोत्सव झाल्यानंतर या मुलांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. पुरणपोळी, पापड, भजे आणि मसाले भात असा मेनू मुलांसाठी तयार करण्यात आला होता. या चिमुकल्यांना सुरुवातीला साखरगाठी तसेच साखरेचे कडे देण्यात आले. सामूहिक श्लोक पठणानंतर मुलांनी भोजनाचा आनंद लुटला. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आस्था जनविकास संस्थेच्या अध्यक्ष आरती श्यामल जोशी, सारिका भंडारी, अंजू मुळे, आशा तेली, प्राजक्ता मुर्कीकर, मधू ठाकूर, ज्योत्स्ना पुजारी, अश्विनी जहागीरदार यांनी परिश्रम घेतले. यावेळी मुकबधीर विद्यालयाच्या विमल बनसोडे, विमला सुगंधी यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images