Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘जेनेटिक डिसॉर्डर’च्या ६ महिन्यांत ३०० केसेस

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील एकमेव ‘जेनेटिक लॅब’ ही कमलनयन बजाज रुग्णालयात सुरू झाली असून, मागच्या केवळ सहा महिन्यांत जनुकीय आजारांच्या (जेनेटिक डिसॉर्डर) तब्बल ३००पेक्षा जास्त केसेसचे निदान या प्रयोगशाळेत झाले आहे. विशेष म्हणजे अचूक निदानामुळे यातील अनेक रुग्णांवर योग्य ते उपचार सुरू करणे शक्य झाले आणि आज यातील अनेकांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहेत. केवळ जनुकीय आजारांचे निदान-उपचार नव्हे, तर जनुकीय आजारांविषयी आवश्यक समुपदेशनाची (जेनेटिक कौन्सिलिंग) सुविधाही रुग्णालयामध्ये उपलब्ध झाली आहे.
जन्मावेळच्या जनुकीय आजारांचे प्रमाण हे तब्बल ५ ते १० टक्के आहे आणि हा जनुकीय आजारांचा भार (जेनेटिक बर्डन) संपूर्ण जगावर समान आहे. त्याचवेळी जगभरातील जनुकीय आजारांची संख्या ही तब्बल साडेतीन हजारांपेक्षा जास्त आहे, मात्र देशात राज्यात व अर्थातच शहरातही जनुकीय आजारांविषयी फार कमी जागृतता आहे. आतापर्यंत जनुकीय आजारांच्या निदान व उपचारांसाठी मुंबई-पुणे व इतर महानगरांमध्ये जाण्याशिवाय पर्याय नव्हता. सप्टेंबर, ऑक्टोबर २०१६ मध्ये ‘कमलनयन’च्या ‘जेनेटिक लॅब-क्लिनिक’ला मान्यता मिळाली आणि तेव्हापासून सहा महिन्यांत जनुकीय आजार असलेल्या ३००पेक्षा जास्त व्यक्तींचे निदान करण्यात आले आहे. त्यातील अनेकांवर उपचार सुरू आहेत. अनेकांममध्ये सुधारणा झाल्याचेही सांगण्यात आले.

चुकीच्या निदानापासून सुटका
रुग्णालयाच्या ‘जेनेटिक लॅब’मध्ये येण्यापूर्वी कितीतरी बाल-प्रौढ रुग्णांचे चुकीचे निदान होऊन त्यांच्यावर चुकीचे उपचार होत होते. परिणामी, रुग्णांमध्ये कोणतीही सुधारणा न होता उलट अधिक नुकसान झाल्याचेही समोर आले आहे. यातील एका बालरुग्णाचे निदान चक्क कुपोषण असे करण्यात आले होते व त्याच्यावर अनेक दिवसांपासून एका रुग्णालयात उपचार सुरू होते. ‘जेनेटिक लॅब’मध्ये संबंधित बालरुग्णाला ‘मेटॅबोलिक सिन्ड्रोम’ असल्याचे निदान झाले व आहारातील बदलांसह औषधोपचारांनी आता बालरुग्णामध्ये सुधारणा होत आहे. एका महिलेची पाच अपत्ये मृत्यू पावली होती; तरीही अचूक निदान झाले नव्हते. शेवटी सहाव्या अपत्याला ‘डीएमडी’ हा जनुकीय आजार असल्याचे निदान होऊन उपचार सुरू झाले व पुन्हा भविष्यातील काळजी घेण्याविषयी तिच्या कुटुंबाला सतर्क करण्यात आले.

‘मायोपॅथी’चे निदान ‘अलेक्झांडर’
एका बालरुग्णाला ‘अलेक्झांडर डिसीज’ हा मेंदूच्या दुर्धर जनुकीय आजार असल्याचे निदान एका खासगी लॅबमध्ये करण्यात आले व संबंधित बालरुग्ण जगणे अशक्य असल्याचेही सुचित करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता व त्याचा फार मोठा ताण कुटुंबावर होता. याच बालरुग्णाला ‘मायोपॅथी’ हा स्नायुंचा जनुकीय आजार असल्याचे ‘जेनेटिक लॅब’मध्ये निदान करण्यात येऊन त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्याच्यामध्ये काही प्रमाणात सुधारणाही होत असल्याचे जेनेटिसिस्ट व जेनेटिक कौन्सिलर डॉ. अल्का एकबोटे यांनी ‘मटा’ला सांगितले.

जगावर जेनेटिक आजारांचा भार असा
- एकूण जनुकीय आजारांची संख्या ३५०२
- जनुकीय आजारांची टक्केवारी ५ ते १० (जन्मावेळी)
- उपचार शक्य ३० टक्के आजारांवर
- उपचार अशक्य ७० टक्के आजारांवर

जनुकीय आजारांमध्ये अचूक निदान व अचूक भाष्य खूप महत्त्वाचे ठरते. ३० टक्के जनुकीय आजारांमध्ये उपचार शक्य असून, योग्य वेळी उपचार झाल्यास असे रुग्ण सर्वसामान्य आयुष्य जगू शकतात. उर्वरित ७० टक्के आजारांवर उपचार नाहीत, पण निदानामुळे ते भविष्यात टाळता येऊ शकतात. एकूण कॅन्सरचे प्रमाण ०.१ ते ०.५ टक्के आहे, तर जनुकीय आजारांचे प्रमाण जन्मावेळी १० टक्क्यांपर्यंत आहे, तरीदेखील जनुकीय आजारांविषयी किमान जागृतताही नाही.
– डॉ. अलका एकबोटे, जेनेटिसिस्ट, जेनेटिक कौन्सिलर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का?'

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । लातूर

भारतीय सैनिकांच्या पत्नीविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांच्यावरील निलंबनाची कारवाई ताजी असतानाच, राज्य सरकारमधील सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी जातीय विधान करून वाद ओढवून घेतला आहे.

'घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का?... मी दलित आहे... एकेकाचं थोबाड रंगवलं असतं...' अशी मुक्ताफळं उधळत कांबळे यांनी खळबळ उडवून दिली आहे.

सामाजिक न्याय विभागातील दलाली बंद झाल्यामुळे दलालांनी दिलीप कांबळे यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. अलीकडेच एका कार्यक्रमात ते निघून गेल्यानंतर त्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. त्याचाच संदर्भ घेऊन कांबळे म्हणाले, 'या राज्यातल्या दलालांची दलाली बंद झाल्यामुळे काही जण शासनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्या विरोधात घोषणा द्यायच्या तर माझ्यासमोर द्या. घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का? मी दलित आहे, एकेकाचं थोबाड रंगवलं असतं.' हे सरकार सर्व प्रकारच्या दलालांच्या विरोधात आहे म्हणून काही जणांच्या पोटात दुखतंय, असा टोलाही त्यांनी लगावला.

या विधानावर टाळ्या-शिट्ट्यांचा पाऊस पडला, पण अनेकांच्या भुवयाही उंचावल्या. सामाजिक सलोखा राखण्याची जबाबदारी असलेल्या मंत्र्यांनीच जातीय वक्तव्य केल्यानं सगळेच चक्रावले. त्यांना नेमकं काय म्हणायचं, कुणाबद्दल बोलायचंय, यावरून तर्क लढवले जात आहेत.

दरम्यान, या विधानावरून वाद उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊनच, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नेत्यांनी सारवासारव करायचा प्रयत्न केला. होळी असल्यानं मंत्र्यांचं हे विधान गांभीर्यानं घेऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं. परंतु, तोवर चर्चा सुरू झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतीसाठी पाणी ही संकल्पना संपली

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या विषयावर भरपूर चर्चा होते. पण, उपलब्ध पाण्याच्या योग्य वापराबाबत चर्चा घडत नाही. पर्जन्याधारीत शेतीचे पॅटर्न बदलल्याने मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. राजकीय सत्तेतून ओढ्यात सिमेंट भिंती उभ्या राहिल्या आहेत. शेतीसाठी पाणी ही संकल्पना संपली आहे. समाज आजही चांगला असून कुणीतरी पुढाकार घेण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध जलकर्मी व आदर्श हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी केले. ‘पाण्याशप्पथ’ या पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते.
लोकवाङ्मय गृह प्रकाशन, मुंबई व अक्षरांगण औरंगाबाद यांच्या वतीने जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे लिखित ‘पाण्याशप्पथ’ या पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम घेण्यात आला. महसूल प्रबोधिनी सभागृहात मंगळवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर जलकर्मी पोपटराव पवार, प्रदीप पुरंदरे, अनिकेत लोहिया, ईश्वर काळे, राजन क्षीरसागर व डॉ. भालचंद्र कानगो उपस्थित होते. पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर मान्यवरांनी पाणी आणि शेतीच्या प्रश्नांवर विचार मांडले. ‘महसूलाचे मार्ग बदलल्यामुळे पाणीप्रश्न निर्माण झाल्याचे पोपटराव पवार म्हणाले. ‘चार वर्षे पाणी टंचाई अनुभवलेल्या मराठ‍वाड्यात ४६ साखर कारखाने आहेत. अवर्षणप्रवण सोलापूर जिल्ह्यात १२ साखर कारखाने आहेत. पण, शुगर इंडस्ट्री लिकर इंडस्ट्रीवर उभी आहे. शासकीय महसूलाचे मार्ग बदलले आहेत. दारू, वाळू, उद्योगातून महसूल मिळत आहे. मग महसूल नसलेल्या शेतीला पाणी का द्यावे अशी परिस्थिती आहे. बाटलीबंद पाण्याचे स्तोम इतके माजले की, काही दिवसांनी अमूक कंपनीचे बाटलीबंद पाणी प्या, असे डॉक्टर लिहून देतील. श्रीमंत होण्यासाठी भूगर्भातील पाण्याचा किती हव्यास धरणार’ असा सवाल पवार यांनी केला. तर राजन क्षीरसागर म्हणाले, ‘पाणीसाठा, वापर, वहन, निचरा या साखळी प्रक्रियेतील गुंतागुंतीची उकल करण्याची क्रिया पुस्तकाने केली आहे. पाण्याची विषमता मोडीत काढण्यासाठी पुस्तकाचे शस्त्र उपयोगी ठरणार आहे. सरकार नद्या उपसून स्मार्ट सिटी बांधत आहेत. सत्ता व पाणी यांची सांगड ओळखणे गरजेचे आहे’.
पुस्तक लेखनामागील भूमिका प्रदीप पुरंदरे यांनी मांडली. ‘२०१२ ते २०१६ हा जलसंकटाचा काळ होता. या कालावधीत पाण्याच्या बाबतीत बरेच काही घडले. माझ्या दोन जनहित याचिकामुळे जलसंपत्ती प्राधिकरणाची व्यवस्था समोर आली. १९१ सिंचन प्रकल्पांची चौकशी सुरू झाली. सहा महिन्यांपासून प्राधिकरणाला अध्यक्ष व सदस्य नाही. सिंचनासाठी धरणे बांधली तरी उद्योग पाणी पळवत आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या क्षेत्रात कोरडे बागायतदार तयार झाले आहेत. हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्यात ऐतिहासिक लढा आवश्यक आहे. आपले पाणी डोक्यावर आणि भूगर्भात आहे. त्याचा शोध घेण्याची गरज आहे’ असे पुरंदरे म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भालचंद्र कानगो यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. समाधान इंगळे यांनी केले. यावेळी अभ्यासक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्तेसाठी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न’

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अनेक वर्षापासून समाजामध्ये एकात्मतेचे वातावरण होते. सत्ता टिकविण्यासाठी या समाजात तेढ आणण्याचे काम काही समाजकंटकांतर्फे केले जात आहे. अशा समाज कंटकांना कारागृहात पाठविल्याशिवाय शांत बसणार नाही, असे मत सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ विधीज्ज्ञ अॅड. महमूद पराचा यांनी व्यक्त केले.
मौलाना आझाद रिसर्च सेंटरमध्ये शनिवारी ‘जमात ए इस्लामी’च्या वतीने ‘वर्तमान स्थिती आणि कायदे’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या वेळी महेमूद पराचा म्हणाले, ‘दहशतवादाच्या नावाखाली आज अनेक तरूण तुरूंगात आहेत. तुरूंगात असलेल्या या तरूणांचा निकाल अजूनही लागलेला नाही. उलट काही प्रकरणात अन्य समाजातील व्यक्ती दहशतवादाला कारणीभूत असल्याचे कोर्टाच्या निकालावरून समोर आले आहे. सध्या देशात समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करून सत्ता टिकविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.’
‘जमात ए इस्लामी’चे इलियास फलाही म्हणाले, ‘देशाच्या विकासात मुस्लिम समाजाचे मोठे योगदान राहिले आहे. हे योगदान आजही चालू आहे. उद्याही कायम राहील. यामुळे मुस्लिमांच्या विकासासाठी इतर समाजाच्या सोबत काम होणे आवश्यक आहे.’
या वेळी अॅड. आदिल बियाबानी, अॅड. सलीम खान, मौलाना न‌सीम मिफ्ताई, जळगाव विधी महाविद्यालयाचे अधिष्ठाता अरशद सब्जवारी, मौलाना माजेद नदवी यांच्यासह मेराज सिद्दीकी यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडमध्ये तीन भावंडांचा बुडून मृत्यू, आई वाचली

0
0

मटा ऑनलाइन वृत्त। बीड

बीड तालुक्यातील कामखेडा गावात तीन सख्ख्या भावंडांचा नदीच्या बंधाऱ्यात मृत्यू झाल्याची ह्रद्य हेलावणारी घटना घडली आहे. जिशान, सानिया आणि अफ्फान अशी या मुलांची नावे आहेत. आपल्या डोळ्यांसमोर आपल्या बुडणाऱ्या लेकरांना वाचवण्यासाठी या मुलांच्या आईनेही पाण्यात उडी घेतली. मात्र गावकऱ्यांनी बुडणाऱ्या आईला वाचवले.

या तीन दुर्दैवी मुलांची आई परवीन शेख कपडे धुण्यासाठी कामखेडजवळच्या बंधाऱ्यावर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची तीन मुलेही होती. आई कपडे धूत असताना अचानक जिशान पाय घसरुन पाण्यात पडला. हे सानिया आणि अफ्फानने पाहिल्याबरोबर ते दोघे जिशानला वाचवण्यासाठी लगबगीने पाण्यात उतरले. मात्र यांपैकी कुणालाही पोहता येत नसल्याने तिघेही बु़डू लागली.

शेजारीच कपडे धूत असलेल्या परवीन यांनी आपली मुले बुडत आहेत हे पाहताच आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांना वाचवण्यासाठी त्यांनीही पाण्यात उडी घेतली. दरम्यान, गटांगळ्या खाणाऱ्या जिशान, सानिया आणि अफ्फान यांना पाण्याने आपल्यात सामावून घेतले.

तीन मुले पाण्यात पडली आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या आईनेही बंधाऱ्यात उडी घेतली आहे, हे पाहताच आसपास असलेल्या गावकऱ्यांनी धाव घेत पाण्यात उड्या घेतल्या आणि परवीन यांचा प्राण वाचवला.

बंधाऱ्यात बुडून मृत्यू पावलेल्या या दुदैवी मुलांचे वडील शेतकरी आहेत. शिवाय त्यांचा कापूस विक्रीचा व्यवसाय आहे.

एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी मागचा पुढचा विचार न करता आपल्या जीवांची बाजी लावणाऱ्या या तीन भावंडांचा दुदैवी मृत्यू झाल्याने कामखेडा गाव आणि बीड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंडितअण्णा मुंडे यांचे ह्रदयविकाराने निधन

0
0

मटा ऑनलाइन वृत्त। बीड

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे बंधू आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे वडील पंडितअण्णा मुंडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. परळीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७७ वर्षांचे होते.

पंडितअण्णांना गेल्या महिन्यात २८ सप्टेंबरला ह्रदयविकाराचा धक्का बसला होता. त्यावेळी त्यांना लातूरमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना विमानाने पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते.

पंडितअण्णा हे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे वडीलबंधू आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे चे वडील होत. पंडितअण्णा यांनी दोन वेळा बीड जिल्हापरिषदेचे अध्यक्षपद भूषवले आहे. याबरोबर संत जगमित्र नागा सहकारी सूतगिरणीचे, तसेच परळी बाजारसमितीचे ते संचालक होते.

पंडितअण्णांनी राजकारणाची सुरूवात आपले बंधू दिवंगत गोपिनाथ मुंडे यांच्या सोबतच केली. गोपीनाथ मुंडे राज्य, तसेच राष्ट्रीय पातळीवर सक्रिय झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकाऱणाची जबाबदारी पंडितअण्णा पार पाडत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंकजांना धक्का; परळीत धनंजय मुंडेच

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । परळी (बीड)

परळी-वैजनाथ नगरपरिषदेत राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या भावा-बहिणींमध्ये रंगलेल्या वर्चस्वाच्या लढाईत पंकजा यांना धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपला गड आणखी मजबूत करत ३३ पैकी २७ जागा जिंकल्या असून भाजपच्या पदरात अवघ्या ४ जागा पडल्या आहेत. परळीच्या नगराध्यक्षपदीही राष्ट्रवादीच्या सरोजिनी हालगे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत. दरम्यान, पंकजा यांनी 'मी हा पराभव स्वीकारत आहे', अशी प्रतिक्रिया निकालांनंतर दिली.

परळीच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सहकारी संस्थांच्या निवडणुकीत पंकजा यांच्या नेतृत्वाने कमाल केली होती. त्या निकालांचीच पुनरावृत्ती परळीत होईल, असे आडाखे बांधले जात होते. मात्र धनंजय मुंडे यांनी हे सगळे अंदाज फोल ठरवले आणि परळीतील आपलं वर्चस्व सिद्ध केलं. भाजप आणि पंकजांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे भाजपने परळीची निवडणूक विशेष प्रतिष्ठेची केली होती. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही येथे प्रचारसभा घेतली होती. त्यामुळे भाजपसाठी हा पराभव जिव्हारी लागणारा ठरला आहे. पंकजा यांची याबाबत प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी पराभव मान्य केला आहे. या पराभवाची जबाबदारी सर्वस्वी माझी आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरता येणार नाही, असे त्या म्हणाल्या. शरद पवार एखाद्या ठिकाणी प्रचाराला गेले आणि तेथे पराभव झाला तर तो पवरांचा पराभव आहे, असे आपण म्हणतो का?, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला.

धनबळ हरलं, जनशक्ती जिंकली: धनंजय मुंडे

भाजपने धनबळ वापरलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नेत्यांच्या फौजा प्रचारासाठी आणल्या, तरीही परळीतील जनशक्तीने राष्ट्रवादीच्या बाजूने कौल दिला आहे. नगरपालिकेत आम्ही करत असलेल्या भरीव कामांना मिळालेली ही पोचपावती आहे, अशी प्रतिक्रिया या विजयावर धनंजय मुंडे यांनी दिली.

परळी-वैजनाथ नगर परिषद निकाल


पक्षीय बलाबल

राष्ट्रवादी - २७
भाजप - ४
शिवसेना - १
काँग्रेस - १
एकूण जागा - ३३

- नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उमेदवार सरोजिनी हालगे ५ हजार १४४ मतांनी विजयी. हालगे यांना १८ हजार १७६ मते तर भाजपच्या मेनकुदळे यांना १३ हजार ३२ मते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेंव्हा त्यानं हजेरीपटावरून जात खोडली...

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

'जात नाही ती जात', असं सांगत अनेकजण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जातीचं समर्थन करत असतात. त्यामुळे जातीही नष्ट होत नाहीत आणि जातीमुळं होणारं नुकसानही टाळता येत नाही. बीडमध्ये मात्र रोहन भोसले या इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं जातीविरोधात लढण्याचं धाडसी पाऊल उचललयं. त्यानं शाळेच्या हजेरीपटावरून स्वत:ची जात आणि धर्मच खोडून काढला असून त्याच्या या कृतीचं सर्वजण कौतूक करत आहेत.

आष्टी तालूक्यातील पारगावच्या जिल्हा परिषद शाळेत रोहन शिकतो. रोहन शाळेतील हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. तो देव आणि धर्मही मानत नाही. शाळेतील हजेरीपटावर विद्यार्थ्यांच्या नावासमोरच्या कॉलममध्ये त्याची जात आणि धर्म लिहिला जात असल्याचं त्याला खटकत होतं. त्यामुळं त्यानं शाळेच्या मधल्या सुट्टीत वर्गात शिक्षक नसल्याची संधी साधत हजेरीपटावरून स्वत: जात खोडून टाकली. जवळ पेन नव्हता, त्यामुळं वर्ग मैत्रिणीचा पेन घेऊन त्यानं हजेरीपटावरून जात काढून टाकण्याचं मिशन फत्ते केलं.

रोहननं जात खोडल्याचं घरी कळताच त्याचे आई-वडिल घाबरले. पण गावकरी आणि शिक्षकांनी त्याच्या या कृतीचं समर्थन केल्यानं रोहनच्या आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला. शाळेत आम्ही विद्यार्थ्यांना जे संस्कार देतो, ते रोहनमुळे खऱ्या अर्थानं सार्थकी लागल्याचं त्याचे शिक्षक सागंतात. रोहनच्या या कृत्याचा अभिमान असून त्याचा हा संकल्प सरकारी पातळीवर राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं शिक्षकांनी सांगितलं.

शिवराय, फुले आणि आंबेडकर प्रेरणास्त्रोत

इतर मुलांसारखं टाइमपास करणं आणि खेळणं यात रोहनला इंटरेस्ट नाही. तो नियमितपणे किर्तन ऐकतो. वाचन करतो आणि घरच्यांना छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचे विचार सांगत असतो. या तीन महापुरुषांच्या विचाराच्या पगड्यातूनच त्याला हजेरीपटावरून जात खोडण्याची प्रेरणा मिळाल्याचं सांगण्यात येतं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलीच्या जन्मानंतर चहा,नाश्ता आणि दाढी फ्री

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

गावात मुलींचा घटलेला जन्मदर वाढविण्यासाठी बीडमधील एका गावानं न्यारीच शक्कल लढवली आहे. मुलगी जन्माला आली तर मुलीच्या वडिलांची सहा महिने दाढी-कटींग फुकट करून देण्यात येत असून त्यांना चहा-नाश्ताही फुकट देण्यात येत आहे. त्यामुळं मराठवाड्यात हे गाव चर्चेचा विषय झाले आहे. शिवाय आधीच स्त्रीभ्रूण हत्येनं बदनाम झालेल्या बीडचा 'बेटी बचाव' मोहिमेचा हा अनोखा 'बीड पॅटर्न' असल्याचं बोललं जात आहे.

स्त्रीभ्रूण हत्येमुळं बीडचे नाव खुप खराब झालं होतं. त्यामुळे या बीडचा जन्मदर ही प्रचंड कमी झाला होता. बीडच्या कुंबेफळ या गावाची स्थितीही काही वेगळी नव्हती. पण ही परिस्थिती बदलण्यासाठी दोन तरूण पुढे आले. अशोक पवार आणि भागवत थोरात असं त्यांचं नावं. मुलगी जन्माला आल्यास मुलीच्या वडिलांची सहा महिने फुकटात दाढी-कटींग करण्याचं पवार यांनी जाहीर केलं. तर भागवत थोरात यांनी मुलीच्या बापाला चहा आणि नाश्ता मोफत देण्याचं जाहीर करून उपक्रमही राबवायला सुरुवात केली. आर्थिक झळ बसत असली तरी या दोघांनी गावच्या हितासाठी हा उपक्रम हाती घेतला आणि गावकऱ्यांना उपक्रमाची माहिती देण्यासाठी आपआपल्या दुकानांवर फलकही लावले. या उपक्रमाचं गावकऱ्यांनी स्वागतही केलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड जिल्ह्यात ९७ अर्ज दाखल

0
0


म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्हा परिषदेच्या ६० गट आणि अकरा पंचायत समितीच्या १२० गणासाठी निवडणूक होत असून सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २७ जानेवारीपासून सुरुवात झाली. मात्र, शुक्रवारी अमावस्या असल्याने जिल्ह्यात एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. सोमवारी जिल्ह्यातील अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्हा परिषदेच्या ६० गटांसाठी ४७ अर्ज दाखल झाले होते. तर पंचायत समितीसाठी ५० अर्ज दाखल झाले.
गेवराई तालुक्यात जिल्हा परिषद गटासाठी १२ व पंचायत समितीसाठी २१ उमेदवारी अर्ज आले आहेत. बीड तालुक्यात जिल्हा परिषद गटासाठी ११ व पंचायत समितीसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल झाले. माजलगावमध्ये पंचायत समितीसाठी आठ तर जिल्हा परिषदेसाठी चार अर्ज दाखल झाले. केज तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी सहा तर पंचायत समिती गणासाठी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला. परळीत जिल्हा परिषद गटासाठी सात तर पंचायत समितीसाठी सात अर्ज आले आहेत. आष्टीत जिल्हा परिषदेला व पंचायत समितीत दोन अर्ज आले आहेत. शिरूर, धारूर, वडवणी तालुक्यात प्रत्येकी एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. चकलंबा आणि उमापूर अशा दोन जिल्हा परिषद गटातून आज जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी उदयसिंह पंडित, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर पिसाळ, जिल्हा परिषद सदस्य डॉ. विजयकुमार घाडगे, आदी उपस्थित होते. तर बीड तालुक्यातून नाळवंडीमधून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुण डाके, तर शिवसेनेकडून गणेश वरेकर यांनी तर पालीतून राष्ट्रवादीकडून उषा आखाडे यांनी उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला. एक फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे राहिलेल्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची मोठी गर्दी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद विकास समुद्रेंवर अंत्यसंस्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

काश्मीर येथे हिमस्खलनामुळे बीड जिल्ह्यातील भारतीय सैन्य दलाच्या जवान विकास पांडुरंग समुद्रे हे शहीद झाले होते. त्यांच्या पार्थीवावर बीड जिल्ह्यातील गांजपूर येथे शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद विकास समुद्रे हे सैन्य दलाच्या मुळ युनिट १८ महार रेजिमेंटमध्ये व सध्या ५१ राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. जम्मू काश्मीर मधील गुरज भागात अतिरेकी घुसखोरीवर नियंत्रण ठेवण्याकरीता तैनात करण्यात आले होते. २५ जानेवारी रोजी अचानक झालेल्या हिमस्खलनामध्ये विकास समुद्रे शहीद झाले होते. त्यांचे पार्थिव गुरज सेक्टर येथून श्रीनगर मिलिटरी हॉस्पीटल येथे हेलिकॉप्टरने ३० जानेवारी सायंकाळी आणण्यात आले. श्रीनगर येथून दिल्ली, दिल्लीहून विमानाने पुणे आणि बुधवारी सकाळी पुण्याहून हेलिकॉप्टरने धारुर आणि तेथून त्यांच्या मुळगावी गांजपूर येथे रुग्णवाहिकेतून आणण्यात आले. प्रथम धारुर शहरात त्यानंतर गांजपूर गावात आणि त्यांच्या राहत्या घरी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले. गावकऱ्यांनी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. त्यांचा तिरंग्यामधील पार्थिव गावात आणताच गावकऱ्यांनी तसेच एनसीसी व स्काऊट गाईडच्या पथकांनी अंतयात्रेत सहभाग घेतला. संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी शहीद विकास समुद्रे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. पोलिस दलाच्या पथकाने तसेच भारतीय सैन्य दलाच्यावतीने लेप्टनंट कर्नल नितिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे, आमदार संगीता ठोंबरे, आमदार आर. टी. देशमुख, सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल हरीभाऊ दळवी, कॅप्टन भीमराव पारवे यांच्यासह असंख्य अधिकारी, पदाधिकारी व देशप्रेमी नागरिकांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. शहीद विकास समुद्रे यांचे भाऊ परमेश्वर यांनी चितेला भडाग्नी दिला. यावेळी आई, पत्नी, बहिनी, चिमुकली मुलगी आणि नातेवाईकांनी अत्यंत शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस नेत्यांचं सोन्याच्या ताटात शाही भोजन

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । उस्मानाबाद

राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरुण बेरोजगार आहेत, गरिबांना दोन वेळचं अन्न मिळत नाहीए, मध्यमवर्गीय जनता महागाईनं हैराण आहे, मग कुठे आहेत 'अच्छे दिन'?, असा सवाल करत राज्य सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी उस्मानाबादमध्ये सोन्याच्या ताटात जेवणावर ताव मारल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून, हाच का काँग्रेसचा गरिबांबद्दलचा कळवळा?, असा प्रश्न विचारला जात आहे.

उस्मानाबादमधील येणगूरमध्ये काँग्रेसने जिल्हा परिषद प्रचाराचा नारळ फोडला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील, आमदार बसवराज पाटील ही नेतेमंडळी सभेसाठी पोहोचली होती. त्यांच्या जेवणाची व्यवस्था एका कार्यकर्त्याच्या घरी करण्यात आली होती. तिथे पोहोचल्यानंतर सगळ्यांचेच डोळे विस्फारले. सोन्याचा मुलामा दिलेली ताटं-वाट्या डायनिंग टेबलवर मांडल्या होत्या आणि एकापेक्षा एक झक्कास पदार्थ घेऊन वाढपी सज्ज होते. नेत्यांच्या ताटातील एकेक वाटी सुग्रास पदार्थांनी भरत गेली. ते पाहून कुणालाच मोह आवरला नाही. सगळ्यांनीच आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घेतला आणि पोटावरून हात फिरवला.

अर्थात, हे शाही भोजन त्यांना पचणार का, हा प्रश्नच आहे. कारण, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अनेक गरिबांच्या घरी जाऊन चक्क पत्रावळीवर जेवले आहेत. त्यांना महाराष्ट्रातील नेत्यांचा हा डामडौल रुचेल का, याबद्दल शंका आहे.

याआधी, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अशाच शाही मेजवानीला स्पष्ट नकार दिला होता. बीडमधील दुष्काळी दौऱ्यादरम्यान एका कार्यकर्त्यानं त्यांच्या भोजनाची जय्यत तयारी केली होती. परंतु, जनता दुष्काळात होरपळत असताना आपण हे शाही भोजन जेवणार नाही, असं त्यानं सांगितलं होतं. परंतु, त्या चव्हाणांसारखा समंजसपणा अशोक चव्हाणांनी आणि इतर नेत्यांनीही दाखवला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेऊर-आष्टी मार्गासाठी दहा कोटी

0
0

पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे यांनी मानले प्रभूंचे आभार

म. टा. प्रतिनिधी, बीड

जेऊर ते आष्टी या बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बीड जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या परळी-बीड-नगर रेल्वे मार्गासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ७८० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. याबद्दल बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे पत्राद्वारे आभार मानले आहेत.

बीड जिल्ह्यातील आष्टी ते जेऊर ७० किलोमीटर या मार्गासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने जिल्ह्यवासियांच्या दृष्टीने दुधात साखर अशी भावना आहे. परळी-बीड-नगर हा रेल्वे मार्ग १९९५ मध्ये मंजूर करण्यात आला होता. २६१ किलोमीटरच्या या रेल्वे मार्गाचा सुरूवातीला १९९५ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यावेळी ३५३ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद केंद्र व राज्य सरकार संयुक्तरित्या करेल असे ठरले होते. या मार्गासाठी अनेकदा आंदोलने झाली. मात्र, या मार्गासाठी मोठी तरतूद कधीच झाली नाही. दहा वीस कोटी रुपये देवून दरवर्षी या रेल्वे मार्गाची बोळवण केली जात होती. वीस वर्षांत ३०० कोटी रुपयांचा निधी या मार्गाला मिळाला. त्यामुळे या रेल्वे मार्गासाठी आता २८०० कोटी रुपयांची आवश्यकता होती. २८०० कोटी प्रकल्प खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी राज्याने मान्यता दिली. त्यासाठी निम्मा वाटा उचलावा, असेही पंतप्रधान मोदी यांनी आदेश दिले होते. त्यानंतर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १ हजार ४१३ कोटी या नगर-बीड-परळी रेल्वेसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. बीडचे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न हा रेल्वे प्रकल्प होता. दिवंगत मुंडे यांच्या पहिल्या स्मृतीदींनाच्या पूर्व संध्येला हा निर्णय घेऊन राज्य सरकारने एक प्रकारे मुंडे यांच्या स्मृतीला अभिवादन केले होते. पंतप्रधानांच्या हस्तक्षेपामुळे हा मार्ग 2019 पर्यंत पूर्ण होणार असून सध्या त्याचे काम वेगाने सुरू आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाला पहिल्या वर्षी १५९ कोटी, दुसऱ्या वर्षी तिनशे कोटी आणि आता थेट ७८० कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. यापैकी पाचशे कोटी हे अर्थसंकल्पा बाहेरून म्हणजे वित्तीय संस्थांकडून उपलब्ध होणार आहेत. या रेल्वे मार्गावरील नगर ते नारायणडोहपर्यंत १५ किलोमीटर रेल्वेमार्ग टाकण्याचे काम झाले आहे. बीड जवळ असणाऱ्या पालवण ते तिप्पटवाडी या साडेसात किलोमीटरमध्ये मातिकाम पूर्ण झाले असून या साडेसात किलोमीटरवर केवळ रेल्वे रुळ अंथरण्याचे काम बाकी आहे. नारायणडोह ते तिपट्टवाडीपर्यंत मातीचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या महिनाभरात बीड ते परळी रेल्वेमार्गाचे माती कामाच्या निविदा निघणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सचिन मुंगसे-पाटील यांनी दिली. दरम्यान, पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांनी या तरतूदीबद्दल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना पत्र पाठवून त्यांचे आभार मानले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परळीत पुन्हा मुंडे विरुद्ध मुंडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

परळी तालुक्यातील पिंपरी गटात अजय व रामेश्वर मुंडे यांच्यात लढत होत आहे. या पूर्वी बीड जिल्ह्यातील गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा संघर्ष साऱ्या राज्याने बघितला. गोपीनाथ मुंडेंच निधन झाल्यानंतर पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे हा संघर्ष तर सर्वश्रुत आहेच. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा मुंडे विरुद्ध मुंडेंचा संघर्ष मिनी मंत्रालयासाठी परळी तालुक्यातील पिंपरी गटात अजय मुंडे विरुद्ध रामेश्वर मुंडे यांच्यात पहावयास मिळणार आहे.

अजय मुंडे हे गोपिनाथ मुंडे यांचे पुतणे आणि पंकजा आणि धनंजयचे सख्खे चुलत भाऊ आहेत. तर रामेश्वर मुंडे हे धनंजय आणि पंकजा मुंडेचे सख्खे चुलत भाऊ आहेत. हे दोघे आताच चर्चत येण्याचे कारण या जिल्हा परिषद निवडणुकीत हे दोघे भाऊ एकमेकासमोर उभे आहेत. ज्या वेळी धनंजय मुंडे यांनी बंड करून आपला वेगळा मार्ग पत्करला त्याच वेळी अजय मुंडे हे धनंजय मुंडे सोबत राष्ट्रवादीत आले. युवक राष्ट्रवादीत प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करीत आहेत. या पूर्वी नाथ्रा ग्रामपंचायतीचे ते बिनविरोध सरपंच राहिले. आता जिल्हा परिषदेच्या आखाड्यात त्यांचा सामना रामेश्वर मुंडे सोबत असणार आहे.

रामेश्वर मुंडे हे धनंजय मुंडेच्या बंडानंतर ही पंकजा मुंडे सोबतच राहिले. एक भाऊ दूर गेला तरी एक भाऊ पंकजासोबत स्थानिक राजकारण करीत होता. मात्र, अजय मुंडे यांच्या तुलनेत रामेश्वर राजकारणात नवखे आहेत. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील गावात ही लढत होणार असल्याने शेतकरी अपल्यालाच मतदान देतील असे रामेश्वर मुंडेंना वाटते.
मागच्या पाच वर्षापासून परळीच्या सगळ्या छोट्या-मोठ्या निवडणुकीत पंकजा आणि धनंजयचा सामना झालेला म्हणूनच आता परळीच्या पिंपरी बुद्रुक या जिल्हा परिषद गटात पुन्हा या भावंडातील लढत लक्षवेधी असणार आहे. या दोन मुंडेच्या लढतीत कस पंकजा व धनंजय यांचा लागणार आहे.

धनंजय मुंडे हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आहेत तर पंकजा मुंडे या राज्याच्या ग्रामविकास मंत्री म्हणून काम पाहत आहेत. आता भाऊबंदकीच्या या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाला पहिल्या वर्षी १५९ कोटी, दुसऱ्या वर्षी तिनशे कोटी आणि आता थेट ७८० कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. यापैकी पाचशे कोटी हे अर्थसंकल्पा बाहेरून म्हणजे वित्तीय संस्थांकडून उपलब्ध होणार आहेत. या रेल्वे मार्गावरील नगर ते नारायणडोहपर्यंत १५ किलोमीटर रेल्वेमार्ग टाकण्याचे काम झाले आहे. बीड जवळ असणाऱ्या पालवण ते तिप्पटवाडी या साडेसात किलोमीटरमध्ये मातिकाम पूर्ण झाले असून या साडेसात किलोमीटरवर केवळ रेल्वे रुळ अंथरण्याचे काम बाकी आहे. नारायणडोह ते तिपट्टवाडीपर्यंत मातीचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या महिनाभरात बीड ते परळी रेल्वेमार्गाचे माती कामाच्या निविदा निघणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सचिन मुंगसे-पाटील यांनी दिली. दरम्यान, पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांनी या तरतूदीबद्दल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना पत्र पाठवून त्यांचे आभार मानले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांच्या घरात संस्कारांची कमी: पंकजा

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेबाबत अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याला राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. 'व्यक्ती हयात नसताना त्यांच्या जन्मतारखेवर भाष्य करून वाद निर्माण करणं योग्य नाही. पण पवारांच्या घरात संस्कारांची कमी आहे,' अशी बोचरी टीका पंकजा यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस १२ डिसेंबरला असतो. पवारांचा वाढदिवस राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ते पाहूनच मुंडेंनी देखील १२ डिसेंबर हीच जन्मतारीख लावली होती, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान केला होता. पवार यांच्या या वक्तव्यावर पंकजा यांनी नाराजी व्यक्त केली. 'अजित पवारांच्या या वक्तव्यामुळं संपूर्ण मुंडे कुटुंबीयांना वेदना झाल्या आहेत. मी नेहमीच शरद पवार यांचा आदर आणि सन्मान केला आहे. तो माझ्या संस्काराचा भाग आहे. पण पवारांच्या घरात अशा प्रकारच्या संस्कारांची कमी आहे हेच अजित पवारांच्या वक्तव्यातून दिसते. 'धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच अजित पवार हे बोलत आहेत,' असा आरोपही पंकजा यांनी केला. 'गोपीनाथ मुंडे यांना जन्मतारीख बदलायचीच असती तर त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जन्मतारीख लावली असती,' असंही त्या म्हणाल्या.

गोपीनाथ मुंडे यांची खरी जन्मतारीख त्यांच्या आई-वडिलांना ठाऊक नव्हती. मुंडे ऐंशीच्या दशकात राजकारणात आले. त्यावेळी शरद पवार यांचे वलय राज्याच्या राजकारणात होते. पवारांप्रमाणेच आपलाही वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा व्हावा यासाठीच त्यांनी ही तारीख जाहीर केल्याचे ते म्हणाले होते.

काँग्रेसप्रवेशाची चर्चा झाली नव्हती!

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये जाणार होते. त्यांच्यासोबत पाच आमदार देखील होते. मात्र डॉ. मनमोहन सिंग यांनी विरोध केल्यामुळे तसेच सुषमा स्वराज यांनी मुंडेंना समजावल्यानेच ते भाजपमध्ये राहिल्याचे अजित पवार म्हणाले होते. पंकजा यांनी याबाबत वेगळे मत मांडले. 'काँग्रेसमध्ये जाण्याबद्दल गोपीनाथ मुंडेंनी कधीही माझ्याशी चर्चा केली नाही. आमदार असताना मी त्यांच्यासोबत दिल्लीला गेले नव्हते,' असा दावाही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंकजा मुंडेंना धक्का; धनंजय मुंडेंची सरशी

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना जिल्हा परिषद निवडणुकीत धक्का बसला आहे. परळीतील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झाली आहे. परळी विधानसभेच्या अंतर्गत येणाऱ्या १० जिल्हा परिषदेच्या जागांपैकी तब्बल आठ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहे. तर बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

परळीतील जिल्हा परिषद निवडणूक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. जिल्हा परिषदेशिवाय परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवरदेखील राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. भाजपने २०१२ साली झालेल्या परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवर विजय मिळवला होता. पण यंदा धनंजय मुंडे यांनी दोन्ही पंचायत समिती भाजपकडून खेचून आणल्या. नगरपालिका पाठोपाठ आपल्या मतदारसंघात कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला ६० जागांपैकी २४ जागांवर विजय मिळला. भाजपला २०, शिवसेना ५, काकू नाना आघाडी ४, शिवसंग्रामला तीन, काँग्रेसला दोन आणि अपक्ष एका जागेवर विजयी झालेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडमध्ये पराभव: पंकजा मुंडे राजीनामा देणार

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पराभव झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे राजीनामा देणार आहेत. परळी विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

काही महिन्यांआधी झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले होते. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल घोषित झाल्यानंतर पंकजांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. कामे करूनदेखील जनतेने असा कौल का दिला, याचे विश्लेषण करणार असल्याचे पंकजा यांनी सांगितले. भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सोपवणार असल्याचे पंकजा मुंडेंनी जाहीर केले आहे.

परळीतील जिल्हा परिषद निवडणूक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. जिल्हा परिषदेशिवाय परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवरदेखील राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. भाजपने २०१२ साली झालेल्या परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवर विजय मिळवला होता. पण यंदा धनंजय मुंडे यांनी दोन्ही पंचायत समिती भाजपकडून खेचून आणल्या. नगरपालिका पाठोपाठ आपल्या मतदारसंघात कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला ६० जागांपैकी २४ जागांवर विजय मिळला. भाजपला २०, शिवसेना ५, काकू नाना आघाडी ४, शिवसंग्रामला तीन, काँग्रेसला दोन आणि अपक्ष एका जागेवर विजयी झालेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रॉस कनेक्शनचे धक्के

0
0



टीम मटा, औरंगाबाद

जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निकालानंतर, मंगळवारी मराठवाड्यामध्ये झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी अपेक्षित चित्र समोर आले. तर, बीड जिल्ह्यामध्ये धक्कादायक घडामोडी घडल्या. बीड तालुक्यामध्ये काकू-नाना विकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना आणि भाजप यांच्या पाठिंब्यावर शिवसंग्राम पक्षाचा उमेदवार सभापती पदावर निवडून आला. तर, गेवराई तालुक्यामध्ये माजी आमदार बदामराव पंडित आणि आमदार अमरसिंह पंडित यांनी हातमिळवणी करत, भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. लातूर जिल्ह्यामध्ये अपेक्षेप्रमाणे भाजपचे वर्चस्व कायम राहिले. तर, एकेकाळी बालेकिल्ला असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या हातामध्ये एकाही पंचायत समितीचे पद राहिलेले नाही.


बीडमध्ये शिवसंग्रामला लॉटरी; गेवराईत पंडित एकत्र
बीड : जिल्ह्यातील अकरा पंचायत समित्याचे सभापती, उपसभापतींच्या मंगळवारी झालेल्या निवडीमध्ये सात ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. सर्वांत जास्त लक्ष लागलेल्या बीड तालुक्यामध्ये क्षीरसागर काका-पुतण्यांच्या लढाईत, शिवसंग्रामला लॉटरी लागली आहे. या ठिकाणी काकू-नाना विकास आघाडीला रोखण्यासाठी शिवसंग्राम, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आले. येथील पंचायत समिती सभापतीपद शिवसंग्रामकडे, तर उपसभापतीपद शिवसेनेच्या ताब्यात गेले आहे. जिल्ह्यात दोन ठिकाणी भाजपचे, तर शिवसेना आणि शिवसंग्रामचे प्रत्येकी एक ठिकाणी सभापती निवडून आले आहेत.
जिल्ह्यात बीड आणि गेवराईमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे, या निवडींकडे सर्वांच लक्ष लागले होते. बीड पंचायत समितीत आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्याविरोधात बंड करून पुतणे संदीप क्षीरसागर यांनी काकू-नाना विकास आघाडी स्थापन केली होती. अठरा सदस्यांपैकी सहा सदस्य आघाडीचे निवडून आले होते. तर, एक अपक्ष सदस्य आघाडीबरोबर आल्याने आघाडीचे संख्याबळ सात झाले होते. दुसरीकडे शिवसंग्रामचे तीन, शिवसेनेचे तीन, राष्ट्रवादीचे दोन आणि भाजपचा एक सदस्य निवडून आला. विरोधात गेलेल्या संदीप यांना रोखण्यासाठी क्षीरसागर यांनी राजकीय मोट बांधत शिवसंग्रामचे तीन, शिवसेनेचे तीन, राष्ट्रवादीचे दोन आणि भाजपचा एक सदस्य एकत्र आणत बहुमताचा आकडा मिळविला. या समीकरणांमध्ये शिवसंग्रामच्या मनीषा कोकाटे सभापती, तर शिवसेनेचे मकरंद उबाळे उपसभापती झाले.
गेवराईमध्ये शिवसेनेत गेलेले माजी आमदार बदामराव पंडित व राष्ट्रवादी आमदार अमरसिंह पंडित यांनी एकत्र येत, भाजप आमदार लक्ष्मण पवार यांना पंचायत समितीपासून दूर ठेवले. राष्ट्रवादीने शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याने गेवराईची पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात आली आहे. धारूर पंचायत समितीत भाजप आणि राष्ट्रवादीचे सारखे सदस्य निवडून आले होते. त्यामुळे चिट्ठी काढून निवड झाली यात सभापतीपद राष्ट्रवादीकडे, उपसभापती पद भाजपच्या पारड्यात पडले आहे.


जालना तालुक्यात सेना काँग्रेसबरोबर
जालना : जालना तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसबरोबर युती करत आगामी काळात जिल्हा परिषदेच्या राजकारणाचे स्पष्टपणे संकेत दिले आहेत. अपेक्षेप्रमाणे भोकरदन, जाफ्राबाद, परतूर आणि मंठा या चार पंचायत समिती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. बदनापूर शिवसेनेने स्वबळावर जिंकली. अंबड, घनसावंगी राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या आहेत.
जालना पंचायत समितीच्या सभापती पदावर शिवसेनेचे पांडुरंग डोंगरे आणि उपसभापती म्हणून काँग्रेसच्या द्वारकाबाई खरात विजयी झाल्या आहेत. बदनापूर पंचायत समितीच्या सभापतीपदावर शिवसेनेच्या अश्विनी मदन व उपसभापती पदावर श्रीराम कान्हेरे हे विजयी झाले. भोकरदन पंचायत समितीच्या सभापती पदावर भाजपचे विलासराव आडगावकर आणि उपसभापती पदावर भाजपचे गजानन नागवे यांनी विजय मिळविला. जाफ्राबाद मध्ये भाजपचे साहेबराव कानडजे सभापती झाले तर वैशाली मुळे या उपसभापती झाल्या आहेत. परतुरात भाजपच्या शीतल तनपुरे सभापती व भाजपाचे प्रदीप ढवळे उपसभापती झाले आहेत. घनसावंगी येथे राष्ट्रवादीच्या मंजुषा कोल्हे या सभापती व राष्ट्रवादीच्या आशाताई उगले या उपसभापती झाल्या आहेत. अंबडच्या सभापतीपदावर राष्ट्रवादीच्या सरला लहाणे आणि उपसभापती किशोर नरवडे विजयी झाले आहेत.
‘संपूर्ण देशभरात काँग्रेसचे पानीपत होत असताना जालन्यात शिवसेना काँग्रेस सोबत गेली. ही अत्यंत अभद्र युती झाली आहे,’ अशी प्रतिक्रिया भाजपचे उपाध्यक्ष भास्करराव दानवे यांनी दिली. तर, आमच्याकडे चर्चेसाठी कोणी आलेच नाहीत, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे जिल्हा परिषदेच्या राजकारणात १९ सदस्य निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे आमची दार चर्चा करण्यासाठी सर्वांना उघडी आहेत, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी दिली.


उस्मानाबाद जिल्ह्याच्या कारभारातून सेना हद्दपार
उस्मानाबाद : जिल्ह्यातील आठ पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी आज निवड झाली. यामध्ये उस्मानाबादसह परांडा, कळंब, भूम व वाशी या पाच ठिकाणच्या पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. तर तुळजापूर, लोहारा आणि उमरगा या ठिकाणी सभापतीपदासाठी काँग्रेसने बाजी मारली. या आठही पंचायत समितीमध्ये सभापती व उपसभापतदीपदी सेनेला स्थान मिळालेले नाही. उमरगा पंचायत समितीमध्ये भाजपचे युवराज जाधव हे उपसभापती म्हणून निवडून आले आहेत. पंचायत समितीच्या कारभारातून सेना जिल्ह्यातून हद्दपार झाली आहे. यंदा सेनेची सर्व सुत्रे ही विधान परिषद सदस्य तानाजी सावंत यांच्या हाती होती. मात्र, त्यांना अपयश आले.
आता २१ मार्च रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवडीकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.


नांदेडवर काँग्रेसचे वर्चस्व
नांदेड : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये नांदेडमध्ये काँग्रेसचे, तर परभणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले होते. त्याप्रमाणे पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापतीपदाच्या निवडींमध्येही हेच चित्र दिसून आले.
नांदेड जिल्ह्यामध्ये हिमायतनगर, हदगाव, अर्धापूर, नांदेड, मुदखेड, भोकर, उमरी, नायगाव, देगलूर या तालुक्यांच्या पंचायत समित्यांच्या सभापतीपदी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. उमरीमध्ये राष्ट्रवादीकडे तर, किनवट, धर्माबाद, बिलोली, मुखेड तालुक्यांमध्ये भाजप, लोह्यामध्ये शिवसेना आणि कंधारमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे सदस्य सभापती म्हणून निवडले गेले आहेत. माहूरमध्ये सभापती पदाचा अर्ज अवैध ठरला.
उपसभापतिपदाच्या निवडणुकीत माहूर, हिमायतनगर, नांदेड, मुदखेड, देगलूर या पाच तालुक्यांच्या पंचायत समितीच्या उपसभापतीपदी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. उमरी, धर्माबाद या तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी, किनवट, हादगाव, लोहा या तालुक्यांमध्ये शिवसेना, तर बिलोलीमध्ये भाजपचा उमेदवार उपसभापती झाला आहे.


परभणीत पाच समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस
परभणी : जिल्हा परिषदेप्रमाणेचे जिल्ह्यातील नऊ पैकी पाच पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तसेच पाच ठिकाणी उपसभापती पदेही पटकावली आहेत. याशिवाय, काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसेना आणि घनदाट मित्रमंडळाने प्रत्येकी एक पंचायत समितीत सभापती निवडून आणला. याखेरीज परभणी पंचायत समितीमध्ये काँग्रेसला, तर पुर्णेत राष्ट्रवादीला पाठींबा देवून दोन्ही ठिकाणी भाजपने उपसभापती पद मिळवले.
जिल्हाभरातील नऊ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांची निवड प्रक्रिया मंगळवारी पार पडली. अनेक राजकीय खलबत्ते होऊन समीकरणे निश्चित झाली.

लातूर जिल्ह्यात भाजपच वरचढ
लातूर : काँग्रेस बालेकिल्ला असणाऱ्या लातूर जिल्ह्याला खिंडार पाडल्यानंतर, पंचायत समिती सभापती पदाच्या निवडींमध्येही अपेक्षेप्रमाणे भाजपचेच वर्चस्व राहिले. जिल्ह्यातील दहापैकी सात तालुक्यांमधील समित्या भाजपकडे, तर तीन तालुक्यांत काँग्रेसची सत्ता आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंप लुटण्याचा शिऊरमध्ये प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
तालुक्यातील शिऊर बंगला येथील राम आटोमोबाइल्स पेट्रोल पंपावर मंगळवारी पहाटे चार अज्ञात दरोडेखोरांनी दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पंपावरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका स्कॉर्पियोमधून (एम एच १७-११) २० ते २५ वयोगटातील अज्ञात सशस्त्र दरोडेखोर शिऊर बंगला येथील राम आटोमोबाइल्स पेट्रोल पंपावर पहाटे आले. यावेळी पंपावरील कार्यरत असलेल्या जगन्नाथ शिवाजी जाधव (वय २८) याच्यावर चाकू रोखून तुझ्याकडील रक्कम आमच्याकडे दे, असे म्हणत धाक दाख‍वून लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, जगन्नाथ याने त्यास प्रतिकार करून आरडाओरड केली. यावेळी झालेल्या झटापटीत जगन्नाथ यांच्या हाताला किरकोळ जखम झाली. त्यानंतर पेट्रोल पंपाशेजारील काही जण आरडाओरड करत धावत आल्याने दरोडेखोरांनी धूम ठोकली.
या घटनेची माहिती गस्तीवर असलेल्या शिऊर पोलिस ठाण्याचे सपोनि धंनजय फराटे, हेडकॉन्स्टेबल रोहिदास तांदळे, रज्जाक शेख, चालक नेताजी जाधव, ए. के. शेख, धनेधर यांना मिळताच त्यांनी दरोडेखोरांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. दरोडेखोर वैजापूर मार्गाने निघाल्याने वैजापूर पोलिसांना देखील कळवून बोलावण्यात आले. परंतु, सुसाट असलेल्या दरोडेखोरांच्या स्कॉर्पियोने खंडाळ्याहून जानेफळमार्गे वडजीकडे पळ काढला. दरम्यान, खड्डे असलेल्या रस्त्यामुळे पोलिसांना त्यांना गाठता आले नाही, अशी चर्चा परिसरात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोयगावमध्ये काँग्रेस, शिवसेना आघाडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सोयगाव पंचायत समितीच्या सभापतिपदी काँग्रेसचे धरमसिंग दारासिंग चव्हाण व उपसभापतिपदी शिवसेनेचे साहेबराव जंगलू गायकवाड हे विजयी झाले. या दोघांनी आपल्या भाजपच्या प्रतिस्पर्ध्यांचा प्रत्येकी दोन मतांनी पराभव केला. पंचायत समितीमध्ये पदाधिकारी निवडीसाठी काँग्रेस व शिवसेनेची आघाडी झाली.
सोयगाव येथील बचत भवन सभागृहात मंगळवारी अध्यासी अधिकारी एस. पी. सावरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. दुपारी दोन वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. सभापतिपदासाठी काँग्रेसचे धरमसिंग चव्हाण व भाजपचे संजीवन सोनवणे यांनी अर्ज सादर केले. उपसभपतिपदाकरिता शिवसेनेचे साहेबराव गायकवाड व भाजपच्या लताबाई विकास राठोड यांनी अर्ज सादर केले. सर्वप्रथम सभापतिपदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसच्या चव्हाण यांना ४ व भाजपचे सोनवणे यांना २ मते मिळाली. उपसभापतिपदासाठी याच पद्धतीच्या प्रक्रियेत शिवसेनेचे गायकवाड यांना ४, तर भाजपच्या राठोड यांना २ मते मिळाली. चव्हाण व गायकवाड यांची निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी सावरगावकर यांनी घोषित केले.
या सभेला उमेदवारांसह रस्तुलबी पठाण, प्रतिभा जाधव या पंचायत समिती सदस्यांची उपस्थिती होती. निवडणूक प्रक्रियते गटविकास अधिकारी अंबादास गायके, तहसीलदार संतोष बनकर आदींनी सहकार्य केले.

...तर, समान मते
पंचायत समितीमध्ये काँग्रेस ३, भाजप २, शिवसेना १, असे बलाबल होते. पदाधिकारी निवडणुकीत काँग्रेस व शिवसेनेची आघाडी झाली. त्यामुळे भाजपला पद मिळवता आले नाही. शिवसेना-भाजप युती झाली, असती तर दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाली असती. त्यानंतर टॉस करावा लागला असता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images