Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अॅपद्वारे फसवणूक; जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जनधन योजनेअंतर्गत कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून युपीआय अ‍ॅपद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेल्या तिसऱ्या आरोपीचा नियमित जामीन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी. अत्तार यांनी फेटाळला.
याप्रकरणी संकेत अंकुश झांबरे (रा. जाधववाडी, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, आरोपी विजय गोवर्धन जाधव याने फिर्यादीला जनधन योजनेअंतर्गत दहा हजार रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीच्या मोबाइलवर फिर्यादीच्या नकळत युपीआय अ‍ॅप डाउनलोड केले होते. त्यानंतर युपीआय अ‍ॅपद्वारे फिर्यादीच्या बँक खात्यावरून परस्पर एक लाख ८० हजारांची रक्कम वळती केली होती. १७ फेब्रुवारी २०१७ रोजी फिर्यादीचे एचडीएफसी बँकेचे खाते ब्लॉक झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली होती, तर आरोपी विजय जाधव याला पोलिसांनी ८ मार्च रोजी अटक केली होती. कोर्टाने त्याला १४ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता, कोर्टाच्या आदेशाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. दरम्यान, आरोपी जाधव याने नियमीत जामिनासाठी अर्ज दाखल केला असता, कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भिंतीवर शायरी लिहून तरुणाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी वाळूज
वाळूज येथील धनगर गल्लीत राहणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन अात्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात अाकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या खोलीतील भिंतीवर शायरी लिहलेली आढळली.
गणेश नामदेव अरगडे, असे मृताचे नाव असून तो जालना जिल्हयातील विरेगाव येथे पत्नी अश्विनी व एका मुलीसह राहत होता. तो अधून मधून वाळूज येथील घरी येत होता. नेहमीप्रमाणे मंगळवारी घरी आल्यानंतर तो झोपी गेला होता. परंतु, तो सकाळपासून बाहेर न आल्याने शेजारी राहणाऱ्या वडिलांनी खिडकीतून डोकावून पाहिले, तेव्हा तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. या घटनेची माहिती तत्काळ वाळूज पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी नागरिकांच्या मतदतीने त्याला उतरवून घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

भिंतीवर मांडले दुःख
दार बंद असल्याने पोलिसांनी छतावरील पत्रे काढून प्रवेश केला तेव्हा त्यांना भिंतीवर शेर-शायरी लिहलेली आढळली. ‘आदमी सारी दुनियासे लढ सकता है, पर औरतसे नहीं, हम तुम्हारे हैं सनम, माझी जागा माझ्या बायकोला द्या, मुकद्दर से ज्यादा या वक्तसे पहेले ना मिला ना मिलेगा,’ असे चारही भिंतीवर लिहलेले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामूहिक सोहळ्यात सहा जोडपी बंधनात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
संत तुकाराम बीजनिमित्त मावसाळा येथे मंगळवारी सकल मराठा समाजातर्फे सामूहिक विवाह सोहळा पार पडला. हा सोहळा जय बाबाजी भक्त परिवाराच्या प्रेरणेने गणेश वडकर यांनी स्वखर्चातून आयोजित केला. या सोहळ्यात सहा जोडप्यांनी लग्नगाठ बांधली.
या सोहळ्यात आयोजकांतर्फे वर-वधुंना कपडे, मंगळसूत्र देण्यात आले. हा सोहळा संत तुकाराम महाराज मंदिर पानमळा येथे पार पडला. यावेळी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत भराड, राजेंद्र पवार, माणिकराव शिंदे, हभप गणगे महाराज, पांडुंरंग मांडकीकर, ज्ञानेश्वर मातकर, अप्पासाहेब कुठेकर, गणपत म्हस्के, सुनील औटे, रमेश केरे, शाहु चव्हाण, सुभाष धोत्रे, पंढरीनाथ ठोंबरे, अशोक दामले, लक्ष्मीकांत वाडकर, रवी बोडखे, गजानन वडकर, कृष्णा वडकर, नारायण वडकर आदींची उपस्थिती होती. सामूहिक विवाह सोहळ्यानिमित्त भजन स्पर्धा घेण्यात आली. हभप गनगे महाराज यांचे कीर्तन व प्रदीप सांळुखे यांचे व्याख्यान आयोजित केले होते.

यांचा झाला विवाह
कन्नड तालुक्यातील भारंबा तांडा येथील वर कैलास नागणे, गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन जवळील जमंदवाडी येथील वधू भारती कासोदे, औरंगाबाद परिसरात सातारा येथील वर प्रवीण साबळे, सातारा येथील वधू सोनाली घोडके, खुलताबाद तालुक्यातील मावसाळा येथील वर ताराचंद सोनवणे, गंगापूर तालुक्यातील एकलहेरा येथील वधू मंगल मोरे, सोयगाव तालुक्यातील माळेगाव येथील वर अनिल खाडे, औरंगाबाद तालुक्यातील गारखेडा येथील वधू संगीता माळी, खुलताबाद शहरातील वर ज्ञानेश्वर फुलारे, कन्नड तालुक्यातील निमडोंगरी येथील वधू जयश्री खंडागळे हे विवाहबद्ध झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोंदुबाबाचा महिलेवर बिडकीनमध्ये बलात्कार

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद
अंगात देवी येत असल्याचे नाटक करून मानसिक उपचाराच्या बहाण्याने एका भोंदूबाबाने एक महिलेला जाळ्यात ओढले. तिच्यावर बलात्कार केल्याची घटना बिडकीन येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात या भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबाला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीचे २०१३ मध्ये निधन झालेले आहे. ती बिडकीन पोलिस स्टेशन हद्दीत आई-वडिलांसह राहते. भोंदूगिरी करणाऱ्या नारायण बाबुदास वैष्ण उर्फ वैष्णव महाराज (वय ४५, रा.बिडकीन) याने या महिलेसोबत ओळख वाढवली. तिच्या असहायतेचा गैरफायदा घेतला. ही महिला आजारी पडत असल्याने बाबाच्या संपर्कात आली. तुझ्यावर तुळजाभवानी देवीची हवा आहे, ती काढावी लागेल, असे सांगितले. बाबाने या महिलेला लिंबू, टाचण्या, खिळे, गुलाल, नारळ आणण्यास सांगितले. त्यानंतर कुंकू लावून बसवून फटके मारत असे. चामडे आणून मंत्रावलेले पाणी पिण्यास दिले, असे या फिर्यादीत म्हटले आहे. या बाबाच्या भूलथापांना बळी पडल्यानंतर बाबाने महिलेवर ऑगस्ट २०१३ ते ऑगस्ट २०१५ या काळात अत्याचार केले, अशी तक्रार आहे.
नारायण वैष्णव उर्फ महाराज याच्याविरुद्ध बलात्कार व शारीरिक-मानसिक त्रास देणे, महाराष्ट्र जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
याप्रकरणी पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, पैठणचे उपअधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनपर पोलिस निरीक्षक सिद्धार्थ गाडे हे अधिक तपास करीत आहेत.

पवित्र आत्म्याशी संबंध ठेव
तुझ्या शरिरातील दुःख काढायचे असेल, तर तुला माझ्या पवित्र आत्म्याशी शारीरिक संबंध ठेवावे लागतील, मी तुझ्याची लग्न करेल, असे सांगून बाबाने महिलेवर भुरळ पाडली.

डॉक्टरवर डोळा
या भोंदूबाबाने पीडित महिलेच्या डॉक्टर असलेल्या लहान बहिणीला भुलवले आहे. कोल्हापूरच्या देवीची हवा आहे, असे सांगून डॉक्टरला मंतरलेले पाणी देत असे. तिला फिरण्यास घेऊन जात असे. त्यामुळे फिर्यादी महिलेने बहिणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला शिवाय माझ्या बहिणीसोबत बोलू नको, असे बाबाला बजावले. डॉक्टर बहिणीला घेऊन हा बाबा चार महिन्यापासून त्याच्या घरी घेऊन गेला आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेळापत्रकावरून ‘परीक्षा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षा गुरुवारपासून सुरू होत आहे. ऐच्छिक विषय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन पेपरमध्ये १५ मिनिटांचा ब्रेक दिला जाणार आहे. त्यामुळे सव्वतीन तासाचा पेपर असणार आहे. हा बदल परीक्षेत गोंधळ निर्माण करणारे ठरतील, असा सूर प्राध्यापकांचा आहे. बीएस्सी आणि बीए अभ्यासक्रमांनाच पर्याय विषय निवडण्याची संधी असते.
विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना गुरुवारपासून सुरुवात होत आहे. यंदा ऐच्छिक विषयांच्या दोन पेपरमध्ये १५ मिनिटांचा जादा कालावधी परीक्षार्थींना देण्यात आला आहे. पूर्वी पदवी अभ्यासक्रमात पेपर-१, पेपर-२ अशा विषयांची परीक्षा सलग तीन तास होत असे. आता त्यात यंदा १५ मिनिटांचा ब्रेक असेल. हा वेळ पुढे वाढविण्यात आला आहे. १० ते १ वेळेत होणारा पेपर आता सव्वा वाजता संपेल. दुपारी २ ते ५ या कालावधीतील पेपर सव्वापाच वाजता सुटणार आहे. एखादा विद्यार्थी एकाच ऐच्छिक विषयात अनुत्तीर्ण झाला असेल, तर त्याला तेवढाच पेपर देऊन जाता येणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात येत आहे. अचानकपणे विद्यापीठाने केलेला हा बदल गोंधळाचा ठरेल, असे प्राध्यापक, प्राचार्यांना वाटते आहे. मधल्या १५ मिनिटांच्या वेळेत प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका देण्यासाठीचा अवधी असेल, असे विद्यापीठाचे म्हणणे आहे. या वेळेत एखादा विद्यार्थी उत्तरपत्रिका घेऊन बाहेर पडला, तर गोंधळ निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

ऐच्छिक विषयाच्या दोन पेपरमध्ये १५ मिनिटांचा कालावधी देण्याची मागणी विद्यार्थ्यांची होती. एखाद्या विद्यार्थ्याचा एक विषय निघाला असेल आणि एक राहिला असेल, तर त्याने अधिकचा वेळ वर्गात बसून राहण्याची काय गरज; तसेच हा निर्णय आधिच घेतला गेलेला आहे, वेळापत्रकातही त्याबाबत स्पष्ट करण्यात आलेले आहे.
- डॉ. दिगंबर नेटके, परीक्षा नियंत्रक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

अशा प्रकारचा बदल प्राध्यापकांना माहित नाही. अचानकपणे बदल सांगितला जातो. अशावेळी त्याच्या अंमलबजावणीचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. मधल्या वेळेत काही गोंधळ झाला, तर त्याला कोण जबाबदार राहणार हा प्रश्न आहे.
- डॉ. संजय शिंदे, अध्यक्ष, जोशाबा शिक्षक संघटना

- एकूण परीक्षार्थी ३,१८,४४५
- परीक्षा केंद्र २४६
- मूल्यांकन केंद्र १७
- दक्षता पथके १७
- पदव्युत्तरचेे विद्यार्थी ६६,०००
- पदव्युत्तर परीक्षा केंद्र ९५

पदवीचे विद्यार्थी
अभ्यासक्र....विद्यार्थी
बीए............१,१८,७६१
बीएस्सी.......१,१६,६८२
बीकॉम........५८,२६०
बीसीएस.......१६८७४
बीबीए..........१९५४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अटकेच्या भितीने दोन पोलिस कर्मचारी पसार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बनावट अपघात विमा घोटाळ्यात सहभाग असल्याचा संशय असलेले पोलिस कर्मचारी शेख मुश्ताक व आर. के. नरवडे दोघे पसार झाले आहेत. तसेच या गुन्ह्यातील तक्रारदार व आरोपी सतीश औचार याचा जामीनअर्ज कोर्टाने फेटाळल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.
अपघात झाला नसताना बनावट कागदपत्रे सादर करून एचडीएफसी विमा कंपनीची लाखो रुपयांची फसवणूक करण्याचे प्रकरण चर्चेत आहे. याप्रकरणी सायबर सेलने एका टोळीला अटक केली आहे. पोलिस आयुक्तांना मिळालेल्या माहितीमुळे हा प्रकार ३ फेब्रुवारी रोजी उघडकीस आला आहे. पोलिसांनी डॉ. महेश मोहरीर, जमादार आर. आर. शेख व विमा एजंट शेख लतीफ शेख अब्दुल यांना अटक केली होती. चौकशीमध्ये तक्रारदार सतीश औचार याचा देखील गुन्ह्यात समावेश असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याचा देखील आरोपीमध्ये समावेश करण्यात आला आहे. वेदांतनगर पोलिसांनी तपासात दिरंगाई केल्याने हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासामध्ये छावणी पोलिस ठाण्यातील जमादार शेख मुश्ताक व पुंडलिकनगर पोलिस चौकीत कार्यरत असलेला आर. डी. नरवडे यांनी देखील बनावट पंचनामे सादर करून गुन्ह्यात भाग घेतला असल्याचे समोर आले. पोलिस जमादार शेख मुश्ताक व नरवडेला तपास अधिकारी उपनिरीक्षक सुभाष खंडागळे यांनी त्यांची बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे. मात्र, मुश्ताक व नरवडे पसार झाले आहेत. पोलिसांनी त्यांच्या घरी शोध घेतला असता ते आढळून आले नाहीत. मुश्ताक व नरवडे हे अटकेच्या भितीने पसार झाले असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मल्ल्यांना दिलेली जमीन परत घ्या

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
विजय मल्ल्या यांच्या मद्य कंपनीला १९७७मध्ये नाममात्र दराने ३० वर्षांसाठी भाडेपट्याने दिलेली ब्रिजवाडी येथील शासकीय जमीन परत घेण्यासाठी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत राज्य शासन, जिल्हाधिकारी आणि विजय मल्या यांच्या मालकीच्या महाराष्ट्र डिस्टिलरी व युनायटेड स्पिरीट डिस्टीलरी लि. आणि विद्यमान युनायटेड ब्रेव्हरीज (यूबी ग्रुप) या प्रतिवादींना सशर्त नोटीस बजावण्याचा आदेश न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. संगीतराव पाटील यांनी दिले आहेत.
या प्रकरणात याचिकाकर्त्यांचा थेट संबंध नाही. त्यांनी याचिकेच्या खर्चापोटी (कॉस्ट) १७ मार्च २०१७पूर्वी ३० हजार रुपये जमा करावेत. त्यानंतरच प्रतिवाद्यांना नोटीसा बजावाव्यात. याचिकाकर्त्यांनी निर्धारित वेळेत पैसे जमा केले नाही, तर आपोआप याचिका फेटाळण्यात येईल, असे खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात विष्णू जाधव व इतरांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका सादर केली आहे. याप्रकरणात याचिकाकर्त्यांतर्फे चंद्रकांत ठोंबरे, एस. सी. ठोंबरे आणि किरण ठोंबरे, तर शासनातर्फे सहायक सरकारी वकील अविनाश बोरुळकर यांनी बाजू मांडली.

भाडेपट्ट्याची मुदत संपली
राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने २३ जून १९७७ रोजी ब्रिजवाडी येथील गट नंबर ३०मधील २५ एकर जमीन ४३६४ रुपये ५० पैसे प्रतीवर्ष दराने ३० वर्षांसाठी भाडेपट्यावर (लीजवर) महाराष्ट्र डिस्टिलरी व युनायटेड स्पिरीट डिस्टिलरी लि. यांना दिली होती. भाडेपट्ट्याची मुदत संपली, तरी कंपनीने भाडेपट्ट्याची रक्कम भरली नाही किंवा भाडेपट्ट्याचे नूतनीकरण केले नाही. महापालिका हद्दीतील औद्योगिक वसाहतींमधील या जमिनीचा भाडेपट्टा रद्द करून शासनाने ती जमीन परत घ्यावी. एमआयडीसी सुशिक्षीत बेरोजगारांना जमीन देत नाही. शासनाच्या जमिनीवर अतिक्रमणे होत आहेत. त्याची शासन, एमआयडीसी आणि महापालिका दखल घेत नाही, असे जाधव यांनी याचिकेत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तोंडचा घास हिरावून नेला’

$
0
0



टीम मटा, औरंगाबाद

चार वर्षांच्या दुष्काळानंतर, यंदा चांगल्या रब्बी हंगामाची अपेक्षा असणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा या अवकाळी पावसामुळे स्वप्नभंग झाला. अगदी तोंडचा आलेला घास हिरावल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
यंदा चांगल्या पावसाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या उत्पादनामुळे दुष्काळातील नुकसान काही प्रमाणात कमी होण्याची आशा होती. मात्र, हाताशी आलेले पिक हातचे गेल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अनेक ठिकाणी ज्वारी काढणीला आली होती. मात्र, वादळी वार्यामुळे ज्वारीचे पिक आडवे झाले आहे. येणारी ज्वारी देखील काळवंडण्याची शक्यता आहे. गव्हाच्या पिकालाही याचा फटका बसला असून, आंब्याच्या झाडाचा फुलोरा तसेच बारीक कैर्या गळून पडल्या आहेत. पपईची झाडे आडवी झाली असून मोसंबी, संत्री गळून पडली आहेत. एकूणच शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे.
लातूर तालुक्यातील भिसे वाघोली, मुरुड परिसरात पाऊस आणि गारामुळे रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेले गव्हाचे पिक जागच्या जागीच आडवे झाले. काढून ठेवलेल्या हरभऱ्याच्या ठिकाणी पाणी साठल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास निसर्गाने हिरावून घेतल्याची प्रतिक्रिया सत्तार पटेल यांनी व्यक्त केली.
गहू, हरभरा या पिकांबरोबरच अनेक शेतकऱ्यांनी फळ बागा तयार केल्या होत्या. या बागांसाठी शेतकऱ्यांनी गुंतवणूकही केली होती. यातून चांगल्या उत्पादनाची अपेक्षा असतानाच, या पावसामुळे नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पावसाच्या भीतीने गहू काढणीची घाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
मागील तीन वर्षे झालेली गारपीट व हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे तालुक्यात गहू सोंगणी व मळणीला वेग आला आहे. मजुरांची कमतरता असल्याने बड्या शेतकऱ्यांप्रमाणे सर्व शेतकऱ्यांनी हार्वेस्टरच्या साह्याने गहू मळणी सुरू केली आहे. पण, यामुळे जनावारांसाठी वैरण म्हणून उपयोगात येणारे भूस मिळणार नाही. त्यामुळे येत्या पावसाळ्यात पाऊस लांबल्यास जनावारांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
सिल्लोड तालुक्यात या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बीचा पेरा वाढला आहे. तालुक्यात जवळपास २० हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी करण्यात आलेली आहे. मुबलक पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी हमखास गव्हाची लागवड केली आहे. कमी पाणी असलेल्या शेतकऱ्यांनी कुटुंबासाठी आवश्यक तेवढ्या गहू पेरणीला प्राधान्य दिले. सिल्लोड तालुक्यात कमी अधिक प्रमाणात तीन वर्षे मार्चमध्ये गारपीट व जोरदार पाऊस झाला. या नैसर्गिक संकटात पीक भूईसपाट झाले होते. त्यामुळे यावर्षी गारपिटीपासून वाचण्यासाठी गव्हाचे पीक काढून घरी नेण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.
शेतकरी दरवर्षी आळीपाळीने गव्हाची सोंगणी करून एकमेकांना मदत करतात. पण, यंदा पावसाच्या शक्यतेने शेतकऱ्यांनी गहू सोंगणी व मळणीकरिता हार्वेस्टरला प्राधान्य दिले. यावर्षी गव्हाचा पेरा जास्त असल्याने पंजाब व हरियाणा राज्यातून मोठ्या प्रमाणात हार्वेस्टर आले आहेत. सर्वांकडून मागणी असल्याने हार्वेस्टर यंत्राचे दर वाढले आहेत. हार्वेस्टर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या मागे फिरावे लागत आहे. उपनेरच्या साह्याने मळणी केल्यानतर जनावरांना वैरण म्हणू गव्हाची भूस मिळते. हार्वेस्टर शेतात उभा असलेला गहूच सोंगत व मळत असल्याने शेतकऱ्यांना भूस मिळणार नाही.

शेतमजूर वंचित
शेतमजूर गव्हाच्या मोबदल्यात सोंगणी करतात. यंदा शेतकरी हार्वेस्टरद्वारे सोंगणी करत असल्याने त्यांना गहू मिळणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एडीसीए’ निवडणुकीला स्टे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या २६ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीला औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. बी. शुक्रे यांनी स्थगिती दिली. हे प्रकरण सहधर्मदाय आयुक्त यांच्याकडे प्रलंबित असताना, १९८८च्या सहसचिवांना कुठलाच अधिकार नसताना निवडणूक जाहीर करण्यात आली होती. या विरोधात खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर तीन आठवड्यांनंतर सुनावणी अपेक्षीत आहे.
औरंगाबाद जिल्हा क्रिकेट असोशिएशनचे आजीव सदस्य विशाल पांडे यांनी ही याचिका दाखल केली. याचिकेत, सहधर्मदाय आयुक्तांनी ३१ ऑगस्ट २०१६ रोजी दिलेल्या निर्णयानुसार, ४८ आजीव सदस्यांना अवैध ठरविण्यात आले होते. त्याचबरोबर अर्जदार व सचिव सचिन मुळे, आक्षेपकर्ते वसंतराव वर्मा, सुहास कुलकर्णी आणि मोहन बोरा यांनाही अवैध ठरविण्यात आले होते.
या निर्णयाविरोधात सहधर्मदाय आयुक्तांकडे संघटनेच्या ४८ आजीव सदस्यांनी अपील दाखल केले होते. ते प्रलंबित असताना सर्व सदस्यांच्या सहमतीने सहधर्मदाय आयुक्तांनी अॅडव्हॉक समिती स्थापन करण्यात आली होती. लोढा समितीच्या निर्देशानुसार संघटनेच्या घटना आणि नियमांमध्ये सुधारणा करणे समितीकडून अपेक्षित आहे, मात्र कार्यवाही सहधर्मदाय आयुक्तांकडे प्रलंबित असताना १९८८मध्ये सहसचिव असलेले किरण जोशी यांनी संघटनेची निवडणूक जाहीर केली. या नाराजीपोटी ही याचिका दाखल करण्यात आली.
खंडपीठाने सुनावणीनंतर संघटनेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीला स्थगिती देत प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. पी. एम. शहा यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. सचिन देशमुख आणि अॅड. अमय सबनीस यांनी सहकार्य केले. हस्तक्षेपकांतर्फे अॅड. प्रभाकर जोशी यांनी बाजू मांडली.

घाईघाईने निवडणूक घेण्याचा प्रयत्न
याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. प्रवीण शहा, अॅड. सचिन देशमुख यांनी खंडपीठाच्या निर्दशनास आणून दिले, की १९८८च्या सहसचिवांना कुठलाच अधिकार नसताना घाईघाईने निवडणूक घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सदस्यांचे अपील प्रलंबित असताना असा प्रयत्न करण्याचा अधिकारी त्यांना नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवजयंती उत्साहात साजरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छत्रपती शिवाजी महाराजांची बुधवारी तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. शिवसेना व भारतीय जनता पक्षातर्फे दोन वेगवेगळ्या मिरवणुका संस्थान गणपतीपासून काढण्यात आल्या. शहरातील विविध भागात देखील शिवसेना, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवजयंती साजरी केली.
संस्थान गणपती येथून सायंकाळी सात वाजता मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. संस्थान गणपतीची आरती केल्यानंतर ही मिरवणूक सुरू झाली. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे, नंदकुमार घोडेले, राजू वैद्य, राजेंद्र जंजाळ, उपमहापौर स्मिता घोगरे, नगरसेविका यशश्री बाखरिया, शिवजयंती महोत्सव समितीचे यंदाचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, सचिन खैरे, लक्ष्मीनारायण बाखरिया, गोपाळ कुलकर्णी, नारायण कानकाटे, महिला आघाडीच्या रंजना कुलकर्णी, प्रतिभा जगताप, संध्या जाधव, राजश्री पोफळे यांच्यासह म‌हिलांची उपस्थिती होती. बैलगाडीच्या रथात असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीत असलेल्या बँड पथकाने देशभक्तीपर आणि धार्मिक गिते सादर करून रंगत आणली.

आकर्षक देखावा
बाल शिवराय स्वराज्य स्थापनेची शपथ घेत असल्याचा सजीव देखावा महिला आघाडीने सादर केला. महादेवाच्या पिंडीवर रक्ताने अभिषेक करतानाचा हा आकर्षक देखावा मिरवणुकीचे आकर्षण ठरला. त्याचबरोबर विश्वासनगर येथील उपविभाग प्रमुख शेख रब्बानी यांनी आणलेल्या वाहनावर शिवरायांच्या मंत्रिमंडळात मुस्लिम समाजाला कसे महत्त्वाचे स्थान होते, याचा फलकाद्वारे देखावा सादर करण्यात आला. बजाज अॅटो कंपनीच्या कामगारांनी देखील मिरवणुकीत सहभाग घेतला. झाडे लावा झाडे वाचवाचा, असा संदेश त्यांनी देखाव्याद्वारे दिला.

विद्यार्थी सेनेची वाहन फेरी
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे बुधवारी सकाळी वाहन फेरीचे आयोजन करण्यात आले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फेरीला सुरुवात करण्यात आली. यावेळी फेरीमध्ये खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, बाळासाहेब थोरात, राजू वैद्य आदी सहभागी झाले होते. भारतीय विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र निमंत्रक, नगरसेवक राजू जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या फेरीसाठी नितीन मेघावाले, सागर पाटील, हनुमान शिंदे, संदीप लिंगायत यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले.

भाजपची स्वतंत्र मिरवणूक
शिवसेनेचा संस्थान गणपती येथील कार्यक्रम आटोपून मिरवणूक सुरू झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. भाजपच्या वॉर्ड पद‌ाधिकाऱ्यांच्या वॉर्डांतील मंडळांची वाहने मिरवणुकीत सहभागी होती. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, नगरसेवक गजानन बारवाल, जगदीश सिद्ध, कचरू घोडके आदींच्या प्रमुख उपस्थितीत या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. शिवसेना व भाजपच्या मिरवणुकांचा राजाबाजार, सराफा, सिटीचौक, मछली खडक, गुलमंडी, पैठणगेटमार्गे क्रांतिचौक येथे समारोप करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळी तडाख्याचे ६ बळी

$
0
0

टीम मटा, औरंगाबाद
मराठवाड्याला बुधवारी अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. या तडाख्यात बीड जिल्ह्यामध्ये वीज पडून पाच जणांचा, तर लातूर जिल्ह्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आणि १३ जण जखमी झाले. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, फळबागांनाही फटका बसला आहे. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत गारपीटही झाली. परभणी जिल्ह्यातही पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.
लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा, निलंगा या तीन तालुक्यांना सकाळपासून गाराच्या पावसाने झोडपले. पहाटे आणि सकाळी हलक्या स्वरुपाचा पाऊस होता. दुपारी बारानंतर सर्वत्र गारांसह पावसाने झोडपून काढले. लातूर शहरातही सरी बरसल्या. दुपारनंतर पावसाची रिमझिम सुरूच होती. या अवकाळी पावसाने लातूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ नुकसान केले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद, कळंब तालुक्यांमध्ये गारा पडल्या. उस्मानाबाद तालुक्यातील मेंढा, कळंब तालुक्यातील सरमकुंडी, पारगावा परिसरामध्ये या पावसामुळे नुकसान झाले. परभणी जिल्ह्यामध्येही पावसाने मोठे नुकसान झाले आहे.
या पावसाचा सर्वाधिक फटका बीड जिल्ह्याला बसला. वीज पडल्यामुळे परळी तालुक्यात दोन, केजमध्ये दोन आणि आष्टीत एकाचा मृत्यू झाला व सात जण जखमी झाले. अनेक मोठे वृक्ष उन्मळून पडले, तर अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली. अवकाळी पावसाने अश्रुबा धिंगाने, (येवता), एकनाथ मुंडे (टोकवाडी), शिवाजी गायकवाड, अश्विनी गायकवाड, सुनिता कुंभार (सर्व, कौठळी), भास्कर सलगर (वाघाळा), शाहुराव पवार, शारदा पवार (दोघे रा. कावळ्याची वाडी, ता. परळी), शेख गप्फार शेख, उस्मान कासम, सखुबाई कल्याण पारेकर, सखुबाई मायदळे, राम उत्तम सोनवणे (सर्व रा. दिंद्रुड, ता. माजलगाव) हे जखमी झाले. परभणी जिल्ह्यालाही गारप‌िटीचा तडाख बसला. सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागात बुधवारी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची झोप उडविली.

दक्षतेचा इशारा
नांदेड : मराठवाड्यासह विदर्भात येत्या ४८ तासांत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर, दक्षता घेण्याचे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती नियंत्रण कक्षाने केले आहे. भारतीय हवामान खात्याच्या या इशाऱ्यात येत्या ४८ तासांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

मृतांची नावे
ओंकार सटवा निर्मळ (११, येवता, ता. केज), आश्रुबा किसनराव गायकवाड (५७), सुशीला तुळशीराम कुंभार (४०, रा. कौठळी), सीमा गोरख तांदळे (२५, रा. बीड सांगवी) यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील आणखी एकाचा आणि लातूर जिल्ह्यात एका १९ वर्षांचा मुलाचा मृत्यू झाला आहे.

बीड, लातूर जिल्ह्यांत झालेला पाऊस व गारपिटीसंदर्भात माहिती घेत आहोत. बीड जिल्ह्यात पाच आणि लातूर जिल्ह्यात एकाचा वीज पडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. उद्या दुपारपर्यंत अहवाल मिळेल.
- प्रल्हाद कचरे, महसूल उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना ‘जय सोनिया’ म्हणणार का ?

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी केली. त्यामुळे शिवसेना आता ‘जय सोनिया’ म्हणणार का,’ असा सवाल महापौर भगवान घडमोडे यांनी बुधवारी केला आहे.
पंचायत समिती सभापती, उपसभापतीपदाच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी शिवसेनेने काँग्रेसबरोबर युती केली व भारतीय जनता पक्षाला पंचायत समितीच्या सत्तेपासून दूर ठेवले. औरंगाबाद पंचायत समितीमध्ये हेच घडले. जुळून येणाऱ्या नवीन राजकीय समीकरणाच्या संदर्भात पत्रकारांनी महापौरांना विचारले असता ते म्हणाले, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला कधीच जवळ केले नव्हते. त्यांचे व्यक्तीमत्व उत्तुंग होते. आता शिवसेना काँग्रेसला जवळ करीत आहे हे चुकीचे आहे. शिवसेना आता जय सोनिया म्हणणार का, असा प्रश्न यामुळे निर्माण होतो. शिवसेनाप्रमुखांच्या सोबत सोनिया गांधीचे नाव सर्वसामान्य नागरिकांना खटकणारे आहे,’ असे ते म्हणाले.
भाजपने देखील अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करून पंचायत समिती सभापती, उपसभापतिपदाची निवडणूक लढवली याकडे पत्रकारांनी महापौरांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले,‘ राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाणे हे एखाद्यावेळी ठीक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मोठे नेते आहेत. ते महाराष्ट्राचे ते भूषण आहेत. त्यामुळे त्यांच्याशी केलेल्या हातमिळवणीत काही गैर वाटत नाही. आता राजकारणात कोणताही पक्ष अस्पृश्य राहिलेला नाही. सत्ता मिळवण्यासाठी नव्हे, तर विकासाची कामे करण्यासाठी भिन्न विचाराचे पक्ष सोबत येत आहेत. त्यांच्या एकत्र येण्याने विकासाची कामे झपाट्याने होतील, असा विश्वास वाटतो.’

महापालिकेत युती भक्कम
महापालिकेतही राजकीय समिकरण बदलणार का, असा प्रश्न घडमोडे यांना विचरला असता ते म्हणाले, ‘महापालिकेत शिवसेना - भाजपची युती भक्कम आहे. नव्याने निर्माण होणाऱ्या राजकीय परिस्थितीतूनही मार्ग निघेल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडमध्ये तीन भावंडांचा बुडून मृत्यू, आई वाचली

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। बीड

बीड तालुक्यातील कामखेडा गावात तीन सख्ख्या भावंडांचा नदीच्या बंधाऱ्यात मृत्यू झाल्याची ह्रद्य हेलावणारी घटना घडली आहे. जिशान, सानिया आणि अफ्फान अशी या मुलांची नावे आहेत. आपल्या डोळ्यांसमोर आपल्या बुडणाऱ्या लेकरांना वाचवण्यासाठी या मुलांच्या आईनेही पाण्यात उडी घेतली. मात्र गावकऱ्यांनी बुडणाऱ्या आईला वाचवले.

या तीन दुर्दैवी मुलांची आई परवीन शेख कपडे धुण्यासाठी कामखेडजवळच्या बंधाऱ्यावर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची तीन मुलेही होती. आई कपडे धूत असताना अचानक जिशान पाय घसरुन पाण्यात पडला. हे सानिया आणि अफ्फानने पाहिल्याबरोबर ते दोघे जिशानला वाचवण्यासाठी लगबगीने पाण्यात उतरले. मात्र यांपैकी कुणालाही पोहता येत नसल्याने तिघेही बु़डू लागली.

शेजारीच कपडे धूत असलेल्या परवीन यांनी आपली मुले बुडत आहेत हे पाहताच आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांना वाचवण्यासाठी त्यांनीही पाण्यात उडी घेतली. दरम्यान, गटांगळ्या खाणाऱ्या जिशान, सानिया आणि अफ्फान यांना पाण्याने आपल्यात सामावून घेतले.

तीन मुले पाण्यात पडली आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या आईनेही बंधाऱ्यात उडी घेतली आहे, हे पाहताच आसपास असलेल्या गावकऱ्यांनी धाव घेत पाण्यात उड्या घेतल्या आणि परवीन यांचा प्राण वाचवला.

बंधाऱ्यात बुडून मृत्यू पावलेल्या या दुदैवी मुलांचे वडील शेतकरी आहेत. शिवाय त्यांचा कापूस विक्रीचा व्यवसाय आहे.

एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी मागचा पुढचा विचार न करता आपल्या जीवांची बाजी लावणाऱ्या या तीन भावंडांचा दुदैवी मृत्यू झाल्याने कामखेडा गाव आणि बीड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंडितअण्णा मुंडे यांचे ह्रदयविकाराने निधन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। बीड

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे बंधू आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे वडील पंडितअण्णा मुंडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. परळीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७७ वर्षांचे होते.

पंडितअण्णांना गेल्या महिन्यात २८ सप्टेंबरला ह्रदयविकाराचा धक्का बसला होता. त्यावेळी त्यांना लातूरमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना विमानाने पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते.

पंडितअण्णा हे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे वडीलबंधू आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे चे वडील होत. पंडितअण्णा यांनी दोन वेळा बीड जिल्हापरिषदेचे अध्यक्षपद भूषवले आहे. याबरोबर संत जगमित्र नागा सहकारी सूतगिरणीचे, तसेच परळी बाजारसमितीचे ते संचालक होते.

पंडितअण्णांनी राजकारणाची सुरूवात आपले बंधू दिवंगत गोपिनाथ मुंडे यांच्या सोबतच केली. गोपीनाथ मुंडे राज्य, तसेच राष्ट्रीय पातळीवर सक्रिय झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकाऱणाची जबाबदारी पंडितअण्णा पार पाडत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंकजांना धक्का; परळीत धनंजय मुंडेच

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । परळी (बीड)

परळी-वैजनाथ नगरपरिषदेत राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या भावा-बहिणींमध्ये रंगलेल्या वर्चस्वाच्या लढाईत पंकजा यांना धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपला गड आणखी मजबूत करत ३३ पैकी २७ जागा जिंकल्या असून भाजपच्या पदरात अवघ्या ४ जागा पडल्या आहेत. परळीच्या नगराध्यक्षपदीही राष्ट्रवादीच्या सरोजिनी हालगे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत. दरम्यान, पंकजा यांनी 'मी हा पराभव स्वीकारत आहे', अशी प्रतिक्रिया निकालांनंतर दिली.

परळीच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सहकारी संस्थांच्या निवडणुकीत पंकजा यांच्या नेतृत्वाने कमाल केली होती. त्या निकालांचीच पुनरावृत्ती परळीत होईल, असे आडाखे बांधले जात होते. मात्र धनंजय मुंडे यांनी हे सगळे अंदाज फोल ठरवले आणि परळीतील आपलं वर्चस्व सिद्ध केलं. भाजप आणि पंकजांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे भाजपने परळीची निवडणूक विशेष प्रतिष्ठेची केली होती. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही येथे प्रचारसभा घेतली होती. त्यामुळे भाजपसाठी हा पराभव जिव्हारी लागणारा ठरला आहे. पंकजा यांची याबाबत प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी पराभव मान्य केला आहे. या पराभवाची जबाबदारी सर्वस्वी माझी आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरता येणार नाही, असे त्या म्हणाल्या. शरद पवार एखाद्या ठिकाणी प्रचाराला गेले आणि तेथे पराभव झाला तर तो पवरांचा पराभव आहे, असे आपण म्हणतो का?, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला.

धनबळ हरलं, जनशक्ती जिंकली: धनंजय मुंडे

भाजपने धनबळ वापरलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नेत्यांच्या फौजा प्रचारासाठी आणल्या, तरीही परळीतील जनशक्तीने राष्ट्रवादीच्या बाजूने कौल दिला आहे. नगरपालिकेत आम्ही करत असलेल्या भरीव कामांना मिळालेली ही पोचपावती आहे, अशी प्रतिक्रिया या विजयावर धनंजय मुंडे यांनी दिली.

परळी-वैजनाथ नगर परिषद निकाल


पक्षीय बलाबल

राष्ट्रवादी - २७
भाजप - ४
शिवसेना - १
काँग्रेस - १
एकूण जागा - ३३

- नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उमेदवार सरोजिनी हालगे ५ हजार १४४ मतांनी विजयी. हालगे यांना १८ हजार १७६ मते तर भाजपच्या मेनकुदळे यांना १३ हजार ३२ मते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेंव्हा त्यानं हजेरीपटावरून जात खोडली...

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

'जात नाही ती जात', असं सांगत अनेकजण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जातीचं समर्थन करत असतात. त्यामुळे जातीही नष्ट होत नाहीत आणि जातीमुळं होणारं नुकसानही टाळता येत नाही. बीडमध्ये मात्र रोहन भोसले या इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं जातीविरोधात लढण्याचं धाडसी पाऊल उचललयं. त्यानं शाळेच्या हजेरीपटावरून स्वत:ची जात आणि धर्मच खोडून काढला असून त्याच्या या कृतीचं सर्वजण कौतूक करत आहेत.

आष्टी तालूक्यातील पारगावच्या जिल्हा परिषद शाळेत रोहन शिकतो. रोहन शाळेतील हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. तो देव आणि धर्मही मानत नाही. शाळेतील हजेरीपटावर विद्यार्थ्यांच्या नावासमोरच्या कॉलममध्ये त्याची जात आणि धर्म लिहिला जात असल्याचं त्याला खटकत होतं. त्यामुळं त्यानं शाळेच्या मधल्या सुट्टीत वर्गात शिक्षक नसल्याची संधी साधत हजेरीपटावरून स्वत: जात खोडून टाकली. जवळ पेन नव्हता, त्यामुळं वर्ग मैत्रिणीचा पेन घेऊन त्यानं हजेरीपटावरून जात काढून टाकण्याचं मिशन फत्ते केलं.

रोहननं जात खोडल्याचं घरी कळताच त्याचे आई-वडिल घाबरले. पण गावकरी आणि शिक्षकांनी त्याच्या या कृतीचं समर्थन केल्यानं रोहनच्या आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला. शाळेत आम्ही विद्यार्थ्यांना जे संस्कार देतो, ते रोहनमुळे खऱ्या अर्थानं सार्थकी लागल्याचं त्याचे शिक्षक सागंतात. रोहनच्या या कृत्याचा अभिमान असून त्याचा हा संकल्प सरकारी पातळीवर राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं शिक्षकांनी सांगितलं.

शिवराय, फुले आणि आंबेडकर प्रेरणास्त्रोत

इतर मुलांसारखं टाइमपास करणं आणि खेळणं यात रोहनला इंटरेस्ट नाही. तो नियमितपणे किर्तन ऐकतो. वाचन करतो आणि घरच्यांना छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचे विचार सांगत असतो. या तीन महापुरुषांच्या विचाराच्या पगड्यातूनच त्याला हजेरीपटावरून जात खोडण्याची प्रेरणा मिळाल्याचं सांगण्यात येतं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीच्या जन्मानंतर चहा,नाश्ता आणि दाढी फ्री

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

गावात मुलींचा घटलेला जन्मदर वाढविण्यासाठी बीडमधील एका गावानं न्यारीच शक्कल लढवली आहे. मुलगी जन्माला आली तर मुलीच्या वडिलांची सहा महिने दाढी-कटींग फुकट करून देण्यात येत असून त्यांना चहा-नाश्ताही फुकट देण्यात येत आहे. त्यामुळं मराठवाड्यात हे गाव चर्चेचा विषय झाले आहे. शिवाय आधीच स्त्रीभ्रूण हत्येनं बदनाम झालेल्या बीडचा 'बेटी बचाव' मोहिमेचा हा अनोखा 'बीड पॅटर्न' असल्याचं बोललं जात आहे.

स्त्रीभ्रूण हत्येमुळं बीडचे नाव खुप खराब झालं होतं. त्यामुळे या बीडचा जन्मदर ही प्रचंड कमी झाला होता. बीडच्या कुंबेफळ या गावाची स्थितीही काही वेगळी नव्हती. पण ही परिस्थिती बदलण्यासाठी दोन तरूण पुढे आले. अशोक पवार आणि भागवत थोरात असं त्यांचं नावं. मुलगी जन्माला आल्यास मुलीच्या वडिलांची सहा महिने फुकटात दाढी-कटींग करण्याचं पवार यांनी जाहीर केलं. तर भागवत थोरात यांनी मुलीच्या बापाला चहा आणि नाश्ता मोफत देण्याचं जाहीर करून उपक्रमही राबवायला सुरुवात केली. आर्थिक झळ बसत असली तरी या दोघांनी गावच्या हितासाठी हा उपक्रम हाती घेतला आणि गावकऱ्यांना उपक्रमाची माहिती देण्यासाठी आपआपल्या दुकानांवर फलकही लावले. या उपक्रमाचं गावकऱ्यांनी स्वागतही केलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड जिल्ह्यात ९७ अर्ज दाखल

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्हा परिषदेच्या ६० गट आणि अकरा पंचायत समितीच्या १२० गणासाठी निवडणूक होत असून सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २७ जानेवारीपासून सुरुवात झाली. मात्र, शुक्रवारी अमावस्या असल्याने जिल्ह्यात एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. सोमवारी जिल्ह्यातील अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्हा परिषदेच्या ६० गटांसाठी ४७ अर्ज दाखल झाले होते. तर पंचायत समितीसाठी ५० अर्ज दाखल झाले.
गेवराई तालुक्यात जिल्हा परिषद गटासाठी १२ व पंचायत समितीसाठी २१ उमेदवारी अर्ज आले आहेत. बीड तालुक्यात जिल्हा परिषद गटासाठी ११ व पंचायत समितीसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल झाले. माजलगावमध्ये पंचायत समितीसाठी आठ तर जिल्हा परिषदेसाठी चार अर्ज दाखल झाले. केज तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी सहा तर पंचायत समिती गणासाठी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला. परळीत जिल्हा परिषद गटासाठी सात तर पंचायत समितीसाठी सात अर्ज आले आहेत. आष्टीत जिल्हा परिषदेला व पंचायत समितीत दोन अर्ज आले आहेत. शिरूर, धारूर, वडवणी तालुक्यात प्रत्येकी एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. चकलंबा आणि उमापूर अशा दोन जिल्हा परिषद गटातून आज जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी उदयसिंह पंडित, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर पिसाळ, जिल्हा परिषद सदस्य डॉ. विजयकुमार घाडगे, आदी उपस्थित होते. तर बीड तालुक्यातून नाळवंडीमधून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुण डाके, तर शिवसेनेकडून गणेश वरेकर यांनी तर पालीतून राष्ट्रवादीकडून उषा आखाडे यांनी उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला. एक फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे राहिलेल्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची मोठी गर्दी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद विकास समुद्रेंवर अंत्यसंस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

काश्मीर येथे हिमस्खलनामुळे बीड जिल्ह्यातील भारतीय सैन्य दलाच्या जवान विकास पांडुरंग समुद्रे हे शहीद झाले होते. त्यांच्या पार्थीवावर बीड जिल्ह्यातील गांजपूर येथे शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद विकास समुद्रे हे सैन्य दलाच्या मुळ युनिट १८ महार रेजिमेंटमध्ये व सध्या ५१ राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. जम्मू काश्मीर मधील गुरज भागात अतिरेकी घुसखोरीवर नियंत्रण ठेवण्याकरीता तैनात करण्यात आले होते. २५ जानेवारी रोजी अचानक झालेल्या हिमस्खलनामध्ये विकास समुद्रे शहीद झाले होते. त्यांचे पार्थिव गुरज सेक्टर येथून श्रीनगर मिलिटरी हॉस्पीटल येथे हेलिकॉप्टरने ३० जानेवारी सायंकाळी आणण्यात आले. श्रीनगर येथून दिल्ली, दिल्लीहून विमानाने पुणे आणि बुधवारी सकाळी पुण्याहून हेलिकॉप्टरने धारुर आणि तेथून त्यांच्या मुळगावी गांजपूर येथे रुग्णवाहिकेतून आणण्यात आले. प्रथम धारुर शहरात त्यानंतर गांजपूर गावात आणि त्यांच्या राहत्या घरी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले. गावकऱ्यांनी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. त्यांचा तिरंग्यामधील पार्थिव गावात आणताच गावकऱ्यांनी तसेच एनसीसी व स्काऊट गाईडच्या पथकांनी अंतयात्रेत सहभाग घेतला. संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी शहीद विकास समुद्रे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. पोलिस दलाच्या पथकाने तसेच भारतीय सैन्य दलाच्यावतीने लेप्टनंट कर्नल नितिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे, आमदार संगीता ठोंबरे, आमदार आर. टी. देशमुख, सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल हरीभाऊ दळवी, कॅप्टन भीमराव पारवे यांच्यासह असंख्य अधिकारी, पदाधिकारी व देशप्रेमी नागरिकांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. शहीद विकास समुद्रे यांचे भाऊ परमेश्वर यांनी चितेला भडाग्नी दिला. यावेळी आई, पत्नी, बहिनी, चिमुकली मुलगी आणि नातेवाईकांनी अत्यंत शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images