Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘स्थायी’चे सभापती होण्यासाठी फिल्डिंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेतील स्थायी समितीच्या आठ सदस्यांना एप्रिलच्या अखेरीस निरोप दिला जाणार आहे. त्यांच्या जागी नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. नवीन सदस्य कोण येणार हे गुलदस्त्यात असले तरी इच्छुकांनी सभापतिपदासाठी आतापासून फिल्डिंग लावण्याचे काम सुरू केले आहे.
दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटी स्थायी समितीचे सहा सदस्य निवृत्त होतात. त्यांच्या जागी नवीन सहा सदस्यांची नियुक्ती केली जाते. यंदा एप्रिल महिन्याच्या अखेरीस विद्यमान सभापती मोहन मेघावाले यांच्यासह रावसाहेब आमले, कमलाकर जगताप, गजानन मनगटे, मकरंद कुलकर्णी (सर्व शिवसेना), नितीन चित्ते (भाजप), विकास एडके, समिना शेख (एमआयएम) हे सहा नगरसेवक निवृत्त होणार आहेत. शिवसेनेचे पाच सदस्य निवृत्त होत असल्यामुळे नवीन पाच सदस्य शिवसेनेकडून स्थायी समितीत पाठवले जातील. त्याच नुसार एमआयएमचे दोन व भाजपचा एक सदस्य स्थायी समितीमध्ये जाईल.
स्थायी समितीचे पुढील वर्षाचे सभापतिपद शिवसेना-भाजपमध्ये झालेल्या करारानुसार भाजपकडे आहे. भाजप व शिवसेनेच्या युतीमध्ये राज्यपातळीवर वितुष्ट आल्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपला दूर ठेवून शिवसेनेने काँग्रेससोबत घरोबा केला. हाच प्रयोग स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत होणार असल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात आहे. स्थायी समितीच्या सभापतिपदी निवडून येण्यासाठी संबंधित उमेदवाराला नऊ मतांची गरज आहे. स्थायी समितीत काँग्रेसचे दोन सदस्य आहेत. एमआयएमचे नगरसेवक तटस्थ राहिले, तर काँग्रेसच्या मदतीने सभापतिपद पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात येऊ शकते असे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेनेतील काही दिग्गज नगरसेवक स्थायी समितीत येण्यासाठी इच्छुक आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिटी सर्व्हे ऑफिसची फसवणूक; गुन्हा दाखल

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बनावट कागदपत्रे सादर करत तसेच कोर्टाने दिलेला स्थगिती आदेश लपवून ठेवत प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेण्याचा प्रकार दोघांनी केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सिटी सर्व्हे कार्यालयाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर सिटीचौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राहुल बनसोड (परीक्षक भूमापक अधिकारी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. यामध्ये संशयित आरोपी मुर्तुझा हुसेन अब्दुल तय्यब व नुरूद्दीन फकरुद्दीन लाखवाला यांनी १२ एप्रिल २०१६ रोजी भूमी अ‌भिलेख कार्यालयात नामांतर व मोजणी अर्ज सादर केला होता. हा अर्ज मृत तजम्मुल हुसेन यांच्या मालमत्तेसंदर्भात होता. मुर्तुझा हुसेन व लाखवाला यांनी सादर केलेल्या अर्जामध्ये मृत हुसेन यांच्या सहीमध्ये तफावत आढळून आली. त्याचप्रमाणे दिवाणी न्यायालयात दाखल असलेल्या एका खटल्यामध्ये मुर्तुजा हुसेन व नुरोद्दीन लाखवाला हे मृत तज्जमुल हुसेन यांचे वारस असल्याचे न्यायालयाने ठरवले आहे. मात्र या आदेशाचा गैरवापर करीता मुर्तुजा व लाखवाला यांनी भूमापन अधिकारी कार्यालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही दिसून आले. याप्रकरणी बनसोड यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जमादार शेवरे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालवाहतूक मार्गाचा आराखडा तयार

0
0

सुरेश कुलकर्णी, जालना
मराठवाड्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ड्रायपोर्टच्या उभारणीचे काम वेगाने सुरू झाले आहे. ड्रायपोर्ट ते औरंगाबाद जालना महामार्ग जोडणाऱ्या विशेष रस्त्याच्या जमिनीच्या मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. दिनेगाव रेल्वे स्थानकाच्या नव्याने उभारणीच्या कामाचा आराखडा आणि ड्रायपोर्टच्या अंतर्गत रेल्वे स्लायडिंगसाठी विशेष रेल्वे रुळाच्या मालवाहतूक मार्गाचा आराखडा तयार झाला असून जेएनपीटी आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांच्या बैठकीत त्याला शुक्रवारी मान्यता मिळाली. पाचशे एकर जमिनीवरील ड्रायपोर्टच्या उभारणीच्या कामातील पहिल्या टप्प्यातील या सर्व जमिनीच्या सभोवताली कंपाऊंड वॉल उभारणीचे काम वेगाने सुरू झाले आहे.
औरंगाबाद-जालना महामार्गावरील औरंगाबादहून जालना औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्नीक कॉलेज)च्या थोडे औरंगाबादच्या दिशेने पुढे आणि मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अलिकडून दिनेगांव रेल्वे स्थानकाच्या बाजूला ड्रायपोर्टच्या आवारात जाणारा सरळरेषेत ड्रायपोर्टला एप्रोच रोड आखला गेला आहे. या संपूर्ण रस्त्याच्या जमिनीच्या मोजनीचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यावर असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर तातडीने रेल्वे गेट बसवले जाणार आहे. भविष्यात याच ठिकाणी रेल्वे ओव्हर ब्रीज उभारणीचे काम लवकरच सुरू होणार असून या संदर्भातील आराखडा तयार करण्यात आला आहे. दिनेगांव रेल्वे स्थानकाच्या नव्याने उभारणीच्या कामाचा आराखडा आणि ड्रायपोर्टच्या अंतर्गत रेल्वे स्लायडिंगसाठी विशेष रेल्वे रुळाच्या मालवाहतूक मार्गाचा आराखडा तयार झाला असून जेएनपीटी आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागिय व्यवस्थापकांच्या बैठकीत त्याला शुक्रवारी मान्यता मिळाली आहे.

ड्रायपोर्ट ते औरंगाबाद - जालना या रोडला एप्रोच कनेक्टीव्हीटीसाठी असलेल्या या केवळ ड्रायपोर्टसाठीच्या विशेष रस्त्याच्या जमिनीचे जेएनपीटीला येत्या पंधरा दिवसात आम्ही हस्तांतरण करत आहोत, या संदर्भात सगळ्या प्रकारच्या शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. ड्रायपोर्टला एप्रोच कनेक्टीव्हीटी झाली की तिथे सहजपणे येणे जाणे सुरू होईल. यातील बहुतांश जमीन सरकारी गायरान आहे.
शिवाजी जोंधळे, जिल्हाधिकारी, जालना

ड्रायपोर्टच्या उभारणीच्या कामातील प्रगतीचा जवळपास दररोजचा आढावा आम्ही घेत आहोत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील ड्रायपोर्टच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. मराठवाडा आणि विदर्भात या नव्या वेगवान आणि अतिशय स्वस्त मालवाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, उद्योजकांना मोठा फायदा होईल. ही सगळी व्यवस्था याच वर्षाच्या अखेरीस पूर्ण करून कंटेनर्सची वाहतूक सुरू करण्याचा संकल्प आहे.
विवेक देशपांडे, संचालक जेएनपीटी, मुंबई.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांनी मागितली आत्महत्येची परवानगी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून त्यांचे जगणे मुश्लिल झाले आहे. शेतकऱ्यांना कर्ज भरणे शक्य नसल्याने सरकारने कर्जमुक्ती करावी अन्यथा सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या गटाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली कर्जबाजारी शेतकऱ्याच्या गटाने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन ही मागणी केली. गेल्या चार वर्षांपासून शेतकरी कर्जबाजारी आहे. यावर्षी उत्पादन वाढले मात्र उत्पन्न वाढले नाही, नोटबंदीचाही फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या कर्जातून सुटका होण्यासाठी तत्काळ कर्जमुक्ती आवश्यक आहे, मात्र कर्जमुक्तीचा विषय हा सर्वच राजकारण्यांनी पोरखेळ केला आहे. मराठवाड्यात दररोज तीन शेतकरी आपले जीवन संपवत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, खाजगी पतसंस्था व मायक्रो फायनान्स कंपन्यांचे कर्ज घेतले आहे. कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना छळ केला जात आहे. कोर्टाच्या माध्यमातून जप्तीच्या नोटीस दिल्या जात असून वसुलीसाठी गुंडांची नेमणूक केली आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकरी घाबरले आहेत, अशी व्यथा या शेतकऱ्यांनी मांडली. सरकारने १० एप्रिलपर्यंत कर्जमुक्तीचा निर्णय घ्यावा, अन्यथा सामूहिक आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. निवेदनावर विठ्ठल घोरपडे, नारायण घटनकर, रामदास बुरकुल, भानुदास बुरकुल, विजय जाधव, गणेश बुरकुल, बाळू घोरपडे, शेरसिंग बायस, पांडुरंग पाटील आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिटी सर्व्हे’च्या पाच कर्मचाऱ्यांवर गुन्हे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मिळकत पत्रिकेवर मूळ मालकाच्या नावाची खाडाखोड करीत बनावट कागदपत्राआधारे प्रॉपर्टी॓ बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी सिटी सर्व्हे ऑफिसचा कार्यालयप्रमुख, अभिलेखापाल, उतारा लिपिक, वरिष्ठ लिपिक, परीरक्षण भूमापकासह दोघांवर सिटीचौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर भूमापन हद्दीतील सिटी सर्व्हे क्रमांक १९२१० मध्ये हाजी सरदार खान यांची १७१ चौरस मीटर जमीन आहे. ‌या जमिनीच्या मिळकतपत्रावर हाजी सरदार खान यांचे नाव आहे. ही जमिनीची गाजी सलाउद्दीन अहेमद अन्सारी (रा. पद्मपुरा) याने बनावट कागदपत्राआधारे मिळकत पत्रिका तयार केली. या बनावट मिळकत पत्रिकेवर गाजी याने स्वतःचे नाव लावले. तसेच जमिनीचे क्षेत्रफळ देखील वाढवत १७१ चौरस मीटरऐवजी २४१ चौरस मीटर दाखवण्यात आले. सिटी सर्व्हे कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा प्रकार करण्यात आला. यानंतर ही जमीन पद्‍मपुरा येथील भरत टिकाराम बरथुने यांना विकण्यात आली. बरथुने यांनी अर्ज करून मिळकत पत्रिकेवर स्वतःचे नाव लावले. यामुळे मूळ मालक हाजी सरदार खान यांचे नाव काढले गेले. हा प्रकार १८ जानेवारी २०१७ रोजी घडला. हे लक्षात आल्यानंतर सिटी सर्व्हे ऑफिसमधील शिरस्तेदार नगर भूमापन अधिकारी अविनाश आत्माराम शिंगाने यांनी गुरुवारी सिटीचौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून सिटी सर्व्हे ऑफिसचे कार्यालय प्रमुख वसंत चांदोरकर, वरिष्ठ लिपिक डी. व्ही. तरटे, परीरक्षण भूमापक मोईन शेख, अभिलेखापाल एस. के. तायडे, उतारा लिपिक एस. यु. कवटकर तसेच गाजी सल्लाउद्दीन अहमद अन्सारी व भरत टिकाराम बरथुने (दोघे रा. पद्‍मपुरा) यांच्याविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे, कट रचणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक डी. एस. शिनगारे पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेड कॅशलेस व्यवहारात नंबर वन ठरेल

0
0


म. टा. प्रतिनिधी, नांदेड
नांदेड जिल्ह्यात सर्वप्रथम होत असलेल्या डिजीधन मेळाव्याने येथील जनतेत लोकजागृती होऊन हा जिल्हा कॅशलेस व्यवहारात नंबर वन ठरेल, असा विश्वास नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला.

नांदेड जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या डिजीधन मेळाव्याचे उद्घाटन खोतकर यांनी केले. त्या प्रसंगी ते बोलत होते. नांदेड जिल्हा ऐतिहासिक गुरुद्वारा, माहुरची रेणुका देवी अशा अनेक पवित्र तीर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे. अशा पवित्र जिल्ह्यात कॅशलेस व्यवहार करण्याचे पवित्र काम सर्वांनी मिळून सुरू केले पाहिजेत, असे आवाहन मंत्र्यांनी केले आहे.
देशात कॅशलेस व्यवहार व्हावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. जगातील सर्व प्रगत देशात देश कॅशलेस सुरू झाले आहेत. त्यामुळे भारतातही ते झाले पाहिजेत ही भूमिका घेऊन आपल्या राज्यात असे डीजीधन मेळावे घेऊन जिल्हा तालुका आणि ग्रामीण स्थरावर, कॅशलेस व्यवहारावर भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून नांदेडचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे खोतकर यांनी स्पष्ट केले.
१०० कोटी मोबाइल आणि १०९ कोटी आधार कार्ड असलेला आपला देश आहे. त्यामुळेच कॅशलेस व्यवहार करणे सुलभ होणार आहे. आपण कॅशलेस झालो की अनेक तणावातून मुक्त होणार आहोत, आता प्रवासात पाकीटमारीचा ताण राहाणार नाही, असे सांगत प्रारंभी आमदार हेमंत पाटील यांनी केलेल्या भाषणाचा उल्लेख करून त्यानी आमदारांच्या सर्व मागण्या पालकमंत्री या नात्याने मार्गी लावण्याचा प्रयत्न राहील असे ते म्हणाले.
जावडेकर न आल्याने कार्यकर्ते नाराज
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते या डीजीधन मेळाव्याचे उद्घाटन होणार होते. त्यामुळे जावडेकरांच्या स्वागतासाठी शहरात सर्व प्रमुख रस्त्यांवर बॅनर्स लावण्यात आले होते. पण ते आलेच नाहीत. पण त्यांचा दौरा रद्द झाल्याने भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची घोर निराशा झाली.

मेळाव्यासाठी एक दिवस अपुरा
शनिवार आणि रविवार अशा सलग दोन दिवस कार्यालयीन सुट्या आल्याने या मेळाव्याचे आयोजन करूनही लोकांना विविध स्टॉल्सला भेटी देऊन माहिती घेणे, यासाठी एक दिवसाचा वेळ अपुरा पडला असे या मेळाव्याला भेट देणाऱ्या नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन खेळांच्या क्रीडा संघटनांना ‘डेडलाइन’

0
0

नवीन खेळांच्या क्रीडा संघटनांना ‘डेडलाइन’
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्याच्या क्रीडा संचनालयाने गेल्या पाच वर्षांमध्ये ४७ नवीन खेळांना मान्यता दिली आहे. या नव्या खेळांच्या संघटनांना जिल्हानिहाय सविस्तर माहिती पाठवणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही माहिती २७ मार्च रोजी क्रीडा मंत्रालयात सादर करण्यात येणार आहे.
२०१३-१४ या वर्षात चॉयक्वोंदो, फिल्ड आर्चरी, फुटबॉल टेनिस, कुडो, रोप स्किपिंग, सेपाक टकरॉ, सिलंबम, सॉफ्ट टेनिस, टेनिक्वाइट, टेनिसबॉल क्रिकेट, टेनिस व्हॉलिबॉल, थांगता मार्शल आर्ट, जंपरोप, ट्रेडिशनल रेसलिंग, रस्सीखेच, वुडबॉल, पॉवरलिफ्टिंग, सेलिंग, कयाकिंग, कॅनोईंग, कराटे, स्क्वॉश, वुशू, शुटिंगबॉल अशा २५ क्रीडा प्रकारांना मान्यता देण्यात आली. २०१४-१५ या वर्षात संगीत खूर्ची, आष्टेडू आखाडा, स्पोर्ट्स डान्स, हापकिडो बॉक्सिंग, लगोरी, कुराश, बुडो मार्शल आर्ट, माँटेक्सबॉल क्रिकेट, पेंटयाक्यू, लंगडी, रग्गी, फ्लोअरबॉल, जित कुन दो, चॉकबॉल, स्पीडबॉल, तेंद सु डो अशा १६ खेळांना मान्यता देण्यात आली होती. २०१६-१७ या वर्षात थाय बॉक्सिंग, सुपर सेवन क्रिकेट, कॉर्फबॉल, मिनी गोल्फ, टेबल सॉकर, युनिक्वाइट, फुटसाल, मॉडर्न पेंटॅथलॉन या आठ नव्या खेळांना मान्यता देण्यात आली.
भारतीय शालेय क्रीडा महासंघांनी या नव्या क्रीडा प्रकारांना मान्यता दिल्यानंतर देशभरातील विविध राज्यांमध्ये या खेळांना मान्यता मिळाली. महाराष्ट्रातही क्रीडा संचनालयाने या नव्या खेळांना मंजुरी दिली. अनेक नवीन खेळांबाबत तक्रारी येऊ लागल्या. या तक्रारींची क्रीडा मंत्रालयाने दखल घेऊन सर्व नव्या क्रीडा प्रकारांची सविस्तर माहिती २७ मार्चपर्यंत मागवण्यात आली आहे. त्यात नव्या खेळांच्या राज्य क्रीडा संघटनांना संलग्न जिल्हा संघटनांची यादी, खेळाडूंची संख्या, कार्यालयाचा अधिकृत पत्ता, जिल्हानिहाय खेळाडूंची यादी, पत्ता, दूरध्वनी क्रमांक अशी माहिती देणे बंधनकारक आहे. तसेच शालेय जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची संख्या, संघटनेच्या जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची संख्या मागवण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश करण्यात आलेल्या नव्या खेळांच्या संघटनांनी सविस्तर माहिती तत्काळ क्रीडा संचनालयाकडे पाठवणे बंधणकारक असल्याचे सहसंचालक एन. एम. सोपल यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबाद झेडपीत महिलाराज

0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्‍यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्यावेळी भाजपच्या चार आणि शिवसेनेच्या दोन सदस्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेवर येण्यासाठी मदत केली होती. त्याची परतफेड म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना सभापतीपद देऊन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक, भाजपचे दोन तर बंडखोर शिवसेनाच्या एकाची सभापतीपदी वर्णी लागली. जिल्हा परिषदेत आता सहा पदाधिकाऱ्यांपैकी चार पदाधिकारी या महिला असल्यामुळे येथे महिलाराज आले असून जिल्हा परिषदेच्या चार विषय समितीच्या सभापतीपदाची भाजपला लॉटरी लागली आहे.
बंडखोर शिवसेना सदस्यापैकी एकाला सभापतीपद राष्ट्रवादीच्या सहकार्याने मिळाले आहे. अर्थ व बांधकाम सभापतिपदी भाजपचे अभय चालुक्य, समाजकल्याण समिती सभापतिपदी बंडखोर शिवसेनेच्या चंद्रकला नारायणकर, महिला बालकल्याण सभापतिपदी भाजपच्या सखुबाई पवार, कृषी सभापतिपदी राष्ट्रवाद काँग्रेसच्या अबिदाबाई जगताप यांची निवड करण्यात आली. आज झालल्या सभापती निवडीवरून भाजपच्या चार आणि शिवसेनेच्या दोन सदस्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेवर येण्यासाठी मदत केल्याचे ‌सिद्ध होत आहे.
जिल्हा परिषदेच्या कारभाराची सर्व सूत्रे ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चना पाटील यांच्‍या हाती आल्या आहेत. शिवेसेनेच्या अकरा पैकी दोन सदस्यांनी बंडखोरी केल्याने त्यांचे संख्याबळ दोनने कमी झाले आहे. भाजपने केवळ चार संख्याबळ असताना दबावतंत्राचा वापर करीत दोन सभापतिपद पदरी पाडून घेतली आहेत.
#

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबादचा पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय

0
0

औरंगाबादचा पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय
राहुल, सचिन, स्वप्नील चमकले
राज्य क्रिकेट स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्य क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित आंतरजिल्हा निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत औरंगाबाद संघाने सोलापूर संघावर पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळवला. औरंगाबादतर्फे कर्णधार राहुल शर्मा, सचिन लव्हेरा, स्वप्नील चव्हाण, प्रवीण क्षीरसागर यांनी या सामन्यात लक्षवेधक कामगिरी केली.
नाशिक येथे हा सामना झाला. औरंगाबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. कर्णधार राहुल शर्माने शानदार शतकाच्या (१२४) जोरावर औरंगाबाद संघाने पहिल्या डावात २२५ धावा केल्या. औरंगाबादकडून सचिन लव्हेरा, स्वप्नील चव्हाण यांनी अनुक्रमे ३० व २९ धावा काढल्या. सोलापूरच्या तन्वीर खानने ४, तर राहुल आसबेने ३ विकेट्स घेतल्या. सोलापूर संघाचा पहिला डाव ४४व्या षटकात १५० धावांत संपुष्टात आला. सोलापूरतर्फे झैद उस्तादने सर्वाधिक ४७ धावा काढल्या. पहिल्या डावात औरंगाबादला ७९ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. औरंगाबादचा दुसरा डाव १८१ धावांत आटोपला. औरंगाबादकडून विकास नगरकरने (५०) अर्धशतक झळकावले. राहुल आसबेने ६२ धावांत ७ विकेट्स घेतल्या. सामनाअखेरपर्यंत सोलापूर संघाने ३७ षटकांत ८ बाद १२८ धावा काढून औरंगाबाद संघाला निर्णायक विजयापासून रोखले. झैद उस्तादने नाबाद ८४ धावा काढल्या. प्रवीण क्षीरसागर, विकास नगरकर व स्वप्नील चव्हाण यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक ः औरंगाबाद जिल्हा संघ ः पहिला डाव - ५२.५ षटकांत सर्वबाद २२५ (राहुल शर्मा १२४, सचिन लव्हेरा ३०, स्वप्नील चव्हाण २९, विकास नगरकर १७, शुभम मोहिते ११, तन्वीर खान ४-६५, राहुल असाबे ३-६६) आणि दुसरा डाव - ४० षटकांत सर्वबाद १८१ (विकास नगरकर ५०, सचिन लव्हेरा ४७, स्वप्नील चव्हाण ३४, शेख मुकीम १४, राहुल आसबे ७-६२) विरुद्ध सोलापूर जिल्हा संघ ः पहिला डाव - ४३.२ षटकांत सर्वबाद १५० (उस्ताद झैद ४७, राहुल असाबे २९, निखिल मदास २८, शाहनूर नदाफ १२, सौरभ चाकोटे १२, प्रवीण क्षीरसागर ३-१८, भारत शर्मा २-१७, शुभम मोहिते २-२८, शुभम चाटे, राहुल शर्मा, स्वप्नील चव्हाण प्रत्येकी १ विकेट) आणि दुसरा डाव - ३७ षटकांत ८ बाद १२८ (उस्ताद झैद नाबाद ८४, राहुल असाबे १०, प्रवीण क्षीरसागर, विकास नगरकर, स्वप्नील चव्हाण प्रत्येकी दोन विकेट, शुभम चाटे, शुभम मोहिते प्रत्येकी १ विकेट).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे-सोलापूर रोडवर बोगदा लवकरच

0
0



औरंगाबाद ः मराठवाड्यातील दळणवळण विकासाला गती देण्यासाठी राज्यातील रस्त्यांसाठी ६० हजार कोटींची तरतूद झाली आहे. औरंगाबाद - धुळे राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड येथील आॅट्राम घाटातील बोगद्याच्या कामासही मंजुरी दिल्याची माहिती वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली.
हेडगेवार हॉस्पिटलमधील आपत्कालीन कक्षाचे उद्घाटन झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गडकरी म्हणाले की, महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केंद्राच्या रस्ते विकास मंत्रालयाने देशासह राज्यात रस्ते करण्याचे काम हाती घेतले आहे. यात मराठवाड्यातील रस्त्यांसाठीच्या ७ हजार कोटींच्या प्रकल्पाचा सूक्ष्म आराखडा तयार झाला आहे, तसेच नागपूर-सोलापूर- रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गासाठी १८ हजार कोटींची तरतूद केली आहे, या महामार्गामुळे मराठवाड्याला लाभ होईल, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मत्स्यशेतीने खिसा खुळखुळला

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शेततळ्यात पुरेसा पाणीसाठा असलेल्या शेतकऱ्यांना मत्स्यपालन हक्काचे उत्पन्न देणारा जोडधंदा ठरला आहे. प्रत्येक तालुक्यात किमान दीडशे शेततळ्यात गोड्या पाण्यातील मत्स्यशेती सुरू आहे. अवघ्या चार महिन्यांत उत्पन्न सुरू होत असल्यामुळे मत्स्यपालनाकडे शेतकरी वळत आहेत. शासकीय स्तरावरुन मत्स्यबीज मिळत नसल्यामुळे शेतकरी खासगी कंपनीकडून मत्स्यबीज खरेदी करीत आहेत.
गोड्या पाण्यातील मत्स्यशेती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरली आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पुरेसा पाऊस झाल्यामुळे शेततळ्यात पाणीसाठा आहे. विक्री व्यवस्थापन असलेल्या शेतकऱ्यांनी मत्स्यपालन केले आहे. या पूरक व्यवसायातून शेतकऱ्यांना समाधानकारक उत्पन्न मिळत आहे. औरंगाबाद तालुक्यात जवळपास दीडशे शेतकऱ्यांनी मत्स्यपालन केले आहे. लहान शेततळ्यात चार महिन्यांत चार ते पाच क्विंटल उत्पादन होते. मासे प्रतिकिलो शंभर रुपये किलोप्रमाणे विक्री होतात. शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांना आधार ठरला आहे, असे तालुका कृषी अधिकारी अशोक कोंडे यांनी सांगितले. पैठण, सिल्लोड आणि कन्नड तालुक्यातही मत्स्यपालनाचे प्रमाण वाढले आहे. ग्राहकांची विशेष मागणी असलेले मासे शेततळ्यात असतात. गोड्या पाण्यातील माशांना मागणी असली तरी विक्री व्यवस्था नाही. जिल्ह्यातच मासे विक्री होत असल्यामुळे पुरेसा भावसुद्धा मिळत नाही. धरण, तलाव आणि शेततळ्यात दरवर्षी भरघोस उत्पादन निघत आहे. शीतगृह असल्यास मासे परराज्यात विक्रीसाठी पाठवणे शक्य होणार आहे, पण शीतगृह नसल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत कमी दरात मासे विक्री करावे लागत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. शेततळ्यात माशांना सकस खाद्य देण्यासाठी शेतकरी मार्गदर्शन घेत आहेत. या पूरक व्यवसायाला सुविधा मिळाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.

मत्स्यबीज केंद्र नाही
प्रत्येक जिल्ह्यातील एक मत्स्यबीज केंद्र मोफत किंवा अत्यल्प दरात मत्स्यबीज देण्याचे काम करीत होते. पैठण येथील मत्स्यबीज केंद्राचे खासगीकरण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सहजतेने मत्स्यबीज मिळणे कठीण झाले आहे. शेतकरी आणि व्यापारी खासगी कंपनीकडून मत्स्यबीज खरेदी करीत आहेत. लहान-मोठ्या आकाराचे मासे विकून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे.

शेततळ्यातील मत्स्यपालन शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसाय आहे. भरपूर पाणी असलेल्या शेततळ्यात शेतकरी हमखास मत्स्यबीज टाकतात. या माशांना ग्राहकांची मागणी असल्यामुळे चांगले उत्पन्न मिळते. - अशोक कोंडे, तालुका कृषी अधिकारी

मत्स्यव्यवसाय विभागाच्या प्रादेशिक कार्यालयात कर्मचारी कमी असल्यामुळे तांत्रिक अडचणी होत्या. दरवर्षी जिल्ह्यात लक्षणीय मासे उत्पादन होते. तीन प्रकारचे मत्स्यबीज मासेपालनासाठी वापरतात. मत्स्यव्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. - विद्या कोरे, प्रादेशिक अधिकारी, मस्त्य विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाखोंची पाणीपट्टी थकली; दहा कार्यालयांना नोटीस

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पाणीपट्टीची लाखो रुपयांची थकबाकी असल्यामुळे महापालिका प्रशासनाने पहिल्या टप्प्यात दहा शासकीय कार्यालयांना नोटीस बजावली आहे. पाणीपट्टी तत्काळ न भरल्यास पाणीपुरवठा खंडित केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
थकबाकीदारांमध्ये विभागीय आयुक्तांच्या बंगल्याचा समावेश आहे. या बंगल्याकडे १२ लाख ३६ हजारांची थकबाकी आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ३ लाख १६ हजारांची थकबाकी आहे. मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेने मार्च महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात गती घेतली आहे. बड्या थकबाकीदारांकडून वसुली व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या शासकीय कार्यालयांची यादी पालिकेने तयार केली आहे. पहिल्या टप्प्यात दहा कार्यालयांना नोटीस बजावण्यात आली आहे. या दहा कार्यालयांकडे ७२ लाख ६७ हजार ७५७ रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीदारांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तांचे निवासस्थान असलेला गुलशन महल हा बंगला आहे.

बून स्कूल सील
मालमत्ता कराचे पंधरा लाख रुपये थकल्यामुळे महापालिकेच्या पथकाने जटवाडा रोडवरील बून स्कूलला सील ठोकले. बड्या थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्याचे आदेश आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिले होते. त्यानुसार सर्वच वॉर्ड अधिकाऱ्यांनी त्या दृष्टीने काम सुरू केले आहे. शनिवारी वॉर्ड ‘अ’ चे वॉर्ड अधिकारी भालचंद्र पैठणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दुपारी बुन स्कूलवर कारवाई केली. या शाळेकडे पंधरा लाख रुपये थकबाकी होती, त्यामुळे शाळा सील करण्यात आली. यावेळी पैठणे यांच्या बरोबर वामन कांबळे, अण्णा पवार, अविनाश मद्दी आदी कर्मचारी उपस्थित होते.
-
सरकारी थकबाकीदार
-
१) सह जिल्हा निबंधक नोंदणी कार्यालय - ४,०३,७८०
२) जिल्हाधिकारी कार्यालय - १ - ३,१६,५८६
३) विभागीय आयुक्तांचा बंगला गुलशन महल - १२,३६,३५५
४) जिल्हाधिकारी फाजलपुरा - ११,९४,२५०
५) जि. प. उपविभाग कार्यालय दिल्लीगेट - ३,३०,२७५
६) जिल्हा परिषद कार्यालय, दमडीमहल - १,४१,१२५
७) पंचायत समिती क्वार्टर्स - ४७,२५०
८) पंचायत समिती, दमडीमहल - ३,०२,९७५
९) विभागीय आयुक्त बंगल्याचे उद्यान - २०,६०,५५०
१०) आयुक्त कार्यालय (तार घर) - १२,३४,६११

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या ताब्यातून सराईत गुन्हेगार फरार

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चोरी, दरोडे, खुनाच्या प्रयत्नात गंभीर आरोप असलेला सराईत गुन्हेगार चिवा उर्फ एजाज ठकसेन काळे (रा. लक्ष्मी गायरान वाळूज, ता. गंगापूर) हा पोलिसांच्या ताब्यातून शनिवारी पावणेचारच्या सुमारास पसार झाला. आरोपीच्या शोधात पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
चिवा काळे एका खुनाचा प्रयत्नाप्रकरणी न्यायालयीन कोठडी होता. वाळूज पोलिस ठाण्यात एका चोरीच्या गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांनी गंगापूर कोर्टाकडे विनंती करून कोर्टाच्या आदेशानव्ये त्यास २४ मार्च रोजी हर्सूल कारागृहातून ताब्यात घेतले. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास पोलिस हेडकॉन्स्टेबल नंदकुमार आव्हाळे यांच्यासह वाहनचालक कोतकर, आवले आदी कर्मचाऱ्यांनी काळे यास घेऊन शासकीय वाहनाने ते गंगापूर कोर्टात पोचले. कोर्टाने काळेला पोलिस कोठडी सुनावली. गंगापूर येथील आरोपीची वैद्यकीय तपासून करून सर्वजण वाळूज पोलिस स्टेशनला निघाले. दुपारी पावणेचारच्या सुमारास वाहन वाळूज टोलनाका येथून जात असतानाच गतिरोधकामुळे गती कमी झाली. त्यावेळी गाडीचा मागील दरवाजा उघडला गेला आणि त्याचा फायदा घेत काळेने पोलिसांच्या हाताला झटका देऊन गाडीतून उडी घेत शेतातून पलायन केले. पोलिसांनी काळेचा सुमारे अडीच किलोमीटर पाठलाग केला, पण तो फरार झाला. तीन कर्मचारी मागील बाजूस बसले होते. सकाळी आरोपीला घेऊन जाताना अंमलदारच्या रुममधून हातकडी घेतली, पण त्यास चावी नव्हती. त्यामुळे आरोपीला दोरखंड लावून नेण्यात आले होते, असे समोर आले आहे. तसेच टू मोबाइल इनचार्ज पोलिस नाईक भाले हे सकाळी गाडीजवळ हजर नव्हते. कोर्टात जाण्यास उशीर होत होता, त्यामुळे अन्य कर्मचारी भाले यांना न घेताच कोर्टाकडे रवाना झाले होते. पोलिस हेडकॉन्स्टेबल केरे किरकोळ रजेवर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षा २६ ला; प्रश्नपत्रिका २७ ला घ्या

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
परीक्षा २६ ला आणि ऑनलाइन प्रश्नपत्रिका २७ ला डाऊनलोड करा, असे अजब परिपत्रक काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने कम्पुटर कोर्सच्या पदवीचे विद्यार्थी आणि कॉलेजांमध्ये गोंधळ उडवून दिला आहे.
विद्यापीठातर्फे १६ मार्चपासून पदवी परीक्षा घेण्यात येत आहेत. त्याचबरोबर ३० मार्चपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू आहेत. पदवी परीक्षेत परीक्षार्थीऐवजी डमी विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे प्रकार समोर आले. त्यासह राज्यशास्त्रातील प्रश्नपत्रिकेतील एकसारख्या प्रश्नामुळेही विद्यार्थी गोंधळले होते. अशाप्रकारांनी परीक्षा गाजत असतानाच आता रविवारी (२६ मार्च) होम सेंटरवर होत असलेल्या ‘कम्प्युटर कोर्स’ व ‘इनव्हार्मेंटल स्टडिज’चा पेपरबाबतच्या परिपत्रकावरून पुन्हा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. रविवारी सकाळी १० ते ११.३० व दुपारी २ ते ४ या वेळेत ही परीक्षा होमसेंटरवर होणार आहे. पेपर रविवारी आहे, त्याचवेळी परीक्षेची प्रश्नपत्रिका प्रत दिनांक २७ मार्च रोजी ८ ते ८.३० दरमयान महाविद्यालयाच्या लॉगिन आयडीवर उपलब्ध करून येईल, असे सांगण्यात आले आहे.
त्यामुळे प्रश्नपत्रिका केव्हा काढायची आणि परीक्षा केव्हा घ्यायची असा प्रश्न कॉलेजांसमोर आहे. विद्यापीठ प्राचार्याच्या इमेलवर परीक्षेच्या तास ते दीड तास आधी प्रश्नपत्रिका ऑनलाइन पाठवते. त्यासाठी स्वतंत्र लॉगीन आयडी देण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार त्याच्या छायांकित प्रती काढल्या जातात. गोपनियतेसाठी सीसीटीव्हीच्या निगरानीत ही प्रक्रिया करावी, असे निर्देश आहेत.

भ्रमणध्वनीलाही प्रतिसाद नाही ?
परिपत्रकात सूचना दिल्यानंतर विद्यापीठाने दोन जणांचे मोबाइल नंबर दिलेले आहेत. त्यावर अनेकदा फोन केल्यानंतरही प्रतिसाद मिळत नसल्याची चर्चा आहे. परिपत्रकातील वेळापत्रकाचा संभ्रम, त्यात प्रशासनाची दिरंगाई यामुळे परीक्षा सुरळीत होणार का ? हा प्रश्न विचारला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नीट परीक्षा केंद्रासाठी पाठपुरावा

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशभरात ७ मे २०१७ रोजी नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी नांदेड व लातूर येथे केंद्र देण्यासाठी मी स्वत: केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सतीश चव्हाण यांना दिली.
‘नीट’ परीक्षेसाठी मराठवाड्यात नांदेड व लातूर येथे केंद्र देण्यात यावे अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी १ मार्च रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. शुक्रवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘नीट’ परीक्षेसाठी देशभरात नवीन २३ परीक्षा केंद्र देण्याचा निर्णय घेतला. यात महाराष्ट्रातील अहमदनगर, अमरावती, कोल्हापूर व सातारा या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. मात्र यात मराठवाड्याच्या वाट्याला एकही नवीन केंद्र देण्यात आलेले नाही. यासंदर्भात शनिवारी (२५ मार्च) आमदार चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. नांदेड व लातूर येथे ‘नीट’ परीक्षेसाठी केंद्र देण्यात यावे, अश मागणी केली. यावेळी आमदार जयंत पाटील, आमदार अमरसिंह पंडीत यांची उपस्थिती होती.
आमदार चव्हाण म्हणाले, ‘नीट’ परीक्षेसाठी मराठवाड्यात औरंगाबाद हे एकमेव केंद्र आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा ते औरंगाबाद अथवा नांदेड जिल्ह्यातील किनवट ते औरंगाबाद अंतर जवळपास ५०० किलोमीटर असून येथील विद्यार्थ्यांना हा प्रवास करून परीक्षा द्यावी लागेल. तसेच विद्यार्थ्यांसोबत एक पालक व त्यांचा प्रवास, लॉजचा खर्च, परीक्षा शुल्क आदींचा विचार केला तर एका विद्यार्थ्याला जवळपास ८ ते १० हजारांचा आर्थिक भुर्दंड बसेल. मराठवाड्याला या परीक्षेसाठी नवीन केंद्र मिळाले नसल्याने मराठवाड्यातील विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असल्याचे त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

लातूर, नांदेडला केंद्र हवे
‘लातूर पॅटर्न’ने शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच नांदेड जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात दर्जेदार शिक्षण देणार्‍या संस्था तयार झाल्या आहेत. या दोन्ही जिल्ह्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात ‘नीट’चे परीक्षा केंद्र देणे अत्यंत गरजेचे आहे, आमदार चव्हाण यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले. तसेच यासंदर्भात आपण केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे देखील पुन्हा मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थी, पालकांचा संचालकांना घेराव

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
परीक्षा शुल्कानंतरही दंड आकारण्यात येत असल्याने संतापलेल्या विद्यार्थी, पालकांनी आज ‘इन्स्टिट्यूट ऑफ एअरक्राफ्ट मेंटनन्स इंजिनीअरिंग’च्या (आयएएमई) संचालकांना घेराव घातला. दंडापोटी अनेकांना परीक्षेपासून वंचित रहावे लागण्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला. काँग्रेसच्या शिष्टमंडळानेही याबाबत निवेदन देत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेण्याची मागणी केली.
शासकीय तंत्रनिकेतनच्या आवारात असलेल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ एअरक्राफ्ट मेंटनन्स इंजिनीअरिंग’मध्ये दंड आकारला जात आहे आणि दंड न भरल्याने परीक्षेस बसू दिले जात नसल्याचा आरोप करत एनएसयूआर व काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी, पालकांनी संचालकांना घेराव घातला. विलंब शुल्क म्हणून हजार रुपये आकारण्यात येत असल्याचा आरोपही एअरक्राफ्ट मेंटनन्स, बीएस्सीच्या विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थी अशाप्रकारचा कोणातही दंड भरणार नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. त्यानंतर संचालकांनी विलंब शुल्क घेतले जाणार नसल्याचे सांगितले. त्यासह कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे लेखी आश्वासन दिले. यावेळी एनएसयूआयचे सरचिटणीस शिवराज मोरे, दिग्विजय पाटील, बरकत पठाण, रोहित कांबळे, अफजल कादरी, ऋषी मिटकर, गणेश जाधव, जितू यादव आदींची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांची तक्रार आली की अतिरिक्त दंड आकारला जात आहे. त्यानंतर आम्ही संबंधित संचालकांना जाब विचारण्यासाठी गेलो. पालक, विद्यार्थ्यांनी त्यांची बाजू मांडली. दंड आकारणार नसल्याचे आणि कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही असे संस्थेच्या संचालकांनी लिहून दिले. - मुजाहिद पटेल, एनएसयूआय

ठराविक तारखेपर्यंत परीक्षा शुल्क न भरलेल्यांना दंड द्यावा लागतो. त्यावरून हा प्रश्न समोर आला. त्यात फारसे काही नाही. ज्यांनी परीक्षा दिली नाही, त्यांची परत परीक्षा घेतली जाईल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही. - राजेश तलवारे, संचालक, आयएएमई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉर्टफिल्म ठरणार कमाईचे माध्यम

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘नवोदित दिग्दर्शक-कलाकारांसाठी शॉर्टफिल्म पहिली पायरी असते. गेल्या काही वर्षात शॉर्टफिल्म निर्मितीचे प्रमाण वाढले आहे. शॉर्टफिल्म निर्मितीद्वारे उत्पन्न मिळावे आणि निर्माते पाठीशी उभे रहावेत यासाठी मराठी चित्रपट महामंडळ प्रयत्नशील आहे,’ असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केले. सातव्या क्लॅप शॉर्टफिल्म फेस्टिव्हलचे उदघाटन केल्यानंतर ते बोलत होते.
क्लॅप फाउंडेशनच्या वतीने सातवा क्लॅप शॉर्टफिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. या फेस्टिव्हलला शनिवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सुरुवात झाली. या उदघाटन कार्यक्रमाला मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, दिग्दर्शक अजित शिरोळे, परीक्षक गणेश मतकरी, सुचेता फुले, क्लॅपचे अध्यक्ष विनय जोशी व अक्षय वाळिंबे यांची प्रमुख उपस्थिती होती. शॉर्टफिल्म निर्मितीवर भाष्य करीत आगामी काळात शॉर्टफिल्म इंडस्ट्री वाढणार असल्याचे राजेभोसले म्हणाले. ‘महामंडळाचा अध्यक्ष झाल्यानंतर मागील वर्षभरात किमान ५० शॉर्टफिल्म फेस्टिव्हलचे उदघाटन केले. एवढी शॉर्टफिल्मची संख्या वाढली आहे, पण निर्मितीनंतर काहीच घडत नाही. वेबसिरीज शॉर्टफिल्मचे हक्क घेतील का याबाबत महामंडळ प्रयत्न करणार आहे. या माध्यमातून उत्पन्नाचा स्रोत तयार होईल. शॉर्टफिल्म मेकर्सच्या पाठीशी निर्माते उभे राहिल्यास या इंडस्ट्रीला वेगळा आयाम प्राप्त होईल. महामंडळाने घटनादुरुस्ती करून शॉर्टफिल्म मेकर्सला सभासदत्व देण्याची तयारी केली आहे. शॉर्टफिल्मच्या वितरणाबाबतही लवकरच योग्य निर्णय घेण्यात येईल,’ असे राजेभोसले म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची जोशी यांनी केले.

तरुणाईची गर्दी
शॉर्टफिल्म पाहण्यासाठी तरुण कलाकार, दिग्दर्शक, लेखक यांची गर्दी झाली आहे. पहिल्या दिवशी ‘मात’, ‘आय अॅम मोदी’, ‘एकलव्य’, ‘चिकाटी’, ‘होप’ या शॉर्टफिल्म दाखवण्यात आल्या. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता फेस्टिव्हल सुरू होणार असून दिवसभरात ३१ शॉर्टफिल्म दाखवल्या जाणार आहेत. औरंगाबाद शहरातील दर्जेदार शॉर्टफिल्म पाहण्याची रसिकांना संधी आहे. सायंकाळी पारितोषिक वितरण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगीकरणातून सिटी बस चालवा

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘खासगीकरणातून सिटी बस चालवा. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ आम्ही पुरवू,’ अशी सूचना परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना केली आहे. ही सूचना करताना त्यांनी सिटीबसच्या संदर्भात तीन पर्याय देखील पालिकेसमोर ठेवले आहेत. आता या पर्यायांवर विचार केला जाणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिवनाच्या संदर्भात शुक्रवारी मुंबईत पालकमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीला महापौर भगवान घडमोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, कार्यकारी अभियंता सिकंदर अली उपस्थित होते. ही बैठक झाल्यावर पदाधिकारी व अधिकारी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना भेटले. औरंगाबादमध्ये सिटीबस सुरू करण्याबद्दल त्यांनी रावते यांच्याशी चर्चा केली. एस. टी. महामंडळाने सिटीबस चालवावी अशी विनंती यावेळी करण्यात आली, पण रावते यांनी या संदर्भात अमर्थता दर्शवली. ‘एसटी महामंडळाची सिटीबस सेवा तोट्यात आहे. त्यामुळे महामंडळातर्फे सिटीबस चालवणे शक्य नाही. महापालिकेने खासगीकरणातून सिटीबस सेवा सुरू करावी, त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ आम्ही पुरवू,’ असे रावते यांनी सांगितल्याचे उपमहापौर स्मिता घोगरे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिकेला सिटी बस सुरू करण्याबाबत तीन पर्याय दिले आहेत. या पर्यायांचा विचार करून सविस्तर प्रस्ताव सादर करा, असे आदेश रावते यांनी दिले आहेत. या संदर्भात महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे.

रावतेंचे तीन पर्याय
१) एसटीच्या बस खरेदी कराव्यात किंवा भाडे द्यावे.
२) महापालिकेने बस खरेदी करून त्या चालवाव्यात.
३) बीओटीच्या माध्यमातून सिटीबस चालवावी.

स्मार्ट सिटीच्या प्रकल्पात उल्लेख
स्मार्ट सिटीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रकल्पात सिटी बस सेवा सुरू करण्याचा उल्लेख आहे. तिन्हीपैकी कोणत्याही पर्यायाच्या आधारे सिटीबस सेवा सुरू झाली, तर स्मार्ट सिटीच्या प्रकल्पातील एक टप्पा पूर्ण केला जाऊ शकतो असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगररचना कारभाराचे संगणकीकरण करा

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘बांधकाम परवानगीसह नगररचना विभागातील सर्व प्रक्रियांचे आठ दिवसात संगणकीकरण करा,’ असा आदेश महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी शनिवारी नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना दिला.
शासनाने विविध प्रकारच्या अकरा सुविधांचे संगणकीकरण करून त्या ऑनलाइन करण्याचे आदेश २०११मध्येच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले, पण पालिकेच्या नगररचना विभागाने त्याचे अद्याप पालन केले नाही. आता पालिकेला या आदेशानुसार बांधकाम परवानगीसह जन्म - मृत्यू प्रमाणपत्र, फायर एनओसी, भोगवटा प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्रांचा ऑनलाइन द्यावी लागतील. संगणकीकरण व ऑनलाइन प्रमाणपत्रांच्या संदर्भात बकोरिया यांनी शनिवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. संगणकीकरणाच्या संदर्भात लेखा विभाग व नगररचना विभागाने फार काही काम केले नसल्याचे यावेळी लक्षात आले.
‘नगररचना विभागाने संगणकीकरणाची प्रक्रिया आठ दिवसांत ऑनलाइन करावी व त्याचा अहवाल सादर करावा. सुटीच्या दिवशी नगररचना विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना बोलवा. त्यांना संगणकीकरणाचे प्रशिक्षण द्या. सहा वर्षात संगणकीकरणाचे काहीच कसे काम केले नाही,’ असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलकुंभाचे काम वेगात

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘शिवाजीनगर जलकुंभाच्या क्रॉस कनेक्शनचे काम वेगात सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर पंधरा दिवसात जलकुंभाचे लोकार्पण होऊ शकते,’ अशी माहिती उपमहापौर स्मिता घोगरे यांनी शनिवारी दिली. या जलकुंभातून पाणीपुरवठा सुरू झाल्यावर सात वॉर्डांना लाभ होणार आहे.
शिवाजीनगर जवळ असलेल्या देशमुखनगरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून जलकुंभाचे बांधकाम करण्यात आले आहे. २००६मध्ये हे बांधकाम पूर्ण झाले. महापालिकेने पाण्याची कमतरता असल्याचे कारण सांगून जलकुंभ ताब्यात घेण्यास टाळाटाळ केली. राजेंद्र जंजाळ सभागृहनेते असताना त्यांनी महापालिकेला तो जलकुंभ जीवन प्राधिकरणाकडून ताब्यात घेण्यास भाग पाडले. जलकुंभ ताब्यात घेतल्यावर त्याच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची सूचना केली. दरम्यानच्या काळात स्मिता घोगरे उपमहापौर झाल्या. त्यांनीही पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून जलकुंभाच्या क्रॉस कनेक्शनचे काम करण्यास भाग पाडले. ‘सध्या हे काम वेगात सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर जलकुंभाची चाचणी घेतली जाईल. त्यानंतर जलकुंभाचे लोकार्पण केले जाईल,’ असे घोगरे यांनी सांगितले.

बिडकीन जवळ जलवाहनी फुटली
गळत्या बंद करण्यासाठी आठ-आठ दिवसांच्या अंतराने पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शटडाऊन घेतले. दोन्हीही शटडाऊनमुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. दोन दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत असताना शुक्रवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास बिडकीन जवळ ७०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी जायकवाडीहून ७०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहनीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. शनिवारी दिवसभर दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे रविवारी जुन्या शहरातील अनेक वसाहतींमध्ये पाणीपुरवठा होण्याची शक्यता नाही, असे पाणीपुरवठा विभागातर्फे कळवण्यात आले आहे.

या वसाहतींना लाभ
- गारखेडा वॉर्ड क्रमांक ९६
- रामकृष्णनगर वॉर्ड क्रमांक ९७
- देवानगरी वॉर्ड क्रमांक १०९
- मयूरबन कॉलनी वॉर्ड क्रमांक ११०
- प्रियदर्शनीनगर वॉर्ड क्रमांक १११
- शिवाजीनगर वॉर्ड क्रमांक ११२
- भारतनगर वॉर्ड क्रमांक ११३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images