Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

२७८ कॉलेजांना नोटीस

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उत्तरपत्रिकांची तपासणी न करता गठ्ठे परत पाठविणाऱ्या विभागातील अशा २७८ कॉलेजांना माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने कारणे दाखवा नोटीस दिली आहे. बारावीची परीक्षा संपल्यानंतरही गठ्ठे परत येण्याचे सत्र सुरूच आहे. संबंधित कॉलेजांमधील विद्यार्थ्यांचे निकालही राखीव ठेवण्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षा २८ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान झाल्या. बारावी उत्तरपत्रिकांच्या तपासणीला अनुदानित महाविद्यालयासह विनाअनुदानित महाविद्यालयांतील शिक्षकांनीही नकार दिला. १५ मार्च रोजी अनुदानित शिक्षकांनी आंदोलन मागे घेतले. विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलनही कोठे सुरू कोठे बंद असे आहे. त्यात अद्याप उत्तरपत्रिका परत येण्याचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे ज्या कॉलेजांकडून उत्तरपत्रिका तपासणीविना परत येत आहेत, अशा कॉलेजांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. त्यात सर्वाधिक उत्तरपत्रिका बीड जिल्ह्यातून परत येत असल्याचे मंडळातील सूत्रांनी ‘मटा’ला सांगितले.

नोटीसमध्ये काय?
महाराष्ट्र खासगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ अनुसूची ‘अ’मधील नियम क्रमांक २२(१) मधील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकरिता विहित केलेल्या कर्तव्यानुसार विभागीय मंडळाकडून सोपविलेली परीक्षेच्या संदर्भातील कोणतेही काम करणे हे त्यांचे कर्तव्य ठरले. तसेच मंडळ नियम क्रमांक ६७ मधील १८नुसार विभागीय मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी कनिष्ठ महाविद्यालयात जरूर त्या सर्व सोयी व कर्मचारी वर्गाच्या सेवा देवू करील, असा उल्लेख असताना परीक्षण न करता परत पाठविल्या आहेत. त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या व कालमर्यादित कामामध्ये व्यत्यय निर्माण झालेला आहे. मंडळास असहकार्य करून व आपल्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे मार्च २०१७चा निकाल राखीव का ठेवू नये आणि मंडळ मान्यता का काढून घेऊ नये,’ असे म्हटले आहे.

उत्तरपत्रिका न तपासता परत आल्या आहेत. ज्या कॉलेजांमधून या उत्तरपत्रिका परत आल्या आहेत, तशांना नोटीस पाठविल्या आहेत. संबंधित शिक्षकांनाही नोटीस देण्याची प्रक्रिया केली जाईल. - वंदना वाहुळ, विभागीय सचिव, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उत्तरपत्रिका तपासणीचे ८४२ गठ्ठे मंडळाकडे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे नियोजन करताना दमछाक उडाली आहे. उत्तरपत्रिका न तपासताच मंडळाकडे ८४२ गठ्ठे परत आले आहेत.
उत्तरपत्रिका तपासणीला अनुदानित महाविद्यालयासह विनाअनुदानित महाविद्यालयांतील शिक्षकांनीही नकार दिला होता. अनुदानित शिक्षकांनी आंदोलन मागे घेतले, तर विनाअनुदानित शिक्षकांपैकी अनेक जिल्ह्यात तपासणीवरील बहिष्कार सुरू आहे. निश्चित केलेल्या तपासणी केंद्रावर उत्तरपत्रिकांचे बंडल व संबंधित विषयनिहाय शिक्षकांची यादी उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठविण्यात आली. मात्र, गठ्ठे तपासणीविना परत येत असल्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे हे गठ्ठे पुन्हा संबंधित शिक्षकांकडे तपासणीसाठी पाठविण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागते आहे. तर, शिक्षकांच्या या असहकारामुळे निकाल लांबणीवर जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

बैठकांचे सत्र
औरंगाबाद विभागात उत्तरपत्रिका तपासणीवरील संकट अधिक असल्याचे स्पष्ट झाले. त्यात विभागात विनाअनुदानित शिक्षकांची संख्या मोठी. त्यामुळे विषयनिहाय शिक्षकांच्या बैठका घेत, तपासणीवरील संकट दूर करण्याचे प्रयत्न मंडळ करत आहे. बुधवारी विभागीय सचिवांनी जालन्यात शिक्षकांची बैठक घेत, उत्तरपित्रका तपासणीबाबत सूचना दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील ६५ शाळा संचमान्यतेच्या प्रतीक्षेत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या धोरणानुसार ३० सप्टेंबरपूर्वी राज्यभरातील शाळांनी ऑनलाइन संचमान्यता सादर केल्या होत्या. औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ अनुदानित प्राथमिक शाळांच्या संचमान्यता पुण्यातील संचालक कार्यालयास अद्याप सापडलेल्या नाहीत. त्यामुळे या शाळा तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
राज्यभरातील अनुदानित, विनाअनुदानित, सरकारी, जिल्हा परिषद शाळांची दरवर्षी ३० सप्टेंबर रोजी संचमान्यता सादर करावी लागते. शाळेत किती शिक्षक आहेत ? विद्यार्थी संख्या किती ? विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षकांची संख्या बरोबर आहे की नाही ? अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांची संख्या आदी माहिती सादर करावी लागते. या प्रक्रियेत पारदर्शकता राहावी, यासाठी शालेय शिक्षण विभागाने गेल्यावर्षीपासून संचमान्यता ऑनलाइन सादर करण्याचे आदेश दिले होते. शाळांनी ही माहिती मुदतीच्या आत पाठविणे आवश्यक होते. औरंगाबाद जिल्ह्यातील बहुतांश शाळांनी संचमान्यता सादर केली. त्याची छाननी पुण्यातील शिक्षण संचालक कार्यालयामार्फत केली जाते. जानेवारी महिन्यात औरंगाबाद जिल्हा परिषदेने संचालक कार्यालयास पत्र पाठवून १२५ शाळांच्या संचमान्यता सापडत नसल्याचे कळविले होते. गेल्या दोन महिन्यांत काही शाळांच्या संचमान्यता सापडल्या. तांत्रिक अडचणीमुळे संचमान्यता सापडत नसल्याचे सांगण्यात आले होते. सूत्रांनी, दिलेल्या माहितीनुसार अद्याप ६५ शाळांच्या संचमान्यता संचालक कार्यालयास ऑनलाइन सापडलेल्या नाहीत. त्यामुळे या शाळांची पुढची प्रक्रिया रखडली आहे. शाळांची संचमान्यता न सापडल्याने या शाळांमधील शिक्षक संख्या, अतिरिक्त शिक्षक काही ठरत आहेत की नाही ? याची माहिती प्राप्त झालेली नाही. जर ही माहिती उशिराने मिळाली, तर अतिरिक्त शिक्षकांच्या समयोजनाच्या प्रश्न भेडसावणार आहे. मुदतीच्या आत समायोजन झाले नाही तर अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना बसून पगार द्यावा लागणार आहे. एकूणच ऑनलाइन संचमान्यता न सापडल्याने पुढील काळात जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग अधिक अडचणीत सापडणार आहे. जिल्ह्यात २८३ अनुदानित प्राथमिक शाळा असून त्यापैकी ६५ शाळांची अडचण आहे.

झेडपीच्या शाळांची संचमान्यता पूर्ण
जिल्हा परिषदेच्या शाळांची संचमान्यता प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या २०९० शाळांची संचमान्यता पूर्ण झाली. त्यात ५५ माध्यमिक शाळांचा समावेश आहे. झेडपी अंतर्गत अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन करण्याची तरतूद आहे. त्यामुळे प्राथमिक विभागासाठी मंजूर असलेल्या ९,३२८ पदांमध्ये हे समायोजन शक्य होऊ शकते. माध्यमाकि शाळांचे ९० शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यांचेही समायोजन करण्यात आले आहे. मात्र, खासगी शाळांच्या बाबतीत संचमान्यता न सापडल्याने अडचण येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार हजारांची लाच घेताना बांधकाम लिपिक जाळ्यात

$
0
0


औरंगाबाद : महिलेच्या औषधोपचार बिलाच्या मंजुरीसाठी चार हजारांची लाच स्वीकारणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ पकडले. विठ्ठलसिंग बजरंगसिंग मुराडे असे त्याचे नाव आहे.
फिर्यादी सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत जालना येथील कार्यालयात नोकरी करतात. त्यांनी जालना येथील कार्यकारी अभियंता कार्यालयमार्फत पत्नीचे औषधोपचाराचे वैद्यकीय बिल औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांना मंजुरीसाठी सादर केले होते. बिल मंजुरीचे कामकाज कार्यालयातील वरिष्ठ लिपिक मुराडे यांच्याकडे होते. तक्रारदार यांना पैशांची आवश्यकता असल्याने ते बिल मंजुरीसाठी मुराडे यांना भेटले. तेव्हा मुराडे यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास त्यात त्रुटी काढून परत पाठवण्याची धमकी दिली. तडजोडीअंती चार हजार रुपये देण्याचे ठरले, पण लाच देण्याची इच्छा नसल्याने फिर्यादीने लिपिकाविरुद्ध जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक प्रवीण मोरे, पोलिस निरीक्षक व्ही. एल.चव्हाण, कर्मचारी संजय उदगीरकर, गंभीर पाटील, महेंद्र सोनवणे आणि रमेश चव्हाण यांनी सापळा रचला आणि दुपारी लाचेची रक्कम स्वीकारताना मुराडेला रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुध्द क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती उपअधीक्षक मोरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेची आउटसोर्सिंगवर मदार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
फसलेल्या नियोजनामुळे महापालिकेचे चाक आर्थिक आरिष्टाच्या गर्तेत रुतले आहे. त्यामुळे खर्चाला कात्री लावण्यासाठी थेट नोकर भरती न करता आउटसोर्सिंगच्या माध्यमातून कर्मचारी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी अर्थसंकल्पात १५ कोटींची तरतूद केली आहे.
नगरपालिका अस्तित्वात असताना आणि त्यानंतर १९८२मध्ये महापालिका स्थापन झाल्यावर नोकर भरती करण्यात आली. त्यानंतर २००४-२००५च्या दरम्यान ११२४ चतुर्थश्रेणी कर्मचारी पालिकेच्या अस्थापनेवर नियुक्त करण्यात आले. या भरतीनंतर महापालिकेत चतुर्थश्रेणी कर्मचारी वगळता कोणत्याही प्रकारची भरती झाली नाही. त्यावेळी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी - कर्मचारी आता निवृत्त होत आहेत. महापालिकेचा अस्थापनेवरील खर्च चाळीस टक्क्यांच्या घरात आहे. शासनाच्या निकषानुसार हा खर्च ३५ टक्क्यांपेक्षा कमी असला पाहिजे. गेल्या काही वर्षांत अस्थापनेवरचा खर्च कमी होण्यापेक्षा वाढू लागला आहे. त्यामुळे निवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जागी नव्याने भरती करून कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करणे महापालिकेला शक्य नाही, त्यातच महापालिकेचा नोकर भरतीचा आकृतीबंध शासनाने अद्याप मंजूर केला नाही. त्यामुळे आउटसोर्सिंग शिवाय महापालिकेच्या प्रशासनासमोर पर्याय राहिलेला नाही. या संदर्भातील भूमिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प मांडताना स्पष्ट केली. ‘पालिका अस्थापनावर सध्या ४१४४ कर्मचारी आहेत, त्यांच्या पगाराचा खर्च चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे. कर्मचारी निवृत्त होत असल्यामुळे मनुष्यबळ देखील कमी होऊ लागले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी आउटसोर्सिंगचा पर्याय निवडला आहे. आवश्यक त्या ठिकाणी आउटसोर्सिंगच्या माध्यमातून अधिकारी - कर्मचारी नियुक्त केले जातील. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया देखील पूर्ण केली जाईल,’ असे बकोरिया यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक्स-रे’सह ‘सिटी स्कॅन’मध्ये बिघाड

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) चारपैकी एक एक्स-रे मशीन बंद पडले असतानाच, दोनपैकी एक सिटी स्कॅन मशीनही सोमवारपासून (२७ मार्च) बंद पडली. परिणामी, दोन्ही मशीन सुरू होण्यासाठी किमान एप्रिल महिना उजाडेल. तोपर्यंत रुग्णांना अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
घाटीच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये (ओपीडी) एक एक्स-रे मशीन आहे, तर इतर तीन एक्स-रे मशीन या ‘सर्जिकल बिल्डिंग’मधील वॉर्ड क्रमांक ११ समोरील क्ष-किरण विभागात आहेत. याच वॉर्डातील एक मशीन बंद पडली आहे. बंद पडलेल्या एक्स-रे मशीनची ट्यूब गेली आहे आणि संबंधित मशीनच्या दुरुस्तीचा कंपनीशी करार झालेला नसल्याने ट्यूबची स्वतंत्र मागणी देऊन मशीनची दुरुस्ती करावी लागणार आहे. हे काम मार्चनंतरच होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे आधीच चार मशीनवर असलेला रुग्णांचा भार आता तीन मशीनवर आणखी वाढणार आहे. त्यातच हे बंद पडलेले मशीन निदान एप्रिल महिन्यात तरी सुरू होणार का, अशी शंकादेखील उपस्थित केली जात आहे. दरम्यान, क्ष-किरण विभागातील एक्स-रे मशीनसोबतच ६ स्लाइस सिटी स्कॅन मशीनमध्येही किरकोळ बिघाड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सध्या ६४ स्लाइस सिटी स्कॅन मशीनवर रुग्णांच्या चाचण्या केल्या जात आहे. अर्थातच, रुग्णांना सिटी स्कॅनसाठी आता अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. घाटीमध्ये येणाऱ्या रुग्णांसह शासकीय विभागीय कर्करुग्णालयातील (शासकीय कॅन्सर हॉस्पिटल) अनेक कर्करुग्णांनाही सिटी स्कॅन करावे लागते आणि त्यामुळे घाटीमध्ये सिटी स्कॅन सांगण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ही नेहमीच जास्त असते.

‘सिटी स्कॅन’मध्ये वारंवार बिघाड
घाटीतील सिटी स्कॅन मशीनमध्ये वारंवार बिघाड होतात आणि वर्षातील कित्येक दिवस हे मशीन बंदच असते, असेही दिसून येत आहे. क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात तपासण्या कराव्या लागत असल्याने मशीनवर ताण येतो आणि मशीनमध्ये छोटे-मोटे बिघाड हमखास होतात, असेही सांगण्यात आले. त्यातच क्ष-किरण विभागातील सिटी स्कॅन किंवा अन्य उपकरणांच्या सुट्या भागांची किंवा ट्यूबची किंमत लाखांमध्ये असल्याने आणि त्याच विशिष्ट कंपनीचे सुटे भाग आवश्यक ठरत असल्याने मशीन दुरुस्तीसाठी जास्त वेळ लागतो, असेही सांगण्यात आले.

‘कॅन्सर’मध्ये हवे सिटी स्कॅन
शासकीय कर्करुग्णालयातील सुमारे ३० टक्के कर्करुग्णांना उपचार सुरू करण्यापूर्वी किंवा उपचारादरम्यान किंवा उपचार झाल्यानंतर सिटी स्कॅन चाचणी आवश्यक ठरते. मात्र, कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन मशीन उपलब्ध नसल्याने अशा रुग्णांना चाचणीसाठी घाटीमध्ये जावे लागते. त्यामुळेही घाटीच्या सिटी स्कॅन मशीनवर रुग्णांचा ताण आहे. गंभीर-अत्यवस्थ कर्करुग्णांची काही दिवसांत ही चाचणी केली जात असली, तरी एरवी स्थिर प्रकृती असणाऱ्या कर्करुग्णांनाही किमान आठवडा-दोन आठवडे प्रतीक्षा करावी लागते आणि इतर रुग्णांना तर आणखी प्रतीक्षा करावी लागते, असेही सूत्रांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर कॅन्सर हॉस्पिटलमध्ये तातडीने सिटी स्कॅन, एमआरआय मशीन उपलब्ध करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्याचे साडेअकरा कोटी थकित

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बहुप्रतीक्षीत जळगाव रोड आणि पैठण रोडची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाने यंदा केली. कित्येक वर्षांपासून या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळत नव्हता. रस्तेदुरुस्तीचे आदेश देऊन कामेही सुरू करण्यात आली, पण आता कंत्राटदाराचे पैसे देण्यासाठी स्थानिक पीडब्ल्यूडी कार्यालयाकडे निधी उपलब्ध नाही.
औरंगाबाद - जळगाव रस्त्याच्या डांबरीकरण मजबुतीकरणाच्या कामाची सुरुवात २०१५ च्या ऑक्टोबर महिन्यात झाली. संपूर्ण रस्त्याचे खड्डे बुजविणे आवश्यक त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे थर असे निविदेत नमूद केले होते. मूळ मंजूर रकमेपेक्षा कमी दराने निविदा मंजूर झाली. कंत्राटदाराने काम सुरू करण्यापूर्वीच त्याची काही राजकीय मंडळींनी तक्रार केली. मुळात हे काम मर्जीतील ठेकेदाराला न मिळाल्याची नाराजी राजकीय पक्षांमध्ये होती. त्यानंतर डांबर निर्मितीचा प्लांट टाकण्यासाठी विलंब झाल्याने जळगाव रस्त्याच्या दोन टप्प्यांचे काम रखडले होते. गेले दीड वर्षे हे काम सुरू आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार पुढच्या टप्प्यांची कामे सुरू आहेत. आता अंतिम टप्प्यात औरंगाबाद तालुक्यातील डांबरीकरणाचे काम सुरू आहे. पैठण रस्त्याची दुरुस्ती हा सुद्धा जळगाव रस्त्याप्रमाणेच महत्वाचा विषय होता. ४२ कोटी रुपये चार टप्प्यांतील मजबुतीकरणासाठी मंजूर केले गेले. बिडकीन ते पैठण रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. या रस्त्यासाठीही कंत्राटादाराला रस्त्यालगत प्लांट टाकण्याची अट होती. बिडकीन जवळ प्लांट टाकला गेला. पण वीज कनेक्शन मिळविण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी गेला होता.
सर्व अडचणी दूर झाल्यानंतर या रस्त्याचे मजबुतीकरण आवश्यक त्या ठिकाणी विस्तारीकरण झाले. आता डांबरीकरणाचा शेवटचा थर टाकावयाचा आहे. चौथ्या टप्प्यात महानुभाव आश्रम ते ए.एस. क्लब लिंक रोडपर्यंत सहापदरी सिमेंटीकरण करण्यात येणार आहे. त्याचे काम काही दिवसांत सुरू होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत प्रवेशात तब्बल ४७ शाळा ‘ऑफलाइन’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘आरटीई’ अंतर्गत मोफत प्रवेशासाठीची मार्च संपत आला, तरी पहिलीच फेरी संपलेली नाही. प्रवेशाची सोडत झाल्यानंतर २४ मार्चपर्यंत शाळांना प्रवेशित विद्यार्थ्यांची यादी शिक्षण विभागाला सादर करायची होती. मात्र, अद्याप ४७ शाळांनी किती प्रवेश दिले याची माहितीच सादर केली नाही. शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे ५,३७० पैकी अद्याप केवळ १७३४ प्रवेश होऊ शकले आहेत.
बालकांच्या मोफत व सक्तीचा शिक्षण कायद्यानुयार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळेत २५ टक्के प्रमाणात मोफत प्रवेशाची प्रक्रिया फेब्रुवारीपासून सुरू आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेनंतर ६ मार्चला ऑनलाइन सोडत काढण्यात आली. ५५५१ जागांसाठी ८५६६ विद्यार्थी रांगेत आहेत. योजनेत पूर्वीच शाळांनी प्रवेशस्तरामध्ये सोयीचा पर्याय निवडल्याचा पालकांचा आरोप असताना, सोडतीनंतरही पहिलीच प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. सोडतीत मिळालेल्या शाळेत प्रवेशित होण्याची प्रक्रिया पालकांसाठी १८ मार्चपर्यंत होती.
या प्रक्रियेत नेमके किती प्रवेश झाले हे शाळांना शिक्षण विभागाकडे २४ मार्चपर्यंत नोंदी द्यायच्या होत्या. मात्र, अद्याप अनेक शाळांनी त्याबाबत माहिती दिलेली नाही. जिल्ह्यातील ४६९ पैकी ४७ शाळांनी हे अहवाल सादर केले नसल्याचे ‌शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. हे अहवाल न आल्याने प्रवेश प्रक्रियेतील दुसरी फेरीही अडचणीत सापडली आहे. तर, ही प्रक्रिया केव्हा सुरू होणार याची प्रतीक्षा पालकांना आहे.

१६ शाळांचा समावेश
मोफत प्रवेशासाठी सोडतीत पूर्व प्राथमिक व पहिलीसाठीच्या एकूण ५५५१ जागांवर प्रवेश दिले जाणार हे स्पष्ट करण्यात आले. त्यासाठी जिल्ह्यातून ८५६६ विद्यार्थी रांगेत आहेत. सोडतीनंतर नॅशनल इन्फॉरर्मेशन सेंटर (एनआयसी) सॉफ्टवेअरच्या मदतीने ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. परंतु, अद्याप पहिलीच फेरी न संपल्याने दुसऱ्या फेरीवर प्रश्नचिन्ह आहे. ज्या ४७ शाळांनी प्रवेशाचे अहवाल दिले नाहीत, त्यात शहरातील १६ शाळांचा समावेश असल्याचा सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उत्तरपत्रिका रामभरोसे!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वर्षभर डोळ्यात तेल घालून विद्यार्थी दहावी, बारावीचा अभ्यास करतात. मात्र, उत्तरपत्रिका तपासणीवेळी या गठ्ठ्यांची वाहतूक करण्यासाठी शिक्षण मंडळ चक्क दुचाकी गाड्या वापरण्याचा पराक्रम करते. या बेपर्वा कृत्यामुळे उत्तरपत्रिका सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यात बारावीच्या परीक्षा संपल्या, तर दहावीच्या परीक्षेत १ एप्रिलला शेवटचा पेपर आहे. उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार याची चर्चा सुरू असतानाच उत्तरपत्रिकांच्या ने-आण करण्यासाठीची व्यवस्था सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सक्षम नसल्याचे चित्र आहे. करिअरसाठी अत्यंत महत्त्वाच्या या परीक्षेसाठी वर्षभर डोळ्यात तेल घालून अभ्यास करणारे विद्यार्थ्यांचे निकालाकडे लक्ष लागते. परीक्षेतील या उत्तरपत्रिका तपासणीसाठी तपासणीवर सेंटरवर अक्षरशः दुचाकीवरून घेऊन जात असल्याचे चित्र आहेत. विशेष म्हणजे मंडळ कार्यालयाबाहेरच दुचाकीवर हे गठ्ठे गाडीवर ठेवलेले पाहायला मिळतात. तपासणीनंतर ही गठ्ठे मंडळाकडे जमा केले जातात. तपासणीसाठी नेणे आणि तपासल्यानंतर परत करण्याची यंत्रणा अशा प्रकारची असल्याने उत्तरपत्रिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ‌उभा राहतो.

मंडळ कार्यालयाचे दुर्लक्षच
उत्तरप‌त्रिकांचे वितरण मंडळाने निश्चित केलेल्या कस्टडीतून होते. बहिष्कार असल्याने अनेक शाळा, कॉलेजांमधून तपासणीविना शेकडो उत्तरपत्रिकांचे गठ्ठे मंडळात परत आले. ते तपासणीसाठी संबंधित शिक्षकाकडे परत पाठविण्याची व्यवस्थाच मंडळाकडे नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे संबंधित प्राचार्य, शिक्षकच तपासणीसाठी गठ्ठे दुचाकीवरच घेऊन जातात. त्यासह तपासणीनंतर उत्तरपित्रकाही अनेकदा अशाच प्रकारे परत आणल्या जातात. अशावेळी चुकीने एखादा गठ्ठा गहाळ झाला, तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

परीक्षा केंद्राहून उत्तरपत्रिका कस्टोडियनकडे जातात. तेथून संबंधित वितरण केंद्रावर पोस्टाने जातात. परंतु, परत आलेले गठ्ठे आम्ही येथून वितरित करतो. ते गहाळ होऊ नयेत ही जबाबदारी असतेच. या सगळ्या उत्तरपत्रिका पाकिटबंद असतात. त्या कोणाला कळतही नाहीत. जे उत्तरपत्रिका नेतात, त्यांनी अतिशय काळजीपूर्वक आणि सुरक्षित न्यायलाच हव्यात. गहाळ होऊ नयेत ही काळजी आम्ही घेतोच. - शिशीर घोनमोडे, विभागीय अध्यक्ष, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंपनी सेक्रेटरींची देशात मोठी गरज

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘वाढते औद्योगिकरण आणि त्याच्याशी निगडित प्रकरणे लक्षात घेता आपल्या देशात कंपनी सेक्रेटरींची मोठी गरज असल्याचे इन्स्ट‌िटयूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्याम अग्रवाल यांनी गुरुवारी (३० मार्च) पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
अग्रवाल म्हणाले, ‘देशात कंपन्यांची संख्या वाढते आहे आणि त्यांच्या खटल्यांची संख्याही. आगामी काळात कंपन्यांच्या कायदेशीर बाबींची पूर्तता आणि त्याच्या संबंधीचे काम पाहण्यासाठी देशात कंपनी सेक्रेटरींची अधिक गरज भासणार आहे. डेब्ट रिकव्हरी ट्रीब्युनलकडे सध्या सुमारे एक लाख खटले प्रलंबित आहेत.
ता सरकारने नॅशनल कंपनी लॉ ट्रीब्युनल स्थापन केल्याने यातील सुमारे २० हजार खटले हे या ट्रीब्युनलकडे वर्ग करण्यात येतील. कंपन्या आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या कायद्यांची माहिती असलेली व्यक्ती ही कंपनी सेक्रेटरी असल्याने यात त्यांनाही खटले लढवता येणार आहेत. याशिवाय कंपनी सुरू करण्यापासुन ती बंद करेपर्यंत कंपनी सेक्रटरीजची गरज आहे,’ असे अग्रवाल म्हणाले.

स्वतंत्र कोर्स
‘औरंगाबादेत या संस्थेशी १७०० विद्यार्थी आणि १०० सदस्य निगडित आहेत. प्रत्यक्ष कामाचा अनुभव यायला हवा यासाठी ९० दिवांसांचा एक स्वतंत्र कोर्स सुरू करण्यात येणार आहे. या कंपनी सेक्रेटरीचा डिसेंबर २०१७पर्यंत अभ्यासक्रम बदलण्यात येईल,’ अशी माहिती राज्य इन्स्टीट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष प्रकाश पांड्या यांनी दिली. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष मकरंद लेले यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्याने उत्तरपत्रिका फाडली

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पैठण
‘बीएससी’च्या द्वितीय वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याने स्वतःची उत्तपत्रिकाच फाडल्याची घटना गुरुवारी प्रतिष्ठान महाविद्यालयात घडली. केंद्र प्रमुखाने त्रास दिल्याने हे कृत्य केल्याचे विद्यार्थ्याचे म्हणणे आहे.
शहरातील प्रतिष्ठान महाविद्यालयात बीएससीच्या द्वितीय वर्षात शिकणारा सुनील (नाव बदलले आहे) हा विद्यार्थी गुरुवारी प्रतिष्ठान महाविद्यालयात फिशरी या विषयाचा पेपर देण्यासाठी गेला होता. परीक्षा सुरू असताना सुनीलने उत्तरपत्रिका फाडली. केंद्रप्रमुखांनी परीक्षा हॉलमध्ये माझा मानसिक छळ केल्याने तणावात उत्तरपत्रिका फाड़ण्याचे कृत्य माझ्या हातून घडल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, सुनीलकडे परीक्षा सुरू असताना मोबाइल सापडला. त्याने कारवाई टाळण्यासाठी उत्तरपत्रिका फाडण्याचे गैरकृत्य केले. त्याचा कोणत्याही प्रकारचा मानसिक छळ केला नाही, असे केंद्रप्रमुखांनी सांगितले. उत्तरपत्रिका फाडण्याचा प्रकरणाची तक्रार पैठण पोलिस स्टेशनमध्ये देण्याचा प्रयत्न केला असता, या प्रकरणात विद्यापीठ कायद्यानुसार कारवाई करा, असा सल्ला पैठण पोलिसांनी प्रतिष्ठान महाविद्यालय प्रशासनाला दिल्याचे समजते.

परीक्षा केंद्र प्रमुखांचा याबाबत संपर्क झाला. पोलिसात तक्रार देण्यासाठी ते गेले होते. मात्र, त्यांनी तक्रार घेतली नाही. तुम्हीच कारवाई करा असा सल्ला दिला. त्याबाबत आम्ही त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविणार आहोत. संबंधित विद्यार्थ्यावर विद्यापीठ नियमानुसार कारवाई निश्चित होईल. - डॉ. दिगंबर नेटके, परीक्षा नियंत्रक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुकुल पद्धतीतील शिक्षण अतिउत्तम

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘गुरुकुल पद्धतीतील शिक्षण सध्या दिले जात नाही, पण तीच पद्धत योग्य आणि आयुष्याच्या वाटेवर फलदायी आहे,’ असे मत ज्येष्ठ मॅनेजमेंटगुरू, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योजक डॉ. गणेश नटराजन यांनी गुरुवारी व्यक्त केले. ते औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशनने आयोजित केलेल्या ४३ व्या रेअरशेअर कार्यक्रमात बोलत होते.
देवगिरी महाविद्यालयातील विश्वकर्मा हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक ऋषी बागला होते. यावेळी सतीश कागलीवाल, एएमएचे अध्यक्ष सी. पी. त्रिपाठी उपस्थित होते. नटराजन म्हणाले, ‘मी बिहारसारख्या राज्यात एका शहरातून आलो. माझे मेकॅनिकल इंजिनिरिंग झाले. त्या नंतर मॅनेजमेंट आणि इतर शिक्षण घेत गेलो. ‌आमचे कुटुंब तसे मध्यमवर्गीय. घरात कमावणारे वडील एकटे व खाणारे तोंड सहा. यामुळे सातत्याने सर्वसामान्य कुटुंबाचे जीवन अनुभवायला आले. वड‌ील रामकृष्ण मिशनमध्ये जात होते, पण मी स्वतः इंग्लिश मीडियममधून शिक्षण घेतले. इंग्लिश सुधारली. शाळा कॉलेजपेक्षा कुतूहलातून मिळवलेले ज्ञान कायम कामी आले, म्हणून गुरुकुल शिक्षण कसे चांगले हे मला पटले. यानंतर मेकॅकिल इंजिनिअरिंग केले. इंडस्ट्रिअल मॅनेजमेंटमध्ये गोल्ड मेडल मिळवून पदव्यूत्तर शिक्षण घेतले. यानंतर आयआयटी मुंबईमध्ये मॅनेजमेंट पीएचडी घेतली आणि अमेरिकेत जाऊन हॉवर्ड बिझनेस स्कूल येथे अॅडव्हान्स मॅन‌ेजमेंट प्रोग्राम हा कोर्स पूर्ण केला. यानंतर मी क्रॉम्पटन ग्रीव्हज येथे नोकरी केली. येथील अनुभवाच्या जोरावर स्वत:चे सीहॉर्स सिस्टीम सुरू केले. यांतर एनआयआयटी, अॅपेटेकमध्ये पार्टनर झालो. झेन्सर टेक्नॉलॉजीचा सीईओ व नंतर उपाध्यक्ष असे पद भूषवले. सीआयआय, नॅस्कॉम यांची विविध पदे भूषवली. नॅस्कॉम फाऊंडेशनचे सध्या लिडिंग करताना खूप समाजसेवाही करता येत आहे. या संपूर्ण आयुष्यात आजपर्यंत अनेकांना प्रेरणा देत गेलो. प्रेरणा घेत गेलो. हेच यशाचे गमक ठरले,’ असे ते म्हणाले.
ऋषी बागला यांनी अध्यक्षीय समारोप केला. ते म्हणाले, ‘ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि आता संन्यास या चारही पातळीवर नटराजन यशस्वी झाले असून, आता ते युवकांना शिक्षण क्षेत्रात काम करून प्रेरणा देत आहेत.’

नटराजन यांचे बोल
‘स्वत:ला जातीपातींमध्ये विखुरण्यापेक्षा आपण इंडियन आहोत हे जगासमोर ठेवा. सध्याचे मोदी सरकार शिक्षण व्यवसाय, उद्योग, डिजिटल इंडियासाठी खूप सकारात्मक आहे. ते युवकांनी स्वीकारले पाहिजे. चीन भारत यामधील ‘टॅलेंट’ जगाने मान्य केले आहे. संशोधन आणि शिक्षण यावर भर द्या. खूप पुढे जाता येईल आणि यामुळेच भारत सक्षम आणि डिजिटल होण्यास मदत होईल. आम्ही आमच्या कंपनीद्वारे भारत सरकारच्या सहकार्याने यात क्षेत्रात खूप काम करत आहोत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूर्य कोपला; अंगी वणवा पेटला!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरभर रखरख, आग ओकणारा सूर्य आणि अंगातून घामाच्या धारा यामुळे शहरवासीय हैराण झाले आहेत. सलग पाचव्या दिवशी शहराच्या कमाल तापमानाने चाळीशी पार केली. गुरुवारी (२९ मार्च) तापमान ४१.१ अंशावर पोचले.
यंदाचा उन्हाळा मराठवाडयासाठी काहीसा दिलासादायक असण्याचा अंदाज हवामान‌ तज्ज्ञांनी वर्तवला होता. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून सर्वच जिल्ह्यांतील तापमानात वाढ झाली आहे. दुपारपासूनच औरंगपुरा, निरालाबाजार, पैठणगेट, शहागंज या दिवसभर गर्दी असलेलेल्या बाजारपेठेत शुकशुकाट होत असून नागरिक खरेदीसाठी सायंकाळी घराबाहेर पडत आहेत. शहरात सकाळपासून पारा चढण्यास सुरुवात होते. दुपार होताच चटके अधिक तीव्र होत असून, संध्याकाळी ऊन कमी झाले तरी वातावरणात उकाडा जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यात पारा चाळीस अंश सेल्सियस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. जागतिक तापमानाच्या चढ उतारामुळे यंदा थंडी लांबली. यानुसार फेब्रवारी महिन्यातील काही दिवस वातावरणात गारवा जाणवत होता. उष्णतेच्या लोटेमुळे शारीरिक ताण पडून जीवितहानी होण्याची शक्यता असते, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

उष्णतेपासून असे करा स्वसंरक्षण
वाढत्या उष्णतेमुळे स्वसंरक्षण करण्यासाठी तहान लागलेली नसताना जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलके, पातळ, सुती कपडे वापरावे. ऊनात जाताना गॉगल, छत्री, टोपी, बूट, चप्पल वापरावी. सोबत पाण्याची बाटली ठेवावी. ऊनात काम करताना डोके, मान, चेहरा ओल्या कपड्याने झाकावे. शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस तसेच घरी तयार केलेली लस्सी, ताक, लिंबूपाणी नियमित प्यावे. सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळावा. यासाठी पहाटे जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा. दुपारी बारा ते साडेतीन या वेळेस बाहेर जाणे टाळावे. गरोदर तसेच आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी. अशक्तपना, स्थुलपना, डोकेदुखी, सतत येणारा घाम, ऊनाचा झटका बसण्याची लक्षणे ओळखावीत. चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,’ असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘माइल्ड सनस्ट्रोक’चा शहराला फटका

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील तापमानाने चाळीशी पार केली असून, मागच्या दोन दिवसांपासून तापमान ४१ अंशांच्याही पुढे गेले आहे. परिणामी, शहरातील बहुतांश रुग्णालयांमध्ये सौम्य उष्माघाताचे रुग्ण दिसून येत आहे. किरकोळ ऊन लागल्याचे रुग्ण तर मोठ्या संख्येने दिसून येत आहेत. यापुढे असेच तापमान वाढत राहिले तर मध्यम व तीव्र उष्माघाताचे रुग्ण वाढू शकतात. त्यामुळेच सर्वतोपरी काळजी घेणे, हाच उष्माघात टाळण्याचा सर्वोत्तम उपाय असल्याचा सल्ला वैद्यकतज्ज्ञांनी दिला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) मध्यम किंवा तीव्र उष्माघाताचे रुग्ण सध्यातरी दिसून येत नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, ऊन लागल्याने ताप तसेच अशक्तपणाचे रुग्ण काही प्रमाणात बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) उपचारासाठी येत आहेत. घाटीमध्ये गुरुवारपर्यंत (३० मार्च) एकही मध्यम किंवा तीव्र उष्माघाताचा रुग्ण उपचारासाठी आला नाही किंवा अशा कोणत्याही रुग्णाला दाखल करण्याची वेळ आली नसल्याचेही अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले. शहरातील डॉ. हेडगेवार रुग्णालयामध्ये ताप, डिहायड्रेशन, अशक्तपणाचे रुग्ण येत आहेत. मात्र, आतापर्यंत एकही तीव्र उष्माघाताचा रुग्ण उपचारासाठी आलेला नाही. अर्थात, पुढील काळात वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचे रुग्ण वाढू शकतात व त्यामुळेच सर्वांनी काळजी घेणे खूप आवश्यक असल्याचे फिजिशियन व मधुमेहतज्ज्ञ डॉ. विकास रत्नपारखे यांनी सांगितले. त्याचवेळी आजघडीला ‘टिपिकल सनस्ट्रोक’च्या केसेस नाहीत, असेही ‘एमआयटी’चे वैद्यकीय संचालक डॉ. आनंद निकाळजे व ‘आधार हायटेक हॉस्पिटल’चे फिजिशियन व इन्टेसिव्हिस्ट डॉ. अनंत कुलकर्णी यांनी ‘मटा’ला सांगितले. दरम्यान, प्रत्येक वर्षी एप्रिल, मे व जून महिन्यामध्ये उष्माघाताचा फटका बसतो व यात अनेकांचा मृत्युदेखील होतो. त्यामुळेच काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

दोन वर्षांपूर्वी २४२२ लोकांचा मृत्यू
देशात २०१५ मध्ये तब्बल २४२२ लोकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला होता. या वर्षी एकट्या तेलंगणामध्ये ४८ लोकांचा मृत्यू झाला होता. जेव्हा ४५ अंशांच्या पुढे तापमान जाते तेव्हा असे उष्माघातामुळे मृत्यू होण्याची शक्यता वाढते, असे राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांना झळांचा तडाखा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यात तापमानाचा पारा प्रचंड वाढल्याने त्याचा दहावी, बारावीच्या परीक्षावर परिणाम होत आहे. त्यामुळे वेळापत्रकात बदल करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक संघ महामंडळानेही केली आहे.
राज्यात तापमानाचा वाढलेला पारा लक्षात घेता त्याचा परिणाम राज्यभरात सुरू असलेल्या बोर्डाच्या परीक्षांवरही झाला. दहावी, बारावीची परीक्षा मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालते. तोपर्यंत तापमान ४० अंश सेल्सियसवर पोहचते. विद्यार्थ्यांना उन्हाचा प्रचंड त्रास होतो. उन्हाच्या त्रासातून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी पुढच्या शैक्षणिक वर्षात बोर्डाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळातर्फे करण्यात आली आहे. परीक्षांची वेळ सकाळी नऊ वाजता करावी, अशी मागणी करण्यात आली. सध्या परीक्षा सकाळी ११ ते १ व दुपारी २ ते ५ या वेळेत होतात. या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना त्याचा जास्त त्रास होतो. हेच लक्षात घेत शिक्षणमंत्र्यांकडे ही मागणी करण्यात आली आहे. मराठवाड्यातूनही ही मागणी पुढे आली आहे. जुलैमध्ये याबाबत बैठक बोलावण्याची मागणी मुख्याध्यापक संघाने केली आहे.

परीक्षा केंद्रांवर असुविधा
मार्चमध्येच तापमान ४० अंशाच्या वर पोहोचत आहे. ऊनाचा प्रचंड त्रास होतो. विद्यार्थ्यांनाही त्याचा त्रास होतोच. त्यामुळे वेळापत्रक बदलावे, याबाबत आम्ही मंडळाकडेही मागणी केली आहे. जुलैमध्ये बैठक बोलवा, आम्ही वेळापत्रक कसे असावे, विद्यार्थ्यांना कोणते वेळापत्रक संयुक्तिक ठरेल हे सांगू. त्याचा परीक्षेवर परिणाम होणार नाही आणि विद्यार्थ्यांना ऊनाचा त्रास होणार नाही.
- वसंत पाटील, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक संयुक्त मुख्याध्यापक संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन कोटी झाडे लावण्याचे लक्ष्य

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
यंदा मराठवाड्यात दोन कोटी झाडे लावली जाणार आहेत. वनक्षेत्र किमान ३३ टक्के करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन सुरू आहे. सामाजिक वनीकरण विभागाने आतापर्यंत ९५ लाख ६१ हजार रोपे तयार केली आहेत. वृक्ष लागवडीसाठी ‘हरित सेने’च्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत.
पर्यावरण समतोल टिकवण्यासाठी एकूण ३३ टक्के वनक्षेत्र आवश्यक असते. मराठवाड्यात अवघे चार टक्के वनक्षेत्र शिल्लक आहे. अतिक्रमण, वृक्षतोड आणि विस्कळीतपणा हा उजाड मराठवाड्याचे प्रमुख कारण ठरला आहे. राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय वन खात्याने घेतला आहे. पुढील पाच वर्षात लागवडीचे उद्दिष्ट गाठण्याचे नियोजन आहे. मराठवाड्यात यावर्षी दोन कोटी झाडे लावली जाणार आहेत. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी या मोहिमेवर विशेष भर दिला आहे. सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग आणि वन्यजीव संरक्षण विभाग यांनी वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. जागतिक वन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सामाजिक वनीकरण विभागाचे वनसंरक्षक अजित भोसले यांनी २०१७-१८ यावर्षीच्या लागवडीचे नियोजन जाहीर केले. वन कर्मचारी आणि सामाजिक संस्थांच्या मदतीतून वनक्षेत्र वाढवण्यात येईल असे भोसले यांनी सांगितले. विभागात एक कोटी ८८ लाख झाडे लावण्याची तयारी सुरू आहे.
आतापर्यंत ९५ लाख ६१ हजार रोपे तयार करण्यात आली आहेत. तसेच २५ लाख खड्डे खोदण्यात आले आहेत. सामाजिक संस्था व वृक्षप्रेमी नागरिकांना मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या परिसरातील लागवडीचे ठिकाण कळण्यासाठी पुस्तिका प्रकाशित केली जाणार आहे. पुस्तिकेतील माहितीनुसार सामाजिक संस्था आणि नागरिक संबंधित ठिकाणी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होऊ शकतील. विदेशी झाडांना फाटा देऊन देशी झाडांना लागवडीत प्राधान्य देण्यात आले आहे. कडूनिंब, जांभूळ, वड, पिंपळ आणि कमी पर्जन्यमानात टिकाव धरणाऱ्या झाडांच्या रोपांची निर्मिती करण्यात येत आहे.

हरित सेनेची मदत
वनक्षेत्र वाढवण्यासाठी ‘हरित सेना’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या सेनेत सदस्य नोंदणी सुरू असून ३१ मार्चपूर्वी मराठवाड्यात १० लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत चार लाख ६६ हजार सदस्यांनी नोंदणी केली आहे. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक नोंदणी झाली आहे. हरित सेनेचे सदस्य लागवडीत प्रत्यक्ष सहभागी होऊन वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोळा विक्रेत्यांनाही तापमानाचा फटका!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रणरणत्या ऊनामध्ये तोंडाला पाणी आणणारा, थंडगार बर्फ गोळा खाण्याची मजा काही वेगळीच असते. मात्र, शहरात गेल्या तीन दिवसांत प्रचंड तापमान वाढले आहे. त्यामुळे दुपारी बर्फ गोळा विक्रेत्यांकडील गर्दी ओसरत असल्याचे दिसत आहे.
वेगवेगळ्या फ्लेवरची चव असलेले बर्फाचे गोळे खाण्याचा मोह फक्त चिमुकल्यांनाच नाही, तर मोठ्यांनाही आवरत नाही. बर्फ गोळा, रबडी गोळा, मावा गोळा व स्पेशल मावा डिश, आदी गोळयांचे प्रकार आहेत. पाच रुपयापासून गोळ्यांची किंमत असून ऐंशी रुपयापर्यंत ड्रायफूट असलेल्या गोळयांची देखील प्रचंड मागणी ग्राहकाकडून होत असते. चौका चौकात लागणाऱ्या या विक्रेत्यांकडे ही गर्दी नेहमीच दिसून येते. मात्र, गेल्या तीन दिवसांत ऊनाचा पारा प्रचंड वाढला आहे. नागरिक दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत आहे. सायंकाळी पाच नंतर नागरिक बाहेर पडतात. त्यामुळे या बर्फ विक्रेत्याकडे देखील दुपारी बारा ते पाच या दरम्यान अत्यंत तुरळक ग्राहक येत आहेत.

उन्हामुळे नागरिक सायंकाळी किंवा रात्री फिरण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. दुपारी ग्राहकांची उणीव जाणवते. त्याचा धंद्यावर परिणाम होतो. मात्र, संध्याकाळी पुन्हा नागरिक बर्फ गोळा घेण्यासाठी गर्दी करतात. - मनोज बसैये; आनंद बर्फ गोळा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीचशे पुरुषांना ‘ब्रेस्ट कॅन्सर’!

$
0
0


Nikhil.Nirkhee@timesgroup.com
औरंगाबाद ः महिलांप्रमाणेच पुरुषांनाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’ होतो. दरवर्षी मराठवाड्यातील सुमारे ६० पुरुषांना ‘ब्रेस्ट कॅन्सर’ झाल्याचे समोर येत आहे. एकट्या ‘टाटा मेमोरियल हॉस्पिटल’मध्ये दरवर्षी सुमारे २०० पुरुष रुग्णांवर उपचार होत असल्याचे ‘टाटा’च्या संचालकांनी स्पष्ट केले.
सरासरी ६० महिलांमागे एका महिलेला स्तनाचा कर्करोग होत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे पुरुषांनाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’ होऊ शकतो, याची कल्पना फार कमी जणांना आहे. शहरातील कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. राजेश सावजी यांच्यानुसार, ‘मराठवाड्यात दरवर्षी किमान ६० पुरुषांना स्तनाचा कर्करोग होतो. त्यांच्यावर शस्त्रक्रिया, रेडिएशन, किमोथेरपी पद्धतीने उपचार करावे लागतात. अर्थात, पुरुषांमधील ‘ब्रेस्ट क्रन्सर’चे प्रमाण हे एकूण ‘ब्रेस्ट कॅन्सर’ रुग्णांच्या एक टक्के इतकेच आहे आणि या प्रमाणात वाढ होत असल्याचे सध्यातरी म्हणता येणार नाही,’ असेही डॉ. सावजी म्हणाले. शासकीय विभागीय कर्करुग्णालयातील शल्यचिकित्सक डॉ. अजय बोराळकर यांच्यानुसार, ‘दरवर्षी हॉस्पिटलमध्ये किमान ३ ते ४ ‘पुरुष बेस्ट कॅन्सर’च्या केसेस येतात. यातील बहुतांश रुग्ण हे साठीनंतरचे असतात आणि बहुतांश कारण हे संप्रेरक (हार्मोन्स) तसेच जनुकीय कारणांशीनिगडीत असते. लवकरात लवकर शस्त्रक्रिया व उपचारांनी त्यांच्यावर प्रभावी उपचारही होऊ शकतात,’ असेही डॉ. बोराळकर म्हणाले.

घाटीत १ पुरुष, ५८ महिलांना ‘ब्रेस्ट कॅन्सर’
‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) क्ष-किरण विभागामध्ये नोव्हेंबर-१६ पासून ‘मॅमोग्राफी’ची सुविधा उपलब्ध झाली असून, आतापर्यंत या मशीनवर सुमारे २५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील एकूण ५९ रुग्णांना ‘ब्रेस्ट कॅन्सर’ असल्याचे निदान झाले. यामध्ये दोन पुरुष रुग्णांचीही मॅमोग्राफी केली आणि यातील एका ६५ वर्षीय पुरुष रुग्णाला ‘ब्रेस्ट कॅन्सर’ असल्याचेही लक्षात आले. याच मशीनवर घाटीतील बहुतांश परिचारिकांचीही तपासणी केली. त्यात दोन परिचारिकांनाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’ असल्याचे लक्षात येताच त्यांच्यावर पुढील उपचारही सुरू केले,’ असे क्ष-किरण विभागप्रमुख डॉ. वर्षा रोटे-कागिनाळकर यांनी ‘मटा’ला सांगितले.

पुरुषांत झपाट्याने पसरू शकतो
‘महिलांप्रमाणेच समस्त पुरुषांनाही जन्मजात स्तनाच्या पेशी (ब्रेस्ट टिश्यू) असतात; पण ते महिलांप्रमाणे विकसित होत नाहीत म्हणून या पेशींचे प्रमाण व एकूणच आकार फार छोटा असतो. मात्र ‘इस्ट्रोजन’ची पातळी वाढून कर्करोगाची निर्मिती-प्रादुर्भाव रोखणाऱ्या ‘BRCA 1’ व ‘BRCA 2’ या सामान्य जिन्समध्ये जेव्हा बदल (म्युटेशन) होतात, तेव्हा पुरुषांमध्ये ‘ब्रेस्ट कॅन्सर’ होऊ शकतो. मात्र महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये ‘ब्रेस्ट कॅन्सर’ झपाट्याने पसरू शकतो आणि दुर्लक्ष झाल्यास जीवघेणा ठरू शकतो,’ असेही डॉ. रोटे म्हणाल्या.

कुटुंबामध्ये ‘ब्रेस्ट कॅन्सर’ची हिस्टरी असणाऱ्या पुरुषांमध्ये ‘ब्रेस्ट कॅन्सर’ दिसून येतो. स्तनांमध्ये न दुखणाऱ्या गाठीसह वेगवेगळे चित्र-विचित्र बदल, हे प्रमुख लक्षण पुरुषांमध्येही हमखास दिसून येते व याकडे दुर्लक्ष धोकादायक ठरू शकते. – डॉ. वर्षा रोटे-कागिळनाळकर, क्ष-किरण विभागप्रमुख, घाटी

‘टाटा मेमोरियल हॉस्पिटल’मध्ये दरवर्षी ‘ब्रेस्ट कॅन्सर’च्या सुमारे २०० पुरुष रुग्णांवर उपचार केले जातात. हे रुग्ण देशभरातून येतात. सर्व उपचारानंतर ‘ब्रेस्ट कॅन्सर’ झालेले पुरुष रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सरासरी ६० टक्के आहे. – डॉ. कैलाश शर्मा, संचालक (अॅकेडेमिक्स), टाटा मेमोरियल हॉस्पिटल (मुंबई)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यानासाठी प्राण्यांची खरेदी-विक्री अमान्य

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कोणत्याही प्राण्यांच्या खरेदी-विक्रीला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे प्राणिसंग्रहालयासाठी परस्पर सामंजस्याने प्राण्यांची देवाण - घेवाण करा, असे कान टोचणारे पत्र सेंट्रल झू ऑथॅरिटीने औरंगाबाद महापालिकेसह देशभरातील प्राणिसंग्रहालयांच्या व्यवस्थापनाला पाठवले आहे. या पत्रामुळे विदेशातून जिराफ व झेब्रा आणण्याचा निर्णय पालिका प्रशासनाला बदलावा लागण्याची शक्यता आहे.
सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात जिराफ व झेब्रा आणण्याचा निर्णय महापालिकेच्या प्रशासनाने घेतला. जिराफ व झेब्राच्या प्रत्येकी तीन जोड्या मलेशियातून आणण्याची तयारी महापालिकेने केली होती. त्यासाठी पत्रव्यवहार देखील करण्यात आला होता. मलेशियातून हे प्राणी आणण्यासाठी किमान चाळीस लाख रुपये खर्च येणार आहे. हा खर्च राज्य शासनातर्फे करण्याचे आश्वासन पालकमंत्री रामदास कदम यांनी पालिकेच्या प्रशासनाला दिले होते. तीन जोड्यांपैकी एक जोडी प्राणिसंग्रहालयात ठेवण्यात येणार असून उर्वरित दोन जोड्या एमजीएमच्या परिसरात विकसित करण्यात येणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिवनात ठेवण्याचे ठरविण्यात आले आहे. विदेशातून जिराफ व झेब्रा आणण्याच्या हालचाली पालिकेने सुरू केलेल्या असतानाच आठ दिवसांपूर्वी सेंट्रल झू ऑथॅरिटीकडून महापालिकेला पत्र प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
देशभरातील सर्वच प्राणिसंग्रहालयांना असे पत्र पाठवले असून प्राणिसंग्रहालयासाठी प्राण्यांची खरेदी - विक्री करता येणार नाही, परस्पर सामंजस्याने प्राण्याची देवाण - घेवाण करा, असे पत्राच्या माध्यमातून कळविण्यात आले आहे. त्यामुळे विदेशातून जिराफ - झेब्रा आणण्याचा विचार पालिकेच्या प्रशासनाला सोडून द्यावा लागणार आहे. ‘एक्सचेंज ऑफर’च्या माध्यमातून देशाच्या विविध राज्यात असलेल्या प्राणिसंग्रहालयांशी संपर्क साधून जिराफ व झेब्रा आणण्याची प्रक्रिया पालिकेच्या प्रशासनाला आता करावी लागणार आहे. त्यादृष्टीने पाच प्राणिसंग्रहालयांशी पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हत्ती-सांबर देण्याची तयारी
सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात दोन हत्ती व ३८ सांबर आहेत. अन्य प्राणिसंग्रहालयात सांबरांची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे सांबर देऊन जिराफ, झेब्रा आणता येईल का याची चाचपणी केली जात आहे. त्याशिवाय दोन्हीही हत्ती अन्य प्राणिसंग्रहालयात पाठवण्याची तयारी पालिका प्रशासनाची आहे. विशाखापट्टणम् येथील प्राणिसंग्रहालयाशी या संदर्भात संपर्क देखील साधण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बायपास अपघातमुक्त करण्याचा निर्धार

$
0
0


औरंगाबाद : बीड बायपास रोड अपघातमुक्त करण्याचा निर्धार पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी केला आहे. त्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमण काढा, रस्ता रूंद करा, अशा सूचना त्यांनी वाहतूक समितीच्या बैठकीत दिल्या.
बीड बायपासर रोडवरील अपघात कमी करण्यासाठी पोलिस आयुक्तालयात नुकतीच विशेष बैठक घेतली आली. बैठकीला विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बीड बायपासवरील अपघात कमी करण्याची चर्चा झाली. त्याबाबत विविध विभागांनी सूचना मांडल्या. हा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केला आहे. रस्त्याचे काम सुरू होईपर्यंत अपघातप्रवण क्षेत्रावर आवश्यक उपाययोजना राबविण्याची सूचना करण्यात आली. पोलिस आयुक्तांनी या रस्त्यावर पेट्रोलिंग सुरू करा, रस्त्याच्या कडेला उभे असणाऱ्या जड वाहनांवर कारवाई करा, बंद पथदिवे सुरू करा, अतिक्रमण हटवा अशा सूचना दिल्या. जालना रोड जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसाच निर्णय बीड बायपासबाबत घ्यावा, असा प्रस्ताव समितीसमोर ठेवला. मात्र, आयुक्तांनी ही सूचना फेटाळून लावली.

मंगल कार्यालयांना परवानगी आवश्यक
बीड बायपासवर अनेक मंगल कार्यालये आहेत. या कार्यालयातून नवरदेवासह वाजत गाजत मिरवणूक निघते. त्यामुळे वाहतूक कोंडी होती. रस्त्यावरील मंगळ कार्यालयातून मिरवणूक काढण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, अनेकजण परवानगी घेत नाहीत. त्यामुळे अशा मंगल कार्यालयावर करडी नजर ठेवा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. तसा प्रस्ताव बैठकीत मांडला.

पोलिस आयुक्तांनी बीड बायपास अपघातमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित विभागाला तसे आदेश दिले आहेत. वाहतूक विभागाकडून पेट्रोलिंग सुरू आहे. पालिकेने रस्त्यावरील बंद असलेले पथदिवे सुरू केले आहेत. अन्य विभागाकडून या सूचनांवर लवकर अंमलबजावणी होईल. - चंपालाल शेवगण, सहाय्यक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images