Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

घर पुन्हा महाग

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरवासीयासांठी चटका लावणारी बातमी. नवीन आर्थिक वर्षाकरिता महापालिका हद्दीतील रेडिरेकनर दरांमध्ये सुमारे १० टक्क्यांची वाढ झाल्याने येत्या काळात तुमचे घर घेण्याचे स्वप्न पुन्हा महाग होणार आहे.
राज्य सरकारने गेल्यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे रेडिरेकनर दर आकारण्याचे वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च असे केले आहे. यावर्षी रेडिरेकनर दरात वाढ होण्याचे संकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. त्यानुसार नगररचना, भूमिअभिलेख, महसूल आणि मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाने गेल्या तीन महिन्यांत मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहाराचे सर्वेक्षण केले. त्यानंतर रेडिनेकनर दरात वाढ करण्याचा प्रस्ताव मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला. १ एप्रिलपासून रेडिरेकनरच्या दरात शहरासह ग्रामीण भागात ८ ते १० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तसेच प्रभाव क्षेत्रात ५ ते १० टक्के वाढ झाली आहे. नवीन दरवाढ आजपासून लागू झाल्याची माहिती विजय कोळेकर यांनी दिली.

बांधकाम दरातही वाढ
रेडिरेकनरच्या दरात वाढ करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य औरंगाबादकरांचे घर खरेदी करण्याचे स्वप्न भंगणार आहे. शहराच्या आसपास असलेली शेतजमीन, घरे बांधण्यासाठी भूखंड आणि सदनिका खरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशांवरही यामुळे अतिरिक्त बोजा वाढणार आहे. चिकलठाणा, देवळाई, हर्सूल, पडेगाव, नक्षत्रवाडी अशा क्षेत्रातील जमिनीसह, प्लॉट, फ्लॅट घेणे महागणार आहे. त्यासह बांधकामाच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ सरसगट १० टक्के निश्चित करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कर्जमाफी द्या अन्यथा सत्तेतून बाजूला व्हा’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, बीड
सरकार चालवत असताना सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाची जाण ठेवली पाहिजे. परंतु, या सरकारचा कारभार कसा चाललाय हे कळत नाही. या सरकाराकडून शेतकयाच्या पिकांना चांगला भाव मिळत नाही. हे सरकार कर्जमाफी द्यायला तयार नसल्याने आम्ही सर्व जण एकत्र आलो आहोत. ही संघर्ष यात्रा १९ आमदारांच्या निलंबनासाठी नाही तर शेतकऱ्यांच्या हितासाठी काढली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या नसता सत्तास्थानावरून बाजूला व्हा, आम्ही कर्जमाफी देऊ असे मत माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
संघर्ष यात्रेच्या निमित्ताने शनिवारी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, ‘कर्ज माफी का पाहिजे हे आजपर्यंत या मुख्यमंत्र्यांला माहित नाही. एवढ्या आत्महत्या होऊनही डोळे झाक होत आहे. सरकारने इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली आहे. मराठवाड्यात किती गुंतवणूक झाली केवळ, लोकांना मोठे स्वप्न दाखवायचे काम या सरकारने केले, पण या कर्जमुक्तीप्रश्नी शिवसेनेने सरकार मधून बाहेर पडून संघर्ष यात्रेत सहभागी व्हावे.’
यावेळी समाजवादी पार्टीचे नेते आबु आझमी, पंतगराव कदम, आमदार जयदत्त क्षीरसागर, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, अमरसिंह पंडित, शेकापचे प्रविण गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीडचे नगराध्यक्ष भरतभूषण क्षीरसागर, माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित, संदिप क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे गेवराई तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक आमदार अमरसिंह पंडित यांनी केले.

#

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनीषा वाघमारे एव्हरेस्ट मोहिमेवर

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील पहिली महिला गिर्यारोहक प्रा. मनीषा वाघमारे यांच्या एव्हरेस्ट शिखर मोहिमेस तीन एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. या मोहिमेसाठी निवड झालेली प्रा. वाघमारे या औरंगाबादच्या दुसऱ्या गिर्यारोहक आहेत.
एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम यांच्या हस्ते डॉ. सौ. इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालयातील क्रीडा विभाग प्रमुख प्रा. मनीषा वाघमारे यांचा सत्कार करून ‘फ्लॅग ऑफ’ करण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य वसुधा पुरोहित, अॅड. कल्पलता पाटील भारस्वाडकर, प्रभाकर ताठे, इंडियन कॅडेट फोर्सचे विनोद नरवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. गेल्या दहा वर्षांपासून मनीषा गिर्यारोहण क्षेत्रात सक्रीय आहेत. आत्तापर्यंत त्यांनी हिमालयातील सात शिखरे पादाक्रांत केली आहेत. तसेच ऑस्ट्रेलिया, युरोप व आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखरेही तिने सर केलेली आहेत. आता त्यांची निवड एव्हरेस्ट शिखर मोहिमेसाठी झाली आहे. काठमांडू येथून तीन एप्रिलला त्यांच्या मोहिमेस प्रारंभ होणार आहे. ही मोहीम १८मेपर्यंत चालेल.
माऊंट एव्हरेस्ट शिखर आठ हजार ८५० मीटर उंचीचे असून अनेक वर्षांपासून एव्हरेस्ट शिखर त्यांना खुणावत होते. मोहिमेसाठी निवड झाल्यानंतर त्यांचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकारण्याची संधी मिळाली आहे. कदम म्हणाले, ‘एव्हरेस्ट मोहिमेसाठी एमजीएमतर्फे मनीषाला एक लाख रूपयांची आर्थिक मदत केली आहे. तिची जिद्द व तयारी पाहाता एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवणारी त्या मराठवाड्यातील पहिली महिला गिर्यारोहक ठरतील असा विश्वास वाटतो.
‘गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये मनीषा यांनी हिमालयातील ३०-४० शिखरे पादाक्रांत केलेली आहेत. आता त्या एव्हरेस्ट मोहिमेवर जात आहेत. अत्यंत आव्हानात्मक अशी ही मोहीम असून त्यात त्या निश्चित यशस्वी ठरतील असा विश्वास वाटतो, असे नरवडे यांनी सांगितले.
या प्रसंगी प्राचार्य पुरोहित, अॅड. भारस्वाडकर यांनीही मनीषाला शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी प्राचार्या रेखा शेळके, प्रभुलाल पटेल, जगदीश खैरनार, अमृत बिऱ्हाडे, बबलू त्रिवेदी, प्रा. डी. के. कांबळे, नंदु पटेल, शशी सिंग उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रूग्णांच्या मृत्यूने सिटीकेअर, घाटीत तणाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे रूग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत घाटी हॉस्पिटल व सिटीकेअर हॉस्पिटलमध्ये रूग्णांच्या नातेवाइकांनी गोंधळ घातला. तसेच महिलेवर चुकीची शस्त्रक्रिया केल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी शुक्रवारी रात्री सेव्हन हिल येथील जिल्ला हॉस्पिटलची तोडफोड केली.

घटना क्रमांक एक

प्रकाश नानाभाऊ गोंडे (वय ३५ रा. नारेगाव) यांना तीन वर्षांपासून श्वासोच्छवासाचा त्रास होता. ते मंगळवारी उस्मानपुऱ्यातील सिटीकेअर हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यादिवशी रात्री त्यांनी लघवी व रक्ताची तपासणी केली. त्यापूर्वी त्यांच्या नातेवाइकांकडे शस्त्रक्रियेसाठी एक लाख तीस हजारांची मागणी करण्यात आली होती. तसेच राजीव गांधी योजनेतून शस्त्रक्रिया होईल असेही सांगण्यात आले. त्यांच्यावर बुधवारी शस्त्रक्रिया झाली. त्यात डॉक्टरांकडून हृदयातील झडप चुकीमुळे कापली गेली. डॉक्टरांनी चूक मान्य करीत गुरुवारी कृत्रिम झडप बसवून देण्याची हमी घेतल्याचा आरोप गोंडे यांचे भाऊ ताराचंद यांनी केला. त्यानंतर गुरूवारी झालेली दुसरी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, रूग्णाकडून शुक्रवारपर्यंत प्रतिसाद मिळाला नाही. रूग्णाचा शनिवारी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यामुळे संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. डॉक्टरांच्या चुकीमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करून कारवाई मागणी नातेवाइकांनी केली आहे. हॉस्पिटलमध्ये पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून खाजगी बॉक्सरदेखील सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

घटना क्रमांक दोन

शरद महावीर वायकोस (वय २१ रा. पिंपळवाडी, ता. पैठण) व त्यांचा मित्र सुमीत शिंदे शुक्रवारी रात्री साडेदहाला पैठण एमआयडीसीतून दुचाकीवर पिंपळवाडीकडे जात होते. कारच्या धडकेत शरद गंभीर जखमी झाला. त्याच्यावर पैठणच्या खासगी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला रात्री साडेअकराला सिटी स्कॅनसाठी घाटीत हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी सिटी स्कॅनऐवजी एक्सरे काढला. तो गंभीर नसल्याचे सांगत शरदला जाण्यास सांगितले. पहाटे सव्वातीनला सुरक्षारक्षकांना सांगून शरद व नातेवाइकांना बाहेर काढण्यात आले. शरद प्रतिसाद देत नसल्याने नातेवाईक उपचाराची मागणी करत होते. अखेर शनिवारी पहाटे साडेतीनला शरदवर उपचार सुरु झाले. पहाटे पाच वाजून पंचावन्नपर्यंत डॉक्टरांनी उपचार केले. यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकारामुळे संतप्त नातेवाइकांनी, डॉक्टरवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह न घेण्याची भूमिका घेतली. घाटीत चार तास हा गोंधळ सुरु होता. सकाळी साडेनऊला नातेवाईक अधिष्ठाता सुधीर चौधरी यांना भेटले. त्यांनी डॉक्टरवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव मावळला.

जिल्ला हॉस्पिटलची तोडफोड

महिलेवरील शस्त्रक्रियेच्या वादातून संतप्त नातेवाइकांनी गुरुवारी रात्री सेव्हनहील येथील जिल्ला हॉस्पिटलच्या काचा फोडल्या. डॉ. पर्सी जिल्ला यांच्या माहितीनुसार साजेदा महंम सईद (वय ६८ रा. रेल्वे स्टेशन परिसर) गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल झाल्या. त्यांना मधुमेह, ब्लड प्रेशर, किडनी व हृदयाचे आजार होते. रक्तदाब वाढल्याने दोनदा त्यांची शस्त्रक्रिया टाळली होती. त्यांच्यावर २७ मार्चला शस्त्रक्रिया झाली. ब्रेनस्टोकने २८ मार्चला सकाळी त्यांची प्रकृती खालावली. त्यांना शुक्रवारी सायंकाळी व्हेंटिलेटरवर ठेवण्याबाबत स्वाक्षरी मागितली असता नातेवाइक संतापले. त्यांनी गोंधळ सुरू केल्याने हॉस्पिटलने जिन्सी पोलिसांना बोलावले.
दोन पोलिस दाखल झाले मात्र, ३०-४० नातेवाईकांनी धुडगूस घालीत काचेचा दरवाजा तसेच मूर्तीची तोडफोड केली. यावेळी वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. तसेच
बाहेरील वाहनांचेदेखील नुकसान जमावाने केले. मात्र सुदैवाने कोणत्याही डॉक्टराला मारहाण करण्यात आली नाही. रात्री अकरा ते साडेबाराच्या दरम्यान हा प्रकार घडला. दरम्यान, बेशुद्ध साजेदा यांची दुसऱ्या खासगी हॉस्पिटलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी कर्जमाफी पंचाग पाहून करणार का ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

‘राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. आजवर ९००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी करावी अशी मागणी आम्ही वारंवार करत आहोत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टोलवाटोलवी करत आहेत. मुळात हा प्रश्नच मुख्यमंत्र्यांना समजलेला नाही. एवढ्या आत्महत्या झाले तरी मुख्यमंत्र्यांना त्यांचे गांभीर्य कळत नाही. आता कर्जमाफीसाठी पंचागांत मुहूर्त पाहणार काय ?’ असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगाविला.

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, एआयएमआयएम, रिपाई (कवाडे गट) यांच्यासह प्रमुख विरोधी पक्षांनी चंद्रपूर ते पनवेल अशी संघर्ष यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा शनिवारी औरंगाबादेत पोचली. यानिमित्त आयोजित सभेत चव्हाण बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात, पतंगराव कदम, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी, राजेश टोपे, डी. पी. सावंत, सुनील केदार, जितेंद्र आव्हाड, नसीम खान यांच्यासह आमदार अब्दुल सत्तार, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, सतीश चव्हाण, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

चव्हाण म्हणाले,‘शेतकरी कर्जमाफीवर आम्ही आग्रही भूमिका मांडत आहोत. मुख्यमंत्री काही दिवसांपूर्वी दिल्लीत केंद्राकडून मदत मागणीसाठी गेले, पण तिथे पंतप्रधानांची भेट होऊ शकली नाही. अर्थमंत्री अरुण जेटली यांना ते भेटले. जेटलींनी चहापान केले आणि शेतकरी कर्जमाफीसाठी एक रुपयाही केंद्राकडून दिला जाणार नाही, असे सांगितले. मुख्यमंत्री म्हणतात की कर्जमाफी केल्याने बँकांचा फायदा होतो. मुख्यमंत्र्यांना हा प्रश्नच समजलेला नाही. आता काय २० हजार आत्महत्या होण्याची वाट पाहणार का पंचागांत पाहून मुहूर्त काढणार ?’ अशी टीका त्यांनी केली.

‘शेतकऱ्यांची सहनशीलता आता संपली आहे. संघर्षाची वेळ आली आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोतच, पण या लढाईत जनतेचे पुढे आले पाहिजे. संघर्ष यात्रा लोकांना जागृत करण्यासाठी सुरू केली आहे. कर्जमाफी होईपर्यंत तुमच्या भागात मंत्र्यांना फिरू देऊ नका, काळ्या गुढ्या उभारून त्यांचा निषेध करा. ३० हजार कोटींचे कर्ज माफ करण्यास या सरकारला अडचण आहे, पण बड्यांची कर्जे मात्र माफ केली जातात. तुम्हाला कर्जमाफी करणे जमत नसेल तर सत्तेतून बाजूला व्हा. आम्ही कर्जमाफी करून दाखवितो,’ असे आव्हान चव्हाण यांनी दिले. अबू आझमी यांनीही सरकारच्या धोरणावर टीका केली. डॉ. कल्याण काळे यांनी सूत्रसंचालन केले. नितीन पाटील यांनी आभार मानले.

संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा लवकरच

पत्रकारांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘शेतकरी संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होईल. उत्तर महाराष्ट्र, धुळे, बुलडाणा, नंदूरबार, पालघर अशी ही यात्रा काढण्यात येईल. त्याचे नियोजन सुरू आहे. कार्यक्रमही जाहीर होईल. सरकारने काहीही नियोजन करून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. यंदाही भीषण दुष्काळाची चिन्हे आहेत. पाण्यासाठी नागरिकांचे हाल होणार आहेत. त्याचे नियोजन सरकारने केले पाहिजे. भाजप सरकारने गेल्या तीन वर्षांत सिंचनाच्या क्षेत्रात काहीच काम केले नाही. मी मुख्यमंत्री असताना सिंचनाचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी मोठा गदारोळ झाला. त्यात कोणी काय केले यापेक्षा आता काय होतेय हे महत्वाचे आहे. यंदा सिंचनासाठी अर्थसंकल्पात कमी तरतूद केली आहे. विकासकामांना कात्री लागणार आहे. सरकारला नेमके काय करायचे आहे ? हेच कळत नाही.’

कर्जमाफीची मागणी करणाऱ्या १९ आमदारांना सरकारने निलंबित केले. एकदा निर्णय घेतला की तो मागे घ्यायचा नसतो. आता ९ आमदारांचे निलंबन मागे का घेतले ? सरकार संघर्ष यात्रेमुळे घाबरले असून आमच्यात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. निलंबन मागे घेतलेले आमदार कामकाजात भाग घेणार नाहीत. तूर खरेदी केंद्रात बारदाना नाही, हे यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय आहे. सरकारला लाज वाटायला हवी. - अजित पवार, नेते, राष्ट्रवादी कॉँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काहीही अडचण आल्यास थेट फोन करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

‘मी अजित पवार. तुला काहीही अडचण आली तर, थेट मला फोन कर. फोन नंबर मिळाला नाही तर इथे कुणालाही सांग ते माझी भेट घालून देतील. तुला काहीच कमी पडू देणार नाही. कशाची चिंता करू नको. शिक्षण घे मोठी हो,’ असे म्हणताच पायल आणि ऋतुजाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. उपस्थित मंडळीही हा प्रसंग पाहून स्तंभित झाली.

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्षासह सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी चंद्रपूरपासून संघर्ष यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा शनिवारी औरंगाबादेत आली होती. जाहीर सभा संपल्यानंतर यात्रेत सहभागी नेत्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसोबत भोजन केले. एका संस्थेमार्फत या पाल्यांचा सांभाळ केला जातो. सुभेदारी विश्रामगृहाच्या हिरवळीवर माजी आमदार नितीन पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. सभेनंतर यात्रेची बस सुभेदारीत आली. कार्यकर्त्यांनी आधीच सगळी तयारी केली होती. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी, नसीम खान, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे यांच्यासह अनेक नेतेमंडळी चिमुकल्यांच्या पंगतीत सहभागी झाले. पायल आणि ऋतुजा या दोन मुलींसोबत अजितदादा जेवायला बसले. जेवताना त्यांनी दोघींशी चर्चा केली.

‘आयुष्यात तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. मी तुमच्या पाठिशी आहे,’ असे सांगताच त्या दोघींच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. उपस्थित मंडळीही निशब्द झाले. आपले पालक या जगात नाहीत. आयुष्याच्या कठीण प्रसंगी मार्ग काढताना भल्याभल्यांची अडचण होते. जग कळण्याआधीच पितृछत्र हरपलेले हे विद्यार्थी आजचा कार्यक्रम पाहून भांबावून गेले होते. ताटात पंचपक्वान्न पाहूनही हात ताटाकडे वळत नव्हते. अजितदादांनी दोन मुलींना दिलासा दिला आणि क्षणार्धात त्याठिकाणचे वातावरणच बदलले. अबू आझमी यांनीही मुलांशी संवाद साधत भोजन केले. पतंगराव कदम, आमदार अब्दुल सत्तार, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, सतीश चव्हाण, श्रीराम महाजन यांच्यासह अनेक नेते याप्रसंगी उपस्थिते होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५३ आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबांना हक्काचा निवारा

$
0
0

Sachin.Waghmare@timesgroup.com

Tweet : @WaghmaresMT

उस्मानाबाद : नापिकी, कर्जबाजारीपणामुळे कुटुंबप्रमुखाने आत्महत्या केल्यानंतर आणि वेगवेगळ्या निकषांवर ४६ कुटुंबाची सरकारी मदत नाकारली होती. या कुटुंबासह उस्मानाबाद जिल्ह्यातील ५३ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आधार देण्यासाठी तीन स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला. या संस्थांच्या मदतीमुळे, या कुटुंबांना घराचा आधार मिळाला आहे. यातील पाच कुटुंबांनी नव्या घरामध्ये प्रवेश केला असून, अन्य कुटुंबेही लवकरच या घरांमध्ये जाणार आहेत.

हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया, विलिस संस्था आणि हसेगाव (ता. केज) येथील पर्याय संस्था अशी या संस्थांची नावे आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयापुढे मुलांच्या शिक्षणाचा, उदरनिर्वाहाचा व सुरक्षिततेचे प्रश्न प्रामुख्याने निर्माण होतात. आत्महत्याग्रस्तांच्या पत्नीला कायम सुरक्षितता निर्माण व्हावी, म्हणून हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया, विलिस संस्था आणि हसेगाव (ता. केज) येथील पर्याय संस्थेने पुढाकार घेतला. या संस्थांनी या आधीही उस्मानाबाद जिल्ह्यातील ८०० कुटुंबांना शौचालये बांधण्यासाठी मदत केली होती. मात्र, या कुटुंबाला मिळणारी मदत कायमस्वरूपी असावी, यासाठी पावले टाकण्यात आली. त्यासाठी त्यांनी कळंब आणि वाशी दोन तालुक्यात सर्वेक्षण केले. त्यानुसार, खरी गरज असणारी ५० कुटुंबे शोधून काढली. या पैकी ४६ कुटुंबाला सरकारने मदत नाकारली होती. या कुटुंबांमधील प्रमुखांनी २००६ ते २०१५ या काळामध्ये आत्महत्या केली आहे. त्याशिवाय तीन परित्यक्त्या व विधवा महिलांनाही त्यांनी घरांसाठी मदत केली. आता या कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण होत आहे.

सुरुवातीच्या काळात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या नावे घरासाठी एक गुंठा जागा करून देण्यास काही जणांनी विरोध केला. हे घर महिलेच्या नावाने केल्यावर घराच्या बांधकामासाठी एक लाख रुपयांची मदत मिळणार असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी तयारी दर्शविली. तरी सहा कुटुंबांनी महिलेच्या नावाने घर करण्यास विरोध दर्शविल्याने त्यांना मदत करता आली नाही.

४८ कुटुंबांची घरे तयार

वर्षभराच्या आतच मदत करण्यात आलेल्या ५३ कुटुंबापैकी ४८ जणांच्या घराचे काम पूर्ण झाले आहे. पाच कुटुंबांनी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन घरात प्रवेश केला. काही जणांच्या घराच्या रंगरगोटी व लाइट फिटिंगचे काम बाकी असल्याची माहिती समन्वयक भिकाजी जाधव यांनी दिली.

आगामी काळात भूम, परंडा, वाशी, कळंब तालुक्यांतील आत्महत्याग्रस्त शेतकरी, विधवा व परित्यक्त्या अशा दोनशे कुटुंबांना कायमस्वरुपी हक्काचे घर मिळावे, यासाठी मदत केली जाणार आहे. - विश्वनाथ तोडकर, सचिव, पर्याय सामाजिक संस्था, हसेगाव, ता. कळंब

हक्काच्या घरासाठी या ५३ कुटुंबाना एक लाख रुपये किमतीचे साहित्य पुरविण्यात आले. यामध्ये ३६० चौरस फुटांच्या जागेत किचन, हॉल, शौचालय, बाथरुमचे बांधकाम करण्यात आले. तर लोकवाटा म्हणून कुटुंबाने बांधकामाच्या मजुरीचा ३० हजार रुपयांचा खर्च केला. - विलास गोडगे, समन्वयक, पर्याय सामाजिक संस्था, हसेगाव, ता. कळंब

या संस्थेच्या मार्गदर्शनामुळे कायमस्वरुपी निवारा मिळाला. अन्यथा गावामध्ये राहण्याची अडचण निर्माण झाली असती. लहान मुलांना राहण्यासाठी सुरक्षीत घर मिळाल्याने खूप मोठा आधार मिळाला. - सुनीता संतोष लाखे, आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नी, लाखणगाव, ता. वाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गारपीटग्रस्त शेतकऱ्याला मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षाने काढलेल्या संघर्ष यात्रेचा लाभ औसा तालुक्यातील येलोरी येथील शेतकऱ्याला झाला. यात्रेतील नेत्यानी येलोरी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी गुंडप्पा निटुरे यांचे गारपिटीत झालेल्या नुकसानीची माहिती ऐकून घेतल्यानंतर जागेवरच एक लाख रुपयांची मदत दिली. आतापर्यंत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रती कोरडीच सहानुभुती दाखवली होती.
लातूर शहरात पालिका निवडणुकीची आचारसंहीता सुरू असल्यामुळे शनिवारी रात्री मुक्काम लातूरात करून रविवारी सकाळी ही यात्रा औसा मार्गे उस्मानाबादकडे रवाना झाली. औसा तालुक्यातील उजनी येथे सभा झाली. लातूर ते औसा या मार्गावरील बुधडा, औसा मोड, बोरफळ, आशीव, बेलकुंड या ठिकाणी शेतकऱ्यांनी जोरदार स्वागत केले. यात्रेचा मार्ग बदलून गारपिटीने सर्वाधिक नुकसान झालेल्या येलोरी गावाला नेत्यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्याच वेळी गुंडप्पा निटुरे यांनी मदतीची रक्कम ही दिली.
उजनी येथे झालेल्या सभेत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, संवेदनशील सरकार कसे असते याचा अनुभव भुकंपाच्या वेळी तुम्ही घेतला आहे. शरद पवार, कैलासवासी विलासराव देशमुख यांनी त्या संकटाला सामोरे जाताना जी संवेदनशीलता दाखवली तशी संवेदनशीलता भाजपाच्या सरकारकडे नाही. कर्ज माफीसाठी आता रान पेटले आहे. कर्ज माफीसाठी आता सगळ्यानीच घराबाहेर पडून सरकार विरुद्ध लढा देण्याचे आवाहन त्यांनी केले.
विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे म्हणाले क्‍भ्‍, ‘विरोधी पक्षानी हिसका दाखवताच सरकारने अनुदानाच्या रक्कमेतून कर्ज कपात करून घेण्याचा निर्णय मागे घेतला आहे. कर्ज माफी सुध्दा आता माघार घ्यायची नसून कोणत्याही परिस्थितीत कर्ज माफ करून घेण्यासाठी लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार अबु आझमी यांचे ही भाषण झाले. संघर्ष यात्रेचे संयोजन औसा येथील आमदार बसवराज पाटील यांनी केले. यावेळी स्थानिक आमदार त्र्यंबक भिसे, यात्रेत सहभागी नेते विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, पंतगराव कदम, विश्वजित कदम, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार अजित पवार, आमदार विक्रम काळे, सुनील केदार आदि नेते सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीयोजनांना विजेचा झटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ऐन उन्हाळ्यात औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा थकबाकीसाठी खंडित करण्यात आला. महावितरणने कारवाईचा बडगा उगारताच ४८१पैकी १६६ पाणीयोजनांच्या थकबाकीचा भरणा करण्यात आला आहे.
महावितरणने वीज बिलाच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. त्यात औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील ४८१ पाणीपुरवठा योजनांकडे ८ कोटी ७८ लाख १७ हजार रुपये थकित होते. या थकबाकीच्या वसुलीसाठी महावितरणे पाणीयोजनांचा वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर १६६ पाणीपुरवठा योजनांच्या थकित बिलांपोटी ३० लाख ९२ हजार रुपये महावितरणाकडे जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.
या कारवाईंतर्गत औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील चार पाणीपुरवठा योजनांची वीज १३ लाख ५८ हजार रुपयांच्या थकबाकीसाठी कायमस्वरुपी खंडीत करण्यात आली आहे. यामुळे उन्हाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची शक्यता आहे. या मोहिमेत औरंगाबाद शहर मंडळातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे ६ कनेक्शन ८ लाख ६३ हजार रुपये थकबाकीसाठी खंडित करण्यात आले. २ पाणीपुरवठा योजनांकडून २ लाख २९ हजार रुपये वसूल करण्यात आले. औरंगाबाद ग्रामीण मंडळातील २३३ सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे कनेक्शन २ कोटी ९३ लाख सहा हजार रुपयांच्या थकबाकीसाठी खंडित केले. त्यापैकी १४६ योजनांकडून १९ लाख ११ हजार रुपये वसूल करण्यात आले. वारंवार सूचना देऊन व नोटीस बजावूनही प्रतिसाद न देणाऱ्या ४ पाणी योजनांचे कनेक्शन १३ लाख ५८ लाख रुपये थकबाकीसाठी कायमस्वरुपी खंडित करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील २४२ सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडे ५ कोटी ७६ लाख ४८ हजार रुपये थकित आहेत. त्यांच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यापैकी १८ वीज ग्राहकांकडून ९ लाख ५२ हजार रुपये वसूल करण्यात आले.

प्रोत्साहन योजनेला प्रतिसादच नाही
सार्वजनिक पाणीपुरवठा व उच्च दाब उपसा जलसिंचन योजनांच्या वीज ग्राहकांनी थकबाकीची रक्कम हप्त्याने भरावी म्हणून प्रोत्साहन योजना जाहीर केली आहे. या योजनेत सार्वजनिक पाणीपुरवठा, ग्रामपंचायत, नगर पालिका, नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे. या योजनेत वीज ग्राहकांकडील मूळ थकित बिलाच्या रकमेपैकी २० टक्के रक्कम व चालू महिन्याचे पूर्ण बिल भरणे गरजेचे आहे. उर्वरित थकबाकीची मूळ रक्कम चार मासिक समान हप्त्यांमध्ये चालू बिलासह भरणे गरजेचे आहे. या योजनेकडे अनेक ग्रामपंचायतीनी पाठ फिरविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धार्मिक उन्माद देशासाठी घातक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देशात धार्मिक उन्माद वरच्या थराला पोचला आहे. सामान्यांचे जगणे सुसह्य करण्याऐवजी राजकीय पक्षांनी धार्मिक ध्रुवीकरण सुरू केले आहे. देश म्हणजे जनता आहे. सरकार जनतेचा आवाज ऐकत नसेल तर सर्वांना एकत्रित आवाज उठवावा लागेल असा सूर ‘प्लॅटफॉर्म फॉर सोशल जस्टिस’च्या महापरिसंवादात उमटला. दलित, मुस्लिम, शेतकरी, आदिवासी यांच्या प्रश्नांवर परिसंवादात चर्चा करण्यात आली.
‘प्लॅटफॉर्म फॉर सोशल जस्टिस’तर्फे ‘महिला, दलित, अल्पसंख्याक व मुसलमानांवर वाढलेले हल्ले’ या विषयावर महापरिसंवाद घेण्यात आला. मौलाना आझाद महाविद्यालयात रविवारी परिसंवादाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत राम पुनियानी यांनी केले. यावेळी साथी सुभाष लोमटे, प्रा. जालिंदर अडसुळे, कवी डॉ. इक्बाल मिन्ने, गिरिजा गुप्ते आणि प्राचार्य डॉ. मकदूम फारूकी यांची प्रमुख उपस्थिती होती. देशातील सद्यस्थितीवर पुनियानी यांनी परखड भाष्य केले. ‘या तरुणांच्या देशात रोजगार नाही. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी उपलब्ध नाही. फक्त धर्माच्या नावावर राजकारण सुरू आहे. राजकारण धर्मावर नको, तर रोटी, कपडा आणि मकान या मुद्यावर करा. धार्मिक दुही रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे’ असे पुनियानी म्हणाले.
‘स्वातंत्र्यानंतर सामान्यांचे प्रश्न मिटतील असे वाटले, मात्र अजूनही आरोग्य, शिक्षण, रोजगार या मूलभूत प्रश्नांसाठीच संघर्ष करावा लागतो. देशातील ७० टक्के महिलांनी शाळेचे तोंड पाहिलेले नाही. दलित-मुस्लिमांचे प्रश्न आणखी बिकट आहेत,’ असे प्रा. जालिंदर अडसुळे म्हणाले.
दरम्यान, दुसऱ्या सत्रात शोभा कारंडे, गिरिता गुप्ते, शशी सोनवणे, कॉ. विलास सोनवणे या मान्यवरांनी विचार मांडले. धार्मिक उन्मादावर कारंडे यांनी टीका केली. ‘पू्र्वी गावात एकोप्याचे वातावरण होते. शहरात गेल्यानंतर जाती-धर्मातील भेद प्रकर्षाने जाणवू लागले. लोकांच्या मनात कट्टर धार्मिकता रुजवली जात आहे. हिंदू आणि मुस्लिम कट्टरतावाद चिंताजनक आहे. धर्माचा उन्माद येण्याऐवजी समतेचा उन्माद का येत नाही. जगण्याचे प्रश्न जागेवरच असून फक्त नेते मोठे झाले आहेत. धार्मिक दुही देशासाठी घातक आहे,’ असे कारंडे म्हणाल्या. गिरिजा गुप्ते यांनी एकत्रित संघर्षाची गरज व्यक्त केली.
‘सध्या वेगवेगळे प्रश्न समोर आहेत. सभ्यता आणि संस्कृतीचा देश असे वर्णन असलेल्या देशात महिलांना गँगरेपच्या धमक्या दिल्या जात आहेत. एखाद्या समाजाला लक्ष्य करण्यात येत आहे. देशात रहायचे असल्यास आम्ही सांगतो तसे वागा असा इशारा दिला जातो. देश म्हणजे फक्त भौगोलिक भाग नसतो. देश म्हणजे लोक असतात. लोकांचा आवाज ऐकणार नसाल तर सर्वांना एकत्रित आवाज उठवावा लागेल,’ असे गुप्ते म्हणाल्या. डॉ. मेराज सिद्दिकी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विद्यार्थी, अभ्यासक उपस्थित होते.

हल्ले नेहमीच होतात
‘देशात दलित आणि मुस्लिमांवर नेहमीच हल्ले होतात. त्यामुळे किती हल्ले झाले आणि किती डोकी फुटली हा मुद्दा नसून किती डोकी भ्रष्ट झाली हा मुद्दा आहे. लोकांमध्ये टोकाचा विखार भिनला आहे. हा विखार विवेकी मार्गाद्वारे कमी करण्यावर विचार झाला पाहिजे,’ असे शशी सोनवणे म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कॉ. विलास सोनवणे यांनी भाष्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फुलोरा’ला बेस्ट बिझनेस वुमनचा पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डोळस ग्रुपतर्फे आयोजित सुगरण प्रदर्शनात सातारा-देवळाईतील फुलोरा बचतगटाने बेस्ट बिझनेस वुमन पारितोषिक पटकावले. या गटातर्फे वाळवणाच्या पदार्थांची निर्मिती व विक्री करण्यात येते.
शिवाजीनगर भागातील वाणी मंगल कार्यालयात ३१ मार्च ते २ एप्रिलदरम्यान आयोजित प्रदर्शनात वाळवणाच्या पदार्थापासून गृहसजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंचे ४० स्टॉल होते. डोळस ग्रुपच्या प्रदर्शनाद्वारे घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांना व्यासपीठ व बाजारपेठेशी ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. समर कॉटन, धारवाड सिल्क, इटालियान, जॉर्जेट, बनारसी, सेमी पैठणी साड्या, कोल्हापुरी व राजकोट पॅर्टन ज्वेलरी, लोकरीचे तोरण, कॉर्पोरेट गिफ्ट, चटण्या अशा वैविध्यपूर्ण वस्तू व जिन्नसांचा यात समावेश होता. सहभागी स्टॉलधारकांना प्रमाणपत्र देण्यात आले. बेस्ट बिझनेस पेअरचा पुरस्कार अलका गृहोद्योगाच्या राधिका कुलकर्णी यांना देण्यात आला. त्या व त्यांचे सासरे सतीश कुलकर्णी यांनी हे पारितोषिक स्वीकारले. खाण्याच्या विभागातून ग्रीष्मा दाबेली सेंटरच्या माया श‌हा व गीता वखारिया यांना पारितोषिक मिळाले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रुपच्या अध्यक्ष शैलजा मुन्शी, उपाध्यक्ष मीना तांबोळी, कोषाध्यक्ष सुरेखा जोशी यांनी परीश्रम घेतले.

जालन्यातही सुरू होणार डोळसची शाखा
डोळस ग्रुप एप्रिलमध्ये जालन्यातही शाखा सुरू कसणार असून, गृहोद्योग प्रदर्शनाद्वारेच शाखेचे जालन्यात पदार्पण होणार आहे. जिजामाई गृहउद्योगाच्या दीपाली नाईक या डोळसच्या शाखाप्रमुख म्हणून काम पाहतील. प्रदर्शनामध्ये नगरसेवक सायली जमादार यांच्या हस्ते नाईक यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राम जनीरीयम् जाता राम जनीरीयम्!!’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘राम जनीरीयम् जाता राम जनीरीयम्...’, ‘क्षितिपदे श्री गुरू क्षीरम्...’ , शरयू तीरे आयोध्या वसती मनु नगरम....’ या व अशा गीतरामायणांतील तब्बल १७ संस्कृत गीतांनी औरंगाबादकरांना तृप्त केले. निमित्त होते संत साहित्य शिक्षण व संशोधन प्रतिष्ठानच्यावतीने श्रीरामनवमीचे औचित्यसाधून रविवारी संस्कृत गीत रामायणाच्या कार्यक्रमाचे.
तापडिया नाट्यमंदिरात झालेल्या कार्यक्रमाची निर्मिती सांगली येथील हिरण्यगर्भ संस्कृत केंद्राची होती. गीतांच्या चाली मूळ गीतरामायणाच्याच होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालयाच्या संचालिका डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता. यासाठी संस्कृत भारती, भारतीय शिक्षण मंडळ, मंगलमूर्ती संस्कार केंद्र आदी संस्था मेहनत घेतली. कार्यक्रमासाठी डॉ. अर्चना मोहगावकर, डॉ. संजीव सावजी, श्रीकांत काशीकर यांनी परिश्रम घेतले. संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी झटणारे मुंबईतील संस्कृत पंडित प्रा. सी. भा. दातार यांनी लिहिलेल्या या संस्कृत गीतरामायणाचे प्रयोग सांगलीतील संस्कृत संवर्धन मंडळाने सुरू केले आहेत. दीपक पाटणकर यांनी सूत्रसंचालन केले. अभिषेक काणे, श्रीनिवास हसबनीस, साक्षी हेब्बाळकर, आशा दातार यांनी ही गीते सादर केली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२ वर्षाच्या मुलाने वाचवला जीव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
तालुक्यातील वडवाळी येथील गोदावरी नदीत बुडालेल्या दोन मुलीपैकी एकीचा मृत्यू झाला असून एका १२ वर्षाच्या मुलाने दुसऱ्या मुलीचा प्राण वाचवला. शाळेला सुटी असल्याने रविवारी पूजा विष्णू आहेर (वय १३) व पूनम हिरामण गव्हाणे (वय १०) या मुली मैत्रिणींसह वडवाळी येथील गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेल्या होत्या. पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही मुली बुडाल्या. त्यावेळी तेथे उपस्थित असलेला १२ वर्षांच्या ओमकार नारायण गव्हाणे याने नदीत उडी मारून दोन्ही मुलींना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ओमकार दोघींपैकी फक्त पूनम हिला वाचवू शकला. पूजा जास्त खोल पाण्यात गेल्याने ओमकार तिच्यापर्यंत पोहचू शकला नाही. याप्रकरणी, पैठण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पेट-४’ची प्रतीक्षा सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने येत्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात पीएचडी पूर्व परीक्षासाठी (पेट-४) तब्बल ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्याचवेळी परीक्षा केव्हा होणार हा प्रश्न कायम आहे. अर्जाची प्रक्रिया होऊन वर्ष होत आले, तरी परीक्षेचे नियोजन अद्याप कागदावर आहे. साडेतेरा हजार विद्यार्थ्यांनी पेट-४साठी नोंदणी केलेली आहे.
विद्यापीठाच्या कारभाराचा फटका विभागातील संशोधन करू इच्छिणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना बसतो आहे. ‘पेट-४’साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन वर्ष होत आले. नवीन शैक्षणिक वर्षही सुरू होण्यास आले तरी पेट-४ केव्हा होणार हे स्पष्ट नाही. नियोजनाच्या पातळीवर अपयशी ठरलेल्या विद्यापीठाला ८ वर्षांत केवळ ३ ‘पेट’ परीक्षा घेता आल्या आहेत. ‘पेट’ केव्हा होणार, अशी विचारणा करण्यासाठी रोज विद्यार्थी येत आहेत. त्यांना प्रशासनाकडून योग्य उत्तरही दिले जात नाही. ‘पेट-४’साठी साडेतेरा हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

प्रश्नपत्रिकांचेही नियोजन कागदावर
विद्यापीठ ५८ विषयांत पेट परीक्षा घेणार आहे. यंदा ऑनलाइन परीक्षा घेणार असल्याने प्रशासनाने सहा महिन्यापूर्वीच जाहीर केले. परीक्षेसाठी विषयतज्ज्ञांकडून प्रश्न मागविण्यात आले. त्याची क्वश्चन बँक तयार करण्याचे सूतोवाच प्रशासनाने केले होते, परंतु अनेक विषयतज्ज्ञांकडून प्रश्नावलीच आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

ऑनलाइनसाठी कंत्राटदार
विद्यापीठाकडे स्वतःचे युनिव्हर्सिटी नेटवर्क अँड इन्फॉरर्मेशन सेंटर (युनिक) आहे. त्यासह संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभाग आहे. असे असतानाही विद्यापीठ प्रशासनाने ‘पेट-४’साठी खाजगी कंत्राटदाराची मदत घेण्याचे ठरविले आहे. स्वतःचे ‘युनिक’सारखे सेंटर, संगणकशास्त्रासारखा विभाग असताना, खाजगी कंत्राटदाराचे प्रशासनाकडून भले केले जात असल्याची चर्चाही विद्यापीठात आहे.

पेटसाठी अर्ज
कलाशाखा ः १९१७
विज्ञान ः २८३२
सामाजिकशास्त्र ः २७४१
अभियांत्रिकी ः १६३७
विधी ः १८३
वाणिज्य ः ५८७
व्यवस्थापनशास्त्र ः ७४६
शारीरिक शिक्षण ः २५४
शिक्षणशास्त्र ः ४२५

परीक्षेची तयारी सुरू आहे. परीक्षा केंद्र उपलब्ध होतात का, त्याबाबत माहिती घेतली जात आहे. मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात परीक्षा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- डॉ. सतीश पाटील, विशेष अधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मार्चएंडला तब्बल २२०० ‌बिलांना मंजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मार्चएंड करताना बजेटसाठी धावाधाव करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी २२०० बिले सादर केली. ही बिले एका रात्रीतून कोषागार कार्यालयामार्फत मंजूर करण्यात आली. या बिलांसाठी सुमारे ४२० कोटींचा निधी प्राप्त झाला होता.
राज्य सरकारच्या वित्त व नियोजन विभागाकडून नियोजन व नियोजनेत्तर कामांसाठी विविध विभागांना मार्चएंडला निधी देण्यात येतो. वर्षभर निधीच्या प्रतिक्षेत असलेल्या विविध कामांसाठी निधी आणन्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती. मार्चएंडला मंत्रालयात संपर्क साधून ऑनलाइन निधी मंजूर करून घेण्याचे प्रयत्न सुरू होते.
औरंगाबाद जिल्हा कोषागार कार्यालयात ३० आणि ३१ मार्च या दोन दिवसांमध्ये सुमारे २२०० बिले विविध विभागांनी मंजुरीसाठी सादर केली होती. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जलसंधारण, जलसंपदा, कृषी, आरोग्य, स्वच्छता व पाणीपुरवठा, क्रीडा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय दंत महाविद्यालय, कॅन्सर हॉस्पीटल, सहकार, विधी व न्याय, ऊर्जा, उद्योग आदी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे अनुदान, वैद्यकीय, दैनंदिन वाहनभत्ता, ठेकेदार यासह अनेक प्रकारच्या बिलांची मंजुरी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रुग्णांप्रती सहवेदना-सहानुभूती महत्त्वाची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अद्ययावत वैद्यकीय ज्ञान-तंत्रज्ञान, वेगवेगळ्या अत्याधुनिक तपासण्या नक्कीच आवश्यक आहेत आणि खरे म्हणजे त्यावरच आजचे वैद्यकीय उपचारदेखील अवलंबून आहेत; परंतु रुग्णांप्रती सहानुभूती-सहवेदना त्याहीपेक्षा जास्त महत्वाची आहे. त्याशिवाय रुग्णांचा डॉक्टरांवर विश्वास बसणार नाही आणि रुग्णांना गुणही येणार नाही. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्या वर्षापासून ‘आर्ट ऑफ मेडिसिन’सह रुग्णांप्रती सहवेदनेची दीक्षा विद्यार्थ्यांना दिली गेली पाहिजे, असे परखड मत शहरातील ज्येष्ठ व प्रख्यात चिकित्सक डॉ. म. ह. सावजी यांनी रविवारी (२ एप्रिल) व्यक्त केले.
‘आयएमए’च्या शहर शाखेच्या वतीने आयएमए हॉलमध्ये शहरातील नामवंत व ज्येष्ठ फिजिशियन, तसेच अनेक सामाजिक कार्यांना वाहून घेतलेले व अनेक सामाजिक-शैक्षणिक संस्थांना जन्म घालणारे डॉ. सावजी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, श्रीमती सावजी, शहर शाखेचे मावळते अध्यक्ष डॉ. दत्ता कदम, नूतन अध्यक्ष डॉ. रमेश रोहिवाल, उपाध्यक्ष डॉ. कुलदीपसिंग राऊळ, डॉ. राजेंद्र गांधी, डॉ. रमेश मालाणी उपस्थित होते. यानिमित्त उपस्थितांनी उभे राहून डॉ. सावजी यांना मानवंदना दिली.
सत्काराला उत्तर देताना व उपस्थित डॉक्टरांना उद्देशून डॉ. सावजी म्हणाले, १९६७ मध्ये मी शहरात प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा शहरात फक्त दोन-तीन डॉक्टर होते, घाटीशिवाय एकही हॉस्पिटल नव्हते. तपासण्यांची सुविधा जवळजवळ नव्हतीच. त्यासाठी रुग्णांना मुंबई-पुण्याला पाठवावे लागत होते. आज तर एका ‘चिप’द्वारे सर्व प्रकारच्या तपासण्या होऊ घातल्या आहेत आणि हे तंत्रज्ञान देशात-शहरात लवकरच येईल. मात्र त्यानंतरही रुग्णांप्रती सहवेदना खूप गरजेची आहे. त्याशिवाय रुग्ण तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि तुम्ही करणाऱ्या तपासण्या रुग्णाला नक्कीच गैर वाटतील. त्यामुळे रुग्णाच्या तपासण्या जरुर करा; पण त्या आवश्यक आहेत का, त्या तपासण्या करण्यासाठी रुग्ण आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे का, याचाही विचार जरूर करा, असाही सल्ला त्यांनी डॉक्टरांना दिला. या निमित्त डॉ. सावजींचे महत्व अधोरेखित करणारे शहरातील ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अर्चना मोहगावकर, ज्येष्ठ पॅथॉलॉजिस्ट डॉ. एस. डी. पाटील, अंकुश भालेकर, प्रताप बोराडे आदींचे व्हीडिओदेखील दाखविण्यात आले.

बहारदार सादरीकरणाने वेधले लक्ष
याच कार्यक्रमात शहरातील डॉ. अनघा मारावार, डॉ. राजेंद्र भट, डॉ. प्रसन्न काळगावकर आदींनी विविध गीतांचे बहारदार सादरीकरणे केले, तर डॉ. अनंक कडेठाणकर यांचे सूत्रसंचालन तसेच गिटारवादन वेधक ठरले. डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यांचा सूर मार्मिक कवितेतून उमटला. डॉ. भापकर यांच्या गीतांनीही टाळ्या मिळवल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता विजेची चोरी रोखणार

$
0
0

abdulwajed.shaikh@timesgroup.com
Tweet : @swajedMT
- औरंगाबाद, जालना शहरांतून वीज वसुली होत नाही, असे काही चित्र मुंबईत निर्माण झाले आहे. अशा स्थितीत ही वसुली कशी केली?
- औरंगाबाद, जालना या शहरांचे नाव चांगले नसल्याच्या म्हणण्यात काही तथ्य नाही. मागील दहा वर्षांत शहरातील वसुलीचा आकडा पाहून तसा समज तयार झाला होता, मात्र औरंगाबाद आणि जालना परिमंडळात राबविलेल्या महावसुली मोहिमेत वीज कर्मचाऱ्यांपासून ते माझ्यापर्यंत सर्वांनीच प्रयत्न केले. माझा लाइनमन, माझा स्टॉफ हे उन्हाची पर्वा न करता काम करीत होते. यासाठी कामगार संघटना, इंजिनीअर्स असोसिऐशन; तसेच विविध संघटनांनी सहकार्य केले. २३२ कोटी रुपये वसुलीचे आमचे उद्दिष्ट्य होते. सर्वांच्याच प्रयत्नांमुळे आम्ही २७२ कोटी रुपये वसूल केले आहेत. हे यश माझ्या प्रत्येक कामगारांच्या परिश्रमाचे यश आहे.

- शासकीय कार्यालये तुमच्या टार्गेटवर होती?
- एखादा वीज थकबाकीदार असेल, तर आम्ही त्याचे कनेक्शन तोडणार. तो कोणीही असो. महावितरण कार्यालय ग्राहकांना वीज सुविधा देते. ग्राहकांनी विकत घेतलेल्या विजेच्या बिलाचे पैसे भरावेत, हा साधा नियम आहे. शासकीय किंवा निमशासकीय कार्यालये कधीच टार्गेटवर नव्हती. फक्त माझ्या टार्गेटवर वीज थकबाकीदार होते.

- मार्च महिन्यापर्यंतची वसुली झाली, आता पुढे काय?
- वीज वसुली मोहीम सुरूच ठेवण्यात येणार आहे. मार्च महिना संपला की, वसुली मोहीम थंडावते. आता मात्र तसे होणार नाही. ही मोहीम जूनपर्यंत चालणार आहे. यावर्षी वीजचोरी हे आमचे लक्ष्य राहील. वसुलीसह वीजचोरी कमी करण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. वीजचोरी रोखण्यासाठी प्रत्येक सबस्टेशनला तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- वीज वसुलीसाठी ६० हजारांवर कनेक्शन कट केले. त्याबाबत काय धोरण राहील?
- महावितरण कार्यालयात आम्हाला धोरण ठरविण्याचा अधिकार नाही. वीज वापरली, पण बिल भरले नाही, अशांची वीज तोडण्यात आली होती. या वीज ग्राहकांची यादी घेऊन त्यांच्याकडून थकित बिल वसूल करण्यात येणार आहे. त्यांनी वीज तोडल्यानंतर इतरांकडून कनेक्शन घेतले, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. याशिवाय थकित वीज बिलापोटी काही पैसे भरून, उर्वरित रक्कम भरण्यासाठी आश्वासन ग्राहकांनी दिले आहे. त्यांनी आश्वासनपूर्ती केली नाही, तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

- महावितरणाच्या अनेक विकास योजना प्रलंबित आहेत?
- केंद्र शासनाकडून मिळालेल्या १११ कोटीतून ५० कोटीच्या कामासाठी निविदा मागविल्या आहेत. याशिवाय उर्वरित कामांच्या निविदा काढून लवकरात लवकर ती सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय दीनदयाल उपाध्याय योजनाही ग्रामीण भागात राबविण्यात येणार आहे. आगामी वर्षभरात महावितरणाशी संबंधित सेवा वाढविण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हाळी रेल्वे प्रवाशांअभावी संकटात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नांदेड ते अजनी (नागपूर) उन्हाळी विशेष रेल्वे सेवा काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती, मात्र या रेल्वेला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे ही रेल्वे लवकरच बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाकडून घेण्यात येणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
उन्हाळ्यात प्रवासी संख्या वाढ‌त असल्यामुळे नांदेड विभागातून विविध शहरांसाठी रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनांकडून करण्यात आली होती. या मागणीवरून नांदेड ते अजनी ही विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला. नागपूरसाठी विशेष रेल्वे औरंगाबादहून सुरू केल्यास प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळेल, अशी मागणी रेल्वे संघटनांकडून वारंवार करण्यात आली होती, मात्र ही मागणी विचारात न घेता दक्षिण मध्य रेल्वेने नागपूरसाठी नांदेडहून विशेष रेल्वे सेवा सुरू केली.
मार्च २०१७ ते जून २०१७ या काळात ही रेल्वे चालविण्यात येत आहे. मार्च महिन्यात झालेल्या फेऱ्यांमधून रेल्वेला अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. या रेल्वेला दोन किंवा तीन टक्के प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे तोट्यात चालणारी रेल्वे सेवा सुरू ठेवावी की नाही, असा प्रश्न रेल्वे
विभागाला पडला आहे. प्रतिसाद न मिळाल्यास ही रेल्वे सेवा बंद करण्यात येईल, अशीही माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.

औरंगाबादचा विचार का नाही?
औरंगाबादहून नागपूरसाठी अनेक ट्रॅव्हल्स बस आणि एसटी बस सुरू आहेत. याशिवाय नंदिग्राम एक्स्प्रेसमध्येही प्रवासी वेटिंगवर असतात. उन्हाळ्याच्या सुट्टया लागल्यानंतर प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असते. यामुळे औरंगाबादहून नागपूरसाठी विशेष रेल्वेची मागणी केली होती. ही मागणी मान्य करून ही रेल्वे औरंगाबादहून सुरू केली असती, तर त्याचा निश्चित फायदा झाला असता. रेल्वेलाही तोटा झाला नसता, असे मराठवाडा रेल्वे विकास समितीचे ओमप्रकाश वर्मा यांनी सांगितले.

तिरुपती-नगरसोललाही प्रतिसाद कमीच
शिर्डीच्या साईभक्तांच्या दर्शनासाठी तिरुपती - नगरसोल रेल्वे सुरू करण्यात आली आहे. या विशेष रेल्वेलाही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, अशीही माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरधाव ट्रकने घेतला चिमुकलीचा जीव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बीड बायपास रोडवर संग्रामनगर उड्डाणपुलासमोरील चौकात रविवारी दुपारी ट्रक-दुचाकी अपघातात तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. या अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक केली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; सातारा परिसरातील छत्रपती नगर येथे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक अनिल पवार राहतात. ते तीन वर्षांची मुलगी अनुष्का आणि पत्नी कविता यांच्यासोबत नातेवाईकाकडे विवाह समारंभासाठी निघाले होते. एकनाथनगरमध्ये त्यांचे नातेवाईक राहतात. तेथून ते चारचाकी वाहनातून विवाह समारंभासाठी पैठणला जाणार होते. छत्रपतीनगर येथून पत्नी आणि मुलीला घेऊन ते दुचाकीवरून (क्रमांक एमएच २० डीवाय ०१३४) बीड बायपासपर्यंत आले. तेथे सिंग्नलवर रस्ता क्रॉस करताना महानुभव आश्रमकडे जाणाऱ्या जाणाऱ्या ट्रकने (क्रमांक डब्ल्यूबी २३ बी ४२५७) त्यांना धडक दिली. त्यामुळे दुचाकी वाहनांवर बसलेल्या कविता पवार या एका बाजुला फेकल्या गेल्या. अनिल पवार आणि त्यांची तीन वर्षांची मुलगी ट्रक समोर पडले.

चालकाने अर्जंट ब्रेक लावल्यानंतरही दुचाकी सुमारे २० फुटांपर्यंत फरफटत गेली. त्यावेळी अनुष्काच्या डोक्याला जबर मार लागला. पवार यांच्या डाव्या पायाला मार लागला. प्रत्यक्षदर्शींनी अपघाताची माहिती पोलिसांनी दिली. स्थानिकांनी चालकाला अडवून ठेवले. सातारा पोलिसांनी अनुष्का आणि अनिल पवार यांना घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी अनुष्काला तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रकची तोडफोड केली. या घटनेची नोंद सातारा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

आईचा टाहो

अपघातानंतर जखमी अनिल पवार आणि त्यांची मुलगी अनुष्काला घाटीत दाखल केले. तीन वर्षांच्या मुलीचा आपल्यासमोर मृत्यू झाल्याचा धक्का कविता पवार यांना बसला. घाटी हॉस्पिटलमद्ये त्यांनी, ‘माझी मुलगी मला परत द्या,’ असा टाहो फोडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३३ टक्के पाण्यावर मराठवाड्याची मदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवघ्या सहा महिन्यांपूर्वी जलमय झालेला मराठवाड्यात कडक उन्हाळ्यामुळे आता पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. एकीकडे टँकरची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे मराठवाड्यातील धरणांची पातळी कमी होत आहे. अवघ्या महिन्याभरामध्ये तब्बल १०.७२ टक्के पाण्याची घट झाली असून, मराठवाड्याची भिस्त आता २६४५ दशलक्ष घनमीटर (३३.०९ टक्के) पाण्यावर राहिली आहे.

विभागातील ८५४ प्रकल्पांमध्ये अवघ्या महिन्याभरात १०.७२ टक्के पाण्याची घट झाली आहे. सध्या प्रकल्पांमध्ये २६४५.९५ दशलक्ष घनमीटर (३३.०९ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. राज्याच्या नकाशावर गेल्या काही वर्षांपासून कायम दुष्काळी प्रदेश अशी काहीशी ओळख असलेल्या मराठवाड्यात गेल्यावर्षी दमदार पाऊस झाला. अनेक वर्षानंतर आठही जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प तुडूंब भरले होते. सर्वात मोठे जायकवाडी धरणात पाणीपातळी ८५ टक्क्यांपर्यंत पोचली होती. यंदा मुबलक पाणी असल्याने पाण्याची अडचण होणार नाही, असा अंदाज होता, मात्र औरंगाबाद, बीड, जालना जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मार्च अखेरीस पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे प्रशासनाला टँकर सुरू करावे लागले. सप्टेंबरमध्ये पाणी-पाणी झालेल्या मराठवाड्याला आता अवघ्या सहा महिन्यांमध्येच दुष्काळाचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे.

मार्चमध्ये मराठवाड्याचे सरासरी तापमानही ३८ अंश सेल्यिसयससेपक्षा अधिक असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवनही वेगाने होते. यामुळे मोठे प्रकल्प, मध्यम; तसेच गोदावरी, मांजरा नदीवरील बंधाऱ्यांमधील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे प्रकल्पातील पाण्याची मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होणार असल्यामुळे पावसाळ्यापर्यंत प्रकल्पातील पाणीपातळी आणखी घसण्याची शक्यता आहे.

टँकरफेराही सुरू

मराठवाड्यात मार्च अखेरीस औरंगाबाद जिल्ह्यात १३८ बीड जिल्ह्यात ५ तर जालना जिल्ह्यात ८ टँकरचा फेरा सुरु झाला आहे. उन्हाचा कडाका जसजसा वाढणार तशी पाणीटंचाई तीवृ होणार असल्याने येत्या काही दिवसांमध्ये टँकरचा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी विहिरींचे अधिग्रहणही मोठ्या प्रमाणावर करण्यात आले आहे.

महिन्याभरात १० टक्क्यांची घसरण

मराठवाड्यातील प्रकल्पांमध्ये २७ फेब्रुवारी रोजी ३५६७ दशलक्ष घनमीटर (४४.६२) पाणीसाठा होता, तर ३१ मार्च रोजी पाणीपातळी घसरून २६४५ दशलक्ष घनमीटरपर्यंत (३३.०९ टक्के) पोचला आहे. अवघ्या महिन्याभरात तब्‍ब्ल ९२२ दशलक्ष घनमीटर म्हणजे १०.७२ टक्के पाण्याची घट झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images