Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

संपूर्ण कर्जमाफीसाठी शिवसेनेची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेने शनिवारी खुलताबाद तहसील कार्यालयासमोर निदर्शने केले.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला त्याप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी करण्यात आली. आमदार प्रशांत बंब यांनी केलेल्या वक्तव्याचा यावेळी निषेध करत निदर्शने करण्यात आला. तहसीलदार डॉ. अरूण जऱ्हाड यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, युवासेना जिल्हा अधिकारी संतोष माने, अंबादास नलावडे, तालुकाप्रमुख किशोर कुकलारे, राजू वरकड, उपतालुकाप्रमुख दत्ता मालोदे, पोपट वेताळ, रामहरी हिवर्डे, नगरसेवक नरेंद्रसिंग साळुंके, सुधाकर दहिवाल, रवींद्र तंबारे, विजय चव्हाण आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डोंगरगावात चर खोदण्यास सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सामील झालेल्या डाेंगरगांव कवाड येथील डोंगरावर चर खोदण्याच्या कामाचे पंचायत समिती सभापती सर्जेराव मेटे यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाथ्रीकर, अनुराधा चव्हाण, किशोर बलांडे, उपसभापती एकनाथ धटिंग, तहसीलदार संगीता चव्हाण, गटविकास अधिकारी एम. सी. राठोड, नाथा काकडे, प्रवीण पारख, गिरीश दुगड, पाणी फाउंडेशनच्या ज्योती सुर्वे यांची उपस्थिती होती. स्पर्धेचा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे २०१७ असा आहे. स्पर्धेत उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील गावांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम बक्षीस ५० लाख, दुसरे ३० लाख, तर तिसरे २० लाख रुपयांचे बक्षीस राहणार आहे. या स्पर्धेत तालुक्यातील ५४ गावांचा समावेश करण्यात अाला अाहे. या कार्यक्रमाला बाजार समिती संचालक रोशन अवसरमल, सरपंच विष्णू भोपळे, राजेंद्र डकले, कृषी सहायक प्रकाश तुपे, मंडळ अधिकारी नरेंद्र उखळकर, तलाठी भरत दुतोंडे, पाणी फाउंडेशनचे समन्वयक प्रल्हाद आरसूळ, बिभीषण भोईटे, जगन्नाथ डकले, विठ्ठल भोपळे, भीमराव भोपळे, सदाशिव भोपळे, केशवराव बोडखे, सर्जेराव डकले, सुभाष बोडखे, शिवाजी डकले, अशोक डकले, हरी भोपळे, ग्रामसेवक अवचित राऊतराय, योगेश भोपळे, दिनकर डकले, त्र्यंबक डकले, शंकर बोडखे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्याग्रस्त मुलांचे गोळेगावात श्रमदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
पाणी फाउंडेशनतर्फे आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातील गोळेगावने सहभाग घेतला आहे. या गावात राज्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ६५० मुलांनी श्रमदान करत आहेत. ‘आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे मनोधैर्य अफलातून असून त्यांच्या श्रमदानातून राज्य व देश प्रेरणा घेईल,’ असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केले.
पाणी फाउंडेशन व भारतीय जैन संघटनेतर्फे गोळेगाव येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पाणी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ, आमदार प्रशांत बंब, अप्पर विभागीय आयुक्त डॉ. विजयकुमार फड, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, मुख्यकार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड, उपमुख्यकार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा, प्रफुल्ल पारख, गौतम संचेती, प्रवीण पारख, अमर गांधी, पारस चोरडिया, गोळेगावचे सरपंच संतोष जोशी यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना डॉ. भापकर म्हणाले, येत्या पाच वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. स्वातंत्र्यानंतर उपयायोजना करूनही टंचाई दूर झालेली नाही. त्यावर मात करण्यासाठी राबविण्यात येत असलेले जलयुक्त शिवार अभियान आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचले आहे. येत्या दोन-तीन वर्षात राज्यातील दुष्काळ संपणार असून दुष्काळग्रस्त गावे लवकरच पाणीदार गावे म्हणून ओळखली जातील, असा दावा डॉ. भापकर यांनी केला.
सत्यजित भटकळ हे गोळेगावातील उत्साह पाहून भारावून गेले. ते म्हणाले, भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने दुष्काळमूक्त महाराष्ट्र करण्याचे स्वप्न लवकरच साकार होईल. आमदार प्रशांत बंब यांनीही श्रमदान केल्याचा उल्लेख केला.
यावेळी उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, पंचायत समिती सभापती अर्चना अंभोरे, उपसभापती गणेश अधाने, उपजिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, तहसीलदार डॉ. अरुण जऱ्हाड यांच्यासह अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

चार तास श्रमदान
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी ‘शेतकऱ्यांचे जीव वाचवा, आत्महत्या केली बाबांनी, आम्ही पोरके झालो, तुम्ही होऊ नका, पाणी अडवा पाणी जिरवा’ हे समूहगीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली. गोळेगाव येथील ५०० महिलांनी पहाटे साडेपाच वाजता महाराष्ट्रातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ६५० मुलांचे औक्षण करून स्वागत केले. सकाळी सहा ते दहा श्रमदान करण्यात आले. पुढील ४५ दिवस गोळेगाव येथील ग्रामस्थ श्रमदान करणार आहेत. खुलताबाद तालुक्यातील ३७ गावात वॉटर कप स्पर्धेत सहभाग आहे.

ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरण
गोळेगावात श्रमदानासाठी २० मुलांचा एक गट तयार करून त्यांना पावसाच्या नक्षत्रांची नावे देण्यात आली. श्रमदान करणाऱ्यांनी ‘भारत माता की जय’ च्या घोषणा दिल्या. दोन ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यात आले. टी शर्ट व टोप्या घातलेले एक हजार श्रमसैनिकांनी काम केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावीर जयंती जिल्ह्यात उत्साहात साजरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भगवान महावीर यांचा २६१६ वा जन्ममहोत्सव रविवारी जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ठिकाठिकाणी मिरवणुका व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

वेरूळमध्ये उत्सव
खुलताबादः वेरूळ येथील श्री पार्श्वनाथ ब्रहमचर्याश्रम जैन गुरुकुल व सकल दिगंबर जैन समाजातर्फे भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक महोत्सव साजरा करण्यात आला. उत्सवाची तयारी संस्थेचे सचिव डॉ. प्रेमचंद पाटणी, निर्मल ठोळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. गुरुकुलमधून महावीरांच्या प्रतिमेची रथातून मिरवणूक काढण्यात आली. रथासमोर कुंभकलशची बोली लावून सविता बांदे यांनी मान मिळवला. पांढरे वस्त्र परिधान करून गुरुकुल विद्यार्थी, केशरी साड्या घालून महिला मिरवणुकीत सामील झाल्या. मिरवणुकीची सांगता वेरूळ लेणीसमोरील कीर्तीस्तंभ येथे करण्यात आली. यावेळी दीपा कास्लीवाल, निखिता पाटणी, पूजा पाटणी, सरला पहाडे, नीलम शाह यांनी रांगोळ्या काढून कीर्तीस्तंभावर सजविला होता. यावेळी महेंद्र दगडफोडे, संदीप अजमेरा, डॉ. प्रेममचंद पाटणी, पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. गुरुकुल मधील मंदिरावर निर्मल ठोळे व रमेश आंबेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. रुपाली जैन यांनी ध्वजगीत गायले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शेख रफिक यांनी वेरूळ गावात स्वखर्चातून पंचरंगी ध्वज लावले होते. मिरवणुकीत अतुल बांदे, वीरेंद्र वाकले, संजय महाजन, विजय हणमंते हणमंते, संतोष जैन, लालचंद वानरे, राजकुमार नरखडे, अमर ठोळे, भोजन समितीमध्ये राजू पाटोदी, जितेंद्र पाटणी, स्वप्नील ठोळे, आनंद गंगवाल, चेतन पाटणी, नरेश साहुजी, महेंद्र वाकले, आशिष कान्हेड, विनोद कान्हेड, किशोर चानेकर, दीपक जैन, प्रदीप माद्रप यांनी परिश्रम घेतले.


पैठणमध्ये पालखी
पैठणः जयंतीनित्त शहरातून रविवारी भगवान महावीर यांच्या मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. महावीर स्तंभाचे पूजन करून जैन गुरू प्रसन्नसागरजी महाराज व पियूषसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने पालखी मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. पालखी मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात महिला व तरूण पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते. पालखी मिरवणूक महावीर स्तंभ, श्रीनाथ हायस्कूल, बसस्थानक चौक, महाराणा प्रताप चौक, शिवाजी चौक मार्गे जैन मंदिरात नेण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात जैन बांधव सहभागी झाले होते. जैन मंदिरात मुनिसुव्रत्नाथ यांच्या मूर्तीचे अभिषेक व महाप्रसादाचे वाटप करून पालखी मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

फुलंब्रीत जयंती
फुलंब्रीः येथे भगवान महावीर जयंती माेठ्या उत्साहात साजरी करण्यात अाली. दिगंबर जैन मंदिरापासून महावीर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात अाली. मिरवणुकीत महिला-पुरुषांनी गरबा नृत्य सादर केले. मानवीय अाहार शाकाहार, अहिंसा परमाे धर्म, जिअाे अाैर जिने दाे, अशा घाेषणा देत प्रमुख मार्गावरून जाऊन मिरवणुकीचा मंदिरासमाेर समाराेप करण्यात आला. त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. जयंतीनिमित्त सर्व जैन समाज बांधवांचे व्यवहार बंद हाेते.
याप्रसंगी भाजप जिल्हा सरचिटणीस सुहास शिरसाठ, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाथ्रीकर, जे. पी. शेजवळ, राजेंद्र ठाेंबरे, बालाजी ढाेके, अण्णासाहेब जाधव, बाळासाहेब देशमुख, मधुकरराव मुळे, संदीप शिंदे, उदय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती हाेती. वर्धमान पाटणी, संताेष मनाेरकर, विजय पाटणी, राजेंद्र सावजी, अशाेकसेठ धुमाळ, सुधीरसेठ धुमाळ, सुर्यकांत सावजी, अमाेर मनाेरकर, मुकेश काला, इंद्रकुमार सावजी, हिरालाल पाटणी, महावीर धुमाळ, मंगेश साेनी, संजय पाटणी, संजय जैस्वाल, विशाल पाटणी, सनी पाटणी, दीपक धुमाळ, सुनील कासलीवाल, निखील पाटणी, तेजस पाटणी, अभिजीत मनाेरकर, जयेश मनाेरकर हे मिरवणुकीत सामील झाले.

किनगावमध्ये उत्सव
फुलंब्रीः तालुक्यातील किनगाव येथे भगवान महावीर यांची जयंती रविवारी साजरी करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य अनुराधा चव्हाण यांनी प्रतिमापूजन केले. महावीर जैन, शोभा जैन यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. याप्रसंगी परमुख पाहुणे म्हणुन बाळासाहेब शिंदे, अंनत सोनवणे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला अमोल चव्हाण, चैतन जैन, देवनाथ नामेकर, सुनील मनोरकर, आदिनाथ सोनवणे, सचिन गोरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन स्वभिमानी फाउंडेशनतर्फे करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस भरती परीक्षेचा आज निकाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहर पोलिस दलातील ३३ जागांसाठी रविवारी लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर ही परीक्षा पार पडली. यावेळी ५३९ उमेदवारांपैकी ४६४ उमेदवार उपस्थित, तर ७५ जण गैरहजर राहिले. या परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारपर्यंत घोषित करण्यात येणार आहे.
शहर पोलिस दलातील ३३ जागांसाठी २९ मार्चपासून भरतीला सुरुवात करण्यात आली होती. ३१ मार्च रोजी उमेदवारांची मैदानी चाचणी संपली होती. रविवारी लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली. उमेदवारांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मैदानावर भव्य मंडप व कुलरची व्यवस्था करण्यात आली होती. उमेदवारांना काही अडचण असल्यास त्यांचे शंका निरसन करण्यात येत होते. उमेदवारांचे ओळखपत्र व चेसीस क्रमांक तपासून त्यांना बसवण्यात येत होते. या परीक्षेसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ३५० कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त संदीप आटोळे, राहुल श्रीरामे स्वतः मैदानावर परीक्षेच्या दरम्यान उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीसाठी केंद्राने हस्तक्षेप करावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केंद्र सरकारने महाराष्ट्रातील कर्जमुक्ती प्रश्न राज्यावर सोपवण्याचे धोरण बदलून महाराष्ट्र शासनाला शेतकरी कर्जमुक्तीचा निर्णय घेण्याचे आदेश द्यावे. केंद्र सरकारने हस्तक्षेप करून वाढत्या शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष अॅड. विष्णू ढोबळे यांनी केली आहे. राज्यात दररोज नऊ शेतकरी आत्महत्या करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राजकीय वर्चस्व आणि आकसापोटी संपले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमुक्तीचा निर्णय घेण्याऐवजी विरोधी पक्षांना प्रतिप्रश्न करून कर्जमुक्तीचा निर्णय टाळला. अगोदर केंद्राचे आश्वासन आणि नंतर योग्य वेळ शोधत अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले. त्यामुळे राज्यभर शेतकऱ्यांत नैराश्य पसरले असून दररोज सरासरी नऊ शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ही परिस्थिती हाताळण्यात केंद्र आणि राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका अॅड. ढोबळे यांनी केली. शेतकरी कर्जमुक्तीची मागणी केवळ शेतकरी व राजकीय पक्षांची नाही. औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या वकील परिषदेतही कर्जमुक्ती करण्याची मागणी वकीलांनी केली आहे. सिंचन, गुंतवणूक, शेती, हमीभाव हे कृषी क्षेत्रातील प्रश्न शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत आहेत. उद्योगांना लाखो कोटी रूपयांची सवलत देणारे सरकार ३० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची टीका अॅड. ढोबळे यांनी केली. देशाचे सात टक्के राष्ट्रीय उत्पन्न वाढले आहे. यात देशातील शेतकरी आत्महत्यांचा चेहरा प्रामुख्याने दिसतो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आणि देशात कर्जमुक्तीचा निर्णय घेणे राष्ट्रीय गरज आहे, असे पत्रकात म्हटले आहे.
कर्जमाफीसाठी उत्तर प्रदेशात आंदोलन झाले नसताना सरकारने कर्जमाफी जाहीर केली. तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत असताना व आंदोलने असताना राज्य सरकार कर्जमाफी करीत नाही. राज्य सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी निराश आहेत, असे अॅड. ढोबळे यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नांदेड पॅटर्न’च्या आडून ‘उपक्रमांचा पॅटर्न’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘नांदेड पॅटर्न’वर राज्यभर चर्चा सुरू झाली आहे व पुण्यासह काही शहरांमध्ये अनुचित प्रकारांना पायबंद घालण्यासाठी अनेक डॉक्टर स्वतःहून पुढे येत आहेत. औरंगाबादध्येही ‘नांदेड पॅटर्न’चे चर्चेचे गुऱ्हाळ रंगत असले तरी सध्यातरी कोणतीही ठोस एकत्रित कृती दिसून येत नाही. अनुचित प्रकार नकोच आणि हीच भूमिका पहिल्यापासून असल्याचे वेगवेगळ्या शाखांचे डॉक्टर म्हणत असले तरी, या प्रश्नी एकत्रितपणे पुढे येणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. अर्थात, ‘नांदेड पॅटर्न’च्या आडून वेगवेगळे उपक्रम सुरू करण्याचे संकेतही डॉक्टरांनी दिले आहेत.
डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर नांदेडमधील ‘फिजिशियन असोसिएशन’ने स्वतःवर आचारसंहिता घालून घेतली आहे आणि ‘कट प्रॅक्टिस’सह इतर अनेक अनूचित प्रकारांना मूठमाती देण्याचे जाहीर केले आहे. याच आचारसंहितेमध्ये रुग्ण-डॉक्टर संबंध सुधारण्यासाठी वेगवेगळ्या प्रयत्नांना प्राधान्य देण्यात आले आहे. या पॅटर्नची राज्यभर जोरदार चर्चा झाली. पुण्याच्या डॉक्टरांनीही ‘कट प्रॅक्टिस’ बंद करण्याचे जाहीर केले आहे आणि इतर शहरांमध्येही या प्रकारचे जाहीर उपक्रम सुरू होण्याचे संकेत आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाडा-खान्देशातील सर्वांत मोठे ‘मेडिकल हब’ ठरू पाहणाऱ्या औरंगाबादमध्येही ‘नांदेड पॅटर्न’वर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. डॉक्टरांमध्ये या विषयी वैयक्तिक तसेच त्या त्या शाखांच्या संघटनांमध्ये मोठ्या चर्चा सुरू असल्या तरी सर्व शाखांचे डॉक्टर एकत्रित येऊन ठोस कृती कार्यक्रम अद्याप तरी सुरू करण्यात आलेला नाही. तरीदेखील अशा प्रकारच्या ‘ड्राइव्ह’ची खरोखर गरज असल्याचे मत डॉक्टरांमधून व्यक्त होत आहे. या संदर्भात प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अजित भागवत म्हणाले, हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनीही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. काही मोजक्या डॉक्टरांकडून होणाऱ्या कट प्रॅक्टिस, अन्इथिकल प्रॅक्टिसविषयी लोकांनाही माहिती आहे आणि म्हणूनच सर्वांनी त्याविरोधात पुढे येणे गरजेचे झाले आहे. त्याचाच भाग म्हणून नांदेड व पुण्यातील डॉक्टर पुढे आले आहेत. काही मोजक्या लोकांमुळे संपूर्ण वैद्यकीय पेशाला डाग लागतोय. परिणामी, जे प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करीत आहेत, त्यांना नैराश्य येत आहे व एकूणच रुग्णांचा डॉक्टरांवरील विश्वास डळमळीत होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. याचा विचार करुन सर्व डॉक्टरांनी पुढे येऊन अशी आचारसंहिता जाहीर केली पाहिजे, असे नक्कीच वाटते, असेही डॉ. भागवत म्हणाले. तर, ‘आयएमए’चे शहर शाखेचे अध्यक्ष डॉ. रमेश रोहिवाल म्हणाले, नांदेडमधील डॉक्टरांचा उपक्रम नक्कीच स्तुत्य व अनुकरणीय आहे. रुग्ण-डॉक्टरांमध्ये संवाद वाढवण्यासाठी आणि संबंध सुधारण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम-उपक्रम वर्षभर राबविले जाणार आहेत. त्याची सुरुवात लवकरच होईल, असेही ते म्हणाले.

‘त्या’ डॉक्टरांची तक्रार करणार
रेडिओलॉजिस्ट डॉक्टरांच्या संघटनेचे शहर शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध कुलकर्णी म्हणाले, आमच्या संघटनेचे डॉक्टर पूर्वीपासूनच ‘नांदेड पॅटर्न’ राबवतात व त्यामुळे ‘नांदेड पॅटर्न’चा तसा विषय येत नाही. तरीदेखील या धर्तीवर जे डॉक्टर चूक करीत असतील, त्यांना समजावण्यात येईल व त्यानंतर मात्र त्यांच्याविरुद्ध संघटनेकडे व ‘एमसीआय’-‘एमएमसी’कडे तक्रार केली जाईल, असेही डॉ. कुलकर्णी म्हणाले.

पॅथॉलॉजिस्टचे स्वतःवर बंधन
‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट’च्या नांदेड शाखेने फिजिशियन डॉक्टरांच्या ‘नांदेड पॅटर्न’ला पाठिंबा देत स्वतःवर बंधन घातले असून, केवळ दोनच पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व अवैध-अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पत्र नांदेड शहर शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश देव, सचिव डॉ. राजेश माने यांनी एमएमसी सदस्य डॉ. संजय राऊत यांना दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जिओ और जिनो दो’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मानवीय आहार शाकाहार, बेटी बचाव बेटी पढाव, धरती बचाव, थॅलेसिमिया जागरुकता, सौर ऊर्जेचे महत्त्व आदी संदेश देत औरंगाबादेत रविवारी सकल जैन समाजाने भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी केली. सकाळी भक्तीपूर्ण वातावरणात निघालेल्या मिरवणुकीत भक्ती, अहिंसा आणि जनजागृतीचा त्रिवेणी संगम अनुभवास आला.
गेल्या १७ वर्षांपासून औरंगाबादेत सकल जैन समाजातर्फे भगवान महावीर जयंती साजरी करण्यात येते. हा उपक्रम देशात अभिनंदनीय ठरला आहे. यंदा श्री भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त गेल्या दहा दिवसांपासून विविध उपक्रम, स्पर्धा घेण्यात आला. रविवारी सकाळी महावीर चौकातील महावीर स्तंभाजवळ धर्मध्वजवंदन झाले. त्यानंतर उत्तमचंद ठोले दिगंबर जैन छात्रालय आणि गुरुगणेश नगरात ध्वजवंदन झाले. राजाबाजार जैनमंदिर येथून सकाळी वाहन फेरी काढण्यात आली. त्यानंतर सकाळी आठ वाजता पैठणगेट येथून मुख्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. आचार्य यशोवर्मसुरीश्वर, आचार्य भाग्ययशसुरीश्वर, आचार्य कर्मविजय नंदी महाराज, मयंकसागर महाराज, गणिनीप्रमुख आर्यिका ज्ञानमती माताजी, साध्वी प्रज्ञाश्रीजी, प्रकाशकवरजी, किरणसुधाजी, कुलभूषणमती माताजी, चिन्मयश्रीमती, विवेकमालाश्रीजी, विशिष्टमालाश्रीजी, दीप्तीजी व लक्षिताजी आदींच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीस प्रारंभ झाला.
मिरवणुकीत श्री शंखेश्वर पार्श्वनाथ जैन जिनालय सिडको एन -३ रथ, श्री पार्श्वनाथ खंडेलवाल दिगंबर जैन मंदिर राजाबाजार पालखी, श्री अग्रवाल दिगंबर जैन मंदिर सराफा, श्री सैतवाल दिगंबर जैन मंदिर भाजीबाजार येथून पालखी, श्री आनंदजी कल्याणजी ट्रस्टचे श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर जोहरीवाडा येथून रथ, औरंगाबाद श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ रथयात्रेत अग्रभागी सहभागी झाले होते. भगवान महावीरांचा जयघोष करत मिरवणूक पैठणगेट, गुलमंडी, मछली खडक, सराफा, शहागंजमार्गे राजाबाजार येथे विसर्जित झाली.
‘जैनस फॉर इंडिया’ या विषयावर आधारित स्वच्छ भारत, आत्महत्याग्रस्त शेतकरी, पूरग्रस्तांना केलेली मदत व पुर्नवसन, शहीद जवानांना दिलेली मदत, पर्यावरण, पाणीबचाव, बेटीबचाव, पशुधन बचाव, वृक्षारोपण आदी विषयांवरील सजीव देखावे लक्षवेधी ठरले. अग्रवाल जैन महिला मंडळाच्या वतीने कचरा वर्गीकरण करण्याचा संदेश देणारा सजीव देखावा सादर केला गेला. जैन सोशल नेटवर्क संगिनी ग्रुपतर्फे थॅलेसिमिया जागरुकता विषयाचा सजीव देखावा मांडला होता. रश्मी शहा, रुपाली भंडारी, रिता मुनोत यांच्यासह सदस्यांचा यात सहभाग होता. आहार विवेकने सादर केलेला ‘शाकाहाराचे महत्त्व’ हा देखावा सर्वांचे आकर्षण ठरला. ‘हॉटेल का खाना रोगो को बुलाना’ अशा वाक्यांनी नागरिकांना संदेश दिला गेला. भारतीय जैन संघटनेच्या वतीने महाराष्ट्र दुष्काळग्रस्त अभियान राबविले जात आहे. त्याची माहिती देणारा देखावा मिरवणुकीत होता. जैन इंजिनीअर्स सोसायटीतर्फे सौर ऊर्जेचे महत्त्व सांगणारा देखावा मांडण्यात आला होता. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. गुलमंडीवर जय गुरू मिश्री युवा मंडळाने व्यासपीठ उभारले होते. तेथे मिरवणुकीत सहभागी प्रत्येक मंडळाचे स्वागत करण्यात येत होते. सिटी चौकात पोलिसांतर्फे स्वागतकक्ष उभारण्यात आला होता. गुरू परिवारातर्फे शहागंज येथील गांधीपुतळ्याजवळ स्वागत कक्ष उभारला होता. तेथे विलास साहुजी, अमोल पाटणी, प्रवीण लोहाडे, प्रीतम पाटणी, निलेश सेठी मिरवणुकीत सहभागी झालेल्यांचे स्वागत करत होते.
मिरवणूक विसर्जित झाल्यानंतर सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या प्रांगणात महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. नम्रता ग्रुपच्या मुगदिया परिवारातर्फे भक्तांसाठी आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीत खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, काँग्रेस शहराध्यक्ष नामदेव पवार, महापौर भगवान घडमोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, शिवसेना शहरप्रमुख रेणुकादास वैद्य, माजी उपमहापौर प्रशांत देसरडा, नगरसेवक नंदकुमार घोडेले, सचिन खैरे, गजानन बारवाल, बसवराज मंगरुळे, प्रफुल्ल मालानी आदी सहभागी झाले होते.

पाणी, शीतपेय, खाद्यपदार्थांचे वाटप
मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी मिरवणुकीत सहभागी झालेल्या भक्तांसाठी पिण्याचे पाणी, सरबत, बिस्किट, खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. देखावे आणि मिरवणुकीतील वाहनांत बसलेल्या लहान मुलांची विशेष काळजी घेण्यात आली.

ढोल पथक
वर्धमान रेसिडेन्सीचे ढोल पथक हे मिरवणुकीतील सर्वात आकर्षण ठरले. यंदा प्रथमच जैन बांधवांचे ढोल पथक महावीर जयंतीच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. उत्साहाने सहभागी झालेल्या युवक युवतींनी आपल्या कलाकृती सादर करून सर्वांची मने जिंकली.

संयोजन समिती
सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा, कार्याध्यक्ष आमदार सुभाष झांबड, कोषाध्यक्ष जी. एम. बोथरा, सरचिटणीस महावीर पाटणी, ललित पाटणी, सुधीर साहुजी, डॉ. प्रकाश झांबड, डॉ. शांतीलाल संचेती, रवी मुगदिया, भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव समितीने अध्यक्ष वृषभ कासलीवाल, कार्याध्यक्ष विनोद बोकडिया, भारती बागरेचा, मुकेश साहुजी, अनिल संचेती, मिठालाल कांकरिया, निलेश सावळकर, राजेश मुथा, संतोष पापडीवाल, संजय सुराणा, प्रभाकर कुमठे, कुंतीलाल हिरण, अजित सुराणा, निलेश पहाडे, सुनील वायकोस, स्वप्नील पारख, पंकज साकला, भावना सेठिया, मंगला पारख, कविता अजमेरा, नरेंद्र अजमेरा, पीयूष कासलीवाल, सुधीर सावजी.

१ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट
आमदार सुभाष झांबड यांनी यावर्षी १ लाख वृक्षलागवडीचा संकल्प जाहीर केला होता. त्यानुसार महावीर जयंती उत्सवात सहभागी झालेल्यांना वृक्षलागवडीचे महत्त्व सांगण्यात आले. महाप्रसादाच्या ठिकाणी रोपट्यांचा स्वतंत्र कक्ष लावण्यात आला होता. ‘पुढील वर्षभरात १ लाख झाडे लावावीत, जेणेकरून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होईल. तुम्हाला जेवढी झाडे पाहिजेत ती घेऊन जा पण प्रत्येक झाड जगले पाहिजे,’ असे प्रत्येकाला सांगण्यात येत होते.

१८२ जणांचे रक्तदान
महावीर जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी सकल जैन समाजातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. नऊ रक्तपेढ्यांमार्फत संकलन करण्यात आले. दुपारी तीनपर्यंत १८२ जणांनी रक्तदान केले.


अशी रंगली मिरवणूक
- लुक अँड लर्न पाठशाळातर्फे जैसे खावे अन्न, तसे होई मन त्यामुळे चांगले खाऊन चांगले विचार निर्माण करा, असा संदेश घोषणातून दिल्या. विमलाराणी बाफना, रुपाली चोरडिया, कल्पना रुणवाल, तृप्ती बोरुडिया, अर्चना मुगदिया, प्रिती कांकरिया उपस्थिती होती.
- दिगंबर जैनवर्धन संस्थेतर्फे मोबाइलचे मुलांवर होणारे दुष्परिणाम यावर आधारित सजीव देखावा केला होता.
- सुमनबाई राजाभाऊ काला गर्ल्स होस्टेलमधील रंजना छाबडा, श्रद्धा अजमेरा, शिवानी जैन, हर्षिता सावजी, दर्शना पहाडे आदी विद्यार्थिनी काश्मिरी पेहरावात सहभागी झाल्या.
- प्रगती महिला मंडळतर्फे भगवान महावीर गर्भधारणा देखावा मेरू पर्वतासह करण्यात आला. यासाठी वासंती काळे आणि मीनाक्षी उदगीरकर यांनी पुढाकार घेतला.
- खंडेलवाल दिगंबर जैन महिला मंडळातर्फे अन्नदान करण्याचे आवाहन करणारा सजीव देखावा करण्यात आला.
- बालाजीनगर येथील श्री कुंथुनाथ दिगंबर जैन मंदिरातर्फे मांगीतुंगी (जि. नाशिक) येथील वृषभनाथ भगवानाच्या १०८ फूट मूर्तीचा देखावा साकारला होता.
- अरिहंतनगरातील युगप्रवर्तक १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिराच्या महिला मंडळतर्फे ‘एकता मे ही जीवन है’ हा संदेश देणारे फलक लावण्यात आले होते. यामध्ये अनिता पहाडे, मधू कासलीवाल, वर्षा कासलीवाल, लता अजमेरा, कुसुम अजमेरा उपस्थित होते.
- माणिकचंद पहाडे यांनी रझाकाराविरोधात केलेल्या कार्याची माहिती देणारा देखावा पी. यू. जैन विद्यालयातर्फे सादर करण्यात आला.
- विमलनाथ जैन पाठशाळातर्फे नवकार की महिमा हा सजीव देखावा सादर करण्यात आला.
- चंद्रप्रभू खंडेलवाल दिगंबर जैन मंदिरातर्फे जैन फॉर ऑल या संकल्पनेवर आधारित देखावा करण्यात आला होता. चारा छावणी, शहीद जवानाच्या परिवाराला आर्थिक मदत, स्वातंत्र्यसैनिकांची माहिती, स्वच्छता अभियान आणि अहिंसा पुतळ्याची माहिती देण्यात आली. कविता अजमेरा, मीना पापडीवाल, मंजू पाटणी, भारती बाकलीवाल, शोभा अजमेरा यांचा यात सहभाग होता.
- बळ्ळारी ( कर्नाटक) येथून कैलास जैन हे महावीर जयंती उत्सवासाठी आले होते. गेल्या १५ वर्षांपासून ते उत्सवासाठी आवर्जून उपस्थित राहतात.
- सिडको एन -३ येथील वाहन फेरीत जर्मनीच्या दोन विद्यार्थिनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाल्या. या विद्यार्थिनी शिक्षणासाठी औरंगाबादेत आल्या आहेत.
- सिटी चौकातील स्वागत कक्षात राजेंद्र दर्डा आणि महावीर पाटणी सहभागी मंडळांना सूचना देत होते. दहानंतर उन्हाची तीव्रता वाढल्याने सिटीचौकापासून शहागंजपर्यंत मिरवणूक वेगाने पुढे सरकली.
- महावीर जयंतीनिमित्त महाप्रसादाचे मानकरी होण्यासाठी दरवर्षी बोलिया लागतात. यंदा महाप्रसाद मंडपातच पुढील चार वर्षांचे यजमान निश्चित झाले.
- अर्पण ग्रुपच्या वतीने अॅम्ब्युलन्स देण्यात आली. गरजू रुग्णांना या अॅम्ब्युलन्सद्वारे मोफत सेवा पुरविली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देशात शेतकऱ्यांची दुर्दशा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा गाजत आहे. युरोपात शेतकऱ्यांना कायमस्वरुपी अनुदानाची व्यवस्था आहे. कारण अन्नधान्य देशाची गरज असते. आपले जगणे ज्याच्या श्रमावर अवलंबून आहे त्याची या देशात असलेली दुर्दशा जगात कुठेही नसेल,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी केले. गुणीजन साहित्य संमेलनात ते बोलत होते.
दहावे गुणीजन साहित्य संमेलन रविवारी भानुदास चव्हाण सभागृहात पार पडले. या संमेलनाला अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे, उद्घाटक बाबा भांड, कविवर्य प्रा. फ. मुं. शिंदे, कृषीतज्ज्ञ विजयअण्णा बोराडे, विभागीय सहनिबंधक राजेश सुरवसे, कवी जयराम खेडेकर, निमंत्रक डॉ. सुभाष माने, स्वागताध्यक्ष प्रा. स्मित माने व संयोजक सुनिता माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात पठारे यांनी जातीव्यवस्था व कृषीव्यवस्थेवर परखड भाष्य केले. ‘सहकार आणि राजकारण एकमेकांना जोडलेल्या गोष्टी आहेत. या व्यवस्था प्रचंड गुंतागुंतीच्या असल्याने वर्चस्व मिळवणे किंवा मोडीत काढण्याचे प्रकार घडले. शेतीची दुर्दशा विचार करायला लावणारी आहे. उद्योगांना करमाफी देणारे सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे दुर्लक्ष करीत आहे. राजर्षी शाहु महाराज व महाराजा सयाजीराव गायकवाड या बहुजन राजांमुळे अठरापगड जातीचे लोक शिकले. एकमेकांचा विचार सांगू लागले. हा कित्ता गिरवण्याऐवजी आपण जातीसाठी आंधळे झालो. जातीव्यवस्था समाजव्यवस्थेची चिरफळ्या करणारी आहे. आता मोकळेपणाने बोलणेसुद्धा शक्य नाही. कोणती सेना उभी राहील आणि ठोकून काढील याचा नेम नाही. पूर्वी लोक मेळ राखून राहत होते. सध्या जातीय विष सर्वांमध्ये भिनले आहे,’ असे प्रा. पठारे म्हणाले.
शिक्षण आणि शेतीची अवस्था बिकट झाल्याची खंत विजयअण्णा बोराडे यांनी व्यक्त केली. ‘प्रगत देशात मातृभाषेतून शिक्षण असताना आपल्या देशात इंग्रजीचा हट्ट सुरू आहे. खेड्यातून जिल्हा परिषदेच्या शाळा उखडून टाकण्याचा डाव आहे. या भागात इंग्रजी शाळा आल्यास गरीब मुलांना शिकणे कठीण होईल. शेतकरी कर्ज बुडवत नाही. प्रतिकूल निसर्गामुळे पीक गेले, तर कर्ज फेडता येत नाही. शेतकऱ्यांना कर्ज देताना आर्थिक शिस्त बिघडेल असे अर्थतज्ज्ञ सांगतात. मग उद्योगांना प्रचंड सवलती देताना शिस्त बिघडत नाही का,’ असा सवाल बोराडे यांनी केला.
दरम्यान, यावेळी प्रा. जयराम खेडेकर संपादित ‘ऊर्मी’, उज्ज्वलकुमार माने लिखित ‘पोलीस हेल्पलाइन’, डॉ. एकनाथ पांडवे लिखित ‘वादळातलं झाड’, गोविंद काळे लिखित ‘अहिल्यागाथा’ व ‘लोकशाहीचा संघर्ष’ या पुस्तकांचे मान्यवरांनी प्रकाशन केले. उत्तम कोळगावकर (कालांतर), सुशीलकुमार शिंदे (शहर आत्महत्या करायचं म्हणतंय), प्रा. रवींद्र कोकरे (थापणूक) यांचा कै. धोंडीराम माने साहित्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तर समीक्षक प्रा. डॉ. माधव सोनटक्के, प्रगतीशील शेतकरी त्र्यंबक पाथ्रीकर व उद्योजक राजाभाऊ निर्मळ यांचा श्रीमती गंगाबाई माने कृतज्ञता पुरस्काराने गौरव करण्यात आला. प्रा. शिवानंद भानुसे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी साहित्यिक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘फमुं’ना जीवन गौरव पुरस्कार
ज्येष्ठ कवी प्रा. फ. मुं. शिंदे यांचा ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि रोख दहा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. वाचकाला पाहण्याची दृष्टी देणे त्या लेखनाचे यश असते असे प्रा. शिंदे म्हणाले. यावेळी त्यांनी ‘मी गोसावी दारोदारी सुखे मागत फिरतो आहे, दार असे सापडले नाही जिथे दुःख भेटले नाही’ ही कविता सादर केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी प्रशासनामुळे शिक्षकांची अडचण

$
0
0

औरंगाबाद : जिल्हा परिषदेंतर्गत शालेय पोषण आहाराची बिले गेल्या ६ महिन्यांपासून थकित आहेत. झेडपी प्रशासन याबाबत सरकारकडे बोट दाखवित आहे. बिले न मिळाल्याने शिक्षकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती टिकावी यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून शालेय पोषण आहार योजना सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यात शालेय पोषण आहार अधीक्षकांची बहुतेक पदे रिक्त असल्याने हा पदभार शिक्षणातील मार्गदर्शक अधिकाऱ्यांकडे सुपुर्द केला आहे. त्यामुळे मूळ कामाकडे दुर्लक्ष होत आहे. अधिकारी नेमूनही गेल्या ६ महिन्यांपासून शालेय पोषण आहाराची बिले संबंधित शाळांना मिळालेली नाहीत. त्यामुळे या योजनेचे फलित काय, असा सवाल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केला आहे. राज्यभरातील शालेय पोषण आहार अधीक्षकाची पदे तत्काळ भरावीत, दरमहा बिले ५ तारखेच्या आत अदा करावीत, अशी मागणी संघटनेने केली आहे.

कारवाई करण्याची मागणी
गेल्या ६ महिन्यांपासून बिले न निघाल्याची कारणे शोधून संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांच्या बदल्या यंदा ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषद शिक्षकांना आता सोयीच्या ठिकाणी बदल्या करून घेता येणार नाहीत. यावर्षीपासून ग्रामविकास खात्याने जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन करण्याचे ठरविले आहे.

बदली प्रक्रियेसाठी सरल प्रणालीमध्ये स्वतंत्र पोर्टल तयार केले असून, शिक्षकांनी त्यांची विनंती तेथे नोंदवायची आहे. ग्रामविकास खात्याने तयार केलेल्या निकषांत बसणाऱ्या शिक्षकांच्याच बदल्या केल्या जातील. या प्रणालीमुळे बदल्यांतील राजकीय हस्तक्षेप आणि अन्य गैरप्रकारांना चाप बसणार आहे. ग्रामविकास खात्यामार्फत दरवर्षी शिक्षकांची सार्वत्रिक बदली प्रक्रिया राबविली जाते. दीर्घकालीन वास्तव्य, पती पत्नी एकत्रिकरण, तालुका बदली, संघटनांचे सदस्य असे अनेक निकष लावल्यानंतर या प्रक्रियेची अंमलबजावणी होते.

या पार्श्वभूमीवर यंदा ग्रामविकास खात्याने राज्यभर ऑनलाइन बदल्या करण्याचे ठरविले आहे. ग्रामविकास विभागाचे सचिव असीमकुमार गुप्ता यांनी गेल्या आठवड्यात मुंबईत बैठक घेऊन यासंदर्भातील संकेत दिले. शिक्षक, शाळांची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी सरल प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यात सध्या स्कूल, स्टुडंट, स्टाफ आणि समायोजन पोर्टल आहेत. त्यात ट्रान्सफर हे पाचवे पोर्टल समाविष्ट करण्यात येणार आहे. या पोर्टलमध्ये शिक्षकांनी आपली संपूर्ण माहिती भरायची आहे. त्याची प्रिंट काढून ते शिक्षण विभागाकडे जमा करावी लागणार आहे. बदलीसाठी नोंदणी करताना शिक्षकांना एक-दोन नव्हे, तर २० पर्याय देता येतील. बदलीची कारणे सादर करताना त्याचा प्राधान्यक्रमही वरिष्ठ कार्यालयातच ऑनलाइन पद्धतीने ठरविला जाईल.

‘अवघड’चे निकष बदलले!

शिक्षकांच्या बदलीचे निकष नोंदविताना सर्वसाधारण आणि अवघड अशी दोन क्षेत्रे निश्चित केली जातात. अवघड क्षेत्राच्या व्याख्येत आजवर अनेक चमत्कारिक उल्लेख होते. तालुका मुख्यालयापासून विशिष्ट अंतरावर असलेले गाव अवघड क्षेत्रात समजले जात होते, पण हे गाव जिल्हा मुख्यालयापासून अगदी जवळ असते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन प्रक्रियेत ज्या ठिकाणी दुचाकी वाहन जाऊ शकते, ते अवघडक्षेत्रातून वगळले जाण्याची शक्यता आहे. परिणामी सोयीच्या ठिकाणी बदली करून घेण्याची इच्छा असलेल्या शिक्षकांची अडचण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस एजन्सी रडारवर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘जिल्ह्याभरामध्ये असलेल्या सर्व ४२ गॅस एजन्सींमध्ये सुरू असलेल्या कारभाराची झाडाझडती मंगळवारपासून (११ एप्रिल) पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात येणार आहे,’ अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून गॅस सबसिडी, वितरण, गॅस वेळेत न मिळणे, सिलिंडरमधून लिकेज, सिलिंडरचे वजन कमी, घरपोच गॅस देण्यात येताना मागण्यात येणारी अधिकची रक्कम आदी मोठ्या प्रमाणवर ग्राहकांच्या तक्रारी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून गॅस एजन्सीजची कोणतीही तपासणी झाली नाही. त्यामुळे आता तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात विविध कंपन्यांच्या एकूण ४२ गॅस एजन्सी असून प्रत्येक तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच नायब तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली पथकांची स्थापना करण्यात येणार आहे. या पथकांकडून गॅस एजन्सीचा संपूर्ण लेखाजोखा तपासण्यात येणार असून प्रामुख्याने ग्राहकांच्या तक्रारींवर लक्ष देण्यात येणार आहे. तपासणीत गोडाऊनमधील गॅस सिलिंडरचा साठा, ग्राहकांच्या सर्व तक्रारी, कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील गॅस एजन्सींमार्फत ५ लाख ४६ हजार ६५७ ग्राहकांना सिलिंडर देण्यात येतात. गॅसची सुविधा घरपोच देताना मागण्यात येणाऱ्या अधिकच्या रक्कम ग्राहकांनी देऊ नये, अशी मागणी झाल्यास तक्रार करावी असे आवाहनही पुरवठा अधिकाऱ्यांनी केले आहे.

रॉकेलचा कोटा घटला
गॅसच्या वापरामध्ये वाढ झाल्यामुळे केंद्र सरकार सातत्याने रॉकेलच्या कोट्यामध्ये घट करत असून औरंगाबाद शहराला मिळणाऱ्या रॉकेल कोट्यामध्ये गेल्या तीन वर्षांपासून तब्बल ६० टक्के घट झाली आहे. मार्च २०१७मध्ये निर्धारित कोट्यापेक्षा दुप्पट आलेले रॉकेल एप्रिलमध्ये निम्म्याने कमी झाले आहे. जिल्ह्यासाठी १४ लाख १६ हजार लिटर (१४१६ केएल) असलेला कोटा एप्रिलमध्ये घटला असून या महिन्यात जिल्ह्याला केवळ १२लाख ४८ हजार लिटर (१२४९ केएल) रॉकेलसाठा मिळाला आहे. सध्या जिल्ह्याला १७ लाख ४ हजार लिटरचा कोटा आहे. गेल्या तीन वर्षांच्या काळात या कोट्यामध्ये २१ लाख लिटरपेक्षा अधिकची घट झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएमचा पान्हा आटला

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बहुतांश एटीएममध्ये पैसे नसल्याने सोमवारी शहरवासींना भटकंती करावी लागली. गेल्या पाच दिवासांपासून रोकड पुरवठा नसणे, शनिवार-रविवारच्या सुट्या आणि बॅँक विलिनीकरणामुळे व्यवस्था कोलमडल्याचे बॅँक अधिकारी सांगत आहेत.
औरंगाबादमध्ये ७०० एटीएम असून त्यापैकी सुमारे ३२५ एटीएम बंद आहेत. रविवारी (२ एप्र‌िल) संध्याकाळपासून रोकड टाकण्यास सुरुवात झाली. यानंतर दोन दिवस रोकड भरली गेली, पण नंतर चार एप्र‌िलपासून पुन्हा रोकड संपल्याने सर्व एटीएम कोरडे झाले. स्टेट बँकेच्या सुमारे २०० एटीएमवर सोमवारी (३ एप्र‌िल) संध्याकाळी रोकड टाकण्यात आली. यानंतर खासगी बँकांच्या एटीएमवरही रोकड जमा करण्यात आली. त्यामुळे दिलासा मिळाला. शहरातील इतर एटीएमवरही येत्या दोन दिवसांत रोकड पोहचणे सुरू होईल, याशिवाय ऑनलाइन आणि ऑफलाइन एटीएमची समस्याही लवकरच सोडव्यात येणार असल्याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेटवर्क मॅनेजरने दिली होती. मात्र, याचाही काही उपयोग झाला नाही. चार दिवसांत ग्राहकांना बँक व्यवहार करता आले नाहीत. सर्वाधिक खडखडाट एसबीआय, एचडीएफसी, महाबँकेच्या एटीएममध्येच निदर्शनास आला. ऑनलाइन आणि ऑफसाइट एटीएम मशीनवर या चार दिवसांत अधिक भार आला. अनेक बँकांकडून एटीएममधील पैसा संपू नये म्हणून दक्षता घेण्यात आली नाही, तर काहींकडून तशी दक्षता घेऊनही काहीच उपयोग झाला नाही. अनेक बँकांचे सर्व्हरही बंद होते. काही बँकांनी ग्राहकांना एसएमएसद्वारे सूचना दिल्या.
गेल्या आठ एप्र‌िलला दुसरा शनिवार आणि नऊ एप्र‌िलला रविवार व महावीर जयंतीची सुटी होती. याशिवाय एक एप्र‌िलपासून स्टेट बँक ऑफ इंडियात विलीन झालेल्या सहयोगी बँकांचे सर्व्हर आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे सर्व्हर बंद झाल्याने एटीएमवर परिणाम झाला आहे. ऑनलाइन आणि ऑफसाइट मशीनचे सर्व्हर बँकांच्या कार्यालयातच असल्याने अधिक त्रास झाला. यातही अनेक तांत्रिक अडचणी आल्या. बँकांमध्ये रोकडचा तुटवडा असल्याने याशिवाय एटीएममध्येही भरणा करण्यासाठी अपुरी रोकड असल्याने एटीएममध्ये खडखडाट असल्याचे बोलले जात आहे.

हे एटीएम बंद
औरंगपुरा, उस्मानपुरा, क्रांतीचौक, जालना रोड, शहानूरमिया दर्गा परिसर, सहकारनगर, दशमेशनगर, सातारा परिसर, बीड बायपास, देवळाई, सिटी चौक, गुलमंडी, निराला बाजार, रोशनगेट, शहागंज या परिसरातील मुख्यत्वेकरून एसबीआयच्या शाखांचे एटीएम बंद होते. याशिवाय एचडीएफसी आणि महाराष्ट्र बँकांची सिडको हडकोतील एटीएम बंद होते. यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.

एटीएमची संख्या
- ३०० एसबीआय
- २०० इतर राष्ट्र‌ीयकृत बँका
- १२५ सहयोगी बॅँका
- १०० खासगी बँका
- ७२५ एकूण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ तीन महिन्यांत आठवेळा गळती

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तीन महिन्यांत आठवेळा जलवाहिनी फुटूनही महापौरांना बैठकीसाठी, तर आयुक्तांना पाणीसमस्येचे मूळ शोधण्याच्या सर्वेक्षणाला मुहूर्त मिळत नाही. त्यामुळे शहरवासीयांना जीवघेण्या रणरणत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
शहरात पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर बनली आहे. वारंवार फुटणारी जलवाहिनी व जलवाहिनीला लागणाऱ्या गळमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. फेब्रुवारी ते १० एप्रिल पर्यंत तीन महिन्यांत आठवेळा जलवाहिनी फुटण्याच्या घटना घडल्या. याशिवाय जलवाहिनीवरील गळत्या दुरुस्त करण्यासाठी दोनवेळा मेगा शटडाऊन घेण्यात आले. त्यानंतरही गळत्या व जलवाहिनी फुटण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. २२ फेब्रुवारी रोजी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पाणीपुरवठा बंद होता. त्यानंतर ७ मार्च रोजी महापालिकेने २४ तासांचा शटडाऊन घेऊन जलवाहिनींवरील गळत्या दुरुस्त केल्या. त्यानंतर ११ मार्च रोजी रेल्वेस्टेशनच्या उड्डाणपुलाखाली जलवाहिनीला गळती लागली. या दुरुस्तीसाठी १६ मार्च रोजी बारा तासांचे शटडाऊन घेण्यात आले. ते ३६ तासांपर्यंत चालले. २४ मार्च रोजी बिडकीनजवळ १४०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली. याच दिवशी चितेगावच्या जवळ ७०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती सुरू झाली. पाच एप्रिलला पुन्हा चितेगावजवळ जलवाहिनीला गळती लागली. आता नऊ एप्रिलच्या रात्री साडेबाराच्या सुमारास रेल्वेस्टेशनच्या उड्डाणपुलाखाली १४०० आणि ७०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीचा जोड निखळल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सोमवारी दिवसभर दुरुस्तीचे काम सुरू होते. रात्री नऊ वाजेच्या सुमारास काम पूर्ण होईल व उद्या मंगळवारी सकाळपासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

...अन् घोषणा हवेत
वारंवार विस्कळित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाणीपुरवठ्यावर विशेष बैठक घेण्याची घोषणा महापौर भगवान घडमोडे यांनी केली होती, पण त्यांना बैठक घेण्यास अद्याप वेळ मिळालेला नाही. पाणीपुरवठ्यातील नेमक्या समस्या जाणून घेण्यासाठी ‘व्हॉल्व्ह टू व्हॉल्व्ह’ सर्वेक्षण करण्याची घोषणा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केली होती. त्यांच्याकडूनही सर्वेक्षण झाले नाही.

आज पाणी येणार
सोमवारी शहराच्या ज्या भागात पाणीपुरवठा होणार होता त्या भागात मंगळवारी पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे. ज्युबलीपार्क, हनुमान टेकडी, विद्यापीठ, शहागंज, जिन्सी, क्रांतीचौक, विश्वभारती कॉलनी, ज्योतीनगर, गारखेडा येथील जलकुंभांवरून होणारा पाणीपुरवठा सोमवारी झाला नाही. जलवाहिनी दुरुस्तीचे काम झाल्यावर रात्री हे सर्व जलकुंभ भरले जाणार असून मंगळवारी सकाळपासून पाणीपुरवठा सुरू केला जाईल, असा दावा महापालिकेतर्फे करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोक अदालतमुळे जुळले ११ संसार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राष्ट्रीय लोक अदालतमध्ये विस्कटलेले ११ संसार पुन्हा जुळले आणि मुलांना आपले आई-बाबा दोघांचेही सान्निध्य मिळाल्याची सुखद घटना घडली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व कौटुंबिक न्यायालयातर्फे शनिवारी कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीत राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात १२३ प्रकरणे सुनावणीस ठेवण्यात आली होती. यापैकी जवळपास ४४ प्रकरणात दोन्ही पक्ष उपस्थित झाले. काही कारणांमुळे एकमेकांपासून दुरावलेले पती, पत्नी आपआपल्या घराच्या सदस्यांबरोबर उपस्थित होते. यावेळी तज्ज्ञांनी केलेल्या समुपदेशनामुळे अकरा जोडप्यांचे संसार पुन्हा फुलले. त्यांनी एकत्र नांदायची तयारी दर्शवल्याने हे खटले तडजोड करुन निकाली काढण्यात आले. उर्वरीत ३३ प्रकरणांत एका बाजूने तडजोडीसाठी तयार असले तरी दुसरी बाजू असणाऱ्या पक्षकारांनी नकार दर्शविल्याने पुढची तारीख देण्यात आली. तर ७९ प्रकरणांत पती किंवा पत्नीपैकी एकाकडील पक्षकार गैरहजर राहिला. मुख्य न्यायाधीश ए. जी. फरस्वाणी, न्या. के. के. गायकवाड, न्या. त्र्यंबक जाधव यांनी काम पाहिले. तर समुपदेशक कुंदन जाधव, समुपदेशक एम. एस. कदम यांनी पंच म्हणून काम पाहिले. या लोकअदालतेच्या यशस्वितेसाठी कौटुंबिक न्यायालयातील कर्मचारी न्यायालय व्यवस्थापक वंदना कोचर, प्रबंधक पी. बी. घुले, डी. एस. सामेदे, सी. डी. काटोळे, अ‍ॅड. राजे जाधव, अमोल खोत, सुनिता कावसनकर, प्रल्हाद कुदळे, किसन तुपे, संयज बाळापुरे, डी. एस. साळवे, ए. आर. रहमान, शेख सलीम शेख इस्माइल यांनी सहकार्य केले.

...अशी झाली सुनावणी
- १२३ एकूण प्रकरणे
- ४४ दोन्ही पक्ष उपस्थित
- ३३ जणांना पुढची तारीख
- ११ संसार जुळले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बळीराजाच्या हत्येस जबाबदार कोण ?

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘बळीराजाच्या हत्येस जबाबदार कोण, ही हत्या आहे की आत्महत्या,’ असे भाल्याच्या टोकागत टोचणाऱ्या शब्दांचे फलक हाती घेऊन सोमवारी क्रांतीचौकात झालेल्या धरणे आंदोलनात सत्ताधारी शिवसेनेने सरकारवर जोरदार टीका केली. शेतकरी कर्जमाफी करा, अन्यथा आंदोलन पुकारू, असा इशाराही दिला.
गळफास घेणाऱ्या शेतकऱ्याची प्रतिकृती आंदोलनाच्या ठिकाणी लावण्यात आली होती. त्यावर ‘ही हत्या आहे की आत्महत्या’ असा प्रश्न ठळकपणे लिहिण्यात आला होता. ‘हक्क मागतो भीक नाही, अजून किती बळी पाहिजेत’ असा सवाल देखील याच प्रतिकृतीच्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आला होता. ‘तत्काळ कर्ज माफी करू, स्वामीनाथन् आयोग लागू करू, शेतकऱ्याला हमी भाव देऊ हे आपल्या जाहीरनाम्यातील वचन, बळीराजाच्या हत्तेस जबाबदार कोण ?’ अशा मजकुराचा फलक देखील धरणे आंदोलनाच्यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केले. आंदोलनात आमदार संजय शिरसाट, उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले, शहरप्रमुख रेणुकादास वैद्य, बाळासाहेब थोरात, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर, कृष्णा पाटील डोणगावकर, शिवसेना महिला आघाडीच्या श्रीमती आनंदीबाई अन्नदाते, रंजना कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांनी ‘कर्जमुक्ती होईपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही. आंदोलन तीव्र करू,’ असा इशारा दिला.

मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी
धरणे आंदोलनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली. त्यांची संभावना ‘नागपूरचा पोपट,’ अशी करण्यात आली. ‘नागपूरचा पोपट काय म्हणतो, कर्जमाफी नाही म्हणतो,’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. याचीच चर्चा आंदोलनाच्या वेळी होती.

उत्तरप्रदेश सरकारने शेतकरी कर्जमुक्ती कशी केली, याचा अभ्यास करण्याचे सांगत वेळकाढूपणा केला जात आहे. २२ हजार कोटींसाठी एवढा विचार करणे योग्य नाही. राज्य सरकारची रेटून नेण्याची भूमिका आहे. - संजय शिरसाट, आमदार

मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या रोज आठ ते दहा आत्महत्या घडतात. मुख्यमंत्री म्हणाले, कर्जमुक्तीपेक्षा शाश्वत शेतीकडे वळावे. जगात काहीच शाश्वत नाही, आपले जगणे देखील. मग शेती शाश्वत कशी करणार ? - अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख

शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही. कर्जमुक्तीला विरोध करणारा न्रतदृष्ट आमदार आपल्या जिल्ह्यात आहे, हे आपले दुर्देव आहे. त्यामुळे शिवसेना आंदोलन तीव्र करेल. - कृष्णा पाटील डोणगावकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंकू वाचवा; आर्त साद!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कुंकू वाचवा, अशी आर्त साद घालत सोमवारी अन्नदाता शेतकरी संघटनेच्या वतीने कर्जमाफीसाठी क्रांतीचौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. मागण्या मान्य करणे शक्य नसेल तर सामूहिक आत्महत्येस परवानगी द्या, अशी मागणी आंदोलक महिलांनी केली.
दुष्काळ आणि बेभरवशाच्या भावामुळे शेतकरी देशोधडीला लागला. बॅँका कर्ज देत नाहीत. मायक्रो फायनान्स कंपन्यांचे अ‍व्वाच्या सव्वा दराने घेतलेले कर्ज फेडणे अशक्य झाले आहे. या दुष्टचक्रात शेतकरी पिचला जातोय. त्यासाठी कर्जमुक्ती करावी, अशी मागणी नेते जयाजी सूर्यवंशी, मीना राजळे, रंजना जराडे, मनीषा पवार, मीना ठोंबरे, संगिता ठोंबरे आदींनी केली.
आंदोलकांनी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. ‘कर्जवसुलीच्या तगाद्याने पती आठ-आठ दिवस घरी येत नाही. यामुळे जगणे असह्य झाले आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांवर सावकारी कायद्याप्रमाणे कारवाई करा, कर्जमाफी करा, नाही तर सामूहिकक आत्महत्येस परवानगी द्या,’ अशी मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यशास्त्रात ‘एक्झाम ड्रामा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाच्या ‘बॅचलर ऑफ ड्रामॅटिक्स’ आणि ‘मास्टर ऑफ परफॉर्मिंग आर्टस’च्या विद्यार्थ्यांचा निकाल वादात सापडला आहे. ‘स्टुडंट ओन प्रोडक्शन’ या विषयात ६० विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत. तासिका झालेल्या नसताना आणि प्रात्यक्षिकासाठी मार्गदर्शन नसताना अनुत्तीर्ण का केले, असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला निवेदन दिले आहे. ‘एकाही तासिकेला हजर नसलेले आणि विषयाचे आकलन नसलेले विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले,’ असे विभागप्रमुख डॉ. जयंत शेवतेकर यांनी सांगितले.
नाट्यशास्त्र विभागातील अनियमित तासिकांचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या परीक्षा निकालात ‘बॅचलर ऑफ ड्रामा’ आणि ‘एमपीए’ प्रथम वर्षाचे साठ विद्यार्थी इंडियन क्लासिकल थिएटर, इंडियन थिएटर डायरेक्शन अॅडव्हान्स आणि स्टुडंट ओन प्रॉडक्शन या विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत. या प्रकाराबाबत विद्यार्थ्यांनी विचारणा केली असता, विभागातील प्राध्यापकांनी उत्तर दिले नाही. ‘एकांकिकेच्या प्रात्यक्षिकाचे गुण बाहेरचे परीक्षक देत असतात, पण एकांकिका न बघता प्राध्यापकांनी निकाल कसा लावला,’ असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. या निकालामुळे विद्यार्थी नेट परीक्षा पात्रता गमावण्याची भीती आहे. डायरेक्शन अॅडव्हान्स, अॅक्टिंग अॅडव्हान्स, स्टुडंट ओन प्रॉडक्शन, इंडियन थिएटर, इंडियन क्लासिकल थिएटर या विषयाचे प्राध्यापक आणि तासिका तत्त्वावरील प्राध्यापक या निकालाला जबाबदार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. नियमानुसार तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना शिकवण्याशिवाय इतर अधिकार नसतात, मात्र अनुत्तीर्ण विद्यार्थीप्रकरणी नेमलेल्या समितीवर तासिका तत्त्वावरील दोन प्राध्यापक नेमले आहेत.
‘गेल्या आठ दिवसांपासून आम्ही विभागप्रमुखांना विषयात लक्ष घालण्याची विनंती करीत आहोत, मात्र तुम्ही कुलगुरुंकडे जा किंवा कोर्टात जा, असा सल्ला देत आहेत,’ असे एका विद्यार्थ्याने सांगितले. उत्तरपत्रिकांची फेरतपसाणी करण्यासाठी विद्यार्थी शुल्क भरू शकत नाहीत. पुन्हा परीक्षा फॉर्म भरण्यासाठी प्राध्यापकांनी दडपण आणले आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

८०० रुपयांत नाटक
मार्च महिन्यात नाट्य महोत्सव घेण्यात आला. एका नाटकासाठी विभागाने फक्त ८०० रुपये बजेट दिले. वारंवार अर्ज केल्यानंतर बजेट मिळाले, मात्र ८०० रुपयांत नाटक बसवणे शक्य नव्हते. तरीसुद्धा मर्यादित सामग्रीत सर्वांनी नाटक सादर केल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली, मात्र नाट्य महोत्सवासाठी ३ लाख ३४ हजार रुपये खर्च केले, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. जयंत शेवतेकर यांनी दिली. प्रत्येकाच्या गरजेनुसार बजेट देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तासिकांचे काय?
एमपीए प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकात ‘स्टुडंट ओन प्रॉडक्शन’ या विषयानुसार एक एकांकिका सादर करावी लागते, मात्र विषयाची एकही तासिका झालेली नाही. विद्यार्थ्यांना दिग्दर्शन शिकवलेले नसतानाही प्रात्यक्षिक घेण्यात आले. एकांकिका निर्मितीसाठी बजेट नसताना अवघ्या १० दिवसांत विद्यार्थ्यांनी एकांकिका सादर केली. दररोज तीन ते चार एकांकिका महोत्सवात सादर झाल्या. ‍विशेष म्हणजे याच विषयात सर्वाधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

विभागात दिसणारे पण वर्गात नसणारे विद्यार्थी एका विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत. विषय आणि विचारांची गफलत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा गैरसमज झाला होता. आता सर्वांनी निकाल मान्य करून पुढील परीक्षेचे फॉर्म भरले आहेत.
- डॉ. जयंत शेवतेकर, विभागप्रमुख, नाट्यशास्त्र विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदव्युत्तरची सीईटी पुढील महिन्यात

$
0
0

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटी परीक्षेनुसार देण्यात येणार आहेत. त्यासाठी विद्यापीठात सोमवारी प्राध्यापकांची बैठक पार पडली. या बैठकीत पदव्युत्तर प्रवेशाची सीईटी मे महिन्यात घेण्याचे निश्चित करण्यात आले.
विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. केंद्रीय पद्धतीने प्रवेशासाठी चाचणी प्रवेश परीक्षा घेणे आवश्यक आहे. या निर्णयासाठी प्रभारी अधिकारी डॉ. सतीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला ‘सीईटी’ समन्वयक डॉ. दिलीप खैरनार, विज्ञान शाखेचे डॉ. आर. जी. मार्टीन यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला विविध विषयांचे प्राध्यापक उपस्थित होते. सीईटीसाठी आवश्यक प्रश्नावली तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विषयनिहाय तीन प्राध्यापक प्रश्नपत्रिका तयार करून विद्यापीठाला देणार आहेत. याद्वारे ऑनलाइन सीईटी घेण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. या प्रक्रियेसाठी आवश्यक सॉफ्टवेअर उपलब्ध करण्यात आले आहेत. जून महिन्यात अभ्यासक्रम सुरू होणार असल्यामुळे मे महिन्यात सीईटी परीक्षा होण्याची शक्यता आहे. प्रवेश प्रक्रियेपूर्वी सर्व महाविद्यालयांना शैक्षणिक शुल्क जाहीर करणे अनिवार्य आहे. सीईटीचे ५० टक्के गुण आणि पदवी परीक्षेतील गुणांना ५० टक्क्यांच्या आधारावर प्रवेश देण्यात येणार आहे. सीईटीनंतर विद्यार्थी पसंतीनुसार महाविद्यालयाची निवड करणार आहेत. विद्यापीठाची प्रक्रिया अनेक संस्थांसाठी गैरसोयीची ठरण्याची शक्यता आहे.

केंद्रीय पद्धतीने पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश घेण्याचा निर्णय पूर्वीच झाला होता. आता प्रत्यक्ष अंमलबजवाणी होणार आहे. या निर्णयामुळे प्रवेशात एकवाक्यता राहील.
- डॉ. सतीश पाटील, समन्वयक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोरक्षक समित्यांवर बंदीची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गोरक्षणाच्या नावाखाली गेल्या काही महिन्यांत उत्तरप्रदेश, राजस्थानातील उना आणि अलवर येथे दलित व अल्पसंख्याक समाजाच्या लोकांवर अत्याचार केले आहेत. देशामध्ये अराजकता निर्माण करणाऱ्या या तथाकथित गोरक्षक समितीवर देशपातळीवर बंदी घालावी. या घटनांची सीबीआय चौकशी करावी आदी मागण्यांसाठी काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष एम. एम. शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष अकिल पटेल, शहराध्यक्ष खालेद पठाण यांनी या निदर्शनांचे आयोजन केले होते. यावेळी विभागाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, की बेहरोर, अलवर (राजस्थान) येथे दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग आठवर काही तथाकथित गोरक्षकांनी पेहलू खान यांना गाय कसाई समजून मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. पोलिसांनीही मृत व्यक्तीवर कत्तलीसाठी जनावरांची बेकायदा वाहतूक केल्याचा गुन्हा दाखल केला. दुसरीकडे त्यांचा मुलगा इर्शाद याने दूध व्यवसायासाठी गायी खरेदी केल्याची पावती असल्याचा दावा केला आहे.
यापूर्वी दादरी (उत्तप्रदेश) आणि उना (गुजरा) येथे याच प्रकरणामुळे मुस्लिम व दलित समाजातील व्यक्तिंना तथाकथिक गोरक्षकांनी अमानुष मारहाण केली होती. त्याचे पडसाद देशभर उमटले होते. गोरक्षणाच्या नावाखाली होत असलेला छळ थांबवावा, तीन घटनांची चौकशी सीबीआयमार्फत करावी, दोषींना तत्काळ कडक शिक्षा करावी, अल्पसंख्याक दूध व्यावसायिकांना संरक्षण द्यावे, पोलिस व सरकारी यंत्रणेमार्फतच जनावरांच्या वाहनांची तपासणी करावी, गोरक्षक समित्यांवर बंदी घालावी, आदी मागण्या करण्यात आल्या.
निदर्शनात काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार, इब्राहिम पठाण, अॅड. सय्यद अक्रम, मोहसीन अहमद, हमद चाऊस, अय्युब खान, सोहेल खान, डॉ. जफर खान, रमजानी खान, बाबा तायडे, प्रभाकर मुठ्ठे पाटील, लियाकत पठाण, आमेर अब्दुल सलीम, सलमान पटेल, इसरार पटेल यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images