Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

प्रतापनगर नागरी सुविधांपासूनच दूरच

$
0
0

प्रतापनगर नागरी सुविधांपासूनच दूरच

उद्यान, चांगले रस्ते, सामाजिक सभागृह द्या; नागरिकांनी केली मागणी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील एक प्रमुख वसाहत असलेला प्रतापनगर परिसर अद्यापही नागरी सोयी-सुविधांपासून दूरच आहे. सर्व प्रकाराच्या करांचा प्रामाणिक भरणा करूनही परिसरातील विकासकामाकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. उद्यान, अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न कायम असून शेजारी मोकळ्या मैदानात रात्रीच्या वेळी नशेबाजी चालते, असे अनेक प्रश्न तातडीने निकाली काढावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

उस्मानपुरा परिसरातील प्रतापनगरात प्रतापनगरसह कासलीवालनगर, प्रशांतनगर, सूरज पार्क यासह अनेक छोट्या मोठ्या कॉलनी आहेत. उच्चभ्रू, मध्यमवर्गीय लोकांची वसाहत असलेल्या या भागात नोकरदार, व्यापारी, व्यवसायिक मंडळी मोठ्या प्रमाणात राहतात. नाही म्हणायला ड्रेनेज, पाणी पुरवठा आदी सोयी सुविधा या परिसरात मिळत असल्या तरी अन्य वॉर्डांच्या तुलनेत या भागात विकासकामे फारशी झाली नाही, अशी ओरड नागरिकांकडून होत आहे.

यात प्रमुख नागरी समस्या म्हणजे प्रतापनगर गल्ली नंबर एकपासून स्मशानभूमीपर्यंत जाणारा रस्ता. रस्त्यावर असंख्य खड्डे पडल्याने त्यावरून वाहन चालविणे अवघड झाले आहे. परिसरातून गेलेल्या नाल्यास कठडे नाहीत. त्यामुळे याकडे तातडीने लक्ष देऊन दुरुस्ती करण्यात यावी, नवीन रस्ता तयार करण्यात यावा, तसेच मुले, वयोवृद्धासाठी परिसरात चांगले उद्यान, महापालिकेच्या जागेत सांस्कृतिक सभागृह आदी उभारण्यात यावे, आदी मागण्याही नागरिकांनी केल्या आहेत. यासंदर्भात मृणालिनी फुलगीरकर, प्रज्ञा मुंढे, नेहा गुंडेवार, मीरा जाधव, मीरा कासले आदींनी महापौर भगवान घडमोडे यांची भेट घेत निवेदनही सादर केले आहे. गेल्या २० वर्षात येथील नागरी सुविधा, विकासकांकडे दुर्लक्ष झाले आहे. आतातरी न्याय द्यावा, अशी अपेक्षा नागरिकांनी केली आहे.

मैदान गुंडांना मोकळे --
प्रतापनगरलगत एक भूखंड आहे. रात्रीच्या वेळी त्यावर गुंड प्रवृत्तीच्या लोकांचाच ताबा असतो. अवैधपणे नशेबाजी केली जाते, असा आरोप नागरिकांकडून होत आहे. याप्रकारामुळे परिसरात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून पथदिवे अनेक बंद असल्याने त्यात अधिक भर पडत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

सांस्कृतिक सभागृह नाही, पथदिव्यांचा प्रश्न यासह असे अनेक विकासप्रश्न प्रतापनगरात कायम आहेत. त्याकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांना न्याय दिला जावा.
- मृणालिनी फुलगीकर, नागरिक, प्रतापनगर

स्मशानभूमीपर्यंत जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. स्वर्गरथ येथून जाताना अनेकदा खड्ड्यामुळे अडचण होते. ही गंभीर बाब असून तातडीने नवीन रस्ता तयार व्हावा. मैदान परिसरात रात्रीच्या वेळी होणारी नशेखोरी बंद करण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने पाऊले उचलावेत.
- संदीप कुलकर्णी, कार्यकर्ते, आमची संस्कृती प्रतिष्ठाण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ गणरायाच्या ५१ कलाकृती रसिकांच्या भेटीला

$
0
0

गणरायाच्या ५१ कलाकृती रसिकांच्या भेटीला

रितिका सोमाणीच्या चित्रांचे शुक्रवारपासून प्रदर्शन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्राचं लाडकं दैवत विघ्नहर्त्या गणरायाची ५१ रूपं चित्रातून पाहण्याची संधी औरंगाबादकरांना मिळणार आहे. औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन(एमजीएम)च्या कला दीर्घ आर्ट गॅलरीत हे चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहेत. चित्रकार रितिका शरद सोमाणी हिने काढलेल्या ५१ चित्रांचे हे प्रदर्शन असेल.

१४ ते १६ एप्र‌िलपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत हे चित्रप्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल. रितिका सोमणी ही औरंगाबादमधील सुप्र‌सिद्ध मूत्ररोगतज्ज्ञ डॉ. शरद सोमाणी आणि भूलतज्ज्ञ डॉ. सुजाता सोमणी यांची कन्या आहे ११ वी सायन्सची ती विद्यार्थिनी आहे. कलाशिक्षक रोहित गिरी यांच्याकडे तिने कलेचे शिक्षण घेतले आहे. गेल्या ४ महिन्यात काढलेल्या गणेशांची विविध रूपे ती या प्रदर्शनात मांडणार आहे. पाचवीमध्ये असताना तिने चित्रकलेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पारितोषिक मिळवले आहे. ती सादर करत असलेल्या प्रदर्शनाचे नाव ‘श्री गणेशा - द बिगनिंग’असे आहे. कॅनव्हासवर अॅक्रॅलिक माध्यमाचा वापर करून ही सर्व चित्रं तिने तयार केली आहेत. आईवडिलांकडूनही तिच्या कलेला प्रोत्साहन मिळाले असून एवढ्या लहान वयात एकटीने मोठे प्रदर्शन भरवणारी ती पहिलीच मुलगी ठरली असल्याचा दावा तिचे शिक्षक रोहित गिरी आणि पालक डॉ. सोमाणी यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राध्यापकांच्या पेन्शनचा संभ्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘अंशदायी पेन्शन योजना’ राज्य सरकारने ‘राष्ट्रीय पेन्शन योजने’कडे वर्ग केली खरी, परंतु यातील खातेधारकांकडे ‘कायम सेवानिवृत्ती खाते क्रमांक’च नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यात भेदभाव केल्याची प्राध्यापकांची भावना आहे. पगारातून पैसा कोषागार विभागाकडे वर्ग होतो, मात्र त्याचे काय होते, यासह इतरांप्रमाणे या हक्काच्या पैशावर व्याज मिळणार का, हा प्रश्न प्राध्यापकांना सतावत आहे. त्यात तथ्य नसल्याचे उच्चशिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.
राज्यात १ नोव्हेंबर २००५पासून अशंदायी पेन्शन योजना सुरू झाली. त्यामध्ये कर्मचाऱ्याच्या पगारातील काही हिस्सा व राज्य सरकारचा काही हिस्सा जमा करण्यात येतो. योजनेला विरोध लक्षात घेता शासनाने एप्रिल २०१५पासून केंद्राच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेकडे (एनपीएस) वर्ग केली. या एनपीएसचा लाभ हवा असेल, तर संबंधित कर्मचाऱ्यांचे कायम सेवानिवृत्ती खाते क्रमांक (परमनंन्ट रिटायर्मेंट अकाउंट नंबर) उघडावे लागते. हे खाते असले तरच योजनेतील फायदे कर्मचाऱ्यांना मिळू शकतात. असे असतानाही राज्यातील निम सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडे अशाप्रकारे खाते क्रमांक नसल्याची चर्चा प्राध्यापकांमध्ये आहे.
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्याचवेळी अनुदानित कॉलेजांमधील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचे अशा प्रकारच्या खात्यांसाठी पाठपुरावाच करण्यात नसल्याचे प्राध्यापकांचे म्हणणे आहे. राज्य सरकारने ‘डीसीपीएस’ ‘एनपीएस’मध्ये वर्ग करताना भेदभाव केल्याची भावना प्राध्यापकांमध्ये आहे. सर्वांना समान पेन्शन मिळावे हे नियमात असताना, शासनाचे धोरण अडचणीचे ठरेल अशी भावना प्राध्यापकांमध्ये आहे.

असा जमा होतो निधी
राष्ट्रीय पेन्शन योजनेत प्राध्यापकाच्या मूळ वेतनातील दहा टक्के रक्कम पेन्शनसाठी जमा होते. त्यात शासनाची दहा टक्के रक्कम असते. योजनेनुसार प्राध्यापकांच्या पगारातून कपात होते, परंतु ती ‘पीआरएएन’खात्यात जमा होत नसल्याचे प्राध्यापकांचे म्हणणे आहे. हे खाते नसल्याने आर्थिक फायदे मिळणार नाहीत. हे खाते क्रमांक देण्याचा अधिकार कोषागार कार्यालयाचा आहे. जोपर्यंत ‘पीआरएएन’ क्रमांकानुसार पैसे जमा होणार नाहीत, तोपर्यंत कपात केलेल्या रकमेला कोणतेही व्याज देय राहत नाही. त्यामुळे ती रक्कम ‘एनपीएस’मध्ये जमा होणार नाही, अशी भीती प्राध्यापकांना सतावत आहे.

अनुदानित कॉलेजातील प्राध्यापकांना ‘पीआरएएन’ म्हणजेच ‘कायम सेवानिवृत्ती खाते क्रमांक’ देऊन, त्यामध्ये पेन्शनचे अंशदान जमा होणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा भांडवली बाजाराचा फायदा मिळणार नाही. हा प्राध्यापकांसोबत भेदभाव करण्यासारखा प्रकार आहे.
- डॉ. विक्रम खिलारे, पदाधिकारी, बामुक्टो.

या प्रकाराबाबत काही प्राध्यापकांनी भेट घेतली. तसे काही झालेले नाही. कोषागार विभागाकडून याबाबत माहिती घेऊन प्राध्यापकांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.
- डॉ. राजेंद्र धामणस्कर, सहसंचालक, उच्चशिक्षण.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद स्टेशनवर पार्सल हबची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शहरातील उद्योजकांची उत्पादने रेल्वेद्वारे थेट मुंबई किंवा दिल्लीसह अन्य शहरांत पाठविण्यात येतात. त्यासाठी औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथे पार्सल हब तयार करण्याची मागणी रेल्वे उपभोक्ता समितीचे सदस्य, उद्योजक अर्जुन गायके यांनी केली.
औरंगाबाद येथून दिल्ली, हैदराबाद आणि इतर ठिकाणी रेल्वेच्या पार्सल विभागातून मालाची वाहतूक केली जाते. औरंगाबाद स्टेशनहून सध्या एनआरबी, एनएचके, गरवारेसह अन्य कंपन्यांचा माल पार्सल विभागाच्या माध्यमातून पाठविण्यात येतो. औरंगाबाद पार्सल विभागाला पार्सलच्या माध्यमातून एक कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळत आह‌े. औरंगाबादहून मुंबईला वगळता ज्या मार्गावर रेल्वे धावत आहेत, त्या मार्गावर पार्सल सेवा सुरू आहे.
रेल्वे उपभोक्ता समिती सदस्य अर्जुन गायके, मंगेश कपोते यांनी नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक डॉ. ए. के. सिन्हा यांची भेट घेऊन, पार्सल हब तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावात डोअर टू डोअर पार्सल जमा करण्यापासून माल व्यवस्थित पोहोचविण्यापर्यंत सगळी सेवा रेल्वे विभागाकडून उद्योजकांना देण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे रेल्वेचे उत्पन्नही वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या प्रस्तावाबाबत उद्योजकांसोबत विशेष बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याची आश्वासन दिले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तपोवन’चे कपलिंग तुटल्याची चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तपोवन एक्स्प्रेसच्या मंगळवारी मनमाड स्टेशनहून निघाल्यानंतर दोन डब्यांना जोडणारे कपलिंग तुटले. कपलिंग निघाल्यानंतर रेल्वे काही अंतरावर जाऊन रेल्वे थांबली. त्यामुळे दोन डब्यांतील प्रवासी बचावले. या घटनेची चौकशी दक्षिण मध्य रेल्वेचा नांदेड विभाग आणि मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग यांच्याकडून केली जाणार आहे.
तपोवन एक्स्प्रेस मंगळवारी मनमाड स्टेशनवरून निघाली. त्यानंतर दोन डब्यांना जोडणारे कपलिंग तुटले. त्यानंतर रेल्वेला जोडणारा हवेच्या दाबाचा पाइप निघाल्या. त्यामुळे ही रेल्वे काही अंतरावर जाऊन थांबली. रेल्वे थांबल्यानंतर ही वेळेतच रेल्वेचे डब्बे एक्स्प्रेसशी पुन्हा जोडण्यात आले. पाच ते सहा मिनिटांनंतर ही रेल्वे पुन्हा मुंबईकडे रवाना झाली. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश भुसावळ रेल्वे विभागाकडून देण्यात आले आहेत. भुसावळ रेल्वे विभागासह नांदेड विभागाकडूनही या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.

कपलिंग तुटण्याची दुसरी घटना
रेल्वेचे कपलिंग तुटण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी जनशताब्दी एक्स्प्रेसचेही कप्लिंग तुटल्याची घटना घडली होती. या घटनेचीही चौकशी नांदेड विभागाकडून करण्याचे आदेश देण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन महामार्गांचे ‌महिन्यात भूमिपूजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या खामगाव ते बार्शी आणि वाटूर ते परभणी या दोन राष्ट्रीय माहामार्गांचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी (१२ एप्रिल) लोणीकर यांनी मराठवाड्यातील पर्यटन, स्वच्छ महाराष्ट्र, वॉटरग्रीड यांसह इतर योजनांचा आढावा घेतला. खामगाव-लोणार-परतूर-माजलगाव-धारूर-केज-कळंब-बार्शी आणि वाटूर-मंठा-जिंतूर-परभणी हे दोन्ही राज्य महामार्ग आहेत. त्यांचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्यात येणार आहे. यामध्ये खामगाव ते पंढरपूर हा रस्ता ४५० किलोमीटर आहे. त्यासाठी दोन हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याचे टेंडर काढण्यात आले असून, हा रस्ता सिमेंटचा राहणार आहे. त्यातील ९५ किलोमीटरचा रस्ता जालना जिल्ह्यातून जाणार आहे. या मार्गात येणाऱ्या पूर्णा, दुधना व गोदावरी नदी क्षेत्रांच्या पुलाची कामेही यामध्ये होणार आहेत. परतूर शहरासाठी स्वतंत्र बायपास, तर वाटूर फाट्यावर उड्डाणपुलाचे काम होणार आहेत. या महामार्गासाठी भूसंपादनाची कार्यवाही प्रशासनाने लवकर पार पाडावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दोन्ही राष्ट्रीय महामार्गामुळे दळणवळणाची सुविधा निर्माण होऊन उद्योग, शेती व रोजगाराला चालना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगिले. उपायुक्त महेंद्र हरपाळकर यांनी प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या भूसंपादनाबाबत लोणीकर यांना माहिती दिली. यावेळी लोणीकर यांनी मराठवाड्यात स्वच्छ महाराष्ट्र महाराष्ट्र अभियानाचा आढावा घेतला. मराठवड्यातील सर्व गावांमध्ये शौचालयाची तत्काळ उभारणी करावी, सर्व गावे पाणंदमुक्त करण्याला प्राधान्य द्यावे, अशा सूचना केल्या.

जालन्यातील १० पर्यटनस्थळांचा विकास
जालना जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने खुप मागे आहे, औरंगाबादमध्ये मोठ्याप्रमाणावर देशी-विदेशी पर्यटक येतात. जालना‌ जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास केल्यास औरंगाबाद व जालना जिल्ह्यात पर्यटक येतील जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी नियोजन विकास निधीतून जिल्हा पर्यटन नियोजन अहवाल तत्काळ तयार करावा यामध्ये संभाजी उद्यान, राजूर गणपती, दत्ताश्रम, परतूरचे नृसिंह मंदिर, ततुरवेदेश्वर धाम, जांबसमर्थ, घानेवाडी धरण, मंठा येथील नांगरतास, शंभू महादेव, केदारेश्वर मंदिर आदी दहा पर्यटनस्थळांवर भर देऊन पर्यटन समूह विकासाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कॅशलेस’बाबत जागृती व्हावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महिलांमध्ये कॅशलेस व्यवहाराबाबत जागृती व्हावी. कारण महिलांच अधिक सक्षमपणे कोणतीही मोहीम यशस्वी करू शकता. यामुळे कॅशलेस ही मोहीम यशस्वी होईल, असे मत अलाहाबाद बँकेच्या व्यवस्थापक आरती मिश्रा यांनी व्यक्त केले.
श्रेयनगर येथील शिशु विकास मंदिर या शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बुधवारी (१२ एप्र‌िल) महिला मंडळातर्फे सामाजिक सप्ताह आणि वासंतिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मिश्रा यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्षा शालिनी देशपांडे अध्यक्षस्थानी. प्रमुख पाहुण्या म्हणून महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अर्चना ‌नीळकंठ यांची उपस्थिती होती. ‘कॅशलेस व्यवहसार जनजागृती’ या विषयावर आरती मिश्रा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
श्रीमती मिश्रा म्हणाल्या, ‘कॅशलेस प्रणालीने अनेक फायदे होत आहेत, हे सिद्ध झाले आहे. कॅशलेस व्यवहारांत महिलांनी आता पुढाकार घेतला पाहिजे. बँकिंग प्रणाली समजून घेणे आवश्यक आहे. ही काळाची गरज पाहून यात पुढाकार घेणे आवश्यक आहे. बँकिंग प्रणाली शिका, कॅशलेससाठी पुढे जा.’
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिकस्तरावरील असलेले तत्व, त्यांची शिकवणूक आणि एकंदरित कार्य या विषयी जागरूकपणे माहिती जाणून घेणे आवश्यक आहे, असे मत महापालिकेच्या सभापती नीळकंठ यांनी व्यक्त केले. बाबासाहेबांचे कार्य, त्यांची भूमिका, त्यांना मिळालेले पुरस्कार, मान-सन्मान या विषयीही त्यांनी उपस्थित महिलांना माहिती दिली. शैला बीडकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. यावेळी संगीता देशमुख, सुलोचना नाईक, वैशाली देशपांडे, यांच्यासह महिला मंडळाच्या पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएसकडून चौघांची चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आयएस या दहशतवादी संघटनेशी सोशल मीडियाद्वारे संपर्कात असल्याच्या संशयावरून चौघांचे समुपदेशन करण्यात आले. दहशतवाद विरोधी पथकाने मंगळवारी ही चौकशी केली. दरम्यान, बुधवारी देखील काही तरुणांची चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सिटीचौक परिसरातील ह‌े चार तरूण असून, आयएस या संघटनेशी सोशल मीडियाद्वारे ते संपर्कात होते. गेल्या काही महिन्यापासून या तरुणांवर एटीएसची नजर होती. यापूर्वी परभणी येथून आयएसशी संपर्कात असलेल्या चार संशयितांना; तसेच वैजापूर येथून एका संशयिताला एटीएसने अटक केली होती. यावरून आयएसने मराठवाड्यात आपले जाळे पसरवत असल्याचे स्पष्ट झाले होते.
एटीएसच्या पथकानी या चौघांना मंगळवारी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करून समुपदेशन करण्यात आले. यानंतर त्यांना सोडण्यात आले. दरम्यान, बुधवारी देखील काही संशयितांना चौकशीसाठी बोलावण्यात आले असून, उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन कोटींचे ‘ऑर्थोपेडिक इंप्लांट’ जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गुडघ्याच्या; तसेच सांध्यांच्या कृत्रिम प्रत्यारोपणासाठी (नी व हिप रिप्लेसमेंट) वापरण्यात येणारे तब्बल दोन कोटींचे ‘ऑर्थोपेडिक इंप्लांट’ हे परवाना नसलेल्या औरंगाबाद, बीड, लातूर व नांदेडमधील वितकांकडून नुकतेच जप्त करण्यात आले आहेत. कारवाई करण्यात आलेल्या वितरकांमध्ये चार वितरक हे औरंगाबाद शहरातील आहेत.
पूर्वी ‘ऑर्थोपेडिक इंप्लांट’चा समावेश वस्तू व रसायनांमध्ये होता, तर अलीकडेच ‘इंप्लांट’चा समावेश औषधांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे ‘इंप्लांट’ची निर्मिती, खरेदी, विक्री तसेच साठवणुकीसाठी परवाना आवश्यक ठरला आहे, मात्र परवाना नसतानाही खरेदी-विक्रीसह साठवणुकीचे प्रकार सर्रास सुरू होते. त्यामुळेच औषधी प्रशासनाच्या औरंगाबाद विभागाने ही कारवाई केली आहे. यामध्ये ‘अॅस्लेपिअस एंटरप्रायजेस’मधून (नांदेड) १ कोटी ७ लाख २३ हजार ८६१ रुपयांचे इंप्लांट जप्त करण्यात आले. ‘एस. जी. सर्जिकल’ येथून (औरंगाबाद) ५ लाख ८ हजार रुपयांचे, ‘वरद सर्जिकल अँड डिस्ट्रिब्युटर्स’मधून (बीड) १७ हजार ५०० रुपयांचे, ‘ऑर्थोनेक्स सर्जिकल एलएलपी’मधून (औरंगाबाद) २४ लाख ७५ हजार ९६० रुपयांचे, ‘सिग्नेचर एंटरप्रायजेस’मधून (लातूर) १२ लाख ६ हजार २७२ रुपयांचे, ‘न्यू प्रीत एंटरप्रायजेस’मधून (लातूर) ३५ लाख ५४ हजार १५० रुपयांचे, ‘श्री दत्त एंटरप्रायजेस’मधून (औरंगाबाद) ४ लाख ६४ हजार ७८४ रुपयांचे, तर औरंगाबाद येथील गिरीधर महादेव जोगदंड (आकांक्षा एंटरप्रायजेसचा सेल्समन) यांच्याकडून ८ लाख ३९ हजार ३२२ रुपयांचे इंप्लांट; म्हणजेच एकूण १ कोटी ९७ लाख ८९ हजार ८४९ रुपयांचे इंप्लांट जप्त करण्यात आल्याची माहिती औरंगाबाद विभागाच्या सहआयुक्त कार्यालयातून देण्यात आली. ‘वरद सर्जिकल’, ‘ऑर्थोनेक्स सर्जिकल’ व ‘श्री दत्त एंटरप्रायजेस’वर खटला दाखल करण्यात आला आहे.
‘इप्लांट’च्या दर्जात्मक निर्मितीसाठी २०१८पासून ‘आयएसओ’ची नियमावली लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे ‘आयएसओ’च्या मार्गदर्शक तत्वांनुसार ‘इंप्लांट’ची निर्मिती कंपन्यांना करावी लागणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

ठाण्यातील कंपनीवर कारवाई
‘इंप्लांट’च्या निर्मितीसाठी विशिष्ट परवाना लागतो. असा परवाना नसलेल्या व ‘इंप्लांट’ची निर्मिती करणाऱ्या ठाण्यातील एका कंपनीवरही कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कारवाई करण्यात आलेल्या वरील एका वितरकाचे मुंबईतील ‘जी. टी हॉस्पिटल’समोर साठवणूक केंद्र होते व तिथून अनेक सरकारी तसेच खासगी रुग्णालयांना ‘इंप्लांट’चा पुरवठा होत होता, असेही सूत्रांनी सांगितले. ‘इंप्लांट’चा समावेश औषधांमध्ये करण्यात आल्यामुळे निर्मितीपासून रुग्णापर्यंत ‘इंप्लांट’चा प्रवास परवानाधारक साखळीतून होणे क्रमप्राप्त असल्याचेही सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तावडेंविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी एक हजार ढोल वादनाचा कार्यकम जाहीर केला होता. हा प्रस्तावित कार्य्रकम रायगडावर श्री शिवाजी स्मारक मंडळाकडून करण्यात आला. हा शिवाजी महाराज आणि त्यांना मानणाऱ्या तमाम जनतेच्या अवहेलनेचा प्रकार असल्याचे म्हणत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने बुधवारी तावडे यांची क्रांतीचौकात ढोल वाजवून; तसेच गोडजेवण वाटप करून प्रतिकात्मक पुण्यतिथी आंदोलन केले.

तावडे यांनी ढोल वादनाचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर याविरुद्ध ‌समाजातून टीकेची झोड उठली. यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला, अशी बतावणी मंत्र्यांकडून करण्यात आली, मात्र रायगडावर ढोल वाजवण्याचा कारनामा करण्यात आला. म्हणून श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाला प्रसिद्धीस आणणारे आणि त्यांना प्रोत्साहन देणारे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांची प्रतिकात्मक पुण्यतिथी ढोल ताशांच्या गजरात; तसेच गोड जेवण देऊन साजरी करण्यात आली. यावेळी ‘विनोद तावडे माफी मागा, राजीनामा द्या’, ‘विनोद तावडे हाय हाय’ अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशसचिव अक्षय पाटील, विद्यापीठ अध्यक्ष अमोल दांडगे, शहर कार्याध्यक्ष मयूर सोनवणे, शहर संघटक बबलू अंधारे, शहर सचिव सुमीत शिंदे यांच्यासह अक्षय शिंदे, जुबेर शेख, संदीप जाधव, रोहित चव्हाण, सिद्धांत जाधव, डॉ. कपिल झोटिंग, धनंजय जाधव, महेश तपसे, के. के. पाटील, ऋषिकेश काळे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेततळ्यातून आता मत्स्य व्यवसाय

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘मराठवाड्यातील काही तालुक्यांमध्ये मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेततळ्यांमध्ये मत्स्य व्यवसाय आणि रेशीम उत्पादनासाठी तुतीची लागवड करण्याचा प्रस्ताव मानव विकास मिशनच्या बैठकीत सादर करण्यात आला आहे,’ अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिली.
मानव विकास कार्यक्रम राबवण्यासाठी नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवारी (१३ एप्रिल) झालेल्या बैठकीसाठी डॉ. भापकर, मानव विकास मिशनचे आयुक्यत भास्कर मुंडे, नियोजन विभागाचे उपसचिव सतीश मोघे, जालना जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, धुळ्याचे डॉ. दिलीप पाढसट्टे, नंदुरबारचे डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, नांदेडचे संतोष पाटील आदींसह मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी यांची उपस्थिती होती.
या बैठकीबाबत पत्रकारांशी बोलताना डॉ. भापकर म्हणाले, ‘मराठवाड्यात गेल्यावर्षी दमदार पाऊस झाला. यामुळे अनेक शेततळ्यांमध्ये पाणी आहे. या पाण्यात मत्स्यबीज सोडून माशांचे उत्पादन करणे शक्य आहे. या व्यवसायामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील. यासाठी शासनाकडूनही शेतकऱ्यांना मदत होणार असून, पूर्ण वाढ झालेले मासे विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांना खरेदीची हमी देण्यात येईल. हा व्यवसाय शेतीला पुरक ठरेल व मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. सध्या मराठवाड्यात १ लाख १३ हजार हेक्टर हेक्टरवर शेततळे आहेत. या शेततळ्यांमध्ये मत्स्यबीज टाकून शेतकऱ्यांना हा व्यवसाय करता येणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला १ लाख मत्स्यबीज १२०० रुपये या प्रमाणे देऊन त्यातून ६० दिवसाला लहान मासे (बोटूक) तयार केले जातील व १ रुपयांप्रमाणे प्रत्येक मासा खरेदी करण्यात येईल. १ लाख मत्स्यबीजापैकी २० ते २५ हजार जरी लहान मासे जगले तरी त्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकेल. हा प्रस्ताव पोरवाल यांच्यासमोर सादर केला आहे,’ असे भापकर म्हणाले.

१०० कोटींचा निधी
‘रेशीम उद्योग उभारण्यासाठी तुतीची लागवड करण्याचा प्रस्तावही बैठकीत सादर करण्यात आला. हे दोन्ही प्रस्ताव शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगाचे असून शेतीला पुरक व्यवसाय म्हणून फायद्याचे ठरणार आहेत. मानव विकास मिशनचा कार्यक्रम राबविण्यासाठी राज्य सरकारकडून १०० कोटी रुपयांचा निधी मिळाला असून त्यामुळे निधीची अडचण येणार नाही. या दोन्ही प्रस्तावाला मान्यता देण्याची तयारी दर्शवली आहे,’ असे डॉ. भापकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पालिकेत अब तक छप्पन बदल्या

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या लेखा, नगररचना विभागात वर्षानुवर्षे तळ ठोकणाऱ्या बहाद्दरांना हलवत आयुक्त ओम प्रकाश बकोरियांनी पहिल्याच यादीत गुरुवारी छप्पन जणांच्या बदल्यांचा धमाका उडवला.
पालिकेत मोठ्या प्रमाणावर अंतर्गत बदल्या होणार याची चर्चा दहा-बारा दिवसांपासून सुरू होती, पण त्याला मुहूर्त लागत नव्हता. एकाच विभागात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ काम करणाऱ्यांच्या बदल्याचे संकेत आयुक्तांनी दिले होते. या बदल्यांची कुऱ्हाड कुणाकुणावर कोसळणार या बद्दल उलटसुलट चर्चा सुरू होती. ३१ मार्च संपल्यावर लगेचच बदल्या होतील असे संकेत मिळाले होते, पण एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा झाला तरी बदल्या करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे आता बदल्या होणार नाहीत असे मानले जात असताना अचानक गुरुवारी सायंकाळी या बदल्या केल्या. बदल्या केलेल्या कर्मचाऱ्यांनी आजच्या आज बदली केलेल्या ठिकाणी रुजू व्हावे व त्याचा अहवाल सादर करावा असे त्यांनी बदल्यांच्या आदेशात म्हटले आहे. बदल्यांची दुसरी यादी पुढील आठवड्यात येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

यांच्या बदल्यांचा फुटला नारळ
- नगररचनातील सहाय्यक नगररचनाकार जयंत खरवडकर अतिक्रमण हटावमध्ये पदनिर्देशित अधिकारी. नगररचनाचा अतिरिक्त कार्यभारही.
- नगररचनातील संजय कोंबडे, पंडित गवळी, संजय कपाळे, राजेंद्र जाधव यांच्याही बदल्या.
- लेखातील उदय मोकाशी, संजय कोलते, मिर्झा सईद बेग, रमेश दाभाडे यांची विविध वॉर्ड कार्यालयात बदली.
- अनुरेखक सय्यद जमशीद अतिक्रमण हटावमधून पाणीपुरवठा विभागात.

आयुक्तांची बदली नाही?
‘आपली बदली ७ ते १४ एप्रिलच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे,’ असे आयुक्तांनी सांगितले होते. मात्र, तूर्तास तुमची बदली होणार नाही असा संदेश त्यांना मुंबईतून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्मार्टसिटी प्रकल्पाचे काम नुकतेच सुरू झाले आहे. एक वर्षात त्याला गती द्या. महापालिकेला शिस्त लावण्याचे काम सुरू केलेच आहे, ते तसेच सुरू ठेवा असे त्यांना मुंबईतून सांगण्यात आल्याचे पालिका वर्तुळात बोलले जात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीप्रश्नावर विशेष सभा घेण्याची मागणी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पाणीप्रश्नावर विशेष सर्वसाधारण सभा घेण्याची मागणी स्थायी समितीमधील शिवसेनेचे चार नगरसेवक महापौरांकडे करणार आहेत. लेखी पत्राद्वारे ही मागणी केल्यावर महापौरांना नियमानुसार चार दिवसांत सभा घ्यावी लागेल.
विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे संबंध शहर वेठीस धरले गेले आहे. या पार्श्वभूमीवर सभागृहनेते गजानन मनगटे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, पाणीप्रश्नाच्या संदर्भात विशेष सर्वसाधारण सभा घेण्याची मागणी स्थायी समितीमधील शिवसेनेचे नगरसेवक महापौरांकडे करणार आहेत. शनिवारी या संदर्भातले पत्र महापौरांना दिले जाईल. पत्रावर मनगटे यांच्यासह सीताराम सुरे, गजानन मनगटे, रावसाहेब आमले, मकरंद कुलकर्णी यांच्या स्वाक्षऱ्या असणार आहेत. मनगटे यांनी महापौरांच्या नावे तयार केलेल्या पत्रात म्हटले आहे की, एक महिन्यापासून शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. नागरिकांच्या तक्रारींचा सामना करताना नगरसेवक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे पाणीप्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी व निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादी’चे गेटबंद आंदोलन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुष्काळात होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे यासाठी गुरुवारी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर गेट बंद आंदोलन केले.
गेल्या दोन वर्षांमध्ये राज्यात नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र, तरीही शासनाचा शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला नाही. यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने गेट बंद करून प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी शहर अध्यक्ष राहुल तायडे, फेरोज पठाण, राहुल पाटील, दत्ता भांगे, सारंग बोराडे, सुशील बोर्डे, संदीप जाधव, अमोल नरवडे पाटील, नीलेश मोरे, विकास भालेराव, आनंद मगरे, प्रतीक खरात, सिद्धांत जाधव, सागर चव्हाण आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कापूस अनुदानाची सोयगावात प्रतिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बँका आणि तहसील कार्यालयातून दाद मिळत नसल्याने सोयगाव तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी अद्यापही कापूस अनुदानापासून वंचित आहेत. यामुळे शेतकऱ्यांत शासनाबद्दल संतापाचे वातावरण आहे. निवडणूक आचारसंहिता, मार्च अखेर यामध्ये शेतकऱ्यांना अद्याप अनुदानाची रक्कम मिळालेली नाही.
सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस अनुदान वितरण करण्याची घोषणा दोन महिन्यांपूर्वी केली. परंतु, हे अनुदान अद्याप शेतकऱ्यांच्या पदरात पडलेले नाही. सक्तीची वसुली करताना प्रशासनाला मार्च अखेर किंवा आचारसंहितेचा अडसर वाटला नाही. पण, शेतकऱ्यांना पैसे देण्याची वेळ येताच आडकाठी आणली जात आहे, अशा भावना व्यक्त होत आहेत. पीक विम्याचा लाभ घेतलेल्या शेतकरी वगळून कापूस पिकाची नुकसान भरपाई देण्याचा शासनाचा निकष आहे. पीक विम्याच्या ५० टक्के अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या आदेशाला दोन महिने उलटूनही अद्याप त्यांना रक्कम मिळालेली नाही. एकीकडे तहसील प्रशासन बँकांकडे शेतकऱ्यांच्या याद्या पाठविल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे बँका याद्या मिळाल्या नसल्याचे सांगत आहेत. तहसील आणि बँक यांच्यातील टोलवाटोलवीमध्ये शेतकऱ्यांना बंकांसमोर हात धरून बसावे लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अल्पवयीन आरोपीसह दुचाकीचोर ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात दुचाकी चोरी करणाऱ्या १७ वर्षाच्या अल्पवयीन आरोपीसह एका दुचाकीचोराला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली. या आरोपींनी चार गुन्हे कबुल करीत चार दुचाकी पोलिसांच्या स्वाधीन केल्या.
उस्मानपुरा पोलिस ठाणे हद्दीतून गेल्या महिन्यात दुचाकी चोरीस गेली होती. ही दुचाकी सराईत गुन्हेगार सागर कौतिकराव मिसाळ (वय २५ रा. राजनगर, मुकुंदवाडी) याने चोरल्याची माहिती उस्मानपुरा पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे सागर व त्याचा १७ वर्षाचा साथीदार यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीमध्ये या दोघांनी उस्मानपुरा, सातारा पोलिस ठाणे हद्दीत केलेल्या दुचाकी चोरीची कबुली दिली. या दोघांच्या ताब्यात चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक सतीशकुमार टाक, उपनिरीक्षक कल्याण शेळके, प्रल्हाद ठोंबरे, मनोज बनसोडे, संतोष शिरसाठ, डोभाळ आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंद मद्यालयांचा भार ८८ बारवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महामार्गालगत ५०० मीटरपर्यंत असलेली मद्यविक्रीची दुकाने आणि बार बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर शहरहद्दीतील २४८पैकी सुमारे १६० बार, मद्यविक्रीचे दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे सुरू असलेल्या ८८ मद्यालयांवर ग्राहकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहन पार्किंगचा प्रश्नही निर्माण होत आहे.
राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील दारू दुकानांना बंदी घालण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने काही महिन्यांपूर्वी दिले. महामार्गापासून ५०० मीटर परिसरात असलेल्या दारू विक्री एक एप्रिलनंतर बंद करावी; तसेच मार्चमध्ये ही दुकाने, बारच्या परवान्याचे नूतनीकरण करू नये, असे आदेशात नमूद करण्यात आले. दारू विक्रीची दुकाने हायवेपासून ५०० मीटरहून अधिक अंतरावर असली पाहिजे, असे आदेशात म्हटले आहे. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्थापन केलेल्या समितीमार्फत सर्वेक्षण केले. या निर्धारित अंतराच्या आत असलेल्या मद्यालयांच्या परवान्याचे नूतनीकरण केले नाही. त्यात शहरहद्दीतील २४८पैकी सुमारे १६० बार, मद्यविक्रीचे दुकाने बंद झाली. त्यात १८ देशी दारुची, १४ वाइन शॉप, १०० परमीट रुम, २८ बिअर शॉपींंचा समावेश आहे. जालना महामार्ग, रेल्वे स्टेशनरोड ते दिल्ली गेट या राज्य मार्गांलगतच्या पंचतारांकित हॉटेलांना निर्णयाचा फटका बसला आहे.

चौकशीसाठी गर्दी
मद्यालय सुरू करण्यासाठी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी संबंधित चालकांनी रंगरंगोटी, अलिशान बांधकाम, डेकोरेशन आदींवर भरसाठ खर्च केला आहे, पण महामार्गालगत ५०० मीटरच्या आता मद्यालये आल्याने अनेकांना ती बंद करावी लागली. त्यामुळे पुढे अन्य जागी नवीन मद्यालये सुरू करता येईल का, आहे त्या ठिकाणी केवळ रेस्टॉरंट सुरू करता येईल का, यांसह अन्य चौकशीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे गर्दी होत आहे.

पार्किगचा प्रश्न
शहरातील अनेक परमीट रुमला टाळे लागले आहेत. केवळ ८८ मद्यालये सुरू असून, त्याठिकाणी नेहमीपेक्षा जास्त गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे परमीट रुमबाहेर वाहनांची संख्या वाढली आहे. परिणामी वाहतुकीला अडचण होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वऱ्हाडाच्या बसला अपघात; सहा गंभीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
लग्नाचे वऱ्हाड घेऊन मालेगावहून औरंगाबादकडे जाणाऱ्या लक्झरी बसला अपघात गुरुवारी सकाळी दहा वाजता अपघात झाला. या अपघातात चालकासह सहा जण गंभीर, तर १३ जण किरकोळ जखमी झाले. ही घटना शिऊर बंगला येथून दोन किलोमीटर अंतरावरील वाघला फाट्याजवळ घडली. जखमींना उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्या आले आहे.
मालेगाव तालुक्यातील आगार बुद्रुक येथून ४० वऱ्हाडी घेऊन लक्झरी बस (एम एच ४१ बी ६७८६) औरंगाबाद येथे जात होती. शिऊर बंगल्यापासून दोन किलोमीटर अंतरावरील वाघला फाटा येथे वाहनाला ओव्हरटेक करताना रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात आदळून बस रस्त्याखाली गेली व एका खोल खड्ड्यात जाऊन थांबली. ही बस उलटली नसल्याने जीवितहानी झाली नाही. चालकाच्या केबिनमध्ये बसलेले कैलास सावंत, वाल्मिक पगारे, पिंटू देवरे व चालक उमेश हे काचेच्या बाहेर फेकले गेल्याने गंमीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिऊर पोलिस व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. शिऊर बंगला येथील पुष्पांजली हॉस्पिटलमध्ये जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले.

जखमींची नावे
कैलास सावंत, वाल्मिक पगारे, पिंटू देवरे, चालक उमेश भगवान सावंत, निवृत्ती सावंत, गुलाब सावंत, सुनंदा लक्ष्मण सावंत, मीरा खैरनार, मंगल आहेर, सिंधुबाई बच्छाव, कमला बच्छाव, लता बच्छाव, देविदास साळुंके (सर्व रा. आगार बुद्रुक ता. मालेगाव).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीसह महिलेचा विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अल्पवयीन मुलीसह महिलेचा विनयभंग करण्यात आल्याच्या दोन घटना घडल्या. हे प्रकार मंगळवारी व बुधवारी मुकुंदवाडी व राजनगर भागात घडले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायदा व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पहिल्या घटनेत राजनगर भागातील एका १५ वर्षांच्या मुलीच्या आजीचे निधन झाल्यामुळे तिचे आई-वडील अंत्यदर्शनासाठी गेले होते. ही मुलगी बुधवारी सकाळी साडेआठ वाजता घराबाहेर जात होती. त्यावेळी अजय सानप याने तिला अडवून एकतर्फी प्रेमातून तू माझी असल्याचे सांगत मारहाण केली व लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अजय सानप (रा. राजनगर) याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायदा व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनयभंगाची दुसरी घटना मंगळवारी रात्री दहा वाजता मुकुंदवाडी परिसरात घडली. येथील २४ वर्षांची महिला घरात हॉलमध्ये झोपली असता ओळखीतील नितीन श्रीमंत जाधव हा घरात शिरला. नितीन याने महिलेसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर शेजारी राहणारे नातेवाईक जमा झाले. नागरिकांनी नितीनला मारहाण केली. यावेळी नितीनने स्वतःवर वार करून घेत या महिलेवर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी‌ देत पलायन केले. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी नितीन जाधव विरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खत, बियाणे खरेदी; आधार क्रमांक द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
रासायनिक खत व बियाणांचा काळाबाजार थांबवण्यासाठी कृषी विभागाने यंदापासून खरेदी करताना शेतकऱ्यांना आधार क्रमांक देणे बंधनकारक केल आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशा सूचना कृषि सेवा केंद्रांना देमअयात आल्या आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सुभाष अघाव यांनी दिली.
पेरणीच्या हंगामात दरवर्षी खते व बियाण्यांचा काळाबाजार होतो. टंचाईच्या नावाखाली दुकानदार शेतकऱ्यांची लूट करतात. कृषी विभागाकडून त्यावर उपाययोजना केल्या जातात, पण त्या पुरेशा ठरत नाही. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी कृषी विभागाने यंदापासून ऑनलाइन खरेदी व्यवहाराचा निर्णय घेतला आहे. येत्या खरीप हंगामापासून या निर्णयाची आंमलबजावणी केली जाणार आहे. जून महिन्यात रासायनिक खत व बियाणे खरेदीसाठी आधार क्रमांक आवश्यक राहणार आहे. याशिवाय कृषी सेवा केंद्रावर कार्ड स्वाइप मशीन ठेवण्यात येणार आहे. या मशीनद्वारे शेतकरी किसान क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड स्वाइप करून खत खरेदी करू शकतील. खरेदी व्यवहार बँकेमार्फत ऑनलाइन होणार असल्याने शेतकऱ्याचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे. आधारकार्ड नसलेल्या शेतकऱ्याने ते काढून घ्यावे व आधार क्रमांक बँकेत देऊन खाते ऑनलाइन करून घ्यावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुभाष अघाव यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images