Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

नागमणीच्या आमिषाने व्यापाऱ्याला लुटले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
नागमणीचे आमिष दाखवून गुजरातच्या व्यापाऱ्याचे तीन लाख रुपये लुटल्याची घटना कसाबखेडा फाटा येथे शुक्रवारी (१४ एप्रिल) रात्री सव्वाबारा वाजता घडली.
पडेगाव येथील चंचल रामटेके, रश्मी रामटेके व नदीम खां नूर खां यांनी चिखली (जि. नवसारी, गुजरात) येथील व्यापारी नरेंद्र यादव ऊर्फ राकेश पटेल यांना नागमणी देण्याकरिता वेरूळ येथे बोलावून घेतले होते. या व्यवहाराबाबत व्यापाऱ्याला संशय आला. रात्री सव्वाबाराच्या सुमारास कसाबखेडा फाटा येथे व्यापाऱ्याने आपल्याला जी वस्तू देणार होते ती न देता मारहाण करून तीन लाख रुपये लुटल्याची माहिती खुलताबाद पोलिस ठाण्यात मोबाइलवरून दिली. जीव वाचवून गुजरातच्या व्यापाऱ्याने गुजरातकडे धाव घेतली. ठाणे अंमलदार भाऊसाहेब अहिरे यांनी घटनेची माहिती दरोडा पेट्रोलिंगसाठी गेलेल्या खुलताबाद पोलिस ठाण्याच्या पथकाला दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजपूत, पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलिस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत पोलिस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून स्कार्पिओची झडती घेतली असता पोलिसांना पिस्टल, गावठी कट्टा , दोन मोबाइल, काडतूस, धार्मिक पूजेचे साहित्य, वाती, बांगड्या सापडल्या. इकडे स्कार्पिओ रस्त्याच्याकडेला उभी होती. स्कार्पिओतील व्यक्तींनी छावणी पोलिस ठाणे गाठून स्कार्पिओला कसाबखेडा फाटा येथे अपघात झाल्याची तक्रार दिली. अपघात झालेले ठिकाण खुलताबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे सांगून छावणी पोलिसांनी त्यांना खुलताबाद पोलिस ठाण्यात जाण्याचे सांगितले. छावणी येथेच खुलताबाद पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. गुजरात येथील व्यापाऱ्याला खुलताबाद पोलिसांनी अधिक चौकशीसाठी बोलावले असून ते व्यापारी खुलताबाद पोलिस ठाण्यात आल्यानंतर घटनेचा नेमका उलगडा होणार आहे. नागमणी विक्रीच्या संबंधित टोळीचा उलगडा होण्याची शक्यता असून यामधून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांनी दिली.

दोघांना बेड्या
याप्रकरणी नरेंद्र यादव ऊर्फ राकेश पटेल यांच्या फिर्यादीवरून चंचल रामटेके (प्रियदर्शनी कॉलनी पडेगाव), रश्मी रामटेके (प्रियदर्शनी कॉलनी पडेगाव), नदीम खां नुर खां (प्रियदर्शनी कॉलनी, पडेगाव) यांना बेड्या ठोकल्या.

चोरट्यांचा जय महाराष्ट्र
गुन्हात वापरण्यात आलेल्या स्कार्पिओच्या (एम.एच.१६व्ही५) पाठीमागील काचेवर शिवसेनेचा वाघ काढलेला असून जय महाराष्ट्र लिहिलेले आहे. त्यामुळे ही गाडी कुणाची, अशी चर्चा रंगली आहे. त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आर्थिक समता प्रस्थापित करावी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘देशाचा आर्थिक विकासदर इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे ७.२ टक्के असणे अभिमानास्पद आहे. मात्र, हा विकास फक्त १५-२० टक्के लोकसंख्येचा आहे. इतरांची स्थिती अजूनही बिकट आहे. देशाच्या विकासात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आर्थिक विषमता अपेक्षित नव्हती. आर्थिक समता प्रस्थापित होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने देशाचा विकास होईल,’ असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. व्ही. बी. तायडे यांनी केले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त बोलत होते.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि त्यांची सद्यस्थितीतील समर्पकता’ विषयावर शुक्रवारी दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात अर्थतज्ज्ञ तायडे यांचे व्याख्यान झाले. यावेळी मंचावर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, विद्यार्थी विकास समन्वयक डॉ. सुहास मोराळे, परीक्षा नियंत्रक दिगंबर नेटके यांची प्रमुख उपस्थिती होती. बाबासाहेबांच्या अर्थशास्त्रातील योगदानावर तायडे यांनी भाष्य केले. ‘बाबासाहेबांच्या जीवनाचे विविध पैलू समाजासमोर आले, पण अर्थशास्त्रज्ञ बाबासाहेब हा पैलू प्रकर्षाने दुर्लक्षित राहिला. अर्थशास्त्रावर त्यांनी अतिशय समृद्ध लिखाण केले. ‘प्रॉब्लेम ऑफ रूपी’ ग्रंथ आकलनास कठीण आहे. या ग्रंथाचा मराठी अनुवाद वाचल्यास काही बोध होतो. मात्र, बहुतेक लेखन काठिण्य पातळीवरील असल्यामुळे दुर्लक्षित राहिले असावे. या आर्थिक मांडणीत लेखन करताना त्यांच्या विचाराची धार अत्यंत प्रखर होती. जगातील आर्थिक प्रश्न मिटतील एवढी क्षमता मांडणीत आहे. ब्रिटीश राजवटीत केंद्राकडे सर्वाधिकार असल्यामुळे राज्यांचा विकास ठप्प होता. राज्यांना आर्थिक पाठबळ दिल्याशिवाय विकास होणार नाही, हे बाबासाहेबांनी स्पष्ट केले. ब्रिटीश सरकार शेती, मीठ आणि अन्य क्षेत्रातून कर वसूल करीत असले तरी जनतेला सुविधा मिळत नव्हत्या. लष्करी बळ व ब्रिटीश अधिकारी यांच्या पगारावर सर्वाधिक खर्च करीत असत. ही विसंगती मांडताना बाबासाहेबांनी काही उपाय सुचवले होते’ असे डॉ. तायडे म्हणाले.
विद्यापीठातील नियोजित प्रकल्पांबाबत कुलगुरू डॉ. चोपडे यांनी माहिती दिली. ‘अडीच कोटी रुपये खर्च करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय ग्रंथालय सुरू करण्यात येणार आहे. जगभरातील अभ्यासकांसाठी हा मोठा ठेवा असेल. आठ कोटी रुपये निधीतून सांची स्तूप उभारला जाईल. विद्यापीठ प्रशासन आणि राज्य शासनाच्या निधीतून येत्या तीन महिन्यात प्रकल्प सुरू होईल,’ असे डॉ. चोपडे म्हणाले.
दरम्यान, व्याख्यानापूर्वी ‘बार्टी’च्या वतीने फिल्म्स डिव्हिजन निर्मित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ माहितीपट दाखवण्यात आला. या माहितीपटाबाबत गीता म्हस्के यांनी माहिती दिली. यावेळी ‘बार्टी’चे विभागीय संचालक डॉ. श्रीकांत देशमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अनिल लहाने यांनी केले. यावेळी विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तैलचित्राची मिरवणूक
विद्यापीठात सकाळी अत्यंत उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली. विद्यापीठ प्रवेशद्वारासमोरील आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणूक निघाली. प्रबोधनगीतांच्या ठेक्यावर नाचत शेकडो विद्यार्थी मिरवणुकीत सहभागी झाले. ‘जय भीम’ घोषणांनी परिसर दणाणून गेला. तीन तास चाललेल्या मिवरणुकीची नाट्यगृहात सांगता झाली. यावेळी कुलगुरू, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युगपुरुषाला अनुयायांचे अभिवादन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती शहरात जल्लोषात साजरी झाली. निळे फेटे घातलेले तरुण, निळे झेंडे लावलेल्या दुचाकी आणि बाबासाहेबांचा जयघोष असे उत्साही वातावरण दिवसभर राहिले. भडकलगेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांची लक्षणीय गर्दी झाली.
समता प्रस्थापित करण्यासाठी जीवनभर संघर्ष करणारे युगपुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी झाली. प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि मिरवणुका यांनी शहर दुमदुमून गेले. आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून ठिकठिकाणी व्याख्याने झाली. आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी वक्त्यांनी मार्गदर्शन केले. तर तरुण अनुयायांनी दुचाकी रॅली काढून महामानवाला अभिवादन केले. डौलात फडकणारे निळे झेंडे, निळे फेटे परिधान केलेले कार्यकर्ते आणि ‘जय भीम’चा नारा चैतन्य निर्माण करणारा ठरला. भडकलगेट येथे दिवसभर भीम अनुयायांची अभिवादन करण्यासाठी वर्दळ होती. सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक संस्था आणि मान्यवरांनी आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले. दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी गर्दी केली. विविध समाजाच्या संघटनांनी अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी गर्दी केली. प्रबोधनगीते व घोषणांनी परिसर दणाणून गेला.

एस. टी. कॉलनीत व्याख्यान
सिडको परिसरातील एस. टी. कॉलनीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. महारूद्र हनुमान मंदिरात झालेल्या कार्यक्रमात निवृत्त शाखर उपसंचालक के. ई. हरदास यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर व्याख्यान दिले. तसेच ऋषिकेश वाघमारे या अंध मुलाने बाबासाहेबांच्या विचारांवर भाष्य केले. या कार्यक्रमाला नगरसेवक दामोधर शिंदे, मंदिर समितीचे अध्यक्ष अशोक पवार, सोसायटीचे अध्यक्ष देवनाथ जाधव, माणिकराव निकम, अॅड. डी. एच. पगारे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पगारे यांनी केले तर अॅड. विवेकानंद इंगळे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीच्या हिश्शामुळे पोचवले पोलिसांपर्यंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चोरी केलेल्या मालाच्या हिश्शाच्या वादाची माहिती खबऱ्याने गुन्हेशाखेला पोचवली. त्यावरून दोन सराईत महिला आरोपींना ताब्यात घेत पोलिसांनी आरोपीकडून ५१ हजाराचे मंगळसूत्र जप्त केले.

गुरुवारी दुपारी मुकुंदनगर रेल्वे गेट क्रमांक ५६ जवळ दोन महिला चोरी केलेल्या मालाच्या हिश्शावरून भांडत होत्या. खबऱ्याने तत्काळ ही माहिती गुन्हेशाखेला दिली. पथकाने धाव घेत संशयित आरोपी संगीता अंकुश शिंदे व सुमनबाई सावळाराम जाधव (रा. मुकुंदनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली. यावेळी दोघींनी रामनवमीच्या दिवशी समर्थनगर येथील राम मंदिरात मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली. दर्शनासाठी आलेल्या मंगला द्वारकाप्रसाद शर्मा यांचे ५१ हजाराचे मंगळसूत्र त्यांनी पळवले होते. हे मंगळसूत्र देखील त्यांच्याकडून पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त संदीप आटोळे, एसीपी रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, जमादार संतोष सोनवणे, सुधाकर राठोड, सिद्धार्थ थोरात, योगेश गुप्ता, लालखा पठाण, धर्मराज गायकवाड, ओमप्रकाश बनकर, प्रभाकर राऊत, रेखा चांदे व शेख सुलताना यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर तब्बल १०३ प्रश्न

$
0
0

पालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर तब्बल १०३ प्रश्न

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

महापालिकेच्या गुरुवारी (२० एप्रिल) होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या समोर तब्बल १०३ प्रश्न आहेत. विविध नगरसेवकांनी त्यांच्या वॉर्डाच्या अनुशंगाने किंवा शहर विकासाच्या अनुशंगाने विचारलेले हे प्रश्न आहेत. एका प्रश्नावर पाच मिनीटे चर्चा झाली तरी संपूर्ण प्रश्नांसाठी ५१५ मिनीटे, म्हणजे साडेआठ तास लागतील.

सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी लेखी प्रश्न विचारण्याची पद्धत तत्कालीन महापौर त्र्यंबक तुपे यांनी सुरू केली. त्यांच्या काळात सर्वसाधारण सभा सुरू झाल्यावर इतिवृत्त मंजूर केले जायचे. त्यानंतर नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांवर चर्चा व्हायची. प्रश्नांवरची चर्चा संपल्यावर विषयपत्रिकेवरील विषय चर्चेसाठी घेतले जात होते. तुपे यांच्या नंतर भगवान घडमोडे महापौर झाले. त्यांच्या अध्यक्षतेखाली आतापर्यंत किमान पाच सर्वसाधारण सभा झाल्या, पण एकाही सभेत त्यांनी नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांना प्राधान्य दिले नाही. प्रश्नांबद्दल पुढील सर्वसाधारण सभेत चर्चा केली जाईल, असे सांगत त्यांनी एका सर्वसाधारण सभेतील प्रश्न दुसऱ्या सर्वसाधारण सभेत ढकलले. त्यामुळे प्रश्न साचत गेले. साचलेल्या प्रश्नांची संख्या आता १०३ वर पोचली आहे.

सर्वसाधारण सभेत प्रश्न मांडल्यावर त्यावर साधकबाधक चर्चा होते, प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने मार्ग निघतो. त्यामुळे नगरसेवक प्रश्न लेखी स्वरूपात मांडतात व त्यावर चर्चा घडवून आणतात. एका प्रश्नावर पाच मिनीटे चर्चा होणार असे गृहीत धरल्यास १०३ प्रश्नांवर ५१५ मिनीटे चर्चा चालेल. ही चर्चा संपल्यावर मूळ विषयपत्रिका महापौरांना हाती घ्यावी लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्योती गवते, कल्याण ढगेला विजेतेपद

$
0
0

ज्योती गवते, कल्याण ढगेला विजेतेपद

मॅरेथॉन स्पर्धा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘रन फॉर इक्व्यालिटी’ मॅरेथॉन स्पर्धा ज्योती गवते व कल्याण ढगे यांनी जिंकली.

डॉ. आंबेडकर मेडीकोज असोसिएशनतर्फे मॅरेथॉनचे आयोजन केले होते. या स्पर्धेत ९५० स्पर्धक धावले. पाच किलोमीटर अंतराची ही मॅरेथॉन परभणीच्या ज्योती गवतेने जिंकली. कांचन म्हात्रेने दुसरा तर संचिता मोरेने तिसरा क्रमांक मिळविला. पुरूष गटात कल्याण ढगेने जेतेपद मिळविले. वैभव जोगदंडने दुसरा तर विशाल भोसलेने तृतीय क्रमांक संपादन केला. या स्पर्धेत वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. हर्षल धाबे, डॉ. विजय जाधव, डॉ. प्रवीण चाबुकस्वार यांनीही सहभाग घेतला होता. विजेत्यांना रोख पारितोषिके व एक पुस्तक भेट देण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेटपासून मॅरेथॉनला प्रारंभ झाला. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते झेंडा दाखवण्यात आला. या प्रसंगी प्राचार्या वैशाली प्रधान, पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, पांडुरंग राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना डॉ. म्हस्के, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. बोरा, डॉ. शालिनी दहाड, डॉ. कैलास गायकवाड, पांडुरंग राऊत यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

मॅरेथॉनच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. तेजस मुंडे, डॉ. प्रभा खैरे, डॉ. राहुल जावळे, डॉ. अमित जोगदंड, डॉ. मनिषा अंभोरे, डॉ. ज्योती खंदारे, अविनाश कांबळे, सायली भगत, मनीष बागूल आदींनी पुढाकार घेतला. तसेच वैद्यकीय कॉलेज, पीईएस इंजिनीअरिंग कॉलेज, युनायटेड युथ फोरमच्या सदस्यांनीही सक्रिय सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅशलेस व्यवहारामुळे पारदर्शकतेत वाढ

$
0
0

कॅशलेस व्यवहारामुळे पारदर्शकतेत वाढ

विधानसभा अध्यक्ष बागडे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कॅशलेस व्यवहार काळाची गरज बनली आहे. या व्यवहारांमुळे पारदर्शकतेत अधिक वाढ होते. हा व्यवहार विश्वासार्ह असून, सर्वांनी रोकडरहित व्यवहारांवर भर देण्याचे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शुक्रवारी येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात डिजिधन मेळाव्याच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, प्रशांत बंब, सुभाष झांबड, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, उपजिल्हाधिकारी एस. एस. परळीकर, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा पुरवठा अधिकारी भारत कदम यांच्यासह सर्व बँकांचे प्रतिनिधी, सर्व विभागाचे प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष बागडे म्हणाले, ‘रोकडरहित व्यवहाराची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. आपला देश रोकडरहित व्यवहाराला प्रथम प्राधान्य देत आहे. ही आधुनिक विकासाची नांदीच आहे. रोकडरहित व्यवहारातून पारदर्शकता समोर येत आहे. त्यातून नागरिकांची कामे होत आहेत. त्यांना समाधान मिळत आहे. प्रशासनाने देखील ई-निविदांमध्ये आरटीजीएस पद्धतीने डिपॉझिट स्वीकारावे.’
सदार खैरे म्हणाले, ‘डिजिटल व्यवहार याबाबत जनसामान्यांमध्ये समज-गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी बँकानी पुढाकार घ्यावा. आधुनिक जगामध्ये रोकडरहित व्यवहाराचे महत्त्व समजून घेऊन यापुढील व्यवहार रोकडरहित करण्यावर भर द्यावा.’
विभागीय आयुक्त डॉ. भापकर म्हणाले, ‘मराठवाड्यात नांदेडमध्ये डिजिधन मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसादही मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीच्या निर्णयाने देशात मोठी क्रांती केली आहे. रोखरहित व्यवहारासाठी सर्व यंत्रणांनी नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.’
निवासी उपजिल्हाधिकारी गावंडे यांनी प्रास्ताविक केले. उपजिल्हाधिकारी अजंली धानोरकर यांनी सूत्रसंचालन केले व आभारही मानले.
पंतप्रधान मोदी यांचे लाइव्ह भाषण
नागपूर येथील डिजिधन समारोप मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषणे झाली. त्याचे थेट प्रक्षेपण जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दाखविण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या रोखरहित भारताच्या दिशेने चालावयाच्या संदेशाबाबत प्रत्येकाने दैनंदिन कामात अंगीकार करावा. देशाबरोबरच राज्य आणि मराठवाडा रोखरहित व्यवहारात अग्रेसर राहील, यासाठी प्रयत्न करावेत. देशाच्या आर्थिक मजबुतीसाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणारी योजना

$
0
0

जनसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणारी योजना

प्रधानमंत्री आवास योजनेचे हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते भूमीपूजन

औरंगाबाद ः

जनसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारी ही उपयुक्त योजना आहे. नियोजनबद्ध विकास योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांची गरज पूर्ण होऊ शकते, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे औरंगाबाद येथे गट क्र. ९ नक्षत्रवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या गृहनिर्माण योजनेचा भूमिपूजन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाठ, आमदार सुभाष झांबड, आमदार प्रशांत बंब, आमदार अतुल सावे यांच्यासह विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल रामोड यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थित होती.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आजच्या महागाईच्या काळात अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना परवडतील अशा दरामध्ये चांगल्या पद्धतीची घरे उपलब्ध होणार आहेत, ही महत्वाची बाब आहे. वाढत्या नागरिकरणामध्ये जागेची उपलब्धता एका बाजूला कमी होत असताना दुसरीकडे लोकसंख्येचे प्रमाण हे वाढते आहे. यामध्ये घराची मूलभूत गरज पूर्ण करणे हे अवघड काम उपलब्ध जागेच्या नियोजनबद्ध वापरातून शक्य होऊ शकते. यादृष्टीने कमी जागेत जास्त कुटुंबाना राहता येईल, अशा पद्धतीने उभ्या इमारतींच्या बांधकामाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे बागडे यांनी सांगितले. अल्प दरात चांगल्या प्रतीची घरे उपलब्ध करून देणारी ही महत्वाची योजना असल्याचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

दोन वर्षात हा प्रकल्प होणार पूर्ण

नक्षत्रवाडीच्या गट नंबर ९ येथे एकूण दोन हेक्टर क्षेत्रामध्ये उभारण्यात येणाऱ्या या गृहनिर्माण योजनेंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटातील २४० घरे तर ८० घरे मध्यम उत्पन्न गटासाठी बांधण्यात येणार आहेत. ४१३.७२ चौरस फूट बांधकाम क्षेत्रफळ असणाऱ्या या घरांची प्राथमिक अंदाजित रक्कम ८ लाख ५० हजार इतकी असून यासाठी प्रत्येक घरासाठी केंद्र शासनाचे एक लाख ५० हजार तर राज्य शासनाचे एक लाख रुपये इतके अनुदान मिळणार आहेत. येत्या दोन वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासनातर्फे महाराष्ट्रातील १४२ शहरांची निवड करण्यात आली आहे. औरंगाबाद विभागातील १७ शहरांचा त्यात समावेश आहे. यामध्ये विभागातील आठ ही जिल्ह्यांची ठिकाणे आहेत. औरंगाबाद म्हाडा विभागातर्फे सादर करण्यात आलेल्या एकूण आठ प्रकल्प अहवालापैकी सहा प्रस्ताव राज्य व केंद्रीय समितीतर्फे मंजूर करण्यात आले असल्याची माहिती डॉ. अनिल रामोड यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मिसारवाडीत गोदामाला आग

$
0
0

बॅटऱ्यांचे स्फोट मिसारवाडीत गोदामाला आग

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मिसारवाडी, आरतीनगर भागात भंगार गोदामाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. शुकव्रारी दुपारी एक वाजता हा प्रकार घडला. आगीमध्ये निकामी बॅटऱ्याचे स्फोट झाल्याने आग भडकली. अग्निशमन दलाने एका तासात या आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण समजू शकले नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
पिसादेवी रोडवर राठी कॉम्पलेक्सच्या बाजूला भंगाराचे गोदाम आहे. दुपारी एक वाजता या गोदामाला अचानक आग लागली. गोदामामध्ये भंगार सामान प्लास्टिकच्या बाटल्या, कॅरीबॅग, टाकाऊ कपडे व चिंध्या असलेल्याने या आगीने रौद्ररुप धारण केले. तेथील मजुरांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग भडकल्याने त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. सिडको व चिकलठाणा येथील अग्निशमन दलाच्या बंबानी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. एका तासात ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. गोदामात असलेल्या वाहनांच्या निकामी बॅटऱ्यांचे स्फोट होत होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीत आठ ते दहा हातगाड्या, पाण्याची टाकी, भंगार साहित्य आदी जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सिडको अग्निशमन दलाचे एस. के. भगत, वैभव बागडे, एस. ई. भोसले, अशोक वेलदोडे, वाहनचालक अशोक वाघ यांच्यासह चिकलठाणा अग्निशमन दलाचे दोन बंब आणि ६ टँकरच्या सहाय्याने आग नियंत्रणात आणली असल्याचे एस. के. भगत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी जामीन, मग हर्सूलमध्ये

$
0
0

आधी जामीन, मग हर्सूलमध्ये
पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीची अखेर जेलमध्ये रवानगी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला सात दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात केली असता, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करून त्याच दिवशी त्याला जामिनावर सोडण्यात आले. त्याविरुद्ध जिल्हा कोर्टात पुनर्विलोकन (रिव्हिजन) अर्ज सादर केला असता, त्याला सिडको पोलिस ठाण्यात हजर होण्याचे आदेश देण्यात आले. आरोपी पोलिस ठाण्यात हजर होताच त्याला ताब्यात घेऊन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी. अत्तार यांच्या कोर्टात हजर केले असता, त्याची रवानगी हर्सूल जेलमध्ये करुन त्याचा जामीनही फेटाळल्यात आला.
या प्रकरणी मृत विवाहिता सविता विजय जाधव (३७, रा. शिवाजीनगर, एन-९, औरंगाबाद) यांचे वडील मच्छिंद्रनाथ गंगाधर तुपे यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीची मुलगी व मृत विवाहिता सविता यांचा विवाह १९९९ मध्ये आरोपी विजय कचरू जाधव (४७, रा. शिवाजीनगर, औरंगाबाद) याच्याशी झाला होता. त्यांना तीन अपत्ये आहेत. लग्नानंतर सविता यांना काही दिवस चांगली वागणूक देण्यात आली. त्यानंतर सविता हिचा सासरच्या मंडळींकडून सातत्याने शारीरिक-मानसिक छळ करण्यात येत होता आणि प्रत्येक वेळी पैशांचा तगादा लावण्यात येत होता. आरोपी पती हा पद्मपाणी कॉलेजमध्ये नोकरीला होता व विद्यार्थ्यांकडून परस्पर डोनेशन घेऊन त्याने संस्थेची फसवणूक केली होती. या प्रकरणात अडचणीत आल्यानंतर फिर्यादीने आरोपीला वेगवेगळ्या वेळी दोन लाख रुपये, दहा हजार रुपये, २५ हजार रुपये दिले, तरीदेखील सविताचा छळ होतच होता आणि पैशांच्या आमिषाने अधिकाधिक छळ केला जात होता. त्याला कंटाळून सविताने ११ मार्च २०१७ रोजी आत्महत्या केली. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीनंतर २० मार्च रोजी सिडको पोलिस ठाण्यामध्ये आरोपीविरुद्ध कलम ३०६, ४९८ (अ), ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल होऊन आरोपी पतीला अटक करण्यात आली.
जामीन मिळाल्यावर फिर्यादीला धमकी
त्याला २१ मार्च रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीला सात दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती कोर्टात करण्यात आली. मात्र त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येऊन त्याचदिवशी त्याला नियमित जामीनही मंजूर करण्यात आला. जामिनावर सोडण्यात आल्यानंतर आरोपीने २२ मार्च रोजी फिर्यादीला तक्रार मागे घेण्यासाठी जिवे मारण्याची धमकी दिली, शिवीगाळ केली, अशी तक्रार फिर्यादीने जावयाविरुद्ध केली. त्यानंतर आरोपीविरुद्ध कलम ३०७ अन्वयेदेखील गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, फिर्यादीने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाविरुद्ध जिल्हा कोर्टात पुनर्विलोकन अर्ज दाखल केला होता. सुनावणीवेळी, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी आरोपी विजय जाधव याला ११ एप्रिल रोजी सिडको पोलिस ठाण्यात हजर होण्याचे आदेश दिले. आरोपी सिडको पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन १२ एप्रिल रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी. अत्तार यांच्या कोर्टात हजर करण्यात आले.
इतर आरोपी मोकाटच
आरोपीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अत्तार यांच्या कोर्टात हजर केले असता, जामिनावर सुटल्यानंतर आरोपीने सासऱ्याला (फिर्यादी) जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत; तसेच या गुन्ह्यातील इतर आरोपींना अटक करणे बाकी असून, फिर्यादीने आरोपीला वेळोवेळी दिलेल्या पैशांचा तपास करणे बाकी आहे. त्यामुळे आरोपीला पाच दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के व अॅड. भिंगारदेव यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरुन कोर्टाने आरोपीची रवानगी हर्सूलच्या जेलमध्ये करण्याचे आदेश दिले. त्याचवेळी आरोपीचा नियमित जामीन अर्जही कोर्टाने फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका शाळांमध्ये मानधनावर योग शिक्षक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या शाळांमध्ये मानधनावर योग शिक्षक नेमण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास नवीन शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक शाळेत योग शिक्षक नेमले जातील.
महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी (२० एप्रिल) होणार आहे. या सभेत उपमहापौर स्मिता घोगरे यांनी योग शिक्षकांच्या नेमणुकीबद्दल प्रस्ताव मांडला आहे. त्याला नगरसेविका मीना गायके यांनी अनुमोदन दिले आहे. प्रस्तावात घोगरे यांनी म्हटले आहे की, शहरात खेळाची मैदाने कमी आहेत. मैदानी खेळ नसल्यामुळे मुलांमध्ये मोबाइल गेम खेळण्याची प्रवृत्ती वाढू लागली आहे. मुलांना व्यायामाची सवय नसल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक क्षमतेवर होऊ लागला आहे. मुलांमध्ये कमी वयात विविध आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे. या सगळ्याचा विचार करता मुलांमध्ये शारीरिक क्षमता वाढविणे, त्यांच्यात व्यायामाची आवड निर्माण होणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रत्येक शाळेत मानधनतत्वावर योग शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी.
महापालिकेच्या ७० शाळा आहेत. योग शिक्षक नियुक्त करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर झाल्यास नवीन शैक्षणिक वर्षापासून या शाळांमध्ये योगशिक्षक काम करताना दिसून येतील.
औरंगाबाद महापालिकेच्या शहरात ७० शाळा आहेत. या शाळांतून सुमारे १६ हजार विद्यार्थी आहेत. सर्वसाधारण सभेते हा प्रस्ताव मान्य केल्यास पालिका शाळांतल १६ हजार विद्यार्थ्यांना योग शिक्षण उपलब्ध होईल. या शिक्षकांची नियुक्ती मानधनावर करण्यात येणार असल्यामुळे महापालिकेवर त्याचा फारसा आर्थिक ताण येणार नाही, असे मानले जात आहे.

- महापालिकेच्या शाळा ः ७०
- विद्यार्थी संख्या ः १६ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भीमनगर - भावसिंगपुऱ्यात ‘भूमिगत’ चे काम अर्धवट

$
0
0

भीमनगर - भावसिंगपुऱ्यात ‘भूमिगत’ चे काम अर्धवट

उपमहापौरांना पालिका प्रशासनाला इशारा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

भीमनगर - भावसिंगपुरा भागात महापालिकेने दीड वर्षापूर्वी भूमिगत गटार योजनेचे काम केले. हे काम पूर्ण न करता अर्धवट अवस्थेत ते सोडून देण्यात आले. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या संपूर्ण परिसरातील भूमिगत गटारयोजनेचे काम तातडीने योग्यप्रकारे पूर्ण करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने हे काम प्रशासनाकडून करून घ्यावे, लागेल असा इशारा उपमहापौर स्मिता घोगरे यांनी दिला आहे.

भीमनगर - भावसिंगपुरा भागात भूमिगत गटार योजनेचे काम करताना दोन्हीही साईडलाइन सोडून काम केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात काम करताना साईडलाइन तोडण्यात आल्या आहेत. काम अर्धवट सोडून देण्यात आले आहे. चेंबरसाठी २० फूट खोल खड्डे खोदण्यात आले आहेत, पण चेंबरचे काम मात्र करण्यात आले नाही. आता या खड्ड्यांमध्ये घाण पाणी साचले असून ते जमिनीमध्ये मुरू लागले आहे. त्यामुळे बोअर व विहिरीतून दूषित पाणी येऊ लागले आहे. या प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. या संदर्भात नगरसेविका आशा निकाळजे यांनी उपमहापौर स्मिता घोगरे व सभागृहनेता गजानन मनगटे यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीनुसार घोगरे व मनगटे यांनी भीमनगर - भावसिंगपुरा भागाची पाहणी केली. यावेळी नगरसेविका आशा निकाळजे, कविता मस्के, दयानंद सरतापे, पठारे, संदीप सेवाकर, विल्सन गायकवाड, अविनाश जगधने, राजेश कांबळे, आशिष नंदा, संदीप पगारे, सुमीत जाधव यासह परिसरातील रहिवासी उपस्थित होते. कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी मात्र उपस्थित नव्हते. त्यानंतर घोगरे यांनी अफसर सिद्दिकी यांना आपल्या दालनात बोलावून भीमनगर - भावसिंगपुरा भागातील भूमिगत गटार योजनेचे काम योग्यप्रकारे करण्याची ताकीद दिली. योग्य प्रकारे काम न झाल्यास शिवसेना स्टाईलने काम करून घेतले जाईल अशा इशारा त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक साहित्य संमेलन आजपासून

$
0
0

शिक्षक साहित्य संमेलन आजपासून

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र औरंगाबाद, शिक्षण विकास मंच व महात्मा गांधी मिशन यांच्या वतीने आयोजित दुसरे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन शनिवारी सुरू होणार आहे. एमजीएम कॅम्पसमधील रुख्मिणी सभागृहात होणाऱ्या संमेलनाचे अध्यक्ष कवी बालाजी मदन इंगळे आहेत. या दोन दिवसांच्या संमेलनात राज्यभरातील दीड हजार शिक्षक सहभागी होणार आहेत.

संत तुकाराम नाट्यगृह ते एमजीएम दरम्यान शनिवारी सकाळी आठ वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता संमेलनाचे उद्‍घाटन होईल. यावेळी राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, नंदकिशोर कागलीवाल, एमजीएमचे विश्वस्त सचिव अंकुशराव कदम, सचिन मुळे, डॉ. वसंत काळपांडे, बसंती रॉय, दत्ता बाळसराफ उपस्थित राहणार आहेत. दुपारी दीड वाजता ‘माझ्या लेखन प्रेरणा’ या विषयावर साहित्यिक रमेश इंगळे उत्रादकर (बुलडाणा), कृष्णात खोत (कोल्हापूर), प्रवीण बांदेकर (सिंधुदूर्ग) आणि संजीवनी तडेगावकर (जालना) यांची मुलाखत कवी केशव खटींग (परभणी) व संदीप जगदाळे (औरंगाबाद) घेणार आहेत. दुपारी तीन वाजता ‘शिक्षकांचे सोशल मीडियावरील सृजनशील लेखन’ या विषयावर परिसंवाद होईल. या परिसंवादात प्रज्ञा देशपांडे (नागपूर), अनिल सोनुने (जालना), वृषाली विनायक (मुंबई) भाऊसाहेब चासकर (अहमदनगर) विचार मांडणार आहेत. सायंकाळी पाच वाजता निमंत्रितांचे कविसंमेलन रंगणार आहे. रात्री साडेआठ वाजता प्रा. अशोक जोंधळे निर्मित ‘खान्देशचा मळा मराठवाड्याचा गळा’ कार्यक्रम होईल. या संमेलनाचा समारोप रविवारी होणार आहे. या दोन दिवसांच्या साहित्य संमेलनाला रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेराशे मालमत्ताधारकांकडे ६५ कोटींची थकबाकी

$
0
0

तेराशे मालमत्ताधारकांकडे ६५ कोटींची थकबाकी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

शहरातील १३३४ मालमत्ताधारकांकडे तब्बल ६५ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात येणार आहेत. थकबाकीदारांमध्ये शासकीय कार्यालये, शिक्षणसंस्था, मोबाइल टॉवर्सचा समावेश आहे.

मालमत्ता कर वाढीच्या संदर्भात महापालिकेच्या मार्च महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत महापालिका प्रशासनाने प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी मालमत्ताकराच्या थकबाकीच्या संदर्भात वस्तूस्थिती मांडली आहे. औरंगाबाद शहरात शासकीय कार्यालयांची संख्या ३८१ आहे. त्यांच्याकडे १६ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकलेला आहे. सोळा कोटींपैकी दोन कोटी रुपये महापालिकेला मिळाले आहेत. मोबाइल टॉवर्सची संख्या ४२० असून त्यांच्याकडे दहा कोटी रुपये थकलेले आहेत. ३२९ शैक्षणिक संस्थांकडे १३ कोटी रुपये थकबाकी आहे. २०४ न्यायालयीन प्रकरणे असून त्यात ३१ कोटी रुपये अडकले आहेत. अशा एकूण १३३४ मालमत्ताधारकांकडे ६५ कोटी रुपयांची थकबाकी आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. शासकीय कार्यालयांना त्यांच्याकडील थकबाकीच्या संदर्भात कळविण्यात आले आहे. त्यांनी तात्काळ कर भरावा अशी सूचना महापालिकेतर्फे करण्यात आली आहे. मोबाइल टॉवर्सच्या कंपनींना देखील कर भरण्यासाठी आदेश देण्यात आला आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी पथकांची स्थापना केली जाणार आहे. मार्च महिना संपलेला असला तरी वसुलीचे काम तेवढ्याच गांभीर्याने केले जाणार आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान मार्च अखेरपर्यंत ८९ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे. मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दीष्ट १३० कोटी रुपयांचे होते. थकबाकीसह या उद्दीष्टाचा आकडा २९० कोटींच्या घरात पोचला होता. कर वसुलीला मिळत असलेला अल्प प्रतिसाद लक्षात घेऊन महापालिकेच्या प्रशासनाने सुधारित उद्दीष्ट निश्चित केले व मार्च अखेरपर्यंत शंभर कोटी रुपये मालमत्ता कराच्या माध्यमातून मिळवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली, उद्दीष्ट घटवूनही फक्त ८९ कोटी रुपयांचीच वसुली होऊ शकली आहे.

३८१ शासकीय कार्यालये - १६ कोटींची थकबाकी

४२० मोबाइल टॉवर्स - १० कोटींची थकबाकी

२०४ न्यायालयीन प्रकरणे - ३१ कोटींची थकबाकी

मालमत्ता कर वसुलीचे सुधारित उद्दीष्ट - १०० कोटी रुपये

मालमत्ता कराची प्रत्यक्ष वसुली - ८९ कोटी रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदामांवर सीसीटीव्हीची नजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्वस्त धान्य योजनेतील धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सरकारी गोदामांवर आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार अाहेत.
सरकारी गोदामांमधून रेशनच्या धान्याचा काळाबाजार होत असल्याची प्रकरणे गेल्या काही दिवसांत समोर आली आहेत. यामुळे दुकानांवर किती पोती धान्य येते; तसेच कोणात्या गाडीमधून किती पोती रेशन दुकानांवर पाठविण्यात येतात यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वॉच ठेवण्यात येणार आहे. शहर व जिल्ह्यातील सर्व सरकारी गोदामांवर सीसीटीव्ही लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.निधी पांडेय यांनी दिली.
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून प्रत्येक जिल्ह्याला रेशनिंग व्यवस्थेंतर्गत वाटप करण्यासाठी धान्यपुरवठा केला जातो. हे धान्य साठविण्यासाठी शहर व तालुकास्तरावर सरकारी गोदामे बांधण्यात आलेली आहेत. या गोदामावर धान्य घेवून आलेला ट्रकमधील धान्याची पोती उतरवून साठवली जातात. दर महिन्याला हे धान्य गोदामात येते. अन्नधान्य वितरण कार्यालय व तहसील कार्यालयामार्फत रेशन दुकानदारांकडून चलान भरून घेऊन धान्य उचलण्याचा परवाना दिला जातो. रेशन दुकानदारांमार्फत गोदामातून धान्याची उचल केली जाते. रेशन दुकानदार गोदामातून धान्य उचल करून दुकानावर नेतात व विक्री करतात, मात्र अनेकदा गोदामतून उचललेला माल रेशन दुकानांवर नेला जात नाही. त्या धान्याची परस्पर विक्री करण्यात येते. या काळ्याबाजाराला आळा घालण्यासाठी सरकारी गोदामावर सीसीटीव्ही लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

असा होईल उपयोग
सरकारी गोदामातून नियमित धान्याची उचल करण्यात येते, मात्र अनेकदा हा माल बाजारात विक्री करण्यात येत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गोदामांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास गोदामावर कोणत्या वाहनांतून किती माल आला, कोणत्या वाहनातून किती माल गेला, ‌गोदामात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हालचाली कोणत्या अधिकाऱ्याने गोदामाला भेट दिली आदी माहिती सीसीटीव्हीच्या माध्यमातून मिळणे शक्य होणार आहे.

प्रत्येक गोदामावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय रेशन दुकानदारांसाठी योग्य आहे, मात्र जेथे धान्य पोत्यांचे वजन करण्यात येते, तेथील चित्रिकरणही केले जावे. त्यामुळे रेशन दुकानदारांना योग्य वजन करून धान्य मिळेल.
- डी. एन. पाटील, अध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार संघटना महासंघ.

- औरंगाबाद जिल्ह्यातील गोदामे ः १३
- जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकाने ः १८००
- शहरातील स्वस्त धान्य दुकाने ः १९९
- स्वस्त धान्य दुकानांचे लाभार्थी ः ७६६११८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपघातमुक्तीसाठी 'सर्व्हिस रोड' अावश्‍यक

$
0
0

अपघातमुक्तीसाठी 'सर्व्हिस रोड' अावश्‍यक

बीड बायपासवरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनासमोर आव्हान

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः

बीड बायपास रोडवरील अपघात कमी करण्यासाठी ‌सर्व्हिस रोडची अत्यंत आवश्यकता आहे. या रस्‍त्यावर अपवादात्मक एखादे ठिकाण वगळता अन्य कोणत्याही ठिकाणी सर्व्हिस रोडसाठी जागा सोडण्यात आलेले नाही. सातारा ग्रामपंचायत किंवा देवळाई ग्रामपंचायतकडून परवानगी घेऊन अनेक इमारती या रस्‍त्यांवर बांधण्यात आल्या आहेत. आता ‌सर्व्हिस रोड करण्यासाठी या इमारतींसमोरील पार्किंग तसेच काही इमारतीचा भाग हटवावा लागणार आहे. याशिवाय काही ठिकाणी रस्‍त्यावर थाटलेली दुकानेही हटवावी लागण्याची शक्यता आहे. ‌सर्व्हिस रोडसारखी अवघड शस्‍त्रक्रिया करून अपघातमुक्त बीड बायपास रोड करण्याची अवघड परीक्षा देण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

बीड बायपास रोडचे काम नॅशनल हायवे अथॉरिटीच्या माध्यमातून केले जाणार आहे. प्रस्तावित रस्ता तयार करण्यासाठी स्‍थानिकांना सातारा आणि देवळाईकडे जाण्यासाठी सर्व्हिस रोडची आवश्यकता पडणार आहे. बीड बायपास रोडवर सध्या अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. बीड बायपास अपघात मुक्त करण्यासाठी सर्व्हिस रोड आवश्यक आहेत. सातारा, देवळाई, सातारा तांडा तसेच अन्य नागरी वसाहत खूप वाढली आहे. सातारासह देवळाई भागात राहणाऱ्यांना बीड बायपास रोड क्रॉस करून दररोजच जावे लागते. जड वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे स्‍थानिक रहिवाशांसाठी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. यामुळे या रस्‍त्यालगत दोन्ही बाजुंनी सर्व्हिस रोड करण्याची मागणी सातारा वासियांनी केली आहे. बीड बायपास रोडवर सध्या महानुभव आश्रम ते देवळाई चौक या दरम्यान पाच किलोमीटरच्या मार्गावर एमआयटी कॉलेज समोरील अथर्व क्लासिक अपार्टमेंट समोरून हा सर्व्हिस रोड सुरू होतो. हा रस्ता काही अंतरापर्यंत आहे. त्यानंतर हा रस्ताही अडविण्यात आला आहे. मात्र, हा सर्व्हिस रोड थेट उड्डाणपुलापर्यंतही जात नाही.

बीड बायपास रस्‍त्याला सर्व्हिस रोड नसल्याने वाहनधारकांना राँग साइडने प्रवास करावा लागतो.

दोन दिवसांपूर्वी कमलनयन बजाज हॉस्पिटल येथून निघालेल्या दांपत्यांचाही या रस्‍त्यावर अपघात झाल्याची घटना घडली. महानुभाव आश्रम ते एमआयटीपर्यंत सर्व्हिस रोड नाही. अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानाची प‌ार्किंग रस्त्यांवर करून ठेवली आहे. एमआयटी कॉलेज ते रेणुका माता मंदिरापर्यंत एमएच२० हॉटेलच्या बाजुला सर्व्हिस रोड नाही. या ठिकाणीही अनेकांची दुकाने तसेच गाड्या रस्‍त्यावर लावण्यात येत आहेत. यामुळे वाहतुकीला अडचणी निर्माण होत आहेत. कमलनयन बजात ते पटेल लॉन्सकडे जाणाऱ्या रस्‍त्यावर ठिकठिकाणी मोठी वाहने उभी असतात. तसेच या ठिकाणी अनेक दुकाने रस्‍त्यावर आलेली आहेत. हॉटेल, तसेच लॉन्सच्या गाड्यांसह शो रूमला आलेल्या ग्राहकांच्या गाड्याही रस्‍त्यावर उभ्या असतात. यामुळे रस्ता अरूंद झालेला आहे. या ठिकाणी अपघाताची शक्यता जास्त आहे. याबाबत अनेकदा पोलिस आयुक्तांनी आदेश देऊनही रस्‍त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आलेली नाही.

देवळाई चौकात शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगवरून देवळाईकडे जाणारी वाहने येतात. या चौकात महानुभव चौक‌ाकडून वेगात येणाऱ्या वाहनांमुळे रस्ता क्रॉस करणे अवघड झाले आहे. याशिवाय सूर्या लॉन्सकडून शिवाजीनगरकडे जात असलेल्या वाहनांनाही रस्ता क्रॉस करण्यासाठी अडचण येते. झाल्टा फाट्याकडून महानुभव चौकाकडे वेगात जाणाऱ्या वाहनांकडे लक्ष देत या चौकातून जावे लागत आहे. याशिवाय देवळाई चौक ते शिवाजीनगर भागाकडे जाताना रस्ता क्रॉस करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे हा अपघातमुक्त चौक ब‌नविण्यासाठी दोन्ही बाजुने सर्व्हिस रोड अत्यंत आवश्यक आहे.

सर्व्हिस रोड करण्यासाठी अनेक अतिक्रमणे हटवावी लागणार आहेत. शिवाय काही मोठ्या इमारतींच्या पार्किंग रस्‍त्यावर करून रस्ता बंद करण्यात आला आहे. त्याही मोकळ्या कराव्या लागणार आहेत. सर्व्हिस रोड झाल्यानंतर या रस्‍त्यावर होणारे अपघातही कमी होतील, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.

पोलिस आयुक्तांचेही प्रयत्न सुरू

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बीड बायपास अपघातमुक्त करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी संबंधित विभागाला आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अतिक्रमण हटविणे, रस्‍त्यावर उभ्या असलेल्या गाड्या हटविणे, असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी आतापर्यंत करण्यात आलेली नाही. त्याकडे पोलिसांना लक्ष द्यावे लागेल.

असे झाले आहेत अपघात

महानुभव चौक ते देवळाई चौक या ५ किलोमीटरच्‍या अंतरात बीड बायपास रोडने एका तपात अपघातात ६४ जणांचे बळी घेतले आहेत. त्यात एमआयटी चौक सर्वात जास्‍त धोकादायक असून तेथे ११ जणांना जीव गमवावा लागला. तर त्याखालोखाल देवळाई चौकात ६ जणांना जीव गमवावा लागला. रेणुका माता कमानीसमोर आतापर्यंत ४ जणांचे प्राण गेले आहेत. तसेच उड्डाणपुलासमोरील चौकात तीन वर्षीय चिमुकलीचा जीव गेला आहे. काही दिवसांपूर्वी एका पती पत्नीलाही या रस्‍त्यावर झालेल्या अपघातात गमवावा लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅरिबॅग विक्रेत्यांवर महापालिकेचे छापे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन कक्षाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कॅरिबॅग विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या पाच व्यापाऱ्यांच्या दुकानांवर छापे टाकून सुमारे अर्धा ट्रक कॅरिबॅग जप्त केल्या. या व्यापाऱ्यांकडून १ लाख १२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शहराच्या मोतीकारंजा भागात कॅरिबॅग विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. शासनाने २० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅग वापरण्यावर बंदी घातली आहे. शासनाची बंदी असतानाही या दुकानांमधून या कॅरिबॅगची सर्रास विक्री करण्यात येत होती. आठ महिन्यांपूर्वी महापालिकेने कॅरिबॅग विक्रेत्यांवर कठोर कारवाई करीत कमी जाडीच्या कॅरीबॅग विक्रीवर अंकुश ठेवला होता. त्यानंतर आता पुन्हा कमी जाडीच्या बॅग विकल्या जात असल्याची माहिती मिळाल्यावर घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे गुरुवारी कारवाई करण्यात आली. मोतीकारंजा भागात कॅरिबॅग विक्री करणारे पाच मोठे व्यापारी आहेत. त्यांच्या दुकानावर छापे टाकून कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या. ही कारवाई घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख, उपायुक्त विक्रम मांडुरके, घनकचरा व्यवस्थापक प्रमोद खोब्रागडे, स्वच्छता निरीक्षक सचिन भालेराव, विशाल खरात, उमेश खरात, लियाकत अली व झोन अधिकारी सुरे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबंदीचा विक्रीकरावर परिणाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विक्रीकर विभागाला गेल्यावर्षीच्या तुलनेते सुमारे ५० कोटी रुपये अधिक महसूल प्राप्त झाला असला, तरी दिलेल्या उद्दिष्ट्यापर्यंत विभागाला पोचता आले नाही. नोटाबंदीनंतर उलाढाल कमी झाल्याचा परिणाम विक्रीकर वसुलीवर झाला आहे. विक्रीकर वसुलीत सुमारे ३४० कोटी ६६ लाख रुपयांची घट झाली आहे. यावर्षी ऑटोमोबाइल क्षेत्रातून ६२ कोटी ३१ लाख, तर मद्यनिर्मिती क्षेत्रातून ९ कोटी १८ लाख रुपयांचा कर कमी मिळाला.
नोटाबंदीमुळे दुचाकी वाहन विक्रीवर मोठा परिणाम झाल्याचे विक्रीकर वसुलीच्या आकडेवारीवरून समोर येत आहे. दुचाकी निर्मिती करणारी बजाज कंपनी व त्यांच्या व्हेंडर कंपनीकडून अपेक्षित विक्रीकरामध्ये यंदा ८५ कोटी रुपयांची घट झाली. स्कोडा कंपनीकडून २३९ कोटी रुपये अपेक्षित होते, पण प्रत्यक्षात १८६ कोटी रुपये विक्रीकराच्या माध्यमातून मिळाले. गेल्यावर्षीच्या तुलनेते ३३ कोटी रुपये कमी मिळाले.
विक्रीकर विभागांतर्गत औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. विभागात ३५ हजार २६४ विक्रीकरदाते आहेत. एप्रिल २०१६ ते मार्च १७ या वर्षासाठी २ हजार ८९० कोटी ७६ लाख रुपये विक्रीकर गोळा होईल, असे अपेक्षित होते. प्रत्यक्षात २ हजार ५५० कोटी १० लाख रुपये कर प्राप्त झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेते ५० कोटी ८ लाख रुपये अधिक महसूल गोळा झाला. तडजोडसाठी ७२२ अर्ज प्राप्त झाले होते. यातून ५२ कोटी ५० लाख रुपये विभागाला मिळाले. व्यवसाय करासाठी वर्षभरात साडेतीन हजार नवीन नोंदणी झाली असून, साडेतीन कोटी रुपयांचा कर मिळाला आहे. यंदा टीडीएस, टीसीएसच्या माध्यमातून २९ कोटी ३८ लाख रुपये प्राप्त झाले. गेल्या वर्षी यामाध्यमातून २७ कोटी ३१ लाख रुपये मिळाले होते.

कॅश आणि कॅशलेस कर भरणा
विभागाला ई पेमेंटच्या माध्यमातून २ हजार ४१३ कोटी ५७ लाख रुपये, तर रोख स्वरुपात १३६ कोटी ५३ लाख रुपये प्राप्त झाले.

विविध क्षेत्रांत विक्रीमध्ये घट झाल्याचे दिसते. त्यांची वेगवेगळी कारणे असू शकतात. विक्रीकरातून गेल्या वर्षीपेक्षा ५० कोटी रुपये अधिक मिळाले, पण १६ टक्के वाढ गृहित धरता दिलेल्या उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही, मात्र टीडीएस, टीसीएसमध्ये वाढ झाली आहे.
- डी. एम. मुगळीकर, विक्रीकर सह आयुक्त.

विविध क्षेत्रातून आलेला विक्रीकर
क्षेत्र..................रक्कम (कोटीत)
ऑटोमोबाइल..............७५२.८४
मद्य निर्मिती.................४९४.४८
प्लास्टिक....................२१.७२
साखर........................७.५३
अभियांत्रिकचे साहित्य..१४.२७
कागद........................२.२४
कंत्राटदारांकडील कामे...४.१७
घरगुती उत्पादने..........१९.९२
सिमेंट........................१.७९
औषधी.......................१७.१९
कापूस........................१७.२३
मशनरी......................२१.५४
विद्युत उपकरणए........११५.०८
स्टील.........................११४.५३
इतर...........................९८.८२
चहापत्ती......................९.७३
(मार्च २०१७अखेरपर्यंत, कर कोटी रुपयांत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा संकलन, पथदिव्याची दुरुस्ती सुरू

$
0
0

कचरा संकलन, पथदिव्याची दुरुस्ती सुरू

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रतापनगर परिसरातील पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. तसेच परिसरातील कचरा संकलनासाठी घंटागाडीही गेल्या दोन दिवसांपासून येऊ लागल्याचे नागरिकांनी सांगितले. गुरुवारच्या अंकात मटाने ‘प्रतापनगर नागरी सुविधांच्या विळख्यात’ या शिर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत महापालिकेने ही कार्यवाही सुरू केल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

उस्मानपुरा परिसरात प्रतापनगरसह कासलीवालनगर, प्रशांतनगर, सूरज पार्क यासह अनेक छोट्या मोठ्या कॉलनी आहेत. उच्चभ्रू, मध्यमवर्गीय लोकांची वसाहत असलेल्या या भागात नोकरदार, व्यापारी, व्यवसायिक मंडळी मोठ्या प्रमाणात राहतात. नाही म्हणायला ड्रेनेज, पाणी पुरवठा आदी सोयी सुविधा या परिसरात मिळत आहेत. तरी अन्य वॉर्डांच्या तुलनेत या भागातील विकासकामांकडे दुर्लक्ष केले जाते, अशी नागरिकांची ओरड आहे. अंतर्गत रस्ते खड्डेमय झाले असून स्मशानभूमी रोड हा खड्ड्यांमुळे तसेच नाल्यावर कठडे नसल्याने धोकादायक झाला आहे. परिसरातील अनेक पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. त्यात प्रतापनगर शेजारील भूखंडावर रात्रीच्या वेळी गुंडाचे राज्य असते. बिनधास्तपणे नशेबाजी केली जाते. पथदिवे बंद असल्याने त्यात अधिकच भर पडते. कचरा संकलन नियमित होत नाही, यासह अन्य नागरी प्रश्नांवर मटाने प्रकाश टाकला. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने नागरी समस्या सोडविण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे.

गेले अनेक दिवस न दिसणाऱ्या घंटागाडीने गुरुवारपासून नागरिकांना दर्शन दिले आहे. घर, इमारतीसमोरील पेटीत असलेला कचराही स्वच्छता कर्मचारी उचलून नेत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

पथदिव्याची दुरुस्ती

पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी असुरक्षित वाटत होते, पण मटामध्ये वृत्त प्रसिद्ध होताच मनपाने पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. परिसरातील प्रत्येक पथदिव्याची पाहणी करत आवश्यक दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. त्यापैकी अनेक बंद असलेले दिवे आता पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

मटाने प्रतापनगर परिसरातील नागरी समस्यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध करताच महापालिकेने कार्यवाही करत पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. कचरा संकलनासाठी घंटागाडीही नियमित येऊ लागली. अंतर्गत रस्ते व अन्य प्रश्नही महापालिकेने तातडीने निकाली काढावेत, हीच अपेक्षा. मटाने आमच्या लढ्याला वाचा फोडली.

संदीप कुलकर्णी, कार्यकर्ते, आमची संस्कृती प्रतिष्ठाण

पथदिवे दुरुस्तीचे काम सुरू झाले ही खूप चांगली बाब आहे. अनेक पथदिवे नादुरुस्त असल्याने रात्रीच्या वेळी येणाऱ्या नागरिकांना त्रास होत असे.

डॉ. अपेक्षा फुलगीरकर, नागरिक

वॉर्डातील विकासकामे प्राधान्याने सोडविण्यासाठी नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा देता याव्यात, यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.

शोभा बुरांडे, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीत ५८ नव्हे फक्त ४५ रक्षक !

$
0
0

घाटीत ५८ नव्हे फक्त ४५ रक्षक !
१३ महिला रक्षकांसाठी वाट पाहावी लागणार तब्बल अडीच महिने
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळा’मार्फत करण्यात आलेल्या ‘सिक्युरिटी ऑडिट’नुसार घाटीच्या सुरक्षेसाठी किमान १३४ सुरक्षा रक्षकांची गरज असताना गरजेच्या केवळ ४०-४२ टक्के म्हणजेच केवळ ५८ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. प्रत्यक्षात ५ एप्रिल रोजी केवळ ४५ रक्षक कामावर रुजू झाले आणि उर्वरित १३ रक्षकांची अजूनही प्रतीक्षा आहे. त्याचवेळी उर्वरित १३ महिला रक्षकांसाठी किमान अडीच महिने आणखी वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार शासकीय मेडिकल कॉलेजांची सुरक्षा वाढवण्यात आली. त्याचाच भाग म्हणून अलीकडे राज्यातील १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ५८४ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आणि यापैकी ४५ सुरक्षा रक्षक ५ एप्रिल घाटी रुग्णालयामध्ये रुजू झाले. अर्थात, घाटी रुग्णालयामध्ये रुजू झालेल्या रक्षकांमध्ये एकही महिला रक्षक नसून रुग्णालयाच्या गरजेनुसार उर्वरित १३ सुरक्षा रक्षक या महिलाच असतील आणि हे महिला रक्षक काही दिवसांत रुजू होतील, असे सुरक्षा महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत एकही महिला रक्षक कामावर रुजू झालेली नाही.
प्रशिक्षणासाठी लागणार दोन महिने
सुरक्षा महामंडळाकडे सद्यस्थितीत एकही प्रशिक्षित महिला रक्षक उपलब्ध नाही. त्यामुळे महामंडळातील अप्रशिक्षित महिला रक्षकांना एक मे पासून दोन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार असून, प्रशिक्षणानंतर जुलैमध्ये महिला सुरक्षा रक्षक उपलब्ध होऊ शकतील, असेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे किमान अडीच महिने महिला रक्षकांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत ४१ रक्षक ८ तासांच्या ३ पाळ्यामध्ये कार्यरत असून, ४ प्रमुख सुरक्षा रक्षकांवर प्रत्येक पाळीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images