Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

झाडांची कत्तल थांबवा; सर्व्हिस रोड करा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रूंदीकरणाच्या नावाखाली रस्त्यालगत असलेल्या सुमारे १७५ झाडांची कत्तल न करता त्याऐवजी सर्व्हिस रोडच्या धर्तीवर रूंदीकरण करावे, अशी मागणी इको नीडस् फाऊंडेशनने केली आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
औरंगाबाद-पैठण रोड हा सर्वात वर्दळीचा रस्ता आहे. वाहनांची संख्या जास्त व रस्ता अरुंद असल्याने या रस्त्यावरील महानुभाव आश्रम चौक ते वाल्मी यादरम्यान रस्ता रूंदीकरण करण्याचे नियोजन संबंधित विभागाने हाती घेतले. मात्र, या रूंदीकरणामुळे रस्त्यालगत असलेले सुमारे १७५ जुने वृक्ष अडथळा ठरत असून ते हटविण्यात येण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर ही वृक्ष वाचविण्यासाठी इको नीडस् फाऊंडेशनच्या अध्यक्षा मनिषा जाघन, सचिव रोहित थोरात, अत्तदीप आगळे, अॅड. विनय सरवदे, अॅड. नीलेश दंदे यांनी पुढाकार घेतला आहे.
रूंदीकरणासाठी वृक्षांची कत्तल चुकीचे ठरेल. त्याऐवजी हे रूंदीकरण सर्व्हिसरोडच्या धर्तीवर करावे, तांत्रिकदृष्ट्या ते शक्य आहे, त्यामुळे वृक्षाचे संवर्धन होईल, असा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. ही झाडे रस्त्याच्या दुभाजक क्षेत्रात घेऊन दुभाजकांच्या दोन्ही बाजूने रुंदीकरण करावे, अशी मागणी करत अशा पद्धतीने रस्ता रुंदीकरणाचा आराखडा फाऊंडेशनकडे तयार असल्याचे सांगितले.
या झाडांचे अन्यत्र पुनर्रोपण प्रस्तावित असेल तर सर्व कायदे, निर्देशांचे पालन करूनच पुढील कारवाई व्हावी, कोणत्या पद्धतीने व प्रक्रियेने वृक्ष पुनर्रोपन केले जाईल, त्याची माहिती जनतेला व्यापक स्वरुपात द्यावी यासह अन्य मागण्या फाऊंडेशनने केल्या आहेत.

नागरिकांनी पुढाकार घ्यावा
पैठण रोडवरील झाडे जुनी व मोठी आहेत. ही झाडांची कत्तल नसून मानवी पिढीच्या भविष्याची कत्तल होईल. त्यामुळेच वृक्ष कत्तल थांबविण्यासाठी नागरिकांनी या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन फाऊंडेशन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुस्लिम-मराठी साहित्य संमेलन पनवेलमध्ये

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘पनवेल येथे १९ ते २१ एप्र‌िलच्या दरम्यान आयोजित अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गझलकार प्राचार्या बीबी फातिमा म‌ुजावर यांची निवड करण्यात आली आहे,’ अशी माहिती मुस्लिम मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांनी सोमवारी (१७ एप्रिल) दिली.
डॉ. मिन्ने म्हणाले, ‘संमेलनासाठी राज्यभरातून आणि बाहेरून सुमारे दीड हजार मुस्लिम मराठी साहित्यिक, अभ्यासक, संशोधक, रसिक सहभागी होणार आहेत. औरंगाबादहून या संमेलनाला ६० जण जाणार आहेत. मुस्लिम मराठी साहित्य चळवळ ही केवळ चळवळ नसून मुस्लिम मराठी साहित्यिकांची अस्मिता आहे. ही चळवळ संघटित होऊन २५वर्षांहून अधिक काळ लोटला. यंदाचे हे अकरावे संमेलन आहे. या संमेलनात दोन मुस्लिम महिलांनाही अध्यक्षपद मिळाले आहे. मात्र, मुस्लिम मराठी साहित्यिकांकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही आहे. सोलापूर, नागपूर, रत्नागिरी, पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, सांगली, जळगाव या ठिकाणी या आधी हे संमेलन झाले. या संमेलनात कविसंमेलन, परिसंवाद, महापरिसंवाद होणार आहे,’ असे ते म्हणाले. यावेळी सुभाष लोमटे, अण्णासाहेब खंदारे, शेख जानिमिया, शेख सौदागर, लियाकत अली पटेल, विलास सोनवणे व नियोजित अध्यक्ष प्राचार्या बीबी फातिमा मुजावर उपस्थित होत्या.

अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनासाठी आजपर्यंत एकदाही सरकारी अनुदान घेतले नाही. हे संमेलन साहित्यप्रेमींच्या अनुदानावर भरत असते. रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. - डॉ. शेख इक्बाल मिन्ने, राष्ट्रीय अध्यक्ष, मुस्लिम मराठी साहित्य संस्कृती मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...‘त्या’ अंध भावंडांना मिळाला दिलासा

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अंध आई, भाऊ, बहिणींनी उदर निर्वाहाचे साधन नसल्याने विकायला काढलेल्या घरात ५० टक्के वाटा मागणाऱ्या वकील मुलाने अखेर सोमवारी (१७ एप्रिल) महिला लोकशाही दिनी माघार घेत संपत्तीचा समान वाटा घेणार असे पोलिस आयुक्तालयामध्ये लिहून दिले. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने या प्रकरणाला वाचा फोडली होती.
जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या गेल्या महिन्यातील लोकशाही दिनी विभागाकडे अंध भावाबहिणीने आपल्या डोळस भावाविरुद्ध तक्रार दिली होती. ‘वकिलाकडून अंध भावंडाचा छळ,’ या आशयाचे वृत्त मटाने २३ मार्चला ‘मटा’ने प्रकाशित केले होते. अंतर्गत वाद असल्याने लोकशाही दिनी ही तक्रार घेता येत नव्हती. तरी महिला तक्रार करायला आल्याने या प्रकरणाची दखल घेत ‌हे प्रकरण पोलिस आयुक्तलयातील महिला तक्रार निवारण केंद्रामध्ये वर्ग करण्यात आले. नेत्रहीन असलेली ४६ वर्षांची महिला व तिचा ४० वर्षांचा दृष्टीबाधित भावाने भावाविरुद्धच तक्रार केली होती. वडील हयात असताना त्यांचा प्रकाशनाचा व्यवसाय तेजित होता. त्यांचा मोठा भाऊ डोळस व व्यवसायाने व‌कील आहे. वडिलांची साथ असल्याने इतक्या वर्षांमध्ये दोघांनीही अपंगत्वाचे प्रमाणपत्रही घेतले नव्हते. २०१४मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर व्यवसायाला घरघर लागली. त्या भावानेही जबाबदारी घेणे टाळले. त्यामुळे आई व या भावंडांना घर विकण्याशिवाय पर्याय नव्हता. पीआर कार्डनुसार घर विक्रीतून येणाऱ्या रकमेत प्रत्येकाचा २५ टक्के अर्थात समान वाटा आहे, पण तोंडी कबुली देऊनही प्रत्यक्षात घर विक्रीच्या वेळी मला ५० टक्के वाटा हवा म्हणून मोठ्या भावाने आडकाठी केली. ही फिर्याद नोंदवल्यावर महिला तक्रार निवारण केंद्राच्या मध्यस्थीने अंध भावा-बहिणीला मी समान हक्क देईन असे त्या भावाने लेखी लिहून दिले. यामुळे या भावंडांना मोठा दिलासा मिळाला आहे.

...अन् दबाव वाढला!
स्वतः कमावता असूनही आपल्या अंध भावडांची जबाबदारी झटकून त्यांना त्रास देणाऱ्या वकिलाची मग्रुरी आणि अंध भावंडाचे हाल ‘मटा’ने मांडले होते. त्यामुळे एक दबाव निर्माण झाला. आणि महिला लोकशाही दिनाच्या तक्रारीत हे प्रकरण न बसताही त्यातून मार्ग निघाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पीडितांना मनोधैर्य लाभ नाही

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मनोधैर्य योजनेचा लाभ मिळणे हा प‌ीडितेचा हक्क आहे. मात्र, प्रत्येक वेळी तिलाच लाचारी पत्करून योजनेसाठी अर्ज करावा लागतो. आलेल्या प्रसंगातून बाहेर पडून पुनर्वसन करण्यास मदत करण्याऐवजी प्रशासकीय यंत्रणाच पीडितेला तिच्या हक्कापासून वंचित ठेवते, असा सवाल एका सामाजिक कार्यकर्त्याने सोमवारी (१७ एप्रिल) महिला लोकशाही दिनी विचारला.
‌शहरातील अल्पवयीन पीडितेची तक्रार घेऊन आलेले एक सामाजिक कार्यकर्ते व तिच्या नातेवाईकांनी मनोधैर्य योजनेच्या अंमलबजावणीवरच सवाल उपस्थित केला. खोकडपुरा भागातील एका चौदा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना १० एप्रिलला घडली. या प्रकरणातील आरोपी पसार असून त्याच्यावर बलात्कार, अप‌हरण तसेच बाललैंगिक अत्याचाराचे कलम लावण्यात आले. या पीडितेला मनोधैर्य योजनेअंतर्गत लाभ मिळावा यासाठी अर्ज करण्यात आला होता, पण तिला अजून निधी मिळाला नाही.
‘मटा’शी बोलताना तक्रारकर्त्याने सांगितले की, ‘मनोधैर्य योजनेचा लाभ पीडितेला १५ दिवसांच्या आत मिळावा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले. मात्र, अद्यापही पीडितांना महिनोनमहिने निधी मिळत नाही. माहितीच्या अधिकाराखाली प्राप्त झालेल्या माहितीनुसार राज्यातील मनोधैर्यच्या ९९१ प्रकरणातील ३२६ पीडिता बेपत्ता असून ५४३ पीडितांचे बॅँकेत खाते नसल्याने त्यांना निधी मिळायला कित्येक महिन्यांचा कालावधी गेला. योजनेस बरेचवेळा निधी उपलब्ध होत नाही. स्वतःवर इतका मोठा प्रसंग उद्भवल्यावर पीडिता आपल्या मूळ ठिकाणी राहिलच याची शाश्वती कशी देता येईल. बदनामीमुळे अनेकींना घर सोडून जावे लागते. पीडितेच्या पुनर्वसनासाठी वित्तीय सहाय्य देण्यासोबतच समुपदेशन, निवारा, वैद्यकीय व कायदेशीर मदत आदी आधारसेवा तत्परतेने उपलब्ध करून द्यावात असेही नमूद करण्यात आले आहे, पण इतर मदत मिळत नाहीच. शिवाय शहरामध्ये ट्रामा टीम कुठे आहेत याविषयी माहिती नाही. अशा परिस्थितीमध्ये जिल्हा महिला व बालविकास व पोलिस प्रशासनामध्येही आपसात समन्वय नसतो,’ असेही त्यांनी सांगितले.

पोलिसच कारवाई करत नाही
बापूनगर, बहादुरपुरा, जरीपुरा, खोकडपुरा या भागामध्ये सराईत गुन्हेगारांमुळे मुली व महिलांना प्रचंड त्रास होतो. परिसरातील मोकळ्या जागा, बौद्धविहार, सार्वजनिक सभागृहांमध्ये अगदी दिवसासुद्धा छेडछाडीचे प्रकार घडतात. अवैध दारू व गांजा विक्री होते. पोलिसांमार्फत ठोस कारवाई होत नसल्याने असे प्रसंग वारंवार घडतात. आरोपींच्या दहशतीमुळे तक्रारी नोंदवल्या जात नाहीत. मध्यंतरी तक्रार केल्यावर काही दिवस परिस्थिती नियंत्रणात होती, पण पुन्हा परिस्थिती जैसे थी झाली. राजकीय हस्तक्षेपामुळेही गुन्हेगारांना अभय मिळत असून याही प्रकरणामध्ये गुन्हेगाराला वाचवण्यासाठी एका खासदारांचे स्वीय सहाय्यक पोलिस स्टेशनमध्ये आले होते. अनेकदा पोलिसच गुन्हेगारांना पाठीशी घालतात, अशीही तक्रार अर्जदारांनी पोलिस आयुक्तालयाच्या कर्मचाऱ्यांसमोरच केली.

...अशी मिळते मदत
मनोधैर्य योजनेअंतर्गत बालकांवरील लैंगिक अत्याचार - २ ते ३ लाख, बलात्कारासाठी २ ते ३ लाख, अॅसिड हल्ल्यात चेहरा विद्रुप होणे, कायम अपंगत्व आल्यास ३ लाख व अॅ‌सिड हल्ल्यात जखमी झाल्यास ५० हजारांपर्यंत मदत मिळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिद्धेश्वर कारखान्याची २१ मे रोजी निवडणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
संपूर्ण सिल्लोड तालुक्याचे लक्ष लागलेल्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. कारखान्यासाठी २१ मे रोजी मतदान होणार आहे.
जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार १७ ते २१ एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करणे, अर्जांची छाननी २४ एप्रिल, यादी प्रसिद्धी २५ एप्रिल, उमेदवारी अर्ज मागे घेणे २५ एप्रिल ते ९ मे, चिन्ह वाटप ११ मे, मतदान २१ मे, मतमोजणी २२ मे असा कार्यक्रम आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आर. एस. शेख यांनी दिली. व्यक्ती उत्पादक सभासदानी निवडून द्यावयाचे प्रतिनिधी मतदार संघ पुढील प्रमाणेः शिवना गट क्रमांक १ मधून ३ प्रतिनिधी, घाटनांद्रा गट क्रमांक २ मधून ३, सिल्लोडमधून ३, निधोना ३, भोकरदनमधून ३, असे एकूण १५ प्रतिनिधींची निवड होणार आहे. सहकारी संस्था उत्पादक बिगर उत्पादक पणन मतदार संघातून १, अनुसूचित जाती जमाती राखीव मतदार संघ १, महिला राखीव मतदार संघ २, इतर मागास वर्ग मतदार संघ १, विमुक्त जाती-भटक्या जमाती-विशेष मागास प्रवर्ग राखीव मतदार संघ १, असे एकून २१ सभासद निवडून द्यायचे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिनेते जोशींनी केले गावांमध्ये श्रमदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांना सोमवारी मराठी चित्रपट अभिनेता जितेंद्र जोशी यांनी भेट दिली. त्यांनी याप्रसंगी गावकऱ्यांसोबत गप्पा मारल्या व स्वतः श्रमदान करून प्रोत्साहन दिले.
जोशी यांनी खुलताबाद तालुक्यातील तीसगाव तांडा, आखातवाडा, बोरवाडी व खिर्डी या गावांना भेटी दिल्या. ग्रामस्थांशी संवाद साधत श्रमदानातून काम करण्याचा उत्साह वाढवत ‘माती आडवा पाणी जिरवा’ हा संदेश दिला. दुष्काळ आणि पाणी या विषयावर चर्चा केली. श्रमदानातून सुरू असलेल्या जलसंधारणाचे काम बघून समाधान व्यक्त केले. यावेळी गावातील महिला, पुरुष, लहान थोर सर्वांनी भर उन्हात श्रमदान केले. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक यांच्यासह उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, तहसीलदार डॉ. अरूण जऱ्हाड, विभागीय समन्वयक इरफान शेख, तालुका समन्वयक सुनील शिंदे, नितेश आदमाने, सामाजिक प्रशिक्षक विकास झाल्टे, पाणलोट सेवक पोपट मेंगाळ, सुभाष कचरे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वऱ्हाडाचे वाहन उलटून २१ जण जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
फुलंब्री-निधोना मार्गावरील आडगाव नजिक वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून झालेल्या अपघातात २१ जण जखमी झाले. त्यांच्यापैकी १७ जणांवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले, तर चार जणांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले आहे. हा अपघात सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झाला.
कन्नड तालुक्यातील कोळंबी येथून औरंगाबाद तालुक्यातील नायगव्हाण येथे पिकअप व्हॅनमधून (एम. एच. १२ के. टी २९५१) वऱ्हाड जात होते. या वाहनात २५ ते २८ महिला-पुरूष होते. हे वाहन अाडगाव नजिक उलटले. वाहन उलटताच एकच गोंधळ उडला. रस्त्यांवरून जाणाऱ्या इतर वाहनांतील नागरिकांनी थांबून त्यांची सुटका केली. यातील जखमींना फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर औषधोपचार करून घरी पाठवण्यात आले. इतर चार गंभीर जखमींना औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात स्वप्निल जाधव (वय २५), गणेश आनंदराव जाधव (वय ४२), शाहरूख शाह (वय १५), दीपक एकनाथ जाधव (वय ४०), शालू कृष्णा जाधव (वय ४५), कलावती पंढरीनाथ जाधव (वय ६०), लताबाई अविनाश जाधव (वय ३५), नंदा जगदीश जाधव (वय ३५), आशुतोष जगदीश जाधव (वय १३), सौरभ गणेश जाधव (वय १५), संतोष जाधव (वय २८), रावसाहेब जाधव, रंजना जाधव (वय ५०, सर्व रा. कोळंबी), मीरा बाबासाहेब मते (वय ४०), बाबासाहेब त्रिंबक मते (वय ४५, दोघे रा. पोखरी), सोपान अण्णा जगदाळे (वय २४), अण्णा कडुबा जगदाळे (वय ६३) यांच्यावर फुलंब्री येथे उपचार करण्यात आले. या अपघाताची वडोदबाजार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

चालक जखमी
या पिकअप व्हॅनचे चालक रावसाहेब कचरू जाधव हे जखमी झाले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या शाळेत स्पोकन इंग्लिशचे वर्ग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उन्हाळ्याच्या सुटीत महापालिकांच्या शाळांमध्ये स्पोकन इंग्लिश, कम्प्युटर प्रशिक्षणाचे वर्ग सुरू करावेत, अशा सूचना आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिल्या. त्याचबरोबर इयत्ता नववीतून दहावी वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुटीतील वर्ग सुरू करण्यात आले आहेत.
महापालिकांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना इंग्रजी संभाषण करता यावे, त्यांना कम्प्युटरचे ज्ञान मिळावे या हेतूने महापालिका आयुक्तांनी प्रयत्न सुरू केले आहे. त्याचाच भाग म्हणून उन्हाळा सुट्यांमध्ये महापालिकेतील शाळांमध्ये स्पोकन इंग्लिश वर्ग घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर कम्प्युटर प्रशिक्षण वर्गही सुरू केले जाणार आहेत.
महापालिकेच्या एकूण ७० शाळा असून, सुमारे १६ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. नववीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी दहावी वर्गाच्या सुटीतील ता‌सिका वर्गही सोमवारपासून सुरू झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बीड बायपासवर जड वाहनांना बंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अपघात रोखण्यासाठी आता बीड बायपास रोडवर सकाळी सात ते रात्री नऊ या कालावधीत जड वाहनांना मंगळवारपासून प्रवेशबंदी करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतला आहे. यासंदर्भातील अधिसूचना सोमवारी जारी करण्यात आली. ही बंद सात दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आली आहे.
बीड बायपास रोडवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी अपघात रोखण्यासाठी काही उपाययोजना केल्या, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी अधिसूचना काढून बीड बायपासवर जड वाहनांना प्रवेशबंदी केली. बीड बायपास रोडवर सर्व प्रकारचे ट्रक, कंटेनर, हायवा आदी जड वाहनांना सकाळी सात ते रात्री नऊ या कालावधीत बंदी असेल. या निर्णयाची अंमलबजावणी १८ एप्रिल ते २४ एप्रिल यादरम्यान प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. अधिसूचनेबाबत काही हरकत किंवा आक्षेप असल्यास वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या कार्यालयत सात दिवसांत लेखी स्वरुपात किंवा ई-मेलद्वारे (acptraff.abad@mahapolice.gov.in) आपले म्हणणे सादर करावे. आक्षेप, हरकत घेणाऱ्या व्यक्तीने आपले पूर्ण नाव, पत्ता, व संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. या आदेशाच्या भंग करणाऱ्यांवर कलम १३१ व अन्य फौजदारी कायद्यान्वये कारवाई करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

जड वाहनांसाठी पर्याय
- बीडकडून येणारी वाहने नगर किंवा धुळ्याकडे जाण्यासाठी-येण्यासाठी पाचोड-पैठण रिंग रोडचा वापर करावा
- जालन्याकडून येणाऱ्या वाहनांनी धुळे किंवा नाशिककडे जाण्यासाठी पाचोड-पैठण रिंग रोड किंवा केम्ब्रिज-सावंगी-फुलंब्री-खुलताबाद-कसाबखेडा आदी मार्गाचा वापर करावा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवासी डॉक्टरांचा घसा कोरडाच

$
0
0

निवासी डॉक्टरांचा घसा कोरडाच

घाटीत वर्षानुवर्षे सुविधांपासून वंचित

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) वसतिगृहात राहणाऱ्या निवासी डॉक्टरांचेदेखील पदवीस्तरीय वैद्यकीय विद्यार्थ्यांप्रमाणेच पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. त्यातही घाटीच्या अपघात विभागाच्या वरच्या मजल्यावरील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहामध्ये सोयी-सुविधांच्या मोठ्या समस्या असून, याकडे घाटी प्रशासनाचे वर्षानुवर्षे दुर्लक्ष सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, राज्यातील सर्व १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहांची माहिती मुंबई हायकोर्टाने मागविली असून, २४ एप्रिलपर्यंत सर्व माहिती सचित्र दाखल करण्याचे आदेश ‘डीएमईआर’ने सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठातांना दिल्याचे समजते. मात्र त्यानंतरही घाटीतील ‘युजी’ तसेच ‘पीजी’ विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांमध्ये किमान सोयी-सुविधा पुरवण्याबाबत कुठलीही हालचाल सुरू झालेली दिसत नसल्याचे सोमवारी (१७ एप्रिल) स्पष्ट झाले. नवीन मेडिसिन बिल्डिंगच्या अलीकडे असलेल्या निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहामध्ये पिण्याची पाण्याची सुविधा काहीअंशी असली, तरी दोन आठवड्यात दोन-चार दिवस पाण्याचा थेंब नसल्याची स्थिती आवर्जुन येते आणि काही दिवसांपूर्वीच अशी स्थिती निवासींवर येऊन गेल्याचे सांगण्यात आले. अर्थात, याच वसतिगृहाच्या तिन्ही बाजुंनी घाण-अस्वच्छता असून, त्याची साफसफाई कधीच होत नाही आणि खिडक्या उघडल्या की घाणीचे ‘दर्शन’ व दुर्गंधीचे फटके सहन करण्याची वेळ प्रत्येकावर हमखास येते. तसेच अनेक खिडक्या व खिडक्यांच्या काचा तुटलेल्या-फुटलेल्या आहेत व अर्धे पार्किंग कोसळलेल्या स्थितीत उभे आहे आणि उर्वरित कधीही कोसळू शकते, अशी एकंदर स्थिती आहे. अपघात विभागावरील निवासींच्या आणखी एका वसतिगृहामध्ये तर सुविधांचा फार मोठा दुष्काळ कित्येक वर्षांपासून कायम आहे. पिण्याच्या पाण्याची कुठलीच सोय या वसतिगृहामध्ये नाही; शिवाय निम्मे बाथरुम-टॉयलेट एकतर नादुरुस्त किंवा पाण्याविनाच आहे. वॉश बेसिन आहेत, पण कोरडे आणि गिझर आहेत, पण कित्येक महिन्यांपासून बंद, अशी अनेक वर्षांपासूनची स्थिती सोमवारीदेखील (१७ एप्रिल) कायम होती. या वसतिगृहातील प्रत्येक निवासी डॉक्टरला पाणी विकत आणावे लागते, अशी खंतही निवासींनी बोलून दाखविली. ‘सीसीटीव्ही’ची गरज असताना कोणत्याच वसतिगृहात सोय नसल्याचे निवासींनी सांगितले. त्याचवेळी केवळ पदवीस्तरीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात रोज २५ खासगी पाण्याचे जार दिले जात असल्याचे ‘ऑक्सिफ्लो’चे दिपक गायकवाड यांनी सांगितले.

नवीन वसतिगृह कोणासाठी?

अडीचशेपेक्षा जास्त निवासी डॉक्टर असताना किमान ७० ते ८० निवासी डॉक्टरांना वसतिगृह उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. निवासींसाठी नवीन सुसज्ज वसतिगृह बांधण्यात आले असले तरी पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, फर्निचर नसल्याचे कारण देत ते कित्येक महिन्यांपासून निवासी डॉक्टरांना उपलब्ध करुन देण्यात येत नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलंब्री तालुक्यात अग्नितांडव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
तालुक्याताल शेवता खूर्द येथे शॉर्टसर्किटने घराशेजारील गोठ्याला आग लागून तीन बैल, चार शेळ्या भाजून मरण पावल्या. एक गाय, एक शेळी व शेळीचे दोन पिल्ले गंभीर भाजले आहेत. ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजता घडली. या आगीत संसारोपगोगी साहित्य खाक झाले. शेतकऱ्याचे अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील गेवराई गुंगी येथे तीन ठिकाणी आग लागून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेलगाव खुर्द येथील सोमीनाथ तुपे व दादाराव तुपे या दोन भावांचा गावापासून एक किलोमीटर अंतरावरील गट क्रमांक १२७ मध्ये घर व गोठा आहे. आठवडी बाजार असल्याने ते सकाळी जनावरांना चारा-पाणी करून वडोदबाजार येथे गेले गेले होते. दुपारी तीनच्या दरम्यान, घर व गोठ्यावरून गेलेल्या विद्युत तारांचे घर्षण होऊन पडलेल्या ठिणग्यांमुळे गोठ्याशेजारील चाऱ्याने पेट घेतला. त्यानंतर काही वेळातच आगीत गोठा सापडला. आग लागल्याचे शेजारील शेतकऱ्यांच्या लक्षात आले, ती विझवण्यासाठी त्यांनी धाव घेतली. शेजाऱ्यांनी मुलांना कसेबसे बाहेर काढले. गोठ्यासोबतच राहत्या घरांना लागलेली आग विझवण्यात आली. या आगीमध्ये जनावरांचा अक्षरश: कोळसा झाला. यामध्ये सोमीनाथ तुपे यांचे दोन बैल व एक शेळी जागेवर गतप्राण झाली. दादाराव तुपे यांचे एक बैल, तीन शेळ्या जागेवरच दगावल्या व दोन शेळ्या व शेळीचे दोन पिल्ले गंभीर भाजले आहेत. शेती उपयोगी अवजारे, जनावरांचा चारा, चाळीस पत्रे, ठिंबक सिंचन संच जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच वडोदबाजार पोलिसांनी पंचनामा केला व तहसीलदार संगीता चव्हाण यांनी भेट घेऊन सांत्वन केले. मंडळ अधिकारी पी. बी. कदम, तलाठी ज्ञानेश्वर घाडगे, तनुजा जगताप यांनी पंचनामा केला. पंचायत समिती सभापती सर्जेराव मेटे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाथ्रीकर यांनी शासनाकडून नुकसान भरपाई मिळ‍वून देण्याचे आश्वासन दिले. या शेतकऱ्यांची परिस्थिती यथातथाच असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गेवराई येथील गणपत हिम्मतराव तांबे यांच्या गट क्रमांक ११ मध्ये शॉर्टसर्किटमुळे आग सोमवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत दोन बैल, एक गाय, एक वासरू गंभीररित्या भाजले. शिवाय १० क्विंटल गहू, ५ क्विंटल बाजरी, चार टन ज्वारी व मका चारा जळून खाक झाला. हे नुकसान अंदाजे दीड ते दोन लाख रुपये आहे. प्रकाश दादाराव तांबे यांच्या गट क्रमांक १०० मधील शेतात आग लागून ३० ते ३५ क्विंटल मक्याची कणसे, तीन ते साडेतीन टन मका चारा, दोन एकरमधील ठिबक संच, १० पाइप जळून खाक झाले. तलाठ्याने केलेल्या पंचनाम्यानुसार हे नुकसान अंदाजे एक ते सव्वा लाखाचे आहे. विमलबाई साहेबराव व खुशालराव तांबे यांच्या गट क्रमांक २७९ व २८० मधील शेतात आग लागली. या आगीत जांभळाचे एक झाड एक, १५ ते २० फूट मोटार केबल जळाली. या आगीत अंदाजे ३० हजारांचे नुकसान झाले आहे. गट क्रमांक २८० मधील आगीत एक आंब्याचे झाड, दोन पेरूची झाडे जळून खाक झाली. हे नुकसान अंदाजे ७० हजाराचे आहे.

तारा ओढून घ्याव्यात
गेवराई गुंगी येथील आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी. महावितरणने आता तरी बऱ्याच ठिकाणी लोंबकळलेल्या तारा, वाकलेले खांब याची दुरुस्ती करावी. यामुळे शॉर्टसर्किटच्या घटना टाळता येतील, असे मत उपसरपंच गणेश तांबे यांनी व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रँडेड कापडाची विक्री; दोन दुकानांवर छापा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बनावट ब्रँडेड कपडे विक्री केल्याप्रकरणी पैठण गेट येथील हॉलीवूड आणि मॉडर्न जीन्स या दुकानातून क्रांतीचौक पोलिसांनी ७२ हजारांचा माल जप्त केला. याप्रकरणी मुंबई येथील दीपेश जितेंद्र गुप्ता यांनी तक्रार केली होती.
गुप्ता यांच्यासह क्रांतीचौक पोलिसांनी पैठण गेट, टिळकपथ येथील हॉलीवूड एनएक्स व मॉडर्न जीन्सवेअर या दुकानांवर छापा टाकला. या छाप्यात दोन्ही दुकानात ५० हजार रुपयांच्या लिवाइस स्ट्रॉस कंपनीचे नाव असलेल्या २० पँट, २२,५०० रुपयांचे १५ टी शर्ट, असा ७२ हजार ५०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या दुकानदारांनी बनावट माल विक्रीसाठी दुकानात ठेवला होता. दुकानदार मोहम्मंद आसताफ मोहम्मद आमीन, शब्बीर बेग जाफर आणि इन्साफ आलम सिद्दीकी या तिघांवर कॉपीराइट अॅक्टनुसार क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृध्दीच्या मोजणी पथकाला पिटाळले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पळशी शहर (ता. औरंगाबाद) येथे समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी जमीन मोजणी करणाऱ्या पथकाला शेतकऱ्यांनी सोमवारी पिटाळून लावले. जवळपास २०० शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. रस्ते विकास महामंडळाच्या पथकाला संमती असलेल्या एकाच शेतकऱ्याची जमीन मोजून माघारी परतावे लागले. या प्रकारामुळे पळशी परिसरात तणाव निर्माण झाला होता.
नागपूर-मुंबई समृद्धी मार्ग पळशी गावातून जाणार आहे. जवळपास ६० शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यासाठी मार्किंग करण्यात आली आहे. पळशी शिवारात सोमवारी दुपारी दोन वाजता पथक मोजणीसाठी आले. मोजणीला संमती असलेले शेतकरी ज्ञानेश्‍वर पळसकर यांच्या शेतात मोजणी करण्यात आली. त्यानंतर नानासाहेब पळसकर यांच्या जमिनीची मोजणी सुरू केली. या मोजणीला कृती समितीचे नेते नानासाहेब पळसकर यांनी विरोध केला. संमतीशिवाय तुम्ही कसे आलात अशी विचारणा करीत पळसकर यांनी पथकाला मोजणी थांबवण्यास सांगितले. काही वेळ मोजणी थांबवून पथकाने पोलिसांना बोलावले. पोलिसांच्या तीन व्हॅन बंदोबस्तासाठी आल्या. तणाव वाढल्यानंतर २०० शेतकरी आणि ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला. या विरोधामुळे पथकाला काढता पाय घ्यावा लागला. शेतात घरे, गोठे, शेततळी, फळबागा आहेत. मात्र, संमतीशिवाय मोजणी करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

शेतकऱ्यांना धमकावण्यासाठी बाउन्सरचा वापर केला जात आहे. पोलिसांची भीती दाखवून मोजणी करण्यात येत आहे. महामार्गासाठी जमीन द्यायची नसल्यामुळे संमतीचा प्रश्नच नाही. याविरोधात पोलिस अधिक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत.
- नानासाहेब पळसकर, शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएसआय परीक्षेचा निकाल जाहीर करू नका

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदावर नियुक्तीसाठी मर्यादित स्पर्धा परीक्षा २०१६ अंतर्गत भरती प्रक्रियेचा निकाल पुढील आदेशापर्यंत जाहीर न करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिले आहेत.
या संदर्भात या भरती प्रक्रियेत सहभागी सय्यद झरिनाबी, रेखा लक्ष्मण आसावरे, मंदाकिनी काटे, तुळजा सपकाळ यांनी 'मॅट'मध्ये अर्ज दाखल केला. त्यानुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलिस नाईक आणि पोलिस शिपाई यांच्याकरिता पोलिस उपनिरीक्षक पदासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१६ मध्ये घेण्यात आल्या. एकूण ८२८ पदांपैकी महिलांकरिता ३३ टक्के राखीव जागा नव्हत्या. त्यामुळे पुरुष आणि महिला यांच्यातही स्पर्धा झाली. यामध्ये पुरुष उमेदवारांना मैदानी चाचणीत सवलत देण्यात आली. परंतु, महिला उमेदवारांना मैदानी चाचणीत कोणतीही सवलत देण्यात आली नाही. पुरुषांना मैदानी चाचणीत सवलत देण्यात आल्यामुळे त्यांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त असेल, असे म्हणणे यात मांडण्यात आले.
हे प्रकरण सुनावणीस आले असता, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागण्यात आला. यावर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने या प्रकरणात पुढील आदेश होईपर्यंत या भरती प्रक्रियेचा निकाल जाहीर करू नये, असे निर्देश दिले. पुढील सुनावणी २५ एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे. या प्रकरणी अर्जदारांतर्फे प्रमोद कुलकर्णी यांनी बाजू मांडली. त्यांना सुनील जाधव यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यायाधिकरण विद्यार्थ्यांच्या हिताचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दोन वर्षांपूर्वी घोषित केलेल्या विद्यार्थी न्यायाधिकरणाचे कामकाज सुरू झाले आहे. महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावरील शैक्षणिक अडचणीबाबत विद्यार्थ्यांना थेट प्राधिकरणात दाद मागता येणार आहे. खर्च झेपत नसल्यामुळे कोर्टात शैक्षणिक तक्रारींचे प्रमाण कमी असते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी न्यायाधिकरण स्थापन करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थी न्यायाधिकरण (स्टुडंट ट्रिब्युनल) सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी न्यायाधिकरणाचा उपयोग होणार आहे. या न्यायाधिकरणाचे नोडल ऑफिसर प्राचार्य डॉ. एस. बी. बिराजदार यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. नवीन विद्यापीठ कायद्यानुसार न्यायाधिकारणाची स्थापना करण्यात आली आहे. महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावर विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक समस्यांचा सामना करावा लागतो. गुणवत्ता यादीत डावलणे, शिष्यवृत्ती प्रलंबित प्रकरणे, अतिरिक्त शुल्क, वसतिगृहातील समस्या, गुणपत्रिकेतील चुका अशा विविध समस्या असतात. याबाबत कोर्टात दाद मागणे विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे विद्यापीठात विद्यार्थी न्यायाधिकरण स्थापन करण्याची मागणी होती. विशेष म्हणजे ‘विद्यापीठ कायदा १९७४’, ‘विद्यापीठ कायदा १९९४’ यात न्यायाधिकरणाची तरतूद असूनही स्थापन करण्यात आले नव्हते. अॅकॅडमिक कमिटीची मनमानी आणि खासगी शिक्षणसंस्थांच्या हितसंबंधात विद्यार्थी अडचणी आणतील या भितीमुळे न्यायाधिकरणाला छुपा विरोध झाला होता. न्यायाधिकरणाच्या स्थापनेसाठी मागील दोन वर्षांपासून व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ. उल्हास उढाण पाठपुरावा करीत होते. विद्यार्थीहित जपण्यासाठी न्यायाधिकरण आवश्यक असल्याची बाजू त्यांनी मांडली होती.
विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी न्यायाधिकरणाच्या निर्णयावर १६ ऑगस्ट २०१६ रोजी व्यवस्थापन परिषदेत शिक्कामोर्तब केले होते. नोडल ऑफिसरपदी डॉ. एस. बी. बिराजदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठ कॅम्पसमध्ये विद्यार्थी न्यायाधिकरणाचे कार्यालय असून, विद्यार्थी थेट संपर्क साधू शकतील. विद्यापीठाशी संलग्न चार जिल्ह्यांतील विद्यार्थी न्यायाधिकरणात दाद मागू शकतात. न्यायाधिकरणाबाबत विद्यार्थी अनभिज्ञ आहेत, मात्र एखाद्या विद्यार्थ्यांला न्याय मिळाल्यानंतर त्याचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी न्यायाधिकरणाची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

विद्यापीठ कायदा
‘विद्यापीठ कायदा १९९४’प्रमाणे नवीन विद्यापीठ कायद्यातही न्यायाधिकारणाची तरतूद आहे. राज्य विद्यापीठ कायदा १९९४ मधील ६८ (१)प्रमाणे न्यायाधिकरण होते. न्यायाधिकरणात विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर निर्णय घेण्याचा कायद्यानुसार अधिकार असतो. प्रवेश नियम, शुल्क, गुणवत्ता यादीत डावलणे, संशोधनात अडचणी अशा अनेक समस्येत दाद मागता येईल. विशेष म्हणजे राज्य सरकारच्या शैक्षणिक निर्णयाविरोधातसुद्धा विद्यार्थ्याला तक्रार करता येईल. विद्यार्थ्यांचे हित जपणे न्यायाधिकरणाचे प्राथमिक कर्तव्य असून न्यायाधिकरण स्थापन करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ राज्यातील पहिलेच विद्यापीठ आहे.

शासनाच्या नियमानुसार शुल्क, प्रवेश नियम आणि भौतिक सुविधा याचे नियम आहेत. किमान पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि स्वच्छ वर्ग यांची निकड आहे. विद्यार्थी प्रथम आपल्या महाविद्यालयाकडे दाद मागू शकतो. तरीसुद्धा समस्या तशीच राहिल्यास न्यायाधिकरणाकडे दाद मागता येईल. ही सुविधा ऑनलाइसुद्धा उपलब्ध आहे.
- डॉ. एस. बी. बिराजदार, नोडल ऑफिसर

विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करण्याचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. विद्यार्थ्यांना डावलून परस्पर निर्णय घेणे किंवा शिक्षण क्षेत्रातील मनमानीला न्यायधिकरणामुळे आळा बसणार आहे. मागील दोन वर्षे न्यायाधिकरणासाठी पाठपुरावा केला.
- डॉ. उल्हास उढाण, माजी सदस्य, व्यवस्थापन परिषद

न्यायाधिकरणाची वैशिष्ट्ये
- न्यायाधिकरणाची माहिती प्रवेश पुस्तिकेत छापा
- महाविद्यालयाच्या वेबसाइटवर माहिती द्या
- विद्यापीठ पुस्तिका काढून वितरीत करणार
- तक्रारींचे निरसन ऑनलाइन होणार
- विद्यार्थ्यांना सुविधा देण्याबाबत दक्षता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहा महिने जीव मुठीत

$
0
0

Makarand.Kulkarni@timesgroup.com
Tweet : @makarandkMT
औरंगाबाद ः औरंगाबादवासीयांच्या जीवावर उठलेल्या बीड बायपासच्या विस्तारीकरणाचा मुहूर्त आणखी सहा महिन्यांनी लांबला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) दिल्लीत पाठविलेल्या प्रस्तावात त्रुटी दाखविण्यात आल्या होत्या. त्यांची पूर्तता करून ३१ मार्च रोजी नवीन प्रस्ताव दिल्ली मुख्यालयात पाठविण्यात आला आहे. त्यावर अभ्यास करून संबंधित कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरवात होण्यास कमीत कमी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत सातारा परिसर, बीड बायपास पलिकडील नागरिकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी २५ डिसेंबर २०१५ रोजी औरंगाबादेत रस्ते विस्तारीकरण कामाचे उद्घाटन केले होते. त्यात जालना रस्ता आणि बीड बायपासच्या विस्तारीकरणाची घोषणा केली होती. रस्ते विस्तारीकरणासाठी १० हजार कोटींची तरतूद करणार असल्याचे सांगितले होते.
पहिल्या टप्प्यात एनएचएआयकडे जालना रस्ता व बीड बायपासची दुरुस्ती प्रस्तावित केली होती. तत्कालीन सहव्यवस्थापकीय संचालक यू. जे. चामरगोरे यांनी जालना रस्त्याचे प्राथमिक सर्वेक्षण करून सहा पदरी रस्त्यासाठी प्लॅन तयार केला. बीड बायपासचा विस्तार करताना सहा पदरी रस्ता करून १३ किलोमीटरचे काँक्रिटीकरण करण्याचे प्लॅनिंग तयार केले गेले. पुढील २५ वर्षांत औरंगाबादचा होणारा विस्तार गृहित धरून बीड बायपासवर तीन उड्डाणपूलही प्लॅनमध्ये प्रस्तावित केले गेले; तसेच बीडबायपासच्या दक्षिण बाजूला झालेली नागरी वसाहत लक्षात घेऊन १३ किलोमीटरचा सर्व्हिस रोडही एनएचएआयने सविस्तर प्रकल्प अहवालात नोंदविला. ऑक्टोबर महिन्यात हा अहवाल दिल्ली मुख्यालयात धाडण्यात आला. दिल्लीतून प्रस्तावाची मंजुरी मिळाल्यानंतर निविदा काढणे, कंत्राटदार निश्चित होणे आणि प्रत्यक्ष कामास सुरवात होणे या प्रक्रियेला किमान सहा महिने अपेक्षित आहेत. शिवाय रस्ता रुंद करताना आजुबाजुच्या मालमत्ता संपादित केल्यातर त्यांची भरपाई देण्याची प्रक्रियाही एनएचएआयमार्फतच पूर्ण केली जाणार आहे. बीड बायपासच्या विस्तारीकरणासाठी सादर केलेल्या फाइलमध्ये काही त्रुटी काढण्यात आल्या आणि पूर्ततेसाठी फाइल पुन्हा औरंगाबाद कार्यालयात पाठविली गेली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; ३१ मार्च रोजी त्रुटी दूर करून फाइल पुन्हा दिल्लीत पाठविण्यात आली.
आता प्रस्तावाच्या मंजुरीत खरी अडचण येणार आहे. कारण दिल्लीत प्रस्ताव तपासून त्यास मंजुरी देण्यास किमान महिनाभराचा कालावधी लागेल. त्यानंतर निविदा काढण्यात येईल. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागले. तोपर्यंत जून महिना उजाडणार आहे.
७ जूननंतर पावसाळा सुरू होतो. त्यामुळे चार महिने रस्त्यांची कामे केली जात नाहीत. साहजिकच निविदा मंजुरी, कंत्राटदार निश्चितीनंतर प्रत्यक्ष काम १५ ऑक्टोबरनंतरच सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीड बायपासच्या विस्तारीकरणासाठी सहा महिन्यानंतरचा मुहूर्त साधला जाईल. तोवर सातारा, देवळाई परिसरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागणार आहे.

सर्व्हिस रोडचे त्रांगडे कायम
बीड बायपासचे विस्तारीकरण एनएचएआयकडून केले जाणार आहे. त्यात सर्व्हिस रोडही प्रस्तावित आहे. सद्यस्थितीत हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्प विभागाकडे आहे. एनएचएआयने प्रस्ताव सादर करताना या विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे. प्रस्ताव मंजुरीनंतर हा रस्ता एनएचएआयकडे येईल. त्याला विलंब लागेल. तोवर सर्व्हिस रोडबाबत काय निर्णय घ्यायचा, हा प्रश्न उद्भवणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेत्रदीपक पदन्यासाने बहरला ध्यासचा नृत्योत्सव

$
0
0

नेत्रदीपक पदन्यासाने बहरला ध्यासचा नृत्योत्सव

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ध्यास परफॉर्मिंग आर्टस्च्या नृत्य विभागातर्फे रविवारी तापडिया नाट्य मंदिर येथे वार्षिक नृत्योत्सव उत्साहात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध डॉक्टर यशस्विनी तुपकरी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात सचिन नेवपूरकर यांनी संगीतबद्ध केलेल्या व आर्या आंबेकर हिने गायलेल्या 'शारदास्तवन' नृत्याद्वारे करण्यात आली. यानंतर प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींनी नाजूक पदन्यासातून पंचतत्व नृत्य अडवुद्वारे सादर केले. सर्व देवांची स्तुती असलेल्या श्लोकातून द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी अभिनय व पदन्यास यांचा सुरेख मेल साधला. यानंतर रंगदेवतेची पूजा पुष्पांजली या नृत्याद्वारे पंचम वर्षाच्या विद्यार्थिनींनी सादर केली. कळीचे फुलात रुपांतर होणाऱ्या अलरिपू या सुंदर रचनेतून तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी मनमोहक पदन्यास सादर केला. भगवान गणेशाची आराधना तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी लिलया सादर केली.

भगवान शिवाचे भजन तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी भावपूर्ण पद्धतीने रसिकांसमोर मांडले. सहाव्या वर्षाच्या विद्यार्थिनींनी मल्लारी या तालबद्ध पदन्यासाचा सुंदर नजराणा पेश केला. तसेच यानंतर जातिस्वरम या शुद्ध नृत्यप्रकारातून चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनींनी तालावरची पकड दाखवून दिली. नंतर पदम या अभिनय पूर्ण रचनेतून पंचम वर्षाच्या विद्यार्थिनींनी भगवान नटराजाशी संवाद साधणाऱ्या लहान मुलीची कथा उत्तमपणे सादर केली. कृष्णाच्या विविध लीला मधुराष्ट्क या नृत्यातून चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनींनी मनमोहकपणे सादर केल्या. यानंतर विष्णूचे दहा अवतार सांगणारा दशावतार पंचम वर्षाच्या विद्यार्थिनींनी सुरेख निभावला. यानंतर लयबद्ध, तालबद्ध व आवेशपूर्ण शिवस्तुतीतून स्वराली मुळे व प्राजक्ता राजूरकर यांचा पदन्यास डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. नंतर तिल्लाना या गतिमान नृत्यातून ध्यासच्या जेष्ठ विद्यार्थिनींनी कार्यक्रमाची उंची वाढवली. कार्यक्रमचा शेवट गणेश वंदनेतून बहारदार नृत्याच्या सादरीकरणाचा कळस गाठणार होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी दाशरथे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी जागरण बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पाण्यासाठी रात्री जागण्याची वेळ आता औरंगाबादकरांवर येणार नाही. पाणीपुरवठ्यात समतोल साधण्यासाठी आणि सर्वांपर्यंत पाणी पोचावे म्हणून रात्री ११ ते पहाटे चार या कालावधीत पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
विस्कळित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे लक्ष वेधत महापौर भगवान घडमोडे यांनी सोमवारी पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. पाणीपुरवठ्याचा समतोल साधावा, टंचाईमुळे नागरिकांवर भटकंतीची वेळ येऊ नये, याची खबरदारी घ्या, असे निर्देश त्यांनी दिले. गेल्या काही दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. गळतींमुळे पाणीपुरवठा खंडित होण्याचा प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यासह बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. टाक्यांमधील पातळी पूर्ण होण्यापूर्वी पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे सर्वदूर पाणीपुरवठ्यात अडचणी निर्माण होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर रात्री ११ ते पहाटे चार या कालावधीत टाक्यांत पाणी भरण्यात येईल. टाक्यांत योग्य पातळीपर्यंत पाणी येईपर्यंत पाणीपुरवठा केला जाणार नाही, असे निश्चित करण्यात आले. टाक्यांमध्ये पाण्याची पातळी तीन मीटरपर्यंत असणे आवश्यक आहे. बैठकीला स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले, सभागृह नेता गजानन मनगटे, मकरंद कुलकर्णी, अर्चना निळकंठ, दिलीप थोरात, गजानन बारवाल, बन्सी जाधव, सरताजसिंग चहेल आदींची उपस्थिती होती.

आयुक्तांच्या आदेशाचे काय?
यापूर्वी आयुक्तांनी रात्री १२ ते पहाटे पाच या वेळेत कोठे पाणीपुरवठा करण्यात येऊ नये असे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर आज महापौरांच्या बैठकीत रात्री ११ ते पहाटे ४ यावेळेवर पाणीपुरवठा होणार नसल्याचे निश्चित करण्यात आले. त्याचबरोबर एन-५मध्ये असलेल्या दोन फिडरपैकी एक फिडर २४ तास सुरू ठेवण्यासाठी महावितरण मदत करणार आहे. त्यामुळे विजेची समस्या जाणवणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांनी बनविल्या पाच शॉर्ट फिल्म

$
0
0


इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांनी बनविल्या पाच शॉर्ट फिल्म
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतानाच आपले चित्रपट बनविण्याचे कौशल्य लिलया सांभाळत जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (जेएनईसी) च्या विद्यार्थ्यांनी एक आदर्श घालून दिला आहे. एक, दोन नव्हे तर पाच शॉर्ट फिल्म (लघुपट) बनविले. प्रत्येक फिल्मची थीम स्वतंत्र असून सामाजिक, देशभक्तीपर लघुपटांना यू ट्यूबवरही मोठ्या हिट्स मिळाल्या आहेत.

ऋषिकेश कराळे, चंदन कोळंबे, सुहास महाजन, सूरज सवंडकर यांनी दिग्दर्शन, निर्मिती, सह दिग्दर्शन, संकलन व लेखनाची बाजू सांभाळली.

२०१४ मध्ये या मित्रांनी एकत्र येऊन लघुपट काढण्याचे ठरविले. दादागिरी नावाचा पहिला लघुपट केला. महाविद्यालयीन जीवन, विद्यार्थ्यांची भांडणे, मारामारी, गुंडगिरी यात गुंतणे त्यामुळे जीवनावर होणारे परिणाम दादागिरी मध्ये उलगडून सांगण्यात आले. ११ मिनिटांच्या या लघुपटात यश जारवाल, मयूर पवर, सूरज सवंडकर, शुभम माने, अक्षय बढे, शुभम खरात, सुविधा मुथा, अनुराधा राठी यांनी भूमिका केल्या. २०१५ मध्ये ‘द ऑरा १८’ या ग्रुपने ‘द चेस’ नावाचा लघुपट तयार केला. या फिल्मला राज्यस्तरावर लघुपटाचे विशेष पारितोषिक मिळाले. हा लघुपट आधी हिंदी व मराठी बनविला आणि पुढे इंग्रजीमध्ये लघुपटाची निर्मिती केली. पहिल्या चित्रपटासाठी तांत्रिक अडचणी होत्या. त्या यावेळी सोडविण्यात बऱ्यापैकी यश मिळाले. डीएसएलआर कॅमेऱ्याद्वारे लघुपटाची निर्मिती करण्यात आली.

एक २२ वर्षीय तरुण एका लहान मुलाचे अपहरण करून स्वतःच कसा जाळ्यात अडकतो, असे चित्रपटाचे कथानक आहे. कोणत्याही चुकीच्या गोष्टीला बळी पडू नका, मोह, लोभ बाळगू नये, असा संदेश चित्रपटातून दिला आहे.

२०१६ मध्ये लिटिल सैराट हा कर्मशिअल लघुपट ग्रुपने बनविला. यातून मिळालेले उत्पन्न पुढच्या लघुपटासाठी वापरण्यात आले.

२०१७ मध्ये त्यांनी ‘ आय एम मोदी’ ‘ द औरा १८’ ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारतर्फे राबविल्या जाणाऱ्या स्वच्छ भारत अभियान लघुपट स्पर्धेत सहभाग नोंदविला. ग्रुपने म्युझिक स्टुडिओमधून तयार घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या या अभियानाने देशाचा विकास होणार असल्याचा संदेश लघुपटातून देण्यात आला. देशातील प्रत्येक व्यक्तीने आपण मोदी आहोत असे समजून काम करावे, असे या शॉर्टफिल्ममधून सुचविण्यात आले. या लघुपटासाठी एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम, डॉ. विनिता एस. जोशी, डॉ. एम. एस. कदम, अर्जुन पवार यांचे विशेष सहकार्य लाभले.


महाराज तुम्हाला शोधू कुठे ?


छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली मूल्ये ‘ महाराज तुम्हाला शोधू कुठे ?’ या लघुपटाद्वारे दाखविण्यात आली आहेत. कराड इंटरनॅशनल लघुपट स्पर्धेत या फिल्मने सहभाग नोंदविला. सर्वेश भालेराव, सूरज सवंडकर, करण मणियार, प्रशांत धोत्रे, शुभम खरात, गोकुळ काळे, आकाश लोहाडे, सूरज गवळी यांनी यात भूमिका केली. लघुपट निर्मितीसाठी सहा महिने लागले.



‘‘ आम्ही मित्र एकत्र येऊन सामाजिक, राजकीय, जनजागृती विषयावर शॉर्ट फिल्म निर्मिती करण्याचे ठरविले. सुरवातीला आलेल्या अडचणींवर मात करत आम्ही सामाजिक विषय हाताळतो. त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ’’

- ऋषिकेश कराळे, दिग्दर्शक, द ऑरा १८ ग्रुप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटीसला उत्तर न दिल्याने नोटीस

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने जारी केलेली नोटीस मिळूनही प्रतिसाद न दिल्याने लघुसिंचन विभागाचे औरंगाबाद येथील अधीक्षक अभियंता, जालन्याचे कार्यकारी अभियंता आणि परतूरचे उपविभागीय अधिकारी यांच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश न्या. आर.एम. बोर्डे आणि न्या. के.एल. वडणे यांनी दिला. याप्रकरणी उत्तर दाखल करण्याचा आदेश देत पुढील सुनावणी २६ एप्रिल रोजी ठेवली आहे.
जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यामधील मौजे लोणी येथील पाझर तलावाचे काम पूर्ण केले नसल्यामुळे गट क्रमांक २५८ आणि २५९ मधील शेतीचे अतोनात नुकसान होते. पाझर तलावाचे काम पूर्ण करण्याबाबत २००८ पासून दरवर्षी वरिष्ठांकडे अर्ज केले. त्यामुळे मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनामे केले. पाझर तलावाला सांडवा नसल्यामुळे गट क्रमांक २५८ व २५९ मधील शेतीचे अतोनात नुकसान होवू शकते, असे पंचनाम्यात म्हटले होते. परंतु, वरिष्ठांनी त्याची दखल घेतली नाही. मात्र, परतूरच्या तहसीलदारांनी १० जून २०१० रोजी परतूरच्या लघु पाटबंधारे विभागाच्या उप अभियंत्यांना पत्र पाठवून सांडव्याचे काम त्वरित पूर्ण करुन वरील शेतकऱ्याचे नुकसान टाळावे. शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाईची जबाबदारी आपणावरच राहील, असे कळविले होते. असे असताना सांडव्याचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे कोंडिबा काकडे व इतरांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. याचिकाकर्त्याची बाजू कैलास बी. जाधव यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images