Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महाराष्ट्र दिनापासून ऑनलाइन सातबारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यातील ऑनलाइन सातबाऱ्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून, येत्या १ मेपासून सातबारा ऑनलाइन मिळणार आहे, मात्र शहर पसिरात असलेल्या ७४५ गटांमध्ये मूळ दस्तऐवज ऑनलाइन करणे बाकी आहे. त्यामुळे या गटांतील सातबारा तूर्त ऑनलाइन पद्धतीने मिळणार नाहीत, अशी माहिती अपर तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी दिली.

गेल्या काही वर्षांमध्ये औरंगाबाद शहर परिसरातील हर्सूल, मिटमिटा, कांचनवाडी, करमाड, शेंद्रा या भागांत मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग झाली आहे. या परिसरात जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले आहेत. त्यामुळे अनेक गटांतील क्षेत्राची जुळवा-जुळव करणे बाकी आहे. रजिस्ट्री असूनही सातबाऱ्यावर त्याच्या नोंदी करण्यात आल्या नाहीत. अशा गटांची संख्या ७४५ आहे. यामुळे या गटांची जुळवणी झाल्यावरच दस्तऐवजी ऑनलाइन करण्याची प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

अप्पर तहसील कार्यालयांतर्गत शहर व परिसरातील सातारा, देवळाईचा समावेश करण्यात आलेला आहे. तहसील कार्यालयांतर्गत शहरातील ७ हजार ७९५ गट अाहेत. या गटांतील सातबारा आणि फेरफारचे संग‌णकीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या वर्षभरपासून सातबारा दुरुस्तीसाठी एका सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे. औरंगाबाद तालुक्यात १ लाख ८२ हजार मूळ खातेदारांच्या सातबारा आणि फेरफारमधील नोंदी करण्यात आल्या आहेत. यासाठी स्वतंत्र सर्व्हर देण्यात आल्यामुळे तालुक्याचे काम ९२ टक्केपूर्ण झाले आहे, मात्र गावातील काही गटांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. पूर्ण झालेल्या गटांमधील सातबारा मात्र १ मेपासून नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

माहिती अपलोड केल्यानंतर ऑनलाइन

हर्सूलमधील ३९४ गट, साताऱ्यातील ११३, मिटमिटा येथील ११० आणि कांनवाडीतील ४८ अशा एकूण ७४५ गटांमध्ये जुळवणी केल्यानंतरच ऑनलाइन सातबाऱ्याचे काम सुरू होईल. एक मेनंतर या गटांतील सातबाराचा उतारा हस्तलिखित स्वरुपात देण्यात येणार आहेत. गटांतील क्षेत्राची सर्व माहिती अपलोड करण्यात आल्यानंतर या भागातील सातबाराचे उतारे ऑनलाइन पद्धतीने मिळू शकतील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जेईई-मेन’मध्ये चारशेवर विद्यार्थी यशस्वी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आयआयटीसह इतर अभियांत्रिकी कॉलेजांसाठी देशपातळीवर घेण्यात आलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा ‘जेईई-मेन’ परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. चांगल्या रँकने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष आता २१ मे रोजी होणाऱ्या ‘जेईई-अॅडव्हान्स’कडे लागले आहे. औरंगाबादमधून ‘जेईई-अॅडव्हान्स’साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या चारशेपेक्षा अधिक आहे. औरंगाबादेतील शुभम अत्री याने १६वा रँक मिळविला आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) २ एप्रिल रोजी ‘जेईई-मेन’ परीक्षा घेण्यात आली. देशभरातून दहालाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. औरंगाबाद केंद्राहून १६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली. त्याचा निकाल गुरुवारी सायंकाळी पाचनंतर जाहीर करण्या आला. ‘जेईई-अॅडव्हान्स’साठी पात्र ठरल्याचे कळल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. निकालात रँकिंगमध्ये औरंगाबदचा टक्का कमी झाल्याचे यंदाचे चित्र आहे.
पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष आता २१ मे रोजी होणाऱ्या अॅडव्हान्सकडे लागले आहे. औरंगाबादचा शुभम अत्री याने १६वा रँक मिळविला आहे. त्यासह उत्कर्ष माकेन (४०), हर्ष गौतम (२३६) योमकेश (३०५), जेतिका कुमार (३४०) यांसह धनजंय राऊत (६१४), अथर्व पवार (६२६), सार्थक चिंचोलीकर (१७५०), महेश काळे (१९७३) आदी विद्यार्थी पात्र ठरले. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी अॅडव्हान्सचे लक्ष असल्याचे सांगितले.

‘नारायण’चे दोनशे विद्यार्थी पात्र
निकालात नारायण इन्स्टिट्यूटचे दोनशे विद्यार्थी पात्र ठरल्याचे माहिती डॉ. एम. एफ. मल्लिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदा गणितचा पेपर अवघड होता म्हणून कट ऑफ मार्क (किमान गुण) हे खुल्या प्रवर्गाकरिता ८१ असून, मागासवर्गीय विद्यार्थ्याकरिता ३२, ओबीसी, ४९, एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी २७ असे आल्याचे त्यांनी सांगितले. निकाल चांगला असून, आता अॅडव्हान्समध्येही विद्यार्थी चांगली कामगिरी करतील असे ते म्हणाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे प्रा. विशाल लदनिया, दत्त्ता जाधव, प्रा. संतोष कालुंगे, प्रा. दुर्गेश सिंग, प्रा.गोधन सिंग, प्रा. अब्दुल हन्नान, प्रा.सुनिल झा, प्रा. प्रदिप शुक्ला यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांना ‘बुक बँके’चा आधार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पहिली ते आठवीपर्यंत शासनाकडून मोफत पुस्तके देण्यात येतात, मात्र नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना बाजारातून पुस्तके खरेदी करावी लागतात. अनेक गरीब विद्यार्थ्यांकडे पुस्तकांचा पूर्ण संच नसतो. बिकट आर्थिक परिस्थिती, गरिबी यामुळे शिक्षणाची आवड असतानाही अनेक विद्यार्थ्यांना दहावीपर्यंतचे शिक्षण घेता येत नाही. अशा विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शहरातील काही शिक्षकांनी ‘इकरा बुक बँके’च्या माध्यमातून मोफत पुस्तके देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
नववीच्या अनेक विद्यार्थ्यांकडे पुस्तकांचा पूर्ण संच नसल्याचे शिक्षकांना जाणवत होते. ‘पुस्तके आणा,’ असे वारंवार सांगितल्यानंतर अनेक विद्यार्थी शाळेत येणे टाळायचे. त्यांच्या पालकांना बोलविल्यानंतर, त्यांच्याकडे विद्यार्थ्यांना पुस्तक विकत घेऊन देण्यासाठीही पैसे नसल्याची वस्तुस्थिती समोर आली. नववीच्या इयत्तेच्या पुस्तकांचा संच घेण्यासाठी पाचशे रुपयांवर खर्च येतो. वह्या आणि पुस्तकांचा एकूण खर्च एक हजार रुपयांवर जातो. या विद्यार्थ्यांचे पालक त्यांना वह्या, पुस्तके आणून देऊ शकत नसल्याचे शिक्षकांच्या ध्यानात आले. यामुळे मोहम्मद अझर, जफर अहेमद, मोहम्मद यासेर, शेख समी आणि अश्फाक अहेमद यांनी बुक बँक सुरू करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी पाच सदस्यांनी हा प्रयोग करून पाहिला. त्यांनी रोशनगेट, टाइम्स कॉलनी आणि अन्य भागांतील शाळात जाऊन मुख्याध्यापकांच्या मदतीने नववी वर्गातून दहावीत जाणाऱ्या आणि दहावी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना जुनी पुस्तक देण्याचे आवाहन केले. याशिवाय गरीब विद्यार्थ्यांना मदत करणारे व्यवसायिक, संस्थांची संपर्क करून मदतीचे आवाहन केले. जुन्या पुस्तकांचा मिळालेल्या संचामध्ये अनेक पुस्तके कमी असतात. यामुळे मिळालेल्या मदतीतून नवीन पुस्तके विकत घेऊन नववी आणि दहावी अभ्यासक्रमांचा संच पूर्ण करण्यात येतो. याशिवाय शाळेचे गॅदरिंग, कार्यशाळा; तसेच विविध कार्यक्रमांमध्ये जाऊन ‘इकरा बँके’ची पत्रके वाटून पुस्तके देण्याचे आवाहन करण्यात येते.
गेल्या वर्षी इकरा बुक बँकेच्या माध्यमातून २५ हजार रुपयांच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यात शैक्षणिक साहित्यांचाही समावेश होता. आता या बुक बँकेच्या सदस्यांची संख्याही वाढली आहे. आता अश्फाक अहमद, अब्दुल लतीफ देगलुरी, मोहम्मद शाहीद खान, शेख इस्माइल, अन्सारी सलीमोद्दीन यांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदविला आहे. यावर्षी सुमारे ३०० विद्यार्थ्यांना पुस्तके मोफत देण्याचा प्रयत्न आहे.

बायडिंग केल्याने पुस्तक होतात नवी
इकरा बँकेद्वारे मदतीच्या स्वरुपात मिळालेल्या जुन्या पुस्तकांचे बायडिंग केले जाते. त्यामुळे ही पुस्तके नव्या पुस्तकांसारखीच दिसतात. ही पुस्तके अन्य शैक्षणिक साहित्यांसोबत विद्यार्थ्यांच्या गरजेनूसार त्यांना देण्यात येतात.

बिडकीन झेडपी शाळेत दिली पुस्तके
औरंगाबाद शहराच्या विविध खासगी शाळांत गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करताना एका शिक्षकाने जिल्हा परिषदेच्या बिडकीन येथील शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकांची गरज असल्याची माहिती दिली. बिडकीन शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना नववी आणि दहावीच्या पुस्तकांचे संच देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएड सीईटी अर्ज भरण्यास मुदतवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अध्यापक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आता येत्या १ मेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्यामुळे गेल्या वर्षी ४० टक्केच जागांवर प्रवेश होऊ शकले होते. यंदाही अशीच स्थिती असल्याचे चित्र आहे.
डीटीएड, बीएड, एमएड अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेशपूर्व परीक्षा १३ व १४ मे रोजी होणार आहे. त्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. २६ एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. त्यात अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय परीक्षा सेलने घेतला आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना १ मेपर्यंत प्रवेशपूर्व परीक्षेसाठी अर्ज भरता येणार आहे. नोकरीची हमी नसल्याने अन् शिक्षक भरतीची रखडलेली प्रक्रिया लक्षात आल्याने या अभ्यासक्रमाकडील कल कमी झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; आजपर्यंत राज्यभरात केवळ १५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत आहे. परीक्षाही ऑनलाइन घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना ४ मे रोजी हॉलतिकीट मिळणार आहेत.

अशी असेल परीक्षा
१३ व १४ मे रोजी बॅचेसप्रमाणे परीक्षा घेतली जाणार आहे. प्रश्नपत्रिका शंभर गुणांचा असेल. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे. त्यासाठी ९० मिनिटांचा कालावधी असेल. या परीक्षेत नकारात्मक गुणपद्धती नसेल. परीक्षेचा निकाल ३१ मे रोजी जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. ही प्रक्रियाही ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. गेल्या वर्षीपासून ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. गेल्या वर्षी प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिंधोन’चे पाणी साताऱ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सातारा, देवळाई परिसरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दोन तलाव जोडून त्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याची योजना महापालिकेने तयार केली आहे. येत्या एक-दीड महिन्यात या योजनेवर काम केले जाणार असून, पावसाळ्यानंतर दोन्ही तलावातील पाण्याचा वापर करता येणार आहे.
सातारा, देवळाई भागात पाण्याची समस्या गंभीर आहे. या परिसरात नळ कनेक्शनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत नसल्यामुळे टँकर आणि जारच्या माध्यमातूनच नागरिकांना आपली तहान भागवावी लागते. सातारा, देवळाई भागाचा महापालिकेत समावेश झाल्यावर समांतर जलवाहिनीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली होती, परंतु हा प्रकल्प रद्द झाल्यामुळे या योजनेतून पाणीपुरवठा होण्याची शक्यता मावळली आहे. सध्या महापालिकेतर्फे सातारा, देवळाईसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळ्यात मात्र टंचाईची तीव्रता अधिकच जाणवते. येत्या काळात यावर तोडगा काढण्यासाठी दोन तलाव जोडून पाणीपुरवठ्याची समस्या सोडवण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. सिंधोन गावाजवळ दोन तलाव आहेत. ते ९०० मिलिमीटर व्यासाची पाइप लाइन टाकून जोडण्याचे पालिकेच्या प्रशासनाने ठरविले आहे. यासाठी दहा लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.
पावसाळ्यात हे दोन्ही तलाव पूर्ण क्षमतेने भरतात व पाणी सांडव्याद्वारे वाहून जाते. पाइप टाकून दोन्ही तलाव एकमेकांना जोडल्यास वाया जाणारे पाणी थांबेल शिवाय दोन्ही तलावातील पाणीपातळी एकसमान राहील. या तलावांतील पाणी सातारा तांडा येथील विहिरीत टाकून टँकरच्या माध्यमातून संपूर्ण सातारा, देवळाईसाठी पाणीपुरवठा करण्याची योजना आखण्यात आली आहे. या योजनेला तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी मान्यता दिली आहे. योजनेच्या खर्चाचे अंदाजपत्रक पाणीपुरवठा विभागाने लेखा विभागाला पाठवले आहे. लेखा विभागाने अंदाजपत्रक मंजूर केल्यावर पाइप टाकून तलाव जोडण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.

पाइपच्या माध्यमातून सिंधोन रस्त्यावरील दोन तलाव जोडण्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. त्याला मंजुरी मिळाल्यावर लगेचच काम सुरू केले जाईल. या कामाचा उपयोग नागरिकांना यंदा होणार नाही, पण पुढच्यावर्षी नागरिकांना निश्चितपणे दिलासा मिळेल.
- सरताजसिंग चहल, कार्यकारी अभियंता, महापालिका.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वायू प्रदूषणाने बळावतोय दमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अनुवंशिकतेसह वायू प्रदूषण, अॅलर्जी, ताणतणाव, चुकीच्या जीवनशैलीने दम्याचे (अस्थमा) प्रमाण दहा टक्क्यांवर येऊन ठेपले असून, कडेलोट झालेल्या वायू प्रदूषणाने असलेला दमा तीव्र स्वरुपात बळावत असल्याचे स्पष्ट झाले आहे, मात्र ‘इन्हेलेशन थेरपी’ने दम्यावर शंभर टक्के नियंत्रण शक्य आहे आणि केवळ एका वर्षाच्या उपचारानंतर दम्याच्या त्रासापासून मुक्ती मिळवता येऊ शकते. विशेष म्हणजे गत ऑलिंपिकमधील चार टक्के खेळाडू हे दमेकरी होते आणि त्यातही सुवर्णपदक पटकावणारे ०.५ टक्के खेळाडू हेदेखील दमेकरी होते. त्यामुळे दमा असला तरी कोणत्याही क्षेत्रातील परमोच्च बिंदू गाठता येऊ शकतो, असे छातीविकारतज्ज्ञांनी दमा दिनानिमित्त स्पष्ट केले.
जागतिक दमा दिन हा येत्या मंगळवारी (दोन मे) आहे. यानिमित्त गुरुवारी (२७ एप्रिल) आयोजित पत्रकार परिषदेत ज्येष्ठ श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. सुहास बर्दापूकर व श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. आशिष देशमुख यांनी दम्याविषयीची सर्व शास्त्रीय तथ्ये मांडली. दमा हा श्वासनलिकेचा दीर्घकालीन आजार आहे व कुठल्याही वयात होऊ शकतो. यामध्ये श्वासनलिका आकुंचन पावतात व या श्वासनलिका ‘इन्हेलेशन थेरपी’ने मोकळ्या होतात. ‘इन्हेलेशन थेरपी’ने दमा हा आयुष्यभर शंभर टक्के नियंत्रणात राहू शकतो. योग्य मात्रेतील इन्हेलरमधील औषधांनी दम्यावर पूर्णपणे मात करता येऊ शकते आणि कुठल्याही क्षेत्रात परमोच्च शिखर गाठता येऊ शकते. मागच्या दोन वर्षांपूर्वी ब्राझिलमध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या ४ टक्के खेळाडूंना दमा होता व सुवर्ण पदक पटकाविणारे ०.५ टक्के खेळाडूदेखील दमेकरी होते, हे एका शास्त्रीय पाहणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दमा हा कोणत्याही यशासाठी अडसर ठरू शकत नाही, हे लक्षात घेऊन लवकरात लवकर निदान व उपचारासाठी नागरिकांनी पुढे आले पाहिजे. त्याचवेळी ‘इन्हेलेशन थेरपी’ ही जगमान्य उपचार पद्धती असून, याचा डोस ‘मायक्रोग्राम’मध्ये असतो व त्याचे कोणतेही दुष्परिणाम नसल्याचे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे. त्याचवेळी दिवसाला अवघ्या ४ ते ५ रुपयांमध्ये हा उपचार होऊ शकतो, असे डॉ. बर्दापूरकर व डॉ. देशमुख यांनी सांगितले.

मेडिकल कॉलेजांत इन्हेलरचा अभाव
स्पायरोमेट्री टेस्ट किंवा पल्मोनरी टेस्ट अशा साध्या व स्वस्त चाचण्यांमधून दम्याचे निदान होते व आजाराच्या तीव्रतेनुसार ‘इन्हेलेशन थेरपी’चा डोस ठरवला जातो, मात्र दुर्दैवाने घाटीसह अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये आणि महापालिकांच्या रुग्णालयांमध्ये ‘इन्हेलेशन थेरपी’साठी वापरली जाणारी नवीन अद्ययावत औषधे मिळत नसल्याचे चित्र आहे, याकडेही डॉ. बर्दापूरकर व डॉ. देशमुख यांनी लक्ष वेधले.

‘सीओपीडी’ही वाढतोय झपाट्याने
सर्व प्रकारच्या धुम्रपानामुळे कालांतराने होणारा ‘क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज’ (सीओपीडी) हा दम्याचा गंभीर प्रकारचा आजारही झपाट्याने वाढत आहे. वायू प्रदूषणामुळेही ‘सीओपीडी’ग्रस्तांचा त्रास वाढत असल्याचे निष्पन्न झाले आहे. एकूण ‘सीओपीडी’ग्रस्तांमध्ये ६० टक्के पुरूष, तर ४० टक्के महिला असतात. महिलांमध्ये धुम्रपानाचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत अजूनही बरेच कमी असले तरी चुलीवर स्वयंपाक करताना होणाऱ्या धुरामुळे महिलांमध्ये विशेषतः ग्रामीण महिलांमध्ये ‘सीओपीडी’चे प्रमाण वाढत असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहन बाजाराला तृतीया पावली

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नोटबंदी, बीएस थ्री वाहन बंदी अशा एकाहून एक खडतर संकटामुळे डबघाईला आलेल्या वाहन बाजाराला शुक्रवारी झालेली अक्षय तृतीया पावली. आज जवळपास तीनशे चारचाकी गाड्यांसह एकूण सहाशे वाहने विकल्याचा अंदाज विक्रेत्यांनी वर्तवला आहे.
यंदा या शुभमुर्हूतावर मारुती, हुंदाई, होंडा, शेवरले, रेनॉल्ट, स्कोडा, टाटाच्या चारचाकी वाहनांची विक्री चांगली झाली. टाटाच्या नवीन गाड्यांना मागणी चांगली होती. शिवाय मारुतीच्या ब्रेझाला वेटिंग कायम आहे. दुचाकी वाहन बाजारात होंडा, हिरो या कंपन्यांच्या गाड्यांना मागणी होती. याशिवाय यामाहा, टीव्हीएस आणि सुझुकीच्या स्कूटर आणि मोटारसायकलला चांगलीच मागणी होती. अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर पाचशे ते सहाशे गाड्यांची विक्री झाल्याचा अंदाज वाहन विक्रेत्यांनी वर्तविला आहे. याशिवाय वाणिज्यीक वापरासाठी गाड्यांची चांगली विक्री झाल्याची माहिती वाहन विक्रेत्यांनी दिली.

अक्षय तृतीयाचा मुहूर्त वाहन विक्रेत्यांसाठी चांगला ठरला. पाडव्या सारखी खरेदी झाली नाही. मात्र, वाहन बाजाराला अक्षय तृतीयाने सावरले. - मनिष धूत, अध्यक्ष, चेंबर्स ऑफ मोटर्स डिलर्स असोसिशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिजात महाराष्ट्र’सोहळा महाराष्ट्र दिनी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
टाइम्स ग्रुप आणि हिरण्य फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सोमवारी (१ मे) सायंकाळी ‘अभिजात महाराष्ट्र’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या असीम आत्मीयतेने आपण स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन साजरा करतो, त्याच जाणिवेने हिरण्य फाऊंडेशनतर्फे गेली तीन वर्ष महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने हिरण्य रिसॉर्टसच्या प्रशस्त लॉन्सवर ‘अभिजात महाराष्ट्र’ ही शास्त्रीय संगीताची मैफल आयोजित करण्यात आली आहे.
आपल्या प्रांतातल्या उदयोन्मुख कलावंताला हक्काच व्यासपीठ देणे आणि औरंगाबादच्या रसिकांना भारताच्या कानाकोपऱ्यातील प्राचीन पण सहसा न ऐकलेल्या वाद्यांना ऐकण्याची पर्वणी देणे, असे साधारण स्वरूप आहे. या वर्षीच्या मैफलीत सर्वप्रथम आपल्या गायनाने रंग भरणार आहेत अंबाजोगाईचे उदयोन्मुख कलाकार ओंकार देगलूरकर आणि त्यानंतर बेंगलुरूच्या ख्यातनाम ‘घटम’ स्त्री वादिका सुकन्या रामगोपाल आणि त्यांच्या महिला साथीदार रंजिनी व्यंकटेश (मृदंगम) आणि भाग्यलक्ष्मी एम. कृष्णा (मोर्चिंग) त्यांच्या ‘स्त्री ताल तरंग’ च्या ‘लाया राग समर्पण’ या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाने मैफलीचा समारोप करणार होईल. सर्वांसाठी खुला असलेल्या या शास्त्रीय संगीताच्या मैफलीचा लाभ जास्तीत जास्त औरंगाबादकरांनी घेण्याचे आवाहन हिरण्य रिसोर्टचे संचालक सुनीत आठल्ये व मेधा आठल्ये यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ सिंघम गेले; दबंग आले!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुंबई येथे बदली झालेले शहर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या जागी ठाणे येथील अप्पर पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यादव यांनी शुक्रवारी सायंकाळी अमितेशकुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला.
यशस्वी यादव यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९७५ रोजी झाला. वयाच्या अवघ्या पंचवीसाव्या वर्षी वर्ष २०००मध्ये ते आयपीएस झाले. यादव यांनी रुकी आयआयटी कॉलेज येथून बी टेक कम्युटर सायन्स व टेक्नॉलॉजी तसेच दिल्ली येथील आयआयएफटीमधून इंटरनॅशनल बिझनेसमध्ये एमबीए केले आहे. यापूर्वी सहायक पोलिस अधीक्षक भुसावळ, जळगाव, गडचिरोली तसेच उपायुक्त म्हणून नागपूर येथे काम पाहिले आहे. नागपूर पोलिस अधीक्षक व कोल्हापूर पोलिस अधीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. यानंतर उत्तरप्रदेशातील कानपूर व लखनौ येथे एसएसपी म्हणून काम पाहिले. त्यांच्याकडे उत्तर प्रदेशात ऑफिसर इंचार्ज पोलिस मॉर्डनाझयटेशनचा अतिरिक्त कारभार होता. कानपूरचे डीआयजी म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे गुन्हेगारांचा कसा बीमोड करता येऊ शकतो याचे प्रात्याक्षिक त्यांनी लखनौ व कानपूरमध्ये केले. त्यांच्या या योजनेचे कौतुक पोलिसांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने केले आहे. याबद्दल त्यांना २०१६मध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. लखनौ व कानपूरमध्येच डायल १०० ही सेवा सुरू केली. अन्य शहरांपेक्षा या दोन शहरामध्ये पोलिस आठ मिनिटांच्या आत घटनास्थळी पोचले आहे. पोलिसांचा घटनास्थळी पोचण्याचा कालावधी कमी आणण्यात त्यांना यश मिळाले होते. २००७मध्ये त्यांना आयबीएम इनोव्हेशनचा पुरस्कार मिळालेला आहे. भारतातील पहिले सीसीटीव्ही शहर म्हणून लखनौने नाव लौकीक मिळवला. त्यासाठी यादव यांना उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरवले आहे. गंभीर दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील निवडणूक शांततेत घेतल्याबद्दल निवडणूक आयोगाने त्यांना गौरवित केले होते. सायबर क्राइम संदर्भातील गुन्हे हाताळण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे.

उत्कृष्ट खेळाडू
जेष्ठांच्या जागतिक स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत यादव यांनी भारतीय संघाचे दोन वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच पोलिस व त्यांच्या कुटुंबीयासाठी देशातील पहिली पोलिस मॅरेथॉन स्पर्धा त्यांनी आयोजित केली होती. या स्पर्धेत पाच हजारापेक्षा जास्त पोलिस व त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग नोंदवला होता. या शिवाय त्यांना पंतप्रधान पुरस्कार, राजीव गांधी लोक प्रशासन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटी परिषदेचे उदघाटन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सीए इन्स्टिट्यूटच्या औरंगाबाद शाखेतर्फे दोन‌ दिवसीय जीएसटी‌ परिषद (गुड्स अँड सर्व्हिस कॉन्फरन्स)चे उदघाटन शुक्रवारी सीए इन्स्टिट्यूट एमआयटी परिसरात करण्यात आले. वेस्टर्न इंडिया रिजन कौन्सिलच्या औरंगाबाद सीए शाखेतर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
परिषदेच्या उदघाटनाला विक्रीकर विभागाच्या अतिरिक्त आयुक्त चित्रा कुलकर्णी, औरंगाबादच्या सहआयुक्त दीपा मुधोळ, सीसीएम मेंबर आणि इनडायरेक्ट टॅक्स कमिटीचे सीए प्रफुल छाजेड, मुख्य वक्ते मंगेश किनारे आदींची विशेष उपस्थिती होती. चार्टर्ड अकाऊंटंट यांची जीएसटीमध्ये विशेष भूमिका राहणार आहे. जीएसटी म्हणजे काय यासाठी काय करावे लागते, विविध परिषदा, कार्यशाळा घेऊन व्यापारी आणि असंघटित क्षेत्रातील लोकांना हे सांगणे सीएंची जबाबदारी आहे. यासाठी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. याशिवाय विविध मान्यवरांनी त्यांच्या विविध विषयांवर मनोगत व्यक्त करत जीएसटी विषयी तांत्रिक माहिती दिली. यावेळी स्थानिक शाखेचे अध्यक्ष अल्केश रावका, सीए उमेश शर्मा यांच्यासह ५०० जणांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...जय जय बसवण्णा!

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘मजहून नसे कोणी लहान,
शिवभक्ताहून नसे कोणी महान
तुमच्या चरणांची साक्ष, माझ्या मनाची साक्ष
कुंडलसंगमदेवा, मज हेची प्रमाण,’
या बसवचनास स्मरून शहरात शुक्रवारी जगदज्योती महात्मा बसवेश्वर महोत्सव समितीच्या वतीने महात्मा बसवेश्वरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
आकाशवाणी चौकामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये खासदार चंद्रकांत खैरे, समितीचे अध्यक्ष शिवा खांडगुळे उपस्थित होते. ध्वजारोहण कार्यक्रम व प्रतिमा पूजनानंतर समितीच्या वतीनेही वाहन फेरी काढण्यात आली. तत्पूर्वी जगतज्योती महात्मा बसवेश्वर व जगदगुरू एकोरामाराध्य महास्वामी जयंती महोत्सवाच्या वतीने चार दिवसीय जयंती महोत्सव साजरा झाला. पहिल्या दिवशी आ. कृ. वाघमारे शालेय मैदानावर आंतरशालेय खो-खो स्पर्धांनी महोत्सवाची सुरुवात झाली. हनुमान मंदिर, हनुमार नगर येथे स्मिता कोठाळे, सुलोचना लकडे व अनिता खांडगुळे यांनी पुढाकार घेत रांगोळी स्पर्धा घेतली. बुधवारी मयूर पार्क येथे चित्रकला स्पर्धा व गुरुवारी संजयनगरमध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. रुपाली औटे, वर्षा गुळवे, मोधे परिवार, संगीता होनराव, सुनिता मेने, सरस्वती कोठुळे, गवंडर, गुळवे, माठे, कोठाळे, हुंडीवाले यांनी उर्वरित दोन स्पर्धांसाठी परीश्रम घेतले. जयंती महोत्सवासाठी ज्ञानेश्वर खर्डे, वीरभद्र गादगे, भरत लकडे, शिवा स्वामी, शेखर कोठुळे, दत्ताविजय गुळवे, दीपक उरगुंडे, देवीदास उंचे, भगवान तिळकरी यांनी परिश्रम घेतले.

शिवा संघटनेच्या वतीने अभिवादन
अखिल भारतीय जगतज्योती वीरशैव युवक संघटनेच्या वतीने महात्मा बसवेश्वरांची ८८६ वी जयंती शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी महात्मा बसवेश्वर चौक, आ​काशवाणी येथे समाजबांधवांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम झाला. यावेळी संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे व शिवसेना उपनेते तथा खासदार चंद्रकांत खैरे, महापौर भगवान घडमोडे, जयंती अध्यक्ष प्रदीप बुरांडे, कार्याध्यक्ष मारोती धुपे, कोषाध्यक्ष संजय चोपडे उपस्थित होते. यावेळी जगनाथअप्पा वाडकर व वृषाली स्वामी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वाहन फेरीही काढण्यात आली. आकाशवाणी चौक, मोंढा नाका, क्रांतीचौक, नूतन कॉलनी, पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक, शहागंज, चेलीपुरा, जिल्हाधिकारी कार्यालय, हडको कॉर्नर, टी.व्ही. सेंटर चौकमार्गे स्वामी विवेकानंद उद्यान येथे बसवेश्वरांच्या नियोजित अश्वारुढ पुतळयाच्या नियोजित जागी फेरीचा समारोप झाला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, उपमहापौर स्मिता घोगरे, भाजप अध्यक्ष किशनचंद तनवाणी, मोहन मेघावाले, नंदकुमार घोडेले, राजेंद्र जंजाळ, गजानन मनगटे, मारोतीअप्पा धुपे, अशोक फुलशंकर, अशोक बसापुरे, नगरसेविका शोभा बुरांडे, शिल्पाराणी वाडकर, ऋषिकेश खैरे, सचिन खैरे, प्रसिद्धीप्रमुख प्रभाकर पटणे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुंबलेल्या नाल्यांची उपमहापौरांकडून पाहणी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर स्मिता घोगरे यांनी शुक्रवारी पंचकुवाँ नाला व बारूदगर नाल्याची पाहणी केली. हे दोन्हीही नाले तुंबलेले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तुंबलेल्या नाल्यांमुळे पावसाळ्यात अपघाताची शक्यता लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने नाल्यांची साफसफाई करण्याचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली.
स्मिता घोगरे यांनी आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्या नावाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पंचकुवाँ आणि बारूदगर नाल्याची पाहणी झोन अधिकारी भालचंद्र पैठणे यांच्यासह केली. दोन्हीही नाल्यांची अवस्था फारच बिकट आहे. पंचकुवाँ नाल्यात प्लास्टिक बॅग, थर्माकोल व इतर कचरा मोठ्या प्रमाणावर साचलेला आहे. त्यामुळे नाल्याचा नैसर्गिक प्रवाह खंडित झालेला आहे. पुलाला संरक्षित भिंत व कठडे नसल्यामुळे रोज अपघात होतात. बारूदगर नाल्याची देखील अशीच स्थिती आहे. प्रशासनातर्फे योग्य ती कारवाई करण्यात येत नसल्यामुळे नाले तुंबलेले आहेत. हे दोन्हीही नाले आवश्यक ती यंत्रसामुग्री वापरून स्वच्छ करण्यात यावेत, अशी मागणी घोगरे यांनी केली आहे.

दंडात्मक कारवाई करा
‘पावसाळा सुरू होण्यासाठी एक महिना असून त्यापूर्वी नाले स्वच्छ करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना द्या,’ अशी सूचना घोगरे यांनी आयुक्तांना केली आहे. ‘नाल्यात कुणीही कचरा टाकू नये यासाठी जनजागृती बरोबरच दंडात्मक कारवाई करा,’ असे त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएमसी’साठी ‘स्थायी’ची तगमग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दीडशे कोटींच्या कामासाठी पीएमसी (प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार) नियुक्त करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीला खुणावू लागला आहे. स्थायी समितीची मुदत संपतासंपता हा प्रस्ताव मंजूर करण्याची संधी मिळावी, यासाठी काही सदस्यांची तगमग सुरू झाली आहे. त्यामुळे स्थायी समितीची बैठक तातडीने आयोजित करण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकला जात आहे.
स्थायी समितीमधील १६पैकी आठ सदस्य ३० एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत. नवीन आठ सदस्य नियुक्त करण्यासाठी शनिवारी महापौर भगवान घडमोडे यांनी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. विद्यमान आठ सदस्यांची मुदत रविवारी संपणार आहे. निवृत्त होताना एखादा ‘मोठा’ प्रस्ताव हाती लागावा यासाठी प्रयत्न केले जात होते. या प्रयत्नांना यश आले, पण ते पदरात पडण्याची शक्यता वेळेअभावी कमीच असल्याचे चित्र निर्माण झाले. हातातोडांशी आलेला घास हिरावून घेतला जातो की काय या कल्पनेने तगमग सुरू झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; शहरात येत्या काळात रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. त्यासाठी १५० कोटी रुपयांचा निधी मिळावा म्हणून महापालिकेने शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. शासनाने हा निधी देण्यास तत्वतः मान्यता दिली आहे. महापालिकेने रस्त्यांच्या कामाचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) सादर करावा. त्यानंतर निधी दिला जाईल, अशी अट शासनाने घातली आहे. या कामाचा डीपीआर तयार करण्यासाठी ‘पीएमसी₨ नियुक्त करण्याचा प्रस्ताव तयार करून तो स्थायी समितीच्या समोर ठेवण्याची सूचना तत्कालीन महापौर त्र्यंबक तुपे यांनी प्रशासनाला केली. त्या सूचनेनुसार प्रशासनाने दोन वेळा पीएमसी नियुक्तीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला. ‘तपशीला’सह प्रस्ताव ठेवा, अशी सूचना करून स्थायी समितीने दोन्ही वेळेस प्रस्ताव स्थगित ठेवला.
आता मुदत संपण्यासाठी एक दिवस बाकी असताना स्थायी समितीला पीएमसी नियुक्तीची आठवण झाली. दीडशे कोटींच्या रस्त्यांच्या कामासाठी पीएमसी नियुक्तीचा प्रशासनाने तयार केलेला प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत यावा, यासाठी खुद्द सभापती मोहन मेघावाले शुक्रवारी प्रयत्न करीत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; स्थायी समितीची बैठक तातडीने आयोजित करण्यासाठी सभापतींच्या कार्यालयातून सचिव कार्यालयाला कळविण्यात आले, पण सचिव कार्यालयाने नियमावर बोट ठेवून बैठक आयोजित करण्यास असमर्थता दर्शवली. स्थायी समितीमधील आठ सदस्यांचा कार्यकाळ शनिवारी संपत असल्यामुळे व त्यासाठी एकच दिवस शिल्लक असल्यामुळे बैठक आयोजित करणे शक्य नाही. स्थायी समितीची बैठक एखाद्या विषयासाठी आयोजित करायची असेल, तर त्यासाठी आयुक्तांच्या मंजुरीची गरज असते. शिवाय किमान ४८ तास अगोदर बैठकीची विषयपत्रिका काढणे बंधनकारक असते, असे सचिव कार्यालयातर्फे सभापतींच्या कार्यालयाला कळविण्यात आले. स्थायी समितीची तातडीची बैठक आयोजित करण्यासाठी नियमांचा अडसर निर्माण झाल्यामुळे ‘स्थायी समिती’ची तगमग जास्तच वाढली आहे.

पीएमसीला अडीच टक्के मानधन
दीडशे कोटींच्या रस्त्यांचा डीपीआर तयार करण्यासाठी पीएमसीला अडीच टक्के मानधन दिले जाणार आहे. पीएमसीला पावणे चार कोटी रुपये मानधन मिळणार आहे, पण त्यासाठी स्थायी समितीची मंजुरी आवश्यक आहे. ‘प्रथा परंपरा’ जपल्याशिवाय स्थायी समितीमध्ये प्रस्ताव मंजूर होत नाहीत. त्याची ‘जाणीव’ मावळत्या स्थायी समितीला झाल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांनी पळवला लाखाचा ऐवज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विविध दोन घटनात संशयित महिला आरोपींनी एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. टाउन हॉल परिसरातील एका हॉलमधून व उस्मानपुरा भागातून रिक्षातून हा ऐवज लंपास करण्यात आला. याप्रकरणी सिटीचौक व उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महापालिकेसमोरील डायमंड फंक्शन हॉलमध्ये बुधवारी रात्री एक घटना घडली. येथील एका लग्नसमारंभात शेख ‌अतिक शेख अब्दुल गफार (रा. रहेमानिया कॉलनी) यांची आई गेली होती. शेख आतिक यांची आई व भावजय जेवत करताना अनोळखी बुरखाधारी महिलांनी त्यांची पर्स लांबवली. पर्समध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम, असा ६२ हजारांचा ऐवज होता. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलांनी पर्स लांबवण्याची दुसरी घटना बुधवारी सायंकाळी उस्मानपुरा भागता घडली. जाकिरा सय्यद जिलानी (वय ४५, रा. नुरानी मज्जीदजवळ मिलींदनगर) या महिलेने नातेवाईकासोबत उस्मानपुरा येथील ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्याचे दागिने खरेदी केले होते. सोने खरेदी करून त्या रिक्षामधून पीरबाजारकडून मिलींदनगरकडे येत होत्या. त्यावेळी सहप्रवासी असलेल्या दोन महिलांनी त्यांच्या पर्समधील ३७ हजार रुपये किंमतीचे दागिने लांबवले. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयएमचे देशी दारूविरुद्ध आंदोलन

$
0
0

म. टा. प्रति‌निधी, औरंगाबाद
चेलीपुरा येथील देशी दारूचे दुकान फोडल्याप्रकरणी आमदार इम्तियाज जलील यांच्यासह कार्यकर्त्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी दुपारी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी सिटीचौक पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले. त्यांनी यावेळी सर्वांना अटक करण्याची मागणी केली.
चेलीपुरा येथील देशी दारूचे दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी एमआयएमतर्फे सोमवारी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी दुकानाची तोडफोड करण्यात आली होती. त्याबद्दल सिटीचौक पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात गुरुवारी सायंकाळी दरोड्याचे कलम वाढवण्यात आले. याची माहिती शुक्रवारी सोशल मिडियाद्वारे पसरली. त्याच्या निषेधार्थ व स्वतःला अटक करून घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी अनेक कार्यकर्ते सिटीचौक पोलिस ठाण्यासमोर जमले. त्यांनी आमदार इम्तियाज जलील यांच्या समर्थनाच्या घोषणा दिल्या. या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, डॉ. गफ्फार कादरी, अरूण बोर्डे, आरेफ हुसेनी, नासेर सिद्दिकी, शेख सलीम, शेख रफिक, गंगाधर ढगे, आकाश एडके, सुभाष वाघुले यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

व्यापी वाढवणार

या आंदोलनात सामील होऊन आमदार इम्तियाज जलील यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. धार्मिक स्थळ आणि शैक्षणिक संस्‍थाजवळील दारू दुकाने बंद करण्यासाठी दीड वर्षांपासून पत्रव्यवहार केला आहे. पण, दुकाने बंद होत नसल्याने तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी गुन्ह्याची कलमे आणखी वाढवावीत, आम्ही जनतेसाठी गुन्हे दाखल करून व अटक करून घेण्यास तयार आहोत, असे आमदार म्हणाले. यापुढील काळात आंदोलनाची व्यापी वाढवण्याचे जाहीर करण्यात आले.

बंदचा प्रस्ताव पाठवणार

आंदोलन सुरू असताना पोलिस आयुक्त अमितेश कुमार हे सिटीचौक पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी आमदार इम्तियाज जलील व कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. शहागंज भागातील तीन देशी दारू दुकाने बंद करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शासकीय तूर खरेदी आदेशाची होळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
तूर खरेदी करणार या राज्य शासनाच्या घोषणेला पाच दिवसांचा व तूर खरेदीचे आदेश काढून दोन दिवसांचा कालावधी लोटल्यावरही अद्याप खरेदी सुरू झालेली नाही. या निषेधार्थ पैठणमध्ये शेतकऱ्यांनी शासकीय आदेशाची होळी करून निषेध व्यक्त केला.
शेतकऱ्यांची संपूर्ण तूर २२ एप्रिलपर्यंत खरेदी करण्यात आली नसल्याने शिल्लक तूर खरेदी करण्याची घोषणा पाच दिवसांपूर्वी राज्य शासनाने केली होती. त्यासंबंधीचे आदेश गुरुवारी बाजार समितींना देण्यात आले. आदेश प्राप्त झाल्यानंतरही अद्याप पैठण येथील शासकीय तूर खरेदी केंद्रावर खरेदी सुरू करण्यात आलेली नाही. खरेदी कधी सुरू करणार याविषयी बाजार समितिकडून निश्चित दिवस सांगितला जात नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी अन्नदाता शेतकरी संघटनेचे नेते जयजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तूर खरेदीसंबंधीच्या शासन आदेशाची होळी केली. यावेळी शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

वाहनभाड्याची चिंता
जवळपास २०० ते २५० शेतकऱ्यांनी तूर खरेदी केंद्रात आणलेली आहे. ते आठ दिवसांपासून प्रतीक्षा करत वाहनांतच झोपत आहेत. दुसरीकडे वाहनभाडे वाढत असल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत. दरम्यान, बाजार समिती प्रशासनकडे तूर खरेदी कधी सुरू करणार याची विचारणा केली असता अधिकारी व कर्मचारी उत्तर देण्यास टाळत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलसंपदामंत्र्यांचा आदेश धुडकावला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्यातून वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी पाणी सोडण्याबाबत कालवा सल्लागार समितीच्या बेठकीत दिलेला आदेश नाशिक पाटबंधारे विभागाने धुडकावला आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांसाठी कालव्यातून उन्हाळी आवर्तन सुटण्याची शक्यता कमी झाली आहे.
वैजापूर व गंगापूर तालुक्यात सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यात दीडशे टँकरने पाणी पुरवले जात असून उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालल्याने टँकरची मागणी सुद्धा वाढत आहे. नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाने कालव्यातून दोन्ही तालुक्यांसाठी उन्हाळी आवर्तन सोडण्याचे नियोजन केले आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणात १३२० अब्ज घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी जलदगती कालव्यातून सोडल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. त्यामुळे पाटबंधारे विभागाला त्वरित कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी मुख्यमंत्र्याना पाठवलेल्या पत्रात करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांना पत्र
आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना पत्र पाठवुन कालव्यातुन पाणी सोडण्याची विनंती केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विद्यापीठाची प्रतिमा उंचावावी’

$
0
0

औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला समता, बंधुता आणि सामाजिक न्याय मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अशा महामानवाच्या नावाने चालणाऱ्या या विद्यापीठाची बदनामी करण्याचे प्रयत्न हाणून पडून प्रतिमा उंचावण्याचे सामूहिक प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन वृत्तपत्रविद्या विभागप्रमुख डॉ.सुधीर गव्हाणे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील महात्मा फुले सभागृहात वृत्तपत्रविद्या विभागप्रमुख डॉ.सुधीर गव्हाणे, सहयोगी प्राध्यापक प्रा. जयदेव डोळे व माजी बीसीयूडी डॉ. एस. पी. झांबरे (प्राणीशास्त्र विभागप्रमुख) यांचा सेवागौरव समारंभ शुक्रवारी सायंकाळी झाला. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे अध्यक्षस्थानी होते. कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राध्यापकाच्या आयुष्यात सेवानिवृत्ती असत नाही. त्याने आयुष्यभर समाजासाठी कार्यरत राहिले पाहिजे, असे कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले. कुलसचिव डॉ. जबदे यांनी या प्राध्यापकांचा कार्याचा गौरव केला. यावेळी डॉ. काशीनाथ रणवीर, डॉ. फराह गौरी यांनीही मार्गदर्शन केले. संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्रराग हासे यांनी आभार मानले.

आपण या विद्यापीठात शिकलो नाहीत, तरीही येथे काम करताना विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून नावलौकिक मिळाला.
- प्रा. जयदेव डोळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ४० वर्षे अध्यापन, संशोधन कार्य करता आले, याचा अभिमान वाटतो.
- डॉ. एस. पी. झांबरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहन परवान्याची कामे ग्राहक केंद्रांतून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वाहन परवान्यांसंबधीचा कामे करण्यासाठी जिल्ह्यात ६०५ ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. त्यामार्फतच सर्व केले केली जातील व नागरिकांनी केंद्रातील सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी केले.
प्रादेशिक परिवहन कार्यालयातून परवाना घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, शुल्क भरणे ही कामे करण्याकरिता राज्यभरात ग्राहक सेवा केंद्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्हयात ६०५ केंद्र देण्यात आली आहेत. परवान्यासाठी अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, शुल्क भरणे यासाठी २० रुपये नाममात्र शुल्क निर्धारित केले आहे. याशिवाय परवान्यांसंबंधी कोणतेही शुल्क डेबिट व क्रेडिट कार्ड, मोबाइल बँकिंग, एसबीआय पे अॅपद्वारे घेण्याची सोय या केंद्रांवर राहणार आहे. या ग्राहक सेवा केंद्रांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन शेळके यांनी केले आहे.
तीन महिन्यांपूर्वी एका खासगी संस्थेकडून ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यात आले होते. पण, सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी ते बंद होते. केंद्र बंद असल्याची माहिती उशिरा मिळाल्याची माहिती आरटीओतील सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध वाळूप्रकरणात वर्षभरात ३०३ गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोट्यवधींच्या वाळूपट्ट्यांच्या लिलावाला धाब्यावर बसवून वाळूचोरी करण्याचे काम केवळ औरंगाबाद जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण मराठवाड्यात होत आहे. प्रशासनाने वाळूतस्करांविरुद्ध कडक धोरण अवलंबले आहे. गेल्या वर्षभरात वाळूचोरीप्रकरणात बीड जिल्ह्यामध्ये चौघांवर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर ९२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मराठवाड्यातील स्वतंत्र आणि संयुक्त अशा ३६२ वाळूपट्ट्यांपैकी केवळ ११८ वाळूपट्ट्यांचा लिलाव झाला असून, वर्षभरात मराठवाड्यात वाळूचोरी, अवैध उत्खनन तसेच वाहतुकीचे तब्बल ५ हजार ५४० प्रकरणे आहेत, प्रत्येक जिल्ह्यात वाळूतस्करांनी उच्छाद मांडला असून, आता चौथ्यांदा लिलाव करण्यात आल्यानंतरही कंत्राटदारांनी लिलावाकडे पाठ फिरवली आहे. वाळूसाठ्यांची भरसमाठ किंमत, किचकट नियमांमुळे कंत्राटदारांनी चार महिन्यांपासून वाळूपट्टा लिलावाला प्रतिसाद दिलेला नाही. १५ ते २० टक्के दर कमी करून चार वेळेस वाळूपट्ट्यांचे फेरलिलाव केले होते. गौणखनिज, अवैध वाळूउपसा व वाहतुकप्रकरणी सर्वाधिक १०४ गुन्हे जालना जिल्ह्यात दाखल करण्यात आले आहेत, तर बीड जिल्ह्यात चौघांविरुद्ध ‘एमपीडीए’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ७८, तर परभणीत ४६, हिंगोलीत २, नांदेड ५८, बीड ८ तर उस्मानाबाद जिल्ह्यात ७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महसूल, पोलिसांच्या संगन्मतामुळे प्रत्येक जिल्ह्यात वाळूची तस्करी सुरू असल्याचा आरोप होतो, वाळूच्या गाड्याही पोलिसांच्याच असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांच्या नजरेसमोरून वाळूचे ट्रक पळवण्यात येतात तरीही यात कारवाई होत नाही. गौण खनिजाबाबत महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे आठही जिल्ह्यांमध्ये वाळूतस्कर बिनदिक्कतपने चोरीचा फंडा वापरत आहेत.

परवाने रद्द का नाही?
अवैध वाळू वाहतकू करणारे वाहन पकडल्यास पाचपट दंड आकारण्यात येतो, वारंवार एकच वाहन पकडण्यात येते, तस्करही पाचपट दंड भरून गाडी सोडवून घेऊन जातो. वारंवार कारवाई केलेल्या वाहनांचा परवाना रद्द करण्याची गरज अाहे, मात्र त्यांच्याविरुद्ध अशी कारवाई केली जात नाही.

६ अधिकाऱ्यांवर हल्ले
वाळूतस्करांना मोकळे रान असल्यामुळे चोरी पकडण्यासाठी गेलेल्या पथकावरही हल्ला करायला मागे पुढे पाहत नाहीत. वर्षभरात ६ शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकावर हल्ला करण्याची हिंम्मत या तस्करांनी दाखविली. औरंगाबाद जिल्ह्यात १, जालना जिल्ह्यात ३ तर परभणी व उस्मानाबाद जिल्ह्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचे प्रत्येक १ प्रकरण घडले आहे.

जिल्हानिहाय गुन्हे
जिल्हा.............गुन्हे....आरोपी अटक.....जप्त वाहने
औरंगाबाद.........७८...........४४.................५३
जालना.............१०४..........४६................००
परभणी............४६............०२................००
हिंगोली............०२............००................००
नांदेड...............५८............००................०२
बीड.................०८............००................००
लातूर..............००............००................००
उस्मानाबाद......०७............०१................८३
एकूण..............३०३..........९२...............१३९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images