Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

२७ पाणीपुरवठा योजनांची वीज तोडली

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वीज बिल थकबाकीदारांविरोधात महावितरणची धडक मोहीम सुरू आहे. बिले न भरणाऱ्या १७६५ वीज ग्राहकांचा एक कोटी ३७ लाख १९ हजार रूपये थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला, तर सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या २७ वीज जोडण्यांचा वीजपुरवठा १९ लाख ९४ हजार रुपयांसाठी खंडित करण्यात आला.
औरंगाबाद शहर मंडल अंतर्गत वीज बिले न भरणाऱ्या ७३० ग्राहकांचा ६८ लाख ७५ हजार रुपयांच्या थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित केला. १३ ग्राहकांचा वारंवार सूचना, नोटीस बजावूनही दखल न घेणाऱ्या सात लाख ९५ हजार रुपये थकबाकीसाठी वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित केला. तर ७७९ ग्राहकांकडून ३६ लाख ४२ हजार रुपये वीज बिलापोटी वसूल केले.
औरंगाबाद ग्रामीण मंडल अंतर्गत वीज बिले न भरणाऱ्या २८९ ग्राहकांचा १४ लाख ७० हजार रुपये थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित केला. १० ग्राहकांना वारंवार सूचना, नोटीस बजावूनही दखल न घेणाऱ्या ९५ हजार रुपये थकबाकीसाठी वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित केला, तर २०९ ग्राहकांकडून ११ लाख २९ हजार रुपये वीज बिलापोटी वसूल केले.
जालना जिल्हयात वीज बिले न भरणाऱ्या ७४६ ग्राहकांचा ५३ लाख ७४ हजार रुपये थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित केला. तर २११ ग्राहकांकडून पाच लाख दोन हजार रुपये वीज बिलापोटी वसूल केले. औरंगाबाद ग्रामीण मधील सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या २७ वीज जोडण्यांचा १९ लाख ९४ हजार रुपये थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला. तर आठ वीज जोडण्यांकडून एक लाख ३५ हजार रुपये वसूल करण्यात आले.

वीज चोरी आढळल्यास गुन्हे
वीज ग्राहकांनी आकडे टाकून, मीटरमध्ये छेडछाड करून विजेचा वापर करू नये. महावितरण पथकास मीटर तपासणी मोहिमेत वीज चोरीचे असे प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर विद्युत कायदा २००३नुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा. वीज ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीज बिले भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तपास सीआयडीकडे; आईचे उपोषण मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘माझ्या मुलाच्या अपघाताचा तपास करा. अपघाताला कारणीभूत कोण, याचा शोध घ्या,’ अशी मागणी करीत ५४ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या मीनाबाई रघुनाथ म्हस्के (रा. त्रिवेणीनगर, सिडको, एन-७) यांनी उपोषण सोमवारी उपोषण मागे घेतले. त्यांना जिल्हा प्रशासनातर्फे सीआयडीमार्फत तपास करण्यात येईल, असे पत्र देण्यात आले आहे.
मीनाबाई म्हस्के यांचा मुलाग सतीश यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. मुलाच्या मृत्यूच्या तपासासाठी आईने १५ मार्चपासून उपोषण सुरू केल्यामुळे जिल्हा प्रशासनावर दबाव आला होता. जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी मीनाबाई म्हस्के यांची भेट घेतली. याप्रकरणी सोमवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत सतीश रघुनाथ म्हस्के यांच्या मृत्यूचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. सतीश म्हस्के याचा २१ एप्रिल २०१६ रोजी अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदर्श शिक्षक प्रस्ताव वादात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. यंदा प्रस्ताव पाठविण्यावरून शिक्षण उपसंचालक कार्यालयात मंगळवारी उपसंचालक आणि शिक्षकांमध्ये खडाजंगी झाली. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर मूल्यांकनासाठी आज शेवटची तारीख होती. अनेक शिक्षकांना हे रात्री सांगण्यात आले, त्यामुळे अनेक शिक्षक उशिरा पोचले. ठराविक शिक्षकांना पुरस्कार मिळावा म्हणून अंधारात ठेवत ही प्रक्रिया पार पडल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे, तर १६३पैकी ५७ प्रस्तावच मुदतीत सादर करण्यात आले.
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी मागील महिन्यात शिक्षकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. त्यानंतर विभागातील शिक्षकांना अर्जासोबत भरलेली माहिती पुराव्यासह घेऊन शिक्षणउपसंचालक कार्यालयात हार्ड कॉपी जमा करायची होती. सोमवारी ही प्रकिया होणार होती, परंतु अनेक शिक्षकांना शिक्षणाधिकाऱ्यांनी याची माहितीच दिली नाही. अनेकांना सोमवारी रात्री उशिरा याची कल्पना देण्यात आल्याने मंगळवारी विविध जिल्ह्यांतील शिक्षकांनी पुरावे, कागदपत्रांसह उपसंचालक कार्यालय गाठले. तोपर्यंत प्रक्रिया संपली होती. प्रक्रियेबाबत प्रशासनातील गोंधळ लक्षात आल्यानंतर शिक्षकांनी उपसंचालकांना घेराओ घातला. जाब विचारत, प्रक्रियेमधील गोंधळ झाल्याचा, भ्रष्टाचाराचा आरोप केला. अंधारात ठेवून ठराविक शिक्षकांच्याच प्रस्तावांचे मूल्यांकन केले. रात्री उशिरा याबाबत माहिती देण्यात आली. त्यामुळे इतर जिल्ह्यातून औरंगाबादला लगेच येणे कसे शक्य आहे. ज्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या नाहीत त्यांच्यावर काय कारवाई करणार, अशा प्रश्नांचा भडीमार शिक्षकांनी केली.
प्रशासनाच्या गोंधळात संधी हुकणार असल्याने शिक्षकांमध्ये नाराजी होती तर, उपसंचालकांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. हा गोंधळ तासभर सुरू होता. प्रक्रियेला मुदतवाढ देण्यासाठी संचालक कार्यालयाकडे विचारणा करू, असे आश्वासन उपसंचालक वैजनाथ खांडके यांनी दिल्याचे शिक्षकांनी सांगितले. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि हिंगोली अशा पाच जिल्ह्यांतून १६३ शिक्षकांना कागदपत्रे, पुराव्यांसह मूल्यांकनासाठी बोलावणे अपेक्षित होते. अनेक शिक्षकांना त्याची माहिती नसल्याने ५७ शिक्षकांचेच प्रस्तावांचे मूल्यांकन होऊ शकले आहे. यावेळी उपसंचाकांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर चंद्रकांत चव्हाण, सुमती रत्नपारखी, अनिता चव्हाण, प्रताप देशपांडे, नितीन साळुंके, कृष्णा दहेतकर, सोनाली मुळे आदींची नावे आहेत.

प्रस्तावाबाबत शिक्षकांना उशिरा निरोप पोचल्याने थोडासा गैरसमज झाला. वरिष्ठ कार्यालयालाही याबाबत कळविले असून, प्रक्रियेला काही वेळ वाढवून देता येतो का, हे पाहतो आहोत.
- भास्कर बाबर, वरिष्ठ अधिकारी, शिक्षण उपसंचालक कार्यालय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ दहशतवादी संघटना इस्लामविरोधी

$
0
0

‘आयएस किंवा अल्-कायदा सारख्या संघटना स्वतःला इस्लामी संघटना असल्याचा दावा करतात. या दहशहतवादी कृत्ये करणाऱ्या संघटना इस्लामच्या मूलभूत शिकवणींची सर्वप्रथम कत्तल करत आहेत. अशा दहशतवादी संघटना कधीच इस्लामी किंवा मुस्लिम होऊ शकत नाही,’ असे मत शेख अबु जैद जमीर यांनी मांडले.
जमियत अहले हदीसतर्फे नुकत्याच झालेल्या विश्वशांती परिषदेत ते बोलत होते. जमियत अहले हदीस महाराष्ट्रचे अध्यक्ष सईद अहमद फैजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या परिषदेत शारजाह येथून आलेले ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना शैख जफरूलहसन मदनी, जमियत अहले हदीस महाराष्ट्रचे सचिव मौलाना फजलूर्रहमान मुहम्मदी, शहरातील विविध धर्मगुरू तसेच ज्येष्ठ पत्रकार शारेख नक्षबंदी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी शैख अबू जैद जमीर म्हणाले की, इस्लाम हा शांततेचा धर्म आहे. इस्लाम आणि ईमान हे या धर्माचे दोन अंग आहेत. इस्लामचा अर्थ होतो शांती आणि ईमानचा अर्थ होतो अमन. तरी अमन आणि शांती हाच इस्लाम धर्माचा मुळ गाभा आहे. अमेरिकेमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर वरील हल्ल्यानंतर जगभरात इस्लाम धर्माला हिंसेचा धर्म म्हणून बदनाम केले गेले. आयएस आणि अल्-कायदा सारख्या कुख्यात दहशतवादी संघटनांनी या आगीत तेल ओतण्याचेच काम केले. सौदी अरबसह अनेक इस्लामी देशांनी या संघटनांना त्वरित दहशतवादी संघटना घोषित करून त्यांच्यावर बंदी टाकलेली आहे. मानवता विरोधी कृत्ये करणाऱ्या अश्या लोकांना कृपया इस्लामचे प्रतिनिधी समजू नका. हे लोक कदापी इस्लामचे प्रतिनिधी होऊ शकत नाहीत. इस्लामचे प्रतिनिधी तर अल्लाहचे शेवटचे पैगंबर हजरत मुहम्मद होते. कुराण आणि हदीस मधेच तुम्हाला खरा इस्लाम कळू शकतो. अल्लाहने कुराण मध्ये फर्माविले की ज्याने कोणी एका निष्पाप जीवाला ठार केले. त्याचा गुन्हा इतका मोठा आहे, जसे की त्याने सर्व मानव जातीला समाप्त केले आणि ज्याने कोणाचे प्राण वाचविले त्याने सर्व मानव जातीला जीवदान दिले, असे ते म्हणाले.
शैख जफरूल हसन मदनी यांनी शांतीदूत पैगंबर मुहम्मद या विषयावर व्याख्यान दिले. ते म्हणाले की पैगंबर फक्त मुसलमानांसाठीच नव्हे तर सर्व मानवजातीसाठी पाठविलेले अल्लाहचे शेवट पैगंबर होते. अल्लाहने त्यांना सर्वस्वी शांतीदूत बनविले होते. पैगंबरांनी जनावरे, पक्षी व झाडांवरही माया करण्याची शिकवण दिली, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दानवेंनी हमी द्यावी; आत्महत्या थांबतील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
कर्जमाफी केल्यास शेतकरी आत्महत्या करणार नाही, अशी हमी विरोधकांनी दिल्यास कर्जमाफी देऊ, असे वक्तव्य करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा अन्नदाता शेतकरी संघटनेतर्फे पैठण येथे निषेध करण्यात आला. या संघटनेने दानवे यांच्याकडे अनेक बाबींची हमी मागितली आहे.
राज्यात शेतकऱ्यांची आत्महत्या वाढल्याने, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी सध्या विरोधक आंदोलन करत आहे. याविषयावर भाष्य करताना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले, कर्जमाफी दिल्यानंतर शेतकरी आत्महत्या करणार नाही, अशी हमी विरोधकांनी दिल्यास आम्ही कर्जमाफी देऊ, असे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचे आरोप अन्नदाता शेतकरी संघटनेचे नेते जयजीराव सूर्यवंशी यांनी केला आहे.
‘रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत याची हमी मागत आहेत. ते जर, गारपीट होणार नाही, अतिवृष्टी होणार नाही, पेरलेले सर्व बियाणे उगवेल, कोरडवाहू शेतीस किमान दोन संरक्षित पाणी देऊ, पेरणीच्या एक महिना आधी कर्ज पुरवठा करणार, शेतकऱ्यानी उत्पादित केलेले धान्य, कडधान्य, फळे, भाजीपाला सरकार खरेदी करेल, खते, बियाणे, कीटकनाशक यांच्या खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही यांची दानवे यांनी हमी घ्यावी. ही हमी घेतल्यास शेतकरी आत्महत्या करणार नाही, याची हमी आम्ही देऊ, असे म्हणत सूर्यवंशी यानी दानवे यांच्या वक्तव्याचा शिवाजी चौकात निषेध केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काटकसरीमुळे टँकर संख्या कमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
तालुक्यात यावर्षी अनेक गावात पाणी टंचाई आहे. पण, प्रशासनाने काटकसरीचे धोरण अवलंबल्याने टँकरची संख्या मर्यादित राहिली आहे. सध्या तालुक्यातील फक्त ३५ गावांना ४५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाणी पुरवठा करण्यासाठी ३८ गावामधील ४५ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टंचाई कमी असली तरी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे टँकरचे ३५ प्रस्ताव दाखल झाले आहेत.
यावर्षी मार्च महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवायला लागल्याने अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाकडे टँकरचे प्रस्ताव दाखल होण्यास सुरुवात झाली. मात्र, टँकर सुरू करण्याबाबत यावेळी प्रशासनाने कडक धोरण अवलंबले आहे. टँकरने पाणी पुरवठा होत असतांना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी झाल्याने आवश्यक असेल तरच टँकरद्वारे पाणीपुरवठा करा, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे यावर्षी टँकरची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत घटली आहे.
पाणी पुरवठा विभागाचे अभियंता के. पी. कड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या तालुक्यात माळीसागज, टाकळीसागज, बल्लाळीसागज, एकोडीसागज, खिर्डी हरगोविंदपूर, पालखेड, अमानतपूरवाडी, धोंदलगाव, लासूरगाव, बाभूळगाव बुद्रक, रघुनाथपूरवाडी, हाजीपूरवाडी, आघुर, लोणी, बाबतरा आदी गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकरची मागणी करणारे ३५ प्रस्ताव पंचायत समितीकड दाखल झाले आहेत. त्यापैकी २० प्रस्ताव भूवैज्ञानिक व उप अभियंता यांच्याकडे पाहणीसाठी देण्यात आले आहेत. त्यात जातेगाव, सिरसगाव, नायगव्हाण, शिऊर वस्त्या, आगरसायगाव, महालगाव, वांजरगाव, नगिनापिंपळगाव, पोखरी, भिवगाव, नांदगाव, टेंभी कऊटगाव मकरमतपूरवाडी, तिडी, नारळा, गोयगाव, निमगाव, चोरवाघलगाव, भोकरगाव व बाहेगाव या गावांचा समावेश आहे. मनेगाव बोलठाणवस्ती, नांदूरढोक वस्ती, बेलगाव, भायगाव वैजापूर, रोटेगाव व चांडगाव येथील प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या गावांची तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांची पाहणी बाकी आहे. कनकसागज, संजरपूरवाडी, पेंडेफळ, जरूळ, दसकुली, बाभुळतेल व आंचलगाव येथील प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्या शिफारशीच्या प्रतिक्षेत आहेत. प्राप्त प्रस्तावांपैकी केवळ बोरसर व नालेगाव या दोन गावांचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीनंतर या गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
दरम्यान, टंचाई असलेल्या गावात अन्य उपाययोजना कराव्यात, असे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा योजना सुरू असलेल्या गावात टँकरचे प्रस्ताव नाकारण्यात आले आहेत. त्यांना उपलब्ध पाण्याचा पिण्यासाठी वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तलवाडा, भादली, कांगोणी व पारळा या ठिकाणी विंधन विहिरी घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी कांगोणी व पारळा येथे विहिरींना चांगले पाणी लागल्याने तेथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या सुटला आहे, अशी माहिती कड यांनी दिली.

दोन प्रस्ताव अंतिम टप्प्यात
गेल्या वर्षी वैजापूर तालुक्यात तब्बल २२५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. मात्र यावर्षी ती संख्या घटून फक्त ४५ वर आली आहे. प्राप्त प्रस्तावांपैकी केवळ बोरसर व नालेगाव या दोन गावांचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीनंतर या गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरी जल आराखडा जून महिन्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दहा वर्षांपासून प्रलंबित असलेला गोदावरी खोरे एकात्मिक जल आराखडा अखेर जून महिन्यात सादर होण्याची शक्यता आहे. आराखडा समितीचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत निर्धारित १५ मे तारीख पुढे ढकलून अखेर जून महिन्यात आराखडा अहवाल सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मराठवाड्यातील नद्या व उपनद्यांचा सविस्तर आराखडा तयार करून पाणी धोरण ठरवण्यासाठी गोदावरी खोरे एकात्मिक जल आराखडा समिती नियुक्त करण्यात आली आहे. जलसंपदा, कृषी, जलसंधारण, पाणीपुरवठा, नगरविकास, उद्योग, पशुसंवर्धन, महसूल, वित्त, भूजल विकास, प्रदूषण या विभागांची प्रमाणित माहिती जमा करून गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने आराखडा तयार करावा. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दहा कॅबिनेट मंत्री असलेल्या जलपरिषदेने आराखड्याला मंजुरी देणे अपेक्षित आहे. गोदावरी पाटबंधारे महामंडळ गेल्या दहा वर्षांपासून आराखडा तयार करीत आहे. मराठवाड्यातील १२ उपनद्या व विदर्भातील १८ उपनद्यांचे उपखोरे असे पूर्ण गोदावरी खोरे आहे. या संपूर्ण पाण्याचे नियोजन करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. या समितीचे अध्यक्ष के. पी. बक्षी असून, एच. टी. मेंढेगिरी, प्रदीप पुरंदरे, एस. एल. भिंगारे, विजय परांजपे आदी तज्ज्ञ सदस्य आहेत. काही दिवसांपूर्वी ‘वाल्मी’ येथे झालेल्या बैठकीत गोदावरी खोऱ्यातील पाण्याच्या हिशेबासह आराखड्यावरील आक्षेपांवर सविस्तर काथ्याकूट झाला होता. समितीने ३० एप्रिलपर्यंत आराखडा सादर केल्यास अभ्यास करून १५ मेपर्यंत जलमंडळाकडे मंजुरीसाठी आराखडा सादर केला जाणार होता. जल परिषदेकडे १५ जूनपर्यंत आराखडा सादर करून ३० जुलैपर्यंत आराखड्याला जल परिषदेची मंजुरी मिळवण्याचे नियोजन होते. प्रत्यक्षात बैठकीनंतर वेगवेगळ्या तांत्रिक अडचणीमुळे आराखडा पूर्ण झाला नाही. याबाबत खंडपीठाने विचारणा केल्यानंतर रखडलेल्या आराखड्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
प्रलंबित आराखड्यावर शासनाने बाजू मांडत परिपत्रक प्रसिद्ध केले. आराखड्यात अंतर्भूत एकूण २७ प्रकरणांपैकी २२ प्रकरणांचे प्रारूप आराखडे समिती सदस्यांनी तयार केले आहेत. सर्व तज्ज्ञ सदस्यांच्या त्यावरील अभिप्रायानंतर आराखडा अंतिम करण्यात येत आहेत. उरलेले पाच प्रकरणांचे प्रारूप आराखडे लवकरच तयार करण्यात येणार आहे. आराखड्यात अंतर्भूत प्रकरणांवर समिती सदस्यांचे अभिप्राय व सूचना विचारात घेऊन प्रकरणे अंतिम करायची आहेत. या कामासाठी अधिक कालावधी लागण्याची शक्यता असल्याने आराखडा परिपूर्ण करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे असे परिपत्रकात म्हटले आहे.

परिपूर्ण आराखडा?
हितसंबंध जपणारे राज्यकर्ते आणि उदासीन अभियंते पाणी धोरणासाठी नेहमीच अडसर ठरले आहेत. गोदावरी खोरे जल आराखड्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठवाड्याला पाण्याबाबत परिपूर्ण करणारा आराखडा तयार करावा अशी सर्वांची अपेक्षा आहे. दहा वर्षे रखडलेल्या आराखड्याला वारंवार मुदतवाढ द्यावी लागली. खंडपीठाने जल आराखडा लवकर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शासनाच्या आराखड्याबाबतच्या उदासीन धोरणावर टीका करण्यात येत आहे.

पुणे येथे झालेल्या बैठकीत जल आराखड्यावर परिपूर्ण चर्चा झाली. १५ मे रोजी आराखडा सादर करण्यात येणार होता, पण आता तारीख थोडी मागे-पुढे होईल. आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
- प्रा. प्रदीप पुरंदरे, सदस्य, जल आराखडा समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात निवडणुकीची मोर्चेबांधणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत असलेल्या विविध प्रश्नांना हाती घेत आमदार सतीश चव्हाण यांनी आगामी अधिकार मंडळाच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची मंगळवारी भेट घेत त्यांनी प्रलंबित प्रश्नांची जंत्री मांडली; तसेच एका विचाराचे बहुमत असलेल्या पॅनलचा नेहमी विजय झाला आहे. त्यामुळे सरकार कुणाचेही असले तरी इतर गटांचे स्थान नगण्य आहे, अशी उपरोधिक टीका चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.
नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर विद्यापीठातील विविध अधिकार मंडळाच्या निवडणुकीचे परिनियम उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जारी केले आहेत. विद्यापीठाअंतर्गत अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, अभ्यास मंडळ, विद्यापीठ विभाग आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास मंडळ, महाविद्यालयीन पदव्युत्तर शिक्षण मंडळ, आजीवन अध्ययन व विस्तार मंडळ, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, माहिती तंत्रज्ञान मंडळ, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय साहचर्य मंडळ, आर्थिक विकास मंडळ अशा १५ प्राधिकरणांच्या निवड प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मागील दहा वर्षांपासून तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चव्हाण यांचा विद्यापीठात दबदबा आहे. अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद या अधिकार मंडळात नेहमी एकमुखी निर्णय झाले आहेत. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर विद्यापीठात भाजपप्रणित गट जम बसवत आहे. ‘सोशल इंजिनिअरिंग’चा प्रयोग आणि शैक्षणिक-प्रशासकीय प्रश्न हाती घेत आगामी निवडणुकीत स्थान भक्कम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चव्हाण यांनी पुन्हा विद्यापीठात दौरे सुरू केले आहेत.
कुलगुरू डॉ. चोपडे यांची भेट घेत चव्हाण यांनी रखडलेल्या कामांचे निवेदन दिले. दोन महिन्यात पेट परीक्षा, कर्मचारी नियुक्ती, संशोधक मान्यता पत्रे या प्रश्नांना सोडवण्याचे आश्वासन घेतले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी आगामी मनसुबे स्पष्ट केले. ‘आपले सरकार आले म्हणून काहीजणांना उकळ्या फुटत असतील. नेते होण्याचे आणि पदे मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत, पण विद्यापीठात नेहमीच एका विचाराचे बहुमत असलेले पॅनल निवडून येते. त्यामुळे सत्ता कुणाचीही असली तरी इतर गटांचे स्थान नगण्य आहे,’ अशी टीका चव्हाण यांनी केली.
‘या निवडणुकीत माझा सहभाग राहणार नाही. सामूहिक नेतृत्वातूनच निवडणूक लढवली जाणार आहे. नवीन चेहऱ्यांना संधी देण्याला प्राधान्य आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

कुलगुरू बदलले
‘मागील काही दिवसांत कुलगुरूंच्या बोलण्यात आणि कामात खूप बदल झाला आहे. या परिसरात आल्यानंतर परिवर्तन दिसत आहे. कुलगुरुंच्या कामाबाबत कोणताही तक्रार नाही. विद्यापीठ परिसरात काहीजण मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थी नेतेच आहेत. या सर्वांचे दिवस बदलावेत अशी इच्छा आहे,’ असे चव्हाण म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टेम्पो, दुचाकीची धडक; फोटोग्राफरचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
टाटा टेम्पो व मोटार सायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार फोटोग्राफर तरूण ठार झाला. हा अपघात पाचोड पैठण रोडवरील थेरगाव येथील कॉलेजसमोर सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास झाला. नवनाथ लेंभे (वय २६, रा. लेंभेवाडी ता. अंबड जि. जालना) असे त्यांचे नाव आहे.
लेंभे हे सोमवारी बालानगर येथे एका लग्न समारंभाचे फोटो,शुटिंगची ऑर्डर पूर्ण करून पैठणहून मोटारसायकलवरून (एम एच २०, ई बी ८३५९) पाचोड जात होते. पाचोड रस्त्यावरील थेरगाव फाटा येथील त्रिंबकदास पटेल कॉलेजजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या विनाक्रमांकाच्या टाटा टेम्पोसोबत समोरासमोर धडक झाली. या अपघातात लेंभे यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना तातडीने त्याच टाटा टेम्पोतून पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्रथोमपचार करून औरंगाबादला पाठवण्यात आले. परंतु, गंभीर दुःखापत झाल्याने त्यांचे वाटेतच निधन झाले. त्यांच्या मागे दीड वर्षाचा मुलगा, पत्नी, आई-वडील असा परिवार आहे. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर ‘पेट’बाबत निर्णय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दोन वर्षांपासून रखडलेल्या पीएचडी प्रवेश पूर्वपरीक्षेचे (पेट) वेळापत्रक ३० मे पूर्वी जाहीर करून ३० जूनच्या आत परीक्षा घेण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिले. पदवीधर मतदासंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मंगळवारी कुलगुरुंची भेट घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत असलेल्या शैक्षणिक व प्रशासकीय समस्यांबाबत त्यांनी कुलगुरुंशी चर्चा केली.
पेट परीक्षा, संशोधक मार्गदर्शकांचे प्रश्न, रिक्त पदे भरणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आमदार चव्हाण यांनी कुलगुरू डॉ. चोपडे यांची भेट घेतली. यावेळी कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, प्रभारी अधिकारी डॉ. सतीश पाटील उपस्थित होते. दोन तास चर्चा झाल्यानंतर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत चर्चेबाबत माहिती दिली. ‘रखडलेल्या ‘पेट’ परीक्षेचा मुद्दा कुलगुरुंनी मान्य केला. येत्या ३० मे पूर्वी पेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करून ३० जून पूर्वी परीक्षा घेण्यात येईल, असे कुलगुरुंनी आश्वासन दिले. या परीक्षेसाठी तालुकानिहाय परीक्षा केंद्र राहणार असून, राज्यभरातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन फॉर्म भरता येणार आहे,’ असे चव्हाण म्हणाले.
अधिकार मंडळ नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे प्रश्न रखडले आहेत. या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबाबत पूर्वग्रहदूषित तक्रारींमुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होत आहे. कुलगुरुंनी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी उभे रहावे; तसेच रिक्त जागा त्वरित भराव्यात, अशी मागणी चव्हाण यांनी केली. ऑगस्ट महिन्याच्या आत रिक्त जागा भरण्याचे नियोजन करण्यात येईल असे आश्वासन कुलगुरुंनी दिले. ‘आरआरसी’मध्ये मान्य झालेल्या संशोधक मार्गदर्शकांची मान्यता पत्रे देण्यात आलेली नाही. विद्यापीठातील ३० ते ४० प्राध्यापकांना पत्रे मिळालेली नाहीत. ही पत्रे २० मे पूर्वी देण्यात येतील असे कुलगुरूंनी सांगितल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
दहाव्या योजनेतील प्राध्यापकांना कायम नियुक्तीचे पत्रे द्यावी, शिक्षक पदोन्नतीची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, विद्यापीठात विविध पदांवर व समित्यांवर नियुक्ती करताना नियमानुसार समन्यायी निर्णय व्हावा, शैक्षणिक शुल्कात अवास्तव वाढ करू नये अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ. शिवाजीराव मदन, डॉ. राजेश करपे, प्रा. फुलचंद सलामपुरे, डॉ. रत्नदीप देशमुख आदी उपस्थित होते.

डायनिंग हॉल रखडला
ग्रंथालय परिसरातील अभ्यासिकेत विद्यार्थ्यांची नेहमी गर्दी असते. बहुतेक विद्यार्थी मेसचा डबा आल्यानंतर परिसरात झाडाखाली बसून जेवतात. विद्यार्थी पिण्याचे पाणीसुद्धा दूरून आणतात. या विद्यार्थ्यांसाठी डायनिंग हॉल बांधून पाण्याची व्यवस्था करण्यासाठी आमदार चव्हाण यांनी आमदार निधीतून दहा लाख रूपये देण्याचे जाहीर केले होते, मात्र विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाने निधीची गरज नाही, लवकरच हॉल बांधू, असे जाहीर केले होते. प्रत्यक्षात डायनिंग हॉलचे काम सुरू झाले नसल्यामुळे चव्हाण यांनी पुन्हा निधी देण्याची तयारी असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंग्रजीच्या शिक्षकाविना पालिका शाळेत वर्ग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पडेगाव
मिटमिटा येथिल महापालिका शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यात जादा वर्ग सुरू करण्यात आले आहेत. तत्कालीन आयुक्तांच्या आदेशामुळे विद्यार्थ्यांची सोय झआली आहे. पण, येथे इंग्रजीच्या शिक्षकाची प्रतीक्षा आहे.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून मिटमिटा महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत आहेत. त्यामुळे जादा वर्ग घेऊन मेहनत केल्यास चांगले परिणाम येतील, हे गृहित धरून तत्कालीन पालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी आदेश दिले होते. त्यानुसार या शाळेत इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांचा अभ्यास उन्हाळ्याच्या सुट्यांत करून घेतला जात आहे. लग्नसराई असो की ऊन, त्याची तमा न बाळगता वर्गात विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती असते. येथील मुख्याध्यापिका, शिक्षक, कर्मचारी, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सर्वांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत आहे. परंतु, येथे इंग्रजी विषयाचा शिक्षक नाही. त्यामुळे पालिकेने या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाचा शिक्षक उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
शिक्षक मिळवण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे लक्ष्मण बनकर, दिलीप जाधव, आण्णासाहेब वाकळे, अजबराव मुळे, शिवाजी गायकवाड, आण्णासाहेब खोतकर, गंगाधर चव्हाण, गणेश राऊत, किसन कनिसे हे पाठपुरावा करत आहेत. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेवक रावसाहेब आमले, मुख्यध्यापिका आर. सी. हिवाळे, शिक्षक डी. डी. देवरे, डी. जे. म्हस्के, श्रीकांत नन्नावरे, केदार पंडित, सुभाष पंडित हे प्रयत्न करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीच्या सहायकास एक दिवसाची कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बदली ऑर्डर देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील कनिष्ठ सहायक सुनील मोरे याला बुधवारपर्यंत (१० मे) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. शेटे यांनी दिले.
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व त्यांचे मित्र यांची आंतरजिल्हा बदली अहमदनगर येथे झाली. ही बदली ऑर्डर देण्यासाठी जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक राजेंद्र चव्हाण व कनिष्ठ सहायक सुनील काशीनाथराव मोरे यांनी लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी लाचलुचपत विभागात तक्रार देण्यात आल्यानंतर २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सुनील मोरे याला अटक करण्यात आली होती, तर यातील मुख्य आरोपी राजेंद्र चव्हाण हा पसार झाला आहे. दरम्यान, दोघांवर गुन्हा दाखल करून मोरे याला कोर्टात हजर केले असता, इतर साथीदारांची माहिती घेणे बाकी आहे. तसेच तक्रारदारांची कागदपत्रे हस्तगत करावयाची असल्याने संशयित आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील कैलास पवार यांनी केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांची संमती असली, तरच दारू दुकान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
शहरात दारूचे दुकान सुरू करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार नगर पालिकेला देण्यात आले आहेत. पण ज्या भागात दारूचे दुकान सुरू करायचे आहे, त्या भागातील किमान ५० टक्के महिलांनी संमती दिल्याशिवाय नगर पालिका दारू दुकानासाठी नाहरकत प्रमाणपत्र देणार नाही, असे नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी सांगितले.
सिल्लोड शहरात चार देशी दारू व विविध ठिकाणी विदेशी दारू व बियरची दुकान होती. मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने शहरातील सर्व दुकाने बंद झाली आहेत. यामुळे दारू पिणाऱ्यांची गोची झाली आहे. यापुढे शहरात दारूचे दुकान सुरु करायचे असल्यास नगर पालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. अनेक व्यावसायिकांनी शहरात विविध ठिकाणी दारू दुकानसाठी नाहरकत प्रमाणपत्राची मागणी केली आहे. पण, त्या भागातील किमान ५० टक्के महिलांनी संमती दिली तरच त्यांना नाहरकत प्रमाणपत्र देण्याचा विचार आहे. त्यामुळे महिलांनी हा विषय गांभीर्याने घेवून योग्य तो निर्णय घ्यावा, असे अवाहन नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्रातील भाविक उत्तरांचलमध्ये अडकले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केदारनाथ दर्शनासाठी हेलिकॉप्टर सेवा अद्याप सुरू न झाल्यामुळे औरंगाबादसह पुणे, मुंबई व महाराष्ट्रातील शेकडो भाविक उत्तरांचलमधील फाटा येथे अडकून पडले आहेत. हेलिकॉप्टर सेवेसाठी विमानतळ प्राधिकरणाकडून अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे अनेकांना केदारनाथांचे दर्शन न घेताच परतावे लागले.
औरंगाबादहून दरवर्षी विविध ट्रव्हल्स एजन्सीकडून अनेक प्रवासी केदारनाथ बद्रीनाथ यात्रेला जातात. यावर्षी औरंगाबादहून या यात्रेसाठी सुमारे २००हून अधिक भाविक गेले आहेत. केदारनाथ यात्रेसाठी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून गेलेल्या अनेकांनी फाटा ते केदारनाथ हेलिकॉप्टरच्या प्रवासासाठी तिकिटांचे बुकिंग केले आहे. हेलिकॉप्टरची सेवा ३ मेपासून सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. हेलिकॉप्टरच्या आवाजामुळे वन्यजीव धोक्यात आल्याची तक्रार उत्तराखंड वन विभाग, काही वन्यजीव प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी केली. त्यानंतर हेलिकॉप्टर किती उंचीवरून उडणार, याचा निर्णय ‘डीजीसीए’ने घेतल्यानंतर, हेलिकॉप्टर प्रवास सुरू केला जाणार होता. ८ मेपर्यंत हेलिकॉप्टर सेवा सुरू झाली नाही. अनेक जण केदारनाथचे दर्शन न घेता परत निघाले. औरंगाबादसह महाराष्ट्रातील अनेक भाविक फाटा येथे बसून आहेत.

महाराष्ट्रातील भाविक खोळंबले

औरंगाबादहून मी २५ जणांचा ग्रुप घेऊन आलो आहे. केदारनाथला जाण्यासाठी फाटा येथून सात ते आठ हेलिकॉप्टर सर्व्हिस देणाऱ्या कंपन्या आहेत. डीजीसीएने परवानगी न दिल्यान या प्रवाशांना फाटा येथील रस्त्यावर थांबावे लागले आहे. याचा फटका महाराष्ट्रातील अनेक भाविकांना बसला आहे, अशी माहिती पर्यटन व्यावसायिक मंगेश कपोते यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुपोषित मुलांचे हात पसरून पोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
अंगणवाडीतील तीव्र कमी वजनाच्या बालकांसाठी सुरू करण्यात आलेले ग्राम बालविकास केंद्र तीन महिन्यापासून निधीअभावी बंद आहेत. त्यामुळे सिल्लोड तालुक्यातील तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या वाढलेली आहे. या बालकांना या श्रेणीतून बाहेर काढण्यासाठी हे केंद्रे सुरू करण्याची गरज आहे.
सिल्लोड तालुक्यात प्रकल्प एक मध्ये ० ते सहा वयोगटाचे २० हजार ८३६ विद्यार्थी आहेत. त्यापोकी तीव्र कमी वजनाची १४४, तर मध्यम श्रेणीतील ७६० बालके आहेत. प्रकल्प दोन मधील १६ हजार ५५७ बाककांपैकी तीव्र कमी वजनाची २०८, तर मध्यम श्रेणीतील ५९९ बालके आहेत. या दोन प्रकल्पातील तीव्र कमी वजानाची एकूण ३५२ बालके तीव्र कमी वजनाची, तर मध्यम कमी वजनाची १३५९ बालके आहेत.
तीव्र कमी वजनाच्या बालकांना त्या श्रेणीतून बाहेर काढण्यासाठी शासनाकडून ग्राम बाल विकास केंद्रे चालविली जातात. मात्र हे केंद्र तीन महिन्यांपासून निधीअभावी बंद आहे. या केंद्रातून या बालकांसाठी प्रती बालक एक हजार रुपये आहार व औषधासाठी दिले जातात. श्रेणी वाढविण्यासाठी दिवसातून आठ वेळेस आहार, औषधी व अंगणवाडीसेविका त्यांची डॉक्टरांकडुन आरोग्य तपासणी करते. मात्र, बालविकास केंद्रे बंद असल्यामुळे या श्रेणीतुन या बालकांना बाहेर काढण्यासाठी महिला बालविकास विभागाकडून पालकांना अतिरिक्त आहार संदर्भ सेवेचे मार्दर्शन केले जात आहे.
तालुक्यातील १४ अंगणवाड्या स्मार्ट डिजिटल आहेत. भराडी येथील अंगणवाडी हायटेक आहे. २२ अंगणवाड्याना आयएसओ मानांकन मिळाले आहे. भराडी येथील अंगणवाडीत बायोमेट्रिक, संगणक, एसी या सुविधा आहेत. पण, तीन महिन्यापासून तीव्र कमी वजनाच्या बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठीची योजना निधीअभावी बंद आहे. परिणामी तालुक्यातील बालकांचे आलोग्य धोक्यात आले आहे.

प्रत्येक घरातून मुठभर धान्य

अंगणवाडी सेविका घरच्या घरी पालकांना बालविकास केंद्राच्या धर्तीवर व्हीसीडीचे मार्गदर्शन करून त्या श्रेणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केरत आहेत. तसेच या श्रेणीतून या बालकांना बाहेर काढण्यासाठी रोज एका पालकाने आहार शिजवून आणायचा व तो बालकांना खाऊ घालायचा, असा उपक्रम सुरू आहे. त्याच बरोबर अक्षयपात्र योजनेतून मुलांनी घरून भाजीपाला आणायचा, तो एका भांड्यात टाकायाचा, त्या भांड्यातील भाजापाला खिचडीत वापरला जात आहे. या शिवाय जास्तीचा असलेला भाजीपाला टिकविण्यासाठी मटका फ्रीज योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच अंगणवाडी कार्यकर्तीने पिशवी घेऊन गावात घरोघरी जायचे. त्यात सर्वांकडून मुठभर धान्य घ्यायचे व ते बालकांना शिजवून खाऊ घालायचे ही योजनाही सुरू आहे. या उपाययोजना करून या श्रेणीतील बालकांना दुसऱ्या श्रेणीत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती महिला बालकल्याण अधिकारी लता खोतकर यांनी दिली.

अंगणवाड्या इमारतीविना

सिल्लोड तालुक्यात एकूण ४८६ अंगणवाड्या दोन प्रकल्पामार्फत चालवल्या जातात. मात्र, प्रकल्प एकमध्ये ७७ व प्रकल्प दोनमध्ये ४४ आंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही. मात्र, ग्रामपंचायतींनी जागा न दिल्याने अनेक गावांतील बांधकाम निधी परत गेला आहे.
महिला बालकल्याण प्रकल्प एकच्या अंगणवाड्यांत ० ते सहा वयोगटातील २० हजार ८३६ विद्यार्थी, तर प्रकल्प दोन मध्ये १६ हजार ५५७ विद्यार्थी आहेत. अंभई, अजिंठा, अंधारी, लोणवाडी, भवन या मोठ्या गावासह शेत-शिवारातील अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही. त्यामुळे लहान बालकांना झाडाखाली, ग्रामपंचायतीच्या इमारतीत, समाज मंदिरात अथवा खासगी घरात शिक्षण घ्यावे लागते. ग्रामपंचातीनी जागा दिली, तर शासन डोंगरी भागातील गावातील अंगणवाडीच्या बाधकामासाठी ६ लाख ६० रुपये बांधकामासाठी निधी दिला जातो. डोंगरी भाग नसलेल्या गावातील अंगणवाड्यासाठी ६ लाख रुपये निधा दिला जातो. मात्र ग्रामपंचायतींच्या अनास्थेमुळे जागा उपलब्ध होत नाही. अनेक गावासाठी आलेला निधी परत गेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉक्टरची फसवणूक; तिघांना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रोकडिया हनुमान कॉलनीतील डॉक्टरला सहा लाखांना गंडा घातल्याप्रकरणी तिघांना अटक करून मंगळवारी (९ मे) कोर्टात हजर केले असता, सोमवारपर्यंत (१५ मे) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. भोसले यांनी दिले.
रोकडिया हनुमान कॉलनीतील डॉ. राजेश रमेश सावजी यांना अब्दुल असद याने गंगापूर तालुक्यातील भेंडाळा येथील दहा एकर जमीन स्वस्तात देण्याचे आमीष दाखवून सहा लाखांचा गंडा घातला होता. या प्रकरणी २४ एप्रिल रोजी अब्दुल असद अब्दुल हनीफ (रा. औरंगाबाद), विवेक थोरे (रा. गारखेडा, औरंगाबाद) व सचिन धनसिंग ठाकूर (रा. नूतन वसाहत, जालना) यांना अटक केली आहे. त्यांची रवानगी पोलिस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. पोलिस कोठडीदरम्यान आरोपींनी सीताराम पाराजी कान्हेरे (वय ६५), हरिचंद्र वामन निळे (वय ५६) व संजय देवराव तुपे (वय ४१) यांची नावे सांगितली व पोलिसांनी तिघांना मंगळवारी अटक केली. त्यांना कोर्टात हजर केले असता, आरोपींकडून पुरावे हस्तगत करणे, इतर आरोपींचा शोध घेणे व दस्तावेज कुठे बनवले याचा तपास करणे बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती कोर्टात करण्यात आली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांनी लावले अधिकाऱ्यांना कामास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिटीचौक पोलिस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी नुतन पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी जनता संमेलन भरवले. यावेळी मांडण्यात आलेल्या ११ तक्रारी त्वरित सोडवण्याचे आदेश देत पोलिस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना कामाला लावले.
आयुक्त यादव यांनी नागरिकांच्या तक्रारीसाठी आठवड्यातून दोन दिवस पोलिस ठाण्यात जनता संमेलन भरवण्याचा उपक्रम सुरू केला आहे. पहिले संमेलन मंगळवारी सिटीचौक पोलिस ठाण्यात घेण्यात आले. यावेळी कुसुम दादाराव खंडागळे या महिलेने तिच्या मुलीचा लग्नासाठी खून केल्याचा आरोप केला. या प्रकरणी न्याय मिळत नसल्याची तक्रार केली. हे प्रकरण बेगमपुरा पोलिस ठाणे हद्दीत येत असूनही आयुक्त यादव यांनी सहायक पोलिस आयुक्तांना तपास करून सात दिवसांत अहवाल देण्याचे आदेश दिले. या संमेलनात युसूफ अलीखान, प्रकाश बाबुराव काळे, भीमराव भगनुरे, मेहरबान सय्यद अथर, नसीम, शर्मिता विनोद जैन, शांतीबाई पाटील, जिंदाराज वैद्य व वंदना शहा यांनी तक्रारी मांडल्या. या सर्वांना आयुक्त यादव यांनी आठ दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त विनायक ढाकणे यांनी केले. यावेळी सिटी चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक दादाराव शिनगारे, उपनिरीक्षक सतीश पंडित, योगेश धोंडे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

पोलिस निरीक्षकांना पाठवले
जनता दलाचे नेते अजमलखान यांनी शहागंज येथील जुन्या बसस्टँडमध्ये मद्यपी व जुगाऱ्यांचा अड्डा झाल्याची माहिती दिली. यावेळी आयुक्त यादव यांनी ही बाब गांर्भीयाने घेत पोलिस निरीक्षक शिनगारे यांना तेथे तत्काळ जाण्याचे आदेश दिले.

२४ तासांत मुद्देमाल परत
हडको परिसरात ७ एप्रिल रोजी शामराव मानके या नागरिकाच्या घरी घरफोडी झाली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला अवघ्या २४ तासात अटक करत सिटी चौक पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. हा दोन लाख आठ हजारांचा मुद्देमाल शामराव मानके यांना आयुक्तांच्या हस्ते परत देण्यात आला.

तक्रारदार कमी, सत्कार करणारे जास्त
या जनता संमेलनाला तक्रारदार अवघे ११ आले होते, तर सत्कार करणारे जास्त असल्याचे‌ दिसून आले. २५ ते ३० जणांनी आयुक्त यादव यांचा शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार केला. या सर्वांचे आयुक्तांनी आभार मानले.

पालिकेच्या तक्रारी जास्त
या जनता संमेलनात आलेल्या तक्रारदारांपैकी अनेक जणांच्या तक्रारी या अतिक्रमणाशी सबंधित होत्या. हा पालिकेचा विषय असला तरी आयुक्त यादव यांनी पोलिस निरीक्षकांना हे अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वरिष्ठाला बंदुकीचा धाक दाखवणारा जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कामावरून कमी केल्याने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरी जाऊन बंदुकीचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या संशयित आरोपीला गुन्हेशाखेने अटक केली. हा प्रकार शुक्रवारी रात्री एन पाच, सावरकरनगर भागात घडला होता. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश नामदेव बोराडे हे केबल कंपनीमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या घरी संशयित आरोपी शैलेंद्र पटेकर (रा. लोकशाही कॉलनी, जयभवानीनगर) हा शुक्रवारी रात्री आला होता. पटेकर याने बोराडे यांना बंदुकीचा धाक दाखवत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नुकसानभरपाई मिळवून देण्याची मागणी केली होती. तसेच बोराडे यांना पोलिसात तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर पटेकर पसार झाला होता. पसार संशयित आरोपी सिडको उड्डाणपुलाखाली येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून सापळा रचून शैलेंद्र पटेकर याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. ‌दीपाली धाटे-घाडगे, सहायक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार भंडारे, साईनाथ महाडिक, आनंद वाहुळ, विकास माताडे, शिवाजी भोसले यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागदचे आरोग्य केंद्र चौथ्या दिवशीही बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
तालुक्यातील नागद येथील गडदगड प्रकल्पात शनिवारी दोन सख्या भावांचा बूडून मृत्यू झाल्यापासून स्थानिक नागरिकांच्या रोषामुळे नागद प्राथमिक आरोग्य केंद्र चार दिवसांपासून बंद आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी व ग्रामस्थांची मंगळवारी झालेली बैठक वांझोटी ठरली.
प्रकल्पात बुडून दोन भावांचा मृत्यू झाला, त्या दिवशी नागद प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. रंधे उपस्थिती नव्हते. त्यामुळे वेळेवर उपचा न मिळाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचा गावकऱ्याचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी आरोग्य केंद्रास टाळे ठोकले. ग्रामस्थांनी वैद्यकीय आधिकऱ्यांच्या नियुक्तीसाठी हे केंद्र उघडू दिले नाही. तालुका आरोग्य अधिकारी ए. के. विडेकर यांनी सोमवारी भेट देऊन ग्रामस्थांबरोबर चर्चा केली, पण ठोस कारवाई नसल्याने केंद्र उघडण्यास मज्जाव केला व वैद्यकीय अधिकारी डॉ. रंधे यांच्या निलंबनाची मागणी केली. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी सात ते सव्वा आठच्या दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डी. एस. खतगावकर, तालुका आरोग्य अधिकारी ए. के. विडेकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून टाळे उघडण्याचे आवाहन केले. पण, सरपंच रणजित पाटील व इतर पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी नियुक्त करेपर्यंत टाळे काढणार नसल्याचे स्पष्ट केले. तालुका आरोग्य अधिकारी विडेकर यांनी डॉ. घुगे यांची नियुक्ती केल्याचे सांगितले, तर भाजप तालुका सरचिटणीस भगवान ठाकरे यांनी कामचुकार कर्मचाऱ्यांच्या बदल्या व वैद्यकीय अधिकारी डॉ. रंधे यांचे निलंबन करण्याची मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बायपासवर पुन्हा जड वाहनांना बंदी

$
0
0

औरंगाबाद : बीड बायपास रस्त्यावरून बुधवारपासून (१० मे) पुन्हा एकदा प्रायोगिक तत्त्वावर १६ मेपर्यंत ट्रक, कंटेनर, हायवा आदी जड वाहनांसाठी बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी मंगळवारी दिले. सकाळी सात ते दुपारी १२, संध्याकाळी चार ते रात्री नऊपर्यंत या रस्त्यावरून जडवाहनास बंदी राहणार आहे. या कालावधीत बीडकडून येणारे ट्रक, कंटेनर, हायवा आदी जड वाहने नगर किंवा धुळ्याकडे जाण्यासाठी व येण्यासाठी पाचोड-पैठण रिंगरोडचा वापर करतील. जालनाकडून धुळे किंवा नाशिककडे जाडण्यासाठी व येण्यासाठी पाचोड पैठण ‌रिंग रोड ‌किंवा केंम्ब्रिज- सावंगी-फुलंब्री-खुलताबाद-कसाबखेडा या मार्गाचा वापर करावा, असे या आदेशात म्हटले आहे. यापूर्वीही १५ दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर जड वाहनांना प्रवेशबंदी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images