Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सुरेश धसांना चोख उत्तर देऊ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातील जनतेने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कौल दिला. मात्र, असे असतांना मतदारांच्या मतांचा व विश्वासांचा परस्पर बाजार केलेल्या माजी मंत्री सुरेश धस यांना आता त्यांच्या आष्टी मतदार संघात येऊन चोख उत्तर देऊ असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.
जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी गद्दारी करत माजी मंत्री सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघावर धनंजय मुंडे यांनी आता लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांनी बुधवारी पाटोदा तालुक्यातील अनेक गावांना भेटी देत त्यांनी संपुर्ण तालुका पिंजून काढला. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, जिल्हा परिषद गटनेते बजरंग सोनवणे, बीडचे नेते संदिप क्षीरसागर, माजी सभापती महेंद्र गर्जे, शिवाजीराव नाकाडे, अ‍ॅड. बाळासाहेब कोल्हे, विठ्ठल सानप यांच्यासह मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
वैजाळा, पाचेगांव, पाचंग्री, मंजरीघाट, अनपटवाडी, पारगांव घुमरा, जवळाला, धानोरा या गावांमध्ये सायंकाळीपर्यंत झालेल्या विविध कार्यक्रम, धावत्या भेटी या माध्यमातून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. या दौऱ्या दरम्यान, बोलतांना मुंडे म्हणाले, ‘यापुढे मी आष्टी मतदारसंघावर विशेष लक्ष देणार असून, परळी प्रमाणेच हा मतदारसंघही आता विकासासाठी दत्तक घेणार आहे. ज्या माजी मंत्र्यांना पक्षाने स्टार प्रचारक केले. मंत्री पदे देऊन राज्य पातळीवर नेतृत्व करण्याची संधी दिली. त्यांनी सत्तेच्या स्वार्थासाठी ज्यांना मी नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पराभुत केले. त्यांचे नेतृत्व स्वीकारण्याची वेळ आली आहे. २००५ साली ही त्यांनी अशीच गद्दारी केली. त्यावेळी त्यांनी कुकडीच्या पाण्यासाठी गद्दारी केल्याचे सांगितले होते. आज कोणत्या पाण्यासाठी गद्दारी केली आहे असा सवाल मुंडे यांनी यावेळी उपस्थित केला. ज्यांच्यामुळे तुम्हाला लायकी प्राप्त झाली. त्यांच्यावर आणि बारामतीच्या नेतृत्वावर आरोप करण्याची तुमची लायकी तरी आहे का ? असा सवालही उपस्थितीत केला. आष्टी, पाटोदा नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये माझ्या सभा कशा चालल्या. त्यावेळी मी चांगला आणि आजच वाईट कसा असा प्रश्न उपस्थित केला.

‘एक दिलाने काम करू’
दरम्यान, पक्षाशी गद्दारी केलेल्या सुरेश धस यांनी या मतदारसंघातील जनतेला पंधरा वर्षांपासून विकासापासून वंचित ठेवले आहे. त्यांना आता धडा शिकवण्यासाठी आम्ही युवक एक दिलाने काम करू असा निर्धार विजयसिंह पंडित, संदिप क्षीरसागर, बजरंग सोनवणे यांनी केला.
#####################
परिवहन मंत्री रावतेंची सुरक्षा रामभरोसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परिवहन मंत्री रावतेंची सुरक्षा रामभरोसे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड,
राज्याचे कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांची सुरक्षा रामभरोसे राहू शकते, तर तेथे सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या दौयानंतर पडला आहे. परिवहन मंत्री आल्याची कुठलीही सूचना पोलिस प्रशासनाला मिळत नाही. तब्बल दीड तास सुरक्षेविना परिवहन मंत्र्यांची गाडी मुखेडच्या सिमेपर्यंत पोहंचते. ही बाब निश्चितच संतापजनक असल्याच्या प्रतिक्रिया शिवसैनिकांतून व्यक्त केली जात आहे.
परिवहन मंत्री दिवाकर रावते हे मंगळवारी रात्री उशिरा नांदेड येथे पोहचले. भोकर येथील विवाह सोहळा आटोपल्यानंतर त्यांनी नांदेडच्या विश्रामगृहावर मुक्काम केला. बुधवारी पहाटे आठ वाजता ते मुखेडकडे रवाना झाले. मात्र, तोपर्यंत पोलिस प्रशासनाची सुरक्षा कवच देणारी इस्कॉटींग गाडी त्यांच्या सेवेत नव्हती. नांदेड ते मुखेड हे तब्बल दीड तासाचे अंतर त्यांनी विना सुरक्षा कापले. सोबत फक्त परिवहन विभागाची गाडी होती. त्यामुळे तेवढा तरी आधार त्यांना होता. याबाबत त्यांच्या कार्यालयाने तसेच काही जणांनी जिल्हा पोलिस अधीक्षक व विशेष पोलिस महानिरीक्षकांशी संपर्क साधला. त्यानंतर नांदेडचे पोलिस यंत्रणा जागी झाली. मात्र, कुठलेही लोकेशन मिळत नसल्याने काहीकाळ ते हैराण झाले. मुखेडच्या जवळ आल्यानंतर एक नव्हे तर दोन पोलिस गाड्या त्यांच्या सुरक्षा पथकात सामील झाल्या. परस्पर ताळमेळ नसणे, अधिकारी वर्गात समन्वय नसणे, तसेच नेमलेला अधिकारी जागेवर नसणे यामुळे या बाबी घडल्याचे दिसून आले. मात्र, पोलिसांनी हा प्रकार सहजपणे घेतला. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी याबाबत कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसली तरी त्यांच्या स्वीय सहायकांनी ही बाब गांभिर्याने घेतली. जिल्हा समन्वयक धोंडू पाटील व सहसंपर्क प्रमुख डॉ. मनोज भंडारी यांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करून एकही सरकारी अधिकारी व पोलिस अधिकारी विश्रामगृहावर तैनात नव्हता. याबद्दल कुणाला जबाबदार धरायचे, संबंधितावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. दौयातील बदलामुळे असे घडले असावे, अशी प्रतिक्रिया प्रशासनाने दिली असली तरी ती संयुक्त नसल्याचे मानले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमत नसेल तर बाजूला व्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
तुमच्याकडून हा खेळ जमत नसेल तर थोडा वेळ तुम्ही सगळे बाजूला व्हा. एवढ्या पुरता दुसरा जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, तालुकाध्यक्ष आम्ही नेमू. आपण आपली पोझिशन तपासा, यावेळीस कुणाचीही गय केली जाणार नाही. विस्तारक योजना आणि शिवार संवाद यात्रा यशस्वी झालीच पाहिजे, जालन्यातील या दोन्ही कार्यक्रमाची अतिशय पुवर पोझिशन आहे, याच शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी भाजपच्या जिल्हा बैठकीत सगळ्या पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी केली.
जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटनाच्या निमित्ताने भाजपाच्या विस्तार योजना आणि संवाद यात्रेच्या तयारीच्या बैठकीत ते बुधवारी बोलत होते. लोकांच्या भाजपच्या संदर्भात प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे, म्हणून भाजप सगळीकडे स्वबळावर विजयी होत आहे. तुमची इच्छा असो की नसो राज्यातील लोकांची इच्छा आहे. कार्यकर्त्यांनी आता शांत बसून चालणार नाही. शिवार संवाद यात्रेत संबंधित गावात शेतकऱ्यांना शेतात एकत्र जमवून बोलायचे आहे, आम्ही काय बोलायचे याचे ट्रेनिंग देणार आहोत, आम्ही सांगतो तेच बोला, आपल्या तालुक्यात बाहेरून आलेल्या कार्यकर्त्याची जेवन अन मुक्कामाची सगळी सोय त्याच गावात करायची जवाबदारी आपली आहे, नाही तर देताल बसस्टॅन्डवर सोडून, या शब्दात खासदार दानवे यांनी विस्तार योजनेचा विषय बैठकीत मांडला.
शरदभाऊ कुलकर्णी भाजपचे संघटन मंत्री होते. तेव्हा ते भोकरदनला यायचे दिवसभर आम्ही फिरायचो अन ते निघाले की मला म्हणायचे रावसाहेब एक पन्नास रूपये प्रवासाला दे. परतूरात बबनराव अन् भोकरदनमध्ये आपण चार लोकांकडून ते पैसे गोळा करून शरदभाऊंना द्यायचो, असे दिवस आम्ही काढलेले आहेत, असेही यावेळी बोलताना खासदार दानवे यांनी स्पष्ट केले.
युद्धात जास्त रक्त सांडण्याची वेळ येऊ नये यासाठी सरावाच्या काळात घाम जास्त गाळला पाहिजे. राज्यात ९० हजार मतदान केंद्रावर आपला कार्यकर्ता विस्तारक म्हणून जाणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या सगळ्या योजना लोकांना समजतील अशा भाषेत सांगायला शिका. भाजपच्या कार्यकर्त्यांना नेमकेपणाने बोलता आले पाहिजे. जालन्याची जिल्हा परिषद आपल्या ताब्यात आली नाही तरी काही काळजी करू नका, असेही खासदार दानवे यांनी स्पष्ट केले.
राजेश टोपे पंधरा वर्षांपासून जिल्ह्याचे पालकमंत्री होते. ५० वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत होते. त्यांनी या राज्याच्या आणि आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले ? हे त्यांना विचारले पाहिजे. दुर्देवाने शेतकरी आत्महत्या करतो आपण सगळेजण आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांचे सांत्वन करून मदतीचा हात पुढे केला पाहिजे. त्या ठिकाणी जाऊन काही जण झेंडू बाम लाऊन रडतात आणि जखमेवर मीठ चोळतात, या शब्दात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी विरोधकांवर तोफ डागली.
देशाची पन्नास वर्षांची विस्कटलेली घडी आपण दुरूस्त करत आहोत. भाजपच्या सगळ्या आमदारांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे असेच मत व्यक्त केले आहे. मात्र, आता कर्जमाफी दिली की ती शेतकऱ्यांना न मिळता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बँकेला फायदा देणार आहे. आपण शेतकऱ्यांना पाणी, वीज आणि हमीभाव बाजार देणार आहोत आणि याच सोबत कर्जमाफी होणार असल्याचे पालकमंत्री लोणीकर यांनी सांगितले.


या बैठकीस आमदार नारायण कुचे, भाजपाचे प्रदेश चिटणीस मनोज पांगारकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, जिल्हा परिषद सदस्य राहूल लोणीकर, संघटन मंत्री भाऊराव देशमुख, जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, शहराध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, स्मिता भक्कड, किशोर अग्रवाल, अर्जुन गेही उपस्थित होते. भाजपाच्यावतीने आजिवन सहयोग निधी जमवण्यासाठी जालना जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना २५ लाख रुपये उद्दिष्ट देण्यात आले आहे. आणिबाणी कालखंडात मिसाबंदी कायद्यात तुरूंगवास भोगलेल्या लक्ष्मण पहेलवान सुरा यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी जलवाहिनीचे भूमिपूजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या १३ मे रोजी जालन्यातील अंतर्गत जलवाहिनी अंथरण्याच्या कामाचे भूमिपूजन करणार असल्याचे यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले. त्यांच्या या दौऱ्यात जिल्ह्यातील संवाद यात्रेचे उद्घाटन करण्याची योजना असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दानवेंनी व्यक्त केली शेतकऱ्यांची दिलगिरी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । औरंगाबाद

तुरीच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांची शिवराळ भाषेत चेष्टा करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे चहुबाजूने टीकेची झोड उठताच नरमले असून त्यांनी शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त केली आहे. मी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरलेला नाही, तरीही माझ्या वक्तव्याने त्यांची मनं दुखावली असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे दानवे म्हणाले.

जालना येथे बुधवारी पालकमंत्री बबन लोणीकर यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दानवे यांची जीभ घसरली होती. एका कार्यकर्त्याने तुरीबाबत प्रश्न विचारला असता 'एवढी तूर खरेदी केली तरी रडतात साXXX', अशी शिवी दानवे यांनी हासडली होती. त्यानंतर दानवे यांच्यावर चौफेर टीका झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दानवे यांनी शेतकऱ्यांची तत्काळ माफी मागावी तसेच दानवे यांना पदावरून हटवण्यात यावे अशी मागणी केली. दरम्यान, हे प्रकरण चिघळत असल्याचे लक्षात येताच दानवे यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्याचे दु:ख मला माहीत आहे. शेतकऱ्याची बाजू घेतच मी ३५ वर्षे राजकीय वाटचाल केली आहे. त्यामुळे मी शेतकऱ्याबद्दल कधीही अपशब्द वापरू शकत नाही, असा दावा दानवे यांनी केला. मी काल माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना उद्देशून कोणताही अपशब्द वापरला नाही. या संवादाचा संबंध शेतकऱ्यांशी जोडणं चुकीचं आहे. त्याउपरही शेतकऱ्यांची मनं दुखावली असतील तर मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, असे दानवे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचितासाठी स्वयंम योजना

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शासनाने पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना आखली आहे. या योजनेनुसार भोजन, निवास, निर्वाह भत्त्यापोटी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जात आहेत. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शालेय व अन्य साहित्य वाटपाऐवजी रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे, अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी गजानन फुंडे यांनी दिली.
येथील कार्यालय क्षेत्रात औरंगाबाद, जालना, बीड, लातूर या जिल्ह्याचा समावेश असून आदिवासी समाजबांधवांची लोकसंख्या सुमारे पावणे तीन लाख आहे. या जिल्ह्यात शासकीय ८ तर ७ अनुदानित आश्रमशाळा आहेत, त्यात एकूण पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. पहिली ते दहावीपर्यंतच्या या विद्यार्थ्यांना यापूर्वी शालेय, लेखन साहित्य यासह स्वच्छता प्रसाधाने, गणवेश आदी वस्तूंचे वाटप केले जात होते. पण, खरेदी व वाटप यात बराच विलंब होत असे. त्यामुळे विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहे, अशी माहिती फुंडे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली. सहायक प्रकल्प अधिकारी आर. जी. देशमुख, दिलीप कोकले उपस्थित होते. यात पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी साडेसात हजार रुपये, ५ वी ते ९ वीपर्यंत ८ हजार ५०० तर १० वीच्या विद्यार्थ्यांना ९ हजार ५०० रुपये मिळणार आहे. यापैकी ६० टक्के रक्कम जून महिन्यात, तर उर्वरित रक्कम लाभार्थ्यांनी वस्तू खरेदी केल्याचे दाखविल्यानंतर खात्यात जमा होईल.

वसतिगृह प्रवेशाचा तिढा मिटणार
पात्र असूनही प्रवेश मिळाला नाही, प्रवेश यादी चुकीची आहे, या प्रकारचे आरोप आदिवासी वसतिगृहाच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान होतात. हा तिढा आता पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेमुळे सुटण्यास मदत होत आहे. औरंगाबाद शहरात पाच, कन्नडला २, सिल्लोड व जालन्यात प्रत्येकी १, अंबाजोगाई तसेच लातूर येथे प्रत्येकी २ वसतिगृह आहेत. इमारत क्षमतेअभावी दरवर्षी उच्चशिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृहात मिळत नाही. या विद्यार्थ्यांना स्वयंम योजनेतून भोजन, निवास व शैक्षणिक साहित्यासाठी आधारसंलग्न खात्यात रक्कम वितरीत केली जात आहे. या योजनेचा १०२ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे.

स्वयंमद्वारे मिळणारा लाभ
खर्चाचा तपशील --- क वर्ग महापालिका क्षेत्रासाठी --- इतर जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
भोजन भत्ता ------- २८ हजार -------------------- २५ हजार
निवास भत्ता ---- १५ हजार ------- १२ हजार
निर्वाह भत्ता ----- ८ हजार -------- ६ हजार
एकूण वार्षिक --- ५१ हजार रुपये ---- ४३ हजार रुपये
(मुंबई, नवी मुंबई व उपनगर, ठाणे, पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व भत्ते मिळून वार्षिक ६० हजार रुपये दिले जातात.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिवऱ्यातील श्रमदानास मुख्यमंत्र्यांचे बळ

$
0
0


उस्मानाबाद - हिवरा (ता. भूम) येथील ग्रामस्थांची कामाची चिकाटी, स्पर्धेमधील सहभाग आणि उत्साह पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः शनिवारी (१३ मे) सकाळी अकराला श्रमदानाला येणार आहेत.
पाणी फाउंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धे’त हिवरा गाव सहभागी झाले असून गेल्या काही दिवसांपासून अधिकारी आणि सर्व ग्रामस्थ योगदान देत असल्यामुळे सर्वांचा उत्साह दुणावला आहे. त्यासोबतच शनिवारी श्रमदानात सहभागी होत असलेल्यांसाठी भूम पंचायत समितीने स्पर्धा ठेवली आहे. यामधील विजेत्यांना २५ हजार रुपयांच्या पारितोषिकाचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी ‘मटा’ला दिली.
हिवरा आणि शिवारात पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवणे आणि पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या ध्येयाने सर्व ग्रामस्थ प्रेरित झाले आहेत. या वर्षी होत असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत हिवरे गाव सहभागी झाले असून गाव पाणीदार करण्याच्या एकाच उद्देशाने गावातला जो-तो उठतोय अन गावासाठी घाम गाळत आहे. हिवरेकर दररोज सकाळी आठ ते अकरा आणि रात्री आठ ते अकरा या वेळेत श्रमदान करीत आहेत.
हमखास पाचवीला पुजलेल्या दुष्काळाशी दोन हात करून तो तात्पुरता नाही; तर कायमचा पिटाळून लावण्याचा निर्धार प्रत्येकाने केला आहे. त्यासाठी गावातील गोरगरीब-श्रीमंत, महिला-पुरुष, युवक-युवती, आजी-आजोबा, बालक-बालिका असे सर्व स्वयंस्फूर्तीने शिवारात राबत आहेत. वॉटर कप स्पर्धेत भूम व परंडा पंचायत समितीतील अधिकारी आणि सर्व ग्रामस्थ योगदान देत असल्यामुळे सर्वांचा उत्साह दुणावला आहे. प्रत्येक जण हिवरा गावाला पाणी फाउंडेशनने आयोजित केलेल्या वॉटर कप स्पर्धेचे बक्षीस मिळविण्यासाठी पेटून उठला आहे.
मुख्यमंत्री शनिवारी सकाळी दहाला भूम येथे आढावा बैठक घेणार असून नंतर हिवरा येथे झालेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी करणार आहेत. त्यासोबतच कामातील लोकसहभाग वाढावा म्हणून मुख्यमंत्री स्वतः श्रमदान करणार आहेत.
....
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते
पारितोषिकाचे वितरण
नागरिक शनिवारी मोठ्या प्रमाणात श्रमदानात सहभागी होणार आहेत. त्यामुळे जादा काम करणाऱ्यांसाठी भूम पंचायत समितीच्यावतीने स्पर्धा ठेवण्यात आली आहे. सुमारे २५ हजार रुपयांच्या पारितोषिकाचे वितरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते यावेळी विजेत्यांना देण्यात येणार आहे.
..
हिवरा ग्रामस्थांची कामाची चिकाटी, स्पर्धेमधील सहभाग आणि उत्साह पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याने आमच्या कामाचा उत्साह अजून वाढला आहे. भूम, परंडा तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे मोठे सहकार्य लाभत आहे.

-सुदर्शन जगदाळे
भूमिपुत्र फाउंडेशन, हिवरा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादच्या ‘डेंटल’मध्ये आता पीएचडी, फेलोशिप

$
0
0

Nikhil.Nirkhee@timesgroup.com
Tweet : @ nnirkhee MT
औरंगाबाद ः राज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा शहरातील शासकीय दंत महाविद्यालयामध्ये ‘कृत्रिमदंतशास्त्र’ या विषयात पीएचडी अभ्यासक्रम, तर दोन विषयांमध्ये फेलोशिप अभ्यासक्रम सुरू होणार आहे. नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने तिन्ही विषयांना मान्यता दिली असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून हे अभ्यासक्रम राज्यातील २३ विद्यार्थ्यांसाठी खुले होणार आहेत.
शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने नेहमीच अग्रेसर राहिलेल्या शहरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयामध्ये ‘बीडीएस’ या पदवी अभ्यासक्रमाचा जागा ४०वरून अलीकडेच ५०पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. इतर काही ठिकाणच्या दंत महाविद्यालयांमध्ये ‘बीडीएस’च्या जागा रिक्त असल्या तरी शहरातील ‘शासकीय दंत’मध्ये सर्वच्या सर्व ५० जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे; तसेच सध्या चार विषयांमध्ये ‘एमडीएस’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रत्येकी तीन जागा महाविद्यालयात उपलब्ध आहेत; म्हणजेच सध्या १२ विद्यार्थ्यांना ‘एमडीएस’ करण्याची सुविधा आहे. त्याचवेळी पुढील वर्षापासून म्हणजेच जून २०१८पासून प्रत्येक पदव्युत्तर विषयात तीन विद्यार्थ्यांची वाढ होऊन एकूण सहा विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात ‘पीजी’ करता येणार आहे व दोन नवीन ‘पीजी’ विषयांमध्ये सहा-सहा विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करू शकणार आहे. याचाच अर्थ २०१८पासून एकूण ३६ विद्यार्थ्यांना दरवर्षी वेगवेगळ्या सहा विषयांमध्ये एमडीएस अभ्यासक्रम करण्याची सुविधाही याच महाविद्यालयामध्ये उपलब्ध होणार आहे. आता त्यापुढे जाऊन याच महाविद्यालयामध्ये कृत्रिमदंतशास्त्र (प्रोस्थोडोन्टिक्स) या
विषयामध्ये किमान तीन विद्यार्थ्यांना पीएचडी अभ्यासक्रम करण्याची संधी येत्या शैक्षणिक वर्षापासून मिळणार आहे. त्यासाठी नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने या तीन वर्षीय पीएचडी अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे व अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे यांना पीएचडीचे गाइड म्हणूनही नुकतीच मान्यता मिळाली आहे. कृत्रिमदंतशास्त्र या विषयामध्ये पीएचडी अभ्यासक्रम सुरू होत असलेले शहरातील ‘शासकीय दंत’ हे राज्यातील पहिले महाविद्यालय ठरणार आहे.

फेलोशिप असेल एक वर्षाची
‘पीएचडी’सह सूक्ष्मजीवदंतशास्त्र (मायक्रो डेन्टिस्ट्री) व दंतरोपणशास्त्र (इम्प्लान्टोलॉजी) या दोन विषयांमध्ये एक-एक वर्ष कालावधीचे फेलोशिप अभ्यासक्रमही ‘शासकीय दंत’मध्ये सुरू होणार आहे. ‘बीडीएस’ हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना ही फेलोशिप करता येणार असून, प्रत्येक विषयासाठी १०-१० अशा एकूण २० विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षापासून फेलोशिप करता येणार आहे. भविष्यात फेलोशिप अभ्यासक्रमाच्या विषयांची संख्याही वाढू शकते, असेही संकेत आहेत. विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याचेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

दंतशास्त्रातील नवनवीन अद्ययावत अभ्यासक्रमांचा लाभ विद्यार्थ्यांबरोबरच प्रामुख्याने रुग्णांना होणार आहे आणि तोच या अभ्यासक्रमांचा उद्देश आहे. कृत्रिमदंतशास्त्र या विषयातील पीएचडी अभ्यासक्रम पहिल्यांदाच औरंगाबादच्या शासकीय दंत महाविद्यालयात सुरू होणार आहे.
- डॉ. सुरेश बारपांडे, सहसंचालक (दंत), डीएमईआर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्डा पडल्यास थेट फौजदारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर खड्डा पडला, तर त्या रस्त्याचे काम करणाऱ्या अधिकारी, कंत्राटदाराला जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने असा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर केली जातात, पण त्यांच्या दर्जाबद्दल काळजी घेतली जात नाही. त्यामुळे रस्त्याचे काम झाल्यावर एक-दोन वर्षांत रस्ता खराब होतो व केलेला खर्च वाया जातो. ही बाब लक्षात घेवून राज्य शासनाने २७ एप्रिल रोजी अध्यादेश काढून नव्याने करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामांबद्दल आचारसंहिता घालून दिली आहे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्या अधिकारी व कंत्राटदारावर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.
अध्यादेशात शासनाने म्हटले आहे की, मार्च २०१७मध्ये झालेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात रस्ते, पूल, रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी क्षेत्रीय कार्यालयाकडून प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली असून, त्या अनुशंगाने आदेश काढण्यात आला आहे.
यापुढे डांबरी रस्त्याचे आर्युमान १५ वर्षे, काँक्रिट रस्त्याचे ३० वर्षे, पुलाचे १०० वर्षे गृहित धरून कामाचे नियोजन करण्यात यावे. अशा प्रकारे काम न केल्यास व जेवढ्या लांबीच्या रस्त्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली, तेवढ्या लांबीचा रस्ता खराब झाल्यास किंवा पूल पडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्याची राहील. याविषयीची विशेष अट निविदेत नमूद करण्यात यावी. यानंतरही रस्ता किंवा पूल खराब झाला, खड्डे पडले किंवा पूल पडला तर कंत्राटदार व अधिकाऱ्यावर फौजदारी स्वरुपाची कारवाई केली जाईल. त्यामुळे निविदेतील या विशेष अटींची नोंद घेतली आहे, असे कंत्राटदाराची स्वाक्षरी असल्याचे प्रमाणपत्र घेऊन ते निविदेच्या सोबत जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या आदेशाची प्रत सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या सर्व मुख्य अभियंत्यांना, सर्व अधीक्षक अभियंत्यांना, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आली आहे.

रस्ते, पुलाचे आर्युमान
- डांबरी रस्ता : १५ वर्षे
- काँक्रिट रस्ता : ३० वर्षे
- पूल : १०० वर्षे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रस्तावांचे पुन्हा मूल्यमापन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मूल्यांकनाबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी उशिरा सूचना दिल्याने गुणदानाची संधी हुकलेल्या शिक्षकांच्या प्रस्तावांचे आता मूल्यांकन केले जाणार आहे. १३ मे रोजी या शिक्षकांना उपस्थित राहण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत. शिक्षक आणि प्रशासनातील वादावर ‘महाराष्ट्र टाइम्स’ने प्रकाश टाकला होता.
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या शिक्षकाला दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार अनेकदा वादात सापडतो. ऑनलाइन प्रस्ताव घेऊनही राज्यस्तरावरील प्रस्तावाचे मूल्यांकनावर वाद झाले. औरंगाबाद विभागात शिक्षक आणि प्रशासनात हमरी-तुमरी झाली. शिक्षकांना शिक्षणाधिकारी मूल्यांकनाचा निरोप न दिल्याने १६३पैकी केवळ ५७ प्रस्तावच संचालक कार्यालयाकडे पोचले. त्यानंतर शिक्षकांनी हा प्रश्न मांडला. ठराविक शिक्षकांच्याच पदरात हा पुरस्कार पडावा यासाठी ही प्रक्रिया गडबडीत पूर्ण करण्यात आल्याचा आरोप काही शिक्षकांनी केला होता.
पुरोगामी शिक्षक शिक्षकेतर संघटनांसह विविध संघटनांनी याबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर आता मूल्यमापन बाकी असलेल्या प्रस्तावांची छाननी करून गुणदानाची प्रक्रिया केली जाईल, असे पत्र शिक्षण उपसंचालकांनी काढले आहे. त्यामुळे शिक्षकांची संधी हुकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
उपसंचालकांनी याबाबतचे प्रत्र शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवून प्रस्तावांचे मूल्यमापन न झालेल्या शिक्षकांनी १३ मे रोजी उपस्थित रहावे, असे कळविले आहे. ही प्रक्रिया १३ मे रोजी नव्याने केली जाणार आहे. या निर्णयाचे शिक्षकांनी स्वागत केले आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांवरच ठपका
या प्रस्तावाच्या मूल्यांकनाबाबत झालेल्या गोंधळाला उपसंचालकांनी शिक्षणाधिकारीच जबाबदार असल्याचे परिपत्रकावरून स्पष्ट होते. शिक्षकांना शिक्षणाधिकारी यांनी उशिरा कळविल्यामुळे अनेकांचे गुणदान व पडताळणी होऊ शकली नाही, असे पत्रात म्हटले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी १३ मे रोजी होणाऱ्या मूल्यांकना प्रक्रियेला स्वतः उपस्थित रहावे, प्रतिनिधीला पाठवू नये. आवश्यकत ती कागदपत्रे सोबत आणावित असे निर्देश दिले आहेत. असे असले तरी, कुचराई करणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार याबाबत अधिकारी बोलण्यास तयार नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नांमका’च्या पाण्यासाठी वैजापुरात उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी नांदूर-मधमेश्वर जलदगती कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडावे या मागणीसाठी लाभधारक शेतकऱ्यांनी गुरुवारपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. कालव्यात पाणी न सोडल्यास शुक्रवारी दुपारी कार्यालयाच्या परिसरात शेतकरी सामूहिक फाशी घेतील, असा इशारा देण्यात आला आहे.
नांदूर-मधमेश्वर कालव्यातून तीन आवर्तन सोडण्याचे यापूर्वी झालेल्या बैठकांतून मान्य करण्यात आले आहे. एकूण साडेचार टीएमसी पाणी वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी सोडण्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आले होते. त्यानुसार अद्याप दीड टीएमसी पाणी शिल्लक आहे. नाशिक पाटबंधारे विभागाकडून या पाण्याचे बाष्पीभवन झाल्याचे सांगून उन्हाळी आवर्तन सोडण्यास नकार देण्यात येत आहे. यामुळे दोन्ही तालुक्यांतील शेतकरी संतप्त झाले आहेत. पाणी सोडण्याच्या मागणीसाठी बाजार समितीचे माजी संचालक ज्ञानेश्वर पाटील जगताप यांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकऱ्यांनी दुपारी चार वाजता तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली. शुक्रवारपर्यंत कालव्यातून पाणी न सोडल्यास सामूहिक फाशी घेण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर ज्ञानेश्वर जगताप, दत्ता पाटील धुमाळ, प्रतापराव सोमवंशी, पंडित शिंदे, सुरेश दारुंटे, चंद्रकांत गायकवाड, कैलास थोरात आदींसह अनेक शैतकऱ्यांच्या सह्या आहेत.

मुख्यमंत्र्यांचे पत्र
नांदूर-मधेश्वर जलदगती कालव्यातून पाणी सोडण्याची कार्यवाही करण्याचे पत्र मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले आहे. त्यांच्या पत्राला सुद्धा अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे. याबद्दल बुधवारी झालेल्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. शिवाय जिल्ह्यातील भाजपनेते काय करत आहेत, असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डोंगरगावात स्वाइन फ्लूचा संशय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
तालुक्यातील डोंगरगांव येथे ताप येणे, घशात खवखवने, श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे असलेले दोन रुग्ण सापडले. त्यांना औरंगाबाद येथील एम. आय. टी. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गावात स्वाइन फ्ल्यू लागण झाल्याच चर्चा सुरू झाल्याने आमदार अब्दुल सत्तार यांच्या सूचनेनुसार वैद्यकीय पथकाने गुरुवारी डोंगरगावात ४५ जणांची तपासणी केली.
डोंगरगांव येथे रुग्णांना ताप येणे, घशात दुखने, सर्दी व श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या आजारांचे रुग्ण वाढत असल्याची माहिती आमदार सत्तार यांना मिळाली होती. शिवाय दोन जण औरंगाबाद येथे उपचार घेत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यानुसार पथकाने गुरुवारी घरोघरी जावून ४५ जणांची तपासणी केली. त्यांना एक रुग्ण या आजाराचा आढळला नाही, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी सय्यद अजहर यांनी दिली. डोंगरगांव दोन महिलांना यापूर्वीच औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची तपासणी झाली असून त्यांचा अहवाल आलेला नाही, असे आरोग्य पर्यवेक्षक प्रकाशराव बिरारे यांनी सांगितले. नागरिकांनी घाबरून न जाता डॉक्टरांनी दिलेल्या सूचनेने उपचार घ्यावा, असे आवाहन आमदार सत्तार यांनी केले आहे.
यावेळी सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर, माजी पंचायत समिती सदस्य निजाम खान पठाण, नगर पालिकेचे बांधकाम सभापती विठ्ठल सपकाळ, रुग्ण कल्याण सेवा समितीचे सदस्य मोहम्मद हनीफ, माजी सरपंच उमर खान पठाण, पालोद येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद अजहर, तालुका आरोग्य पर्यवेक्षक प्रकाशराव बिरारे, आरोग्य सेवक भानुदास खोकडे, आरोग्य सेविका वंदना हासे, अब्दुल करीम कुरेशी, फईम पठाण, सत्तार हुसेन, जलील पठाण व आशा सेविकांची उपस्थिती होती.

दोन दिवस मुक्काम
हे पथक डोंगरगावात दोन दिवस राहणार आहे. त्यांच्याकडून उर्वरित रुग्णाची तपासणी करण्यात येणार आहे, असे डॉ. सय्यद अजहर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दानवेंविरुद्ध शिवसेनेची सिल्लोडमध्ये निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांचा अपमान करणारे भाजपचे प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यापर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. दानवे यांच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे तीव्र निदर्शने करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांना निवेदन देण्यात आले.
शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून निसर्गाच्या लहरीपणामुळे त्याची अवस्था वाईट झाली आहे. सध्या तुरीच्या खरेदीवरून शेतकरी त्रस्त झालेले आहे, या अवस्थेत खचलेल्या शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्याची गरज आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे दूर, प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल अत्यंत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांचे वक्तव्य माथे फिरवणारे आहे. त्यांच्या वक्तव्यावरून त्यांची व त्यांच्या पक्षाची खरी प्रतिमा समोर आली आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. आर. एल. पार्क येथील शिवसेना कार्यालयापासून शिवसैनिक गुरुवारी घोषणा देत उपविभागीय कार्यालयावर आले, तेथे निदर्शने करून निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख रघुनाथ चव्हाण, तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल, शहरप्रमुख मच्छिंद्रनाथ धाडगे, नगरसेवक सुदर्शन अग्रवाल, युवासेना तालुकाध्यक्ष विष्णू जाधव, शहराध्यक्ष शिवा टोम्पे, उपतालुकाप्रमुख शिवा गौर, सुभाष करवंदे, कैलास जाधव, उपशहर प्रमुख रवींद्र सोनवणे, लखन ठाकूर, आशिष कुलकर्णी, सरदारसिंग लखवाल, रवी काळे, गजानन जैस्वाल, गणेश कुदळ, अंकुश बन्सोड, सतीष शिरसाठ, कैलास जायभाये, किरण सिरसाठ, प्रमोद सिरसाठ, रामेश्वर एंडोल, संतोष बुजाडे, उत्तम शिंदे, अफरोज मुलतानी, इरफान शेख, शेनफड फरकडे, सचिन रूद्रे, विजय दगडघाटे, शिवसिंग खोडे, जयसिंग खोडे, अंबादास कालभिले, राहुल नवल आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोंबड्या, शेळ्यांसह कुटुंबाचे उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
इंदापूर शिवारातील गट नंबर ४३ मधील गायरान जमीन नावावर करण्यासाठी यशवंत लक्ष्मण भालेराव यांनी पत्नी निर्मला, मुलगा आकाश, मुलगी आरती, पाच कोंबड्या, सात शेळ्या व एका कुत्र्यासह तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
गायरान जमिनीसाठी उपोषणाला सहकुटुंब सुरुवात केल्यानंतर कोंबड्या, शेळ्या, पाळीव कुत्रा सांभाळण्यासाठी कोणीही नसल्याने भालेराव यांनी त्यांनाही सोबत घेतले आहे. तहसीलदारांना उपोषणाला बसण्यापूर्वी दिलेल्या निवेदनात यशवंत भालेराव यांनी म्हटले आहे की, १९८५-८६ पासून इंदापूर गट नंबर ४३ शिवारातील दोन एकर जमिनीवर ताबा आहे. जमीन ताब्यात असतांना नाव वगळले गेले आहे. ही जमीन ताबा नसताना कोंडीराम जाधव, सुभाष पंडित यांच्या नावावर करण्यात आलेली आहे. या जमिनीवर पेरणी करून पिके काढून अहोरात्र कष्ट करून मुलाबाळांची उपजीविका भागवत आहे. ही जमीन नावावर करण्यासाठी सहकुटुंब कोंबड्या, बकऱ्या, पाळीव कुत्र्यासह आमरण उपोषण करीत असल्याचे म्हटले आहे. तहसीलदार डॉ. अरूण जऱ्हाड यांनी संबंधीत तलाठ्याकडून अहवाल मागविला आहे. अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस आयुक्तालयात ड्रोनचे प्रात्यक्षिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आगामी काळात शहरावर ड्रोन कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. या कॅमेऱ्याचे प्रात्याक्षिक पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी गुरूवारी सायंकाळी पोलिस आयुक्तालयाच्या मैदानावर घेतले. तसेच यावेळी क्विक रिसपान्स टीमने थरारकरित्या संशयित दहशतवाद्यांना पकडण्याचे प्रात्याक्षिक सादर केले.
शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याप्रमाणे १० ड्रोन कॅमेरे वापरण्यात येणार आहेत. संकटकालीन परिस्थितीमध्ये हे ड्रोन कॅमेरे घटनेचे छायाचित्रण करणार आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी या ड्रोन कॅमेऱ्याचा चांगला उपयोग होणार आहे. सायंकाळी चार वाजता या ड्रोन कॅमेऱ्याचे प्रात्याक्षिक आयुक्त यादव यांनी घेतले. गोंधळ करणाऱ्या जमावाचे यावेळी आकाशातून छायाचित्रण करण्यात आले. तसेच दुसरा ड्रोन कॅमेरा हा जमावावर मिरची पूड फेकण्यासाठी वापरण्यात येणार होता. प्रात्याक्षिकामध्ये यात फुले टाकण्यात आली होती. मात्र तांत्रिक बाबीमुळे हा ड्रोन कॅमेरा उडू शकला नाही.

क्यूआरटीला पारितोषिक
क्विक रिसपान्स टीमने यावेळी संशयास्पद वाहनांचा पाठलाग करून त्यातील दहशतवादाना कसे पकडायचे याचे प्रात्याक्षिक सादर केले. क्युआरटीच्या पथकाने हे प्रात्याक्षिक उत्कृष्टरित्या सादर केले. पोलिस आयुक्त यादव यांनी देखील त्याला दाद देत पथकाला १५ हजारांचे पारितोषीक जाहीर केले. यावेळी उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात, गोवर्धन कोळेकर, पोलिस निरीक्षक सुरेश वानखेडे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिमकार्ड विक्रीची माहिती दरमहा द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्ह्यात बोगस सिमकार्ड विक्री करणारे विक्रेते पोलिसांच्या रडारवर आले आहेत. दहशतवाद्यांनी बोगस सिमकार्डचा वापर केल्याचे अनेक ठिकाणी निष्पन्न झाले आहे. त्यामुळे बोगस सिमकार्ड विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी दिला आहे. जिल्ह्यातील विक्रेत्यांना दरमहा सिमकार्ड विक्रीचा स्थानिक पोलिस ठाण्याला द्यावा लागणार आहे.
बोगस सिमकार्ड विक्रीला आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार पोलिस अधीक्षक कार्यालयातर्फे दुकानदारांसाठी सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सिमकार्ड खरेदीवेळी ओळखपत्र सादर झालेली व्यक्ती तीच आहे काय याची खात्री करावी, सिमकार्ड खरेदीदाराचे नाव, पत्ता, पर्यायी मोबाइल क्रमांक, फोटो, सिमकार्डची माहिती याची नोंद रजिस्टरला घ्यावी, दुसऱ्याच्या नावे व बनावट ओळखपत्राद्वारे सिमकार्ड घेणाऱ्याची माहिती पोलिस ठाण्याला द्यावी, दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, ट्रायच्या नियमानुसार मोबाइल सिम चालू करण्याआधी विक्रेत्याने व्हेरीफिकेशनच्या नियमांचे काटेकोर पालन करावे या सूचना दिल्या आहेत.

...तर, गुन्हे दाखल
सिमकार्ड विक्रीची माहिती स्थानिक पोलिस ठाण्याला दर महिन्याला देणे बंधनकारक आहे. या सूचनांचे पालन न करणाऱ्या विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून स्पषअट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झेडपी पुढील उपोषण आश्वासनानंतर स्थगित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषद आरोग्य विभागातील रुग्णवाहिकेवरील कर्मचाऱ्यांचे वेतन, पीएफ मिळत नसल्या कारणाने कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला सुरवात केली होती. दरम्यान, आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर त्याच्या उपस्थितीत दुपारी उपोषणकर्त्यांनी आंदोलन स्थगित केले.
जिल्हा परिषद आरोग्य विभागात २००५ पासून कंत्राटी वाहनचालकांमार्फत रुग्णवाहिकेची कामे केली जातात. या कर्मचाऱ्यांचे पीएफ, ईएसआय नियमाप्रमाणे भरावेत, सर्व कामगारांना किमान वेनत द्यावे, वेगवेगळ्या कंत्राटदारांकडील थकीत पगार द्यावा, जिल्हा परिषद यांच्याकडील २०१५ चे थकीत वेतन मिळावे, रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांची खोटी नावे टाकून हजेरी मस्टर टाकून वेतन उचलले आहेत, त्याची चौकशी करावी यासह अन्य मागण्या करण्यात आल्या.
परिषद कार्यालयासमोर भीमराव पठाडेसह अन्य कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. खतगावकर व जिल्हा परिषद सदस्यांना मिळाली. डॉ. खतगावकर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण, माजी सदस्य दीपक राजपूत यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत कारवाईचे आश्वासन दिले. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रसंगी आर. आर. गोरे, फिरोज शेख, शेषराव पवार, संतोष घुले, गणेश खोडपे, गणेश भोसले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेतन थकल्याने शिक्षण विभागाला कुलूप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
दोन महिन्यांचे वेतन थकल्याने शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पंचायत समिती कार्यालयाच्या शिक्षण विभागाला कुलूप ठोकून गटविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोंडले. वेतन मिळेपर्यंत कुलूप उघडणार नाही, अशी ठाम भूमिका शिक्षकांनी घेतली. अखेर गटविकास अधिकारी पुष्पा मनचंदा यांनी भेट देऊन आश्वासन दिल्यानंतर कुलूप उघडण्यात आले.
वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ३२४ शाळांमधील १२५५ शिक्षकांचे वेतन मार्च महिन्यापासून मिळालेले नाही. जिल्हा परिषदेकडून पंचायत समितीला २ मे रोजी बजेट मिळालेले आहे. परंतु, पंचायत समितीच्या कारभारामुळे शिक्षकांना वेतन मिळण्यास विलंब होत आहे. परिणामी, शिक्षकांना घरखर्च करतांना अडचणी येत आहेत. अनेक शिक्षकांनी सोसायटी, वाहन व गृह कर्ज घेतले आहे. कर्जाचे हप्ते थकल्याने संस्थांनी शिक्षकांना काळ्या यादीत टाकले आहे. शिक्षक संघाचे नारायण साळुंके, शिक्षक समितीचे अंजुम पठाण, मुप्टाचे विलास त्रिभुवन, शिक्षक सेनेचे सोमनाथ जगदाळे व मराठवाडा शिक्षक संघटनेचे शाम राजपूत आदींसह विविध शिक्षक शिक्षण विभागाच्या परिसरात जमा झाले व त्यांनी कार्यालयाला कुलूप ठोकून अधिकारी सय्यद तैयब्बा, वरिष्ठ लिपिक दिलीप अनर्थेसह सर्व कर्मचाऱ्यांना कोंडले.

शिक्षकांची मनधरणी
गटविकास अधिकारी पुष्पा पंजाबी यांनी कार्यालयाला भेट दिली व संतप्त शिक्षकांची समजूत काढत एक तास चर्चा केली. यापुढील काळात वेतनाच्या कामात घोळ होणार नाही, असे आश्वासन मिळाल्यानंतर शिक्षकांनी आंदोलन मागे घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता इंजिनीअरिंग प्रवेशाकडे लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गुरुवारी ‘एमएचटी-सीईटी’ घेण्यात आली. मराठवाड्यातून ५९ हजार विद्यार्थ्यांनी ही प्रवेशपूर्व परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल ४ जूनपर्यंत जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल आणि प्रवेश प्रक्रियेकडे आता लक्ष लागले आहे. यंदा अभियांत्रिकी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या वाढली असल्याने प्रवेशासाठी स्पर्धा होण्याची शक्यता आहे.
राज्यभरात विविध जिल्ह्यांमधून आज ही प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात आली. सकाळी दहा वाजता पेपर असल्याने सकाळी नऊ वाजता परीक्षा केंद्रावर विद्यार्थी उपस्थित होते. इलेक्ट्रॉनिक गॅजेट घेऊन परीक्षा हॉलमध्ये प्रवेश नव्हता. ‘नीट’च्या तुलनेत सूचनांचा भडिमार नसल्याने या परीक्षेत विद्यार्थ्यांची धावपळ झाली नाही. सकाळी दहा ते दुपारी साडेचार या वेळेत पेपर झाले. सकाळी दहा ते साडेअकरा यावेळेत गणित, दुपारी बारा ते दोन फिजिक्स, केमेस्ट्री, दुपारी तीन ते साडेचारदरम्यान ‘बायोलॉजी’चा पेपर झाला. मराठवाड्यात ‘एमएचटी-सीईटी’ला ६० हजार ४५८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५८ हजार ६०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

विषयाच्या क्रमवारीत बदल
परीक्षेत यंदा पहिल्यांदाच विषयाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. पहिल्यांदाच गणिताचा पेपर क्रमवारीत पहिल्यांदा घेण्यात आला. त्यामुळे ‘पीसीएम’ ग्रुपच्या विद्यार्थ्यांचा वेळ वाचला. मागील वर्षीपर्यंत बायोलॉजीचा पेपर दुसरा व शेवटचा पेपर गणिताचा होता. त्यामुळे या विद्यार्थ्यांना साडेचारपर्यंत थांबावे लागायचे. यंदा गणित विषयाचा पेपर पहिल्याच सत्रात झाल्याचे हे विद्यार्थी दुपारी दोन वाजता जाऊ शकले. पीसीबी ग्रुपच्या विद्यार्थ्यांचा दुपारी बारा ते साडेचार या वेळेत पेपर देता आले. नव्या बदलामुळे विद्यार्थी सुखावले.

प्रवेशाची स्पर्धा वाढणार
यंदा अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सीईटीला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सव्वालाखाने वाढली आहे. त्यामुळे प्रवेशासाठी स्पर्धा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निकाल चांगला लागला, तर कट ऑफ वाढेल आणि ही स्पर्धा अधिक चुरसदार होईल, असे तज्ज्ञांना वाटते. मागील वर्षी राज्यात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ६२ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या.

- मराठवाड्यातून नोंदणी ः ६०,४५८
- परीक्षेला उपस्थिती ः ५८,६०९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुलताबादेत जाळला खा. दानवेंचा पुतळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
तूर खरेदीवरून मुक्ताफळे उधळणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याला शिवसेना कार्यकर्त्यांनी जोडे मारून पुतळा जाळला. हे आंदोलन खुलताबाद येथील गुलमंडी भागात दुपारी साडेबारा वाजता करण्यात आले.
तालुकाप्रमुख किशोर कुकलारे यांच्या नेतृत्वाखाली रावसाहेब दानवे यांच्या विरोधात घोषणाबाजीने शिवसेना कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. विशेष म्हणजे पोलिसांना या आंदोलनाची माहिती नव्हती. भर रस्त्यातच रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळा जाळण्यात आला. यावेळी एकही पोलिस अधिकारी अथवा पोलिस कर्मचारी उपस्थित नव्हता. यावेळी माजी तालुकाप्रमुख गणेश भिकन अधाने, रवींद्र तंबारे, किरण फुलारे, पोपट वेताळ, लहू साळुंके, जयश्री साळुंके, विजय चव्हाण, बाळू मते, बाळू खुटे, संभाजी कोरडे, मनोहर लाळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिद्धेश्वर कारखान्यात ३५ जणांत लढत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याच्या भारतीय जनता पक्ष व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना यश आले नाही. अर्ज परत घेण्याची वेळ निघून गेल्यामुळे कारखान्याची निवडणूक लागली आहे. दरम्यान, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी १८ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने २१ जागांसाठी ३५ उमेदवार रिंगणात आहेत.
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजप व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. पण, तोपर्यंत उशीर झाला होता. त्यामुळे निवडणूक निर्वाचन अधिकारी आर. एस. शेख यांनी नियमानुसार वेळ निघून गेल्याचे सांगितले. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. कारखान्याचे विद्यमान चेअरमन श्रीरंग साळवे यांनी पुतण्या चंद्रशेखर साळवे याच्यासाठी उमेदवारी मागे घेतली. या शिवाय ज्ञानेश्वर तायडे, श्रीरंग साळवे, ठगण भागवत, बाजीराव दाभाडे, कैलास कळम, कुशालराव पवार, शिवाजी पाथ्रीकर, गणपत इंगळे, दिलीप दाणेकर, राजू घुसिंगे, पांडुरंग उजागरे, पद्माबाई जिवरग, जयश्री वाघ, किशोर अग्रवाल, लक्ष्मण दळवी, साहेबराव पाथरे, सुरेश माळी, रामलाल दुधे या मातब्बरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.
शिवना ऊस उत्पादक गटातून काँग्रेसला उमेदवार मिळाला नसल्यामुळे येथील तीन जागांसाठी भाजपचे चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. घाटनांद्रा व निधोना गटात प्रत्येकी तीन जागांसाठी काँग्रेसचे दोन, तर भाजपाचे तीन उमेदवार आहेत. सिल्लोड व भोकरदन गटामध्ये काँग्रेसचा एकही उमेदवार नसल्याने दोन्ही गटामध्ये प्रत्येकी तीन जागांसाठी भाजप उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.

मातब्बरांची माघार
कारखान्याच्या निवडणुकीतून दोन्ही पक्षांच्या मातब्बर पुढाऱ्यांनी माघार घेतली आहे. यामुळे ही निवडणूक लुटुपुटूची लढाई ठरणार आहे. सध्यातरी भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. निवडणुकीत भाजप पॅनलच्या ११ उमेदवारांची निवड निश्चित असल्याने कारखान्याची सत्ता भाजपकडेच राहणार आहे.

२१ रोजी मतदान
कारखान्यासाठी येत्या २१ मे रोजी मतदान होणार आहे. २२ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images