Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जिन्सीतील बे‌कायदा गर्भपात केंद्रावर छापा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिन्सी भागातील रनमस्तपुरा येथे सुरू असलेले बेकायदा गर्भपात केंद्र पोलिसांनी बुधवारी छापा टाकून उघड केले. याप्रकरणी महिला डॉक्टर व एका मदतनीस महिलेला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी गर्भपातासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले.
या कारवाईबाबत पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले की, किलेअर्क भागात राहणाऱ्या सुमैय्या अंजूम सय्यद इफ्तेखारोद्दीन (२५) यांचा त्यांचे पती सय्यद सल्लाहुद्दीन सय्यद शहाबुद्दीन यांनी १९ एप्रिल रोजी त्यांच्या मर्जीविरुद्ध डॉ. चंद्रकला आर. गायकवाड यांच्या गर्भपात केंद्रात गर्भपात केला. याबाबत त्यांनी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्याकडे तक्रार केली होती. पोलिस आयुक्तांच्या आदेशानंतर जिन्सी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्याम सुंदर वसूरकर यांनी उपनिरीक्षक वर्षा काळे व काही महिला कर्मचाऱ्यांचे विशेष पथक स्थापन केले.
तक्रारदार महिलेसोबत पोलिस २४ मे रोजी वेश बदलून हॉस्पिटलमध्ये गेले. ‘गर्भपात करायचा आहे,’ असे त्यांनी तेथे सांगितले. डॉ. गायकवाड यांनी, ‘संबंधित रुग्णाची तपासणी करावी लागेल,’ असे त्यांना सांगितले. ‘गर्भवती नसतानाही महिला गर्भवती आहे, असे सांगून गर्भपात करण्यासाठी डॉक्टर तयार झाले. त्यासाठी दोन हजार रुपये लागतील. एक इंजेक्शन आणावे लागेल. त्यासाठी उद्या या, असे सांगण्यात आले, अशी माहिती श्रीरामे यांनी दिली. दुपारी दोनच्या सुमारात तक्रारदाराची नातेवाईक महिला, अर्जदाराची आई व पोलिस उपनिरीक्षक वर्षा काळे या वेश बदलून गायकवाड यांच्या हास्पिटलमध्ये गेले. तेथे डॉक्टरांनी गर्भपात करण्याची प्रक्रिया सुरू केली. उपनिरीक्षक वर्षा काळे यांनी आतमधून इशारा करताच आजुबाजुला दबा धरून बसलेल्या पथकाने हॉस्पिटलवर छापा मारला.
या प्रकरणात डॉ. चंद्रकला रामराव गायकवाड (६०, रा. राज कॉम्प्लेक्स रोजेबाग) व त्यांची मदतनीस शांता गोकुळ सातदिवे (४६, रा. मोतीकारंजा) यांना अटक केली. हॉस्पिटलमधून गर्भपात करण्याचे साहित्य व औषधी ताब्यात घेतले आहे.

अनेक प्रकरणे उघडकीस येतील?
रनमस्तपुरा येथे पोलिसांनी उघड केलेल्या बेकायदा गर्भपात केंद्रात आतापर्यंत अनेक गर्भपात करण्यात आल्याचा संशय आहे. या केंद्रात स्त्री भ्रूण हत्या करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिलेची आत्महत्या; पतीला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सासरच्या शारीरिक-मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली. त्याला बुधवारी (२४ मे) कोर्टात हजर करण्यात आले असता शनिवारपर्यंत (२७ मे) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हस्के यांनी दिले.
या प्रकरणी सारंगधर बापुराव लहाने (वय ४२, रा. नाकोद, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, विवाहिता किर्ती (मृत) हिने सासरच्या शारीरिक-मानसिक छळाला कंटाळून २२ मे रोजी सकाळी विषारी औषध प्राशन केले. तिला उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात पती आशुतोष रामदास सोमदे (रा. सिडको महानगर, वाळूज, औरंगाबाद) याच्यासह सासरा रामदास सोमदे, सासू संगीता सोमदे, दीर किशोर सोमदे, नणंद अश्विनी सोमदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पती आशुतोष सोमदे याला मंगळवारी अटक केली, तर उर्वरित आरोपी पसार झाले. आरोपी आशुतोषला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, सखोल चौकशी करणे व पसार आरोपींना अटक बाकी आहे. आरोपी गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्याची शक्यता असल्याने पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील एन. एन. पवार यांनी केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत एकनाथांचा पालखीमार्ग जैसे थे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
केंद्र शासनाने पालखी मार्गासाठी मंजूर केलेल्या निधीतून संत एकनाथ महाराज यांच्या पारंपरिक पालखी मार्गाचेच काम होणार आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही, असा निर्वाळा उपविभागीय अधिकारी दीपक चव्हाण यांनी दिला आहे. संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यानिमित्त तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी ही माहिती शासनाच्यावतीने दिली.
पंढरपूर येथील आषाढी महोत्सवात सहभागी होण्यासाठी संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे १६ जून रोजी पैठणहून येथून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे बुधवारी तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पैठण-फुलंब्रीचे उपविभागीय अधिकारी दीपक चव्हाण हे होते.
या बैठकीत बोलताना चव्हाण यांनी पालखी मार्गात बदल होणार नसल्याचा निर्वाळा दिला. वारकऱ्यांच्या सर्व मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत. यावर्षापासून पालखी निधीत पाच लाखावरून साडेसात लाखापर्यंत वाढ करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त थेट पंढरपूरपर्यंत देण्यास पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी मान्यता दिली. पालखीसोबतच्या पाण्याच्या टँकरमध्ये एकने वाढ करून ते पाच केले आहेत. पालखी प्रस्थानापूर्वी नगर पालिका व पाटबंधारे विभागातर्फे चनकवाडीचा रस्ता तत्काळ दुरुस्त करणे व पालखी सोबतच्या वाहनांना थेट मंदिरापर्यंत प्रवेशाकरिता पास देण्याचे आदेश चव्हाण यांनी बैठकीत दिले.
या बैठकीला तहसीलदार डी. सी. मेंडके, नायब तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी, उपमुख्यधिकारी दिलीप साळवे, पोलिस निरीक्षक अशोक गिरी, भगवान कुलकर्णी, पालखीप्रमुख हभप रघुनाथ महाराज, वारकरी प्रतिष्ठानचे चंद्रकांत अंबिलवादे, किसन महाराज धरपळे, राजेंद्र सातघरे, दीपक लिखिते, शिवाजी साबळे, शिवाजी बावणे, गंगा बावणे, कर्ण बावणे, भाऊराव धरम, बब्रू कदम आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेत लेटलतिफांची हॅटट्रिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेतील सलग तिसऱ्या दिवशीच्या तपासणीत १४ अधिकारी व ३७ कर्मचारी लेटलतिफ ठरले. सलग दोन दिवसांच्या तपासणीनंतर अधिकारी, कर्मचारी कार्यालयात वेळेवर येतील, अशी अपेक्षा होती, पण ती फोल ठरली आहे.
सरकारी कार्यालयात येण्याची वेळ निश्चित असूनही जिल्हा परिषदेतील बहुतांश अधिकारी, कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करतात. मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांनी सोमवारी सकाळी सर्व विभागांना भेटी देऊन उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. दुसऱ्या दिवशी अतिरिक्त सीइओ सुरेश बेदमुथा यांनीही धडक मोहीम राबविली. डेप्युटी सीइओ मंजुषा जाधव यांच्या तपासणीत तिसऱ्या दिवशी १४ अधिकारी आणि ३७ कर्मचारी वेळेवर कार्यालयात उपस्थित नसल्याचे दिसून आले. प्रशासनाने एवढी कडक कारवाई करूनही अधिकारी, कर्मचारी बिनधास्त असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेतील कर्मचारी वेळेवर येत नाहीत, अशा तक्रारी वारंवार प्रशासनाला प्राप्त होत होत्या. स्थायी समिती बैठकीत उपाध्यक्ष केशवराव तायडे यांनीही आरोग्य विभाग, बांधकाम विभागातील कर्मचारी जागेवर हजर नसतात, अशी तक्रार केली होती. सर्व तक्रारींची दखल घेऊन सीइओ मधुकरराजे अर्दड यांनी सोमवारी सकाळी झेडपी मुख्यालयातील सर्व विभागांना सकाळी भेट दिली. त्यावेळी तब्बल १७ अधिकारी व १४४ कर्मचारी वेळेत हजर नसल्याचे दिसून आले. मंगळवारी अतिरिक्त सीइओ सुरेश बेदमुथा तपासणी केली त्यात १२ अधिकारी ६१ कर्मचारी लेटलतिफ असल्याचे आढळून आले. बुधवारी सकाळी १० वाजून १० मिनिटांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) मंजुषा जाधव यांनी सर्व विभागांना भेट दिली. त्यात १४ अधिकारी आणि ३७ कर्मचारी गैरहजर आढळून आले. काही अधिकारी स्वच्छता मिशनच्या कार्यशाळेला गेल्याचे सांगण्यात आले.

सलग तिसऱ्या दिवशी अधिकारी, कर्मचारी उशिरा येणे गंभीर आहे. सुरुवातीला सर्वांना समज देण्यात येईल. त्यानंतरही परिस्थिती सुधारली नाही, तर एक वेतनवाढ रोखली जाईल. यापुढे दररोज दहा वाजून १० मिनिटांनी हजेरी रजिस्टर जमा केले जातील. एखाद्या कर्मचाऱ्याला दौऱ्यावर जायचे असेल तर त्याने हालचाल रजिस्टरमध्ये नोंद करावी, यापुढे तालुका पातळीवरही ही मोहीम राबविली जाईल.
मधुकरराजे अर्दड, सीइओ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांकडून मारहाण; व्हिडिओ व्हायरल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
येथील एका दुचाकीस्वारास तीन वाहतूक पोलिसांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांवर हात उगारणाऱ्या तरूणावर वाहतूक पोलिस शाखेने कारवाई केली आहे. शहरातील आकाशवाणी चौकात मंगळवारी सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओत तीन पोलिस एका वाहनधारकाला मारहाण करीत असल्याचे दिसते. वाहनधारकही पोलिसांवरही हल्ला करीत असल्याचे दिसते. संबंधित वाहन जप्त करण्यात आले आहे. आकाशवाणी चौकातील प्रकाराबाबत वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश अघाव यांनी स्पष्टीकरण दिले आहे. एमएच २० डीसी ८९२ क्रमांकाच्या दुचाकीवरून तीन तरूण जात होते. त्यांना अडवून पोलिसांनी वाहन बाजूला घेण्यास सांगितले असता त्यांनी वाद घातला. पोलिसांनी संयमाने समजविण्याचा प्रयत्न केला. कागदपत्रे मागण्याचा प्रयत्न केला असता, वाहनधारकाने अरेरावी सुरू केली. अखेर तरूणाने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांना मारहाण करावी लागली. त्या तरूणाशी संबंधित कुणीतरी घाटीत दाखल होते. म्हणून त्याची गाडी ताब्यात घेऊन वाहनधारकाला सोडण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड लाख शौचालयाचे बांधकाम होणार सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन युद्धपातळीवर कामाला लागले आहे. २९ मे ते ४ जून दरम्यानच्या सप्ताहात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये १ लाख ४३ हजार शौचालयांचे काम सुरू करण्यात येईल. १५ ऑगस्टपर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.
जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागातर्फे जिल्ह्यातील ग्रामसेवक, सरपंच तसेच अधिकाऱ्यांची कार्यशाळा आज घेण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अर्दड म्हणाले, जनगणनेनुसार जिल्ह्यात ३ लाख ५९ हजार कुटुंबे आहेत. या सर्व कुटुंबांसाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालये बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गेल्या महिन्यात घेतलेल्या आढाव्यात १ लाख ५३ हजार ९०७ शौचालये बांधणे शिल्लक होते. आज हा आकडा १ लाख ४३ हजार ३०३ एवढा आहे. १५ ऑगस्टपर्यंत हागणदारीमुक्ती करावयाची आहे. त्यानुसार प्रतिदिवस ११९४ शौचालये जिल्ह्यात बांधावे लागतील. कर्मचारी संख्या लक्षात घेता दर महिन्यात ३४ ते ३५ हजार शौचालये बांधावी लागणार आहेत, असे ते म्हणाले.
त्यासाठी गावपातळीवर तांत्रिक मार्गदर्शन, संवाद कौशल्य, मोटिव्हेशन, साहित्य उपलब्ध करून देणे, लोकसहभाग याबाबत आजच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. दिवसभर अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यांनी मार्गदर्शन करून ही मोहीम कशा पद्धतीने यशस्वी करावयाची आहे, याची चर्चा केली. सरकारकडून या योजनेला निधी दिला जाईल. पण तोवर गावपातळीवर अडचणी उद्‍भवू नयेत, यासाठी अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली आहे. शौचालय बांधकामासाठी वाळू, पाणी, पैसा कुठेही कमी पडू दिला जाणार नाही. यावेळी अतिरिक्त सीइओ सुरेश बेदमुथा, उपाध्यक्ष केशवराव तायडे, स्वच्छ भारत मिशनचे समन्वयक अरूण रसाळ उपस्थित होते.

अर्ज भरून घेणार

या मोहिमेची माहिती नागरिकांपर्यंत अधिक चांगल्या पद्धतीने पोचावी, यासाठी १ लाख ४३ हजार कुटुंबापर्यंत झेडपीचे कर्मचारी पोचतील. त्यांना एक अर्ज देतील. त्यात सर्व माहिती भरून घेतली जाईल. त्यामुळे नेमकी माहिती समोर येईल. २९ मेपासून आठवडाभर जिल्ह्यातील १०० टक्के शौचालयांचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. ज्यामुळे १५ ऑगस्टपर्यंत उद्दिष्टपूर्ती होणार आहे.

मराठवाड्यात चौथा

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हागणदारीमुक्तीच्या कामात औरंगाबाद जिल्हा मराठवाड्यात चौथ्या क्रमांकावर आहे. दारिद्रयरेषेखालील कुटुंबांसाठी शौचालयांच्या बांधकामात मात्र औरंगाबाद अव्वल असल्याचे स्वच्छ भारत मिशनचे समन्वयक अरूण रसाळ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जामुळे शेतकऱ्याची जातेगावात आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
तालुक्यातील जातेगाव येथील साेमिनाथ परभत दानवे (वय ४२) या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून अात्महत्या केली अाहे. त्यांचा मृतदेह गट नंबर १७५ मधील शेतातील विहिरीत अाढळला. ही घटना मंगळवारी उघडकीस अाली. याप्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
साेमिनाथ दानवे हे शनिवारपासून (२० मे) बेपत्ता हाेते. त्यांचा शोध घेऊनही ते सापडले नव्हते. त्यांच्यावर २००९ पासून साेसायटीचे एक लाख रुपये कर्ज अाहे. याचबराेबर बाहेरील खासगी देणी ८० हजार रुपये आहेत, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. त्यांना ७२ गुंठे व अाठ गुंठे, अशी एकूण दाेन एकर शेती अाहे. चार वर्षांपासून नापिकी असल्याने कर्ज कसे फेडावे या विचारात ते बेचैन होते. त्यातून अात्महत्या केली, असे कुटुंबीयांनी सांगितले. तलाठी भाग्यश्री दुताेंडे यांनी पंचनामा केला. दानवे यांच्या मागे पत्नी, १४ वर्षांचा मुलगा व १२ वर्षांची मुलगी, असा परिवार अाहे. याबाबत फुलंब्री पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक ए. एफ. आगळे हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन अधिष्ठातांची विद्यापीठात नियुक्ती

$
0
0

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात चार प्रभारी अधिष्ठाता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५७व्या दीक्षांत समारंभ येत्या ३० मे रोजी होणार अाहे. नवीन विद्यापीठ कायद्याप्रमाणे यापुढे चारच विद्याशाखा असणारा आहेत. या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ बी ए चोपडे यांनी बुधवारी (२४ मे) या नियुक्त्या करण्यात आल्याची घोषणा केली.
त्यामध्ये डॉ. वाल्मिक सरवदे (वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र), डॉ. दिलीप खैरनार (कला व सामाजिक शास्त्रे - मानव्यविद्या शाखा) डॉ. मझहर फारुकी (विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा) व डॉ संजय साळुंके (आंतर विद्याशाखा) यांचा समावेश आहे. डॉ प्रदीप जब्दे यांच्या स्वाक्षरीने त्यांना बुधवारी सायंकाळी पत्र देण्यात आले. डॉ. सरवदे हे वाणिज्य विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असून, व्यवस्थापनशास्त्र विभागाचे संचालक आहेत. डॉ. खैरनार हे देवगिरी महाविद्यालयात समाजशास्त्र विभागप्रमुख तर डॉ. मझहर फारुकी हे डॉ. रफिक झकेरिया महिला महाविद्यालयात कार्यरत आहेत. डॉ. साळुंके हे समाजशास्त्र विभागात प्राध्यापक आहेत. ३१ ऑगस्ट २०१७ किंवा नवीन पूर्णवेळ अधिष्ठांताची नियुक्ती होईपर्यंत ते कार्यरत राहणार आहेत. प्रभारी अधिकारी डॉ. सतीश पाटील व परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. राजेश रगडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बार बंद करण्याच्या आदेशाला स्थगिती

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा वेगळा अर्थ लावून राज्य मार्गावरील हॉटेल व बार बंद करण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे सुटीतील न्या. के. के. सोनवणे यांनी दिले.
याचिकाकर्ते राजेंद्र शेळके (पाचोड ) यांचे हॉटेल व बार हे पैठण-पाचोड या राज्यमार्गावर आहे. अन्य याचिकाकर्ते ओमप्रकाश काल्डा, सुजाता गुंजाळ यांचे हॉटेल व बार हे राजूर-अकोले, संगमनेर-नेवासा या राज्यमार्गांवर आहे. या याचिकाकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. शासकीय बांधकाम विभागाने दिलेल्या पत्राप्रमाणे याचिकाकर्त्यांचे हॉटेल हे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गावर नाही. त्यांचे हॉटेल असलेले रोड हे फक्त राज्यमार्ग आहे. असे असताना जिल्हाधिकारी यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा वेगळा अर्थ लावून त्यांचे हॉटेल बंद करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांचे हॉटेल हे फक्त राज्यमार्गांवर आहे. त्यामुळे त्यांचे हॉटेल बंद करणे चुकीचे आहे, असा युक्तीवाद याचिकाकर्त्यांचे वकील विजय लटांगे यांनी केला. कोर्टाने अंतरिम स्थगिती देऊन हॉटेल सुरू करण्याचे आदेश दिले. या याचिकेची पुढील सुनावणी १३ जूनला होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५० कोटींचे रस्ते ‘डीपीआर’च्या प्रतीक्षेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रस्त्यांच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महापालिकेने अद्याप सादर न केल्यामुळे १५० कोटी रुपयांचा निधी रखडला आहे. रस्त्यांच्या कामासाठी औरंगाबाद महापालिकेला निधीचे वाटप करण्याची शिफारस अर्थमंत्र्यांनी केली, पण डीपीआर न मिळाल्यामुळे नगरविकास खात्याने ही शिफारस अडकवून ठेवली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
महापालिकेत महापौरपदी भाजपचे भगवान घडमोडे विराजमान झाले. महापौर बदल होताच शहारासाठी वेगळे काहीतरी करण्याचे त्यांच्यासह भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ठरविले. शहरात रस्त्यांचा प्रश्न गंभीर असून, त्यासाठी शासनाकडून विशेष निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. या प्रयत्नांना यश देखील आले. शहरातील रस्त्यांसाठी दोन टप्प्यांत १५० कोटी रुपयांचा निधी देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मान्य केले. राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी रस्त्यांच्या कामाचा प्रस्ताव द्या, अशी सूचना महापालिकेला करण्यात आली. त्यानुसार महापालिकेच्या यंत्रणेने १५० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला. त्यापूर्वी २६८ कोटी रुपयांचा प्रस्ताव रस्ते विकासाच्या कामासाठी शासनाकडे पाठवण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार या प्रस्तावात कपात करून १५० कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला. राज्याच्या अर्थसंकल्पात औरंगाबाद शहरातील रस्त्यांच्या कामासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
औरंगाबाद महापालिकेला आवश्यकतेनुसार निधी देण्यात यावा, अशी शिफारस करणारे पत्र काही दिवसांपूर्वी अर्थमंत्रालयाने नगरविकास खात्याला पाठवले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; नगरविकास खात्याने अर्थमंत्रालयाचे पत्र अडवून ठेवले आहे.
दीडशे कोटी रुपयांच्या निधीतून कोणत्या रस्त्यांची कामे केली जाणार आहेत, याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महापालिकेने सादर केलेला नाही. डीपीआर सादर करेपर्यंत निधी न देण्याची भूमिका नगरविकास खात्याने घेतली आहे. महापालिकेकडे आवश्यक मनुष्यबळ नसल्यामुळे खासगी संस्थेच्या माध्यमातून डीपीआर तयार करून घेण्याचे महापालिकेच्या यंत्रणेने ठरविले. खासगी संस्थेची नियुक्ती करण्याबद्दलचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवला, पण स्थायी समितीच्या दोन बैठकांमध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे डीपीआर तयार करण्याचे काम खोळंबले आहे.

डीपीआर १५ दिवसांत ः महापौर
यासंदर्भात महापौर भगवान घडमोडे यांनी सांगितले की, शहरातील रस्ते विकासासाठी १५० कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. डीपीआर तयार न झाल्यामुळे अद्याप निधी मिळाला नाही यात तथ्य असू शकते. त्यामुळेच डीपीआर तयार करण्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीचे सभापतिपद अस्तित्वात नसल्यामुळे मी माझ्या अधिकारात मंजूर केला आहे. एक-दोन दिवसांत त्या संस्थेला वर्कऑर्डर दिली जाईल व पुढील १५ दिवसात डीपीआर शासनाला सादर केला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला, बालविकासला अधिकारी मिळेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा महिला व बाल विकास विभागाला पूर्णवेळ अधिकारी नसल्याने विभागाच्या कामकाजावर गंभीर परिणाम होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून बाल विकास नागरी प्रकल्प क्र. १ च्या प्रकल्प अधिकारी रेश्मा चिमुंद्रे याच्याकडे या विभागाचा पदभार आहे. दोन्ही विभाग व पदे महत्त्वाची असल्याने दोन्ही विभागाच्या कामकाजावर परिणाम होत आहे. महिला व ब‌ालविकास‌ विभागाला जून २०१५ पासून पूर्णवेळ अधिकारी नाही.
जून २०१५ पासून पूर्णवेळ अधिकारी नसल्याने विभागाचे कामकाज प्रभारींवर सुरू आहे. महिला व बालकांच्या विविध समित्यांचे सदस्य सचिव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी असतात. यातील बऱ्याच विषयांच्या बैठका घेण्यात आल्या नाहीत. महिला व अल्पवयीन मुला-मुलींबाबत अनूचित घटना घडल्यास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी असणे अपेक्षित असते. ऑगस्ट २०१४ पर्यंत संजय कदम हे विभागाचे शेवटचे पूर्ण वेळ अधिकारी होते. त्यानंतर प्रकल्प अधिकाऱ्यांना पदभार सोपवण्यात येत आहे. विद्यमान अधिकारी चिमुंद्रे या ५ डिसेंबर २०१६ पासून या पदावर आहेत.
शुभमंगल, सामूहिक विवाह आदी योजनांना पूर्णवेळ अधिकारी नसल्याने प्रतिसाद मिळत नाही. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठीची विशाखा समितीचा अद्ययावत तपशील विभागाकडे नाही. महिलांच्या तक्रारी व अडचणी सोडवण्यासाठी आयोजित महिला लोकशाही दिनातही महिलांच्या तक्रारींची संख्या अत्यंत तोकडी आहे. या विभागाला तातडीने पूर्णवेळ अधिकारी नेमण्याची गरज आहे.

बैठका लांबणीवर

बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार, अॅसिड हल्‍ला यातील पीडितांना अर्थसाह्य व पुनर्वसनाची मनोधैर्य योजनेच्या बैठका सतत लांबणीवर पडत आहेत. विशाखा समित्यांच्या नोडल ऑफिसरकडे पाठपुरावा करण्यात येत नाही. यामुळे समित्यांच्या कामावर परिणाम झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या घरापर्यंत श्वानाने काढला माग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फर्दापूर
सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील अरिहंतनगरातील एक घर फोडून चोरांनी दोन लाख ८२ हजारांच्या दागिन्याची चोरी केली. हे कुटुंब मंगळवारी रात्री गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते. चोरीचा माग काढण्यासाठी आणलेल्या श्वानाने पोलिस कर्मचारी निवासस्थानापर्यंत माग काढला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरणचे कर्मचारी सय्यद इमरान सय्यद अली (वय ३०) हे उकाड्यामुळे कुटुंबासह छतावर झोपण्यासाठी गेले होते. चोरांनी पाळत ठेऊन हे कुटुंब झोपी गेल्यानंतर मध्यरात्री इमरान यांच्या घराच्या दाराचे कडीकोयंडे उचकटून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले दोन लाख ८२ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. ही माहिती समजल्यानंतर उपविभागीय पोलिस आधिकारी राजगुरू यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा,अंगली मुद्रा तज्ज्ञ, श्वानपथक आदींनी धाव घेतली. याप्रकरणी फर्दापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निलेश घोरपडे करीत आहेत. पोलिसांचे श्वान पोलिस कर्मचारी निवासस्थान परिसरात जाऊन थांबला. त्यामुळे या चोरीत पोलिस कर्मचारी सहभागी आहे काय, अशी कुजबूज होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवारी शहरात हेरिटेज वॉक

$
0
0

रविवारी शहरात हेरिटेज वॉक
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दख्खनचा ताज महाल म्हणून ख्याती असलेल्या बीबीका मकबऱ्याची सफर रविवारी (२८ मे) औरंगाबादकरांना घडणार आहे. औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्यावतीने ‘हेरिटेज वॉक’ आयोजित करण्यात आला आहे.
औरंगाबादेत प्रमुख पर्यंटन आकर्षणांपैकी एक असलेल्या बीबी का मकबऱ्याला पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटक येतात. शहरातील लोकांनासुद्धा याची माहिती मिळावी आणि त्याच्या पैलूंशी अवगत करण्यासाठी हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी सात वाजता बिबीका मकबरा येथे हा हेरिटेज वॉक होणार आहे. मकबऱ्याचा संपूर्ण परिसर, बारादरी, आईना महाल, मस्जिद, आणि मकबऱ्याची जलव्यवस्था या वॉक दरम्यान पाहायला आणि अभ्यासायला मिळणार आहे. या कार्यक्रमात डॉ. दुलारी कुरेशी, डॉ. शिवकांत बाजपेयी, रफात कुरेशी, डॉ. बिना सेंगर हे मकबऱ्याविषयी माहिती देणार आहेत. मकबऱ्याच्या प्रवेशद्वारापासून सुरू होणाऱ्या या वॉकच्या माध्यमातून मकबऱ्याची विस्ताराने पाहणी करता येणार आहे. सकाळी सात वाजता सुरू होणाऱ्या या वॉकला डोक्‍यावरील टोपी आणि पाण्याची बाटली घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन शहरवासीयांना आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौशल्याचे धडे फक्त कागदावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे धडे प्रशिक्षण देण्याची शासनाची घोषणा हवेतच विरली आहे. अभ्यासक्रम, कॉलेजांची तयारी, समन्वयकांची नेमणूक होऊनही अद्याप एक तासिकाही होऊ शकली नाही. पॉलिटेक्निक कॉलेजांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात येणार होता. त्यासाठी नापास विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कौशल्य विकासास पात्र, असा उल्लेखही करण्यात आला.
विद्यार्थ्यांवरील नापासचा शिक्का पुसण्यासाठी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी घोषणा करण्यात आली. दहावीत तीनपेक्षा अधिक विषयातील नापास विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पात्र ठरविण्यात आले. दहावीच्या गुणपत्रिकते खास कौशल्य विकासास पात्र, असा उल्लेख करण्यात आला आहे. उपक्रमात राज्यातील २७४ पॉलिटेक्निकमधून या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची सोय करण्यात आली. औरंगाबाद शहरातील ३ कॉलेजांमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार होते. सहा महिने कालावधीच्या १६ अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली. पॉलिटेक्निकमध्ये या अभ्यासक्रमांचे धडे दिले जाणार होते. तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयात नापास असलेल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याला प्रवेशही देण्यात आले. शैक्षणिक वर्ष संपले तरी, या पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले गेले नाही. विद्यार्थीच येत नसल्याचे कारण आता सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांना कौशल्याभिमुख शिक्षण घेता यावे, यासाठी ही योजना पुढे आली प्रत्यक्षात अभ्यासक्रमाचे वर्गच सुरू नाहीत. पॉलिटेक्निक कॉलेजांमधील पायाभूत सुविधांचा उपयोग करून हे प्रशिक्षण दिले जाणार होते. एका बॅचमध्ये ३० विद्यार्थीचा समावेश करण्यात आला. त्यांना त्यांच्या आवडीनुसार प्रशिक्षण दिले जाणार होते. सुरुवातीला ऑगस्ट, त्यानंतर सप्टेंबरमध्ये प्रशिक्षणाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षातील दहावीचा निकाल जवळ आला, तरी मागील वर्षीचे वर्ग सुरू होऊ शकलेले नाहीत.

शाळा प्रशासनही उदासिन
दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची जबाबदारी शाळांवरही टाकण्यात आली होती. त्याबाबत प्रशिक्षण, प्रवेश प्रक्रियेबाबत तयार करण्यात आलेल्या अॅपची माहिती आदींसाठी कार्यशाळा घेण्यात आल्या. त्यानंतरही शाळांनी त्यात फारसा पुढाकार न दाखविला नाही. त्यामुळे ही माहितीच सर्व संबंधित विद्यार्थ्यांपर्यंत पोचली नसल्याचे सांगण्यात येत आहे. दहावीच्या गुणपत्रिकते खास कौशल्य विकासास पात्र असा उल्लेख करण्यात आला आहे. गुणपत्रिका वितरित करतावेळी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी, असे स्पष्ट करण्यात आले होते. औरंगाबाद विभागात एकूणच सर्व स्तरावर उदासिनता असल्याने येथे वर्गच सुरू होऊ शकले नाहीत.

असे अभ्यासक्रम
अनुत्तीर्ण राहिलेल्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास योजनेतंर्गत विविध अभ्यासक्रमाचे धडे दिले जाणार. त्यासाठी मेकॅनिकल अँड ऑटोमोबाइल टेक्निशियन, हँड एम्ब्रॉयडरी, मशिन ऑपरेटर, सिव्हिल कन्स्ट्रक्शन टेक्निशियन, इलेक्ट्रॉनिक टेक्निशियन, अन्न प्रकिय्रा, सेटअप बॉक्स इन्स्टॉलर अँड सर्व्हिस टेक्निशियन, प्लबिंग अशा अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. जवळच्या पॉलिटेक्निकमध्ये हे अभ्यासक्रम शिकविले जाणार होते. शिक्षण मंडळ, तंत्रशिक्षण मंडळ, यशस्वी अॅकॅडमी फॉर स्किल, पॉलिटेक्निक कॉलेजांच्या पुढाकारातून ही योजना राबविली जाणार असली तरी, यंदा त्याला मुहूर्त मिळालेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याध्यापकाचा तरुणीवर बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
औरंगाबाद जिल्हा महिला काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्षा व गल्ले बोरगांव येथील सरपंच शोभा जगन्नाथ खोसरे व काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष जगन्नाथ खोसरे यांच्या मुलाने एका विवाहितेवर बलात्कार केल्याचा गुन्हा खुलताबाद पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. संदीप जगन्नाथ खोसरे, असे त्याचे नाव असून तो गल्ले बोरगाव येथील नाथ माध्यमिक महाविद्यालय मुख्याध्यापक आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीसोबत पटत नसल्याने ही विवाहिता माहेरी राहत होती. ती मंगळवारी (२३ मे) परीक्षेनिमित्त कन्नडला गेली असता संदीप बोरसे याने तिला मोबाइलवर वारंवार संपर्क केला. पण, परीक्षा सुरू असल्याने तिने मोबाइल उचलला नाही. परीक्षा संपल्यानंतर फोन का केला अशी विचारणा तिने केली. त्यावर संदीप याने तिला वेरूळ येथे उतरण्यास सांगितले. त्यानुसार पीडित विवाहिता वेरूळ येथील शिवालय तीर्थकुंड येथे बसमधून उतरली. त्याने तिला कैलास गेस्ट हाउसमध्ये नेऊन दुपारी चार ते साडेचारच्या दरम्यान बलात्कार केला. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित विवाहितेने बुधवारी सकाळी खुलताबाद पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संदीप जगन्नाथराव खोसरे याच्याविरुद्ध कलम ३७६, ५०६ भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत हे तपास करीत आहेत. दरम्यान, संशयित आरोपी संदीप बोरसेला पकडण्यासाठी पोलिसांनी दोन पथक स्थापन केली आहेत.

आठवड्यातील तिसरी घटना
खुलताबाद तालुक्यात या आठवड्यातील ही बलात्काराची तिसरी घटना आहे. १७ मे रोजी पोलिस हवालदार सुधाकर कोळी याने एका १३ वर्षीय मुलीवर बलात्कार केला होता. औरंगाबाद येथील एका तरुणीवर शेख इरफान या युवकाने २२ एप्रिलला बलात्कार केल्याप्रकरणी २३ मे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता २४ मे रोजी तिसरा गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोशल मीडियावर निकालाच्या अफवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाच्या तारखेची सोशल मीडियावर बुधवारी अफवा कायम होती. मंडळाने अद्याप निकालाची जाहीर केलेली नाही, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन मंडळाचे अधिकारी दिवसभर करत होते.
दहावी, बारावीच्या परीक्षेनंतर मे महिन्याचा पंधरवाडा संपला की, पालक, विद्यार्थ्यांना निकालाचे वेध लागतात. त्यात सोशल मीडियावरील वेगवेगळ्या तारखांनी निकालाबाबत गोंधळ निर्माण केला आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या तारखा, चर्चा असल्यामुळे विद्यार्थी, पालक संभ्रमात आहेत. शिक्षण मंडळातही बुधवारी दिवसभर निकालाबाबत फोन खणखणत होते. मंडळाने अशा प्रकारचे कोणते वेळापत्रक अद्याप जाहीर केले नाही हे सांगतासांगता अधिकारी, कर्मचारीही वैतागले होते, तर निकाल केव्हा याची विद्यार्थी, पालकांना उत्सुकता लागली आहे.
मंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; दोन-तीन दिवसांत या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात. विभागीय मंडळाच्या सचिव वंदना वाहुळ यांनी ‘मटा’ला सांगितले की, अद्याप मंडळाने बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केलेली नाही. निकालाची तारीख निश्चित झाल्यावर त्याची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे दिली जाईल.
दहावीच्या निकालही जूनच्या पहिल्या आठवड्यात की दुसऱ्या या चर्चेला ऊत आला आहे. दहावीच्या निकालाचीही तारीख अद्याप ठरली नसल्याचे त्यांनी सांगितले. माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाप्रमाणे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावी निकालाबाबतही अशीच चर्चा होती. वेबसाइटवरूनही स्पष्ट करण्यात आले नसल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये चर्चा होती.

६ जूनपर्यंत निकालाची शक्यता
दहावीचा निकालाबाबतही चर्चा जोरदार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ६ जूनपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. यंदा उत्तरपत्रिका तपासणीवर सुरुवातीला शिक्षकांनी बहिष्कार टाकला होता. त्यामुळे निकालाला उशीर लागण्याची शक्यता वर्तवली जात होती, परंतु काही दिवसांत शिक्षकांनी बहिष्कार मागे घेत उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात केली. त्यामुळे निकाल वेळेत लावण्यास मदत होत असल्याचे मंडळातील सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयंत पाटलांविरुद्ध भाजपची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी महिलांविषयी अपमानास्पद विधान केले, असा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीने बुधवारी सायंकाळी चार वाजता क्रांती चौकात जोरदार आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी पाटील यांचा निषेध केला.
शहराध्यक्ष मनीषा भन्साली, प्रदेश उपाध्यक्ष रेखा कुलकर्णी, प्रदेश सचिव सविता कुलकर्णी, दिव्या मराठे, साधना सुरडकर, स्मिता दंडवते यांच्या प्रमुख उपस्थितीत निदर्शने करण्यात आली. महिलांचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही, असे म्हणत संतप्त कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. मृणालिनी फुलगीरकर, मीरा चव्हाण, संध्या कापसे, सुनीता सोळुंके, छाया सोनवणे, रुपाली वाघुळे, अमृता पालोदकर, गीता कापुरे, सुनंदा निकम, मंगल टोणपे, सुप्रिया चव्हाण आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त ३ जून रोजी गोपीनाथ गडावर होणाऱ्या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची उपस्थिती लाभणार आहे. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्यावतीने यादिवशी विविध सामाजिक उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आली.
गोपीनाथ गडावर ३ जून रोजी सकाळी ११ वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी आयुष्यभर समाजातील वंचित, पीडित घटकांसाठी काम केले. त्यामुळे त्यांच्या स्मृती दिनानिमित्त अशा घटकांना गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मदतीचा हात पुढे करणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच बीडच्या रेल्वेचे लोकनेत्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास नेणारे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. ह. भ. प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे दुपारी एक वाजता कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसाद असे कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे.
स्मृती दिनानिमित्त अपंगांना स्वयंचलित स्कुटर, व्हिल चेअर, सायकल, श्रवणयंत्र, अल्पदृष्टींना मोबाइल कीटचे वाटप करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचतगटांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतंर्गत गरीब कुटुंबांना गॅसचे वितरण, ऊसतोड कामगारांचे पाल्य व दत्तक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, पालघर (मुंबई ) येथे बालमृत्यू झालेल्या बालकांच्या कुटूंबियांना आर्थिक सहाय्य यावेळी करण्यात येणार असून गोपीनाथराव मुंडे वृक्ष लागवड अभियानांतर्गत सहा हजार वृक्षांची लागवड व संगोपन करण्याचे प्रतिष्ठानने ठरवले आहे.

रोजगार मेळाव्यात नोकरीची संधी
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने स्मृती दिनाच्या एक दिवस अगोदर म्हणजे २ जून रोजी सकाळी दहा वाजता एन. एच. अभियांत्रिकी महाविद्यालय ब्रह्मवाडी येथे सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यातच पात्र झालेल्या उमेदवारांना औरंगाबाद - पुणे येथील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मेळाव्यात दहावी, बारावी व आयटीआय उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी स्वतः उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याचा परिसरातील युवकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्ताकराच्या नोटीसचे वाटप कर्मचाऱ्यांमुळे खोळंबले

$
0
0

मालमत्ताकराच्या नोटीसचे वाटप कर्मचाऱ्यांमुळे खोळंबले
‘लॅन’ केलेल्या कार्यालयातून कामाची टाळाटाळ
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
नव्याने तयार करण्यात आलेल्या वॉर्ड कार्यालयात पुरेसा कर्मचारीवर्ग नसल्यामुळे मालमत्ता कराच्या नोटीस वाटपाचे काम अद्याप सुरूच झाले नाही. त्यामुळे छापई झालेल्या हजारो नोटीस पडूनच आहेत. शहरातील नागरिकाला महापालिकेच्या कोणत्याही वॉर्ड कार्यालयात जाऊन मालमत्ता कर भरता यावा यासाठी सहा वॉर्ड कार्यालये इंटरनेटच्या माध्यमातून (लॅन) परस्परांना जोडण्यात आली आहेत, पण या कार्यालयांमधूनही कर भरून घेण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेचा आर्थिक कणा मालमत्ताकरावर अवलंबून असताना महापालिकेच्या यंत्रणेतर्फे मालमत्ता कराच्या वसुलीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचे उघड झाले आहे. महापालिकेची सहा वॉर्ड कार्यालये होती. शहराचा विस्तार व नागरिकांची गरज लक्षात घेवून दोन वर्षांपूर्वी वॉर्ड कार्यालयांच्या संख्येत वाढ करून एकूण नऊ वॉर्ड कार्यालये तयार करण्यात आली आहेत. तीन नवीन वॉर्ड कार्यालयात फक्त वॉर्ड अधिकाऱ्याचीच नियुक्ती करण्यात आली आहे. अन्य कर्मचारी अद्याप नियुक्त करण्यात आले नाहीत. त्यामुळे या तिन्हीही वॉर्ड कार्यालयांचे काम ठप्प झाले आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या वॉर्ड कार्यालयांची स्थिती असून अडचण, नसून खोळंबा अशी झाली आहे. नवीन वर्षात मालमत्ता कर वसूल करण्यासाठी पालिकेच्या यंत्रणेने डिमांड नोट छापून घेतल्या आहेत. वॉर्ड कार्यालयनिहाय डिमांड नोटचे गठ्ठे बांधून त्या त्या वॉर्ड कार्यालयात पोचवण्यात आले आहेत, परंतु नव्याने अस्तित्वात आलेल्या वॉर्ड कार्यालयात कर्मचारीच नसल्यामुळे मालमत्ता कराच्या डिमांड नोटचे गठ्ठे पडून आहेत.
नागरिकांच्या आणि प्रशासनाच्या सोईसाठी २०१३ यावर्षी सहा वॉर्ड कार्यालये इंटरनेट सुविधेने परस्परांशी जोडण्यात आली. या सुविधेमुळे एका वॉर्ड कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात राहणारा नागरिक त्याच्या घराचा किंवा दुकानाचा मालमत्ता कर दुसऱ्या वॉर्ड कार्यालयात जाऊन भरू शकतो, पण कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या मालमत्तांचा कर भरून घेतला जात नाही. त्यामुळे मालमत्ता कराच्या वसुलीवर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे.

वॉर्ड कार्यालय - वॉर्ड कार्यालयांतर्गत मालमत्तांची संख्या

१ - २३,९६२
२ - २०,४९०
३ - १६,५७८
४ - २२,४८९
५ - २७,०८५
६ - २२,८९४
७ - ३०,२१३
८ - १५,४८९
९ - २६,८६७

कर वसुलीचे २०१६ - १७ यावर्षीचे उद्दीष्ट - २३० कोटी रुपये
कराची प्रत्यक्ष झालेली वसुली - ८९ कोटी रुपये
कर वसुलीचे २०१७ - १८ या वर्षाचे उद्दीष्ट ३७० कोटी रुपये.

मालमत्ता कर वसुली साठी व डिमांड नोटच्या वितरणासाठी वॉर्ड कार्यालयांमध्ये पुरेसा कर्मचारी नाही ही वस्तूस्थिती आहे. वॉर्ड कार्यालयात पुरेसा कर्मचारीवर्ग उपलब्ध करून देण्याबद्दल आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मालमत्ता कराच्या वसुलीचे प्रमाण वाढावे यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील.
भगवान घडमोडे, महापौर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस आयुक्तांपुढे किरकोळ तक्रारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छावणी पोलिस ठाण्यात पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्या नागरिक संवाद कार्यक्रमात किरकोळ तक्रारींचा पाऊस पडला. किरकोळ तक्रारी जास्त आल्याने पोलिस आयुक्तांनी पोलिस निरिक्षकांना फैलावर घेतले. किरकोळ तक्रारी पोलिस ठाण्यात न सोडविल्यामुळे त्या आपल्यापर्यंत येत आहेत, या शब्दात त्यांनी खडसावले. किरकोळ समस्या ठाण्यातच सोडवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
छावणी पोलिस ठाण्यात बुधवारी झालेल्या कार्यक्रमाला आमदार संजय शिरसाठ यांची उपस्थिती होती. यावेळी एकूण २२ जणांनी तक्रारी मांडल्या. त्यापैकी १२ तक्रारदार उपस्थित होते. १० तक्रारी पोलिस आयुक्तांसमोर ठेवण्यात आल्या. पाण्याच्या नळावरून होणाऱ्या भांडणापासून ते घरगुती भांडणांचा त्यात समावेश होता. किरकोळ तक्रारी जास्त असल्याने त्या सोडवता येत नाहीत का या शब्दात पोलिस निरीक्षक इंद्रजित बहुरे यांना ‌आयुक्तांनी खडसावले. नागरिकांना तक्रारीसाठी वारंवार पोलिस ठाण्यात येण्याची गरज पडू नये, अशी सूचना त्यांनी केली. पोलिस आयुक्तांनी नागरिकांना कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. यावेळी छावणी परिषदेचे सदस्य व उपाध्यक्षातर्फे पोलिस आयुक्त यादव यांचा सत्कार करण्यात आला.

त्याला तडीपार करा

एका नागरिकांने सूरज साळवे हा गुंड महिलांची छेड काढतो, त्याची दहशत असल्याची तक्रार केली. त्याच्याबद्दल पोलिस आयुक्तांनी विचारणा केली असता छावणी पोलिसांनी तो जेलमध्ये असल्याचे सांगितले. तो बाहेर येताच तडीपार करा, असे आदेश आयुक्तांनी दिले.

आमदारांकडून पाच लाख

औरंगाबाद शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून नागरिकांची सुरक्षितता वाढवण्याचा करण्याचा मानस पोलिस आयुक्‍तांनी व्यक्त केला. त्यावर आमदार संजय शिरसाठ यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी पाच लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images