Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

१५ जूनच्या आत आत प्रवेश देऊ नका

$
0
0

१५ जूनच्या आत आत प्रवेश देऊ नका

नियम मोडणाऱ्या शाळांवर कारवाई; शाळांना शिक्षण विभागाचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षण विभागांच्या सूचनांना डावलून १५ जूनच्या आत शाळांनी प्रवेश दिल्यास अशा शाळांवर तात्काळ कारवाई करा, अशा स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अनेक इंग्रजी शाळा शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच प्रवेश प्रक्रिया राबवितात, ज्यामुळे पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी पालकांची धावपळ उडते.

शैक्षणिक वेळापत्रकानुसार शाळा सुरू होण्यापूर्वी शाळांनी प्रवेश देऊ नयेत असे सूचना आहेत. असे असताना अनेक शाळा नियमांना केराची टोपली दाखवित सर्रास प्रवेश प्रक्रिया राबवितात. विशेषतः इंग्रजी शाळा यात आघाडीवर असतात. वेळेपूर्वीच प्रवेश प्रक्रिया राबविल्याने पालकांची धावपळ उडते. आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी पालकांना अनेक शाळांमध्ये खेट्या माराव्या लागतात. त्यात अनेक शाळांमध्ये डोनेशन, मुलाखतीचे प्रकार आणि शैक्षणिक साहित्य खरेदीबाबतचा आग्रह याबाबत तक्रारी येतात. यावर्षी ही अनेक तक्रारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे आल्याने, शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापनाला सूचनापत्रक काढत अशा प्रकारचे प्रकार थांबविण्याच्या स्पष्ट सूचना केल्या आहेत. शाळांनी १५ जूनपर्यंत प्रवेशाची प्रक्रिया राबविता कामा नये, यासाठी शिक्षणाधिकारी यांनी लक्ष द्यावे. शाळा नियमाला बगल देत प्रवेश प्रक्रिया राबवित असतील तर अशा शाळांवर तात्काळ कारवाई करावी, असे परिपत्रकात म्हटले आहे. प्रवेश प्रक्रियेपासून शैक्षणिक साहित्य, शुल्काची माहिती व्हावी या हेतूने नोटीस बोर्डबर ठळक अक्षरात शुल्क किती आहे हा फलक, पुस्तक खरेदीची सक्ती न करणे अशा सात सूचनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासह शिक्षणाधिकारी यांनी तक्रार निवारण कक्ष स्थापन करावा अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.

शाळांची मनमानीच

शाळांच्या प्रवेश प्रक्रियेसह शुल्कातही शाळांमध्ये सुसूत्रता नाही. प्रवेश शुल्काची निश्चिती केल्यानंतर अनेक शाळा शिक्षण विभागाची मान्यता घेत नसल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले. त्यासह आशा शाळांची माहितीच शिक्षण विभागाकडेही नाही.‌ इंग्रजी माध्यमांच्या शाळा अशा प्रकारात आघाडीवर असतात. फेब्रुवारी-मार्चमध्येच अनेक शाळा प्रवेशाची प्रक्रिया राबवितात. जूनमध्ये अनेक शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर आठवडा भरातच प्रवेश फुल असल्याचे फलक लागतात. त्यामुळे‌ शिक्षण विभागाच्या सूचनांनी कितपत फरक पडणार हे आगामी काही दिवसांतच स्पष्ट होईल.

शिक्षण विभागाच्या सूचना

कायम विना अनुदानित, स्वयंअर्थसहाय व्यवस्थापनांच्या मान्यता प्राप्त शाळांनी फी निश्चिती करून त्यास पालक शिक्षक संघाची मान्यता घ्यावी, निश्चिती केलेले शुल्क शाळेच्या दर्शनी भागावर, नोटीस बोर्डवर प्रदर्शित करावे, प्रवेशासाठी देणगी, मुलाखती घेणे हे नियमाबाह्य आहे. याबाबत सर्व शाळांना जाणीव करून द्यावी, अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त इतर पुस्तके खरेदी करण्याबाबत पालकांना सक्ती करू नये, शैक्षणिक साहित्य शाळेतून किंवा शाळेने निश्चित केलेल्या दुकानदाराकडूनच खरेदी करण्याबाबत आग्रह धरतात, त्याला प्रतिबंध करावा. विना परवानगी स्थलांतरित शाळांमध्ये पालकांनी पाल्यांना प्रवेश देऊ नये, असे वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करावे, अशा शाळांवार कार्यवाही करावी, प्रवेश, डोनेशन, अधिकचे शुल्क, स्थलांतर, शैक्षणिक साहित्य याबाबत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर उपशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण कक्ष स्थापन करावा, अशा सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत.

जिल्ह्यातील एकूण शाळा.. ४४२६

जिल्ह्यातील इंग्रजी शाळा.....४५८

शहरातील इंग्रजी शाळा........२७५


नियमांना डावलून प्रवेश देणे, शुल्कवाढ किंवा शैक्षणिक साहित्य ठराविक ठिकाणाहूनच घेणे अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यात शैक्षणिक वर्ष सुरू होते आहे. सुरुवातीपासूनच शिक्षणाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडावी, चुकीचे प्रकार शाळांमध्ये होत असतील तर, अशा शाळांवर तात्काळ कारवाई करावी यासाठी आम्ही या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर आमच्याकडे पालकांनी तक्रारी केल्यातर, त्याची दखल घेऊन संबंधित शाळांवर कारवाई केली जाईल.

वैजनाथ खांडके,

विभागीय उपसंचालक,

शिक्षण विभाग, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मार्चअखेर सोलापूर-औरंगाबाद सुसाट

$
0
0

Ramchandra.Vyabhat@timesgroup.com
Tweet : @vyabhatramMT
औरंगाबाद ः बहुप्रतीक्षित धुळे-सोलापूर महामार्गावरील एक टप्पा मार्च महिन्याअखेर पूर्ण होण्याची चिन्हे असून, सोलापूर-औरंगाबाद हा चौपदरी महामार्ग मार्च २०१८अखेर वाहतुकीसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
सध्या महामार्गाचे ५२ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या डिसेंबरपर्यंत ७५ टक्के काम पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांना आहे. सध्या सोलापूर ते औरंगाबाददरम्यान बहुतांश ठिकाणी चौपदरी रस्‍त्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, या रस्‍त्यावरून वाहतुकही सुरू आहे. सध्या उस्मानाबाद, बीड, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांतील रस्‍त्यासाठी ६६ टक्के उपलब्‍ध जमिनीपैकी ५२ टक्के जमिनीवर रस्ता तयार करण्यात आला आहे.
सोलापूर-येडशी (१०० किलोमीटर) महामार्गाच्या पहिल्या टप्‍प्याचे बांधकाम सप्टेंबरअखेर पूर्ण करण्यात येणार असून, येडशी-औरंगाबाद (१९० किलोमीटर) या टप्प्याचे कामही वेगात सुरू आहे. या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांचा वेग ताशी १०० ते १२० किलोमीटर राहील, असे या रस्त्याचे डिझाइन तयार केले आहे. त्यामुळे रस्ता तयार झाल्यानंतर औरंगाबादहून बीडपर्यंत अवघ्या एका तासाच्या, तर सोलापूरपर्यंत तीन तासांच्या पोचणे शक्य होईल.
महामार्ग पूर्ण झाल्यावर राज्याच्या पायाभूत सुविधांमधील एक महत्त्वाचा टप्पा होणार असून, शिवाय उत्तर भारताकडील उद्योग क्षेत्र आणि दक्षिणेकडील माहिती तंत्रज्ञान क्षेत्र यांना जोडणारा हा प्रमुख मार्ग असेल. त्यामुळे औरंगाबादेतील उद्योग-व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी मोठी मदत होणार आहे. महामार्गाच्या औरंगाबाद-धुळे (१५० किलोमीटर) या तिसऱ्या टप्‍प्याचे काम जोरात सुरू असून, औरंगाबाद जिल्ह्यात लवकरच मोबदला वाटपाचे काम सुरू करण्यात येणार आहे.

डिसेंबरमध्ये लागणार टोल?
रस्‍त्याचे काम ७५ टक्के पूर्ण झाल्यावर अधिसूचना काढण्यात येईल. त्यानंतर कामाची कंत्राटदार कंपनी ‘आयआरबी’ टोलवसुली करू शकेल. हे काम डिसेंबरअखेर पूर्ण होईल. सोलापूर-औरंगाबाद या महामार्गाच्या दुसऱ्या टप्‍प्यांमध्ये पारगाव (जि. उस्मानाबाद), पाडळशिंगी (जि. बीड) व पाचोड (जि. औरंगाबाद) या ठिकाणी टोल प्लाझा उभारण्यात येणार आहेत.

आतापर्यंत जिल्हानिहाय भूसंपादन मोबदला वाटप
जिल्हा..........प्राप्त रक्कम........वाटप.......शिल्लक
उस्मानाबाद.......२३७.८२........१३१.४८........१०६.३४
बीड.................५०९.१७........३९८.१४........११४.२१
जालना............१७२.३१........१४७.८३........२४.४८
औरंगाबाद........२७९.२७........२३७.७६........४१.५१
एकूण............१२०१.७५........९१५.२१........२८६.५४
(रुपये कोटीमध्ये)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ जंजाळ धमकी प्रकरणी उपायुक्त निकम यांना कारणे दाखवा नोटीस

$
0
0

जंजाळ धमकी प्रकरणी उपायुक्त निकम यांना कारणे दाखवा नोटीस

शिस्तभंगाची कारवाई करण्याची नगरसेवकांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना आपल्या भावामार्फत धमकी दिल्या प्रकरणी व अतिक्रमण हटाव विभागाचा पदभार काढून घेण्याचे आदेश महापौरांनी दिल्यावर टाळ्या वाजवून या आदेशाची खिल्ली उडविल्याप्रकरणी उपायुक्त रवींद्र निकम यांना महापालिकेचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान, निकम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा, अशी मागणी करीत नगरसेवकांनी गुरुवारी मुगळीकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.

महापालिकेच्या २० मे रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत राजेंद्र जंजाळ यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी अतिक्रमण हटाव विभागाच्या कारभाराबद्दल आरोप केले. या विभागाचे प्रमुख असलेले उपायुक्त निकम यांच्याकडील अतिक्रमण हटाव विभागाचा कारभार काढून घ्या, अशी मागणी केली. महापौरांनी ही मागणी मान्य करून निकम यांच्याकडील अतिक्रमण हटाव विभागाचा कार्यभार काढून घेण्याचे आदेश आयुक्तांना दिले. महापौरांनी हे आदेश देताच निकम यांनी टाळ्या वाजवून आदेशाची खिल्ली उडवली. ही बाब महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ च्या कलम २३ चा भंग करणारी आहे. त्यामुळे निकम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, त्यांना महापालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली. यावेळी जंजाळ यांच्यासह सभागृहनेते गजानन मनगटे, माजी महापौर त्र्यंबक तुपे, माजी सभापती दिलीप थोरात उपस्थित होते. यासर्वांच्या स्वाक्षरीचे पत्र आयुक्तांना देण्यात आले आहे.

दरम्यान या प्रकरणाची दखल घेवून निकम यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, असे मुगळीकर यांनी पत्रकारांना सांगितले. नोटीसचा खुलासा प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्री थोडक्यात बचावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले. निलंगा तालुक्यातील नियोजित कार्यक्रम संपवून मुंबईला जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण करताच काही क्षणांतच ते विजेच्या तारेला अडकून जमिनीवर कोसळले. दुर्घटनेवेळी हेलिकॉप्टर फार उंचीवर नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, हेल‌िकॉप्टर एका घरावर कोसळल्याने आठ जण किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर निलंगा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चौकशीचे आदेश
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताच्या चौकशीचे आदेश सामान्य प्रशासनच्या (उड्डाण) प्रधान सचिव वल्सा नायर यांनी दिले आहेत. बहुदा उद्यापर्यंत (शुक्रवार) नक्की काय झाले याची तांत्रिक माहिती डीजीसीए (डिरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन) यांच्याकडून उपलब्ध होईल. त्यानंतर पुढील कारवाई काय करायची हे ठरेल, असे ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना त्यांनी सांगितले.

असा घडला अपघात…
- निलंग्यातील कार्यक्रम उरकल्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण.
- मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे सचिव प्रवीणसिंह परदेशी, माध्यम सल्लागार केतन पाठक, स्वीय सहाय्यक अभिमन्यु पवार आणि इतर कर्मचारी.
- टेक ऑफनंतर अवघ्या ५० सेकंदातच हेल‌िकॉप्टर ८० फूट उंचीवर गेले. मात्र, बिघाडानंतर विजेच्या तारेला पंखा अडकून ते कोसळले.
- मुख्यमंत्र्यांना काहीही दुखापत झाली नाही; मात्र, केतन पाठक यांच्या डोक्याला किरकोळ मार लागला.
- हेलिकॉप्टर मैदानाशेजारील भरत कांबळे यांच्या घरावर पडले. त्यांच्यासह सुक्षा कांबळे, श्रावण बोयणे, रशीद शेख, प्रेम शिंदे, सलामा शिकलकर, हुकूम शेख किरकोळ जखमी.
- अपघातानंतर मुख्यमंत्री निलंग्यात पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या निवासस्थानी विश्रांतीसाठी थांबले.
- त्यानंतर ‌विशेष विमानाने लातूरहून मुंबईकडे रवाना.

आई तुळजाभवानी, पांडुरंगाची कृपा आणि महाराष्ट्रातील अकरा कोटी २० लाख लोकांचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे मला काहीही झालेले नाही. माझी तब्येत अत्यंत ठणठणीत आहे. पाठक यांना किरकोळ स्वरूपाची जखम झाली आहे.
-मुख्यमंत्री फडणवीस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रियेला मुभा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने २७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदांतर्गत शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात जाहीर केलेल्या धोरणाला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवर गुरुवारी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात झालेल्या सुनावणीत सुटीतील न्या. के. के. सोनवणे यांनी, बदल्यांसंदर्भात इतर प्रक्रिया करण्याची मुभा दिली, पण पदस्थापनेसंदर्भात ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांच्यासह जवळपास २० याचिका खंडपीठात दाखल करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांसाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने २७ फेब्रुवारी २०१७ रोजी बदल्याचे नवे धोरण जाहीर केले. त्यानुसार शासनाने ‘अवघड’ आणि ‘सर्वसाधारण’ अशी दोन क्षेत्रे निर्माण केले. यामध्ये अवघड क्षेत्रातील गावांत म्हणजे तालुका मुख्यालयापासून दूर, दळणवळणाच्या दृष्टीने दुर्गम, ज्या गावात पोचण्यासाठी सुविधा नाहीत, दुर्गम व डोंगराळ भागातील गावे; तसेच काम करण्यासाठी प्रतिकूल परिस्थिती असलेली गावे यांचा समावेश. उर्वरित सर्व गावे सर्वसाधारण क्षेत्रात असा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. हे ठरविण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले. यामध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग १ आणि भाग २ हे निर्माण करण्यात आले आणि त्यामध्ये प्राधान्यक्रम ठरविण्यात आला. याचिकेनुसार हा शासनादेश बेकायदा आहे. अवघड क्षेत्र घोषित करण्याच्या प्रक्रियेचा यात उल्लेख नाही.
यापूर्वी १५ मे २०१४चा शासनादेश जिल्हा परिषदेच्या गट ‘क’ आणि गट ‘ड’च्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी असताना नवीन शासनादेश काढून त्यातून शिक्षक संवर्ग वगळण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी एकच नियम आहे आणि त्यातून शिक्षक संवर्ग वेगळा काढता येणार नाही, असे याचिकेत म्हटले आहे.
सुनावणीअंती न्यायालयाने, बदल्यांसंदर्भात इतर प्रक्रिया करण्याची मुभा देत, पदस्थापनेसंदर्भात परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले. याप्रकरणी याचिकाकर्त्यांतर्फे सुधीर बारलिंगे, सिद्धेश्वर ठोंबरे, संभाजी टोपे व शिवकुमार मठपती हे बाजू मांडत आहेत. शासनातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ विनायक दीक्षित, सिद्धार्थ यावलकर यांनी काम पहिले. या सर्व याचिकांवर १६ जून रोजी सुनावणी होणार आहे.

धोरण अन्यायकारक
या धोरणानुसार पती-पत्नी एकत्रिकरण योजनेनुसार लाभ मिळालेल्या दोघांपैकी एकाचीही त्या ठिकाणी दहा वर्षे पूर्ण झाली असतील, तर दोघांचीही बदली केली जाणार, हे अन्यायकारक आहे. नवीन धोरणानुसार दरवर्षी बदलीचे प्रमाण किती टक्के असावे याबाबत सुस्पष्टता नाही. त्यामुळे दरवर्षी ९० टक्क्यांहून अधिक प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होतील आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या शिक्षण क्षेत्रावर विपरित परिणाम होईल, असे म्हणणे याचिकेत मांडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलसंधारण कामे पावसाळ्यापूर्वी उरका - शिंदे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
जलसंधारण कामाचा कार्यारंभ आदेशाबरोबरच त्यासाठीचा निधी देण्यास विलंब झाला असला तरी आता ही कामे जोमाने पावसाळ्यापूर्वी उरका, अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी उस्मानाबाद येथे आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिला.
आमदार सुजीतसिंह ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपजिल्हाधिकारी प्रभ्योदय मुळे यांची यावेळी उपस्थिती होती.
यावर्षीची जलसंधारणाची सर्व कामे ३० जून पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश राम शिंदे यांनी दिले. वेळेत कामे पूर्ण न करणाऱ्या अधिकारी व ठेकेदार यावर कारवाई करण्याची तंबीही त्यांनी यावेळी दिली. जिल्ह्यातील मागील दोन वर्षाच्या जलयुक्त शिवार कामाचा मोठा गवगवा झाला असला तरी आपण त्या कामाबाबत फारसे समाधानी नाही. यातील काही कामाची गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.
जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या १६ हजार ७९५ कामांपैकी ७ हजार ८८८ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित सर्व कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. जलशिवार कामातील कृषी विभागासह जलसंधारण, भूजल सर्वेक्षण, पाटबंधारे विभागाचे काम अजिबात समाधानकारक नसल्याची खंत यावेळी जलसंधारण मंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.
राज्य सरकारने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान राज्यात सुरू केले आहे. जिल्ह्यातील १०७ पाझर तलाव, साठवण तलाव अशा सिंचन स्रोतातील गाळ उपसण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय इंधनावरील खर्चही शासन सोसत आहे. राज्यभरात ४ वर्षे हे अभियान राबविण्यात येणार असून यावर ६ हजार २३६ कोटी रुपये खर्च राज्य सरकार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

उस्मानाबादची टँकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल
मे २०१६ मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात ४२५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता, मात्र,यंदा जिल्ह्यात सध्या केवळ ५ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. ही किमया केवळ जिल्ह्यातील जलशिवारच्या कामामुळे शक्य झाली आहे. मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत जिल्ह्याला सन २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षांसाठी ३७०० शेततळ्याचे उद्दिष्ट देण्यात आले. यापैकी १२४९ शेततळे पूर्ण झाली आहेत. १३६५ चे काम प्रगतीपथावर आहे. आज अखेर १२४९ शेतकरी लाभार्थ्यांना २१२.१८ लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

भूजल पातळीत ३.५० मीटरने वाढ
२०१७-१८ या वर्षासाठी जिल्ह्यातील १७८ गावांची निवड जलयुक्तशिवार कामासाठी करण्यात आली आहे. या गावातील कामाचा प्रकल्प आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, यातील गावात ८२९ विविध कामे सुरू करण्यात आली. यापैकी ५७६ कामे पूर्ण झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून झालेल्या मृद व जल संधारणाच्या कामामुळे भूजल पातळीत सुमारे ३.५० मीटर इतकी वाढ झाली. या अभियानाच्या माध्यमातून २५२१४.६८ टीसीएम इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड रेल्वेच्या कामाला गती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
निधी मिळाल्यानंतर बीड रेल्वेच्या कामाला गती आली आहे. नगर ते नारायणडोह या साडेबारा किलोमीटर अंतरावरील रेल्वेमार्गावर रेल्वेच इंजिन धावल्यानंतर आता नारायणडोह ते आष्टी आणि आष्टी ते अंमळनेर तसेच अंमळनेर ते बीड या सर्व टप्प्यात रेल्वेचे काम जोरात सुरू आहे. मातीकाम, तसेच छोट्या मोठ्या पुलाची कामे झाली आहेत. रेल्वे रुळाच्या खाली अंथरण्याचे स्लीपर ठिकठिकाणी आणून टाकण्यात आले आहेत.
अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गावरील अहमदनगर ते नारायणडोह या अंतरावर रेल्वे इंजिन धावले. नारायणडोह ते अंमळनेर या टप्प्यातील काम जोरात सुरू आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू पुढच्या महिन्यात बीड जिल्ह्यात येत आहेत. त्यावेळी बीडच्या रेल्वेसंदर्भात ते काय बोलतात याकडेही लक्ष असणार आहे. त्यामुळे बीडच्या जनतेच्या आशा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत.
परळी-बीड-नगर या रेल्वे मार्गास तांत्रिक मान्यता देऊन १९९५ मध्ये हा रेल्वे मार्ग मंजूर करण्यात आला. २६१ किलोमीटरच्या या रेल्वे मार्गाचा सुरूवातीला १९९५ मध्ये मंजुरी मिळाली. त्यावेळी ३५३ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. या साठी लागणाया निधीची तरतूद केंद्र व राज्य सरकार संयुक्तरित्या करेल असे ठरले होते. या मार्गासाठी निधी दिला गेला नाही. मग अनेक आंदोलने झाली. मात्र, या मार्गासाठी मोठी तरतूद कधीच झाली नाही. दहा वीस कोटी रुपये देवून दरवर्षी या रेल्वेमार्गाची बोळवण केली जात होती. आजवर केवळ वीस वर्षात ३०० कोटी निधी या मार्गाला मिळाला होता.
केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर त्यांना या २५ वर्षाहून अधिक काळापासून रखडलेल्या कामाकडे लक्ष दिल्याने हे काम प्रगतीपथावर आले. २८०० कोटी प्रकल्प खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी राज्याने मान्यता दिलेला आपला निम्मा वाटा उचलावा, असेही पंतप्रधान मोदी यांनी आदेश दिले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १४१३ कोटी नगर-बीड-परळी रेल्वेसाठी देण्याचा निर्णय घेतला.
निधी मिळाल्याने कामाला गती आली आहे. २०१९ पर्यंत नगर ते बीड पर्यंत रेल्वे धावली पाहिजे असे टार्गेट देण्यात आले आहे. याचा एक टप्पा म्हणून नगर ते नारायणडोह या साडेबारा किलोमीटर अंतरावरील रेल्वेमार्गावर रेल्वेच इंजिन धावले. तसेच नारायणडोह ते आष्टी आणि आष्टी ते अंमळनेर तसेच अंमळनेर ते बीड या सर्व टप्प्यात रेल्वेचे काम जोरात सुरू आहे.
रेल्वे कामाला सध्या गती आली असून मातीकाम, तसेच छोट्या मोठ्या पुलाची कामे झाली आहेत. रेल्वे रुळाच्या खाली अंथरण्याचे स्लीपर ठिकठिकाणी आणून टाकण्यात आले आहेत. २०१९ पर्यंत नगर ते बीड रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ गावकऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी केले श्रमदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
भाजपच्या संवाद सभा अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंगा तालुक्यातील हलगरा येथे गावकऱ्यांसोबत अर्धा तास श्रमदान करून केली. हलगरा येथे पन्नास दिवसांपासून गावकरी जलसंधारणाच्या कामासाठी श्रमदान करीत आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यासमवेत खासदार डॉ. सुनील गायकवाड, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर होते.
हलगरा गावात श्रमदान केल्यानंतर त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेती आणि शेतकरी समृद्ध करण्यासाठी राज्य सरकार किती योजना राबवत आहे, याची महिती दिली. गावकऱ्यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या यशस्वीतेसाठी श्रमदानाचा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. हलगरा गाव आदर्श गाव करण्यासाठी हे गाव दत्तक घेण्याची घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. सध्या देशभक्ती ही जलस्वालंबनासाठी जलस्वातंत्र्याची लढाई असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांनी गटशेतीची योजना राबवली तर सरकारच्या शेती विषयक जेवढ्या योजना आहेत, त्या एकत्रपणे राबवण्यासाठी सरकार मदत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शिवार संवाद सभामुळे आम्ही काय करीत आहोत आणि जनतेला काय पाहिजे असा संवाद होत आहे. त्यामुळे लोक अत्यंत आनंदाने स्वागत करीत आहेत, अशी माहिती ही मुख्यमंत्र्यानी पत्रकारांशी बोलताना दिली.

कोल्हापुरी बंधाऱ्याच्या बॅरेजची पाहणी
जलसंपदा विभागाच्यावतीने जिल्ह्यातील औराद शहाजानी (ता. निलंगा) येथील तेरणा नदीवरील कोल्हापूरी बंधाऱ्याच्या बॅरेजमध्ये रुपांतरण करण्यात आलेल्या कामाची मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिंचनक्षमता, पिण्याच्या पाणी पुरवठा योजना, वृक्ष लागवड यांचाही संबंधीत यंत्रणांकडून आढावा घेतला.

अनसरवाडा येथील शेततळ्याची पाहणी
अनसरवाडा (ता. निलंगा) येथील राजकुमार बाहेती या शेतकऱ्याच्या शेतातील कृषी विभागाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून घेण्यात आलेल्या शेततळ्याची तसेच कंपार्टमेंट बंडीगच्या कामांची पाहणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शेतकरी बाहेती यांच्या शेतात वृक्षरोपण करण्यात आले.

‘सर्वांना घरे आणि स्वच्छ महाराष्ट्र’
हे सरकार सर्वसामान्यांसाठी झटणारे सरकार आहे, ‘सर्व गरजूंना घरे आणि स्वच्छ महाराष्ट्र’ हाच आमचा ध्यास आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी येथे केले. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेंतर्गत घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांची मुख्यमंत्री फडणवीस यांनी निलंगा तालुक्यातील हंगरगा या गावी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी केली सर्वांसोबत न्याहरी
हलगरा येथे शिवार संवाद कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी गांवकऱ्यांसोबत बाजेवर बसून न्याहरीचा आस्वाद घेतला. न्याहरीमध्ये प्रसिद्ध असा ‘निलंगा राईस’ आणि ‘सुशीला’ हा पदार्थ त्यांनी चवीने खाल्ला. राज्याचा मुख्यमंत्री आमच्या शेतात येऊन न्याहरी करतो हे आमच्यासाठी अभिमानास्पद असल्याच्या भावना गांवकऱ्यांनी व्यक्त केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुख्यमंत्र्यांच्या अपघातावेळी इरफान शेख नसता तर...

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । निलंगा (लातूर)

'निलंगा येथे गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर कोसळलं आणि सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. हेलिकॉप्टरचा स्फोट होईल या भीतीनं पोलिसांसह अधिकारीही आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. पण मी हेलिकॉप्टरच्या दिशेने पळत सुटलो. हेलिकॉप्टरचे दार उघडत नसल्यानं मुख्यमंत्रीसाहेब आतच अडकून पडले होते. ते पाहून मी त्यांच्या दिशेनं धावलो. मोठ्या प्रयत्नांनी दार उघडले आणि त्यांना बाहेर काढलं.'

अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्र्यांना सुखरूप बाहेर काढणाऱ्या इरफान शेखनं 'मटा ऑनलाइन'शी बोलताना हा थरारक अनुभव सांगितला. २८ वर्षाचा इरफान शेख निलंग्यात राहतो. त्याचं भंगाराचं दुकान आहे. अपघातस्थळापासून इरफानचं दुकान अवघ्या काही अंतरावर आहे. हेलिकॉप्टर कोसळलं तेव्हा तो दुकानात उभा होता. त्याच्या डोळ्यासमोरच हा अपघात घडला. त्यावेळच्या परिस्थितीबाबत सांगताना इरफान म्हणाला, 'हेलिकॉप्टरमध्ये अडकलेल्या साहेबांना मी सुखरूप बाहेर काढले. मी ठीक आहे असं त्यांनी सांगितल्यावर माझा जीव भांड्यात पडला. माझ्या सहकाऱ्यांना आणि वैमानिकालाही बाहेर काढा असं मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं. त्यानुसार इतरांनाही सुखरूप बाहेर काढलं.
58855924

मुख्यमंत्र्यांसह सर्वजण हेलिकॉप्टरमधून सुखरूप बाहेर आल्यानंतर अधिकारी व पोलीस पुन्हा त्यांच्या बाजूला गोळा झाले. मी मुख्यमंत्री साहेबांना भेटण्याचा खूप प्रयत्न केला. पण पोलिसांनी मला अडवले आणि साहेबांना भेटू दिलं नाही. इच्छा असूनही मला साहेबांना भेटता आलं नाही. कुणीतही माझ्याशी संपर्क करेल असं मला वाटत होतं. मात्र, या दुर्घटनेला दिवस उलटला तरी प्रशासनाने वा मुख्यमंत्र्यांनी कोणीही माझ्याशी संपर्क केला नाही, अशी खंतही इरफाननं व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावत्र पित्याकडून चिमुकल्याचे अपहरण

$
0
0

औरंगाबाद ः दुसऱ्या पत्नीला अपत्य होत नसल्याने सावत्र पित्याने पहिल्या पत्नीच्या दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण केले. गाजगाव (ता. गंगापूर) येथे गुरुवारी पहाटे हा प्रकार घडला. रेल्वेतून पसार होत असताना मनमाड येथे या पित्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चिमुकल्याची सुटका केली.
गाजगाव येथे एक २५ वर्षांची महिला पती व दीड वर्षाच्या मुलासह राहते. या महिलेच्या पहिल्या पतीने तिला सोडून दिले असून, तिने दुसरा विवाह केला आहे. या महिलेच्या पहिल्या पतीचाही दुसरा विवाह झाला आहे. गुरुवारी पहाटे पाच वाजता महिलेच्या पहिल्या पतीने तिच्या दीड वर्षाच्या मुलाला सोबत घेत पलायन केले. महिलेच्या लक्षात हा प्रकार येताच तिने सिल्लेगाव ठाणे गाठून माहिती दिली.
दरम्यान, मुलाला घेऊन पसार झालेला पती लासूर स्टेशनजवळ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लपून बसला होता. लासूर स्टेशन येथे दुपारी दुपारी साडेबारा वाजता त्याने पत्नी, चिमुकल्यासह स्टेशन गाठले व मनमाडकडे प्रयाण केले. हा प्रकार समजल्यामुळे मुलाची आई स्टेशनवर पोचली होती. रेल्वे निघून गेल्याने तिने स्टेशन मास्तराला हा प्रकार सांगितला. त्यांनी रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना ही घटना कळविली. आईकडे असलेल्या मुलाच्या फोटोवरून फोटो काढूत सोमाणी यांनी त्यांच्या रेल्वे प्रवासी सेना व महाराष्ट्र पोलिस मित्र या व्हॉट्स अॅप ग्रुपवर टाकला. या पोस्टमुळे हायकोर्ट एक्स्प्रेसमध्ये या चिमुकल्याला घेऊन एक जोडपे जात असल्याची माहिती हाती आली. औरंगाबाद रेल्वे पोलिस विभागाचे एपीआय भगवान कांबळे, पीएसआय बनसोड, गोंडे यांनी मनमाड पोलिसांना ही माहिती कळवली. दुपारी दोन वाजता मनमाड पोलिसांनी या चिमुकल्यासह सावत्र पित्याला व पत्नीला ताब्यात घेतले.

तक्रार देण्यास नकार
औरंगाबाद लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने मुलाच्या आईसोबत मनमाड गाठत चिमुकल्याला ताब्यात घेतले, मात्र मुलाच्या आईने पतीविरुद्ध तक्रार देण्यास नकार दिल्याने पतीला समज देऊन पोलिसांनी सोडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीच लाख खात्यांमध्ये‌ व्यवहारच नाहीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्ह्यात जनधन योजनेचा हवेत बार उडाला आहे. अडीच लाख खात्यांमध्ये तीन वर्षे झाली तरीही अजून एकही व्यवहार झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेंतर्गत बँकेत खाते सुरू करून खातेदाराला अपघात विमाही मिळतो, पण बँक खात्यात काहीतरी व्यवहार होणे अपेक्षित आहे ते न झाल्याने या विम्याविषयीदेखील अनेकजण अनभिज्ञ आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ ऑगस्ट २०१४ ला जनधन योजना सुरू केली. याचा गाजावाजाही झाला. याचा परिणाम औरंगाबाद जिल्ह्यातही सुरुवातीला सकारात्मक पद्धतीत झाला आज मितीस तीन वर्षांत या योजनेंतर्गत जिल्ह्यात ‌तब्बल ६ लाख ५२ हजार ७९० खाती उघडण्यात आली आहेत. ३१ मार्च २०१७ पर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार या उघडण्यात आलेल्या खात्यांपैकी तब्बल २ लाख ५० हजार ६६१ खात्यांमध्ये कुठलाही व्यवहार झालेला नाही. या सर्व खात्यांचा बॅलन्स ‘झिरो’ आहे. या योजने संदर्भात अग्रणी बँकेच्या अधिकारी वर्ग व सुत्रांनी यात व्यवहार होत नसल्याचे मान्य केले आहे. त्यासोबतच देशभरातही फारशी चांगली परिस्थिती नसल्याची पुष्टी त्यांनी दिली आहे. संपूर्ण भारतात ११ कोटी खाती उघडण्यात आली असून महाराष्ट्रात १ कोटी ८१ लाख ६६ हजार ३६८ खाती या योजनेंतर्गत उघडले गेले आहेत. औरंगाबाद जिल्हयात यातील ६ लाख ५२ हजार ७९० खात्यांचा समावेश आहे.
उघडण्यात आलेल्या खात्यांत गेल्या तीन वर्षांत फक्त ९८.६८ कोटी रूपये गोळा झाले आहेत. एकूण खातेउघडत असलेल्यांचा आकडा, व्यवहार नसलेल्यांचा आकडा या दोन्ही तुलना केल्यास गोळा झालेला ९८.६८ कोटी रूपयांचा निधी फारच कमी असून योजनेची फलश्रृती शून्यच म्हणावी लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेकींच्या शिक्षणाला पैका मिळेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्त्री जन्माचे स्वागत करून मुलींना शिकवण्यासाठी प्रभावीपणे सुरू केलेल्या केंद्राच्या ‘बेटी बचाव बेटी पढाव’ योजनेला निधीची घरघर लागली आहे. गेल्यावर्षी या योजनेसाठी जिल्ह्याला एक रुपयाही निधी प्राप्त झाला नव्हता. प्रशासनाने कशीबशी योजना राबविली. किमान यंदापासून तरी या योजनेसाठी प्राधान्याने निधी दिला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मुलींचा घटता जन्मदर चिंताजनक असल्याचे मत नोंदवून केंद्र सरकारने जानेवारी २०१४पासून देशभर बेटी बचाव बेटी पढाव योजना सुरू केली. त्याअंतर्गत २०११च्या जनगणनेनुसार राष्ट्रीय सरासरीनुसार १००० मुलांमागे किमान ९१८ मुली जिल्ह्यात जन्मल्या असाव्यात, याची तपासणी करून जिल्हानिहाय योजना राबविण्याचे आदेश दिले गेले होते. औरंगाबाद जिल्ह्यात २०१४मध्ये १००० मुलांमागे ९०० मुली असे प्रमाण होते. ही योजना राबविणे सुरू झाले त्यानुसार महापालिका, ग्रामीण रुग्णालये; तसेच जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग अशा समन्वयाने जनजागृती कार्यक्रम, प्रबोधनपर कार्यक्रम राबविण्यात आले. मुलींच्या जन्माचे स्वागत कसे करावे? त्याचा प्रसार कसा करावा? याची माहितीही दिली गेली. त्यानुसार २०१५मध्ये मुलींचे प्रमाण ९०७वर पोचले. २०१६मध्ये १००० मुलांमागे ९२९ मुली असे प्रमाण झाले. दरवर्षी या केंद्राच्या अहवालानुसार मुला -मुलींच्या प्रमाणाच्या आकडेवारीत बदल होतो. मार्च २०१७अखेर हे प्रमाण ९५० करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील आकडेवारीचे संकलन अद्याप झाले नसले, तरी हा आकडा ९५८ वर पोचला आहे. औरंगाबाद जिल्हा मुलींच्या जन्मदराबाबत समाधानकारक स्थितीत पोचला आहे. ‘बेटी बचाव बेटी पढाव’अंतर्गत विविध उपक्रमासाठी केंद्राकडून निधी दिला जातो.

४० लाखांतील छदामही नाही

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; २०१६ या वर्षात या योजनेसाठी एक रुपयाही प्राप्त झाला नाही. त्यामुळे स्थानिक यंत्रणेची पुरती धावपळ झाली. या योजनेसाठी ४० लाख रुपये अपेक्षित होते. ही योजना आणखी प्रभावीपणे राबविण्यासाठी केंद्राने चालू आर्थिक वर्षात तरी वेळेवर निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकशी समितीचे वेट अँड वॉच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
साई इंजिनीअरिंग कॉलेजच्या सामूहिक कॉपी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त चौकशी समितीचे काम सुरू झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा भवनात समितीला स्वतंत्र कक्ष देण्यात आला आहे. समिती सदस्यांची शुक्रवारी बैठक झाली. या प्रकरणाचा अहवाल लवकर देण्याचा समितीचा प्रयत्न आहे, मात्र अजूनही ठोस कारवाई झाली नसल्याने विद्यापीठात विद्यार्थी संघटनांची आंदोलने सुरूच आहेत.
चौका येथील साई इंजिनीअरिंग कॉलेजच्या सामूहिक कॉपी प्रकरणाचा विद्यापीठ आणि पोलिस प्रशासन तपास करीत आहे. या प्रकरणात २७ विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. साई कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सामूहिक कॉपी करताना पकडले होते. या प्रकरणाचे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांशी कनेक्शन आहे का, याचा पोलिस तपास करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने कॉपी प्रकरणात तातडीने कारवाई केली नसल्याने टीकेची झोड उठली होती; तसेच कॉपी प्रकरण दडपण्यासाठी राजकीय दबाव येत असल्याची चर्चा सुरू होती. अखेरीस कुलगुरूंनी परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांचा राजीनामा घेतला, तर कॉपी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती नेमली आहे. या समितीचे अध्यक्ष डॉ. एम. डी. शिरसाट असून, डॉ. साधना पांडे व डॉ. प्रवीण वक्ते सदस्य आहेत. सध्या समितीने चौकशीचे काम सुरू केले असून, प्राथमिक चर्चा पूर्ण झाली आहे. परीक्षा भवनातच समितीसाठी स्वतंत्र कक्ष दिला असून, एक कर्मचारी नियुक्त केला आहे. अहवालासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता परीक्षा विभाग करीत आहे.
दरम्यान, समितीचे अध्यक्ष डॉ. एम. डी. शिरसाट आणि डॉ. साधना पांडे यांची शुक्रवारी बैठक झाली. प्रशासकीय कामामुळे डॉ. वक्ते उपस्थित राहू शकले नाही. या बैठकीत चौकशी अहवाल लवकर सादर करण्याबाबत चर्चा झाली, असे सूत्रांनी सांगितले. या प्रकारातील विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून चौकशीत आणखी काही निष्पन्न करण्याचा समितीचा प्रयत्न आहे. साई कॉलेजमधील परीक्षेचे संपूर्ण मूल्यमापन केले जाणार आहे. इतर पेपरमध्ये मास कॉपी झाली असल्यास पूर्ण परीक्षा रद्द करण्याचा विचार आहे. ‘बिल्डिंग कन्सट्रक्शन’ पेपरची मास कॉपी पकडली असली, तरी इतर पेपरमध्येही कॉपी झाली असण्याची शक्यता आहे. पोलिस प्रशासन आणि विद्यापीठ प्रशासन यांच्या अहवालाचा एकत्रित अभ्यास करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

आंदोलन सुरूच
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उत्तपत्रिका घोटाळा, गुण वाढवून देण्याचे प्रकार आणि होम सेंटरचा भ्रष्ट कारभार अशा घटना घडत आहेत. प्रशासकीय सुधारणा करण्याऐवजी कुलगुरू मराठवाड्यावर नाकर्तेपणाचे खापर फोडत असल्याची टीका करीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (खरात) शुक्रवारी विद्यापीठात निदर्शने केली. प्रभारी अधिकाऱ्यांवर काम सोपवू नका, अशी मागणी जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी केली. या आंदोलनात मनोज शेजवळ, सचिन त्रिभवुन, प्रमोद गायकवाड, सुरेश खोतकर आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नांमका’ची पोटचारी फुटून पाण्याला गळती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
वैजापूर व गंगापूर तालुक्यातील ४५ गावांना पिण्यासाठी नांदूर-मधमेश्वर जलद कालव्यातून सोडलेले पाणी बुधवारी रात्री हिंगोणी शिवारातील वितरिका क्रमांक पाच मधील पोटचारी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाया गेले. पोटचारीचा फुटलेला भाग नांमका कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी भराव टाकून बुजवला. पण, पोटचारी फुटली की फोडली यावर विभागाचे अधिकारी तोंडावर बोट ठेऊन गप्प आहेत.
पोटचारी फुटल्याने पाणी भऊर शिवारातील शांतीलाल भाऊसाहेब जगताप यांच्या शेतवस्तीवरील राहते घर व जनावरांच्या गोठ्यात शिरले. जगताप यांचे संसारपयोगी साहित्य, अन्नधान्य भिजून खराब झाले. घरात घुसलेले पाणी बाहेर काढण्यासाठी जगताप परिवारातील सदस्यांना रात्रभर जागरण करावे लागले. दरम्यान, पिण्यासाठी पोटचारीला पाणी सोडण्यात आल्यानंतर ती फोडली की फुटली यावर नांमका विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता पी. ए. पाटील यांनी मौन धारण केले आहे. शेतकऱ्यांनी पिण्यासाठी पाणी द्या अन्यथा अंतयात्रेला या असा निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर नाशिक पाटबंधारे विभागाने वैजापूर-गंगापूरसाठी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या आदेशावरुन एक टीएमसी पाणी सोडले आहे. हे आवर्तन १६ दिवसांचे असून पहिल्या टप्पयात टेल टू हेड या धोरणानुसार गंगापूर तालुक्यातील १७ गावातील पाणीपुरवठा योजनांच्या गावतलावात पाणी सोडण्यात आले. त्यानंतर वैजापूर तालुक्यातील २४ गावांतील तलावात पाणी देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हिंगोणी गावातील वितरिका क्रंमाक पाच वरील पोटचारी बुधवारी रात्री फुटली की फोडली यांचा खुलासा नांमका विभागाने केलेला नाही. पण, यामुळे भऊर शिवारातील शेतवस्तीवरील नागरिकांची झोप उडाली होती.

कालवा निरीक्षक गायब
कालव्यात पाणी सोडल्यानंतर पाण्याची चोरी रोखण्यासाठी निकराणी करण्याकरिता दिवस-रात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हिंगोणी येथील बुधवारी रात्री पोटचारी फुटल्याची महिती कालव्यावर देखरेख ठेवणारे कर्मचारी, अधिकारी गायब होते. ही माहिती गुरुवारी सकाळी समजल्यानंतर त्यांनी घाईबडीत भराव टाकून पाणी बंद केले. दरम्यान, तलावात पाणी सोडताना संबधित ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांकडू नांमका विभागाला सहकार्य मिळत नाही, अशी तक्रार कार्यकारी अभियंता पाटील यांनी केली. ग्रामसेवक हजर राहत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीने तलावात पाणी सोडले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गृहकर्ज वसुलीच्या तगाद्याने आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
तालुक्यातील गिरसावळी येथील शेतकरी नाना पुंजाबा गाडेकर यांनी महिंद्रा गृहकर्ज वसुलीच्या जाचाला कंटाळून फाशी घेऊन गुरुवारी सायंकाळी सात वाजता अात्महत्या केली अाहे. याबाबत फुलंब्री पाेलिसांत गुन्हा नाेंदविण्यात अाला अाहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत नाना गाडेकर (वय ४७) यांनी गुरुवारी माेठा मुलगा अजिनाथ यास फोन करून, मी महिंद्रा फायनान्सच्या वसुली जाचास कंटाळलो असून आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. अजिनाथ यांनी सांयकाळी वडिलांना फोन केला असता लागत नव्हता. त्यांनी गावातील परिचितांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर परचित मंडळी शेतातील राहत्या घरी गेले असता त्यांना गाडेकर यांनी गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी गाडेकर यांना फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात मृतावस्थेत दाखल केले. दरम्यन, शुक्रवारी पोस्टमार्टेम झाल्यानंतर गावकऱ्यांनी फुलंब्री पोलीस स्टेशन गाठून महिंद्रा फायनान्स कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यानंतर अजिनाथ गाडेकर यांच्या तक्रारीवरून महिंद्रा फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी चव्हाण यांच्या विरोधात भांदवि ३०६ नुसार गुन्हा दाखल करून पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव हे तपास करत आहेत.

वसुलीसाठी धमक्या
मृत नाना गाडेकर यांनी एक लाख २५ हजार रुपयांचे गृहकर्ज घेतले हाेते. त्यातील काही हप्ते भरले, मात्र परिस्थितीनुसार हप्ता थकला होता. वसुली अधिकारी चव्हाण यांचा नाना गाडेकर यांना हप्ता भरण्यासाठी नेहमी फोन येत होता. लवकर हप्ते भरा नसता घरावर ताबा घेऊन, ते घर लिलावात काढण्यात येईल, तुमच्यावर न्यायालयीन कारवाई करू, असे सातत्याने बोलले जात होते, असे तक्रारीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माळेगावच्या माळावर पवन उर्जा निर्मिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
खुलताबाद-कन्नड तालुक्याच्या सीमेवरील माळेगावच्या डोंगरांवर सुयोग उर्जा प्रा.लि.तर्फे उभारण्यात येणाऱ्या पवन उर्जा प्रकल्पाच्या यंत्रांचे आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याठिकाणी पवन उर्जेचे ४८ स्तंभ उभारण्यात येणार आहेत.
या प्रकल्पातील एका मशीनवर २४ तासांत २.०१ मेगावॉट वीजनिर्मिती होऊ शकते. पवन उर्जा प्रकल्पामुळे पावसाचे प्रमाण कमी होते या गैरसमजामुळे या प्रकल्पाला काही काळ अडथळा आला होता. येथे निर्माण झालेली वीज पिशोर सबस्टेशनला जोडणी करून महावितरणच्या जाळ्यात सोडली जाणार आहे. यावेळी कंपनीचे चेअरमन चैतराज खडकाळ, संदीप शिंदे, चंद्रकांत सातवे, राजेंद्र वाढेकर, अनिल पवार, रज्जाक पठाण, भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर नलावडे, जिल्हा परिषद सदस्य एल. जी. गायकवाड, पंचायत समिती उपसभापती गणेश अधाने, माजी उपसभापती दिनेश अंभोरे, पंचायत समिती सदस्य प्रभाकर शिंदे, प्रकाश वाकळे, नगरसेवक अविनाश कुलकर्णी, परसराम बारगळ, योगेश बारगळ, मच्छिंद्र लिंगायत, सतीश दांडेकर, मुक्त्यार पठाण आदी उपस्थित होते.

एक कोटीचा रस्ता
बाजारसावंगी ते माळेगाव हा पिशोर परिसरात जोडणारा रस्ता करण्यासाठी कंपनीने एक कोटी रुपये खर्च करून जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत रस्ता तयार केला आहे. या रस्त्यामुळे बाजारसावंगी, पाडळी, दरेगाव, हनुमानवाडी, माळेगाव ठोकळ, पिशोर या परिसरातील गावे जोडली गेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा हजार घरांचे बांधकाम एकाच दिवशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी असलेल्या घरकुल योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन युद्ध पातळीवर कामाला लागले आहे. लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्याची प्रक्रिया उशिरा सुरू झाली असून, एकाच दिवशी ६००० घरकुल बांधण्याचा अभिनव उपक्रम प्रशासनाने राबविला.
जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून केंद्राची ‘पंतप्रधान आवास योजना₨ राबविली जाते. याअंतर्गत पात्र लाभार्थ्याला घरकुल बांधण्यासाठी दीड लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणातून पात्र ठरलेल्यांनाच याचा लाभ दिला जातो. त्यानुसार जिल्ह्यात २०१६-१७साठी ६८६३ कुटुंबे पात्र ठरली. कुटुंबांची चौकशी करून प्रशासनामार्फत लाभार्थी निवडले जातात. घरकुल योजनेत बांधकामाच्या टप्प्यानुसार निधी वितरित करणे, कामाच्या प्रगतीचा अहवाल ऑनलाइन सादर करणे आदी निकष आहेत. त्यात लाभार्थी निवडीच्या टप्प्याला विलंब झाला. २८ मार्च रोजी एकाच दिवशी ६००० घरकुलांचे बांधकाम एकाच दिवशी सुरू करण्यात आले. आता ही कामे कधी संपतात आणि त्यासाठीचा निधी वेळेवर मिळतो की नाही, हे पाहावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीत सुपरस्पेशालिटीचे काम वेगात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेतून शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) परिसरामध्ये १०० खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून १५० कोटी रुपये दिले आहेत. हॉस्पिटलचे बांधकाम सुरू असून, डिसेंबर २०१७मध्ये ते पूर्ण होईल. मे २०१८पर्यंत हॉस्पिटल सुरू होण्याचे प्रशासकीय संकेत आहेत. अर्थात, हॉस्पिटलचे काम वेळेत पूर्ण झाले तरी पुढील वर्षी हॉस्पिटल हे अपेक्षेप्रमाणे अद्ययावत सेवांसह सुरू होणार की नाही, हे काळच ठरवणार आहे.
केंद्राच्या योजनेतून हे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होणार आहे. त्यासाठी केंद्राकडून ७० टक्के म्हणजेच १०५ कोटी, तर राज्याकडून ३० टक्के म्हणजेच ४५ कोटींचा निधी दिला जाणार आहे. हे हॉस्पिटल घाटी परिसरात उभे राहात असून, बांधकाम वेगात सुरू आहे. या पाच मजली हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्याचा स्लॅबही पूर्ण झाला आहे. इतर बांधकामदेखील प्रगतीपथावर आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे या हॉस्पिटलचे काम डिसेंबर २०१७पर्यंत पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. या योजनेंतर्गत हॉस्पिटलचे बांधकाम; तसेच उपकरणांचा विषय हा पूर्णपणे केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. त्यामुळे केंद्र सरकारमार्फत हॉस्पिटलचे संपूर्ण काम होणार आहे. शिवाय हॉस्पिटलमधील उपकरणे व यंत्रसामग्रीदेखील केंद्रामार्फत उपलब्ध होणार आहे.
हॉस्पिटलमधील पदनिर्मिती व पदनियुक्ती ही राज्य सरकारमार्फत केली जाईल. हे हॉस्पिटल घाटीअंतर्गत कार्यरत असेल. या हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजी, नेफ्रॉलॉजी, निओनॅटॉलॉजी, सीव्हीटीएस, रेडिओलॉजी अशा विभागांतर्गत रुग्णांना अद्ययावत सेवा दिल्या जाणार आहेत. डिसेंबर २०१७पर्यंत रुग्णालयाचे काम पूर्ण होणे अपेक्षित असून, बांधकामाच्या गतीमुळे हे काम पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वर्ग एक ते वर्ग चारपर्यंतची (चतुर्थ श्रेणी) पाचशेपेक्षा जास्त पदे असणार आहेत. घाटीतील नेफ्रॉलॉजी विभागासह सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी ४२६ पदांचा प्रस्ताव यापूर्वीच ‘वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालया’कडे (डीएमईआर) पाठवण्यात आला आहे. ४२६ पदांशिवाय आणखी २३० पदांचा प्रस्तावही पाठवण्यात येणार आहे. अर्थात, ४२६ पदांच्या प्रस्तावाला अद्याप मान्यता मिळाली नसतानाच ‘सीव्हीटीएस’ विभागामध्येदेखील कायमस्वरुपी पदांची निर्मिती व नियुक्ती झालेली नाही. त्याचबरोबर मनोविकृती विभाग, त्वाचा विभाग, छाती व फुफ्फुसविकार विभागांमध्येही प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्याशिवाय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची २२६ पदेदेखील वर्षानुवर्षे रिक्त आहे. विभागप्रमुख-प्राध्यापक-सहयोगी प्राध्यापकांच्या रिक्त जागांमुळेच अनेक विषयातील पीजी अभ्यासक्रम एकतर खंडित झाले आहेत किंवा सुरूच झाले नाहीत, अशी एकंदर स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पदनिर्मिती-पदनियुक्ती वेळेत होणार का, हा प्रश्न असून, त्याशिवाय हॉस्पिटल अपेक्षेप्रमाणे अद्ययावत सेवांसह सुरू होण्याची शक्यता नाही, हेही स्पष्टच आहे.

सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम डिसेंबरपर्यंत पूर्ण होऊन मे २०१८पर्यंत हॉस्पिटल सुरू होईल. त्यासाठी ४२६ पदांचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. आणखी २३० पदांचा प्रस्ताव पाठवण्यात येईल. अपेक्षेप्रमाणे हॉस्पिटल वेळेत सुरू होईल.
- डॉ. चंद्रकांत म्हस्के, अधिष्ठाता, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोघांना घर विकून बिल्डरकडून फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बिल्डरने घर दोघांना विकून एका प्राध्यापकाची पावणेसहा लाखांची फसवणूक केली आहे. बँकेकडून एकाच घरावर संशयित आरोपीने दुसऱ्यांदा कर्ज उचलल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकाने बिल्डरला अटक केली.
रमेश कचरू सुरडकर (वय ५३, रा. स्वाती रेसीडेंसी, हायकोर्ट कॉलनी, सातारा) हे परतूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांनी २००४ मध्ये कविता इंटरप्रायजेसचे बिल्डर राधाकृष्ण भाऊराव खरात यांच्याकडून गट क्रमांक ८८ येथील डुप्लेक्स घर खरेदी करण्याबाबत इसार पावती केली होती. हा व्यवहार सहा लाख २० हजार रुपयांत ठरला होता. सुरडकर यांनी ७० हजार रुपये रोख दिले व उर्वरित साडेपाच लाख रुपयाचे अदालत रोडवरील आयसीआयसीआय बँकेतून कर्ज घेतले. या कर्जाचे नियमित हप्ते सुरडकर भरत होते.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी सुरडकर यांच्याकडे एआरसीआयएल या ‌कंपनीचे कर्मचारी आले. त्यांनी सुरडकर यांना त्यांच्या स्वाती रेसिडेन्सी या घरावर २५ लाखांचे कर्ज थकीत असल्याची माहिती दिली. सुरडकर यांना हे ऐकूण धक्का बसला. त्यांनी माहिती घेतली असता बिल्डर राधाकृष्ण भाऊराव खरात याने २४ फेब्रुवारी २००६ साली त्यांच्या घराची सहा लाख ७१ हजार रुपयात विक्री करण्याचा करार करीत बाबासाहेब एकनाथ शिंदे यांच्यासोबत इसारपावती केल्याचे निष्पन्न झाले. खरात याने सुरडकर यांच्यासोबत केलेली इसारपावती रद्द करत त्यांच्या मालमत्तेवर पुन्हा पाच लाख ७० हजार रुपयांचे कर्ज बँकेकडून उचलले असल्याचे दिसून आले. याप्रकरणी सुरडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून बिल्डर राधाकृष्ण खरात व बाबासाहेब एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सॉइल हेल्थ कार्डातून जमिनीची काळजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी माती परीक्षण व त्यातील घटकांनुसार पिकांची निवड, खतांचे प्रमाण ठरवावे लागते. केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगाने त्यासाठी राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मृद आरोग्‍य पत्रिका (सॉइल हेल्थ कार्ड) ही योजना हाती घेतली आहे. जिल्ह्यात त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन वर्षात ९७८ गावांतील ८५ हजार ४६५ मातीचे नमुने तपासण्यात आले असून, सुमारे ३ लाख ६१ हजार ८९५ मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. निश्चित केलेले टार्गेट ६८ टक्के पूर्ण झाले आहे.
सधन कृषी पद्धतीत मृद आरोग्य अबाधित राखण्यासाठी मृद तपासणीवर आधारित खतांच्या संतुलित; तसेच परिणामकारक वापरास महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यासाठी केंद्र शासनाने मृद आरोग्य पत्रिका ही योजना फेब्रुवारी २०१५पासून हाती घेतली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ३०० गावातील १ लाख १७ हजार ४७३ माती नुमने तपासून, ५ लाख ३२ हजार शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका वाटपाचे उद्दिष्ट येथील कृषी विभागांतर्गत जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयास देण्यात आले आहे.
२०१५-१६ या वर्षात जिल्ह्यातील विविध गावांत कृषी सहायकांनी २८ हजार ४७३ माती नुमने घेतले. त्यांची तपासणी करून १ लाख २५ हजार आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना देण्यात आल्या. एप्रिल २०१६ ते मार्च १७ या कालावधीत ५७ हजार माती नुमन्याची तपासणी करून २ लाख ३८ हजार ८५९ पत्रिकाचे वाटप झाले.

या घटकांची तपासणी
मृदेतील सामू (पीएच), क्षारता, पालाश, सेंद्रीय कर्ब, नत्र, स्फुरद, गंधक, लोह, जस्त, मॅग्‍निज, बोरॉन आदी घटकांची मात्रा किती प्रमाणात आहे, याची तपासणी येथील प्रयोगशाळेत केली जाते. त्याच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना पीक नियोजन व पिकांना दिल्या जाणाऱ्या खतांचे प्रमाण याबाबत कृषी अधिकारी मार्गदर्शन करतात व मृदा आरोग्य पत्रिके त्याची सविस्तर माहिती दिली जाते.

मृद चाचणी, तपासणीसाठी शेतकऱ्यांनाकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील ९७८ गावांतून घेतले ८५ हजारांवर माती नमुने घेण्यात आले असून, साडेतीन लाखांहून अधिक मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे.
- प्रकाश पाटील, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी

मृद आरोग्य पत्रिका मोहीम

तालुका.......गावांची संख्या......नुमने.......मृद आरोग्य पत्रिका

औरंगाबाद.......१४१............७,८१५........४०,८५९

पैठण............१२३.............११,८०४......४०,१६५

फुलंब्री..........६८...............६,५९८.......३१,४१०

वैजापूर.........१३५..............१५,१८५......६०,५१४

गंगापूर..........१५८..............११,५२२......५६,१८७

खुलताबाद......५३................३,९११........१६,४४२

सिल्लोड........१०५..............१०,६८२.......५१,११६

कन्नड...........११५..............१२,३४७.......४२,१५७

सोयगाव........८०................५,६०१.........२३,०४५

एकूण..........९७८...............८५४६५........३६१८९५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images