Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

स्मार्टसिटीच्या कामांसाठी २५ जूनचा मुहूर्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्मार्टसिटीच्या कामांचा शुभारंभ करण्यासाठी २५ जूनचा मुहूर्त ठरविण्यात आला आहे. या दिवशी सोलार पॅनल बसवण्यासह संपूर्ण शहरात मोफत वायफाय सेवा देण्याचे काम देखील सुरू केले जाणार आहे. स्मार्टसिटी प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारकडून महापालिकेला ‘एसपीव्ही’च्या नावे आतापर्यंत २८१ कोटी रुपये मिळाले आहेत.
केंद्र सरकारच्या स्मार्टसिटी योजनेत औरंगाबाद शहराचा समावेश झाल्यानंतर पॅनसिटीअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांना चालना देण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेकलच्या माध्यमातून (एसपीव्ही) प्रयत्न केले जात आहेत. स्मार्टसिटी प्रकल्पासाठी शासनाने महापालिकेला दोन टप्प्यांत २८१ कोटी दिले आहेत. त्यातून लवकरात लवकर काम सुरू व्हावे, असे निर्देश शासनाने दिले आहेत. ‘एसपीव्ही’चे अध्यक्ष अपूर्व चंद्रा यांनी मे महिन्यात एसपीव्हीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून स्मार्टसिटीची कामे सुरू करण्याचे आदेश दिले. चिकलठाणा शिवारात ग्रीनफिल्डचा विकास केला जाणार असल्यामुळे भूसंपादनाचे काम देखील सुरू करा, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार पालिकेने एसपीव्हीच्या माध्यमातून काही उपक्रम सुरू करण्याचे ठरविले आहे.
महापालिकेच्या मुख्य इमारती, वॉर्ड कार्यालये, शाळा, हॉस्पिटल आदी ठिकाणी सोलार पॅनल बसवण्याच्या कामाचा शुभारंभ २५ जून रोजी केला जाणार आहे. पालिकेच्या मालकीच्या या इमारतींवर सोलार पॅनल बसवून सोलार सिटीचा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. सोलारचा प्रकल्प पूर्ण झाल्यावर वीज बिलामध्ये मोठी कपात होईल, अशी अपेक्षा आहे. शहरातील सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारतींवर सोलार पॅनल बसविण्यासाठी त्यानंतर प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर फ्री वायफाय सिटीच्या प्रकल्पाचा देखील शुभारंभ केला जाणार आहे.

मोबाइल कंपन्यांची मदत घेणार
फ्री वायफाय सिटी प्रकल्पासाठी नागपूर मॉडेल वापरण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. नागपूर शहरात महापालिकेने फ्री वायफाय साठी स्वतः केबलिंग केले आहे. औरंगाबाद महापालिकेला ते शक्य नसल्यामुळे मोबाइल फोनच्या कंपन्यांच्या मदतीने काम करून घेतले जाणार आहे. २५ जूनपासून स्मार्टसिटीच्या कामांना सुरुवात केली जाणार असल्याच्या वृत्ताला पालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दुजोरा दिला. सोलार पॅनल व फ्री वायफाय ही कामे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून ही कामे सुरू केली जातील, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सभापतिपदासाठी युतीकडून बारवाल यांना उमेदवारी

0
0

स्थायी समिती सभापतिपदासाठी युतीकडून बारवाल यांना उमेदवारी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी भारतीय जनता पक्ष - शिवसेना युतीतर्फे शहर विकास आघाडीचे गटनेते गजानन बारवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एमआयएमने अजिज अहेमद रफिक यांना उमेदवार म्हणून पुढे केले आहे. बहुमताच्या जोरावर बारवाल यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

स्थायी समितीचे सभापती मोहन मेघावाले यांची एक वर्षाची मुदत संपल्यामुळे सभापतिपदासाठी निवडणूक होत आहे. युतीमध्ये झालेल्या करारानुसार सभापतिपद यंदा भाजपच्या वाट्याला आले आहे. पालिकेच्या राजकारणात अपक्ष नगरसेवकांच्या शहर विकास आघाडीने भाजपला पाठिंबा दिला आहे. या आघाडीचे गटनेते गजानन बारवाल यांची सभापतिपदी वर्णी लावण्याचा निर्णय भाजपच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी सुमारे दीड महिन्यापूर्वी घेतला होता. असे असले तरी भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्यांना सभापतिपदाची संधी देण्याची मागणी होत होती. त्यासाठी राजगौरव वानखेडे यांचे नाव चर्चेत होते. वानखेडे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरेपर्यंत उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले, त्यात त्यांना यश आले नाही. सभापतिपदाचा उमेदवार भाजपतर्फे गुरुवारी रात्रीच ठरवला जाणार होता, पण प्रत्यक्षात शुक्रवारी दुपारी दीड वाजेपर्यंत उमेदवारीचा घोळ सुरूच होता. दीड वाजेच्या सुमारास बारवाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यावर त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. मनिषा मुंडे या बारवाल यांच्या उमेदवारीच्या सूचक असून कीर्ती शिंदे यांनी अनुमोदन दिले आहे. उद्या शनिवारी सभापतिपदासाठी निवडणूक होणार आहे. सकाळी ११ वाजता यासाठी स्थायी समितीची विशेष बैठक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या भितीने ४० गुन्हेगार शहरातून भूमिगत

0
0

पोलिसांच्या भितीने ४० गुन्हेगार शहरातून भूमिगत

दुचाकीचोर व घरफोड्यांचा समावेश

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांच्या ‌भितीने शहरातील रेकॉर्डवरील सुमारे ३५ ते ४० गुन्हेगार शहरातून भूमिगत झाले आहेत. गुन्हेशाखेच्या वतीने विशेष पथके नेमून या गुन्हेगारांचा तपास करण्यात येत आहे. या गुन्हेगारांमध्ये प्रामुख्याने दुचाकीचोर व घरफोड्याचा समावेश असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद पोलिसांना हवा असलेल्या कुख्यात गुन्हेगार कलीमखान उर्फ कल्ल्या हा परभणी शहरात वास्तव्य करीत असल्याचे त्याला पकडल्यानंतर समोर आले. पोलिसांच्या भितीने कल्ल्याने शहरातून पलायन केले होते. कल्ल्याप्रमाणेच शहरातील ३५ ते ४० गुन्हेगारांनी शहराबाहेर पलायन केले आहे. हे गुन्हेगार गुन्हेशाखेच्या रडावर असून त्यांचा सातत्याने शोध घेण्यात येत असल्याची माहिती गुन्हेशाखेच्या सूत्रांनी दिली.

एका पथकाकडे दहा गुन्हेगारांची शोध मोहीम

शहरात दुचाकी चोरी व घरफोड्याचे सत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांचा शोध सुरू आहे. भूमिगत असलेल्या या गुन्हेगारांच्या शोधासाठी गुन्हेशाखेने पथकांना जबाबदारी दिली आहे. यामध्ये एका पथकाकडे दहा गुन्हेगारांची शोध मोहीम घेण्याचे आदेश आहेत. या पथकांनी या गुन्हेगार कसून शोध घेण्यास सुरूवात केली आहे. रात्री बेरात्री या गुन्हेगारांचे घर गाठून शोध घेण्यात आला. मात्र, हे गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कारागृहातून बाहेर पडलेल्या गुन्हेगारांवर नजर

चोरी घरफोडीचे गुन्हे दाखल असलेले अनेक सराईत गुन्हेगार हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत होते तर अनेकजण न्यायालयीन कोठडीत होते. यापैकी कोणते गुन्हेगार शिक्षेचा कालावधी संपवून बाहेर पडले आहेत. तसेच कोणते गुन्हेगार महिन्याभरात जामिनावर सुटले आहेत. सध्या गुन्हेगार कोठे आहेत यावर देखील गुन्हेशाखेच्या पथकांची करडी नजर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेज कॅम्पसमध्ये मतदार नोंदणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
काही कारणाअभावी मतदारयादीत समावेश राहिलेल्या नवीन मतदारांची नाव नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवणार आहे. जिल्ह्यात एक ते ३१ जुलै या कालावधीत नोंदणी करण्यात येईल. कॉलेज कॅम्पसमध्ये विशेष कॅम्प घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दरवर्षी मतदारांच्या संख्येत दोन टक्के भर पडत असते. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांचा यादीत समावेश करण्यासाठी जिल्हानिहाय मोहीम सुरू करण्यात येणार आहे. एक ते ३१ जुलै या कालावधीत मोहीम सुरू राहणार आहे. सर्वांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन करण्यात येत आहे. पहिल्यांदाच देशभर ईआरओ नेट प्रणालीद्वारे नोंदणी होणार असल्यामुळे दोन वेळेस नोंदणीचा गैरप्रकार घडणार नाही, असे नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर १८ ते २१ वयोगटातील नवीन मतदार नोंदणीसाठी आठ ते २२ जुलै या काळात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. शासकीय व खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष कँप घेण्यात येणार आहे. नायब तहसीलदारांची बैठक घेऊन जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात नाव नोंदणी करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायत यांच्याकडून डेथ रजिस्टर मागण्यात आले आहे. त्यानुसार मृत मतदारांची नावे वगळण्याचे काम सुरू आहे. घरोघरी मतदार नोंदणीचे अभियान पोचवून यादीत दुरुस्ती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

जिल्हा मतदार दिन
येत्या १७ सप्टेंबर रोजी जिल्हा मतदार दिन आणि एक जुलै रोजी राज्य मतदार दिन साजरा करण्यात येणार आहे. लोकशाही प्रक्रिया गतिमान व बळकट करण्यासाठी हा उपक्रम असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. याच दिवशी अनुक्रमे हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन व कृषी दिन आहे. त्यामुळे या दिवसांचे महत्त्व कमी होईल असा मुद्दा उपस्थित झाला आहे, मात्र एकाच दिवशी दोन चांगली कामे करता येतील. त्यामुळे इतर दिवसांचे महत्त्व कमी करण्याचा मुद्दा नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

संपाची माहिती घेतली
सध्या राज्यात शेतकरी संप सुरू आहे. लोकशाहीत प्रत्येकाला संप करण्याचा अधिकार आहे, मात्र शेतकऱ्यांच्या नावाखाली कुणी दूध, भाजीपाला यांचे दर वाढवून ग्राहकांची लूट करीत असल्यास कारवाई करण्यात येईल. कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासनाचे लक्ष आहे. संपाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून, अहवाल मागून योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील, असे नवलकिशोर राम यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘माझे झाड - माझे मूल’ वृक्षदान शिबिर

0
0

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त
‘माझे झाड - माझे मूल’ वृक्षदान शिबिर
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पर्यावरणाचा समतोल राखणे, वृक्षसंपदा वाढविण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जागृतीमंचच्या वतीने ‘ माझे झाड - माझे मूल’ हे वृक्षदान शिबिर ५ जून रोजी आयोजित करण्यात आले आहे.
५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो. त्या अनुषंगाने जागृतीमंचच्या वतीने ५ जून रोजी वृक्षदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात १००० झाडांचे दान करण्यात येईल. जी मंडळी ही झाडे घेतील त्याचे संगोपन वृक्षपालक व्यवस्थित करतो की नाही याची यंत्रणा जागृतीमंचने निर्माण केली आहे. प्रत्येक वृक्षपालकाचा मोबाइल क्रमांक, कोणते झाड दिले आहे ? याची नोंद ठेवली जाईल. ‘माझे झाड माझे मूल’ हे ब्रीदवाक्य घेऊन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात शहरातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा, झाड घेऊन जाऊन अपत्याप्रमाणे संगोपन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ४ जून रोजी सकाळी १० ते १ या वेळेत क्रांती चौक उड्डाणपूल येथे होईल, असे समन्वयक डॉ. सुषमा सोनी, भारती पवार, नेहा गुंडेवार, भारती विश्वास, ललिता चौधरी, शर्मिष्ठा रोडगे, सविता कुलकर्णी, डॉ. अर्चना वैद्य, शुभदा पवार, मृणालिनी फुलगीरकर, माधुरी कोरान्ने आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नड तालुक्यातील चिंचोली, जेहूरचे आठवडी बाजार बंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
तालुक्यातील शेतकरी संपाचा दुसरा दिवस नाचनवेल येथील चौफुलीवरील आंदोलनाने गाजला. येथे शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. तालुक्यात ठिकठिकाणी संपाला जोरदार पाठिंबा मिळाला.
तालुक्यातील चिंचोली व जेहूर येथील आठवडी बाजार संपामुळे बंद राहिले. नागद येथील आठवडी बाजारात सुरळीत व्यवहार झाले, पण ग्राहकी तुलनेने कमी होती. तालुक्यातील चिंचोली लिंबाजी व जेहूर येथील शेतकऱ्यांनी दूध संकलनासोबतच कृषी दुकाने बंद ठेवून संपाला पाठिंबा दर्शविला. तालुक्यातून विविध गावातून खासगी संस्था व संघामार्फत होणाऱ्या दूध पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. तालुक्यातील सुमारे ४० हजार लिटर दूध संकलन झाले नाही. कन्नड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी शुकशुकाट दिसून आला.

आज रास्ता रोको
शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील हतनूर येथे शनिवारी दूध व भाजीपाल्याची वाहने अडवण्यात येणार आहेत. हतनूर हे औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गावर असल्याने या आंदोलनाची परिणामकारता जाणवेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांशी संवाद साधून मागण्या सोडवाव्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शेतकरी संपास पाठिंबा म्हणून मराठवाडा लेबर युनियनसह अन्य संघटनांनी शुक्रवारी पैठणगेट येथे जोरदार निदर्शने केली. कष्टकरी, कामगारांनी याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करत सरकारने संपकरी शेतकऱ्यांशी संवाद साधून सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी केली.
कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी गुरुवारपासून पुकारलेल्या संपाला मराठवाडा लेबर युनियनने पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लेबर युनियनसह महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ, स्वराज अभियान-जयकिसान आंदोलन व स्वराज इंडियातर्फे सकाळी ११च्या सुमारास पैठण गेट येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या संपास संपूर्ण पाठिंबा, तर आहेच परंतु, सरकारने संपकरी शेतकऱ्यांशी तत्काळ संवाद साधून सर्व प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी सुभाष लोमटे यांनी केली. शेतकऱ्यांनी केलेल्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या तरी शेतकऱ्यांवरील संपूर्ण संकट टळणार नाही. म्हणून शेतकऱ्यांना बाजारमुक्त करणे अत्यंत निकडीचे आहे. आजघडीला शेतकऱ्यांला लागणाऱ्या सर्व वस्तूसाठी त्याला बाजारावर अवलंबून राहावे लागते आणि शेतात पिकलेला माल विक्रीसाठी पुन्हा बाजारावर अवलंबून राहावे लागते. दोन्ही वेळेस त्याची बाजारात लूट होते. त्यामुळे त्याच्या बाजारमुक्तीशिवाय बळीराजा शोषणमुक्त होणार नाही, असे मत लोमटे यांनी व्यक्त केले.
सत्तेत येण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी ज्या मागण्या केल्या होत्या, त्या सर्वांचा त्यांना विसर पडला, असा आरोप त्यांनी केला. भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी तर धान्य आयात करण्याची भाषा केली, याचे आश्चर्य वाटते, असे सांगतानाच लोमटे यांनी सरकारच्या या दुप्पटी धोरणाविरोधात शेतकरी कष्टकऱ्यांच्या एकजुटीने संघर्ष सुरूच राहिल, असे नमूद केले.
अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा, अण्णासाहेब खंदारे, अॅड. अंकुश भालेकर, डॉ. जनार्धन पिंपळे, देविदास किर्तीशाही, छगन गवळी, अली खान, रवी अंभोरे, प्रा. श्रीराम जाधव, गणेश जोंगळे, शेख रफिक, उत्तम साळवे, सिद्धेश्वर पिंपळे, संजय बांगर, कमलताई इंगळे यांच्यासह मोठ्या संख्येने कष्टकरी कामगार, हमाल मापाडी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठण तालुक्यातून दूध, भाजीपाल्याची वाहतूक बंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी संपाला चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे पैठण व बालानगर येथील आठवडी बाजार भरलेच नाहीत. शहराकडे भाजीपाला व दूध घेऊन जाणारी वाहतूक पूर्णपणे पडली होती.
बालानगर व पैठण येथे शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. मात्र, शेतकरी संप असल्याने व शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी आणला नसल्याने दोन्ही ठिकाणी बाजार भरलाच नाही. पैठणच्या आठवडी बाजारामध्ये काही व्यापाऱ्यांनी दुकाना लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अन्नदाता शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्याना दुकाने लाऊ दिली नाहीत. तसेच अन्नदाता संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शहराबाहेरील औरंगाबाद, पाचोड, शहागज व शेवगाव रस्त्यावर भाजीपाला व दुधाची वाहतूक करणारी वाहने रोखून परत पाठवली. परिणामी, शुक्रवारी शहरात भाजीपाल्याची व दुधाची आवक झाली नाही.
दरम्यान, शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी, शहरातील अनेक राजकीय व बिगर राजकीय संघटनानी या संपास पाठिंबा दिला. अन्नदाता शेतकरी संघटनेसह अनेक संघटनानी बसस्थानक चौकात राज्य सरकार विरोधी घोषणाबाजी करत सरकारचा प्रतिकात्मकरित्या निषेध केला.

प्रतिकात्मक अंत्ययात्रा
शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी अन्नदाता शेतकरी संघटनेच्या वतीने आठवडी बाजार बंद केल्यानंतर शहरातील खंडोबाचौक ते बसस्थानक चौकादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी आंदोलकांनी राज्य शासन व मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात माउली मुळे, अतिश गायकवाड, संतोष गोबरे, साईनाथ कर्डिले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते.

शिवसेना सक्रिय
शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी शहर शिवसेनेच्या वतीने आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवण्यात आला. आठवडी बाजार, बसस्थानक चौकात झालेल्या आंदोलनात शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, नगरसेवक तुषार पाटील, कृष्णा मापारी यांच्यासह अनेक शिवसैनिकांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ बीड बायपासच्या बाधित मालमत्ताधारकांना अंतरिम संरक्षण

0
0

बीड बायपासच्या बाधित मालमत्ताधारकांना अंतरिम संरक्षण

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

बीड बाय पास रुंदीकरणात बाधित होणाऱ्या मालमत्ता अनाधिकृत ठरवून २४ तासांच्या आत बांधकामे काढून घेण्याचे आदेश औरंगाबाद महापालिकेने ३१ मे रोजी दिले होते. या आदेशाला आव्हान देणाऱ्या आणखी २१ मालमत्ताधारकांना औरंगाबाद खंडपीठाने अंतरिम संरक्षण दिले.

गणेश घोले पाटील, कमलनयन बजाज हॉस्पिटल व मंदाकिनी गाडेकर यांच्यासह शुक्रवारी २१ याचिका खंडपीठात सादर झाल्या. कमलनयन बजाज हॉस्पिटलमार्फत सादर केलेल्या याचिकेत असे नमूद केले आहे की, औरंगाबाद पालिकेने बांधकाम परवाना जारी करून १ ऑक्टोबर २००७ रोजी भोगवटा प्रमाणपत्र जारी केले होते. हॉस्पिटलने कोणत्याही प्रकारचे अनाधिकृत बांधकाम केलेले नसतानाही पालिकेने ३१ मे रोजी काही बांधकाम अनाधिकृत असल्याचे ठरवून ते पाडून टाकण्यासाठी नोटीस बजावली होती. हॉस्पिटलने २९ मे रोजीच पालिकेस खुलासा सादर करून रस्ता रूंदीकरणात बाधित मालमत्ता हस्तांतरित करण्यास तयार असल्याचे कळविले होते. मात्र, योग्य तो मोबदला मनपाने देण्याची विनंती केली होती. मात्र, सदर खुलाशाचा विचार न करता पालिकेने खुलासा असमाधानकारक असल्याचा एक ओळीचा आदेश पारित करून २४ तासात बाधित बांधकाम काढून घेण्याचे आदेश दिले होते. हा आदेश बेकायदेशीर व नैसर्गिक न्याय तत्त्वाच्या विरुद्ध असल्याने रद्द करण्याची विनंती याचिकेत करण्यात आलेली आहे.

सातारा तसेच देवळाई ग्रामपंचायतीनी दिलेले सर्व बांधकाम परवाने बेकायदेशीर असल्याचे जाहीर प्रगटन पालिकेने १ जून रोजी दिले होते. हे बांधकाम परवान्याआधारे करण्यात आलेली सर्व बांधकामे अवैध ठरविली होती. सक्षम अधिकाऱ्यांनी अकृषिक परवाना दिल्यानंतर ग्रामपंचायतींनी बांधकाम परवाने जारी केले असल्याने मनपास एका ओळीचा आदेश पारित करून बांधकाम परवाने रद्द करण्याचा अधिकार नसल्याचा युक्तिवाद इतर याचिकांमध्ये करण्यात आलेला आहे. याचिकाकर्त्यांची बाजू विजयकुमार सपकाळ, देवदत्त पालोदकर, मुरली कराड, एस. एस. काझी, एम. ए. पठाण व एम. पी. त्रिपाठी यांनी मांडली.

पालिकेने कायदेशीर प्रक्रियेची अंमलबजावणी करून मालमत्ताधारकांना बांधकामे काढून घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. सद्यस्थितीत बेकायदेशीर बांधकामाबाबत कार्यवाही सुरू असून त्याबाबत कोणताही मोबदला देण्याची आवश्यकता नाही, असा युक्तीवाद पालिकेचे वकील आनंद भंडारी यांनी केला.

न्या. संगीतराव पाटील यांनी प्रकरणात मनपाने प्रत्येक याचिकेसंदर्भात सविस्तर उत्तर सादर करणे आवश्यक असून त्यासाठी मनपाला वेळ देणे आवश्यक आहे, असे निरीक्षण नोंदवत सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून पुढील सुनावणी ७ जून रोजी ठेवण्याचा आदेश दिला. केवळ याचिकाकत्र्यांच्या मालमत्तेसंदर्भात जैसे थे परिस्थिती ठेवावी, असेही आदेश खंडपीठाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅफो चव्हाण यांची जालन्याला बदली

0
0

औरंगाबाद : जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी (कॅफो) उत्तम चव्हाण यांची जालना जिल्हा परिषदेत बदली झाली. चव्हाण यांचा कार्यकाळ ३ वर्षे पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली झाली. लेखाधिकारी एकनाथ कोटगिरे यांचीही उपमुख लेखापरीक्षक म्हणून बदली झाली.
मे महिन्याचा शेवटचा आठवडा बदल्यांचा हंगाम असतो. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांची नुकतीच पुण्याला बदली झाली. त्यापूर्वी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन रबडे यांचीही बदली झाली आहे. दोन दिवसांपूर्वी उत्तम चव्हाण यांच्या बदलीचे आदेश आले. त्यांच्यासोबत कोटगिरे यांचीही बदली झाली. उत्तम चव्हाण यांच्या जागी जालन्याहून चव्हाण रुजू होणार आहेत. जिल्ह्यातील सेवानिवृत्तांना सुविधा केंद्र निर्माण करण्यात चव्हाण यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेत नवीन सभागृह अस्तित्वात आले. त्यानंतर हे बदलीसत्र झाल्याने आता नव्या सभागृहाला अनेक विभागात नवीन अधिकारी लाभणार आहेत. जिल्हा परिषदेत समाजकल्याण अधिकारी, शिक्षणाधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणीपुरवठा) ही पदे रिक्त आहेत. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पवार आजपासून रजेवर गेले आहेत. त्यामुळे या महिन्यात कामकाजावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.

अधिकाऱ्यांचा नकार?
जिल्हा परिषदेत होणारा सर्वपक्षीय राजकीय हस्तक्षेप योजना राबविण्यापेक्षा त्यावर आक्षेप घेऊन लांबविण्याचे धोरण, अधिकाऱ्यांच्या कामकाजात होणारी ढवळाढवळ पाहून औरंगाबाद जिल्हा परिषदेत येण्यासाठी अधिकाऱ्यांचा नकार असतो. सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांपैकी अनेक जण प्रतिनियुक्तीवर जाण्यासाठी इच्छुक आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाधववाडीतील आवक बंद; भाज्यांचे दर झाले तिप्पट

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शेतकऱ्यांचा संप आज शुक्रवारी दुसऱ्या दिवशी सलग सुरू राहिल्याने शुक्रवारी जाधववाडीत एकही ट्रक भाजीपाला आला नाही. शुक्रवार हा साप्ताहिक सुटीचा असला तरी काही ना काही प्रमाणात भाज्यांची आवक राहावी यासाठी निदान ५ ते ६ ट्रक माल येत असतो. पण २ जूनला एकही ट्रक माल आला नाही, अशी माहिती बाजारसमितीचे सचिव विजय शिरसाट यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना दिली.
औरंगाबाद शहराला भाजीपाला पुरवठा करत असलेल्या जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मंडईत पहाटेपासूनच शुकशुकाट होता. मंडईत ग्रामीण भागातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याच्या गाड्या येत असतात. पण, शुक्रवारी त्या गाड्या आल्याच नाहीत. ग्रामीण भागातून छोट्या शेतकरी व उत्पादकांनी गोण्यामध्ये भरून आणलेला भाजीपाला मात्र मंडईच्या बाहेर जादा दराने विकण्यात आला. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी ग्राहकांना भाजीपाला जादा दराने विकला. त्याचा फटका ग्राहकांना बसला आहे. संपाचा शुक्रवारी दुसरा दिवस असल्याने भावात मोठी वाढ झाली आहे.

औरंगाबादच्या जाधववाडीत शुक्रवारी माल न आल्याचा परिणाम भाजीबाजारात दिसला. संपाचा विपरित परिणाम आहे. भाजीपाल्यांचे दरही वाढले आहेत. फळभाज्यांनी ९० ते शंभरी गाठली आहे. सिडको, हडको, सातारा, देवळाई, औरंगपुरा या सगळ्या मंडईत वेगवेगळ्या दराने व चढ्या दराने भाजीपाला विकला जात आहे.
- ‌जनार्दन जाधव, भाजीविक्रेते, सिडको

संपाचा दुसरा दिवस भाववाढीतच गेला आहे. पण आमचे दु:ख आम्हाला माहित. अजून दोन दिवस जरी संप चालला तरी भाव अजून कडाडतील आणि मग संपाचे गांभीर्य लक्षात येईल.
-मोहंमद शेख, भाजीपाला विक्रेते, पळशी

शुक्रवारचे भाव
(रुपये प्रतिकिलो)
बटाटे-५०
कांदे-३०
गवार- ९०
कोबी-७०
टमाटे- ५० ते ६०
फुलकोबी-६०
वांगी- ६०
कारले-५०
मटार-७५
कोथिंबीर, मेथी, पालक- ३० रुपये जुडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेरच्या टप्प्यात ९६ बदल्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील एकाच विभागात अनेक वर्षे ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांची इतर विभागात बदली करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या आदेशानुसार शुक्रवारी तब्बल ९६ कर्मचाऱ्यांच्या बदलीचे परिपत्रक जारी करण्यात आले. प्रशासकीय कामात शिस्त आणण्यासाठी कुलगुरूंनी मागील महिनाभरात तब्बल १४० कर्मचाऱ्यांची बदली केली आहे.
साई इंजिनीअरिंग कॉलेजच्या मास कॉपी प्रकरणानंतर विद्यापीठाचा परीक्षा व मूल्यमापन विभाग सर्वाधिक चर्चेत आला होता. या विभागातील कर्मचारी संगनमताने परीक्षेत गैरप्रकार करीत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला होता. या कर्मचाऱ्यांच्या बदल्या तात्काळ करण्यासाठी दबाव वाढल्यानंतर कुलगुरूंनी तातडीने बदल्यांचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात अभियांत्रिकी विभागातील १५ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. प्रथम व द्वितीय श्रेणीतील २९ कर्मचाऱ्यांची बुधवारी बदली करण्याचे परिपत्रक जारी करण्यात आले, तर तृतीय व चतुर्थ श्रेणीतील ९६ कर्मचाऱ्यांची शुक्रवारी बदली करण्यात आली. परीक्षा व मूल्यमापन विभागातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. लेखा, आस्थापना, पदव्युत्तर प्रवेश, शैक्षणिक, मध्यवर्ती भांडार, स्थावर, आजीवन अध्ययन व विस्तार आदी विभागातील कर्मचाऱ्यांची इतर विभागात रवानगी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका ठिकाणी कमाल तीन वर्षे कार्यरत राहण्याचा नियम आहे. मात्र, हा नियम धुडकावून काही कर्मचारी दहा-पंधरा वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत होते. कर्मचारी संघटनांचा दबाव असल्यामुळे बदलीची ऑर्डर नाकारण्याचे धाडस कर्मचारी करीत होते. या प्रकाराला चाप लावत कुलगुरूंनी दीडशे कर्मचाऱ्यांना विविध विभागात पाठवले आहे. पुढील तीन वर्षे बदली झालेल्या विभागातच काम करावे लागणार आहे. काही कर्मचारी बदली रद्द करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, पण एकदा ऑर्डर निघाल्यानंतर त्यात बदल करणे शक्य नसल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट सांगितले.

बदल्यांचा विक्रम
गेल्या १५-२० वर्षांत विद्यापीठात अपवादात्मक बदल्या झाल्या आहेत. वेगवेगळ्या तांत्रिक कारणांमुळे बदल्यांना नकार दिला जात होता. तत्कालीन कुलगुरूंनी प्रयत्न करूनही कर्मचाऱ्यांची बदली करण्यात पुरेसे यश आले नाही, तर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी निर्णयावर ठाम राहत दोन आठवड्यात १४० कर्मचाऱ्यांची बदली करून नवा विक्रम केला आहे. प्रत्येक विभागातील कामकाज गतिमान करण्यासाठी बदलीचा निर्णय योग्य ठरण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेपर घोटाळ्यातील आरोपींना जामीन नाही

0
0

औरंगाबाद : अभियांत्रिकी पेपर घोटाळ्यातील आरोपी व साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अध्यक्ष, प्राचार्य, प्राध्यापक, परीक्षा केंद्रप्रमुख, सदस्य या पाच आरोपींनी सादर केलेला नियमित जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. एन. राजे यांनीही शुक्रवारी (२ जून) फेटाळला. यापूर्वी पाच आरोपींचा जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. साबळे यांनी २५ मे रोजी फेटाळला होता. त्यामुळे सर्व पाच आरोपींचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत वाढल्याचे स्पष्ट झाले.
साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. विजय आंधळे, संस्थाचालक सदस्य मंगेश मुंढे, संस्थेचे अध्यक्ष अॅड. गंगाधर मुंढे, परीक्षा केंद्रप्रमुख अमित कांबळे व प्राचार्य संतोष देशमुख या आरोपींचा नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. साबळे यांनी गुरुवारी (२५ मे) फेटाळला होता. या निर्णयाला आव्हान देत आरोपींनी सत्र न्यायालयात जामीन अर्ज सादर केला होता.

गुन्ह्याची व्याप्ती मोठी
सुनावणीवेळी, आरोपी हे संस्थाचालक, प्राध्यापक व पदाधिकारी आहेत, त्यांचा गुन्ह्यात मुख्य सहभाग आहे. याची व्याप्ती मोठी असून, त्यांना जामीन मंजूर केल्यास ते कागदपत्रांमध्ये फेरफार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोपींना जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब महेर यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपींचा नियमित जामीन फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड लाख लिट दुधाचा औरंगाबादेत तुटवडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कर्जमुक्तीसह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा फटका शहरातील दूध पुरवठ्यावर झाला आहे. अहमदनगरसह वैजापूर, पैठण व इतर तालुक्यातून दूध आले नाही. परिणामी, एकट्या औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात ५० हजार लिटर दुधाचे संकलन झाले नाही. शहरात दीड लाख लिटर दुधाचा तुटवडा जाणवू लागला आहे, अशी माहिती जाणकारांनी दिली.
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत मुंबईसह सर्व शहरातील भाजीपाला व दुधाची रसद तोडण्यात आली आहे. या संपाचा परिणाम शहरात जाणवण्यास सुरुवात झाली आहे. भाजीपाला पुरवठ्यासह प्रामुख्याने दुधाच्या पुरवठ्यावर अधिक परिणाम झाल्याचे समोर आले आहे. शहरात दररोज सरासरी सव्वातीन लाख लिटर दुधाची गरज भासते. स्थानिक किरकोळ विक्रेते, डेअरी यांच्यामार्फत सुमारे ७० हजार लिटर दुधाची घरपोच किंवा डेअरीमार्फत विक्री केली जाते. उर्वरित दुधाचा पुरवठा प्रामुख्याने सहकारी तसेच खासगी दूध संघामार्फत केला जातो. देवगिरी महानंद या नावाने उत्पादने विकणाऱ्या जिल्हा दूध संघ दररोज सरासरी ८९ हजार लिटरपेक्षा जास्त दूध संकलन करते. या संपामुळे शुक्रवारी ५० हजार लिटर दुधाचे कमी संकलन झाले. यात वैजापूर तसेच पैठण तालुक्यातून एक लिटरही दुधाचा पुरवठा शुक्रवारी झाला नाही. मागणी जास्त व पुरवठा कमी, या समस्येला तोंड देण्याची वेळ संघावर आली आहे.
जिल्हा दूध संघासह शहरात प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यातील विविध सहकारी तसेच खासगी संस्थामार्फत दुधाचा पुरवठा होता. गेल्या दोन दिवसांपासून संपकऱ्यांनी नगर भागातून येणारे दूध रोखले आहे. परिणामी, दुधाच्या तुटवड्यात अधिकच भर पडली आहे. आजघडीला शहराची एकूण मागणी व पुरवठा लक्षात घेता सव्वा ते दीड लाख लिटर दुधाचा तुटवडा होत आहे, अशी माहिती शहरातील प्रमुख ठोक विक्रेते सुरेश खांड्रे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

पोलिस संरक्षण देणार
दुधाचा पुरवठा करण्यास तयार आहोत. पण, वाहने अडविली जात आहेत त्यामुळे काहीच करू शकत नाही. आता पोलिसांनी संरक्षण देऊ, असे सांगितले आहे, अशी माहिती गोदावरी खोरे नामदेवराव परजणे तालुका सहकारी दूध संघाच्या एका अधिकाऱ्याने दिली.

दुधाची भाववाढ
दुधाचा तुटवडा जाणवू लागताच. काही किरकोळ विक्रेते त्याचा फायदा घेत आहेत. अर्धा लिटरच्या बॅगमागे एक ते तीन रुपये जादा आकारले जात आहे, अशी माहिती एका ग्राहकाने दिली.

मागणी जास्त व पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या संपामुळे संघाचे दूध संकलन ५० हजार लिटरने कमी झाले आहे. शहर व परिसराचा विचार करता सव्वा ते दीड लाख लिटर दुधाचा तुटवडा जाणवत आहे.
- नंदलाल काळे, उपाध्यक्ष जिल्हा दूध संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पेट’ ३० जून रोजी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ‘पेट’ (पीएचडी एंट्रन्स टेस्ट) परीक्षा ३० जून रोजी होणार आहे. राज्यभरात ऑनलाइन ‘पेट’ परीक्षा घेऊन दोन तासात निकाल घोषित करण्यात येईल असे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सांगितले. या परीक्षेसाठी देशभरातील तज्ज्ञ मार्गदर्शन करीत आहेत. विषयनिहाय रिक्त जागा आणि गाइडची यादी तयार झाल्यानंतर परीक्षा जाहीर करण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पीएचडी पूर्वपरीक्षेची (पेट-४) तयारी अंतिम टप्प्यात आहे. या परीक्षेसाठी साडेतेरा हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, अडीच वर्षांपासून परीक्षा रखडली आहे. अडीच वर्षात किमान दोन ‘पेट’ परीक्षा होणे अपेक्षित असताना एकही परीक्षा झालेली नाही. विद्यापीठाच्या प्रशासकीय कारभाराचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. विद्यार्थी संघटना व शिक्षण क्षेत्रातील विविध शिष्टमंडळांनी ‘पेट’ घेण्याबाबत पाठपुरावा केला. प्रत्येक वेळेस कुलगुरूंनी आश्वासन देऊन शिष्टमंडळांची बोळवण केली. पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी ‘पेट’ घेण्याची मागणी केली होती. यावर येत्या ३० जूनपर्यंत परीक्षा घेण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिले होते. सध्या ‘पेट’ची तयारी अंतिम टप्प्यात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘पेट’ परीक्षा राज्यभर घेण्याचे नियोजन केले आहे. ऑनलाइन परीक्षा घेऊन तासाभरात निकाल जाहीर होतील. या प्रकारे राज्यभर परीक्षा घेणारे पहिलेच विद्यापीठ ठरणार आहे. देशातील तज्ज्ञ पेपर सेट करीत आहेत. प्रश्नावली तयार झाली असून काठीण्य पातळीवर परीक्षा होईल असे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले. ३० जून रोजी ‘पेट’ घेण्यात येणार आहे. ही परीक्षा यशस्वी झाल्यानंतर वर्षातून दोन वेळेस पेट घेण्याचे नियोजन करण्यात येईल, असे चोपडे म्हणाले. रखडलेली ‘पेट’ तात्काळ घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी संघटनांनी जोरदार आंदोलन सुरू केले होते. परीक्षा व मूल्यमापन संचालक बदलल्यानंतर ‘पेट’चे नियोजन करण्यात आले आहे.

माहिती अपडेट
‘पेट’ परीक्षेसाठी साडेतेरा हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ५८ विषयांत ऑनलाइन परीक्षा होणार आहे. विषय तज्ज्ञांकडून प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. या प्रश्नावलीतून प्रश्न निवडले जाणार आहेत. काठिण्य पातळीवर परीक्षा घेण्यात येणार आहे. सध्या पीएचडीच्या विषयनिहाय रिक्त जागा आणि गाइडची यादी अपडेट करण्यात येत आहे. या माहितीनंतर परीक्षेची तारीख जाहीर होणार आहे.

नियोजन व्यापक असल्यामुळे ‘पेट’ परीक्षेला उशीर झाला आहे. येत्या ३० जून रोजी निश्चित ‘पेट’ परीक्षा होईल. राज्यभर परीक्षा घेण्याचा विद्यापीठाचा पहिला प्रयत्न आहे. यानंतर दरवर्षी दोन वेळेस परीक्षा घेण्यात येणार आहे.
- डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन रोडरोमियोंकडून छेड; तरुणींनी भरचौकात चोपले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तिबेटी तरुणींचा पाठलाग करून छेड काढणाऱ्या दोन रोडरोमियोंना या तरुणी व नातेवाईकांनी चांगलेच झोडपले. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी चार वाजता महावीर चौकात घडला. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
पडेगाव परिसरात राहणाऱ्या दोन तिबेटी तरुणी मोपेडवरून शुक्रवारी दुपारी शहरात येत होत्या. यावेळी नगरनाक्यापासून दुचाकीवर असलेल्या दोघांनी या तरुणींचा पाठलाग सुरू केला. हे रोडरोमियो या तरुणींना कट मारणे, टॉटिंग करणे असले प्रकार करीत होते. दरम्यान, या तरुणींचे काही नातेवाईक देखील पाठीमागून रिक्षात येत होते. महावीर चौकाजवळ आल्यानंतर या तरुणींनी रोडरोमियोला थांबण्याचा इशारा केला. तरुणींनी बोलवल्यामुळे रोडरोमियो खूश झाले. ते या तरुणीकडे गेल्यानंतर तरुणींनी दोघांना जाब विचारला. दरम्यान, त्यांचे नातेवाईक देखील पाठीमागून आले होते. या रोडरोमियोंनी अरेरावी करीत एका तरुणीला चापट मारली. त्यामुळे तरुणी व नातेवाईक चांगलेच भडकले. त्यांनी या दोघांना चांगलेच झोडपले. हा प्रकार समजल्यानंतर क्रांती चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दोन तरुणांना वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिठाईच्या दुकानात दहा हजारांचा चोरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चेतकघोडा परिसरातील मिठाईचे दुकान फोडून दुकानातून १० हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरणाऱ्यास सोमवारपर्यंत (५ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरुंदळे यांनी दिले. या प्रकरणी शक्‍तीसिंह राजपुरोहित (रा. श्रीरामनगर, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती.
फिर्यादीनुसार, राजपुरोहित हे २४ मे रोजी मिठाईचे दुकान रात्री नेहमीप्रमाणे बंद करून गेले होते. दुसऱ्या दिवशी २५ मे रोजी दुकानातून ४ हजार ४०० रुपयांची मिठाई व ६ हजार रुपयांच्या वजनकाट्याची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन सय्यद सरताज सय्यद सिंकदर (वय २५, रा. मिसारवाडी, पिसादेवी, औरंगाबाद) याला बुधवारी (३१ मे) अटक करण्यात आली. त्याला गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, ८ हजार २०० रुपयांचा माल जप्‍त करण्यात आला असून, उर्वरित माल जप्‍त करणे बाकी आहे, साथीदारांचा तपास करायचा असल्याने सहाय्यक सरकारी वकील एस. एम. जोंधळे यांनी पोलिस कोठडीची मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू !

0
0

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू !

सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

‘शेतकरी संपावर जाणे आणि आई संपावर जाणे यात फरक नाही. आई संपावर गेल्यानंतर जी अवस्था होईल तीच अवस्था शेतकरी संपाने झाली आहे. शेतकरी संपाबाबत सरकार गांभीर्याने चिंतन करीत आहे. शेतकऱ्यांनीही सरकारशी चर्चा करून संप मागे घ्यावा. कर्जमुक्ती करून शेतकऱ्यांना दुष्टचक्रातून बाहेर काढू’ असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. विभागीय आयुक्तालय येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्याचे वनक्षेत्र वाढवण्यासाठी वन विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. अत्यल्प वनक्षेत्र असलेल्या मराठवाडा विभागात यावर्षी ७४ लाख १५ हजार रोपे लावण्याचे नियोजन आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. महसूल व वन अधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केले. राज्यात शेतकरी संप चिघळल्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. ‘शेतकरी संपावर जाणे आणि आई संपावर जाणे सारखेच आहे. सरकार संपावर गांभीर्याने विचार करीत आहे. शेतकऱ्यांनीही संप मागे घेऊन चर्चा करावी. आघाडी सरकारच्या मागील १५ वर्षांच्या काळात शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले आहेत. शेतकऱ्याला कर्जमाफी नव्हे तर संपूर्ण कर्जमुक्ती देऊन कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. राज्य सरकार शेतकऱ्याला संपन्न करण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहे. मागील सरकारने कर्जमाफी देऊनही त्यांचे प्रश्न सुटले नाहीत. उलट भर पडल्यामुळे सरकार अभ्यासपूर्वक प्रश्न सोडवणार आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या सोडवण्याचे आश्वासन दिले असून संप टाळण्याचा सल्ला दिला आहे’ असे मुनगंटीवार म्हणाले. या पत्रकार परिषदेला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, वन विभागाचे मुख्य सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर उपस्थित होते.

वृक्ष लागवडीचे नियोजन

‘यंदा राज्यात चार कोटी झाडे लावली जाणार आहेत. मराठवाड्यात ७४ लाख १५ हजार झाडे लावली जाणार आहेत. गेल्यावर्षी लावलेल्या झाडांपैकी ८२ टक्के झाडे जगली असून १८ टक्के झाडे जळाली आहेत’ अशी माहिती वनमंत्री मुनगंटीवार यांनी दिली. सध्या मराठवाड्याचे वनक्षेत्र अ‍वघे ४.८२ टक्के असून लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात कमी वनक्षेत्र आहे. यंदा ग्रीन आर्मी आणि इको बटालियनच्या माध्यमातून वृक्ष लागवड केली जाणार आहे. खुलताबाद परिसरात शंभर हेक्टरवर इको बटालियन वृक्ष लागवड करणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे. तसेच शासकीय जमीन परिसरात वृक्ष लागवड करण्यात येईल, अशी घोषणा मुनगंटीवार यांनी केली.

शिवसेनेचे काय ?

शेतकरी संपाला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. काही ठिकाणी आंदोलन करण्यात शिवसेनेचे कार्यकर्ते आघाडीवर आहेत. मात्र, याबाबत बोलण्यास मुनगंटीवार यांनी नकार दिला. ‘भाजप व सेना सत्तेत असून आम्ही एकत्रितपणे संपाबाबत निर्णय घेऊ. शिवसेनेच्या भूमिकेबाबत अधिक काही बोलणार नाही’ असे मुनगंटीवार म्हणाले. कर्जमुक्ती केल्यानंतर शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढ‍ण्यावर सरकार भर देत असल्याची माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणावर चाकू हल्ला; तिघांना अटक, कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एका तरुणाला गंभीर मारहाण करून चाकूहल्ला करणाऱ्या तिघांना गुरुवारी अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर केले असता शनिवारपर्यंत (३ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. जी. एम. शेख यांनी दिले.
याप्रकरणी सय्यद अखीब अली पिती राऊफअल्ली (वय २२, रा. मंजूरपुरा, औरंगाबाद) याने सिटी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ३० मेच्या रात्री ११ वाजता फैसल मोहम्मदी सलीम महोम्मदी (वय १९, रा. दिल्लीगेट, औरंगाबाद) याचा फोन फिरासत याच्या मोबाइलवर आला होता. फिर्यादीने फिरासत याच्या हातातून मोबाइल बोलण्यासाठी घेतला होता. दुसऱ्या दिवशी ३१ मे रोजी पहाटे साडेपाचला पुन्हा फिर्यादीला फैसल याने फोन करून शिविगाळ करीत धमक्या दिल्या होत्या. त्याच दिवशी रात्री साडेदहाच्या सुमारास फैसल याच्यासह सय्यद इम्रान उर्फ सोनू अहेमद कादरी सय्यद रफिक कादरी (वय २२, रा. बुढ्ढीलेन, औरंगाबाद) व लईक अन्सारी रफिक अन्सारी (वय २०, रा. बुढ्ढीलेन) यांनी फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण व चाकुहल्ला केला. फिर्यादीला मित्रांनी रक्तबंबाळ अवस्थेत घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याप्रकरणी तिघांविरुद्ध कलम ३०७, ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तिघांना गुरुवारी अटक करून सय्यद इम्रानच्या खिशातून चाकू जप्त केला.

हल्ल्यामागचे कारण अज्ञात
याप्रकरणातील तिघांना कोर्टात हजर केले असता गुन्ह्यामागचे नेमके खरे कारण काय आहे, हल्ला करण्यासाठी कोणी प्रोत्साहन दिले, आणखी इतरांचा सहभाग आहे का, भांडण नेमके कोणत्या कारणामुळे झाले याचा तपास करायचा आहे, असे सांगण्यात आले. तिघा आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील योगेश शिवाजीरारव तुपे यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपींना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांच्या संपाला शिवसेनेचा नैतिक पाठिंबा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शेतकऱ्यांच्या संपाला नैतिक पाठिंबा देण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. संपाच्या काळात शेतकऱ्यांना अडचणी आल्या, तर त्यांना शिवसेना मदत करेल. संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन मजबूत असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊ, असे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सांगितले.
कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी गुरुवारपासून संप सुरू केला आहे. त्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. गुरुवार-शुक्रवार असे दोन्हीही दिवस या संपामध्ये शेतकऱ्यांच्या बरोबर शिवसेनाही सहभागी झाल्याचे चित्र आहे. या संदर्भात अंबादास दानवे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या संपाला शिवसेनेचा नैतिक पाठिंबा आहे. संपाच्या काळात शेतकऱ्यांना अडचणी आल्या, तर आम्ही मदत करीत आहोत. मदत करण्याच्या भूमिकेतूनच काल आम्ही जाधववाडी येथील मोढ्यात गेलो होतो. आज देखील सकाळी जाधववाडीत जाऊन परिस्थितीचा अंदाज घेतला. व्यापाऱ्यांकडून शेतकरी भरडला जाणार नाही, त्याचे नुकसान होणार नाही, व्यापारी किंवा समाजाच्या अन्य घटकाकडून त्याला त्रास होणार नाही याची काळजी शिवसेना घेणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या संपासंदर्भात अशीच भूमिका घेण्यात आली असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. गुरुवारी गंगापूरला तर शुक्रवारी वैजापूरला भेट देवून संपाचा आढावा घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images