Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​ ३१,७५१ थकबाकीदारांचा वीज पुरवठा तोडला

$
0
0

३१,७५१ थकबाकीदारांचा वीज पुरवठा तोडला

औरंगाबाद, जालना जिल्ह्यात कारवाई

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः

थकबाकीदारांविरोधात महावितरणने २ मे ते १ जून या कालावधीत केलेल्या कारवाईत ३१,७५१ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित तोडण्यात आला. त्यांच्याकडे २८ कोटी ३१ लाख ५६ हजार रुपये थकबाकी होती. तर वारंवार नोटीस देऊनही दाद न देणाऱ्या ६९६ ग्राहकांचा वीज पुरवठा कायमसाठी तोडण्यात आला. त्यांच्याकडे १ कोटी १५ लाख ६ हजार रुपये थकबाकी आहे.

महावितरणच्या या कारवाईत ३४,५०२ वीज ग्राहकांकडून १४ कोटी ६६ लाख ३७ हजार रुपये वीजबिलापोटी वसूल करण्यात आले. याच कारवाईत सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या १३१५ वीज जोडण्यांचा वीज पुरवठा ३१ कोटी ६७ लाख ९१ हजार रुपये थकबाकीसाठी खंडित करण्यात आला. तर ९२ पाणी पुरवठा योजनांकडून २६ लाख पाच हजार रुपये वसूल करण्यात आले.

औरंगाबाद शहर मंडल अंतर्गत वीज बिले न भरणाऱ्या १३७१७ ग्राहकांचा ११ कोटी ७० लाख चार हजार रुपये थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला. तर १७,००० ग्राहकांकडून ८ कोटी ६५ लाख ८२ हजार रुपये वीज बिलापोटी वसूल करण्यात आले. वारंवार सूचना, नोटीस बजावूनही दखल न घेणाऱ्या १४३ ग्राहकांचा ५८ लाख ४१ हजार रुपये थकबाकीसाठी वीज पुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला.

औरंगाबाद ग्रामीण मंडल अंतर्गत वीज बिले न भरणाऱ्या ५८९८ ग्राहकांचा ३ कोटी १३ लाख ९० हजार रुपये थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला. तर ४९० ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित केला. त्याचवेळी ८९०३ ग्राहकांकडून ३ कोटी ११ लाख ५६ हजार रुपये वीज बिलापोटी वसुली करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्यापाऱ्यांच्या पाठिंब्यासाठी संपकरी जाधववाडीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कर्जमाफीसह अन्य मागण्यासाठी पुकारलेल्या संपाला पाठिंबा मिळावा, यासाठी काही संपकरी शेतकऱ्यांनी शुक्रवारी जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी, नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान, शेतकऱ्यांना गुरुवारी झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी जाधववाडीत जाऊन शेतकऱ्यांना त्रास दिला तर याद राखा, असा इशारा दिला. यावेळी काही व्यापारी व शिवसैनिकांत वाद झाला.
जाधववाडी येथील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये आंदोलक सकाळी साडेसात वाजता दाखल झाले. त्यांनी शेतकरी किती अडचणीत सापडला आहे, संप का करावा लागत आहे, याची माहिती देत व्यापारी, किरकोळ विक्रेत्यांचा संपाला पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला. येथे गुरुवारी शेतकऱ्यांना मारहाणीचा घडला होता. तसाच प्रकार पुन्हा होऊ नये, म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे व शिवसैनिकांनी फेरी मारली. त्यांनी शेतकऱ्यांच्या संपास पाठिंबा द्या, सहभागी व्हावा, असे आवाहन केले. त्यांनी शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, असा इशारा व्यापाऱ्यांना दिला. याप्रसंगी काही व्यापारी व पदाधिकारी यांच्यात शब्दिक चकमक झडली. कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेरूळचा बाजार बंद; बाजारसावंगीत भरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे शुक्रवारी वेरूळ येथील आठवडीबाजार भरला नाही. ज्या शेतकऱ्यांनी बाजारात विकण्यासाठी कांदा आणला होता, तो औरंगाबाद-धुळे महामार्गावर टाकून सरकारचा निषेध करण्यात आला.
शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी तालुक्यात तीव्रता जाणवत आहे. खुलताबाद शहरात भाजीपाला व फळांची टंचाई निर्माण झाली आहे. बाजारसावंगी येथील आठवडीबाजाराला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मागण्या मान्य झाल्याशिवाय दूध,भाजीपाला विकायचा नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे शहरात व तालुक्यात दूध आणि भाजीपाल्याची टंचाई निर्माण झाली आहे. खुलताबाद येथील दररोज भरणाऱ्या रमजानच्या बाजारात भाजीपाला आणि फळफळावळ यांची टंचाई निर्माण झाली आहे. ताजा भाजीपाला नसल्याने व्यापारी उरलेला भाजीपाला विकत आहेत. गोळेगाव येथील शेतकऱ्यांनी आजही खवा तयार केला.

उद्या रास्ता रोको
संपूर्ण कर्जमाफीसाठी ५ जून रोजी काटशिवरी फाटा येथे सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात सर्व शेतकऱ्यांनी मोठ्यासंख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूर जिल्ह्यात रास्ता रोको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या संपाने दुसया दिवशी रौद्र रुप धारण केले. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी रस्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे लातूर-निलंगा रस्त्यावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. यामुळे लग्नाचे वऱ्हाड अडकून पडले होते. त्यासोबतच शुक्रवारी सकाळी बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या दुधाच्या गाडीमधील कॅन आंदोलकांनी रस्त्यावर ओतून दिले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुधाचे नुकसान झाले, तर भाजी मार्केटमध्ये आलेल्या तुरळक भाज्याचे दर वधारले होते.
लातूर-निलंगा रस्त्यावरील औसा टी पॉईंटवर शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे सुमारे दोन तास या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. रास्ता रोकोमुळे लग्नाचे वऱ्हाडही अडकून पडले होते. औशात ताताडीने तूर खरेदी करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.
लातूर शहरातील रयतु बाजारच्या परिसरातील फळ विक्रेत्यांनी दुकाने बंद करावेत या साठी दहा ते पंधरा जणाच्या एका टोळ्क्याने फळ विक्रेत्याकडील टरबुज, आंबे, द्राक्ष रस्त्यावर फेकून देऊन दुकाने बंद पाडली. पोलिस त्या ठिकाणी पोहचल्यानंतर ते टोळके पळून गेले. या घटनेनंतर भीतीमुळे अनेक फळ विक्रेत्यांनी दिवसभर दुकाने बंद ठेवली होती.
शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी लातूरातील बियाणे, शेती विषयक खते औषधे विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप सोनवणे यांनी दिली.
शेतकऱ्यांनी भुलथापांना बळी न पडता मुख्यमंत्री फडणवीस चर्चेला तयार आहेत. त्यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांनी संप मिटवावा असे आवाहन लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केले आहे.


उस्मानाबादमध्ये आज बंद
उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकरी संपाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विविध सामाजीक संघटनेने शनिवारी उस्मानाबाद बंदची हाक दिली आहे. बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला संमिश्र प्रतिसाद लाभला. जिल्ह्यात काही ठिकाणी आंदोलने करून शेतकऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. नांदेड, जालना व परभणी जिल्ह्यातील शेतकरी संपात सहभागी झाले आहेत. त्याचा परिणाम भाजी व दूध विक्रीवर झाला असून त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरणी ठरणार जलसाक्षरतेसाठी मॉडेल गाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
उस्मानाबाद तालुक्यातील आरणी गावाचा उल्लेख ऊस क्षेत्रासाठी व उत्पादकतेसाठी नावाजलेले गाव म्हणून केला जात होता. मात्र, गेल्या तीन-चार वर्षातील आवर्षण व दुष्काळीस्थितीमुळे पाण्यासाठी गावाची अवस्था दैयनीय झाली होती. परंतु, ‘राव न करी ते गाव करी’ या म्हणीप्रमाणे आरणी ग्रामस्थांनी राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानाला हाताशी धरून नामशेष होणाच्या मार्गावर असलेले ऊस उत्पादकतेची ओळख पुन्हा अबाधित ठेवली. त्याशिवाय जलसाक्षरतेसाठी आरणी हे गाव राज्यात मॉडेल म्हणून ओळखले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राज्य सरकारकडून ‘जलयुक्त शिवार अभियान-२०१५-१९’ ही योजना कार्यान्वित केली. जलयुक्त शिवार अभियानासाठी २०१७ साली आरणी या गावाची राज्य सरकारकडून निवड केली. जलयुक्त शिवार आरणी येथे गावातील लोकवाटा व राष्ट्रसंत भय्यु महाराज इंदौर यांच्या सूर्योदय परिवार या सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने ४.५ किलो मीटरच्या नाला सरळीकरण व शेततळ्यांचे काम पूर्ण झाले. जलयुक्त शिवार अभियानातंर्गत आरणी शिवारात सिमेंट नाले, सिमेंट बांध, बंधारे यांचे खोलीकरण करण्यात आले. त्याशिवाय याच योजनेतंर्गत आरणी शिवारात १४ शेततळी पूर्ण झाली असून ६ शेततळ्यांचे काम प्रगतीपथावर सुरू आहेत.
आरणी गावाच्या समृध्दीसाठी आणि शाश्वत जलसंवर्धनासाठी गावातील युवकांनी एकत्र येऊन ‘हरितक्रांती करुया, मिळून सारे जलक्रांती करुया’ अशा घोषवाक्यासह जलयुक्त शिवार अभियान आरणी नावाची एक समिती स्थापन केली. या समितीच्या माध्यमातून गावातील प्रत्येक स्थरातील नागरिक व शेतकरी जागृत करून त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी या समितीच्या माध्यमातून युवकांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून गावात केले. यासाठी गावात प्रभात फेरी, रॅली, बैठका, दवंडी, ग्रामसभा, चर्चासत्रे, चावडी बैठकांच्या माध्यमातून गावातील नागरिकांचे मत परिवर्तन करून या कामी सहभाग वाढविण्याचे काम केले गेले.
या कामासाठी लागणारी यंत्रणा म्हणजे खोदकाम करण्यासाठी लागणारे पोकलेन व अन्य यंत्रणा राष्ट्रसंत भैय्यू महाराज इंदौर यांच्या सूर्योदय परिवार उपलब्ध करुन दिल्या. जलयुक्त शिवारच्या कामाममुळे नाल्यांच्या दोन्ही बाजूला असलेल्या अनेक झाडांची कत्तल करावी लागली. परंतु झालेली झाडांची कत्तल ही नुकसानकारक असली तरी या भागातील नाल्यांच्या सरळीकरण आणि खोलीकरणामुळे या परिसरात शाश्वत जलसंचय उपलब्ध होणार होता. परंतु वृक्षांच्या हानीची भरपाई
करण्यासाठी सूर्योदय परिवार व जलयुक्त शिवार अभियान समिती आरणी यांच्या वतीने ४.५ किलो मीटर अंतराच्या निर्माण झालेल्या नाल्यांना परिपूर्णपणे शाश्वत ठेवण्यासाठी या नाल्यांच्या दोन्ही बाजूने प्रति किलो मीटर १००० झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार या नाल्यांची बांधणी ही अतिशय कणखर व स्थायी स्वरुपाची होऊन वृक्षसंवर्धना बरोबरच शेतीपुरक वनराई उपलब्ध करण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या या संकल्पानुसार या परिसरात कमी पाणी शोषणारी आणि उत्पादक जसे की जांभुळ, पेरू, कडूलिंब, शेवगा, व अन्य उंच वाढणारे फळझाडे लावण्याचा संकल्प केला आहे.

लोकवाट्यातून तब्बल १० लाख रुपयांचे योगदान
आरणी परिसरात निर्माण करण्यात आलेल्या या नाल्यामुळे २०१७ च्या झालेल्या समाधानकारक पावसामुळे अनेक सापेक्ष परिणाम दिसून येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याशिवारातील जवळपास सर्वच विहिरींचा जलस्थर येत्या पावसाळ्यात उंचावणार असल्याची खात्री अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाल्याच्या निर्माणा नंतर गाव टँकरमुक्त, शेतकरी आत्महत्यामुक्त, विंधन विहीर मुक्त (बोअरमुक्त) गाव म्हणून नावारुपास येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. गावातील सर्वस्तरातील नागरिकांनी लोकवाट्यातून तब्बल १० लाख रुपयांचे योगदान दिले. या गावातील लोकांची जलयुक्त शिवार व गावात जलक्रांती व हरितक्रांती देण्यासाठीची तळमळ पाहून आमदार मधुकरराव चव्हाण यांनी ३ लाख लाखांचा निधी दिला.

टँकरमुक्त गाव कायम राहणार
आरणीला पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून जवळपास ५-१० टँकरची व्यवस्था करावी लागली होती. परंतु जलयुक्त शिवारच्या या यशस्वीतेमुळे येत्या काळात एकाही टँकरची गरज भासणार नाही. त्यामुळे हे गाव टँकरमुक्त गाव म्हणून ओळखले जाईल असा विश्वास तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विस्ताराची स्वप्नपूर्ती!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
फुलांच्या माळांनी सजलेली आणि निळ्या रंगाच्या इंजिनने नटलेली दिमाखदार जालना-शिर्डी शटल रेल्वेला शनिवारी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी परळी येथून व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखविताच ती शिर्डीसह साईनगरकडे धावली. या फेरीत दीडशेपेक्षा जास्त प्रवाशांनी मनमाड गाठले.
जालना-नगरसोल रेल्वेचा शिर्डीपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. तसेच परळी-अहमदनगर या रेल्वे मार्गाचे उद्घाटन प्रभू यांनी शनिवारी केले. नांदेड विभागातील दोन लिफ्ट, तिसरी पिटलाइन, नांदेड ते पुणे द्विसाप्ताहिक रेल्वेचे सहा डबे वाढविणे, औरंगाबाद येथील सुविधांचे उद्घाटन, मुकुंदवाडी आरक्षण कार्यालयाचे उद्घाटन, दौंड-भायवान विद्युतीकरण, मोहोल-वाकाऊ दुहेरी रेल्वे मार्ग, अक्कलकोट - तिलाटी दुहेरी रेल्वे मार्ग, सोलापूर रेल्वे स्टेशन, परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन याशिवाय अहमदनगर रेल्वे स्टेशनच्या परिसरातील विविध विकास कामांचे उद्घाटन प्रभू यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे परळी येथूनच करण्यात आले.
औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर आयोजित कार्यक्रमात महापौर भगवान घडमोडे, आमदार संजय शिरसाट, नगरसेवक रेणुकादास वैद्य, डीआरएम डॉ. ए. के. सिन्हा, डीआरयुसीचे सदस्य नंदकुमार घोडेले, मराठवाडा रेल्वे विकास समितीचे ओमप्रकाश वर्मा, स्वातंत्र्यसैनिक ताराबाई लड्डा यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
जालना-नगरसोल डेमोचा शिर्डीपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. रेल्वे लोको पायलट दीपककुमार आणि गार्ड शेख पाशा यांनी आज ही गाडी शिर्डीकडे नेली. आठ डब्यांची ही शटल रेल्वे आता जालना, औरंगाबाद मार्गे अंकाई, मनमाड, कोपरगाव, शिर्डी साईनगरपर्यंत धावणार आहे.

आठवड्यातून तीन दिवस
‘जालना-औरंगाबाद-शिर्डी-साईनगर गाडी आठवड्यातून तीन दिवस सोमवार, मंगळवार आणि गुरुवारी धावेल. आगामी काळात ती नियमित करण्यात येईल,’ अशी माहिती ‌रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. ए. के. सिन्हा यांनी दिली.

प्रवाशांची फरफट
औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरील उद्घाटन कार्यक्रम फलाट क्रमांक एकवर ठेवण्यात आला होता. फलाट क्रमांक एकवर कार्यक्रम सुरू झाला. त्यामुळे येथे शिर्डीकडे रवाना होणारी गाडी रेल्वे उभी होती. त्यामुळे इतर महत्वाच्या रेल्वे फलाट क्रमांक दोन आणि तीन येथे आणाव्या लागल्या. या ऐनवेळच्या बदलाने प्रवाशांची तारांबळ उडाली.

...पुन्हा जुना रॅक
उद्घाटन कार्यक्रमासाठी विजयवाडाहून विशेष डेमू रॅक पाठविण्यात आला होता. जालना-नगरसोल मार्गावर चालणारी रेल्वे दुरुस्तीसाठी मौला अलीला पाठविण्यात आली आहे. यामुळे उद्घाटन सोहळ्यासाठी नवीन रेल्वे रॅक आणण्यात आला आहे. काही दिवसांनी किंवा एक किंवा दोन दिवसात जुन्या रेल्वे रॅकमधून जालना ते शिर्डीचा प्रवास होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर टक्के दान पावले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. औरंगाबादमधील १४ शाळांतून दोन हजार विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. बहुतांश शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून १० कम्युलेटिव्ह ग्रेड पॉइंट अॅव्हरेज (सीजीपीए) मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे.
दहावीच्या परीक्षेला देशभरातून साडेसोळा लाख विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ९० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नऊ मार्च ते २२ एप्रिल दरम्यान ही परीक्षा घेण्यात आली. निकालात औरंगाबादच्या विद्यार्थ्यांनी दबदबा कायम ठेवला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी १० सीजीपीए श्रेणीत गुण मिळविले आहेत. शहरातील १४ शाळांचा निकाल जवळपास शंभर टक्के लागला आहे. टेंडर केअर होम शाळेतील ४१ विद्यार्थ्यांनी १ ग्रेड मिळविला आहे. शाळेतून मान धोपटे हिने प्रथम क्रमांक मिळविला. सलोनी धोपटे हिने सामाजिकशास्त्र विषयात १०० टक्के गुण, तर शांभवी भुरे हिला गणितात शंभर गुण मिळाले. जैन इंटरनॅशनल स्कूलच्या २३ विद्यार्थ्यांनी १० सीजीपीए मिळविला. शाळेतून तोषित पाटील याने प्रथम क्रमांक मिळविला. त्याला ९९.२० टक्के गुण आहेत. पोदार इंटरनॅशनलचे २९ विद्यार्थ्यांनी १० सीजीपीए मिळविला आहे. शाळेची रिया पाठे हिने ९९ टक्के गुण मिळविले. ज्ञानदा इंग्लिश स्कूलच्या नऊ विद्यार्थ्यांना १० सीजीपीए मिळाले.

जुना ‘पॅर्टन’ची शेवटची बॅच
सीबीएसई २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून नवा पॅर्टन आणत आहे. जुन्या पॅर्टनप्रमाणे परीक्षा देणारी ही शेवटीच बॅच होती. त्यामुळे विद्यार्थी, पालकांसह शाळा व्यवस्थापनामध्ये उत्सुकता होती. सध्या सीबीएसईच्या शाळांमध्ये ६०/४० चा पॅर्टन राबविला जातो. ४० टक्के बोर्डाचे तर ६० टक्के शाळांमध्ये अंतर्गत गुण असतात. यात आता बदल करण्यात आला आहे.

आनंदी आनंद गडे...
- १६ लाख ५० हजार एकूण विद्यार्थी
- १४ शाळा औरंगाबादमधील
- २,००० विद्यार्थी उत्तीर्ण
- १० सीजीपीए मिळविणारे लक्षणीय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ...सुखाच्या सरी!

$
0
0


औरंगाबादः जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित असलेला पाऊस अखेरीस शनिवारी कोसळला. दुपारी ढगाळ वातावरण तयार झाल्यानंतर सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. शहरात सर्वदूर पाऊस झाला असून येत्या दोन दिवसात पाऊस आणखी सक्रिय होण्याची शक्यता आहे. पडेगाव, सिडको, विद्यापीठ, सातारा या भागात सायंकाळी जोरदार पाऊस झाल्यामुळे काही वेळ वीज पुरवठा खंडीत झाला. दरम्यान, ‘मान्सून अजूनही सक्रिय झालेला नाही. मान्सूनची प्रगती गेल्या १०८ तासांपासून एकाच ठिकाणी स्थिरावली आहे. केरळच्या दक्षिण मध्य प्रदेशापर्यंत मजल मारली असून फक्त पूर्वोत्तर प्रदेशात थोडी प्रगती झाली आहे’ असे हवामान तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.

चार गुरे दगावली
कन्नडः तालुक्यातील काही भागात विजेच्या गडगडाटासह झालेल्या पावसात वीज पडून चार गुरे दगावली, तर एक जण जखमी झाला. मुंडवाडी येथे दुपारी दोनच्या सुमारास वादळी वारे व विजेच्या गडगडाटासह पाऊस झाला. प्रकाश भिकन बारगळ यांच्या शेतात वीज कोसळून एक गाय, एक बैल व एक वासरू दगावले. तर दुसऱ्या घटनेत घाटशेंद्रा येथे दुपारी अडीचच्या सुमारास कृष्णा पुंडलिक तारू यांच्या शेतात वीज पडून एक बैल दगावला. तर गणेशपूर येथील रवींद्र अशोक सोळंके वीज पडून जखमी झाले. त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. चिंचोली लिंबाजी, घाटशेंद्रा, गणेशपूर परिसरात दुपारी वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला.

पावसामुळे घरात पाणी
शनिवारी दुपारी अचानक झालेल्या पावसामुळे खुलताबाद शहरात सर्वत्र दाणादाण उडाली. लहानीआळी भागातील दादाराव वरपे यांच्या घरात गटारीचे पाणी शिरले. त्यामुळे घरातील गहू, ज्वारी, तूर, डाळी, अन्नधान्य व संसार उपयोगी वस्तू भिजल्याने मोठे नुकसान झाले. पावसामुळे वीजगुल झाली. पावसाळ्यापूर्वी गटारीच्या साफसफाईचे काम न झाल्याने नगरपालिकेचे पितळ उघडे पडले. घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. चुली पाण्यात बुडाल्याने रात्री जेवण कोठे करायचे, असा प्रश्न वरपे कुटुंबियांना पडला होता. उपनगराध्यक्ष सुरेश मरकड यांनी तातडीने नगरपालिका कर्मचार्‍यांना बोलावून कानउघाडणी करत नालेसफाई करण्याचे आदेश दिले. परिसराला दमदार पावसाने सुमारे दोन तास झोडपून काढले. शनिवारी भद्रा मारुती मंदिर परिसरातील बाजार असल्याने बाजारपेठेत व्यावसायिकांसह ग्राहकांची एकच तारांबळ उडाली. फळ व भाजीपाल्यांचे भाव कमी करून व्यावसायिकांनी आपल्या जवळील माल संपविण्याचा प्रयत्न केला.

नदी खळाळली
खुलताबादः पावसाने दमदार हजेरी लावल्याने शनिवारी खुलताबाद तालुक्यातील घोडेगाव नदी खळाळली. परिसरात अनेक ठिकाणी विजेच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. वरुणराजाच्या आगमनाने शेतकरी सुखावला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दाशरथी यांचा ग्लोबल महाराष्ट्रीयनने गौरव

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र मंडळ लंडन यांच्यावतीने आयोजित तीन दिवस चालणाऱ्या लंडन महाराष्ट्र संमेलनाची सुरुवात शनिवारी झाली. इंग्लंडची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या कॅनरी व्हार्फ येथील वन कॅनडा स्क्वेअर च्या ३९ व्या मजल्यावर झालेल्या दिमाखदार सोहळ्यात औरंगाबाद येथील उद्योगपती उमेश दाशरथी यांना ‘ग्लोबल महाराष्ट्रीयन आंत्रप्रेनुअर’ या पुरस्काराचे सुवर्णविजेते घोषित करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमास ब्रिटिश संसदेतील हाऊस ऑफ लॉर्डसचे ज्येष्ठ सदस्य लॉर्ड डोलर पोपत, नॅसडॅकचे वरिष्ठ उपाध्यक्ष सलील ढोके व ब्रिटिश उद्योग मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लॉर्ड डोलर यांनी भारत-ब्रिटन संबंधांचे बदलत्या परिस्थितीतील महत्व विषद केले. ब्रिटनस्थित भारतीयांच्या देशाच्या विकासातील योगदानाचे कौतुक करून ब्रेक्झिटमुळे भारताला उपलब्ध होऊ शकणाऱ्या संधींचा उपयोग करून घेण्याचे आवाहन केले.
उमेश दाशरथी यांनी बोलताना या आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या कठीण निकषांवर उतरतांना आलेले अनुभव विषद केले. या पुरस्काराचा गौरव अजून वाढेल, असे कार्य भविष्यात करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. थायलंडचे मराठी उद्योजक एस. नाबर यांना रजत विजेते घोषित करण्यात आले. एस. बी. गांगुर्डे, रोहन नागरे, विलास शिंदे, प्रसाद भिडे यांनाही या प्रसंगी सन्मानित करण्यात आले.
जागतिक अर्थ आणि उद्योगविषयक विविध परिसंवादांनी हा सोहळा गाजला. विविध भारतीय व ब्रिटिश अर्थतज्ज्ञ, उद्योगपती, चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी यात सहभागी झाले. तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करताना त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय, जागतिक अर्थव्यवथेत भारत व ब्रिटन यांचे स्थान आदी विषयांवर तज्ज्ञांनी आपली मते नोंदवली. याप्रसंगी लंडन महाराष्ट्रीयन मंडळाचे अध्यक्ष दिलीप आमडेकर, सुशील रापतवार, वैशाली मंत्री, कॅमलिनचे श्रीराम दांडेकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे शंतनू भडकमकर, पितांबरीचे रवींद्र प्रभूदेसाई व अनेक लंडनस्थित मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ नांदेड विभाग ‘मध्य’ला जोडण्याची मागणी योग्य

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘दक्षिण मध्य रेल्वेचा नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडण्यासंदर्भाची मागणी योग्य आहे. त्याचा वरिष्ठ पातळीवर विचार करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल,’ असे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले.
प्रभू रेल्वेच्या विविध कामांच्या उद्‍घाटनानिमित्त औरंगाबादेत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार अतुल सावे, महापौर भगवान घडमोडे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, शिरीष बोराळकर, गजानन बारवाल आदी यावेळी उपस्थित होते. प्रभू म्हणाले, ‘गेल्या तीन वर्षांत रेल्वेच्या विकासकामांना मोठ्या प्रमाणावर चालना दिली गेली. देशभरात तीन लाख ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. पूर्वी वर्षभरात ३५ हजार कोटींची गुंतवणूक केली जात होती. ती क्षमता आम्ही वाढविली आहे. मोठ्या प्रमाणावर वीजेचीही बचत केली जाणार आहे. रेल्वेचे जाळे वाढविण्यासाठीही अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. मराठवाड्यात रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. निधीची कुठेही अडचण नाही. रेल्वेचे जाळे वाढविण्याच्या अहवालप्राप्तीनंतर पुढील निर्णय घेतले जातील. मराठवाड्यातील रेल्वेचे जाळे वाढविण्यासाठी एकात्मिक योजना तयार करण्यात येणार आहे. राज्य सरकार आणि रेल्वे विभागाने एकत्र येऊन संयुक्त कंपनी स्थापन केली आहे. त्याच्या माध्यमातून रेल्वेसाठीच्या वस्तूंचे उत्पादन केले जाणार आहे. मेक इन इंडियाची ही कल्पना चांगली आहे. त्यातून राज्याच्या विकासालाही मोठा हातभार लागणार आहे,’ असे त्यांनी नमूद केले.
धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कन्नडजवळच्या औट्रम घाटातील बोगद्यातून रेल्वेमार्ग नेण्यासंदर्भात विचारले असता प्रभू म्हणाले, ‘यासंदर्भात अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाईल. जर बोगद्यातून रस्त्यालगत रेल्वे ट्रॅक टाकणे योग्य असेल तर त्याचा निश्चितच फायदा होईल. माळीवाडा ते औट्रम घाट असा रेल्वेमार्ग केला तर औरंगाबादकरांना मनमाडऐवजी थेट धुळे ट्रॅकला जोडता येईल.’ यासंदर्भात निवेदन रेल्वेखात्याकडे पाठविल्याचे सांगतिल्यानंतर प्रभू म्हणाले, ‘त्याची माहिती घेऊन पुढील निर्णय घेऊ. रेल्वेच्या आयआरसीटीसी कंपनीच्या माध्यमातून टुरिझम सर्किट उभे करण्यात येतील, त्यात औरंगाबादचा समावेश आहे,’ असे प्रभू यांनी सांगितले.

पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शहरातील उद्योजक, व्यापाऱ्यांशी संवाद साधला. त्यात केंद्र सरकारच्या तीन वर्षांच्या कामांची माहिती त्यांनी दिली. रेल्वेच्या कामाविषयी माहिती देताना सांगितले, की १६५०० किलोमीटरचा मार्ग दुहेरी करण्यात येणार आहे. देशभरात ४२ टक्के विद्युतीकरण केले जाईल. मीटरगेटचे ब्रॉडगेज करण्यासहही मान्यता दिली गेली आहे. रेल्वेच्या विकासात पायाभूत सुविधांचे अनन्यसाधारण महत्व आहे. पायाभूत सुविधा वाढविल्या की अडचणी राहत नसतात. त्याचे पालन आमचे सरकार करत आहे. रेल्वेच्या कामात पारदर्शकता आणून गैरप्रकारांना बऱ्यापैकी आळा घातल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ स्थायी सभापतिपदी बारवाल

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदी भारतीय जनता पक्ष पुरस्कृत शहर विकास आघाडीचे गटनेते गजानन बारवाल यांची अपेक्षेप्रमाणे वर्णी लागली. शनिवारी झालेल्या निवडणुकीत त्यांनी एमआयएमचे अजीम अहेमद रफिक यांचा पराभव केला. बारवाल यांना ११, तर रफिक यांना चार मते मिळाली.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुकीच्या बैठकीला सुरुवात झाली. सभापतिपदासाठी गजानन बारवाल व अजीम अहेमद रफिक या दोघांचे उमेदवारी अर्ज होते. बैठक सुरू झाल्यावर दोघांच्याही उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. दोघांचेही अर्ज वैध ठरले. त्यानंतर हात उंचावून मतदान घेण्यात आले. स्थायी समितीमध्ये शिवसेनेचे सहा, भाजपचे तीन, भाजप पुरस्कृत शहर विकास आघाडीचे दोन, एमआयएमचे चार तर काँग्रेसच्या एका सदस्याचा समावेश आहे. हात उंचावून केलेल्या मतदानानंतर बारवाल यांना ११ मते मिळाल्याचे स्पष्ट झाले. अजीम अहेमद रफिक यांना चार मते मिळाली. काँग्रेसचे शेख सोहेल मतदानासाठी आलेच नाहीत. त्यामुळे स्थायी समितीच्या १६ पैकी १५ सदस्यांनीच मतदानात भाग घेतला.
बारवाल यांची सभापतिपदी निवड झाल्यावर त्यांच्या स्वागताला भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी, आमदार अतुल सावे, प्रशांत बंब, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, महापौर भगवान घडमोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, सभागृहनेता गजानन मनगटे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व नगरसेवक नंदकुमार घोडेले, शहरप्रमुख व नगरसेवक रेणुकादास (राजू) वैद्य, माजी सभापती मोहन मेघावाले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सेना नेत्यांनी पाठ फिरवली
बारवाल यांचे स्वागत करण्यासाठी शिवसेनेचा कोणताही मोठा नेता किंवा पदाधिकारी महापालिकेत आला नाही. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा पालिका वर्तुळात होती. बारवाल पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे. शिवसेनेने त्यांना महापौर केले, पण २०१५मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत शिवसेनेने त्यांना तिकीट नाकारले. त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली व शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून निवडून आले. निवडून आल्यावर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. या घटना घडामोडींमुळे शिवसेनेचे नेते, पदाधिकारी बारवाल यांचे स्वागत करण्यासाठी आले नसल्याचे बोलले जात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगीकरण हाच ‘समांतर’साठी पर्याय

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘शहरासाठी पाणी गरजेचे आहे. त्यासाठी समांतर जलवाहिनीचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. समांतर जलवाहिनीसाठी खासगीकरण हाच पर्याय आहे, कारण हा प्रकल्प पूर्ण करण्याची क्षमता महापालिकेत नाही,’ असा दावा स्थायी समितीचे नवनिर्वाचित सभापती गजानन बारवाल यांनी शनिवारी केला.
स्थायी समितीच्या सभापतिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बारवाल पत्रकरांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘शहराचा पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. त्यामुळे समांतर जलवाहिनीचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहे. पीपीपीतत्वावरील योजना आपण हद्दपार केली आहे. कंपनीबरोबरचा करार रद्द केला आहे. त्यामुळे त्याच कंपनीकडून काम करून घेता येणे शक्य होईल, असे वाटत नाही. समांतर जलवाहिनीचे काम स्वतंत्रपणे करण्याची क्षमता महापालिकेची नाही, कारण महापालिकेकडे तेवढे मनुष्यबळ नाही. त्यामुळे समांतर जलवाहिनीच्या कामासाठी खासगीकरणाशिवाय पर्याय नाही. शहराचा पाणीप्रश्न सुटला पाहिजे, नागरिकांना मुबलक पाणी मिळाले पाहिजे अशी आपली भूमिका आहे. नागरिकांना जोपर्यंत मुबलक पाणी मिळत नाही तोपर्यंत पाणीपट्टीत वाढ नको,’ अशीही आपली भूमिका आहे. शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी लक्ष घालणार आहे. नारेगावचा कचराडेपो हलवला गेला पाहिजे. शहरात चांगेल रस्ते झाले पाहिजेत. स्मार्टसिटी योजनेअंतर्गत आवश्यक ती कामे लवकरात लवकर सुरू व्हावीत, या प्रकल्पाअंतर्गत सिटीबस सेवा देखील सुरू व्हावी यासाठी आपण युध्दपातळीवर प्रयत्न करणार आहोत,’ असे ते म्हणाले.

राष्ट्रीय पक्षासोबत काम
बारवाल १९८८पासून नगरसेवक आहेत. युती सरकारच्या काळात १९९६मध्ये ते महापौर होते. शिवसेनेकडून मिळालेले महापौरपद व भाजपकडून मिळालेले सभापतिपद या बद्दल काय वाटते असा प्रश्न बारवाल यांना विचारला असता ते म्हणाले, ‘त्यावेळी मी शिवसेनेसारख्या राज्यस्तरीय पक्षासोबत होतो. शिवसेनाप्रमुखांनी महापौर होण्याचे आदेश अचानकपणे दिले व मी महापौर झालो. महापौरपद माझ्या स्वप्नातही नव्हते. शिवसेनाप्रमुखांमुळे ते मिळाले. आता मी राष्ट्रीय पक्षासोबत आहे. महापालिका, राज्य सरकार व केंद्र सरकारमध्ये आता एकाच पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे शहर विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा संकल्प आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार विषय समितींचे सभापती बिनविरोध

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या चार विषय समितींचे सभापती शनिवारी बिनविरोध निवडले गेले. महिला बालकल्याण समितीच्या सभापती, उपसभापतिपदासाठी निवडणूक झाली. सभापती म्हणून शिवसेनेच्या आशा भालेराव, तर उपसभापती म्हणून भाजपच्या ज्योती नाडे निवडून आल्या. त्यांनी एमआयएमच्या उमेदवाराचा पराभव केला.
महापालिकेत पाच विषय समित्या आहेत. त्यांच्या सभापतिपदासाठी शनिवारी निवडणूक घेण्यात आली. आरोग्य समितीच्या सभापतिपदी प्रेमलता दाभाडे, शहर सुधार समितीच्या सभापतिपदी ज्योती अभंग, शालेय समितीच्या सभापतिपदी शोभा बुरांडे तर समाज कल्याण समितीच्या सभापतिपदी खतीजा कुरैशी छोटू कुरैशी यांची बिनविरोध निवड झाली. महिला बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी शिवसेनेच्या आशा भालेराव यांनी तर एमआयएमच्या शेख समीना शेख इलियास यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भालेराव यांना सहा तर शेख समीना यांना दोन मते मिळाली. या निवडणुकीत भालेराव विजयी झाल्या. उपसभापतिपदासाठी भाजपच्या ज्योती नाडे यांना सहा, तर एमआयएमच्या रेशमा अशफाक कुरैशी यांना दोन मते मिळाली. उपसभापती म्हणून नाडे विजयी झाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्री, सूर्यवंशींविरोधात संताप

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शेतकरी संपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह अन्नदाता शेतकरी संघटनेचे नेते जयाजी सूर्यवंशी यांनी फूट पाडण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत संतप्त कार्यकर्त्यांनी या नेत्यांच्या प्रतिमेस शनिवारी क्रांती चौकात जोडा मारो आंदोलन करत निदर्शने केली.
मुख्यमंत्र्यांसमेवत झालेल्या बैठकीनंतर समाधान झाल्याने संप स्थगितीची घोषणा शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी पहाटे केली. मात्र, त्यावर अनेक संपकरी नाखुश झाले. संभाजी बिग्रेड, अखिल भारतीय छावा संघटना, छावा मराठा, शिवक्रांती युवा, शिवप्रहारसह अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही, तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. सूर्यवंशी यांना संप माघार घेण्याची घोषणा करण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवालही त्यांनी केला. यावेळी रमेश गायकवाड, रमेश केरे पाटील, राम भगुरे, अप्पासाहेब कुढेकर, डॉ. शिवानंद भानुसे, सचिन मिसाळ, राहुल बनसोड यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत संप सुरू राहील. संपात फूट पाडण्याचा जो प्रयत्न झाला. तो हाणून पाडला जाईल. आंदोलनाची दिशा पुढील दिशा ठरविण्यासाठी नाशिकला बैठक होणार असून त्यात एकमताने निर्णय घेऊ. - अप्पासाहेब कुढेकर, आंदोलनकर्ते

दूध पुरवठ्यावर परिणाम
संपाच्या सलग तिसऱ्या दिवशी शनिवारी दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. संप स्थगित किंवा नाही, याबाबत संभ्रम असल्याने शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार पेठेत पाठविला नाही. तुरळक आवक वगळता जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुकशुकाट होता. दुधाच्या संकलनातही नेहमीप्रमाणे वाढ नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

भाजीपाला कडाडला
मागणी जास्त व पुरवठा कमी अशी अवस्था निर्माण झाल्याने भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत. मेथी तसेच पालकाची एक जुडी १० ते १५ रुपये, टोमॅटो २० ते ४० रुपये किलो, बटाटे १५ ते ३०, कांदे १५ ते २० काकडी, २० ते ४० पत्ताकोबी २५ ते ३० रुपये किलोने विकली गेली. फळांचेही दर वाढले आहेत.

आज मूकमोर्चा
‘शेतकऱ्यांच्या संपास पाठिंबा म्हणून रविवारी सकाळी १० वाजता पैठणगेट येथून मूक मोर्चा काढण्यात येणार आहे,’ अशी माहिती शेतकरी आंदोलन समर्थन समितीचे देविदास कीर्तीशाही यांनी दिली. या आंदोलनास पाठिंबा म्हणून स्वराज अभियान, सीटू, आयटक, मराठवाडा लेबर युनियनसह विविध पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी स. भु. परिसरात प्रा. विजय दिवाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात शेतकरी आंदोलन समर्थन समितीची स्थापन करण्यात आली. सोमवारी शहागंज येथील गांधी पुतळा येथे सकाळी १० वाजेपासून उपोषण करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामविकासाचे स्वप्न पूर्ण करू

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासात माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे योगदान जनता कधीही विसरणार नाही. त्यांच्या स्वप्नातील ग्रामविकासासाठी संशोधन केंद्र कार्यरत राहील’ असे प्रतिपादन संशोधन केंद्राचे संचालक डॉ. सर्जेराव ठोंबरे यांनी केले. स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या स्मृतीदिनानिमित्त शनिवारी अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, वित्त व लेखाधिकारी डॉ. नंदकुमार राठी, डॉ. अजित थेटे, डॉ. गजानन सानप, डॉ. भीमराव भोसले, अधिष्ठाता डॉ. संजय साळुंके, डॉ. भगवान साखळे यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकनेते गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण समस्या संशोधन केंद्राच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ. सर्जेराव ठोंबरे म्हणाले, ‘हैदराबादेत ग्रामीण संशोधनाचे राष्ट्रीय केंद्र सुरू असून या धर्तीवर हे केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रातर्फे पदव्युत्तर आणि दहा पदविका अभ्यासक्रम चालविण्यात येणार आहेत. शिक्षण, संशोधन व प्रशिक्षणाचे कार्य सुरू आहे.’ तर डॉ. गजानन सानप यांनी मुंडे यांच्या कार्याला उजाळा दिला. ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी कुटुंबातून पुढे आले. उपमुख्यमंत्री व नंतर केंद्रात कृषीमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. संपूर्ण जीवन ऊसतोड मजूर, शेतकरी, कष्टकरी वर्गासाठी त्यांनी समर्पित केले. त्यांच्या नावाने सुरू होणारे केंद्र मराठवाडयाच्या ग्रामविकासात मोलाचे योगदान देईल’ असे सानप म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले. या कार्यक्रमासाठी भगवान फड, सोमीनाथ वाघ, डॉ. गणेश बडे, गणेश खरात यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘शेतकऱ्यांना सर्वांत मोठी कर्जमाफी’

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, बीड

शेतकऱ्यांच्या संपाविषयी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली आणि त्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय़ घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही तत्पर असून, राज्याच्या इतिहासातील सर्वांत मोठी कर्जमाफी देण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी परळी येथील गोपीनाथ गडावर केले. गेल्या सरकारने दिलेल्या कर्जमाफीपेक्षा दुपटीने कर्जमुक्ती देणार आहोत, असे त्यांनी या वेळी सांगितले.
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या पुण्यतिथी निमित्त वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शेतकरी संपाविषयी असणाऱ्या संभ्रमाविषयी ते म्हणाले, ‘ ‘शेतकऱ्यांसाठी आम्ही घेतलेल्या निर्णयाबाबत काही जण शंका उपस्थित करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न खितपत ठेवावयाचे आहेत. सरकारला अडचणीत आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतल्याने त्यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. त्यामुळे ते शेतकऱ्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील एकही शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहणार नाही, याबाबतचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत केली आहे.’ राज्यातील गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना या कर्जमुक्तीचा फायदा होणार आहे. मराठवाडा, विदर्भ, खान्देश, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील ८० टक्के शेतकऱ्यांना या कर्जमुक्तीचा लाभ होईल.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘आमचे मार्गदर्शक दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांनी राज्यातील दीन दुबळ्यांसाठी, गरीबांसाठी, मागासवर्गासाठी, ओबीसींसाठी, अल्पभूधारकांसाठी सातत्याने संघर्ष केला, त्यांना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्ने केले, त्यांचाच आदर्श घेऊन आमचे सरकार काम करीत आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीईटी’मध्ये ५० टक्के पार होईना

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बारावी परीक्षेत निकालाची टक्केवारी वाढली असताना मात्र, ‘एमएचटी-सीईटी’मध्ये तब्बल ९२ टक्के विद्यार्थी ५० टक्केही गुण मिळवू शकलेले नाहीत. मागील वर्षीच्या तुलनेत निकाल दोन टक्क्यांनी घसरला आहे.
राज्यातील अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटीचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. या निकालाची टक्केवारी मागच्यावर्षीपेक्षा घसरली आहे. बारावीचा निकाल वाढला असताना एमएचटी निकालात मात्र गुणांची घसरण झाली आहे. राज्यात ३ लाख ८९ हजार ५२० विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती. त्यापैकी दोन लाख ८४ हजार विद्यार्थ्यांनी ‘पीसीएम’ गटात परीक्षा दिली. त्यापैकी शंभर व त्यापेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या फक्त २३ हजार ७८ आहे. तर, दीडशेपेक्षा अधिक गुण असलेल्या या गटातील विद्यार्थ्यांची संख्या केवळ दोन हजार ८८९ आहे. औषधनिर्माणशास्त्रसाठीच्या ‘पीसीबी’ गटातही स्थिती वेगळी नाही. दोन लाख ३८ हजार ३६५ पैकी १२ हजार ७१२ विद्यार्थ्यांनी शंभरपेक्षा अधिक गुण मिळविले. तर, ५७३ विद्यार्थी दीडशेच्या पुढे गुण घेणारे आहेत.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी निकालात विज्ञान शाखेचा निकाल ९५.८५ टक्के आहे. त्याचवेळी सीईटीच्या निकालात घसरण झालेली आहे.

वेबसाइट हँग
सायंकाळी निकाल जाहीर झाला परंतु, काहीवेळ वेबसाइट हँग असल्याने विद्यार्थ्यांना निकालासाठी वाट पहावी लागली. रात्री उशिरापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यास अडचणी निर्माण झाल्या. या तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजी होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साक्षी, विपुल, हरविंदर, अफसर मानकरी

$
0
0

साक्षी, विपुल, हरविंदर, अफसर मानकरी
जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे आज वितरण
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राजे शिवछत्रपती संभाजी सामाजिक, सांस्कृतिक युवा क्रीडा मंडळ, काकाज ग्रुप, साई-पुजा स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने साक्षी चितलांगे, विपुल कड, डॉ. शेख अफसर आणि पॅरा खेळाडू हरविंदरसिंग संधू यांना जिल्हा क्रीडारत्न पुरस्कार शनिवारी जाहीर करण्यात आले. रविवारी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
विभागीय क्रीडा संकुलात रविवारी (४ जून) सकाळी नऊ वाजता पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे. खेळाडू, प्रशिक्षक व अपंग खेळाडू अशा तीन प्रकारांत पुरस्कार देण्यात येणार आहे. या तीनही प्रकारांतील पुरस्कारप्राप्त खेळाडू, मार्गदर्शकांना प्रत्येकी ५,००० रुपये, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष नितीन घोगरे यांनी दिली. यंदाच्या वर्षापासून मंडळाने जिल्हा पातळीवर क्रीडारत्न पुरस्कार देण्यास प्रारंभ केला आहे. त्यासाठी काकाज ग्रुपने पुढाकार घेतला. उपमहापौर स्मिता घोगरे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या प्रसंगी क्रीडा उपसंचालक राजकुमार महादावाड, डॉ. उदय डोंगरे, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. मकरंद जोशी, चंद्रशेखर घुगे व मंडळाचे सचिव भिकन आंबे यांची प्रमुख उपस्थिती राहाणार आहे.
साक्षी चितलांगे ही आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू असून तिने जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धा, आशियाई बुद्धिबळ स्पर्धा, राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले. तिने १३ आंतरराष्ट्रीय, ८ राष्ट्रीय, १३ राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये यशस्वी कामगिरी केली आहे. युवा बास्केटबॉलपटू विपुल कडने भारतीय बास्केटबॉल संघात स्थान मिळविले. अशी कामगिरी करणारा विपुल हा मराठवाड्यातील पहिलाच बास्केटबॉलपटू आहे. क्रोएशियात त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. पॅरा टेबल टेनिसपटू हरविंदसिंग संधू याने राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे. राज्यस्तरीय पॅरा स्पर्धेत त्याने दोन सुवर्ण व एक ब्राँझपदक पटाकाविलेले आहे. क्रीडा मार्गदर्शक डॉ. शेख अफसर हे खुलताबादेतील चिश्तिया कला महाविद्यालयात क्रीडा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. डॉ. शेख यांनी तीन आंतरराष्ट्रीय खेळाडू, ३० राज्य, राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंना मार्गदर्शन केलेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायत इमारत, रस्त्याबाबत नाराजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
सांसद आदर्श गाव योजनेतील कामांची पाहणी करण्यासाठी आलेल्या संसदीय स्थायी समितीने कामांची गुणवत्ता पाहून नाराजी व्यक्त केली. या कामांच्या गुणवत्तेवरून असमाधान व्यक्त करून शासनाचा निधी व्यर्थ वाया गेल्याचा निष्कर्ष नोंदविल्यानंतर शिवसेनेचे राज्यसभा सदस्य खासदार राजकुमार धूत यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना ग्रामपंचायत इमारत बांधकाम व सिमेंट रस्ता तयार करणाऱ्या कंत्राटदाराची ९७ लाख ४७ हजारांची बिले वितरित न करण्याचे आदेश दिले आहेत.
सांसद आदर्श गाव योजनेत खासदार राजकुमार धूत यांनी खासदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत वेरूळ येथील ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी ४९ लाख ४० हजार रुपयांचा निधी व सिमेंट रस्त्यासाठी ४८ लाख ७ हजार रुपये असा एकूण ९७ लाख ४७ हजार रुपयांचा निधी दिला आहे. या कामांना जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रशासकीय मान्यता देखील दिलेली आहे. विकासकामे करताना गुणवत्ता व दर्जा राखण्याची ताकीद खासदार धूत यांनी दिली होती, मात्र कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरून बांधकाम केल्याचे आढळून आले आहे.

दर्जामुळे बांधकाम केले होते बंद
सिमेंट रस्ता व ग्रामपंचायत इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी खासदार राजकुमार धूत यांनी संबंधित कंत्राटदाराला, कामाचा दर्जा व गुणवत्ता राखण्याची ताकीद दिली होती. त्यानंतर प्रत्यक्षात बांधकाम सुरू झाल्यावर ग्रामपंचायतचे सरपंच साहेबसिंह गुमलाडू, उपसरपंच कोमल महेंद्र दगडफोडे, ग्रामपंचायत सदस्य व जागरूक ग्रामस्थांनी निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरले जात असताना बांधकाम बंद पाडले होते, मात्र त्यावेळी संबंधितांनी कामाचा दर्जा चांगला असून, वेगळ्याच कारणासाठी काम बंद पाडण्यात येत आल्याचा कांगावा केला होता, परंतु संसदीय स्थायी समितीच्या खासदारांनी कामांची पाहणी केली असता कामांचे पितळ उघडे पडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीच लाख वृक्षवल्ली असलेले एकमेव क्रीडा केंद्र

$
0
0

औरंगाबाद ः साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रात गेल्या काही वर्षांमध्ये शाळा, कॉलेजसह सामाजिक संस्थांच्या मदतीने तब्बल अडीच लाख झाडे लावण्यात आली आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने वृक्षवल्ली जोपासणारे देशातील हे एकमेव साई क्रीडा केंद्र ठरले आहे. यंदाच्या पावसाळ्यात २५ हजार झाडे लावण्याचा संकल्प असल्याचे केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी सांगितले.
साई क्रीडा प्रशिक्षण केंद्राला तब्बल १०८ एकर परिसर लाभलेला आहे. एकेकाळी हे केंद्र बंदच झाले होते. पुन्हा कार्यान्वित झाल्यानंतर २००३मध्ये वीरेंद्र भांडारकर यांच्याकडे केंद्राचा चार्ज देण्यात आला. त्यावेळी केंद्रात अवघी पाच-सहा झाडे होती. केंद्राचा परिसर अतिशय भकास दिसत होतो. हा परिसरात इमारतीचे भग्नावशेष होते. भांडारकर यांनी केंद्रात आधुनिक क्रीडा सुविधा निर्माण करताना झाडे लावण्यावरही भर दिला. २०१०नंतर झाडे लावण्याचा उपक्रमावर अधिक भर देण्यात आला. शहरातील शाळा, कॉलेज, रोटरी क्लब, लायन्स क्लब, व्ही फॉर इनवायरमेंट, ग्लोबल फोरम, क्रिएटिव्ह ग्रुप यासारख्या सामाजिक संस्थांनी झाडे लावण्याकरिता पुढाकार घेतला. लष्करी विभाग, उद्योजक यांनीही झाडे लावण्याच्या उपक्रमाला हातभार लावला. त्यामुळे आजच्या स्थितीत साई केंद्रात तब्बल अडीच लाख झाडे डौलदारपणे उभी आहेत. परिसर हिरवाईने नटून गेलेला दिसून येतो. केंद्रात प्रवेश केल्यानंतर रस्त्याच्या दुर्तफा लावलेली झाडे सर्व थकवा दूर करून टाकतो.
अडीच लाख झाडांमध्ये चिंच, आंबे, चिकू, सीताफळ, पेरू, डाळिंब, मोसंबी, जांभुळ, नारळ ही फळांची झाडे मोठ्या संख्येने लावण्यात आलेली आहेत. सावलीबरोबरच केंद्रातील खेळाडूंना फळे खाण्याचाही आनंद घेता येत आहे. लिंब, फायकस, पेट्रोमजिवा, अमलतास, बांबू, पिटोनिया, वड, पिंपळ, गुलमोहोर, टोपिया, सुरू, अशोका, चाफा ही झाडेही मोठ्या संख्येने दिसून येतात. निळ्या रंगाचे फुल येणारे निलमोहोराचीही काही झाडे लावण्यात आलेली आहेत. फळे, फुलांची झाडे वैशिष्ट्यपूर्ण रचनेने लावण्यात आली आहेत. त्यामुळे केंद्राच्या सौंदर्यीकरणात भरच पडली आहे. झाडांची कटिंग व त्याला दिलेला आकार, बुंध्यांना केलेली रंगरंगोटी यामुळे परिसर अतिशय रेखीव दिसतो. झाडांमुळे परिसरातील वातावरण अगदी छान राहते. त्याचा नियमित सराव करणाऱ्या खेळाडूंना मोठा फायदा होत आहे. खेळाडूंबरोबरच नागरिकही मोठ्या संख्येने केंद्रात व्यायामासाठी येत आहेत. गेल्या काही वर्षांत ही संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे, असे भांडारकर यांनी सांगितले. साई केंद्रात एक जुनी विहीर आहे. तिचे पाणी पुरेसे ठरत नाही. नव्या विहिरीच प्रस्ताव पाठविला आहे. केंद्रातून वाहून जाणारे पाणी थांबविण्यासाठी रोटरी क्लबच्या मदतीने पाझर तलाव उभारण्यात आला आहे. त्यामुळे केंद्रातील पाणी पातळीत मोठी वाढ होणार आहे. त्याचा फायदा झाडे जगवण्याकरिता निश्चितच होणार आहे, असे भांडारकर यांनी सांगितले.

कचऱ्यातून खत निर्मिती
झाडांची संख्या अडीच लाखांपर्यंत पोचल्यामुळे पानांची गळती होत असते. झाडाखाली होणाऱ्या कचऱ्यातून खत निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या दररोज दहा हजार किलो खत निर्मिती करण्यात येत आहे. या खताचा झाडांसाठी उपयोग करण्यात येतो. त्याचा फायदा दिसून येत आहे. या खताचा वापर केलेली झाडे लवकरच हिरवीगार झालेली दिसून येत आहेत. एवढ्या संख्येने झाडे केंद्राच्या परिसरात लावलेली आहे, त्यासाठी केंद्राकडून एकही पैसा खर्च केलेला नाही. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या मदतीनेच ही वृक्षवल्ली उभी राहिलेली आहे. यावर्षी २५ हजार झाडे लावण्याचा संकल्प आहे, असे भांडारकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images