Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आकरावी प्रवेशाचा मुहूर्त हुकला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अकरावी प्रवेश प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात होणार होती, परंतु शिक्षण विभागाच्या अर्धवट तयारीमुळे पहिल्या दिवशी एकही ऑनलाइन प्रवेश होऊ शकला नाही. अद्याप शाळांपर्यंत माहिती पुस्तिकाच पोचल्या नाहीत तर, प्रवेश प्रक्रिया शाळेतून राबवायची याची माहितीच अनेक शाळांना नसल्याचे कळते.
यावर्षीपासून औरंगाबाद महापालिका हद्दीत अकरावी प्रवेश ऑनलाइन पद्धतीने केले जाणार आहेत. त्यासाठी सोमवारी बैठक घेत शिक्षण विभागाने मंगळवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याचे जाहीर केले. प्रत्यक्ष आज प्रवेशाची वेबसाइट दुपारी एक वाजता सुरू झाली. शिक्षण विभागाकडून अद्याप माहिती पुस्तिकाच शहरातील पाच झोन केंद्रापर्यंत पोचल्या नव्हत्या. विभागाच्या अर्धवट तयारीमुळे प्रवेश प्रक्रियेचा मुहूर्त पहिल्याच दिवशी हुकला. झोन केंद्रावर दुपारनंतर माहिती पुस्तिका पोचविण्यात आल्या. त्यानंतर शाळांना केंद्रावरून पुस्तिका घेऊन जाण्याचे आदेश देण्यात आल्याचे कळते. आता उद्यापासून प्रक्रिया सुरळीत होईल, असे सांगण्यात येत आहे.
माहिती पुस्तिकेसह विद्यार्थ्याला स्वतंत्र लॉग-इन आयडी व पासवर्ड दिला जाणार आहे. ही माहिती पुस्तिका शाळेमध्येच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरातील १०४ ज्युनिअर कॉलेजांमधील २२ हजार ९४० जागांवर ऑनलाइन प्रवेश दिले जाणार आहेत.

अनेक शाळा माहितीपासून दूरच
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाने शहरात पाच झोन केले. एक झोनसाठी एक कॉलेज सेंटर दिले आहे. झोनअतंर्गत शाळांनी माहिती पुस्तिका संबंधित ठिकाणाहून घेऊन जायच्या आहेत. विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेत गैरसोय होऊ नये. यासाठी शाळांची मदत घेतली जात आहे, परंतु अनेक शाळांनाही प्रवेश प्रक्रियेबाबत शिक्षण विभागाकडून स्पष्ट सूचना नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे निकाल जाहीर झाल्यावर हा गोंधळ वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आजपासून वेबसाइट सुरू झाली, परंतु प्रवेश झाले नाहीत. शाळांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत. माहिती पुस्तिका झोन केंद्रामध्ये उपलब्ध करून दिल्या असून, एक-दोन दिवसात प्रक्रियेला चांगल्या पद्धतीने गती येईल.
- वैजनाथ खांडके, विभागीय उपसंचालक, शिक्षण विभाग.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देशात इंधनाचे दर समान ठेवण्याचा विचार ः प्रधान

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
देशभरात वेगवेगळ्या शहरांत आणि जिल्ह्यांत पेट्रोल-डिझेलचे भाव समान नाहीत. ते समान ठेवण्याचा विचार सरकार करत आहे, असे केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. औरंगाबाद शहरात इंधन डेपो सुरू करण्याचाही विचार; तसेच कोकणामध्ये ६० दशलक्ष टन क्षमतेचा तेल शुद्धीकरणाचा कारखाना राज्य सरकारशी सल्लामसलत केल्यानंतर उभारण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.
औरंगाबाद शहरातील संपादकांशी बोलताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे सरकारची पूर्ण बचत ग्राहकांना दिली जात नाही. ती दिली तर विकासाचा दर वाढू शकतो, परंतु त्या बचतीचा खर्च पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी प्रकल्पावर वापरला जात आहे. १५ जून २०१५ रोजी खनीज तेलाचे भाव ११५ डॉलर होते. जुलै २०१५मध्ये हेच भाव एका टप्प्यावर २७ डॉलर होते. गेल्या तीन वर्षांपासून खनीज तेलाची किंमत ४५ ते ५५ डॉलर इतकी आहे. कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्यास वाहतूक आणि रिफायनरी खर्च तितकाच राहतो. प्रत्यक्षात केवळ ३० टक्केच बचत होते. नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यापासून गेल्या तीन वर्षांत ३ लाख कोटी रुपये वाचविल्याची माहिती प्रधान यांनी दिली. पूर्वी संपूर्ण फायदा ग्राहकांना देत होतो. पेट्रोल आणि डिझेल वापरणाऱ्यांची संख्या मर्यादित आहे. त्यांना हा फायदा दिला असता, तर महागाईमध्ये निश्चितपणे वाढ झाली असती. रेल्वे, रस्ते आणि कल्याणकारी योजनांसाठी हा निधी वापरला. गरिबांच्या घरांमध्ये चुलीऐवजी गॅस देण्यासाठी पेट्रोलियम खात्याने ८ हजार कोटींचा त्याग केला आहे, असेही प्रधान यांनी सांगितले.
सध्या दरवर्षी सरकार ६ लाख कोटी रुपयांचे तेल आयात करते. २०१४मध्ये देशभरात १४ कोटी एलपीजी कनेक्शन होते, पण गेल्या तीन वर्षांत एलपीजी संख्या २१ कोटींपर्यंत गेली आहे. याचा अर्थ असा, तीन वर्षांत ७ कोटी एलपीजी कनेक्शन वाढले आहेत. हे कनेक्शन वाढल्यामुळे लाखो बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, आमदार अतुल सावे, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, महापौर भगवान घडमोडे, माजी महापौर डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी आदी उपस्थित होते.

औरंगाबादेत ऑइल डेपोचा विचार ः पेट्रोलियम मंत्री
कोकणामध्ये ६० दशलक्ष टन तेल शुद्धीकरणाचा प्रकल्प सुरू करण्याचा मानस केंद्र सरकारचा आहे. राज्य सरकारशी सल्लामसलत करून हा कारखाना कोकणामध्ये कुठे असेल, हे निश्चित केले जाईल. राज्य सरकार सूचवेल त्याठिकाणी हा कारखाना उभारला जाईल, असेही प्रधान यांनी सांगितले. औरंगाबाद शहराजवळील शेंद्रा येथे तेल कंपन्यांचे इंधन डेपो उभारण्याची मागणी आहे. यासाठी खासदार चंद्रकांत खैरे यांचा माझ्याकडे आग्रह असतो. या इंधन डेपोची मागणी विचारात घेण्यात येईल, असे आश्वासन प्रधान यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांच्या आढावा बैठकीत आयुक्तांचा ‘बोलाचाच भात’

$
0
0

महापौरांच्या आढावा बैठकीत आयुक्तांचा ‘बोलाचाच भात’

नव्वद टक्के वसुली, वृक्षारोपणाचे टार्गेट एक लाख

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

महापौर भगवान घडमोडे यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ‘बोलाचाच भात, बोलाचीच कढी’ या म्हणीचा प्रत्यय उपस्थितांना आला. या प्रत्ययाचे धनी आयुक्त डी. एम. मुगळीकर असल्याची चर्चा बैठकीच्या नंतर होती. मालमत्ता कराच्या वसुलीसाठी चाचपडणाऱ्या महापालिकेच्या वसुलीचे प्रमाण ९० टक्के करू, १ लाख झाडे लावण्याचे टार्गेट लिलया पूर्ण करू अशी स्वप्ने आयुक्तांनी दाखविल्याचे बोलले जात होते.

महापौरांची आढावा बैठक प्रामुख्याने वृक्षारोपण, मालमत्ता कराची वसुली, दिवाबत्ती या विषयाबद्दल होती. बैठकीला पदाधिकाऱ्यांसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्त मुगळीकर देखील होते. मालमत्ता कराच्या वसुलीचे प्रमाण फक्त ३८ टक्के आहे. हे प्रमाण वाढवले पाहिजे, अशी अपेक्षा महापौरांनी व्यक्त केली. त्याला आयुक्तांनी सहमती दर्शवली. ते म्हणाले, ३८ टक्के वसुली आहे हे खरे आहे, पण या वर्षी वसुलीची टक्केवारी ९० करण्याचे उद्दीष्ट आहे. शासनाने वसुलीवर लक्ष देण्याचे आदेश दिले आहेत, शिवाय आयुक्तांच्या ‘केआरए’ मध्ये याचा ठळक उल्लेख आहे. त्यामुळे वसुलीचे प्रमाण वाढवू. महापालिका मुख्यालयातील कर्मचारी वसुलीच्या कामासाठी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

वृक्षारोपणाचे एक लाखाचे टार्गेट लिलया पूर्ण करू, असे ते म्हणाले. सफारी पार्कच्या जागेवर ४० हजार झाडे लाऊ. जांभुळबनात १० हजार झाडे लावण्यात येतील, यापैकी ५ हजार झाडे लावली आहेत. शहराच्या विविध भागात उद्याने आहेत, तेथेही झाडे लावू असे ते म्हणाले. नगरसेवक - पदाधिकाऱ्यांनी स्मशानभूमी, कब्रस्तानात झाडे लावण्याची सूचना केली. या ठिकाणीही १० हजार झाडे लावून टाकू, असे आयुक्त म्हणाले. तसे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. बंद पडलेल्या पथदिव्यांच्या संदर्भात येत्या एक - दोन दिवसात कंत्राटदारांची बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

१२०० मालमत्तांचे सर्वेक्षण

सातारा परिसरात १२०० मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. आता या मालमत्तांना कर आकरणी करावी लागणार आहे, असे आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले. कर आकारणीसाठी तात्काळ कर्मचारी उपलब्ध करून द्या, कर्मचाऱ्यांची पथके नेमा, असे आदेश महापौर भगवान घडमोडे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा विद्यार्थी वसतिगृहाचा शुभारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यर्थ्यांसाठी मराठा समाज प्रतिष्ठानने उभारलेल्या मराठा विद्यार्थी वसतिगृहाचा मंगळवारी (६ जून) शिवराज्याभिषेक दिनी मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
मराठा विद्यार्थी वसतिगृहामध्ये सकाळी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्‍ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मराठा समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मानसिंह पवार, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, मधुकर अण्णा मुळे, पद्माकर मुळे, गजानन सुरासे, विंग कमांडर टी. आर. जाधव यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी मराठा वसतिगृह उभारणीची संपूर्ण माहिती उपस्थितांना देण्यात आली. मध्यवर्ती बसस्थानकासमोर कोतवालपुरा येथे हे वसतिगृह उभारण्यात आले अाहे. तेथे सर्व सोयी सुविधांनी युक्त असलेल्या या वसतिगृहामध्ये मराठवाड्यातील शेतकरी, आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांतील विद्यार्थी आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

२१ लाख देणगीची घोषणा
वसतिगृह शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर नागरिकांमधून प्रतिष्ठानसाठी २१ लाख रुपयांच्या देणगीची घोषणा करण्यात आली. काहींनी कार्यक्रमाच्या ठिकाणीच धनादेशही दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नापास होण्याच्या भीतीने आत्महत्या

$
0
0

औरंगाबाद : ‘नीट’मध्ये मार्क कमी पडण्याच्या भीतीमुळे तरुणाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सायंकाळी सनी सेंटर पिसादेवी रोड भागात हा प्रकार घडला. अनिकेत पंडित गडकरी (वय १८) असे तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
अनिकेतचे वडील भोकरदन येथे प्राध्यापक असून, आई शिक्षिका आहे. अनिकेतने गेल्या वर्षी नीटची परीक्षा दिली होती. यामध्ये त्याला कमी मार्क पडल्याने त्याने पुन्हा यावेळी ‘नीट’ दिली. काही दिवसांपूर्वी त्याने ऑनलाइन अँसर की पाहिली. यामध्ये अनिकेतला पुन्हा कमी मार्क पडले होते. सोमवारी परीक्षा असल्याने आई-वडील बाहेर गेले होते, तर लहान भाऊ क्लासेसला गेला होता. घरी कोणी नसल्याचे पाहून अनिकेतने फॅनला साडी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. आई-वडील घरी परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. ‌अनिकेतला तत्काळ घाटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, जमादार महेमूद पठाण तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात दोन शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड
शेतकरी संपामुळे राज्य ढवळून निघत असताना मराठवाड्यात दोन शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. नांदेड आणि जालना जिल्ह्यांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे मंगळवारी समोर आले.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वीरेगाव येथील तरुण शेतकरी रमेश रामदास दळवी (वय २६) यांनी गळफास घेऊन सोमवारी आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी रात्री आठच्या सुमारास उघड झाला. रमेश दळवीवर काही बँकांचे कर्ज असल्याचे नागरिकात चर्चा होती. त्यांच्या मागे आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी नागरिकांनी धाव घेऊन त्यांना वाचविले व समजावून सांगितले होते. त्यानंतर त्यांनी पाच जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी भोकरदन पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास बी. एल. राठोड हे करीत आहे
पळसपूर (जि. नांदेड, ता. हिमायतनगर) येथील शेतकरी परमेश्वर नाथराव वानखडे (वय ४०) यांची पळसपूर शिवारात ३ एकर शेती आहे. पेरणीसाठी त्यांनी भारतीय स्टेट बँकेकडून ५० हजारांचे व महिंद्रा फायनान्सकडून अंदाजित ३ लाखांचे कर्ज घेतले होते. सतत तीन वर्षांपासून जमिनीत काहीच पिकात नसल्याने ते हताश होते. त्याचे उसाचे टिशू कल्चर बेणे तीन एकर शेतात लावले होते, मात्र भर उन्हाळ्यात विहीर व बोअरचे पाणी कमी झाले. शेताजवळ असलेल्या पैनगंगा नदी कोरडी पडल्याने उभा ऊस वाळून गेला. त्यांनी ऊस मोडून काढला. शेतात पेरणी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे यंदा पेरणी शक्य नसल्याने त्यांनी मंगळवारी दुपारी आपल्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली, असे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितलेले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाधववाडीमध्ये आवक सुरू

$
0
0

जाधववाडीमध्ये आवक सुरू

किरकोळ बाजारपेठेत भाज्यांचे दर वाढले

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतकरी संपाच्या सहाव्या दिवशी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या जाधववाडीमध्ये भाजीपाल्याच्या आवक सुरू झाली. एरव्ही ज्या प्रमाणात आवक होते, त्यात घट होती. दरम्यान आलेल्या भाजीची किरकोळ बाजारपेठेत चढ्या दराने विक्री सुरू झाली आहे. अशीच परिस्थिती पुढचे दोन तीन दिवस असली तर औरंगाबादकरांना भाज्या खरेदी करणे अवघड होणार आहे. दुसरीकडे दुधाची आवक मात्र समाधानकारक झाल्याचे सांगण्यात आले.

कर्जमाफी, शेतीमालाला हमी भाव मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी १ जूनपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. नाशिक, पश्चिम महाराष्ट्रात संपाची तीव्रता अधिक आहे. सोमवारी राज्यव्यापी बंद पुकारला होता. संपाच्या पहिल्या दिवशीपासून जाधववाडीमध्ये भाज्यांची आवक थांबली होती. एकूण संख्येच्या १० टक्केपर्यंतच भाजीपाला शहरात येत होता. फळांच्या बाबतीत मात्र ही परिस्थिती नव्हती. शहरात नाशिक, नगरहून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला येतो. दुधाच्या बाबतीतही नगर जिल्ह्यातून मोठी आवक होते. दैनंदिन १.५० लाख लिटर दूध शहरात येते. संपाच्या पार्श्वभूमीवर त्यात ३० टक्क्यांची घट झाली होती.

मंगळवारी जाधववाडी बाजारपेठेत कांदा, बटाटा आणि लसणाचे छोटे मोठे ७२ ट्रक, टेंपो आले. त्यातून १२१८ क्विंटल मालाची आवक झाली. फळांचे ४६ ट्रक, टेंपो आले त्यातून ४९९ क्विंटल माल आला. मंगळवारी आवक सुधारल्याचे सूत्रांनी सांगितले. जाधववाडी सकाळी १७१७ क्विंटर पालेभाज्यांची आवक झाली. मेथी, कोथिंबिर, पालक, चुका आदीच्या ३७५०० जुड्या विक्रीसाठी आणण्यात आल्या. हा सर्व माल स्थानिक असल्याचे बाजारसमितीतून सांगण्यात आले. सोमवारी पालेभाज्या, फळभाज्या आणि फळांची एकूण आवक ९५० क्विंटल झाली होती. किरकोळ बाजारपेठेत मात्र भाज्यांचे भाव वाढलेलेच आहेत. अशीच परिस्थिती पुढचे काही दिवस राहिली तर फळभाज्यांचे भाव अजून वाढतील अशी भीती आहे.

दीड लाख लिटर दुधाची आ‍वक

औरंगाबादमध्ये मंगळवारी दीड लाख लिटर दुधाची आवक झाली. महानंदमध्ये दररोज ५६ हजार लिटर दूध येत असते. ते आज ५४ हजार लिटर आले. अन्य खाजगी संघांची आवकही नेहमीपेक्षा थोडी कमी राहिली तरी त्याचा फारसा फटका जाणवला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावी निकालाची अफवाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बारावीच्या निकालानंतर आता दहावीचे विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मंगळवारी निकालाबाबत दिवसभर विद्यार्थी, पालकांमध्ये चर्चा होती, तर निकाल केव्हा याबाबत मंडळाच्या विभागीय कार्यालयात दिवसभर फोन खणखणले. निकालाची प्रक्रिया अद्याप अपूर्ण असल्याने त्याची नेमकी तारीख अद्याप मंडळाने जाहीर केली नसल्याने अफवांवर विश्वास ठेवू नका, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा ७ मार्च ते २९ मार्चदरम्यान झाली. या परीक्षेचा निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर होईल, असे सांगण्यात येत होते. पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता कमी असल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे. मागील वर्षी दहावीचा निकाल ७ जूर रोजी जाहीर झाला होता. यंदा बारावीचा निकाल ३० मे रोजी लागला, तर विद्यार्थ्यांना शुक्रवारी गुणपत्रिका मिळणार आहे. बारावीचा निकाल लांबला त्यामुळे दहावीचा निकाल कधी असा प्रश्न पालक, विद्यार्थ्यांना पडला आहे. त्यात दोन दिवसापासून सोशल मीडियावरील निकालाच्या तारखांनी पालक, विद्यार्थी संभ्रमात आहेत. त्यात आता ९ जून अशी तारीखही सोशल मीडियावर चर्चेत आहे, परंतु मंडळाने, ‘अशा तारखांवर विद्यार्थी, पालकांनी विश्वास ठेवू नये,’ असे स्पष्ट केले. औरंगाबाद विभागातून १ लाख ९१ हजार ४८८ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे.

मंगळवारी सायंकाळपर्यंत दहावीच्या निकालाबाबत मंडळाने कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. सोशल मीडियावर ज्या काही तारखा येत आहेत, त्या केवळ अफवा आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिकृतरित्या मंडळ तारखा जाहीर करेल.
- वंदना वाहूळ, विभागीय सचिव, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


येडेश्वरीच्या भोगी प्रथेवर बंदी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून परिचित असणाऱ्या येरमाळ्याच्या येडेश्वरी देवीच्या मंदिरातील भोगीच्या प्रथेवर बंदी घालण्यात आली आहे. या प्रथेमध्ये बोकडाचा बळी देण्यात येत होता. कोर्टाच्या आदेशावरून हा निर्णय घेण्यात आला आहे.
कळंब तालुक्यातील येरमाळा येथील येडेश्वरी देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. तुळजाभवानीची धाकटी बहीण अशी ख्याती असल्यामुळे, देशभरातून भाविक या मंदिरातच येत असतात. मनोकामना पूर्तीनंतर भाविक देवीची महापूजा करतात. यानंतर देवीस पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. शिवाय हार, टिळे, डोळे, साडी-चोळीने ओटी भरण्याचा कार्यक्रम होतो. याचबरोबर भोगीचा म्हणजे बकरा बळीचा कार्यक्रमही होतो. आता भाविकांना हा भोगीचा कार्यक्रम करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

तीन किलोमीटर परिसरात बंदी
बापूसाहेब बेदरे यांच्या अध्यक्षतेखाली पाच जून रोजी झालेल्या बैठकीत मंदिर समितीने हा ऐतिहासिक निर्णय घेतला. मुख्य मंदिरांसह मंदिराच्या तीन किलोमीटर परिसरामध्ये बळी देण्यास मनाई करण्यात आली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत गावकरी व मानकरी यांची होणारी भोगी करण्यास मुभा आहे. या उपरोक्त भोगीचा कार्यक्रम केल्याचे आढळून आल्यास देवस्थान ट्रस्ट हायकोर्टाच्या आदेशानुसार कारवाई करणार आहे.

अनिष्ट प्रकारांना आळा बसणार
भोगीच्या कार्यक्रमासाठी मंदिरामध्ये नेहमीच गर्दी असायची. या प्रथेबरोबर अनिष्ठ प्रकारही घडत होते. यामध्ये येणाऱ्या भाविकांमध्ये मद्यप्राशनाचे प्रकार वाढल्यामुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले. भाविकांच्या कौटुंबिक वादांची संख्या वाढली. नशेत अर्वाच्य शिव्या देणे, कोठेही झोपणे, याचबरोबर अवैध प्रकार वाढले होते. याचा त्रास सामान्य भाविकांना होऊ लागल्याने ही बंदी घालण्यात आली आहे.

दोरा, हळदीवर बंदी
देवीच्या डोंगराला दोरा बांधण्याची व पायरीला हळद लावण्याची येथे पूर्वापार परंपरा आहे. याला कोणताही धार्मिक किंवा शास्त्रीय आधार नाही. उलट दोरा बांधल्यामुळे आग लागून अपघाताचा धोका आहे. तसेच हळद लावल्यामुळे पायऱ्यांचे विद्रुपीकरण होते, शिवाय भाविक पायऱ्यांवरून पाय घसरून पडण्याची शक्यता आहे. या प्रथा काही भाविकांनी आपणहून सुरू केल्या होत्या. यावरही आता बंदी घालण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेगळ्या मराठवाड्याला खासदार शेट्टींचा पाठिंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छोट्या राज्यांमुळे सर्वांगीण विकासाला चालना मिळते. झारखंड, उत्तराखंड ही त्याची उदाहरणे आहेत. हिंदी भाषेची तीन राज्ये होऊ शकतात, तर मराठी भाषकांची तीन राज्ये का होऊ नयेत ? माझा वेगळ्या मराठवाड्याला पाठिंबा आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी केले.
मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मौलाना आझाद संशोधन केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर लढा देणारे मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अॅड. प्रदीप देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. मराठवाडा विकास चळवळीचे ज्येष्ठ नेते द्वारकाभाऊ पाथ्रीकर, जे. के. जाधव, मराठवाडा मुक्ती मोर्चाचे संस्थापक प्रा. बाबा उगले, प्रा. सत्तार, रेल्वे अभ्यासक गणेश चौधरी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
ते म्हणाले,‘शेतकरी संपामुळे मला येता आले नाही, पण तुमच्या चळवळीला माझा पाठिंबा आहे. छोटी राज्ये विकासाला परिपूर्ण असतात. मराठवाड्याच्या भावनेशी मी सहमत आहे. स्वतंत्र मराठवाड्याचा या भागातील नागरिकांना फायदाच होणार आहे. मराठवाड्यासह विदर्भ वेगळा झाला तरी त्यासाठी आमचा पाठिंबा असेल.’

मोबाइलवरून संवाद
राज्यातील शेतकऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे खासदार शेट्टी यांना कार्यक्रमाला येता आले नाही, मात्र त्यांनी मोबाइलवरून सभागृहात संवाद साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात पदविका अभ्यासक्रमांना ‘ब्रेक’?

$
0
0

Tushar.bodkhe@timesgroup.com
Tweet : @ tusharbMT
औरंगाबाद ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य शिकवण्यासाठी कला शाखेत पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आले, पण बहुतेक विभागांत प्राध्यापकांच्या जागा रिक्त असल्याने चालू शैक्षणिक वर्षात पदविका अभ्यासक्रमांचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे पदविका अभ्यासक्रम रद्द होण्याची शक्यता आहे.
सध्या पूर्णवेळ प्राध्यापक नसल्यामुळे विद्यापीठात बहुतांश विभागात नियमित तासिकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यापीठात प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचा जागा रिक्त आहेत. मागील अनेक दिवसांपासून रिक्त जागांचा प्रश्न प्रलंबित आहे. विद्यार्थ्यांना भाषिक कौशल्य शिकवून व्यावसायिक संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने कला शाखेत कमी कालावधीचे पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. दोन वर्षांपासून अभ्यासक्रमांना समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे, मात्र यंदा पदविका अभ्यासक्रम अडचणीत आहेत. मराठी विभागाचे तीन प्राध्यापक निवृत्त झाले आहेत. चार प्राध्यापकांवर विभागाची भिस्त असल्याने पदविका अभ्यासक्रम पेलवणे कठीण झाले आहे. अनुवाद, संहिता लेखन, माध्यम लेखन अशी कौशल्ये पदविका अभ्यासक्रमात शिकवली जातात. पाली विभागात प्राध्यापक नसल्यामुळे अभ्यासक्रमाबाबत साशंकता आहे. पाली भाषा शिकून संशोधन व भाषांतर कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थी प्रवेश घेतात. यंदा जून महिन्यात प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. इंग्रजी आणि हिंदी विभागातही अभ्यासक्रमाला साधारण प्रतिसाद आहे.
दरम्यान, रिक्त जागांबाबत विद्यापीठ प्रशासनाने अजूनही ठोस निर्णय घेतलेला नाही. बहुतेक विभागांनी रिक्त जागा त्वरित भरण्याची मागणी केली आहे, तर तांत्रिक कारणांची जंत्री सांगत कुलगुरूंनी रिक्त जागांचा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे.

जेमतेम प्रतिसाद
भाषा कौशल्य आत्मसात करून व्यावसायिक संधी मिळ‍ण्याबाबत विद्यार्थी साशंक आहेत. बहुतांश विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याला प्राधान्य देतात. या परिस्थितीत पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा प्रतिसाद घटला आहे. पाली विभागात मागील वर्षी फक्त पाच विद्यार्थी होते. इतर विभागांचीही अशीच स्थिती आहे. कमी कालावधीचा कोर्स करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल नाही. अध्यापनासाठी पूर्णवेळ प्राध्यापक नसल्याचा फटकाही अभ्यासक्रमाला बसत आहे.

विभागनिहाय अभ्यासक्रम
मराठी विभाग ः व्यावहारिक मराठी प्रमाणपत्र
हिंदी विभाग ः अनुवाद पदविका, माध्यम लेखन पदविका
इंग्रजी विभाग ः इंग्रजी संभाषण कौशल्य प्रमाणपत्र
पाली विभाग ः पाली भाषा प्रमाणपत्र

विद्यापीठातील रिक्त जागांपैकी अर्ध्या जागा लवकरच भरण्यात येतील. जुलै महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागाचा आढावा घेतला आहे.
- डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू

प्रत्येक भाषेत निश्चितच संधी आहेत. पाली भाषेचे व्याकरण आणि साहित्य शिकून संधी मिळू शकतील. किमान दहावी उत्तीर्ण विद्यार्थीसुद्धा प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो, पण भाषा शिकण्याकडे कमी कल आहे.
- डॉ. पी. बी. पगारे, प्रभारी विभागप्रमुख, पाली

मराठी विभागात फक्त चार प्राध्यापक असल्यामुळे शैक्षणिक वर्षाचे नियोजन करणे कठीण झाले आहे. रिक्त जागांमुळे पदविका अभ्यासक्रम ठेवायचा की नाही याचा निर्णय घेऊ. रिक्त जागा भरण्याची गरज आहे.
- डॉ. अशोक देशमाने, विभागप्रमुख, मराठी विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबादमध्ये रोहिण्या बरसल्या

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद शहर आणि परिसरामध्ये मंगळवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. मान्सूनपूर्व पावसाच्या या हजेरीमुळे उकाडा कमी झाला असून, शेतकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरामध्ये मंगळवारी दिवसभर ऊन होते. मात्र, सायंकाळनंतर अचानक ढग भरून आले आणि रात्री आठ वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तास जोरात पाऊस होता आणि त्यानंतर जोर कमी झाला. तरीही रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता.
जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली असली, तरीही यंदाच्या हंगामातील हा पहिलाच जोरदार पाऊस आहे. त्यामुळे, शहराच्या सखल भागामध्ये पाणी साचले होते. तसेच, नाल्याही भरून वाहू लागल्या होत्या. पाऊस सुरू झाल्यानंतर, काही वेळात शहरातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. या पावसामुळे दिवसभर जाणवत असणारा उकाडा कमी झाला असून, यानंतर कमाल तापमानामध्ये घट होत जाईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
हा पेरणीयोग्य पाऊस असल्यामुळे, शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे. आता पेरणीच्या कामांना सुरुवात करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग वाढणार आहे. रोहिणी नक्षत्राच्या अखेरच्या टप्प्यामध्ये हा पाऊस झाला आहे. रोहिणी नक्षत्रात पाऊस झाल्यानंतर, शेतकऱ्यांकडून प्रामुख्याने मूग, उडीद या पिकांची पेरणी होते. त्यामुळे, पाऊस झालेल्या परिसरांमध्ये पुढील दिवसांमध्ये या पिकांची प्राधान्याने पेरणी होईल, असे सांगण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ मराठवाड्यात ‘टाळे ठोका’

$
0
0



टीम मटा, औरंगाबाद

मराठवाड्यामध्ये शेतकरी संप सुरूच असून, सर्वत्रच शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांना टाळे ठोकण्याचे आंदोलन करण्यात आले.
संपूर्ण कर्जमाफी आणि अन्य मागण्यांसाठी राज्यात शेतकऱ्यांकडून संप पुकारण्यात आला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासह मानवत आणि पालमच्या तहसील कार्यालयांना कुलूप ठोकले. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटला टाळे ठोकून शेतकऱ्यांनी संपाचे आंदोलन सुरूच ठेवले. लातूर जिल्ह्यातील लातूर आणि औसा इथ शासकीय कार्यालयाला टाळा ठोको आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व वकीलांनी न्यायालयीन कामकाजात भाग न घेता शेतकरी संपाला पाठिंबा दिला. एसएफआय या विद्यार्थी संघटनेने नांदेडमध्ये निदर्शने करत, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. या आंदोलनामध्ये सोमवारी महाराष्ट्र बंदचेही आवाहन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये ग्रामीण भागातील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते, तर शहरी भागामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. या पार्श्वभूमीवर, सर्व जिल्ह्यांमध्ये मंगळवारी टाळे ठोका आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

परभणीत तीव्र आंदोलन
परभणी : संपूर्ण कर्जमाफीसह इतर अनेक मागण्यांसाठी मंगळवारी शेतकऱ्यांनी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयास कुलूप ठोकले. तसेच मानवत आणि पालमच्या शेतकऱ्यांनी देखील तहसील कार्यालयांना कुलूप ठोकून तीव्र संताप व्यक्त केला आहे. परभणीत सहाव्या दिवशीही शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र स्वरूप पहावयास मिळाले.
किसान क्रांती समन्वय समितीच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात विविध स्वरूपात आंदोलने होत आहेत. समितीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा कचेरी परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तरीही दुपारी बारा वाजता शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या लोखंडी गेटला कुलूप ठोकण्याचा प्रयत्न केला. काही काळ कुलूप लागलेही होते. परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करून हे कुलूप काढले. त्यानंतर जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर यांनी आंदोलकांशी चर्चा केली असता, आंदोलकांनी ४८ तासांत कर्जमाफी द्यावी, अन्यथा या पुढील आंदोलन तीव्र स्वरूपात करण्याचा इशारा दिला आहे.
मानवत येथे शेतकऱ्यांंनी मंगळवारी तहसिल कार्यालयाला टाळे ठोकून आपला निषेध नोंदविला. येथील लाल बावटा कार्यालय सावता माळी रोड येथून शेतकरी क्रांती मोर्चाच्या वतीने लिंबाजी कचरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शेतकरी मोर्चा तहसिल कार्यालयावर धडकला.
या वेळी तालुक्यातील शेतकर्यांनी शासनाा निषेध करून जोरदार घोषणाबाजी करीत तहसीलला टाळे ठोकून आपला रोष व्यक्त केला. या आंदोलनानंतर मानवत पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेवून लगेचच सोडून दिले. तर पालम येथील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पालम तहसील कार्यालयात जाऊन ताळे बंद आंदोलन केले. यात विठ्ठल कराळे, शिवाजी कराळे, एकनाथ शेटे आदी कार्यकर्ते तहसीलदार यांच्या कार्यालयास कुलूप लावण्याचा प्रत्यन केला. त्याच वेळी पालम पोलीस स्टेशनचे पोलीस निरक्षक महेश शर्मा यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यक्रत्यास ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करून त्यांना सोडून दिले.
दरम्यान, परभणी वकील संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करत या संपाला पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून सध्या चालू होत असलेल्या खरीप हंगामासाठी बी-बियाणे, खते, औषधी व अवजारे शंभर टक्के अनुदानावर देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.


नांदेडमध्ये ‘एसएफआय’चा पाठिंबा
स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारसी लागू करण्यात याव्यात व शेतकऱ्यांची पूर्ण कर्ज माफी करण्यात यावी व इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला ‘एसएफआय’च्या नांदेड जिल्हा कमिटीच्याने पाठिंबा दिला आहे. सरकारच्या शेतकऱ्यांबाबत असलेल्या उदासीनतेविरूद्ध नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
या वेळी एसएफआयचे राज्य सचिव साथी बालाजी कलेटवाड म्हणाले, ‘सरकार धनदांडग्या भांडवलदारांचे कर्ज माफ करत आहे. तर दुसरीकडे जगाला आणि देशाला जगवणारा शेतकरी कर्जामुळे आत्महत्या करत आहे. ही शेतकऱ्यांची आत्महत्या नसून सरकारमार्फत केली जाणारी हत्याच आहे. जर या संपावर तात्काळ तोडगा निघाला नाही तर येणाऱ्या काळात सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेवर विद्यार्थी संघटनेकडून बहिष्कार टाकण्यात येईल.’ शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने विचार करण्यात यावा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. या वेळी ‘एसएफआय’च्या पदाधिकाऱ्यांबरोबरच विद्यार्थीही मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
राज्यातील शेतकरी संघटनांनी संपाची हाक दिल्यानंतर, नांदेडमध्येही शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यानुसार, मंगळवारी सरकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

‘पालकमंत्र्यांच्या घराला टाळे ठोकणार’
लातूर जिल्ह्यातील लातूर आणि औसा येथे शासकीय कार्यालयाला टाळा ठोको आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व वकीलांनी न्यायालयीन कामकाजात भाग न घेता शेतकरी संपाला पाठिंबा दिला.
लातूरच्या तहसील कार्यालयामध्ये आंदोलकांनी तहसीलदारांना निवेदन देऊन कामकाज बंद पाडले. उपविभागीय अधिकारी कार्यालयाला मात्र टाळे ठोको आंदोलन केल्याची माहिती कृती समितीचे सदस्य अॅड. उदय गवारे यांनी दिली. औसा पंचायत समितीला गनिमीकाव्याने प्रतिकात्मकरीत्या ठाळे ठोकण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे राजेंद्र मोरे यांनी दिली. बुधवारी सकाळी पालकमंत्र्याच्या घराला टाळा ठोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही मोरे यांनी दिली.
भाजीपाला मार्केटमध्ये सकाळी १६८ क्विंटल मालाची आवक झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव मधुकर गुंजकर यांनी दिली. भुसार मालाचा भाव आजही निघाला नसल्याचे त्यांनी सांगितले. रयतु बाजारात मात्र शेतकरी मोठ्या संख्येने भाजीपाला विक्रीला घेऊन येत आहेत. नेहमी पेक्षा थोडा महाग असला तरी ग्राहकाला भाजीपाला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीवर ठाम
उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी सहाव्या दिवशी शेतकरी आंदोलन सुरूच होते. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटला टाळे ठोकून शेतकऱ्यांनी संपाचे आंदोलन सुरूच ठेवले. संपूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार या वेळी शेतकऱ्यांनी केला.
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. या वेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील व शेतकरी संघटनेचे रामजीवन बोदर यांनी आक्रमक होत टाळे ठोकले. अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी हे शेतकऱ्यांना मान्य नसून, सरसकट कर्जमाफी हवी आहे, अशी मागणी माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी या वेळी केली.
शेतकऱ्यांकडून टाळे ठोका आंदोलन करण्यात येणार असल्यामुळे, जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व सरकारी कार्यालयांसमोर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिशू कर्जाने दिली व्यवसायास उर्जितावस्था

$
0
0

शिशू कर्जाने दिली व्यवसायास उर्जितावस्था

दोन वर्षात कोटींची उड्डाणे

dhananjay.kulakrni@timesgroup.com

@dhananjaykMT

औरंगाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुद्रा योजना आणून आज दोन वर्षे झाली आहेत. बहुतांश ठिकाणी या योजनेतील तीन कर्जे घेऊन लाखो जणांनी या योजनेचा फायदा घेतला आहे. व्यवसायास उर्जितावस्था दिली आहे. या योजनेत तीन प्रकारची कर्जे दिली जातात. या योजनेतील पहिले कर्ज शिशू योजना असते यातून अनेकांनी आपला व्यवसाय वृद्धींगत करून भरभराट केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लघुउद्योजकांसह व्यावसायिकांच्या भांडवली गुंतवणुकीसाठी एप्रिल २०१५ रोजी मुद्रा योजना आणली. या माध्यमातून उद्योजकांना १० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यासाठी बँकांना या योजनेसाठी कर्जखातेदारांची खाती उघडण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे. हे कर्जवाटप तीन श्रेणीत केले जाते. यामध्ये शिशू श्रेणीत ५० हजारांपर्यंत, किशोर श्रेणीत ५० हजार ते लाख, तर तरुण श्रेणीत ते १० लाखांपर्यंत कर्जपुरवठा केला जात आहे. त्यामुळे लहान कारखानदार, दुकानदार, भाजीवाले, फेरीवाले, किरकोळ विक्रेते या व्यवसायांनाही ऊर्जितावस्था आली आहे.

मुद्रातील पहिली योजना शिशू योजनेत सुरुवातीच्या पहिल्या वर्षी लाखात कर्ज वाटले गेले, पण नंतर २०१६-२०१७ कोटींत हा आकडा गेला. एकंदरीतच या योजनेचे फलित मोठे आहे. यामुळे सर्वच बँकांनी त्यांच्या विविध बँक शाखांमधून कमीतकमी ५ ते जास्तीत जास्त ५० फाइल मंजूर केल्या आहेत. यामुळे मुद्रा योजनेतील शिशू योजनेतून अधिक कर्ज वितरित झाले आहे व त्याचा परतावाही चांगला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात २०१५ ते २०१६चा शिशू योजनेचे लाभार्थी

योजना प्रकार- शिशू

खातेदार ३४५५

मंजूर कर्ज ११४३ लाख

वाटप कर्ज १११६ लाख

औरंगाबाद जिल्ह्यात २०१६ ते २०१७ चे शिशू योजनेचे लाभार्थी

योजना प्रकार शिशू

खातेदार- १३०३०९

मंजूर ३११.२२ कोटी

वाटप कर्ज-३०८.३७ कोटी

मी बँकेतून मुद्रा योजनेतून कर्ज काढले. मी फूल व्यावसायिक आहे. मला या योजनेचा खूप फायदा झाला. या योजनेतील कर्जाने व्यवसाय वृद्धिंगत झाला. एकंदरीत ही योजना खूप चांगली आणि छोट्या व्यावसायिकांना फायदेशीर आहे.

इम्रान खान, फूल विक्रेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बीएड’ प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अध्यापक पदवी अभ्यासक्रमासाठी (बीएड) सीईटीच्या निकालानंतर प्रवेश प्रक्रियेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. पहिल्या टप्प्यात कॉलेजांनी माहिती सादर करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. १५ जूननंतर प्रवेशाच्या फेऱ्या होणार आहेत. राज्यात यंदा ४१ हजार २२८ विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) १३ व १४ मेदरम्यान बीएड प्रवेशपूर्व ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. त्याचा निकाल १ जून रोजी विद्यार्थ्यांना पहायला मिळाला. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे यंदाचे दुसरे वर्ष असून, मागील वर्षीच्या तुलनेत परीक्षार्थींची संख्या अधिक होती. ऑनलाइन परीक्षा, दूरवर असलेल्या परीक्षा केंद्रांमुळे सीईटी चर्चेत आली होती. सीईटीच्या निकालात पात्र, अपात्र असे दर्शविण्यात आले नाही. विद्यार्थ्याला किती गुण मिळाले एवढेच दर्शविण्यात आले आहे. निकालानंतर आता प्रवेश प्रक्रियेची प्रक्रिया सुरू झाली आहे. गुरुवारपासून (८ जून) कॉलेजांकडून सीईटी सेलकडे माहिती सादर करण्यात येणार आहे. कॉलेजचे संलग्नीकरण, अभ्यासक्रम, प्रवेश क्षमता, पात्र शिक्षकांची संख्या आदी माहिती सादर केली जाणार आहे. त्यासाठी कॉलेजांना १५ जूनपर्यंत मुदत दिली आहे. प्रवेश प्रक्रियेचे टप्पे १५ जूननंतर सुरू होणार असून, विद्यार्थ्यांना कॉलेजांचे पर्याय ऑनलाइन भरावे लागतील.

४० हजारांवर विद्यार्थी
राज्यात यंदा बीएड अभ्यासक्रमासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत तीन पटींनी वाढली आहे. मागील वर्षी सीईटी दिलेल्या विद्यर्थ्यांची संख्या साडेआठ हजार होती. यंदा ४१ हजार २२८ विद्यार्थ्यांनी सीईटीला नोंदणी केली होती. त्यामुळे यंदा प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. बीएडच्या तुलनेत एमएड, एमपीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याची स्थिती आहे.

राज्यात इच्छुक विद्यार्थी
- मराठी माध्यम ः २९१७३ विद्यार्थी
- इंग्रजी माध्यम ः १२०५५ विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पावसामुळे जायकवाडीत अर्धा टीएमसी पाण्याची भर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्याने मंगळवारी जायकवाडीच्या पाणीसाठ्यात जवळपास अर्धा टीएमसी पाणीसाठ्याची भर पडली. पाण्याची आवक बुधवारी थांबली होती.
जायकवाडी धरण परिसर व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवार व सोमवारी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. परिणामी, मंगळवारी दिवसभर जायकवाडी धरणात पाच हजार ३०० क्युसेकप्रमाणे पाण्याची आवक सुरू होती. मंगळवारी दिवसभरात धरणात १३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची भर पडल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली. सध्या, जायकवाडी धरणात ११४७.३९९ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा असून त्यापैकी ४०९.२९३ एवढा उपयुक्त (१८.८५ टक्के) पाणीसाठा आहे.
मागच्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी जायकवाडी धरणात जवळपास १४ फूट पाणीपातळी व १९ टक्के पाणीसाठा अधिक आहे. मागच्या वर्षी ७ जूनला जायकवाडी धरणाची पाणीपातळी १४८८ फूट एवढी होती. यावर्षी ७ जूनला पाणीपातळी १५०२.२० फूट आहे. बुधवारी धरणात जवळपास १९ टक्के पाणीसाठा असून मागच्या वर्षी धरणात शून्य टक्के पाणी साठा होता, अशी माहिती शाखा अभियंता चव्हाण यांनी दिली.

सध्याचा साठा
जायकवाडी धरणात ११४७.३९९ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा असून त्यापैकी ४०९.२९३ एवढा उपयुक्त (१८.८५ टक्के) पाणीसाठा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सुविधां’चा सेतू ढेपाळलेलाच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दहावी परीक्षेचा निकाल येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रातील महाऑनलाइन सेवा बंद पडली आहे. यामुळे सेतू सुविधा केंद्राचे काम गेल्या तीन आठवड्यांपासून ऑनलाइनऐवजी ऑफलाइन सुरू असल्याने विद्यार्थी, पालकांसह सेतू सुविधा केंद्रातील कर्मचारीही त्रस्त झाले आहेत.
गेल्या तीन आठवड्यांपासून महाऑनलाइनच्या पोर्टलमध्ये बिघाड निर्माण झाला असून, सेतू कार्यालयाचे ऑनलाईन काम कधी बंद, तर कधी सुरू असते. यामुळे येथील कर्मचाऱ्यांना विविध प्रमाणपत्रे तयार करण्यासाठी वेळ लागत आहे. सध्या सेतू सुविधा केंद्रामध्ये महा ई सेवा केंद्राच्या सर्व खिडक्यांवर विविध प्रमाणपत्रांसाठी केवळ फोटो काढून घेण्यात येतो. त्यानंतर ऑनलाइन सेवा सुरू झाल्यावर प्रमाणपत्रांचे काम करण्यात येते. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी प्रमाणपत्रे पाठविण्यात येतात. या प्रक्रियेनंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात येतात. या संपूर्ण प्रक्रियेला खूप वेळ लागत असल्यामुळे नागरिकांसह महा ई सेवा केंद्राचे कर्मचारीही त्रस्त झाले आहेत.
सेतू सुविधा केंद्रामध्ये विविध २५ काउंटरच्या माध्यमातून काम करण्यात येते. सेतू सुविधा केंद्रामधून सातबारा, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अल्पभूधारक, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, वय व अधिवास, भूमीहिन, शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक, ३० टक्के महिला आरक्षण, वास्तव्य दाखला आदी विविध १८ प्रमाणपत्रे वितरित केली जातात. हे प्रमाणत्र काढण्याचे काम ऑफलाइन झाले आहे. त्यामुळे कामाचा वेग मंदावला आहे.

दलालांचा सुळसुळाट वाढला
दहावी, बरावीचा निकाल लागल्यानंतर सेतू सुविधा केंद्रामध्ये दलालांचा सुळसुळाट वाढतो. सध्या बारावीचा निकाल लागला असून, लवकरच दहावीचा निकाल लागणार आहे. यामुळे सेतू सुविधा केंद्रांमध्ये दलालांचा वावर वाढला अाहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून जादा पैसे घेतले जात आहेत. सध्या सेतूचा कारभार मंदावल्याचा फायदा येथील दलाल घेत असून, लवकर प्रमाणपत्र काढून देतो, असे म्हणत विद्यार्थ्यांकडून अधिकचे पैसे घेण्याचे प्रकार घडत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूरच्या दोन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
गंगापूर शहरालगत असलेल्या मौजाबाद येथे तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुध‍वारी दुपारी चारच्या सुमारास घडली. शोयब सत्तार बागवान व सोहेल मोहम्मद तांबोळी (दोघेही वय २०) अशी त्यांची नावे आहेत. ते मित्रांसोबत पोहण्यासाठी गेले होते.
शोयब सत्तार बागवान व सोहेल मोहम्मद तांबोळी हे मित्रांसह पोहण्यासाठी गेले होते. हे दोघे बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर इतरांनी आरडाओरड केली. पण, घटनास्थळ गावापासून एक ते दीड किलोमीटर दूर असल्याने मदत मिळण्यास उशीर झाला. दरम्यान, मदत येईपर्यंत दोन्ही तरूण बुडाले होते. ही बातमी गंगापूर शहरात समजल्यानंतर लोकांचे जथ्थे घटनास्थळी पोहोचले. या ठिकाणी सर्वप्रथम पोहचलेले बुऱ्हाण फिटर,अजमत अण्णा, उबेद चाउस, कालू पटेल आदींनी बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दोन तासांच्या परिश्रमानंतर एका तरुणाचा मृतदेह शोधण्यास यश आले. तोपर्यंत गंगापूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी पोहचले. बऱ्याच वेळानंतर दुसऱ्या तरुणाचा मृतदेह सापडला. मृत सोहेल मोहम्मद तांबोळी हा जेष्ठ पत्रकार मोहम्मद तांबोळी यांचा मुलगा होता. शोएब हा जीपचालक सत्तार बागवान यांचा मुलगा होता. दोघांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी वैद्यकीय अधिकारी पद्ममजा सराफ यांनी केली.

रोजेदार तरूण

या दोन्ही तरुणांनी रमजानचा उपवास ठेवला होता. या घटनेमुळे गंगापूर शहरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर रात्री उशिरा दफनविधी करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधी विद्यापीठ प्रवेशाला येत्या १५जूननंतर मुहूर्त

$
0
0

औरंगाबाद : औरंगाबाद विधी विद्यापीठाच्या जनरल कौन्सिलची बैठक १० जून रोजी होणार आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती व विद्यापीठाचे कुलपती रंजन गोगोई उपस्थित राहणार आहेत. विधी विद्यापीठ स्थापनेनंतर जनरल काउंन्सिलची प्रथमच बैठक होत आहे, तर विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया १५ जूननंतर सुरू होतील, असे सूत्रांनी सांगितले.
विधी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून एस. सूर्यप्रकाश यांची मार्चमध्ये निवड झाली. त्यानंतर विद्यापीठाच्या पुढील प्रक्रियेला वेग आला. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाचे वर्ग सुरू होणार आहे. कुलगुरूंच्या निवडीनंतर मागील महिन्यात अधिकार मंडळांची स्थापना करण्यात आली. शनिवारी ‘जनरल कौन्सिल’ची बैठक होणार आहे.
विद्यापीठ स्थापनेनंतर प्रथमच होत असलेल्या या महत्वपूर्ण अधिकार मंडळाच्या बैठकीची तयारी विद्यापीठात सुरू आहे. कुलपती यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती व कुलपती, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, हायकोर्टाचे न्यायमूर्ती यांच्यासह प्रधानसचिव आदी उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत एकनाथांच्या पालखीचे १६ जून रोजी प्रस्थान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
पंढरपूर येथील आषाढी वारी महोत्सवात सामील होण्यासाठी संत एकनाथ महाराज यांची पालखी १६ जून रोजी पैठण येथून प्रस्थान करणार आहे, अशी माहिती संत एकनाथ महाराज पालखीप्रमुख वसंत महाराज पांडव यांनी दिली.
१६ जून रोजी संध्याकाळी संत एकनाथ महाराज यांच्या पादुका विधिवत पूजन करून पालखीत ठेवल्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी ती गोदावरी नदीतिरावरील पालखी ओट्यावर ठेवण्यात येणार आहे. ऐन सूर्यास्ताच्यावेळी पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे होईल. १९ दिवसांच्या प्रवासानंतर व मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील १९ गावांमध्ये मुक्काम केल्यानंतर ४ जुलै रोजी संत एकनाथ महाराज यांची पालखी पंढरपूरला पोहचणार आहे. संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे मार्गक्रमण पुढीलप्रमाणेः चनकवाडी, हादगाव, लाडजळगाव, कुंडल पारगाव, मुंगुसवाडी, राक्षसभुवन, रायमोह, पाटोदा, दिघोळ, खेर्डा, दांडेगाव, अनाले, परंडा, बिटरगाव, कुर्डू, अरण, करकंब, होळे, शिरढोण मार्गे पंढरपूर. या पालखी सोहळ्यात सामील होण्यासाठी १६ जून रोजी पैठण येथे भाविक व वारकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संत एकनाथ महाराज पालखी प्रमुख वसंत महाराज पांडव यांनी केला आहे.

पाच रिंगण सोहळे

३ जुलै रोजी आषाढी वारीत महोत्सवात सहभागी झाल्यानंतर ४ जुलै रोजी पंढरपूर नगर प्रदक्षिणा, व ८ जुलैपर्यंत पालखीचा मुक्काम पंढरपूरच्या नाथ मंदिरात राहणार आहे. १६ जून ते ३ जुलै दरम्यान संत एकनाथ महाराज यांच्या पालखीत पाच रिंगण सोहळे होणार आहेत. १९ जून रोजी मिडगाव येथे पहिला, २३ जून पारगाव घुमरे येथे दुसरा, २६ जूनला नागरडोह येथे तिसरा, २९ जूनला कव्हेदंड येथे चौथा व ३ जुलै रोजी पंढरपूर येथे पादुका आरती व पाचवे उभे रिंगण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images