Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​ दूध खरेदी दरात वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यात शासकीय दूध योजनेमार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या गाय व म्हशीच्या दूध दरामध्ये प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढ करणार आहे. येत्या चार दिवसांत हा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी शनिवारी दिली.
एका खासगी कार्यक्रमानिमित्त जानकर शहरात आले होते. त्याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मंत्री झाल्यापासून दूध खरेदी दरात आतापर्यंत सहा रुपयांची वाढ केली आहे. मात्र, कॉँग्रेस आघाडी सरकारच्या राजवटीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून दरवाढीसाठी प्रयत्न झाले नाहीत, असा आरोप जानकरांनी यावेळी केला.
सरकार जे बोलतो ते केलेच पाहिजे. आम्ही शेतकऱ्यांचे मुले आहोत. शेतकऱ्यांच्या हितासाठी दूध दरवाढीचा निर्णय घेतला आहे. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून, येत्या चार दिवसांत खरेदी दर वाढीचा निर्णय घेऊ. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून राज्यातील दूध संघाना निधीबाबत मदत करण्यात आली आहे. नाव शेतकऱ्यांचे व काम आपले, अशा प्रकारे कोण्या संघाचे कामकाज असेल तर असे धंदे चालवून घेणार नाही. सर्व लेखाजोखा तपासू, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, कर्जमाफीसह अन्य विषयावर मुख्यमंत्री विश्वासात घेतात, चर्चा करतात, असेही त्यांनी एका प्रश्नांवर बोलताना सांगितले.

राज्यात एकच ब्रॅंड
अमूलच्या धर्तीवर राज्यात दुधाचा एकच ब्रॅंड असावा, यासाठी प्रयत्नशील असल्याचे जानकर यांनी सांगितले. महानंदाला ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न झाले आहेत. मागील सरकारने स्वतःचा ब्रँड वाढविण्याचे काम केले, तर सरकारी दुधाच्या बँडकडे दुर्लक्ष केले, असा आरोप जानकर यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कर्जमाफी’तील आरोपी ‘नॉट रिचेबल’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा मध्यवर्ती बँकेत बेकायदा कर्जमाफी देऊन साडेआठ कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणातील आरोपींनी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी हजर राहण्याच्या बजावलेल्या नोटीसला ठेंगा दाखवत दांडी मारली. त्यामुळे त्यांचा जबाब नोंदविण्यात आला नाही.
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाने त्यांच्या मर्जीतील विविध को ऑपरेटिव्ह सोसायट्यांना आठ कोटी ५२ लाख १ हजार ८६२ रुपयाचे कर्ज वाटप केले आणि ते बेकायदेशीरपणे माफ केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या निर्णयाने बँकेचे कोट्यवधींचे नुकसान झाले. ही बाब तपासात समोर आल्यानंतर क्रांती चौक पोलीस ठाण्यात संचालक मंडळासह १३२ लोकांवर भांदवी कलम ४०६, ४०९, ४२०, ४६३, ४६८, ४७१, १२० ब या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या पैकी अनेकांना शुक्रवारी पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन नोटीस बजावल्या. मात्र, त्यापैकी बहुतांश आरोपी पोलिसांकडून नोटीस घेण्यासाठी समोर आले नाहीत. हजर राहण्याची नोटीस नातेवाईकांना सुपूर्द करून पोलिसांनी आरोपींना भ्रमणध्वनीवर कॉल केला असता त्यांचे भ्रमणध्वनी बंद होते. शनिवारी या आरोपींना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींपैकी एक असलेल्या आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून त्यांच्या कार्यकर्त्यांनी सहाय्यक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात यांच्याशी संपर्क केला होता. त्यांच्याकडून सोमवारी या प्रकरणात जबाब देण्याबाबत सांगण्यात आले आहे.

आरोपींनी पोलिसांसमक्ष जबाब नोंदवावेत अशी अपेक्षा आहे. अब्दुल सत्तार यांच्या कार्यकर्त्याने संपर्क केला होता. मात्र, अन्य कोणीही संपर्क केलेला नाही. - रामेश्वर थोरात, सहाय्यक पोलिस आयुक्त

आम्ही एक रुपयाचाही भ्रष्ट्राचार केला नाही. या प्रकरणात मला नोटीस मिळालेली नाही. तरीही सत्यता पोलिसांसमोर यावी यासाठी संबंधित सर्व कागदपत्र घेऊन मी जबाब नोंदविण्यास तयार आहे. - अब्दुल सत्तार, आमदार, जिल्हा बँकेचे संचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सामाजिक बांधिलकी पक्षाचे बलस्थान

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘सामाजिक बांधिलकी जपणे हे पक्षाचे बलस्थान असते. तीन वर्षांपासून सत्तेबाहेर असलो तरी अविरत काम करणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा राज्याचे वैभव म्हणून समोर आणायचे आहे,’ असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी शनिवारी सकाळी हडको येथील राष्ट्रवादी भवनात ध्वजारोहण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, माजी आमदार संजय वाघचौरे, शहराध्यक्ष काशिनाथ कोकाटे, माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, माजी शहराध्यक्ष मुश्ताक अहमद, कदीर मौलाना, नगरसेविका अंकिता विधाते, माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय, वक्ता सेलचे प्रमुख प्रदीप सोळुंके, पांडुरंग तायडे यांची उपस्थिती होती. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मुंडे यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ‘पंधरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्र व राज्यात सत्तेत होता. मागील तीन वर्षांपासून पक्ष सत्तेत नसला तरी जनसामान्यांसाठी काम थांबलेले नाही. राज्यात पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी प्रयत्नशील रहा’ असे मुंडे म्हणाले.
दरम्यान, शेतकरी संपाबाबत मुंडे यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. येवला तालुक्यात शेतकरी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी मुंडे रवाना झाले. कोपरगाव, वैजापूर व येवला तालुक्यातील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यासाठी रविवारी मुंडे शहरात दाखल होणार आहेत. पक्ष संघटन वाढवण्यासाठी महत्त्वाची बैठक होणार आहे.

कार्यकारिणीत आज फेरबदल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीत रविवारी फेरबदल करण्यात येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. समृद्धी महामार्गाचा प्रश्न आक्रमकपणे हाती घेण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पक्षात मोठे फेरबदल होणार आहेत. शहर कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी, युवक काँग्रेस आणि विद्यार्थी कार्यकारिणीत बदल करण्यात येणार आहेत. सध्या आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर जिल्हाध्यक्ष आहेत. मात्र, वैजापूर मतदारसंघात पूर्णवेळ लक्ष देणार असल्यामुळे जिल्हाध्यक्षपदी दुसऱ्या नेत्याची वर्णी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलग तिसऱ्या दिवशी उस्मानाबादमध्ये पाऊस

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद शहर आणि परिसरामध्ये शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली असून, मृग नक्षत्राच्या या सुरुवातीमुळे शेतकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.
मृग नक्षत्र लागल्यापासून उस्मानाबाद आणि शहर परिसरामध्ये पाऊस होत आहे. शहरामध्ये शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला असून, रात्री उशिरापर्यंत पाऊस होत होता. या पावसामुळे शहरातील सखोल भागात पाणी साचले होते. विशेषत: बस स्थानक परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
या पावसाळ्यातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा पाऊस आहे. या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण असून, वाफसा होताच शेतकरी उडीद, मूग, सोयाबीनची पेरणी करतील. या पावसाने शहरातील नगरपालिकेच्या बोअरवेलला पाणी वाढण्यास मदत होणार आहे. यामुळे शहरवासीयांचा पाण्याच्या प्रश्नावर दिलासा मिळाला आहे. शहरात पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पाऊस होत असल्यामुळे, शेतकऱ्यांची तयारीसाठी लगबग सुरू झाली आहे. बी-बियाण्यांच्या खरेदीसाठी गर्दी झाली असून, शेतांमध्ये कामांनाही वेग आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटदारांच्या नफेखोरीला आळा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे करणाऱ्या कंत्राटदारांच्या नफेखोरीला आळा घालण्यासाठी सुस्पष्ट मार्गदर्शक सूचना लवकरच काढण्यात येतील, अशी माहिती जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी दिली.
खुलताबाद तालुक्यातील गिरीजा नदीवर झालेल्या नाला खोलीकरणाच्या कामाची पाहणी केल्यानंतर, टाकळी राजाराय येथे ते बोलत होते. कृषी विभागाच्या वतीने हे काम करण्यात आले असून, डवले यांनी या कामाविषयी समाधान व्यक्त केले. या वेळी उपसचिव नारायण कराड, विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, उपविभागीय कृषी अधिकारी उदय देवळाणकर, तालुका कृषी अधिकारी वैजनाथ हांगे, मंडळ कृषी अधिकारी विशाल आगलावे, कृषी पर्यवेक्षक मिलिंद कोलंबीकर, कृषी सहायक अशोक पठाडे, पंचायत समिती उपसभापती गणेश अधाने, माजी उपसभापती राजेंद्र भागडे, रमेश करपे उपस्थित होते.
दोन तास पाहणी करताना डवले यांनी कामांची मोजमाप पुस्तिका, अंदाजपत्रक, प्रत्यक्ष झालेले काम यांची तपासणी केली. कृषि विभागाने तालुक्यातील प्रत्येक गावाचे तयार केलेल्या वॉटर बजेटची माहिती त्यांनी घेतली. पावसाचे पडणारे पाणी, वापरले जाणारे पाणी यातील तुट कशी भरून काढता येईल. त्यासाठी काय केले पाहिजे याविषयीची चर्चा केली. वॉटर बजेटचे विविध पैलू समजावून घेत याबाबत जल तज्ज्ञांकडून वॉटर बजेटमध्ये काटेकोरपणा आणण्यासाठी आढावा घेतला जाणार असल्याचे सांगितले. जलयुक्त शिवारच्या कामांमध्ये आर्थिक काटेकोरपणा आणणार असल्याचे सांगून ते म्हणाले, ‘कमी पैशांत जास्त कामे करण्यावर सरकारचा भर आहे. कंत्राटदारांऐवजी शेतकऱ्यांनी कामे करावे. जलयुक्त शिवारच्या कामांमध्ये लोकसहभाग वाढविण्याची गरज आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेणापूरचा नगराध्यक्ष भाजपचा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, लातूर

रेणापूरचे नगराध्यक्ष म्हणून रेणापूर विकास आघाडीचे अभिषेक आकनगिरे यांची निवड झाली आहे. तर, उपनगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या रबियाबी शेख यांची निवड झाली आहे.
रेणापूर नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपला आठ, काँग्रेसला सहा, राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाल्या होत्या. तर दोन जागांवर अपक्ष उमेवदवार विजयी झाले होते. कोणत्याच पक्षाला या निवडणूकीत पुर्ण बहुमत मिळाले नाही, मात्र सर्वाधिक आठ जागा मिळाल्यामुळे भाजपने सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक व एक अपक्ष अशा दहा नगरसेवकांचा गट तयार करून रेणापूर विकास आघाडीची स्थापना केली. नगराध्यक्ष पदासाठी पाच जून रोजी रेणापूर विकास आघाडीकडून अभिषेक आकनगिरे, तर रेणापूर नगरपंचायत विकास आघाडीकडून शिवाजी पाटील यांनी अर्ज दाखल केले होते.
रेणापूर नगरपंचायत येथे पिठासीन अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी जनार्धन विधाते यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीसाठी विशेष बैठक घेण्यात आली. या वेळी आकनगिरे यांना दहा मते मिळाली, तर काँग्रेसचे शिवाजी पाटील यांना सात मते मिळाली. नगराध्यक्षाच्या निवडीनंतर दुपारी साडेबारा वाजता उपनगराध्यक्ष पदासाठी मतदान घेण्यात आले. यामध्ये रबियाबी शेख यांना दहा मते तर गजेंद्र चव्हाण यांना सात मते पडली. निवडीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून जनार्धन विधाते यांनी तर सहाय्यक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण सुकलवाड, नायब तहसीलदार आर. के. कराड यांनी काम पाहीले.
निवड प्रक्रीया झाल्यानंतर नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे व उपनगराध्यक्ष रबियाबी शेख यांची येथील रेणापूर नगरपंचायत कार्यालयापासून ते रेणुकादेवी मंदिरपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या वेळी नुतन पदाधिकाऱ्यांनी रेणूकामातेचे दर्शन घेतले. तसेच रेणुकादेवी मंदिर परिसरात नूतन नगराध्यक्ष अभिषेक आकनगीरे व उपनगराध्यक्ष रबियाबी शेख यांचा भाजप नेते रमेश कराड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऋतुजा भोसलेला विजेतेपद

$
0
0

ऋतुजा भोसलेला विजेतेपद
दुहेरीत प्रांजला-जिओक्सी अजिंक्य
आयटीएफ महिला टेनिस स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ईएमएमटीसीतर्फे आयोजित एन्ड्युरन्स आयटीएफ महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत ऋतुजा भोसलेने विजेतेपद पटाकाविले. दुहेरीत प्रांजला येडलापल्ली व जिओक्सी झाओ जोडी अजिंक्य ठरली.
विभागीय क्रीडा संकुलातील एन्ड्युरन्स टेनिस सेंटरमध्ये या स्पर्धेचा शनिवारी समारोप झाला. एकेरीच्या अंतिम सामन्यात ऋतुजाने विजयी घोडदौड कायम ठेवताना १६ वर्षीय महक जैनचा ६-४, ६-४ असा पराभव करून विजेतेपद पटाकाविले. एक तास २४ मिनिटे रंगलेल्या अंतिम सामन्यात पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी तुल्यबळ खेळ केला. वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या ऋतुजाने नवव्या गेममध्ये महकची सर्व्हिस भेदली. त्यानंतर स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट ६-४ असा जिंकून सामन्यात आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये ऋतुजाने पाचव्या गेममध्ये महकची सर्व्हिस भेदली व पाठोपाठ स्वतःची सर्व्हिस राखत सामन्यात ४-२ अशी आघाडी घेतली. त्यानंतर महकने बेसलाइनवरून सुरेख खेळ करत आठव्या गेममध्ये ऋतुजाची सर्व्हिस भेदली व या सेटमध्ये ४-४ अशी बरोबरी साधली. ऋतुजाने चतुराईने खेळ करत महकची नवव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट ६-४ असा जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या जेतेपदामुळे ऋतुजाला १२ डब्ल्यूटीए गुण व २३५२ डॉलरचे पारितोषिक, तर उपविजेत्या महक जैनला ७ डब्ल्यूटीए गुण व १४७० डॉलर रकमेचे पारितोषिक मिळाले.
दुहेरीच्या अंतिम लढतीत प्रांजला येडलापल्ली व जिओक्सी झाओ या जोडीने ऋतुजा भोसले व कनिका वैद्य या जोडीचा सुपर टायब्रेकरमध्ये गेलेल्या अटीतटीच्या लढतीत २-६, ६-३, १०-४ असा पराभव करून विजेतेपद पटाकाविले. दुहेरी गटातील विजेत्या जोडीला ९०० डॉलर व १२ डब्ल्यूटीए गुण, तर उपविजेत्या जोडीला ५१० डॉलर व ७ डब्ल्यूटीए गुण मिळाले.
नाथ व्हॅली स्कूलचे मुख्याध्यापक रणजितदास, ईएमएमटीसीच्या अध्यक्षा वर्षा जैन, एमएसएलकटीएचे सचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्यांना पारतोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी आयटीएफ सुपरवायजर शीतल अय्यर, एन्ड्युरन्सचे एचआर हेड संजय दत्ता आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आशुतोष मिश्रा, गजेंद्र भोसले, प्रवीण गायसमुद्रे आदींनी पुढाकार घेतला.

अंतिम निकाल ः एकेरी - ऋतुजा भोसले वि. वि. महक जैन ६-४, ६-४.
दुहेरी गट - प्रांजला येडलापल्ली-जिओक्सी झाओ वि. वि. ऋतुजा भोसले-कनिका वैद्य (२-६, ६-३, १०-४).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी बसला भीषण अपघात, १२ जणांचा मृत्यू

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

जिल्ह्यातील धानोऱ्याजवळ खासगी बसला अपघात झाला . या अपघातात १२ जणांचा मृत्यू तर २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईहून लातूरच्या दिशेनं जाणाऱ्या खासगी बसला हा अपघात झाला.

आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मुंबईहून लातूरच्या दिशेनं जाणाऱ्या सागर ट्रॅव्हल्सच्या बसला हा अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या बसवरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस एका अवघड वळणावर रस्ता सोडून उलटली आणि १०० फुटांवर जाऊन थांबली.

दरम्यान अपघात झालेल्या बसचा ड्रायव्हर वेगात गाडी चालवत होता असं प्रवाशांनी सांगितलं आहे. अपघातातील मृतांमध्ये दोन महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. जखमींवर अहमदनगर, आष्टी , कडा येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुलपतीनीं घेतला विकास कामांचा आढावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद विधी विद्यापीठाच्या ‘जनरल कौन्सिल’ची बैठक पार पडली. विद्यापीठाचे कुलपती व सुप्रिम कोर्टाचे न्यायमूर्ती रंजन गोगाई व न्यायमूर्ती एन. व्ही. रामन्ना यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत येत्या शैक्षणिक वर्षात राबविण्यात येणारे अभ्यासक्रम, पायाभूत सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर कांचनवाडी येथील वसतिगृहांच्या डागडुजीच्या कामांना भेट देत पाहणी करण्यात आली.
औरंगाबाद विधी विद्यापीठ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होत आहे. मार्चमध्ये कुलगुरू म्हणून एस. सूर्यप्रकाश यांची निवड झाली. त्यानंतर विद्यापीठाच्या पुढील प्रक्रियेला गती आली. ‘विधी विद्यापीठ कायदा-२०१४’ नुसार अधिकार मंडळांची स्थापना करण्यात आली. त्यात ४ जूनला ‘अॅकडमिक कौन्सिल’ची बैठक झाल्यानंतर शनिवारी ‘जनरल बौन्सिल’ची बैठक पार पडली. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती रंजन गोगाई, न्यायमूर्ती एस. व्ही. रामन्ना यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. त्याला हायकोर्टाचे न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे, न्यायमूर्ती गंगापूरवाला कुलगुरू भवानी प्रसाद पंडा, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सिताराम कुंटे यांची उपस्थिती होती. या बैठकीत नव्याने उभारण्यात येत असलेल्या या विद्यापीठाच्या भौतिक सुविधांवर अधिक चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रवेश प्रक्रिया, वर्गखोल्या, अत्याधुनिक साधनसामुग्री, ग्रंथालयासारख्या विविध बाबीसह संवैधानिक अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची भरती प्रक्रिया, शासनाकडून मिळणारे सहकार्य याबाबत चर्चा आणि त्यानुसार विद्यापीठाला सूचना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. बैठकीनंतर विद्यार्थी वसतिगृह व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांना भेट देण्यात आली. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी कांचनवाडी परिसरात उभारलेल्या इमारतींमध्ये वसतिगृह असेल. या जागेची, सुविधांची पाहणी करण्यात आली.

५ कोटी रुपयांची मागणी
विधी विद्यापीठाला शासनाने मार्चमध्ये सुमारे १ कोटी २० लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून विद्यापीठाच्या स्थापनेबाबत आवश्यक त्याबाबी उभारल्या जात आहेत. त्यासह विद्यापीठ सुरू झाल्यानंतर लागणाऱ्या विविध विकासकामांसाठी ५ कोटी रुपयांचा नवा प्रस्ताव विद्यापीठाकडून शासनाला पाठविण्यात आला आहे. विद्यापीठाचे वर्ग शासकीय बीएड कॉलेजमध्ये भरणार आहेत. सुरुवातीला दोन वर्षे हे वर्ग येथे चालणार आहेत. तेथील डागडुजी, अधिकारी, कर्मचारी भरती प्रक्रिया, विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले जाईल, असे सूत्रांनी सांगितले, तर विधी विद्यापीठाला निधी उपलब्ध करू दिला जाईल, असे शासनाकडूनही आश्वासन देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादचा ओंकार ‘जेईई’मध्ये आठवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ठराविक तासच अभ्यास केला असे नाही, परंतु जो अभ्यास केला तो मनापासून. नियमित अभ्यास, छोट्या-छोट्या नोट्स आणि सराव ही यशाची ‌त्रिसूत्री असल्याचे देशातून आठव्या रँक मिळविणाऱ्या ओंकार देशपांडे यांने ‘मटा’शी बोलताना सांगितले. ओंकारला नॉवेल वाचण्याचा छंद आहे तर, बास्केटबॉल हा त्याचा आवडता खेळ.
आयआयटी प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेला अतिशय खडतर मानले जाते. या परीक्षेत औरंगाबादच्या अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनिय कामगिरी केली. औरंगाबादचा विद्यार्थी ओंकार माणिक देशपांडे हा देशभरात आठवा रँक मिळविला आहे. औरंगाबादमध्येच त्याने परीक्षेची तयारी केली. निकालानंतर तो म्हणाला, ‘पहिल्या शंभरमध्ये येईल अशी खात्री होती, परंतु पहिल्या दहामध्ये असेल असे वाटले नव्हते.’
ओंकारचे वडील डॉ. माणिक देशपांडे हे भूलतज्‍ज्ञ, तर आई डॉ. विशाखा या स्त्रीरोगतज्‍ज्ञ आहेत. शालेय शिक्षण ‘टीसीएस’मधून झालेल्या ओंकारने दहावीनंतर आयआयटीची तयारी केली. सुरुवातीपासून मॅथ्सची आवड होती. बायोलॉजी आवडता विषय नसल्याने आपल्याला काय करायचे हे ठरवलेले होते. त्यानंतर नियमित अभ्यासावरच लक्ष केंद्रीत केले. वाचनाची आवड असल्याने जे शिकवले ते लक्षात ठेवले. त्याच दिवशी अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर दिला. त्यासह छोट्या-छोट्या नोट्स काढल्या. त्यानंतर त्याचा सराव केला. त्यामुळे परीक्षा अतिशय सोपी गेल्याचे तो सांगतो. ठराविक तासच अभ्यास केला, असे नाही जे आवडते ते केले. विद्यार्थ्यांनी रोजच्या रोज अभ्यास, सरावावर भर द्यावा. अभ्यासाचा तणाव घेत अभ्यास करणे योग्य नसल्याचेही तो सांगतो. ‘कम्प्युटर सायन्स’ला त्याला प्रवेश घ्यायचा असून आयआयटी पवई पहिली पसंत असल्याचे त्याने सांगितले.

वाचनाची आवड
ओंकारला वाचनाची लहानपणापासून आवड आहे. त्याला नॉव्हेल वाचायला आवडतात. त्यासह पेहणे आणि बास्केटबॉल हे क्रीडा प्रकार त्याला आवडतात. आपल्या आवडीला कधीही आपण मुरड घातली नाही, असे त्याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धी महामार्गाबाबत बाजू ऐकायचीयः पवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातील कुठल्याही विकास प्रकल्पाला माझा विरोध नाही. मात्र विकास साधताना अन्य घटकांवर अन्याय होता कामा नये, समृद्धी महामार्गासाठी ज्या जमिनी संपादित होणार आहेत. त्या शेतकऱ्यांच्या शंका आहेत. त्या ऐकून घेण्यासाठी आलो आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा मराठवाडा व विदर्भाला फायदा होणार आहे, मात्र तुमचा त्यासाठी विरोध आहे काय?, असे विचारल्यावर शरद पवार म्हणाले,‘माझा कुठल्याही प्रकल्पाला विरोध नाही. मी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आलो आहे. या प्रकल्पात शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. त्यांना मावेजा कसा देणार? केंद्रात आमचे सरकार असताना अशा प्रकल्पग्रस्तांसाठी आम्ही भरीव तरतूद केली. जमिनीचे नीट मोजमाप झाले पाहिजे, अर्ध्या तुकड्यातून रस्ता प्रस्तावित केला गेला. काही ठिकाणी अन्य अडचणी आहेत, हे मांडण्यासाठी १६-१७ तालुक्यांतील शेतकरी माझ्याकडे आले होते. सरकारने याबाबत भूमिका स्पष्ट करावी, शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल तर राज्य सरकारला सांगून दुरुस्ती सूचविणे आणि समन्वयाची भूमिका असेल. ते करूनही जर सरकारने शेतकऱ्यांचे समाधान केले नाही तर पुढे शेतकरी ठरवतील त्या पद्धतीने आंदोलन केले जाईल.’

शेतकऱ्यांकडे सहानुभूतीने पाहावे

शेतकरी कर्जमाफी ही आर्थिक स्वातंत्र्याची पहाट आहे, असे सांगून पवार म्हणाले, की निर्णय घेतला म्हणजे पैशाची तरतूद केली असेल. ‘मम’ म्हटल्यावरच पुढची तरतूद केली असेल, असा टोला पवारांना लगाविला. जुलै महिन्यात राजकीय भूकंप होणार काय? असे विचारल्यावर पवार म्हणाले, की त्याची मला तरी काही माहिती नाही.

आज शेतकरी परिषद

प्रस्तावित समृद्धी महामार्गावर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होणार आहेत. त्यांच्या अडचणी आहेत. सरकार त्यांचे म्हणणे ऐकून घेत नाही. समृद्धी प्रकल्प विरोधी शेतकऱ्यांची राज्यस्तरीय परिषद सोमवारी औरंगाबादेत होणार आहे. संत तुकाराम नाट्यगृहात दुपारी एक वाजता ही परिषद होईल. या परिषदेसाठी दहा जिल्ह्यांमधील शेतकरी उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत ही परिषद होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी आंदोलनाच्या आढाव्यासाठी बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शेतकरी कर्जमुक्ती व अन्य मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनाचा आढावा घेण्यासाठी शरद जोशी यांच्या नेतृत्वात गेल्या तीन दशकांत काम केलेल्या व सध्या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या प्रमुख नेत्यांची बैठक येत्या १६ जून रोजी औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आली आहे. शंकर धोंडगे यांच्या पुढाकाराने ही बैठक होणार आहे.
सततची नापिकी, दुष्काळ व सरकारकडून शेतमालाच्या भावाबाबत कायम होत असलेली अवहेलना यांमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. गेल्या तीन वर्षांत सर्व संघटना, विरोध पक्ष व अनेक माध्यमांतून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, स्वामीनाथन समितीच्या शिफारसी, पेन्शन, हमीभाव या महत्त्वाच्या मागण्या करण्यात येत आहेत. सरकारकडून मात्र केवळ घोषणा करण्यात येत आहेत.
या पार्श्वभूमीवर इतिहासात प्रथमच १ जूनपासून शेतकरी संपावर गेले. राज्यभर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातील मागण्या पूर्णपणे तडीस नेण्यासाठी अनुभवी नेत्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १६ जून रोजी सकाळी ११ वाजता सुभेदारी विश्रामगृह येथे ही बैठक होणार आहे. या बैठकीला रामचंद्र पाटील, विजय जावंधिया, वामनराव चटप, मोरेश्वर टेंभुर्डे, किशोर माथनकर, अनिल घनवट, सरोज काशीकर आदी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्णय स्वागतार्ह पण... ः पवार

$
0
0

औरंगाबाद : महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर अत्यंत अस्वस्थ होता. राज्य सरकार आणि सुकाणू समिती यांच्यात रविवारी झालेल्या चर्चेत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर केली गेली. हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे, मात्र सरसकट, तत्वतः आणि निकष या तीन शब्दांमुळे शंका घेण्यास वाव आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
‘राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी आंदोलन पहायला मिळाले. सर्व शेतकरी संघटना एका व्यासपीठावर आल्या. पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला. शेतकऱ्यांची एकजूट ही समाधानाची बाब आहे. सुकाणू समिती आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली आणि शेतकऱ्यांच्या पदरात माप पाडून घेण्यात समिती यशस्वी ठरली.’
राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. हा निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे. शेतकऱ्यांवर दीर्घ व अल्प मुदतीचे कर्ज असते. हे दोन्ही कर्जमाफी होणार आहे. हा निर्णय तातडीने राबविला पाहिजे. खरीप पेरणी तोंडावर आहे. उद्यापासून शेतकरी, शेतकरी संघटनांनी नवीन कर्ज मिळविण्यासाठी बँका, सोसायट्यांकडे जावे आणि नवीन कर्ज पदरात पाडून घ्यावे, बि बियाणे घ्यावे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक होईल, असे पवार यांनी सांगितले.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरसकट कर्जमाफी जाहीर केली, मात्र काही गोष्टींवर शंका आहे. तत्वतः, सरसकट आणि निकष हे तीन शब्द वापरले आहेत. सरकार योग्य निकष समोर ठेवूनच सरसकट कर्जमाफी करेल. याबाबत कुठलीच शंका नाही कारण माझा चंद्रकांत पाटलांवर विश्वास आहे. सरकार पैशाची व्यवस्था एक दिवसात करू शकते. मात्र या शब्दांबाबत उद्या विश्लेषण करण्याची वेळ सरकारवर येऊ नये. आज जाहीर झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

डॉ. स्वामिनाथन समितीच्या शिफरसी स्वीकारण्याबाबत एक शिष्टमंडळ करून दिल्लीला जाण्यासंदर्भात जाहीर करण्यात आले. हे करताना सरकारने समितीने सुचविलेल्या उत्पादन खर्च व ५० टक्के नफा या शिफारशीबाबत आग्रह धरून पदरात पाडून घेतले पाहिजे.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँगेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या नोटांचा सिडकोत पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिडको एन २ परिसरातील कामगार चौकाजवळील एका रिकाम्या प्लॉटवर जुन्या हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटांचा अक्षरशः पाऊस पडला. रविवारी सकाळी साडेअकरा वाजता हा प्रकार उघडकीस आला. मुकुंदवाडी पोलिसांनी ही रक्कम जमा केली असता साडे दहालाख रुपयांच्या नोटा असल्याचे पोलिसांनी सांगितले. या ठिकाणी एका मोठ्या ज्वेलर्सचे टॅगही आढळले.
कामगार चौकाजवळी प्लॉट क्रमांक ७९ येथे बाभळीचे झाड आहे. या झाडावर पिशवीत भरून जुन्या नोटा उधळण्यात आल्या. यापैकी काही नोटा जमिनीवर, तर काही नोटा झाडावर अडकल्या. रविवारी सकाळी येथील रहिवाशांनी मुकुंदवाडी पोलिसांना ही माहिती दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पीएसआय सुषमा पवार, प्रवीण कापरे, एस. बी. सोहळे, माधुरी खरात आदींनी घेतली. पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी देखील घटनास्थळ गाठले. पोलिसांनी या सर्व नोटा जप्त केल्या. रक्कमेची मोजणी करण्यात आली. यावेळी ही रक्कम साडेदहा लाख रुपये असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी एका ज्वेलर्सच्या दुकानाचे टॅगही आढल्याची माहिती मुकुंदवाडी पोलिसांनी दिली. ही रक्कम काळे धन असल्याचा संशय व्यक्त होत असून, ती फेकणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू आहे.

बघ्यांची गर्दी
नोटांचा पाऊस पडल्याची माहिती मिळताच बघ्यांची प्लॉटकडे धाव घेतली. काही वेळातच शेकडो नागर‌िकांची गर्दी जमा झाली, मात्र जुन्या नोटा असल्याचे समजताच काहींनी काढता पाय घेतला, मात्र ही गर्दी आवरताना पोलिसांची देखील तारांबळ उडाली.

सीसीटीव्हीच्या मदतीने शोध सुरू
जुन्या नोटांची मोठी रक्कम फेकल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नोटा फेकणारा कोण व नोटाबंदीच्या सहा महिन्यांनंतर फेकण्याचे कारण काय, याचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत संशयितांच्या तपासासाठी घेण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांच्या हितासाठी मदत केंद्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी मराठवाडा व विदर्भातील विद्यार्थ्यांची गर्दी असते. ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यापीठात पदव्युत्तर वर्गाला प्रवेश घेतात, मात्र वसतिगृह प्रवेश आणि प्रवेश प्रक्रियेची पुरेशी माहिती नसल्यामुळे अडचण निर्माण होते. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने विद्यार्थी मदत केंद्र सुरू करणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
पदव्युत्तर प्रवेशासाठी सीईटी जाहीर झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेतील अभ्यासक्रमांची माहिती घेण्याचा विद्यार्थी प्रयत्न करतात, मात्र विद्यापीठ कॅम्पसमध्ये मार्गदर्शन केंद्र नसल्यामुळे निराशा होते. बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील असून विद्यापीठात पहिल्यांदाच आले आहेत. पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया, वसतिगृह प्रवेश, शिष्यवृत्ती प्रक्रिया, अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा केंद्राबाबत माहिती घेताना विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व मदत करण्यासाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया विद्यार्थी मदत केंद्र सुरू करणार आहे. या शैक्षणिक वर्षात आठ ते दहा दिवस मदत केंद्र कार्यरत राहील असे ‘एसएफआय’चे राज्य उपाध्यक्ष सुनील राठोड यांनी सांगितले. विद्यापीठाचा ‘वाय’ कॉर्नर, सामाजिकशास्त्रे विभाग इमारत आणि प्रशासकीय इमारत परिसरात केंद्र सुरू करण्यात येईल. दूरवरून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या ठिकाणी घेऊन जाणे, अर्ज भरून देणे आणि तांत्रिक अडचण असल्यास मदत करण्याचे काम ‘एसएफआय’चे कार्यकर्ते करणार आहेत. प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्यासाठी मदत केंद्र कार्यरत राहणार आहे. या तीन केंद्रात विद्यार्थी संपर्क साधून मदत घेऊ शकतील असे संयोजकांनी सांगितले.

दरवर्षी मदत केंद्र
विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एसएफआय दरवर्षी मदत केंद्र चालवत असते. मात्र, काही कारणांमुळे दोन वर्षे मदत केंद्र सुरू नव्हते. यावर्षी विद्यार्थी मदत केंद्र सुरू करून उपक्रमात सातत्य ठेवले जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेची गर्दी लक्षात घेऊन येत्या दोन दिवसात मदत केंद्र कार्यरत होणार आहे. किमान आठ ते दहा दिवस केंद्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत केली जाणार आहे. सध्या ‘पीजी सीईटी’च्या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे.

विद्यार्थी मदत केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्याचा उद्देश आहे. हा उपक्रम गेली अनेक वर्षे सुरू आहे. विद्यापीठातील विविध विभागांची माहिती मिळवणे कठीण असल्यामुळे विद्यार्थ्यांना मदत केंद्राचा उपयोग होईल.
- सुनील राठोड, राज्य उपाध्यक्ष, एसएफआय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उन्हाळ्याच्या हंगामात ‘एसटी’ सुसाट

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उन्हाळ्याची सुट्टी आणि लग्नाचा हंगाम यांमुळे गेल्या दोन महिन्यांमध्ये एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढली आहे. यातून एसटीच्या उत्पन्नामध्ये घसघशीत वाढ झाली असून, या फायद्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. फक्त मे महिन्यामध्येच उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एसटीला १६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
शाळांना सुट्या असल्यामुळे एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये प्रवासाचे नियोजन होत असते. याच काळामध्ये लग्नांचाही हंगाम असल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीसाठी हा सुगीचा काळ असतो. त्यामुळेच, एसटीनेही मे महिन्यासाठी प्रवासाविषयी नियोजन आखले होते. उस्मानाबाद जिल्ह्यामध्येही प्रवाशांना आकर्षित करण्यामध्ये एसटीला यश मिळाले आहे. त्यामुळे, एकट्या मे महिन्यात एस टी च्या उस्मानाबाद विभागाने सुमारे १६ कोटी रुपयांचे निव्वळ उत्पन्न प्राप्त केले आहे. यातही जिल्ह्यातील ६ आगारांपैकी उस्मानाबाद आगाराची कामगिरी जिल्ह्यात सरस राहिली आहे.
उस्मानाबाद विभागाचे विभाग नियंत्रक राजीव साळवे व विभागीय वाहतूक अधिकारी अमोल गोंजारी यांनी मे महिन्यासाठी नियोजन केले होते. त्यामध्ये उस्मानाबाद विभागाला सुमारे १६ कोटी रुपयांचा उत्पन्नाचा पल्लागाठता आला. यासाठी जिल्ह्यातील ४६२ बसनी एकूण ५४ लाख ५१ हजार किलोमीटरचा प्रवास केला. यातून बसला २९.३४ रुपये प्रतिकिलोमीटरला उत्पन्न मिळाले. गतवर्षी मे महिन्यात उस्मानाबाद विभागाला १३ कोटी २९ लाखांचे उत्पन्न मिळाले होते.
जिल्ह्यात ६ आगार आहेत. यामध्ये सर्वाधिक चांगली कामगिरी उस्मानाबाद आगाराने केली आहे. उस्मानाबाद आगाराने ३ कोटी ८६ लाखाची कमाई केली आहे. उस्मानाबाद विभागातील सर्व अधिकारी, चालक, वाहक, यांत्रिकी व प्रशासकीय विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यातील समन्वयामुळे व परिश्रमामुळे एस टी च्या उत्पन्न वाढीत उस्मानाबाद विभाग चांगली कामगिरी करू शकला, अशी प्रतिक्रिया विभाग नियंत्रक राजीव साळवे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीच्या निर्णयाला उशीरःअजित पवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सरकारने कर्जमाफीचा निर्णय बजेट अधिवेशनापूर्वीच घेण्याची गरज होती, मात्र निर्णय घेण्यासाठी कारण नसताना वेळ लावला, बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा निर्णय होत नाही म्हणून आत्महत्या केल्या. सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला, हे सरकाचे अपयश असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यानंतर रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘कर्जमाफी झालीच पाहिजे मात्र केवळ कर्जमाफी करून उपयोग नाही. यानंतर शेतकरी जे पीक घेणार त्याला योग्य किंमत मिळाली पाहिजे. जर आधारभूत किंमत मिळाली नाही तर असेच चित्र राहील, असे सांगत आम्ही शेतकऱ्यांना पायावर उभे करून कर्जमाफी देणार नाही असे सत्ताधारी म्हणत होते. त्यांनी काढलेल्या संवाद यात्रेमध्ये आमदार, खासदार, मंत्र्यांना शेतकऱ्यांचा कौल बहुतेक कळाला व त्यामुळेच त्यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतला असावा, असा टोला त्यांनी लगावला. कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांनाच झाला असला तरी प्रश्न मात्र कायम आहेत. कर्जमाफीनंतर थकबाकीदारांना खरीपासाठी तत्काळ कर्ज मिळणार का ? खरीपासाठी बीयाणांसाठीची अडचण, बंपर उत्पादन झाले तर काय असे प्रश्न कायम आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

‘जलयुक्त’साठी सेलिब्रिटींचा वापर

आमच्याच योजना एकत्र करुन राबवल्याचा कार्यक्रम म्हणजे जलयुक्त शिवार अभियान आहे. नवीन सरकार आले आणि आम्ही १५ वर्षात काहीच केले नाही हे यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जलयुक्त शिवार अभियानासाठी आमीर खान, मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर आदींसारख्या सेलिब्रेटींचा वापर सरकारने केल्याचा आरोप अजित पवार यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादीची नौटंकी’

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, लातूर

शेतकऱ्यांची कर्ज माफी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने करणे, ही त्यांची नौटंकी असल्याचे सांगून पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसवर लातुरात चौफेर टीका केली.
शिवसंपर्क अभियानाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी रामदास कदम लातुरात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत कदम यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा चांगलाच समाचार घेतला. या पत्रकार परिषदेला माजी आमदार दिनकर माने, जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी, नामदेव चाळक यांची उपस्थिती होती. ते म्हणाले, ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेत असताना ७० हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा केला. राज्यावर कर्जाचा डोंगर निर्माण केला, शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले आणि आता तेच लोक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा काढीत आहेत, त्यांना संघर्ष यात्रा काढण्याचा नैतिक अधिकार नसून त्यांची नौटंकी आहे.’
शिवसेना सत्तेत किती आहे, यापेक्षा राज्यातील सत्तेला शिवसेनेचा टेकू आहे तो काढून घ्यावा, यासाठी अनेकांचे प्रयत्न आहेत. परंतु त्यांचे मनसुबे आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, योग्य वेळ आल्यानंतर सत्तेचे काय करायचे हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील, असेही कदम यांनी नमूद केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिल्लीत पंतप्रधानांना, मुंबईत मुख्यमंत्र्यांना भेटून शिवसेनेच्या फायली अडवुन ठेवण्याचे सांगतात, असा आरोपही त्यांनी केला.
शिवसेना कन्फ्युज असलेला पक्ष असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यावर पंतप्रधानांची दिल्लीत भेट घेणे, बारामतीचे निमंत्रण देणे, याविषयी वडील शरद पवार यांच्याकडून माहिती घ्यावी आणि त्यानंतर शिवसेनेवर टीका करावी, असा सल्लाही कदम यांनी दिला.
घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक महापालिकेने त्यांच्या बजेटच्या २५ टक्के निधी राखीव ठेवण्याचे राज्य सरकारने निर्देश दिले असल्याचे यावेळी रामदास कदम यांनी सांगितल. लातूरच्या मांजरा नदीच्या प्रदूषणाबाबत माहिती घेणार असल्याचे सांगून नांदेडच्या गोदावरी नदीच्या प्रदुषणाला जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती ही यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली.

‘बुलेट ट्रेन आता नको’
परभणी : राज्यात शेतकरी आत्महत्या करत असताना सरकार एक लाख कोटी रूपयांची बुलेट ट्रेन गुजरातला नेत आहे. बुलेट ट्रेनमध्ये राज्य शासनाचा २५ हजार कोटी रुपयांचा वाटा आहे. आताच बुलेट ट्रेनची गरज आहे का, समृद्ध महामार्गही दोन वर्षांनी निर्माण करता येईल, असे सांगत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राज्य सरकारवर टीका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचा खिसा पेरणीवेळी रिकामा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
सिल्लोड तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस पडला असून शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. मात्र, शेतमालास भाव नसल्याने यंदा शेतकरी आर्थिक संकटात आहेत. परिणामी, शेतकरी पेरणीसाठी पैशाच्या चिंतेत असल्याने अद्यापही तालुक्यातील कृषी सेवा केंद्रातून खरेदी सुरू झालेली नाही.
गेल्या वर्षी तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पोटाला चिमटा देऊन, व्याजाने पैसे घेऊन, जनावरे विकून मिरचीची लागवड केली. मात्र भावा मिळाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांना मिरची रस्त्यावर फेकून द्यावी लागली. यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. शिवाय कापसाच्या बोंडात अळ्या पडल्याने अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. मोठा खर्च करूनही हातात मोजकेच पैसे आले, अनेक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. गेल्या वर्षी काही काळ सतत पाऊस पडत असल्याने तण माजले व शेतीचा खर्च वाढला. मका पिकाच्या बाबतीतही अशीच परिस्थिती राहिली. त्यामुळे मकाचे उत्पादनही कमी झाले व भावही कमी मिळाला. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगले उत्पादन झाले, पण अत्यल्प भाव मिळाला. त्यामुळे मागच्या वर्षी शेतीवर मोठा खर्च करून शेती परवडली नाही. परिणामी, यावर्षी लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसेच नाहीत. पेरणी केली नाही, तर जमीन पडिक राहणार असल्याने बियाणे व खत खरेदीसाठी शेतकरी पैशाच्या चिंतेत आहेत. अनेक शेतकरी पाहुणे व खासगी सावकाराकडे खेट्या मारत आहेत.

द्विधा मनःस्थिती
गेल्या वर्षी मिरची, सोयाबिन व मका हे पीक भरघोस आले. पण शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळाला नाही. अनेक शेतकऱ्यांनी मिरची रस्त्याकडेला फेकून दिली होती. शेतमालाला भाव न मिळाल्याने यंदा पेरणीच्या काळात शेतकऱ्यांच्या हातात पैसै नाहीत. शिवाय संपामुळे शेतकरी पीककर्जाबद्दल अद्याप द्विधा मनःस्थितीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात नाराज कार्यकर्त्यांची दखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रविवारी (११ जून) शहरात झालेल्या मेळाव्यात नाराजांची दखल घेण्याचा प्रयत्न पक्षाचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. यावेळी दोन्ही नेत्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोचून काम करण्याचा तसेच संघटना मजबूतीसाठी कानमंत्र दिला.
पक्ष केवळ कार्यकर्त्यांच्या जिवावर चालतो, कार्यकर्ता हीच खऱ्या अर्थाने पक्षाची ताकद आहे. मात्र कार्यकर्ताही तोलामोलाचा असला पाहिजे, असे मार्गदर्शन मेळाव्यात करण्यात येत होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे भाषण करत असतांना कार्यकर्त्यांमध्ये बसलेले उदयसिंग राजपूत यांना तुम्ही मागे का बसलात, असे विचारताच एक कार्यकर्ता उभा राहिला आणि काम करणारे नेते मागेच बसतात आणि न काम करणारे लोक स्टेजवर बसले असल्याचे सांगितले. यावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, पण परिस्थिती सावरून तटकरे यांनी भाषण पुढे सुरू ठेवले. यावेळी त्यांनी कदीरभाई कुठे आहेत, असे म्हणूनही विचारले. यावेळी त्यांनी संजय वाघचौरे आणि कदीर मौलाना राष्ट्रवादीतच राहतील, असा विश्वास व्यक्त केला.
अजित पवार यांनीही त्यांच्या भाषणामध्ये कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी वाद विसरून पक्षबांधणीच्या कामाला लागा, असे सांगितले. यावेळी त्यांनी चंद्रकांत घोडके आणि संजय वाघचौरे यांचाही त्यांनी उल्लेख केला. मेळाव्यात अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी पक्षाचा लेखाजोखा मांडला व पक्षाच्या १९ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मेळाव्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, जिल्हाध्यक्ष आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, आमदार सतीश चव्हाण, शहराध्यक्ष काशिनाथ कोकाटे, माजी आमदार संजय वाघचौरे, मधुकरराव मुळे, कदीर मौलाना, मुश्ताक अहेमद, मनमोहनसिंग ओबेरॉय आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

फिक्सिंग करणारे नको

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले की, काही लोक केवळ उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे असतात. आज इथे तर उद्या तिथे, यातील काही लोक विकले जातात. हे लोक केवळ निवडणुकीत फिक्सिंग करण्याचे काम करतात याचा फायदा विरोधकांना होतो. हे होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. कोणता कार्यकर्ता सर्वसामान्यांपर्यंत जातो हे पाहूनच येणाऱ्या काळात पदे देण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले. काही कार्यकर्ते केवळ पुष्पगुच्छ देऊन फोटोसेशन करण्याचे काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मजबूत संख्याबळ; दुर्बल सरकार

राज्यात ‌विद्यमान सरकारकडे मोठे संख्याबळ आहे. तरीही सरकारमध्ये सहभागी शिवसेना रोज सरकारचा विरोध करत आहे. सरकारकडे मोठे संख्याबळ असताना कोणताही महत्त्वाचा निर्णय घेतला नसल्याचे तटकरे यांनी सांगितले. यावेळी ‌त्यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवत हिंमत असेल, तर सत्तेतून बाहेर पडा, असे आव्हान दिले.

औरंगाबादच्या आमदार, खासदारांनी काय केले ?
मराठवाड्याचे प्रवेदशद्वार असलेल्या औरंगाबाद शहरासाठी येथील आमदार आणि खासदारांनी काय केले. त्यांनी शहराच्या विकासाचे काय निर्णय घेतले, काय विकास केला. आज शहरात रस्ते, पाणी, ड्रेनेजची अवस्था बिकट असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. या उलट आम्ही वीज तसेच इतर प्रश्नांबाबत निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

संघटना मजबूत हवीः मुंडे
राष्ट्रवादी काँग्रेसने १९ व्या वर्षात पदार्पण केले असून यापैकी पक्ष १५ वर्ष सत्तेत होता. गेल्या अडीच वर्षांपासून पक्ष प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे. पक्षाची मुंबईतून प्रतिक्रिया आली, तर ती प्रत्येक तालुक्यात उमटायला हवी यासाठी पक्षसंघटना मजबूत हवी, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images