Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​ ...अन् बँकांनी फलक हटवले!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘फक्त आमच्याच बॅँकेचे कार्ड एटीएममध्ये चालेल,’ असे रिझर्व्ह बॅँकेच्या नियमांचे उल्लंघन करणारे आणि शहरवासीयांची दिशाभूल करणारे फलक भारतीय स्टेट बॅँक, पंजाब अॅँड महाराष्ट्र को. ऑप. बॅँकेसह इतर खासगी बॅंकांनी लावले होते. याबाबतची बातमी मंगळवारी (१३ जून) ‘मटा’मध्ये प्रसिद्ध होताच हे फलक काढण्यात आले.
ऐन चलन टंचाईच्या काळात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ठराविक शाखांमध्ये व एटीएमवर ‘आमच्याच बॅँकेचे एटीएम कार्ड चालतील,’ असे फलक लावण्यात आले होते. गुरुद्वारा रोड शाखा व उस्मानपुरा शाखांमध्येही हे फलक लागले होते. यामुळे इतर बॅँकांचे ग्राहक या एटीएममध्ये पैसे असूनही बाहेरूनच काढता पाय घेत होते. शहरातील इतर एटीएम बंद असल्याने अडचण येत होती. याबाबतच्या अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या. तसे वृत्त ‘मटा’मध्ये प्रसिद्ध होताच हे फलक मंगळवारी तातडीने हटविण्यात आले. दरम्यान, याविषयी बोलताना पंजाब अँड महाराष्ट्र को ऑप बँकेच्या उस्मानपुरा शाखेचे व्यवस्थापक अक्षता मुळे म्हणाले, ‘आम्ही लावलेले फलक काढून टाकले आहेत. याशिवाय आमच्या शाखेच्या एटीएममध्ये कोणत्याही बँकांचे कोणतेही एटीएम चालू शकतात. मात्र, सध्या आमच्याकडे रोकड उपलब्ध नाही. रोकड उपलब्ध झाली की एटीएममधून पैसे काढणे कोणालाही शक्य होणार आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिला रुग्णालयासाठी चिकलठाण्यात जागा?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा नियोजन मंडळाच्या गेल्या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर शासकीय जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या जागेचा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला असून, रुग्णालयाला चिकलठाणा परिसरात सात एकर जागा मिळण्याचे प्रशासकीय संकेत आहेत. अर्थात, बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाने ‘ग्रीन सिग्नल’ दिल्यानंतरच जागेचे निश्चित होणार असल्याचे स्पष्ट आहे.
औरंगाबाद जिल्ह्याला २०० खाटांचे जिल्हा महिला रुग्णालय मंजूर होऊन साडेतीन-चार वर्षे झाली आहेत. मात्र, पहिली दोन-अडीच वर्षे कुठलीच हालचाल न झाल्याने जिल्हा रुग्णालयाचा विषय जवळजवळ बासनात गुंडाळून ठेवल्याची स्थिती होती. मागच्या वर्ष-दीड वर्षापासून जिल्हा रुग्णालयाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र, मागच्या ‘डीपीसी’च्या बैठकांमध्ये वारंवार विषय निघून व पालकमंत्र्यांनी आदेश देऊनही जागेचा शोध लागलाच नाही. दरम्यान, सातारा तसेच औरंगाबाद लेणी परिसरातील जागा आरोग्य विभागाने नामंजूर केल्यानंतर रुग्णालयासाठीच्या जागेचा विषय एक जून रोजीच्या ‘डीपीसी’च्या बैठकीमध्ये पुन्हा चर्चिला गेला. या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांनी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला पत्र दिले होते. त्यानंतर केंब्रिज शाळेमागील चिकलठाणा परिसरातील जागेचा रुग्णालयासाठी विचार सुरू झाला असून, आरोग्य विभागाने पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. आता रुग्णालयासाठी संबंधित जागा योग्य असल्याचा अहवाल बांधकाम विभागाने दिल्यानंतर पुढील प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयातून होईल, असेही सांगण्यात आले. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेला आणखी किती दिवस लागणार आणि खरोखर जागेचा प्रश्न निकाली निघणार का, हा खरा प्रश्न आहे.

जिल्हा महिला रुग्णालयासाठी चिकलठाणा परिसरातील सात एकर जागेबाबत प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. येत्या १५ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. – डॉ. जी. एम. गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुप्रीम कोर्टाचे खंडपीठ मुंबईत स्थापन करा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सुप्रीम कोर्टाचे खंडपीठ मुंबईत स्थापन करावे, जातीयवादी विरोधातील ठराव, कनिष्ठ वकिलांना पाच वर्षांपर्यंत विद्यावेतन द्यावे, वकिलांना निवृत्तीनंतर दहा लाख रुपये कल्याणकारी निधी मिळवून द्यावा, असा ठराव ‘ऑल इंडिया लॉयर्स युनियन’च्या (एआयएलयु) दुसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात नुकताच मंजूर करण्यात आला.
अधिवेशनात राज्यातील ‘एआयएलयु’च्या विविध जिल्हा समित्यांचे ४३ प्रतिनिधी उपस्थित होते. अधिवेशनात मागील तीन वर्षांचा संघटनात्मक अहवाल सादर करुन नवीन ठराव मंजूर करण्यात आले. ‘एआयएलयु’चे उपाध्यक्ष ई. के. नारायणन यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा तथा इंडिया अ‍ॅडव्होकेट मल्टिस्टेट मल्टिपर्पज को ऑप सोसायटीचे संचालक अशोक पाटील अध्यक्षस्थानी होते. बाबासाहेब वावळकर यांनी अधिवेशनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. अधिवेशनात राज्यातील विविध जिल्ह्यातून सुमारे १५ प्रतिनिधींनी चर्चेत सहभाग नोंदवला, तर विश्वास अवघडे यांनी क्रेडेशन अहवालाचे सादरीकरण केले. अधिवेशनात नारायणन यांनी राज्यातील संघटना आणखी बळकट करण्यासाठी उपयुक्त सूचना केल्या. मावळते अध्यक्ष तिवारी यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी रामनाथ चोबे, सुरेश वाघचौरे, जी. एस. गाडीवान, सचिन गंडले, रवींद्र शिरसाट, पल्लवी बर्डे, मिलिंद संदानशिव, नितीन ढोबळे, विश्वनाथ शेळके, अहमद खान आदींनी पुढाकार घेतला. याच अधिवेशनात, सुप्रीम कोर्टाचे खंडपीठ मुंबईत स्थापन करावे, जातीयवादी विरोधातील ठराव, कनिष्ठ वकिलांना पाच वर्षांपर्यंत विद्यावेतन द्यावे, वकिलांना निवृत्तीनंतर दहा लाख रुपये कल्याणकारी निधी मिळवून द्यावा, असे ठराव मंजूर करण्यात आले.

नूतन कार्यकारिणी जाहीर
‘एआयएलयु’च्या अध्यक्षपदी बाबासाहेब वावळकर, सचिवपदी चंद्रकांत भोजगर, सहसचिवपदी अ‍ॅड. प्रदीप साळवी, उपाध्यक्ष आदिनाथ तिवारी, कोषाध्याक्ष ओ. पी. सिंग, राज्य कमिटी सदस्य म्हणून अ‍ॅड. रमेश महाजन, सुरेश शिंदे, अजय बुरांडे, सचिन गंडले, मिलिंद पिंपळगावकर, नितीन ढवळे आदींसह १९ सदस्यांची राज्य कमिटीवरील निवड अधिवेशनात जाहीर करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बडी’बेपत्ता; पोलिस मागावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुलगा हरवला, मुलगी हरवली अशी तक्रार अनेकदा पोलिस ठाण्यात येते. मात्र, श्रेयनगरातून बडी नावाचा तीन महिन्यांचा, काळ्या रंगाचा, छातीवर पांढरा पट्टा असणारा श्वान शुक्रवारपासून (९ जून) बेपत्ता झाल्याची तक्रार उस्मानपुरा पोलिसांत आली आहे. या बडीच्या प्रेमापोटी एका लहानग्याने जेवण सोडल्याने पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, श्रेयनगरात वास्तव्यास असलेले कांचन नायब देशमुख तीन महिन्यांपूर्वी सिडको महानगरात राहत. त्यांनी शेजाऱ्यांकडून ‘बडी’ हे लॅब्रॉ क्रासिंग प्रजातीचे श्वान घेतले. तेव्हा त्याने धड डोळेही उघडले नव्हते. देशमुख कुटुंबात त्याचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. विशेषतः आठवीत शिक्षण घेणाऱ्या प्रथमेशला बडीचा लळा लागला. सकाळी त्यास जेवण देणे, शाळेतून आल्यावर बडीला अंघोळ घालणे, बाहेर फिरायला नेणे, त्याच्यासोबत खेळणे, या दिनक्रमामुळे प्रथमेशचा तो खास मित्र झाला. गुरुवारी (१ जून) देशमुख कुटुंब श्रेयनगरात राहण्यास आले. अन् शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास प्रथमेश शाळेतून घरी आला. नेहमीप्रमाणे तो बडीसोबत खेळला. जेवणासाठी म्हणून घरात गेला, तर बडी कंपाऊंडमध्येच होता. त्यावेळी बाहेर पाऊस सुरू होता. सांयकाळी चारच्या सुमारास बडीच्या जेवणाची वेळ झाल्याने घरातील सदस्य बाहेर आले, पण बडी तेथे नव्हताच. घरातील सर्व सदस्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. जीवापाड जपलेला बडी असा अचानक सोडून गेल्याने शेवटी देशमुख कुटुंबीयांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. पोलिस हेडकॉन्स्टेबल बी. ए. जाधव पुढील तपास करत आहेत.

प्रथमेश रुग्णालयात
‘बडी’ प्रथमेशचा खास मित्र होता. तो बेपत्ता झाल्याने प्रथमेशला धक्का बसला. त्याने गेल्या काही दिवसांत जेवणही केले नाही. त्यामुळे त्याची तब्येत खराब झाली. दवाखान्यात दाखल करावे लागले. प्रकृतीत सुधारणा झाल्याने डॉक्टरांनी घरी जाण्यासाठी त्यास सुट्टी दिली असून बडीचा लवकर शोध लागावा यासाठी त्याची प्रार्थना सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ डीपी याचिकेवर तारीख पे तारीख...!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शहराच्या सुधारित शहर विकास आराखड्याच्या संदर्भात राज्य शासनाने अद्याप आपले म्हणणे सर्वोच्च न्यायालयात सादर केले नाही. त्यामुळे विकास आराखड्याच्या याचिकेच्या सुनावणीसाठी नवनवीन तारखा मिळू लागल्या आहेत. शासनाने आपले म्हणणे सादर केले तर याचिका निकाली निघून विकास आराखड्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे.
महापालिकेने राज्य शासनाच्या नगररचना विभागाच्या मदतीने शहराचा सुधारित विकास आराखडा तयार करून घेतला. हा आराखडा तयार करताना मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. अनेक भागातील आरक्षणे उठविण्यात आली, रहिवासी क्षेत्रावर नव्याने आरक्षण टाकण्यात आले. आराखड्यात रस्त्यांची आखणी देखील योग्यप्रकारे करण्यात आली नाही, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या. या तक्रारींचा आधार घेऊन काही नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे.
महापालिकेने तयार केलेल्या सुधारित विकास आराखड्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या नगरविकास खात्याचे मत मागवले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील दोन सुनावण्यांपासून शासनातर्फे न्यायालयात मत सादर करण्यात आले नाही. एप्रिल महिन्यात या संदर्भात शेवटची सुनावणी झाली तेव्हा देखील शासनाने विकास आराखड्याबद्दल आपले मत मांडले नाही. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाला सुट्ट्या लागल्या, सुट्ट्या संपल्यावर जुलै महिन्यात विकास आराखड्याच्या संदर्भात सुनावणी होऊ शकते. यावेळी शासनाने आपले म्हणणे सादर केले तर याचिकेचा निकाल लगेचच लागू शकतो, असे जाणकारांचे मत आहे. विकास आराखड्याबद्दल म्हणणे सादर करण्यास शासन वेळकाढूपणा करीत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महापौरांबद्दल आदेश नाहीत
विकास आराखड्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले तेव्हा त्र्यंबक तुपे महापौर होते. आता भगवान घडमोडे महापौर आहेत. महापौर बदलल्यामुळे नवीन महापौरांनी विकास आराखड्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करावे असा मतप्रवाह होता. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता शपथपत्र दाखल करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महापौरांच्या नावे लेखी आदेश काढलेले नाहीत असे कळाले. जोपर्यंत लेखी आदेश मिळत नाहीत तोपर्यंत महापौर शपथपत्र दाखल करणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महेंद्रला व्हायचेय, मोबाइल फोन कंपनीचा मालक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग करून मोबाइल फोन कंपनीचा मालक होण्याचे स्वप्न महापालिका शाळांमधून दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवून सर्वप्रथम आलेल्या महेंद्र माणिक मोरे याने जपले आहे. मोलमजुरी करणाऱ्या त्याच्या वडिलांनी देखील कितीही परीश्रम करावे लागले तरी महेंद्रला त्याच्या आवडीप्रमाणे शिक्षण देण्याचा निर्धार केला आहे.
महापालिकेच्या नारेगाव येथील शाळेत महेंद्र मोरे याने पाचवीत प्रवेश घेतला. तेव्हा पासून त्याने शाळेतून सर्वप्रथम येण्याचा मान कायम ठेवला आहे. ही परंपरा त्याने दहावीच्या परीक्षेतही ठेवली. त्याचे वडील, मोठा भाऊ आणि आई मजुरी करतात. या तिघांच्या मजुरीतून कुटुंबाचा गाडा चालतो. निकाल लागल्यानंतर मोरे कुटुंबाच्या घरी आनंद साजरा झाला. महेंद्रला ९४ टक्के गुण मिळाल्याचे कळाल्यावर त्याच्या कुटुंबातीलच नव्हे, तर शाळेतील शिक्षकांना देखील आकाश ठेणगे झाले.
‘मटा’ शी बोलताना महेंद्र म्हणाला, ‘मी वक्तृत्व स्पर्धेत सुरुवातीपासून भाग घेत होतो, त्यामुळे काही तरी करू शकतो असे शाळेतील शिक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी मला विशेष मार्गदर्शन केले, त्यातून माझा आत्मविश्वास वाढला. सुरुवातीपासूनच नियोजन करून अभ्यास करीत होतो. दहावीचा अभ्यास रात्री बारा ते पहाटे चार असा केला. यावेळेत शांतता असते, एकाग्रतेने अभ्यास करता येतो.’ गणित हा विषय आवडीचा विषय असल्याचे त्याने सांगितले. त्याने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर होण्याची इच्छा व्यक्त केली. मायक्रोसॉफ्टचे बिल गेटस् व अॅपलचे स्टिव्ह जॉब्ज हे आदर्श असून त्यांच्या प्रमाणेच मोबाइल कंपनीचे मालक होण्याचे आपले स्वप्न आहे, असे त्याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीतही मुलींचीच बाजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सोशल मीडियाने बोर्डाच्या पुढे धावत अनेकदा निकाल कधी लागणार याच्या तारखा जाहीर करून एकीकडे विद्यार्थी पालकांची उत्सुकता वाढवली अन् गोंधळही घातला. आज,उद्या करत अखेर मंगळवारी मंडळाने दहावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी मुलांपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे सिद्ध केले. विभागात निकालात ६.१२ टक्क्यांनी मुली पुढे आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत निकालाच्या टक्केवारीत किंचित वाढ झाली आहे. एकूण निकालातही औरंगाबाद विभागात सुधारणा झाली आहे. विभागाच्या निकालाची टक्केवारी ८८.१५ एवढी आहे.
मंडळातर्फे ७ मार्च ते १ एप्रिलदरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली. परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात आला. औरंगाबाद विभागातून १ लाख ८३ हजार २३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ६१ हजार ५२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ८८.१५ एवढी आहे. मागील वर्षी ८८.०५ टक्के दहावीचा निकाल होता. यावर्षी कला, क्रीडा विषयाचे वाढीव गुणांचा बोनसही विद्यार्थ्यांना मिळाला. बारावी प्रमाणे दहावीतही मुलींनीच आपला वरचश्मा कायम ठेवला आहे. विभागात मुलांपेक्षा तब्बल ६.१२ टक्क्यांनी मुलींचा निकाल पुढे आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मुलींच्या निकालात १.४२ टक्क्यांनी वाढ आहे. विभागातून २ हजार ४०६ शाळांमधून विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. परीक्षेच्या निकालाने यंदा मोठी उत्सुकता वाढविली होती. सोशल मीडियावरील तारखांनी गोंधळ उडाल्याने बोर्डाला त्याची सफाई द्यावी लागली. फेरपरीक्षार्थींमध्ये ७ हजार ५११ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३ हजार ३२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेचे प्रमाण ४४.२३ टक्के एवढे आहे.

अकरावीचे प्रवेश ऑनलाइन
दहावीचा निकाल जाहीर झाला निकाल हातील पडल्यानंतर लगेच अकरावी प्रवेशाची लगबग सुरू होत आहे. यंदा औरंगाबाद महापालिकेत अकरावी प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. शाळांमध्येच विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बाहेर गावांतील विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने नेमेलेल्या पाच झोन सेंटरवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश नोंदणी प्रक्रियेलाही मंगळवारपासून गती आली आहे. अर्ज भरून देण्याची जबाबादारी शाळांवर असल्याने मुख्याध्यापकांना प्रक्रियेची माहिती, प्रशिक्षण देण्यात आले आहे. शाळांमध्ये माहिती पुस्तिकाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

अकरावी प्रवेशासाठी सेंटर
- देवगिरी ज्युनिअर कॉलेज
- विवेकानंद ज्युनिअर कॉलेज
- मौलाना आझाद ज्युनिअर कॉलेज
- वसंतराव नाईक ज्युनिअर कॉलेज
- शिवछत्रपती ज्युनिअर कॉलेज
(बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना या सेंटरवर भरता येईल अर्ज)

शहरातील ज्युनिअर कॉलेज ः १०४
प्रवेश क्षमता ः २२९४०

जिल्हानिहाय निकाल
जिल्हा........परीक्षार्थी...उत्तीर्ण......टक्केवारी
औरंगाबाद....६४३१२....५७५९८.......८९.५६
बीड.............४२४४३....३९३२४........९२.६५
परभणी........२९५१४....२३८७५........८०.८९
जालना.........३०२३०.....२७१७८........८९.९०
हिंगोली.........१६७४०....१३५४७........८०.९३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढीव गुणांमुळे टक्का वाढला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लोककला, चित्रकला, क्रीडा प्रकारांसाठी वाढीव गुण देण्याचा निर्णयाचा हजारो दहावीच्या विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे. औरंगाबाद विभागात तब्बल ४ हजार ४७ विद्यार्थ्यांना वाढीव गुण मिळाले आहेत. यंदा प्रथमच वाढीव गुण देण्याचा निर्णय आला आणि मंडळाकडे प्रस्तावांचा पाऊस पडला.
शासनाने यावर्षीपासून चित्रकला, शास्त्रीय कला, लोककला चित्रकला, क्रीडा क्षेत्रात सहभागी विद्यार्थ्यांना वाढीव २५ गुण देण्याच्या निर्णय घेण्यात आला. निर्णयाला उशीर झाला, तरी विभागातून प्रस्तावांची संख्या मोठी होती. औरंगाबाद विभागातून पाच जिल्ह्यांतून ५ हजार २४ प्रस्ताव माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयाकडे आले होते. निर्णयाने अनेक विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये वाढ झाली. विभागातून आलेल्या प्रस्तावांपैकी ४ हजार ४७ विद्यार्थी या वाढीव गुणांसाठी पात्र ठरले. प्रस्तावांमध्ये औरंगाबाद जिल्हा पुढे आहे. या प्रस्तावांमुळे दहावीच्या निकालालाही उशीर झाल्याचे मानले जाते.

क्रीडा गुणांचा ३७८ जणांना लाभ
कला, चित्रकला कलप्रकारांमध्ये प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांसह दहावीमध्ये क्रीडा गुणांचा लाभ मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३७८ आहे. विभागातून ४२८ प्रस्ताव आले होते. त्यापैकी ५० प्रस्ताव अपात्र ठरल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाढीव गुणांचे एकूण प्रस्ताव ः ५०२४
पात्र विद्यार्थी ः ४०४७
क्रीडा गुणांसाठी प्रस्ताव ः ४२८
पात्र प्रस्ताव ः ३७८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२९१ शाळा शंभर टक्के

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत विभागातील २०९ शाळांतील शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर सहा शाळांमधील एकही परीक्षार्थी उत्तीर्ण झाला नाही. वाढीव गुणांच्या निर्णयांमुळे शून्य टक्के शाळांची संख्या बोटावर मोजण्या एवढी झाली आहे.
मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी ऑनलाइन जाहीर झाला. निकालात मोठ्या प्रमाणात शाळांनी शंभर टक्के निकालाचा टप्पा पार केला आहे. विभागातील २ हजार ४०६ शाळांमधून दहावीचे विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या शाळांमधून २०९ शाळांमधील शंभर टक्के परीक्षार्थींनी दहावीचा टप्पा पार केला. त्या औरंगाबाद जिल्ह्यातील शाळांची संख्या अधिक आहे.

सहा शाळांचा शून्य टक्के निकाल
वाढीव गुणांच्या निर्णयानंतर टक्क्यात वाढ झाली. त्यात शंभर टक्के निकालासह शून्य टक्के असलेल्या शाळाही विभागात सहा आहेत. अशा शाळांची संख्या बोटावर मोजण्या एवढीच आहे. परभणीमध्ये ३ शाळांचा निकाल शून्य टक्के आहे. बीडमध्ये १ तर, हिंगोलीत २ शाळांतील एकही विद्यार्थी उत्तीर्ण झाला नाही.

निकाल शंभर टक्के
जिल्हा.......शाळा
औरंगाबाद....१०५
बीड.............८८
परभणी........३०
जालना........५८
हिंगोली........१०

आजपासून गुणपडताळणी
ऑनलाइन निकालानंतर बुधवारपासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करता येणार आहेत. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी शाळोमार्फत विभागीय मंडळाकडे २३ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहेत. अर्जासोबत विद्यार्थ्यांना वेबसाइटवरून काढलेली गुणपत्रिकेची स्वसाक्षांकित छायांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे, तर छायांकीत प्रतीसाठी १४ जूनापासून अर्ज करता येणार आहेत. गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांना ३ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंचन कामे वाटपात झेडपीत अनियमितता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागांतर्गत कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधाऱ्यांची कामे वाटप करताना गैरप्रकार झाल्याच्या आरोपावरून मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांनी अतिरिक्त सीईओ सुरेश बेदमुथा, कार्यकारी अभियंता व्ही. पी. पांढरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कामे वाटप करताना केलेले दुर्लक्ष, चौकशी समितीच्या अहवालाची दखल घेऊन ही नोटीस बजावली असून, दोन दिवसांत खुलासा करावा अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे नोटिसीत म्हटले आहे.
जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागांतर्गत २०१६-१७मध्ये कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधाऱ्यांची कामे मंजूर केली होती. या कामे वाटपाबाबत सीईओंकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. वाटपात गैरप्रकार, निविदा लिफाफ्यावर स्वाक्षऱ्या नसणे, निविदा पुस्तिकांमध्ये नोंदी नसणे, करारनामे कोरे असणे आदी आरोप करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन सीईओंनी मुख्य लेखा वित्त अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते. या समितीने सर्व निविदा व कागदपत्रे तपासून अहवाल सादर केला होता. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. देवयानी पाटील डोणगावकर यांनीही सीईओ अर्दड यांच्याकडे या प्रकरणाबाबत पत्र दिले होते. अहवालाच्या आधारे सीईओ अर्दड यांनी मंगळवारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा आणि सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. पी. पांढरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यात म्हटले आहे, की २०१६-१७मध्ये जिल्हा परिषद सिंचन विभागातील कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधाऱ्यांसाठी ४५ निविदा काढण्यात आल्या. ८ बंधाऱ्यांचे कार्यारंभ आदेश दिले नव्हते. ३७ कोल्हापुरी बंधारे आणि सिमेंट बंधाऱ्यांना वित्त विभागाची मान्यता नव्हती. विभागस्तरावरून थेट कामे वाटप करून गैरप्रकार करण्यात आला. त्यावरून नोटीस बजावण्यात आली.

३७ निविदा पुस्तिका अपूर्ण
निविदांसाठीच्या लिफाफ्यावर निविदा समिती सदस्य, अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आवश्यक असते. त्या दिसून आल्या नाहीत. कार्यारंभ आदेश दिलेल्या ३७ पैकी १८ लिफाफ्यांवर अतिरिक्त सीईओंची स्वाक्षरी नव्हती. दोन लिफाफ्यावर समिती सदस्यांचीही स्वाक्षरी नाही. निविदा पुस्तिकांमध्ये सर्व माहिती भरणे आवश्यक असते. सर्वच निविदा पुस्तिका अपूर्ण असल्याचे चौकशी समितीला आढळून आल्याचे या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. कामांसाठी करारनामे केले जातात. या कामांचे सर्व करारनामे कोरे आढळून आले. एकूणच या कामांमध्ये प्रचंड अनियमितता दिसून आली. यासंदर्भात दोन दिवसांत खुलासा सादर करावा, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सीईओ अर्दड यांनी बजावलेल्या नोटिसीत म्हटले आहे. या कारवाईमुळे जिल्हा परिषद खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांत अर्दड यांनी कामात कुचराई, अनियमितता करणाऱ्यांविरुद्ध थेट कारवाई सुरू केल्याने आगामी काळात आणखी काही अधिकाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निकालानंतरही सेतू ऑफलाइनच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या महिन्याभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयातील सुविधांचा ‘सेतू’ ढेपाळलेलाच आहे. दहावीच्या निकालानंतर विविध प्रमाणपत्र काढण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांची गर्दी वाढत असताना सेतू सुविधा केंद्रातील महाऑनलाइनचे त्रांगडे कायम असल्यामुळे कर्मचारी त्रस्त आहेत.
दहावीचा निकाल मंगळवारी (१३ जून) जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या सेतू सुविधा केंद्रामध्ये विद्यार्थी, पालकांची मोठी गर्दी झाली होती. गेल्या महिन्याभरपासून सेतूचे कामकाज ऑफलाइनच आहे. मंगळवारी दुपारी सेतूमधील एका काउंटरवरील कर्मचारी जागेवर नसल्यामुळे विद्यार्थी, पालकांचा पारा चढला होता. यामुळे काही वेळ सेतू सुविधा केंद्रामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
गेल्या महिन्याभरापासून महाऑनलाइनच्या पोर्टलमध्ये बिघाड निर्माण झाला असून, सेतू कार्यालयाचे ऑनलाइन काम कधी बंद, तर कधी सुरू आहे. दहावीच्या निकालापूर्वी सिस्टीम सुरू होणे अपेक्षित होते, मात्र निकालानंतरही महाऑनलाइच्या पोर्टल बंद असल्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागला. सेतूमधून सातबारा, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अल्पभूधारक, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, वय व अधिवास, भूमीहिन, शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक, ३० टक्के महिला आरक्षण, वास्तव्य दाखला आदी विविध १८ प्रमाणपत्रे वितरित केली जातात.

या खिडकीवरून त्या खिडकीवर
सेतू सुविधा केंद्रामध्ये विविध २५ काउंटरवर काम करण्यात येते. मंगळवारी दुपारी मात्र सिस्टीमची गती मंदावल्यामुळे काउंटवरील कर्मचारी पालकांना व विद्यार्थ्यांना या काउंटरवरून त्या काउंटरवर पळवत होते.

प्रशासनाने मागितला बंदोबस्त
सेतू सुविधा केंद्रातील गर्दी मोठ्याप्रमाणावर वाढल्यामुळे आम्ही पोलिस बंदोबस्त मागवला असल्याचे नायब तहसीलदार एस. जी. पटवारी यांनी सांगितले. येत्या महिन्याभर बंदोबस्ताची आवश्यकता राहणार आहे. सध्या ५०० प्रमाणपत्रे देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

दलालांचा वावर वाढला
सेतु सुविधा केंद्रामध्ये दलालांचा वावर वाढला असून, याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. दलाल सेतूतील कर्मचाऱ्यांना चिरीमिरी देऊन आपला व्यवसाय सुरू ठेवत असल्याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. दुसरीकडे प्रशासनातील अधिकारी मात्र दलालांपासून सावध राहण्याच्या सूचना देत असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा

$
0
0



टीम मटा, औरंगाबाद

मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये पाऊस सुरूच असून, बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय उस्मानाबाद जिल्ह्यामध्येही पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यासह आठही जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्रीपासून पुढील ४८ तासांत अतिवृष्टी होण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
भारतीय हवामान खात्याच्या या इशाऱ्यात १५ जूनपासून पुढील ४८ तासांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार मराठवाड्यातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ७० ते ११० मिलिमीटरहून अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर, आपत्ती व्यवस्थापन कक्षाने विविध यंत्रणांना सतर्क राहण्याचे सूचना दिल्या आहेत. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयानेही नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

बीडच्या दोन मंडळात मुसळधार
बीड : बीड जिल्ह्यामध्ये पाऊस सुरूच असून, या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने शंभर मिलिमीटरचा आकडा ओलंडला आहे. बीड जिल्ह्यात यावर्षी पाऊस मेहरबानी झाला आहे. जूनच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. चार दिवसांत तर पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यात मंगळवारी दुपारी पावसाची सरीवर सरी येत होत्या. जिल्ह्यातील दोन महसूल मंडळात ६५ मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. या पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. तर शेतातून पाणी बाहेर निघाले. ओढे आणि नदी पत्रातून पाणी खळखळू लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलसंधारणा’ला अद्याप मुहूर्त मिळेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्याचे मृद व जलसंधारण आयुक्तालय औरंगाबादेत कार्यान्वित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय अघोषित मुदतीपर्यंत रखडला आहे, तर ‘वाल्मी’ संस्था जलसंधारण विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. ३१ मे रोजी आयुक्तालयाचा अध्यादेश निघूनही आयुक्तालय रखडले आहे. जलसंपदा व कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी नवीन विभागात जाण्यास नकार दिल्यामुळे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांची कोंडी झाली आहे. कर्मचारी समाविष्ट झाल्याशिवाय आयुक्तालय सुरू होणे शक्य नाही.
पैठण रोड परिसरातील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्या (वाल्मी) आवारात राज्याचे मृद व जलसंधारण आयुक्तालय सुरू करण्याची घोषणा जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केली. एक मे रोजी आयुक्तालय सुरू करण्याचे नियोजन झाले, पण प्रशासकीय पातळीवर नियोजन नसल्याने आयुक्तालय अघोषित मुदतीपर्यंत रखडले आहे. आराखडा, कर्मचारी नियुक्ती आणि तांत्रिक बाबी अर्धवट असल्यामुळे आयुक्तालय सुरू होण्यास अडचणी आहेत. आयुक्तालय कधी सुरू होणार याची ठोस माहिती नाही. मृद व जलसंधारण आयुक्तालयात जवळपास ३० हजार अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहतील. कृषी आणि जलसंपदा विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. प्रत्यक्षात नवीन आयुक्तालयात जाण्यास बहुतेक कर्मचारी तयार नाहीत. कृषी विभाग आणि जलसंपदा विभागाच्या पातळीवर आयुक्तालयाबाबत तांत्रिक प्रक्रिया झाली नाही. या सर्व गोंधळात आयुक्तालय लवकर कार्यान्वित होण्याची शक्यता नाही. औरंगाबाद येथे चार नोव्हेंबर रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘वाल्मी’ संस्था जलसंधारण विभागात विलीनीकरण करण्याची शक्यता तपासण्यासाठी मंत्रिमंडळाने निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने जलसंधारण विभागाच्या सचिवाच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांची समिती स्थापन केली होती. या समितीमध्ये दोन विभागीय आयुक्त, जलसंधारण, जलसंपदा, कृषी, भूजल सर्वेक्षण व वाल्मी या विभागाच्या सदस्यांचा समावेश होता. जलसंधारण विभागाकडे कोणतीही प्रशिक्षण संस्था नाही आणि जलसंपदा विभागाकडे ‘मेरी’, ‘मेटा’ व ‘वाल्मी’ या तीन प्रशिक्षण संस्था आहेत. त्यापैकी जल व भू-व्यवस्थापन संस्थेच्या (वाल्मी) स्वायत्ततेला बाधा न आणता जलसंधारण विभागाकडे वर्ग करण्याची समितीने शासनाला शिफारस केली होती. त्यानुसार ‘वाल्मी’ जलसंधारण विभागाकडे वर्ग केली आहे. आता जलसंपदा विभागाऐवजी जलसंधारण विभागाचा काम पाहणार आहे.

आयुक्तालयाची संरचना
मृद व जलसंधारण आयुक्त कार्यालयात प्रशासनिक, वित्तीय, तांत्रिक व अतांत्रिक प्रकाराच्या यंत्रणा पुढीलप्रमाणे प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. मृद व जलसंधारण आयुक्त कार्यालयासाठी एकूण १८७ पदांचा आकृतीबंध मंजूर झाला आहे. आयुक्त, अपर आयुक्त प्रशासन, सहआयुक्त किंवा सहसंचालक आर्थिक सेवा, उपायुक्त वित्त, अपर आयुक्त जलसंधारण, अपर आयुक्त मृदसंधारण, उपायुक्त (माहिती तंत्रज्ञान समन्वय, संकल्पचित्र व प्रशिक्षण) अशी पदे राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परंड्याच्या नाहिदला सर्व विषयांत ३५ गुण

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

दहावी परीक्षेच्या निकालामध्ये शंभर टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची चर्चा असतानाच, उस्मानाबाद जिल्ह्यातील नाहिदही चर्चेत आला आहे. त्याने सर्वच विषयांमध्ये ३५ टक्के गुण मिळवत दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला.
नाहीद परंडा शहरातील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये शिकला. या निकालानंतर त्याच्या नावाची एकदम चर्चा सुरू झाली आणि त्याचे कौतुकही करण्यात येत आहे. या निकालासाठी त्याला फेटा बांधून सत्कारही केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुल घोटाळाप्रकरणी मुख्याधिकारी अटकेत

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

गाजलेल्या तुळजापूर नगर परिषदेच्या घरकुल घोटाळा प्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी राजीव बुबणे व नगर अभियंता फारूकी यांना अटक करण्यात आली आहे. तुळजापूर पोलिसांनी या दोन्ही आरोपीना अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
तुळजापूर नगर परिषदेच्या वतीने ९२० घरकुल बांधण्याची योजना होती. मात्र, केवळ १२० घरे बांधून बाकीची योजना कागदोपत्री पूर्ण केल्याचे दाखवून शासकीय अधिकारी व नगराध्यक्षांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचे आरोप आहे. मुख्य आरोपी नगराध्यक्ष अर्चना गंगणे यांच्यासह २३ आरोपी गुन्हा दाखल होऊन ७५ दिवस झाल्यानंतरही फरार आहेत. या प्रकरणाची बातमी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर खळबळ उडाली होती.
या योजनेचे काम सोलापूर येथील पंधे कंस्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. हा घोटाळा २५ कोटी रुपयांचा असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलिसात गेल्या महिन्यात गुन्हा नोंद केला होता. मात्र, अधिकाऱ्यांकडून फारसे गांभीर्य घेण्यात येत नव्हते. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यानी पुढाकार घेऊन तपास करत, गुन्ह्याची व्याप्तीही वाढवली होती.
उस्मानाबाद पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी आज या प्रकरणातील आरोपींविरोधात पावले उचलत अटकेची कारवाई केली. तत्कालीन मुख्याधिकारी राजीव बुबणे व नगर अभियंता फारुकी याना अटक केली. या घरकुल घोटाळा प्रकरणाला तुळजापूरचे सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांनी वाचा फोडली होती.
घरकुल घोटाळ्याबरोबरच तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी आलेल्या यात्रा अनुदानावर नगराध्यक्ष व शासकीय अधिकारी यानी संगनमत करीत १ कोटी ६० लाख रुपयांचा घोटाळा केला होता. या प्रकरणातील आरोपीविरोधातही अशाच प्रकारे कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पदवीच्या निकालासाठी विद्यापीठात कँडल मार्च

$
0
0

औरंगाबाद ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत पदवी व पदव्युत्तर परीक्षा मार्च-एप्रिल महिन्यात घेण्यात आली. परीक्षा होऊन ६० ते ७० दिवस उलटूनही परीक्षा विभागाने निकाल जाहीर केला नाही. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना ‘सीएम फेलोशिप’साठी अर्ज करता येत नाही व स्पर्धा परीक्षेची संधी हुकली आहे. येत्या १५ जूनपूर्वी निकाल जाहीर करा या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने कँडल मार्च काढला.
मंगळवारी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मार्च काढण्यात आला. नवीन विद्यापीठ कायद्यानुसार ३० दिवसांत निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. दोन महिन्यानंतरही निकाल लागले नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचे आंदोलकांनी सांगितले. रॅलीचे नेतृत्व शहराध्यक्ष अॅड. राहुल तायडे व जिल्हा कार्याध्यक्ष ऋषीकेश देशमुख यांनी केले. यावेळी राहुल पाटील, तेजस पाटील, सुशील बोर्डे, सारंग बोराडे, मोहीत जाधव, देव राजळे, रोहीत चव्हाण, विकास भालेराव, सम्राट कटारे, धनंजय देशमुख आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पथकांकडून कन्नडमध्ये अडीच लाखांचा गुटखा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अडीच लाखांचा गुटखा जप्त करून तिघांना अटक केली. ही कारवाई सोमवारी दुपारी चार वाजता कन्नड शहरात करण्यात आली.
ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी पदभार घेतल्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंदे रोखण्यासाठी विशेष पथके नेमले आहेत. कन्नड शहरात बसस्टँडमध्ये गुटख्याची अवैध विक्री होत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यावरून छापा टाकण्यात आला. रिक्षामध्ये नेण्यात येत असलेला दोन लाख चाळीस हजारांचा माल पोलिसांनी जप्त केला. यावेळी आरोपी शेख शोएब शेख मुबारक, शेख अतिक शेख मुश्ताक, शेख मजहर शेख गुलाम गौस अली (सर्व रा. कन्नड) यांना ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे गुटख्याचा साठा व आरोपी हस्तांतरित करण्यात आले. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षख बालाजी ठाकूर, मधुकर गोरे, सुनील बोराडे, समाधान दुबेले, गणेश मुसळे व अनिल राजपूत यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका शाळांचा निकाल वाढला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिका शाळेचा दहावी परीक्षेचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टक्क्यांनी वाढला आहे. यंदा महापालिका शाळांमधून दहावीच्या परीक्षेला ५४० विद्यार्थी बसले होते, त्यापैकी ४२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेचे हे प्रमाण ७७.९६ टक्के आहे. नारेगाव शाळेचा विद्यार्थी महेंद्र मोरे याने ९४ टक्के गुण मिळवून महापालिका शाळांमधून प्रथम येण्याचा मान मिळवला. गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक महापौर व आयुक्तांनी केले.
किराडपुरा नंबर १ या उर्दू माध्यमाच्या शाळेचा निकाल सर्वात जास्त म्हणजे ९८.३० टक्के लागला आहे. त्या खालोखाल मिटमिटा शाळेचा निकाल ९४.४४ टक्के लागला, शहाबाजार येथील उर्दू शाळेचा निकाल ९२.५० टक्के लागला आहे, तर बन्सीलालनगर येथील शाळेचा निकाल ९०.४७ टक्के लागला आहे. पालिका शाळेतील ४१ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. १६२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. महेंद्र माणिक मोरे हा नारेगाव येथील शाळेचा विद्यार्थी ९४ टक्के गुण मिळवून सर्व प्रथम आला आहे. सिडको एन ७ येथील शाळेचा विद्यार्थी शुभम प्रल्हाद दांडगे ९० टक्के गुण मिळवून पालिका शाळेत दुसरा आला आहे, तर याच शाळेचा विद्यार्थी शिलरत्न राजेंद्र दाभाडे या विद्यार्थ्याने ८७ टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकवला. उर्दू माध्यमातून किराडपुरा नंबर १ शाळेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. या शाळेचा शेख सोहेल शफिक याला ८७ टक्के तर शेख समरीन बहाउद्दीनला ८१ टक्के गुण मिळाले. आवेज खान या पुर्णतः अंध असलेल्या बेगमपुरा शाळेच्या विद्यार्थ्याला ४६.२० टक्के गुण मिळाले.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक महापौर भगवान घडमोडे व आयुक्त डी.एम.मुगळीकर यांनी केले. यावेळी उपमहापौर स्मिता घोगरे, सभापती गजानन बारवाल, सभागृहनेते गजानन मनगटे, विरोधीपक्ष नेते फेरोज खान, शिक्षण समितीच्या सभापती शोभा बुरांडे, आयुक्त डी. एम. मुगळीकर, उपायुक्त रवींद्र निकम, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांच्यासह शिक्षण विभागातील कर्मचारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छ विद्यालयावर भर हवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शाळांचा परिसर हा अधिकाधिक स्वच्छ ठेवण्यावर भर द्या, असे सांगत ‘स्वच्छ विद्यालय’चा नारा शाळांना देण्यात आला आहे. त्याचबरोबर चार कोटी रोपांची लागडवड उपक्रमातही शाळांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना शाळा मुख्याध्यापकांना मंगळवारी झालेल्या सहविचार सभेत देण्यात आल्या.
सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुधकरराजे आर्दड, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार फड, वासुदेव सोळुंके, शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, मुधकर देशमुख, शिक्षण व आरोग्य सभापती मीना शेळके, विद्या प्राधिकरणाचे संचालक सुभाष कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड म्हणाले,‘केंद्र आणि राज्य सरकारने स्वच्छ विद्यालय, स्वच्छ भारत मिशनवर लक्ष केंद्रीत केले आहे. शाळांनी आपला परिसर अधिकाधिक स्वच्छ ठेवण्यावर भर दिला पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता सुधारत असल्याचे सांगत, भविष्यात या शाळा खाजगी शाळांपेक्षा अधिक वेगाने प्रगतीकडे वाटचाल करतील.’
अतिरिक्त आयुक्त फड यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असलेल्या वृक्षरोपण मोहिमेची माहिती दिली. चार कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यात शाळांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले. त्यासह शाळा पूर्व तयारी, मोफत प्रवेश प्रक्रिया, प्रवेश पंधरवाडा साजरा करण्यासह शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठपुस्तके मिळावित, अशा सूचना शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी दिल्या. यासह तंबाखू नियंत्रण, दप्तराचे ओझे, शालेय पोषण आहार, ऑनलाइन विद्यार्थी स्थलांतर व आधार कार्ड अद्ययावत करणे आदी विषयांवर विविध तज्‍ज्ञांनी मार्गदर्शन केले.

पाणंदमुक्तीसाठीही सहभाग
जिल्ह्यातील सर्व गावे १५ ऑगस्टपर्यंत हागणदारीमुक्त करायचे असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यात शाळांनी गावामध्ये जनजागृतीसाठी सहभाग घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यात ८६१ ग्रामपंचायती आहेत. शाळांचा सहभाग असेल, तर शंभर टक्के हागणदारीमुक्त जिल्ह्यांमध्ये औरंगाबादचा समावेश होऊ शकतो, असे वासुदेव सोळुंके यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रांजणगावात क्रिकेट मॅचवर सट्टा चालवणारा गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चँपीयन्स ट्रॉफीवर सट्टेबाजी करणाऱ्या आरोपीला गुन्हेशाखेने अटक केली. ही कारवाई सोमवारी सायंकाळी रांजणगाव शेणपुंजी येथे करण्यात आली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रांजणगाव येथील शिवछत्रपतीनगर येथील पूनमसिंग उर्फ प्रशांत सुनील ठाकूर (वय २९ रा. शिवछत्रपतीनगर) हा इंग्लडमध्ये सुरू असलेल्या चँपीयन्स ट्रॉफीच्या मॅचवर सट्टा चालवत असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. या माहितीवरून सोमवारी श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान या मॅचवर तो सट्टा चालवत असताना पोलिसांनी छापा टाकला. यावेळी आरोपी ठाकूरच्या घरातून एक एलइडी टीव्ही, सेटअप बॉक्स, चार वेगवेगळ्या कंपनीचे मोबाइल हँडसेट, सट्ट्याची आकडेवारी असलेली रेकॉर्ड‌बुक, कॅल्क्युलेटर, असा ४५ हजार ६५५ रुपयाचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी आरोपी ठाकूरला अटक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images