Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विद्यापीठ वेबसाइट अपडेट करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘शैक्षणिक क्षेत्रात झपाटयाने होत असलेले बदल लक्षात घेऊन विद्यापीठे, शैक्षणिक संकेतस्थळ ‘अपडेट’ ठेवली पाहिजेत. विद्यापीठाचे अद्ययावत संकेतस्थळ लवकरच सुरू करण्यात येईल,’ अशी माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभागाप्रमुखांच्या शनिवारी महात्मा फुले सभागृहात झालेल्या बैठकीत दिली.
विद्यापीठाची अद्ययावत वेबसाइट लवकरच सुरू करण्यात येणार आहे. याबाबत ही बैठक घेण्यात आली. बैठकीला प्रभारी अधिकारी डॉ. सतीश पाटील, ‘युनिक‘चे संचालक डॉ. सचिन देशमुख, अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे उपस्थित होते. प्रोग्रामर यशपाल साळवे यांनी संकेतस्थळातील बदलाबाबत माहिती दिली. यावेळी चोपडे म्हणाले, ‘पुढील काळात वि़द्यापीठाची एकमेव वेबसाइट असणार आहे. संकेतस्थळावर विद्यापीठाच्या अॅचिव्हमेंट, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकलेल्या माजी विद्यार्थ्यांची छायाचित्रे असतील. तसेच विभागाची स्थापना, उद्दिष्टे, व्हिजन-मिशन, संशोधन, संशोधनपर लेख, अध्यापकांचा बायोडाटा, अभ्यासक्रमांची फोटो गॅलरी, अॅवॉर्डस आदी विस्तृत माहिती असणार आहे’. दरम्यान, बैठकीतील तज्ज्ञांनी काही सूचना केल्या. या सूचनेनुसार वेबसाइटमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत.

‘रँकींग’साठी फायदा
‘संकेतस्थळाबाबत निर्णय व सूचनांसाठी सल्लागार समिती स्थापन करण्यात येईल. ‘एनआयआरएफ’ यासह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे रँकींगसाठी वेबसाइट अद्ययावत, माहितीपूर्ण असणे आवश्यक आहे. याचा फायदा रँकींगला होईल,’ असे कुलगुरू म्हणाले. संकेतस्थळाच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा आढावा डॉ. सचिन देशमुख यांनी घेतला. प्रणाली विश्लेषक अरविंद भालेराव, प्रोग्रामर यशपाल साळवे, दिनेश कोलते यांनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘इंजिनीअरिंग’ नोंदणी आजही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्टच्या पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत अर्ज भरणे व निश्चितीसाठीची मुदत एक दिवसाने वाढविल्याने रविवारपर्यंत विद्यार्थ्यांना आजही ऑनलाइन नोंदणी अर्ज करता येईल.
तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, आर्किटेक्चर पदवी अभ्यासक्रमाची प्रथम वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया पाच जूनपासून सुरू झाली. त्यात प्रथमवर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठीची मुदत १७ जूनपर्यंत होती. ही मुदत एक दिवसाने वाढविण्यात आली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे शनिवारी हे जाहीर करण्यात आले. त्यामुळे रविवारीही सर्व सुविधा केंद्र सुरू राहणार आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरून सुविधा केंद्रावर जाऊन कागदपत्रांची तपासणी, अर्ज निश्चिती करता येणार आहे. शनिवारी मुदत संपत असल्याने अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रामांच्या कॉलेजांसाठी विद्यार्थी, पालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन नोंदणीचा टप्पा लाखाच्या वर पोहचला आहे. अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता यादी १९ ला जाहीर केली जाणार आहे. २०, २१ असे दोन दिवस आक्षेपांसाठी आहेत. यानंतर २२ जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. पहिल्या फेरीसाठी २३ ते २६ जून दरम्यान ऑप्शन फॉर्म भरता येणार आहेत. प्रथम फेरीसाठीचे जागा वाटप २८ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना २९ जून ते तीन जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करावयाचा आहे. पाच जुलै रोजी पहिल्या फेरीनंतरच्या राहिलेल्या रिक्त जागांची यादी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ आरटीओकडून २२ स्कूल बस जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आरटीओकडून तपासणी करून न घेणाऱ्या २२ स्कूल बस शनिवारी जप्त करण्यात आल्या. मागील तीन दिवसांत ५५ स्कूल बसवर कारवाई करण्यात आली.
नागपूर हायकोर्टाच्या आदेशानंतर दरवर्षी स्कूल बस तपासणी करणे आवश्यक आहे. ‘आरटीओ’कडून फिटनेस प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विद्यार्थी वाहतूक करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाप्रमाणे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तसेच जून महिन्याच्या १५ तारखेपर्यंत आरटीओकडून स्कूल बस तपासणी करणे आवश्यक करण्यात आले होते. शहरात ५७१ अधिकृत स्कूल बस आहेत. ८६ स्कूल बस या शाळांच्या मालकीच्या, तर ४८५ या बस कंत्राटदारांच्या आहेत. अनेक कंत्राटदारांनी स्कूल बसची तपासणी केली नसल्याची माहिती समोर आली होती. या स्कूल बस चालकांच्या विरोधात आरटीओ विभागाने १५ मे पासून कारवाईला प्रारंभ केला आहे. यासाठी तीन पथक स्थापन करण्यात आले आहेत. या पथकाने ५५ स्कूल बसची तपासणी केली.

दोन लाख ३६ हजार रुपये वसूल
३३ स्कूल बस चालकांकडून दोन लाख ३६ हजार रुपये वसूल करण्यात आले आहे. यातील २२ स्कूल बस जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या बस आरटीओ कार्यालयात तसेच रस्त्यावर लावण्यात आल्या आहेत. सोमवारपासून ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येईल, अशी माहिती आरटीओतील सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ योग दिनानिमित्त सामूहिक योगाभ्यास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तिसऱ्या जागतिक योग दिनानिमित्त २१ जून रोजी (बुधवार) सकाळी साडेसात वाजता औरंगपुरा येथील सरस्वती भुवन हायस्कूलच्या प्रांगणात सामूहिक योगासने करण्यात येणार आहेत. हा उपक्रम क्रीडा भारती आणि महाराष्ट्र टाइम्सच्या संयुक्त विद्यमाने होत असून शालेय विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहरभर जागतिक योग दिनानिमित्त यंदा विविध ठिकाणी सामूहिक योगासनांचे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर योग दिन साजरा व्हावा, जास्तीत जास्त जणांना योगाचे महत्त्व समजावे, या उद्देशाने योग दिनाच्या निमित्ताने सामूहिक योगासने करण्यात येणार आहे. २१ जून २०१५ रोजी पहिला जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात देशभर साजरा झाला होता. योग ही पाच हजारांहून अधिक जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना असून ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. सर्व जनतेचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखणे आणि जीवन योगमय करणे हेच या जागतिक योग दिनाचे उद्दिष्ट आहे. सरस्वती भुवन हायस्कूलच्या प्रांगणात सकाळी साडेसात ते नऊ या वेळेत सामूहिक योग साधना होणार असून औरंगपुरा, पैठणगेट, रंगारगल्ली, गुलमंडी, खडकेश्वर, क्रांती चौक परिसरातील नागरिकांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन क्रीडा भारतीच्या वतीने उपक्रमाचे समन्वयक उदय कहाळेकर (९८२३०१८००७) यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सीए परिषदेस प्रारंभ; जीएसटीवर विचारमंथन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘वस्तू सेवाकर (जीएसटी) विधेयकाची केंद्र सरकार लवकरच अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे बाजारपेठ व करप्रणालीत सुसूत्रीकरण होणार आहे,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजचे प्रदेशाध्यक्ष ऋषी बागला यांनी शनिवारी येथे केले. आयसीएआय भवन येथे आयोजित चार्टर्ड अकाऊंटच्या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटच्या पश्चिम विभागीय परिषदेत बागला यांनी सीएंना मार्गदर्शन केले. ‘जीएसटीचे अनेक फायदे असून हे एक चांगले पाऊल आहे. चार्टर्ड अकाऊंटंट्सनी सतत आनंदी राहावे व आपल्या सेवेतून राष्ट्रविकासात हातभार लावावा. आपले कामकाज, कुटुंब यात ताळमेळ राखावा. पैसा हे सर्वस्व नसून आनंदी राहणे ही श्रीमंती आहे,’ असे ते म्हणाले.
परिषदेत पहिल्या दिवशी कपिल गोयल, पाठक, जयेश गार्गी यांनी मार्गदर्शन केले. रविवारी रमेश प्रभू, मधुकर हिरगंगे, खुषरुम पाठक, अनिल भंडारी मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेत ७०० जणांचा सहभाग आहे. परिषदेसाठी पंकज सोनी, सचिन लाठी, गणेश शीलवंत, रोहन आचलिया, रवींद्र शिंदे आदी पुढाकार घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेच्या आढावा बैठकीत वादावादी

$
0
0

औरंगाबाद : संघटना बांधणीसंदर्भात विधानसभा मतदारसंघ निहाय शिवसेनेची शनिवारी आढावा बैठक झाली. या बैठकीत सोशल मीडियावरील पोस्टवरून महिला आघाडीत वादावादी झाली. या वादावादीचे प्रकरण थेट पालकमंत्र्यांपर्यंत गेले. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
शिवसेनेने शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून संघटना बांधणीचे काम सुरू केले आहे. या अभियानाचा आढावा घेण्यासाठी शनिवारी सुभेदारी विश्रामगृहात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीला खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघातील पक्ष बांधणीच्या कामाचा आढावा खैरे - घोसाळकर यांनी घेतला. या बैठकीसाठी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना देखील बोलावण्यात आले होते. विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतल्यानंतर खैरे-घोसाळकर यांनी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावले. बैठक सुरू होताच सोशल मीडियावरील पोस्टवरून वाद सुरू झाला. एका ज्येष्ठ महिला पदाधिकाऱ्याने खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. या पोस्टवरून खैरे यांच्यासह त्यांचे समर्थक पदाधिकारी संतापले. बदनामीकारक पोस्ट टाकणे योग्य नाही, शिस्तभंगाचा हा प्रकार आहे, अशा भावना व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोशल मीडियावरील पोस्टचे प्रकरण इतके तापले की ते थेट पालकमंत्री रामदास कदम यांच्यापर्यंत गेले. ज्या महिला पदाधिकाऱ्याने ही पोस्ट टाकली, त्या पदाधिकाऱ्याविरोधात कदम यांच्याकडे तक्रार करण्यात आली. कदम यांनी त्या पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा शब्द दिला आणि वादात आढावा बैठक संपली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ५० लाखांची ड्रेनेज लाइन काढून टाकण्याचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नूर कॉलनी नाल्यात पन्नास लाख रुपये खर्चून टाकलेली ड्रेनेज लाइन तातडीने काढून टाकण्याचे आदेश देत महापालिका आयुक्तांनी भूमिगत गटार योजनेच्या कामाला पुन्हा एक धक्का दिला. त्यामुळे भूमिगत गटार योजनेंतर्गत केलेल्या कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महापालिका मुख्यालयाच्या शेजारी असलेल्या नूर कॉलनी भागात कॉलनीच्या शेजारून वाहणाऱ्या नाल्याचे पाणी शिरत होते. त्यामुळे अनेक घरांमध्ये असुरक्षिततेची स्थिती निर्माण झाली होती. याच भागात डेंग्यूमुळे दोघांचा मृत्यू झाला होता. या घाण पाण्याच्या समस्येमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी पालिकेचे तत्कालीन आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे तक्रार केली. केंद्रेकर यांनी स्थळ पाहणी करून त्या नाल्यात ड्रेनेज लाइन टाकून पाणी प्रवाहित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार भूमिगत गटार योजनेचे काम करणाऱ्या विभागातर्फे १२०० मिलीमीटर व्यासाची आरसीसी पाइप लाइन टाकण्यात आली. पाइप लाइन टाकण्याचे काम मात्र योग्य प्रकारे झाले नाही. त्यामुळे नूर कॉलनी मधील रहिवाशांच्या समस्येत अधिकच भर पडली. नूर कॉलनीमध्ये आमखास मैदान, हिमायत बाग परिसर, कमल तलाव, टाउन हॉल
परिसरातून पावसाचे पाणी वाहून येते. हे पाणी टाउन हॉल उड्डाणपुलाखालून नूर कॉलनीतील नाल्यातून वाहत जात पुढे बारुदनगर नाल्यात मिळते. नूर कॉलनीत १२०० मिलीमीटर व्यासाची ड्रेनेज लाइन टाकण्यात आली. ही लाइन
जमिनीच्या खालून टाकण्याऐवजी जमिनीवरून टाकली. लाइन टाकताना लेव्हल मिळते की नाही याचा विचार करण्यात आला नाही. यामुळे वरच्या भागातून वाहत येणाऱ्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नाही. नागरिकांनी ड्रेनेज लाइनवर मातीची भर टाकून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे परिस्थिती अधिकच धोकादायक बनली आहे. ही बाब लक्षात घेऊन कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी १२०० मिलीमीटरची लाइन काढून टाकण्याची शिफारस केली. ती ग्राह्य धरून आयुक्तांनी भूमिगत गटार योजनेच्या कामाचे प्रमुख अफसर सिद्दिकी यांनी ती लाइन काढून टाकण्याचे आदेश दिले. ही ड्रेनेज लाइन काढली, तर वर्षभरापूर्वी केलेला पन्नास लाखांचा खर्च
वाया जाणार आहे.

चौकशीची मागणी
नूर कॉलनीच्या नाल्यात टाकलेली ड्रेनेज लाइन काढावी लागणार असल्यामुळे या संदर्भात या भागाचे नगरसेवक गंगाधर ढगे यांनी पालिका आयुक्तांना पत्र दिले. पन्नास लाख रुपये खर्च करून ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम करताना ते काळजीपूर्वक करायला हवे होते, पण तसे झाले नाही. आता हा खर्च वाया जाणार आहे. त्यामुळे अधिकारी व कंत्राटदाराकडून खर्च वसूल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ हर्सूल मैदानावर चौथा आठवडी बाजार सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शेतकऱ्यांचा माल थेट बाजारात पोचविण्यासाठी सुरू केलेल्या हर्सूल कारागृह मैदानावरील पहिल्याच आठवडी बाजारात शनिवारी पन्नास हजारांची उलाढाल झाली.
शेतमालाला योग्य भाव मिळावा व ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न पणन मंडळाने थेट शेतकरी ते ग्राहक या योजनेअंतर्गत संत शिरोमणी सावता माळी आठवडी बाजार अभियान हाती घेतले आहे. त्याअंतर्गत हर्सूल कारागृह मैदानावर शहरातील चौथा शेतकरी आठवडे बाजार सुरू करण्यात आला. कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामने यांच्या हस्ते बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक बी. आर. मोरे, पणन महामंडळाचे सर उप व्यवस्थापक डॉ. महेश साळुंके पाटील, बाजार आयोजक विलास भेरे, अशोक भगुरे आदी उपस्थित होते. ‘शेतकऱ्यांसह ग्राहकांसाठी ही योजना फायदेशीर असून शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी नागरिकांनी अशा आठवडे बाजारातूनच खरेदी करावी,’ असे आवाहन याप्रसंगी धामने यांनी केले. पहिल्याच बाजारात एक हजार २४० किलो भाजीपाल्याची विक्री झाली. जांभूळ खुल्या बाजारात १४० ते १६० रुपये किलोने विकले जात असताना त्यांची इथे ८० दराने त्याची विक्री झाली. दर शनिवारी या ठिकाणी सकाळी आठ ते दुपारी १२ पर्यंत आठवडी बाजार भरणार आहे. शहरात याआधीपासून दर्गा रोडवरील अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय परिसरात रविवारी, दशमेशनगर परिसरात बुधवारी, ज्योतीनगर येथे शुक्रवारी आठवडी बाजार भरविला जात आहे.

१९ गट स्थापन
पैठण, सिल्लोड, औरंगाबाद, खुलताबाद, फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांचे गट स्थापन करून त्यांना या आठवडी बाजाराच्या माध्यमातून हक्काचे मार्केट उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्यात असे सुमारे १९ गट स्थापन झाले असून, एका गटात १५ ते २० शेतकरी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ ...अन‍् प्रकटली इंटिरिअरची जादू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘ईफ्मा’च्या इन्स्टिटयूट ऑफ फॅशन मीडिया अॅँड अलाइडच्या २३ व्या इंटिरियर डिझाइन शोकेसच्या प्रदर्शनाला शनिवारी युवकांनी मोठी गर्दी केली. मराठवाडा साहित्य प्रबोधिनीच्या सभागृहामध्ये ४० विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमातून शुक्रवारपासून हे प्रदर्शन सुरू आहे.
प्रदर्शनाचे उदघाटन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाच्या सहाय्यक संचालक एस. एन. ठोंबरे, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी शशिकांत गुंटूरकर, प्राचार्य कुलकर्णी, शशिकांत पेंडसे, नंदकुमार देशपांडे, विनय अभ्यंकर यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी ईफ्माचे संचालक अनंत देशपांडे व प्रणिता देशपांडे, आर्किटेक्ट सिद्धांत जहागिरदार उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी फर्निचर, फ्लोरिंग, फॉल्स सिलिंग, वायरिंग,लायटिंग, एअर कडिशनिंग, प्लबिंग तसेच त्याचे साइन बोर्ड तयार केले आहेत. सर्वसामान्य ग्राहकाला समजण्यासाठी थ्रीडी सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आल्याने तयार केलेली डिझाइन्स प्रत्यक्षात कशा दिसतील याची कल्पना ग्राहकांना येते.

प्रदर्शनाची वैशिष्टये
- प्रदर्शनामध्ये २२ व्यावसायिक प्रकल्पांचे डिझाइन
- २० बाय ३० फूट जागेमध्ये रेडिमेड मेन्सवेअर, लेडिज वेअर, बुटीक, आईस्क्रीम पार्लर, शु शॉप, बुक शॉप, कॉफी शॉप, कॉस्मेटिक शॉप, म्युझिक शॉप, फर्निशिंग शॉप, टूर्स अॅँड ट्रॅव्हल्स, सॅनिटरी वेअर व टाइल्स शॉप, टॅटू शॉप, ब्युटी पार्लर, वन बीएचके, टु बीएचके, रो हाऊससह ट्विन बंगलोचे इंटिरिअर पाहण्याची संधी.
- संपूर्ण घराचे फ्लोरिंग,फॉल्स सिलिंग, कलर स्कीम,लायटिंग या सर्व सेवांचे डिझाइन्स ऑटो कॅड व थ्रीडी सॉफ्टवेअरमध्ये.
- मसाप सभागृहामध्ये सकाळी १० ते १ व दुपारी ४ ते ९ दरम्यान प्रदर्शन खुले. रविवारी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस.

मी सर्वप्रथम ग्रहिणी आहे, पण मला आर्टसची खूप आवड आहे. आमचा स्वतःचा व्यवसाय असल्याने मी या कोर्सला प्रवेश घेतला. या कोर्समुळे मला डिझायनिंग, डेकोरेशन व मटेरियच्या उपयोगितेवर माहिती मिळाली. - करुणा व्यास

मी स्वतः पेंटिंग करत असल्याने माझ्या आवडीला पूरक ठरेल असा हा कोर्स होता. आम्हाला काँस्मेटिक्स शॉपचे डिझाइन करायची संधी मिळाली. प्रॉडक्टकडे विशेष लक्ष जावे यासाठी मी ब्लॅक अॅँड व्हाईट थीम घेतली होती. - शलाका गंगवाल

मला टूर्स अँड ट्रव्हल्सचे डिझाइन करायचे होते. मी ग्रीन व ब्ल्यू थीम घेतली. डोळ्यांना रिफ्रेशिंग लूक देणारे रंग व प्रवाशांचा कम्फर्टला माझे प्राधान्य होते. - संध्या नथानी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्टसिटीचे लवकरच भूसंपादन

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्टसिटीसाठी पुढील महिन्यात भूसंपादन सुरू होणार असल्याचे संकेत महापालिकेचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिले आहेत. याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे आदेश सीएचटूएमएल या ‘पीएमसी’ ला देण्यात आले आहेत.
स्मार्टसिटी प्रकल्पाच्या कामांना गती देण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाच्या स्पेशल पर्पज व्हेकलचे (एसपीव्ही) अध्यक्ष अपूर्व चंद्रा यांनी आदेश दिले होते. चिकलठाणा शिवारात ग्रीनफिल्ड विकासासाठी भूसंपादनाची प्रक्रिया लवकर सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार आता भूसंपादनासाठीचे होमवर्क केले जात आहे. या संदर्भात माहिती देताना मुगळीकर म्हणाले, ग्रीनफिल्डसाठी २७५ हेक्टर जमीन संपादित करायची आहे. ती प्रक्रिया कशी करायची हे ठरवावे लागणार आहे. काही शेतकऱ्यांनी जमीन देण्याची तयारी दर्शवली आहे, काही जणांनी संमतीपत्रदेखील दिले आहे. काही शेतकऱ्यांचा मात्र जमीन देण्यासाठी विरोध आहे. त्यांच्याशी चर्चा करून भूसंपादनाची माहिती द्यावी लागणार आहे. लँडपुलिंग पद्धतीने भूसंपादन करावे लागणार असल्यामुळे ते कसे करायचे याचा तपशील ठरवावा लागणार आहे. हे करतानाच नगररचना विभागाची योजना (टाऊन प्लॅनिंगची स्किम) त्या भागात टाकावी लागणार आहे.
डीपीआर तयार झाल्यावर कालमर्यादा ठरवून कामे सुरू केली जाणार आहेत. त्यात प्रामुख्याने घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, स्मार्ट पार्किंग, स्मार्ट सिग्नलिंग आदींचा समावेश असेल. घनकचरा व्यवस्थापनाचा डीपीआर वीस ते पंचवीस दिवसांत तयार होईल असा दावा मुगळीकर यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रेष्ठ संततीसाठी संकल्पशक्ती महत्त्वाची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
श्रेष्ठ संततीसाठी शुद्ध संस्कार, शुद्ध विचार, शुद्ध आचरण, शुद्ध जीवनशैली याबरोबरच उच्चतम प्रतीची संकल्पशक्तीही तितकीच महत्त्वाची आहे. त्याची सुरुवात वधु-वराच्या निवडीपासूनच होते आणि अपत्य किमान पाच वर्षांचे होईपर्यंत सुरूच राहते. त्यामुळे जेथे आहात, तेथून पुढे जा आणि दृढसंकल्पातून देश, समाज व कुटुंबाला सर्वार्थाने पुढे नेणाऱ्या श्रेष्ठ संततीसाठी प्रयत्न करा, असे आवाहन ‘गर्भ विज्ञान’ विषयातील तज्ज्ञ डॉ. संजीवन व डॉ. वैदेही देवधर यांनी केले.
‘इस्कॉन’च्या वतीने रविवारी (१८ जून) यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये ‘श्रेष्ठ संततीचे उपाय’ या गर्भविज्ञानावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी ‘इस्कॉन’चे डॉ. रमेश लड्डा, विनोद बगडिया, डॉ. संतोष मद्रेवार, डॉ. संदीप लोखंडे आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी डॉ. देवधर दाम्पत्याने भारतीय संस्कृतीतील वेगवेगळी उदाहरणे देत गर्भविज्ञानाचे महत्व पटवून दिले. अलिकडे एडीएचडी, ऑटिझम, डाउन सिन्ड्रोम, आयजीयुआर अशा प्रकारच्या अनेक आजारांचे प्रमाण वाढले आहे, वाढतेच आहे, मात्र अगदी २०-२५ वर्षांपूर्वीपर्यंत अशा आजारांचे प्रमाण खूप कमी होते व त्यापूर्वीच्या काळात तर अगदी नगण्य होते. आताच्या काळात गर्भधारणा, गर्भावस्था, प्रसुती व बाळंतपण या बाबी अगदी सामान्यपणे होतील, असे राहिलेले नाही. त्यामुळेच गर्भ विज्ञान, अधिजनन शास्त्र या विषयांचे महत्त्व अधोरेखित होत आहे, असे त्यांनी सांगितले.
अर्थात, गर्भ विज्ञानाची सुरुवात अगदी वधू-वराच्या निवडीपासूनच होते. दोन नद्यांच्या मिलनाप्रमाणे उत्तम ‘जिन्स’च्या मिलनासाठी, ‘जेनेटिक कोड’साठी, उत्तम ‘जिन्स’ पुढच्या पिढीमध्ये प्रवाही होण्यासाठीच कुंडली, गोत्र बघितले जाते व हा पहिला संस्कार ठरतो. त्याचबरोबर विवाह संस्कार हादेखील एक अतिशय महत्त्वाचा संस्कार असून, ९ महिन्यांची प्रत्यक्ष गर्भावस्था आणि त्यापूर्वीच्या तीन महिन्यांचा कालावधीही खूप महत्त्वाचा ठरतो.
या तीन महिन्यांच्या काळातील पती-पत्नीच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक जीवनशैलीतून आणि उत्तम अपत्यनिर्मितीच्या संकल्पशक्तीतूनच श्रेष्ठ अपत्यनिर्मितीचा मार्ग जातो. तसेच लवकर विवाह, लवकर गर्भधारणा आणि २०-२५ या वयात पहिले अपत्य सर्वदृष्टीने योग्य ठरते. सर्वोच्च संकल्पशक्ती होती म्हणूनच जिजामातांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्मले, हेही लक्षात घेतले पाहिजे, असेही डॉ. देवधर दाम्पत्याने विषद केले.

आयुर्वेदात होते ‘जिन्स रिपेअर’
वाईट ‘जिन्स रिपेअर’ होणे आणि शरिरातील चांगले ‘जिन्स’ पुढे जाऊ देणे, हे आयुर्वेदाच्या उपचारांनी शक्य होते व शरीरातील वात-पित्त-कफाचे संतुलन साधणारा ‘पंचकर्म’ उपचार हा त्यातील एक महत्त्वाचा उपचार ठरतो. शरीर-मनाच्या सूक्ष्म पातळीवर कार्य करणाऱ्या आयुर्वेदामुळेच ‘जिन्स रिपेअर’ होतात, असेही देवधर दाम्पत्याने नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडीत १९.३९ टक्के पाणीसाठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जायकवाडी प्रकल्पाच्या वरील भागात जोरदार पाऊस झाला नसल्यामुळे पाण्याची आवक संथ आहे. प्रकल्पात १९.३९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. काही मंडळात अतिवृष्टी होऊनही पाणीसाठ्यात फार वाढ झाली नाही. वरील धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यानंतरच जायकवाडीच्या साठ्यात वाढ होणार आहे.
सध्या विभागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. काही मंडळात अतिवृष्टी झाली असली तरी धरणाची पाणी पातळी वाढलेली नाही. जायकवाडी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. सध्या प्रकल्पात १९.३० टक्के पाणीसाठा आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा कायम आहे. ही वरील धरणे भरल्यास खाली पाणी सोडतात. विसर्गामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होते. गोदावरी खोऱ्यात दमदार पावसाची प्रतीक्षा असून, वरील धरणे भरल्यानंतर जायकवाडीत भर पडणार आहे, असे अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर झालेल्या पावसाने धरणात फारशी वाढ होत नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

विभागातील स्थिती
प्रकल्प.........टक्केवारी
जायकवाडी.....१९.३९
येलदरी..........२.७९
विष्णुपुरी........९.९५
मांजरा...........२४.९८
लोअर दुधना....४१.७०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिस्थितीवर मात करत दहावीचा किल्ला सर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
वडिलांचा निधन झाल्याने पोरके झालेल्या दोन मुलांनी परिस्थिती व गरिबीवर मात करून दहावी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. या दोघांनीही आईचे कष्ट वाया जावू दिले नाहीत. प्रसंगी स्वतः काबाडकष्ट करून कुटुंबाला हातभार लावला पण, शिक्षणावरील लक्ष कमी होऊ दिले नाही.
भराडी येथील सरस्वती भुवन प्रशालेल्या सचिन साळवे याने दहावीच्या ९०.६०, तर गौरव खैरनार यांने ८७.८० टक्के गुण मिळवले आहेत. सचिनचे वडील त्याच्या लहानपणीच वारले, घरात भावंडे व लग्नाला आलेली बहीण, डोक्यावर छप्परही साधेच. उदरनिर्वाहासाठी शेतमजुरी, असा त्याचा जीवनसंघर्ष आहे. अत्यंत बिकट परिस्थिती असलेल्या साळवे यांना अत्यंत कमी कोरडवाहू जमीन आहे, त्यावर वर्षभराची गुजराण होणे कठीण आहे. त्यामुळे आईसह सर्व भावंडे शेतमजुरी करत. या परिस्थितीत सचिनला आईने शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. सचिन जिद्दीने अभ्यास केला. रविवारी व सुटीच्या दिवशी इतरांसोबत शेमजुरी केली. दररोज सकाळी पाच वाजता अभ्यासाला बसणे, सकाळी आईला घरकामात मदत करणे, रात्री एकपर्यंत अभ्यास, असा त्याचा दिनक्रम होता. दररोज अभ्यास केल्यमुळे परीक्षेचा ताण आला नाही, असे त्याने सांगितले. परीक्षेआधी प्रत्येक विषयाच्या प्रत्येकी पाच प्रश्नपत्रिका सोडवल्याचा लाभ झाल्याचे त्याने सांगितले. त्याने आयआयटी इंजिनीयर होण्याचे स्वप्न बाळगले आहे.
गौरव राजेंद्र खैरनार याच्या वडिलांचे ११ वर्षांपूर्वी अपघातात निधन झाले. त्याला घर व शेतजमीनही नाही. घरात आई, एक भाऊ, तीन बहिणी, असा परिवार. आईने शिवणकाम सुरू केले असले तरी परिस्थितीत फार फरक पडलेला नाही. मुलांच्या शिक्षणात कमतरता भासू नये यासाठी दिवस-रात्र मेहनत केली. गौरवनेही आईचे कष्ट वाया जाऊ दिलेले नाहीत. शिवणकामात आईला मदत करत वर्षभराचे नियोजन करून अभ्यास केला. नियमित तासिका, टिपण काढणे, मुद्देसूद लेखन, प्रश्नपत्रिका सोडविण्यावर भर यामुळे घवघवीत यश मिळाल्याचे तो सांगतो. स्वाभिमानी बाण्यामुळे परिस्थितीचे भांडवल केले नाही, सहानुभूती मिळविली नाही. गौरवने भविष्यात इंजिनियर होण्याचा संकल्प केला आहे.

आईच्या परिश्रमाला दाद
सकारात्मक दृष्टीकोण असेल तर परिस्थितीवर मात करता येते, यावर सचिव व गौरव दोघांचाही विश्वास आहे. त्यांनी वडिलांच्या यश अर्पण करताना आईच्या परिश्रमाला श्रेय दिले. या शैक्षणिक प्रवासात मुख्याध्यापक सुभाष साळवे, संजय दाभाडे, सखाहरी झिंजुर्डे, प्रदीप महाजन व इतर शिक्षकांची मोलाची मदत केल्याचे ते आवर्जून सांगातत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभियांत्रिकीसाठी इच्छुकांची संख्या वाढली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्टच्या पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरणे व निश्चितीची प्रक्रिया रविवारी संपली. यंदा अभियांत्रिकीसाठी मागील दोन वर्षांच्या तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. औरंगाबाद विभागातून १३ हजार ४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. मागील वर्षीच्या तुलनेत १ हजार ६४४ने वाढली आहे, तर औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल कायम असल्याचे चित्र आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे अभियांत्रिकी प्रथम वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया ५ जूनपासून सुरू झाली. ऑनलाइन अर्ज नोंदणी व निश्चितीसाठी असलेली मुदत आज संपली. प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठीची मुदत १७ जूनपर्यंत होती. ही मुदत शनिवारी एक दिवसाने वाढविण्यात आली. त्यामुळे रविवारी सुविधा केंद्र सुरू होती. आजही अनेक विद्यार्थ्यांनी सुविधा केंद्रावर अर्ज निश्चितीची प्रक्रिया पूर्ण केली. कागदपत्रांची तपासणी, अर्ज निश्चिती प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. शासकीय औषधनिर्माणशास्त्र कॉलेजच्या सुविधा केंद्रावर गर्दी मोठ्या प्रमाणात होती. इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन नोंदणीचा टप्पा राज्यात एक लाखाच्या वर पोहचली आहे. मराठवाड्यात सायंकाळी ५पर्यंत विभागातून १३ हजार ४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा नोंदणींचा आकडा वाढला आहे, तर औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी नोंदणीचा आकडा दहा हजारांच्या पुढे गेला आहे. विभागातून १० हजार ३८८ विद्यार्थ्यांनी बीफार्मसीसाठी अर्ज भरले, तर आर्किटेक्चरसाठी विभागातून २५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ऑनलाइन नोंदणी व अर्ज निश्चिती प्रक्रियेनंतर अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता यादी १९ जून रोजी जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना २०, २१ जून या दिवशी आक्षेप दाखल करता येतील, तर २२ जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. पहिल्या फेरीसाठी २३ ते २६ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरता येणार आहेत. प्रथम फेरीसाठीच्या जागांचे वाटप २८ रोजी जाहीर केले जाईल. २९ जून ते ३ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावयाचा आहे.

मागील दोन वर्षांची तुलना केली, तर नोंदणीचा आकडा वाढला आहे. सुमारे १५ टक्क्यांनी ही वाढल्याचे दिसते. त्यामुळे रिक्त जागा कमी होतील असे दिसते आहे.
- गोविंद संगवई, समन्वयक, प्रवेश प्रक्रिया, औरंगाबाद.

विभागातील इंजिनीअरिंग.........३३
प्रवेश संख्या...........................१२१८२

इंजिनीअरिंगासाठी नोंदणी
वर्ष...................ऑनलाइन नोंदणी
२०१५................१०१००
२०१६................११४००
२०१७................१३०४४

फार्मसी कॉलेज............२३
प्रवेश संख्या................१७८०
अर्ज संख्या.................१०३८८
आर्किटेक्चर नोंदणी.....२५९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार पेट्रोल पंपांची तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ठाणे येथे एका पंपावर पेट्रोल भरताना चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर रविवारी टास्क फोर्सने औरंगाबाद शहरातील चार पेट्रोल पंपांची तपासणी केली.
पेट्रोल चोरी, सुरक्षेच्या दृष्टीने शहरात गुन्हे शाखा, वजन व मापे विभाग, बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीच्या अधिकारी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचा विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास उस्मानपुरा भागातील पेट्रोल पंपावर या पथकाने तपासणी केली. पेट्रोल व डिझेल योग्य परिमाणात दिले जाते की नाही याची तपासणी करण्यात आली. शिवाय पंपांची तपासणी करण्यात आली. यानंतर या पथकाने हिंद सुपर पेट्रोल पंपाची तपासणी केली. तेथे ऑटोमेशन पद्धत व अन्य आवश्यक नियम पाळले जातात की नाही, याची तपासणी केली. त्यानंतर राज पेट्रोल पंप व रिलायन्सच्या पेट्रोल पंपाचीही तपासणी करण्यात आली.
या तपासणीत टोकियम, गिल्बर्गो, मिट्को मशीन कंपन्यांचे अधिकारीही सहभागी झाले होते. कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी इंधन डिस्पेंसर मशीनच्या नोजल व पल्सरमध्ये काही फेरफार केला आहे काय, याची तपासणी करण्यात आली. या टास्क फोर्समध्ये वैध मापन प्रशासन कार्यालयाचे निरीक्षक अशोक शिंदे, शिवहरी मुंडे, विकास रंजन पांडे, अपेक्षा भदोरिया, विपुल वर्मा, फुलचंद जाधव, प्रदीप लुटे, विजय गोरे, जगदीश खाडे आदींचा समावेश होता. या तपासणीत कोणत्याही प्रकारची अनुचित बाब आढळली नाही, अशी माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली.

अचानक तपासणी होणार
रविवारी टास्क फोर्सकडून तपासणी करण्यात आली आहे. शहरातील अन्य पेट्रोल पंपांवरही अचानक तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पॉलिटेक्निकचे प्रवेश आजपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पॉलिटेक्निक प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सोमवारी सुरू होत आहे. १९ ते ३० जूनदरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरणे व नोंदणी निश्चितीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांचे पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेकडे लक्ष लागले होते. तंत्रशिक्षण विभागाने शनिवारी वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार विद्यार्थ्यांना अॅप्लिकेशन कीट मिळणार आहे. ३० जूनपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येईल व अर्ज निश्चिती करता येईल. तात्पुरती गुणवत्ता यादी १ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यर्थ्यांना आक्षेपासाठी २ ते ४ जुलैपर्यंत मुदत असेल. अंतिम गुणवत्ता यादी ५ जुलै रोजी जाहीर केली जाईल. पहिल्या फेरीसाठीचे कॉलेजांचे पर्याय देण्याची प्रक्रिया ७ ते ११ जुलैदरम्यान होणार आहे. जागांचे वाटप १३ जुलै रोजी, तर एआरसी सेंटरवर जाऊन प्रवेश निश्चिती १४ ते १७ जुलैपर्यंत मुदत आहे.
पहिल्या फेरीनंतर रिक्त जागांची यादी १९ जुलै रोजी जाहीर केली जाईल. दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना कॉलेजांचे पर्याय २० ते २३ जुलैपर्यंत देता येतील. २४ जुलै रोजी जागा वाटप जाहीर केले जाईल. प्रवेश निश्चितीसाठी २५ ते २७ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तिसऱ्या फेरीसाठीसाठी रिक्त जागांची माहिती २९ जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे. तिसऱ्या फेरीत ३० जुलै ते १ ऑगस्टपर्यंत पर्याय देण्यासाठी मुदत आहे. जागा वाटपाची यादी ३ ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे. तर, प्रवेश निश्चितीसाठी ४ ते ६ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. संस्थेत जाऊन प्रवेश घेण्यासाठी ५ ते ९ ऑगस्टपर्यंत मुदत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

११वी प्रवेशाबाबत आज मार्गदर्शन

$
0
0

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. प्रवेश घेताना कोणती काळजी घ्यावी, कॉलेजांचे पर्याय कसे निवडावेत याबाबत विद्यार्थी, पालकांना माहिती व्हावी म्हणून ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे सोमवारी ‘मिशन अकरावी ऑनलाइन प्रवेश’ मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रुक्मिणी सभागृहात सकाळी ११ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात प्रवेश प्रक्रियेतील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेची सुरुवात ९ जूनपासून सुरू झाली. महापालिका हद्दीतील १०४ कॉलेजांमधील २२ हजार ९४० जागांवरील प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. ऑनलाइन प्रवेशाचे हे पहिले वर्ष असून, संभाव्य अडचणी लक्षात घेत विद्यार्थी, पालकांना प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती व्हावी या उद्देशाने या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात सकाळी ११ वाजता हा मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहे. शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके, शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांच्यासह प्रवेश प्रक्रियेतील तज्ज्ञ विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत पहिला टप्पा नोंदणीचा आहे. दुसऱ्या टप्प्यात कॉलेजचे संकेतांक विचारात घेताना, कॉलेजमधील शाखा, प्रकार, गट, माध्यम, उपलब्ध असणारे वैकल्पिक विषय निवडताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

स्थळ ः रुक्मिणी सभागृह, एमजीएम कॅम्पस
दिनांक ः १९ जून, सोमवार
वेळ ः सकाळी ११ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज ग्राहकांना मिळणार एलबीटीचे आठ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शहरातील नागरिकांनी जीटीएलच्या काळात १ मे २०११ ते नोव्हेंबर २०१४ या काळात एलबीटीसह वीज बिल अदा केले आहे. जीटीएल आणि महापालिकेच्या वादामुळे एलबीटीचा भार ग्राहकांवर टाकण्यात आला होता. याप्रकरणी वीज नियामक आयोगाने एलबीटी परत करावी, असा आदेश दिला आहे. त्याच्या दोन महिन्यानंतर महावितरणच्या मुख्य कार्यालयाने पुढील तीन महिन्यात ग्राहकांना आठ कोटी रुपये परत करावेत, असे आदेश दिले आहेत.
महावितरणतर्फे औरंगाबाद शहरात जीटीएलची १ मे २०११ ते नोव्हेबर २०१४ या काळात फ्रँचायझी म्हणून नेमली होती. राज्य शासनाच्या धोरणानुसार राज्यात कोठेही विजेवर एलबीटी किंवा जकात लावली जात नाही. पण, जीटीएल व औरंगाबाद महापालिका यांच्यातील वादामुळे जीटीएल ही खासगी कंपनी असल्याने एलबीटी आकारण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार जीटीएलकडे एलबीटी पोटी २२ कोटी रुपयांची मागणी केली होती. याला जीटीएलने हायकोर्टात आव्हान दिले, हे प्रकरण प्रलंबित आहे. दुसरीकडे महावितरणने नोव्हेबर २०१४मध्ये जीटीएलचा करार रद्द केला. पण औरंगाबाद शहरातील वीज ग्राहकाकडून वीज बिलात एलबीटी आकारणी सुरूच ठेवली. ही बाब ग्राहक प्रतिनिधी हेमंत कापडिया यांनी महाराष्ट्र वीज नियम आयोगाच्या औरंगाबाद येथील वीज दरवाढ सुनावणीवेळी निदर्शनास आणून दिली. वीज नियामक आयोगाने याप्रकरणी मुंबई येथे वेगळी सुनावणी घेवून २ फेब्रुवारी २०१७ रोजी ग्राहकाकडून वसूल केलेले ८ कोटी २० लाख रुपये तीन हफ्त्यात परत करण्याचा आदेश दिले. महावितरणतर्फे या आदेशाची अंमलबजावणी करण्यास विलंब होत असल्याने कापडिया व उर्जा मंचने आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. सततच्या पाठपुराव्यानंतर महावितरणच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाने १२जून २०१७ रोजी अधीक्षक अभियंता शहर विभाग यांना पत्र पाठवून एलबीटीची रक्कम परत करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार आगामी ‌तीन महिन्यात ही रक्कम ग्राहकांना परत देण्यात येणार आहे, अशी माहिती हेमंत कापडिया यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्ल्सचे विद्यार्थी देणार गरिबांना रमजान किट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रमजान ईदचा आनंद गरीब आणि गरजू कुटुंबानी साजरा करावा यासाठी पर्ल्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी खाऊचे पैसे व नातेवाईकांकडून रक्कम जमा करून रमजान किट देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांतर्फे ३०० रमजान किट देण्यात येणार आहे, अशी माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. यासाठी तीन लाख रुपये लागणार आहेत.
पर्ल्स अकॅडमीमध्ये स्कूल पार्लंमेंट नियुक्त केली असून पार्लमेंटने यंदा रमजान किट वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात शिरखुर्माचे पदार्थ देण्यात येणार आहेत. खोबरे, खजूर, बदाम, चारोळी, तूप, काजू, साखर, शेवयांचा त्यात समावेश आहे. तीन लाख रुपयांमधील काही वाटा विद्यार्थ्यांनी स्वतः उचलला आहे. उर्वरित रक्कम अकॅडमीतर्फे देण्यात येणार आहे, अशी माहिती पर्ल्स अकॅडमीचे प्राचार्य साबेर शेख यांनी दिली. हे साहित्य नायगाव आणि सावंगी भागातील गरीब कुटुंबांना देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी दान स्वीकारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे काम ‘जॉय ऑफ गिव्हिंग’ उपक्रमातून करण्यात येत आहे, असे मुफ्ती अब्दुल अजीम यांनी सांगिले. पत्रकार परिषदेत स्कूल पार्लमेंटचे सुलेमान रिजवी, अमाना मोतीवाला, काझी इकरा फातिमा, पटेल अब्दुल रहेमान यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुनप्रकरणातील आरोपीली आळंदीमध्ये दिंडीत अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
तालुक्यातील वळण शिवारात जमिनीच्या वादातून भावजय व पुतण्याचा कोयत्याने खून करणाऱ्या राजेंद्र दामोधर सूर्यवंशी या संशयित आरोपीला पोलिसांनी आळंदीच्या दिंडीत पकडले. पुणे पोलिसांनी राजेंद्र यास पकडून वैजापूर पोलिसांच्या ताब्यात दिले.
तालुक्यातील वळण शिवारातील शेतात ६ जून रोजी रुपाली संजय सूर्यवंशी (वय ३४) व गोकुळ संजय सूर्यवंशी (वय १४) या दोघांची कोयत्याने हत्या करण्यात आली होती. घटनेच्या १२ दिवसानंतर मोबाइलच्या लोकेशनवरून व तो कीर्तनकार असल्याने आळंदीच्या दिंडीत पकडण्यास पोलिसांना यश आले. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले. पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अतिरिक्त पोलिस उपाधीक्षक उज्ज्वला वनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक दुल्हत यांच्या पथकाने मोबाइलच्या लोकेशनवरून राजेंद्रचा नाशिकमध्ये शोध घेतला. राजेंद्र हा कीर्तनकार होता. वळण व परिसरात त्याची राजेंद्र महाराज म्हणून ओळख होती. राजेंद्र हा मोबाइलचे चार वेगवेगळे सिम कार्ड वापरून पोलिसांना चकवत होता. त्यामुळे लोकेशन मिळूनही पोलिसांना छडा लागत नव्हता. अखेर राजेंद्र याने पोलिसांच्या तावडीत सापडू नये म्हणून त्याच्या जवळचे चारही सिम नाशिक येथे नष्ट केले व त्रिंबकेश्वर गाठले. तेथून पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडीत तो सामील झाला. दरम्यान, राजेंद्र याचे छायाचित्र व अन्य माहिती पुणे पोलिसांना कळवण्यात आली होती. तो कीर्तनकार असल्याने मंदिरात आश्रय घेणार याची पोलिसांना खात्री होती. त्यामुळे शोध सुरू ठेवला होता. दरम्यान, राजेंद्र हा त्रिंबकेश्वर येथून आळंदीला पोहचला व तेथून तो रविवारी दिंडीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार होता. यावेळी पुणे पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला वैजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही घटना शिऊर पोलिसांच्या हद्दीत घडली होती.

असे झाले खून
वळण शिवारात सूर्यवंशी कुटुंबातील चार भावांची जमीन आहे. जमिनीची वाटणी झाली होती. पण संजय व राजेंद्र यांच्यात वाद होता. घटनेच्या दिवशी रुपालीचा चालक पती संजय हा गाडी घेऊन दिल्लीला गेला होता. रुपाली व तिचा मुलगा गोकुळ हे सकाळी ११ वाजता सुमारास शेतात गेले होते. त्यावेळी राजेंद्र हा बांधावर खांब रोवत होता. त्यास रुपालीने विरोध केल्याचा राग आल्याने राजेंद्र याने कोयत्याने सपासप वार करून रुपाली व गोकुळला ठार मारले. या घटनेनंतर राजेंद्र हा मोटारसायकलवरून पसार झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images