Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​ ‘सर्जिंग अहेड’ ऊर्जेचा स्रोत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘महापालिकेकडून काहीच चांगले कामे होत नसल्याचे अतिशय चुकीचे मत निर्माण होत असताना टाइम्स ग्रुपच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्जिंग अहेड’ हे कॉफी टेबल बुक खऱ्याअर्थी सकारात्मक ऊर्जेचे स्रोत ठरणार आहे,’ असे प्रतिपादन आमदार अतुल सावे यांनी केले.
शहरातील हॉटेल गिरिराजमध्ये शुक्रवारी (२३ जून) सकाळच्या सत्रात सुमारे दोन तास रंगलेल्या या ‘सिटीजन ऑफ औरंगाबाद व जालना- सिझन टू’ सोहळ्यावेळी ‘औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्जिंग अहेड’ या कॉफी टेबल बुकचे आमदार अतुल सावे, उपमहापौर स्मिता घोगरे, महापालिकेचे उपायुक्त रवींद्र निकम, महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल, पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, एंड्रेस हाऊजर्सचे श्रीराम नारायणन आणि स्टरलाइट टेक्नॉलॉजीचे अनिल भदोरिया यांच्या हस्ते थाटात प्रकाशन करण्यात आले. या कॉफी टेबल बुकसाठी एंड्रेस हाऊजर्स, स्टरलाइट टेक्नॉलॉजी आणि धूत ट्रान्समिशनचे सहकार्य लाभले आहे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात आलेल्या या कॉफी टेबल बुकमध्ये योगदान दिल्याबद्दल एंड्रेस हाऊजर्सचे श्रीराम नारायणन आणि स्टरलाइट टेक्नॉलॉजीचे अनिल भदोरिया यांचा सत्कार आमदार अतुल सावे, महापालिका उपायुक्त रवींद्र निकम, महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांच्या हस्ते करण्यात आला. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांना यावेळी गौरविण्यात आले.
यावेळी एंड्रेस हाऊजर्सचे श्रीराम नारायणन आणि स्टरलाइट टेक्नॉलॉजीचे अनिल भदोरिया यांनी मनोगतात पर्यावरणासाठी आपापल्या कंपनीच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली. टाइम्स ग्रुपच्या वतीने स्वप्नील वाटेगावकर यांनी सर्वांचे आभार मानले.

टाइम्स ग्रुपच्या प्रतिनिधीने महापालिकेच्या विविध विभागांची माहिती संकलित करून अतिशय आकर्षक पद्धतीने मांडून ‘औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्जिंग अहेड’ तयार केले आहे. महापालिकेच्या चांगल्या कामांची दखल या कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून घेऊन टाइम्स ग्रुपने आमच्या कामांचा गौरव केला आहे. या स्तुत्य उपक्रमात सहभागी होण्याची आम्हाला संधी मिळाली, याबद्दल टाइम्सचे आभार. - रवींद्र निकम, उपायुक्त, महापालिका

टाइम्स ग्रुप देशभरात विविध प्रकारचे उपक्रम राबवतो हे सर्वश्रुत आहे. महापालिकेच्या चांगल्या कामांची पावती 'औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्जिंग अहेड'च्या रूपाने मिळाली आहे. पर्यावरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कंपन्यांनी शहरात देखील लक्ष देणे गरजेचे असून कंपन्यांनी महापालिकेच्या सहकार्याने ऐतिहासिक औरंगाबादेत एकत्रित विकासकामे करायला हवी. - अतुल सावे, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्रांतिदिनी एक मिन‌िट राष्ट्रासाठी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘क्रांती दिनास येत्या ९ ऑगस्ट रोजी ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त देशभर सर्वांनी एकाच वेळी राष्ट्रगीत गाऊन शहिदांना वंदन करू,’ असे आवाहन नऊ ऑगस्ट क्रांती दिन समितीचे संयोजक विजय काकडे-पाटील व प्रवीण बिल्हारे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केले.
काकडे म्हणाले, ‘९ ऑगस्ट क्रांती दिन समिती स्थापन करण्यात आली असून, या उपक्रमासाठी सर्वत्र दौरे करून लोकांनी सहभागी व्हावे, यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. ९ ऑगस्ट १९४२ रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे रणशिंग फुंकले गेले. या क्रांती दिनाला येत्या ९ ऑगस्ट २०१७ रोजी ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून भारतीय स्वांतत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या वीरांना अभिवादन करण्यासाठी, शहीद झालेल्या जवानांना वंदन करण्यासाठी आणि सैनिकांना आम्ही तुमच्या पाठिशी आहोत हे दर्शविण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यानिमित्ताने जगभरात आपली एक विराट ताकद दिसून येईल. शैक्षणिक संस्था, शासकीय, निम शासकीय कार्यालय, खासगी संस्था, कार्यालय, सार्वजनिक ठिकाणे सर्वत्र एकाच वेळी राष्ट्रगीत गायन केले जाईल. या उपक्रमात सहभागी व्हावे,’ असे आवाहन काकडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ रस्ते कामाची मदार सरकारवर

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील सर्वात महत्त्वाचा असलेल्या जालना रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी राज्य सरकारची भूमिका महत्वाची असणार आहे. महापालिकेच्या मदतीने राज्य सरकारने विस्तारीकरणातील अडथळे दूर करून सर्व क्लिअर करून दिल्यानंतरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कामाला सुरुवात करणार आहे. नगरनाका ते केंब्रिज या रस्त्यावर काही ठिकाणी जमीन संपादन, अडथळे हटविणे हे महत्वाचे काम राज्य सरकारला करावे लागणार आहे.
जालना रस्त्याचे विस्तारीकरण आणि मजबुतीकरण तसेच बीड बायपास विस्तारीकरण व काँक्रिटीकरण यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दोन वर्षांपूर्वी घोषणा केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हे रस्ते बनविण्यात येणार असून त्यासाठी ८०० कोटींची तरतूद केली आहे. निविदा निश्चित झाल्यानंतर कामास सुरुवात होईल. एकूण या प्रक्रियेतील महत्वाचे टप्पे आता पार पडले आहेत. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे एक मागणी केली आहे. जालना रस्त्यावरील जागा संपादनाचा प्रश्न पूर्णपणे सोडवावा, रस्त्यालगत असलेले वीजेचे खांब तसेच जमिनीखालून गेलेल्या जलवाहिनी, मलनिसारण वाहिनी, दूरध्वनी केबल यासंदर्भातील तिढे सोडविणे आवश्यक आहे. हे सर्व प्रश्न हाती घेऊन ते सोडवावेत, त्यानंतर काम सुरू होणार आहे.

समस्यांचा डोंगर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेने या रस्त्याच्या सर्वेनंतर बाधित होणाऱ्या मालमत्तांना मार्किंग केले होते. त्यानुसार आकाशवाणी परिसरातील अनेक मालमत्ताधारकांनी आपापल्या इमारती पाडून घेतल्या होत्या, पण काही ठिकाणी जमीन संपादन अद्याप बाकी आहे. त्यासाठी आता पीडब्ल्यूडीला महापालिका प्रशासनाला हाताशी धरून कार्यवाही करावी लागणार आहे. त्यानंतर अंतर्गत वाहिन्यांबाबतही तातडीने निर्णय घ्यावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ शहीद जाधव यांच्या कुटुंबीयास शिवसेनेची मदत

$
0
0

शहीद जाधव यांच्या कुटुंबीयास शिवसेनेची मदत
औरंगाबाद : शहीद संदीप जाधव यांच्या कुटुंबीयास सोमवारी शिवसेनेतर्फे पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली.
सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथे जाऊन पालकमंत्री रामदास कदम यांनी जाधव कुटुंबीयांची भेट घेतली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने या कुटुंबाला पाच लाख रुपये मदत म्हणून दिले. केळगावातील तरुण मुले देशसेवेसाठी सैन्यात भरती होत असल्यामुळे हे गाव विकास कामाच्या दृष्टीने दत्तक घेण्याची घोषणा कदम यांनी यावेळी केली. येणाऱ्या एक वर्षात शासनाच्या सर्व योजना गावात राबवण्यात येतील, असे त्यांनी जाहीर केले. संदीप जाधव यांच्या पत्नीस लवकरात लवकर शासकीय सेवेत घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी खासदार चंद्रकांत खैरेसह इतर नेते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ कोल्हापुरी गेट खरेदीचा मुहूर्त यंदाही हुकणार

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागातर्फे उभारण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या गेट खरेदीचा मुहूर्त यंदाही हुकण्याची शक्यता आहे. अध्यक्षांनी येत्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव ठेवला असला, तरी निविदेच्या तांत्रिक अटींची पूर्तता होणे अवघड असल्याने यावरून वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत.
सिंचन विभागातर्फे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सिंचन क्षमता वाढावी, यासाठी गेल्या काही वर्षांत टप्प्याटप्प्यात मागणीनुसार कोल्हापुरी बंधारे उभारले. संबंधित जागेची क्षमता, साईट आणि निकड लक्षात घेऊन तज्ज्ञांच्या संमतीनंतर या बंधाऱ्यांना मंजुरी दिली गेली. अनेक वर्षांपूर्वी उभारलेल्या बंधाऱ्यांचे गेट चोरीला गेला. चार वर्षांपासून याची माहिती एकत्रित करण्यासाठी सिंचन विभागाची यंत्रणा कार्यान्वित झाली, पण संपूर्ण आकडा अद्याप हाती आलेला नाही. दरम्यान गेल्यावर्षी जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट बसविण्याबाबत ठराव मंजूर केला गेला. उपकरातून त्यासाठी अडीच कोटींची तरतूद केली गेली. निविदा प्रक्रिया राबविली गेली. ई टेंडरिंगपद्धतीने प्रक्रिया राबविली गेली. एका गेटची किंमत ७,१००च्या आसपास ठेवली गेली होती. ही रक्कम कमी असल्या कारणाने निविदाच भरली गेली नाही. दरम्यान सभागृहात सदस्यांनी आपापल्या भागातील बंधारे निवडले गेले नाहीत, म्हणून तीव्र नाराजी व्यक्त केली. काही सदस्यांनी गेटच्या बाबत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होतो. हे टाळण्यासाठी प्रत्येक गेटवर नंबर टाकावा, जिल्ह्यात एकाच दिवशी गेट बसवावेत, व्हिडिओ रेकॉर्डिंग करावी असे सूचविले गेले होते. मात्र संभ्रमावस्था वाढल्याने हा प्रस्ताव तडीस जाणार नाही, याची प्रशासनाला खात्री होती. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका लागल्या आणि सगळे नियोजन मागे पडले. दरम्यान प्रशासनाने कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या गेटखरेदीसाठी पुन्हा निविदा प्रक्रिया राबविली गेली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेटच्या किमती ९०० रुपयांची वाढ करण्यात आली. निविदा दाखल करण्याच्या मुदतीत काही जणांनी निविदा दाखल केल्या आहेत. त्यानुसार आता हा प्रस्ताव मार्गी लागणार अशी चिन्हे आहेत.

नवीन सदस्यांकडून शंका
बंधारे निवडताना प्रशासनाने काय निकष लावले असा प्रश्न आता नवीन सदस्यांकडून उपस्थित केला जात आहे. वास्तविक सिंचन विभागाने यावेळची प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने राबविली आहे. ज्या बंधाऱ्यांना तातडीने गेटची आवश्यकता आहे. अशांचा तालुकानिहाय सर्वे करून निवड केली गेली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात ३,५०० गेट बसविले जाणार आहेत. मात्र, सदस्यांकडून प्रश्न उपस्थित केले गेल्याने यंदाची प्रक्रियाही रखडणार की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ साडेबारा लाख झाडांची वनराई फुलणार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी जिल्ह्यात १ जुलै ते ७ जुलै दरम्यान होणाऱ्या वनमहोत्सवात एकूण साडेबारा लाख रोपांची लागवड करून वनराई फुलविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यात साडेसहा लाख रोपांची लागवड करण्यात येणार आहे.
राज्यात वनमहोत्सवाच्या सप्ताहात चार कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी स्वयंसेवी संस्था, अशासकीय संस्था, खासगी मंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच लोकप्रतिनिधी व हरित सेना (ग्रीन आर्मी) यांचे सहकार्य घेण्यात येत आहे. ‘रोपवाटिकेतून संबंधित ग्रामपंचायतींना मोफत रोपटे दिले जात असून, वाहतूक खर्च वन विभागमार्फत केला जात आहे. अन्य विभागांना मागणीनुसार शासकीय दरात रोपे दिली जात असून नुसती रोप लागवड करून चालणार नाही. या रोपांच्या संगोपनाची जबाबदारी सर्वांनी मिळून पार पाडावी,’ असे आवाहन उपवन संरक्षक सतीश वडस्कर यांनी केले आहे.

वन व सामाजिक वनीकरण विभागाच्या मिळून जिल्ह्यात २२ रोपवाटिका असून त्या ठिकाणी वड, पिंपळ, विविध फळझाडे यासह विविध असे १५ लाखांहून अधिक रोप तयार झाले आहेत. वन विभागाला दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे वृक्ष लागवडीची तयारी अंतिम टप्प्यात असून खड्डे खोदण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. - सतीश वडस्कर, उपवन संरक्षक

असे होईल वृक्षारोपण
- ५,५०० रोपे वनविभाग लावेल
- ८६१ ग्रामपंचायतींनाही लक्ष्य
- ३ लाख १३ हजार झाडे लावणार
- १ लाख ५० हजार कृषीविभाग
- ८० हजार उदयोग जगत
- ३० हजार महापालिका
- ५ हजार राखीव बटालियन
- ५ हजार साई क्रीडा केंद्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धान्य घोटाळ्यात अधिकाऱ्यांचा हात

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील शासकीय धान्य घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालली असून, पाच हजार क्विंटलपेक्षा अधिक धान्य काळ्या बाजारात विकले गेल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती समोर येत आहे. या धान्य घोटाळ्या प्रकरणी संबंधितावर दीड कोटी रुपयांची वसुलीची कारवाई होणार असून, यामध्ये महसुल विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यावरही कडक कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येते. रक्कम वसुलीच्या कारवाईबरोबरच दोषी अधिकाऱ्यांवर पोलिस कारवाईही होण्याची शक्यता आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील अंदोरा येथे पोलिसांनी काळ्या बाजारात जाणारा धान्याचा टेम्पो पकडला होता. यात रेशनचे गहू व तांदूळ होते. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला व कळंब येथील गोदामपाल अभिजीत खराटे याला अटक केली. गुन्ह्याची व्याप्ती पाहून पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी हा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्याकडे सुपूर्द केला. तर, या घोटाळा व गोदाम तपासणीसाठी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती नेमली. या समितीने तपासणी पूर्ण केली असून, यात जवळपास ५ हजार क्विंटल पेक्षा अधिकच्या धान्याची तूट आढळली असल्याची सूत्रांची माहिती आहे. बाजारभावाप्रमाणे दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वसुली प्रस्तावित केली जाणार आहे. या प्रकरणात काही अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्यावर प्रशासकीय व फौजदारी कारवाई केली जाणार आहे. या धान्य घोटाळ्याचा कळंब येथील एक प्रतिष्ठित धान्य व्यापारी मास्टर माइंड असून याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. कळंबसारखीच स्थिती संपूर्ण जिल्ह्यात असल्याने गेल्या एक वर्षाच्या सर्व धान्य वाटप व गोदाम तपासणीचे आदेशही दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाळाच्या डीएनए टेस्टमुळे सिद्ध झाला बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दलित सेल्समन तरुणीवर वर्षभर बलात्कार करणाऱ्या निवृत्त पोलिसाच्या आरोपी मुलाला १० वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपयांचा दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. शिंदे यांनी मंगळवारी (२७ जून) ठोठावली. त्याचवेळी पीडितेला एक लाख रुपये नुकसान भरपाईपोटी देण्याचेही आदेश कोर्टाने दिले आहेत. हा गुन्हा बाळाच्या डीएनए टेस्टमुळे सिद्ध झाला.
याप्रकरणी जालना येथील २४ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी ही एका डिटर्जंट कंपनीचे मार्केटिंगचे काम करीत होती व तिच्या कंपनीचे कार्यालय हे औरंगाबाद शहरातील शक्तीनगर परिसरात होते व ती सिडको परिसरात मार्केटिंगसाठी जात होती. दरम्यान, पीडितेला आरोपी संतोष रायसिंग चव्हाण (वय २६, रा. राणीउंचेगाव, ता. घनसावंगी, जि. जालना) हा सिडको बसस्थानक परिसरात भेटला व डिटर्जंट पावडर विकत घेण्याच्या निमित्ताने आरोपीने पीडितेला स्वतःच्या हर्सूल जेल क्वार्टरमध्ये नेले. तिथे त्याने शरीरसुखाची मागणी केली असता, पीडितेने त्याला विरोध केला. मात्र जिवे मारण्याची धमकी देत तसेच लग्नाचे आमीष दाखवत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतरही जिवे मारण्याची धमकी देत जवळजवळ वर्षभर तिच्यावर अत्याचार केला. त्यातून पीडिता चार महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर पीडितेने घडला प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर पीडिता व तिची आई आरोपीच्या घरी गेली आणि आरोपीचा पिता तसेच पोलिस खात्यातील निवृत्त कर्मचारी व दुसरा आरोपी रायसिंग रुपलाल चव्हाण (वय ६०) याच्याकडे ‘पीडितेचे आरोपीशी लग्न लावून द्या’ अशी मागणी केली. त्यावर दोन्ही आरोपींनी पीडिता व तिच्या आईला जातीवाचक शिविगाळ करून त्यांना मारहाण केली. याप्रकरणी पीडितेने ५ सप्टेंबर २०१० रोजी तक्रार दिल्यानंतर बेगमपुरा पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध कलम ३७६, ३२३, ५०४, ५०६, तसेच अॅट्रॉसिटी कायद्याच्या कलम ३ (१) (१०) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तत्कालिन सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप भाजीभाकरे यांनी तपास करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील अजित अंकुश यांनी ७ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने आरोपी संतोष चव्हाण याला कलम ३७६ अंतर्गत १० वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, तर अॅट्रॉसिटी कायद्याच्या कलम ३ (१) (१०) अंतर्गत ६ महिने सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली, तर दुसरा आरोपी रायसिंग चव्हाण याला निर्दोष मुक्त केले. त्याचवेळी नुकसान भरपाईपोटी पीडिता तसेच आरोपीपासून जन्मलेल्या बालकाला एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचेही आदेश कोर्टाने दिले.
खटल्याच्या सुनावणीवेळी, पीडिता, आरोपी व आरोपीपासून जन्मलेल्या बालकाची डीएनए चाचणी करण्यासाठी सरकार पक्षातर्फे कोर्टात अर्ज सादर करण्यात आला. कोर्टाच्या अनुमतीनंतर तिघांचे रक्तनमुने मुंबईतील कलिना प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आणि डीएनए रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आरोपीपासूनच पीडितेच्या पोटी संबंधित बालकाचा जन्म झाल्याचे सिद्ध झाले. याची कोर्टाने दखल घेतली आणि शिक्षेवर शिक्कामोर्तब झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जागतिकीकरणाचा चेहरा साहित्यातून पुढे यावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘युद्ध वगळता जागतिकीकरणाच्या युगात देशांच्या सीमा उरलेल्या नाहीत. बहुराष्ट्रीय कंपन्या गरीब देशांमध्ये स्वतः शासक बनू पाहत आहेत. भांडवल आणि नफा केवळ या पलिकडे कंपन्यांना काहीच दिसत नाही. त्यांचा हा विक्राळ चेहरा आपल्या परिचयाचा नसून तो साहित्यातून समोर आला पाहिजे,’ अशी अपेक्षा जेष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केली.
‘जागतिकीकरणानंतरचे मराठी साहित्य’ या प्रा. प्रल्हाद लुलेकर गौरव ग्रंथाचे प्रकाशन रविवारी तापडिया नाट्यमंदिरात प्रा. पठारे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. भगवानराव देशपांडे होते. यावेळी प्रा. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. सुधाकर शेलार, प्रा. प्रल्हाद लुलेकर, सुशिला लुलेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या ग्रंथाचे संपादन प्रा. नागनाथ कोत्तापल्ले आणि प्रा. दत्ता भगत यांनी केलेले आहे.
‘आपण जागतिकीकरण फार भाबडेपणाने स्वीकारले आहे. पूरातन काळापासून आपण जगाशी व्यापार करत आहोत. फरक एवढाच आहे की, त्या काळी व्यापाऱ्यांची मनमानी नव्हती. आज आपल्या सार्वभौमित्त्वाला आव्हान निर्माण झाले आहे. कमकुवत देशांवर जागतिकीकरणाचा होणा परिणाम साहित्यिकांनी शोधावा,’ असे आवाहन प्रा. कोत्तापल्ले यांनी केले. डॉ. सुधाकर शेलार म्हणाले की, ‘आपले अवगुण आणि निष्क्रियता लपवून सरळसरळ जागतिकीकरणाला दोष देणे अयोग्य आहे. श्रीमंत समर्थन करतात, गरीब विरोध करतात. पण, मध्यमवर्ग गोंधळलेला आहे. भौतिक सुखाची गरज आणि ओढ पाहता जागतिकीकरणाला पर्याय नाही व त्यापासून सूटका नाही. समाजाचे वाटोळे करायला जागतिकीकरणाची गरज नाही, त्यासाठी आपण पुरेसे आहोत. त्यामुळे जागतिकीकरणाला दोष देणे थांबावावे, असे डॉ. शेलार म्हणाले.
याप्रसंगी ‘जास्वंदाची फुले : प्रा. प्रल्हाद लुलेकर व्यक्ती आणि साहित्य’ व ‘नवे चर्चाविश्व : दलितेतरांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेंद्र तातेड, सूत्रसंचालन प्रवीण लुलेकर व शीतल पांचाळ-लुलेकर, आभारप्रदर्शन समिधा जाधव यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा चांगला निर्णय घेतला, मात्र पिकाला हमीभाव दिल्याशिवाय आणि दलाली कमी झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या समस्या संपणार नाहीत. सद्यस्थितीत गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देण्याची गरज आहे,’ असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा आरक्षण, गड-किल्ल्यांचे संवर्धन या मुद्द्यांवर राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे काम सुरू आहे. राज्य सरकारने घेतलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. फक्त गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी द्यावी, असे संभाजीराजे यांनी नमूद केले. ‘पिकाला हमीभाव दिल्याशिवाय शेतीच्या समस्या संपणार नाहीत. आत्महत्या अंतिम पर्याय नाही हे सांगण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन गरजेचे आहे. या कामासाठी सर्वपक्षीय समिती नेमून काम सुरू करावे,’ असे संभाजीराजे म्हणाले. पक्षीय मतभेद बाजूला सारून काही प्रश्नांवर एकत्र आले पाहिजे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. अशा प्रकारच्या सकारात्मक भेटीतून प्रश्न मार्गी लागू शकतील, असे त्यांनी नमूद केले. मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडविण्याची गरज आहे. मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करावी, असा सल्ला संभाजीराजे यांनी दिला.

हे शोभेचे पद
‘फारसे अधिकार नसल्यामुळे राज्यसभेचे सदस्यत्व शोभेचे पद आहे, मात्र दबाव टाकून काम करून घेता येते. गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम लवकरच सुरू होणार आहे. सर्व मंजुरी मिळाली असून काम सुरू होईल,’ असे संभाजीराजे यांनी सांगितले. कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरातील वाद संवेदनशील असून, पुजाऱ्यांनी चुकीच्या गोष्टी केल्यामुळे वाद उफाळून आला, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिक्षण विषमता नष्ट करते’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘अठरापगड जातींना एकत्र आणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजाच्या उद्धाराचे कार्य केले. या दोघांच्या कार्यात फक्त कालखंडाचा फरक आहे. सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी शिक्षण हाच उपाय असल्याचा विचार शाहूंनी रूजवला. या विचारानुसार वाटचाल करण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. छत्रपती शाहू महाराज जयंती सोहळ्यात ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र आणि राजर्षी शाहू महाराज अध्यासन केंद्र यांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती, प्राचार्य टी. एस. पाटील, कुलगुरू प्रोफेसर बी. ए. चोपडे, कुलसचिव डॉ. प्रदीप जबदे, परीक्षा नियंत्रक डॉ. राजेश रगडे, नंदकुमार राठी, डॉ. राजेश करपे व डॉ. राम चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यावर संभाजीराजे यांनी विचार मांडले. ‘शाहू महाराजांनी बहुजन समाजाचा उद्धार करतानाच उद्योग, सिंचन, शिक्षण, क्रीडा या क्षेत्रात बहुमोल कार्य केले. राजेशाही थाट सोडून दीनदलितांसाठी समतेचा लढा दिला. विषमता नष्ट करण्यासाठी शिक्षण हाच पर्याय असल्याचे लक्षात येताच त्यांनी संस्थानात सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण लागू केले. ३९ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या करवीर संस्थानात एकूण २३ टक्के खर्च शिक्षणावर होत असे. शाहू महाराज किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा केवळ जयजयकार करून उपयोग नाही, तर त्यांचे विचार प्रत्यक्ष स्वीकारणे गरजेचे आहे,’ असे संभाजीराजे म्हणाले.
‘आजच्या संदर्भात शाहू महाराजांच्या कार्याची प्रस्तुतता’ या विषयावर प्राचार्य टी. एस. पाटील यांचे व्याख्यान झाले. ‘समताधिष्ठीत विचार रुजल्याशिवाय देश मोठा होणार नाही. फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार हाच देशाच्या विकासाचा मार्ग आहे. यज्ञ संस्कृती नाकारून शाहू महाराजांनी बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली केली. आरक्षण देऊन मागासलेल्या समाजाला प्रगतीची संधी दिली. स्वातंत्र्य, समता, बंधुता हा विचार त्यांचे शिक्षक सर फ्रेजर यांनी दिला होता. या विचारानुसारच शाहू महाराजांनी कार्य केले,’ असे पाटील म्हणाले.
संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आदर्श विचारांवर चर्चा करा
‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला विचारांचा जागर करण्याऐवजी डॉल्बीचा सेट दिसतो. महापुरूषांच्या आदर्श विचारांवर चर्चा करण्याची गरज आहे. शिवाजी महाराज हिंदुत्ववादी की पुरोगामी या वादाला अर्थ नाही. वादातून काहीच साध्य होणार नाही,’ असे संभाजीराजे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंधरा वर्षाच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भावसिंगपुरा, भीमनगर भागात १५ वर्षाच्या मुलाचा घरात सोमवारी सायंकाळी चार वाजता मृत्यू झाला. सुमेध नवनाथ तेजाड, असे या मुलाचे नाव असून त्याच्या गळ्यावर गळफासाचे व्रण आढळल्यामुळे मृत्युप्रकरणी संशय निर्माण झाला आहे. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तो दहावीचा विद्यार्थी होता.
सुमेश तेजाडचे आई-वडील सोमवारी सायंकाळी कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यावेळी घरी सुमेध व त्याची मोठी चुलत बहीण दोघेच होते. सुमेधची बहीण घरातील कामे संपल्यानंतर आंघोळीसाठी गेली होती. यावेळी सुमेध त्याच्या खोलीत पलंगावर अभ्यास करीत बसला होता. सुमेधची बहीण आंघोळ करून परत असली असता तिला सुमेध बेशुद्धावस्थेत पलंगावर पडलेला दिसला. सुमेधच्या बहिणीने आरडाओरडा केल्यानंतर त्याची काकू धावत आली. दरम्यान सुमेधची आई देखील घरी परतली होती. सुमेधला घाटी ह‌ॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. चक्कर येऊन सुमेधचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या पंचनाम्यामध्ये सुमेधच्या गळ्यावर गळफासासारखे व्रण आढळून आले आहे. हा घातपात आहे का नैसर्गिक मृत्यू याबाबत शंका निर्माण झाली आहे. याप्रकरणी सध्या छावणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावी ऑनलाइन प्रवेश मुदतवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत नोंदणीसाठी दोन दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने मंगळवारी घेतला. विद्यार्थ्यांना आता २९ जूनपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत १८ हजार ९९७ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणीची आणि त्यापैकी १६ हजार ७४८ विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरण्याची (टप्पा-२) प्रक्रिया पूर्ण केली आहे.
औरंगाबाद शहरात यावर्षी अकरावी प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. ऑनलाइन नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना २७ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. मंगळवारी ऑनलाइन नोंदणीची मुदत संपण्यापूर्वी शिक्षण विभागाने नोंदणी अर्जासाठी आणखी २ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना २९ जूनपर्यंत अर्ज भरणे व निश्चितीची प्रक्रिया करता येणार आहे. ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेत अनेक विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेतील ‘टप्पा-२’ शिल्लक आहे. त्यासह अनेकांच्या अर्जातील त्रुटी दूर करून अर्ज निश्चितीची प्रक्रिया करणे बाकी असल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याचे विभागातील सूत्रांनी सांगितले. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया आज संपत असल्याचे माहित असल्याने मंगळवारी झोन सेंटरवर ‘टप्पा-२’ प्रक्रिया, अर्जातील दुरुस्तीसाठी विद्यार्थी, पालकांनी गर्दी केली होती.

पुढचे वेळापत्रकही बदलणार
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले होते. प्रवेश प्रक्रियेत चार फेऱ्या आहेत. ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ दिल्याने पुढील प्रक्रियेचे वेळापत्रकही पुढे जाण्याची शक्यता आहे. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार २८ जून रोजी व्यवस्थापन कोट्यातील ५ टक्के आरक्षित जागांसाठीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार होती. नव्या वेळापत्रकानुसार ही यादी आता ३० जून रोजी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर दोन दिवस प्रवेश निश्चितीसाठी देण्यात आले होते. दोन दिवसाची मुदतवाढ दिल्याने वेळापत्रक पुढे जाईल, परंतु त्याचे वेळापत्रक एक-दोन दिवसांत जाहीर केले जाईल असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी ‘मटा’ला सांगितले.

अर्जनिश्चितीसाठी अधिकचा वेळ
प्रवेश प्रक्रियेत दोन महत्त्वाचे टप्पे आहेत. त्यात पहिला ऑनलाइन नोंदणीचा टप्पा आहे. पहिला टप्पा १८ हजार ९९७ विद्यार्थ्यांनी पूर्ण केला. त्यातील १४ हजार ३७१ अर्जाची सत्यता तपासणी झाली, तर दुसरा टप्पा १६ हजार ७४८ विद्यार्थ्यांनी पार केला. त्यापैकी १६ हजार ६१८ विद्यार्थ्यांनी सत्यता तपासणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. नोंदणीची संख्या आणि सत्यता तपासणीच्या आकडेवारीत तफावत आहे.

माहिती पुस्तिकांचा पुन्हा आढावा
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अद्यापही माहिती पुस्तिकांचा तुटवडा असल्याचे चित्र आहे. शिक्षण विभागाच्या मदत केंद्रावरही त्याचा तुटवडा होता. त्यामुळे मंगळवारी पुन्हा शाळांमधील शिल्लक माहिती पुस्तिकांचा आढावा घेण्यात येत आहे. नोंदणीची प्रक्रिया शाळांना करायची होती. असे असतानाही अनेक शाळांमधून तेवढी नोंदणी झाली नाही. त्यामुळे काही शाळांकडे अद्याप माहिती पुस्तिका शिल्लक आहेत. विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिकेत लॉग-इन आयडी देण्यात आला आहे. विद्यार्थ्याला स्वतंत्र आयडी, पासवर्ड दिला आहे.

ज्युनिअर कॉलेज ः ११६
प्रवेश संख्या ः २४११०
ऑनलाइन नोंदणी (टप्पा-१) ः १८९९७
‘टप्पा-२’ पूर्ण केलेले विद्यार्थी ः १६७४८

ऑनलाइन नोंदणीला दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ होईल. ऑनलाइन नोंदणीनंतर अर्ज निश्चितीची प्रक्रियेचा टप्पा पूर्ण करणे बाकी आहे, त्यांनाही ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. पुढचे वेळापत्रकही लवकरच जाहीर केले जाईल.
- वैजनाथ खांडके, शिक्षण उपसंचालक, औरंगाबाद विभाग.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा आरोग्य केंद्रात स्वच्छतागृहाचा अभाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
साताऱ्यात दोन वर्षांपूर्वी महापालिकेचे आरोग्य केंद्र सुरू झाले. तेव्हापासून येथे स्वच्छतागृह नसल्यामुळे तपासणीसाठी येणाऱ्या शेकडो महिला व रुग्णांची गैरसोय होत आहे.
पूर्वी सातारा, देवळाई ग्रामपंचायत असल्यामुळे जिल्हा परिषदेचे आरोग्य उपकेंद्र होते. त्याला स्वतंत्र इमारत होती. तेथे सर्व सुविधा होत्या. परंतु या परिसराचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर सध्या असलेल्या प्रभाग कार्यालयाच्या आवारातील दोन खोल्यांमध्ये महापालिकेने आरोग्य केंद्र सुरू केले आहे. ही जागा अपुरी पडत आहे. दर आठवड्याला बुधवारी व शुकवारी लसीकरणाच्या दिवशी मोठ्या संख्येने महिला येतात. तसेच प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत दर महिन्याच्या ९ तारखेला मोफत शिबिर असते. त्यावेळी शेकडो गरोदर महिलांची गर्दी असते. या दिवशी सातारा, देवळाई तसेच दोन-तीन कि. मी. अंतरावर असलेल्या कॉलनी, नगरातून महिला येतात. परंतु तेथे स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्यामुळे महिलांची गैरसोय होत आहे. या केंद्राचे उद्‍घाटन केले तेव्हाच त्याचा विस्तार करण्यात येईल व सोयीसुविधा पुरवण्यात येतील, असे मनपा प्रशासनाने जाहीर केले होते. दोन वर्षानंतरही लसीकरण, तपासणी व औषध गोळ्यांशिवाय प्रगती झालेली नाही. लस ठेवण्यासाठीही आयएसआर नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या दुसऱ्या केंद्रात व्यवस्था करावी लागते. मनपाने आरोग्याशी संबंधित प्रश्नाकडे तरी किमान दुर्लक्ष न करता तातडीने लक्ष देऊन स्वच्छतागृह बांधण्याची मागणी आशा शिराणे, बेबी सोळनर आदी महिलांनी केली आहे.

साताऱ्यातील आरोग्य केंद्रात महिलांसाठी स्वच्छतागृह नसणे ही अतिशय गंभीर बाब आहे. ही समस्या सोडवावी, यासाठी मनपा आयुक्तांना पत्र देणार आहे.
- प्रेमलता दाभाडे, आरोग्य सभापती, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ नणंदेकडून भावजयीला किडनीदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आपल्याकडे नातेसंबंधाला अनन्यसाधारण महत्व आहे. नणंद आणि भावजयी या नात्यातील संबंधाचे आगळेवेगळे उदाहरण नुकतेच घडले. नणंदेकडून भावजयीला किडनीदान करण्यात आले. दोघींचीही प्रकृती आता स्थिर असून नणंद अलका चौधरी यांचा नुकताच आमदार अतुल सावे यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.
औरंगाबादेतील रहिवासी आशा विठ्ठल भंगाळे (वय ४९) यांना १५ वर्षांपूर्वी मूत्रपिंडविकार असल्याचे निदान झाले. तेव्हापासून किडनीवर सूज असल्यासंदर्भात उपचार सुरू होते. आजार वाढत गेला आणि जानेवारी २०१७ मध्ये दोन्ही किडन्या निकामी झाल्या. प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नव्हता. सर्वसाधारणपणे किडनी दाता हा रक्ताच्या नात्यातील असावा असे अभिप्रेत आहे. त्यानुसार श्रीमती भंगाळे यांच्या कुटुंबातील सर्वांची चाचणी करण्यात आली, पण त्यांच्या किडनी जुळत नव्हत्या. भंगाळे यांच्या काही नातेवाईकांचीही चाचणी झाली, पण त्यात यश आले नाही. नशिराबाद (जि. जळगाव) येथील विठ्ठल भंगाळे यांची बहीण अलका चौधरी यांनी धावपळ पाहिली आणि किडनी देण्यास पुढे आल्या. श्रीमती चौधरी यांच्या पतीच्या निधनानंतर भावजयी आशा भंगाळे यांनी आधार दिला होता. त्यांची दोन्ही मुले वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. आईने घेतलेल्या निर्णयाला त्यांनीही परवानगी दिली. आवश्यक चाचण्या व अन्य प्रक्रिया पूर्ण झाल्या आणि काही दिवसांपूर्वी किडनी प्रत्यारोपण पार पडले.

दोघांची प्रकृती स्थिर
आता दोघींचीही प्रकृती स्थिर आहे. सिडको एन -नऊ पवननगर वॉर्डाचे नगरसेवक नितीन चित्ते यांनी दोन दिवसांपूर्वी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात अलका चौधरी यांचा आमदार अतुल सावे यांच्या हस्ते किडनीदान केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर भगवान घडमोडे, अनिल मकरिये आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऑनलाइन मतदार नोंदणीत त्रुटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्राधिकरण निवडणूक २०१७ करीता विद्यापीठाच्या वेबसाइटवर पोर्टल तयार करण्यात आले, मात्र पदवीधर मतदारांच्या ऑनलाइन नोंदणी अर्जात आणि प्रक्रियेत गंभीर त्रुटी आहेत. त्यामुळे पदवीधर मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या त्रुटी दूर करून प्रक्रिया दोषमुक्त करण्याची आणि मतदार नोंदणीचा कालावधी वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.
विद्यापीठ प्राधिकरण निवडणुकीच्या मतदार ऑनलाइन नोंदणीसाठी वेबपोर्टल सुरू करण्यात आले आहे, मात्र त्रुटी असल्यामुळे नोंदणी करणे कठीण झाले आहे; तसेच सूचित वैद्यकीय महाविद्यालये नसल्यामुळे ऑनलाइन नोंदणी करता येत नाही. या त्रुटी दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत प्रा. संभाजी भोसले यांच्या शिष्टमंडळाने कुलगुरू प्रोफेसर बी. ए. चोपडे यांना मंगळवारी निवेदन दिले. वेबपोर्टलमध्ये महाविद्यालय निवडताना दिलेल्या सूचीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश नाही. आरोग्य विज्ञान विद्यापीठ अस्तित्वात येण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालयांमधून पदवी प्राप्त केलेल्या पदवीधरांना सूचीतील योग्य कॉलेज न निवडल्यामुळे ऑनलाइन नोंदणी करता येत नाही. त्यामुळे सर्व वैद्यकीय पद‍वीधर मतदार नोंदणी व निवडणूक लढवण्यापासून वंचित राहतील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कोणत्याही शाखेचे पदवीधर नोंदणी करू शकतील, असे विद्यापीठाने म्हटले आहे. प्रत्यक्षात वैद्यकीय महाविद्यालयांची नावे समाविष्ट केली नाही. २०१५मध्ये मतदार नोंदणीसाठी नोंदणी शुल्क जमा केलेल्या मतदारांना आता २०१७मध्ये नोंदणीसाठी शुल्क आकारण्यात येणार नाही, असे निवडणूक निर्णय अधिकारी सांगतात, परंतु याबाबत ठोस खुलासा निवडणूक वेबपोर्टलवर नाही. स्पष्ट खुलासा पोर्टलवर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. विवाहानंतर महिलांचे नाव वेगळे असते. पदवी प्रमाणपत्रावर विवाहापूर्वीचे व रहिवासी प्रमाणपत्रावर विवाहानंतरचे नाव असते. या जाचक अटीमुळे महिला पदवीधर मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या शिष्टमंडळात प्रा. संभाजी भोसले, प्रा. शिवाजी लकडे, प्रा. पंडित तुपे, प्रा. नरेंद्र काळे, प्रा. सुनील मगरे, प्रा. संभाजी वाघमारे व सुभाष राऊत यांचा समावेश होता.

कालावधी वाढवा
मतदारसंघाची व्याप्ती लक्षात घेऊन मतदार नोंदणी कालावधी वाढवणे आवश्यक आहे. किमान १५ दिवस कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. मतदान केंद्रांची संख्या वाढवून तालुक्यातील काही प्रमुख गावांतही मतदान केंद्र देण्याची मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोंबकळलेल्या वीज तारांमुळे एक जण जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
शेतातील लोंबकळत असलेल्या महावितरण कंपनीच्या तारांचा धक्का बसून एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. ही घटना तालुक्यातील कोल्ही शिवारात नुकतीच घडली. या व्यक्तीवर शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
कोल्ही शिवारात उच्चदाब वीज वाहिन्या जमिनीलगत लोंबकळत असल्याची तक्रार सरपंचासह ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयाकडे केली होती. मात्र त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करण्यात आले. सध्या ग्रामीण भागात खरीप हंगामाची गडबड सुरू आहे. तालुक्यातील कोल्ही येथील रामहरी पवार हे आपल्या शेतात काम करत होते. त्यावेळी त्यांच्या शेतातील खाली आलेल्या विद्युत वाहिन्यांशी त्यांचा संपर्क आल्याने त्यांना जोराचा धक्का बसला. यात त्यांना गंभीर जखम झाली आहे. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेवून त्यांना शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच शिऊर पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. लोंबकळलेल्या वीजवाहिनी दुरुस्तीची मागणीची दखल न घेणाऱ्या महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी सरपंच कैलास पवार यांनी शिऊर पोलिसांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीक विमा योजनेसाठी ३१ जुलैची अंतिम मुदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकदा शेतीमालाचे नुकसान होते. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. म्हणून शेतीमालास विम्याचे संरक्षण मिळावे, यासाठी राज्यात पंतप्रधान पीक विमा योजना राबवण्यास सुरुवात झाली आहे. २०१७च्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना या योजनेत ३१ जुलैपर्यंत सहभागी होता येणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट, पीक पेरणीपूर्व-लावणीपूर्व नुकसान भरपाई, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई, काढणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, आदी बाबींवर विमा संरक्षण देण्यात येत आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांचे पाच गट करण्यात आले आहेत. या पाच गटांसाठी विमा कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यात उस्मानाबाद, नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी मुंबई, लातूर, हिंगोली या जिल्ह्यासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मुंबई व जालना जिल्ह्यासाठी दि ओरिएन्टल इन्शुरन्स कं. लि, व रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लिमिटेड या कंपनीद्वारे विमा योजना राबविण्यात येणार आहे. पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत अर्ज व प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक आर. एस. भताने यांनी केले आहे.

आवश्यक कागदपत्र
योजनेत सहभागी होण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपला फोटो असलेले बँक पासबुक आणि आधारकार्डाची झेरॉक्स सादर करणे गरजेचे आहे. आधारकार्ड नसल्यास मतदान ओळखपत्र, किसान क्रेडिट कार्ड, नरेगा जॉबकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स सादर करावे. शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याला आधार्ड कार्ड जोडणे आवश्यक आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना आधार कार्ड संलग्न असलेल्या बँक खात्याची माहिती योजनेत सहभागी होताना द्यावी लागले.
..
विमा योजनेतील पिके व हप्ता

पीक संरक्षित रक्कम विम्याचा हप्ता
(रु.प्रति हेक्टर) (रुपये)
सोयाबीन ४०,००० ८००
तूर ३०,००० ६००
मका २५,००० ५००
मूग १८,००० ३६०
बाजरी २०,००० ४००
ज्वारी २४,००० ४८०
कापूस ४०,००० २०००
भुईमूग ३०,००० ६००
कांदा ५५,००० २७५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या मनमानीला चाप

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील ऐतिहासिक वारसास्थळांच्या बाबतीत अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेच्या मनमानीला चाप बसणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या स्तरावर सेंट्रल हेरिटेज काँझर्वेशन कमिटी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, त्यानंतर या कमिटीच्या परवानगीशिवाय वारसास्थळांवर कुणालाही कारवाई करता येणार नाही.
रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली महापालिकेने दमडीमहल, खासगेट यासह सुमारे सहा वारसास्थळांवर बुलडोजर फिरवला. विकास कामांच्या नावाखाली वारसास्थळांचे अस्तित्व मिटवण्यास शहरातील काही नागरिकांनी विरोध केला, पण हा विरोध झुगारून पालिका प्रशासनाने वारसास्थळे पाडली. वारसास्थळांच्या संवर्धनासाठी महापालिकेने एक समिती स्थापन केली आहे. असे असताना वारसास्थळांचे अस्तित्व मिटवण्याचे काम होत असल्याची दखल विभागीय आयुक्त कार्यालयाच्या स्तरावर घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
त्यामुळे केंद्रीय स्तरावर हेरिटेज काँझर्वेशन कमिटी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. या समितीमध्ये संबंधित सर्व शासकीय कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी, वारसास्थळांच्या संदर्भात काम करणाऱ्या विविध संस्थांचे प्रतिनिधी, काही लोकप्रतिनिधी यांचा समावेश केला जाणार आहे. त्यात प्रामुख्याने पोलिस, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य व केंद्रीय पुरातत्व कार्यालयाचे अधिकारी, विद्यापीठ आदी कार्यालयांच्या अधिकाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे. ठराविक कालावधीनंतर या कमिटीची बैठक होणार असून वारसास्थळांच्या संवर्धनाबद्दल व अन्य कामांबद्दल बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.

परवानगीचे अधिकार
केंद्रीय स्तरावर हेरिटेज काँझर्वेशन कमिटी स्थापन करण्यासंदर्भात येत्या काही दिवसात परिपत्रक काढले जाणार आहे. परिपत्रक काढल्यावर बैठक घेऊन कमिटीची स्थापना केली जाणार आहे. त्यानंतर या कमिटीच्या परवानगीशिवाय कोणत्याही कार्यालयाला वारसास्थळांवर कारवाई करता येणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेतूचे काम खासगी संस्थेकडून सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्राचे काम मंगळवारपासून (२७ जून) जेएमके इन्फोसॉफ्ट या नव्या खासगी संस्थेकडून सुरू करण्यात आले.
गेल्या दीड वर्षापासून महा-ई-सेवा केंद्राकडे चालवण्यास देण्यात आलेल्या सेतू सुविधा केंद्राबाबत गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य नागरिक तसेच विद्यार्थ्यांच्या मोठ्या तक्रारी होत्या. नुकत्याच दहावी व बारावीच्या निकालानंतरही सेतूमध्ये गोंधळ उडाला. यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार सेतूचे काम नवीन एजन्सीला देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता.
मंगळवारी जेएमके इन्फोसॉफ्ट कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काम सुरू केले. महा-ई-सेवा केंद्राचे काम २५ काउंटरच्या माध्यमातून काम सुरू होते. जेएमकेने प्रारंभी १५ काउंटरच्या माध्यमातून काम सुरू केले आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये सेतूमध्ये तांत्रिक बाबींचे इन्स्टॉलेशन करण्यात आले. सेतूमधून सातबारा, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अल्पभूधारक, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर, वय व अधिवास, भूमीहिन, शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक, ३० टक्के महिला आरक्षण, वास्तव्य दाखला आदी विविध १८ प्रमाणपत्रे वितरित केली जातात.

रखडलेल्या प्रमाणपत्रांसाठी स्वतंत्र काउंटरची सोय
नागरिकांनी महा-ई-सेवा केंद्राकडे अर्ज करण्यात आलेले प्रमाणपत्रांच्या तसेच कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी एक स्वतंत्र काउंटर सुरु करण्यात आले आहे. या काउंटरवरुन फक्त महा-ई-सेवा केंद्राकडे करण्यात आलेल्या अर्जांचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images