Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​ विमानतळ विस्तारीकरण तिढा सुटणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विमानतळ विस्तारीकरणाचा थंड बस्त्यात पडलेला तिढा येत्या काही दिवसात सुटणार आहे. पुढील आठवड्यात महापालिका, सिडको, सार्वजनिक बांधकात तसेच महसूल विभागातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी लागणाऱ्या १८२ एकर जमिनीच्या भूसंपादनासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग ही सर्व्हेक्षण आणि संपादन संस्था राहणार असून जमीन मोजणीसाठी २९ लाख ७४ हजार रुपयांची आवश्यकता आहे. हे शुल्क भरल्यानंतर आवश्यक जमिनीची मोजणी करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी लागणाऱ्या १८२ एकर जमिनीची १० नोव्हेंबर रोजी सिडको, महापालिका तसेच महसूल, विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी स्थळपाहणी केली होती. या पाहणीअंती प्राथमिक अहवाल तयार केला होता. त्यानंतर भूसंपादनाचा पुन्हा सुधारित अहवाल तयार करून मुंबई येथे पाठवण्यात आला. मात्र, त्यानंतर अनेक दिवस प्रकरण जैसे थे होते. आता जिल्हाधिकारी नवल किशोर राम सर्व यंत्रणांची संयुक्त बैठक घेणार असून सर्वांसोबत चर्चा करून आढावा घेणार आहेत.

मालमत्ता ताब्यात घेणार
विस्तारीकरणासाठी यापूर्वी महापालिका तसेच सिडकोने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार १८२ एकर जमीन, ६३१ एनए प्लॉट ताब्यात घ्यावे लागणार आहेत, तर १२९६ मालमत्ता बाधित होणार आहेत. यामध्ये सिडकोच्या खासगी ३१६, म्हाडाच्या ३५० मालमत्तांचा समावेश आहे. यामध्ये शासनाचे ८२ आर, महापालिकेची १५ आर, सिडकोच्या ४३ आर खुल्या जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे.

विस्तारीकरणासाठी आवश्यक जमीन
संपादन खासगी क्षेत्र…………१५५. ८५ एकर
मनपा (अतिक्रमित)………….. २०.७५ एकर
सिडको ………………………२ एकर
मनपा (एसटीपी)……………… ३.४० एकर
एकूण संपादन करावयाचे क्षेत्र………..१८२ एकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ शहीद जाधव यांच्या विहिरींचा प्रस्ताव घरपोच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जम्मू काश्मिरमधील पूंच परिसरात पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात केळगाव (ता.सिल्लोड) येथील जवान संदीप जाधव हे गेल्या आठवड्यात शहीद झाले. जाधव अल्पभूधारक शेतकरी असून त्यांना एमआरइजीएसमधून विहीर मंजूर झालेली आहे. या विहिरीच्या मंजुरीच्या प्रशासकीय मान्यतेचे पत्र तात्काळ घरपोच द्यावे, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांनी दिले.
पालकमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी सायंकाळी केळगाव येथून जाऊन जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आणि शिवसेनेतर्फे पाच लाखांची आर्थिक मदत केली. यावेळी अर्दड व जिल्हा परिषदेचे अधिकारीही तिथे उपस्थित होते. गावकरी आणि जाधव कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर असे कळाले की, जाधव हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून (एमआरइजीएस) विहीर मंजूर झाली आहे. एरव्ही या विहिरीच्या मंजुरीनंतर प्रशासकीय मान्यता मिळून प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्यास अनेक अडचणी असतात, पण जाधव कुटुंबीयांसाठी विशेष बाब म्हणून सीइओ अर्दड यांनी जाधव यांच्या विहिरीची प्रशासकीय मान्यता तात्काळ मंजूर करून घरपोच द्यावी, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सर्व योजना राबवा
पालकमंत्री रामदास कदम यांच्या दौऱ्यात जिल्हाधिकारी नवलकिशोर राम हे सुद्धा केळगावमध्ये गेले होते. या गावाचा रस्ता, पाणीपुरवठा योजना तसेच अन्य योजना तात्काळ राबवाव्यात, त्यासाठी ज्या कोणत्या आवश्यक मंजुरी आहेत त्या द्या आणि महिनाभरात योजना मार्गी लावाव्यात, असे आदेश कदम यांनी प्रशासनाला दिले.

भाजपची मदत
शहीद जवान संदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सोमवारी रात्री भेट घेऊन सांत्वन केले. याप्रसंगी दानवे यांनी जाधव कुटुंबाला पक्षातर्फे पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. सरकार तुमच्या पाठिशी असल्याचे त्यांनी सांगितले. या गावच्या भूमिपुत्रांनी देशासाठी आहुती दिली ही अभिमानाची बाब असल्याचे दानवेंनी सांगितले. यावेळी प्रदेश कार्यकारीणी सदस्य सुरेश बनकर, भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे, माजी सभापती अशोक गरूड, दिलीप दाणेकर, डॉ. मच्छिंद्र पाखरे, विष्णू काटकर, सचिन चौधरी, सरपंच सोमनाथ कोल्हे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ९९ कोटींची तहान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरासाठी नेहमीच कळीचा मुद्दा ठरणाऱ्या पाणीपुरवठा विभागाने यंदा ९९ कोटींची मागणी केल्यामुळे अर्थसंकल्पात जुळवाजुळव करताना महापालिका प्रशासनाच्या नाकी नऊ आले आहेत.
महापालिकेत पाणीपुरवठा विभाग हा महत्वाचा विभाग मानला जातो. या विभागासाठी लागणारा खर्च अर्थसंकल्पात तरतूद नसताना देखील विशेषाधिकारात मंजूर केला जातो. त्यामुळे या विभागाला पालिकेच्या रचनेत वेगळे स्थान आहे. त्यामुळे या विभागाने विविध कामांसाठी ९९ कोटी २० लाखांची मागणी केली आहे. महापालिकेचे बजेट १११० कोटींचे, तर पाणीपुरवठा विभागाची मागणी ९९ कोटी रुपयांची. त्यामुळे याची सांगड कशी घालायची, असा प्रश्न निर्माण होत आहे.
महापालिकेचा आर्थिक डोलारा एलबीटीच्या माध्यमातून शासनाकडून दर महिन्याला मिळणाऱ्या १७ ते १८ कोटी रुपयांवर उभा आहे. याशिवाय मालमत्ता कराच्या वसुलीवर विकास कामांची मदार आहे. शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार व अत्यावश्यक खर्च भागवला जातो. मालमत्ता कराच्या वसुलीतून कामांना प्राधान्य दिले जाते. यंदा मालमत्ता कराची वसुली ८५ कोटी रुपयांपर्यंत झाली. वसुलीच होत नसल्यामुळे अनेक कामे ठप्प आहेत. पेमेंट मिळण्याची शाश्वती नसल्यामुळे कंत्राटदारही टेंडर भरण्यासाठी प्रतिसाद देत नाहीत. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीचे नवनिर्वाचित सभापती गजानन बारवाल यांनी विविध विभागांकडून कामांची व कामांसाठी लागणाऱ्या खर्चाची माहिती मागवली. त्यात पाणीपुरवठा विभागाचे मागणी पत्रक पाहून हा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या अत्यावश्यक कामांनाच मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

कामांचा तपशील - रुपये (लाखात)
- अशुद्ध पाणी उचलीसाठी - ३००
- विद्युत देयके - ५०००
- रसायन खरेदी - ३००
- योजना देखभाल दुरुस्ती - १५०
- वितरण व्यवस्था देखभाल - १२००
- मशिनरी दुरुस्ती - ५००
- टँकर भाडे - ८००
- आपतकालीन कामे - ८०
- पाणी नमने तपासणी - ५०
- प्रदूषण व वॉटर सेस - ७५
- अकृषिक कर व धरण सुरक्षा - १५
- भांडवली कामे (सातारा - देवळाई) - २००
- मुख्य योजना व शहर वितरण - ८५०
- सरकारी विहिरींची डागडुजी - २००
- ऐतिहासिक नहरींचे संवर्धन - २००
- एकूण - ९९२०.०० लाख रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ दोषींविरुद्ध आता थेट कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारत निर्माण योजनेंतर्गत जिल्ह्यात ज्या पाणीपुरवठा योजना अपूर्ण आहेत. त्यात संबंधित गावातील योजनांसाठी नियुक्त केलेल्या अध्यक्ष, सचिवांवर गुन्हे दाखल होतात. मात्र, तांत्रिक मान्यता देणाऱ्यावर काहीच कारवाई केली जात नाही. या अपूर्ण योजनेत जे कुणी दोषी असतील, त्यात तांत्रिक सहायक असला तरी त्याच्यावर थेट कारवाई करावी, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांनी मंगळवारी दिले.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची तहूकब सभा आज झाली. अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर, उपाध्यक्ष केशवराव तायडे, सभापती मीनाताई शेळके, विलास भुमरे, कुसुमाई लोहकरे, धनराज बेडवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा जाधव यांच्यासह अधिकारी, सदस्य उपस्थित होते.
गेल्यावेळी अधिकारी नसल्यावरून सभा तहकूब झाली होती. ती सभा आज झाली. विषयपत्रिकेवर एकच विषय होता. तो संपल्यानंतर आयत्यावेळची चर्चा सुरू झाली. तहकूब सभा असल्याने कुठलेही निर्णय घेता येणार नव्हते. त्यासाठी सदस्यांनी विभागनिहाय आढाव्याची मागणी केली. आरोग्य, बांधकाम, सिंचन, महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आढावा सादर केला. त्यात झालेल्या चर्चेत किशोर बलांडे, अविनाश गलांडे, मधुकर वालतुरे, रमेश गायकवाड, किशोर पवार, पंकज ठोंबरे, जितेंद्र जैस्वाल आदींनी सहभाग घेतला. पाणीपुरवठा विभागाच्या आढाव्यादरम्यान अपूर्ण पाणीपुरवठा योजनांचा मुद्दा उपस्थित झाला. बलांडे म्हणाले, अपूर्ण योजनेसाठी संबंधित योजनेच्या अध्यक्ष, सचिवांना दोषी धरून गुन्हे दाखल केले जातात. वास्तविक योजना मंजूर करताना तांत्रिक सहाय्यकांचा रोल महत्वाचा असतो. यांना कधीच गृहित धरले जात नाही. अध्यक्ष, सचिवांना कुठेच तांत्रिक ज्ञान नसते. यावर गलांडे यांनी सीईओ अर्दड यांनी निवेदन करावे, अशी मागणी केली. त्यावर अर्दड म्हणाले, की आम्ही पाणीपुरवठा योजनांचा वारंवार आढावा घेतो. योजनेसाठी तांत्रिक सहकार्य करणाऱ्यांच्या बाबतीत कधीच पाहिले जात नाही. वास्तविक त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असते. कोट्यवधी रुपये गुंतवून योजना अपूर्ण राहते. त्याबाबत तांत्रिक सहाय्यकांनाही दोषी धरले जावे आणि कारवाई करण्यात यावी, असे आदेश मी दिले आहेत. यापुढे दोषींना कुठल्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. योजनांच्या तपासणीसाठी विशेष पथक नियुक्त केले जाईल आणि त्यांच्याकडून आलेल्या अहवालानंतर सविस्तर बैठक घेतली जाईल.

सीईओंचा गौरव
जिल्ह्यात २७ जून अखेर १ लाख शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले. उर्वरित उद्दिष्ट २ ऑक्टोबरपूर्वी करून जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प पूर्ण केला जाणार आहे. सीईओ मधुकरराजे अर्दड यांनी या कामी महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचे अतिरिक्त सीईओ सुरेश बेदमुथा यांनी सभागृहात सांगितले. अविनाश गलांडे यांनी सीईओंचे अभिनंदन केले. त्यानंतर अध्यक्ष डोणगावकर आणि उपाध्यक्ष तायडे यांच्या हस्ते सीईओंचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ घाटीत एक जुलैपासून ‘नांदेड पॅटर्न’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रुग्णालयामध्ये रात्री-अपरात्री निर्माण होणारे प्रश्न, रुग्ण-डॉक्टरांमधील संघर्ष टाळण्यासाठी; तसेच रुग्णसेवेबाबत रुग्ण-नातेवाईकांची नाराजी दूर होऊन अधिकाधिक दर्जेदार रुग्णसेवा देण्याच्या दृष्टीने ‘नांदेड पॅटर्न’ हा नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये राबवण्यात आला आणि त्याचे उत्तम रिझल्टस् मिळाले. हाच ‘पॅटर्न’ म्हणजे ‘रुग्णालय आधार प्रणाली’ (हॉस्पिटल सपोर्ट सिस्टीम) घाटी रुग्णालयामध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मंगळवारी (२७ जून) झालेल्या मोकळ्या वातावरणातील बैठकीत अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या आवाहनाला घाटीतील प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक व निवासी डॉक्टरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानंतर एक जुलैपासून म्हणजेच ‘डॉक्टर्स डे’पासून या प्राणालीची अंमलबजावणी होण्याचे निश्चित झाले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. येळीकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ‘नांदेड पॅटर्न’ राबविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ‘मटा’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. ही मुलाखत १६ जून रोजीच्या ‘औरंगाबाद टाइम्स’च्या अंकात प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर महाविद्यालयातील समितीद्वारे हा पॅटर्न राबविला जाऊ शकतो का, याची चाचपणी करण्यात आली आणि ही प्रणाली घाटी रुग्णालयामध्ये राबविणे शक्य असल्याचे लक्षात येताच मंगळवारची ‘कॉलेज कौन्सिल’ची नेहमीप्रमाणे बैठक घेण्याऐवजी मोठ्या हॉलमध्ये ही बैठक वजा कार्यक्रम घेण्यात आला. या बैठकीमध्ये अधिष्ठाता डॉ. येळीकर यांनी रुग्ण-डॉक्टर संबंधांपासून काळाची व घाटीची गरज, घाटीतील गोरगरीब रुग्णांची अगतिकता आणि त्यांना अधिकाधिक चांगली-दर्जेदार सेवा देणे कसे गरजेचे आहे व त्यासाठी डॉक्टरांनी कशा पद्धतीने स्वतःहून पुढाकार घेणे गरजेचे आहे, याविषयी मार्गदर्शन केले आणि प्रणालीविषयी आवाहन केले. ‘नांदेड पॅटर्न’विषयी आवाहन करताच सर्वजण तात्काळ तयार झाले आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी एक जुलै रोजी असलेला ‘डॉक्टर्स डे’चा दिवसही निश्चित करण्यात आला. या बैठकीला प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापकांसह निवासी डॉक्टरांनाही निमंत्रित करण्यात आले होते.

रोज रात्री राऊंड
रुग्णालय आदार प्रणालीमध्ये दोन सहाय्यक प्राध्यापक, एक सहयोगी प्राध्यापक, नाइट सुप्रिटेंडन्ट, मेट्रन, निवासी वैद्यकीय अधिकारी, निवासी डॉक्टर, वैद्यकीय सामाजिक अधीक्षक, सुरक्षा रक्षक आदी सात ते आठजणांची टीम तयार करण्यात येणार असून, रात्री आठ, मध्यरात्री दोन व सकाळी आठ अशा तिन्ही वेळी अपघात विभागासह सर्वत्र राऊंड घेतील. कुठेही अनुचित प्रकार घडल्यास सर्वजण त्या ठिकाणी धाव घेतील व समस्या तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करतील. त्याचवेळी ‘व्हॉटसअॅप’द्वारे प्रत्येकाला अपडेट देण्यात येतील. प्राध्यापक व इतर स्टाफला महिन्यातून केवळ एक दिवस नाइट ड्युटी करावी लागेल, असेही डॉ. येळीकर यांनी ‘मटा’ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ कृषी सहाय्यकांचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मृद व जलसंधारण विभागाकडे वर्ग होण्यापूर्वी कृषी विभागाचा सुधारित आकृती बंध तयार करावा यासह अन्य प्रलंबित मागण्यासाठी लक्ष वेधण्यासाठी कृषी सहाय्यकांनी मंगळवारी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केले.
प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात यासाठी राज्य कृषी सहाय्यक संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेने राज्यभर आंदोलन हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणून संघटनेचे विभागीय सचिव शिवानंद आडे, सतीश मिटकरी, राजेंद्र पाटील, औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष सचिन खरात, बीडचे राजेंद्र राऊत आणि जालन्याचे शिवाजी कोरडे यांच्या नेतृत्वाखाली कृषी सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. मागण्या तातडीने मान्य करा, अशी घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिची, ऐश्वर्या, स्वामिनी अव्वल

$
0
0

रिची, ऐश्वर्या, स्वामिनी अव्वल
विश्वेश, अथर्व, अमेय, सर्वेश चमकले
एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत विश्वेश जोशी, अथर्व नगरकर, रिची भंडारी, अमेय पदातुरे, ऐश्वर्या देशपांडे, स्वामिनी मंडलिक, सर्वेश भाले यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटाकाविले.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर ही स्पर्धा झाली. बालगट, कनिष्ठ गट, वरिष्ठ गट अशा गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. पुरुष एकेरी, महिला एकेरी, मिश्र दुहेरी व समूह अशा प्रकारांत ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांना डॉ. मकरंद जोशी, सिद्धार्थ कदम, अमेय जोशी, विवेक देशपांडे, हर्षल मोगरे, राहुल श्रीरामवार, सुरज ताकसांडे, अनघा खैरनार, मनीष थट्टेकर यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
अंतिम निकाल ः ८ ते ११ वर्षे वयोगट ः मुले एकेरी - १. विश्वेश जोशी (११.१७), २. विश्वेश पाठक (११.१७), ३. कौशल कलंत्री (११.१५). मुली एकेरी - १. शमिता चाटुफळे (१३.४०), २. कल्याणी कलंत्री (११.३०), ३. राधा सोनी (१०.७०). मिश्र दुहेरी - १. विश्वेश पाठक, राधा सोनी (१४.१६), २. अद्वैत वझे, शमिता चाटुफळे, ३. कौशल कलंत्री, कल्याणी कलंत्री (१०.२५). १२ ते १४ वर्षे ः मुले एकेरी - १. अथर्व नगरकर (१२.३५). मुली एकेरी - १. रिची भंडारी (१६.८५), २. सिल्वी शहा (१४.८५). मिश्र दुहेरी - संजना पटेल, अथर्व नगरकर (११.२५). तिहेरी - संजना पटेल, अवनी पाठक, प्राजक्ता भोसले (१०.६५). १५ ते १७ वर्षे ः मुले एकेरी - १. अमेय पदातुरे (१४.७), २. संदेश चिंतलवाद (१३.४५), ३. सुधन्वा बोर्डे (१३.३०). मुली एकेरी - १. ऐश्वर्या देशपांडे (१३.२५), २. मिताली गर्गे (१०.४५), ३. रिद्धी सोनवणे (१०.३५). तिहेरी- १. अथर्व जोशी, श्रीपाद हारल, सुधन्वा बोर्डे (१२.२०), २. ऐश्वर्या देशपांडे, मिताली गर्गे, रिद्धी सोनवणे (१०.२०). मिश्र दुहेरी - १. ऐश्वर्या देशपांडे, अमेय पदातुरे (१२.३५), २. अथर्व जोशी, रिद्धी हत्तेकर (११.८०).
१८ वर्षांवरील वरिष्ठ गट - पुरुष एकेरी ः १. सर्वेश भाले (१७.८०), २. गौरव जोगदंड (१७.१५), ३. पुरुषार्थ गरजाळे (१६.१०). महिला एकेरी ः १. स्वामिनी मंडलिक (१४.९०), २. शर्वरी लिमये (१४.३५), ३. ईशा महाजन (१४.३०). मिश्र दुहेरी - १. मयूर बोढारे, ईशा महाजन (१४.१५), २. ऋग्वेद जोशी, साक्षी लड्डा (१४.१५), ३. पुरुषार्थ व दिशा (११.३५). तिहेरी – १. धैर्यशील देशमुख, गौरव जोगदंड, सर्वेश भाले (१३.५५), २. सोमाजी बालुरे, अविनाश कोळेश्वर, तेजस पळसकर (१०.४५). समूह - १. ऋग्वेद जोशी, धैर्यशील देशमुख, रजत मेघावाले, संदीप उंटवाल, अनिकेत चौधरी (१३.०५), २. सोमाजी बालुरे, अविनाश कोळेश्वर, तेजस पळसकर, पुरुषार्थ व दिशा (१०.५०).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरसकट कर्जमाफीसाठी निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी मंगळवारी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने क्रांती चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.
दलाचे नेते सुभेदार मेजर सुखदेव बन यांच्या नेतृत्वाखाली दुपारी बाराच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बन म्हणाले, ‘नापिकी, दुष्काळ, उत्पादन जास्त तर मालास भाव नाही अशा कारणांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व नवी उभारी देण्यासाठी तातडीने सरसकट कर्जमाफी करुन त्यांचे सातबारा कोरे करावेत, शेतीला सिंचनाची सोय करून कायम स्वरुपी वीज पुरवठा करावा, शेतीमाल उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव द्यावा, शेतकऱ्यांच्या नियंत्रणाखाली प्रक्रिया उद्योग उभारा,’ आदी मागण्या केल्या. यावेळी भानुदास गाडेकर, अॅड. संघपाल भारसाखळे, शेख खुर्रम, कैलास कामानदार, बाबासाहेब निकाळजे, गोरख पडघन, संदीप भालेकर, दगडू पवार, अजय निकाळजे, उस्मान सय्यद, राम काळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भारतीय ज्युदो संघाची कसून तयारी

$
0
0

भारतीय ज्युदो संघाची कसून तयारी
आशियाई स्पर्धेत दहा पदके जिंकण्याचा निर्धार
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आशियाई ज्युदो स्पर्धेसाठी सध्या भारतीय ज्युदो संघाचे सराव शिबिर भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) औरंगाबाद येथील प्रशिक्षण केंद्रात सुरू आहे. या स्पर्धेत आठ ते दहा पदके जिंकण्याचा निर्धार संघाने केला असल्याचे ज्युदो संघाचे प्रशिक्षक विजय धिमन यांनी सांगितले.
साई येथील शिबिरात कॅडेट व ज्युनिअर गटातील मुले-मुली सहभागी झाले आहेत. या शिबिरासाठी घेण्यात आलेल्या निवड चाचणीत देशभरातील पाचशेपेक्षा अधिक ज्युदोपटूंनी सहभाग घेतला होता. या चाचणीतून ६४ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. कॅडेट गटात व ज्युनिअर गटात प्रत्येकी १६ मुलां-मुलींचा समावेश आहे, अशी माहिती धिमन यांनी दिली.
किर्गिझिस्तान येथे १२ ते १७ जुलै या कालावधीत आशियाई कॅडेट व ज्युनिअर ज्युदो स्पर्धा होणार आहे. त्यासाठी प्रशिक्षक विजय धीमन, राकेश शिंग, कृष्णन लाल, सावत्री चानू, सुषमा अवस्थी हा प्रशिक्षकांचा गट खेळाडूंची कसून तयारी करून घेत आहे. कॅडेट मुलांच्या गटात ५० ते ९० किलो वजन गटात, तर ज्युनिअर गटात ५५ ते १०० किलो वजन गटात खेळाडू सहभागी होतील. कॅडेट मुलींच्या गटात ४० ते ७० किलो, तर ज्युनिअर मुलींच्या गटात ४४ ते ७८ किलो वजन गटातील खेळाडूंचा सहभाग असेल. दिवसभर तीन सत्रात खेळाडू सराव करत असल्याचे राकेश सिंग यांनी सांगितले.
सकाळच्या सत्रात फिटनेस, मॅटवरील टेक्निक, स्ट्रेंथ वाढवण्यावर भर देण्यात येतो. दुपारच्या सत्रात सामन्याचा सराव करण्यात येतो. सायंकाळच्या सत्रातही खेळाशी संबंधित विविध पैलूंची तयारी करून घेण्यात येत असल्याचे धिमन म्हणाले. गतवेळच्या तुलनेत यंदाचा भारतीय संघ नवीन आहे. तरीही किमान आठ ते दहा पदके जिंकून आणण्याची क्षमता या संघात असल्याचे धिमन व सिंग यांनी नमूद केले. आशियाई ज्युदो स्पर्धेत भारतीय संघासमोर जपान, दक्षिण कोरिया, कझाकिस्तान, इराण या देशांच्या ज्युदोपटूंचे आव्हान असणार आहे. भारतीय ज्युदोपटूंनी या खेळाडूंच्या आव्हानाला समर्थपणे सामोरे जावे, याकडे सराव शिबिरात विशेष लक्ष दिले जात आहे. शिबिराचा कालावधी तुलनेने कमी असला तरी कमी वेळेत सर्वोतोपरी तयारी करून घेण्यावर भर असल्याचे धिमन म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ शिष्यवृत्ती परीक्षेत ९३५ विद्यार्थी पात्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक(इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता आठवी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.
राज्यात ९ लाख १७ हजार ५३४ परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ६५ हजार ५८९ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. एकूण परीक्षार्थीपैकी १८ टक्के विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ३० हजार ६३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पाचवीचे ४८८ आणि आठवीचे ४४७ विद्यार्थी पात्र ठरले.
यंदा प्रथमच पाचवी, आठवीस्तरावर शिष्यवृत्ती परीक्षा झाली. परिषदेतर्फे २६ फेब्रुवारी घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. राज्यभरात इयत्ता पाचवीस्तरावर ५ लाख २६ हजार ६३५ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी १ लाख १२ हजार ९७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
त्यापैकी १६ हार ३०८ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले. इयत्ता आठवी स्तरावर राज्यभरातून ३ लाख ९० हजार ८९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात ५२ हजार ६१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर, १३ हजार ७५५ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. पूर्व उच्च प्राथमिकस्तरावर पात्र विद्यार्थ्यांची टक्केवारी २०.६९ टक्के आहे. पूर्व माध्यमिक स्तरावर ही टक्केवारी कमी असून, निकालाची टक्केवारी १३.०४ एवढी आहे.

औरंगाबाद निकालात मागे
औरंगाबाद जिल्ह्यातून पूर्व उच्च प्राथमिक स्तरावर २८ हजार ५८० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ४८८ विद्यार्थी पात्र ठरले. पूर्व माध्यमिक स्तरावर २२ हजार ३६१ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी ४४७ विद्यार्थी पात्र ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उघड्यावर 'बसणाऱ्यांचा' गुलाब देऊन सत्कार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । औरंगाबाद

'हागणदारीमुक्त गाव' या योजनेनं देशभरात चळवळीचं रूप घेतलं असून उघड्यावर शौचाला बसण्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी ठिकठिकाणी वेगवेगळ्या उपायांचा अवलंब केला जात आहे. औरंगाबाद महापालिकेनं उघड्यावर बसणाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्याचा उपक्रम सुरू केला असून त्या अंतर्गत आज सकाळी काही लोकांचा सत्कार करण्यात आला.

औरंगाबादमधील मुकुंदवाडी राज नगर भागात सुमारे ८०० कुटुंबांची वस्ती आहे. रेल्वे रुळांलगत असलेल्या या वस्तीतील बहुतेक लोक उघड्यावरच शौचाला जातात. ही बाब हेरून महापालिकेच्या गुड मॉर्निंग पथकानं आज सकाळीच या परिसरात फिल्डिंग लावली आणि उघड्यावर शौचाला बसण्यासाठी जाणाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. औरंगाबाद महापालिकेनं उघड्यावर बसणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी २८ पथकांची नियुक्ती केली आहे. त्यात काही वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नी, मुलीला मारहाण करणाऱ्यास सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या पत्नीला व मुलीला बेदम मारहाण करणाऱ्या पतीला एक वर्ष सक्तमजुरी व अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. जांभळे यांनी ठोठावली.
या प्रकरणी पायल शिवाजी वाघमारे (रा. कबीरनगर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २७ जानेवारी २०१४ रोजी आरोपी शिवाजी वाघमारे याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता, पायल यांनी पैसे देण्यास नकार दिला. नकार देताच संतापलेल्या शिवाजी वाघमारे याने पत्नीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, तर मुलीला रस्त्यावर फेकून दिले. यात मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची तक्रार दिल्यावरुन आरोपी पतीविरुद्ध उस्मापुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक फौजदार पी. एम. मोकळे यांनी तपास करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीवेळी, सहायक सरकारी वकील अ‍ॅड. बी. एम. राठोड यांनी तीन साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंचे युक्तिवाद व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने आरोपी शिवाजी वाघमारे याला कलम ३२४ अन्वये एक वर्ष सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैद, तर ३२३ कलमान्वये ६ महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेमके दोषी कोण? पोलिसांची विचारणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
साई इंजिनीअरिंग सामुहिक कॉपीप्रकरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नेमलेल्या चौकशी समितीने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला क्लिनचिट दिले आहे. पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी हा अहवाल अमान्य केला आहे. याप्रकरणी पुन्हा चौकशी करून दोषी व्यक्तीचे नाव कळवण्याबाबत पत्र पाठवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त यादव यांनी दिली.
सुरेवाडी येथे १७ मे रोजी नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरी इंजिनीअरिंग कॉलेजच्या २७ विद्यार्थ्यांना पेपर सोडवताना गुन्हे शाखेने पकडले होते. यावेळी २७ विद्यार्थ्यांसह संस्थाचालक मंगेश नाथराव मुंढे वय (रा. आदित्यनगर, गारखेडा), प्राध्यापक विजय केशव आंधळे (रा. सिडको) व नगरसेवक सीताराम सुरे (रा. सुरेवाडी) यांना अटक करण्यात आली होती. हे सर्व विद्यार्थी चौका येथील साई इंजिनियरींग कॉलेजचे विद्यार्थी होते.
१६ मे रोजी कॉलेजमध्ये सोडवण्यात आलेल्या उत्तरपत्रिका हे विद्यार्थी पुन्हा रात्री सोडवत होते. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने देखील चौकशी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल दोन दिवसांपूर्वी पोलिसांना पाठवण्यात आला आहे. यामध्ये कॉलेजवर ठपका ठेवून विद्यापीठ परीक्षा विभागाला क्लिनचिट देण्यात आले आहे. आयुक्त यादव यांनी हा अहवाल अमान्य केला आहे.

उत्तरपत्रिका वेळेत का आल्या नाहीत?
परीक्षेनंतर २४ तासांत उत्तरपत्रिका विद्यापिठात जमा करणे बंधनकारक असताना पेपर वेळेवर विद्यापीठात का पोचले नाहीत, यासाठी जबाबदार कोण आहे. त्याचे नाव कळवावे; तसेच रजिस्टारला पुन्हा चौकशीसाठी पाठविण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात येणार असल्याचे आयुक्त यादव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संकट टाळण्यासाठी पाण्याचे संवर्धन करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘दिवसेंदिवस पाण्याचा वापर अमर्याद स्वरुपात वाढला आहे. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होत असून हे संकट टाळण्यासाठी सर्वांनी पाण्याची बचत करावी, काटकसरीने वापरावर भर द्यावा,’ असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.
सिडको परिसरातील राज्य सहकारी बँकेच्या सभागृहात बुधवारी नाबार्डतर्फे पाणी हेच जीवन, जल जागरुकता या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी बागडे बोलत होते. नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक डॉ. राजेंद्र कुलकर्णी, सहायक व्यवस्थापक राजेंद्र महाजन, उदय क्षीरसागर, जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष दामुअण्णा नवपुते यांच्यासह सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, जलदूत उपस्थित होते.
प्रारंभी नाबार्डचे क्षीरसागर यांनी जल जागरुकता या अभियानाविषयी माहिती दिली. राज्यात ८ हजार गावामध्ये जलदूतामार्फत जनजागृती केली जात असल्याचे सांगितले. औरंगाबादेत ४२७ गावामध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असून सहा सामाजिक संस्थांचे जलदूत यात सहभागी झाल्याचे नमूद केले. त्यानंतर काही जलदुतांनी अनुभवकथन करताना नदीचे खोलीकरण, गावात पाण्याच्या टाकीची गरज, शेततळ्याच्या निधीत वाढ व्हावी, अशी ग्रामस्थांची अपेक्षा असल्याचे सांगितले.
त्यावर बोलताना विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी हा उपक्रम जल बचतीसाठी उपयुक्त असून उपलब्ध जलसाठा लक्षात घेऊन ते पुढच्या वर्षीही टिकले पाहिजे, असे नियोजन करुन वापर केला पाहिजे, असे आवाहन केले. शेततळे हे पाणी जिरविण्यासाठी आहेत, साठवणीसाठीचे शेततळ वेगळे आहेत, योजनेबाबत योग्य माहिती नसल्याने गैरसमज निर्माण झाला आहे, असे सांगतानाच बागडे यांनी जल जागरुकता चळवळीत लोकसहभाग वाढविण्यासाठी ग्रामस्थांशी मैत्री करा, असा सल्ला उपस्थित जलदुतांना दिला.

४२७ गावांत जागर
राज्यात ८ हजार गावांमध्ये जलदुतामार्फत जनजागृती केली जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ४२७ गावामध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यात सहा सामाजिक संस्थांचे जलदूत सहभागी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साई इंजिनीअरिंगचे प्रवेशही थांबवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
साई इंजिनीअरिंग महाविद्यालयाचे प्रथम वर्षाचे स‌ंलग्निकरण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने महाविद्यालयात पॉलिटेक्निकमधून ‌द्वितीय वर्षाला होणारे प्रवेशही थांबवण्यात आले असल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिली.
साई इंजिनीअरिंग कॉलेजच्या द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचे इतर महाविद्यालयात समायोजन करण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सामूहिक कॉपीप्रकरणी साई इंजिनीअरिंग कॉलेजची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर विद्या परिषदेच्या बैठकीत महाविद्यालयाची संलग्नीकरण रद्द करण्याच्या ठरावाला बुधवारी संपलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
या विषयी कुलगुरू म्हणाले की, साई इंजिनीअरिंगला टाळे ठोकण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे, मात्र या प्रकरणात संस्थाचालक विद्यापीठाच्या विरोधात न्यायालयात गेले, तर अपयश मिळू नये यासाठी शांतपणे पावले उचलली जात आहेत.
विद्यापीठाने साई कॉलेजचे सं‌लग्निकरण रद्द करून काळ्या यादीत टाकल्यामुळे यापुढे सं‌लग्निकरण मिळण्याचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. आता पॉलिटेक्निकमधून थेट अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षांला देण्यात येणारे प्रवेशही थांबविण्यात आले आहेत.

विद्यार्थी समायोजनाचा विचार
पुढील वर्षांत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करणे आवश्यक असल्याचे सांगत या विद्यार्थ्यांचे कोणत्या महाविद्यालयात समायोजन होऊ शकते, त्या महाविद्यालयातील जागा, शुल्क आदी बाबींवर विचार करण्यात येत असल्याचेही कुलगुरूंनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वच्छतेच्या सवयी विद्यार्थ्यांना लावाव्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
‘विद्यार्थ्यांना लहानपणापासून स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात यासाठी पालकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य अनुराधा चव्हाण यांनी मंगळवारी केले. तालुक्यातील किनगाव येथील जिल्हा परिषद शाळेत ग्रामीण रुग्णालयातर्फे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाला डॉ. सुरेश ताठे, डॉ. फरीन सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी चव्हाण म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी शाळेत येतांना आंघोळ करून व स्वच्छ कपडे घालून यावे. नखे वाढू देऊ नका, पालकांनाही मुलांना स्वच्छतेचे धडे द्यावेत. शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेविषयक सवयींचे निरीक्षण करून त्यात योग्य सुधारणा कराव्यात, असे आवाहन चव्हाण यांनी केले. यावेळी डॉ. सुरेश ताठे व डॉ. फरीन सय्यद यांनी १२२ विद्यार्थ्यांची तपासणी केली. किरकोळ आजारी विद्यार्थ्यांवर औषधोपचार करण्यात आले. संदर्भित विद्यार्थ्यांना उच्चस्तरावर उपचाराकरिता संदर्भ सेवा पत्र देण्यात आले. या तपासणीत फार्मासिस्ट मंगला गवळी, लिलाबाई वाणी यांनी डॉक्टरांना मदत केली.
याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण, रमेश चव्हाण, बाळासाहेब शिंदे, मुख्याध्यापक लता पाथ्रीकर, दांडगे, शिंदे, गायकवाड, नितीन नवले यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार सत्तारांविरुद्ध भाजपचे शक्तिप्रदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
तालुक्यातील दहिगाव येथे शेतजमिनीच्या वादातून आमदार अब्दुल सत्तार यांनी हिंदू देवतांच्याबद्दल अपमानजनक विधान केल्याचा आरोप आहे. आमदार सत्तार यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने बुधवारी शहरात निषेध मोर्चा काढला. जिल्ह्यातून निषेध होत असल्याने यापूर्वी आमदार सत्तार यांच्या समर्थकांनी मोठा मोर्चा काढला होता, त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न या मोर्चाद्वारे करण्यात आला.
भाजपच्या मोर्चाला तालुक्याचे ग्रामदैवत म्हसोबा महाराज यांच्या मंदिरापासून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मोर्चाच्या मार्गावरील हनुमान मंदिरात आरती करण्यात आली. सराफा बाजार, प्रियदर्शिनी चौक, महावीर चौक, मुख्य रस्ता मार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. येथे मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत करण्यात आले.
यावेळी बोलतांना प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर म्हणाले की, आमदार अब्दुल सत्तार हे हिंदू देवतांबद्दल अाक्षेपार्ह बोलत आहेत. ते हिंदुंच्या धार्मिक कार्यक्रम, भंडाऱ्यांना मोठ्या प्रमाणात वर्गणी देतात म्हणून ते हिंदू देवतांचा अपमान करतात काय, असा सवाल बनकर यांनी केला. त्यांनी आमदारकीच्या काळात सर्व जाती-धर्मियांच्या नागरिकांना त्रास दिला आहे. त्यांच्या अाक्षेपार्ह विधानाचा गावागावात निषेध केला जाणार आहे, असे ते म्हणाले. माजी आमदार सांडु पाटील लोखंडे म्हणाले की, लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार अब्दुल सत्तार यांनी अाक्षपार्ह बोलणे गैर आहे. या प्रकाराचा निषेध नोंदविण्यासाठी आता तालुकास्तरावर शहर बंद ठेवण्यात आले. रास्ता रोको करण्यात आला. निषेध मोर्चा काढण्यात आला. या नंतर गावागावात हे आंदोलन व्यापक स्वरूपात करून निषेध केला जाईल. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन इद्रिस मुलतानी म्हणाले की, पवित्र रमजान महिन्यात आमदार सत्तार यांनी महिलांना केलेली शिवीगाळ निंदणीय आहे. त्यांनी स्वधर्मीयांनाच त्रास दिल्याचा आरोप मुलतानी यांनी केला. तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, मकरंद कोर्डे, अशोक तायडे यांची भाषणे झाली.
व्यासपीठावर महिला अाघाडीच्या जिल्हाध्यक्षा विजया गव्हाणे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मानकर, माजी सभापती अशोक गरूड, जिल्हा परिषद सदस्य गजानन राऊत, दिलीप दाणेकर, राजेंद्र ठोंबरे श्रीरंग साळवे, विष्णू काटकर, कमलेश कटारीया यांची उपस्थिती होती. मोर्चामध्ये सुनील काळे, विकास मुळे, चंद्रशेखर साळवे, संजय डमाळे, विठ्ठल वानखेडे, अर्जून गवळीकर, विनोद मंडलेचा, विलास पाटील, अनिल खरात, मेघराज चौंडिये, विजय वानखेडे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. जाहीर सभेवेळी शहीद संदीप जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेचे सूत्रसंचलन सचिन चौधरी यांनी केले, तर रघुनाथ घरमोडे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरवणी उत्तीर्णांसाठी स्वतंत्र फेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माध्यमिक व उच्चमाध्यमिक मंडळातर्फे जुलैमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना औरंगाबाद शहरात ऑनलाइन पद्धतीनेच अकरावी प्रवेश दिला जाणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी जुलैमध्ये विशेष प्रक्रिया राबविली जाणार आहे. यंदा प्रथमच औरंगाबाद महापालिका हद्दीत अकरावी प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना ऑफलाइन प्रवेश द्यायचे, की ऑनलाइन असा प्रश्न शिक्षण विभागासमोर होता.
गेल्या वर्षीपासून माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना लगेच जुलैमध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लगेच त्याचवर्षी पुढील प्रवेशाची संधी मिळते. यंदा शहरातील अकरावीचे प्रवेश ऑनलाइन होत असल्याने जुलैमध्ये होणाऱ्या दहावी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ऑनलाइन की ऑफलाइन प्रवेश द्यायचे, असा प्रश्न शिक्षण विभागासमोर होता. त्यावर अखेर तोडगा काढत शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनेच प्रवेश दिले जातील, असे स्पष्ट केले आहे. त्यासाठीची तयारीही सुरू करण्यात आली आहे.
पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारीचा विचार केल्यास, या विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या कॉलेजांना प्रवेश घेणे अवघड होण्याची शक्यता आहे. नियमित विद्यार्थ्यांचा कट ऑफ विचारात घेता या विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर प्रवेश दिला जाईल. त्यात शहरातील कॉलेजांची संख्या ११६, तर प्रवेश क्षमता २४ हजार ११० आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन अर्जाची संख्या विचारात घेता, सुमारे तीन हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त राहतील, असा अंदाज बांधला जात आहे. दरवर्षी होणाऱ्या उत्तीर्णतेचा टक्का विचारात घेता शहरातील कॉलेजांमध्ये प्रवेशाची किती शक्यता कितपत मिळेल? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

जुलैमध्ये वेळापत्रक
औरंगाबाद शहरातील कॉलेजांमध्ये रिक्त राहिलेल्या जागा, अकरावीस पात्र विद्यार्थी संख्या यांवर ही प्रक्रिया अवलंबून असेल. त्यासाठी जुलै किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे शिक्षण विभागातील सूत्रांनी ‘मटा’ला सांगितले. त्यात प्रवेशाचे टप्पे मर्यादित केले जातील आणि नियमितपेक्षा हे वेळापत्रक आटोपशीर असेल, असेही सूत्रांनी सांगितले.

सत्राचे वेळापत्रक हुकणार
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण विभागातर्फे जुलैमध्ये दहावीची पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. त्या पुरवणी परीक्षेचा निकाल साधारतः ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जातो. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली तर ऑगस्टमध्ये या प्रक्रियेचे वेळापत्रक असेल. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या अकरावी परीक्षेच्या पहिल्या सत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

- विभागात पुरवणी परीक्षेस पात्र : २०७१७
- जिल्ह्यातील पुरवणी परीक्षेस पात्र : ६७१४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद महापालिका घेणार २५ सिटी बस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी शासनाकडून मिळालेल्या निधीतून हायड्रॉलिक पद्धतीच्या २५ सिटी बस खरेदी करण्याचे महापालिकेत झालेल्या प्राथमिक बैठकीत ठरविण्यात आले. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तात्काळ तयार करण्याचे आदेश ‘पीएमसी’ला देण्यात आल्याची माहिती आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिली.
स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निधी दिला, आता प्रत्यक्ष काम सुरू करा, असे आदेश केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिले होते. त्यानुसार स्मार्टसिटीमधील कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी आयुक्त मुगळीकर यांनी बुधवारी अधिकारी व पीएमसीच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. डीपीआर करण्याची गरज नसलेली कामे तात्काळ सुरू करण्यात येतील, असे त्यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुगळीकर म्हणाले, ‘स्मार्ट ऑफिस, अॅटो डीसीआर, स्मार्ट टॉयलेट, रूफ टॉप सोलार पॅनल्स, स्मार्ट स्कूल्स या कामांसाठी ‘डीपीआर’ची गरज नाही. त्यामुळे ‘स्मार्ट सिटी’साठी मिळालेल्या निधीतून ही कामे लगेचच सुरू करता येण्यासारखी आहेत. एसपीव्हीच्या (स्पेशल पर्पज व्हेकल) बैठकीत याचा प्रस्ताव ठेवून संचालकांची त्याला मान्यता घेतली जाईल. मान्यतेनंतर लगेचच ही कामे सुरू केली जातील.’
घनकचरा व्यवस्थापन आणि सिटीबस सेवा (अर्बन ट्रान्सपोर्ट) या दोन प्रकल्पांचा डीपीआर तयार करावा लागणार आहे. एका महिन्यात दोन्ही प्रकल्पांचा डीपीआर तयार करून द्या, असे आदेश पीएमसी म्हणून काम करणाऱ्या सीएचटूएमएल या कंपनीला देण्यात आले आहेत. स्मार्टसिटीच्या निधीतून कचरा वाहतुकीसाठी ६० रिक्षा खरेदी करणे शक्य आहे. त्याचबरोबर हायड्रॉलिक पद्धतीच्या २५ सिटी बस देखील पहिल्या टप्प्यात खरेदी करणे शक्य आहे. डीपीआर तयार झाल्यावर संचालक मंडळाच्या बैठकीत सिटी बस व रिक्षा खरेदीचा प्रस्ताव ठेवण्यात येईल. महापालिकेने स्मार्टसिटी प्रकल्पाच्या निधीतून सिटी बस खरेदी केल्यावर, त्या कशा चालवायच्या याचा समावेश ‘डीपीआर’मध्ये करण्यास सांगितले आहे, अशी माहिती मुगळीकर यांनी दिली.

शेतकऱ्यांशी चर्चा करणार
स्मार्ट सिटीचा एकूण प्रकल्प १७४० कोटी रुपयांचा आहे. त्यापैकी ११४० कोटी रुपये ग्रीनफिल्डसाठी ठेवण्यात आले आहेत. चिकलठाणा शिवारात ग्रीनफिल्ड विकसित केले जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घ्याव्या लागतीत. शेतकऱ्यांशी चर्चा करून जमिनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू केली जाईल, असे आयुक्त मुगळीकर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुदतवाढीने विद्यार्थ्यांना दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत गुरुवारी अर्ज नोंदणीची मुदत संपत आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत १९ हजार ६६० विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज केले. मुदतवाढीनंतर आज दिवसभरात ७०० नवीन विद्यार्थ्यांनी अर्ज केले.
औरंगाबाद महापालिका हद्दीतील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया यंदापासून ऑनलाइन होते आहे. अर्ज भरण्याची मुदत २७ जूनपर्यंत होती. ही मुदत पुन्हा दोन दिवस वाढवून देण्यात आली. त्यानंतर आज दिवसभरात ७०० विद्यार्थ्यांनी नव्याने अर्ज केले. सर्वाधिक विद्यार्थ्यांनी शहरातील पाच झोन सेंटरवर ही नोंदणी केली आहे. मुदवाढ दिल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झाल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘मटा’ला सांगितले. या प्रक्रियेनंतर पहिला टप्पा ३० जून रोजी मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेशाची प्रक्रियेत गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.

पुढचे वेळापत्रक नाही
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला दोन दिवसांची मुदतवाढ शिक्षण विभागाने दिली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष प्रवेशाचे वेळापत्रकही पुढे गेले आहे. प्रवेश प्रक्रियेत एकूण चार फेऱ्या होणार आहेत. ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ दिल्यानंतर पुढील प्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण विभागाने तात्काळ जाहीर करणे अपेक्षित होते, परंतु अद्याप ते निश्चित होऊ शकलेले नाही. वेळापत्रकाची विद्यार्थी, पालकांना प्रतीक्षा आहे. नव्या वेळापत्रकानुसार प्रवेशाचा पहिला टप्पा संस्थास्तरावर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नवीन कॉलेजांचा अखेर समावेश
शिक्षण विभागाने ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून मे महिन्यात कॉलेजांना नोंदणी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते. त्यात १०४ कॉलेजांनी नोंदणी, प्रवेश संख्याबाबत माहिती सादर केली. त्यानुसार माहिती पुस्तिकेतही अशा कॉलेजांचा समावेश करण्यात आला. त्यानंतरही अनेक कॉलेजांनी नोंदणीची प्रक्रिया न केल्याचे समोर आले होते. अशा कॉलेजांना विभागाने तंबी देताच १२ कॉलेजांनी पुन्हा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्या कॉलेजांचा समावेश ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत करण्यात आला आहे. त्यामुळे एकूण प्रवेश क्षमतेत सुमारे १२०० जागांची भर पडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images