Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

हर्ष आर्टचे ‘फ्यूजन’ चित्रप्रदर्शन

$
0
0

हर्ष आर्टचे ‘फ्यूजन’ चित्रप्रदर्शन
१७ कलाकारांच्या ४८ चित्रकृतींचा समावेश
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कुंचल्यातून वैविध्यपूर्ण मनोहर चित्रकृतीची निर्मिती करणे, त्यातून अंतःकरणात दडलेले भाव प्रकट करण्याचे काम चित्रकार सातत्याने करत असतो. आपल्या प्रतिभेचा वापर करत चित्रकारांनी निर्मिलेले मॉर्डन आर्ट, निसर्गचित्र, फुले यांची पेंटिंग ‘फ्यूजन’ पाहण्याची संधी हर्ष आर्ट क्रिएशनच्या चित्र प्रदर्शनातून उपलब्ध होत आहे.
८ व ९ जुलै रोजी सकाळी ११ ते रात्री एमजीएम कलादीर्घ आर्ट गॅलरी येथे १७ कलावंतांच्या ४८ कलाकृती रसिकांना पाहता येणार आहे. दोन-तीन महिन्यांपासून परिश्रम घेऊन हर्ष आर्टच्या विद्यार्थ्यांनी या चित्रकृती तयार केल्या आहेत. या प्रदर्शनात ६ वर्ष ते ४० वर्षांपर्यंतच्या कलाकारांचा समावेश आहे. या सर्वच कलाकृती अंतरंगाला भिडणाऱ्या आहेत. हरीश आणि श्रुती दहिहंडे यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. ‘फ्यूजन’ थीम असलेले हे त्यांचे तिसरे प्रदर्शन आहे.
या चित्र प्रदर्शनात अन्यन्या दहिफळे, अनुष्का राजपूत, आस्था सकलेचा, देवांग दहिहंडे, हार्दिक झांबड, इरा सोनी, इशा कंदाकुरे, इशानी पटेल, मुग्धा निकाळते, मुस्कान वेद, नमिता सोनी, नीता निकाळजे, परीधी पगारिया, पायल शेठ, प्रार्थना वेद, राधिका बालापुरे, तृप्ती बोरुळकर या कलाकारंचा समावेश आहे. रसिकांनी चित्र प्रदर्शनास उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्योजक गुट्टेंची तीन तास चौकशी

$
0
0


परभणी - गंगाखेड शुगरचे चेअरमन तथा रासपचे नेते रत्नाकर गुट्टे यांची शेतकऱ्यांच्या नावे परस्पर ३२८ कोटी रूपयांचे कर्ज उचलल्याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी तीन तास कसून चौकशी केली. या चौकशीत गुट्टे यांचा जबाब घेण्यात आला असून त्या अनुषंगाने संबंधीत शेतकऱ्यांचेही जबाब घेण्याचे काम सुरू झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय हिबारे यांनी दिली.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये असलेल्या पाच राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर अॅण्ड एनर्जी लि. या साखर कारखान्याने परभणी, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड आणि अकोला या सहा जिल्ह्यातील ८ ते १० हजार शेतकऱ्यांच्या नावे तब्बल ३२८ कोटी रूपयांचे कर्ज उचलल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल झाल्यानंतर खंडपीठाने आर्थिक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर या प्रकरणात गंगाखेड पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री परळीच्या एका शेतकऱ्यांने गुन्हा दाखल केला. त्यानुसार व न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे रत्नाकर गुट्टे यांना येथील पोलिस अधिक्षक कार्यालयात चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. या ठिकाणी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक संजय हिबारे यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी रत्नाकर गुट्टे यांची तब्बल ३ तास कसून चौकशी केली. ज्यामध्ये त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. या संदर्भात हिबारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तीन तास झालेल्या चौकशीत गुट्टे यांचे स्टेटमेंट घेण्यात आले आहे. त्यानुसार संबंधीत शेतकऱ्यांचे जबाब नोंदवून घेण्याचे काम सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
राजकीय षड्यंत्रातून आरोप- गुट्टे
पोलिस अधिक्षक कार्यालयात तीन तास चौकशी झाल्यानंतर बाहेर पडलेल्या उद्योजक रत्नाकर गुट्टे यांनी प्रसार माध्यमांना बोलताना आपल्यावर हे राजकीय षड्यंत्रातून आरोप झाल्याचे म्हटले आहे. असा कुठलाही प्रकार झालाच नाही. पूर्णपणे राजकीय षड्यंत्र रचण्यात आले असून त्यातूनच हे आरोप झाले असल्याचे गुट्टे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊस गायब; धरणे कोरडीठाक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विभागात तब्बल तीन आठवडे पावसाने उघडीप दिल्यामुळे चिंताजनक स्थिती आहे. खरीप पिकांचे नुकसान होत असतानाच धरणातील पाणीसाठा घटत आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रकल्पांची स्थिती ‘जैसे थे’ असून जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे, मात्र सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत पावसाचे दिवस असल्यामुळे पाणीसाठा वाढणे अपेक्षित असल्याचे जलतज्ज्ञांनी सांगितले.
समाधानकारक पावसाचा अंदाज असताना मागील तीन आठवडे पावसाने उघडीप दिली आहे. जून महिन्यात फक्त ११ दिवस पाऊस पडला. जुलै महिन्याचा पहिला आठवडा पूर्ण कोरडा गेला आहे. तब्बल २२ दिवस पाऊस नसल्यामुळे खरीप पिकांची स्थिती चिंताजनक आहे. विभागातील धरणात जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे.
प्रकल्प क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यास पाण्याची आवक सुरू होते. सध्या राज्यभर पाऊस नसल्यामुळे पाणीसाठा घटत आहे. मराठवाड्यात उद्योग, शेती आणि शहरांचे अवलंबित्व असलेल्या जायकवाडी प्रकल्पात (पैठण) १७.७८ टक्के पाणीसाठा आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण भरलेले नाहीत. तसेच जायकवाडीच्या वरील क्षेत्रात पाऊस नसल्यामुळे पाण्याची आवक बंद आहे. सध्या प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन सुरू आहे. तापमानातील आर्द्रतेचा जलसाठ्यावर मोठा परिणाम होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४७.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पावसाचे प्रमाण वार्षिक सरासरीच्या २१ टक्के आहे. विभागातील आठ जिल्ह्यात सारखीच स्थिती असल्यामुळे मोठे, मध्यम व लघु प्रकल्प कोरडेठाक आहेत.

जायकवाडी प्रकल्पाच्या वरील भागात पाऊस नसल्यामुळे पाण्याची आवक नाही. सध्या धरणात पाणीसाठा असला तरी तापमान आणि आर्द्रता बाष्पीभवनाला कारणीभूत ठरत आहे. वरील प्रकल्प भरल्यानंतरच जायकवाडीत पाणी येऊ शकेल.
- अशोक चव्हाण, अभियंता, जायकवाडी प्रकल्प

विभागातील पाणीसाठा
प्रकल्प..............टक्केवारी
जायकवाडी..........१७.७८
निम्म दुधना........३९.६९
येलदरी................३.०५
सिद्धेश्वर..............३.८७
माजलगाव...........१४.९०
मांजरा................२४.६०
इसापूर................३.७६
सीना कोळेगाव.....२.९३
(७ जुलैचा अहवाल)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोंदणीकृत डॉक्टरच करू शकतात रिपोर्टवर सह्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च ‘एमसीआय’ व ‘एमएमसी’कडे नोंदणी झालेल्या डॉक्टरांनाच लॅबच्या रिपोर्टवर सह्या करण्याचा अधिकार आहे, असे ‘एमसीआय’ अर्थात भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. एकीकडे ‘एमसीआय’ने अशी भूमिका घेतली असली तरीदेखील, राज्यामध्ये बोगस डॉक्टर-पॅथॉलॉजिस्टचा सुळसुळाट असल्याबद्दल वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना विचारले असता, आता डॉक्टरांना १०० टक्के नोंदणी आवश्यक असून, अधिकार नसताना सह्या करणारे बोगस डॉक्टर, तंत्रज्ञ व इतरांवर कडक कारवाई करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी ‘मटा’ला सांगितले.
वेगवेगळ्या दर्जात्मक निकषांचे पालन करणाऱ्या प्रयोगशाळांना ‘एनएबीएल’ प्रमाणपत्र देणाऱ्या ‘नॅशनल अॅक्रिडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅब्रोटरीज’च्या (एनएबीएल) वतीने ८ ऑक्टोबर २०१४ व १२ ऑगस्ट २०१४ रोजी ‘एमसीआय’ला देण्यात आलेल्या पत्राद्वारे वेगवेगळ्या शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. यामध्ये ‘एमसीआय’कडे नोंदणीकृत नसलेल्या; पण एमएसस्सी किंवा पीएचडी पदवीप्राप्त व्यक्तींना लॅबच्या रिपोर्टवर सह्या करण्याचा अधिकार आहे का, केवळ ‘एमबीबीएस’ पदवीप्राप्त डॉक्टरांना सह्या करता येतील का; तसेच मेडिकल मायक्रोबायोलॉजी, मेडिकल बायोकेमिस्ट्री, सायटोजेनेटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, लाइफ सायन्सेस, अॅपलाइड बायोलॉजी आदी विषयांतील पीएचडीप्राप्त व्यक्तींना लॅबच्या रिपोर्टवर सह्या करता येतील का, आदी प्रश्न पत्राद्वारे उपस्थित करण्यात आले होते.
दरम्यान, छोट्या-मोठ्या; तसेच कॉपोर्रेट लॅबमध्ये तंत्रज्ञ किंवा एमएस्ससी किंवा पीएचडी पदवी प्राप्त व्यक्तींकडून वेगवेगळ्या लॅब रिपोर्टवर सर्रास सह्या होत असल्याच्या तक्रारीही अलीकडे ‘एमसीआय’कडे आल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर ‘एमसीआय’ने खास समिती स्थापून यासंदर्भात एमसीआय सदस्यांमध्ये अनेकदा चर्चा झाली. त्यानंतर केवळ ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ किंवा राज्यातील ‘मेडिकल कौन्सिल’मध्ये नोंदणी झालेल्या प्रशिक्षित डॉक्टरांनाच कोणत्याही लॅब रिपोर्टवर सह्या करण्याचा अधिकार आहे, असे पत्र ‘एमसीआय’च्या उपसचिव डॉ. परूल गोयल यांच्या सह्यानिशी नुकतेच काढण्यात आले आहे.

तीन वर्षांनी घेतली दखल!
या निमित्ताने ‘एनएबीएल’ने उपस्थितीत केलेल्या प्रश्नांना ‘एमसीआय’ने चक्क तीन वर्षांनी उत्तर दिले आहे, याबाबतही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याचवेळी पॅथॉलॉजिस्ट मुंबईत बसून त्याच्या सह्या जालना, जळगाव, पुणे यासारख्या ठिकाणी सर्रास वापरल्या जात असल्याच्या केसेसमध्ये नेमकी कोणती कारवाई केली जाणार, यावर ‘एमसीआय’ने भाष्य केलेले नाही.

‘एमसीआय’ने केवळ नोंदणीकृत डॉक्टरांनाच सह्यांचा अधिकार दिला आहे. आता सर्व डॉक्टरांनी १०० टक्के नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यामुळेच आता बोगस डॉक्टर उघडे पडणार आहेत. अशा राज्यभरातील बोगस व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार आहे.
- गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीचा शिक्षण विभागात संकटात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी राज्यभरातील उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. काही मुख्याध्यापकांना पदोन्नती देत गटशिक्षणाधिकारी म्हणून जबाबदारी सोपविली. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे एम. के. देशमुख यांची जालन्याला बदली केल्याने प्राथमिक विभाग शैक्षणिक वर्ष सुरू होतानाच संकटात सापडणार आहे.
आर. एस. मोगल हे ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागेवर प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून अद्याप कुणाचीही नियुक्ती केलेली नाही. सेवाज्येष्ठतेनुसार माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांना प्राथमिक शिक्षणाधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. या विभागातील उपशिक्षणाधिकाऱ्यांची दोन्ही पदे गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त आहेत.
दरम्यान शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नतीचे आदेश जारी केले. त्यानुसार कन्नड येथील गटशिक्षणाधिकारी आश्विनी लाटकर यांची औरंगाबाद उपशिक्षणाधिकारी, मांजरी येथील मुख्याध्यापक श्रीमती शेख यांची कन्नड येथे गटशिक्षणाधिकारी, आंग्ल भाषेच्या श्रीमती खान यांची पैठण गटशिक्षणाधिकारी, कन्नड येथील एम. डी. दहिफळे यांची खुलताबाद गटशिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. सर्वात धक्कादायक म्हणजे एम. के. देशमुख यांना औरंगाबादहून जालन्याला हलविण्यात आले. देशमुख यांची औरंगाबादेत चार वर्षे सेवा पूर्ण झाली होती.

अजूनही एक पद रिक्त
प्राथमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकाऱ्यांची दोन पदे आहेत. ही पदे गेल्या कित्येक महिन्यांपासून रिक्त आहेत. वारंवार मागणी करूनही ही पदे भरण्याकडे वरिष्ठ कार्यालयाने दुर्लक्ष केले आहे. मोगल कार्यरत असताना ते एकाच वेळी चार पदांचा कार्यभार सांभाळत होते. अशीच परिस्थिती देशमुखांनीही अनुभवली. आता एक उपशिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली, पण अजूनही एक पद रिक्तच राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऋतुजाच्या कष्टाला हवी समाजाची साथ

$
0
0

Ashish.Choudhari@timesgroup.com
Tweet : @ashishMT
औरंगाबाद ः घरची परिस्थिती बेताची. वडील कापड दुकानात कामाला. स्वतःचे घरही नाही. त्यातच ऐन परीक्षेच्या काळात आजारपण... अशा संकटांवर मात करीत ऋतुजा जाधवने दहावीचा किल्ला सर केला. दहावीत ९२.२ टक्के गुण मिळविणाऱ्या ऋतुजाला डॉक्टर व्हायचे आहे. कष्ट करण्याची जिद्द असताना तिच्या मार्गात आर्थिक अडथळे आहेत. ते पार करण्यासाठी तिला समाजाची साथ हवी आहे.
मुलींच्या भविष्याची स्वप्ने पाहणारे सुभाष जाधव यांचे गाव फुलंब्री तालुक्यातील वाणेगाव. रोजीरोटीसाठी २० वर्षांपूर्वी ते औरंगाबादेत आले. वर्षभर मजुरी केली. त्यानंतर जवाहर कॉलनीतील न्यू अमर ड्रेसेस या कापडाच्या दुकानात कामास सुरुवात केली. याच परिसरात भाड्याच्या एका खोलीत त्यांनी संसार थाटला. ते गेली १९ वर्षे या दुकानात काम करतात. त्यांच्या तुटपुंज्या पगारावर कुटुंबाचा चर‌ितार्थ चालतो. त्यांना ऋतुजा आणि क्षीतिजा या दोन मुली. मोठी मुलगी ऋतुजा परिसरातीलच ब्रिलियंट किड्स स्कूलची विद्यार्थिनी. घरच्या परिस्थितीची जाण असलेल्या ऋतुजाने खासगी शिकवणीचा कधीही आग्रह धरला नाही. मुलीच्या शिक्षणाचा खर्च वाढत आहे. तिच्या शिक्षणाला हातभार लागावा म्हणून आई वंदना यांनी मागील वर्षी शिवणकाम शिकल्या, परंतु त्यातही फारसे उत्पन्न मिळत नाही. अभ्यासात हुशार असलेल्या ऋतुजाने आठवीपासूनच डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. दहावीत पहाटे सोडचार ते सकाळी सात अभ्यास, त्यानंतर शाळा, तेथून दुपारी साडेबाराला घरी. पुन्हा दुपारी दीड ते अडीच यादरम्यान अभ्यास. दोन तास शिकवणीला आणि पुन्हा सायंकाळी आठनंतर रात्री ११पर्यंत अभ्यास..., अशी तिची दिनचर्या. दहावीत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवत केलेला अभ्यास सार्थकी लागल्याचे ऋतुजा सांगते. शाळेत पहिला क्रमांक मिळाला आणि ऋतुजाच्या आई-वडिलांना आभाळ ठेंगणे झाले. त्याचवेळी, मुलीने पाहिलेल्या स्वप्नाचे काय, असा प्रश्नही त्यांना सतावत आहे.

प्रसंगी दागिनेही गहाण
आपल्या मुलीचा कल पाहत आपल्या पोटाला चिमटा काढत, प्रसंगी आपल्या पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवून सुभाष जाधव आतापर्यंत शिक्षणाचा खर्च भागवला. दहावीच्या अभ्यासासाठी एकांत मिळावा म्हणून जवळच्याच शिकवणीमध्ये पाठवले. मुलीच्या शिक्षणासाठी केलेले प्रयत्न आणि मुलीची मेहनत सांगताना सुभाष जाधव यांच्या डोळ्यात आश्रू तरळतात.

आजारानेही पाहिली परीक्षा
अभ्यासाचा ताण आणि परीक्षेची भीती वाटल्याने परीक्षेच्या आदल्या दिवशी ऋतुजा आजारी पडली. तिला हॉस्पिटलमध्ये जावे लागले. सलाइन लावल्यानंतर डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला, परंतु दुसऱ्या दिवशी पेपर असल्याने पुन्हा घरी येऊन अभ्यास आणि परीक्षा दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेचा पाय खोलात

$
0
0

पालिकेचा पाय खोलात
बांधकाम परवानगीच्या दोन प्रकरणात सव्वालाखांचा फटका
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
महापालिकेच्या नगररचना विभागाकडून देण्यात येणाऱ्या बांधकाम परवानगीच्या बाबतीत लेखापरीक्षणाच्या माध्यमातून अनेक अनियमितता उघड झाल्या आहेत. या अनियमिततांची दखल आयुक्तस्तरावर घेतली गेल्यास बुडालेला महसूल पालिकेच्या तिजोरीत पुन्हा जमा होईल असे मानले जात आहे. जुना बायजीपुरा व शिवशक्ती गृहनिर्माण संस्था या संदर्भातील दोन प्रकरणे बांधकाम परवानगीशी निगडीत असून या दोन प्रकरणांमुळे पालिकेला सव्वालाखांचा फटका बसला आहे. आता ही रक्कम संबंधितांकडून वसूल करण्याचे आव्हान महापालिकेच्या यंत्रणे समोर आहे.
महापालिकेच्याच लेखापरीक्षण विभागाने नगररचना विभागातील कारभाराचे ऑडिट केले. या ऑडिट दरम्यान जुना बायजीपुरा भागातील एक प्रकरण अधोरेखित करण्यात आले आहे. या भागातील सीटीएस क्रमांक १२१५३ मधील भूखंडावर नगररचना विभागाने २० जून २०१४ रोजी बांधकाम परवानगी दिली. बांधकाम परवानगी देताना संबंधित व्यक्तीकडून रेडी रेकनर दराने शुल्क वसूल करणे गरजेचे होते. व्यावसायिक व रहिवासी अशा दोन प्रकारच्या बांधकामाची परवानगी या ठिकाणी देण्यात आली. या दोन्ही बांधकामाचा शहर विकास निधी रेडी रेकनर दरानुसार ९७ हजार ५६० रुपये पालिकेच्या तिजोरीत भरून घेणे गरजेचे होते, पण तसे न करता ४१ हजार रुपयेच भरून घेण्यात आले. ५६ हजार ५६० रुपये कमी वसूल करण्यात आले. महापालिकेचे त्यामुळे आर्थिक नुकसान झाले असा ठपका लेखापरीक्षण अहवालात ठेवण्यात आला आहे. कमी वसूल करण्यात आलेली रक्कम संबंधितांकडून वसूल करून पालिकेच्या फंडात जमा करावी अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे.
कमी शुल्क वसूल करण्यात आल्याचे दुसरे प्रकरण शिवशक्ती सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या संदर्भात उघडकीस आले आहे. नगरभूमापन क्रमांक १२४५५ वरील ७/ए या भूखंडावर नगररचना विभागाने ३१ मे २०१४ रोजी बांधकाम परवानगी दिली. बांधकाम परवानगी देताना रेडी रेकनर नुसार १ लाख ३४ हजार १६० रुपये शहर विकास निधीच्या माध्यमातून वसूल करणे गरजेचे होते, परंतु एवढी रक्कम वसूल न करता ६७ हजार १०० रुपयेच वसूल करण्यात आले. त्यामुळे पालिकेला ६७ हजार ६० रुपयांचा फटका बसला. ही रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमाच झाली नाही. याच प्रकरणात संबंधिताने बांधकाम परवानगीचा प्रस्ताव दाखल करताना सक्षम कार्यालयाचा मोजणी नकाशा सादर केलेला नाही, मोजणी नकाशा सादर केलेला नसतानाही बांधकाम परवानगी देण्यात आली. या सर्व प्रकाराचा खुलासा होणे गरजेचे आहे असे लेखापरीक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील सिग्नल रामभरोसे

$
0
0

शहरातील सिग्नल रामभरोसे
वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात वाहतूक नियमनासाठी नवीन सिग्नलची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, सिग्नल सुरू असले तरी या ठिकाणी पोलिस कर्मचारी उभे राहत नसल्याने हे सिग्नल शोभेची वस्तू ठरत आहेत. बहुतांश सिग्नलवर लाल दिवा लागला तरी वाहने थांबतच नाहीत अन् पोलिस कर्मचारी नसल्याने कारवाईचा प्रश्नच उभा रहात नाही. एकूणच शहरातील सिग्नल रामभरोसे सुरू आहेत.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत असावी, वाहतूकीची कोंडी होऊ नये म्हणून शहरात काही ठिकाणी नवीन सिग्नल उभारण्यात आले आहे. यामध्ये शहानूरवाडी, रोपळेकर चौक, हेडगेवार चौक तसेच अभिनय थियेटर जवळील चौकातील सिग्नलचा समावेश आहे.
शहरातील महत्वाच्या सिग्नलवर वाहतूक पोलिसांचा पॉइंट वाहतूक नियमनासाठी लावण्यात येतो. मात्र, काही सिग्नल याला अपवाद आहेत. यापैकी अभिनय थिएटर चौक, समर्थनगर, रोपळेकर हॉस्पिटल चौक व हेडगेवार चौक या सिग्नलवर वाहतूक पोलिस कधीतरी दिसून येतात. यामुळे हे‌ सिग्नल सुरू असले तरी रामभरोसे असल्याचे दिसून येते.
वाहनधारकांची मनमानी
पोलिस तैनात नसलेल्या सिग्नलवर वाहनधारकांची मनमानी वाहतूक सुरू असते. सिग्नलचा लाल लाईट सुरू असला तरी कोणी थांबत नाही. बिनधास्तपणे सिग्नल तोडून वाहनधारक निघून जातात. या बेशिस्तपणामुळे अपघाताचा धोका देखील वाढला आहे.
ऑलआऊट ऑपरेशनच्या वेळेस दिसतात पोलिस
पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्या संकल्पनेतून शहरात ऑल आऊट ऑपरेशन राबवण्याची मोहिम सुरू झाली आहे. नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना यामध्ये दंड ठोठावण्यात येतो. नाकाबंदी असली तर या सिग्नलवर मात्र पोलिस पॉइंट हमखास तैनात करण्यात येतो.
प्रामाणिक वाहनचालकाची गोची
हे सिग्नल सुरू असले तरी या ठिकाणी पोलिस नसल्याने बेशिस्त वाहनधारकांचे चांगलेच फावत आहे. सिग्नलच्या नियमांचे पालन न करता ही मंडळी सर्रास निघून जातात. मात्र, वाहतूक नियमनाचे पालन करणारे वाहनधारक लाल लाईट बंद होऊन हिरवा सिग्नल मिळाल्याशिवाय आपले वाहन पुढे काढत नाही. या प्रकारात त्यांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिमरनच्या वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबादच्या शेख सिमरन या विद्यार्थिनीचा वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीचा मार्ग मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयामुळे मोकळा झाला. न्या. अनुप मोहता व न्या. सुनील कोतवाल यांच्या खंडपीठाने माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाला विद्यार्थिनीची बारावीची गुणपत्रिका देण्याचा आदेश दिला.
शेख सिमरन ही विद्यार्थिनी फेब्रुवारी २०१५मध्ये बारावीची (विज्ञान शाखा) परीक्षा उत्तीर्ण झाली होती, मात्र राष्ट्रीय वैद्यकीय पात्रता परीक्षेसाठी (नीट) आवश्यक गुण तिला प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे तिने मंडळाच्या श्रेणी सुधार योजनेंतर्गत गेल्यावर्षी पुन्हा परीक्षा दिली. जून २०१६मध्ये या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. नीट परीक्षेसाठी आवश्यक गुण तिने प्राप्त केले, पण तिने मंडळाकडून गुणपत्रिका घेतली नाही.
ही चूक तांत्रिक आहे. नकळत झालेल्या चुकीमुळे विद्यार्थिनीचा वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीचा प्रवेश नाकारला जाईल. त्यामुळे मंडळाला गुणपत्रिका देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती.
न्यायालयाने माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाला गुणपत्रिका देण्याचा आदेश दिला. याचिकाकर्तीच्यावतीने रवींद्र गोरे यांनी बाजू मांडली. त्यांना नारायण मातकर, चंद्रकांत बोडखे यांनी सहकार्य केले. मंडळाच्यावतीने सुरेखा महाजन व सरकारतर्फे ए. व्ही. देशमुख यांनी काम पाहिले.

गुणपत्रिका देण्यास मंडळाचा होता नकार
यावर्षी जून महिन्यात तिने नीट परीक्षा दिली व ती वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पात्र ठरली. श्रेणी सुधार योजनेंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयात एका महिन्यात गुणपत्रिका देता येते. त्यानंतर पुढील पाच महिन्यांत जुनी गुणपत्रिका स्वीकारून नवीन गुणपत्रिका देता येते, पण सहा महिने उलटल्याने मंडळाने तिला गुणपत्रिका देण्यास नकार दिला. त्यामुळे शेख सिमरनने खंडपीठात धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिटी स्कॅन’ बंदच; खर्चमान्यतेची प्रतीक्षा

$
0
0

‘सिटी स्कॅन’ बंदच; खर्चमान्यतेची प्रतीक्षा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) ‘६ स्लाईस सिटी स्कॅन’ हे उपकरण मागच्या दीड महिन्यापासून बंद असून, अद्यापदी उपकरणाच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झालेला नाही. उपकरणाच्या दुरुस्तीसाठी घाटी प्रशासनाने ‘पीएलए’ फंडातून खर्च करण्याची परवानगी ‘वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालया’कडे (डीएमईआर) मागितली असली तरी या खरेदीला अजूनही मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे ही मान्यता मिळून उपकरण कधी सुरू होईल, याचे उत्तर घाटी प्रशासनाकडेही नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
घाटीच्या क्ष-किरण विभागामध्ये ‘६ स्लाईस’ व ‘६४ स्लाईस’ अशी दोन सिटी स्कॅन उपकरणे आहेत. मात्र सुमारे दीड-पावणे दोन महिन्यांपासून ‘६ स्लाईस’ उपकरणाचे ट्यूब नादुरुस्त झाल्याने हे उपकरण बंद पडले आहे. त्यामुळे चाचण्यांचा सगळा ताण ‘६४ स्लाईस’वर असून, रुग्णांचे वेटिंग वाढले आहे. उपकरणाच्या ‘ट्यूब’ची किंमत ४० ते ४५ लाखांच्या घरात असून, घाटीच्या ‘पीएलए फंडा’तून ट्यूबची खरेदी शक्य आहे. मात्र पाच लाखांपुढील खर्चाचे अधिकार अधिष्ठातांना नसल्याने तसा प्रस्ताव ‘डीएमईआर’कडे पाठवण्यात आला असला अद्याप या प्रस्तावाला कुठलेच उत्तर आलेले नाही. त्यामुळे ‘सिटी स्कॅन’चे भिजत घोंगडे कायम असून, ‘ट्यूब’ची खरेदी कधी होणार आणि उपकरण कधी सुरू होणार, हा प्रश्नच आहे. त्याचवेळी सिटी स्कॅनच्या ‘ट्यूब’चा समावेश वार्षिक देखभाल करारात (एएनसी) होत नसल्याने, नादुरुस्त झालेल्या ‘ट्यूब’च्या खरेदीसाठी एकतर तात्काळ परवानगी मिळाली पाहिजे किंवा दुसरा पर्यायी मार्ग शोधला पाहिजे, अशीही मागणी होत आहे.
‘६४ स्लाईस’वर दुप्पट ताण
एकीकडे ‘६ स्लाईस’ मशीन बंद पडल्याने ‘६४ स्लाईस’वर मागच्या दीड महिन्यापासून दुपटीने ताण वाढला आहे. यदा कदाचित ‘६४ स्लाईस’ची ट्यूब नादुरुस्त झाली तर मात्र घाटीमध्ये ‘सिटी स्कॅन’ची कुठलीही सोय राहणार नाही. त्यादृष्टीने ‘६ स्लाईस’ उपकरण लवकरात लवकर सुरू होण्याची गरज व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘एमआयएम’ विरोधात शिवसेना आक्रमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रस्तावाला विरोध करत विषयपत्रिका फाडणारे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन रशीद यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांची शुक्रवारी (७ जुलै) भेट घेत केली.
याप्रकरणी व्हिडिओ क्लीप पाहून निर्णय घेण्याचे आश्वासन यादव यांनी दिले असून, नगरसेवक सय्यद मतीन यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
गुरुवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या नियुक्तीचा प्रस्ताव सादर करण्यात होता. नगरसेवक सय्यद मतीन यांनी या प्रस्तावाला विरोध करीत विषयपत्रिका फाडली. तसेच नंतर प्रसार माध्यमांशी बोलताना ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप शिवसेनेने आयुक्तांना दिलेल्या निवेदनामध्ये केला आहे. पोलिस आयुक्तांनी या प्रकरणी व्हिडिओ फुटेज मागवून त्याची तपासणी करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. मात्र, नगरसेवक मतीन यांना कलम १४९ प्रमाणे प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. शिष्टमंडळाने पार्किंग व मह‌ावीर चौकातील वाहतूक समस्याबाबत देखील तक्रार केली असता त्या सोडवण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. या वेळी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, शहरप्रमुख राजू वैद्य, बाळासाहेब थोरात, संतोष जेजुरकर, गजानन मनगटे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांवर हल्ला; आरोपीला कारावास

$
0
0


औरंगाबाद : अटक करण्यासाठी गेलेल्या चार पोलिसांवर चाकूने हल्ला करणाऱ्या आरोपीला सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पौर्णिमा कर्णिक यांनी ठोठावली. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सतीश प्रभाकर पगार यांनी फिर्याद दिली होती.
फिर्यादीनुसार, २६ जून २०१२ रोजी फिर्यादी हा प्रभाकर गदई, त्र्यंबक पवार, राजेंद्र खरात या इतर तीन पोलिस कॉन्स्टेबलसह आरोपी सुरेश दौलतराव साळवे (रा. इंदिरानगर, औरंगाबाद) याला दुसऱ्या एका प्रकरणात अटक करण्यासाठी इंदिरानगर परिसरात गेला होता. त्यावेळी पोलिसांना पाहून आरोपी सुरेश याने फिर्यादी पोलिसाची कॉलर पकडून फिर्यादीच्या गळ्यावर चाकूने वार केला. दुसऱ्याच क्षणी इतर तिघा पोलिसांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या दंडावर चाकूने वार करीत आरोपी पळून गेला. त्याच दिवशी मध्यरात्री आरोपीला अटक करण्यात येऊन आरोपीविरुद्ध कलम ३०७, ३५३, ५०४, ५०६ अन्वये जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्यावेळी सहाय्यक सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने आरोपीला कलम ३५३ अन्वये दोषी ठरवून आरोपीला सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ तरुणींना चापट मारून त्रस्त करणारा गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुचाकीवर येऊन तरुणींना चापटा मारून छेडछाड करणाऱ्या माथेफिरू मीर मुजाहीद हुसैन आबेदीला शुक्रवारी (७ जुलै) दामिनी पथकाने बेड्या ठोकल्या. गेल्या तीन महिन्यांपासून एन १ भागात हा प्रकार सुरू होता.
सिडको एन १ भागात आदिवासी मुलींचे वसतिगृह आहे. येथील मुलींना तसेच महिलांना गेल्या तीन महिन्यांपासून पाठीमागून पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या तरुणाने चापटा मारत छेड काढून त्रस्त केले होते. या प्रकाराला कंटाळलेल्या मुलींनी दामिनी पथकाकडे तक्रार केली होती. पथकातील महिला पोलिसांनी या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून संशयिताचे फुटेज मिळवून फॉरेन्सिक लॅबकडून तपासले. यामध्ये दुचाकीचा अर्धवट क्रमांक मिळाला. या क्रमांकाची किती वाहने शहरात गेल्या दहा वर्षांत आली आहेत याची माहिती आरटीओ कार्यालयातून मिळवण्यात आली. अशा क्रमांकाची चार वाहने असल्याची माहिती समोर आली. यापैकी तीन वाहनचालकांना बोलावून त्यांची ओळख या तरुणींसमोर करण्यात आली. मात्र, छेड काढणारा तरुण तो नसल्याचे तरुणींनी सांगितले. अखेर आज संशयित मीर मुजाहीद हुसैन आबेदी पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पोलिस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, एसीपी रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाच्या पोलिस नाईक स्वाती बनसोडे, कोमल निकाळजे, पूनम झाल्टे, स्नेहा दांडगे यांनी ही कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाच्या दडीने चिंता वाढली

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
पावसाने घेतलेल्या दीर्घ विश्रांतीने जिल्ह्यातील खरीप पिके जळू लागली असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. येत्या तीन-चार
दिवसात पावसाने सर्वदूर हजेरी न लावल्यास ग्रामीण भागातील परिस्थिती अधिकच बिकट होण्याची साशंकता वर्तविली जात आहे.
मे महिन्यात रोहिणी नक्षत्रात व जूनमध्ये मृग नक्षत्रात जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली. या पावसाने शेतकऱ्यांमध्ये व बाजारपेठेत उत्साहाचे
वातावरण होते. या पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे ६० टक्के लोकांनी खरीप पेरणी उरकली. जिल्ह्यात यंदा रोहिणी व मृगचा पाऊस बरसल्याने यंदा अनेक
शेतकऱ्यांनी उडीद व मूग या पिकावर अधिक लक्ष केंद्रित केले. यंदा पेरणीच्या वेळी जमिनीत चांगली ओल असल्याने पिकांची उगवनही समाधानकारक झाली. परंतु, आद्र्रा नक्षत्र जवळपास कोरडे गेल्याने उगवून आलेली पिके माना टाकू लागली आहेत. काही ठिकाणची पिके पिवळी पडू लागली आहेत.
यंदा कोकण व मुंबईपेक्षा उस्मानाबादेत पावसाचे आगमन अगोदर झाले. परंतु गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. सध्या रुठलेल्या पावसाचे पुन्हा आगमन कधी होणार, यासाठी शेतकऱ्यांचे आभाळाकडे लक्ष लागले आहे.
सध्या दिवसरात्र जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आणि पडत चाललेल्या कडक उन्हामुळे जमिनीतील ओल कमी होत चालली असून, उगवून आलेल्या पिकांना बळ मिळण्यासाठी सध्या पावसाची नितांत गरज आहे. पावसाअभावी हलक्या व मध्यम प्रतीच्या जमिनीतील ओल कमी झाली असून, उगवण झालेल्या पिकांना बळ मिळण्यासाठी सध्या पावसाची नितांत गरज आहे. पावसामुळे पिके जळून जात असून, खुरटे गवतही जनावरांसाठी दुरापास्त होवू लागले आहे. पावसाने दडी मारल्याची चिंता ग्रामीण भागामध्ये असून, यंदा खरीप पिके हातची जातात की काय अशी शंका वर्तविण्यात येत आहे.
दिवसभरातील कोरडे ढग आणि रात्रीच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या चांदण्या व
सुसाट वारे यामुळे पाऊस लांबण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पावसाअभावी बाजारपेठेतील भाजीपाल्याची आवकही मंदावली असून, सर्वच
भाज्यांचे दर कडाडले आहेत. त्यामुळे सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहात आहेत. ५ जुलै पासून पुनर्वसू नक्षत्र सुरू झाले असून, याचे चिन्ह कोल्हा आहे. या नक्षत्रात पाऊस लहरीपणाने पडतो असा समज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हागणदारीमुक्त गावालाच निधी देणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
लातूर जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्न करीत आहे. त्या प्रयत्नाला चालना देण्यासाठीच जे गाव हागणदारीमुक्त होईल. त्याच गावाला मी माझा खासदार निधी देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी दिशाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महापौर सुरेश पवार, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रकाश देशमुख, निलंगा पंचायत समितीचे सभापती अजित माने, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. सुधीर भातलवंडे उपस्थित होते.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती दिशाच्या कार्याचा आढावा बैठक या समितीचे अध्यक्ष खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत झालेल्या कामाकाजाची माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत खासदार डॉ. सुनील गायकवाड म्हणाले, ‘जिल्ह्यात आरोग्य सेवेसाठी मंजूर असलेल्या १११ डॉक्टरांपैकी ९१ डॉक्टरांची नियुक्ती झालेली आहे. जर एमबीबीएस झालेले डॉक्टर मिळत नसतील तर बीएएमएस डॉक्टर नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
लातूर जिल्ह्यासाठी पासपोर्ट कार्यालय मंजूर झाले असून स्थानिक पोस्ट ऑफीसमधील कर्मचाऱ्यांचे त्यासाठीचे प्रशिक्षण ही पूर्ण झाले असून लवकरच या कार्यालयाची सुरुवात करण्यात येणार आहे. लातूर शहरातील पालिकेच्या शाळा आणि दवाखान्याच्या इमारतीची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. त्या इमारती नव्याने बांधण्यासाठी पालिकेने प्रस्ताव दिल्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
स्वस्तात हवाई प्रवास योजना सुरू करण्यासाठी लातूरच्या विमानतळाच्या तटभिंतीचे बांधकाम सुरू झाले असून डिसेंबरमध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी दिली.

रेल्वेसाठी रस्त्यावर उतरणार
लातूरकरांच्या जिव्हाळ्याचा आणि अस्मितेचा प्रश्न झालेल्या लातूर मुंबई रेल्वेचा प्रश्न सोडविण्यासाठी मी सत्ताधारी भाजपचा खासदार असलोतरी रस्त्यावर उतरून आंदोलन करेन अस मी रेल्वे मंत्र्यांना सांगितले असल्याचे खासदार डॉ. गायकवाड यांनी सांगितले. बिदर ते मुंबई ही रेल्वे सुरू झाल्यानंतर लातूर ते मुंबई ही रेल्वे कायम राहणार आहे, बिदरला आता ट्रॅक तयार झाला आहे. त्यामुळे ती रेल्वे लवकरच सुरू होईल असे मला सांगण्यात आले आहे. रेल्वे मंत्र्यांनी रेल्वेचे अधिकारी गुहा यांना तर खासदार म्हणात तशी रेल्वे सुरू करा असा आदेशसुद्धा दिल्याचे त्यांनी सांगितले. एक जुलैला नवीन रेल्वे सुरू होणार होती? त्याचे काय झाले ? असे विचारता मी असे म्हणालो नाही. ज्यांनी असे सांगितले त्यांना विचारा असे डॉ. गायकवाड यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ उजाड शाळा, गळक्या भिंती!

$
0
0

गणेश जाधव, फुलंब्री
एकीकडे महागड्या इंग्रजी शाळांचे फुटलेले पेव आणि दुसरीकडे गलितगात्र, मरणासन्न झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा यात सामान्यांची फरफट सुरू आहे. फुलंब्री तालुक्यांतील अनेक शाळांमध्ये गळक्या भिंती, पत्रे उडालेले आणि मोडकळीस आलेल्या इमारतींमुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे.
तालुक्यातील ममनाबाद, धामणगाव, वाहेगाव (गणेशवाडी) जिल्हा परिषदेच्या शाळेवरील पत्रे उडाले आहेत. विद्यार्थ्यांना गळक्या छताखाली बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. जुनाट वर्गखोल्यांमुळे येथील शाळांची अवस्था अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अनेक शाळा मद्यपींचा अड्डा बनल्या आहेत. शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात. अनेक शाळांना संरक्षक भिंती नाहीत. त्यामुळे अशा शाळांत विद्यार्थी पाठवायचे तरी कसे, असा प्रश्न पालकांना पडत आहे. विशेष म्हणजे गावातील शालेय शिक्षण समितीनेही याकडे दुर्लक्ष केले आहे. पाल, जाधववाडी, कान्होरी, ममनाबाद, आळंद, महालकिन्होळा, धामणगाव, वाहेगाव (गणेशवाडी), बाभुळगाव तरटे, वडोदबाजार, पीरबावडा येथील शाळेंच्या दुरुस्तीचे प्रस्ताव गटशिक्षण अधिकारी कार्यालयात सादर केलेले आहेत. या शाळांची दुरुस्ती करावी, अशी मागणी पालक वर्गाकडून केली जात आहे.

शाळेची इमारत मद्यपींचा अड्डा
गणोरी येथील जिल्हा परिषद शाळेचे जून २०१५ मध्ये नवीन इमारतीत स्थलांतर झाले. आता जुनी इमारत मोडकळीस आली आहे. शाळेच्या परिसरात व वर्गखोल्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या इमारतीचा गैरवापर सुरू असून आता शाळा मद्यपी आणि पत्ते कुटणाऱ्यांचा अड्डा झाली आहे. वर्गखोल्यांचा वापर सर्रासपणे शौचास जाण्यासाठी केला जातो. जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाने याकडे लक्ष देऊन या इमारतीची डागडुजी करावी. येथे एखादे प्रशिक्षण केंद्र, छंद वर्ग अथवा जागेचा सदुपपयोग करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सर्व शाळेंच्या दुरुस्तीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केले आहेत. निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. निधी मिळताच सर्व शाळेंची दुरुस्ती करण्यात येईल. - रवींद्र वाणी, गटशिक्षण अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजीनगर डेपो संघास विजेतेपद

$
0
0

शिवाजीनगर डेपो संघास विजेतेपद
अंतिम सामन्यात नूतन कॉलनी डेपोवर मात
लोगो - पेपर विक्रेते प्रीमिअर लीग क्रिकेट
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘टाइम्स ऑफ इंडिया’ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या पेपर विक्रेते प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत शिवाजीनगर डेपो संघाने नूतन कॉलनी डेपो संघाचा २९ धावांनी पराभव करून विजेतेपद पटाकाविले.
साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उपांत्य सामन्यात शिवाजीनगर डेपो संघाने आकाशवाणी डेपो संघाचा, तर नूतन कॉलनी डेपो संघाने शहागंज डेपो संघाचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. तत्पूर्वी शहागंज डेपो संघाने सिडको डेपो संघाचा २० धावांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठली होती. अंतिम सामन्यात शिवाजीनगर डेपो संघाने प्रथम फलंदाजी करताना १० षटकांत ८ बाद ९० धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना नूतन कॉलनी डेपोला १० षटकांत ६ बाद ६१ धावाच करता आल्याने २९ धावांनी पराभव स्विकारावा लागला. रोहित सोळुंकेने सर्वाधिक २६ धावा काढत एकाकी झुंज दिली. पवन गायकेने ४ विकेट्स घेतल्या.

पारितोषिक वितरण सोहळा
टायडी होमचे संचालक अजिंक्य सावे यांच्या हस्ते विजेत्या शिवाजीनगर डेपो संघास करंडक प्रदान केला. उपविजेत्या नूतन कॉलनी डेपो संघास राजेंद्र कानडे व नानासाहेब पाटील यांच्या हस्ते करंडक देण्यात आला. अंतिम सामन्यातील सामनावीर पवन गायकेला किशोर लहाने यांच्या हस्ते, तर मालिकावीर अजय कावळेला टीव्ही सेंटर डेपोचे काकासाहेब मानकापे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. या सोहळ्यास वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब जगताप, उपाध्यक्ष फईम शेख, सचिव नीलेश फाटके, टाइम्स डीलर सागर पाटील, आकाशवाणी डेपोचे गणेश पिंजरकर, नूतन कॉलनी डेपोचे आसाराम कुलकर्णी, माणिक कदम, आर. बी. ठाकरे, शिवाजीनगर डेपोचे बी. टी. लहाने, गजानन मंदिर डेपोचे अनिल बर्गे, सिडको एन - ७ डेपोचे नितीन दहाड, सिडकोचे महेश निराळी, मिलकॉर्नर डेपोचे किशोर लहाने, शहागंज डेपोचे अब्दुल अझीझ व प्रकाश देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेच पंच म्हणून सय्यद जमशीद, मोहसीन हफवी, शेख मुजाहेद यांनी काम पाहिले. लखन सुर्यवंशी यांनी गुणलेखन केले. संदीप साऊंडचे संदीप काळे यांचेही सहकार्य या स्पर्धेला लाभले. टीव्ही सेंटर येथील ऋषिकेश न्युज पेपर एजन्सीचे काकासाहेब जगताप यांनी विजेत्या शिवाजीनगर डेपो संघास १,००१ रूपयांचे बक्षीस दिले.

मालिकावीर अजय कावळे म्हणाला, ‘पेपर विक्रेत्यांसाठी ‘मटा’ने क्रिकेट स्पर्धा घेऊन आम्हाला एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. गेल्या एक महिन्यापासून आम्ही या स्पर्धेची तयारी करीत होतो. स्पर्धेत सर्वच खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्याने आमचा संघ विजेता ठरला.’

संक्षिप्त धावफलक ः उपांत्य फेरी ः १. शिवाजीनगर डेपो संघ - ८ षटकांत ९४ (अजय कावळे ६६, अशोक ७, राम काळे, सागर साखरे प्रत्येकी २ विकेट्स) विजयी विरुद्ध आकाशवाणी डेपो संघ - ८ षटकांत ६० (श्रीकांत गिरी नाबाद ३१, सिद्धार्थ इखारे १४, अमोल चाबुकवार ३ विकेट्स, अजय कावळे, पवन प्रत्येकी १ विकेट). सामनावीर - अजय कावळे.
२. शहागंज डेपो संघ - ८ षटकांत ४९ (शेख मुजीब १६, राहुल पाटील ४ विकेट्स) पराभूत विरुद्ध नूतन कॉलनी डेपो संघ - ५.३ षटकांत ५५ (रोहित नाबाद २३, राहुल लोखंडे नाबाद १५, लक्ष्मण घुले १५, अय्याज १ विकेट). सामनावीर - राहुल पाटील.
अंतिम सामना ः शिवाजीनगर डेपो संघ - १० षटकांत ८ बाद ९० (नितीन लहाने १९, अमोल चाबुकवार १८, पवन गायके १८, राहुल पाटील ३ विकेट्स, लक्ष्मण घुले २ विकेट्स) विजयी विरुद्ध नूतन कॉलनी डेपो संघ - १० षटकांत ६ बाद ६१ (रोहित सोळुंके २६, राहुल पाटील १५, पवन गायके ४ विकेट्स, अजय कावळे, अशोक प्रत्येकी १ विकेट). सामनावीर - पवन गायके.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ चोरीस गेलेल्या वीस दुचाकी सापडल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
पोलिसांनी शुक्रवारी (७ जुलै) कुंजखेडा येथे केलेल्या कोबिंग ऑपरेशनमध्ये वीस दुचाकी मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आल्या, तर ३६ दुचाकींची कागदपत्रे वाहनचालकांकडे नसल्याने जप्त करण्यात आल्या.
अजिंठा पोलिस ठाण्यात दुचाकी चोरी झाल्याप्रकरणी आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे आज पहाटे १२ ते ७ वाजेच्या दरम्यान तालुक्यातील कन्नड, सोयगाव, फर्दापूर व अजिंठा येथील पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. कन्नड शहर पोलिस ठाण्यात जमा केलेल्या गाड्यांचे खरे कागद पत्रे दाखवून व पडताळणी करून घेऊन जाण्याचे आवाहन उपविभागीय पोलिस नीरज राजगुरू यांनी केले आहे. याबाबत अजिंठा पोलिस ठाण्यात गराडा येथील एक व कुंजखेडा येथील एका आरोपीस दुचाकी चोरीच्या आरोपाखाली बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. या आरोपींने दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू कन्नड ग्रामीणचे पोलिस निरीक्षक मारुती पंडित, कन्नड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे, अजिंठा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोहर वानखेडे, फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश घोडके, सोयगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुजित बढे यांच्यासह सुमारे ३५ पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. या आरोपीकडून अजूनही दुचाकीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

सर्व सामान्य नागरिकांनी जुनी वाहणे व दुचाकी घेताना पूर्ण कागदपत्रे तपासून व पडताळणी करून घ्यावी. यामुळे फसवणूक होणार नाही याची कळजी घ्यावी. - नीरज राजगुरू, उपविभागीय पोलिस अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘बीपीएल’ची साखर महाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
किराणा दुकानातील रेशनवर आता बीपीएल आणि अंत्योदय योजनेतील कार्डधारकांसाठी साखरेचे दर वाढल्याने किलोमागे दीड रुपया अधिक मोजावा लागेल. तर केंद्र सरकारने साखरेवरील अनुदान बंद केल्यामुळे राज्याने साखरेच्या कोट्यात घट केली असून प्रतिमानसी अर्धा किलो मिळणारी साखर आता प्रती कार्ड एक किलो मिळणार आहे.
खुल्या बाजारात साखरेचे दर चाळीस रुपये किलोपर्यंत गेलेले असताना रेशन दुकानाद्वारे बीपीएल तसेच अंत्योदय योजनेसाठी वाटप होणाऱ्या साखरेचा कोट्यात शासनाने जवळपास निम्मी घट केली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील १ लाख ७७ हजार ४३८ बीपीएल आणि ६९ हजार ३११ अंत्योदय अशा एकूण २ लाख ४६ हजार ७४९ कार्डधारकांना खुल्या बाजारातून साखर विकत घ्यावी लागणार आहे.
गोरगरिबांचे किराणा दुकान असलेल्या रेशनवर काही वर्षांपूर्वी डाळी, साखर, डालडा, मैदा, पामतेल आदी वस्तू सवलतीच्या दरामध्ये देण्यात येत होत्या. कालांतराने कधी काळी गहू, तांदूळ, साखर, पामतेल, डाळी आदी वस्तू सवलतीच्या दरात कार्डधारकांना दिल्या जात होत्या. मात्र, कालांतराने रेशन दुकानांवर गहू, तांदूळ, साखर आणि डाळी उरल्या आहेत. मात्र, आता केंद्र शासनाने साखरेवरील अनुदान बंद केल्यामुळे राज्य शासनाने साखरेचा कोट्यामध्ये घट केली आहे.
जिल्ह्यात एकूण कार्डधारकांची संख्या साडेसात लाख आहे. त्यापैकी पाच लाख कार्डधारकांना रेशन दुकानावर गहू व तांदूळ मिळतो. तर अंत्योदय आणि बीपीएल कार्डधारकांनाच साडेतेरा रुपये किलोदराने साखर मिळत होती. आता जून महिन्यापासून साखरेच्या कोट्यात घट करण्यात आली आहे. शासननिर्णयापूर्वी जिल्ह्याला ५ हजार ८१३ क्विंटल साखरेचा कोटा देण्यात येत होता. मात्र, आता प्रती कार्ड एक किलो निर्णयानंतर जिल्ह्यामध्ये २ हजार ४६७.४९ क्विंटल साखरेचा कोटा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ खंडपीठ निवडणुकीत देशमुख विजयी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद खंडपीठ वकील संघाच्या शुक्रवारी (७ जुलै) अत्यंत चुरशीत झालेल्या निवडणुकीत दुसऱ्यांदा झालेल्या मतमोजणीत अॅड. आर. एम. देशमुख (५१५) यांनी अॅड. अतुल कराड (५०१) यांच्यावर १४ मतांनी विजय मिळविला. निवडणुकीत ११५६ पैकी १०५० वकील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीत नऊ जणांची बिनविरोध निवड झाली असून, सात जागांसाठी मतदान झाले.
खंडपीठ वकील संघाच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी अपेक्षित होता. फेरमतमोजणीमुळे रात्री ७.४५ वाजता अध्यक्षपदाचा निकाल मुख्य निवडणूक अधिकारी अविनाश बोरूळकर यांनी जाहीर केला. सचिवपदासाठी आनंदसिंह बायस यांनी अमित कुलकर्णी यांचा पराभव केला. बायस यांना ६०९, तर कुलकर्णी यांना ४०४ मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठी बाबासाहेब सागडे (३६७) व राजेंद्र सानप (६२७) यांना मते मिळाली. सहसचिवपदासाठी अनिल धोंगडे (६८१) साहेबराव पंडित (३१५), कोषाध्यक्ष हनुमंत जाधव (६२३) व अमोल पटाले (३८३), ग्रंथालय समिती चेअरमनपदासाठी व्ही. एस. जानेफळकर (३११), दयानंद माळी (४२६), आनंद वानगे (२७४) , ग्रंथालय समिती सचिवपदासाठी बिपीनचंद्र पाटील (५२९), नानाभाऊ थोरात (४६८) मते मिळाली. सदस्य म्हणून पूनम बोडखे पाटील, सरिता गायकवाड मनिषा भामरे, सोपान बोबडे, धनराज मुंडे, नीलेश सानप, प्रदीप तांबडे, शंतनू उढाण, विशाल उढाण यांची बिनविरोध निवड झाली. महिला उपाध्यक्ष म्हणून संगीता वडमारे, महिला सहसचिवपदी शारदा चाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीच्या यशस्वीतेसाठी श्रीहरी दंडे, अॅड. पराग बर्डे, गिरीश वाणी, एल. व्ही. संगीत, एम. एल. संगीत, ए. आय. देशमुख, अॅड. जी. एस. राणे, अॅड. श्रीनिवास कुलकर्णी, आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images