Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दहावीतील गुणवंतांना हवा मदतीचा हात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करून दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आर्थिक मदतीची गरज आहे. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही साधन-सुविधांशिवाय त्यांनी हे यश संपादन केले आहे. करिअर घडविण्यासाठी त्यांना आता मदत हवी आहे. या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘मटा हेल्पलाइन’ सुरू असून, समाजातील दानशूरांना आवाहन करण्यात आले आहे.

दहावीच्या परीक्षेत कठोर परिश्रम करून यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर पुढील शिक्षणासाठी असंख्य प्रश्न असतात. अशा विद्यार्थ्यांना ‘मटा हेल्पलाइन’च्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात येते. वाचकांच्या भक्कम पाठबळावर हा उपक्रम सुरू आहे. दानशूरांनी विद्यार्थ्यांना मदत करावी.

महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या शुभम दांडगेने दहावीच्या परीक्षेत ९०.४० टक्के गुण मिळविले आहेत. लहानशा खोलीत दांडगे कुटुंबाचा संसार तेथे अभ्यासासाठी पुरेशी जागा नाही. खासगी शिकवणी लावणेही त्याला शक्य नव्हते. अशावेळी शाळेतील शिक्षकांनी घेतलेल्या एक्स्ट्रा क्लासचा त्याला फायदा झाला. शुभमला मेडिकलला प्रवेश घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला केंद्रीय लोकसेवा आयोगाचे आव्हान पार करायचे आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्यासमोर आर्थिक संकटाचे आव्हान आहे.

कोमल पळसकरचे वडील शेतीत राबतात. शेतीतून कुटुंबाला पुरेल एवढेही धान्य निघत नाही. कोमलने दहावीत ९३.२ टक्के गुण मिळविले. कोमलला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी, डॉक्टर होण्यासाठी समाजातून मदतीचे काही हात पुढे येण्याची आवश्यकता आहे.

घरची परिस्थिती बेताची आणि टेन्शनमुळे ऐन परीक्षेच्या काळात आलेले आजारपण यांवर मता करीत ऋतुजा जाधवने दहावीत ९२.२ टक्के गुण मिळविले. तिचे वडील कापड दुकानात कामाला आहेत. तिला डॉक्टर व्हायचे आहे. त्यासाठी तिच्यासमोर आर्थिक परिस्थितीचे आव्हान आहे. ते पार करण्यासाठी समाजातून मदत मिळणे गरजेचे आहे.

वडील कारागीर, आई आजारी, घरची परिस्थिती बिकट. अशा कठीण परिस्थितीवर मात करीत सूरज सवणेने कठोर परिश्रम केले आणि दहावीच्या परीक्षेत ९०.२ टक्के गुण मिळविले. आईचे आजारपण डोळ्यासमोर असलेल्या सूरजला डॉक्टर व्हायचे आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाजातून त्याला मदतीचा हात हवा आहे.

कोरडवाहू जमिनीवर संसाराचा डोलारा असलेल्या कुटुंबातील रोहिणी जाधवने दहावीच्या परीक्षेत ९३.२ टक्के गुण मिळविले. पावसाने पाठ फिरविली तर संपूर्ण वर्षभर आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. अशा स्थितीत रोहिणीला वडिलांनी शिक्षणासाठी औरंगाबादेत ठेवले. तिला आर्किटेक्ट व्हायचे आहे. तिच्या स्वप्नांच्या पूर्णतेसाठी समाजातून मदतीची अपेक्षा आहे.

चेक स्वीकारण्याचा पत्ता
महाराष्ट्र टाइम्स साई स्क्वेअर, दुसरा मजला, उस्मानपुरा सर्कल, रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद
विशेष सूचना : चेक विद्यार्थ्यांच्या नावे 'म.टा.' कार्यालयातच द्यावेत. चेक जमा करण्यासाठी ‘मटा’ने अन्य कोणाचीही नेमणूक केलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बांधकामाचा हिशेब मागितला; त्यांनी पाडले दोन दात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
गुरुधानोरा येथे लोकवर्गीणीतून बांधण्यात येणाऱ्या मशीद बांधकामाच्या खर्चाचा हिशेब मागितल्याच्या कारणावरून चौघांनी बेदम मारहाण केली. यात एकाचे दात पडले आहेत. या प्रकरणी चौघांविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करीम नूर खान पठाण (वय ६०, रा. गुरूधानोरा ता. गंगापूर) हे नेहमीप्रमाणे गावातील एका टेलरच्या दुकानात पेपर वाचत बसले होते. त्यावेळी गावातील गोरे खान अमीर खान पठाण, मलंग नूर खान पठाण, सय्यद गणी मुन्शी सय्यद, शेख कादर शेख हबीब (सर्व रा. गुरूधानोरा) यांनी करीम नूर खान पठाण यांच्याकडे मशीद बांधकामासाठी ठरलेल्या अडीच हजार रुपयांतील येणे असलेले ३६० रुपयांच्या वर्गणीची मागणी केली. त्यावर करीम पठाण यांनी यापूर्वी घेतलेल्या लोकवर्गणीचा हिशेब देण्याची मागणी केली. त्याचा राग आल्याने वर्गणी मागणाऱ्यांनी त्यांना शिवीगाळ करत दोन दात पाडले. त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत सोडून पळ काढला. ही घटना सोमवारी सकाळी ९ वाजता घडाली. पठाण यांना जखमी अवस्थेत नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कॉपी-पेस्ट’ संशोधनाला आळा

$
0
0

Tushar.Bodkhe@timesgroup.com
Tweet : @tusharbMT
औरंगाबाद ः विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन अध्यादेशानुसार एमफिल अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल झाला आहे. या पीएचडी धर्तीवरील पद्धतीमुळे संशोधनाचा दर्जा सुधारणार असून प्रथमच मौखिक परीक्षा घेण्यात येणार आहे, मात्र प्राध्यापकांच्या श्रेणीनुसार संशोधकांच्या जागा मर्यादित करण्यात आल्या आहेत. या नवीन नियमामुळे यंदा एमफिल संशोधकांची संख्या निम्म्याने घटणार आहे.

‘कॉपी-पेस्ट’ पद्धतीने वादग्रस्त ठरलेल्या एम. फिल अभ्यासक्रमात विद्यापीठ अनुदान आयोगाने महत्त्वाचे बदल केले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने हा अध्यादेश तीन ऑक्टोबर २०१६ रोजी लागू केला आहे. नवीन अध्यादेशानुसार एमफिल गुणवत्तापूर्ण संशोधनाला चालना देणारा अभ्यासक्रम ठरणार आहे. पूर्वीच्या नियमानुसार एका विभागात कमाल २० संशोधक विद्यार्थ्यांना एमफिलसाठी प्रवेश देण्यात येत होता. आता प्राध्यापकांच्या श्रेणीनुसार संशोधक विद्यार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. प्रोफेसर ०३, असोसिएट प्रोफेसर ०२ आणि असिस्टंट प्रोफेसर ०१ अशी विद्यार्थ्यांची मर्यादा ठरवण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित विभागातील प्राध्यापकांच्या संख्येनुसार विद्यार्थ्यांची संख्या अवलंबून आहे. मागील वर्षी विद्यापीठात एमफिल करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३२० होती. यावर्षी संख्येत निम्मी घट होणार आहे. मात्र, सामाजिक आरक्षणानुसार प्रवेश देण्यात येणार आहे.

५० टक्के खुला प्रवर्ग आणि ५० टक्के राखीव प्रवर्ग असे जागांचे स्वरूप आहे. विद्यार्थी संख्या घटणार असली तरी कोणत्याही प्रवर्गाच्या जागा कमी होणार नाहीत. एका वर्षात दोन सत्र किंवा कमाल दोन वर्षे असा अभ्यासक्रम कालावधी आहे. पीएच. डी. संशोधनाच्या पद्धतीनुसार एमफिलचे काम होणार आहे. एकूण ३० श्रेयांक असून, मेथॉडॉलॉजीला ८ श्रेयांक आहेत. संख्यात्मक संशोधन, संगणक अॅप्लिकेशन, संशोधन साहित्य आढावा या घटकांना प्रत्येकी दोन श्रेयांक आहेत.

प्रशिक्षण-सर्वेक्षण व सेमिनारला प्रत्येकी एक श्रेयांक आहे. पहिल्या सत्रात कोर्सवर्क पूर्ण करावा लागणार आहे. बहिस्थ परीक्षकांच्या माध्यमातून परीक्षण केले जाणार आहे. एमफिल प्रवेश प्रक्रिया आठ जुलैपासून सुरू झाली असून, २९ जुलै रोजी प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) आहे. विद्यापीठातील १८ विभागात एमफिल अभ्यासक्रम आहे.

तोंडी परीक्षा होणार
यावर्षीपासून एमफिल अभ्यासक्रमात मौखिक परीक्षा होणार आहे. प्रबंध सादर करण्यापूर्वी पूर्व तोंडी परीक्षा होईल. या परीक्षेला उपस्थित संशोधक व परीक्षांच्या सूचना असल्यास संशोधनात बदल करावा लागणार आहे; तसेच संशोधन काळात एक शोधनिबंध मान्यताप्राप्त जर्नलमध्ये प्रकाशित होणे बंधनकारक आहे. अंतिम प्रबंध सादर करण्यापूर्वी कुलगुरू मान्यता देणार आहेत. संगणक आणि अत्याधुनिक संशोधन पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांनी संशोधन करणे अपेक्षित आहे. या प्रकारामुळे दर्जेदार शोधनिबंध तयार होतील असा तज्ज्ञांचे मत आहे.

नवीन पद्धतीमुळे एम. फिलचा दर्जा निश्चित सुधारणार आहे. संशोधनात प्रथमच संगणकाचा वापर वाढणार असून नवीन पद्धती आदर्श आहे. जगभरातील संशोधन इंटरनेटवर उपलब्ध असताना आपल्यालाही दर्जेदार संशोधनाची संधी मिळाली आहे.
- प्रा. डॉ. कैलास अंभुरे, मराठी विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाल्याचे दर गगनाला

$
0
0

भाजीपाल्याचे दर गगनाला

पावसाने मारली दडी ; आवक घटली

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने भाजीपाला उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे भाज्यांचे दर गगनाला पोहचले आहेत. सर्व भाज्या ८० ते १०० रुपये किलो या दराने विकल्या जात आहे. मंगळवारी भाजीपाल्याचे गेल्या महिन्यापेक्षा तिप्पट झाल्याचे दिसून आले.
बाजार समितीसह शहरातील विविध भाजीमंडीमध्ये भाज्यांचे दर वाढलेले आहेत. दोन दिवसांत पालेभाज्यांची आवक निम्म्याने घटली आहे. त्यामुळे नागरिक व हॉटेल व्यावसायिकांची पंचाईत झाली आहे. शेतकरी संपामुळे गेल्या महिन्यांत सातत्याने तब्बल ७० ते ८० टक्के भाज्यांची आवक कमी झाली होती. तशीच घट आताही जुलै महिन्यात पाहायला मिळाली. विविध भाजीमंडईंच्या व्यतिरिक्त रस्त्यावरील ठराविक चौकात बसून व विविध कॉलन्यांतून फिरून किरकोळ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना रोजच्यापेक्षा दुप्पट पैसे देऊन भाजी खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर किलोमागे तब्बल २० ते ५० रुपयांनी वाढले आहेत. ८ ते १० रुपयांना मिळणाऱ्या कोथिंबीर जुडीसाठी भाजीमार्केटमध्ये आज १५ ते २० रुपये मोजावे लागत आहे. एक किलो टोमॅटोचा दर २० ते २५ रुपये होता, तो आता ८० ते ९० रुपये किलोने विकला जात आहे. किरकोळ बाजारामध्ये तर ग्राहकांना टोमॅटोचे दर पहिल्यांदाच एवढ्या प्रमणात वाढल्याचे दिसून आले. इतर भाज्यांच्या दरामध्येही तब्बल किलोमागे १५ ते २५ रुपयांनी वाढ झाली आहे. पाऊस लांबल्यास दर अजून वाढण्याची शक्यता आहे.
पालेभाज्या तेजीत
दोन आठवड्यापांसून कृषी उत्पन्न बाजार समितीत घटलेली पालेभाज्यांची आवक मंगळवारी थोडी वाढली होती. सुमारे १८०० क्विंटल फळे व पालेभाज्यांची आवक झाली. यात मेथी, पालक, कोथिंबिरीच्या ३० हजार जुड्यांची आवक झाली. त्यांची विक्री प्रतिजुडी २० रुपये प्रमाणे विक्री केली जात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट’साठी औरंगाबादवारी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, जालना

अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पीएचडीच्या ‘पेट’ला मुहूर्त मिळाला असला, तरीही जालना जिल्ह्यामध्ये या परीक्षेचे एकही केंद्र नाही. त्यामुळे, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना औरंगाबादला जावे लागणार आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये केंद्र दिले असताना, जालना जिल्ह्याचा विचार करण्यात आला नाही, अशी तक्रार विद्यार्थ्यांमधून करण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ‘पेट’ १४ व १५ जुलै रोजी होत आहे. औरंगाबादबरोबरच जालना, उस्मानाबाद आणि बीड जिल्हे असे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. या चारही जिल्ह्यांतील विविध विद्याशाखांतील १४ हजार ५०० विद्यार्थी ‘पेट’ देणार आहेत. त्यांच्यासाठी १७ परीक्षा केंद्रांवर दोन दिवस आणि तीन सत्रांत ही परीक्षा घेणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले होते. बीड जिल्ह्यातील १२४८ परीक्षार्थींसाठी आदित्य इंजिनिअरिंग कॉलेज आणि अंबाजोगाईचे एमबीर्इ इंजिनिअरिंग कॉलेज ही दोन परीक्षा केंद्रे आहेत. उस्मानाबाद येथील ६९२ परीक्षार्थींसाठी तेरणा कॉलेज आणि तुळजापूर कॉलेज ही दोन परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या धर्तीवर जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठीही जालन्यातील महाविद्यालयांमध्येच परीक्षा केंद्र मिळणे अपेक्षित होते. परंतु विद्यापीठ प्रशासनाने जालना जिल्ह्याला वगळण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये निराशा आहे.
जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील १२१४३ परीक्षार्थींसाठी औरंगाबादेच परीक्षाकेंद्र देण्यात आला. यात १३ महाविद्यालयांमध्ये परीक्षा घेण्यात येईल. ‘पेट’साठी औरंगाबादवारी करण्यात वेळ आणि पैसे वाया जाणार असल्याने जालनेकर विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. परीक्षार्थ्यांमध्ये नोकरदार आणि अपंग विद्यार्थ्यांचाही समावेश असून, काही परीक्षा केंद्रे तर वाळूज आणि कांचनवाडी येथे शहराबाहेर असल्याने ये-जा करताना कसरत करावी लागणार आहे.

रविवारी परीक्षा का नाही?
दरम्यान, यापूर्वीच्या पेट परीक्षा फक्त रविवारीच घेण्यात आल्या होत्या. परंतु यावेळेस विद्यापीठाने पेट परीक्षा रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी न ठेवता शुक्रवार आणि शनिवार या कामकाजाच्या दिवशी आयोजित केली आहे. परीक्षार्थींमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरदारांचा समावेश असल्याने खास परीक्षेसाठी रजा घ्यावी लागणार आहे. अनेक जणांना संबंधित मालक आणि संस्थाचालकांकडे सुट्टीसाठी विनवणी करावी लागणार आहे. बहुतेक परीक्षार्थी हे खासगी विनाअनुदानित शिक्षण संस्थांवर काम करून आपली उपजीविका भागवतात. सध्या प्रवेशांची गडबड सुरू असल्याने संस्थाचालकांनी सुट्टी दिली नाही, तर.. ही भीती अनेकांच्या मनात आहे.


‘पेट’ रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी ठेवायला पाहिजे होती. सध्या प्रवेशांचे दिवस असून, खास परीक्षेसाठी कामावरून सुट्टी घ्यावी लागणार आहे. त्यातच औरंगाबाद जाण्या-येण्यात मोठ्या प्रमाणावर वेळ आणि पैसाही वाया जाणार आहे. सुट्टी न दिल्याने अनेकांना परीक्षेला मुकावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-प्रा. शरद जाधव,
परीक्षार्थी, जालना


आंदोलनाचा इशारा
‘कुलगुरूंनी परीक्षार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन पेट परीक्षा रविवारी किंवा सुट्टीच्यादिवशी आयोजित करावी आणि जालन्यातील विध्यार्थ्यांसाठी जालन्यातच परीक्षा केंद्र द्यावी, अन्यथा आम्ही युवा सेनेस्टाइल आंदोलन करू,’ असा इशारा युवा सेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य जगन्नाथ काकडे यांनी दिला आहे. विद्यापीठ प्रशासनाने पेटसाठी जालना सेंटर न देऊन जालनेकर परीक्षार्थ्यांवर एकप्रकारे अन्यायच केला आहे. यामुळे औरंगाबाद जाण्या-येण्यात मोठ्या प्रमाणावर वेळ आणि पैसाही वाया जाणार आहे, असा आरोप त्यांनीही केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीआरपीएफच्या दोन जागा रिक्त ठेवण्याचे आदेश

$
0
0

म. टा . विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
केंद्रीय राखीव पोलिस दलात (सीआरपीएफ) निवड झालेल्या दोन उमेदवारांनी मराठा जातीचा दाखला वेळेत दिला नाही म्हणून निवड रद्द करण्याचा निर्णयाला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. शासनाला नोटीस बजावून न्या. अनुप व्ही मोहता व न्या. एस.के. कोतवाल यांनी याचिकाकर्त्यांच्या दोन जाग रिक्त ठेवण्याचे निर्देश दिले.
२०१५ मध्ये केंद्र शासनाने शिपाई (जनरल ड्यूटी) केंद्रीय राखीव पोलिस दल या पदासाठी एकूण ६२ हजार ३९० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली. या भरतीमध्ये अटी व शर्तीनुसार काही ठराविक जात प्रवर्गातील उमेदवारांना उंचीमध्ये सवलत देण्यात आली होती. त्यात मराठा जातीचाही समावेश करण्यात आला होता. या भरती प्रक्रियेमध्ये नगर जिल्ह्यातील याचिकाकर्ते योगेश कासाळ व राजेंद्र तिडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या उमेदवारांनी शारीरिक चाचणीच्या वेळेस तसेच आरोग्य चाचणीच्या वेळेस मराठा जातीचा दाखला दाखल करून उंचीमध्ये सवलत मिळवलेली होती. लेखी परीक्षाही उत्तीर्ण झाले होते. या भरती प्रकियेचा गुणवत्तेनुसार निकाल जाहीर झाला असता दोघांचे नाव निवड यादीमध्ये न आल्यामुळे त्यांनी कर्मचारी भरती आयोगाकडे लेखी तक्रार करून माहिती मागवली असता त्यांची निवड जातीचे प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यामुळे रद्द केल्याचे आयोगाने कळविले.
केंद्र शासनाच्या या निर्णयाविरूद्ध त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. याचिकाकर्त्यांनी निवड प्रक्रियेच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्या असून, मराठा जातीचे प्रमाणपत्र शारिरिक चाचणीच्या वेळेसच सादर केलेले आहे. जाहिरातीतील अटी व शर्तींप्रमाणे जे उमेदवार त्यांचा जातीचा दाखला दाखल करतील अशाच उमेदवारांची शारीरिक व आरोग्य चाचणी घेण्यात आलेली आहे. याचिकाकर्त्यांनी ज्यांना उंचीमध्ये सवलत मिळणार आहे अशा उमेदवारांनी जातीचा दाखल केला होता व उंचीमध्ये सवलत मिळविलेली होती. त्यामुळे केंद्र शासनाचा तसेच कर्मचारी भरती आयोगाचा निर्णय चुकीचा व अन्यायकारक आहे असा युक्तीवाद याचिकाकर्त्याचे वकील अमोल चाळक-पाटील यांनी केला. केंद्र शासन,भरती आयोगाला नोटीस बजावून शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले. दरम्यानच्या काळात दोन जागा रिक्त ठेवण्याचे आदेश दिले. केंद्र शासनातर्फे अजय तल्हार हे काम पाहत आहेत. या याचिकेची सुनावणी २७ जुलैला होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्स हिसकावली, तिघांना अटक, पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गारखेडा परिसरात पायी जात असलेल्या महिलेच्या हातातील पर्स हिसकावणाऱ्या तिघा आरोपींना गुरुवारपर्यंत (१३ जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरुंदळे यांनी दिले.
या प्रकरणी करुणा रामदास धनेधर (रा. गारखेडा, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, ही महिला ही १३ फेब्रुवारी रोजी गारखेडा परिसरातून पायी जाताना दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी पर्स हिसकावून धूम ठोकली. या पर्समध्ये साडेचार हजार रुपये रोख होते. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीनंतर जवाहरनगर पोलिस ठाण्यात दाखल होऊन आरोपी गजानन दिंगबर जानोळे (वय २७, रा. अंबिकानगर, औरंगाबाद), राहुल बाळू मिसाळ (वय १९, रा. जिजाऊनगर, औरंगाबाद), अनिकेत कचरू विधाते (वय १८, मुकुंदवाडी, औरंगाबाद) यांना अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता, सहाय्यक सरकारी वकील सुनील एम. जोंधळे यांनी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपींना गुरुवारपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डॉ. आंबेडकर पुतळा परिसर विकसित करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसर अतिक्रमणमुक्त करून या परिसरात उद्यान विकसित करण्याची मागणी शहरातील नागरिकांनी नगर पालिकेकडे केली आहे.
शहराच्या मध्यभागी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आल्याने पुतळा परिसराची जागा निम्म्याने कमी झाली आहे. परिणामी, या भागात काही कार्यक्रम असल्यास नागरिकांना रस्त्यावर उभे रहावे लागते. नगर पालिकेने या भागातील जागा भोगवटा तत्वावर दिलेली आहे. या ठिकाणचे भोगवटा रद्द करून पुतळा परिसरात उद्यान विकसित करण्याची व पुतळा परिसर अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी करणारे निवेदन शहरातील नागरिकांनी नगर पालिकेला दिले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचा पैठण आपेगाव विकास प्राधिकारणात समावेश करून विकास करण्याचीही विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर कपिल पहिलवान, लखन कांबळे, सुनील आडसूळ, गौरव आठवले, महेंद्र साळवे, मिलींद बनकर, सचिन वाघमारे, शेखर दाभाडे, श्रीकांत मगरे, अजय पाखरे, विश्वनाथ काळे, विनोद सरोदे, भास्कर दाभाडे, भानुदास ईरतकर, सुमित मगरे आदिनी सह्या केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खुलताबादमध्ये सेनेचे‘ढोल बजाओ’ आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेस पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तत्काळ द्यावी, या मागणीसाठी मंगळवारी शिवसेनेच्या वतीने भारतीय स्टेट बँकेच्या शाखेसमोर ढोलनाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनचे नेतृत्व जिल्हाप्रमुख अंबादास दानवे व तालुकाप्रमुख राजू वरकड यांनी केले.
राज्यातील प्रत्येक तालुक्यातील कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी प्रत्येक तालुकानिहाय बँकेत, सोसायटीत व इतर प्रमुख ठिकाणी लावावी अशी मागणी शिवसेनेच्यावतीने ढोल बजाओ आंदोलन करून करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांची २००९ पासून संपूर्ण कर्जमाफ करण्याचे जाहीर केले. त्यानुसार विविध प्रकारचे शासन निर्णयदेखील प्रसिद्ध केले, मात्र अद्यापपर्यंत कोणत्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही. तरी शासनाने त्वरित कर्जमाफी करून कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी गावपातळीवरील मुख्य ठिकाणी प्रसिद्ध करावी या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बँक प्रशासन अधिकाऱ्यांना शिवसेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. बाबासाहेब बारगळ, प्रकाश जाधव, दत्ता मालोदे, गणेश अधाने, भूषण दीक्षित, नरेंद्रसिंग साळुंके, मनोहर लाळे, फकीरचंद काळे, किशोर कुकलारे आदी शेकडो शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाने पाठ फिरवल्याने दुबार पेरणीचे संकट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या धोक्यात आल्या आहेत. येत्या पाच ते सात दिवसांत पाऊस पडला नाही, तर जिल्ह्यातील पैठण, औरंगाबाद, फुलंब्री, गंगापूर तालुक्यांतील २१ हजार हेक्टरवर दुबार पेरणी करावी लागेल, अशी शक्यता कृषी विभागाने वर्तावली आहे.

पूर्वमोसमी पावसाने समाधानकारक हजेरी लावली, पण त्यानंतर पावसाने पाठ फिरविली आहे. जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद होती, मात्र पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेचे ढग दाटले आहेत. पावसाने दडी मारल्याने पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील चार तालुके हे दुबार पेरणीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहेत. येत्या पाच ते सात दिवसांत पाऊस पडला नाही, तर जिल्ह्यातील २१ हजार ८६० हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार अाहे.

औरंगाबाद जिल्ह्यात ७ लाख ३६ हजार हेक्टर सर्वसाधारण खरीप पेरणी क्षेत्र आहे. त्यापैकी ६ लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. जिल्ह्यांत ९० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे, पण पावसअभावी पिके धोक्यात आली आहेत. त्यांची वाढ खुंटल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पैठण, गंगापूर, औरंगाबाद व फुलंब्री तालुक्यांतील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे, अशी शक्यता कृषी खात्याने वर्तावली.

शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड
मागीलवर्षी प्रमाणे यंदाही पाऊस चांगला पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली. यासाठी बी- बियाणे, खते खरेदीसाठी पेरणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च त्यांना करावा लागला. मात्र, गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने केलेली मेहनत, पैसा, वेळ सर्व वाया जाण्याच्या मार्गावर असून पाऊस न पडल्यास दुबार पेरणी कशी करणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

दुबार पेरणीचे क्षेत्र
तालुका.........क्षेत्र
औरंगाबाद....२४१
फुलंब्री..........८०६
पैठण...........९७२६
गंगापूर........११०८७
एकूण..........२१८०७
(क्षेत्र हेक्टरमध्ये)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पितळखोऱ्याच्या कुंडात तरुण, तरुणीचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
जगप्रसिद्ध पितळखोरे लेणी परिसरातील कुंडामध्ये बुडून औरंगाबाद येथील महाविद्यालयीन तरुण व तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.

पावसाळ्यामुळे पितळखोरे लेणी परिसराला पर्यटक मोठ्या संख्येने भेट घेतात. औरंगाबाद येथील सिडको एन-८ येथील रहिवासी प्रमोद सिद्धार्थ शिंदे (वय २४) व सिडको एन-१ येथील साक्षी अपार्टमेंटमधील रहिवासी शलाका सुनील बिडवई (वय २२) हे मंगळवारी दुपारी मोपेडवरून (एमएच २९ के ४३६३) पितळखोरे लेणी परिसरात आले होते. लेणीच्या वरील भागात १५ ते २० फूट खोल शेवाळलेला कुंड आहे. या दोघांना कुंडाकडे जाताना काही पर्यटकांनी पाहिले होते, पण ते परत आले नाहीत. ही बाब दोनच्या सुमारास पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना पर्यटकांनी सांगितली. त्यानंतर कुंडाजवळ ते न दिसल्याने पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही माहिती कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यास कळवली. पोलिस निरीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शेख हमीद शेख चाँद, हेडकॉन्स्टेबल पंढरी इंगळे, सूर्यकांत भामरे, साईनाथ काळे, भरत कंचार यांनी तेथे धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक रहिवासी काकासाहेब अळीग, तोताराम अगिवाले यांच्या मदतीने सायंकाळी पाच वाजता दोघांचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढले. कन्नड ग्रामीण रुग्णालयात बुधवारी पोस्टमार्टेम करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादला विजेतेपद

$
0
0

औरंगाबादला विजेतेपद
लोगो - तलवारबाजी स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या मिनी राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत १२ वर्षांखालील गटात औरंगाबाद संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटाकाविले. या स्पर्धेत औरंगाबाद संघाने तीन सुवर्ण, एक रौप्य व तीन ब्राँझ अशी सात पदके जिंकली.
वैयक्तिक गटात रोहन शहा, कृष्णा मगर यांनी सुवर्णपदके पटाकावली. वरद सोनवणेने रौप्यपदक तर गार्गी डोंगरे, हर्षदा वंजारे, यशस्वी वंजारे, वैष्णवी धामणे यांनी ब्राँझपदक जिंकले. फॉइल सांघिक प्रकारात स्वराज डोंगरे, तेजस पाटील, रोहन शहा, ऋषभ मोरे यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. सेबर प्रकारात गार्गी डोंगरे, हर्षदा वंजारे, वैदेही खैरनार यांनी सांघिक गटात ब्राँझपदक निश्चित केले. या स्पर्धेत स्वानंद पवार, स्पर्श जाधव, यथार्थ थोरात, ओम वाघ, कणक पाटील, सई कुलकर्णी, अक्षदा भवरे, तनिष्क पगारे यांनी लक्षवेधक कामगिरी बजावली. या संघास संजय भुमकर, स्वप्नील तांगडे, सागर मगरे, अजय त्रिभुवन यांचे मार्गदर्शन लाभले. या कामगिरीबद्दल राज्य तलवावराजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, गणेश मोरे, क्रीडा उपसंचालक राजकुमार महादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, गोकुळ तांदळे, दिनेश वंजारे, एस. पी. जवळकर आदींनी पदक विजेत्यांचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद सर्वसाधारण विजेते

$
0
0

औरंगाबाद सर्वसाधारण विजेते
राज्य एरोबिक्स जिम्नॅस्टिक स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
परभणी येथे झालेल्या १८ व्या राज्यस्तरीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक स्पर्धेत औरंगाबादच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. औरंगाबाद संघाने ११ सुवर्ण, तीन रौप्य व एक ब्राँझ अशी पंधरा पदकांची कमाई केली.
वैयक्तिक पुरुष गटात औरंगाबादच्या गौरव जोगदंडने जालन्याच्या पुरुषार्थ घरजाळेला मागे टाकत सुवर्णपदक जिंकले. पुरुषार्थने रौप्यपदक, तर ठाण्याच्या सत्यजित पाटीलने ब्राँझपदक मिळवले. महिलांमध्ये औरंगाबादच्या स्वामिनी मंडलिकने जालन्याच्या शर्वरी लिमयेला मात दिली. स्वामिनीने सुवर्ण, तर शर्वरीने रौप्य व बीडच्या साक्षी लड्डाने ब्राँझपदकावर नाव कोरले. मिश्र दुहेरीत मयूर बोढारे व ईशा महाजन जोडीने सोनेरी यश मिळवले. सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघात औरंगाबादच्या धैर्यशील देशमुख, गौरव जोगदंड, सर्वेश भाले यांचा समावेश होता. विजेत्या खेळाडूंना राज्य जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष सुधाकर शेटे, सचिव डॉ. मकरंद जोशी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
अंतिम निकाल : ११ वर्षे मुले - १. विश्वेश पाठक (जालना), २. यशराज देशमुख (जळगाव), ३. विश्वेश जोशी (औरंगाबाद). मुली - १. राधा सोनी (जालना), २. शमिता चाटुफळे (औरंगाबाद), ३. कल्याणी कलंत्री (बीड). मिश्र गट - १. विश्वेश पाठक व राधा सोनी (जालना), २. शमिता चाटुफळे व अद्वैत वझे (औरंगाबाद), ३. पाणिनी दास व श्रावणी कदम (जळगाव). १४ वर्षे मुले - १. अथर्व नगरकर (औरंगाबाद), २. गीत लाड (जळगाव), ३. दिव्येश सोनार (धुळे). मुली - १. रिची भंडारी (औरंगाबाद), २. सिल्विया शाह (बीड), ३. वेदोसी वाणी (जळगाव). मिश्र गट - १. अथर्व नगरकर व संजना पाटील (औरंगाबाद), २. गीत लाड व अनुष्का जगताप (जळगाव), ३. दिव्येश सोनार व रागिणी चोपडे (धुळे). सांघिक (मुली) - १. संजना पाटील, अवनी पाठक, प्राजक्ता देशमुख (औरंगाबाद), २. वेदांती डांगे, सुहानी वैष्णव, रोशनी शेलार (अमरावती), ३. ईशा पिंपळकर, अविनाश महाजन, अनुष्का जगताप (जळगाव). १७ वर्षे : मुले - १. अमेय फडतरे (औरंगाबाद), २. संदेश चिंतलवाड (जालना), ३. भूषण देशमुख (जळगाव). मुली - १. ऐश्वर्या देशपांडे (औरंगाबाद), २. रिद्धी लाटे (पुणे), ३. मिताली गर्गे (बीड). मिश्र - १. अमेय फडतरे व ऐश्वर्या देशपांडे (औरंगाबाद), २. विनय हिमाने व सृष्टी पांडे (अमरावती), ३. संदीप पिसुळे व शुभांगी मिश्री (जालना). सांघिक - १. सुधान्न बोर्ड, अथर्व जोशी, श्रीपाद हराळ (औरंगाबाद), २. आकाश बगाटे, शुभम जाधव, माधव पांचाळ (नांदेड), ३. सानिका राहोते, सुखदा हंबर्डे, रश्मी गायकवाड (अमरावती).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘समृद्धी’मागे साडेसाती

$
0
0

‘समृद्धी’मागे साडेसाती
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुंबई-नागपूर या ७१० किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर कायम असून मनधरणी करण्यासाठी गेलेल्या तलाठ्यांना जिल्ह्यात अद्याप एकाही शेतकऱ्याने संमती दिली नाही. दरम्यान बुधवारी (१२ जुलै) २२ गावांती जमिनीचे दर जाहीर करण्यात येणार आहेत.

समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी तिन्ही तालुक्यांतील ६२ पैकी ४० गावांचे दर प्रशासनाने निश्चित केले आहेत. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून एकाही शेतकऱ्याने जमीन देण्यासाठी संमती दिलेली नाही. यामुळे तलाठ्यानंतर आता अधिकारी प्रत्येक गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. जमीन खरेदी व्यवहारासाठी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यासाठी प्रत्येकी एका तहसीलदार पदाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बुधवारी औरंगाबाद तालुक्यातील १३, गंगापूर तालुक्यातील १ आणि वैजापूर तालुक्यातील ८ गावांची दरनिश्चिती करण्यात येणार आहे. आतापर्यंत औरंगाबाद तालुक्यातील २३, गंगापूर १० आणि वैजापूर तालुक्यातील ७ गावांचे दर निश्चित करण्यात आले आहेत.


अडचणी सोडविणार
भूसंपादनाबाबत उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल म्हणाले, ‘दरनिश्चितीची बैठक बुधवारी होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना जमिनीच्या दराबाबत अडचणी असतील त्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यात येणार आहे.’

दर प्रती एकरी
- १९ ते ६० लाख औरंगाबाद तालुका
- १२ ते २५ लाख गंगापूर तालुका
- १३ ते २१ लाख वैजापूर तालुका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमरनाथ यात्रेवरील भ्याड हल्ल्याचा निषेध

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जम्मू आणि काश्मीर येथील अनंतनागमध्ये झालेल्या अमरनाथ यात्रेकरूंवरील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा शिवसेनेच्या वतीने मंगळवारी (११ जुलै) सायंकाळी गुलमंडी येथे अतिरेक्यांच्या पुतळयाला जोडे मारून व दहन करून निषेध करण्यात आला, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

अतिरेक्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या सात भाविकांना शिवसेनेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पाकिस्तान मुर्दाबाद, गर्व से कहो हम हिंदू है, वंदे मातरम आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. आंदोलनाला खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, पूर्व विधानसभा संघटक राजू वैद्य, उपमहापौर स्मिता घोगरे, नंदू घोडेले यांच्यासह महिला आघाडी, युवा सेना, भारतीय विद्यार्थी सेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

मेणबत्त्या पेटवल्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मंगळवारी (११ जुलै) क्रांतीचौकात मेणबत्त्या पेटवून व पुष्प अर्पण करून अमरनाथ यात्रेत दहशवाद्यांच्या हल्ल्यात झालेल्या मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मनसेचे बिपीन नाईक , संदीप कुलकर्णी , निनाद खोचे, लीला राजपूत , सपना ढगे, अनिता लोमटे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ आमदार विक्रम काळे यांच्या निवडीला आव्हान

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम वसंत काळे यांच्या निवडीला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या निवडणूक याचिकेत आ. काळे, निवडणूक आयोग व निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त यांना नोटीस बजाविण्याचे आदेश न्या. व्ही. के. जाधव यांनी दिले.

जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात विधान परिषद शिक्षक आमदार पदासाठी निवडणूक झाली होती. औरंगाबाद विभागातून विक्रम काळे विजयी झाले होते. त्यांच्या निवडीला संभाजी ब्रिगेड पुरस्कृत प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार संजय जगन्नाथराव जाधव यांनी खंडपीठात निवडणूक याचिकेद्वारे आव्हान दिले. आ. काळे यांनी निवडणूक अर्ज दाखल करताना खोटी माहिती सादर केली, नोटबंदी असताना निवडणुकीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला, त्याचा हिशेबही आयोगाकडे सादर केला नाही. निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर अवैध मतेही वैध ठरवून त्यांच्या बाजुने मोजली असा आक्षेप याचिकेत घेण्यात आला आहे. याचिकाकर्त्यातर्फे शंभुराजे देशमुख व रामराजे देशमुख यांनी युक्तीवाद केला. या याचिकेची सुनावणी दोन महिन्यांनी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ तीन लाख वीज मीटरची तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘वीज चोरी आणि गळती रोखण्यासाठी शहरातील तीन लाख वीज मीटरची तपासणी करण्याचा निर्णय महावितरणच्या वतीने घेण्यात आला आहे,’ अशी माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी मंगळवारी (११ जुलै) पत्रकार परिषदेत दिली.

औरंगाबाद-जालना परिमंडळात एक जुलैपासून वीज चोरी रोखण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. याबाबत माहिती देण्यासाठी गणेशकर यांनी पत्रकार परिषद घेतली. गणेशकर म्हणाले, ‘सिटी चौक, जसवंतपुरा, गणेश कॉलनी आणि रोशन गेट फिडरवरील १५३ ग्राहकांवर कारवाई केली. रिमोट वापरणे तसेच अन्य प्रकारच्या चोऱ्यांमधून चारशे किलोव्हॅट विजेचा अनधिकृत वापर झाल्याची नोंद आहे. आगामी काळात या फिडरची शंभर टक्के तपासणी करू. मार्च अखेरपर्यंत वीज थकबाकी ११० कोटी होती. चार महिन्यात ही थकबाकी १६० कोटीपर्यंत वाढली आहे. अशा थकबाकीदारांची वीज जोडणी तोडण्यात येईल. औरंगाबाद जालना येथे सात लाख ग्राहक असून, यात तीन लाख ग्राहकांचे वीज कनेक्शन तपासणी तसेच वीज चोरी करणाऱ्यांविरोधात कारवाई करू,’ असा इशारा गणेशकर यांनी दिला.

कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसुली
‘वाळूजच्या एका उपकेंद्रावर भेट दिली असता त्या ठिकाणी काही वीज ग्राहकांना जून २०१६पासून वीज बिल गेले नसल्याचे प्रकरण समोर आले. या प्रकरणात दोन वीज कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. अशी प्रकरणे समोर आल्यानंतर कामात कुचराई करणाऱ्या महावितरणाच्या कर्मचारी अभियंता यांच्यावर कारवाई करू. संबंधित भागातील वीज ग्राहकांकडे असलेल्या थकबाकीच्या एकूण रकमेच्या दहा टक्के रक्कम कर्मचारी अधिकारी यांच्या पगारातून वसूल करा,’ असा इशारा गणेशकर यांनी दिला.

रिडिंग घेणाऱ्या एजन्सी बंद?
गणेशकर म्हणाले, ‘वीज रिडिंग घेण्यासाठी नेमलेल्या एजन्सीकडून वेळेवर वीज बिलाचे रिडिंग न घेणे, रिडिंग चुकीचे पाठविणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. वारंवार सांगूनही एजन्सी चालकांमध्ये सुधारणा होत नाहीत. यामुळे अशा एजन्सी बंदक करून आयटीआय किंवा अन्य तांत्रिक महाविदयालयाच्या विद्यार्थ्यांकडून वीज मीटर रिडिंगचे काम करण्याचा विचार सुरू आहे. शेतकऱ्यांचे मोबाइल क्रमांक, आधार कार्ड त्यांच्या वीज खात्यांशी संलग्न केले आहेत. विविध योजनांसाठी त्यांचा उपयोग होईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ हवाई ब‌ीजारोपण; हवेतल्या गप्पा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वन सप्ताहात ठरविलेल्या वृक्षलागवडीच्या उद्दिष्टाची जिल्ह्यात वाट लागलेली असताना, आता हवाई बीजारोपणाची राणा भीमदेवी थाटात केलेली घोषणा फुसका बार ठरली आहे. आजवर एकाही ठिकाणी असे बीजारोपण न झाल्याने या केवळ हवेतल्या गप्पा असल्याचे सिद्ध झाले आहे.

वन क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी खुलताबाद, सातारा परिसरातील डोंगरदऱ्यात हेलिकॉप्टरद्वारे बीजारोपण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले. यासंदर्भात स्थानिक कार्यालयाकडून प्रस्ताव मागविले. मात्र, त्यावर अद्याप वरिष्ठ पातळीकडून हिरवा कंदील नाही. त्यामुळे हवाई बीजारोपणाला खीळ बसली आहे.

मराठवाड्यातील एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी केवळ साडेचार टक्के वनक्षेत्र असल्यामुळे त्या भागात पाणीटंचाई आणि अपुऱ्या पावसाच्या संकटाला तोंड द्यावे लागते. ही बाब लक्षात घेऊन वन क्षेत्र वाढविण्यासाठी हरित सेना उपक्रम हाती घेण्यात आला आहे. एक जुलै ते सात जुलै दरम्यानच्या वनमहोत्सवात विभागात अडीच कोटी रोप लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, या उद्दिष्टालाही जिल्ह्यात हरताळ फासण्यात आला. आता हवाई बीजारोपणाचे नियोजनही पुरते बारगळे आहे. याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवून सव्वा महिना झाला. मात्र, त्यावर काहीच हालचाली झाल्या नाहीत. वरिष्ठ कार्यालयाकडून अद्याप काहीही माहिती आलेली नाही, अशी माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली.

ज्या डोंगराळ भागात प्रत्यक्ष जाऊन वृक्षारोपण शक्य नाही, तेथे हेलिकॉप्टरद्वारे बीजारोपण करण्यात येणार आहे. वेरूळ, सातारा आदी परिसरात बीजारोपणाचे नियोजन आहे. यासंदर्भात वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. - प्रकाश महाजन, मुख्य वनसंरक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ई-लिलावामुळे पनवती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ई-लिलाव पद्धतीमुळे यंदाही ठेकेदारांनी वाळू लिलावाकडे पाठ फिरवली आहे. आतापर्यंत केवळ ९ पट्ट्यांचे लिलाव झाले असून, वाळू पट्ट्यातून मिळणाऱ्या महसूलाला जबर फटका बसण्याची चिन्हे आहेत.

वाळूपट्ट्यांच्या लिलावात ठेकेदारांकडून होणारी रिंग, नियमानुसार वाळू लिलावाची वाढणारी किंमत यामुळे सरकारला होणारा तोटा आदी प्रकार टाळण्यासाठी शासनाने वाळूपट्ट्यांसाठी ई-लिलाव पद्धत सुरू केली. ई-निविदा आणि ई लिलाव पद्धतीमुळे प्रतिसाद वाढण्याऐवजी कमी झाला. ठेकेदारांनी वाळूपट्ट्यांच्या लिलावाकडेच पाठ फिरवली. परिणामी गेल्या दोन-तीन वर्षांपासून जिल्ह्यातील वाळूपट्यांच्या लिलावाला प्रतिसाद मिळत नाही. केवळ ९ वाळूपट्टे गेले असतानाही शहरात्र मात्र राजरोसपणे वाळू वाहतूक सुरू आहे.

२०१६–१७ वर्षासाठी ४३ वाळूपट्टे जिल्हा प्रशासनाने लिलावासाठी ठेवले होते. पहिल्या लिलावात तीन-चार वाळूपट्ट्यांचा ठेका गेला. त्यानंतर किंमत कमी करून नव्याने वाळूपट्यांचा लिलाव करण्यात आला. यानंतरही ठेकेदार वाळूपट्टा घेण्यासाठी पुढे आले नाहीत. आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ नऊ वाळूपट्ट्यांचा ठेका गेला आहे. त्यातून केवळ ५५ लाख रुपयांचा महसूल प्रशासनाकडे जमा झाला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ठेकेदारांना मिळालेल्या मंजुरीनुसार वाळू उपसा करण्याची परवानगी दिलेली आहे. मात्र, ठेकेदाराने किती वाळू उपसा केला, याची तपासणीच दर आठवड्याला किंवा महिन्याला होत नाही. यामुळे नेमक्या कोणत्या पात्रातून किती उपसा होतो, याची माहिती प्रशासनाला मिळत नाही.

गेल्यावर्षी अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांनी अवैध वाळू वाहतूकदारांवर आळा घालण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. अवैध वाळू तसेच गौणखणिज उपसा व वाहतुकीच्या ६५०पेक्षा अधिक प्रकरणांमध्ये कारवाई होऊन कोट्यवधींची दंडवसूली करण्यात आली. याचा महसुली उत्पन्नावर परिणाम झाला होता. यंदा मोठ्या कारवाया नसल्याचा फटकाही महसुली उत्पन्नाला बसणार आहे. दरम्यान, शहरात होणारी अवैध वाळू वाहतूक तसेच जिल्ह्यातील वाळू ठेक्यातील उपशाबाबत अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांना विचारले असता त्यांनी केवळ माहिती घेऊन सांगतो, असे उत्तर दिले.

उपशाचा अहवाल नाही
आतापर्यंत जिल्हाप्रशासनाकडून करण्यात आलेल्या लिलावातून ९ ठेक्यांना प्रतिसाद मिळाला. यामध्ये पैठण तालुक्यातील मायगाव (१४१ ब्रास), वाघाडी (१४० ब्रास), फुलंब्रीतील शेवता खु. (१२७२ ब्रास), भालगाव (६४ ब्रास), कविटखेडा (१०६ ब्रास), वानेगाव खु. बु. (४२४ ब्रास), गंगापूर तालुक्यातील शिवना नदीवरील दिनवाडा (४५९ब्रास ), माळुंजा खु. (२५४ ब्रास) आणि सिल्लोड तालुक्यातील पूर्णा नदीवरील भवन वाळूपट्यातील ७९५ ब्रास वाळू उपश्याचा ठेका दिला आहे. यातून प्रत्यक्षात किती उपसा करण्यात येतो, याचा अहवाल प्रशासनाकडे नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ खासदार खैरेंची आचारसंहिता भंगातून मुक्तता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांना आचारसंहिता भंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. साबळे यांनी दिले.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी समर्थनगर येथील प्रचार कार्यालयावर मोठे बॅनर लावल्याचे आणि त्यावर स्वतःसह अन्य नेत्यांचे फोटो असल्याची तक्रार अण्णासाहेब खंदारे यांनी निवडणूक विभागाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक विभागाच्या फिरत्या पथकाने बॅनरची व्हिडिओ शुटींग करून आयोगाकडे सादर केली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार क्रांतीचौक पोलिस ठाण्यात खैरे यांच्या विरोधात कलम १८८ व मुंबई पोलिस कायदा १३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सुनावणीवेळी, खैरे यांच्या वतीने अॅड. के. जी. भोसले यांनी बाजू मांडली. बॅनरची प्रत्यक्ष साइज काय आहे, यांचा उल्लेख फिर्यादीमध्ये कुठेच नाही. त्यामुळे हा गुन्हा सिद्ध होऊ शकत नसल्यामुळे खैरे यांना निर्दोष मुक्त करावे, असा युक्तिवाद करण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून कोर्टाने खैरे यांना निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images