Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तरुणाई... लघुपट अन् स्वच्छता अभियान

$
0
0

तरुणाई... लघुपट अन् स्वच्छता अभियान
प्रदर्शनापूर्वीच ट्रेलरला मिळाले हजारो लाइक्स
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील तरुणाई सोशल मीडियाच्या सहाय्याने आजकाल सकारात्मक प्रयोग करू लागली आहे. यु ट्युबसाठी तरुणांनी एक लघुपट बनवला असून तो १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. त्याच्या ट्रेलरला प्रदर्शित २ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारावर लाइक्सही मिळाले आहेत.
सफाई कामगारांना कचरेवाले म्हणू नका, आदराने त्यांना दादा, काका, मामा असे संबोधा, आपण जर ठरवले तर बदल सहज घडू शकतो, असा साधा सरळ संदेश या लघुपटातून दिला जाणार आहे. हा लघुपट यु ट्युबवर १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर रिलीज होईल. भारत स्वच्छता अभियानावर आधारित ‘इज इट पॉसिबल???’ लघुपटाची शहरातील तरुणांनी निर्मिती केली आहे. लघुपटाची कथा विशाल ढेंबरे आणि सुरेश बोरूळकर यांनी लिहिली आहे. कॅमरामन म्हणून अमोल गायकवाड यांनी जबाबदारी सांभाळली असून हा लघुपट अर्जुन पवार यांच्या पवार स्टुडिओत बनवण्यात आला आहे. या लघुपटात आकाश गुरूभय्ये, अरमारन शहा, हुशारसिंग चव्हाण, किरण नाईक, शॅरोन रॉड्रिग्ज, जेनिफर रॉड्र‌िग्ज, आकाश बैनाडे, कपिल श‌िंदे, आदित्य घुसळे, आकाश ढेंबरे, प्रथमेश सोनवणे, राहुल बोरले, सौरभ नाईक, अमित सोनवणे, महेश पांचाळ यांची भूमिका आहे. दिग्दर्शन गौरव कुलकर्णी याचे आहे. या लघुपटाची निर्मितीची जबाबदारी अब्दुल फारूख शहा यांनी घेतली आहे. या लघुपटासाठी औरंगाबाद महापालिकेनेही विशेष सहकार्य केले आहे.
शहरवासियांना स्वच्छतेचे महत्त्व आम्ही या लघुपटातून पटवून दिले आहे. याच लघुपटाचा ट्रेलर आम्ही नुकताच यु ट्युबवर टाकला असून त्याला २ हजार व्ह्युज मिळाले आहे. यावरून त्याची लोकप्र‌ियता लक्षात येईल.
- गौरव कुलकर्णी, दिग्दर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जीएसटी’मुळे येणार व्यवहारात पारदर्शकता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘जीएसटीमुळे सर्व करांऐवजी अवघ्या एक कराच्या रुपात पारदर्शकता आणली जाणार आहे. यासाठी सर्वच क्षेत्रात आता बदल होतील,’ असे प्रतिपादन वस्तू व सेवा कर विभागाचे सहायक आयुक्त अशोक कुमार यांनी केले.
बांधकाम व्यावसायिकांच्या ‘क्रेडाई’ या संघटनेतर्फे हॉटेल रामा मध्ये आयोजित परिसंवादात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वस्तू व सेवा कर अधीक्षक आर. बी. गुप्ता, क्रेडाईचे अध्यक्ष रवी वट्टमवार, महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष राजेंद्रसिंग जबिंदा, सचिव आशुतोष नावंदर, सीए संकेत शाह (नाशिक), सीए असोस‌िएशनचे अध्यक्ष अल्केश रावका, सचिव पंकज सोनी, नरेंद्रसिंग जबिंदा यांची उपस्थिती होती.
यावेळी अशोक कुमार म्हणाले की, वस्तू व सेवा कर हा ‘एक देश एक कर’ या संकल्पनेवर आधारित आहे. या करात एक्साइज‌, व्हॅट, स‌र्व्हिस टॅक्स, सेंट्रल सर्व्हिस टॅक्स, कस्टम्स ड्युटी, आदी करांचे समायोजन करण्यात आले आहे. जीएसटीबद्दल मदत करण्यासाठी २४ तास ७ दिवस सुरू राहणारे मदत केंद्रातून शंका निराकरण केले जाणार आहे, असे ते म्हणाले. संकेत शहा यांनी राज्याचा जीएसटी, केंद्राचा जीएसटी आणि बांधकाम क्षेत्रासाठी असलेला जीएसटी याची माहिती दिली. कोणते रिटर्न भरावे, कशी खबरदारी घ्यायची, बांधकाम व्यावसायिकांचे जॉइंट व्हेंचर, रेव्हेन्यू शेअरिंग आदीसाठी कर आकारणी, जीएसटी सेट ऑफ कसा घ्यावा याची माहिती दिली.
यावेळी विकास चौधरी, रमेश नागपाल, संग्राम पटारे, नवनीत भारतिया, अनिल अग्रहारकर, प्रदीप मोटरवार, प्र‌ितेश धानुका, अभिजित कोडगिरवार, सिद्धार्थ कांकरिया आदींची उपस्थिती होती. यावेळी १५० हून अधिक बांधकाम व्यावसायिक, कर्मचारी, चार्टर्ड अकाउंटंट उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवासी जीपचालकाचा सिल्लोडजवळ खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
औरंगाबाद येथून प्रवासी घेऊन जळगावकडे जाणाऱ्या क्रुझर चालकाचा अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने वार करून खून केला. या घटनेमुळे सिल्लोड तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिस हल्लेखोराचा शोध घेत आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेख शकील शेख शब्बीर (वय ३४, रा. नारेगाव औरंगाबाद) हे क्रुझरचालक क्रुझरमध्ये (एम एच २० ई ई ३४८१) प्रवासी घेऊन गुरुवारी रात्री औरंगाबादहून जळगावकडे जात होते. यावेळी सिल्लोडपासून दहा किलोमीटर अंतरावरील पालोद येथील पेट्रोल पंपाच्या आवारात क्रुझरमधील प्रवाशांनी धारदार हत्याराने वार करून शकील यांना गंभीर जखमी केले व रस्त्याच्या पश्चिमेकडे खड्डयात फेकून क्रुझर घेऊन पळून गेले. गंभीर जखमी अवस्थेतील शकील यांनी क्रुझर मालक इम्रान खान यांना मोबाइलवरून संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर इम्रान खान हे सहकाऱ्यांसह पालोद येथे पोहचले. तिकडे जाताना त्यांनी ही माहिती पोलिसांना दिल्याने सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शंकर शिंदे यांनी कर्मचाऱ्यासह धाव घेतली. त्यांनी शकील यांना तातडीने सिल्लोड येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तपासून मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह घटनास्थळी भेट देऊन तपासाबद्दल सूचना दिल्या.
या प्रकरणी, सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात इम्रान खान यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तिंविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जीप सापडली
ही जीप जळगाव येथील नेहरू चौकात बेवारस अवस्थेत सापडली आहे. हे अज्ञात मारेकरी कोण, त्यांनी शकील यांची हत्या का केली याचा शोध पोलिस घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमसीआय’कडून घाटी हॉस्पिटलची तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या (एमसीआय) तीन सदस्यांच्या पथकाने शुक्रवारी (१४ जुलै) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (घाटी) तपासणी केली. ‘एमसीआय’च्या निकषांच्या पार्श्वभूमीवर पदवीस्तरावरील महाविद्यालयातील सर्व प्रकारच्या पायाभूत सोयी-सुविधांची पथकाने चाचपणी केली. तसेच पूर्वीच्या त्रुटींची पूर्तता झाली किंवा नाही, याचीही काटेकोर चाचपणी करण्यात आल्याचे समजते. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे व इतरांनी पथकाला इत्यंभूत माहिती दिली.
प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये दर पाच वर्षांनी ‘एमसीआय’कडून तपासणी होती. यापूर्वी ‘एमसीआय’कडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आगस्ट २०१२ मध्ये तपासणी झाली होती. त्यानंतर शुक्रवारी (१४ जुलै) ही तपासणी करण्यात आली. गोवाहाटी (आसाम) येथील डॉ. आर. के. बेका (अध्यक्ष) यांच्यासह बेल्लारी (कर्नाटक) येथील डॉ. के. लक्ष्मीनारायण व बडोदा (गुजरात) येथील डॉ. शिल्पा जैन या सदस्यांच्या पथकाने घाटीची दिवसभर पाहणी केली. बाह्यरुग्ण विभागासह (ओपीडी) ‘सर्जिकल बिल्डिंग’मधील अपघात विभाग, स्त्रीरोगविभाग, नेत्र विभाग, शल्यचिकित्साशास्त्र विभाग, भूलशास्त्र विभाग आदींसह ‘मेडिसिन बिल्डिंग’मधील औषधवैद्यकशास्त्र विभागाचीही पाहणी केली. प्रत्येक विभागामध्ये ‘एमसीआय’च्या निकषानुसार सोयी-सुविधा आहेत का, विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून महाविद्यालयात पायाभूत सुविधा आहेत का आदींचाही वेध घेण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षकांची शिरगणतीही झाली. पथकाने महाविद्यालयाची तपासणी करुन समाधान व्यक्त केल्याचेही सूत्रांनी सांगितले.

पूर्वीच्या त्रुटींची पूर्तता

मागच्या तपासणीमध्ये ‘एमसीआय’च्या पथकाने अद्ययावत ग्रंथालय, वसतिगृह, सेमिनार हॉल नसल्याच्या त्रुटी काढल्या होत्या. सुदैवाने बहुतेक त्रुटींची पूर्तता झाल्याचे समजते. अर्थात, ‘एमसीआय’ने काटेकोर तपासणी केल्यास अनेक बाबतीत त्रुटी निघू शकते, असेही समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पाणीपुरवठा विस्कळीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महावितरणने देखभाल दुरुस्तीसाठी शुक्रवारी १२ तासांचे शटडाऊन घेतल्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसांनी पुढे ढकलले आहे.

याबाबत माहिती देताना कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल म्हणाले, ‘पावसाळा सुरू झाल्यामुळे महावितरण व वीज मंडळाने पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेवर देखभाल दुरुस्तीसाठी आज सकाळी नऊपासून बारातासांचे शटडाऊन घेतले होते. या काळात महावितरणने छोटी मोठी कामे केली. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहागंज-जिन्सी येथील जलकुंभावरील ५०० मिलिमीटरचा मुख्य व्हॉल्व्ह दुरुस्त केला. ४५० मिलिमीटर व्यासाचे दोन मोठे व्हॉल्व्ह बदलले. सिडको एन ५, महावीर चौक, ढोरकीन, नक्षत्रवाडी, फारोळा येथेही दुरुस्तीची कामे केली. महावितरणचे शटडाऊन शुक्रवारी रात्री नऊ वाजता संपले. त्यानंतर जायकवाडीहून पाणीपुरवठा सुरू केला जाईल. शुक्रवारी शहराच्या ज्या भागात पाणीपुरवठा झाला नाही त्या भागात शनिवारी, तर शनिवारी ज्या भागात पाणीपुरवठा होईल त्या भागात रविवारी पाणीपुरवठा होणार आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सरकारी संस्थांच्या वादात जीव धोक्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उड्डाणपुलाखालून धोकादायक जड वाहतूक जाऊ नये, यासाठी उभी केलेली लोखंडी चौकट गुरुवारी रात्री एका वाहनाच्या धडकेत वाकली. हा पूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) उभारला आहे. मात्र परिसर महापालिकेच्या अखत्यारित आहेत. या चौकटीची दुरुस्ती करायची कुणी ? याबाबत दोन्ही यंत्रणा टोलवाटोलवी करत आहेत. दोन्ही यंत्रणांच्या वादात नागरिकांचा जीव मात्र धोक्यात आला आहे.

वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी एमएसआरडीसीने रस्ते एकात्मिक विकास योजनेतून जालना रस्त्यावर पाच उड्डाणपूल बांधले. क्रांतीचौक येथील उड्डाणपूल हा त्यापैकी एक. पाच वर्षांपूर्वी पुलाचे काम पूर्ण झाले. पुलाखालून जडवाहतूक जाऊन धोका उदभवू शकतो. हे टाळण्यासाठी चारही बाजूंनी विशिष्ट उंचीपर्यंतची लोखंडी कमान त्यावेळी उभारली. पूल बांधल्यानंतर नियमानुसार दोष निवारण कालावधी निश्चित केला जातो. त्यानुसार कंत्राटदारासाठी पूल आणि पुलाखालील परिसराचा कालावधी निश्चित होता. तो गेल्या महिन्यात संपला असे एमएसआरडीसीच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान गुरुवारी रात्री उस्मानपुऱ्याकडून येणाऱ्या रस्त्यावरील चौकटीला एक वाहन धडकले आणि ही लोखंडी जड चौकट वाकली. ती पडण्याचा धोका निर्माण झाला. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून रस्ता बंद केला. या चौकटीची दुरुस्ती कुणी करायची ? असा प्रश्न आता उभा राहिला आहे. पालिकेचे म्हणणे आहे की रस्ता व पूल अजूनही एमएसआरडीसीकडे आहे. तर एमएसआरडीसीचे अधिकारी म्हणतात की आम्ही रस्ता व पूल पालिकेकडे हस्तांतरित केला आहे. दोघांच्या वादात नागरिकांचा जीव मात्र धोक्यात सापडला आहे.

पूल आणि रस्त्याचा दोषनिवारण कालावधी होता. जून महिन्यात तो संपला. यासंदर्भातील कागदपत्रे पालिका प्रशासनाकडे सुपूर्द केली आहे. पुलाचे हस्तांतरण करण्याची कागदपत्रेही त्यात आहेत. परिणामी आता आमची जबाबदारी नाही. - उदय भरडे, कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी

उड्डाणपूल व त्याखालील रस्ता व जडवाहनांसाठीचे अडथळे अद्याप महापालिकेला हस्तांतरित करण्यात आलेले नाहीत. लेखी स्वरुपात यासंदर्भात कोणती कागदपत्रे उपलब्ध नाहीत. एमएसआरडीसीने हे हस्तांतरित केल्याचे दाखविले तर आम्ही तात्काळ काम करू. - सिकंदर अली, शहर अभियंता, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवतरुणचा खेळाडू हाच बहुमान

$
0
0

नवतरुणचा खेळाडू हाच बहुमान
ज्येष्ठ संघटक पुंडलिक शेजुळ यांची भावना
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एकेकाळी महाराष्ट्रात नवतरुण मित्र मंडळाच्या कबड्डी संघाने दबदबा निर्माण केला होता. या संघाचा खेळाडू असणेही त्या काळात मोठे प्रतिष्ठेचे होते. माझ्यासाठीही हा मोठा बहुमानच असल्याची भावना ज्येष्ठ कबड्डी संघटक पुंडलिक शेजुळ यांनी ‘मटा’शी संवाद साधताना व्यक्त केली.
वयाच्या ७७व्या वर्षी पुंडलिक शेजुळ यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेतर्फे बुवा साळवी कार्यकर्ता पुरस्कार शनिवारी (१५ जुलै) नाशिक येथे प्रदान करण्यात येणार आहे. त्यानिमित्त शेजुळ यांनी ‘मटा’शी संवाद साधला. पुंडलिक शेजुळ हे मुळचे सिल्लोड तालुक्यातील उपळी या गावचे. पाचवीपासूनचे शिक्षण घेण्यासाठी ते औरंगाबादला आले आणि एक दर्जेदार कबड्डीपटू म्हणून त्यांनी नावलौकिक प्राप्त केला. कबड्डी खेळाच्या जोरावर त्यांनी बँकेतही नोकरी मिळवली.
‘शिक्षणानिमित्त मी औरंगाबादेत आलो. तो १९५४ चा काळ होता. त्यावेळी हुतूतू हा खेळ खेळला जात असे. मीही हा खेळ खेळू लागलो. पुढे १९५७ मध्ये नवतरुण मंडळाची स्थापना झाली. औरंगपुरा भागातील जिल्हा परिषद मैदानावर मंडळाचे कार्य चालत असे. कन्हैय्यालाल सिद्ध, नाना बापट, मधू कदम, मधू बक्षी, दत्ता पाथ्रीकर, बाबुराव अतकरे, शंकर कोळी अशा अनेक दिग्गजांमुळे नवतरुण मंडळाचा दबदबा निर्माण झाला होता. तब्बल २५ वर्षे मंडळातर्फे कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या काळात मंडळाचे खेळाडू हे राज्यात गाजत होते. तसेच पुंडलिक चौधरी, भाऊ परळकर, रामभाऊ गावंडे, मुरलीधर टाकळकर, सहस्त्रबुद्धे, सोहनी, भोंडे असे अनेक खेळाडू शहरात कबड्डी मैदान गाजवीत होते. त्यांच्या सान्निध्यात मी देखिल घडलो. त्या काळात नवतरुण मंडळाचा खेळाडू हे मोठे अभिमानाची गोष्ट होती. आजही मला तेवढाच बहुमान वाटतो, असे शेजुळ यांनी सांगितले.
शंकरबुवा साळवी यांच्या उपस्थितीतच १९५७ मध्ये औरंगाबादेत कबड्डी संघटनेची स्थापना झाली. त्यानंतर कबड्डीचे नियम तयार करण्यात आले आणि हुतूतू ऐवजी कबड्डी असे नामकरण झाले. त्याकाळी एकनाथ मंदिरशेजारी मैदान होते. या मैदानावर स्नेहविकास मंडळाचे खेळाडू खेळत. नवतरुण मंडळ, मित्र साधना आणि स्नेहविकास मंडळात मोठी चुरस असायची. नाना बापट आणि कन्हैय्यालाल सिद्ध यांच्या मार्गदर्शनाखाली नवतरुण मंडळाची भक्कम बांधणी झाली. नाना बापट हे अतिशय शिस्तप्रिय होते. कन्हैय्यालाल सिद्ध हे कुस्तीपटू. त्यामुळे कन्हैय्यालाल हे कबड्डीपटूंना ताकदीचे कौशल्य शिकवायचे, तर नाना बापट हे तंत्रशुद्ध कौशल्यावर भर देत. कबड्डीचे वातावरण अतिशय चांगले होते. स्पर्धात्मक वातावरणही चांगले असल्याने त्या काळात अनेक उत्कृष्ट कबड्डीपटू घडले. खेळाडूही प्रचंड मेहनत घेत असायचे. प्रत्यक्ष सरावाला प्रारंभ करण्यापूर्वी मैदानाला दहा फेऱ्या माराव्या लागत. त्यानंतर २५ बैठका, त्यानंतर २५ सूर्यनमस्कार घातल्यानंतरच सराव सुरू व्हायचा. दोन-दोन तास घाम गाळत खेळाडू मैदानावर स्वतःला झोकून देत असायचे. आजचा काळ बदलला आहे. आम्ही जेव्हा कबड्डी खेळायचो, त्याकाळी टीव्ही नव्हता. करमणुकीचे दुसरे साधन नव्हते. टीव्ही आणि क्रिकेटच्या लोकप्रियतेनंतर कबड्डीच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. आता काळ पुन्हा बदलला आहे. प्रो-कबड्डीमुळे आता पुन्हा कबड्डीला चांगले दिवस आले आहेत. आमच्या पिढीला नवीन पिढी घडवता आली नाही, याची मोठी खंत वाटते. आता पुन्हा एकदा नवतरुण मंडळाने भरारी घ्यावी, अशी अपेक्षा शेजुळ यांनी व्यक्त केली.
कबड्डी महर्षी शंकरबुवा साळवी यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या बुवा साळवी कबड्डी कार्यकर्ता पुरस्कारासाठी माझी निवड झाली हा माझा मोठा सन्मानच आहे, असे शेजुळ म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य स्क्वॉश स्पर्धा आजपासून रंगणार

$
0
0

राज्य स्क्वॉश स्पर्धा आजपासून रंगणार
पाचशे खेळाडूंचा सहभाग
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र राज्य स्क्वॉश रॅकेट संघटना व औरंगाबाद जिल्हा स्क्वॉश रॅकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय स्क्वॉश स्पर्धेला शनिवारी (१५ जुलै) प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत विविद वयोगटांत राज्यभरातून पाचशेपेक्षा अधिक खेळाडूंची नोंदणी झाली आहे. या स्पर्धेसाठी औरंगाबादचा संघ शुक्रवारी जाहीर करण्यात आला.
विभागीय क्रीडा संकुलातील स्क्वॉश कोर्टवर ही स्पर्धा रंगणार आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. या प्रसंगी राज्य स्क्वॉश संघटनेचे सरचिटणीस डॉ. दयानंद कुमार, अध्यक्ष डॉ. प्रदीप खांड्रे, औरंगाबाद जिल्हा स्क्वॉश संघटनेचे सचिव रणजित भारद्वाज, क्रीडा उपसंचालक राजकुमार महादावाड, चंद्रशेखर घुगे, डॉ. रोडगे यांची प्रमुख उपस्थिती राहाणार आहे. ही स्पर्धा १४ वर्षे, १७ वर्षे, १९ वर्षे वयोगट मुले-मुली व खुला गट अशा विविध गटांत होणार आहे. या स्पर्धेत मुंबई, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नंदूरबार, जळगाव, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर अशा २५ जिल्ह्यांमधून खेळाडू सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेत पंच प्रमुख दीपक भारद्वाज, रोहित गाडेकर हे काम पाहाणार आहेत. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी दीपक बिरारे, अकीब सिद्दीकी, सोहेल खान, किशोर हिवराळे, आनंद लाहोटी, शैलेश खांड्रे, शेख उमेर, राजकुमार गारोल आदींनी पुढाकार घेतला आहे.

औरंगाबाद संघ : १४ वर्षे वयोगट मुले : जीत जैन, ओम करवा, आदित्य गोडबोले, अंगद सोधी, सोहम घुगे, मुली : राजनंदिनी पवार, रूद्राणी काळे, इंद्रायणी काळे. १७ वर्षांखालील मुले : ईशान महाजन, गौतम पांधी, शिवम राजपूत, पार्थ छाजेड, चिन्मय तारगे, मुली - अलोकी बोबडे, स्नेहा जैस्वाल, हर्षदा हंबीर, पौर्णिमा गायकवाड. खुला गट : जयेश खडकीकर, हर्ष बाहेती, नागराव वाहोडे, सौरभ राठोड, रिना कराळे, कविता क्षीरसागर, किरण भुसारे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबादच्या २७ खेळाडूंची निवड

$
0
0

औरंगाबादच्या २७ खेळाडूंची निवड
राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बंगळुरू येथे १५ ते १९ जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या १४व्या राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेसाठी औरंगाबादच्या २७ खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.
परभणी येथे झालेल्या स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी १३ सुवर्ण, २ रौप्य व एक ब्राँझ अशी सोळा पदकांची कमाई केली. या स्पर्धेतील कामगिरीमुळे औरंगाबादच्या २७ खेळाडूंना राज्य संघात स्थान मिळाले. त्यात गौरव जोगदंड, स्वामिनी मंडलिक, ईशा महाजन, मयूर बोढारे, धैर्यशील देशमुख, सर्वेश भाले, ऋग्वेद जोशी, संदीप उंटवाल, रजत मेघावाले, अनिकेत चौधरी, अमेय पदातुरे, ऐश्वर्या देशपांडे, अथर्व जोशी, श्रीपाद हराळ, सुधन्वा बोर्डे, अथर्व नगरकर, रिची भंडारी, संजना पाटील, अवनी पाठक, प्राजक्ता देशपांडे, विश्वेश जोशी, शमिता चाटुफळे, अद्वैत वझे या खेळाडूंचा समावेश आहे. हे खेळाडू वरिष्ठ गट, कनिष्ठ गट व बालगटात सहभागी होतील.
औरंगाबादसह विश्वेश पाठक, राधा सोनी, संदेश चिंतलवाड, पुरुषार्थ गर्जले, शर्वरी लिमये, सोमाजी बालुरे, अविनाश कोळेश्वर, तेजस पळसकर (जालना), सिल्वी शहा (बीड), यशराज देशमुख, गीता लाड, अनुष्का जगताप (जळगाव), वेदांती डांगे, प्राजक्ता देशपांडे, रोशनी शेलार, विनय हिमाने, श्रुती पांडे (अमरावती), आकाश बगाटे, शुभम जाधव, माधव पांचाळ (नांदेड), रिद्धी लेले (पुणे) या अन्य जिल्ह्यातील खेळाडूंचा राज्य संघात समावेश आहे. या संघासमवेत प्रशिक्षक म्हणून हर्षल मोगरे, राहुल श्रीरामवार हे जाणार आहे. पंच म्हणून विवेक देशपांडे, सिद्धार्थ कदम, अमेय जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख म्हणून डॉ. मकरंद जोशी यांची नियुक्ती झाली आहे. या निवडीबद्दल मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष राम पातुरकर, सचिव हेमंत पातुरकर, उपाध्यक्ष मोहन डोईबळे, जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष अॅड. संकर्षण जोशी, सचिव सागर कुलकर्णी, साईचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, अजितसिंग राठोड, रामकृष्ण लोखंडे, क्रीडा उपसंचालक राजकुमार महादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, तनुजा गाढवे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ५०० कोटींची संपत्ती जाळ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘विभागात वर्षभरात आयकर दात्यांची संख्या तब्बल सव्वालाखाने वाढली असून, सुमारे ५०० कोटींची अघोषित संपत्ती प्रकाशात आली,’ अशी माहिती औरंगाबाद विभागाचे प्रधान आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव यांनी शुक्रवारी (१४ जुलै) दिली.

आयकर विभागाच्या छावणी येथील मुख्य कार्यालयात त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. अतिरिक्त आयकर आयुक्त संजय देशमुख, संदीपकुमार साळुंखे, विश्वास मुंडे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी श्रीवास्तव म्हणाले, ‘आय घोषणा योजनेअंतर्गत (आयडीएस) विभागात पाचशे कोटींची अघोषित संपत्ती नागरिकांनी घोषित केली. मार्च ते सप्टेंबर २०१६ दरम्यान ही योजना राबविण्यात आली. या संपत्तीवर सप्टेंबर १७ पर्यंत पन्नास टक्के कर आकारण्यात येत असून ३० टक्के भरणा प्राप्त झाला आहे. उर्वरित प्रक्रिया सुरू आहे.

अघोषित संपत्तीचा शोध घेण्यासाठी २०१६-१७ या आर्थिक वर्षात विविध १४८ ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून सुमारे १४५ कोटी रुपयांची अघोषित संपत्ती प्रकाशात आली. तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत सुमारे ४९ कोटींची अघोषित संपत्ती शोधण्यात यश आले,’ अशी माहिती श्रीवास्तव यांनी दिली.

‘आर्थिक वर्ष २०१६-१७मध्ये विभागाला ९९२ कोटी कर संकलनाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेत केलेल्या कामामुळे सुमारे एक हजार १०० कोटी रुपयांचे कर संकलन झाले असून, एक उच्चांक प्रस्थापित झाला आहे. २०१७ च्या पहिल्या तिमाहित (जून १७ अखेर) मागील वर्षाच्या पहिल्या तिमाहीपेक्षा २० कोटी रुपयांनी अधिक कर संकलन झाले. यंदा एक हजार १०० कोटी रुपये कर संकलन झाले. तर १६-१७मध्ये मागील वर्षाच्या तुलनेते सव्वा लाखांनी करदात्यांची संख्या वाढली. आता विभागात एकूण तीन लाख ५५ हजार करदाते आहेत. तर नोटबंदीच्या काळात एका फर्म विरोधात फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल असून प्रकरण कोर्टात आहे,’ असे श्रीवास्तव म्हणाले.

अघोषित संपत्ती शोधण्यासाठी आयकर विभाग पुन्हा नव्याने जोरदार मोहीम हाती घेणार आहे. ऑगस्टपासून प्रत्यक्ष सर्व्हेक्षणाचे काम हाती घेण्यात येणार असून, रडारवर प्रामुख्याने कोणते क्षेत्र हे सांगण्यास अधिकाऱ्यांनी मात्र नकार दिला. जीएसटी करप्रणालीमुळे आयकर विभागास मोठी मदत मिळेल. - शिवदयाल श्रीवास्तव, प्रधान आयुक्त, आयकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘समृद्धी’विरोधात धग कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुंबई-नागपूर या ७१० किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर कायम असून पहिल्या टप्प्यात दर निश्चिती झालेल्या एकाही गावामधून शेतकऱ्यांनी संमती दिली नाही. मात्र, जिल्ह्यात ९५ टक्के शेतकरी जमीन देण्यास तयार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी तिन्ही तालुक्यांतील ६२ पैकी ५९ गावांचे दर प्रशासनाने निश्चित केले. पहिल्या टप्प्यात ३० जून रोजी ४० तर दुसऱ्या टप्प्यात १२ जुलै रोजी १९ गावांची दर जाहीर करण्यात आल. मात्र, पहिल्या टप्प्यात दर निश्चिती होऊन पंधरा दिवस झाले असून, अद्याप एकाही शेतकऱ्याने जमीन देण्यासाठी संमती दिली नाही. दरम्यानच्या काळामध्ये जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांची मनधरणी करण्यासाठी तलाठी व त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनीही प्रयत्न केले. तरीही शेतकऱ्यांनी संमती दिली नाही. दर निश्चितीनंतरही शेतकऱ्यांकडून समृद्धी महामार्गाला तीव्र विरोध सुरू असून वैजापूर तालुक्यात जमीन देण्याविरोधात शेतकऱ्यांनी उपोषण करून शुक्रवारी आंदोलन केले, अशी स्थिती असतानाही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी महामार्गाला ९५ टक्के शेतकऱ्यांची संमती असल्याचे सांगितले. मात्र, किती लोकांनी लेखी संमती दिली असे विचारले असता लेखी संमती नसल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक रद्द
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी बाधित शेतकऱ्यांची खासदार शरद पवार व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कानगो यांच्यासोबत शुक्रवारी (१४ जुलै) मुंबईत आयोजित केलेली बैठक अचानक रद्द केली. त्याचा समृद्धी महामार्ग विरोधी कृती समिती, भाकप, किसानसभेने निषेध केला. तसेच वैजापूर तहसील कार्यालयात घुसून तालुक्यातील १५ गावांमधील सुमारे २०० बाधित शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाविरोधात जोरदार निदर्शने केली. तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

आठवड्यात निर्धार मेळावा
आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या आठवड्यात औरंगाबादेत निर्धार मेळाव्याचेही आयोजन करण्यात येणार आहे. तिन्ही तालुक्यातील कृतीसमितीच्या कार्यकर्त्यांशी विचार विनिमय सुरू असून त्यासाठी पुन्हा सर्व ६२ बाधित गावात निर्धार फेरी काढण्यात येणार आहे. पुढील मागण्यांसाठी लढा पेटवला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन तालुक्यात ३१ टँकर सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महिन्याभरापासून मराठवाड्यासह औरंगाबाद जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे औरंगाबाद तालुक्यात २४, तर वैजापूर तालुक्यात सात टँकर सुरू करण्यात आले आहेत.

पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे जिल्हा प्रशासनाने औरंगाबाद, वैजापूर, सिल्लोड, कन्नड तसेच गंगापूर तालुक्यांमध्ये टँकर सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यामध्ये स्थळ पाहणी करून हे टँकर सुरू करण्यात आले.

गंगापूर तालक्यात ४४, सिल्लोड १३ तर कन्नड तालुक्यांमध्ये ६ टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात जून महिन्यामध्ये केवळ ११ दिवस पाऊस झाला असून, १९ दिवस पावसाचा खंड पडला. निम्मा जुलै महिना कोरडा गेला. यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत उर्वरित तालुक्यांमध्येही स्थळ पाहणी तसेच पाण्याची गरज पाहून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी मंजुरी मिळण्याचे संकेत जिल्हाप्रशासनाने दिले आहेत.

दमदार पावसाची प्रतीक्षा
गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडलेल्या हलक्या सरीमुळे खरीप पिकांची दुबार पेरणी काही दिवस निश्चितच लांबणीवर पडली आहे. मात्र, उत्पादनात ५ ते २५ टक्क्यांपर्यंत घट होईल, अशी शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली होती आता पाण्यामुळे पीक वाढीस लागतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. सद्यस्थितीत मका, बाजरी, मूग आदी पिकांच्या उत्पादनात सरासरी १५ ते २५ टक्के घट झाली असून सोयाबीन, उडीदच्या उत्पादनात सुमारे १० तसेच कापूस, तूर आदींच्या उत्पादनात सुमारे ५ टक्क्याहून अधिक घट झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ कर्जमाफी शिवाय अधिवेशन चालू देणार नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘शेतकऱ्यांचे कर्जमाफ झाल्यासंबंधीची फडणवीस सरकारने केलेली घोषणा फसवी आहे. सर्वसामान्य शेतकरी अजूनही अडचणीत व संभ्रमात आहे. त्याचा जाब २४ जुलैपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आम्ही विचारणारच आहोत. परंतु योग्य पद्धतीने कर्जमाफी झाली नाही तर अधिवेशन चालू देणार नाही,’ असा इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी दिला.

कर्जमाफीसाठी काँग्रेसने राज्यव्यापी अभियान सुरू केले असून, या अभियानाची सुरुवात सातारा येथून शुक्रवारी करण्यात आली. ‘कोणत्या शेतकऱ्याकडे किती कर्ज आहे, त्याची जमीन बागायती आहे की, जिरायती ?’ याबाबतची माहिती या फॉर्ममध्ये असेल. त्यापूर्वी १० लाख रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या सातारा तांडा येथील एका तलावातील पाणी दुसऱ्या तलावात आणण्यासाठीच्या जलवाहिनी कामाचे भूमिपूजन आमदार सत्तार यांच्या हस्ते झाले. याठिकाणी वृक्षारोपणही करण्यात आले.

सत्तार म्हणाले, शेतकऱ्यांकडे लाखो रुपये कर्ज असून, एक, दोन असे पाच लाखांपर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांकडे आहे. या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्याची फसवी घोषणा सरकारने केली आहे. याचा जाब अधिवेशनात सरकारला विचारणार आहोत. त्या आधी काँग्रेस पक्षाच्या वतीने गावागावात जाऊन शेतकऱ्याकडे कर्ज किती आहे, जमीन किती आहे, ती बागायत आहे की जिरायत आहे. ही माहिती एका फार्म भरून एक कापी तहसीलदार व एक मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना याचा फायदा मिळावा, अशी २०१४ पासून काँग्रेसची मागणी असून, यासाठी नागपूर, मुंबईला मोर्चे काढले. सातत्याने प्रत्येक अधिवेशनात यासंबंधी आवाज उठवण्यात येत आहे. महिना, महिना अधिवेशनही बंद पाडल्याचे ते म्हणाले. यावेळी आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, नामदेव पवार, केशवराव तायडे, सरोज मसलगे, नगरसेवक सायली जमादार, फिरोज पटेल, आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसची निवडणूक तयारी सुरू

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पराभवाची मालिका सुरूच असलेल्या काँग्रेसने आता नव्याने जोमाने २०१९ च्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर सरकारला घेरण्यासाठी राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम म्हणजे निवडणुकीची तयारी मानली जात आहे. जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांचे कमबॅक हे त्याचेच एक पाऊल असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचे निकटवर्तीय असलेल्या आमदार सत्तार यांना दीड वर्षांपूर्वी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका निवडणुका झाल्या. या निवडणुकीत वरिष्ठांकडून सभा आणि रसदच्या बाबतीत दुर्लक्ष झाल्याचा जाहीर आरोप करत सत्तारांनी जिल्हाध्यक्षपदाचा त्याग केला होता. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे त्यातून मार्ग काढतील अशी काँग्रेसजनांमध्ये चर्चा होती, पण काही महिन्यातच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होत्या. त्या पार्श्वभूमीवर ही जबाबदारी नवीन पदाधिकाऱ्यावर सोपविण्याऐवजी शहराध्यक्ष नामदेव पवार यांच्याकडे कार्यभार सोपविला होता. झेडपी निवडणूक प्रचारासाठी तीन माजी मुख्यमंत्री जिल्ह्यात आले, पण त्यांनी सत्तारांचे कार्यक्षेत सोडून अन्यत्र प्रचार सभा घेतल्या. त्यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळले होते. दरम्यान, शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्षयात्रेची जबाबदारी पुन्हा आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे दिली गेली आणि तेव्हापासून दुरावा संपल्याची चर्चा सुरू झाली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि आमदार सत्तार यांची विदर्भात भेट झाली. तिथे पुढची रणनीती ठरवून घेतली गेली आणि त्यानुसार सत्तारांनी पुन्हा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर काँग्रेसने दोन दिवसांपूर्वी बुलडाणा येथून राज्यव्यापी आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांना भेटून त्यांच्याकडून अर्ज भरून घेतले जात आहेत. राज्यभर ही मोहीम राबवून पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर अहवाल दिला जाणार आहे. या मोहिमेच्या निमित्ताने काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे मानले जात आहे.

ग्रामीण भागातून सुरुवात
गेल्या काही महिन्यांत मराठवाडा, विदर्भात राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांचे दौरे वाढले होते. तुलनेत काँग्रेस मागे पडल्याची टीका होत होती. आता मात्र काँग्रेसने थेट ग्रामीण भागातून सुरुवात केल्याने निवडणुकीला सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. त्यात आमदार अब्दुल सत्तार यांचे कमबॅक हे जिल्ह्यातील काँग्रेसला वरदान ठरणार की नाही ? हे आगामी काळच दाखवून देणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ शिक्षिकेकडून उकळली दहा लाखांची खंडणी

$
0
0

औरंगाबाद : शिक्षिकेशी झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत नाशिकच्या तरुणाने ब्लॅकमेल करीत दहा हजारांची खंडणी उकळली. गेल्या चार वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी शिक्षिकेने अखेर गुरुवारी सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा परिसरात एक चाळीस वर्षाची शिक्षिका कुटुंबासह राहते. चार वर्षांपूर्वी या शिक्षिकेच्या मोबाइलवर अनोळखी व्यक्तीचा मिस कॉल आला. त्यामुळे त्यांच्यात वारंवार संभाषण होऊन ओळख वाढली. समोरील तरुणाने आपले नाव पंकज उर्फ विक्रम आशिष जाधव (रा. माणिकनगर, गंगापूर रोड, नाशिक) असे सांगितले. या ओळखीतून आरोपी जाधवने भावाच्या लग्नासाठी या महिलेकडून सुरुवातीला चार लाख साठ हजार रुपये चेकद्वारे उसने घेतले. या दोघांची ओळख वाढल्याने आरोपी जाधवने शिक्षिकेशी लगट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महिलेने त्याला बोलणे टाळणे सुरू केले. यावेळी शिक्षिकेला शिवीगाळ करीत धमकावत त्याने पन्नास हजार, एक लाख असे एकूण दहा लाख रुपये उकळले. शिक्षिकेने आरोपीला पैशाची परत मागणी केली असता त्याने आणखी दोन लाखांची मागणी केली. अन्यथा तिला व तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकाराला कंटाळून शिक्षिकेने गुरुवारी सातारा पोलिस ठाणे गाठून आरोपी पंकज उर्फ विक्रम जाधवविरुद्ध खंडणी, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ भोकरदन पालिकेकडून राजशिष्टाचारला तिलांजली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
राज्य सरकारने निर्धारित केलेला राजशिष्टाचार पायदळी तुडवत भोकरदन नगर परिषदेच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाचा उदघाटन कार्यक्रमास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षीय मेळाव्याचे स्वरूपात झाला. विशेष म्हणजे या समारंभात भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना काढलेल्या चिमटे आणि कोपरखळ्या सगळ्यांनीच ऐकून घेतल्या.
भोकरदन नगर परिषद काँग्रेसच्या ताब्यात आहे. याठिकाणी काँग्रेसचे दहा, राष्ट्रवादीचे तीन तर भाजपचे चार नगरसेवक आहेत. नगराध्यक्षा मंजुषा राजेंद्र देशमुख या काँग्रेसच्या असून त्यांचे पती माजी नगराध्यक्ष राजेंद्र देशमुख हे पालिकेत स्वीकृत सदस्य आहेत. तेच या पालिकेचा दैनंदिन कारभार चालवतात. शहरातील सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाच्या ४.६० लक्ष घनमीटर क्षमतेचे जलकुंभ आणि जलवाहिनी तसेच वितरण व्यवस्था पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन शनिवारी (८ जुलै) झाले. या भूमीपूजन समारंभाच्या अध्यक्षस्थानी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून खासदार रावसाहेब दानवे, राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेश टोपे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया,राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे, काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र देशमुख व भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांना निमंत्रित करण्यात आले होते.
राज्यातील सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाची योजना मंजूर करून त्याला निधी उपलब्ध करून देणारे या संपूर्ण योजनेचे राज्यातील पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे प्रमुख आणि जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर तसेच शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना या भूमीपूजन समारंभाच्या कार्यक्रमातून चक्क बाजूला सारण्यात आले. विशेष म्हणजे सध्या एका कथित वादग्रस्त विधानावरून अडचणीत आलेले आमदार अब्दुल सत्तार हे खासदार दानवे उद्घाटक आहेत व ते कार्यक्रमाच्या स्थळी उपस्थित आहेत असे समजताच सत्तार यांनी त्यांचा बेत बदलला. फोनवर राजेंद्र देशमुख यांना शुभेच्छा देऊन गैरहजर राहणे पसंत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. वस्तुस्थिती नुसार आमदार सत्तार हे सिल्लोडचे आमदार असताना ते भोकरदन पालिकेच्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कसे निमंत्रित केले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री लोणीकर यांना डावलून ऐनवेळी परतूरचे माजी आमदार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांच्या अध्यक्षतेखाली खासदार दानवे यांनी या योजनेचे भूमीपूजन केले.
आम्ही गेल्या पंचवीस वर्षे विरोधी पक्षात राहून राजकारणात टिकलो वाढलो आणि आता दोन-तीन वर्षातच तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते असे का काळवंडे आहेत ? सत्तेची ऊब जरा कमी झाली की अस्वस्थ झाले आहेत असे म्हणत खासदार दानवे यांनी राजकारणात सगळ्यांना कसे हाताळावे याचा एक तासाचा शिक्षकी पाठ घेतला. आपल्याला भोकरदन शहरातील मतदान होत नसले तरी आपण या गावात राहतो म्हणून विकासाच्या योजनांना निधी कमी पडू दिला जाणार नाही असे ते म्हणाले.

नव्या प्रशासकीय संकटाला निमंत्रण
कार्यक्रमास आमदार राजेश टोपे आणि माजी आमदार चंद्रकांत दानवे उपस्थित नव्हते. शिवसेनेचा एकही नगरसेवक पालिकेत नसल्याने शिवसेनेच्या नेत्यांना कार्यक्रमास बोलवण्याचा कुठलाही प्रश्न उभा राहत नाही असे या कार्यक्रमाचे संयोजक राजेंद्र देशमुख यांच्यावतीने सांगण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री पाणीपुरवठा योजना मंजूर करणारे लोणीकर यांना डावलून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जेथलिया यांच्या अध्यक्षतेखाली भूमीपूजन समारंभ घडवून देशमुख यांनी नव्या प्रशासकीय संकटाला निमंत्रण दिले असल्याचे भोकरदनमध्ये बोलले जात आहे. यासंदर्भात नगराध्यक्षा मंजुषा देशमुख यांच्या समोरच्या अडचणी वाढल्या आहेत.



भोकरदन नगर परिषदेच्या या भूमीपूजन समारंभाच्या निमित्ताने शासकीय शिष्टाचाराचे निश्चितच उल्लंघन झाले आहे. यासंदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंगटे यांना खुलासा मागण्यात आला असून तो समाधानकारक नसल्यास त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई होऊ शकते.
शिवाजीराव जोंधळे, जिल्हाधिकारी, जालना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ घोटाळ्याचे पैसे इतर कंपन्यांमध्ये हलविण्याचा घाट

$
0
0

परभणी- उद्योजक रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगरकडून तब्बल ३७८ कोटी रुपयांचा शेतकरी कर्ज घोटाळा झाला असून या प्रकरणी गुन्हे दाखल होऊनही त्यांना जाणीवपुर्वक अटक होत नाही. ते सत्ताधारी पक्षातील असल्याने त्यांना अटक करू नये यासाठी थेट मुख्यमंत्री कार्यालयातून पोलिसांना फोन आल्याचा आरोप आमदार मधुसुदन केंद्रे यांनी केला आहे. शिवाय गुट्टे यांच्याकडून घोटाळ्यातील पैसे त्यांनी स्थापन केलेल्या हाँगकाँग लिमिटेड कंपन्यांमध्ये वळविल्या जात असल्याचेही केंद्रे म्हणाले.
येथील सावली विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत केंद्रे बोलत होते. राज्यातील सुमारे ६ राष्ट्रीय बँकांमध्ये तब्बल १५ हजार शेतकयांचे नावे ३७८ कोटींचे कर्ज परस्पर उचलल्याचा आरोप गंगाखेड शुगरचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांच्यावर आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. शिवाय एका शेतकयाच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलिसात गुन्हा देखील झाला आहे. या संबंधी उच्च न्यायालयाने आर्थिक गुन्हा शाखेला २४ जुलैपर्यंत चौकशी अहवाल देण्याचे आदेश दिले आहे. मात्र, या कालावधीत गुट्टे यांच्याकडून बँकेचे अधिकारी दबाव आणण्याचा आरोप पत्रकार परिषदेत आमदार केंद्रे यांनी केला आहे.

ईडी मार्फत चौकशी करा
गुट्टे हे सत्ताधारी पक्षातील रासपचे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांना सरकार कडूनच वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा गुन्हा दाबण्याचा प्रयत्न देखील होत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुट्टे यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र पोलिसांना मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला. हा आर्थिक गुन्हा असून यात चौकशीपुर्वी अटक करू नका असे सांगितल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. पोलीस आता न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहात आहे. मात्र, तो पर्यंत गुट्टे हा गुन्हा दाबण्यासाठी दबाव आणतील म्हणून या प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी विधानसभेत करणार असल्याचे केंद्रे यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवामान खात्याच्या विरोधात शेतकऱ्यांची फसवणुकीची तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
पुणे वेधशाळा आणि कुलाबा वेधशाळेने यंदा पावसाबद्दलचे खोटे अंदाज व्यक्त केले. खते आणि बियाणे निर्मिती करणाऱ्या कंपनीशी हवामान विभागाने संगनमत करून राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. हा फसवणुकीचा प्रकार आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या विरोधात गुन्हा नोंदवावा असा तक्रार अर्ज शुक्रवारी माजलगाव तालुक्यातील शेतकरी गंगाभीषण थावरे यांनी दिंद्रुड पोलिस स्टेशनमध्ये दाखल केला. कायदेशीर बाबी तपासून अर्जावर पुढील निर्णय घेणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

हवामान खात्याने एप्रिल-मे मध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करीत यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावर विसंबून देशातील बहुतांश शेतकरी पेरणीपूर्व मशागत करून ठेवली. हवामान अंदाज सांगणाऱ्या कुलाबा आणि पुणे येथे राज्यात वेधशाळा आहेत. या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी कोणताही अभ्यास न करता जून २०१७ पूर्वी खते बियाणे कंपनीचा आर्थिक फायदा व्हावा या हेतूने जून, जुलैमध्ये भरपूर पाऊस पडणार असल्याचा चुकीचा हवामान अंदाज प्रसार माध्यमाद्वारे व्यक्त केला. त्यावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात पेरण्या केल्या. यासाठी बी, बियाणे, खते, औषधे, मजूर, फवारणी यावर लाखो रुपयांचा खर्च झाला आहे. हवामान विभागाने येत्या ४८ तासांत पाऊस येणार, ७२ तासात येणार असे सांगत हवामान खाते शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे.
यामागे बियाणे कंपन्या, खत आणि औषधी कंपन्यांचे आणि हवामान खात्याचे काही आर्थिक हितसंबंध असावेत अशी शक्यता असल्याचे तक्रारीत म्हटले असून ही तक्रार माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली गेली आहे.

अन्यथा पोलिस स्टेशनवर मोर्चा काढणार
दोन दिवसांत कारवाई करून गुन्हा दाखल केला गेला नाही तर पोलिस स्टेशनवर मोर्चा काढण्याचा इशारा गंगाभीषण थावरे यांनी दिला. हवामान खात्याच्या विरोधात शेतकऱ्यांची पोलिसांत तक्रार देण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपमधील संघर्षात अडकली रस्त्यांची यादी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शंभर कोटींमधून केल्या जाणाऱ्या रस्त्यांची यादी भारतीय जनता पक्षातील नेत्यांमध्ये निर्माण झालेल्या संघर्षात अडकली आहे. आपापल्या मतदारसंघात रस्त्यांचा निधी ओढण्याची चढाओढ सुरू असल्यामुळे यादीला अंतिम रूप मिळत नसल्याची चर्चा आहे. दरम्यान २० जुलैला होणाऱ्या सर्वसाधारण सभेपूर्वी रस्त्यांची यादी जाहीर करावी, असे आव्हान शिवसेनेसह विरोधकांनी दिले आहे. त्यामुळे चीनहून परतताच महापौर यादी जाहीर करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात शासनाने शंभर कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले. रस्त्यांची यादी डीपीआरसह तांत्रिक मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाठवा असे शासनाने महापालिकेला कळविले आहे. अनुदानाच्या मंजुरीचे पत्र प्राप्त झाल्यापासून पंधरा ते अठरा दिवसांत रस्त्यांची यादी तयार झालेली नाही.
रस्त्यांच्या यादीवरून संघर्ष निर्माण झाल्यामुळे त्यात समन्वयाची भूमिका कोण पार पाडतो यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, रस्त्यांचे केंद्र ‘गुलमंडी’वर असून तेथूनच अंतिम यादी बाहेर येईल असेही मानले जात आहे. २० जुलैला पालिकेची सर्वसाधारण सभा आहे. त्यापूर्वी महापौरांनी यादी जाहीर करावी असे आव्हान सभागृह नेते गजानन मनगटे व विरोधी पक्षनेते फेरोज खान यांनी दिले आहे. यादी जाहीर न झाल्यास त्याचा जाब सभेत विचारू असे मनगटे म्हणाले.

का रखडली आहे यादी?
औरंगाबाद पूर्व आणि फुलंब्री मतदारसंघात शहराचा बहुतांश भाग आहे. त्यामुळे या भागातील रस्त्यांचीच कामे शासकीय अनुदानातून प्रामुख्याने करण्यात यावीत असा आग्रह भाजपतील एका गटाचा आहे. तर येत्या काळात लोकसभा, विधानसभेची निवडणूक युतीशिवाय लढवावी लागण्याची शक्यता असल्यामुळे सर्व मतदारसंघांचा विचार करून रस्त्यांची कामे करावीत, त्याचा फायदा निवडणुकीत होऊ शकेल असाही एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिण्यासाठी जार; वापरासाठी बेजार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महावितरणने जायकवाडी पंपहाऊस क्षेत्रात देखभाल दुरुस्तीसाठी बारा तासांचा घेतलेला शटडाऊन चार तासांनी लांबल्यामुळे शहराची पाणीपुरवठा योजना तब्बल सोळा तास कोमात होती. त्यामुळे शुक्रवारी शहरवासीयांना पूर्णपणे निर्जळीला सामोरे जावे लागले. शनिवारी दुपारनंतर पाणीपुरवठा सुरळीत होण्यास सुरुवात झाली. मात्र, शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी सोमवारचा दिवस उजाडणार आहे.

महापालिकेच्या जायकवाडी येथील पंपहाऊसच्या उपकेंद्रात देखभाल दुरुस्तीची कामे महावितरण कंपनीने शुक्रवारी हाती घेतली. त्यासाठी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार होता, पण प्रत्यक्षात देखभाल दुरुस्तीचे काम रात्री एक वाजेपर्यंत चालले. त्यामुळे जायकवाडी येथील पंपहाऊस तब्बल सोळा तास बंद होते. रात्री एकनंतर वीज पुरवठा सुरू झाला आणि एकानंतर एक पंप सुरू करण्यात आला. त्यामुळे शहरात पाणी येण्यासाठी शनिवारची दुपार उजाडली. योग्य दाबाने पाणी येत नसल्यामुळे जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू होऊनही अनेक भागांना पाणी मिळाले नाही. सोमवारपर्यंत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केला आहे.

सिडको-हडकोत पुरवठा नाही
दरम्यान सिडको एन ५ येथील जलकुंभाचा वीज पुरवठा शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास खंडित झाला. साडेतीनच्या दरम्यान वीज पुरवठा सुरू झाला. त्यामुळे या जलकुंभावरील यंत्रणा ठप्प झाली होती. त्यामुळे सिडको हडको भागात देखील योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images