Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

खड्ड्यामुळे चाक निखळून कार उलटली, एक ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
खड्ड्यात आदळून चाक निखळल्याने झालेल्या अपघातात कारचालक ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी नागपूर-मुंबई महामार्गावर साईबाबा मंदिराजवळ झाला. शरद संपत घुगे (वय २७), असे मृताचे नाव असून दिनेश किसन जंजाळे (वय २६) हे गंभीर जखमी झाले आहेत.
हे मुंबईचे रहिवासी कारमधून (एम. एच. ०४ एन ०५९४) मुंबई येथून औरंगाबादकडे जात होते. महामार्गावरील शिवराई शिवारात साईबाबा मंदिराजवळ कारचे मागील चाक मोठ्या खड्ड्यात आदळल्याने वेगळे झाले. त्यामुळे कार तीन-चार वेळा उलटून रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. या घटनेत कारचालक शरद घुगे यांचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी दोघांना ताबडतोब १०८ क्रमांकाच्या अँम्ब्युलन्सने वैजापूर येथील उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. येथील डॉक्टरांनी तपासून शरद यांना मृत घोषित केले. जखमी दिनेश याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी दिनेश जंजाळे यांच्या फिर्यादीवरून शरद घुगे यांच्याविरूद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय खिल्लारे हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वनरक्षकास ५० हजारांची लाच घेताना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अटक न करणे व जप्त केलेला जेसीबी सोडण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना वनरक्षक रामेश्वर रंगनाथ डुकरे (वय २६) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई धामणगाव ते चिंचोली रस्त्यावर रविवारी कारवाई केली.
तक्रारदाराचा जेसीबी चालक दत्ता हा दुचाकीवरून बाभूळगाव येथे जेसीबीवर कामाला येत होता. त्यावेळी वनविभागातील श्रीमती तुपे व वॉचमन साबळे यांनी अडवून, आम्हाला न विचारता जेसीबीने रस्ता का केला, असा जाब विचारला. त्या वेळी दत्ता यांनी आपण रस्ता केला नसल्याचे सांगितल्याने तिघांत वाद झाला. हे प्रकरण फुलंब्री पोलिस ठाण्यात गेले. तुपे यांच्या तक्रारीनुसार, चालक दत्ता यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद झाली. त्यानंतर रामेश्वर डुकरे यांनी चालक दत्ता यांच्या मालकाला फोन करून ‘परवानगी न घेता वनखात्याच्या हद्दीत रस्ता कसा केला. जंगल कायद्यानुसार, तुमच्यावर कारवाई झाली आहे,' असे सांगितले. या प्रकरणात अटक करून जेसीबी मशीन जप्त करणार आहोत, अशी भीती दाखवून फोन कट केला.
वनरक्षक डुकरेने पुन्हा फोन करून चिंचोली येथील नर्सरीत भेटण्याचे सांगितले. यावर ते डुकरेला भेटण्यासाठी गेले असता वन परिक्षेत्र अधिकाऱ्याला भेटून आलो असून जेसीबीची जप्ती व अटक टाळायची असेल तर दोन बाँडपेपर आणून ६० हजार रुपये द्यावेत, असे सांगितले. लाच देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता डुकरेने ६० हजारांची मागणी करून ५० हजारांवर तडजोड केली. त्यानंतर सापळा रचून डुकरे याला लाच घेताना पकडण्यात आले. या प्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस निरीक्षक विकास पाटील, प्रमोद पाटील, रवींद्र देशमुख, संदीप आव्हाळे, संतोष जोशी, बाळासाहेब राठोड, दिलीपसिंग राजपूत यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुनाट साहित्याने वीज गळतीचा फटका

$
0
0

जुनाट साहित्याने वीज गळतीचा फटका

तारांमधून दररोज पाच ते दहा टक्के वीजगळती

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः

शहरामध्ये वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत तारा या २० ते २५ वर्षांपासून बदललेल्याच नाहीत. काही भागांमधील तारांचे वयोमान १० वर्षांपर्यंतचे आहे. या जुन्या झालेल्या विद्युत तारांमुळे वीज गळतीचा मोठा फटका महावितरणला बसत आहे. यातून होणारी दररोजची वीज गळती पाच ते हा टक्क्यांपर्यंतची आहे. साहजिकच याचा फटका ग्राहकांनाच बसत आहे.

औरंगाबाद शहरातील विजेसंबंधीच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी २००७ राज्याचे तत्कालीन उर्जामंत्री राजेंद्र दर्डा यांच्या काळात एक पायलट प्रोजेक्ट हाती घेण्यात आला होता. त्याअंतर्गत जुन्या शहरातील काही भागांतील सब स्टेशन उभारणी तसेच डिपी बसविणे वीज वाहिन्यांचे केबल बदलणे अशी कामे करण्यात आली. ड्रम प्रकल्प उभारल्यानंतर औरंगाबाद शहराची वीज व्यवस्‍था जीटीएल कंपनीकडे वर्ग करण्यात आली होती.

जीटीएल कंपनीकडे शहराचा कारभार गेल्यानंतर दरवर्षी पाच कोटी रुपये शहराच्या वीज वितरण व्यवस्‍थेच्या दुरुस्तीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पाच वर्षांच्या काळात जीटीएल कंपनीने शहरात वीज सुविधा दुरुस्तीसंदर्भात कोणतेही काम केले नाही. काही भागात वीज चोरी वाढल्यामुळे जीटीएल कंपनीने एबी केबल टाकल्या. याशिवाय डिपी बदलणे, जुन्या केबल बदलणे तसेच अन्य कामे झालीच नाहीत.

जीटीएल कंपनीने शहरातील वीज वितरण व्यवस्‍थेकडे लक्ष दिले नाही. यामुळे शहरातील २० - २५ वर्षांपूर्वी बदलण्यात आलेल्या विद्युत ताराच अद्यापही वीज प्रवाह वाहून नेण्याचे काम करीत आहेत. अनेकदा या तारा तुटून पडतात. यामध्ये विजेचे नुकसान होते. अनेक भागात वीज वितरण करणाऱ्या डिपीही जुन्या आहेत. वीज ग्राहकांची संख्या वाढल्यामुळे या डिपींची क्षमताही वाढविण्याची आवश्यकता होती. मात्र, या डिपींची क्षमता वाढविण्यात आलेली नाही. या ‌जुन्या डिपी आणि वीज तारांमुळे विजेचा तोटा तीन ते पाच टक्के वाढला आहे.

कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात

वीज वितरण व्यवस्थेत जुनाट झालेल्या विजेच्या तारांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी तारा तुटल्यामुळे तेथे जोड देण्यात आले. विजेचा दाब वाढल्यास पुन्हा हे जोड तुटण्याचा धोका असतो. या ठिकाणी दुरुस्तीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांचाही जीव अशा प्रकारच्या तारांमुळे धोक्यात येऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता आरटीओ करणार ‘स्टिंग ऑपरेशन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या नावाखाली शासकीय शुल्काव्यतिरिक्त ग्राहकांकडून जादा पैसे उकळण्याचे प्रकार घडतात. त्यांना चाल लावण्यासाठी आता राज्यभरातील आरटीओ कार्यालयांत स्टिंग ऑपरेशन करण्यात येणार आहेत. ग्राहकांना लुबाडणाऱ्या एजंटांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश परिवहन आयुक्त प्रवीम गेडाम यांनी दिले आहेत.

आरटीओ कार्यालयात मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यक्ती येत असतात. आरटीओ एजंट म्हणून त्यांचा कार्यालयात वावर असतो, असे चित्र राज्यातील सर्वच आरटीओ कार्यालयामध्ये दिसते. आरटीओ कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांकडून हे एजंट कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त अधिक रक्कम वसूल करतात. नागरिकांना लुबाडण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. काही नागरिकांनी थेट परिवहन आयुक्तांकडे तक्रारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आरटीओ कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची लुबाडणूक होऊ नये; तसेच आरटीओ कार्यालयाची प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून परिवहन आयुक्त गेडाम यांनी कारवाई करण्याचे आदेश राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना दिले आहेत.

परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी १५ जुलै २०१७ रोजी यासंदर्भात राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना पत्र पाठविले आहे. आरटीओ कार्यालयाच्या परिसरात सर्वसामान्य नागरिकांना लुबाडण्यात येत असल्याच्या प्रकाराचे स्टिंग ऑपरेशन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

आरटीओ कार्यालयात आरटीओ कर्मचारी, अधिकारी यांनी साध्या वेशात जावे. कार्यालयाच्या परिसरात अनधिकृत व्यक्ती नागरिकांकडून जास्तीचे पैसे घेत आहेत की नाही, याची चाचपणी करावी. नागरिकांना लुबाडण्यात येत असल्याचे स्पष्ट झाल्यास त्रयस्थ

पंच अथवा छुपे व्हिड‌िओ रेकॉडिंग करावे आणि लुबाडणूक करणाऱ्यांविरोधात पुरावा तयार करावा. त्याआधारे संबंधित अनधिकृत व्यक्तीच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करावेत, असेही आदेश परिवहन आयुक्त गेडाम यांनी सर्व आरटीओ कार्यालयांना दिले आहेत.

असे केले जाणार स्टिंग ऑपरेशन
आरटीओ कार्यालयाचे कर्मचारी किंवा अधिकारी साध्या वेशात दुसऱ्या आरटीओ कार्यालयात जातील. तेथे जाऊन लायसन्स, गाडी नावावर करणे किंवा आरटीओ विभागाशी संबंधित कामे करण्यासाठी एजंटांशी संपर्क साधतील. त्यांच्याकडून शासकीय शुल्काव्यतिरिक्त किती रुपये आकारणी केली जातात याची चाचपणी करतील. त्याचे छुप्या व्हिडिओ रेकॉडिंग करून पुरावेही तयार केले जातील.

आदेशाप्रमाणे कारवाई करणार
स्टिंग ऑपरेशन करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहे. परिवहन आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे कारवाई केली जाणार आहे. औरंगाबाद, बीड आणि जालना या विभागात नागरिकांची लुबाडणूक होत असलेल्या तक्रारी असतील, तर त्यांनी आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील यांनी केले आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओव्हर फ्लोचे पाणी ‘नांमका’तून सोडावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
नाशिक जिल्ह्यात पडणाऱ्या संततधार पावसाने सर्व नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे हे ओव्हर फ्लोचे पाणी वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी नांदूर-मधमेश्वर कालव्यात सोडावे, अशी मागणी माजी आमदार आर. एम. वाणी यांनी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे केली आहे.
नाशिक जिल्ह्यात आठ ते दहा दिवसांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. निफाड तालुक्यातील नांदूर-मधमेश्वर धरणातून गोदावरी नदी, तसेच नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील कालव्यात ओव्हर फ्लोचे पाणी सोडण्यात आलेले आहे. गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने गंगापूर व वैजापूर तालुक्यात दुबार पेरणीचे संकट आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे माजी आमदार वाणी यांनी राज्यमंत्री शिवतारे यांना फोन करून वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी नांदूर-मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी केली. पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील, असे आश्वासन मंत्र्यांनी दिल्याची माहिती माजी आमदार वाणी यांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकल प्रवेश प्रक्रियेला गती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी देशपातळीवर घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेनुसार (नीट) प्रक्रिया सध्या सुरू आहे. प्रक्रियेत वैद्यकीय शिक्षण संचालनालय व प्रवेश कक्षाकडून औरंगाबाद केंद्रासह राज्यातील चार केंद्रावर प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे.

एमबीबीएस, बीडीएस यांसह विविध अरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांसाठी ही प्रक्रिया सुरू आहे. आरोग्य विज्ञानच्या सर्व शासकीय, अनुदानित व खासगी विनाअनुदानित कॉलेजामध्ये प्रवेश नीट या अखिल भारतीय स्तरावरील परीक्षेद्वारे गुणवत्तेनुसार प्रवेश करण्यात येत आहे. त्यामध्ये एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस अशा विविध अभ्यासक्रमांचा समावेश आहे. ‘नीट’ उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रिया औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात सुरू आहे. २१ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना आपल्या कागदपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे. त्यासाठी १ ते १ लाख ३५ हजार ऑल इंडिया रँक असलेल्या विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले आहे, तर २१ जुलै रोजी अनुसूचित जमाती, डी-२, डी-३, डोंगरी भाग या प्रवर्गातील १ लाख ३५ हजार ते ३ लाख ऑल इंडिया रँक असलेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात आले आहे.

गुणवत्तायादीत समावेश असलेल्या विद्यार्थ्यांना वेबसाइटवरही ऑनलाइन पसंतीक्रम अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची निवड झाल्यास त्यांनी संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रमाणपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया सुरू असून निरीक्षक डॉ. अजित दामले, डॉ. एम. एस. बेग, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. एम. एस. बेग, डॉ. राजन बिंदू, डॉ. कैलास झिने, डॉ. मोहन डोईबळे, डॉ. अनिल जोशी आदी प्रक्रियेत सहभागी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन कोटींचा रस्ता पाइप लाइनसाठी खोदला

$
0
0

दोन कोटींचा रस्ता पाइप लाइनसाठी खोदला
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
सहा महिन्यापूर्वी सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला रस्ता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गेल्या आठवड्यात पाइप लाइन टाकण्यासाठी खोदला. त्यामुळे एक किलोमीटरच्या रस्त्याचे भवितव्य धोक्यात आले आहे. रस्त्याचे काम करण्यापूर्वी पाइप लाइन टाकण्याचे काम का करण्यात आले नाही, असा सवाल आता विचारला जात आहे.
महापालिकेतर्फे केल्या जाणाऱ्या कामांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे केलेली अनेक कामे बिघडली जातात. त्याचा फटका पालिकेच्या अर्थकारणाला जसा बसतो, तसाच तो सर्वसामान्य नागरिकांना देखील बसतो. पालिकेतर्फे सहा महिन्यांपूर्वी समर्थनगरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते औरंगपुरा येथील महात्मा फुले चौका पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात आले. आठ ते दहा वर्षात या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नव्हते. नागरिकांची ओरड झाल्यावर पॅचवर्क करून रस्त्याची मलमपट्टी केली जात होती. माजी नगरसेवक समीर राजूरकर व विद्यामान नगरसेवक ऋषीकेश खैरे यांच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. डांबरीकरणाच्या कामासाठी सुमारे दोन कोटी रुपये देखील खर्च करण्यात आले. ज्या कंत्राटदाराने डांबरीकरणाचे काम केले त्याला तीन वर्षाचा डिफेक्ट लायब्लिटी पिरेड देण्यात आला आहे. तीन वर्षात डांबरीकरणाच्या कामात बिघाड झाली तर त्याची जबाबादारी त्या कंत्राटदारावर असणार आहे. असे असताना केवळ सहा महिन्यातच पालिकेने हा रस्ता खोदण्याचे काम सुरू केले आहे.
निरालाबाजारहून नागेश्वरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावर पाणीपुरवठा विभागाने पाइप लाइन टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम केले. त्यामुळे नव्याने करण्यात आलेल्या रस्त्याचे डांबरीकरण उखडले आहे. पाइपलाइन टाकल्याच्या नंतर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ववत करण्याऐवजी खोदलेला खड्डा माती व मुरूमाने बुजवण्यात आला आहे. माती व मुरूमातून रस्त्याच्या मुळापर्यंत पाणी मुरण्याची शक्यता असून त्यामुळे संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण येत्या काही महिन्यात उखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रस्त्याच्या डांबरीकरणाचा घटनाक्रम
रस्त्याच्या डांबरीकरणाचे टेंडर निघाले - जानेवारी - फेब्रुवारी २०१५ मध्ये
कंत्राटदाराला वर्क ऑर्डर देण्यात आली - मे - जून २०१५ मध्ये
काम पूर्ण झाले - फेब्रुवारी - मार्च २०१७ मध्ये
डांबरीकरणाच्या कामावर झालेला खर्च - सुमारे दोन कोटी रुपये

निरालाबाजारच्या परिसरातील वसाहतींना पाण्याची समस्या होती, त्यामुळे पाइप लाइन टाकण्याचे काम केले जात आहे. हे काम सध्या थोडे बाकी आहे. काम पूर्ण झाल्यावर रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण केले जाईल. नागरिकांना त्रास होवूनये, केलेला खर्च वाया जावूनये यासाठी माझा प्रयत्न असणार आहे.
ऋषीकेश खैरे, नगरसेवक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाळीव कुत्र्यावरून दोन गटात हाणामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पाळीव कुत्र्याला दगड मारल्याच्या कारणावरून वाद होऊन दोन गटात रविवारी नंदनवन कॉलनीत दुपारी तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीवरून परस्परांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा कुत्रा दुसऱ्याच्या घरासमोर घाण करतो, अशी तक्रार आहे.
याप्रकरणी अरूण यशवंत बस्ते (वय ६० रा. नंदनवन कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार, ते त्यांच्या पाळीव कुत्र्याला फिरवत होते. यावेळी तेथे आलेल्या कारमधून दोन जण उतरले व एकाने बस्ते यांच्या कुत्र्याला दगड मारला. बस्ते यांनी, कुत्रा काही करत नाही, असे सांगितले तरी त्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. त्यांचा मुलगा भांडण सोडवण्यासाठी आला असता त्याला देखील मारहाण करून जखमी करण्यात आले. याप्रकरणी संशयित आरोपी अरविंद कोचुरे व दोन अनोळखी व्यक्तिंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात अरविंद प्रताप कोचुरे (वय ३५ रा. नंदनवन कॉलनी) यांनी दुसरी तक्रार दिली आहे. त्यानुसार, बस्ते यांचा कुत्रा कोचुरे यांच्या घरासमोर घाण करतो, त्यामुळे कोचुरे यांनी बस्ते यांना कुत्र्याला इकडे आणू नका असे सांगितले होते. या कारणावरून बस्ते, त्यांचा मुलगा व आणखी एका अनोळखी व्यक्तीने कोचुरे यांना दगडाने मारहाण करीत शिवीगाळ केली. या प्रकरणी बस्ते व त्यांच्या मुलाविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणात सहायक फौजदार जेकब हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आयटीआय’ प्रवेश; विद्यार्थी ताटकळले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रियेत गुणवत्तायादी जाहीर होऊन दोन दिवस उलटले, तरी प्रत्यक्ष प्रवेशफेरीचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. राज्यातील ४ लाख विद्यार्थ्यांना प्रवेशफेरीच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा आहे.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागातर्फे राज्यातील आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया १९ जूनपासून सुरू आहे. ८ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज नोंदणी व निश्चितीची प्रक्रिया पूर्ण केली. १५ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात आली, परंतु पुढील प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. मागील वर्षी सुरुवातीलाच प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. यावर्षी केवळ ऑनलाइन अर्ज नोंदणी व निश्चितीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यावेळी पुढच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले. गुणवत्ता यादी जाहीर होऊन दोन दिवस उलटले, तरी वेळापत्रक नाही. त्यामुळे प्रवेशाच्या फेऱ्या नेमक्या किती असणार, त्यांचे स्वरूप कसे असणार याबाबत अद्याप विद्यार्थ्यांना माहिती नाही.

राज्यात चार लाख विद्यार्थी प्रतिक्षेत
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडील विद्यार्थ्यांचा कल कमी होत असतना, आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा कल कायम आहे. एक जागेसाठी चार विद्यार्थी रांगेत आहेत. राज्यात एक लाख प्रवेश क्षमतेसाठी चार लाख विद्यार्थ्यांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

वेळापत्रकाला दोन दिवस
मागील वर्षी आयटीआयची चार फेरीमध्ये प्रवेश प्रक्रिया झाली. त्याचे वेळापत्रक सुरुवातीलाच जाहीर करण्यात आले. यंदा वेळापत्रक निश्चित करण्यात प्रशासकीय पातळीवरच एकवाक्यता नसल्याने गोंधळ उडाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यात आणखी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

विद्यार्थी, पालकांकडून विचारणा सुरूच आहे. प्रत्यक्ष फेरीचे वेळापत्रक लवकरच जाहीर होईल. त्यासाठी पाठपुरावा सुरूच आहे. वेळापत्रक जाहीर झाल्यावर, त्याबाबत विद्यार्थ्यांना कळविण्यात येईल.
- आय. आर. भिलेगावकर, निरीक्षक, प्राचार्य आयटीआय, पैठण

- राज्यातील शासकीय आयटीआय ४१७
- खासगी आयटीआय ३००
- प्रवेश क्षमता १ लाख १० हजार
- प्रवेश इच्छुक विद्यार्थी ४ लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारू दुकानाचा प्रस्ताव रद्द करा, अन्यथा आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘उल्कानगरी येथील प्रस्तावित देशी दारूचे दुकान रद्द करा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही. प्रस्तावित दुकान रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहणार आहे,’ असा इशारा नगरसेवक दिलीप थोरात यांनी ‘मटा’शी बोलताना दिला. रहिवाशी भागात देशी दारू दुकान सुरू झाल्यास जगणे अवघड होईल, अशी भिती त्यांनी व्यक्त केली.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार हायवेपासून ५०० मीटरपर्यंतच्या अंतरात दारूविक्रीला बंदी आली आहे. त्यामुळे शहर व परिसरातील दारूची अनेक दुकाने बंद झाली, काही दुकानदारांनी स्थलांतरासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अर्ज केले आहेत. त्यापैकी एक देशी दारू दुकान उल्कानगरी येथील मालखरे क्लासिक परिसरात प्रस्तावित आहे. या दुकानाच्या विरोधात परिसरातील नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम, जनजागृती करत लढा पुकारला आहे.
या लढ्यात सामील असलेले उल्कानगरी वॉर्डाचे नगरसेवक दिलीप थोरात यांनी दुकान रद्द होईपर्यंत संघर्ष सुरू राहील, असा इशारा दिला आहे. या दुकानाला वॉर्डातील नागरिकांचा कडाडून विरोध असल्याचे निवेदन जिल्हा प्रशासन, पोलिस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागांना दिले आहे. त्यावर तातडीने सकारात्मक निर्णय न घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

रहिवासी भागात देशी दारूचे दुकान असता कामा नये. नागरिकांचा त्यास कडाडून विरोध आहे. प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी.
- दिलीप थोरात, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी भाविकांचा उत्साह कायम

$
0
0

अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी भाविकांचा उत्साह कायम

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अमरनाथ यात्रेस जाणाऱ्या भाविकांवर नुकताच दहशतवादी हल्ला झाला. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली. त्यानंतर बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या यात्रेकरूंचा उत्साह मात्र कायम आहे. औरंगाबादमधून नुकताच २० भाविकांचा जत्था अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाला.

कमल बिरारे या भाविक गेल्या सात वर्षांपासून अमरनाथ यात्रेसाठी जातात. यंदा त्यांनी इच्छुक यात्रेकरूंना घेऊन जाण्याचा बेत आखला. यानुसार भाविकांचाही उत्साह कायम असल्याने प्रथमच भाविक विमानाने रवाना झाले. जत्थ्यात पुणे, वैजापूर, जालना, बिडकीन, सिल्लोड येथील भाविकांचा यंदा सहभाग आहे. हल्ला झाला तरी भक्तीची ओढ लागली आहे, सुखरुप परत येऊ, असा विश्‍वास मंगल सोनार यांनी व्यक्त केला.

भाविकांना घेऊन शनिवारी औरंगाबादहून खाजगी बस मुंबईत गेली. तिथून विमानाने श्रीनगर, दलसरोवर मार्गे बालताल, सोनमर्ग, ग्लेशिअर पॉइंट पाहून १९ जुलै रोजी भाविक दर्शनासाठी रवाना होतील. २१ जुलै रोजी हे भाविक मुंबईला परततील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीए अभ्यासक्रमात ‘जीएसटी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नव्याने लागू करण्यात आलेल्या वस्तू व सेवा कराचा (जीएसटी सीए अर्थात चार्टर्ड अकाउंटंटच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. सीए अभ्यासक्रमात मोठे बदल करण्यात आले आहेत. सध्या सीपीटी-आयपीसीसी आणि फायनल या स्वरुपात असलेला अभ्यासक्रम आता फाउंडेशन-इंटरमिजिएट आणि फायनल या स्वरुपात असेल. याशिवाय आता दहावीऐवजी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतरच अभ्यासक्रमासाठी नोंदणी करता येईल.

यासंदर्भात चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी संघटनेचे (विकासाचे) प्रमुख सीए रोहन आचलिया यांनी सांगितले की, ‘आयसीएआय’च्या मध्यवर्ती समितीने (सेंट्रल कौन्सिल) हे बदल केले अाहेत. चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठी ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया’तर्फे (आयसीएआय) परीक्षा घेण्यात येते. ‘आयसीएआय’ने २००६मध्ये अभ्यासक्रमात बदल केले होते. त्यानंतर यावर्षी अभ्यासक्रमात मोठे बदल केले आहेत. नव्या अभ्यासक्रमात फाउंडेशन परीक्षेत अकाउंट्स आणि ‘बिझनेस लॉ व कम्युनिकेशन’ हे दोन्ही विषय लेखी स्वरुपात समाविष्ट करण्यात आले आहे. जनरल कमर्शियल नॉलेज, लॉजिकल रिझनिंग हे दोन विषयदेखील नव्याने समाविष्ट करण्यात आले आहेत. इंटरमिजिएट परीक्षेतील ‘इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’ विषयाचा अंतर्भाव अभ्यासक्रमात असला, तरी त्याची परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागणार नाही. त्याऐवजी ‘एंटरप्राइज इन्फर्मेशन सिस्टिम’ विषयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. इंटरमिजिएट आणि फायनलच्या अभ्यासक्रमात ‘वस्तू व सेवा कर’ (जीएसटी) या विषयाचा समावेश करण्यात आला आहे.

फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीच्या नियमांतही बदल करण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना फाउंडेशनमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात कमीत कमी ४० टक्के आणि एकूण परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. ‘सीए’चा नवा अभ्यासक्रम एक जुलै २०१७पासून लागू होणार आहे, मात्र ३० जूनपर्यंत जुन्या अभ्यासक्रमासाठी नोंदणी सुरू राहणार आहे.

नुकतेच दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ३० जूनपर्यंत जुन्या अभ्यासक्रमानुसार सीपीटी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतील. आधुनिकतेची कास धरत हे बदल करण्यात आले आहेत. सध्या असलेल्या विद्यार्थ्यांना लगेच या विषयाशी जुळवून घ्यावे लागणार आहे. याशिवाय जुन्या अभ्यासक्रमासाठीही नोंदणी सुरूच राहणार असल्याने अनेकांना यामुळे दिलासा मिळणार आहे, असेही आचलिया यांनी सांगितले.

उद्योग, व्यापार आणि बदलत्या प्रवाहाला विचारात घेऊन अभ्यासक्रमात बदल केले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या सॉफ्ट स्किल्सही विकसित होतील. त्याचा फायदा प्रॅक्टिकल आणि आर्टिकलशिप करताना होऊ शकतो.
- रोहन आचलिया, सीए, अध्यक्ष (विकास), चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूट, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ कर्जमाफी योजना म्हणजे फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भाजप सरकारने शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी म्हणजे निव्वळ फसवणूक आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी अडचणी वाढल्या आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सभापती विनोद तांबे यांनी सोमवारी विहामांडवा (ता. पैठण) येथे केले.

काँग्रेसने जाहीर केलेल्या ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ या अभियानांतर्गत पैठण तालुक्यातील अभियान विहामांडवा येथे आज राबविण्यात आले. यावेळी तांबे बोलत होते. ३० जून २०१७ पर्यंतच्या सर्व थकबाकीदारांना कर्जमाफी, पुनर्गठीत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मदत नाही तर संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, सर्व शेती पूरक शेती औजारे, पॉली हाऊस, शेडलेट, मत्स्यव्यवसाय तसेच शेळी मेंढी पालन, कुक्कुटपालन, आदीसाठी घेतलेले कर्ज माफ करण्यात यावे, नागरी बँका, पतसंस्था व मायक्रो फायनान्स कडून शेतीसाठी घेतलेले कर्ज माफ करण्यात यावे आदी मागण्या काँग्रेसकडून करण्यात आल्या आहेत, अशी माहिती तांबे यांनी यावेळी दिली. भाजप- शिवसेना सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची पोकळ योजना जाहीर केली ही खोटी आहे . सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कर्जमाफीचे निकष कोणत्याही बँकेला अद्याप लेखी स्वरूपात दिलेले नाही. रोज रोज नवीन किचकट अटी व शर्ती टाकीत आहे . त्यामुळे प्रत्येक गावातील नव्वद टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सरपंच संभाजी नरके, सरपंच बाळासाहेब बोडखे, सतिशराव काळे, राजूनाना नवथर, बाळासाहेब पन्हाळकर, दादासाहेब नवथर, अशोक गावडे, माऊली रसाळ, बळीराम गाभूड, प्रदीप नरके, बिलालभाई यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘एचएलएल’च्या सेवा निम्म्या जिल्ह्यांमध्येच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते जिल्हा रुग्णांलयांपर्यंत अत्याधुनिक लॅब चाचण्यांच्या सेवा देण्याचा राज्य सरकारशी करार झालेल्या एचएलएल कंपनीच्या आतापर्यंत निम्म्याच जिल्ह्यांमध्ये सेवा सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य सरकारशी एचएलएल कंपनीचा करार होऊन सहा महिने लोटले आहे. करारावेळी तीन महिन्यात संपूर्ण राज्यात या सेवा सुरू करण्यात येतील, असे कंपनीने म्हटले होते. मात्र आजही सुमारे २० जिल्ह्यांपर्यंतच सेवा सुरू झाल्या आहेत आणि त्याही पूर्णपणे सुरू झालेल्या नाहीत. अनेक ठिकाणी अर्धवट सेवा सुरू झाल्याचेही सूत्रांनी सांगितले. तर, पॅथॉलॉजिस्ट मिळत नसल्याची कंपनीची मुख्य अडचण असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये केवळ वैजापूर, सिल्लोड, गंगापूर या तालुक्यांमध्ये व पाच ते सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंतच या सेवा सुरू झाल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी ‘मटा’ला सांगितले. अशीच स्थिती मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे संपूर्ण राज्यात या सेवा सुरू होण्यासाठी किती प्रतीक्षा करावी लागणार, याचे उत्तर आरोग्य विभागाकडे निदान आज तरी नाही. महाराष्ट्र दिनापर्यंत राज्यात सेवा सुरू होणे अपेक्षित होते; परंतु त्यालाही आता तीन महिने लोटले आहेत.

‘पॅथॉलॉजिस्ट’साठी असाही दंडक
‘एचएलएल’च्या मुंबईतील एकाच पॅथॉलॉजिस्टच्या सह्या जालना, जळगाव, पुणे व इतर ठिकाणी दिसून आल्याचे प्रकरण ‘मटा’ने प्रकाशात आणले होते. त्यानंतर कंपनीचे पेमेंट बंद करुन ज्या लॅबमध्ये प्रक्रिया होते त्या प्रत्येक पॅथॉलॉजी लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्ट असण्याचा दंड घालण्यात आल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांनी ‘मटा’ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंगचे स्वप्न पूर्ण होणार का ?

$
0
0


सुरेश केसापूरकर, ​ जालना
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जालन्याच्या आरती व नम्रता या उगिले भगिनींनी दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळवले. घरची परिस्थिती हलाखीची असताना सामाजिक संस्थेने दोघींना मदत केली. त्यामुळे त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. बारावीला दोघींना चांगले गुण मिळाले असून या दोन्ही भगिनींना मेहनतीचे फळ मिळाले. मात्र, पुढे चालून त्यांना इंजिनीअर व्हायचे आहे...मात्र, त्यांचे हे स्वप्न पूर्ण होईल का ? याची चिंता सतावत आहे.
जालन्यातील गांधीनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या उगले परिवारातील कुणीही शिक्षण घेतलेले नाही. घरातील एखादे मंगलकार्य शुभविवाह सोहळ्यानंतर अथवा वास्तुपूजेनंतर रेणूका जगदंबेचा जागर गोंधळ घालण्याचा पारंपारीक अर्थाजनाच्या लोप पावत चाललेल्या व्यवसायधंद्यात काहीच भविष्य उरलेले नाही. त्यामुळे हाताला मिळाले ती मोलमजुरी करत संसाराचा गाडा ओढत असलेल्या जालन्यातील गांधी नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या उगले कुटुंबातील नम्रता शांताराम उगले आणि आरती संतोष उगले या दोघींनी अतिशय विपरीत परिस्थितीत संघर्षातून संपादन केले.
चार भिंतीच्या आत जगणारे गोंधळी समाजातील पारंपारीक रूढींना चिकटलेल्या घरातूनच नम्रता व आरती या दोघींनी दहावीपर्यंतचे शिक्षण दोघींनी अतिशय विपरीत परिस्थितीत संघर्षातून श्री. म. स्था. जैन विद्यालयाच्या मराठी माध्यमातून घेतले. दहावीत नम्रताला ९० टक्के तर आरतीला ९३ टक्के गुण मिळाले.
त्यानंतर दोघींने जेईएस महाविद्यालयात बारावी विज्ञानपर्यंतचे शिक्षण जालना एज्युकेशन फाऊंडेशन यंग इन्होव्हेटर्स यांच्या माध्यमातून आणि शहरातील नामवंत कोचिंग क्लासेसच्या मदतीने पूर्ण केले. नम्रताने बारावी बोर्डात ७६ टक्के आणि अभियांत्रिकी महाविद्यालय प्रवेश परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत २७ व्या क्रमांक मिळवित यशस्वी झाली. नम्रताचा भाऊ एका सामान्य हॉटेलमध्ये काही काम करतो. घरातील परिस्थिती खडतर आहे. त्यामुळे तिला इंजिनीअर होण्याची महत्त्वकांक्षा असून ती पूर्ण करण्यासाठी तिला परिस्थितीशी झगडावे लागत आहे.
जालन्यातील याच भागत राहत असलेल्या संतोष उगले यांची मुलगी आरतीला बारावी बोर्डात ७७ टक्के तर अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक मिळाला आहे. संतोष हे हाताला मिळाले ते काम करतात. त्यांना तीन मुली व एका मुलाच्या संगोपनासाठी जीवाचे रान करावे लागते. आरतीला व्हीजेटीआय मुंबई अथवा सीओईपी पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात नक्की प्रवेश मिळू शकतो. परिस्थितीसोबत दोन हात करीत आरतीने यशाला गवसणी घातली आहे. मात्र, तिचे इंजिनीअर होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तिला मदतीची आवश्यकता आहे.

###

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ २० हजार हेक्टरवरील पिके संकटात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
पावसाच्या खंडामुळे उदभवलेल्या बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील पीक परिस्थितीची पाहणी राज्याचे कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सोमवारी केली. बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कामांचा आढावा त्यांनी बीड येथे घेतला. यावेळी त्यांनी कामात कुचराई करणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
बीड जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाचे आगमन झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी धावपळ करीत खरीपाच्या पेरण्या उरकल्या. बीड जिल्ह्याचे सरासरी खरीप क्षेत्र सहा लाख ५८ हजार २४० हेक्टर आहे. या तुलनेत
आतापर्यंत जिल्ह्यात कापूस ३ लाख २६ हजार पाच हेक्टर, सोयाबीन एक लाख ५० हजार ६५३ हेक्टर, बाजरी ५७ हजार ६९७ हेक्टर, तूर ३२ हजार १७१ हेक्टर, मूग १७,६२० हेक्टर, उडीद ३२,१८८ हेक्टर असे एकूण ६ लाख, ३५ हजार १५१ हेक्टर म्हणजेच ९६.४९ टक्के क्षेत्रावर पेरणी उरकली आहे. यावर्षी पेरणीची लगबग करून शेतकऱ्याने पेरणी उरकली असली तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी उरकल्यानंतर पाऊस गायब झाल्याने पिके अडचणीत आली असून सुकू लागली आहेत. त्यामुळे या पीक परिस्थितीची पाहणी सोमवारी राज्याचे कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केली.
गेवराई ,बीड, तालुक्यात थेट बांधावर जाऊन त्यांनी पीक परिस्थिती पाहिली. त्यासोबतच बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उस्मानाबाद, बीड, लातूर जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीत त्यांनी तीन जिल्ह्यातील कृषी विभागाच्या योजनाचा आढावा घेतला. यावेळी केंद्रेकर यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अजून अर्ज दाखल केलेले नाहीत. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेची प्रचार प्रसिद्धी करावी. त्यामुळे पिक विमा भरण्यासाठी शेवटच्या आठवड्यात बँकेत गर्दी होण्याची शक्यता आहे. हे गृहीत धरून काही दिवस सुट्टीच्या दिवशी पिक विमा स्वीकारण्याचे नियोजन करावे अशा सूचना त्यांनी केली. जिल्ह्यात पावसाचा खंड पडला आहे. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीचे संकट किती क्षेत्रावर येईल याचा आढावा कृषी अधीक्षक, उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून घेतला. बीड जिल्ह्यात एकोणीस हजार हेक्टर वरील पीक पावसभावी अडचणीत आले आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. मात्र, कृषी आयुक्तांनी कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी फिल्डवर जाऊन किती क्षेत्रावरील पिकाला पावसाने ओढ दिली व त्याचा पिकवाढीवर परिणाम होईल, उत्पनात किती घट होईल याची माहिती एकत्रित करण्याचे आदेश केंद्रेकर यांनी दिले.
त्यासोबतच अशी परिस्थिती उदभवल्यास आवश्यक खते, बियाणे याचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शेतकऱ्यांना यांत्रिकारण योजनेतून औजारे आठ दिवसांत वाटप करावीत. ठिबक सिंचनाचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढावेत, शेतकरी आत्महत्या सुरू असलेल्या जिल्ह्यात अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचे काम करावे, अशा सूचना यावेळी केंद्रेकर यांनी दिल्या.




कागदी घोडे नाचवण्यापेक्षा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा
शेती हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत जोखीम असणारा व्यवसाय आहे. त्यामुळे शेतीत कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची अडवणूक करू नका. त्यांच्या घरी जाऊन नवे तंत्राज्ञान द्यावे, अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची माहिती एकत्रीत करा. ऑफिसमध्ये बसून कागदी घोडे नाचवण्यापेक्षा शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन करावे. त्यांच्यापर्यंत योजना पोचवाव्यात. थेट उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांना संपर्क साधणार असून त्यांनी कामकाज सुधारावे, असेही केंद्रेकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कला, क्रीडा शिक्षकांचे अण्णा हजारेंना साकडे

$
0
0

कला, क्रीडा शिक्षकांचे अण्णा हजारेंना साकडे
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कला आणि क्रीडा तासिका कमी करण्याच्या निर्णयाबद्दल आता कला, क्रीडा शिक्षकांच्या शिष्टमंडळाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे धाव घेतली आहे. या प्रश्नी मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांशी बोलण्याचे आश्वासन हजारे यांनी शिष्टमंडळास दिले.
सरकारने २८ एप्रिल रोजी एक परिपत्रक काढले. त्यानुसार कला, क्रीडा विषयाचे तास कमी करण्यात आले. तासिका कमी केल्यामुळे राज्यातील १५ हजार कला, क्रीडा शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. शासनास निवेदने देऊन, मोर्चे, आंदोलने करून शासनाने या प्रश्नाची दखल घेतली नाही. त्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांच्यासह शिष्टमंडळाने अण्णा हजारे यांना दिली. आरटीई कायद्यानुसार कला, क्रीडा शिक्षक शासनाने कायमचा हद्दपार केला आहे. भविष्यात मानधनावर हा विषय शिकवण्याकरिता शिक्षक नेमला जाणार असून भविष्यात ही पदे भरली जाणार नसल्याची माहिती कलाध्यापक संघाचे जिल्हा सचिव संजय पठाडे यांनी यावेळी करून दिली.
शिष्टमंडळाचे बोलणे ऐकून घेतल्यानंतर अण्णा हजारे यांनी या प्रश्नावर मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांशी बोलणार असल्याचे सांगितले. ‘स्वच्छ भारताबरोबरच स्वस्थ भारत’ ही संकल्पना राबवायची असेल आणि भारताला ऑलिंपिकमध्ये पदके मिळवायची असतील तर विद्यार्थी हा मैदानावर टिकला पाहिजे. त्यामुळे कला, क्रीडा तासिका पूर्ववत करण्यासाठी मी बोलेन असे हजारे यांनी शिष्टमंडळास सांगितले. या शिष्टमंडळात मुख्याध्यापक सोमनाथ वाकचौरे, दादासाहेब दुसुंगे, राजेंद्र कोतकर, संजय पठाडे, शिरीष टेकाडे, बापू होळकर, महेंद्र हिंगे, दत्तात्रय औटी, भाऊ धावडे, विजय जाधव, शिवाजी धामणे, विनायक उंडे आदी विविध जिल्ह्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ शरपंजरी ‘समांतर’चे पुनरुज्जीवन

$
0
0

औरंगाबादः ‘जीएसटी लागू करण्यासाठी मध्यरात्री आयोजित केलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. त्यामुळे येत्या काळात या प्रकल्पाचे काम सुरू झालेले असेल,’ असा गौप्यस्फोट खासदार चंद्रकांत खैरे यांनी ‘मटा’शी बोलताना केला.

समांतर जलवाहिनी प्रकल्प राबवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी पुढाकार घेतला आहे असे विधान खैरे यांनी गेल्या आठवड्यात पत्रकारांशी बोलताना केले होते. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘मटा’ने खैरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘एसएल ग्रुपचे मालक तथा भाजपचे खासदार सुभाषचंद्र गोयल यासाठी पुढाकार घेत आहेत. ३१ जुलैच्या मध्यरात्री बारा वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटी संदर्भात विशेष अधिवेशन झाले. या अधिवेशनात सुभाषचंद्र गोयल यांनी माझी भेट घेतली. औरंगाबादच्या समांतर जलवाहिनी योजनेचे काम आम्ही लवकरच सुरू करीत आहोत असे त्यांनी सांगितले. त्यामुळे ‘एसएल’ ग्रुपच्या माध्यमातूनच येत्या काळात समांतर जलवाहिनीचे काम केले जाणार हे स्पष्ट झाले आहे. ‘एसएल’ ग्रुपच्या माध्यमातून समांतर जलवाहिनीची योजना पूर्ण व्हावी यासाठी राज्य व केंद्र सरकार देखील अनुकूल आहे, असे कळाले आहे. भाजपच्याच काही नेत्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘समांतर’चे काम पुन्हा सुरू होणार असेल, तर आपली काहीच हरकत नाही. मला तो प्रकल्प हवाच आहे. हा प्रकल्प रद्द केमुळे शहर पाचवर्ष मागे गेले आहे. शहराचे मोठे नुकसान यामुळे झाले. औरंगाबादसाठी ‘समांतर’ प्रकल्पाची गरज आहे, हे आता भाजपच्या नेत्यांच्याही लक्षात आले आहे. मात्र, प्रकल्प रद्द केल्यामुळे त्याची किंमत वाढली आहे. आता हे काम करायचे असेल तर किमान ११०० कोटी रुपये लागतील. जेवढा उशीर या प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी लागेल तेवढी प्रकल्पाची किंमत देखील वाढेल. त्यामुळे लवकरात लवकर प्रकल्पाचे काम सुरू होणे गरजेचे आहे. ‘त्यांनी’ प्रामाणिकपणे हा प्रकल्प राबवावा व शहरातील नागरिकांना मुबलक पाणी द्यावे,’ असे आवाहन खैरे यांनी केले.

भाजपच्या नेत्यांनी ‘समांतर’साठी पुढाकार घेतला असला तरी आपला पाठपुरावा सुरूच राहील, कारण या प्रकल्पाचा निधी आपण आणला आहे. हा निधी परत गेला, तर औरंगाबादसाठी केंद्र सरकारकडून दुसरा कोणताही निधी मिळणार नाही. - चंद्रकांत खैरे, खासदार

आमच्यातील काहीजण भाजपच्या कळपात
‘समांतर’ प्रकल्प सुरू करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी आता पुढाकार घेतला असला, तरी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याशिवाय त्यांना या प्रकल्पाचे काम सुरूच करता येणार नाही. ‘समांतर’ करार रद्द करण्यासाठी आमच्या पक्षातील काहीजण भाजपच्या कळपात सामील झाले होते. त्यावेळी माझ्यावर काही आरोपही केले. आरोप करणाऱ्यांमध्ये माझ्या पक्षातील काहीजण होते, पण आता सर्वांचे लक्ष या प्रकल्पाकडे लागले आहे,’ असे खैरे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेड, हिंगोलीत पावसाची हजेरी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नांदेड
नांदेड जिल्ह्यात सोमवारी पावसाने हजेरी लावली. सोमवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३०.७२ मिली मीटर इतकी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत २४.३८ टक्के पाऊस झाला आहे. सोमवारी दिवसभरही पावसाची रिपरिप सुरुच होती. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. दीर्घ काळ उघडीप दिल्याने शेतीच्या उत्पादन घट होणार असली तरी पावसाअभावी सुकू लागलेल्या पिकांना या पावसाने जीवदान मिळाले आहे. अनेक भागात दुबर पेरणीचे संकट टळले आहे.
रविवारी सायंकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने नांदेड शहर जलमय झाले होते. रस्त्यांची गटारे होऊन दुतर्फा साचलेली घाण रस्त्यावर आली.नाल्या तुंबल्या शहराच्या सखल भागात श्रीनगर,दत्तनगर,शाहूनगर आदी भाग जलमय झाले आहेत.रविवारी देवगिरी एक्स्प्रेस पूर्ण येथे दोन तास रोकून धरली होती.

आसना नदीला पूर
हिंगोली - हिंगोली जिल्ह्यात सोमवारी दमदार पावसाने हजेरी लावली. औंढा नागनाथ तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याने आसना नदीतून पाणी वाहू लागले आहे. हिंगोली जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मागील २४ तासात सरासरी १५.७० मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २४३.५६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या २३.७६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे बळीराज सुखावला असून गेल्या काही दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने पिके सुकू लागली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

लातूरमध्ये रिमझीम
लातूर - लातूर शहर व परिसरात सोमवारी दिवसभर रिमझीम पावसाने हजेरी लावली. शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याने पावसाअभावी सुकू लागलेल्या पिकांनी जीवदान लाभले आहे. पाणी साठ्यात वाढ होण्यासाठी अजून मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाणे संघास सर्वसाधारण अजिंक्यपद

$
0
0

ठाणे संघास सर्वसाधारण अजिंक्यपद
यजमान औरंगाबाद उपविजेता
राज्य स्क्वॉश स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र राज्य स्क्वॉश संघटना व औरंगाबाद जिल्हा स्क्वॉश संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्य स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटाकाविले. यजमान औरंगाबादचा संघ उपविजेता ठरला.
विभागीय क्रीडा संकुलात ही स्पर्धा झाली. २७ जिल्ह्यातून ६५० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी गजानन सानप, क्रीडा उपसंचालक राजकुमार महादावाड, केशव क्षीरसागर, राज्य स्क्वॉश संघटनेचे सरचिटणीस डॉ. दयानंद कुमार, अध्यक्ष डॉ. प्रदीप खांड्रे, डॉ. पी. आर. रोकडे, डॉ. उदय डोंगरे, क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जागतिक फुटसाल क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या प्रतिक स्वामी, क्रिष्णा खराडे, मिथिलेश कोरे यांचा प्रवीण घुगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा स्क्वॉश संघटनेचे सचिव रणजित भारव्दाज यांनी सूत्रसंचालन केले. आनंद लाहोटी यांनी आभार मानले. पंच म्हणून दीपक भारद्वाज, रोहित गाडेकर, किशोर हिवराळे, पर्शी बिरार, शैलेश खांड्रे यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अकीब सिद्दिकी, पवन राऊत, सोहेल सय्यद, योगेश रघुवंशी, भगिरथ म्हस्के, सुरेश मोरे आदींनी पुढाकार घेतला.
अंतिम निकाल ः १४ वर्षे वयोगट मुले सांघिक - १. नागपूर, २. औरंगाबाद, ३. गोंदिया. मुली - १. ठाणे, २. औरंगाबाद, ३. नागपूर.
१७ वर्षांखालील मुले - १. औरंगाबाद, २. गोंदिया, ३. कोल्हापूर. मुली - १. ठाणे, २. औरंगाबाद, ३. कोल्हापूर.
१९ वर्षांखालील मुले - १. ठाणे, २. नागपूर, ३. औरंगाबाद. मुली - १. अमरावती, २. औरंगाबाद, ३. कोल्हापूर.
वैयक्तिक गट : अंतिम निकाल ः १४ वर्षांखालील मुले - १. दिव्य मेहता (नागपूर), २. ओम करवा (औरंगाबाद), ३. मानव क्रिपलानी (नागपूर). मुली - १. रिया जैन (नागपूर), २. आर्या पाटील (औरंगाबाद), ३. मिनल निमसे (ठाणे).
१७ वर्षांखालील मुले - १. इशांत महाजन (औरंगाबाद), २. गौतम पाढी (औरंगाबाद), ३. विकास चंद (ठाणे). मुली - १. अंजली सेमवाल (ठाणे), २. मोना चव्हाण (ठाणे), ३. संजना गुप्ता (ठाणे).
१९ वर्षांखालील मुले - १. अर्जुन सिंग (ठाणे), २. पिंटू राय (ठाणे), ३. राहुल धारा (ठाणे). मुली - १. सुनीता पाटील (ठाणे), २. प्राजक्ता पाटील (औरंगाबाद), ३. अंशुलिका देशमुख (पुणे).
खुला गट : पुरुष - १. संदीप पासवान (ठाणे), २. प्रदीप चौधरी (मुंबई उपनगर), ३. रूपेश परमार (ठाणे). महिला - १. भावना गोयल (ठाणे), २. प्राची साळुंखे (ठाणे), ३. भारती बडगे (गोंदिया).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images