Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

ग्रीनफिल्ड तीन वर्षांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत चिकलठाणा शिवारात विकसित करण्यात येणाऱ्या ग्रीनफिल्डचे काम पूर्ण होण्यास किमान ३८ महिने लागणार आहेत. ग्रीनफिल्डच्या विकासासाठी ११४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, जमिनी ताब्यात घेण्यासाठी ‘एसपीव्ही’ आता शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे ४० शेतकऱ्यांनी जमिनी ताब्यात देण्याची तयारी दर्शवली आहे.

केंद्र सरकारच्या स्मार्टसिटी प्रकल्पात औरंगाबाद शहराचा समावेश झाल्यानंतर एसपीव्हीच्या बैठका होण्यापलीकडे अद्याप काहीच काम झाले नाही. स्मार्टसिटीअंतर्गत चिकलठाणा शिवारात ग्रीनफिल्ड प्रकल्प करण्याचा उल्लेख स्मार्टसिटीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रकल्प अहवालात करण्यात आला आहे. महापालिकेने स्मार्टसिटीचा एकूण प्रकल्प १७४० कोटी रुपये किमतीचा तयार केला असून, त्यापैकी ११४० कोटी रुपये ग्रीनफिल्डच्या विकासावर खर्च केले जाणार आहेत. ग्रीनफिल्डमध्ये काम कसे करायचे, शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी ताब्यात घेताना नेमकी कोणती पद्धत अवलंबायची याबद्दल नियोजन केले जात आहे. स्मार्टसिटीच्या सर्व कामामध्ये एसपीव्हीची (स्पेशल पर्पज व्हेकल) भूमिका महत्त्वाची असणार आहे. एसपीव्हीच्या माध्यमातूनच स्मार्टसिटी प्रकल्पातील कामे केली जाणार आहेत. विविध कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल एसपीव्हीला करून देण्यासाठी सीएचटूएमएल या कंपनीची ‘पीएमसी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिकेने स्मार्टसिटीसाठी प्रस्ताव तयार करताना त्यात ग्रीनफिल्ड आणि पॅनसिटीचा उल्लेख केला आहे. ग्रीनफिल्ड ही महत्त्वाकांक्षी योजना असल्यामुळे ही योजना पूर्ण करावीच लागणार आहे, असे पालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी स्पष्ट केले. ११४० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे, असा उल्लेख त्यांनी केला. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घ्याव्या लागणार आहेत. जमिनी ताब्यात घेण्याची विशिष्ट पद्धत आहे. या पद्धतीनुसार जमिनी ताब्यात घेण्यास १८ महिने लागतील. त्यानंतर पुढील १८ ते २० महिन्यांत उर्वरित प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले. या कालावधीनंतर ग्रीनफिल्ड विकसित झालेले दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

घनकचरा व्यवस्थापनाचा डीपीआर
स्मार्ट सिटीअंतर्गत पॅनसिटीचा प्रकल्प देखील घेण्यात आला आहे. त्यात घनकचरा व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग आहे. जबलपूर व इंदूर या शहरात घनकचरा व्यवस्थापनाचे काम कसे चालते, याचा अभ्यास सीएचटूएमएल या पीएमसीच्या प्रतिनिधींनी केला आहे. अभ्यासानुसार ते डीपीआर तयार करणार आहे. एक महिन्यात हा डीपीआर तयार होईल, असे डी. एम. मुगळीकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घृष्णेश्‍वर मंदिर परिसर आता अतिक्रमणमुक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
महसूल व पोलिस प्रशासनाने कारवाई करत वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिराला अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त केले आहे. अनेक वर्षांपासून हा प्रश्न रेंगाळला होता. दुकानांच्या गर्दीत हरवलेल्या मंदिराचे दर्शन आता दूरवरूनच होत आहे.
श्री घृष्णेश्वर मंदिरासभोवती अनेक दुकान थाटण्यात आली होती. भाविकांच्या सुरक्षेसाठी यापूर्वी अनेकवेळा अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न झाला. काही प्रमाणात यशही मिळाले होते. पण, पुन्हा अतिक्रमण होत होते. येत्या सोमवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार असल्याने भाविकांची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे तहसीलदार डॉ. अरुण जऱ्हाड व पोलिस निरीक्षक हरीश खेडकर यांनी पुढाकार घेऊन गुरुवारी मंदिराच्या परिसरातील अतिक्रमणे काढली.
मंदिर परिसरातील अतिक्रमणे काढण्याबद्दल दुकानदार संघटना, मंदिर देवस्थान ट्रस्ट, प्रशासन यांच्यात अनेक वेळा चर्चा होऊनही ठोस होत नव्हती. त्यामुळे अतिक्रमण काढण्यापूर्वी मंदिर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तहसीलदार डॉ. जऱ्हाड, पोलिस निरीक्षक खेडकर, मंदिर देवस्थानचे विश्वस्त मंडळ व ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते. अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यापूर्वी दुकानदारांना साहित्य काढून घेण्यास संधी देण्यात आली. काही दुकानदारांनी स्वत: सामान व दुकाने काढली. पण, काही दुकानदार तयार होत नसल्याने प्रशासनाने कारवाई करत ती अतिक्रमणे जेसीबीच्या साह्याने काढली.

भाविकांची सोय
पुढील काळात पुन्हा अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार डॉ. अरूण जऱ्हाड यांनी दिला आहे. श्रावण महिना व शिवरात्रीनिमित्त दरवेळी अतिक्रमणांचा मुद्दा चर्चेत येत होता. यावेळी फक्त चर्चा न करता काहीप्रमाणात कारवाई करण्यात आली. यामुळे या श्रावण महिन्यात भाविकांची सोय होणार आहे.

सुरक्षेला प्राधान्य

श्री घृष्णेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर ९ मे २००६ रोजी एटीएसच्या कारवाईत मोठा शस्त्रसाठा, स्फोटके हस्तगत करण्याती आली होती. त्यावेळी एका दहशतवाद्याला टाटा सुमो गाडीसह पकडण्यात आले होते. तेव्हापासून या मंदिराच्या सुरक्षेबद्दल खबरदारी घेतली जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीत ‘लर्निंग डिसॅबिलिटी’ प्रमाणपत्र

$
0
0

घाटीत ‘लर्निंग डिसॅबिलिटी’ प्रमाणपत्र
‘ओपीडी’त दर बुधवारी मिळण्याची सोय; मुलांच्या चाचण्या, पालकांचे समुपदेशनही होणार
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) बहुप्रतिक्षित अध्ययन अक्षमता (लर्निंग डिसॅबिलिटी) केंद्र सुरू झाले असून, बाह्यरुग्ण विभागातील केंद्रामध्ये अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांची सर्वांगीण चाचणी, पालकांचे समुपदेशन तसेच अध्ययन अक्षमतेचे शासकीय प्रमाणपत्रही मिळणार आहे. हे शासकीय प्रमाणपत्र मिळण्याची सोय असलेले घाटी हे निदान जिल्ह्यातील एकमेव केंद्र आहे. दर बुधवारी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत हे प्रमाणपत्र दिले जाणार असून, शुक्रवारी (२१ जुलै) या केंद्राचे उद्घाटन झाले.
या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी घाटीच्या अभ्यागत समितीचे अध्यक्ष व आमदार अतुल सावे, आमदार संजय शिरसाठ, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, अभ्यागत समितीचे सदस्य नंदकुमार फुलारी, साधना सुरडकर, नारायण कानकाटे, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे आदींची छोटेखानी कार्यक्रमाला उपस्थिती होती. यानिमित्त घाटीचे विविध प्रश्न विधीमंडळात मांडू व ते सोडवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार सावे यांनी दिले, तर डॉ. येळीकर यांनी अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र महत्वाची भूमिका निभावेल, असे मनोगत मांडले. वैद्यकीय सामाजिक अधीक्षक नरेंद्र भालेराव यांनी सूत्रसंचालन केले.
शास्त्रीय पद्धतीने होणार चाचणी
ज्या मुलांना कोणतेही शारीरिक-मानसिक व्यंग-अपंगत्व नाही व ज्यांचा बुद्ध्यांक हा अगदी सर्वसामान्य आहे; परंतु तरीही ज्या मुलांना वाचन, लिखाण तसेच गणिताविषयीच्या मूलभूत समस्या आहे व टोकाचे प्रयत्न करुनही त्यामध्ये नगण्य सुधारणा होते, अशा मुलांमध्ये अध्ययन अक्षमता (लर्निंग डिसॅबिलिटी) असू शकते. अशा मुलांच्या सर्वांगीण चाचण्या करण्याची सोय घाटीतील मनोविकृती विभागाअंतर्गत सुरू झालेल्या केंद्रामध्ये झाली आहे. अशी मुले केंद्रामध्ये आल्यानंतर त्यांना कोणताही शारीरिक आजार-व्यंग-अपंगत्व नाही, याबाबत चाचण्या केल्या जातील. तसेच बुद्ध्यांक (आयक्यू) सामान्य असूनही वाचन-लिखाण-गणिताच्या समस्या आढळल्या तर त्यांच्या शास्त्रीय पद्धतीने चाचण्या करुन त्यांच्यात अध्ययन अक्षमता आहे किंवा नाही, असेल तर त्याची तीव्रता किती आणि अक्षमता नेमक्या कुठल्या प्रकारची, याचे निदान होईल. त्याचवेळी अशा प्रकारची अक्षमता असणाऱ्या मुलांच्या पालकांचे समुपदेशनही केले जाईल व ‘स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी’चे (एसएलडी) शासकीय प्रमाणपत्रदेखील संबंधित विद्यार्थ्याला दिले जाईल. या प्रमाणापत्राच्या आधारे संबंधित विद्यार्थ्याला परीक्षेसाठी लेखनिक मिळू शकतो. विशिष्ट प्रमाणात ग्रेस गुण मिळू शकतात व गणिताविषयी तीव्र समस्या असल्यास संबंधित विद्यार्थ्याला गणिताऐवजी दुसरा विषय घेण्याची परवानगी मिळू शकते, असे विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप देशमुख तसेच मानसतज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांमी ‘मटा’ला सांगितले.
‘डिस्लेक्सिया’चे प्रमाण सर्वाधिक
अध्ययन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे सरासरी १२ ते १५ टक्के आहे. यामध्ये सर्वाधिक ७० टक्के प्रमाण हे वाचन-लिखाणाची समस्या म्हणजेच ‘डिस्लेक्सिया’ असणाऱ्यांचे आहे. त्यानंतर २० टक्के प्रमाण गणिताची समस्या म्हणजेच ‘डिस्कॅल्कुलिया’ असणाऱ्यांचे व १० टक्के प्रमाण आकृत्या समजण्याविषयी गोंधळ म्हणजेच ‘डिसग्राफिया’ असणाऱ्यांचे आहे. मेंदुतील जन्मजात काही बदलांमुळे या समस्या उद्भवतात, ज्याला ‘न्युरो डेव्हलपमेंटल डिसॉर्डर’ म्हटले जाते, असेही डॉ. देशमुख व डॉ. शिसोदे यांनी स्पष्ट केले.

मुलांमधील अध्ययन अक्षमतेचे असे आहे चित्र
देशभरातील एकूण मुलांमधील प्रमाण….१२ ते १५ टक्के
यात वाचन-लिखाणाच्या समस्येचे प्रमाण….७० टक्के
गणिताची समस्या असणाऱ्यांचे प्रमाण….२० टक्के
आकृत्या समजण्याविषयी समस्यांचे प्रमाण…१० टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार जाधव यांची काँग्रेससोबत जवळीक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासोबत खटका उडाल्याने शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काँग्रेसशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांच्या मतदार संघातील विकासकामांचे उद्‍घाटन काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत शनिवारी होणार आहे.
आमदार जाधव यांच्यातर्फे तिडका ते कवळी, तिडका ते घाटनांद्रा, अंधानेर ते कोळवाडी व कन्नड शहरातील बडा बंगलास्थित शादी हॉल या विकासकामांचे शनिवारी उद्‍घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला आमदार सुभाष झांबड व माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांचीही उपस्थिती राहणार आहे. आमदार जाधव यांना शह देण्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयसिंग राजपूत यांना शिवसेनेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राजपूत यांनी सुद्धा त्यासाठी संमती दाखवल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर आमदार जाधव यांनी आघाडीतर्फे आयोजित या कार्यक्रमात काँग्रेस नेत्यांना निमंत्रित करण्याची खेळी खेळली असल्याचे बोलले जात आहे. पंचायत समितीमध्ये काँग्रेस व स्व. रायभानजी जाधव विकास आघाडी यांची सत्ता आहे. त्यामुळे या नियोजित कार्यक्रमाबद्दल बोलण्यास काँग्रेस व शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी बोलण्यास तयार नाहीत. आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी दोन ते अडीच वर्षे अवधी असल्याने त्याकडे दुर्लक्ष करण्याचे या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांचे धोरण आहे.

पोटात गोळा

आमदार जाधव यांनी सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणूक लढवून विधानसभा गाठली. तेथे वरिष्ठांसोबत मतभेद झाल्याने त्यांनी राजीनामाही दिला होता. पण, तो परत घेऊन टर्म पूर्ण केल्यानंतर यावेळी ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत. आता ते काँग्रेससोबत जवळीक करत असल्याने काँग्रेस इच्छुकांच्या पोटात गोळा आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भावयजीवर बलात्कार; पैठणमध्ये गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
लग्नाचे अामिष दाखवून भायानेचे वेळोवेळी बलात्कार केल्याची तक्रार विधवा भावजयीने केली आहे. हा प्रकार तालुक्यातील करंजखेड येथे घडला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेच्या तक्रारीनुसार, करजखेड येथील चाळीस वर्षीय महिलेच्या पतीचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. या पीडित महिलेचा सख्खा भाया अरूण बाबुराव रंधे (वय ६०, रा. करंजखेडा) याने गेल्या पाच वर्षांपासून तुझ्या मुलांचा सांभाळ करतो, असे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. वेळोवेळी शारीरिक संबध ठेवल्याने पीडित महिला गरोदर होऊन आठ दिवसांपूर्वी प्रसूत झाली आहे व एका मुलाला जन्म दिला आहे.
दरम्यान, भाया याने लग्नाचे आमिष दाखवून आपले शारीरिक शोषण करून फसवणूक केल्याचे महिलेच्या लक्षात आल्यावर या महिलेने पैठण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिच्या तक्रारीवरून अरूण रंधे यांच्या विरोधात पैठण पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पैठण पोलिस पुढील तपास करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दैठणाच्या शेतकऱ्याचा मुलगा झाला ‘सीए’

$
0
0

दैठणा बुद्रुकच्या शेतकऱ्याचा मुलगा झाला ‘सीए’

गावातील पहिलाच सीए ; शिक्षण घेता-घेता केले बहिणीला बीकॉम

dhananjay.kulkarni@timesgroup.com

औरंगाबाद - दैठणा बुद्रुक, जालन्यातील घनसावंगी भागातील ७०० उंबऱ्याचं छोटंस गाव... गावात शिक्षणाचा फारसा गंध नाही... एखाद्याने शिक्षण पूर्ण केलेच तर फक्त शिक्षक किंवा पोलिस याच दोन करिअरच्या वाटा ठरलेल्या... अशा गावात शेती करणारे उद्धव धांडे आणि ताराबाई धांडे यांचा मुलगा वैजिनाथ धांडे हा सीए झाला आहे. त्यामुळे अवघ्या गावाला झालेला आनंद अवर्णनीय.

घरात आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाहीच. आईवडिल आणि काकांचे एकत्र कुटूंब. ८/९ एकर जमीन, ती ही फारशी पीक हाती न देणारी जमीन. आई निरक्षर आणि वडील ६ वी शिकलेले. वैजिनाथचे काका भगवान धांडे व काकू मीरा धांडे यांचीही शेती व किराणा दुकान. वैजिनाथला दोन सख्ख्या बहिणी राधा आणि अनिता. राधाचे लग्न झाले, ती सहावी पास झाली होती. लहान बहीण अनिता हिनेही कुटूंबाच्या जबाबदारीनुसार पालकांनी लवकर लग्न करावे असे वाटत होते, परंतु वैजिनाथने तसे होऊ दिले नाही. तिला त्याने बी.कॉम.पर्यंत शिकविले. स्वत: वैजिनाथ हा १० वीपर्यंत आईवडिलांसोबत शेतीत काबाडकष्ट करायचा. सहावीपर्यंत गावातल्या जिल्हा परिषदेच्याशाळेत शिक्षण झाल्यावर दहावीपर्यंतचे शिक्षण दूधना तळेगावातील शाळेत झाले. नंतर बारावीपर्यंत जालन्याच्या एसबी कॉलेजमध्ये अन् मत्स्योदरी संस्थेच्या कॉलेजमध्ये बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण झाले. प्राचार्य आर. जे. गायकवाड आणि प्रशासकीय अधिकारी बी. जी. गायकवाड यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. पुढे औरंगाबादला देविगरी कॉलेजला एम.कॉमचे शिक्षण घेतले. सीएचा अभ्यासक्रमही सुरूच होता. ४ वेळा सीएच्या ग्रुप २ आणि १ अशा परीक्षा दिल्या. अखेर यंदा सीए पूर्ण झाले.

सीए करताना ‘भारतीया-साहुजी-वाघमारे’ या सीए फर्ममध्ये आर्टिकलशीप केली. बी.कॉम.-एम.कॉम. झाल्यावर हडकोच्या कुलदीप कोचिंग क्लासेसमध्ये कॉमर्सचे धडे देऊ लागला. तेथून गाठीला चार-पाच हजार रुपये येऊ लागले. त्याचसोबत तीन वर्षे आर्टिकलशीप करताना ती फर्म त्याला तीन हजार रुपये महिना देत असे. यातून त्याने बहीण अनिताला औरंगाबादेत बी.कॉम. करण्यासाठी मदत केली.

रवींद्रनगर या भागात तो एक खोली घेऊन राहत असून बहिणीला त्याने आता एमपीएससी करीत आहे. या यशाचे श्रेय तो आईवडिल, गायकवाड सर आणि भारतीया-साहुजी- वाघमारे यांना देतो. भविष्यात जालना-औरंगाबाद येथे स्वत:ची फर्म सुरू करायची असून स्वतःचा व्यवसाय करायचा असे त्याने ठरवले आहे. यासाठी तो काही मित्रांसोबत जालना येथे सीएची प्रॅक्टिस सुरू करणार आहे. औरंगाबादेतही लवकरच प्रॅक्टिस सुरू करणार आहे. या करिअरविषयी त्याला गावात जनजागृती करायची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४४ अतिक्रमणधारकांना एसटी महामंडळाची नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
बसस्थानकाची मालकी असलेल्या सुमारे दोन एकर जागेत अतिक्रमण करणाऱ्या ४४ नागरिकांना एस. टी. महामंडळाने नोटीस बजावून आठ दिवसात जागा रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. नोटीसमुळे हवालदिल झालेल्या नागरिकांनी कोर्टाची पायरी चढण्याचे संकेत दिले आहेत.
पैठण शहराच्या मध्यभागी एस. टी. महामंडळाची जवळपास सात एकर जागा असून त्यापैकी पाच एकरवर बसस्थानक आहे. उर्वरित एक एकर ३४ गुंठे जागा रिकामी पडलेली आहे. या जागेवर दोन वर्षांपूर्वी जवळपास ५० नागरिकानी अतिक्रमण करून पत्र्याचे शेड उभे केले आहेत. यातील बहुतांश अतिक्रमणधारकांना नगर पालिकेने नळ कनेक्शन व महावितरणने वीज मीटर दिलेले आहे. एस. टी. महामंडळाच्या जागेवरील अतिक्रमणामुळे शहराला बकालपणा आल्याने स्थानिक नागरिकांनी ते काढण्याची मागणी केली होती.
दोन वर्षांपासून डोळेझाक करून बसलेल्या एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी जाग आली. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात ४४ जणांना नोटीस बजावली. बसस्थानकाचे विस्तारीकरण व सुशोभीकरण करायचे असल्याने एक एकर ३४ गुंठे जागेवरील अतिक्रमण आठ दिवसात काढून घ्यावे, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

खळवाडी असल्याचा दावा

‘वरिष्ठांच्या आदेशानुसार एस. टी. महामंडळाच्या जागेवरील अतिक्रमणधारकाना नोटीस दिल्या आहेत. त्यानुसार आठ दिवसात आम्ही आमची जागा अतिक्रमण काढून ताब्यात घेणार आहोत,’ असे पैठण बसस्थानकाचे व्यवस्थापक एस. बी. जवळेकर यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षांपासून येथे राहत आहेत. ही जागा एस. टी. महामंडळाची नसून खळवाडी आहे, असा दावा येथील रहिवासी रामकिसन चन्नेकर यांनी केला. नगर पालिका व महावितरणने नळ व वीज कनेक्शन दिलेले आहे. पुढील कार्यवाही टाळण्यासाठी कोर्टात दाद मागणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जबाबदारीच्या टोलवाटोलवीतून सीईओंच्या खुर्चीवर जप्तीची नामुष्की

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
सरकारी कार्यालयात काम करताना आपल्या अंगावर कोणते भलतेच झेंगट येऊ नये, यासाठी बहुतांश कर्मचारी कातडीबचाव धोरण स्वीकारतात. आलेल्या कागदाचे वाचन करता ते दुसऱ्याकडे धाडण्याची गडबड केली जाते. जबाबदारीच्या टोलवाटोलवीतूनच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर जप्तीची नामुष्की ओढावली आहे. जप्तीनंतर जिल्हा परिषदेत फाइलची चौकशी सुरू केल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यामुळे सीईओ संतापले.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत अंधारी (ता. सिल्लोड) येथील शाळा बांधण्याच्या कामास १९८८मध्ये मंजुरी दिली गेली होती. त्यावेळी कामावरून तत्कालीन अधिकारी आणि कंत्राटदारामध्ये बेबनाव निर्माण झाला. प्रकरण कोर्टात गेले. कोर्टाचा निकाल कंत्राटदाराच्या बाजूने लागला. झेडपी प्रशासन हायकोर्टात गेले, कालांतराने हे प्रकरण पुन्हा जिल्हा कोर्टात आले. एप्रिल २०१७मध्ये न्यायालयाने निकाल देत कंत्राटदाला नुकसानभरपाईसह रक्कम अदा करावी, असे आदेश दिले. त्याची अंमलबजवाणी न झाल्याने मंगळवारी कोर्टाच्या आदेशाने सीईओंच्या दालनातील खुर्ची आणि पाच कम्प्युटर जप्त करण्यात आले. नेमकी कुणाच्या दुर्लक्षामुळे ही नामुष्की ओढावली याचा शोध प्रशासनाकडून घेताना अनेक गमतीशीर बाबी समोर आल्या.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१७मध्ये कोर्टाच्या आदेशाची प्रत बांधकाम विभागात पोचली. कार्यकारी अभियंत्यांनी त्यावर अभिप्राय लिहित संबंधित कर्मचाऱ्याकडे प्रत पाठविली. मध्येच एका कर्मचाऱ्याने त्यावरील नावाचा उल्लेख बदलून दुसऱ्याच टेबलवर पाठविला. बांधकाम विभागात चार ठिकाणच्या बांधकामाची कोर्टप्रकरणे सुरू आहेत. त्यात एका कर्मचाऱ्याने दुसऱ्याच गावाचे नाव लिहिले आणि हा कागद चौथ्या टेबलवर पोचला. तेथून पुढचे तीन महिने काहीच हालचाल झाली नाही. कोर्टाच्या प्रकरणांची माहिती सामान्य प्रशासन आणि सीईओ कार्यालयाला मिळते या अविर्भावात बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने पाहिलेच नाही. मंगळवारी जेव्हा जप्तीची नामुष्की ओढावली. त्यानंतर दोन दिवस नुकतीच प्रकरणाची खमंग चर्चा होत होती, पण नेमकी चूक कोणाची याच्या खोलात जाण्याचे आदेश सीइओ अर्दड यांनी दिले. त्यानंतर शुक्रवारी अनेक गोष्टी समोर आल्या. कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षाचा फटका मात्र सीईओ कार्यालयाला बसला आहे.

या प्रकरणाकडे गांभीर्याने न पाहिलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाईल. त्यात दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. कामात कुठलीही दिरंगाई अजिबात खपवून घेतली जाणार नाही.
- मधुकरराजे अर्दड, सीईओ, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ ‘स्थायी’त गोंधळ झाला तर सर्वसाधारण सभेतही होणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, लातूर
स्थायी समितीचे अध्यक्षपद काँग्रेसकडे आल्याचा राग मनात धरून स्थायी समितीच्या बैठकीत कारण नसताना सत्ताधारी नगरसेवकांनी गोंधळ घातला. त्यामुळे या प्रकारची प्रतिक्रीया ही सर्वसाधारण सभेत उमटणार आहे. यापुढील काळात स्थायीची सभा शांततेत पार पडली तरच सर्वसाधारण सभा शांततेत होईल, असा इशारा स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर यांनी विरोधी पक्षनेते अॅड. दीपक सुळ यांनी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
लातूर महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत विरोघी पक्षाच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. या सभेत नेमके काय झाले ? काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे ? या विषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती.
अॅड. दीपक सुळ यांनी सभेत मंजूर करण्यात आलेले विषय हे बेकायदेशीर आहेत, नगर सचिवाने एकाही विषयाच वाचन केल नाही. त्यामुळे महापौरांनी पुन्हा एकदा सभा बोलवावी सर्वांना बोलू द्यावे आणि त्यानंतर निर्णय करावेत अशी मागणी केली.
महापौरांनी सभा बोलावली नाही तर विभागीय आयुक्ताकडे जाऊ, न्यायालयात जाऊन दाद मागू असे ही त्यांनी सांगितले. जे विषय काँग्रेसच्या काळातच मंजूर झालेले आहेत ते पुन्हा मंजुरीसाठी कशासाठी ठेवण्यात आल्याचा सवाल करून शहरातील पार्किंगचा प्रश्न त्याच काळात सोडविलेला असून त्या काळात टेंडर ही दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी २६७ कोटी रुपयांचे विविध विकास कामांचे प्रस्ताव पाठविण्याचे सांगितले आहे. मंजूर केलेले नाहीत, तरी सुद्धा शहरभर मुख्यमंत्र्याच्या फोटो लावून त्यांच्या आभाराचे फलक लावले जात आहेत. ही जनतेची फसवणूक असल्याचा आरोप ही यावेळी अॅड. सुळ यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी पाणी टंचाईच्या काळात ज्या योजना मंजूर केल्या. त्यातील फक्त टँकरसाठीचे आठ कोटी रुपये आले असून नऊ कोटी रुपये येणे बाकी आहे. बाकीच्या योजनेचे तर काहीच झाले नसल्याचे यावेळी सूळ यांनी स्पष्ट केले.


‘दोन्ही बाजुने विकासासाठी चर्चा व्हावी’
सभेत गोंधळ करण्याची तयारी करूनच महापौर आले असल्याची टीका अॅड. सूळ यांनी केली. सभेला समोर जाणे, चर्चा करणे हे त्यांना मान्य नाही. सभेतून पळून जाण्याचा त्यांचा इतिहास असल्याचे ही त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी अशोक गोविंदपूरकर यांनी दोन्ही बाजुने विकासासाठी चर्चा झाली नाही तर असेच होणार असल्याचे सांगून स्थायीत गोंधळ झाला म्हणूनच सर्वसाधारण सभेत गोंधळ होणारच असे सांगून गोंधळाचे समर्थन केले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष मोईज शेख, व्यंकटेश पुरी, नगरसेवक विजय साबदे, ओमप्रकाश पडीले, सपना किसवे आदिची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटीबस खरेदीवरून प्रशासन अडचणीत

$
0
0

खासगीकरण बारगळले, सिटीबस खरेदीवरून प्रशासन अडचणीत
संपूर्ण शहरासाठी तयार केला जाणार ‘डीपीआर’
म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
खासगीकरणातून सिटीबस चालवण्याचा प्रस्ताव बारगळण्याच्या स्थितीत आलेला असल्यामुळे बस खरेदी करून त्या ठराविक मार्गावर चालविण्याचा मनोदय पालिकेच्या प्रशासनाने व्यक्त केला, पण त्यात अनेक त्रुटी असल्याचे लक्षात आल्यावर प्रशासन अपसूकच बॅकफूटवर आले. आता संपूर्ण शहरासाठी सिटीबसचा ‘डीपीआर’ तयार केला जाणार आहे.
औरंगाबाद शहरात सिटीबस सेवेची अत्यंत गरज आहे हे लक्षात घेवून महापालिकेचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी खासगीकरणातून सिटीबस सेवा सुरू करण्यासाठी वेगवान हालचाली सुरू केल्या. त्यासाठी त्यांनी एका संस्थेशी देखील संपर्क साधला. संस्थेने सिटीबस चालवण्याबाबत एक प्रस्ताव सादर केला. प्रस्ताव सादर करताना काही अटी घालण्यात आला. अटींचा समावेश असलेला प्रस्ताव पालिकेतर्फे राज्य शासनाच्या परिवहन खात्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. परिवहन खात्याने त्यावर अद्याप काहीच निर्णय घेतला नाही. अटी मान्य होण्याची शक्यता नसल्यामुळे हा प्रस्ताव बारगळेल, असे मानले जात आहे. त्यामुळे पालिकेच्या प्रशासनाने नवीन शक्कल लढवली. गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ३४ आसन क्षमतेच्या १३ मिनीबसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडला. एसटी महामंडळातर्फे सध्या ३२ बसेसच्या माध्यमातून सिटीबसची सेवा दिली जात आहे. सिटीबसचे १३ मार्ग महामंडळाने बंद केले आहेत. या मार्गावरील बसेस महामंडळाने काढून घेतल्या आहेत. त्यामुळे या मार्गावर सिटीबस चालवण्यासाठी १३ बसेस विकत घेणे गरजेचे आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले. ‘नाविण्यपूर्ण योजनेतून’ या बसेस खरेदी करणे शक्य आहे. एका बसच्या खरेदीसाठी १९ लाख २७ हजार ४२५ रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. १३ बसेससाठी तीन कोटी पन्नास लाख रुपये खर्च येईल. हा खर्च जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकेल, असा दावा पालिकेच्या प्रशासनाने केला.
प्रशासनाचा हा दावा नगरसेवकांनी खोडून काढला. शिवसेनेचे राजू वैद्य, नंदकुमार घोडेले यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांपुढे अधिकारी निरूत्तर झाले. १३ बसेस घेणार , पण त्या चालवणार कशा ? महापालिकेकडे सिटीबस चालवण्यासाठी पायाभूत सुविधा आहेत का ? चालक - वाहक, डेपो, मेकॅनिक्स याची व्यवस्था कशी केली जाणार आहे. नेमक्या कोणत्या मार्गावरून या बसेस चालवण्यात येणार आहेत ? फक्त तेराच बसेस खरेदी का करायच्या, संपूर्ण शहराचा विचार करून बस खरेदीचा प्रस्ताव का तयार करण्यात आला नाही, असे विविध प्रश्न विचारून प्रशासनाला कोडींत पकडण्यात आले. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर आयुक्त मुगळीकर किंवा शहर अभियंता सिकंदर अली यांना देता आले नाही. त्यामुळे संपूर्ण शहरासाठी सिटीबसचा ‘डीपीआर’ (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करा, तो शासनाकडे पाठवा. शासनाकडून आपण या प्रकल्पासाठी निधी आणू, असे नगरसेवकांनी प्रशासनाला सांगितले. त्यामुळे बस खरेदीचा अर्धवट ठेवलेल्या प्रस्ताव प्रशासनाला परत घ्यावा लागला.
‘डीपीआर’ बद्दल शंका
सिटीबस सेवेच्या खासगीकरणा पाठोपाठ १३ बसेस खरेदी करण्याचा मनसुभा देखील उधळला गेल्यामुळे पालिकेचे प्रशासन डीपीआर तयार करण्यासाठी यंत्रणा उभी करेल की नाही या बद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी कर्जमाफीचे लाभार्थी ठरेनात

$
0
0

औरंगाबाद ः शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपये कर्जमाफी देण्याच्या घोषणेला ४० दिवस उलटले, मात्र अद्याप जिल्ह्यातील किती शेतकरी कर्जमुक्ती होणार, याचा नेमका तपशील स्पष्ट झालेला नाही. विविध कार्यकारी सोसायटीच्या सचिवांचा संप आणि लाभार्थी निवडीसंदर्भात अस्पष्ट मार्गदर्शक सूचना यांमुळे लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पूर्ण झालेली नाही. दरम्यान, शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे जिल्हा सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यामध्ये १३८ शाखा अाहेत. बँकेचे दोन लाख ५८ हजार खातेदार आहेत. एकूण २ लाख १४ हजार कर्जदार आहेत. त्यांच्याकडे मुद्दल व व्याज धरून एकूण ७७१ कोटीचे कर्ज आहे. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा यापैकी ८० ते ८५ हजार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ होईल, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या २० दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत हा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, सुमारे ७५ हजार शेतकऱ्यांनी १९४ कोटी रुपयांच्या पिककर्जाची परतफेड ३० जूनपूर्वीच केली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.

जिल्हा मध्यवर्ती बँकांचे बहुतेक कर्ज हे विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत वाटप केले जाते. या सोसायट्यांचे सचिव संपावर गेले आहेत. त्यामुळे दीड लाखांच्या आतील व वरील कर्जदार शेतकरी कोण, याची अचूक माहिती मिळविण्यास विलंब होत आहे. कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार करण्यासाठी बँकेचे कर्मचारी प्रयत्नशील आहेत. येत्या काही दिवसांत यादी तयार करून जिल्हा उपनिबंधक (सहकार) कार्यालयाकडे सादर करण्यात येईल.

दरम्यान, कर्जमाफीसंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे सरकारकडून अद्याप प्राप्त झालेली नाहीत. त्यामुळेही लाभार्थी शेतकरी नेमका कोण, त्यांची निवड कशी करावी याबाबत संभ्रमाची स्थिती असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेनेकडून याद्यांची मागणी
शिवसेनेने जिल्हा बँकेसमोर नुकतेच आंदोलन केले होते. कर्जमाफी घोषणेचा किती शेतकऱ्यांना लाभ झाला, याची माहिती यावेळी मागण्यात आली होती. त्यानंतर शिवसेनाच्या काही कार्यकर्त्यांनी शुक्रवारी बँक अधिकाऱ्यांची भेट घेऊन यादीची मागणी केली. त्यावर यादी तयार करण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

तातडीच्या कर्जासाठी अर्जच नाही
३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या खरिपासाठी तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपये देण्याचा शासन निर्णय आहे. या आदेशानुसार; जिल्हा बँकेने ३० कोटी रुपयांची तरतूद केली, पण अद्यापही कोणीही त्यासाठी अर्ज केला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलंब्रीच्या भाविकांवर काळाचा घाला

$
0
0

वृत्तसंस्था, चामोली/म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
उत्तराखंडातील चामोली जिल्ह्यामध्ये यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळल्यामुळे फुलंब्री तालुक्यातील दोन महिलांचा मृत्यू झाला, तर ३३ जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. हे यात्रेकरू निधोना आणि पाडळी या गावांतील आहेत.

भागूबाई साबळे (वय ६५), ठगूबाई साबळे (वय ६०, दोघी रा. पाडळी) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत. फुलंब्री तालुक्यातील निधोना आणि पाडळी येथील ३३ भाविक चारधाम यात्रेसाठी गेले होते. या यात्रेकरूंनी शुक्रवारी बद्रीनाथाचे दर्शन घेतल्यानंतर, केदारनाथकडे जात होते. कर्णप्रयागमध्ये बद्रीनाथ महामार्गावरील उमादेवी लाउंजजवळ ही बस दरीमध्ये कोसळली. यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच, पोलिस तातडीने घटनास्थळी पोचले आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले. तीन यात्रेकरू गंभीर जखमी झाले होते. त्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने डेहराडून येथे हलविण्यात आल्याची माहिती चामोलीच्या पोलिस अधीक्षक तृप्ती भट्ट यांनी दिली. अन्य जखमींना कर्णप्रयाग येथे दाखल करण्यात आले आहे.

आणि अस्वस्थता पसरली
फुलंब्री तालुक्यातील निधोना व पाडळी ३३ यात्रेकरून दहा जुलै रोजी चारधाम यात्रेसाठी रवाना झाले होते. ही यात्रा २० दिवसांची होती आणि हा गट ३० जुलै रोजी परत येणार होता. यात्रेला गेलेले रावसाहेब राऊतराय यांनी शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास गावात फोन केला. ‘आमची बस दरीत कोसळली. १५ यात्रेकरू किरकोळ जखमी आहेत, तर बाकी जण गंभीर असून आम्हा सर्वांना अॅडमिट केले आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतर त्यांचा फोन कट झाला. ही माहिती समजताच गावात एकच धावपळ सुरू झाली. गावातील सर्व जण यात्रेला गेलेल्या यात्रेकरूंशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, संपर्क होत नव्हता.

यात्रेला गेलेले भाविक
निधोना : कारभारी मनसाराम गाडेकर, भागूबाई कारभारी गाडेकर, रावसाहेब भानुदास राऊतराय, विनायक देवराव राऊतराय, विमल विनायक राऊतराय, आप्पाराव राऊतराय, संगीता आप्पाराव राऊतराय, नर्मदा कारभारी राऊतराय, संदीप काकासाहेब राऊतराय, नंदा किसन राऊतराय, नारायण रामचंद्र राऊतराय, चंद्रकला नारायण राऊतराय, नाना भावराव गाडेकर, सुलाबाई सोनाजी राऊतराय, काकासाहेब लक्ष्मण गाडेकर, खंडू किसनराव गाडेकर, विठाबाई खंडू गाडेकर, विलास शेनफडू गाडेकर, रावसाहेब प्रभू गाडेकर, नारायण व्यवहारे, हिराबाई देविदास गाडेकर, वंदना संदीप राऊतराय, कडूबाई लक्ष्मण गाडेकर, चंद्रकांत विठ्ठल काथार, जिजाबाई प्रभू गाडेकर.
पाडळी : साहेबराव तुळशीराम साबळे, शेनफडू देवराव दाभाडे, भागूबाई तुळशीराम साबळे, ठगूबाई साबळे, विमल शेनफडू दाभाडे, अंतिका महादू साबळे, विलास तात्याराव साबळे.

मोठा अनर्थ टळला
अपघातग्रस्त बस कोसळल्यानंतर दरीच्या मध्यावर अडकली. त्यामुळे जीवितहानी टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या दरीच्या खाली अलकनंदा नदी पावसामुळे दुथडी भरून वाहात आहे. ही बस नदीमध्ये कोसळली असती, तर मोठी जीवितहानी झाली असती, असे चामोलीच्या पोलिस अधीक्षक भट्ट यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाकुने भोसकले; युवकास चार वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मारहाण करीत चाकुने भोसकणाऱ्या तरुणाला चार वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. एन. राजे यांनी शुक्रवारी ठोठावली.
या प्रकरणी फेरोज बेग बाबा बेग (वय २७, रा. अन्सार कॉलनी, पडेगाव, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, ५ ऑक्टोबर २०१५ रोजी आरोपी मोहम्मद अजहर मोहम्मद हनीफ (वय २०, रा. अन्सार कॉलनी) हा दुचाकीवर आला आणि त्याने फिर्यादीला त्याच्या घरासमोर धडक दिली. फिर्यादी व त्याच्या आई-वडिलांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तिघांना शिविगाळ, मारहाण केली. त्यानंतर आरोपी त्याच दिवशी सायंकाळी पाचच्या सुमारास चाकू घेऊन आला आणि फिर्यादीचा पुतण्या शहाबाज बेग शेरू बेग (वय १८) याच्या पोटात चाकुने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. इतरांनाही जीवे मारण्याच्या धमक्या देत पळून गेला. या प्रकरणी कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६ अन्वये छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक ए. एस. कुरूंदकर व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक व्ही. बी. घेरडे यांनी तपास करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात पैरवी म्हणून बी. वाय. किरडपाटील यांनी काम पाहिले.

कोर्टाकडून वयाचा विचार

खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील अनिल हिवराळे यांनी १० साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये फिर्यादीचा जखमी पुतण्या तसेच फिर्यादीची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजुंचे युक्तिवाद व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने आरोपीला कलम ३०७ अन्वये चार वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास ठोठावला. आरोपीला शिक्षा ठोठावताना कोर्टाने आरोपीच्या वयाचा तसेच पहिलाच गुन्हा असल्याची दखल घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘एमपीएससी’त चुकांचा रतीब

$
0
0

औरंगाबाद: ‘एमपीएससी’ (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षेत चुकीच्या प्रश्नांचा रतीब सुरू असून, रविवारी (१६ जुलै) झालेल्या प्रश्नपत्रिकेत तब्बल १२ प्रश्न संदिग्ध असल्याने परीक्षार्थी हवालदिल झालेत. या वर्षी आजवर झालेल्या चार परीक्षेत हाच प्रकार सुरू असल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू आहे.
पोलिस उपनिरीक्षक आणि मंत्रालय सहाय्यक पदांसाठी रविवारी पूर्वपरीक्षा झाली. शंभर गुणांच्या या प्रश्नपत्रिकेची पहिली ‘उत्तर सूची’ आयोगाने सोमवारी जाहीर केली. त्यातून जवळपास बारा प्रश्न संदिग्ध असल्याचे समोर आले आहे. आता दुसरी ‘उत्तर सूची’ जाहीर केल्यानंतर हे प्रश्न आयोग पूर्वीप्रमाणे रद्द करेल. याचा विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. यावर्षी आयोगाने २९ जानेवारी रोजी विक्रीकर निरीक्षक पदांसाठी पूर्व परीक्षा घेतली. १०० गुणांच्या या प्रश्नपत्रिकेची दुसरी ‘उत्तर सूची’ १८ एप्रिल रोजी जाहीर केली. त्यात आठ प्रश्न रद्द केले होते, तर सात प्रश्नांची उत्तरे बदलली होती. १२ मार्च रोजी पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पूर्व परीक्षा झाली. शंभर गुणांच्या या प्रश्नपत्रिकेची दुसरी ‘उत्तर सूची’ ११ मे रोजी जाहीर केली. यात पाच प्रश्न रद्द केले, तर एका उत्तरात बदल केला. आयोगाच्या सतत सुरू असलेल्या या भोंगळ कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

पेपरमध्ये चुकाच चुका
दोन एप्रिल रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रत्येकी दोनशे गुणांचे दोन पेपर झाले. याची दुसरी ‘उत्तर सूची’ १३ जुलै रोजी जाहीर झाली. त्यातील ‘सामान्य अध्ययन’ या पहिल्या पेपरमधील चार प्रश्नांची उत्तरे बदलली. सोबतच यातील दुसरा पेपर ‘नागरी कल चाचणी सेवा’मधील पाच प्रश्न रद्द केले, तर चार प्रश्नांची उत्तरे बदलली.

दोन एप्रिलला झालेल्या परीक्षेची पहिली ‘उत्तर सूची’ पाच एप्रिलला जाहीर झाली. त्यात नापास झालो असे धरून मुख्य परीक्षेचा अभ्यास सोडून दिला. आता दुसऱ्या ‘उत्तर सूची’मध्ये नऊ प्रश्नात बदल झाले. त्यावरून मी उत्तीर्ण होणार हे नक्की आहे, मात्र आता अभ्यासाला कमी वेळ आहे. - गणेश साळवे, परीक्षार्थी, राज्यसेवा पूर्व परीक्षा

पहिली ‘उत्तर सूची’ जाहीर केल्यानंतर विद्यार्थी आक्षेप नोंदवतात. आयोगाला दुसऱ्या ‘उत्तर सूची’मध्ये बदल करावे लागतात. वर्षभर प्रत्येक परीक्षेत जवळपास आठ ते दहा प्रश्नांत बदल झाले. यामुळे दहा-दहा तास अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. - रवींद्र चाटे, परीक्षार्थी, राज्यसेवा पूर्व

हजारो विद्यार्थी जीवाचे रान करून परीक्षा देतात. या वर्षी जवळपास सर्व परीक्षांमधील दहा प्रश्न चुकले. ते ऐनवेळी रद्द केले. आयोगाची उत्तर सूची जाहीर करून एकीकडे पारदर्शी कारभाराकडे वाटचाल सुरू आहे. आता या चुकाही टाळाव्यात. प्रश्नपत्रिका तयार करताना काळजी घेतली जावी. - केतन पाटील, युनिक अॅकॅडमी, पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ एमफिल सीईटी १६ ऑगस्टला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची एमफिल ऑनलाइन सीईटी १६ ऑगस्ट रोजी होणार आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया शनिवारी सुरू होणार आहे, अशी माहिती प्रभारी अधिकारी डॉ. सतीश पाटील यांनी दिली.

विद्यापीठातील १८ विभागांत एमफिल अभ्यासक्रम आहे. मराठी, हिंदी, उर्दू, पाली, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, शारिरीक शिक्षणशास्त्र, लोकप्रशासन, ग्रंथालयशास्त्र, वाणिज्यशास्त्र, पत्रकारिता, गणित, व्यवस्थापनशास्त्र, संगणकशास्त्र आदी विभागांचा समावेश आहे. या ‘सीईटी’चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. प्रवेशपूर्व परीक्षा ऑनलाइन होणार असून ‘निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम’ आहे. प्रत्येक चुकलेल्या प्रश्नाचे ०.२५ गुण (चार प्रश्नाला एक गुण) वजा होणार आहे. ‘पेट’च्या धर्तीवर प्रक्रिया राबविण्यात येईल. तसेच सर्व विभागांची एकच सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. अधिक माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याबाबत आढावा घेण्यासाठी प्रभारी अधिकारी डॉ. सतीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक झाली. यावेळी अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. मजहर फारुकी, डॉ. दिलीप खैरनार, डॉ. संजय साळुंके आदींची उपस्थिती होती.

एमफिलचे वेळापत्रक

- नोंदणी व ऑप्शन फॉर्म भरणे - २२ जुलै ते ५ ऑगस्ट
- ऑनलाइन सीईटी - १६ ऑगस्ट
- प्रथम यादी - २१ ऑगस्ट
- द्वितीय यादी - २६ ऑगस्ट
- स्पॉट अ‍ॅडमिशन - २९ ऑगस्ट
- तासिकांना सुरुवात - १ सप्टेंबर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ अर्जित रजा तातडीने संपवा !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ व परीचर यांच्या अर्जित रजांचे रोखीकरण होणार नसल्यामुळे रजा संपवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. हा तुघलकी आदेश बदलून कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मार्गी लावण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी सेवक संघाने केली आहे. याबाबत शिष्टमंडळाने कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांना शुक्रवारी निवेदन दिले.

विद्यापीठातील विज्ञान विभागातील शिक्षकेतर कर्मचारी प्रयोगशाळा तंत्रज्ञ व परीचर तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या अडचणींचा मुद्दा ऐरणीवर आहे. कर्मचाऱ्यांना विद्यापीठ प्रशासनाने अचानक सुटीतील कर्मचारी म्हणून ग्राह्य धरून अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ बंद केला आहे. आतापर्यंत साठवलेल्या रजा उपभोगून संपवण्याचा आदेश काढला आहे. अनेक कर्मचारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना रजा कशा संपवणार असा प्रश्न आहे. तीनशे दिवस अर्जित रजा रोखीकरण नसल्यामुळे कर्मचारी हवालदिल झाले आहेत. सुटीतील इतर पदांना अर्जित रजा रोखीकरण देताना या कर्मचाऱ्यांवर अन्याय का असा सवाल विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी केला आहे. अनेक कर्मचाऱ्यांची २० वर्षांची सेवा असूनही कालबद्ध पदोन्नती देण्यात आलेली नाही. तसेच भविष्य निर्वाह निधीच्या जमा रकमेचे पत्रक गेल्या तीन वर्षांपासून कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. पत्र तात्काळ देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर डॉ. कैलास पाथ्रीकर, प्रकाश आकडे व पर्वत कासुरे यांची स्वाक्षरी आहे.

आकृतीबंध सादर करा
विद्यापीठातील मंजूर पदाचा आकृतीबंध शासनास तात्काळ सादर करावा. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त ११० पदांची भरती करताना विद्यापीठात अनेक वर्षांपासून रोजंदारीवर काम करणाऱ्यांना प्राधान्य देण्याची मागणी संघटनेने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘त्या’ अधिकाऱ्यांचे पाय गाळात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेतील निलंबित अधिकाऱ्यांचे पाय गाळात पुरते रुतले असून त्यांचे निलंबन एका प्रकरणात करण्यात आले असून, आता विभागीय चौकशी मात्र दुसऱ्याच प्रकरणात होणार आहे. त्यासाठी सर्वसाधारण सभेच्या मान्यतेची आवश्यक आहे, असे मत आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी व्यक्त केले.

पालिकेतील शहर अभियंता सखाराम पानझडे, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. डी. पी. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता, पण महापौरांनी तो स्थगित ठेवला. याच संदर्भात शुक्रवारी पत्रकारांनी आयुक्तांची भेट घेऊन अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले, ‘सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाल्याशिवाय विभागीय चौकशी करता येत नाही. त्यामुळे मान्यतेसाठी तो प्रस्ताव सभेत ठेवण्यात आला होता.’ निलंबित अधिकारी व सध्या कार्यरत असलेले अधिकारी यांची एकत्रित विभागीय चौकशी कशी काय असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले, ‘जे अधिकारी निलंबित आहेत त्यांचे निलंबनाचे प्रकरण वेगळे आहे. ज्या प्रकरणात विभागाय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे, त्या प्रकरणाचा आणि निलंबनाच्या प्रकरणाचा काहीही संबंध नाही. पानझडे, डॉ. कुलकर्णी, शिवाजी झनझन व डॉ. बी. एस. नाईकवाडे यांना ज्या प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे, त्यांची त्या प्रकरणात विभागीय चौकशी करण्यासाठी अधिकारी नियुक्त करा असे पत्र शासनाला पाठवण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांवरील दोषारोपपत्र देखील शासनाकडे देण्यात आले आहे. शासनाने चौकशी अधिकारी नियुक्त करताच सादरकर्ता अधिकाऱ्याची नेमणूक करून चौकशी सुरू केली जाणार आहे. शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेतील विभागीय चौकशीचा प्रस्ताव इआरपी सिस्टीम आणि २४ कोटींचे रस्ते याबद्दलचा होता.’

शौचालय अनुदान; अधिकाऱ्यांचे हात मैले
‘स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी वाटप करण्यात येणाऱ्या अनुदानात अधिकारी - कर्मचारी हजार-दोन हजारांची चिरीमिरी घेतात. त्याशिवाय लाभार्थींनी अनुदान मिळत नाही,’ असे गंभीर आरोप नगरसेवकांनी केले आहेत.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत औरंगाबाद शहरात ७९९७ वैयक्तिक शौचालय बांधण्याचे टार्गेट शासनाने महापालिकेला दिले आहे. त्यानुसार २५०० शैचालये बांधणे अद्याप बाकी आहे. शासनाने यासाठी ३० जुलै ही अंतिम तारीख दिली होती. या तारखेनंतरही काम सुरूच आहे. वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी शासनातर्फे पंधरा हजार रुपयांचे अनुदान लाभार्थीला दिले जाते. हे अनुदान अपुरे असल्यामुळे पालिकेच्या फंडातून जास्तीचे तीन हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. एका लाभार्थीला आता अठरा हजार रुपये मिळणार आहेत.

‘लाभार्थीला वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी पालिकेचे काही कर्मचारी हजार - दोन हजार रुपयांची मागणी करतात,’ असा गंभीर आरोप नगरसेवक चेतन कांबळे यांनी केला आहे. ‘शौचालयाच्या पैशांत तरी हात मारू नका. एवढे काम तरी प्रामाणिकपणे करा,’ असे ते म्हणाले. त्यांच्या या आरोपाला अन्य काही नगरसेवकांनी पाठिंबा दर्शवला. नगरसेवकांनी या प्रकरणात केलेल्या आरोपाची गंभीर दखल आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी घेतली. ‘पैशाची मागणी केली जात असेल तर त्याची माहिती द्या, चौकशी करून संबंधितावर कारवाई केली जाईल,’ असे आश्वासन त्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नळदुर्गच्या २५ जणांना खंडपीठात दिलासा

$
0
0

म.टा.विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
उस्मानाबाद जिह्यातील नळदुर्ग येथील २५ याचिकाकर्त्यांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात फरतउल्ला इनामदार व इतर २४ जणांनी खंडपीठात धाव घेतली होती. या आदेशाला न्या. सुनील देशमुख यांनी स्थगिती दिली.
लोकायुक्तांच्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील अवैध बांधकामे व शासकीय जागेवरील अतिक्रमणाबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश नळदुर्ग नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार त्यांनी अहवाल सादर केला. शासकीय जागेवरील अतिक्रमणे, रहदारीस अडथळा ठरलेली अनधिकृत बांधकामे, हॉटेल व इतर दुकाने हटविल्याचा अहवालही त्यांनी गेल्यावर्षी दिला. पण या ३० जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी बसस्थानक, राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नानीमा दर्गा ते राष्ट्रीय मार्ग , वक्फ बोर्ड ते किल्ला रोड व इतर ठिकाणची अतिक्रमणे हटविण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले. त्याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून दाद मागण्यात आली होती. याचिकाकर्ते जागेचे मालक आहेत. नगरपालिकेकडे याविषयीच्या नोंदी आहेत. ७/१२ उताऱ्यावर त्यांच्या नावाची नोंद आहे. जिल्हाधिकारी व नगरपालिकेविरुद्ध याचिकाकर्त्यांकडे मनाई हुकूम आहे, असा युक्तीवाद याचिकाकर्त्यांच्यावतीने करण्यात आला. सुनावणीअंती खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती दिली. याचिकाकर्त्यांची बाजू सुहास उरगुंडे यांनी मांडली. त्यांना सुजीत गायकवाड यांनी सहकार्य केले. या याचिकेवर सहा आठवड्यानंतर सुनावणी होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सिमेंट बंधाराप्रकरणी दोषींना निलंबित करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
धनगाव (ता. पैठण) येथे बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यांचे अत्यंत निकृष्ट होते. झालेले बांधकाम हात लावले की निखळून पडत होते. यासंदर्भात सीईओंनी स्वतः स्थळपाहणी केली आणि त्याची प्रचिती आली. सिमेंट बंधारे आणि कोल्हापुरी बंधाऱ्याच्या उभारणीत लाखो रुपयांची उधळपट्टी झाली. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती विलास भुमरे यांनी केली आहे.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी झाली. सभेत कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या गेटचा विषय गाजला. याच विषयाला अनुसरून धनगाव येथील बंधाऱ्याचा विषय चर्चेला आला. भुमरे म्हणाले, ‘सीईओ मधुकरराजे अर्दड यांनी गेल्या आठवड्यात पैठण तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांना धनगाव येथील सिमेंट बंधाऱ्यांच्या कामाची तक्रार करण्यात आली. अर्दड यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता त्यांना कामाचा निकृष्ट दर्जा निदर्शनास आले. झालेल्या बांधकामाला हात लावला की ते पडत होते. या चार बंधाऱ्यांव्यतिरिक्त एक कोल्हापुरी बंधाराही याच पद्धतीने उभारण्यात येत आहे. पावसाळ्यात या बंधाऱ्यात एक थेंबही पाणी अडले नाही. लाखोंची उधळपट्टी या कामांवर करण्यात आली. मुळात या बंधाऱ्यांना तांत्रिक मान्यता कशी काय दिली गेली ? तपासणी केली गेली होती की नाही ? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. याप्रकरणी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करावेत,’ अशी मागणी त्यांनी केली.

तांत्रिक समिती स्थापन
सीईओ मधुकरराजे अर्दड म्हणाले, ‘मी स्वतः धनगाव येथील सिमेंट बंधारे पाहिले. तेथील काम निकृष्ट झाले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तांत्रिक समिती नेमली असून त्यांच्या अहवालानंतर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील गावे रस्त्यांनी जोडणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व गावे मजबूत व पक्क्या रस्त्यांनी २०१९ पर्यंत जोडली जातील. त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. राज्य सरकारकडून ग्रामीण भागातील नागरिकांसाठी शासन विविध विकासाच्या योजना राबविल्या जातात. या सर्व योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देवून ग्रामीण भागाच्या सर्वांगिन विकासासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
परळी तालुक्यातील लोणी येथील ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण व ग्रामपंचायतमध्ये बसवण्यात आलेल्या नवीन पाणी फील्टर प्लॅन्टचे उदघाटन तसेच संत सावता माळी मुर्ती प्रतिष्ठापणा पालकमंत्री पंकजा मुंडे
यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या.पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘महाराष्ट्र सरकारच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक विकासाच्या योजना असून या योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकांना तसेच गावांना झाला पाहिजे. त्या योजनाचा लाभ संबंधितांना मिळाल्यास त्या नागरिकांचा तसेच त्या गावाचा निश्चितच विकास होण्यास मदत होणार आहे. लोणी येथील फील्टर प्लॅन्टमुळे या गावातील नागरिकांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळणार असल्याने या गावातील नागरिकांना दुषित पाण्यामुळे होणार आजार कमी होण्यास मदत होणार आहे.’
गावकऱ्यांनी आपला परिसर स्वच्छ ठेवल्यास त्यांचे आरोग्य चांगले राहणार असल्याने या कामाकडे गावकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, असे सांगून दाऊतपूर ते लोणी रस्त्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला
असून लवकरच रस्त्याचे काम हाती घेवून पुर्ण करण्यात येणार असल्याने गावचा रस्त्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यासोबतच या गावासाठी सभागृह मंजूर करण्यात आले असल्याचेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी जाहीर केले.
जिल्ह्यातील प्रलंबित असलेली विकासाची कामे येत्या काळात पुर्ण करण्यासाठी शासनस्तरावरुन प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास बिभिषण फड, रामेश्वर महाराज फड, दिलीप बिडकर यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

जलसंधारणाच्या कामांचा फायदा
बीड जिल्ह्यात विविध योजनाच्या माध्यमातून विकासाची कामे करण्यात येत आहे. जिल्ह्यात मागील दोन वर्षांत जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणाची मोठया प्रमाणात कामे झाली असल्याने मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे पाणी साठ्यामध्ये वाढ झाली आहे. त्याचा फायदा सर्व शेतकरी व गावकऱ्यांना झाला आहे. जमिनीत पाणी साठा वाढल्याने शेतकयांना चांगला फायदा झाल्याने त्यांच्या उत्पनात वाढ झाल्याचे दिसून आले असल्याचे
पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images