Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कॅरिऑनसाठी विद्यापीठात घोषणाबाजी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी (बाटू) संलग्न झाल्यानंतर प्रथम वर्षातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा प्रश्न जटील झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने कॅरिऑन द्यावे किंवा कॉलेजांच्या पुनर्प्रवेशाच्या दबावावर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. काही विद्यार्थी संघटनांनी ‘कॅरिऑन’साठी आंदोलन केले तर काही संघटनांनी विरोध केला. अभियांत्रिकी शाखेचा मुद्दा चिघळल्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठात जोरदार घोषणाबाजी केली.

शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालये ‘बाटू’शी संलग्न झाल्यानंतर अनुत्तीर्ण विद्यार्थी तांत्रिक अडचणींचा सामना करीत आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षात फेरप्रवेश घ्यावा किंवा विद्यापीठाकडून कॅरिऑन आणण्यासाठी महाविद्यालयांनी दबाव आणल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. याबाबत विद्यार्थ्यांनी सोमवारी विद्यापीठात निदर्शने केली. देवगिरी अभियांत्रिकी कॉलेज, एमआयटी, जेएनईसी आदी महाविद्यालयांचे विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले. अभियांत्रिकीचे विद्यार्थी संभ्रमात असल्यामुळे ‘बाटू’चा अभ्यासक्रम वाचावा की ‘बामू’चा असा पेच आहे. याबाबत नियमावली दिलेली नाही. अभियांत्रिकी शाखेचा निकाल कमी लागला असून ७५ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांना कॅरिऑन द्यावे, अशी मागणी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने केली आहे. याबाबत संघटनेने कुलसचिव डॉ. प्रदीप जबदे यांना निवेदन दिले. यावेळी नीलेश आंबेवाडीकर, सागर साळुंखे, सूरज निकम, मीर इमाद अलीखान, अजय रनवरे, शारेख काजी, नीलेश चोरमाले आदी उपस्थित होते.

दरम्यान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली काही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. पहिल्या वर्षाला पुनर्प्रवेश घेण्यासाठी दबाव आणणाऱ्या प्राचार्यांवर विद्यापीठाने कारवाई करावी आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची वेगवेगळी शिकवणी घ्यावी अशी मागणी संघटनेने केली. या मागण्यांबाबत कुलसचिव डॉ. जबदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी गोविंद देशपांडे, निखिल आठवले, शिवा देखणे, वैभव थोरात, विवेक पवार, ईश्वर आष्टेकर, गजानन वाबळे आदी उपस्थित होते, मात्र विद्यार्थ्यांना कॅरिऑन देण्याला ‘अभाविप’ने विरोध केला. विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

कुलगुरू दौऱ्यावर
अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे, मात्र मागील आठ दिवसांपासून कुलगुरू डॉ. चोपडे दिल्ली दौऱ्यावर आहेत. पीजी प्रवेश प्रक्रिया, पेट निकाल, अभियांत्रिकीचे निकाल, प्राध्यापकांचे उपोषण या प्रश्नांवर आंदोलन सुरू असल्यामुळे विद्यापीठाचा कॅम्पस दणाणून गेला आहे. ही परिस्थिती हाताळण्यात सध्या विद्यापीठ प्रशासन अपयशी ठरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिकेच्या पाच शाळा धोकादायक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या पाच शाळा धोकादायक शाळा म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. या शाळांच्या डागडुजीबद्दल शिक्षण विभागाने शहर अभियंता विभागाला अनेकवेळा पत्रव्यवहार केला, पण त्याकडे लक्षच दिले नाही. दरम्यान, सिडको एन ७ येथील शाळेतील विद्यार्थ्यांचे स्थलांतर सोमवारी करण्यात आले, या शाळेच्या वर्गखोलीच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले होते.

महापालिकेच्या सध्या ७२ शाळा सुरू आहेत. त्यापैकी १५ शाळा दहावीपर्यंतच्या आहेत उर्वरित शाळांमध्ये आठवीपर्यंतचे वर्ग आहेत. गेल्या काही वर्षांपासून शाळांच्या डागडुजीचे, रंगरंगोटीचे काम झालेले नाही, त्यामुळे बहुतेक शाळा समस्यांचे आगार बनल्या आहेत. स्वच्छता गृह व पिण्याच्या पाण्याची समस्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त शाळांमध्ये आहे. गेल्या आठवड्यात सिडको एन-७ येथील शाळेच्या एका वर्गखोलीच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले. त्यात कुणालाही इजा झाली नसली, तरी धोकादायक शाळा म्हणून आता ही शाळा गणली जाऊ लागली आहे. या शाळेत बालवाडी ते दहावीपर्यंतचे ४७० विद्यार्थी आहेत. प्लास्टर कोसळल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. महापौर भगवान घडमोडे व आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी या शाळेला भेट देऊन वर्गखोल्यांची पाहणी केली. त्यानंतर सोमवारी विद्यार्थ्यांचे स्थालंतर करण्यात आले.

सिडको एन-७ येथील शाळेसाठी १५ ते १७ खोल्या आहेत. त्यापैकी आठ खोल्या धोकादायक स्थितीत आल्या आहेत. त्यामुळे या आठ खोल्यांमधील विद्यार्थी अन्य खोल्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आले, अशी माहिती शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली. ही शाळा पूर्णपणे पाडायची ठरली, तर शेजारच्याच एखाद्या बंगल्यात किंवा हॉलमध्ये शाळा सुरू करावी लागेल, असे ते म्हणाले.

पालिकेच्या ७२ शाळांपैकी पाच शाळा धोकादायक झाल्या आहेत. त्यात सिडको एन ७ येथील शाळेसह सिडको एन - ६, सिडको एन - ९, बनेवाडी व बडीगिरणी या शाळांचा समावेश आहे. बडीगिरणी येथील शाळा अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. धोकादायक बनलेल्या शाळांसह सर्वच शाळांची डागडुजी करणे गरजेचे आहे. त्याबाबत अभियांत्रिकी विभागाला प्रस्ताव देण्यात आला आहे, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.

७२ शाळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी १२ ते १३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एवढा खर्च केला, तर पुढील दहा वर्षांत पुन्हा खर्च करण्याची गरज पडणार नाही, असा अहवाल शिक्षण विभागातर्फे तयार करण्यात आला आहे. हा अहवाल आयुक्तांना सादर केला जाईल. आयुक्तांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करू.
- श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ अंशकालीन कर्मचारी रस्त्यावर

0
0

परभणी : गेल्या १७ वर्षांपासून अंशकालीन पदवीधरांचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे. तो त्वरीत निकाली काढण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्रासह परभणी जिल्ह्यातही पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यासोबतच धरणे व भजन आंदोलन करून राज्य सरकारचे लक्ष वेधण्यात आले.
राज्यातील १४ हजार ७४४ अंशकालीन पदवीधरांची इत्यंभूत माहिती मंत्रालयामधील संबंधित विभागाकडे पाठविली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन, अर्थ आदी विभागात ही माहिती १७ वर्षांपासून फिरत आहे. परंतु शासन पदवीधर अंशकालीन कर्मचायांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे.
राज्यात शासकीय, निमशासकीय विभागात जवळपास दीड ते दोन लाख रिक्त पदे असूनही राज्य सरकारकडून ही पदे भरली जात नाहीत. सुशिक्षीत बेकारांचा प्रश्न कायमस्वरूपी तसाच प्रलंबित ठेवण्यात आला आहे. मागील अनेक वर्षापासून अंशकालीन कर्मचारी सातत्याने या प्रश्नाचा पाठपुरावा करीत आहेत. परंतु, याकडे राज्य सरकारचे जाणून-बुजून दुर्लक्ष केले आहे.
सोमवारपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा प्रश्न चर्चेत घेवून यावर तोडगा काढावा यासाठी संघटनेच्या वतीने प्रयत्न सुरू असून राज्य सरकारला जागे करण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून भजन व धरणे आंदोलन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून परभणी जिल्ह्यातही परभणी जिल्हा पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रमुख रस्त्यांवरून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले. यावरही राज्य सरकारने प्रलंबित मागण्यांचा विचार न केल्यास भाविष्यात आमच्या मागण्यांसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला.
राज्य सरकारकडून आमच्या प्रश्नाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देवून प्रश्न सोडवावा, अशी विनंती जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. या अधिवेशनाच्या पूर्वार्धात हा प्रश्न निकाली न निघाल्यास अधिवेशन काळात पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला.
या आंदोलनात गुणीरत्न वाकोडे, भारती साळवी, संजय पांडे, सुरेश शिंदे, सरदार जगताप आदींसह शेकडो पदवीधर अंशकालीन कर्मचारी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याचा हल्ला; एक जण जखमी

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
तालुक्यातील कनकसागज शिवरातील पोपट किसन गुंजाळ यांच्या मक्याच्या शेतात सोमवारी दुपारी एक वाजता बिबट्या आढळून आला. या बिबट्याने हल्ला करून शहाजी जगन्नाथ गुंजाळ यांना जखमी केले.
त्यांना उपचारासाठी वैजापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मक्याच्या शेतात लपून बसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. या घटनेमुळे कनकसागज व परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. पोपट गुंजाळ हे शेतात गेले असता त्यांना बिबट्या दिसला. शेतात बिबट्या आल्याचे कळताच परिसरतील नागरिकांनी बिबट्याला बघण्यासाठी शेताजवळ गर्दी केली. गर्दीमुळे बिबट्या बिथरला व त्याने हल्ला केला. या हल्ल्यात शहाजी गुंजाळ यांच्या पायाला पंजाचा फटका बसल्याने ते जखमी झाले आहेत. नागरिकांनी जखमी गुंजाळ यांना ताबडतोब वैजापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नडमध्ये गोर-बंजारा समाजाचा आक्रोश मोर्चा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
सोयगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथील सीमा राठोड या अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना तत्काळ फाशी द्या या मागणीसाठी गोर-बंजारा समाजातर्फे तहसील कार्यालयावर सोमवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
गोर-बंजारा समाजातर्फे काढण्यात आलेल्या मोर्चाला दुपारी एक वाजता गिरणी मैदान येथून सुरुवात झाली. तहसीलदार महेश सुधळकर यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आला. येथे अभिवादन करून मोर्चाची सांगता करण्यात आली. या मोर्चात तालुक्याच्या अनेक गावांतून व इतर जिल्ह्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने सामील झाले होते. गिरणी मैदान ते कन्नड-चाळीसगाव मुख्य रस्त्यावरून घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर गेला.
या मोर्चात बंजारा समाजाचे नेते मारोती राठोड, ओंकार जाधव, जीजाबाई राठोड, अनिल चव्हाण, पुंडलिक पवार, भीमराव जाधव यांचा सहभाग होता. आक्रोश मोर्चाला कन्नड तालुका सकल मराठा क्रांती मोर्चा व शिवसेने पाठिंबा दिला होता. अवघ्या दोन दिवसांत मोर्चाचे नियोजन करूनही मोठी उपस्थिती होती.

मोर्चातील मागण्या

सीमा राठोडच्या मारेकऱ्यांना तत्काळ फाशी द्या, खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवावा, पीडित कुटुंबाला शासनाने मदत व पोलिस संरक्षण द्यावे, दुर्गम भागात तांड्या-वस्तीवर राहण्याऱ्या सर्व समाजाच्या मुलीची महाविद्यालयीन शिक्षणाची सोय करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठण नगर पालिकेच्या निषेधार्थ मशाल मोर्चा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
पैठण नगर पालिकेकडे वीज बिलाचे सुमारे सहा कोटी रुपये थकल्याने महावितरणने पथदिव्यांची वीज कापली आहे. परिणामी, गेल्या सात दिवसांपासून पैठण शहरातील रस्त्यांवर अंधार पसरला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रविवारी रात्री मशाल मोर्चा काढून नगर पालिकेचा निषेध करण्यात आला.
महावितरणने सहा कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी गेल्या रविवारी पथदिव्यांची वीज कापली आहे. यामुळे येथील नागरिक अंधारात व्यवहार करत आहेत. याचा मनसेतर्फे निषेध करण्यात आला. पथदिवे बंद झाल्याने शहरात भितीचे वातावरण आहे. नगर पालिकेने थकबाकी भरून शहरातील पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात, शहराध्यक्ष कपिल पहिलवान व नितेश वैद्य, सुनील पहिलवान, शुभम लोहारे, रवी बनकर, राहुल कानटकर, शुभम पहिलवान, मयूर जोगस, संतोष ठेरे, सचिन जाधव, अजय पहिलवान, प्रकाश हिवराळे, कृष्णा खुटेकर, दुर्गेश शिंदे, महेंद्र पहिलवान, आकाश इंगळे, किरण गायकवाड, अक्षय वाघमारे आदी कार्यकर्त्यानी भाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीचा विनयभंग; तरुणाला दोन वर्षे सक्तमजुरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एम. सय्यद यांनी ठोठावली. दंडातून वसूल करण्यात आलेली ११ हजार रुपयांची रक्कम पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
शहरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी २७ नोव्हेंबर २०१४ रोजी दुपारी साडेतीन वाजता मैत्रीणीसोबत शाळेतून घरी येत असताना आरोपी अक्षय उर्फ गुंड्या युवराज गायकवाडने दोघींना रस्त्यात अडवून मुलीस ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’ असे म्हणत अंगातील शर्ट काढून हातावर व अंगावर ब्लेडने सपासप वार करून घेतले. तसेच ‘तू माझ्यासोबत प्रेम केले नाही तर तुला सोडणार नाही’ अशी धमकी देत मुलीचा हात ओढण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून आरोपीविरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी ६ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने कलम ३५४ (ड) अन्वये १ वर्ष सक्तमजुरी, ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास, कलम ५०६ (भाग दोन) अन्वये २ वर्षे सक्तमजुरी, ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास, तर कलम ३२३ अन्वये कोर्ट उठेपर्यंत शिक्षा, १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. दंडातून वसूल करण्यात आलेली रक्कम पीडित मुलीला नुकसान भरपाईपोटी देण्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

सुनावणी सुरू असताना छेड

या प्रकरणी खटल्याची सुनावणी सुरु असतानादेखील, आरोपी अक्षय उर्फ गुंड्या युवराज गायकवाड याने अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची तक्रार संबंधित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात दिल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या प्रकाराचीही दखल कोर्टाने शिक्षा सुनावताना घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांसाठी 'ड्यूटी मनेजर अॅप'

0
0

पोलिसांसाठी 'ड्यूटी मनेजर अॅप'
ड्युटीसंदर्भातील तक्रारी होणार दूर; कामावरही राहणार नजर
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः
पोलिसांना मिळणाऱ्या ड्यूटीमध्ये असमानता असल्याची पोलिसांची तक्रार आता दूर होणार आहे. पोलिसांची ड्यूटी लावण्यासाठी पोलिस आयुक्तालय ‘ड्यूटी मॅनेजर अॅप’ तयार करणार आहे. या अॅपच्या माध्यमातून पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची यावर नजर राहणार आहे.
औरंगाबाद शहरातील सर्व पोलिस ठाणे, वाहतूक विभाग, पोलिस आयुक्तालय तसेच अन्य कार्यालांमध्ये दररोज पोलिस कर्मचाऱ्यांना ड्यूटीचे वाटप केले जाते. सुमार चार हजार कर्मचाऱ्यांना ड्यूटीचे वाटप करताना संबंधित हजेरी मेजर मर्जीतल्या पोलिसांना सोयीची ड्यूटी आणि इतरांना वेगळी ड्यूटी देत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. ड्यूटी वाटपातील हा घोळ संपविण्यासाठी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी ‘ड्यूटी मॅनेजर अॅप’ तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हे अॅप तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
या अॅपमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना दिलेल्या ड्यूटीची माहिती हजेरी मेजरला नोंदवावी लागणार आहे. ही माहिती अॅपद्वारे सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना बघता येणार आहे. एकाच कर्मचाऱ्याला वारंवार एकच ड्यूटी दिली जात असेल तर ती माहिती पोलिस आयुक्तांना, वरिष्ठांना आपोआप कळू शकेल. त्यामुळे हजेरी मेजरला आपल्या मर्जीतल्या सहकाऱ्यांना मनासारखी ड्युटी देता येणार नाही. नियमानुसारच ड्युटीचे वाटप करावे लागेल. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांची ड्युटीबाबतची तक्रारही अॅपद्वारे दूर होणार आहे.
अॅपमुळे पोलिसांच्या कामगिरीवरही राहणार लक्ष
वाहतूक पोलिसांसह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांची ड्युटी एखाद्या विशिष्ट ठिकाणी लावण्यात आली व त्या ठिकाणी एखादा अपघात, गुन्हा घडल्यास, त्या कर्मचाऱ्याला माहिती विचारता विचारता येणार आहे. या अॅपमुळे पोलिसांच्या कामगिरीवर पोलिस आयुक्तांसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची नजर असणार आहे.

ड्युटी मॅनेजर अॅप हा स्मार्ट पोलिसिंगचा प्रकार आहे. ड्युटी वाटपावरून होणाऱ्या तक्रारी यामुळे संपुष्टात येतील. तसेच पोलिसांना कर्तव्य पार पाडण्यात कोणत्याही प्रकारची अडचण राहणार नाही. त्यामुळे याचा निश्चित फायदा पोलिसांना होईल.
यशस्वी यादव, पोलिस आयुक्त, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्राणघातक हल्ला करणाऱ्या दाम्पत्यास सक्तमजुरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्यात साक्ष विरोधात देणाऱ्या नातेवाईकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दाम्प्त्यास १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी सोमवारी (२४ जुलै) ठोठवली.
या प्रकरणी बापूसाहेब देसले (रा. शिवाजीनगर, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, देसले हे ४ डिसेंबर २००८ रोजी सायंकाळी साडू माधवराव देसले यांना भेटण्यासाठी दुचाकीवरून आला होता. त्यावेळी त्याच परिसरात राहणारी आरोपी शारदाबाई सुभाष जाधव ही फिर्यादीला पाहून शिविगाळ करू लागली. ‘शिविगाळ का करता’ असे विचारले असता ‘तुझ्या साडूने अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये विरोधात साक्ष का दिली’ असे म्हणत पुन्हा शिविगाळ सुरू केली. त्याचवेळी घरातून आरोपी शारादाबाईचा मुलगा धवल हा पळत आला आणि त्याने लाकडी दांड्याने फिर्यादीला मारहाण केली. यात देसले खाली कोसळले. मेव्हाण्याला माराहण होत असल्याचे पाहून शकुंतलाबाई देसले या मदतीला धावून आल्या. ते पाहून शारदाबाईने शंकुतलाबाई यांना बेदम मारहाण केली. तसेच शारदाबाईचा पती व आरोपी सुभाष जाधव बाहेरुन आला आणि त्यानेदेखील लोखंडी गजाने देसले यांना मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात कलम ३०७, ३२३ व ५०४ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. धवल हा अल्पवयीन असल्यामुळे त्याला बाल न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले होते.

विविध कलमांन्वये शिक्षा

खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील कैलास पवार खंडाळकर यांनी ७ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यापैकी एक साक्षीदार फितूर झाला. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने शारदाबाई व सुभाष जाधव या दाम्प्त्यास कलम ३०७ कलमान्वे १० वर्षे सक्तमजुरी, प्रत्येकी २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास, कलम ३२४ अन्वये दोघांना १ वर्ष सक्तमजुरी, प्रत्येकी ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास, कलम ५०४ अन्वये दोघांना ६ महिने सक्तमजुरी, ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास ठोठावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गंगापूर’ संचालक मंडळाच्या ताब्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शेतकरी हितासाठी सहकारी तत्वावर उभा केलेला गंगापूर सहकारी साखर कारखाना मालमत्तेसह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात होत्या. आमदार प्रशांत बंब यांनी हा कारखाना सहकारी तत्वावरच राहावा, यासाठी प्रयत्न सुरू केले होते. दरम्यान हे प्रकरण न्यायालयात आहे. न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून हा कारखाना राज्य सरकारच्या अखत्यारितील विशेष बाब म्हणून संचालक मंडळाच्या ताब्यात देण्याचा निर्णय शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यानुसार सोमवारी प्रक्रिया पूर्ण होऊन हा कारखान्याचा ताबा संचालक मंडळाच्या ताब्यात देण्यात आला. आठ वर्षे बंद असलेल्या कारखान्याची तपासणी करून हा कारखाना लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात हालचाली आता सुरू होणार आहेत.

रघुनाथनगर (ता. गंगापूर) येथे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी गंगापूर सहकारी साखर कारखाना उभारला गेला. कारखाना २००८मध्ये सुरू होता, मात्र आर्थिक बाबींमुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कारखाना आणि त्याच्या मालमत्तेवर जप्ती आणली. सहकारी तत्वावरील कारखाना खाजगी होण्याची शक्यता होती. दरम्यान, हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. हा कारखाना सहकारीच राहावा, यासाठी आमदार प्रशांत बंब यांनी पुढाकार घेतला. महाराष्ट्र सहकारी कायदा अधिनियम १९८० कलम ७९ (अ)नुसार राज्य सरकार विशेष बाब म्हणून जनहितार्थ यासंदर्भात निर्णय घेऊ शकते. आमदार बंब यांनी सरकारकडे अर्ज केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहत विनाअट हा कारखाना संचालक मंडळाकडे देण्यास परवानगी दिली. सोमवारी दुपारी आमदार बंब यांच्यासह कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव भुसारे, संचालक राजेंद्र वाबळे, रामेश्वर मुंदडा, नानासाहेब गायके, बाळासाहेब गायकवाड, देविदास वाघ, कचरू शिदे, सुभाष साळुंके, तुकाराम मिसाळ, कल्याण सुकासे, बालचंद जाधव, साहेबराव थोरात, दिलीप बनकर, अशोक जगताप, भाऊराव जाधव, गोरख तूपलोंढे, राजेंद्र दारुंटे यांच्या उपस्थितीत कारखाना ताब्यात घेण्यात आला. कारखान्याच्या मालकीची ३५० एकर जमीनही आता ताब्यात येणार आहे.

गंगापूर तालुका आणि परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा कारखाना सहकारी तत्वावर चालणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री, सहकारमंत्र्यांनी आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला कारखान्याचा ताबा दिला. न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहूनच सर्व निर्णय घेतले जातील.
- प्रशांत बंब, आमदार, गंगापूर विधानसभा मतदारसंघ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनोग्राफीत अनियमितता; डॉक्टरची शिक्षा कायम

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सोनोग्राफी सेंटरच्या रेकॉर्डमध्ये अनियमितता आढळल्याने मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी डॉक्टरला तीन महिने सक्तमजुरी व हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेला जिल्हा कोर्टात आव्हान देण्यात आले असता, मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी ठोठावलेली शिक्षा कायम ठेवत जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी अर्ज फेटाळला.
जिल्हा वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंजली अशोक देशपांडे (वय २३, रा. बिडकीन) यांनी १४ जानेवारी २०१२ रोजी आरोपी डॉ. जयश्री मदन मानधने (वय ५७, रा. पैठण, जि. औरंगाबाद) यांच्या रुग्णालयाची तपासणी केली होती. या तपासणीत सोनोग्राफीसंदर्भातील ‘एफ फॅर्म’मध्ये अनियमितता आढळली होती. त्यानंतर आरोपीचे सोनोग्राफी सेंटर सील करण्यात आले होते. या प्रकरणी कोर्टात दोषारोपपत्र दाखल होऊन तत्कालीन मुख्य न्यायदंडाधिकारी जी. जी. भालचंद्र यांनी आरोपीला तीन महिने सक्‍तमजुरी व हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला जिल्हा कोर्टात आव्हान देण्यात आले होते. त्याच्या सुनावणीवेळी आरोपीची शिक्षा कायम ठेवत जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी अर्ज फेटाळला. सहाय्यक सरकारी वकील उदय पांडे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी पूर्ण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अकरावी ऑनलाइन प्रवेशाची दुसरी फेरी सोमवारी पूर्ण झाली. दुसऱ्या जागा वाटपाच्या यादितील ४ हजार ७६६ विद्यार्थ्यांपैकी दोन हजार ९८५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला.
दुसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी जागा वाटपाची यादी २० जुलै रोजी जाहीर झाली. विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी २४ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. शहरातील ११६ उच्चमाध्यमिक व ज्युनिअर कॉलेजांमधील २४ हजार ११० जागांवर या प्रक्रियेतून प्रवेश दिले जात आहेत. दोन्ही प्रक्रियांतील प्रवेशाचा टक्का ५० टक्केच एवढाच आहे. पहिल्या फेरीतील त्रुटीमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे दुसऱ्या फेरीत प्रवेशाचा टक्का वाढेल, असा अंदाज बांधण्यात येत होता. जागा वाटपाच्या यादीत नाव असतानाही प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, तर प्रक्रियेला प्रतिसाद न देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दोन हजार १८० एवढी आहे. यासह पहिल्या क्रमांकाचा पर्याय नाकारणाऱ्या विद्यार्थ्यांचे लॉगीन आयडी ब्लॉक करण्यात आले आहे.

दुसऱ्याफेरीतही निम्मेच प्रवेश
पहिल्या फेरीप्रमाणे दुसऱ्या फेरीतही प्रवेशाचा टक्का वाढलेला नाही. पहिल्याफेरीत दहा हजार ५८०पैकी सहा हजार ३८८ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला, तर चार हजार ७९९ विद्यार्थी प्रवेशापासून दूर राहिले. पहिल्या दुसऱ्या फेरीत केवळ दोन हजार ५४० प्रवेश झाले. त्यात विज्ञान शाखेत होन हजार ९८५ विद्यार्थ्यांना जागा वाटप करण्यात आले. त्यापैकी एक हजार ४१६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. एमसीव्हीसीसाठी ४५३पैकी ३२८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. वाणिज्य शाखेत ६२७पैकी ३२६ तर, कला शाखेत ७०१पैकी केवळ ४७० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

अशी असेल पुढील प्रक्रिया
तिसऱ्या फेरीसाठीची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होत आहे. मंगळवारी तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर केली जाहीर. त्यानंतर २६ व २७ असे दोन दिवस विद्यार्थ्यांना कॉलेज, शाखांचे पर्याय ऑनलाइन भरावे लागतील. गुणवत्ता यादी २९ जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे.

दोन फेऱ्यांत झालेले प्रवेश
शाखा......जागा वाटप...प्रत्यक्ष प्रवेश
विज्ञान..........६५७८........५०१०
कला............२०२८.........१८१०
वाणिज्य........१७९७........१४९६
एमसीव्हीसी...७३७.........६१२

एकूण विद्यार्थी...........१११४०
प्रवेश घेणारे विद्यार्थी.....८९२८
प्रवेश न घेतलेल्यांची संख्या..२१८०

शाखानिहाय प्रवेश क्षमता.
शाखा.........प्रवेश क्षमता
कला.............७४४०
विज्ञान...........१०१२०
वाणिज्य........३४८०
व्होकेशनल....१९२०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी कर्मचारी संघाचा थाळीनाद मोर्चा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत कार्यरत अंगणवाड्यांमध्ये काम करणाऱ्या सेविका व मदतनीसांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषदेत थाळीनाद मोर्चा काढण्यात आला.
अंगणवाडी कर्मचारी व मदतनीसांना एप्रिल महिन्यापासून मानधन मिळालेले नाही, त्यामुळे कुटुंबीयांची उपासमार होत आहे. राज्य सरकारने २० जून रोजी शासन व कामगार संघटना यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली मानधनवाढ समिती स्थापन केली होती. समितीने सेवाज्येष्ठता व शिक्षणाधारित मानधनवाढी संबंधीच्या शिफारसी सादर केलेल्या आहेत. कर्मचाऱ्यांना मानधनवाढ करावी, टीएचआर बंद करावा, लाभार्थींच्या आहारासाठी दर वाढवून देणे, एप्रिलपासूनच्या मानधनाची रक्कम देणे, सेवासमाप्ती लाभाची रक्कम देणे, लाभार्थीच्या आहाराचे पैसे देणे, मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीचा फरक देणे, रिक्त जागेवर सेविका, मदतनीसांची नेमणूक करणे, योजनेच्या कामासाठी लागणारे छापील रजिस्टर्स व अहवाल फॉर्म देणे, लाभार्थींना आहार पुरवठा करणाऱ्या सेविकांना त्यांचे खर्च झालेले पैसे देणे, टीएडीएची रक्कम देणे, २०१७ मधील परिवर्तन निधीचे पैसे देणे आदी मागण्या करण्यात आल्या. हे प्रश्न सोडवावेत, यासाठी सोमवारी दुपारी एक वाजता जिल्हा परिषदेवर थाळीनाद मोर्चा काढण्यात आला. कार्याध्यक्ष मंगला सराफ, आशा परदेशी, रत्नप्रभा गंफले, मंदाकिनी तांबे, निर्मला एकबोटो, संगीता बोराडे, शोभा बोरसे, मंगला हरिदास, राजू लोखंडे, जगदीश चौकीदार, नादिरा नदाफ, कविता पवार आदींसह पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुमच्या सौंदर्याला चढवा ‘श्रावणक्वीन’चा साज

0
0

तुमच्या सौंदर्याला चढवा ‘श्रावणक्वीन’चा साज
निसर्गाने चढवलेला हिरवा साज
त्यावर सौंदर्य आण‌ि
बुद्धिमत्तेचा दिमाख
लक्षात येतंय का काही?
हो, अगदी बरोबर ओळखलंत
तुमचं सौंदर्य आण‌ि कलागुणांचं मोल जाणून नव्या संधीची कवाडं खुली करणारी ‘महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन स्पर्धा’, या स्पर्धेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. यात सहभाग घेण्याची इच्छा असलेल्या १८ ते २५ वर्षे वयोगटातील तरुणींना आपला फोटो आणि माहिती वेबसाइटवर अपलोड करता येईल. वेबसाइटवर केलेल्या नोंदणीनंतर वाचकांकडून मिळालेली मते आणि तज्ज्ञ मंडळींचा निर्णय याआधारे एलिमिनेशन राऊंडसाठी निवडक तरुणींची निवड केली जाईल. त्यांच्यात स्पर्धा घेतली जाईल आणि ‘श्रावण क्वीन’ची निवड होईल. स्पर्धेसाठी इच्छुक तरुणींनी अपलोड केलेले फोटो आणि माहिती वेबसाइटवर पाहून वाचक स्पर्धकांना मते देऊ शकतील.
तरुणींना या स्पर्धेत सहभागासाठी ९८२२६३०५५५ या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करता येईल. अथवा http://www.mtshravanqueen.com/ या वेबसाईटवर ऑनलाइन नोंदणी तुम्ही सहभागी होऊ शकता. याशिवाय महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयात येऊन तुम्ही फॉर्म भरून नोंदणी करू शकता.
तर मग वाट कसली बघत आहात, ‘मटा श्रावणक्वीन’ होण्यासाठी गरज आहे एक पाऊल पुढे टाकण्याची... स्पर्धेसाठी तुमची नोंदणी करण्याची...

नोंदणीसाठी काय कराल
- http://www.mtshravanqueen.com/ या वेबसाईटवर ऑनलाइन नोंदणी करता येईल.
- ९८२२६३०५५५ या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करता येईल.
- महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयात येऊन थेट नोंदणीही करता येईल.

For Register Visit
http://www.mtshravanqueen.com
FB Page
www.facebook.com/mtshravanqueen

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्ञानाजर्नाचा प्रवास जीवघेणा

0
0

ज्ञानाजर्नाचा प्रवास जीवघेणा
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक धोकादायक
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक हा कळीचा मुद्दा आहे. रिक्षामध्ये मनमानी पद्धतीने विद्यार्थी कोंबून त्यांची वाहतूक करणे पुन्हा सुरू झाले आहे. तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दोन वर्षांपूर्वी अशा रिक्षांना चांगलाच चाप लावला होता. मात्र, त्यांची बदली झाल्यानंतर हा प्रकार पुन्हा सुरू झाला आहे.
घरापासून शाळा दूर असल्याने अनेक पालकांना आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्यासाठी रिक्षाचा वापर करावा लागतो. अनेक शाळांच्या स्वतःच्या स्कूल बस किंवा व्हॅन आहेत. मात्र, ज्या शाळांकडे स्कूलबसची व्यवस्था नाही, अशा शाळातील पालकांना नाईलाजाने रिक्षा लावावी लागते. वाहनांच्या गर्दीमध्ये अशा विद्यार्थ्यांची जिवघेणी वाहतूक करणाऱ्या रिक्षा सर्वत्र दिसून येतात.
कोंबलेले विद्यार्थी, लटकलेली दप्तरे
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षांमध्ये चार पेक्षा जास्त विद्यार्थी बसवण्यात येऊ नये असे कठोर आदेशच तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी जारी केले होते. रिक्षाचालकांची बैठक घेऊन त्यांना तशा सूचना देखील करण्यात आल्या होत्या. मात्र, आता ही परिस्थिती बदलली आहे. विद्यार्थ्यांना रिक्षामध्ये कोंबून बसविण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आतमध्ये दाटीवाटीने बसलेल्या रिक्षातील विद्यार्थ्यांचे दप्तर, वॉटर बॉटल मात्र बाहेर धोकादायक पद्धतीने लटकलेल्या असतात. हे दप्तर किंवा वॉटर बॉटल दुसऱ्या एखाद्या वाहनाला अडकून अपघात होण्याची ृशक्यता नाकारता येत नाही.
सबंधित विभागाची डोळेझाक
शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसंदर्भात प्रादे‌शिक परिवहन विभाग तसेच वाहतूक शाखेला कारवाईचे अधिकार आहेत. मात्र, या जिवघेण्या वाहतुकीबाबत सबंधित विभाग कोणतेही ठोस पाऊल उचलताना आढळत नाही. या वाहतुकीकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसत आहे.
रिक्षाचालक म्हणतात, परवडत नाही
शालेय वाहतूक करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मासिक भाडे अंतरावर किंवा रिक्षाचालकाच्या मनावर अवलंबून आहे. जास्त विद्यार्थी बसवल्यास एका फेरीला रिक्षाचालकाला जास्त रक्कम मिळते. कमी विद्यार्थी बसवल्यास त्यांना हे भाडे परवडत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते.

मंगळवारी या संदर्भात शालेय समिती, रिक्षाचालक, प्रादे‌‌शिक परिवहन विभागाचे अधिकारी यांची बैठक बोलावली आहे. या रिक्षाचालकांना सूचना देण्यात येणार आहेत. त्यांच्या वाहतुकीमध्ये सुधारणा झाली नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
डॉ. दीपाली धाटे-घाडगे, पोलिस उपायुक्त, मुख्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कडेठाण येथील महालक्ष्मी मंदिरातील दानपेटी पळवली

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
तालुक्यातील कडेठाण येथील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिराची दानपेटी अज्ञात चोरट्यांनी पळवून रक्कम लंपास केली. ही घटना रविवारी रात्री घडली असून दानपेटीत एक लाख रुपये असावेत, असा अंदाज आहे.
कडेठाण येथील महालक्ष्मी मंदिरात रविवारी नेहमीप्रमाणे पूजापाठ केल्यावर पुजारी कृष्णा गुरव यांनी मंदिराला कुलुप लावून घरी गेले. त्यानंतर रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला व मंदिरातील दानपेटी पळवली. कृष्णा गुरव हे सोमवारी नेहमीप्रमाणे मंदिर उघडण्यासाठी आले असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. गावकऱ्यांना चोरीची माहिती दिल्यानंतर, या घटनेची माहिती पाचोड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला असता काही अंतरावरील नदीपात्रजावळ रिकामी दानपेटी सापडली.
दानपेटमध्ये अंदाजे एक लाख रुपये असल्याचा अंदाज पुजारी कृष्णा गुरव यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूद्ध पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश अंधाळे यांच्या मार्गदर्शना खाली बीट जमादार गोरखनाथ कणसे, गुलफाम शेख हे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. बद्रीनारायण बारवाले यांचे निधन

0
0

डॉ. बद्रीनारायण बारवाले यांचे निधन
म. टा. प्रतिनिधी, जालना
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, ‘महिको’ या जगप्रसिद्ध बियाणे उद्योगाची मुहूर्तमेढ रोवणारे जालन्याचे भूमीपूत्र पद्मभूषण डॉ. बद्रीनारायण रामूलाल बारवाले यांचे मुंबईतील लिलावती रूग्णालयात सोमवारी दुपारी चारला निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी गोमतीदेवी, पुत्र राजेंद्र आणि पाच मुली असा परिवार आहे.
जागतिक स्तरावरील अतिशय प्रतिष्ठेचा १९९८चा जागतिक अन्न पुरस्कार (वर्ल्ड फूड प्राइज) त्यांना देण्यात आला. केंद्र सरकारने २००१मध्ये पद्मभूषण, तमिळनाडू कृषी विद्यापीठाने २००२मध्ये तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने २०१०मध्ये डी. लिट. देऊन त्यांचा गौरव केला. त्यांच्या निधनाने कृषी क्षेत्रात व्यापक कार्य करणारा देशातील महत्त्वाचा उद्योजक काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना मराठवाड्यात व्यक्त होत आहे.

सशस्त्र क्रांतीत सहभाग
बद्रीनारायणजी २७ ऑगस्ट १९३० रोजी हिंगोलीत जन्मले. ते जयकिशनजी कागलीवाल यांचे पुत्र. पुढे ते भिकूलालजी बारवाले यांचे दत्तकपुत्र म्हणून जालन्यात वयाच्या दहाव्या वर्षी आले. जालन्यातील सरकारी शाळेत शिकत असताना त्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामात उडी घेतली. हुतात्मा जनार्दन मामा यांचे ते सहकारी होते. देऊळगावराजा येथील सैनिक कॅम्पमध्ये ते होते. हैदराबादच्या निझाम सरकारच्या विरोधात सशस्त्र क्रांतीच्या लढ्यात अग्रभागी असताना त्यांना निझाम सरकारने अटक केली त्यात त्यांना एक वर्षाचा तुरूंगवास भोगावा लागला.

शेतीमध्ये क्रांती
मांडवा (ता. बदनापूर, जिल्हा जालना) येथील वडिलोपार्जित शेतीमध्ये स्वातंत्र्योत्तर काळात नवनवीन प्रयोग करून त्यांनी संपूर्ण मांडवा गावातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. याच काळात त्यांनी बियाणे उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. महाराष्ट्र हायब्रीड सीडस् अर्थात महिकोचा जन्म झाला. त्यांनी शेतकऱ्यांना संकरित बियाण्यांची संपूर्ण देशात सर्वप्रथम साथ मिळवून दिली. भारताच्या पहिल्या हरितक्रांतीच्या यशस्वीतेसाठी त्यांनी केलेले हे अतिशय महत्त्वाचे योगदान आहे.
त्यांनी १९६७मध्ये अमेरिका, युरोपमधील प्रगत देशांत चालणाऱ्या शेती संशोधनाचा अभ्यास करून शेती बियाणे संशोधनाचा विस्तार केला. त्यांना १९८९मध्ये केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे शेती संशोधन आणि विकास या विषयाचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. १९९०मध्ये आंतरराष्ट्रीयस्तरावरील शेती बियाणे संशोधन आणि तंत्रज्ञान संघटनेतर्फे पुरस्कार देण्यात आला. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचा संशोधन पुरस्कार, इंटरनॅशनल सीडस् सोसायटी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या संकरित बियाणे संशोधनाचा संपूर्ण भारतभर प्रसार झाला आणि विशेषत: सुधारित मका, बाजरी, ज्वारी आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न अतिशय भरघोस वाढले. जैव तंत्रज्ञानावर आधारित बीटी कॉटन या नाविन्यपूर्ण संशोधनाचे कापूस बियाणे भारतात सर्वप्रथम उत्पादन करून कापूस उत्पादकांना त्यांनी नवसंजीवनी दिली. भारताच्या शेतकऱ्यांनी अमेरिकेला कापूस उत्पादनात मागे टाकले यातून बारवाले यांच्या बियाण्यांची जागतिक पातळीवर उमटलेली छाप स्पष्ट दिसली.

शैक्षणिक क्षेत्रातही ठसा
शेतकरी आणि शेती उत्पादनांची प्रगती हाच त्यांचा अखेरपर्यंत श्वास होता. जालन्यात दावलवाडी या औरंगाबाद रस्त्यावर जागतिक स्तरावरील शेती तंत्रज्ञान संशोधन आणि विकास संस्थेच्या माध्यमातून त्यांचे संशोधन आजही सुरू आहे. केवळ कृषीच नव्हे तर शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले. अत्याधुनिक जैवतंत्रज्ञान शिक्षण देणाऱ्या जालन्यातील डॉ. बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, मांडवा गावातील शाळा, औरंगाबाद येथे श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे ते उपाध्यक्ष होते. जालन्यातील गोल्डन ज्युबिली शाळा, आणि जागतिक दर्जाचे जालना येथील श्री गणपती नेत्रालय आदी संस्था त्यांनी उभारल्या. औरंगाबाद येथील डॉ. हेडगेवार रुग्णालय, लातूर येथील विवेकानंद हॉस्पिटलच्या उभारणीत त्यांनी भरीव सहकार्य केले.



बारवाले यांच्या सन्मानाला उजाळा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ज्येष्ठ उद्योजक डॉ. बद्रीनारायण बारवाले यांना २३ जानेवारी २०१० रोजी ५१ व्या दीक्षांत समारंभात डी. लिट प्रदान केली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार, तत्कालीन कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले व उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे उपस्थित होते.
कृषी व शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान असलेले उद्योजक डॉ. बद्रीनारायण बारवाले यांचे सोमवारी निधन झाले. मराठवाडा विभागात बियाणे निर्मितीद्वारे वेगळी वाट निर्माण करणारा दूरदृष्टीचा उद्योजक हरवल्याची भावना निर्माण झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बारवाले यांना २०१० मध्ये डी. लिट प्रदान केली होती. या आठवणीला माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी उजाळा दिला. ‘मराठवाड्याच्या कृषी व शिक्षण क्षेत्राच्या जडणघडणीत बारवाले यांनी मोठे योगदान दिले. या भागाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्यांचा विद्यापीठाने गौरव केला पाहिजे, या हेतूने डॉ. बारवाले व दिवंगत नेते विलासराव देशमुख यांना बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने २०१० मध्ये डी. लिट प्रदान केली होती. या दोघांचे योगदान मराठवाडा कधीच विसरणार नाही’ असे कोत्तापल्ले म्हणाले.

बियाणे उद्योग व संशोधनातील योगदानाबद्दल नोबेलच्या तोडीचा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार देऊन बारवाले यांना सन्मानित करण्यात आले होते. जालना शहाराचे नाव जगभर पोहोचवणारा कृतिशील उद्योजक हरपला आहे.
- डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू



‘शेतकऱ्यांचा कैवारी हरपला’
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, ‘महिको’ या जगप्रसिद्ध बियाणे उद्योगाची मुहूर्तमेढ रोवणारे जालन्याचे भूमीपूत्र पद्मभूषण डॉ. बद्रीनारायण रामूलाल बारवाले यांचे सोमवारी मुंबईतील लिलावती रूग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने कृषी क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा कैवारी हरपला असल्याची भावना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्या.

बियाणे उद्योगातील प्रथितयश मिळवूनही अत्यंत साधे राहणारे बद्रीनारायणजी यांचा दबदबा होता. मी अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यावर त्यांना भेटायला गेलो होतो, त्यांची ऊर्जा पाहून थक्क झालो होतो. सचोटीने वागणारे, दिलदार उद्योजक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांना माझ्याकडून आणि सीएमआयए परिवाराकडून श्रद्धांजली.
प्रसाद कोकीळ, अध्यक्ष, सीएमआयए.


बद्रीनारायणजी हे माझे काका होते. ते ‘फादर ऑफ सीड इंडस्ट्रीज’ म्हणून ओळखले जात. त्यांनी या क्षेत्रात आमच्या सारख्या पिढींना आकार दिला. त्यांना या औद्योगिक क्षेत्रात अत्यंत मानाचे आणि मोठे स्थान होते. त्यांच्या जाण्याने कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
नंदकिशोर कागलीवाल, संस्थापक नाथ सीड्स

बद्रीनारायण बारवाले यांनी उद्योग क्षेत्रात नव्हे तर शिक्षण क्षेत्रातही भरीव काम केले. हैदराबाद मुक्तीसंग्राम चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. शून्यातून विश्व कसे निर्माण करता येते, हे बारवालेजींनी दाखवून दिले होते. बियाणे क्षेत्रात त्यांनी क्रांती निर्माण केली.
प्राचार्य शरद अदवंत, सचिव, स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्र

बद्रीनारायण बारवाले यांचा मराठवाड्याच्या विकासात महत्वाचा वाटा आहे. बियाणे क्षेत्रात त्यांनी केलेले काम निश्चितपणे एक आदर्श म्हणून आपल्यासाठी भूषणावह आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले काम कुणीही विसरू शकणार नाही.
डॉ. एस. बी. वराडे, अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्र


जुन्या पिढीतील कृषीतज्ज्ञ. बियाणे कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदेशीर ठरावेत अशा वाणांची निर्मिती करताना नवनवीन प्रयोग त्यांनी केले. हैदराबाद स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सहभाग होता. उद्योगासह सामाजिक क्षेत्रातही त्यांनी भरीव काम केले. अनेक सामाजिक प्रकल्पांत त्यांचा सहभाग होता.
प्रा. विजय दिवाण.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ विकास मंडळाने पुढाकार घ्यावा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘नापिकीमुळे मराठवाड्यातील शेतकरी त्रस्त आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आता मराठवाडा विकास मंडळाने पुढाकार घ्यावा, सरकारला सूचना कराव्या,’ असे आवाहन प्रा. विजय दिवाण यांनी सोमवारी येथे केले.

स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्राच्या वतीने पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ जयंतीनिमित्त प्रा. दिवाण यांचे ‘ मराठवाडा वैधानिक विकास मंडळ - वाटचाल आणि अपेक्षा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. केंद्राचे अध्यक्ष डॉ. एस. बी. वराडे अध्यक्षस्थानी होते. सचिव प्राचार्य शरद अदवंत यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. विभागीय असमतोलाचा इतिहास मांडून दिवाण यांनी मराठवाड्याच्या वाटचालीचे टप्पे सांगत वैधानिक विकास मंडळ स्थापनेची माहिती सांगितली. ते म्हणाले, ‘ज्येष्ठ स्वातंत्रसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांनी सुरुवातीपासूनच मराठवाड्याच्या विकासाचा मुद्दा आग्रहाने मांडला. १९८४ ते १९९२ या काळात दांडेकर समिती, भुजंगराव समिती, १९९७मध्ये इ. ए. एस. शर्मा समितीने दिलेल्या अहवालातून मराठवाड्याची बिकट परिस्थिती मांडली गेली. १९८३मध्ये गोविंदभाई तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले आणि तिथे वैधानिक विकास मंडळाची मागणी केली. १९८४मध्ये विकास मंडळाचा प्रस्ताव सर्वप्रथम मांडला गेला. ९ मार्च १९९४मध्ये राष्ट्रपतींनी यासंदर्भात फर्मान दिले. ३० एप्रिल १९९४ रोजी मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्राच्या वैधानिक विकास मंडळांची घोषणा झाली आणि २५ जून १९९४ रोजी प्रत्यक्षात मंडळे अस्तित्वात आळी. पाच वर्षांचा कालावधी निश्चित केला गेला, पण त्याला मुदतवाढ दिली गेली. गोविंदभाई श्रॉफ यांच्यामुळेच वैधानिक विकास मंडळ स्थापन झाले. प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील विकासकामांसाठी निधीची तरतूद सूचविली गेली. पण आपला निधी उर्वरित महाराष्ट्राचे वळविला गेला. त्यामुळे मराठवाडा विकासात अजूनही मागे आहे,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

हेतूबद्दल प्रश्नचिन्ह
‘वैधानिक विकास मंडळाच्या स्थापनेचा मूळ हेतू साध्य झाला की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. आता वैधानिक हा शब्द काढून मराठवाडा विकास मंडळ असे नामकरण झाले आहे. ते कशामुळे माहित नाही, पण मराठवाड्याचा विकास झालेला नही. अनुशेष कायम आहे. मराठवाड्यातील कोरडवाहू शेतीला मूल्यावर्धित शेतीचे प्रयोग राबविणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात नवे रोजगार कसे निर्माण होतील, यासाठी विकास मंडळाने सूचना करावी,’ अशी अपेक्षा दिवाण यांनी व्यक्त केली.

गोविंदभाईंना अभिवादन
गोविंदभाई श्रॉफ यांना जयंतीनिमित्त गुजराती समाज विकास मंडळातर्फे फेरीचे आयोजन करण्यात आले होते. खाराकुआँ येथून निघालेली फेरी सुपारी हनुमान रोड, टिळक पथमार्गे पैठण गेटपर्यंत निघाली. ‘गोविंदभाई अमर रहे’, ‘एक दोन तीन चार गोविंदभाईंचा जयजयकार’ अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. पैठण गेट येथील गोविंदभाई श्रॉफ यांच्या पूर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनिल पटेल, डॉ. नवनीत श्रॉफ, डॉ. जतीन शहा, अॅड. नरेंद्र कापडिया, कोषाध्यक्ष ललित पारीख, शालेय समिती अध्यख उदय पटेल आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विशाखा’साठी नोडल अधिकारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विशाखा कायद्याअंतर्गत लैंगिक छळाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी १५९ कर्मचाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे विशाखा कायद्याला बळकटी मिळणार आहे. मुंबईनंतर मराठवाडयामध्ये ही अंमलबजावणी करण्यात आली आहे.

विशाखा कायद्यामध्ये दहापेक्षा कमी कर्मचारी असलेल्या आस्थापना किंवा असंघटित क्षेत्रातील महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी नोडल ऑफिसरची तरतूद आहे. लैंगिक छळाच्या तक्रारी स्वीकारण्याचे अधिकार नोडल ऑफिसरला दिले आहेत. या तक्रारी सात दिवसांच्या आत स्थानिक तक्रार निवारण समितीकडे सुपूर्द करणे, प्रत्येक महिन्यात अहवाल सादर करणे व संपूर्ण माहिती कार्यालयाच्या दर्शनी भागात लावणे ही नोडल ऑफिसरच्या कर्तव्ये आहेत. याबाबतचा अहवाल जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे सोपवणे बंधनकारक आहे. यामुळे महिलांचा वेळ वाचणार असून महिला व स्थानिक तक्रार निवारण समिती यांच्यातील सेतूचे काम नोडल अधिकारी करतील.

गाव व तालुका पातळीवरच्या लैंगिक छळाच्या तक्रार स्थानिक तक्रार निवारण समितीपर्यंत पोचणे खूप गरजेचे होते. त्यामुळे या निर्णयाचे मी स्वागत करते. महिला आयोगाची अध्यक्ष झाल्यावर मी स्वत: या विषयाकडे लक्ष दिले. याचा महिलांना नक्कीच फायदा होईल. - विजया रहाटकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅँकांमुळे १५ ऑगस्ट गणवेशाविना

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विद्यार्थ्यांचे खाते उघडण्यास बँकांनी नकार दिल्यामुळे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा यंदाचा १५ ऑगस्ट चक्क गणवेशाशिवाय साजरा होणार आहे. पालिका प्रशासन देखील बॅँकांच्या भूमिकेमुळे हतबल झाले आहे.

महापालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलींना, एससी - एसटी प्रवर्गातील मुलांना शासनाच्या सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून गणवेश दिले जातात. गतवर्षीपर्यंत शाळेतून दोन गणवेश पुरवले जायचे. त्यासाठी एका विद्यार्थ्यामागे चारशे रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यंदा शासनाने या पद्धतीत बदल केला. विद्यार्थ्यांनी बँकेत खाते उघडावे. चारशे रुपयांचे दोन गणवेश खरेदी करावेत. गणवेश खरेदी केल्याची पावती शाळेच्या मुख्याध्यापकाला दाखवावी. पावती मिळाल्यावर मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याच्या बँकेच्या खात्यात पैसे जमा करावेत, असे आदेश दिले आहेत.

महापालिकेच्या शाळेत १७५०० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी ६५३२ विद्यार्थी सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून गणवेशासाठी मिळणाऱ्या अनुदानास पात्र नाहीत. या विद्यार्थ्यांना पालिका फंडातून गणवेशासाठी पैसे दिले जातात. उर्वरित विद्यार्थ्यांना शासनाकडून गणवेशासाठी चारशे रुपये दिले जाणार आहेत, परंतु बँकेत खाते उघडल्याशिवाय ही रक्कम विद्यार्थ्यांना मिळणार नाही.

दरम्यान, महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप यांनी आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. चारशे रुपयांच्या गणवेशासाठी विद्यार्थ्यांना बँकेत खाते उघडावे लागत असून खाते उघडण्यासाठी तीनशे रुपये लागतात. ही बाब अन्यायकारक असल्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेश खरेदीसाठी चारशे रुपये रोख देण्यात यावेत, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.

बँकेत खाते उघडण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणींची दखल आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी घेतली. महाराष्ट्र बँक ही आग्रणी बँक आहे. त्या बँकेच्या अधिकाऱ्यांना उद्या मंगळवारी सकाळी बैठकीला बोलवा. त्यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांचे खाते उघडून घ्या, असे आदेश आयुक्त मुगळीकर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

विद्यार्थ्यांचे बँकेत उघडले जाणारे खाते ‘झिरो बॅलेन्स’चे असल्यामुळे बहुतेक बँका खाते उघडून घेण्यास उत्सुक नाहीत. या प्रकारामुळे पन्नास टक्के पेक्षा जास्त विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले आहेत. १५ ऑगस्टपर्यंत या सर्वांची खाती बँकेत उघडली जावीत व प्रत्येकाला गणवेश मिळावा यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. - श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images