Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​ रस्त्यांची यादी; पुन्हा नवा वायदा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘मीच त्रस्त झालो आहे. मंगळवारी रस्त्यांची कच्ची का होईना यादी जाहीर करू,’ अशी ग्वाही उसणे अवसान आणून देत महापौर भगवान घडमोडे यांनी सोमवारी पुन्हा नवा वायदा केला.

शहरातील रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेवून शासनाच्या नगरविकास खात्याने शंभर कोटींचे अनुदान मंजूर केले. या निधीत ज्या रस्त्यांची कामे करायची आहेत त्या रस्त्यांची यादी, सविस्तर प्रकल्प अहवाल व तांत्रिक मान्यतेचा अहवाल सादर करा. त्यानंतर निधी दिला जाईल, असे शासनाने कळविले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सविस्तर प्रकल्प अहवाल व तांत्रिक मान्यतेचा अहवाल महापालिकेला शासनाकडे सादर करावा लागणार आहे.

अनुदान मिळाल्याची घोषणा २८ जून रोजी करण्यात आली. त्या दिवसापासून रस्त्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. एक महिना पूर्ण होत आला तरी यादी तयार करण्याचे काम पूर्ण झाले नाही. शंभर कोटींमधून कोणत्या रस्त्यांची कामे केली जाणार याबद्दल पालिका वर्तुळाबरोबरच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. भाजपमधील गटातटात रस्त्यांची यादी अडकल्याचे बोलले जाऊ लागले. त्यातच पालिकेतील नगरसेवकांनी रस्त्यांच्या यादीसाठी महापौरांकडे पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे रस्त्यांची यादी तयार करण्यात आली असली तरी जाहीर मात्र करण्यात आली नाही.

कुणाचे समाधान करू
सोमवारी यादी जाहीर करू असे महापौर भगवान घडमोडे यांनी सांगितले होते, पण आज देखील त्यांनी यादी जाहीर केली नाही. ‘उद्या मंगळवारी कच्ची यादी का होईना जाहीर करतो,’ असा वायदा त्यांनी केला. ‘रस्त्यांच्या यादीवरून मीच त्रस्त झालो आहे. कुणाकुणाचे समाधान करायचे असा प्रश्न आहे. शिवाय डीपीआर देखील तयार झालेला नाही,’ असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ पोलिसात तक्रार दिली म्हणून पत्नीला मारहाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पोलिस ठाण्यात तक्रार दिली म्हणून पतीने पत्नीला कोंडून बेदम मारहाण केली. विवाहितेवर दोन दिवसांपासून घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिवंसरा यांना या घटनेची माहिती समजल्यानंतर सोमवारी हा प्रकार उघडकीस आला. बेगमपुरा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. तृप्ती (नाव बदलेलेले आहे) या घाटी रूग्णालयात परिचारिका आहेत. त्यांचा २००७मध्ये विवाह झाला. त्यांना पाच वर्षांचा मुलगा व एक वर्षाची मुलगी आहे. नोकरी सांभाळून तृप्ती जयसिंगपुरा भागात राहतात. तीन दिवसांपूर्वी मुलगा शाळेतून आल्यानंतर त्याचे दप्तर फेकून देण्यात आले. याबाबत सासऱ्यांना विचारले असता त्यांनी शिवीगाळ केली. तिला घरातून निघून जाण्यास भाग पाडले. हा त्रास वाढल्यामुळे त्या बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेल्या. तेव्हा पोलिसांनी जर घर सासऱ्यांच्या नावावर असेल, तर ते तुम्हाला काढू शकतात असे सांगून परत पाठवले. त्यानंतर तृप्तींनी एक रात्र मैत्रिणीकडे काढली. दुसऱ्या दिवशी त्या पुन्हा पोलिस ठाण्यात गेल्या. तेव्हाही पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. तृप्ती त्या दिवशी त्यांच्या घरी गेल्या. तेव्हा पतीने मध्यरात्री पोलिसांत तक्रार का दिली म्हणून बेदम मारहाण केली. घराबाहेर आवाज जाऊ नये म्हणून दरवाजा, खिडक्या बंद केल्या. हा प्रकार असह्य झाल्याने तृप्ती सकाळी सहा वाजता पोलिस ठाण्यात गेल्या. त्यावेळी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. पोलिस ठाण्यातून परतताना त्या रस्त्यातच बेशुद्ध पडल्या. नागरिकांनी त्यांना घाटीत दाखल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘सीएमआयए’ला ‘मेडा’चा राज्यस्तरीय पुरस्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर अर्थात सीएमआयएला महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचा (मेडा) राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. ऊर्जाक्षेत्रात ‘एनर्जी सेल’च्या माध्यमातून केलेल्या कार्याला मिळालेली ही पोचपावती आहे,’ अशी माहिती अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

कोकीळ म्हणाले, ‘पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार माजी अध्यक्ष गुरप्र‌ीतसिंग बग्गा, माजी अध्यक्ष आशिष गर्दे यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. ‘सीएमआयए’च्यावतीने चार वर्षांपूर्वी एनर्जी सेल स्थापन करण्यात आला असून सुमारे २५ कंपन्यांचे एनर्जी ऑडिटही करण्यात आले आहे. या कामी आम्हाला शहरातील सात इंजिनी‌अरिंग कॉलेजमधील इलेक्ट्र‌िकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या ४९ विद्यार्थ्यांची व त्यांच्या शिक्षकांची मदत झाली.’ यावेळी गुरप्र‌ीतसिंग बग्गा म्हणाले, ‘आम्ही प्रसाद कोकीळ, आशिष गर्दे, व्ही. एन. नांदापूरकर यांच्यासह ऊर्जा क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञ मंडळींकडून एनर्जी सेलची स्थापना केली होती. यातून गेल्या काही वर्षांत ऊर्जा बचत व संवर्धन या क्षेत्रात भरपूर कामे झाली आहेत. त्याचाच हा पुरस्कार म्हणजे परिपाक आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑलआउट ऑपरेशनमध्ये ८०३ वाहनांना दंड

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पोलिसांनी शहरात सोमवारी सायंकाळी ऑलआउट ऑपरेशन राबवून नाकाबंदी करत तीन हजार वाहनांची तपासणी केली. या मोहिमेत ८०३ वाहनांवर दंडात्मक कारवाई करत अडीच लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच आठ अवैध दारू विक्रेत्यांना अटक करण्यात आली.
शहरातील १७ पोलिस ठाण्याअंतर्गत प्रमुख चौकात सायंकाळी सात ते नऊ या काळात नाकाबंदी करण्यात आली. यावेळी मोटार वाहन कायद्यानुसार विविध कलमाअंतर्गत वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. हर्सूल पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान हद्दपार केलेले आरोपी अनिस सिकंदर पटेल (रा. फुलेनगर) याला अटक केली. या शिवाय अवैध दारू विक्री करणाऱ्या आठ जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई पोलिस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, विनायक ढाकणे, राहुल श्रीरामे यांच्या मार्गदर्शनाखाली ८२ अधिकारी व ४१५ पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.

१९ हजारांचा गुटखा जप्त

नाकाबंदीच्या काळात बंदी विक्रीसाठी गुटखा बाळगणारा अयुब दौलत लाला शेख (रा. हुसेन कॉलनी) याला अटक केली. ही कारवाई गुन्हे शाखा व अन्न व सुरक्षा विभागाने केली. त्याच्या ताब्यातून १९ हजार ५०० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. अजिंठेकर या प्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षामध्ये पाच पेक्षा जास्त विद्यार्थी नको

0
0

पाच पेक्षा जास्त विद्यार्थी नको
रिक्षा चालकांना पोलिसांचा निर्वाणीचा इशारा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षामध्ये १२ वर्षाखालील ५ व १२ वर्षांपेक्षा मोठे ३ विद्यार्थीच न्यावेत. हा नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी दिला. मंगळवारी सकाळी पोलिस आयुक्तालयात वाहतूक शाखा, विविध शाळेचे मुख्याध्यापक, पालक व प्रादेशीक परिवहन विभागाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थी सुरक्षेची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची राहील, असेही स्पष्ट केले.
मंगळवारच्या अंकात मटाने ‘जीवघेणा ज्ञानार्जन’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. यामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या धोकादायक वाहतुकीवर प्रकाश टाकण्यात आला होता. मंगळवारी उपायुक्त डॉ. धाटे-घाडगे यांनी या संदर्भात बैठक बोलाविली. यावेळी उपस्थितांकडून विविध सूचना मागविण्यात आल्या. विद्या‌र्थी वाहतूक सुरक्षेबाबत शाळा प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती देखील घेण्यात आली. या बैठकीला उपायुक्त वाहतूक शाखेचे एसीपी सी. डी. शेवगण, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्यासह विविध अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
रिक्षाचालकांना कडक ‌इशारा
मोठ्या शाळांमधील विद्यार्थ्यांची वाहतूक ही स्कूल बस किंवा व्हॅनमधून करण्यात येते. दरवाजा लावलेल्या या व्हॅनची वाहतूक रिक्षाच्या तुलनेत सुरक्षित मानली जाते. मात्र, दुसरीकडे रिक्षांमध्ये विद्यार्थी कोंबून त्यांची धोकादायक वाहतूक करण्यात येते. त्यांची दप्तरे, वॉटर बॉटल बाहेर लटकलेले असल्याने अपघाताची शक्यता असते. या रिक्षाचालकांना १२ वर्षाखालील विद्यार्थी असतील तर ५ विदयार्थी बसवावेत तसेच १२ वर्षांपेक्षा जास्त असतील तर तीनच बसवावे असा इशारा देण्यात आला आहे.
बैठकीत पोलिसांनी केलेल्या महत्त्वाच्या सूचना
- सुप्रीम कोर्ट, मोटार वाहन कायद्यानुसार देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वाचे स्कूल बसचालकांनी पालन करावे.
- विद्यार्थी सुरक्षेची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची राहील.
- स्कूलबसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस प्रणाली यंत्रणा बसवावी.
- स्कूल बस, व्हॅनमध्ये एक विद्यार्थिनी असेल तरी तिच्यासाठी महिला कर्मचारी नेमण्यात यावी.
- शाळेचा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत.
- रिक्षाचालक, वाहनचालक किमान चार वर्षाचे लायसंस असावे.
- स्कूल बसचालक, रिक्षाचालक याचे चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- चालकाने विद्यार्थ्यांसोबत सलगी करू नये, अशा सुचना शाळा व्यस्थापनाने चालकांना कराव्यात.
- कोणता विद्यार्थी कोठे उतरणार आहे याची यादी चालकाकडे असावी, त्यांच्या पालकाचे मोबाइल क्रमांक, फोन क्रमांक त्यांच्याकडे असावेत.
- विद्यार्थ्याला पालक घेण्यासाठी आले नसतील तर त्याला रस्त्यावरच उतरून न देता त्याला व्यवस्थितपणे पोहोचविण्याची जबाबदारी चालकाची असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘यशप्राप्तीसाठी मेहनत, चिकाटी, जिद्द हीच त्रिसूत्री’

0
0

‘यशप्राप्तीसाठी मेहनत, चिकाटी, जिद्द हीच त्रिसूत्री’
सीए परीक्षेत अनुतीर्ण विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सातारा परिसरातील सीए इन्स्टिट्यूट येथे सीए परीक्षेत यावर्षी उतीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी यशप्राप्तीसाठी मेहनत, चिकाटी आणि जिद्द हीच त्रिसूत्री आहे, असा सूर निघाला.
आयसीएआयच्या वतीने १८ जुलै रोजी सीए-सीपीटी तसेच सीए-फायनल परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षांमधे ज्या विद्यार्थ्यांना यश मिळाले नाही, अशांचे मनोबल वाढवण्यासाठी सीए विद्यार्थी शाखा विकासातर्फे शाखा अध्यक्ष रोहन आचलिया यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनसत्र झाले. यासत्रात औरंगाबादचे नामवंत सीए अशोक पाटील, आर. एच. मालपाणी, आलोक सिंग यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी अशोक पाटील म्हणाले, मी एका शेतकरी कुटुंबातून आणि छोट्याशा खेड्यातून त्यांच्या प्रवासाची सुरुवात केली. शिक्षणासाठी भटकंती केली व इंटरपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आपले पुढील शिक्षण त्यांनी वाणिज्य शाखेतून केले व पदवी मिळवली. वाणिज्य पदवीधर होईपर्यंत त्यांना सीए कोर्सबद्दल माहितीही नव्हती. पुढील प्रवासात त्यांना सीए कोर्स बद्दल माहिती मिळाली व त्यांनी सीए होण्याचे ध्येय ठरवले. त्याप्रमाणे मी परिश्रम करून अपयशातून मार्ग काढत पदवी प्राप्त केली. आर.एच.मालपाणी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना दोन पिढीमधील अंतरावर भर दिला. ते म्हणाले, मला कोणत्याही प्रकारची शिकवणी उपलब्ध नसताना तसेच साधनांची कमतरता असूनही मी सीए झालो. प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून झाले. सीए अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमातून पूर्ण करायचे होते. त्यासाठीही मला खडतर मेहनत करावी लागली. सीए एकमेव असा कोर्स आहे जेथे फक्त गुणावत्ताच श्रेष्ठ आहे. अपयशातून स्वतःचे आकलन करा व यश मिळवा.
आलोक सिंग यांनी त्यांच्या जीवन प्रवासासोबतच विद्यार्थ्यांच्या सीए परीक्षेत कशाप्रकारे व कुठे चुका होतात. यावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, अंतिम परीक्षेची तयारी करायला मला मुंबईला जावे लागले. तिथे राहण्याची सोय लवकर झाली नाही तेव्हा अनेक रात्री रस्त्यांवर झोपूनच काढाव्या लागल्या, परंतु मी परत फिरलो नाही व अभ्यास पूर्ण केलाच व यशही मिळवले. रोहन आचलिया म्हणाले, आज मी यशाच्या शिखरावर असलो तरी अपयशातूनच आपले अस्तित्व निर्माण केले आहे. यावेळी विकासा उपशाखा अध्यक्ष ऐश्वर्या ब्रम्हेचा, सचिव रोहन खंडेलवाल, मंजिरी महातोले, श्रिया लड्डा, रोहन मुगदिया आदी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता बलराम मनिठेच्या प्रेरणात्मक कवितेने झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस निरीक्षकाच्या मोबाइलवर सीसीटीव्ही

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण तेथील पोलिस निरीक्षकाला थेट मोबाइल स्क्रीनवर पाहता येणार आहे. गेल्या महिन्यात येथील लॉकअपमध्ये आरोपीने केलेल्या आत्महत्येनंतर नवीन आलेल्या निरीक्षक‌ांनी दक्षता घेऊन ही सोय करून घेतली आहे.
वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये १५ जून रोजी मंगळसूत्र चोरीच्या आरोपाखाली पकडलेल्या गणेश रमेश नेमाणे (वय २८ रा. जळगाव सपकाळ, ता. भोकरदन) या संशयित आरोपीने चादरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर येथील पोलिस निरीक्षकांची उचलबांगडी नियंत्रण कक्षात करण्यात आली, तर दोन जणांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबीत करण्यात आले होते. या ठिकाणी हर्सूल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांची बदली झाली आहे.
या पोलिस ठाण्यात लॉकअप, ठाणे अमंलदार कक्ष, प्रवेशद्वार आदी ठिकाणी सात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. त्याचे चित्रीकरण पोलिस निरीक्षकाच्या केबीनमध्ये पाहता येऊ शकते. पण, ठाण्याबाहेर पडल्यास तेथे काय सुरू आहे याची माहिती निरीक्षकाला होत नाही. हे लक्षात घेऊन निरीक्षक साबळे यांनी मोबाइलवर ही सेवा उपलब्ध करून घेतली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सेवा देणाऱ्या कंपनीने मोबाइल अॅप उपलब्ध करून दिले आहे. त्याचा वापर करून ते ठाण्याबाहेर असल्यास तेथील कारभारावर लक्ष ठेऊ शकणार आहेत.

पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. पण, ठाण्याबाहेर असल्यास तेथे काय सुरू आहे याची माहिती असणे आवश्यक आहे. मोबाइल अॅपच्या माध्यमातून हे शक्य झाले आहे. त्यामुळे ठाण्याबाहेर जरी असलो तरी काही नजरेस आल्यास त्वरित दखल घेता येते.
-ज्ञानेश्वर साबळे, पोलिस निरीक्षक, वाळूज एमआयडीसी पोलिस ठाणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिराचे अतिक्रमण वैजापुरात काढणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
सार्वजनिक बांधकाम विभागाने वैजापूर शहरातील गंगापूर रस्त्यावरील देवीच्या मंदिराचे अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मंगळवारी नगर पालिकेच्या सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीत मंदिराची देखरेख करणाऱ्या व्यक्तिंना ही माहिती देण्यात आली. त्यांनी स्वतः अतिक्रमण न काढल्यास पुढील कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. हे अतिक्रमण येत्या दोन ते तीन दिवसात काढण्याची तयारी यावेळी संबंधितांनी दाखवली. आली.
सुप्रीम कोर्टाने रहदारीस अडथळा ठरणाऱ्या महामार्गावरील धार्मिक स्थळांची अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजवणी करण्यासाठी मंगळवारी नगर पालिकेच्या सभागृहात मुख्यधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व मंदिराचे पुजारी, विश्वस्त यांच्या बैठक घेण्यात आली. वैजापूर शहरात महामार्गावर अतिक्रमित असलेले देवीचे एकमेव मंदिर गंगापूर रस्त्यावर आहे. बांधकाम विभागाकडे मंदिरची अतिक्रमित म्हणून नोंद आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशची अंमलबजावणी करण्यासाठी बांधकाम विभागाने हे अतिक्रमण काढण्याचे ठरवले आहे. त्यानुसार मंदिराच्या संबंधित व्यक्तींना त्याची बैठकीत कल्पना देण्यात आली. दरम्यान वैजापूर शहरात मुख्य स्टेशन रस्ता, गंगापूर रस्ता, लाडगाव रोड व येवला रस्त्यावर बांधकाम विभागाच्या जागेवर, गटारीवर अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. तसेच रस्त्यावरही मोठ्या प्रमाणवर अतिक्रमणे झाल्याने रहदारीस अडथळा येत आहे. त्यामुळै ही सर्व अतिक्रमणे दिवाळीनंतर काढण्यात येतील, अशी माहिती बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्टँपिंग करताना ऑइल कंपनीचा अधिकारी राहावा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘पंप खराब झाल्यानंतर कंपनीला सूचना दिल्यानंतर कंपनीकडून एजन्सीचा माणूस येतो, तो काय करतो याची माहिती पंप चालकांना नसते. वजन मापे विभागाचे अधिकारी येऊन याची स्टॅपिंग करतात, त्यावेळी ऑईल कंपनीच्या अधिकाऱ्याला उपस्थित राहणे आवश्यक करा. त्यामुळे झालेल्या कामाची माहिती कंपनीच्या प्रतिनिधींना होईल,’ अशा प्रतिक्रिया पंप चालकांनी जनजागृती अभियानावेळी व्यक्त केल्या.
हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीतर्फे हिंद सुपर पेट्रोल पंपावर ग्राहकांकरिता बुधवारी जनजागृती मोहीम घेण्यात आली. यावेळी कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक विपुल वर्मा, व्यवस्थापक (क्वॉलिटी व क्वॉटिंटी) व्ही. आर. टोमणे, सेल्स ऑफिसर जार्ज थॉमस, वजन मापे विभागाचे अरूण खैरनार, निरीक्षक एस. व्ही. मुंडे, पेट्रोलियम असोसिऐशनचे अध्यक्ष चंदनमल खिवंसरा, हिंद सुपर पेट्रोल पंपाचे अब्दुल हूसेन अब्बास यांची उपस्थिती होती.
यावेळी व्हीआर टोमणे यांनी ग्राहकांना पाच लिटरच्या मापात पेट्रोल टाकून प्रात्याक्षिक दाखविले. पंपाचे मिटर सेट केल्यानंतर नोझल बंद करणे किंवा झटका दिल्यामुळे पेट्रोल कमी पडत नाही, असे सांगितले. यावेळी ग्राहकांच्या शंकांच्या समाधान करण्यात आले.
पंप सुरू करताना पेट्रोल कमी येत असेल, तर पंपचालकांनी त्वरित पंप बंद ठेवून त्याबाबत संबंधीत विभागाला कळविणे आवश्यक आहे, असे वजन मापे विभागाचे अरूण मुंडे पंपचालकांना सांगितले. सध्या स्टॅपिंगच्या तारखांबद्दल गोंधळ असल्याचे मान्य केले. यावेळी पंपचालकांनी अडचणी मांडल्या.
मशिन जप्त झाल्यानंतर दुसरी मशिन घेऊन पेट्रोल विक्री करता येत नाही का? असा सवाल पंपचालकांनी उपस्थित केला. यावेळी अखिल अब्बास, दीपक सोनवणे आदी उपस्थित होते.

सर्वच पंपावर अभियान

हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने त्यांच्या सर्व पंपांवर जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल कंपनीसुद्धा जनजागृती अभियानात सुरू करेल, असे अखिल अब्बास यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धार्मिक स्थळांवर हातोडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शहरात सार्वजनिक जागांवरील धार्मिक स्थळे हटविण्यासंदर्भात हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. शहरातील तब्बल ११०० धार्मिक स्थळे हटविण्यात येणार आहेत. यासंदर्भात मंगळवारी आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत मुगळीकर यांनी, धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई बुधवारपासून सुरू केली जाणार असल्याचे सांगितले. या कारवाईसाठी चार पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

सार्वजनिक जागांवर असलेली धार्मिक स्थळे हटवावीत, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. धार्मिक स्थळे हटविण्यासंदर्भात महापालिका व पोलिस प्रशासने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असेही खंडपीठाने आदेशात नमूद केले आहे. या आदेशानुसार आयुक्त मुगळीकर यांनी मंगळवारी पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात बैठक घेतली. धार्मिक स्थळे हटविण्यासंदर्भात महापालिकेच्या स्तरावर नेमण्यात आलेल्या समितीच्या सदस्यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. समितीमध्ये पोलिस आयुक्त व जिल्हाधिकारी यांचा समावेश आहे, पण या दोघांनीही स्वतः बैठकीला हजर न राहता आपले प्रतिनिधी पाठवले.

बैठकीनंतर मुगळीकर म्हणाले, ‘शासन व सार्वजनिक जागेवरील धार्मिक स्थळे काढावित करावीत, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. या आदेशानुसार कार्यवाही करणे गरजेचे आहे. त्यामुळे समितीची बैठक घेण्यात आली. ११०० धार्मिक स्थळे अवैध व बेकायदा आहेत, असे कोर्टाने नमूद केले आहे. ते हटविण्याची कारवाई ताबडतोब सुरू करावी व त्याचा अहवाल कोर्टाला टप्प्याटप्प्यांने सादर करावा, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार अवैध व बेकायदा धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई केली जाणार आहे. बुधवारपासून या कारवाईला सुरुवात होईल.’

महापालिकेने सुरुवातीला १२९४ धार्मिक स्थळांची यादी तयार केली होती. ती दुरुस्त केल्यानंतर ११०१ धार्मिक स्थळे अवैध व बेकायदा असल्याचे स्पष्ट झाले आहे. ती पाडून टाकण्यासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत. एकाच वेळी चारही पथकांतर्फे कारवाई सुरू केली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले. एका पथकात पथक प्रमुखासह दहा कर्मचारी व आवश्यक ती यंत्रसामग्री दिली जाणार आहे. पोलिस आयुक्तांनी देखील आवश्यक तेवढा पोलिस बंदोबस्त देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही कारवाई सुरू केली जाईल, असे मुगळीकर यांनी स्पष्ट केले. पथकांचे प्रमुख, त्यांच्या सोबतचे कर्मचारी, कारवाई सुरू करण्याचे ठिकाण या बद्दलचा तपशील रात्री उशिरा तयार केला जाईल असे त्यांनी सांगितले.

बैठकीला सहाय्यक पोलिस आयुक्त दीपाली घाडगे, तहसीलदार रमेश मुंडलोड, पालिकेचे उपायुक्त रवींद्र निकम, अय्युब खान, शहर अभियंता सिकंदर अली, अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख एम. बी. काजी यांच्यासह सर्व विभागप्रमुख, सिडको, छावणी परिषद, एमआयडीसी, एमएसआरडीसी, वक्फबोर्ड या कार्यालयांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

विशेष सर्वसाधारण सभा बोलवा ः शिवसेना
२००९ या वर्षानंतर अस्तित्वात आलेली अवैध व बेकायदा धार्मिक स्थ‍ळे पाडण्यासंदर्भात शासनाचा अध्यादेश आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतोच, पण या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून सरसकट धार्मिक स्थळे प्रशासन पाडणार असेल, तर ते मान्य नाही, अशी भूमिका शिवसेनेचे नगरसेवक रेणुकादास वैद्य यांनी स्पष्ट केली. धार्मिक स्थळे पाडण्यासंदर्भात प्रशासनाची नेमकी भूमिका काय आहे, हे न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान राखत आम्हाला जाणून घ्यायचे आहे. चुकीची कार्यवाही होऊ न,ये अशी शिवसेनेची इच्छा आहे. त्यामुळे प्रशासनाची भूमिका स्पष्ट व्हावी यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवा, अशी मागणी स्थायी समितीच्या चार सदस्यांच्या स्वाक्षरीच्या पत्रासह बुधवारी आम्ही महापौरांकडे करणार आहोत, असे वैद्य यांनी सांगितले.

धार्मिक स्थळांवरील कारवाईसंदर्भात आयुक्तांनी माझ्याशी चर्चा केली नाही. आज दिवसभर मी बाहेर गावी होतो. उद्या शहरात परतल्यावर यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा करणार आहे. कोर्टाचा सन्मान ठेवावाच लागेल. शिवसेनेच्या नगरसेवकांनी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्याची मागणी केली, तर कोर्टाच्या निर्णयाला बाधा पोचणार नाही, हे तपासून सर्वसाधारण सभा आयोजित केली जाईल.
- भगवान घडमोडे, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंगमधील नापास विद्यार्थ्यांचा प्रश्न अधांतरी

0
0

औरंगाबाद ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या इंजिनीअरिंग प्रथम वर्षाच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांमुळे पेच निर्माण झाला आहे. अनेक महाविद्यालये ‘बाटू’शी संलग्न झाल्याने आणि नापासांचे संख्या कमी असल्याने त्यांचे स्वतंत्र वर्ग घेण्यास महाविद्यालये उत्सुक नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. ‘नव्याने प्रवेश घ्या,’ असा सल्ला अनेक कॉलेजांमध्ये दिला जात आहे. त्यामुळे संभ्रम वाढला आहे.
इंजिनीअरिंग अभ्यासक्रमात २०१६-१७मध्ये प्रथम वर्षला प्रवेश घेतलेल्यापैकी ४० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी नापास झाले.चारपेक्षा अधिक विषयांत नापास विद्यार्थ्यांच्या तासिकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक कॉलेज डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाशी संलग्न झाले आहेत. तेथील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे त्यांनी तासिका घेण्यास असर्थता दर्शवित आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी, ‘तासिका कशा घेणार, आम्ही कोणत्या विद्यापीठाशी संलग्नित असू,’ असे प्रश्न उपस्थित करून कॅरिऑनचा मुद्दा पुढे केला आहे.

धोरण नसल्याने गोंधळ
विद्यापीठाने असा पेच निर्माण होणार, हे गृहित धरून तातडीने उपाययोजना आखणे आवश्यक होते. या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम, वेळापत्रक निश्चित करून कॉलेजांना त्याप्रमाणे सूचना दिल्या जाव्यात, अशी चर्चा विद्यापीठात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणने पकडल्या १५ दिवसांत २८४३ वीज चोऱ्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील शहरी भागांत वीज गळतीचे प्रमाण ३० ते ४० टक्के असून जून २०१७ पर्यंत २३४ कोटी ३४ लाख रुपयांची थकबाकी आहे. औरंगाबाद परिमंडळात १ जुलै ते १५ जुलै या काळात २८४३ वीज चोऱ्या पकडण्यात आल्या व २७२ वीज चोरांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
औरंगाबाद परिमंडळात दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. या दोन जिल्ह्यात एप्रिल ते जून या काळात लघुदाब ग्राहकांनी ४७५.८१ दक्षलक्ष युनिटचा वापर केला, त्यापैकी ३१६.९४ दक्षलक्ष युनिटचेच वीज बिलिंग झाले आहे. यामुळे १५८.८७ दक्षलक्ष युनिटची वीज गळती होत असल्याचे समोर आले आहे. महावितरणला मार्चमधील वीज गळतीमुळे १८७ कोटी ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. ही थकबाकी जूनपर्यंत २३४ कोटी ३४ लाख रुपये झाली आहे, असे गणेशकर यांनी सांगितले.

शहरामध्ये वीज गळती

औरंगाबाद शहरातील शहर विभाग १ मध्ये गेल्या तीन महिन्यात २२.९२ दशलक्ष युनिटची वीज गळती (११ कोटी रुपये) झाली. शहर विभाग २ मध्ये १४.८७ दशलक्ष युनिटचे वीज गळती (७ कोटी रुपये) झाली आहे.

९२९ तक्रारी प्राप्त

आठवड्याच्या दर सोमवारी वीज बिलाबाबत ग्राहकांच्या तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत. १७ जुलै आणि २४ जुलै रोजी झालेल्या तक्रार मेळाव्यात वीज बील दुरुस्तीसाठी ९२९ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ६०५ तक्रारीचे निरासरण ऑनस्पॉट करण्यात आले, ३२४ प्रकरणात वीज मिटर तपासणी करण्यात येत आहे, असे गणेशकर यांनी सांगितले.

११८२ घरे विजेशिवाय

ग्रामीण भागात सर्व घरांत वीज कनेक्शन देण्याची घोषणा केंद्र शासनाने केली आहे. पण, औरंगाबाद जिल्ह्यातील पाच वाड्यांवरील ११८२ व जालना जिल्ह्यात २० गावांतील फक्त १० ते २० कनेक्शन देण्यात आले आहेत. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या आढाव्यात ही माहिती समोर आली. जालना जिल्हयातील ४८ हजार ५४० घरांमध्ये वीज पोहोचलेली नाही. या घरांत कनेक्शन देण्यात येईल, असे गणेशकर यांनी सांगितले.

पैसे भरा डिपी घ्या

शेतकऱ्यांनी २५ हजार रुपये भरल्यास २४ तासात डीपी बसविण्यात येणार आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या वीज बिलातून वळती करण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागातील ६० ते ७० डीपी जळालेल्या अवस्थेत असल्याचे गणेशकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइलवर ऑनलाइन बिंगो जुगार; आठ अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मोबाइल अॅपवर ऑनलाइन ‌बिंगो नावाचा जुगार खेळणाऱ्या आठ जणांना गुन्हे शाखेने सोमवारी सायंकाळी कैलासनगरमध्ये अटक केली. मोबाइल अॅप डाऊनलोड करून कॅसिनोसारख्या फिरत्या चक्रीवर जुगार खेळवण्यात येत होता. जिंकणाऱ्याला दहा रुपये लावल्यास दहा पट रक्कम देण्यात येत होती.
कैलासनगरमध्ये काही तरूण अँड्राइड मोबाइलवर फन टार्गेट बिंगो हा गेम डाउनलोड करून ऑनलाइन जुगार खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून स्मशान मारोती मंदिराजवळ छापा मारण्यात आला. येथे जुगार खेळत बसेलेले गिरीश पंडित नारखेडे (वय ३० रा. उत्तमनगर, जवाहर कॉलनी), ज्ञानेश्वर प्रभात मोहिते (वय ३५), शिवाजी छगन ठाकरे (वय ३०), सचिन पंडित अवचार (वय २५), फैय्याज अमीन कुरेशी (वय २५ सर्व रा. कैलासनगर), शेख एजाज शेख रऊफ (वय २४), जुनेद शेरुखान (वय २४) व शेख वसीम शेख शमीम (वय २९ सर्व रा. संजयनगर,बायजीपुरा) यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून बिंगो गेम डाउनलोड असलेले तीन मोबाइल, रोख रक्कम, असा ३७ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे, साईनाथ महाडिक, विकास माताडे, ओमप्रकाश बनकर, संजय जाधव, शिवाजी भोसले, राहुल हिवराळे, संजय धुमाळ यांनी केली.

असा खेळत होते जुगार

डाउनलोड करणाऱ्याला ठराविक रक्कम अॅपसाठी भरावी लागते. त्यानंतर हा जुगार खेळता येतो. कॅसिनोमधील फिरणारे चक्र व त्यात सोडलेल्या बॉलप्रमाणे मोबाइलच्या स्क्रीनवर चक्री येते. जुगार खेळणारे एका आकड्यावर पैसे लावतात. त्या आकड्यावर बॉल आल्यास दहा पट रक्कम मिळत होती. पण, आकडा चुकल्यास रक्कम हरत होता,अशी माहीती सूत्रांनी दिली.

जागेची अडचण नाही

या जुगाराला खेळण्यासाठी जागेची अजिबात अडचण नाही. ग्रुप करून कोठेही ऑनलाइन पद्धतीने हा जुगार खेळता येतो. सर्वजण मोबाइलमध्ये दंग असल्याने जुगार खेळत असल्याची माहिती सुद्धा इतरांना समजत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक बांधिलकीतूनच गोरगरीबांच्या सेवेत

0
0

सामाजिक बांधिलकीतूनच गोरगरीबांच्या रुग्णसेवेत

महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सर्वांत पहिल्यांदा घाटीत ‘निओनॅटॉलॉजी’ विभाग सुरू करण्याचे श्रेय ज्यांना जाते आणि आता ‘डीएम-निओनॅटॉलॉजी’ हा सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रम विभागात सुरू करण्यासाठी अहोरात्र झटणारे मराठवाड्यातील पहिले निओनॅटॉलॉजिस्ट व घाटीचे विभागप्रमुख डॉ. एल. एस. देशमुख यांची ‘नॅशनल निओनॅटॉलॉजी फोरम’च्या राज्य अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. यानिमित्त त्यांनी ३५ वर्षांच्या बाल-शिशू रुग्णसेवेचा विस्तृत अनुभव व विचार ‘मटा’कडे व्यक्त केले.

या क्षेत्राकडे कसे वळालात?

- माझे वडील व माजी आमदार (कै.) शेषराव देशमुख हे राजकारणात होते. त्यामुळे घरात राजकारणाचे वातावरण होते; परंतु मी डॉक्टर होण्याची खूणगाठ बांधून १२ पर्यंत परभणीत शिक्षण घेतले आणि एमबीबीएस-एमडी (पेडियाट्रिक्स) घाटीत केले. शिकणे-शिकवणे यातच मुळातून रस असल्यामुळे शिक्षकीपेशात आलो. घाटीच्या बालरोग विभागामध्ये प्राध्यापकी सुरू असताना माझेच दोन विद्यार्थी डीएम-निओनॅटॉलॉजी करू लागल्यानंतर माझेही लक्ष वेधल्या गेले. ‘सर तुम्ही का नाही करत डीएम’ असा त्यांचा सवाल माझ्या डोक्यात चमकून गेला. काही तरी वेगळे करुन पाहू, असे म्हणत ‘ऑल इंडिया एन्ट्रन्स’ उत्तीर्ण झालो आणि शासकीय सेवेत असल्याने विद्यार्थी रजा घेत १९९६ मध्ये ‘केईएम’मध्ये ‘डीएम’साठी प्रवेश घेतला. त्याच काळात लंडनच्या ‘रॉयल कॉलेज ऑफ चाईल्ड केअर’मध्ये फेलोशिप करण्याची संधी मला समृद्ध करुन गेली. १९९९ मध्ये ‘डीएम’ पूर्ण झाले व ‘डीएम’ पूर्ण करणारा मी मराठवाड्यातील पहिला बालरोगतज्ज्ञ ठरलो. ‘डीएम’ होताच अनेक डॉक्टर, बालरोगतज्ज्ञांची खासगी प्रॅक्टिसमध्ये येण्यासाठी आमंत्रणे सुरू झाली. विदेशातूनही संधी चालून आली. मात्र सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून शासकीय सेवेतच राहण्याचा विचार पक्का केला आणि पुन्हा शासकीय सेवेत आलो. अर्थात, पुन्हा शासकीय सेवेत येण्यासाठीही अडचणी पार कराव्या लागल्या. त्याच वर्षापासून म्हणजे १९९९ पासून घाटीमध्ये ‘एनआयसीसू’ सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि थेट मुख्यमंत्र्यांना भेटून त्यासाठीचा प्रस्तावही सादर केला. तेव्हापासून सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर २००७ मध्ये विभागाला मान्यता मिळाली. दरम्यान, २००८ मध्ये ‘एमपीएससी’द्वारे ‘पेडियाट्रिक्स’ विषयातील प्राध्यापक झालो आणि तेव्हाचा सर्वांत तरुण प्राध्यापक म्हणून माझी गणना झाली. २००९ मध्ये घाटीच्या एनआयसीयू विभागाचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र अकल्पित व वेगळेच प्रश्न उभे ठाकले आणि विभाग सुरू होण्यात असंख्य अडचणी निर्माण झाल्या. त्यातच माझी धुळ्याला बदली झाली आणि मी पुन्हा २०१२-१३ मध्ये औरंगाबादला घाटीत आल्यानंतर व असंख्य अडचणींवर मात करीत विभाग सुरू झाला. आधी सात बेड सुरू झाले आणि हळूहळू बेडची संख्या वाढून आज विभाग ४० बेडचा झाला आहे. फार मोठ्या रुग्णसंख्येचा विचार करुनच आता आणखी ४० बेड वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याशिवाय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्येही विभागाचा विस्तार होणार आहे व रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा देता येण्याचा प्रयत्न असणार आहे.

पुढे कोणते उपक्रम हाती घेणार आहात?

- ‘एनआयसीयू’मध्ये दाखल असलेल्या शिशुंच्या मातांसाठी ‘सीएसआर फंडा’तून ‘कांगारू मदर केअर वॉर्ड’ सुरू करण्याचा प्रयत्न आहे. सुमारे सव्वादोन कोटींचा खर्च अपेक्षित असलेल्या या वॉर्डात ३० ते ४० मातांना दाखल करता येणार आहे. वेगवेगळ्या दानशुरांच्या देणगीतून हा वॉर्ड उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अलीकडे ‘मदरबेस्ड एनआयसीयू’च्या जागतिक संकल्पनेतून या वॉर्डाला मोठे महत्व आहे आणि नवजात शिशू-बाल रुग्ण ठणठणीत होण्यासाठी ‘कांगारू केअर’ला शास्त्रीय आधार मानला जातो. मात्र दुर्दैवाने चकचकीत ‘एनआयसीयू’ उभे करण्यात ‘कांगारू केअर’कडे सर्रास डोळेझाक केली जाते, हा भाग निराळा. त्याचवेळी प्री-मॅच्युअर्ड मुलांच्या शारीरिक-मानसिक विकासाचा सूक्ष्मपातळीवर व शास्त्रीय पद्धतीने फॉलोअप घेण्यासाठीच घाटीमध्ये ‘हाय-रिस्क फॉलोअप क्लिनिक’ सुरू करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी दर बुधवारी खास ओपीडी यापूर्वीच घाटीमध्ये सुरू झालेली आहे. ‘एनएनएफ’चा राज्य अध्यक्ष म्हणून डॉक्टर-परिचारिकांमध्ये ‘निओनॅटल केअर’बाबत प्रत्येक जिल्ह्याच्या तालुकापातळीपर्यंत जाणीव जागृती निर्माण करण्यासह शिक्षण-प्रशिक्षण-कार्यशाळा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. विशेषतः मराठवाडा-विदर्भातील ग्रामीण भागांत अशी प्रशिक्षणे घेण्याचा मानस आहे. अर्थात, या प्रकारची प्रशिक्षणे फार पूर्वीपासून घेत आहे.

प्रश्नः रुग्ण-डॉक्टर संबंधाबाबत काय वाटते?

उत्तरः दुर्दैवाने अलीकडे डॉक्टर-रुग्ण संबंधांमध्ये खरोखर अंतर निर्माण झाले आहे आणि खरे म्हणजे डॉक्टरांविषयी अविश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळेच एका डॉक्टरच्या उपचारांविषयी दुसऱ्यांकडून खात्री करण्यासाठी अनेकांची मते घेण्याचा प्रघात पडला. मात्र या प्रकारांमुळेच आरोग्य सेवांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष खर्च वाढत आहे, हे लक्षात घेतले जात नाही. अर्थात, समाजात चांगले डॉक्टर आहेत आणि त्यांना जपण्याची नितांत गरज आहे, जी सगळ्यांचीच जबाबदारी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेला गंभीर मारहाण; तिघांना ३ वर्षे सक्तमजुरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
क्षुल्लक कारणावरून महिलेला लाथा-बुक्क्यांनी व दगडाने गंभीर मारहाण करणाऱ्या तिघांना तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी मंगळवारी (२५ जुलै) ठोठावली.
या प्रकरणी मनोज गोटीराम सुरे (वय २४, रा. वडारवाडा, शनिमंदिर, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार १७ ऑगस्ट २००९ रोजी दुपारी तीनच्या सुमारास सुरे यांचा लहान भाऊ घरासमोर खेळत असताना गल्लीत रहिवासी आरोपी राजू लक्ष्मण गायकवाड (वय १९, रा. वडारवाडा) हा तिथे आला. त्याने क्षुल्लक कारणावरून सुरे यांची आई बबिता (वय ४५) यांच्याशी वाद घातला. त्यावरून त्याच दिवशी रात्री साडेआडच्या सुमारास आरोपी राजू याच्यासह त्याचा भाऊ व दुसरा आरोपी बाळू लक्ष्मण गायकवाड (वय २५), वडील तिसरा आरोपी लक्ष्मण शंकर गायकवाड (वय ४८) हे तिघे सुरे यांच्या घरासमोर आले. त्यांनी बबिता यांना लाथा-बुक्यांनी व दगडाने बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली. या प्रकरणी तिघा आरोपींविरुद्ध कलम ३०७, ३२३, ५०४, ३४ अन्वये कन्नड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

…तर पुन्हा तीन महिने कारावास

खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील बी. आर. लोया यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये जखमी महिला बबिता, फिर्यादी व डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने तिघा आरोपींना कलम ३२५ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणी पैरवी अधिकारी सुरेश साळवे यांनी अॅड. लोया यांना साह्य कले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘लॉ’चे निकाल रखडले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या विधी अभ्यासक्रमांचे निकाल रखडल्याने अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले. प्रथम वर्षाचा निकाल नसल्याने द्वितीय वर्षाचे, तर वर्गच सुरू होऊ शकले नाहीत.

गेल्या वर्षी ‌विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा गोंधळ राज्यभर गाजला. यावर्षी निकाल लांबल्याने या अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊ शकले नाही. विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेचे निकाल परीक्षा होऊन दोन महिने होत आले, तरी जाहीर झालेले नाहीत. विद्यापीठातर्फे १७ ते २६ मेदरम्यान विधी अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्यात आली. जुलै महिना संपत आले, तरी निकाल न जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. निकाल केव्हा जाहीर होणार, असा प्रश्न करत विद्यार्थी कॉलेजांमध्ये खेटा मारत आहेत. निकाल नसल्याने दुसऱ्या वर्षाचे वर्ग सुरू करायचे की नाही, असा प्रश्न कॉलेज प्रशासनाला पडला आहे.

शैक्षणिक सत्र कोलमडणार
जुलै महिना संपत आला, तरी विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात वर्ग सुरू होणे अपेक्षित आहे. निकाल, गुणपत्रिका याला ऑगस्ट उजाडण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रवेशाची प्रक्रिया होईल. या सगळ्या प्रक्रियेला ऑगस्टच्या दुसरा आठवडा लागेल, अशी चर्चा आहे. त्यामुळे शैक्षणिक सत्रातील परीक्षा दिवाळीनंतर होतील अणि पुढच्या सत्राचेही वेळापत्रक लांबणार आहे.

विधी महाविद्यालये.....७
प्रथमवर्ष परीक्षार्थी.....८००
उत्तरपत्रिका.............२८००

निकाल लांबल्याने पुढची सगळी प्रक्रिया थांबली आहे. अद्याप निकाल नसल्याने द्वितीय वर्षाचे वर्ग सुरू झालेले नाहीत. त्याचा परिणाम शैक्षणिक वेळापत्रक पूर्ण कोलमडले आहे. निकालाबाबत विद्यार्थी रोज विचारणा करत आहेत.
- भाग्यश्री परांजपे, उपप्राचार्य, माणिकचंद पहाडे विधी कॉलेज.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी पदाधिकाऱ्यांनी केली प्रशासनाची कोंडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या कारभारात सदस्यांचा हस्तक्षेप नसावा, अशा आशयाचे परिपत्रक १९९५ मध्ये काढण्यात आले होते. हे पत्र गेल्या आठवड्यात व्हॉटसअपवर फिरले. तो मुद्दा उपस्थित करून स्थायी समिती सदस्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला बुधवारी चांगलेच कोंडीत पकडले. या परिपत्रकाची अंमलबजावणी केली जात असेल, तर सगळ्याच शासनआदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी सदस्यांनी लावून धरली. त्यावर अधिकारी निःशब्द झाले. अखेरीस दुसरा मुद्दा चर्चेला आला आणि हा विषय मागे पडला.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक बुधवारी झाली. अनुपालनात जिल्हा परिषद जागांच्या अतिक्रमणाचा प्रश्न तासभर चर्चिला गेला. अधिकाऱ्यांना सांगूनही कारवाई होत नाही, त्यापेक्षा राजीनामा देऊन घरी बसलेले बरे, असे उद्‍गार उपाध्यक्ष केशवराव तायडे यांनी काढले. अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर, सभापती विलास भुमरे, सदस्य प्रा. रमेश बोरनारे, मधुकर वालतुरे, रमेश गायकवाड, किशोर पवार, किशोर बलांडे, अविनाश गलांडे, जितेंद्र जैस्वाल आदींनी चर्चेत सहभाग घेतला. जिल्हा परिषदेच्या कोट्यवधींच्या मालमत्तांची नोंद नाही. अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे, पण प्रशासन लक्ष देत नाही, असा आरोप त्यांनी केला. त्यावर सीइओ मधुकरराजे अर्दड यांनी उत्तर दिले. मालमत्तांच्या नोंदीसाठी आदेश दिलेले आहेत. महिनाभरात माहिती संकलित होऊन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समितीसमोर जाईल. त्यानंतर पुढची कार्यवाही करण्यात येईल.
पाणीपुरवठा विभागाचा विषय चर्चिल्यानंतर किशोर बलांडे, अविनाश गलांडे यांनी शासनाच्या परिपत्रकाचा मुद्दा उपस्थित केला. १९९५ मध्ये एक परिपत्रक काढण्यात आले होते. त्यात जिल्हा परिषदेच्या कारभारात सदस्यांचा कितपत हस्तक्षेप असावा, असे नमूद केले आहे. पत्रातील माहितीनुसार झेडपी सदस्यांच्या कारभाराबद्दल मुद्दे होते. हे परिपत्रक गेल्या आठवड्यात जिल्ह्यात व्हॉटसअपवरून फिरले. त्या पत्राखाली अवलोकनार्थ म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे जाधव यांनी स्वाक्षरी होती. या मुद्यावरून सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच कोंडीत पकडले. सर्वपक्षीय सदस्य प्रशासनावर तुटून पडले. ‘आम्हाला काही अधिकार नसतील, तर निवडून येऊन उपयोग काय ? आमचे काय अधिकार आहेत ते सभागृहात सांगा ? ही सभा सुद्धा अधिकारात येते की नाही ते स्पष्ट करा. ते परिपत्रक मागवा.’ अशी मागणी सदस्यांनी केली.
प्रशासन जर २२ वर्षे जुन्या परिपत्रकाची एवढी प्रभावीपणे अंमलबजावणी करत असेल, तर प्रत्येक शासनाआदेशाचीही अंमलबजावणी व्हावी, मुख्यालयी न राहणाऱ्या किती कर्मचाऱ्यांवर कारवाई केली ? दोषी असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आजवर काय कारवाया झाल्या ? सगळेच नियमानुसार करा, असे मुद्दे मांडून प्रशासनाची पुरती कोंडी करण्यात आली. यावर प्रशासनाने उत्तर द्यावे, अशी मागणी केली. मंजुषा जाधव यांनी परिपत्रकासंदर्भात निवेदन केले पण सदस्यांचे त्यावर समाधान झाले नाही. सदस्य आहेत म्हणून जिल्हा परिषद चालते, असा मुद्दाही सदस्यांनी मांडला. दीर्घ चर्चेनंतर दुसरा विषय चर्चेस आला आणि या विषयास पूर्णविराम मिळाला.

सभेत अडथळा

स्थायी समिती सभा सुरू असताना सभागृहाचा दरवाजा उघडून एक व्यक्ती आत आली आणि दरवाजात उभी राहिली. हे पाहून सर्व सदस्य, अधिकारी सर्द झाले. प्रभारी शिक्षणाधिकारी रवींद्र वाणी यांना त्या व्यक्तीने बाहेर जाण्यास सांगितले. अध्यक्ष, सीइओंसह सर्व सदस्यांनी ‘सभा सुरू आहे. तुम्ही असे कसे काय आत आलात ? अधिकारी बाहेर येऊ शकणार नाहीत. सभा संपल्यानंतर तिकडे भेटा’ असे सांगितले. त्यावर त्या व्यक्तीने तुम्ही सभा घेऊन करता काय ? तिकडे आरटीई प्रवेशाची दोन महिन्यांपासून अडचण आहे. हे अधिकारी सोडवत नाहीत त्याचे काय ? असा प्रतिप्रश्न केला. सुरक्षारक्षक असूनही ही व्यक्ती आत आल्याने पदाधिकारी, अधिकारी चिडले. त्यांनी त्या व्यक्तीस बाहेर जाण्यास सांगितले. या घटनेचा सर्व सदस्यांनी निषेध केला. अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर यांनी सभेबाहेर सुरक्षारक्षक तैनात करण्याचे आदेश दिले. काही वेळातच एक सुरक्षारक्षक दरवाजाबाहेर उभा राहिला. गेल्या आठवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत एका शाळेचे विद्यार्थीही थेट सभागृहात आले होते. त्यामुळे झेडपी प्रशासनाचा वचक आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पोदार’चे तीन संघ उपांत्य फेरीत

0
0

‘पोदार’चे तीन संघ उपांत्य फेरीत
सुब्रातो करंडक फुटबॉल स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिका आणि जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित सुब्रोतो करंडक फुटबॉल स्पर्धेत पोदार आयसीएसई स्कूल, पोदार सीआयई स्कूल, पोदार सीबीएसई स्कूल आणि स्कॉलर इंग्रजी स्कूल या संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
विभागीय क्रीडा संकुलात मंगळवारी स्पर्धेला प्रारंभ झाला. ही स्पर्धा १४ व १७ वर्षांखालील वयोगटांत ही स्पर्धा सुरू आहे. मुलींच्या गटात सलामीच्या लढतीत पोदार आयसीआयई स्कूल संघाने औरंगाबाद पोलिस पब्लिक स्कूल संघाचा ५-० असा सहज पराभव केला. पोदारच्या स्नेहा गावडेने दोन, तर ईशिका, महिमा, वर्णी यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सामन्यात पोदार सीआयई स्कूल संघाने रायन इंटरनॅशनल स्कूल संघाचा २-० असा पराभव केला. सारा मूर्तीने दोन गोल करीत सामना गाजवला. तिसऱ्या सामन्यात पोदार सीबीएसई स्कूल संघाने होलि सेंट स्कूल संघावर ४-० अशी सहज मात केली. पोदारकडून रूतुल जाधवने दोन, तर प्रवीण कौर, मोयशा बजाज यांनी एकेक गोल केला. चौथ्या सामन्यात स्कॉलर इंग्रजी स्कूल संघाने सेंट जॉन स्कूल संघाचा टायब्रेकमध्ये ३-२ असा पराभव केला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांमध्ये गोलशून्य बरोबरी होती. टायब्रेकमध्ये स्कॉलर स्कूलने ३-२ अशी बाजी जिंकली.
महापालिका स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी क्रीडा उपसंचालक राजकुमार महादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, फुटबॉल संघटक महंमद बदरोद्दीन यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी मनपा क्रीडा विभाग प्रमुख संजीव बालय्या, क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, गुरूदीपसिंग संधू, महंमद रियाजोद्दीन, श्यामसुंदर भालेराव, कृष्णा केंद्रे, महंमद बदरोद्दीन, चंद्रशेखर घुगे, डॉ. मोईन फारूकी, माहुद अली खान यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंच म्हणून अख्तर कुरेशी, अझर बाबर, शेख अल्ताफ, मोहंमद साहिल, फेरोज बेग, राहुल तांदळे, सय्यद नईम, मोहंमद अली खान, शेख जमीर, डॉ. समीना पठाण यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेचार तास खेळाडू प्रतीक्षेतच

0
0

साडेचार तास खेळाडू प्रतीक्षेतच
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या क्रीडा स्पर्धांच्या हंगामास गोंधळानेच प्रारंभ झाला. खेळाडूंना प्रत्यक्ष सामना खेळण्यासाठी तब्बल साडेचार तासाची प्रतीक्षा करावी लागली. या विलंबामुळे खेळाडू त्रासून गेले होते.
विभागीय क्रीडा संकुलात मंगळवारी सुरू झालेल्या सुब्रातो करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी सकाळी नऊ वाजता मैदानावर बोलावण्यात आले होते. उद्घाटन सोहळा ११.३० वाजता झाला. त्यानंतर दीड वाजता प्रत्यक्ष सामन्याला प्रारंभ झाला. पोदार स्कूल आणि औरंगाबाद पोलिस पब्लिक स्कूलचा संघ उदघाटनानंतरचा सामना खेळण्याकरिता मैदानात हजर झाले. मात्र, फुटबॉलच उपलब्ध न झाल्याने खेळाडू तासभर मैदानावरच बसून राहिले. उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर स्पर्धेचा ड्रॉ टाकण्यात आला. त्यामुळे सामन्याला प्रारंभ होण्यास उशीर झाल्याचे कारण सांगण्यात येत आहे, असे क्रीडा शिक्षकांनी सांगितले.
खेळाडूंवर अन्याय
अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू असतानाच सुब्रातो करंडक फुटबॉल स्पर्धा घेण्यावर मौलाना आझाद ज्युनिअर कॉलेजचे मोईन फारूकी यांच्यासह काही क्रीडा शिक्षकांनी नाराजी दर्शवली. ‘मटा’शी बोलताना फारूकी म्हणाले, ‘अकरावीचे प्रवेश अद्याप पूर्ण झालेले नाहीत. दहावी पास झालेले अनेक चांगले खेळाडू अकरावीत प्रवेश घेतात. त्यांच्या प्रवेशाअगोदरच ही स्पर्धा होत असल्याने अनेक गुणवान खेळाडूंची या स्पर्धेत खेळण्याची संधी हुकली. हा त्यांच्यावर अन्यायच आहे. राज्य व राष्ट्रीय स्पर्धांच्या तारखा निश्चित झाल्यामुळे ही स्पर्धा घेण्यात येत आहे, असे आम्हाला सांगण्यात आले. किमान अन्य क्रीडा स्पर्धा अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच घ्याव्यात. जेणेकरून खेळाडूंची संधी हुकणार नाही याची काळजी घ्यावी अशी अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रिन्स, सम्यकला विजेतेपद

0
0

प्रिन्स, सम्यकला विजेतेपद
बुद्धिबळ स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पाचव्या रॅपिड लीग बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात प्रिन्स जैस्वालने विजेतेपद पटाकाविले. १३ वर्षांखालील गटात सम्यक देशपांडे विजेता ठरला.
कलश मंगल कार्यालयात ही स्पर्धा झाली. खुल्या गटात प्रिन्स जैस्वालने सहा पैकी पाच गुणांची कमाई करीत जेतेपद पटाकाविले. विनीत धूतने उपविजेतेपद मिळविले. पुष्कर डोंगरे, विलास राजपूत, सुधांशू निकम यांनी अनुक्रमे तृतीय, चतुर्थ व पाचवे स्थान मिळविले. या गटात महिला खेळाडूचे पारितोषिक वर्षा सामिद्रे हिने पटाकाविले.
सम्यक देशपांडेपाठोपाठ १३ वर्षांखालील गटात कार्तिक टेटवार उपविजेता ठरला. आशिष संकलेचाने तृतीय, राजवीरसिंग बेडवालने चतुर्थ, तर सोहम देशपांडेने पाचवे स्थान मिळविले. बालगटातील खेळाडू देवांशला पुरस्कार देण्यात आला. या गटात ७० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
दोन्ही गटातील विजेत्यांना प्रमुथ अतिथी किशोर लव्हेकर, क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, माजी दक्षता अधिकारी दौलतराव मोरे, अमरीश जोशी, अभिजीत वैष्णव, मिथुन वाघमारे, विलास राजपूत यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. मिथुन वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अनिल अतकरे, संजय वणवे, सचिन पुरी, सचिन मोरे, अनिल यदमाळ, मीनाक्षी अंबिलडूके, विद्या वैष्णव, संजय निकम, सावता काळे आदींनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images