Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जातीय शक्तींचा बिमोड कराः भाई वैद्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘जगात आमचा देश ज्ञानी असून विमान आणि सर्जरी शेकडो वर्षांपूर्वी अस्तित्वात होती असा डंका पिटणारे लोक चातुर्वण्याची भलावण करतात. दलितांवरचे अन्याय ते कधीच सांगत नाहीत. देशात दरवर्षी दलित अत्याचाराच्या ४० हजार घटना घडतात. दलित समाज सत्ताधारी झाला पाहिजे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते. या स्वप्नासाठी एकजुटीने जातीयवादी शक्तींचा बिमोड करा’ असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी केले. संघर्ष परिषदेत ते बोलत होते.
फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रबोधन परिषदेने संघर्ष परिषद घेतली. संत तुकाराम नाट्यगृहात गुरुवारी दुपारी ही परिषद झाली. यावेळी मंचावर ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, डॉ. प्रतिभा अहिरे, प्रबोधनकार सत्यपाल महाराज, डॉ. भालचंद्र कांगो, रमेशभाई खंडागळे, मिलिंद पाटील, साथी सुभाष लोमटे, अजमल खान, भीमराव सोनवणे, राम बाहेती, अण्णा खंदारे, लक्ष्मण जाधव व वर्षा गुप्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. मागील तीन वर्षात दलित व अल्पसंख्याक समाजावरील अत्याचार वाढले आहेत. खासगीकरणाने रोजगार हिरावला जाण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर संघर्ष परिषद घेण्यात आली.
‘पुरोगामी, डाव्या, आंबेडकरी चळवळीसमोरील आव्हाने’ या विषयावर भाई वैद्य यांनी सविस्तर भाषण केले. निवडणूक जिंकून जर्मनीचा सर्वेसर्वा होण्यापूर्वी हिटलरने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. जर्मनीला जगात सर्वश्रेष्ठ करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला भुलून लोकांनी निवडून दिले. भारतातसुद्धा हिटलरशाही येऊ घातली आहे. देशाचे पंतप्रधान म्हणजे हंटर घेऊन सर्वांना शिस्तीत काम करायला लावणारा नेता, असे लोकांना वाटते. मात्र, ते तसे नाही. साठ लाख अल्पसंख्याक ज्यूंची हिटलरने हत्या केली होती हे लक्षात घ्या. हिटलरचे समर्थन करणारी माणसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची होती. या देशात मानवाची उपेक्षा होते. किड्या-मुंग्यासारखी माणसे मरतात. पण, चीड-खेद उपाययोजना काहीच नाही. अशा देशाचा विकास निर्देशांकात १७८ देशात १३४ वा क्रमांक आहे. सेनगुप्ता अहवालानुसार ८२ टक्के लोक प्रचंड गरीब आहेत. दलित समाज सत्ताधारी करण्याचे आंबेडकरांचे स्वप्न होते. मोदींच्या कुशीत शिरून सत्ताधारी झालेले नाही. एकजुटीने जातीय शक्तीचा बिमोड करा’ असे वैद्य म्हणाले.
दरम्यान, या परिषदेत प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा सन्मानपत्र व संविधानाची प्रत भेट देऊन विशेष गौरव करण्यात आला. यावेळी आंबेडकरी चळवळीतील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

दक्ष रहा

‘एखाद्या व्यक्तीला जिवंतपणी प्रचंड त्रास देऊन निंदा-नालस्ती करून नामोहरम करण्यात येते. ती व्यक्ती मरण पावल्यानंतरही समाज मानत असेल तर आपणही पूजा करायची असा संघाचा डाव असतो. सध्या आंबेडकर, गांधी, विवेकानंद यांचा जयघोष करण्यात ते पुढे आहेत. बाईला धक्का लागला तर बाई किमान शिव्या देईल. पण, गायीला धक्का लागल्यास आपण जिवंत राहू की नाही अशी स्थिती आहे’ असे वैद्य म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वेरूळ अभ्यागत केंद्रात प्रकाश उजाळला

$
0
0

वेरूळ अभ्यागत केंद्रात प्रकाश उजाळला
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः
वेरूळ अभ्यागत केंद्रात तब्बल २० दिवसांनंतर प्रकाश पडला आहे. विजबिल न भरल्यामुळे महावितरणने वीज पुरवठा तोडला होता. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी वीज बिल भरण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आल आहे.
वेरूळ लेणी व बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. त्यामुळे येथे कायम वर्दळ असते. येथे येणाऱ्या भाविकांसाठी १०० कोटी रुपये खर्च करून वेरूळ अभ्यागत केंद्र आले. मात्र या अभ्यागत केंद्राचे ३५ लाख रुपयांचे बिल थकले होते. विजबिल भरले जात नसल्याने महावितरणने अखेर वीज पुरवठा खंडित केला होता.
वीज पुरवठा खंडित झाल्याने पर्यटकांची गैरसोय होऊ लागली. त्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्याशी चर्चा केली. पुढील महिन्यात थकीत बिल भरण्याचे त्यांनी आश्वासन दिले. त्यानंतर या अभ्यागत केंद्राचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश महावितरणचे ग्रामीण अधिक्षक अभियंता फुलकर यांना देण्यात आले. त्यानंतर हा वीज पुरवठा सुरळीत झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कूल बस, व्हॅनवर पोलिसांची कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस व व्हॅनविरुद्ध वाहतूक शाखेने गुरुवारपासून कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी मंगळवारी बैठक घेऊन स्लूक बस व व्हॅनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
वाहतूक शाखेच्या विविध पथकांनी गुरुवारी सकाळी शैक्षणिक संस्थाजवळ कारवाई केली. वाहनचालकाने सीटबेल्ट लावला आहे का, कागदपत्रांची तपासणी, गणवेश, लायसन्स आदींची तपासणी करण्यात आली. यात दोषी आढळलेल्या चालकांना दंडाच्या पावत्या देण्यात आल्या. मोंढा नाका येथील सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयात जाऊन चालकांना दंड भरावा लागला. दरम्यान, गुरुवारी १५ व्हॅनवर कारवाई केल्याची माहिती वाहतूक शाखेतून देण्यात आली. नियमबाह्यरित्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस, व्हॅन व रिक्षांवर कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युपीआयद्वारे फसवणूक; भाच्याला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘युपीआय’द्वारे १७ ग्राहकांच्या बँक खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे वळते करून तब्बल एक कोटी सहा लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्यास गुरुवारी ठाणे येथे अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर केले असता शनिवारपर्यंत (२९ जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. जी. उपाध्याय यांनी दिले. मामा-भाच्याने मिळून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले असून, मामाला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रच्या करमाड शाखेचे व्यवस्थापक तुषार संदीप भुसार यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, संशयित आरोपी प्रतिक पदनाभा पुजारी (वय २५, आशानगर, ठाणे) व त्याचा मामा विमल देविदास साळवे (रा. जळगाव मेटे, ता. फुलंब्री, औरंगाबाद) यांनी ‘युपीआय’द्वारे बँक ऑफ महाराष्ट्रच्या आठ शाखांमधील १७ ग्राहकांच्या खात्यातून एक कोटी सहा लाख रुपयांची रक्कम दुसऱ्यांच्या खात्यावर परस्पर वळती केली. पोलिसांनी विमल साळवे याला यापूर्वीच अटक करण्यात केली असून तो न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयीन कोठडीत असताना विमलने दिलेल्या जबाबावरून प्रतिक पुजारी याला गुरुवारी ठाण्यात अटक करण्यात आली. आरोपीने कोणा-कोणाच्या खात्यावर रक्कम वळती केली, तसेच आरोपीने रकमेची विल्हेवाट कशी लावली, आणखी कोणी साथीदार आहेत का, याचा तपास करणे बाकी आहे. त्यामुळे आरोपीला पाच दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील अर्चना लाटकर यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपीला शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नारेगावात छापा; वीज चोरीचे साहित्य जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गुन्हे शाखेच्या पथकाने नारेगाव येथील कुलर तयार करणाऱ्या कंपनीवर छापा टाकत २१ मीटर, सहा रिमोट व करंट ट्रान्सफॉर्मर जप्त केले. ही कारवाई गुरुवारी सकाळी करण्यात आली. हा एकूण एक लाखांचा हा ऐवज आहे.
रिमोट वापरून वीज चोरी करणारे रॅकेट नुकतेच उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करीत आहे. या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींनी सिडको एमआयडीसी भागात एका कंपनीत वीज मीटर व इतर साहित्य ठेवल्याची माहिती दिली होती. त्यावरून गुरुवारी सकाळी ‌सिडको एमआयडीसी भागातील प्लॉट क्रमांक डब्लू ४३ येथील कोहिनूर कुलर कंपनीवर छापा टाकण्यात आला. कंपनीच्या गोदामात तीन फेज व सिंगल फेजचे २१ मीटर, सहा वेगवेगळ्या प्रकारचे रिमोट, तीन फेजचे करंट ट्रान्सफॉर्मर, रिमोट बनवण्याचे साहित्य आदी मुद्देमाल सापडला. हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या कंपनीचे मालक अशफाक काझी (रा. कटकटगेट) हे सध्या धार्मिक कामासाठी बाहेरगावी गेल्याचे सांगण्यात आले.
ही कारवाई पोलिस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अजबसिंग जारवाल, जमादार शिवाजी झिने, विलास वाघ, गजानन मांटे, सुनील धात्रक, राजेंद्र चौधरी, देवचंद महेर, प्रभाकर राऊत, महिला कर्मचारी चांदे यांनी पार पाडली.

रिमोट बनवण्याचा कारखाना

जप्त करण्यात आलेल्या मीटरवर ग्राहकांची नावे व टेस्टिंग क्रमांक लिहलेले आहेत. तसेच शहरातून काही वीज मीटर चोरी गेल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. जप्त केलेले वीज मीटर त्या गुन्ह्यातील आहेत का, याचा तपास करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी वीज मीटरवर प्रयोग करून रिमोट तयार केले जात असल्याचा संशय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापुरात तपासणी; ७२ वीज चोऱ्या उघड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
महावितरणच्या पथकाने शहरातील हॉटेल, दुकाने, पिठाच्या गिरण्या व घरांतील वीज मीटरची तपासणी करून ७२ वीज चोऱ्या पकडल्या. या ग्राहकांना १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. या कारवाईत एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याची एक लाख रुपयांची वीज चोरी पकडण्यात आली आहे.
वैजापूर शहरात ५० टक्क्यांपेक्षा जास्त वीज चोरी होत असल्याचे महावितरणच्या तपसणीत लक्षात आले होते. त्यामुळे प्रादेशिक कार्यकारी संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या सुरक्षा पथकाने वैजापुरमध्ये बुधवारी तपासणी केली. मुख्य अभियंता सुरेश गणेशकर व अधीक्षक अभियंता फुलकर यांच्या नेतृत्वाखाली हॉटेल्स, पिठाच्या गिरण्या, दुकाने व काही घरातील वीज मीटरची पाहणी केली. रिमोटने मीटर बंद करणे, मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी होत असल्याचे उघड झाले. ही कारवाई कार्यकारी अभियंता राजपूत, अतिरिक्त कार्यकारी अभियंता भंगाळे, जैस्वाल, बुंदेले, खंगार यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी शाळेच्या आवारात जुगार; सात गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देवगाव रंगारी जवळील मौजे केसापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात जुगार खेळणाऱ्या सात जणांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई बुधवारी रात्री दहा वाजता करण्यात आली. या प्रकरणी देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केसापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात काही दिवसापासून जुगार खेळला जात असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी पथकाला छापा टाकण्याचे आदेश दिले. गस्तीवरील पथकाने बुधवारी रात्री दहा वाजता शाळेच्या आवारात छापा टाकला असता झन्ना मन्ना जुगार खेळला जात असल्याचे आढळले. पोलिसांनी भानुदास काळे, अप्पासाहेब झरेकर, प्रशांत धिवर, बबन शेख लतीफ, समाधान हार्दे, राजू खोसरे व रामकृष्ण काळे यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून रोख ११ हजार रुपये, मोबाइल जप्त केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर, डीवायएसपी डॉ. सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजश्री आडे, पोलिस नाईक युवराज पवार, लिंगायत व वाघ यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पाचशे जणांना कारणे दाखवा नोटीस

$
0
0

पाचशे जणांना कारणे दाखवा नोटीस

कागदपत्रांची पूर्तता झाल्यावरच नोंदणी प्रक्रिया

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उद्योग, व्यवसाय संबंधित परवाने नसणे अथवा अस्पष्ट असणे, पत्ता नसणे यासह कागदपत्रांची योग्य पद्धतीने पूर्तता न करणाऱ्या सुमारे ५०० करदात्यांना जीएसटी विभागाने कारणे दाखवा नोटिसा जारी केल्या आहेत. त्यांच्याकडून कागदपत्राची पूर्तता होताच नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

१ जुलैपासून देशभरात वस्तू व सेवाकर कायदा (जीएसटी) लागू करण्यात आला आहे. येथील जीएसटी विभागाकडे एकूण ३६ हजार मूल्यवर्धित कायद्यांतर्गत नोंदीत करदाते आहेत. या करदात्यांनी जीएसटीएन पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी, यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून जीएसटी विभागाकडून जनजागृती केली जात आहे. त्यापैकी सुमारे ३५ हजार करदात्यांनी प्रोव्हिजन आयडी घेतला आहे. तर त्यापैकी २० हजार करदात्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सध्या दररोज १०० ते १५० करदाते जीएसटीएनवर नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज करीत आहेत. एक जुलैपासून आतापर्यंत नव्याने सुमारे २ हजार करदात्यांची नोंदणी पूर्ण झाली. नोंदणी करताना करदात्यास व्यापार, व्यवसाय संबंधित परवाने, त्यांची कागदपत्रे, पत्ता, त्यांचा पुरावा, आधारकार्ड, पॅन, खाते क्रमांक आदी माहिती व कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करावी लागते, परंतु दररोज येणाऱ्या अर्जापैकी सुमारे २० ते ३० अर्जात संबंधित कागदपत्रे अस्पष्ट, अपूर्ण असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. आतापर्यंत सुमारे ५०० जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावत कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थित करा, असे सांगण्यात आले आहे. त्यांच्याकडून संबंधित कागदपत्रांची पूर्तता होताच नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कंत्राटी कर्मचारी बदलीमुळे संपावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील २३ कंत्राटी कर्मचाऱ्यांची गुरुवारी बदली करण्यात आली. अचानक बदली झाल्यामुळे विभागाचे काम विस्कळीत होईल, असा दावा करीत सर्व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी परीक्षा भवन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. कुलगुरू व कुलसचिवांनी कामाची माहिती घेऊन निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली.

साई इंजिनीअरिंग कॉलेजच्या मास कॉपी प्रकरणानंतर परीक्षा विभाग चर्चेत आला होता. विभागात अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे असल्यामुळे गैरव्यवहारात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप झाला होता. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दखल घेऊन विद्यापीठातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांची बदली केली. विद्यापीठ प्रशासनाने गुरुवारी परीक्षा विभागातील २३ कंत्राटी कर्मचाऱ्यांची बदली केली. या बदलीला कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. कायम सेवातील कर्मचारी सेवेत नसल्यामुळे अनुभवी कंत्राटी कर्मचारी कामकाज सांभाळत आहेत. या कर्मचाऱ्यांची बदली केल्यानंतर दुसऱ्या विभागातील कर्मचारी रुजू होतील. परीक्षा विभागाचे कामकाज समजून घेण्यास त्यांना बराच वेळ लागेल. सध्या निकाल आणि पदवी प्रमाणपत्राचे काम वेगात सुरू आहे. या कामात बदल्यांमुळे अडथळा निर्माण होईल असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

कुलगुरू दौऱ्यावर असल्यामुळे कर्मचाऱ्यांना भेटता आले नाही, मात्र शुक्रवारी परीक्षा भवन बंद ठेवण्यात येईल, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

पदवी प्रमाणपत्राला विलंब
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवी प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रचंड उशीर होत असल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. अर्ज केल्यापासून ७२ तासांत पदवी देण्याचा कोर्टाचा आदेश आहे, मात्र चार जुलै रोजी अर्ज करूनही पदवी प्रमाणपत्र मिळाले नसल्याची तक्रार कृष्णा कारभारी या विद्यार्थ्याने कुलगुरूंकडे गुरुवारी केली. संबंधित विभागातही दररोज जाऊनही दाद मिळत नसल्याचे अर्जात म्हटले आहे. संबंधित विद्यार्थी बीएस्सीचा विद्यार्थी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चकमकीनंतर अट्टल गुन्हेगार जेरबंद

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, लातूर
अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी व खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच पॅरोलवर सुटल्यानंतर फरार झालेला गुन्हेगार संतोष धृतराज याच्यासोबत गुरुवारी सकाळी पोलिसांची चकमक झाली. हा प्रकार नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव येथे घडला. चकमकीत संतोष हा जखमी झाल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यासोबतच यावेळी पोलिस ही किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती विशेष पोलिस पथकाचे प्रमुख डीवायएसपी गणेश किद्रे यांनी दिली.
संतोष धृतराज हा नांदेड जिल्ह्यातील एक खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. त्यानंतर तो २६ जून २०१५ रोजी पॅरोलवर जेलमधून बाहेर पडला होता. त्यानंतर तो जेलमध्ये परत आला नव्हता. दरम्यानच्या काळात २८ फेब्रुवारी २०१६ रोजी किल्लारी येथे पोलिसांची नाकाबंदी सुरू असताना संतोष हा चोरीचा ट्रक घेऊन जात होता. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या पोलिसांना शंका आल्याने त्यांनी त्या ट्रकचा पाठलाग केला. त्यावेळी संतोषने पोलिसांच्या अंगावर ट्रक घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. अनेक प्रलंबीत गुन्हाचा तपास करण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षकानी, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड, अतिरीक्त पोलिस अधिक्षक काकासाहेब डोळे यांनी डीवायएसपी गणेश किद्रे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक नियुक्त केले होते.
या विशेष पथकाला संतोष धृतराज हा तळणीगावच्या शिवारात आहे, अशी माहिती मिळाली होती. संतोष हा नेहमी गावठी पिस्तुल, तलवार असे धारदार शस्त्र बाळगून फिरणारा गुन्हेगार असल्यामुळे याच्याविषयी कोणी माहिती देत नव्हते. परंतु पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर तो नांदेड हद्दीतील लिंबगावमध्ये आला असल्याची माहिती आम्हाला मिळाली असे किद्रे यांनी सांगितले.
संतोषच्या घराला सकाळी पोलिसांनी घेराव घातला व त्याला शरण येण्याविषयी बजावले. त्यांने शरण येण्याऐवजी तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सुधाकर बावकर यांनी त्याच्या पायावर गोळी झाडली. त्यानंतर ही त्याने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या पायावर गणेश यादव यांनी गोळ्या झाडल्या या चकमकीत पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत जमाव जमत असताना नांदेड पोलिसांची कुमक तेथे पोहचली आणि त्याला आता जखमी अवस्थेतच नांदेडला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती किद्रे यांनी दिली.

संतोषवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे
खून प्रकरणासोबतच फरार असलेल्या संतोष धृतराजच्या विरोधात पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचे तीन गुन्हे, शस्त्र बाळगणे, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेष पथकात पोलिस उपनिरीक्षक कदम, संजय बेरळीकर, गणेश यादव, व्यंकटेश निटुरे, राहुल सोनकांबळे यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’च्या रजिस्ट्रीला अखेर मुहूर्त लागला

$
0
0

औरंगाबाद : शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यात पहिल्या रजिस्ट्रला अखेर गुरुवारी (२७ जुलै) मुहूर्त लागला. औरंगाबाद तालुक्यातील बेंदेवाडी येथील दोन शेतकऱ्यांच्या जमिनीची रजिस्ट्री प्रक्रिया करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले.

विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या उपस्थितीत कार्यालयात दस्त हस्तांतरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, बीडचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे अपर जिल्हाधिकारी जगदीश मनियार, उपजिल्हाधिकारी एम. व्ही. आरगुडे, पुनर्वसन विभागाचे उपायुक्त महेंद्र हरपाळकर, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार सतीश सोनी यांची उपस्थिती होती.

मुंबई-नागपूर या ७१० किलोमीटरच्या समृद्धी महामार्गासाठी जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून, बेंदेवाडी येथील शेतकरी सर्जेराव येडुबा शेजवळ यांची २२ गुंठे तर श्याम हिवराळे यांच्या ७५ गुंठे जमिनीची रजिस्ट्री प्रक्रीया पूर्ण करण्यात आली. शेजवळ यांची जिरायती, तर हिवराळे यांची हंगामी बागायत जमीन समृद्धी महामार्गासाठी विकत घेण्यात आली आहे. दरनिश्चितीनुसार शेजवळ यांना २२ गुंठे जमिनीचे ११ लाख ८८ हजार १३८ रुपये, तर हिवराळे यांच्या ७४ गुंठे जमिनीचे ६८ लाख ७७ हजार ६२४ रुपये त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले.

७५० शेतकऱ्यांची संमती
समृद्धी महामार्गासाठी गावनिहाय दरनिश्चिती केल्यानंतर शेतकऱ्यांमधून समृद्धीला विरोध मावळत असल्याचे चित्र आहे. आठवडाभरामध्ये तब्बल ७५० शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गासाठी संमती दिली असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

बाधितांची आज बैठक
मराठवाडा व विदर्भातील ‘समृद्धी’ बाधितांची निर्धार बैठक शुक्रवारी औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आली आहे. सिडकोतील व्ही. डी. देशपांडे सभागृहात दुपारी एक वाजता ही बैठक होणार आहे. राजू देसले, अॅड. रतनकुमार इचम, सोमिनाथ वाघ, प्रा. राम बाहेती यांची उपस्थिती असणार आहे. बैठकीला उपस्थित रहावे आसे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ रस्ते यादीचा घोळ सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासनाने रस्ते दुरुस्तीसाठी महिन्यापूर्वी अनुदान रूपाने शंभर कोटी रुपये मंजूर करूनही केवळ राजकीय पदाधिकाऱ्यांच्या रस्सीखेचीमुळे काम करायच्या रस्त्यांची यादी तयार झाली नाही. ही यादी केव्हा तयार होईल, हे आता खुद्द महापौरही सांगू शकत नाहीत. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या माथी खड्डेमय रस्ते कायम असल्याचे मानले जात आहे.

शहरातील रस्त्यांच्या कामासाठी शासनाने १५० कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, अशी विनंती महापालिका पदाधिकाऱ्यांनी केली होती. शिवसेनेचे तत्कालीन महापौर त्र्यंबक तुपे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानंतर भाजपचे भगवान घडमोडे महापौर झाले. राज्यात व केंद्रात भाजपचेच सरकार असल्यामुळे रस्त्यांसाठी अनुदान मिळावे म्हणून त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नाला यश देखील आले. २७ जून रोजी राज्य शासनाच्या नगर विकास खात्याने शंभर कोटींचे अनुदान मंजूर केल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून महापालिकेला पाठवले. या निधीतून रस्त्यांचीच कामे करायची, असे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी ठरविले.

शंभर कोटींमधून किती आणि कोणत्या रस्त्यांची कामे करायची याचा खल सुरू झाला. यादी तयार करण्याचे काम भाजपमधील पदाधिकाऱ्यांनीच सुरू केले. त्यात मतदारसंघाचा वाद निर्माण झाला. ‘आपल्या’ सरकारने अनुदान मंजूर केल्यामुळे ‘आपल्याच’ मतदारसंघात रस्त्यांची जास्तीत जास्त कामे झाली पाहिजेत अशी स्पर्धा भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू झाल्यामुळे यादी अद्याप तयार होऊ शकली नाही असे बोलले जात आहे. भाजपचे काही पदाधिकारी अप्रत्यक्षपणे याची कबुलीही देतात. रस्त्यांच्या यादीवरून महापालिकेतील राजकारण देखील तापले आहे. यादी तयार करताना सर्व पक्षाच्या नगरसेवकांना, पदाधिकाऱ्यांना व नेत्यांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी महापौरांकडे केली जात आहे. या सर्व ओढातणीत रस्त्यांच्या यादीचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.

सर्वानुमते रस्त्यांची यादी तयार केल्यावर रस्त्यांच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल महापालिकेला तयार करावा लागेल. या अहवालानंतर रस्त्यांच्या कामाच्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता घेऊन तो शासनाकडे पाठवावा लागेल. तांत्रिक मान्यतेच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर शासनाकडून शंभर कोटींचा निधी पालिकेच्या तिजोरीत जमा होईल. त्यानंतर रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे. अनुदान मंजुरीचे पत्र २७ जून रोजी मिळाल्यावर आठ दिवसात रस्त्यांच्या कामांची यादी तयार झाली असती, तर आतापर्यंत डीपीआर व तांत्रिक मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करून पालिकेच्या झोळीत शंभर कोटी रूपये पडले असते व रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ देखील करता आला असता, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

यादी लवकरच
अनुदान मंजुरीच्या महिन्यानंतरही रस्त्यांची यादी तयार न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान रस्त्यांच्या यादी संदर्भात महापौर भगवान घडमोडे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘यादी तयार करण्य़ाचे काम अंतिम टप्प्यात आले असून यादी लवकरच जाहीर केली जाईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते यादीचा घोळ सुरूच

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासनाने रस्ते दुरुस्तीसाठी महिन्यापूर्वी अनुदान रूपाने शंभर कोटी रुपये मंजूर करूनही केवळ राजकीय पदाधिकाऱ्यांच्या रस्सीखेचीमुळे काम करायच्या रस्त्यांची यादी तयार झाली नाही. ही यादी केव्हा तयार होईल, हे आता खुद्द महापौरही सांगू शकत नाहीत. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या माथी खड्डेमय रस्ते कायम असल्याचे मानले जात आहे.

शहरातील रस्त्यांच्या कामासाठी शासनाने १५० कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, अशी विनंती महापालिका पदाधिकाऱ्यांनी केली होती. शिवसेनेचे तत्कालीन महापौर त्र्यंबक तुपे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानंतर भाजपचे भगवान घडमोडे महापौर झाले. राज्यात व केंद्रात भाजपचेच सरकार असल्यामुळे रस्त्यांसाठी अनुदान मिळावे म्हणून त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नाला यश देखील आले. २७ जून रोजी राज्य शासनाच्या नगर विकास खात्याने शंभर कोटींचे अनुदान मंजूर केल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून महापालिकेला पाठवले. या निधीतून रस्त्यांचीच कामे करायची, असे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी ठरविले.

शंभर कोटींमधून किती आणि कोणत्या रस्त्यांची कामे करायची याचा खल सुरू झाला. यादी तयार करण्याचे काम भाजपमधील पदाधिकाऱ्यांनीच सुरू केले. त्यात मतदारसंघाचा वाद निर्माण झाला. ‘आपल्या’ सरकारने अनुदान मंजूर केल्यामुळे ‘आपल्याच’ मतदारसंघात रस्त्यांची जास्तीत जास्त कामे झाली पाहिजेत अशी स्पर्धा भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू झाल्यामुळे यादी अद्याप तयार होऊ शकली नाही असे बोलले जात आहे. भाजपचे काही पदाधिकारी अप्रत्यक्षपणे याची कबुलीही देतात. रस्त्यांच्या यादीवरून महापालिकेतील राजकारण देखील तापले आहे. यादी तयार करताना सर्व पक्षाच्या नगरसेवकांना, पदाधिकाऱ्यांना व नेत्यांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी महापौरांकडे केली जात आहे. या सर्व ओढातणीत रस्त्यांच्या यादीचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.

सर्वानुमते रस्त्यांची यादी तयार केल्यावर रस्त्यांच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल महापालिकेला तयार करावा लागेल. या अहवालानंतर रस्त्यांच्या कामाच्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता घेऊन तो शासनाकडे पाठवावा लागेल. तांत्रिक मान्यतेच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर शासनाकडून शंभर कोटींचा निधी पालिकेच्या तिजोरीत जमा होईल. त्यानंतर रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे. अनुदान मंजुरीचे पत्र २७ जून रोजी मिळाल्यावर आठ दिवसात रस्त्यांच्या कामांची यादी तयार झाली असती, तर आतापर्यंत डीपीआर व तांत्रिक मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करून पालिकेच्या झोळीत शंभर कोटी रूपये पडले असते व रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ देखील करता आला असता, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

यादी लवकरच
अनुदान मंजुरीच्या महिन्यानंतरही रस्त्यांची यादी तयार न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान रस्त्यांच्या यादी संदर्भात महापौर भगवान घडमोडे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘यादी तयार करण्य़ाचे काम अंतिम टप्प्यात आले असून यादी लवकरच जाहीर केली जाईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई होणारच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हायकोर्टाच्या आदेशानुसार अवैध व बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याबाबत गुरुवारी महापालिकेत बैठकांचे सत्र रंगले. कारवाईसंदर्भात प्रशासन काहीच माहिती देत नाही असे लक्षात आल्यामुळे महापौर भगवान घडमोडे प्रोटोकॉल तोडून आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्या दालनात गेले. तेव्हा कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई होणारच, असे आयुक्तांनी सांगितले.

हायकोर्टाच्या आदेशाची प्रत मिळाल्यावर झालेल्या बैठकीत कारवाईसाठी चार पथके स्थापन केल्याचे आयुक्तांनी जाहीर केले, मात्र दोन दिवस झाले तरी कारवाई केली नाही. बुधवारी मुंबईला गेलेले आयुक्त गुरुवारी परतले. धार्मिक स्थळांवरील कारवाईसंदर्भात प्रशासनाकडून माहिती जाणून घेण्यासाठी महापौरांनी आयुक्तांना आपल्या दालनात या असा निरोप दिला, पण पंधरा - वीस मिनीटे झाली तरी आयुक्त महापौरांच्या दालनात आले नाहीत. त्यामुळे महापौरच स्वतः आयुक्तांच्या दालनात गेले. तेथे त्यांनी दहा मिनिटांपर्यंत चर्चा केली आणि पुन्हा आपल्या दालनात आले.

महापौरांच्या पाठोपाठ आयुक्त देखील महापौरांच्या दालनात आले. अँटीचेंबरमध्ये आयुक्त, महापौर व काही पदाधिकाऱ्यांची सुमारे पाऊण तास बैठक चालली. त्यानंतर आयुक्त पुन्हा आपल्या दालनात आले. तेथे त्यांनी सर्व विभागप्रमख, वॉर्ड अधिकारी यांची व्यापक बैठक घेतली. धार्मिक स्थळांवरील कारवाईसाठीच ही बैठक झाल्याचे सांगण्यात आले, मात्र बैठकीबद्दल उघडपणे बोलण्यास कोणी तयार नव्हते.

धार्मिक स्थळांवरील कारवाईच्या संदर्भात कोर्टाने दिलेल्या आदेशाची माहिती प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्तांनी मला दिली नव्हती, त्यामुळे मी त्यांना माझ्या दालनात बोलावले होते. काही कारणांमुळे ते माझ्या दालनात येऊ शकले नाहीत. त्यामुळे मीच त्यांच्या दालनात प्रोटोकॉल तोडून गेलो. जनतेचा प्रतिनिधी असल्यामुळे जनभावना घेवून त्यांच्याकडे जाण्यात काही गैर वाटले नाही. - भगवान घडमोडे, महापौर

हायकोर्टाच्या आदेशानुसार धार्मिक स्थळांवर कारवाई केली जाणार आहे. कोणत्याही प्रकारची कुचराई केली जाणार नाही. कारवाई करण्याबद्दल नियोजन करण्यात आले आहे. - डी. एम. मुगळीकर, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ...कर्दनकाळाच्या जबड्यातून परतले!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बद्रीनाथ यात्रेसाठी गेलेल्या औरंगाबादच्या भाविकांची बस कर्णप्रयागजवळ दरीत कोसळली. या अपघातातून बचावलेले १९ भाविक गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास रेल्वे स्टेशनवर पोहचले. शिवसैनिक आणि कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी तात्काळ घाटीत पाठवून दिले.

जिल्हयातील फुलंब्री तालुक्यातील निधोना आणि पाडळीचे ३५ भाविक केदारनाथ-बद्रिनाथ यात्रेसाठी गेले होते. बद्रीनाथांचे दर्शन घेऊन कर्णप्रयागमार्गे केदारनाथाकडे जाताना २२ जुलै चामोली भागातील पर्वत रांगावरून त्यांची बस दरीत कोसळली. यात बसमधील दोन भाविकांचा जागेवर मुत्यू झाला. उर्वरित भाविकांवर श्रीनगर आणि देहराडून येथील हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. हे भाविक सचखंड एक्सप्रेसने औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर पोहोचले.

अपघात जखमी झालेले भाविक येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे किरण गणोरे आणि काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुदाम मते, किशोर बलांडे यांनी रेल्वे स्टेशन येथे अॅब्युलन्सच्या सहा गाड्या तयार ठेवल्या होत्या. रेल्वे येताच जखमींना रुग्णवाहिकेतून घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. यावेळी संतोष मेटे, आबाराव सोनवणे, लक्ष्मण तेलंग, संतोष सोमाणी, विनीत खरे यासह शासकीय वैदयकीय रुग्णालय महाविद्यालय भागातील रुग्णवाहिका संघटनेचे शेख रब्बानी, अझहर शेख, सचिन पांडव यांनी परिश्रम घेतले.

रेल्वे सुरक्षा बलाचे अरविंद शर्मा, गुंजाळ, डी. जी. कांबळे, सुनील नरवडे, जीआरपीचे एपीआय भगवान कांबळे, ए. एस. आय. लेले, दिलीप लोणारे, धनराज गडलिंगे, माधव दासरे, यशवंत गायकवाड, भाऊसाहेब पुरणार, केशव चपटे यांनी या मदतकार्यात सहभाग नोंदविला. फ्लाइंग स्कॉड, शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने रेल्वेस्टेशन ते घाटी मार्गादरम्यान वाहतूक मोकळी ठेवण्यात आली होती. अवघ्या आठ मिनिटांमध्ये नऊ अॅम्ब्युलन्सने जखमी घाटीत दाखल झाले. त्या ‌‌‌ठिकाणी उपचार सुरू करण्यात आले.

‘सचखंड’ने आलेल्या भाविकांची नावे
चंद्रकलाबाई नारायणराव राऊतराय, कडूबाई लक्ष्मण गाडेकर, नर्मदाबाई कारभारी राऊतराय, वंदना संदीप राऊतराय, विठाबाई खंडू गाडेकर, हिराबाई देविदास गाडेकर, नंदाबाई किसन राऊतराय, विनायक देवराव राऊतराय, संदीप काकासाहेब राऊतराय, विमलबाई विनायक राऊतराय, अप्पाराव रामराव राऊतराय, खंडू केशव गाडेकर, रावसाहेब भानुदास राऊतराय, काकासाहेब लक्ष्मण गाडेकर, संगीता अप्पाराव राऊतराय (सर्व रा. निधोरा, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद).

स्थानिकांची मदत मिळाली
अपघाताची बातमी समजताच देविदास गाडेकर हे कर्णप्रयागला पोहचले होते. तेथे स्थानिक, कर्णप्रयाग येथील पोलिस कर्मचारी, रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी मदत केली. माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांचीही मदत झाली, अशी माहिती गाडेकर यांनी दिली.

अन्य जखमींना विमानातून आणणार
कर्णप्रयाग येथील अपघातानंतर १९ जण सोडण्यात आले आहे. काही जणांची प्रकृती चांगली असल्याने ते औरंगाबादला आले. सात जणांची प्र‌कृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या जखमी भाविकांना विमानाद्वारे किंवा रेल्वेद्वारे आगामी काही दिवसांत आणले जाणार असल्याची माहिती फुलंब्री भागातील नागरिकांनी दिली.

...अन् बस दरीत कोसळली
अपघातातून बचावलेले काकासाहेब लक्ष्मण गाडेकर यांच्या सोबत त्यांच्या घरातील पाच नातेवाईक होते. त्यांनी या भयाण घटनेची माहिती दिली. ते म्हणाले, केदारनाथ १३५ किलोमीटर होते. तेव्हा बस चामोली जिल्ह्यातून जात होती. शुक्रवारी दुपारच्या वेळी पर्वत रांगावरून जाताना ड्रायव्हरने फोन ठेवला. काही वेळेतच तो ओरडला. ‘गड्डी गई...’ त्यानंतर गाडी दरीत कोसळली. गाडीने एक कोलांटी खाल्ली. काच फुटल्याने मी बाहेर पडलो. काही वेळेत गाडीने दुसऱ्यांदा उलटली. मला काय करावे हे सुचत नव्हते. मी देविदास साहेबांना फोन लावला. गाडी कोसळल्याचे दिसताच नागरिक धावून आले. त्यांनी बचावाला सुरुवात केली. चामोली गावातील नागरिकांनी मला सांगितले की या पर्वतावरून पडल्यानंतर एकही जण जिवंत राह‌त नाही. तुम्ही वाचले. तुमचे नशीब. आम्ही वाचलो,गावाला पोहोचलो.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ वेतन कराराची पूर्तता करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तिसऱ्या वेतन कराराची तातडीने पूर्तता करा यासह अन्य मागण्यांसाठी बीएसएनल कर्मचाऱ्यांनी गुरुवारी लाक्षणिक संप केला. मागण्या त्वरित मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला.

तिसऱ्या वेतनसुधारणा समितीने सुचवल्यानुसार अद्याप वेतनवाढ न मिळाल्याने बीएसएनएलचे कर्मचारी, अधिकारी संतप्त झाले आहेत. या विरोधात त्यांनी लढा देत आपल्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी संप पुकारला. बीएसएनएल कर्मचारी संघटना, बीएसएनएल एसएनईए, एसएनएटीटीए, एआयजीईए आदी संघटनांनी एकत्र येत संघर्ष सुरू केला आहे.

सिडको येथील संचार भवनासमोर सकाळी अकराच्या सुमारे आंदोलनकर्त्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. कामगार एकजुटीचा विजय असो, वेतन वाढ मिळालीच पाहिजे अशी घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. तिसऱ्या वेतन सुधारणा समितीच्या शिफारसी १९ जुलै रोजी सरकारने मान्य केल्या आहेत. तीन वर्षे फायद्यात चालणाऱ्या सरकारी कंपन्यांनी वेतनवाढ द्यावी, अशी शिफारस समितीने केली आहे. बीएसएनएल तोट्यात असल्यामुळे या कंपनीत वेतनवाढ लागू करण्यात आलेली नाही. सरकारने बीएसएनएलच्या विरोधात धोरणे राबवल्यामुळेच कंपनी तोट्यात गेली आहे, असा आरोप कर्मचारी संघटनेचे नेते जॉन वर्गिस यांनी करत वेतनवाढ मिळालीच पाहिजे, अशी मागणी केली.

१ जानेवारी २०१७पासून तिसरा वेतन करार लागू करावा, निवृत्त कर्मचाऱ्यांना संशोधित पेन्शन द्या, सरळ सेवा भरतीद्वारे घेतलेल्या कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्ती योजनेचा लाभ देण्यात यावा यासह अन्य मागण्या संघटनेने केल्या. बी. बी. दुबिले, विलास सवडे, बी. एन. सानप, एम. एल. गायकवाड, जी. बी. काळे. आर. एस. राऊत यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कामकाज ठप्प
देशव्यापी संपात जिल्ह्यातील सुमारे सातशेहून अधिक अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे ग्राहक सेवा केंद्रातील कामकाज दिवसभर ठप्प झाले होते, असा दावा आंदोलनकर्त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पीक विमा सर्वच बँकेत स्वीकारणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नांदेड
पीक विमा ऑनलाइन भरताना दिवस-रात्र त्यांना ताटकळत बसावे लागत होते. शेतकयांना होणारा त्रास पाहता या संदर्भात नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषीमंत्री फुंडकर यांच्याशी हा शेतकयांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मांडला. यावर मुख्यमंत्र्यांनी थेट केंद्रीय कृषीमंत्री यांच्याकडे या संदर्भात माहिती दिली. विमा कंपनी व मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा होऊन यात राज्यातील सर्वच बँकेत पीक विमा भरण्याचा निर्णय घेण्यात आला. चिखलीकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आता सर्वच बँकेत पीक विमा भरून घेतला जाणार आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकयांना पीक विमा ऑनलाइन भरण्यासाठी सीएससी सेंटरवर तासनतास ताटकळत बसत होते. त्यातच राज्यातील सर्वच जिल्हा बँकामध्ये ऑफलाइन किंवा ऑनलाइन विमा भरण्यासाठी सॉफ्टवेअरच्या येत असलेल्या अडचणी वाढत चालल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून शेतक-यांकडुन विमा स्वीकारणे जवळपास बंदच होते. विमा भरणे हा शेतक-यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न चिखलीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषीमंत्री पांडूरंग पुंडकर यांच्याशी सविस्तर चर्चा करून विषद केला. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकार अखत्यारित प्रश्न असल्यामुळे थेट केंद्रीय कृषीमंत्री यांच्याशी संवाद साधला. संपुर्ण वस्तुस्थिती लक्षात घेवुन केंद्रीय कृषीमंत्री यांनी विमा कंपनी व संबंधितांना बँकेत पीक विमा घेण्याचा निर्णय दिला. केंद्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे राज्य सरकारनेही पीक विमा घेणे संदर्भात संबंधीत विभागांना आदेश पारीत केले. आ. चिखलीकर यांनी पीक विमा संदर्भात जो पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले असून आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह सर्वच बँकेत पीक विमा भरता येणार आहे.


जिल्हा बँकेत आजपासून पीक विमा स्वीकारणार
नांदेड जिल्ह्यातील सर्व बँकाच्या शाखांमधून संगणक सॉफ्टवेअरच्या तांत्रीक अडचणीमुळे पिकविमा स्विकारण्यात प्रचंड अडचणी निर्माण झाल्या होत्या. जिल्हा मध्यवर्ती बँकांना ३१ जुलैपर्यंत पीक विमा स्वीकारुन तो विमा पोर्टलवर समाविष्ठ करण्यासाठी कालावधी वाढवून देण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये पीक विमा स्वीकारण्यासाठी सुरुवात करण्यात आल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा आमदार चिखलीकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ संतप्त शेतकऱ्यांची बँकेवर दगडफेक

$
0
0

परभणी : पीकविमा भरण्याची मुदत संपत असल्यामुळे विमा भरण्यासाठी बँकांमध्ये शेतकऱ्यांनी एकच गर्दी केल्याने यंत्रणा कोलमडून पडली. त्यामुळे संयम तुटलेल्या शेतकऱ्यांनी जिंतूर तालुक्यातील बोरी येथे रास्तारोको आंदोलन केल्यनंतर मध्यवर्ती बँकेवर जोरदार दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार करत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
जिंतूर महार्गावरील बोरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत गुरुवारी शेतकऱ्यांची सकाळपासूनच पीकविमा भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. वाढलेली गर्दी आणि तांत्रिक अडचणींमुळे विमा भरून घेण्यात अडचण येत होती. यामुळे शेतकऱ्यांनी दुपारी १ वाजता सुरू केलेले रास्ता रोको आंदोलन ३ वाजेपर्यंत चालले. हे आंदोलन पोलिसांच्या मध्यस्थीत शेतकरी आणि बँक अधिकारी यांची चर्चा झाल्यानंतर मागे घेण्यात आले. यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शटर उघडताच एकच गोंधळ उडाला. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी दगडफेक करण्यास सुरूवात केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच पोलिसांनी लाठीमार केला. यावेळी काही काळ गेंधळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परभणीहून दंगा नियंत्रण पथक आल्यानंतर आंदोलक पांगले. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कांबळे फौजफाट्यासह बोरीत ठाण मांडून आहेत. दरम्यान, पीक विमा भरण्याची मुदत वाढविण्याची प्रक्रिया शासनस्तरावरून सुरू आहेत. मध्यवर्ती बँकेकडूनही जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा विमा भरून घेण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा ऊभी करण्याचे प्रयत्न असल्याची माहिती बँकेचे मुख्य व्यवस्थापक व्ही. जी. जाधव यांनी दिली .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

असंघटित कामगारांना द्या दरमहा २६ हजार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देशात मोठ्या संख्येने असलेला असंघटीत कामगार गुलामीचे जीवन जगत आहेत. मग देश स्वतंत्र झाला हे कसे म्हणता येईल, असा संतप्त सवाल स्वामी अग्निवेश यांनी केला. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांचे वेतन असंघटीत कामगारांना द्यावे, अशी मागणी केली. रोज किमान एक हजार किंवा महिन्याकाठी २६ हजार रुपये वेतन मिळावे, यासाठी निर्णायक लढा सुरू झाल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगतिले.
स्वामी अग्निवेश यांनी स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्रात शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाकपचे ज्येष्ठ नेते अॅड. मनोहर टाकसाळ, सुभाष लोमटे, कासमभाई, बुद्धीनाथ बराळ, अण्णासाहेब खंदारे उपस्थित होते.
‘देशात सुमारे ९० टक्क्यांहून अधिक कामगार असंघटीत क्षेत्रात काम करतात. त्यांची संख्या सुमारे ५० कोटींच्या घरात आहेत. त्यांचे देशाच्या जीडीपीत मोठे योगदान आहे. पण, त्यांनाच किमान वेतन मिळत नाही,’ असे ते म्हणाले. केंद्र सरकारने सर्वत्र सारखे किमान वेतन देण्याचा निर्णय घेतला, त्याचे स्वागत केले. अनेक असंघटीत कामगार गुलामगिरी, वेठबिगारीचे जीवन जगत आहे. असे असताना देश स्वतंत्र झाला असे कसे म्हणता येईल. अशा भयावह परिस्थितीत राज्यकर्त्यांना स्वतंत्र्य दिनी झेंडा फडकविण्याचा अधिकारच नाही, असे विधानही स्वामींनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समन्वयाने काम केल्यास विकासः अंभोरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
‘केंद्र व राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जास्ती-जास्त निधी आणून योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्यासाठी आमदार प्रशांत बंब यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित व समन्वयाने काम केल्यास तालुक्याचा विकास सहजतेने होईल,’ अशी अपेक्षा पंचायत समिती सभापती अर्चना अंभोरे यांनी व्यक्त केली.
पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीच्या अंतर्गत ७६ गावांच्या विकासासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती अंभोरे होत्या. उपसभापती गणेश अधाने, सदस्य युवराज ठेंगडे, रेखा चव्हाण, हीना मनियार, जिल्हा परिषद सदस्या हिंदवी खंडागळे, सुरेश सोनवणे आदी उपस्थित होते.
‘जनतेचे प्रश्न, समस्यांचे निराकरण होण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अधिकाराचा वापर सामाजिक दृष्टिकोन ठेवून करावा,’ अशी सूचना जिल्हा परिषद सदस्य एल. जी. गायकवाड यांनी केली. प्रलंबित प्रश्न सोडवून न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सभापती अंभोरे यांनी सांगितले. समस्या छोटी अथवा मोठी, असो ती समन्वयाने सोडविण्यावर भर दिला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
या बैठकीला गटविकास अधिकारी हारकचंद कहाटे, गटशिक्षणाधिकारी एम. डी. दहिफळे, शिक्षण विस्तार अधिकारी व्ही. सी. केवट, तालुका कृषी अधिकारी वैजनाथ हांगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बलराज पांडवे, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाधिकारी सविता बिक्कड, आरित फाउंडेशनचे सीईओ अनिल घुगे, आशिष कुलकर्णी, प्रकाश वाकळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images