Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पीकविमा भरण्यास शेतकरी उदासीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
तालुक्यातील जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांनी पीकविम्याकडे पाठ फिरवली आहे. पीकविम्याची मुदत संपण्यास एक दिवस राहिलेला असताना (३० जुलै) तालुक्यातील केवळ आठ हजार ७१० शेतकऱ्यांनी ६३ लाख ५५ हजार रुपयांचा विमा हप्ता भरला आहे. गेल्या वर्षी तब्बल एक लाख २७ हजार ७७० शेतकऱ्यांनी दोन कोटी ७९ लाख ३० हजार रुपयांचा हप्ता भरला होता.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मोंढा मार्केट शाखेत शेतकऱ्यांनी सोमवारी शेवटचा दिवस असल्याने विमा हप्ता भरण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, तुलनेने गर्दीचे प्रमाण कमी होते. वैजापूर तालुक्यात यावर्षी मृग नक्षत्रात चांगला पाऊस पडल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी जून महिन्यात पेरणी केली. चांगला पाऊस झाल्याने यावर्षी चांगले उत्पादन येण्याची अपेक्षा आहे. या परिस्थितीत पीक विमा मिळणार नाही, असा समज झाल्याने बहुतांश शेतकरी विमा हप्ता भरण्याबद्दल उदासीन आहेत.
मागील वर्षी कमी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला. शिवाय विमा भरण्याची किचकट ऑनलाइन प्रक्रिया यामुळे विमा भरण्यास शेतकरी उत्सूक नसल्याचे दिसते. यावर्षी कृषी सहायकांनी काम बंद आंदोलन केल्याने योजनेची जनजागृती पुरेशआ प्रमाणात झाली नाही. त्याचाही योजनेला फटका बसला आहे.

पिकांची स्थिती गंभीर

गेल्या काही दिवसातील रिमझिम पाऊस वगळता जुलै महिन्यात पावसाने ताण दिल्याने पिकांची परिस्थिती नाजूक झाली आहे. त्यामुळे पिकांना संरक्षण म्हणून काही शेतकऱ्यांनी विम्याचा आधार घेतला आहे. पिकांची सध्याची परिस्थिती पाहता मुदतवाढ मिळाल्यास विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने यावर्षी शेतकऱ्यांची विमा भरण्याची मानसिकता नव्हती. मात्र मुदत वाढण्याची अपेक्षा आहे. पिकांची सद्यपरिस्थिती पाहता शेतकरी विमा भरतील, अशी अपेक्षा आहे
-एस. एन. मुसने
कृषी अधिकारी, पंचायत समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पद्मपुऱ्यात भरदिवसा घरफोडी; दागिने पळवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एका प्राध्यापकाचे पद्मपुरा भागातील घर भरदिवसा फोडून चार तोळ्यांचे दागिने लंपास करण्यात आले. हा प्रकार सोमवारी सकाळी १० ते दुपारी १२ च्या दरम्यान गुलाबपुष्प अपार्टमेंटमध्ये घडला. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
प्रा. राजन राजपूत हे सोमवारी सकाळी १० वाजता कुलूप लावून सिडकोतील कॉलेजमध्ये गेले, त्यांची पत्नी माहेरी गेलेली आहे. ही संधी साधून चोरांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला व चार तोळ्यांचे सोन्याचे द‌ागिने घेऊन पोबारा केला. प्रा. राजपूत यांची भाच्ची दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घरी आली असता कुलूप तुटलेले दिसले. तिने हा प्रकार प्रा. राजपूत यांना कळवला. पोलिसांना माहिती दिल्यानंतर वेदांतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फिंगर प्रिंटस एक्स्पर्ट व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, कोणतीही ठोस माहिती प्राप्त झाली नाही.

एकाच इमारतीत दुसऱ्यांदा चोरी

गुलाबपुष्प या इमारतीमध्ये फेब्रुवारीमध्ये चोरी झाली होती. त्यावेळी जितेंद्र जैन यांच्या घरातून चोरांनी सव्वा लाखांचा ऐवज लंपास केला होता. या चोरीचा तपास अद्याप लागलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडी परिसरात इको सेन्सिटिव्ह झोनला विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जायकवाडी पक्षी अभयारण्याभोवती पर्यावरण संवेदनशील क्षेत्राची अंतिम अधिसूचना पर्यावरण व वन मंत्रालयाने जारी केली आहे. अभयारण्याची सीमारेषा ५०० मीटरपर्यत असून ते एकूण १४१ किलोमीटर क्षेत्रापर्यत विस्तारलेले आहे. दरम्यान, इको सेन्सिटिव्ह झोनमुळे अनेक निर्बंध येणार असल्याने स्थानिकांनी विरोध केला आहे. दुसरीकडे वन्यजीव विभागातर्फे इको सेन्सिटिव्ह झोनचे लाभ समजावून सांगण्यासाठी जनजागृती अभियान, मेळावे घेतले जाणार आहेत.
जायकवाडी धरणाच्या परिसरात पर्यावरण, वन व जलवायू परिर्वतन मंत्रालयाने इको सेन्सिटिव्ह झोनसंदर्भातील अंतिम अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध केली आहे. सुरुवातील या झोनचे सीमाक्षेत्र हे दहा किलोमीटरपर्यंत प्रस्तावित होते. त्यानंतर, वन, महसूल विभागाचे अधिकारी, लोकप्रनिधी तसेच, पर्यावरण अभ्यासक यांच्या समितीने घेतलेल्या बैठकांनतर सुधारित प्रस्ताव तयार झाला. सर्व्हेक्षण झाल्यानंतर अंतिम मुसदा वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात आला होता. आता जारी अंतिम अधिसूचना झोनची १० किलोमीटर अंतराची अट शिथील करून क्षेत्र घटविण्यात आले आहे.
अधिसूचना जारी झाल्याने आता या झोन क्षेत्रात सॉ मिलला बंदी असणार आहे. तसेच कॅरीबॅग वापरण्यास बंदी असेल. परंतु, या परिसरातील स्थानिकांच्या दैनदिन व्यवहारावर परिणाम होणार नाही, असा दावा वन्यजीव अभ्यासक डॉ. दिलीप यार्दी यांनी केला.

स्थानिकांचा विरोध

अभयारण्यास विरोध नाही पण, इको सेन्सिटिव्ह झोनला विरोध असल्याचे पैठण येथील रहिवासी प्रगतशील शेतकरी सतीष बलदवा यांनी सांगितले. शेतकरी व स्थानिकांवर अनेक बंधने आणली जातील, कायद्यांच्या कचाट्यात सापडू, असे सांगत त्यांनी पाचशे मीटरची अट रद्द करा, अशी मागणी केली. स्थानिकांना न्याय मिळाला पाहिजे, चर्चेतून न्याय मिळाला नाही, तर लोक आंदोलनाचे हत्यार उपसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला.

जनजागृतीवर भर

अंतिम अधिसूचना नुकतीच जारी झाली आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांमध्ये काही गैरसमज असतील तर दूर केले जाईल. इको सेन्सिटिव्ह झोन हा पर्यावरण व सर्वांच्या दृष्टीने लाभकारक आहे. याबाबत मेळावे, बैठका घेऊन जनजागृती केली जाईल, अशी माहिती वन अधिकारी (वन्यजीव) कमलाकर धामगे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भवती प्रेयसीसोबत लग्नास नकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्यानंतर पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या तरुणीसोबत लग्न करण्यास तो तरूण व त्याच्या कुटुंबाने नकार दिली आहे. आश्चर्च म्हणजे मुलाचे वय लग्नासाठी कमी असल्याचे कारण देण्यात आले आहे. त्यामुळे या तरुणीने थेट सिडको पोलिस ठाण्याची पायरी चढून तरूण व त्याच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीचे वय २१ वर्षे असून तिची स्वप्नील किसन गवळे याच्यासोबत दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले व ते सहा महिन्यांपूर्वी पळून गेले. या प्रकरणात स्वप्नील व त्याच्या कुटुंबाविरुद्ध फेब्रुवारीमध्ये सिडको पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणीला शोधून कोर्टापुढे हजर केले असता तिने आई-वडिलांकडे राहण्यास नकार दिला होता. त्यामुळे ती स्वप्नीलसोबत राहत होती. या काळात स्वप्नीलने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक सबंध ठेवले. सध्या ही तरुणी पाच महिन्यांची गर्भवती आहे. त्यानंतर स्वप्नीलने लग्नासाठी स्वतः वय कमी असल्याचे सांगून लग्नास नकार दिला. संतापलेल्या तरुणीने रविवारी पोलिस ठाणे गाठून आरोपी स्वप्नील गवळे व त्याला पैसे देऊन मदत करणारे त्याचे वडिल किसन गवळे यांच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आहे. या प्रकरणी पीएसआय सागर कोते तपास करीत आहेत.

आई-वडिलांकडे राहणास नकार

सहा महिन्यांपूर्वी पळून गेलेल्या या जोडप्याला शोधून तरुणीला कोर्टापुढे हजर केले होते. त्यावेळी तिने आई-वडिलांकडे राहण्यास नकार दिला होता. त्यामुळे ती स्वप्नीलसोबत राहत होती. पण, गर्भवती राहिल्यानंतर त्याने लग्नाला नकार दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रॅम्पवर उतरायचंय, नोंदणी करा

$
0
0


रॅम्पवर उतरायचंय, नोंदणी करा
बुधवारी रंगणार श्रावणक्वीनची पहिली फेरी; नावनोंदणीचा आज अखेरचा दिवस
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तरुणींच्या आयुष्याला नवी कलाटणी देणाऱ्या ‘महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन’ या स्पर्धेच्या नावनोंदणीला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. डॉक्टर, इंजिनीआर, मॉडेल अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तरुणींनी या स्पर्धेसाठी नावनोंदणी केली आहे. तुम्हालाही रॅम्पवर आपला जलवा दाखवायचा आहे, तर आजच नोंदणी करा. आज (दि. १ ऑगस्ट) या स्पर्धेसाठी नावनोंदणी करण्याची शेवटची तारीख आहे. ऑनलाइन किंवा महाराष्ट्र टाइम्सच्या उस्मानपुरा कार्यालयात येऊन तुम्हाला नोंदणी करता येईल.
‘श्रावणक्वीन’ या स्पर्धेची प्राथमिक फेरी बुधवारी (२ ऑगस्ट) होते आहे. या फेरीच्या नावनोंदणीला स्पर्धकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोच आहे; तुम्हीही स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्सुक असाल, तर लगेच तुमचं प्रोफाइल अपलोड करा आणि स्पर्धेत सहभागी व्हा. ‘श्रावणक्वीन’ ही काही फक्त ब्युटी कॉन्टेस्ट नाही, तर ही आहे ‘पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट’. त्यामुळे आकर्षक व्यक्तिमत्त्व, कुठलीही एक कला आणि हजरजबाबीपणा असेल, तर ही स्पर्धा तुमच्यासाठीच आहे.
रॅम्पवॉक करून आल्यानंतर मंचावर सर्वांसमोर उभं राहून करून दिलेली स्वतःची ओळख, त्यानंतर तुमच्यातील कलागुण सादर करण्याची संधी आणि नंतर परीक्षकांची प्रश्नोत्तरं अशा विभागांमध्ये ही प्राथमिक फेरी होईल. ओळख फेरीअंतर्गत स्पर्धकांनी स्वतःविषयी माहिती सांगणं अपेक्षित आहे. त्यानंतर होणाऱ्या ‘टॅलेंट राउंड’मध्ये कला सादरीकरण करायचं आहे. यात नृत्य, गायन, अभिनय, वाद्यवादन, शिल्पकला, चित्रकला, रांगोळी, निवेदन असे अनेक पर्याय असू शकतात. प्रश्नोत्तरांच्या फेरीत परीक्षक स्पर्धकांना प्रश्न विचारतील. यातून अंतिम फेरीसाठी स्पर्धक निवडले जातील.
अशी करा नोंदणी
ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी http://www.mtshravanqueen.com या वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. या वेबसाइटवर गेल्यानंतर ‘Participate now’ या पर्यायावर क्लिक केल्यावर रजिस्ट्रेशन फॉर्म भरता येणार आहे. या फॉर्ममध्ये तुमचे पूर्ण नाव, पत्ता, फोन नं., इ-मेल अॅड्रेस, तुमचे पॅशन काय?, उंची, वजन, हेअर कलर, आय कलर आदी तुमच्याविषयी माहिती नमूद करायची आहे. यामध्ये तुमचे फोटोदेखील अपलोड करायचे आहेत. तुम्हाला ९८२२६३०५५५ या क्रमांकावर संपर्क करूनही नोंदणी करता येईल. याशिवाय महाराष्ट्र टाइम्सच्या उस्मानपुरा येथील कार्यालयात येऊन तुम्ही फॉर्म भरूनही तुमची नोंदणी निश्चित करू शकता.
स्पर्धेचे नियम
तरुणी १८ ते २५ वयोगटांतील आणि अविवाहित असावी.
प्राथमिक फेरीत स्पर्धक तरुणीला तीन मिनिटांत आपली कला सादर करावी लागेल.
त्यानंतर परीक्षक स्पर्धकाला सामान्यज्ञानाशी संबंधित प्रश्न विचारतील.
परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
आजच (दि. १ ऑगस्ट) स्पर्धकांना ऑनलाइन फॉर्म किंवा ऑफिसमध्ये प्रत्यक्ष येऊन नावनोंदणी करता येणार आहे.
प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी निवड झाल्यास ग्रुमिंग सेशन्सना पूर्णवेळ उपस्थित राहणं बंधनकारक असेल. यातील फेरीसाठीचा पेहराव खास डिझाइन करून
घेतला जातो. त्याचं मूल्य संबंधित स्पर्धकालाच द्यावं लागेल.
व्होट फॉर हर
‘श्रावणक्वीन’मध्ये आम्ही वाचकांनाही सहभागी करून घेत आहोत. ऑनलाइन रजिस्ट्रेशन केलल्या तरुणींना वाचक व्होट करू शकतील. यामध्ये ज्या तरुणींना सर्वाधिक व्होट मिळतील, त्यांची निवड प्राथमिक फेरीसाठी निवड होणार आहे. उद्या (दि. २ ऑगस्ट) सकाळी साडेनऊ वाजता श्रावणक्वीन स्पर्धेस प्रारंभ होणार आहे. स्पर्धेत सहभागी तरुणींनी सकाळी ९ वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. क्रांती चौक येथील हॉटेल मॅनोर येथे स्पर्धकांनी आपण आल्याची नोंद करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळ जाहीर करा; पैठणमधून मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
मागच्या एक महिन्यापासून पैठण तालुक्याच्या बहुतांश भागात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पिके जळून गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
यावर्षी तालुक्यातील पूर्व-पश्चिम भाग वगळता, उर्वरित तालुक्यात अद्यापपर्यंत सरासरीच्या २५ टक्केही पाऊस पडलेला नाही. परिणामी, तालुक्यातील जवळपास ८० टक्के भागातील खरीप पिके जळून गेली आहेत. काही भागातील पिके जळण्याच्या मार्गावर आहे. यामुळे शेतकऱ्यांना लागवडीपोटी प्रती एकर दहा हजार रुपये नुकसान झाले आहे. पाऊस नसल्याने जनवारांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला असून तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे.
तालुक्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्य शासनाने पैठण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, चारा छावण्या सुरू कराव्यात, पाण्याचे टँकर सुरू करावेत, पीक विम्याची मुदत वाढ करावी व विमा कंपन्यानी गाव पातळीवर शेतकऱ्यांचा विमा हप्ता भरून घ्यावा, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार महेश सावंत यांना देण्यात आले. अन्नदाता शेतकरी संघटनेचे जयाजीराव सूर्यवंशी, सुनील तांबे, माऊली मुळे, किशोर दसपुते, संभाजी तवार, जिजाभाऊ तांबे, काकासाहेब तांबे, कल्याण तांबे, ज्ञानदेव नलावडे, सावलीराम थोरे, अमोल गोर्डे यांनी शेतकऱ्यांतर्फे तहसीलदारांना निवेदन दिले.

या गावांतील शेतकरी

यावेळी तालुक्यातील तांबे डोणगाव, दरेगाव, पोरगाव, पाडळी, बालानगर, तुपेवाडी, कडेठाण, आंतरवाली, एकतुनी, ब्रह्मगाव, अब्दुलपूर, आडुळ, गेवराई, या गावांतील गावकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरला गंडा; आरोपीची रवानगी हर्सूलला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील डॉक्टरला सहा लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या संशयित आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. पाटील यांनी सोमवारी दिले.
या प्रकरणी डॉ. राजेश रमेश सावजी (वय ४३, रा. रोकडिया हनुमान कॉलनी) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, अब्दुल असद अब्दुल हनीफ याने भेंडाळा (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथे स्वस्तात जमीन मिळत असून, जमीन विकत घेण्याचे आमीष फिर्यादीला दाखवले आणि आरोपी संदीप आकाश हिवराळे (वय ३१, रा. ज्युबली पार्क, औरंगाबाद) याच्यासह इतर संशयित आरोपींना जमिनीचे मालक म्हणून फिर्यादीसमोर आणले. जमिनीचा सात-बारा पाहून फिर्यादीने १३ लाखांत व्यवहार ठरवला आणि शंभर रुपयांच्या बाँडवर दहा एकर जमिनीची इसारपावती करण्यात आली. त्यानंतर फिर्यादीने एक लाखाचा धनादेश, तर पाच लाखांची रक्कम संशयित आरोपी संदीप याच्याकडे दिली. मात्र आरोपींनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी टाळाटाळ केली आणि फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर फिर्यादीने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात आरोपी संदीप व इतर आठजणांवर गुन्हा दाखल होऊन संदीप याला मंगळवारी अटक करण्यात आली. त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेज टूमध्ये २४२ हेक्टर क्षेत्राचा मावेजा

$
0
0


फेज टूमध्ये २४२ हेक्टर क्षेत्राचा मावेजा
बिडकीन पैठण औद्योगिक क्षेत्रातील शेतकरी व उद्योजकांना दिलासा
Dhananjay.Kulkarni
@timesgroup.com
Tweet : @dhananjaykMT
औरंगाबाद : दिल्ली मुंबई इंडस्ट्र‌िअल कॉरिडोरचे काम वेगात सुरू आहे. ऑरिक सिटीही येऊ घातली आहे, पण डीएमआयसी भूसंपादनाच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात सध्या काय चालले आहे. यात शेतकरीवर्गाला किती मावेजा दिला गेला, किती हेक्टर जमीनीचा ताबा सरकारला मिळाला, या दोन्ही टप्प्यात सध्या काय सुरू आहे याचा उहापोह करणारी ही मालिका आजपासून... खास ‘एमआयडीसी स्थापना दिना’च्या निमित्ताने...
दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअ‌ल कॉरिडोरचे काम सध्या जोरात सुरू आहे. यासोबत शहरात पहिली स्मार्ट औद्योगिक सिटी (ऑरिक) देखील येऊ लागली आहे. सध्या डीएमआयसीतील फेज- टू आणि थ्रीमध्ये भूसंपादन हा विषय संपूर्णपणे हाताळला गेला असून आता औद्योगिक नगरीसाठी पायाभूत सुविधा देणे सुरू झाले आहे. विशेषत: बिडकीन औद्योगिक क्षेत्रात तर एल अँड टीला कॉण्ट्रॅक्ट दिले गेले असून येथे आता काम सुरू होणार आहे.
बिडकीन औद्योगिक क्षेत्रासाठी २ हजार ३६३.८२९ हेक्टर जमीनस २ सप्टेंबर २०१० पासून अधिसूचित करण्यात आले आहे. डीएमआयसीतील बिडकीनमधील बिडकीन बन्नी तांडा हा भाग सुद्धा अधिक महत्त्वाचा आहे. बिडकीन (ता.पैठण जि. औरंगाबाद) येथे सरकारी जमीन १२ हेक्टर ५४ गुंठे आहे. खाजगी जमीन १४६८ हेक्टर ७५ गुंठे आहे तर एकूण जमीन १४८१ हेक्टर २९ गुंठे एवढी आहे. बन्नी तांडा बिडकीन येथे एकूण गट ६५ आहेत. आजपर्यंत २४२.० हेक्टर जमीन वर्ग-२च्या क्षेत्राचा मावेजा देण्यात आलेला आहे. या जमीनीचा ताबा उपविभागीय अधिकारी, पैठण-फुलंब्री यांनी घेतलेला आहे. उर्वरित कार्यवाही सुरू असून उपविभागीय अधिकारी पैठण-फुलंब्री यांच्याकडे ताब्यात आलेल्या जमिनी एमआयडीसीकडे वर्ग करण्याची आता कार्यवाही सुरू झाली आहे.
उपविभागीय अधिकारी पैठण-फुलंब्री यांनी सबंधित शेतकरींना मावेजा (भरपाई) अदा करण्यासाठी एकूण ५१२.५३ कोटींची मागणी केलेली असून त्यापैकी ४५० कोटी उपलब्ध करून दिलेले आहेत. संबंधितांना ही भरपाई अदा करून जमिनीचा ताबा शासनाकडे येण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

पैठण तालुक्यातील चारही गावांतील ८९७. हेक्टर ६९ गुंठे जमिनची भूसंपादनाची कार्यवाही सुरू आहे. उपलब्ध करून दिलेल्या ४५० कोटी निधींपैकी संबंधितांना ४४२.६७ कोटी भरपाई देण्यात आली आहे. शेतकऱ्यांक़डून ७७९. हेक्टर २१ गुंठे क्षेत्राचा ताबा शासनाकडे आला आहे. याशिवाय डीएमआयसी फेज-२ मधील प्रस्तावित २३६३.८२९ हेक्टर जमिनीपैकी १८९६ हेक्टर ८० गुंठे जमिनीचा ताबा औद्योगिक महामंडळाकडे आला आहे.
- सोहम वायाळ, प्रादेशिक अधिकारी, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुचाकी उचलणाऱ्यांमुळे झाला ताप

$
0
0


दुचाकी उचलणाऱ्यांमुळे झाला ताप
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी उचलण्यासाठी वाहतूक शाखेच्या वतीने वॉर्डनची नेमणूक केली आहे. या पथकाच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना मात्र नाहक त्रास होत आहे. दिसेल ते वाहन उचलत असल्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला झळ बसत असल्याचे चित्र आहे.
पहिली घटना
निराला बाजार ते नागेश्वरवाडी रोडवर बँकेच्या जवळ एका दुचाकीस्वाराने दुचाकी उभी केली होती. ही दुचाकी नो पार्किंग प्लेसमध्ये नव्हती. एका बाजूला उभी करण्यात आली होती. तरीही दुचाकी उचलणाऱ्या पथकाने ती उचलून नेली.
दुसरी घटना
स्थळ निराला बाजार ते नागेश्वरवाडी रोड. एका महिलेने रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या दोन कारच्या मध्ये त्यांची मोपेड उभी केली. वाहने उचलणाऱ्या पथकाने त्यांची दुचाकी उचलून नेली. विशेष म्ह‌णजे नो पार्किंगमध्ये उभ्या करण्यात आलेल्या या कारवर कारवाई करण्यात आली नाही.
दोन्ही घटना प्रातिनिधिक आहेत. अशा प्रकारच्या घटनांना दुचाकीस्वारांना नेहमीच सामोरे जावे लागते. दोन मिनिटांसाठी दुचाकीस्वार दुचाकी सोडून खरेदीसाठी दुकानात गेल्यास अवघ्या काही क्षणात त्याची दुचाकी उचलण्यात येते. वाहने उचलणाऱ्या तरुणांना अडवल्यास त्यांच्याकडून प्रसंगी दुचाकीस्वाराला धक्काबुक्की देखील करण्याचे प्रकार घडतात.
नियोजनाचा अभाव
शहरात दुचाकी पार्किंगची मोठी समस्या आहे. महत्त्वाच्या रोडवर दुचाकी पार्किंगचे नियोजन नसल्याने वाहनधारक दुचाकी उभी करताना संभ्रमात पडतो. निराला बाजार, औरंगपुरा, कॅनाट प्लेस, पैठणगेट भागात ही समस्या कायम आहे. खरेदी करावयाची असल्याने दुचाकीस्वार मिळेल त्या ठिकाणी दुचाकी उभी करून दुकानात जातो आणि त्याची दुचाकी उचलण्यात येते. नियोजन नसल्याने हे प्रकार घडत असल्याच्या वाहनधारकांच्या प्रतिक्रिया आहेत.
मानसिक, आर्थिक त्रास
दवाखाने, हॉस्पिटल समोरून देखील दुचाकी उचलण्यात येतात. अनेकवेळा दुचाकीस्वार रुग्णांना घेऊन आलेला असतो. त्याची दुचाकी उचलून नेल्यास त्याला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. विद्यार्थ्यांच्या दुचाकी उचलून नेल्यास त्यांना देखील २०० ते २५० रुपयांचा फटका बसतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीची ‘मॅमोग्राफी’ अद्ययावत

$
0
0


घाटीची ‘मॅमोग्राफी’ अद्ययावत
‘ब्रेस्ट कॅन्सर’चे लवकर अचूक निदान होणार
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमधील सर्वांत अद्ययावत ‘मॅमोग्राफी’ मशीन ही शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) क्ष-किरण विभागामध्ये मागच्या वर्षभरापासून कार्यरत झाली असतानाच, आता मॅमोग्राफी मशीनवर अत्याधुनिक सॉफ्टवेअर अपलोड केले जाणार आहे. परिणामी, एकाचवेळी तब्बल १५ ते २० इमेजेस मिळणार असून, स्तनाच्या कर्करोगाचे (ब्रेस्ट कॅन्सर) खूप आधी अचूक निदान होऊन तात्काळ व प्रभावी उपचार करणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे प्रगत देशांमध्ये हे तंत्रज्ञान नुकतेच प्रचलित होत असून, हेच तंत्रज्ञान आता मराठवाड्यातील महिलांसाठी उपलब्ध होत आहे.
राज्य शासनाने ‘डिजिटल टोमोसिन्थेसिस फॉर डिजिटल मॅमोग्राफी’ या सॉफ्टवेअरसाठी ३६ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, याविषयीचा शासन निर्णय २७ जुलै रोजी काढण्यात आला आहे. २०१७-१८ या वर्षासाठी हा निधी मंजूर करण्यात आल्यामुळे येत्या काही महिन्यात ही अद्ययावत सुविधा घाटीच्या क्ष-किरण विभागात होईल, अशी अपेक्षा आहे. अर्थातच, ‘डिजिटल मॅमोग्राफी’ या मशीनसह सॉफ्टवेअरची अत्याधुनिक सुविधादेखील राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये सर्वांत पहिल्यांदा घाटीमध्येच उपलब्ध होत आहे.
घाटीच्या क्ष-किरण विभागामध्ये मागच्या वर्षी तब्बल दोन कोटींची जपानी बनावटीची सर्वांत अद्ययावत मॅमोग्राफी मशीन उपलब्ध झाली. अवघ्या २०० रुपयांमध्ये ही तपासणी केली जाते आणि आता सॉफ्टवेअरमुळे मिळणाऱ्या अत्याधुनिक सुविधेसाठी कोणतेही वेगळे शुल्क आकारले जाणार नाही. ‘टोमोसिन्थेसिस’ या सॉफ्टवेअरमुळे तब्बल १५ ते २० इमेजेस मिळतील आणि ‘ब्रेस्ट कॅन्सर’ची छोट्यातली छोटी गाठदेखील लपून राहणार नाही. अगदी एक सेंटिमीटर गाठ असली तरी या ‘सॉफ्टवेअर’मुळे कॅन्सरचे निदान केले जाऊ शकेल आणि मुख्य म्हणजे खूप लवकर हे निदान करता येऊ शकेल. परिणामी, तातडीने उपचार सुरू करणे शक्य होणार आहे. यातील कमीत कमी रेडिएशन डोसमुळे या तपासणीचा धोकाही कमीत कमी राहणार आहे, असेही विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा रोटे-कागिनाळकर यांनी ‘मटा’ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेरूळमध्ये दर्शन रांगेतील घुसखोरीला आळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी वेरूळ येथील घृष्णेश्‍वर मंदिरात भाविकांची झुंबड उडाली होती. भाविकांनी सोमवारी पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. यावर्षी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात करून दर्शन रांगेतील घुसखोरी मोडून काढली आहे.
दरवर्षी एकीकडे भाविक अनेक तास रांगेत उभे राहतात, तर दुसरीकडे काही भाविक थेट घुसखोरी करून मंदिरात प्रवेश करत होते. पोलिसांनी यंदा प्रथमच ही प्रथाच बंद केली. वेरूळ गावातील स्थानिकांना थेट प्रवेश बंद झाल्यामुळे वेरूळ येथील स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. श्रावण महिन्यात घृष्णेश्‍वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून भाविक वेरूळ येथे दर्शनासाठी गर्दी करतात. पोलिस निरीक्षक हरीष खेडकर यांनी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

थेट प्रवेश द्यावा

त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात स्थानिकांना थेट प्रवेश दिला जातो. त्याप्रमाणेच वेरूळ येथील स्थानिकांसाठी आधार कार्ड पाहून घृष्णेश्‍वर मंदिरात थेट प्रवेश द्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तबला वादनात चिमुकले दंग; राज्यभरातून प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तालसम्राट गुरुवर्य पं. कंठे महाराज स्मृती तबला वादन स्पर्धेला स्पर्धकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. राज्यभरातील स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले असून सोमवारी रात्री उशिरापर्यंत स्पर्धा रंगली. लहान गटातील १०४ व मोठ्या गटात ६० स्पर्धकांनी बहारदार वादन करून रसिकांची दाद मिळवली.
दरवर्षीप्रमाणे पं. कंठे महाराज स्मृती तबला वादन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कलश मंगल कार्यालयात मंगळवारी स्पर्धा रंगली. दोन दिवसांच्या महोत्सवात पहिल्या दिवशी स्पर्धा, दुसऱ्या दिवशी नामांकित कलाकाराचे तबला वादन व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण कार्यक्रम आहे. या स्पर्धेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. लहान गटात १०४ व मोठ्या गटात ६० स्पर्धकांनी सहभाग घेतला. अमरावती, मुंबई, गोवा, अकोला आदी शहरातील स्पर्धकांनी सादरीकरण केले. वादन कौशल्य दाखवत स्पर्धकांनी दाद मिळवली. या स्पर्धेचे परीक्षण अमित मोघे, सतीश कानडे व स्वाती सोहोनी यांनी केले. मोठ्या गटाचे परीक्षण अभय अग्निहोत्री, अविनाश बहिरगावकर व वैशाली कागलकर यांनी केले.

तबलावादन आज

तालसम्राट पं. कंठे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पं. सुप्रित देशपांडे (पुणे) यांचे तबलावादन आयोजित करण्यात आले आहे. संवादिनीवर तन्मय देवचक्के साथसंगत करणार आहेत. यशोमंगल कार्यालयात मंगळवारी सायंकाळी सात वाजता कार्यक्रम होईल. कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाडीला हात लावल्याने मारहाण; तिघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी काढताना गाडीला हात लावला म्हणून शिविगाळ करीत मारहाण करणाऱ्या तिघा आरोपींना रविवारी अटक करण्यात आली. त्यांना सोमवारी कोर्टात हजर केले असता, गुरुवारपर्यंत (३ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. शेख यांनी दिले.
या प्रकरणी सोपान विनायक कुटे (वय ३३, रा. धामोरी बुद्रुक, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार ते २५ जुलै २०१७ रोजी एमआयडीसी वाळूज परिसरातील पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी काढत होते. तेव्हा ‘आमच्या गाडीला हात का लावला’, असे म्हणत संशयित आरोपी डॅनी उर्फ संतोष तेजराव जगताप (रा. तिरंगा कॉलनी, पंढरपूर, औरंगाबाद), अनिल दिलीप केदारे (रा. गोडगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद) व सुशील भीमराव म्हस्के (रा. साईनगर, पंढरपूर, औरंगाबाद) व इतरांनी शिविगाळ करीत बेल्ट, सळईने गंभीर मारहाण केली. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन आरोपींविरुद्ध कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होऊन या तिघांना रविवारी अटक करण्यात आली.

दुचाकी जप्त करणे बाकी

तिघा संशयितांना सोमवारी कोर्टात हजर केले असता, त्यांच्याकडून बेल्ट, सळईसह ज्या दुचाकीवर पळून गेले ती जप्त करणे बाकी आहे. त्यामुळे संशयित आरोपींना सात दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बी. एन. कदम यांनी केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृत्तपत्र विक्रेत्यांचा बचत गट

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘साईकृपा पुरूष बचतगट’ नाव कानावर पडताच वेगळे वाटेल. पुरुषांचा बचत गट कसा काय, असा प्रश्नही पडेल. रोजमर्राच्या जिंदगीच्या चरख्यात आपल्याजवळची थोडी तरी पुंजी गाठीला जमा व्हावी, यासाठी वृत्तपत्र विक्रेत्यांनी पुढाकार घेऊन हा बचत गट स्थापला आहे. बहुदा राज्यातला हा पहिलाच अभिनव प्रयोग आहे.

‘साईकृपा’ बचत गटाची स्थापना एक जानेवारी २०१४ रोजी करण्यात आली. अमोल धामणे हे बचत गटाचे संस्थापक अध्यक्ष. बचत गटात २० सदस्य असून, ते दरमहा पाचशे रुपये जमा करतात. साडेतीन वर्षानंतर या गटाने आपआपसात कर्ज वाटप सुरू करून समृद्धीकडे जाण्याचा प्रवास सुरू केला आहे. कमीतकमी १५ हजार ते जास्तीत जास्त २५ हजार कर्ज देण्याची सोय असल्याने अनेक छोट्या-मोठ्या गरजा यातून पूर्ण होत आहेत. त्यासाठी बॅँका, सावकारापुढे हात पसरण्याची गरज राहिली नाही.

तीन वर्षांत बचतगटाचा ‘नफा’
बचत गटाने २०१४पासून ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स बँकेच्या खात्यात दर महाची बचत जमा करणे सुरू केले आहे. येथे दरमहा १० हजार जमा होतात. जुलै २०१७पर्यंत या बचतगटाने तब्बल ३ लाख ९५ हजार रुपये जमा केले. कर्ज वाटपातून आलेला नफा सदस्य आपआपसात वाटून घेतात. पहिल्या वर्षी सर्वांना ११००, दुसऱ्या वर्षी ९०० तर आता तिसऱ्या वर्षी १६३० रुपयांचा नफा प्रत्येकाच्या वाट्याला आला आहे.

असा आहे बचत गट
रामकृष्ण राऊत (अध्यक्ष), बाळासाहेब गायके (सचिव), अमोल धामणे (कोषाध्यक्ष), सदस्यः राजू गायकवाड, बाबाराव जुमडे, राजेश राठोड, संदीप मोटे, कांतीलाल लुणावत, भागवत साखरे, विशाल देशमुख, कृष्णा काळे, विष्णू काळे, दत्ता खरात, सागर पाटील, दिलीप सूर्यवंशी, अशोक गव्हाणे, गजेंद्र सोनवणे, गजानन दामधर, नारायण आहेर, संजय जवळेकर.

अशी होते बैठक
दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सर्व सदस्यांची पदमपुरा येथील अहल्याबाई होळकर चौकातील उद्यानात बैठक होते. कोणाला कर्ज दिले जावे, यावर चर्चा होते. कर्जाचा व्याजदर दोन टक्के (रिड्युसिंग) आहे. या कामासाठी कोणीही कुठलाही मेहनताना देत नाही. दर महिन्याच्या १० तारखे‍च्या आत ५०० रुपये सर्व जण जमा करतात. कर्ज वसुली १० तारखेच्या आत केली जाते. याची जबाबदारी अमोल धामणे यांच्याकडे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कट प्रॅक्टिस’ कायदा पुढच्या अधिवेशनात

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘कट प्रॅक्टिस’विरोधातील प्रस्तावित कायद्याचा भक्कम मुसदा तयार करण्यासाठी नियुक्त समितीला २८ जुलै रोजी दोन महिन्यांची मुदत दिल्यामुळे या पावसाळी अधिवेशनात मसुदा मांडण्याची शक्यता कमी आहे. ‘घाईघाईत कायदा निर्मिती करण्यापेक्षा त्यात अधिकाधिक पारदर्शकता यावी म्हणून मुदत वाढविली आहे,’ असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी ‘मटा’ला सांगितले.

एकीकडे समितीला दोन महिन्यांची मुदत देण्यात आली असली, तरी समितीमध्ये डॉ. रमाकांत पांडा यांच्यासह डॉक्टरांची सर्वांत मोठी संघटना असलेल्या ‘आयएमए’चा एकही सदस्य नसल्याबद्दल आणि ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचेही समितीमध्ये प्रतिनिधित्व नसल्याबद्दल आश्चर्य तसेच नाराजी व्यक्त होत आहे.

मुंबईच्या ‘एशियन हार्ट इन्स्टिट्यूट’चे डॉ. रमाकांत पांडा यांनी मुंबईतील रस्त्यावर ‘ऑनेस्ट ओपिनियन. ‘नो कमिशन टू डॉक्टर्स’ असे बॅनर लावल्यानंतर वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्याला वैद्यकीय वर्तुळातून मोठा विरोध झाला असताना, डॉ. पांडा यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री तसेच आरोग्यमंत्र्यांना लेखी निदेनाद्वारे ‘कट प्रॅक्टिस’विरोधात कठोर पावले उचलण्याचे आवाहन दिले. त्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. समितीने मसुदा तयार करुन राज्य सरकारकडे सादर केला आणि हा मसुदा पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात सादर करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी मागच्या आठवड्यात ‘मटा’ला दिली होती. दरम्यान, राज्य सरकारने २८ जुलै रोजी ‘जीआर’ काढून समितीला दोन महिन्यांची मुदत दिली. त्यामुळे आणखी दोन महिन्यांपर्यंत मसुद्यामध्ये सूचनांचा अंतर्भाव होण्यासाठी संधी राहणार आहे.

४० हजारांचे प्रतिनिधित्व नाहीच
या समितीमधून डॉ. रमाकांत पांडा यांच्यासह नामांकित बालरोगतज्ज्ञ डॉ. आमडेकर, ‘आयएमए’चे नियोजित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांना वगळल्याचे समजते. त्याविषयी नाराजी व्यक्त होत आहे. या संदर्भात डॉ. वानखेडकर म्हणाले, ‘महाराष्ट्रातील ६० हजार डॉक्टरांपैकी तब्बल ४० हजार डॉक्टर हे ‘आयएमए’चे सदस्य आहे आणि आता समितीमध्ये ‘आयएमए’चे प्रतिनिधित्व करणारा कोणीही नाही. त्याचवेळी समितीमधील बहुतांश डॉक्टर हे मुंबईतील आहेत, ग्रामीण भागातील प्रतिनिधित्व नाही. सर्वंकष कायद्याच्या निर्मितीसाठी ग्रामीण भागात सेवा देणाऱ्यांच्या सूचनांचाही विचार होणे खूप गरजेचे आहे. तसेच या कायद्याच्या मसुद्यावर विधिमंडळात चर्चा होणे आणि जनतेसाठी तो खुला होणे, तितकेच गरजेचे आहे,’ असेही डॉ. वानखेडकर म्हणाले.

‘आयएमए’सह सर्वांच्याच सूचनांचा जरूर विचार केला जाणार आहे. कोणीही समितीला सूचना देऊ शकतो आणि लवकरच जनतेसाठीही हा कायदा खुला केला जाईल. घाईघाईत कायदा करण्यापेक्षा त्यात कोणत्याही त्रुटी राहू नये, यासाठी समितीला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. त्यामुळेच अधिकाधिक सूचनांचा अंतर्भाव करण्यासाठी वेळ मिळेल. याच कारणासाठी पावसाळी अधिवेशात कायदा मांडता येईल, याविषयी थोडी शंका वाटते. – गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्तनपानातून दीड लाख शिशुंना जीवदान शक्य

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
योग्य स्तनपानाद्वारे दरवर्षी तब्बल दीड लाख नवजात शिशुंना मृत्यूपासून वाचवणे शक्य आहे. त्याचवेळी योग्य स्तनपानाने शिशुंमध्ये १५ पट ‘न्युमोनिया’ची, तर ११ पट ‘डायरिया’ची शक्यता कमी होते व मेंदुचा विकास चांगला होतो आणि स्तनपान करणाऱ्या मातेला स्तनाच्या कर्करोगाची शक्यताही कमी होते. तरीदेखील देशामध्ये निम्मेच व अपुरे स्तनपान होते, असे ‘लॅन्सेट’ने स्पष्ट केले आहे.

जगभरात दरवर्षी २२ टक्के नवजात शिशुंचा मृत्यू हा योग्य-व्यवस्थित स्तनपान न झाल्यामुळे होतो आणि योग्य-व्यवस्थित स्तनपानाद्वारे देशातील तब्बल एक लाख ५६ हजार नवजात शिशुंना वाचवता येणे शक्य आहे, हे पुरते सिद्ध झाल्यामुळेच एक ऑगस्ट ते सात ऑगस्टदरम्यान देशभरात स्तनपान सप्ताह पाळला जातो. त्याचाच भाग म्हणून केंद्र सरकारकडून ‘मा’ (मदर्स अॅब्सोल्युट एफेक्शन) हा खास प्रकल्प मागच्या वर्षापासून राबविण्यात येत आहे आणि यानिमित्त दरवर्षी जनजागृतीपर उपक्रम राबविले जातात.

‘लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध पाक्षिकाच्या २०१६ मधील सर्वेक्षणानुसार, भारतामध्ये ९०.८ टक्के प्रसुती रुग्णालयात होतात; परंतु तरीही केवळ ५७.५ टक्के नवजात शिशुंनाच प्रसुतीनंतरच्या पहिल्या तासात स्तनपान मिळते आणि केवळ ५६.६ टक्के म्हणजेच केवळ निम्म्या नवजात शिशुंनाच संपूर्ण सहा महिने फक्त स्तनपान (एक्स्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग) मिळते. योग्य स्तनपानामुळेच नवजात शिशुंमधील ‘न्युमोनिया’ची शक्यता १५ पटींनी व ‘डायरिया’ची शक्यता ११ पटींनी केली होती. तसेच मेंदुची योग्य वाढ होण्यासाठीही स्तनपान महत्वपूर्ण ठरते. त्याचवेळी पहिले सहा महिने केवळ स्तनपान केले, तर संपूर्ण देशाचा मोठा खर्च कमी होऊ शकतो. त्यामुळेच प्रसुतीनंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करणे, प्रसुतीनंतरच्या पहिल्या सहा महिन्यांत केवळ स्तनपान करणे आणि सहा महिन्यांनी बालकांना स्तनपानासह पूरक आहार सुरू करणे व दोन वर्षांपर्यंत स्तनपान सुरुच ठेवणे गरजेचे आहे, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (घाटी) स्त्रीरोगविभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी ‘मटा’ला सांगितले. ‘ब्रेस्ट फीडिंग विक’निमित्त मंगळवारी (१ ऑगस्ट) सकाळी साडेदहाला घाटीच्या ‘ओपीडी’मध्ये पथनाट्यासह जनजागृतीपर कार्यक्रम होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नोकरी करणाऱ्यांनाही सहज शक्य
नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार, नोकरी करणाऱ्या महिलांनी कामावर जाताना आपल्या शिशुंसाठी वाटीमध्ये दूध काढून ठेवावे. असे दूध सामान्य तापमानात (रूम टेम्प्रेचर) सहा तासांपर्यंत, तर फ्रीजमध्ये २४ तासांपर्यंत चांगले राहू शकते. असे दूधदेखील शिशुंसाठी अतिशय उपयुक्त ठरते, असेही डॉ. गडप्पा म्हणाले.

घाटीतील ‘बेबी फ्रेंडली हॉस्पिटल’अंतर्गत १९९४ पासून योग्य स्तनपानासाठी मातांना मार्गदर्शन केले जात आहे. त्यांचे समुपदेशन केले जात आहे. त्यामुळेदेखील अलीकडे मातांमध्ये स्तनातील जंतुसंसर्ग किंवा इतर गुंतागुंतीचे त्रास कमी झाले आहेत. – डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी

योग्य पद्धतीने व दोन वर्षांपर्यंत स्तनपान केल्यामुळे मातांना स्तनाच्या कर्करोगाची शक्यता कमी होते. त्यामुळे नैसर्गिंक प्रसुतीमध्ये पहिला तासात, तर सिझेरियन प्रसुतीमध्ये चार तासात स्तनपान सुरू करणे गरजेचे आहे. अलीकडे प्रभावी औषधांमुळे सिझेरियननंतरही दोन-अडीच तासात स्तनपान सुरू करणे शक्य झाले आहे. – डॉ. श्रीनिवास गडप्पा, घाटी

सुशिक्षित महिलांमध्येही स्तनपानाविषयी दुर्लक्ष दिसून येते. त्यामुळे सुशिक्षित महिलांसह सर्वच महिलांना स्तनपानासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. स्तनपानामुळे ‘ब्रेस्ट कॅन्सर’चे प्रमाणही उल्लेखनीयरित्या कमी होते, हे महिलांनी लक्षात घेतले पाहिजे. – डॉ. अपूर्वा देशपांडे, स्त्रीरोगतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पीकविमा भरण्यासाठी बँकांमध्ये रात्री उशिरापर्यंत रांगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पीकविमा भरण्यासाठी सोमवारी रात्री उशिरापर्यंत अनेक बँकांसमोर शेतकऱ्यांनी गर्दी केली. काही ठिकाणी गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांची मदत घेतली गेली. रविवारीही बँका रात्री दहा वाजेपर्यंत सुरू होत्या.

पीकविमा भरण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली होती. विमा भरण्यासाठी असलेला फॉर्म ऑनलाइन भरणे बंधनकारक होते. एक फॉर्म भरण्यासाठी कमीत कमी तीन ते पाच मिनिटे लागत होते. यामुळे बँकांसमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी रविवारी बँका सुरू ठेवाव्यात, असे आदेश दिले होते. त्यानुसार औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील १३८ शाखा रविवारी सुरू होत्या. सोमवारीही बँकांमध्ये शेतकऱ्यांची पीकविम्याचा अर्ज भरण्यासाठी गर्दी केली. ३१ जुलै ही अंतिम तारीख असल्यामुळे सायंकाळपर्यंत अनेक शाखांसमोर रांगा होत्या. काही ठिकाणी गर्दी नियंत्रणात येत नसल्याचे पाहून बँक प्रशासनाने पोलिसांना बोलाविले.

‘त्या’ पोस्ट अफवाच
सोमवारी दुपारपासून पीकविम्यासाठी दहा दिवस मुदतवाढ मिळाल्याच्या बातम्या सोशल मीडियावरून फिरत होत्या, पण त्याविषयी अधिकृत कुठलीच माहिती उपलब्ध न झाल्याने बँक व्यवस्थापनाने रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारल्याचे व्यवस्थापकीय संचालक राजेश्वर कल्याणकर यांनी सांगितले.

बँकांची विशेष दक्षता
पीकविम्याचा ताण पडू नये यासाठी बँकांनी विशेष पावले उचलणे सुरू केले आहे. यात बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या कर्मचाऱ्यांचा ४५ जणांचे पथक स्थापन करून या गटाला पीकविम्याच्या सर्व कामांची वाटणी केली आहे. या पायलट प्रोजेक्टचे अनुकरण आता इतर बँकाही करणार आहेत. रविवारी (३० जुलै) पीकविमा भरता यावा, इतर बँकिंग सुविधा शेतकऱ्यांना मिळाव्यात यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रनेही ही सोय केली होती. आता सेंट्रल बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया आदींसह काही राष्ट्रीयकृत बँकांही असे विशेष पथक स्थापन करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आकड्यांचा घोळ
पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी सोमवारी जिल्ह्यातील विविध बॅंका व महा ई सेवा केंद्र आदी ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली. कृषी कार्यालयाने अर्ज भरून देण्यासाठी शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. दरम्यान, जिल्ह्यात एकूण किती शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला यांची माहिती कृषी विभागाकडून उपलब्ध होऊ शकली नाही. एकत्रित आकडेवारीसाठी अजून पाच ते सहा दिवस प्रतीक्षा करावी लागेल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘पेट’वरून पुन्हा घमासान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पीएच. डी. पूर्वपरीक्षेला (पेट) अवलंबलेली वजा गुण पद्धत (निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम) रद्द करून नव्याने निकाल जाहीर करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी संघटनांनी सोमवारी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना घेराव घातला. तीन ऑगस्टपर्यंत ‘पेट’बाबत योग्य निर्णय घेण्यात येईल, असे चोपडे यांनी जाहीर केले. तर विविध मागण्यांसाठी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने निदर्शने केली.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीत उल्लेख नसतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘पेट’ परीक्षेत वजा गुण पद्धत वापरली. अचानक निर्णय घेतल्यामुळे निकालात कमालीची घसरण झाली. परीक्षेत नऊ हजार विद्यार्थ्यांपैकी फक्त ३२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. परीक्षेतील वजा गुण पद्धतीबाबत फेरनिर्णय घेऊन निकाल जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत माजी अधिसभा सदस्य डॉ. उल्हास उढाण, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अमोल दांडगे, भारतीय विद्यार्थी सेनेचे तुकाराम सराफ यांनी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेला अधिष्ठाता, प्रभारी अधिकारी उपस्थित होते. नियमाचे उल्लंघन असल्यामुळे ‘पेट’ परीक्षेचा मुद्दा कोर्टात दाखल होऊ शकतो. विद्यापीठ प्रशासनाने फेरनिर्णय घ्यावा असे संघटनांनी सांगितले. याबाबत तीन ऑगस्टपर्यंत योग्य निर्णय घेण्यात येईल असे चोपडे यांनी स्पष्ट केले. परीक्षेच्या दोन दिवसांपूर्वी विद्यापीठाने संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या सूचनेनुसार संशोधन पद्धती व पदव्युत्तरच्या मूळ विषयात स्वतंत्रपणे ५० टक्के गुण अनिवार्य असल्याचे नमूद केले होते, पण निकालात स्वतंत्र गुण न देता दोन्ही पेपरचे सामाईक गुण दिले. या प्रकारात घोळ झाल्याची शक्यता विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरली आहे. ‘पेट’ परीक्षेच्या निकालाचा मुद्दा वादग्रस्त ठरला असून आंदोलन करण्याचा निर्णय विद्यार्थी संघटनांनी घेतला आहे.

‘सत्यशोधक’ची निदर्शने
नियोजन नसल्यामुळे विद्यापीठात विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. एमफिलचा कोटा पूर्ववत ठेवणे, सीईटीचे शुल्क कमी करणे, ऑनलाइन सीईटी विद्यापीठात घेणे, सर्व अध्यासन केंद्राच्या वतीने फेलोशिप अनिवार्य करावी या मागण्यांसाठी सोमवारी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने निदर्शने केली. वसतीगृहांचा दर्जा सुधारून विद्यार्थी क्षमता वाढवावी, कमवा व शिका योजनेचे मानधन २५०० रुपये करावे, सिटी बस सुरू करावी या मागण्या संघटनेने केल्या आहेत. याबाबत कुलगुरूंना निवेदन देण्यात आले. यावेळी अविनाश सावंत, अमोल खरात, प्रवीण चिंतोरे, एच. एस. मोरे, सोनाली मस्के, कल्पना बडे, स्वाती आदोडे, बळीराम पाईकराव, सिद्धांत मोरे आदी उपस्थित होते. या प्रश्नांवर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिले.

नोंदणीला मुदतवाढ नको
विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणुकांची मतदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, एका व्यक्तीच्या हितासाठी नोंदणीला दिलेली मुदतवाढ चुकीची आहे असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मूळ विद्यापीठातून दुसरे विद्यापीठ निर्माण झाले असल्यास दुसऱ्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील मूळ विद्यापीठाच्या पदवीधारकांनी नवीन विद्यापीठात नोंदणी करण्याचा नियम आहे. मात्र, दबावाखाली विद्यार्थी चुकीचा निर्णय घेत आहे असे ‘अभाविप’चे गोविंद देशपांडे, निखिल आठवले, विवेक पवार यांनी निवेदनात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक बदल्यांच्या दुकानदारीला ब्रेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत यंदा सर्व प्रकारच्या दुकानदाऱ्यांना ब्रेक लागणार आहे. राज्य सरकारच्या धोरणानुसार यंदा ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जाणार आहे. जिल्ह्यातील इच्छुकांना मंगळवारी एक ऑगस्ट दुपारी दोनपर्यंत अर्ज सादर करावा लागेल. सगळी प्रक्रिया मुंबईतून होणार असल्याने स्थानिक प्रशासन तणावमुक्त झाले आहे.

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत ग्रामविकास व शालेय शिक्षण खात्याने यंदा अवघड व सोपे क्षेत्र असे निकष लावले होते. त्यावर आक्षेप नोंदविले गेले. न्यायालयीन प्रक्रियेनंतर आता बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यासह राज्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागात जिल्हांतर्गत बदल्या करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईहून वेळापत्रक ठरवून दिले आहे. सरल पोर्टलमध्ये बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांना ऑनलाइन फॉर्म भरून द्यावा लागेल. विशेष शिक्षक संवर्ग यावेळी करण्यात आला असून, त्यात पती पत्नी एकत्रीकरण योजनेंतर्गत प्राधान्य दिले जाईल. शाळेपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत जर शिक्षकाचा जोडीदार कार्यरत असेल तर त्यांना प्राधान्य दिले जाईल. अवघड क्षेत्रात तीन वर्षे काम केलेले तसेच दहा वर्षे सोप्या क्षेत्रात कार्यरत असणारे आणि बदलीसाठी अर्ज केल्यानंतर सेवाज्येष्ठता यादीनुसार त्यांना प्राधान्यक्रम दिला जाईल.

ऑनलाइन सूची
बदलीप्रक्रिया ऑनलाइन होणार असल्याने स्थानिक कार्यालयात कुठेच हालचालीला वाव राहणार नाही. दरम्यान झेडपी प्रशासनाने सेवाज्येष्ठता सूची ऑनलाइन प्रसिद्ध केली आहे. शिक्षकांना बदलीसाठी अर्ज करताना २० पर्याय द्यावे लागणार आहेत. यादी संकलित होऊन बदल्यांची यादी मुंबईहूनच प्रसिद्ध केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीक विम्यासाठी शेतकरी ‘ऑनलाइन’

$
0
0

टीम मटा, औरंगाबाद
गेल्या वर्षी नोटा बंदीनंतर पुन्हा एकदा सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी बँकासमोर रांगेत उभे केले आहे. मराठवाड्यातील शेतकरी गेल्या चार दिवसांपासून शेतातील कामे सोडून २४ तास बँकासमोर ‘ऑनलाइन’ उभा आहे. पीक विमा भरून घेण्यासाठी ३१ जुलै शेवटचा दिवस असल्याने व
मुदतवाढ न मिळाल्याने शेवटच्या दिवशी बँकासमोर शेतकऱ्यांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती. शेवटच्या दिवशी विमा भरता न आल्याने तीस टक्क्य‌ांहून अधिक शेतकऱ्यांना वंचीत राहवे लागणार आहे.

जालन्यातील शेतकरी मेताकुटीला
जालना - संपूर्ण देशात गतवर्षी पीकविमा योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात पहिल्या क्रमांकावर आलेल्या जालना जिल्ह्यातील यंदाच्या पीक विमा योजनेच्या हप्ता भरण्यासाठी शेतकऱ्यांचा जीव अक्षरशः मेताकुटीला आलेला आहे. पीक विम्याचा हप्ता भरण्यासाठी मुदत संपल्यानंतर यंदाच्या वर्षी किमान तीस टक्याहून अधिक शेतकरी वंचित आहेत असा प्राथमिक अंदाज आहे.
जिल्ह्यातील तिर्थपूरी ता.घनसावंगी परिसरातील शेतकऱ्यांच्या पीकविमा योजनेच्या हप्ता भरण्यासाठी खूप चांगली व्यवस्था करण्यात आली होती. सोमवारी सकाळपासून पीक विमा योजनेच्या हप्ता भरण्यासाठी एक देखिल शेतकरी शिल्लक राहिला नाही. ही सगळी व्यवस्था तात्यासाहेब चिमने व राष्ट्रवादीच्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनी उभारली होती. दरम्यान, सगळ्यात वाईट अवस्था जाफ्रराबाद आणि भोकरदन तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भोगावी लागली. सोमवारी शेवटच्या दिवशी या भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने महाईसेवा केंद्र ठप्प झाली होते. सातबारा उताऱ्यावर पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा योजनेच्या हप्ता भरण्यासाठी रोख रक्कम द्यावी लागली. टेंभुर्णी (ता. जाफ्राबाद) येथे रविवारी अक्षरशः हाणामारी झाली पोलिसांनी हस्तक्षेप करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खूप प्रयत्न केले. अंबड, बदनापूरमध्ये देखील असेच वातावरण होते.

शेवटच्या दिवशी रांगाच रांगा
बीड - सोमवारी पीक विमा भरण्याचा शेवटचा दिवस होता. जिल्हाभरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकेत शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. जिल्ह्यातील प्रत्येक बँकेपुढे रांगाच रांगा असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. अनेक ठिकाणी रविवारी रात्रीपासून शेतकरी बँकेच्या बाहेर मुक्कामी आले होते. तर काही ठिकाणी पहाटे पासून रांगा लागल्या होत्या.
यावर्षी पावसाळ्याच्या दोन महिन्यात केवळ सतरा दिवस पाऊस पडला तर ४४ दिवस कोरडे गेले. त्यामुळे यंदा पावसाअभावी पिके अडचणीत आली असल्याचे चित्र आहे. अनेक भागात खरीप पिकांनी माना टाकल्या आहेत. अशावेळी पीक विमा एक आधार वाटत असल्याने शेतकऱ्यांचा ओढा विमा भरण्याकडे वाढला. शेवटच्या आठवड्यात तर बीड जिल्ह्यात दगडफेकीची घटना घडली. अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावून पीक विमा भरून घ्यावा लागला. शेवटच्या दिवशी काही ठिकाणी दोन किलोमीटर शेतकऱ्यांच्या रांगा होत्या. तरीही काही शेतकऱ्यांना रिकामे हाताने परत जावे लागले. जिल्हाभरात पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढण्यासाठी मुदत वाढ मिळाली असल्याची अफवा समाज माध्यमातून फिरत होती. शेतकरी अफवेसंदर्भात चौकशी करीत होते. मात्र, ही शेवटी अफवा अफवाच ठरली. कृषी विभागाकडे मुदतवाढ झाल्याचे कुठलेही अधिकृत पत्र प्राप्त झाले नसल्याचे जिल्हा कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

मुदत न वाढल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड
परभणी - शेवटच्या टप्यात पीक विमा भरण्यासाठी शेतकरी सरसावल्याने सर्व जिल्हा बँकांच्या शाखांवर शेतकऱ्यांची गर्दी झाली आहे. सोमवारी (३१ जुलै) विमा भरण्याची शेवटची तारीख असल्याने जिल्हा बँकेसह हैदराबाद आणि महाराष्ट्र बँकेच्या शाखा तसेच ई-महासेवा केंद्रांवर शेतकऱ्यांनी विमा भरण्यासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. मात्र, सायंकाळी वेळ संपताच अनेक बँकांनी शटर डाऊन केल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी विम्यापासून वंचित राहिले.
परभणी जिल्ह्यातील केवळ एकट्या जिल्हा बँकेत सुमारे एक लाख पाच हजार शेतकरी खातेदार आहेत. याहुनही अधिक शेतकऱ्यांचे राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांमध्ये खाते आहेत. सुमारे अडीच ते तीन लाख शेतकर् शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी तोडका कालावधी मिळाला. ज्यामुळे परभणी तालुक्यासह सेलू, मानवत, पूर्णा, गंगाखेड, पाथरी, सोनपेठ, जिंतूर, पालम आदी तालुक्यांमधील जिल्हा बँकांच्या शाखांमध्ये गेल्या आठवडाभरापासून पीक विम्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. शेवटच्या क्षणापर्यंत पीक विमा भरण्याची मुदत वाढून मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र सोमवारी उशिरापर्यंत शासन स्तरावरून कुठलेही आदेश निघाले नाहीत. ज्यामुळे परभणी जिल्ह्यातील सुमारे ५० हजार शेतकरी अद्यापही पिक विमा भरण्यापासून वंचित राहिल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.




नांदेडमध्ये गर्दीच गर्दी
नांदेड - पीक विमा भरण्याचा सोमवारी शेवटचा दिवस असल्याने नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकासमोर गर्दी केली होती. नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक बँकेपुढे गेल्या चार दिवसापासून रांगा असल्याचे चित्र पाहायवास मिळते. यावेळेसही पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ मिळेल असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र, रात्री उशीरापर्यंत त्यावर कसलाच निर्णय झाला नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात होती.
शेतकऱ्यांनी रविवारी रात्रीपासून बँकेच्या बाहेर मुक्कामी होते. तर काही ठिकाणी पहाटे पासून रांगा लागल्या होत्या. पीक विमा भरण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असल्याने मोठी गर्दी दिसत होती. नांदेड जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात दगडफेकीचे प्रकार घडल्याने सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

उस्मानाबादमधील शेतकरी वंचित
नांदेड - पीक विमा भरण्याचा सोमवारी शेवटचा दिवस असल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बँकासमोर गर्दी केली होती. मात्र, काही जण पीक विमा भरण्यापासून वंचित राहावे लागेल असे चित्र होते. शेतकऱ्यांनी केलेल्या गर्दीमुळे बँकेच्या परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते. याठिकाणी पीक विमा भरण्यासाठी बँका रविवारी सुरू होत्या. सोमवारी पण बँकापुढे मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. उस्मानाबाद जिल्ह्यात पीक विमा भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत ३ लाख ५६ हजार पैकी ३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा भरल्याची अधिकृत माहिती जिल्हा कृषी अधीक्षक शिरीष जमदाडे यांनी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. जवळपास ५० हजार शेतकऱ्यांचा पीक विमा भरणे अद्याप बाकी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images